Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘वैधमापनशास्त्र’च्या दारी ‘मापा’त चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

बोगस व कमी वजनाची वजन-मापे वापरून मसाला विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला दोन नागरिकांनी शुक्रवारी पकडल्याची घटना नाशिकरोड येथे घडली. वजन-मापे वैधमापनशास्त्र उपसंचालक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावरच हा प्रकार उघडकीस आल्याने वजन-मापे वैधमापन निरीक्षक व उपसंचालक कार्यालयातील अधिकारीही या ‘मापाच्या पापाकडे’ डोळेझाक करीत असल्याचे उघड झाले आहे.

नाशिकरोड येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ किसन उगरे गेल्या २५ वर्षांपासून मसाल्याचा पदार्थांची विक्री करतात. त्यांचे आजोबा व वडीलही मसाला व्यापारीच होते. शहरातील संपत हारक व सचिन सोनवणे (रा. जेलरोड) या तरुणांनी किसन उगरेंकडून मसाला खरेदी केला. मात्र, त्यांना घेतलेल्या मसाल्याच्या वजनाबाबत संशय आल्याने त्यांनी तातडीने इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर घेतलेल्या मसाल्याचे वजन केले असता ते खूपच कमी भरले.

या दोघांनी पुन्हा उगरेंकडे जाऊन त्यांच्याकडील एक किलोचे वजन-माप ताब्यात घेतले व ते इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर तपासले असता ते केवळ ७५० ग्रॅमच भरले. यावरून प्रत्येक किलोमागे २५० ग्रॅम मसाला ग्राहकांना कमी देऊन ग्राहकांची फसवणूक होत असल्याची त्या दोघांची खात्री झाल्यावर त्यांनी या व्यापाऱ्याकडील बोगस व कमी वजनाचे वजन-माप घेऊन सरळ नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण पोलिस ठाण्याबाहेरच मिटवले गेले.

--

२५ वर्षांपासून फसवणूक!

किसन उगरे या मसाला विक्रेत्याकडून या कमी वजनाच्या वजन-मापाचा वापर गेल्या २५ वर्षांपासून सुरू असल्याचे त्याने स्वतःच कबूल केले. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून मसाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

--

व्यावसायिकांकडे दुर्लक्ष

शहरातील रस्त्यांच्या कडेला हजारो व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यातील बहुतांश व्यावसायिक वजन-मापे वापरतात. या सर्व व्यावसायिकांना त्यांच्याकडील वजन-मापे प्रमाणित करून घेणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र, यातील बहुतांश व्यावसायिक आपल्याकडील वजन-मापे प्रमाणित करून घेत नाहीत आणि असे असूनही वजन-मापे व वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन दिवसांतच गतिरोधक ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अजब कारभाराचे किस्से नाशिककरांना नवीन नाहीत. भाभा नगर येथील सह्याद्री हॉस्पिटल ते कॅमल हाऊस या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येऊन पाच ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले होते. मात्र दोन दिवसानंतर तो पुन्हा खरडून टाकण्यात आल्याने रस्ता पुन्हा खराब झाला आहे. ज्यांनी गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती त्यांच्याकडून या रस्त्याचा खर्च वसूल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मुंबई नाका ते कॅमल हाऊस हा रस्ता सकाळी आणि सायंकाळी अत्यंत गजबजलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याने रस्ता नवीन होऊनही त्याचे ग्रहण सुटलेले नाही. सह्याद्री हॉस्पिटलपासून कॅमल हाऊसकडे जाताना दोन ठिकाणी त्यानंतर पाटीदार भवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि कॅमल हाऊसच्या मागे जनरल अरुणकुमार वैद्य नगराच्या समांतर असलेल्या रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात आले.

मुळातच हा मार्ग अरुंद असून त्यातुलनेत रहदारी जास्त आहे. तसेच या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्याने वाहने जास्त वेगाने जात नाही. या मार्गावर रोजच्या पेक्षा जास्त वाहतूक कोंडी होऊ लागल्याने स्पीड ब्रेकरचा फटका अनेक वाहनधारकांना बसल्याने रविवारी तो तातडीने काढण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुंद रस्त्यांनी वाहतुकीचा खोळंबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येत वाहनांची संख्याही वाढली आहे. वाढलेल्या वाहनांमुळे रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यातच कॉलनी भागात अरूंद झालेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात रस्त्यालगत होत असलेली वाहने पार्किंगही हटविण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. रोजच वाहतूक कोंडीत भर म्हणून महामंडळाच्या बसेसलाही वळणावर त्याचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

सातपूर भागातील वाढलेल्या लोकवस्तीत अरूंद झालेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी रोजची आहे. कॉलनी रोडवर रस्त्यालगत उभ्या राहत असलेल्या वाहनांमुळे चारचाकी वाहनांना समोरासमोर जाताना खडतर प्रवास करण्याची वेळ येते. त्यातच शहर वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसलादेखील अरुंद रस्त्यांचा त्रासाला सामोरे जावे लागते. या भागात अनेक ठिकाणी सर्रासपणे रस्त्यालगत वाहने उभे केली जात असल्याने त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. यात महामंडळाच्या बसेसचे रुंदीने मोठ्या असल्याने वळण घेताना रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमुळे चालकांना त्रास सहन करण्याची वेळ येते.

---------------------

बसेसला रस्त्यालगतच्या वाहनांच्या पार्किंगचा त्रास होतो. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर महापालिका व वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज आहे.

-प्रमोद सोनवणे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड जेल होणार आणखी अभेद्य

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

ब्रिटिशांनी १९२७ मध्ये बांधलेल्या नाशिकरोड सेंट्रल जेलची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी येरवडा जेलप्रमाणे दुहेरी तटबंदी केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, लवकरच कार्यवाही होईल, अशी अपेक्षा नवीन कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

नावीन्यपूर्ण उपक्रम व महसुलात नाशिकरोड जेल राज्यात आघाडीवर आहे. तथापि, कैदी पलायन, खून, मारामारी, कैद्यांकडे सातत्याने मोबाइल व अमली पदार्थ सापडणे अशा घटना घडत असल्याने जेलची बदनामी होते. जेलमध्ये कैद्यांची वाढलेली प्रचंड संख्या व तुलनेत तोकडे मनुष्यबळ हे त्यामागील खरे कारण आहे. त्यामुळे कोम्बिंग ऑपरेशन करून एकूण ४७ जॅमर, तसेच सीसीटीव्ही बसवून, कर्मचारी निलंबन, कैदी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करूनही प्रश्न सुटलेले नाहीत.

