Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

त्या २७ भूखंडांचे काय?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर व अंबड येथील औद्योगिक वसाहतील भूखंड शिल्लक नसल्याचे सातत्याने सांगितले जाते. मात्र दलालामार्फत सर्रास भूखंड मिळतो. त्याचबरोबर २७ भूखंड एका रात्रीत वितरित केल्याचा आरोप उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी केला. त्यावर सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर एमआयडीसीमधील भूखंडवाटपाची प्रक्रिया पारदर्शक असावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी उद्योगमित्र समितीची बैठक झाली. तब्बल दीड वर्षानंतर झालेल्या या सभेत उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागविले. ऑनलाइनमध्ये भूखंडाची जाहिरात दिल्यानंतर त्याला मुदत द्यावी व त्याची माहिती उद्योजकांच्या निमा व आयमा संघटनेच्या नोटीस बोर्डावर द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात होणाऱ्या औद्योगिक नववसाहतीतील भूखंड लिलावाची माहितीही एकाच वेळेस जर दिली तर त्याचा फायदा सर्वांना होईल, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. भूखंडवाटपाच्या विषयानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विषयपत्रिकेच्या विषयावर चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक विषय हे महापालिकेशी संबंधित असल्यामुळे आयुक्त सुटीवरून आल्यानंतर त्यासाठी निमा कार्यालयात स्वतंत्र बैठक घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर वीजपुरवठा, टेलिफोन आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ‘मेक इन नाशिक’च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत काही विषयांचा अपवाद वगळल्यास ही बैठक सकारात्मक झाली. बैठकीत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदळकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील- भामरे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, मनीष रावल, जयप्रकाश जोशी, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे आदींसह उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.

तळेगाव- अक्राळेचे काम लवकर करा

नाशिकपासून जवळ असलेल्या तळेगाव- अक्राळे येथील नव्या औद्योगिक वसाहतीचे काम लवकर करा, ‘मेक इन नाशिक’नंतर येणाऱ्या उद्योजकांना ते दाखवता येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. त्याचप्रमाणे एक सॅम्पल भूखंड व औद्योगिक वसाहतीची माहिती देता यावी असे काही तरी करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

वीज मंडळाला डीपीडीसीतून पैसे

वीज मंडळाने अखंड वीजपुरवठा करण्याच्या सूचना केल्यानंतर काही ठिकाणी वीज कनेक्शनच्या अडचणी सोडवताना निधीची कमतरता पडेल. अशा वेळी जिल्हा विकास योजनेतून पैसे घ्या, अशा सूचना त्यांनी विद्युत अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे निमाचे अध्यक्ष बॅनर्जी यांच्यासह उद्योजकांनी कौतुक केले.

औद्योगिक विकासाचे प्रश्न मांडा

औद्योगिक वसाहतीच्या मूलभूत सेवेचे प्रश्न आपण सोडवू; पण बैठकीत औद्योगिक विकास कसा होईल यासाठी जास्तीत जास्त प्रश्न मांडा. त्यातून या बैठकीचे उद्दिष्ट सफल होईल. त्यामुळे उद्योगही येतील व त्यातून सर्व प्रश्नही सुटतील, असेही त्यांनी सांगितले.

आता तीन महिन्यांनंतर सभा

उद्योजकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी आत दर तीन महिन्यांनी सभा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे वाइनरीची स्वतंत्र बैठक घेण्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओचे सर्व्हर डाऊन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व्हरचा वेग कमी झाल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे मंदावल्याचे चित्र बुधवारी दिवसभर पाहावयास मिळाले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

वाहनाची नोंदणी करणे असो किंवा शिकाऊ, तसेच कायमस्वरूपी परवाना काढणे असो, अनेक कामे मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होते. बुधवारीदेखील नागरिकांची आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी गर्दी होती. मात्र, कार्यालयातील सर्व्हरचा वेग कमी असल्याने ही कामे धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे किरकोळ कामांसाठीही बराच वेळ ताटकळत राहावे लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सर्व्हरचा वेग कमी असला तरी दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होऊ दिला नसल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केला. डोंगलच्या माध्यमातून कामे सुरू ठेवल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसा शुकशुकाट, रात्री वर्दळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून ४०.१ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेल्या तापमानात एक अंशांची घट झाली असली तरी उन्हाच्या झळा मात्र कमी झालेल्या नाहीत. शहरात ३९.१ अंश सेल्सियस कमाल, तर १९.९ किमान तापमान बुधवारी नोंदवले गेले. काही दिवसांपासून चाळिशीजवळच तापमान स्थिरावल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. घराबाहेर पडताच बसणारे चटके टाळण्यासाठी दुपारच्या उन्हात फिरकणेदेखील टाळले जात असल्याने भरदुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे, तर सायंकाळी ऊन कमी होताच बाहेर पडण्यास पसंती मिळत असल्याने शहराच्या मुख्य भागांमध्ये वर्दळ दिसून येत आहे.