--

का होतात घटना?

कर्मचारी बारा तास ड्युटी करीत असतानाही नाशिकरोड जेलमध्ये अशा घटना का घडतात, हे पाहणे गरजेचे आहे. या जेलचा परिसर २२५ एकर इतका मोठा आहे. कैदी क्षमता कमाल तीन हजार आहे. २००९ पूर्वी दीड हजार कैदी होती. आता तब्बल ३२०३ कैदी आहेत. या कैद्यांसाठी दोनच डॉक्टर असून, त्यात महिला कैद्यांसाठी महिला डॉक्टरच नाही. एक बराकीत एक कैदी असायचा आता तीन आहेत. त्यांच्यासाठी फक्त सव्वाशे कर्मचारी होते. तीन महिन्यांपूर्वी कसेबसे ७० कर्मचारी (त्यात तीस महिला) भरल्याने ही संख्या दोनशेवर गेली आहे. सहा कैद्यांमागे एक कर्मचारी असे प्रमाण आहे. एकूण पाचशे कर्मचारी आवश्यक आहेत. अधीक्षक, उपअधीक्षकांच्या दोन आणि वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांच्या दोन जागा आहेत. यापैकी एक रिक्त आहे. अतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाच जागा असून, तीन रिक्त आहेत. जेलरच्या १८ जागा असून, तीन रिक्त आहेत. हवालदार, सुभेदारच्या २४५ जागा असून, नऊ रिक्त आहेत. सुरक्षेसाठी ३० होमगार्डची मदत घेण्यात आली होती. मात्र, त्यांची संख्या कमी करावी लागली.

--


तब्बल ६३ एकरचा तट

नाशिकरोड जेलमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये ४० मोबाइल-सीमकार्ड सापडल्याची घटना घडली होती. जेलला सर्व बाजूंनी मिळून ६३ एकरचा तट आहे. तटाची उंची २२ फूट आहे, तरीही तटावरून आतमध्ये मोबाइल फेकले जातात. एक कैदी तटाला टॉवेलचा दोर आणि बादलीची रिंग करून फरार झाला होता. कर्मचारी कमी असल्यामुळे ३५ पॉइंट रिक्त आहेत. अधीक्षक राजकुमार साळी यांनी सांगितले, की चार्ज घेतल्यानंतर तटाचे सर्वेक्षण केले, तेव्हा तटावरून मोबाइल आत फेकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. तटालगत शेती असल्याने फेकलेले मोबाइल लगेच सापडत नाहीत. त्यामुळे तटालगतची शेती बंद करण्यात येणार आहे. तटावर महिला सुरक्षारक्षक नेमले आहेत. शिस्त व पारदर्शी कारभारावर भर देण्यात आला आहे.

--

अवाढव्य नाशिकरोड जेलच्या समस्यांचा अभ्यास करून व जुन्या घटनांचा आढावा घेऊन येरवडा जेलप्रमाणे दुहेरी तटबंदीचा प्रस्ताव दिला आहे. जुन्या व नव्या तटात तीस फुटांचे अंतर असेल. दुहेरी तट झाल्यास अनेक गैरप्रकारांना आळा बसेल.

-राजकुमार साळी, मुख्य कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७१८ उमेदवारांनी दिली परीक्षा

$
0
0

लवकरच अंतिम यादी प्रसिध्द होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील १६९ रिक्त जागांसाठी तब्बल दोन हजार ७१८ उमेदवारांनी रविवारी लेखी परीक्षा दिली. मुलाखतीचा प्रकार वगळण्यात आला असून, लेखी परीक्षेचा निकाल फारतर २४ तासांत प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. शहर व ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठी तब्बल २७ हजारांपेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले होते.

शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाई व बॅण्डसमन पदाच्या रिक्त जागांपैकी शासन आदेशानुसार ७५ टक्के म्हणजेच अनुक्रमे ७९ व १८ जागांसाठी ही भरती प्रकिया राबविली गेली. ग्रामीण पोलिस दलासाठी याच निकषाने ७२ जागांची भरती प्रक्रिया आडगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडली. यासाठी २४ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली होती. १६ मार्चनंतर त्यात तीन दिवसांची वाढ करण्यात आली. २० मार्च रोजी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी दोन्ही मिळून जवळपास २७ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. २२ मार्च रोजी सकाळी पाच वाजेपासून मैदानी परीक्षा सुरू झाली होती. साधारणतः दररोज एक हजार उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी पाचारण करण्यात आले.

शहर पोलिसांनी पोलिस मुख्यालयातील मैदानासह गंगापूररोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाच्या रस्त्यावर मैदानी परीक्षा घेतली. ग्रामीण पोलिसांनी आडगाव मुख्यालयाच्या मैदानावर हे काम पार पाडले. एकूण रिक्त जागा आणि मैदानी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी शहर पोलिस दलाने दोन हजार १३९ उमेदवार पात्र ठरवले. तर, ग्रामीण पोलिस दलासाठी एक हजार ५१८ उमेदवारांना पाचारण करण्यात आले. शहर पोलिस दलाने लेखी परीक्षेचे आयोजन मुख्यालयाच्या मैदानावर केले होते. विशेष म्हणजे उमेदवारांना बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण एक हजार ६६९ विद्यार्थी हजर राहिले. ग्रामीण पोलिस दलाच्या लेखी परीक्षेसाठी एक हजार ४९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

दोन तासांत उत्तरतालिका, तर २४ तासांत निकाल

परीक्षा झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत उत्तरतालिका नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली. तसेच, ही उत्तर तालिका www.mahapolice.gov.in या वेबसाईटवरदेखील प्रसिध्द करण्यात आली आहे. परीक्षेचा अंतिम निकाल फारतर २४ तासांत प्रसिध्द होण्याची शक्यता असून, अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नावे लागलीच संबंधित मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुक हॅक करून मोबाइल रिचार्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुक अकाउंट हॅक करून एका भामट्याने फुकटात मोबाइल रिचार्ज करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश देवाजी गांगुर्डे (वय ३६, रायगड चौक, शिवनेरी गार्डन शेजारी, पवननगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

मोबाइलमधील फेसबुक अकाउंट हॅक करण्याचा प्रकार १५ एप्रिल रोजी पावणे नऊ वाजेच्या सुमारास झाला. या दरम्यान, गांगुर्डे मुंबई नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर ते घरी परतले. या वेळेत कोणीतरी त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले. तसेच फेसबुकवरील सर्व मित्रांना मोबाइलवर अर्जंट रिचार्ज मारण्यास सांगितले. काही नातेवाईकांनी लागलीच ८४७ रुपयांचे रिचार्ज मारले. घरी पोहोचल्यानंतर हा प्रकार गांगुर्डे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच अंबड पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक वाबळे करीत आहेत.

सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर येणाऱ्या काही मेसेजमुळे अनेकांची फसवणूक होत आहे. यात आर्थिक लुटीसह बँक अकाउंट हॅक केले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. तरी पोलिसांनी तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी एकनिष्ठ युवा फाउंडेशनने केली आहे. याबाबत सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अनिल पवार यांना फाउंडेशनतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश गांगुर्डे, अविनाश सूर्यवंशी, मनीष सोनवणे, यश खैरनार, उपाध्यक्ष अमोल कदम, सचिव योगेश आहिरे आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅपद्वारे बदनामी

अडकलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे धुळे येथील दोघा संशयितांनी एकाची अश्लिल बदनामी केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मयूर विजय टाटिया (पाटील पार्क, जुना गंगापूर नाका, डोंगरे मैदानासमोर) यांनी फिर्याद दिली. टाटिया यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील नितील बापूराव देसले आणि लिलाबाई जी. पवार यांच्याविरोधात आयटी अॅक्टच्या कलम ५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी त्यांच्याकडील मोबाइलच्या मदतीने फिर्यादी, त्याच्या आई-वडील व मयत बहिणींबाबत अश्लिल मजकूर असलेले पत्रक प्रसारीत केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर टाटिया यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट स्वाक्षरीने सव्वाचार लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यूजर आयडी आणि पासवर्डचा दुरूपयोग करीत लेखापालाने तब्बल चार लाख ३८ हजार ८९७ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी सिन्नर येथे राहणाऱ्या सोपान गणपत खांदवे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

युनिव्हर्स कम्युनिकेशन ऑफीसमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी अशोक ब्रह्मदेव रहाणे (वय ४६, मेघराज अंबर अपार्ट. गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली. रहाणे यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी खांदवे कार्यालयात अकाउंटचे काम पाहत होता. नोव्हेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत खांदवेने एसबीआय बँकेतून टीएफ फंड ट्रान्सफरसाठी आवश्यक असलेला एससीआयचा यूजर आयडी व पासवर्डचा दुरूपयोग करीत रहाणे यांची बनावट स्वाक्षरी करून कार्यालयातील कागदपत्रात फेरफार केला. तसेच पगाराच्या ताळ्यात फेरफार करून वाढीव पगार दाखवून चेकवर हुबेहूब स्वाक्षऱ्या करून चार लाख ३८ हजार ८९७ रुपये काढून घेतले. फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्यानंतर रहाणे यांनी चौकशी करून पोलिस स्टेशन गाठले. घटनेचा अधिक तपास पीएसआय पवार करीत आहेत.

दाम्पत्यावर गुन्हा

१८ वर्षीय युवतीचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार फर्नांडीसवाडी येथे घडला. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, २ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नितीन विक्रम बेद (वय ३२) व त्याची पत्नी अनिता (दोघे रा. फाल्वर लाइन, फर्नांडीसवाडी, जयभवानीरोड) पीडित युवतीच्या घरात घुसले. यावेळी नितीनने पीडित मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घटनेचा अधिक तपास पीएसआय एस. डी. तेली करीत आहेत.


चालत्या कारवर दगडफेक

अज्ञात समाजकंटकांनी चालत्या कारवर अचानक केलेल्या दगडफेकीमध्ये कारची काच फुटून आत बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्यास दुखापत झाली. हा धक्कादायक प्रकार अंबड टी पॉईंट येथील महाराष्ट्र बँकेजवळ १५ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडला.

शबाना हुसेनअली मोगल (वय ३२, साईनगर, एकलहारा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेच्या वेळी शबाना मोगल, त्यांचे पती हुसेन अली मेहबूब अली मोगल आणि त्यांच्या दोन मुली असे चौघे कारने (एमएच ०६, एडब्लू ६७८६) मुंबई ते नाशिक असा प्रवास करीत होते. त्यांची कार महाराष्ट्र बँकेसमोर पोहोचली असता अज्ञात समाजकंटकांनी अचानक दगडफेक सुरू केली. कार वेगात असल्याने लागलीच कारची काच फुटली. तसेच आत बसलेल्या शबाना यांच्या उजव्या डोळ्यास दुखापत झाली. यामुळे घाबरलेल्या मोगल कुटुंबीयांनी लागलीच अंबड पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी कलम ३३७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार उघडे करीत आहे.

पवननगरला घरफोडी

बंद घराचे कुलूप कापून चोरट्यांनी तब्बल ९२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना वर्दळीच्या सिडको परिसरातील पवनगर येथील अक्षय चौक येथे १५ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. संगीता राजेंद्र आहेरराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप कापून घरात प्रवेश केला. तसेच सव्वातीन तोळे वजनाची सोन्याची पोत, रोख रक्कम आणि देवाच्या चार मूर्ती असा तब्बल ९२ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. वर्दळीच्या परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील सर्वच भागात घरफोडींचे सत्र सुरू असून, चोरटे मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत आहेत.