यंदाच्या उन्हाळ्याची प्रखरता मार्चपासूनच जाणवू लागल्याने नाशिककरांसाठी हा उन्हाळा लक्षात राहील असाच ठरला आहे. एप्रिलच्या प्रारंभी कमी झालेले रणरणते ऊन या महिन्याच्या मध्यावर पुन्हा तप्त झळांचा अनुभव देणारे ठरले. यामुळे थंड हवेचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्येदेखील उन्हाळ्याचा प्रभाव वाढत असल्याचे या काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दरम्यान, २३ एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सिझनल फळांना मागणी

उकाड्याने त्रस्त झालेल्या नाशिककरांकडून सध्या सिझनल फळांना मागणी वाढली आहे. त्याचबरोबर थंड पदार्थांनाही मागणी वाढली आहे. जशी संध्याकाळ होऊ लागते, तसे नाशिककर घराबाहेर पडून अशा पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात. गोळा, ज्यूस सेंटर्स येथे गर्दी दिसून येते. टरबूज, आंबे, खरबूज, स्ट्रॉबेरी अशा फळांनाही मागणी आहे. आंब्याचे भाव अद्याप मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असले तरी हळूहळू आंबे खरेदीला जोर येत आहे. देवगड व रत्नागिरी हापूस आंब्यांची किंमत पाचशे ते सहाशे रुपये डझन इतकी आहे. त्यामुळे हा दर कमी होण्याची प्रतीक्षाही केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई, दिल्ली सेवेला पसंती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईसाठी विमानसेवा नको, असा सूर आळवला जात असला तरी प्रत्यक्षात नाशिककरांनी मुंबईलाच प्रथम पसंती दिली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी नवी दिल्लीसाठी विमानसेवा असावी, असा कल व्यक्त करण्यात आला आहे. हे ऑनलाइन सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल विमान कंपन्यांना सादर केला जाणार आहे.

नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची मोठी प्रतीक्षा नाशिककरांना आहे. विविध कारणांमुळे ही सेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. केंद्र सरकारने उडान योजनेंतर्गत नाशिकला सेवा देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर काही खासगी विमानसेवा कंपन्यांनी सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, अशी अपेक्षा कंपन्यांनी व्यक्त केली. त्यानुसार काही दिवसांपासून हे सर्वेक्षण सुरू होते. सर्वेक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणात ९,६७२ नाशिककरांनी सहभाग घेऊन पसंती नोंदवली आहे. नाशिकहून मुंबईसेवा हवी, अशी मागणी ३,३२१ नाशिककरांनी केली आहे. त्याखालोखाल दिल्लीसाठी २,६२३ जणांनी मत नोंदवले आहे.

पाच वेळा विमानप्रवास

वर्षातून सर्वाधिक म्हणजे पाच वेळा विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ४२२६ जणांनी तसे मत नोंदविले आहे. वर्षातून केवळ एकदा विमानसेवा घेणाऱ्यांची संख्या २४ टक्के आहे, तर वर्षातून दहा वेळा विमान प्रवास करणाऱ्यांची टक्केवारी १५.७ इतकी आहे. २० पेक्षा अधिक सेवा वापरणाऱ्यांची संख्या ९.१ टक्के आहे.

बंगळुरू-नाशिक-दिल्ली सेवा हवी

उत्तरेतील नवी दिल्ली आणि दक्षिणेतील बंगळुरू या दोन शहरांना जोडणारी हॉपिंग फ्लाइट असावी, अशी पसंती नाशिककरांनी दर्शविली आहे. ३९.५ टक्के नाशिककरांनी तसे मत नोंदविले आहे. पुणे- नाशिक- नागपूर या सेवेसाठी ३० टक्के, अहमदाबाद-नाशिक- हैदराबाद साठी ११.५ टक्के, इंदूर- नाशिक- गोवासाठी ११.३ टक्के, तर वडोदरा- नाशिक- बंगळुरूसाठी ५.४ टक्के नाशिककरांनी पसंती दिली आहे.

दुसरी पसंती दिल्ली, गोवा

ओझरहून सेवा सुरू झाल्यास दुसरी पसंती नवी दिल्लीसाठी असेल, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. २५.८ टक्के नाशिककरांनी तसे मत दिले आहे. दिल्लीनंतर गोवा आणि त्यानंतर बंगळुरू, मुंबई, हैदराबाद या शहरांना नाशिककरांनी पसंती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन एकता मंचतर्फे पाणपोई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जैन एकता मंचतर्फे रुंगठा बिल्डकॉनचे सेदुरामजी रुंगठा व ओमप्रकाश गर्ग यांच्या सौजन्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रविवार कारंजा येथे रुंगठा बिल्डकॉनचे सेदुरामजी रुंगठा यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी उन्हाळ्यापर्यंत थंड व शुद्ध पाण्याचे जार पुरविले जाणार आहेत.