तरुणाची आत्महत्या

विषारी औषध प्राशन करीत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १५ एप्रिल) बागवानपुरा येथे घडली. कादीर इब्राहिम खान (वय ३७) असे या व्यक्तीचे नाव आहे. रात्री साडेबारा वाजता कादीर खान याने राहत्या घरात विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास तत्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांवर उन्हाचीच हुकूमत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून, गेला आठवडाभर नाशिककर रणरणत्या उन्हाचा दाह सहन करीत आहेत. उन्हाच्या असह्य झळांमुळे रविवारची सुटी घरामध्येच घालविण्यास नाशि‌ककरांनी प्राधान्य दिले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

झोडपून काढणारा पाऊस, हुडहुडी भरविणाऱ्या गारठ्याचा नाशिककरांनी यंदा मनसोक्त अनुभव घेतला. प्रत्येक ऋतू नाशिकवर मेहेरबान होत असल्याचा शहर आणि जिल्हावासीयांचा आजवरचा अनुभव आहे. एकाच पावसाळ्यात दोन मोठे पूर अनुभवणाऱ्या नाशिककरांनी चार अंशांपर्यंत खाली आलेल्या थंडीचाही अनुभव घेतला. आता चैत्रातील उन्हाचा तडाखा नाशिककरांना सहन करावा लागत आहे. जिल्हाभरात गेला महिनाभर सातत्याने तापमानात चढ-उतार सुरू होती. परंतु, १२ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली उतरलेला नाही. तापमानाने एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच चाळिशी ओलांडली असून, उन्हाच्या तप्त झळा आतापासूनच असह्य होऊ लागल्या आहेत. १२ ते १४ एप्रिल या कालावधीत नाशिकचे कमाल तापमान अनुक्रमे ४०.७, ४०.९ आणि ४१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. हेच तापमान गेले दोन दिवस अनुक्रमे ४०.१ आणि ४० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे १८ एप्रिलपर्यंत हे तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यानच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने, तसेच पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यापेक्षा यंदाही मालेगावात तापमानाचा पारा अधिक वर चढला आहे. ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान येथील तापमान राहिले आहे. १८ एप्रिलपर्यंत हे तापमान याचदरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे

--

उन्हापासून स्वत:ला वाचविण्यासाठी शक्यतो दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत बाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. या ऋतूमधील कलिंगड व अन्य रसदार फळे, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, नारळपाणी, विविध प्रकारचे सूप यांसारख्या द्रवपदार्थांचे आवर्जून सेवन करावे. वाळा, सब्जाबीज यांचे सेवनही आरोग्यास फायदेशीर ठरेल. डोळे, त्वचेच्या रक्षणासाठी गॉगल, टोपी, रुमालचा वापर करावा.

डॉ. योगेश सदगीर

--

गत सहा दिवसांतील तापमानाची स्थिती

दिनांक तापमान

११ एप्रिल ३९.९

१२ एप्रिल ४०.७

१३ एप्रिल ४०.९

१४ एप्रिल ४१.०

१५ एप्रिल ४०.०

१६ एप्रिल ४०.१

--

आगामी सहा दिवसांबाबतचा अंदाज

दिनांक तापमान

१७ एप्रिल ४१.०

१८ एप्रिल ४१.०

१९ एप्रिल ४०.०

२० एप्रिल ३९.०

२१ एप्रिल ३८.०

२२ एप्रिल ३७.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंद उद्योगांना संजीवनी कधी?

$
0
0

औद्योगिक भूखंडांचे भाव वाढविण्यात सरकारला रस का?; उद्योजकांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरात असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत. यामुळे बंद पडलेल्या उद्योगांना नवसंजीवनी कधी मिळणार, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक भूखंडांचे भाव वाढविण्यातच सरकारला रस आहे का, असाही प्रश्न उद्योजक उपस्थित करत आहेत. उद्योग मंत्री सुभाष देसाई ‘नाईस’ सभागृहाच्या उद्घाटनाप्रंसगी बंद असलेल्या कारखान्यांचे भूखंड तात्काळ ताब्यात घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजतागायत एकही भूखंड एमआयडीसीने ताब्यात घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्रा’ची घोषणा भाजप सरकारने दिली होती. परंतु, प्रत्यक्षात भाजप सरकारने दिलेली घोषणा नाशिकमध्ये अंमलात कधी येणार, हाच खरा प्रश्न आहे. नाशिक शहरात असलेल्या सातपूर व अंबड एमआयडीसीत असलेले अनेक कारखान्यांचे भूखंड बंद अवस्थेत आहेत.

उद्योगांचे भिजत घोंगडे

केंद्रात व राज्यात भाजप व शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे साहजिकच महत्त्वाचे निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेण्याची गरज होती. परंतु, नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या उद्योगांचे भिजत घोंगडे आजही पडून आहे. त्यातच काही गुंतवणूकदारांकडून न्यायालयात धाव घेतल्याने औद्योगिक भूखंडांचे भाव वाढते ठेवण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही उद्योजकांकडून केला जातो. यावर सरकारच्या उद्योग विभागाने बंद असलेल्या उद्योगांचे भूखंड तात्काळ ताब्यात घेत गरजू उद्योजकांना द्यावेत अशी मागणी होत आहे.

उद्योगमंत्र्यांनी लक्ष द्यावे

दरम्यान, उद्योग मंत्री सुभाष देसाई नाईस सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी बंद असलेले भूखंड शासन ताब्यात घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु, अजुनही नाशिक शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक भूखंड धुळखात पडून आहेत. त्यातच काही गुंतवणूक दारांकडून भूखंडांचे दर वाढविण्याचा गोरखधंदा पहायला मिळतो. याकडे उद्योग मंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी तरुण उद्योजकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थानच्या कारभारात ढवळाढवळ करू नये

$
0
0

विश्वस्त यादवराव तुंगार यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहातील पार्वतीमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठेबाबात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार डॉ. बिंदू महाराजांना अथवा आखाडा परिषदेस नाही. अशा प्रकारे देवस्थान ट्रस्टच्या कारभारात बाहेरच्या व्यक्तींनी ढवळाढवळ करून वाद निर्माण करू नये, अशी मागणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा विश्वस्त यादवराव तुंगार यांनी केली आहे.

डॉ. बिंदू महाराज यांनी आखाडा परिषेदची बैठक घेऊन पार्वतीची मूर्ती ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्र ट्रस्टला प्राप्त झाल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष आणि देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यादवराव तुंगार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी काळजी घेण्याचे आखाडा परिषदेला आवाहन देखील केले आहे.

देवस्थान ट्रस्टच्या नियमांमध्ये ढवळाढवळ केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधणार आहोत. विश्वस्त मंडळात काही विषयांबाबत किरकोळ मतभेद असू शकतात. मात्र याबाबत बाहेरच्या व्यक्तींनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, असे तुंगार यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्या समवेत तुंगार मंडळी, ट्रस्टचे दिलीप तुंगार, महेंद्र तुंगार उपस्थित होते.

देवस्थान सार्वजनिक मालमत्ता

डॉ. बिंदुजी महाराज यांनी आपली बाजू मांडताना सांगितले, की देवस्थान ही कोणाची खासगी मालमत्ता नसून, सार्वजनिक मालमत्ता आहे. खंडित मूर्ती आम्ही बदलू शकतो व त्यानंतर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला देवस्थान ट्रस्ट जबाबदार राहील.