नाशिक शहर हे नेहमीच थंड व हवेशीर ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या चार- पाच वर्षांत शहराचे आधुनिकीकरण होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ पाहत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड उन्हामुळे रस्त्याने जा-ये करणाऱ्या माणसांची पाण्यासाठी तडफड होत असते. त्यामुळे हा उपक्रम आम्ही घेतला असल्याचे संयोजकांनी या वेळी सांगितले.

रविवार कारंजा ही सर्वांत मोठी बाजरपेठ असून, या ठिकाणी विविध भागांतून छोटे- मोठे व्यापारी व ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत असतात. लोकांची गौरसोय होऊ नये, तसेच तहानलेल्याला पाणी मिळावे हे पुण्याचे काम करता यावे ही धारणा ठेवून हा सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य जैन एकता मंचच्या माध्यमातून होत असल्याचे मंचच्या अध्यक्षा सुरेखा कांकरीया यांनी सांगितले. रविवार कारंजा येथील राजकमल फोटो स्टुडिओ यांनी पाणपोईसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर रोजच्या देखभालीची जबाबदारी घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. या वेळी जैन एकता मंचच्या संस्थापकीय अध्यक्षा मंगल घिया, अध्यक्षा सुरेखा कांकरिया, शर्मिला मुथा, मोनिका चोरडिया, रुंगठा बिल्डकॉनचे सेदुरामजी रुंगठा, ओमप्रकाश गर्ग, जे. सी. भंडारी, अशोक कांकरिया, सुभाष घिया, सुभाष लोढा, राजमल भंडारी व जैन एकता मंचच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये अतिक्रमण जमीनदोस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पिंपळगाव, येवला, शिर्डी रस्त्यालगतचे, तसेच निफाड बसस्थानाक, पंचायत समिती, निफाड कोर्ट परिसरात वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग, निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त कारवाईत काढण्यात आले.

निफाड पिंपळगाव (ब) रोडवर एक किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुकानदारांनी, टपरीधारकांनी अतिक्रमण केले होते. त्या अनुषंगाने निफाड नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रितपणे मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. शांतीनगर त्रिफुली येथील स्टेट बँक समोरील, निफाड मार्केट यार्ड, निफाड बस स्थानक, पंचायत समिती, न्यायालय आदी परिसरातील व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने हलवली. किरकोळ ठिकाणचे अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. या अतिक्रमित दुकानदारांत हॉटेल चालक, चहाची टपरीधारक, फळविक्रेते आदींचा समावेश होता. अतिक्रमण हटाव मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे, अधिकारी, कर्मचारी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, निफाड पोल‌िस यांनी सहभाग घेतला. पोल‌िस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर व सिक्युरिटीच्या सबचॅप्टरचा २२ ला प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीयांमध्ये आग व सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक सबचॅप्टरचा प्रारंभ २२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पाम शेल्स रेस्टॉरंट, गंगापूर-मखमलाबाद रोड, सुयोजित गार्डनजवळ हा कार्यक्रम होईल, अशी माहिती समन्वयक जितेंद्र कोतवाल यांनी दिली. सद्यःस्थितीत मुंबई, पुणे येथे मुख्य चॅप्टर, तर नागपूर येथे या संस्थेचा सबचॅप्टर कार्यरत आहे.

फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया ही ‘ना नफा’ तत्त्वावर कार्य करणारी देशपातळीवरील संस्था असून, आग, सुरक्षा, जीवनसुरक्षा, मालमत्तेचे संरक्षण यासाठी सरकारच्या हातात हात घालून कार्य करीत असते. विविध आघाडीच्या कंपन्या, अभियंते, वास्तुविशारद, तसेच आग व सुरक्षा क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक याचे सदस्य असतात. आजमितीला याचे देशभरात अडीच हजारांवर सभासद आहेत.

नाशिक सबचॅप्टरच्या उद््घाटनासाठी फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर व महाराष्ट्राचे निवृत्त अग्निशमन संचालक व सल्लागार एम. व्ही. देशमुख प्रमुख पाहुणे असतील. प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल बिल्डिंग कोड - २०१७ चे उपाध्यक्ष व्ही. सुरेश आहेत. नाशिक महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारीख व उपमुख्य अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले उपस्थित राहतील. आगामी काळात नाशिकमध्ये असोसिएशनच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर उपक्रमही हाती घेण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही कर्जमाफी द्या’