मूती बसविण्यासाठी पुन्हा परवानगी कशासाठी?

त्र्यंबकेश्वर : पार्वतीमातेची मूर्ती बसवण्याची परवानगी किती वेळेस मागावी याचेसुद्धा त्र्यंबकेश्वर सार्वजनिक विश्वस्थांना भान राहिलेले नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने ही परवानगी विश्वस्थ ललिता शिंदे यांना यांना दीड वर्षापूर्वी दिलेली आहे. त्यानंतर तुंगार ट्रस्ट यांनासुद्धा तसे पत्रानुसार कळवले आहे. त्यानुसार तुंगार ट्रस्टनी पार्वतीची मूर्ती पण बनवली आहे. तरी पण त्र्यंबकेश्वर मंदिरात पार्वतीची प्राणप्रतिष्ठा नाकारण्याचे हेतूपुरस्सर प्रयत्न कसे केले जात आहेत. दोन ट्रस्टमधील अंतर्गत हेवेदावे किती विकोपाला नेऊन ठेवले आहेत याचे हे उत्तम उदाहरण. ट्रस्ट हे येथील त्र्यंबकेश्वराचे पावित्र्य राखण्यासाठी निर्माण झाले की स्वतःच्या प्रतिष्ठतेसाठी हेच कळत नाही, असे ललिता शिंदे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात आज नो हॉकिंग डे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉर्न वाजविण्याच्या सवयीमुळे शहरातील ध्वनिप्रदूषण वाढते आहे. त्यास आळा घालण्यासाठी शहर पोलिस आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत दर सोमवारी नो हॉकिंग डे साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या दिवशी हॉर्न न वाजवता कोणीही या मोहिमेत सहभागी होऊ शकतो. या मोहिमेचा हा दुसरा आठवडा असून, नाशिककरांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

गर्दीतून मार्ग काढताना हॉर्न वाजवण्याची सवय वाहनचालकांमध्ये इतकी भिनली आहे की मोकळा रस्ता असताना अनेक वाहनचालक हॉर्न वाजवतात. वाहनचालकांच्या या सवयीमुळे शहरात ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढते आहे. तसेच याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आणि शहरातील काही सामाजिक संघटना, शाळा कॉलेज एकत्र आले असून, प्रत्येक सोमवारी नो हॉन डे साजरा करण्यात येणार आहे. गत आठवड्यात या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बरोबर अनेक शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सिग्नल्स आणि चौकात या बाबत जनजागृती केली.

शहर पोलिस, सामाजिक संघटना, विविध शाळा-कॉलेजच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू झाली असून, दर सोमवारी नाशिककरांनी त्यास प्रतिसाद दिल्यास चांगले परिणाम दिसून येतील. या दिवशी शहरातील प्रमुख ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जाईल. जास्तीत जास्त नागरिक या मोहिमेत सहभागी झाल्यास ध्वनी प्रदूषणाची समस्या नक्की मार्गी लागेल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मे महिना एन्ट्रन्सचा!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीचा टप्पा ओलांडल्यानंतर दर्जेदार करिअरसाठी विद्यार्थ्यांनी गत वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे. या वर्षभराच्या तयारीनंतर आता पुढच्या महिन्यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एन्ट्रन्स परीक्षांचे पॅक शेड्यूल आहे. विविध अभ्यासक्रमांसाठीच्या एन्ट्रन्स एकामागोमाग ओळीने आल्याने मे महिना एन्ट्रन्सचा असणार आहे.

गेल्या वर्षापासून मेडिकल कॉलेजमधील प्रवेशांसाठी जिव्हाळ्याची बनलेली ‘नीट’ (नॅशनल इलीजिबीलिटी कम एन्टरन्स टेस्ट) परीक्षा यंदा ७ मे रोजी होणार आहे. यंदा या परीक्षेसाठी नाशिकमध्ये अगोदरपासूनच केंद्र आहे. यंदा राज्यात या केंद्रांच्या यादीत नवीन चार केंद्र समाविष्ट झाले आहेत. या केंद्रांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. या परीक्षेची प्रवेशपत्र वेबसाइटवर उपलब्ध झाली असून ७ मे ला होणाऱ्या या परीक्षेचा निकाल ८ जूनला जाहीर होणार आहे.

नवी दिल्लीतील एआयआयएमएस (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) च्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा यंदा २८ मे २०१७ रोजी होणार आहे. एम्सच्या अंतर्गत येणाऱ्या सात प्रमुख संस्थांसाठी या परीक्षेद्वारे प्रवेश होतो. यात एमबीबीएस, एमडी, नर्सिंग, फार्मास्यूटिकल, हेल्थ सायन्स आदी विषयांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी या एन्ट्रन्सनंतर खुले होतात. या परीक्षेचे प्रवेशपत्र ५ मे रोजी उपलब्ध होणार असून १४ जूनला परीक्षेचा निकाल लागणार आहे.

विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा

इंजीनिअरिंग, फार्मास्युटिकल आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणारी सीईटी ११ मे रोजी होणार आहे. यासाठी २५ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होऊ शकतील. या परीक्षेचा निकाल ५ जून नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्यएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेतील प्रवेशासाठी जेआयपीएमईआर ही परीक्षा ४ जूनला पार पडेल. यासाठी २२ मे पासून प्रवेशपत्र उपलब्ध होतील. याचा निकाल १९ जूनला जाहीर होणार आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत प्रवेशांसाठी ‘नेस्ट’ (एनइएसटी) परीक्षा २७ मे रोजी होणार आहे. यासाठी शुक्रवारपासून प्रवेशपत्र मिळण्यास सुरुवात झाली असून १६ जून रोजी परीक्षेचा निकाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉगिंग ट्रॅकचे पालटणार रुपडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जॉगिंग ट्रॅकचे भाग्य लवकरच उजळणार असून, अंधाराचे साम्राज्य असलेल्या या ट्रॅकवर एलईडी लाइट लावण्यात येणार आहेत. तसेच, काही ट्रॅकवरची जुनाट झालेली साउंड सिस्टिम बदलण्यात येणार असून, नव्या पद्धतीची डिजिटलाइज्ड साउंड सिस्टिम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व जॉगिंग ट्रॅकचे रुपडे पालटणार आहे.

शहरातील बहुतांश जॉगिंग ट्रॅकवर अंधाराचे साम्राज्य पसरल्याने महिलांना फिरणे अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडून नेण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना करावी, अशी सूचना शहर पोलिसांनी महापालिकेला केली होती. परंतु, महापालिका निवडणूक असल्याने या कामाला फारशी गती मिळू शकली नव्हती.

शहरातील अनेक जॉगिंग ट्रॅकवर काही दिवसांच्या विसाव्यानंतर पुन्हा नव्याने गर्दी होऊ लागली आहे. यात इंदिरानगर, कृषिनगर, डीजीपीनगर, पंचवटी, उपनगर, नाशिकरोड इत्यादी जॉगिंग ट्रॅकचा समावेश आहे. हिवाळ्याच्या कालावधीत जास्त थंडी असल्याने फिरणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. हिवाळा संपताच उन्हाळ्याच्या पहिल्या पर्वात उष्णतेने कहर केल्याने त्या कालावधीतही लोक जॉगिंग ट्रॅकवर येत नव्हते. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका असल्याने जॉगिंग ट्रॅकच्या देखभालीकडे महापालिका कर्मचाऱ्यांचा काणाडोळा झाला होता. निवडणुका संपताच कर्मचारी आपल्या जागी पुन्हा परतले असून, जोमाने कामाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांनीही कामाचा धडाका सुरू केला असून, जॉगिंग ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे.

--

...अशी झालीय तरतूद

लवाटेनगर येथील जॉगिंग ट्रॅकवर पथदीप व्यवस्था व वॉचमन रुमच्या विद्युतीकरणाच्या कामाचे नऊ लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रॅकवर असलेली साउंड सिस्टिम निकामी झाली असून, ती बदलण्यासाठी दहा लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे. प्रमोद महाजन गार्डनमधील नादुरुस्त लाइट दुरुस्त करून इलेक्ट्रिकची कामे करण्यासाठी आठ लाखांचे टेंडर काढण्यात आले आहेत. पंचवटीतील वीर सावरकर उद्यानातील पथदीप बदलण्यात येणार असून, त्यासाठी पाच लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे. महापालिकेच्या कामाचे नागरिकांनी कौतुक केले असून, सुट्यांचा कालावधी लक्षात घेता ही कामे दुपारच्या वेळेत करावीत, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसची निखळली चाके...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भरधाव धावणाऱ्या बसची चाके अचानक बसपासून पूर्णतः वेगळी झाली तर... कल्पनाही करू शकत नाही पुढे काय होईल? परंतु, ही घटना प्रत्यक्षात घडली ती निफाड जवळील रसलपूर फाट्यानजीक. शनिवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर रसलपूर (ता. निफाड) फाट्याजवळ जालना-औरंगाबाद-नाशिक या अंबड डेपोच्या बसला (एमएच २०, बीएल ३१२८) अपघात झाला. या विचित्र अपघातात बसच्या मागील बाजूची चारही चाके पाट्यासह निखळून पडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत बसचालक बाळासाहेब उत्तम पैठने (अंबड डेपो) यांनी निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिककडे बस घेऊन जात असताना रसलपूर फाट्याजवळ बसपुढे चार ते पाच कुत्रे आडवे आल्याने ब्रेक दाबावा लागला. वेगात असल्याने बसला अपघात झाला. बसची मागील चार चाके पाट्यासह पूर्णतः वेगळी होऊन साधारण २० ते ३० फुटापर्यंत बसपासून अलग होऊन बाजूला पडली होती. बस रस्त्याच्या खाली निघून गेली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून बसचालक, वाहक आणि २४ प्रवाशी यांना कोणतीही इजा झाली नाही. दैव बलवततर म्हणून वाचलो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अडवून चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार अडवून एकाने महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन तोडून धूम ठोकली. कारचालकाने पाठलाग केला असता संशयित आरोपीने दगडासारखी वस्तू त्याच्या डोक्यात मारली. हा सर्व घटनाक्रम पळसे गावाजवळ १४ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला.

अशोक तायडे उर्फ अशोक वाकचौरे (वय अंदाजे ३० ते ४० वर्षे, पत्ता माहित नाही) असे संशयित आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी उत्तम खंडेराव गायकवाड (रा. त्रिकोणी गार्डनसमोर, काठे गल्ली) हे आपल्या पत्नीसमवेत कारने (एमएच ०२ बीजी ३८५९) नाशिक-पुणे हायवेने चिंचोली ते काठे गल्ली असा प्रवास करीत होते. पळसे गावाजवळील एसटी कॉलनी येथे हॉटेल विसावा ते किरण ढाब्यादरम्यान संशयित आरोपीने त्यांची कार आडवली. तसेच काही कळायच्या आत गायकवाड यांच्या पत्नीच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे आणि अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. गायकवाड यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने दगडासारख्या वस्तूने गायकवाड यांच्या डोक्यात वार केला.

गायकवाड यांनी लागलीच नाशिकरोड पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भुजबळ करीत आहेत. हायवेवर असा प्रकार प्रथमच घडला असून, आरोपीस जेरबंद करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षतोडीविरोधात आज स्वाक्षरी मोहीम

$
0
0

झाडांच्या बेकायदेशीर कत्तलीबाबत वृक्षप्रेमींचा लढा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

हायकोर्टाच्या आदेशाचा दाखला देत नाशिक महापालिकेने गंगापूररोडसह शहरात शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल केली आहे. याविरोधात वृक्षप्रेमींतर्फे आज (दि. १७) सकाळी साडेनऊ वाजता महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अश्विनी भट यांनी केले आहे. याप्रसंगी वृक्षविरोधी नेत्यांच्या दबावाखाली महापालिकेने वृक्षतोड करून कोर्टाचा कसा अवमान केला आणि पर्यावरण कसे धोक्यात आणले हे नागरिकांना पटवून दिले जाणार आहे.

या वृक्षप्रेमींच्या स्वाक्षरी मोहिमेत मिलिंद वाघ, मुकुंद दीक्षित, जगबीर सिंग, योगेश शास्त्री, श्यामला चव्हाण, सचिन मालेगावकर आदी सहभागी होणार आहेत. या स्वाक्षरी मोहिमेबरोबरच नेते आणि महापालिकेविरुद्ध न्यायालायीन लढाईही सुरू राहणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या अटींचे उल्लंघन

n झाड तोडण्यापूर्वी तज्ज्ञ समितीची संमती घेणे आवश्यक.

n झाड तोडण्यापूर्वी मनपाने वड, पिंपळ, नांद्रुकसारख्या झाडांची लागवड केलेली असावी

n महापालिकेने पुनर्रोपण केलेल्या झाडांच्या दीर्घकालीन संवर्धनाचे कृती कार्यक्रम आखला पाहिजे.

n वृक्ष तोडण्याअगोदर महापालिका क्षेत्रातील वृक्षांचे ऑडिट तज्ज्ञ समितीकडून केले पाहिजे

n वृक्ष तोडण्यापूर्वी पर्यावरणाची हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी

n रिप्लान्टेशन करण्याऐवजी झाडांचा वापर रस्ता दुभाजक, सर्कल, सुशोभित बेटे तयार करण्यासाठी करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा नियोजनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजचे बायोलॉजी विभागातील प्रा. वाय. एच. शिरसाठ यांनी कॉलेजच्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांचे नियोजन असावे, असे सांगितले. या नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. तसेच कॉलेजमधील प्रत्येक घटक विद्यार्थी-पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहील याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रा. पी. आर. बोरसे यांनी संस्थास्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मविप्र पॅटर्नची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त पाळावी असे सांगितले. तसेच नियमित उपस्थितीसाठी पालकांचा सहभाग आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. मेळाव्यासाठी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी पालकांनीही मनोगत मांडले. पालक मेळाव्याचे नियोजन वर्षातून दोनदा करावे तसेच इयत्ता अकरावीसाठी देखील पालक-शिक्षक विद्यार्थी मेळावा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. उपप्राचार्य प्रा. डी. डब्ल्यू. शेवाळे यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार अंगी बाळगावे व समाजाचा आदर्श नागरिक व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य डॉ. एस. एस. घुमरे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही वैयक्तिक, कौटुंबिक व इतर समस्येस सामोरे जावे लागत असल्यास निसंकोचपणे भेटावे तसेच कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थिती, प्रगती संदर्भात पालकांनी समक्ष भेटून माहिती घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एस. कापडणीस तर आभार प्रा. जी. व्ही. बोरसे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’विरुद्ध शेतकऱ्यांना ‘संघर्षा’चे बळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरून सिन्नर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असतानाच जिल्ह्यात दाखल होत असलेल्या संघर्ष यात्रेमुळे या महामार्गाच्या विरोधातील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता बळावली आहे. दोनच दिवसांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी या सर्व प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला असताना आता आघाडीची दिग्गज नेतेमंडळी समृद्धी महामार्गाविरोधात कुणावर तोफ डागणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्या विरोधात शेतकरी एकवटले आहेत. आपल्या वडिलोपार्जित आणि उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. इगतपुरी येथील सर्वेक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला असला तरी सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी सर्वेक्षणापूर्वीच जिल्हा प्रशासनाला जेरीस आणले आहे. सर्वेक्षणाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवडे येथील शेतकरी आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यात अलीकडेच चर्चा झाली. मात्र, जमिनी न देण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितल्याने ही बैठक निष्फळ ठरली. खासदार शेट्टी यांनी शिवडे गावाला भेट दिली असता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबद्दलचे गाऱ्हाणे त्यांच्याजवळ मांडले. शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच आता मंगळवारी संघर्ष यात्राच शिवडे गावात धडकणार आहे.

शिवडे गाव पुन्हा चर्चेत

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा राज्यात ज्या ज्या ठिकाणी पोहोचली, तेथे आघाडीच्या नेत्यांनी ज्वलंत प्रश्नांना हात घालून राज्य सरकारच्या धोरणांवर कोरडे ओढले आहेत. सरकार अडचणीत येईल आणि शेतकऱ्यांचे पाठबळ लाभेल, असे मुद्दे संघर्ष यात्रेमधील काँग्रेस- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रकर्षाने मांडत आहेत. समृद्धी महामार्गासाठी सरकारकडे असलेला हजारो कोटींचा निधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वापरावा, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी यापूर्वीच केली आहे. जिल्ह्यात समृद्धी महामार्गाला होत असलेल्या विरोधामुळे शिवडे गाव चर्चेत आले आहे. नेमके याच गावाला संघर्ष यात्रा भेट देणार असल्याने समृद्धी महामार्गाच्या विरोधाला आणखी धार चढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संपर्कसाधने वाढूनही संवाद हरवला’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जागतिकीकरणामुळे जग जवळ आले असले तरीही मूल्य व संस्कार जागतिकीरणाचे बळी ठरले आहेत. जगात संर्पकाची साधने वाढूनही संवादाचा अभाव वाढला आहे. घराघरातील नात्यानात्यांमधील संवाद खुंटला असून, मनुष्य पोटीतील भाषा बोलण्याऐवजी पोटाची भाषा बोलू लागला असल्याची खंत ख्यातनाम कवयित्री व साहित्यिक प्राचार्य डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी व्यक्त केली.

साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ साहित्यायन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी २५व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सिसिलिया कार्व्हालो बोलत होत्या. संमलेनाचे उद्घाटन आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, कवी खलील मोमीन, कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, कवी कमलाकर देसले, डॉ. व्ही. डी. पाटील, प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, साहित्यायनचे अध्यक्ष प्रा. शं. कं. कापडणीस उपस्थित होते.

डॉ. कार्व्हालो पुढे म्हणाल्या, की समाजातील संवेदनशीलता आता नाहीशी झाली आहे. जागतिकीकरणामुळे मनुष्य एकमेकांपासून दुरावला आहे. परिणामी कुटुंब व्यवस्था दुरावली आहे. समाजात घटस्फोट वाढले आहे. यामुळे समाजाला खऱ्या अर्थाने जगण्याचे व दिशा देण्याचे कार्य साहित्य करीत आहे. यामुळे साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी परिपक्वता महत्त्वाची असून, मूल्यघटक देण्यासाठी साहित्य पुढाकार घेत आहे. ढासळत्या कुटुंब व्यवस्थेत आजी हे मूल्यसंस्कार देणारे केंद्र नाहीसे झाले आहे. घरातील मोठी वडीलधारी मंडळी नसल्याने युवक दिशाहिन व भरकटत असून, तरुणांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन आत्महत्येसारखा मार्ग निवडला जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, साहित्यिकांनी यासाठी नवनवे मूल्य साहित्य बाजारात आणायला हवे.

संमेलनाचे उद्घाटक आमदार अपूर्व हिरे यांनी साहित्यायनच्या रौप्यमहोत्सवी संमेलनाचे कौतुक करून ग्रामीण भागात ही चळवळ सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त करून आमदार निधीतून साहित्यायन संस्थेसाठी निधी देण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे, ज्येष्ठ कवी खलील मोमीन यांची भाषणे झाली.

दुसऱ्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात येऊन आजचे मराठी साहित्य नवपरिवर्तनासाठी सक्षम आहे नाही याविषयावर झाले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एकनाथ पगार होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कमलाकर देसले होते. संदीप देशपांडे व सीमा सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. साहित्य संमेलनास अ‍ॅड. पंडितराव भदाणे, यशवंत अहिरे, नितीन चंद्रात्रे, अ‍ॅड. सतीश चिंधडे, बा. जी. पगार, बाबुलाल मोरे, किरण दशमुखे, सीमा सोनवणे, उषा भामरे, डॉ. शुभदा माजगांवकर, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

काव्यस्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

साहित्यायनच्या वतीने आयोजित काव्यस्पर्धेत प्रथम पुरस्कार चित्रा कुलकर्णी, द्वितीय ज्ञानेश्वर भामरे व तृतीय चारूलता केतकर यांनी पटकावला. पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी साहित्यायनच्या साहित्यायनी या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय एकात्मतेचा खंदा पुरस्कर्ता

$
0
0

बाबरी मशिदीचा ढाचा पडला त्यावेळी जे. पी. जाधव यांच्या मनात एकच काहूर माजलं. या कालावधीत अनेक ठिकाणी जातीय दंगली सुरू झाल्या. माणसं माणसाशी अशी का वागतात, या विचारांनी त्यांना भंडावून सोडलं. दंगलींसंदर्भात येणाऱ्या वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून त्यांचे मन विषण्ण झाले. यासंदर्भात आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला आणि मग भारतीय एकात्मता समितीच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून धर्मा-धर्मांत जातीय सलोखा, बंधुभाव कसा राहील यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आज वयाच्या सत्तरीतही त्यांचे कार्य अविरत सुरू असून, भारतीय एकात्मता समिती आणि जे. पी. जाधव हे एक अतूट समीकरण झाले आहे.

जे. पी. जाधव यांचा जन्म मालेगाव जिल्ह्यात झाला. वडील सरकारी नोकरीत असल्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, नांदगाव अशा बदल्यांच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पार पडले. लहान काका मुंबईला असल्याने उच्च शिक्षणासाठी वडिलांनी त्यांच्याकडे पाठ‍विले. बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना मालेगाव येथे शिक्षकाची नोकरी लागली. मात्र, या नोकरीत ते फारसे रमले नाहीत. त्यांनी गव्हाचा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान वेळ मिळत असल्याने काही ना काही सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. स्वतःच्या खिशात पैसा नव्हता. मात्र, समाजसेवा करण्याची धडपड पाहून अनेकांनी त्यांच्या कार्याला हात दिला. स्थानिक वर्तमानपत्रात एका मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीत जागा भरायच्या असल्याची जाहिरात वाचायला मिळाली. तेथे त्यांनी अर्ज केल्यावर त्यांना लगेचच रुजू करून घेण्यात आले. पुढे अनेक वर्षे या व्यवसायात ते होते. १९९२ पासून त्यांनी स्वतःच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायास प्रारंभ केला. तेव्हापासून ते या व्यवसायात आजही कार्यरत आहेत. घरातील जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर समाजकार्याला खऱ्या अर्थाने जोर आला. भारतीय एकात्मता समितीत काम करीत असल्याने २६ जानेवारी, १५ ऑगस्ट रोजी लहान मुलांमध्ये एकात्मतेची भावना रुजावी यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे बैसाखीच्या काळात शहरातील गुरुद्वारांमध्ये जाऊन तेथे कार्यक्रम सुरू केले. रमजान ईदच्या दिवशी गोल्फ क्लब येथे येणाऱ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याची प्रथा सुरू केली. बाबरी मशीद ज्यावेळी पाडली गेली त्यावेळी शहरातील वातावरण कलुषित झाले होते. अशा वेळी त्यांनी सर्वधर्मीयांची मानवी साखळी तयार करून एक आदर्श समाजापुढे निर्माण केला. ही साखळी नाशिक शहरातील अशोक स्तंभ ते मुंबई नाका इतक्या मोठ्या अंतराची होती. शहरापासून दूर असलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नाताळच्या कालावधीत सत्कार घडवून आणला. ज्या महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने समाजाला वेगळी दिशा दाखवली, अशा महिलांचादेखील दर वर्षी सत्कार करीत असतात. शहरातील अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन मोतीबिंदू शिबिरे घेतली असून, दोन हजारांच्या वर ऑपरेशन्स त्याद्वारे केली गेली आहेत. याला लागणार सर्व खर्च भारतीय एकात्मता समिती करीत असते. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या सत्काराचेदेखील सातत्याने आयोजन करीत असतात. मुलांमध्ये एकात्मतेचे बीज रोवल्यास येणारी पिढी अधिक सक्षम होईल, असे ते म्हणतात. या कामाव्यतिरिक्त त्यांनी जेसीज्, जायंट्स ग्रुप, लायन्स क्लब यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे. त्याचप्रमाणे कॉलेजरोडवरील निरामय जॉगिंग ट्रॅकचे ते अध्यक्ष असून, आजपर्यंत लाखो रुपये महापालिकेकडून मिळवून अनेक सुधारणा केल्या आहेत. नाशिक शहरात एकात्मता भवन असावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, त्याला यश आलेले नाही. जे सरकार एकीकडे राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी करीत होते, त्याच्या प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत होते, त्याच सरकारच्या काळात मान्यता मिळवण्यासाठी सरकारी बाबूंकडून पैशाची मागणी करण्यात आली. त्यामुळे एकात्मता भवन उभे राहू शकले नाही, ही खंत त्यांच्या मनात घर करून राहिली आहे. ज्या दिवशी शाळेच्या दाखल्यावरून जात आणि धर्म जाईल तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा असेल, असे ते सांगतात.


नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images