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कर्जमाफी देतांना फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ नये, तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांनाही याचा लाभ मिळायला हवा, असे मत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आगामी कालावधीत नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरीही कर्ज थकित ठेवण्यावर भर देतील. यामुळे वित्तीय व्यवस्थेवर विपरित परिणाम होईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत पहिल्या एटीएम केंद्राचे उद््घाटन करून शेतकरी सभासदांना रुपे डेबिट कार्ड वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज पाटील उपस्थित होते. सर्व शाखा 'सीबीएस'अंतर्गत मुख्य कार्यालयातील डाटा सेंटरशी जोडल्या आहेत. तसेच सर्व ९० शाखांमध्ये शेतकऱ्यांना एनईएफटी, आरटीजीएस, एबीबी, एसएमएस अलर्ट सेवा प्रदान करण्यात येत आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. शेतकरी खाते धारकदेखील कॅशलेस व्यवहारात पुढे यावा, या उद्देशाने जिल्हा बँकेने सर्व ५३ हजार कर्जदार शेतकऱ्यांना रुपे किसान क्रेडिट कार्डवाटपाचे तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्हा बँकेचे एटीएमचे नियोजनाचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तयार व्हा ‘मटा किड्स कार्निव्हल’साठी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळांना सुट्या लागल्या असून, बच्चेकंपनी सुट्यांचा आनंद लुटण्यात दंग झाली आहे. दीड ते दोन महिन्यांच्या या सुटीत काय काय करायचे, याचे नियोजनही अनेकांकडून आखले जात आहेत. सुटीचा हा कालावधी सत्कारणी लागावा, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे दहा दिवसीय किड्स कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या किड्स कार्निव्हलचे व्हेन्यू पार्टनर सेंट्रल मॉल, त्र्यंबक नाका येथे असून, याच सेंट्रल मॉलमध्ये येत्या रविवारपासून (२३ एप्रिल) रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा कार्निव्हल सुरू होणार आहे.

उन्हाळ्याची सुटी नुसतीच टीव्ही, कम्प्युटर, मोबाइल या वस्तूंमध्येच अडकून न पडता त्यांना काही तरी चांगले शिकण्यासाठी या सुटीचा वापर व्हावा, या उद्देशाने अनेक पालक पाल्यांना किड्स कार्निव्हलला पाठविण्याचे नियोजन करीत असतात. मुलांचाही हट्ट अशा कॅम्पसाठी असतो. अशा बालकांना चांगल्या दर्जाच्या किड्स कार्निव्हलचा आनंद लुटता यावा, यासाठी मटा कल्चर क्लबकडून या किड्स कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. २३ एप्रिलपासून सुरू होणारा हा किड्स कार्निव्हल दहा दिवस सुरू राहणार असून, अकराव्या दिवशी सहल नेण्यात येणार आहे. ४ ते १४ वयोगटांतील मुले, मुली यामध्ये सहभागी होऊ शकणार आहे. सहलीच्या खर्चाचाही अंतर्भाव आहे. नावनोंदणीसाठी कमलेश (मोबाइल ः ७०४०७६२२५४) यांच्याशी किंवा ०२५३ ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे शिकण्याची संधी

किड्स कार्निव्हलमध्ये क्राफ्ट्स, इनोव्हेटिव्ह कॅण्डी स्टिक्स, किड्स योगा, फन गेम्स, सायन्स अँड नॉलेज, गॅसशिवाय कूकिंग, कॅण्डल मेकिंग, डान्स अँड झुम्बा, योगा, विज्ञानाचे चमत्कार, विविध खाद्यपदार्थ, किरकोळ स्वरूपाचे शिवणकाम, स्क्रॅप बुक, पेन स्टँड, विविध प्रकारच्या मेणबत्त्या यांसारख्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी...

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड

संपर्क ः ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा जीव घेऊ नका

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

साठ वर्षे शेतकऱ्यांना मातीत घालणारी काँग्रेस जावून आता बीजेपी आली. तरीही या देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचे मरण काही संपत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याऐवजी त्याला लुटण्याचे धोरण सुरू आहे. नोकरदारांना सातवा वेतन आयोग, आमदारांना पगारवाढ देताना कुठलाही विचार न करणारे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चकार शब्दही काढायला तयार नाहीत. मोदीजी या शेतकऱ्यांचे रक्त घ्या, मात्र जीव घेऊ नका, अशा शब्दात हल्ला चढवत प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी राज्यकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणावर आसूड ओढले.

स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात, राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करावे, पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेंतर्गत जाहीर करावा, सर्व शेतमालावरील निर्यातबंदी हटवावी आदी मागण्यांसाठी आमदार कडू यांची प्रहार संघटना आणि रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेने संयुक्तपणे ‘शेतकरी आसूड यात्रा’ काढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातून ११ एप्रिलला निघालेली ही यात्रा २१ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडनगर गावात (गुजरात) धडकणार आहे. या यात्रेचे मंगळवारी सायंकाळी (दि. १८) येवला शहरातील विंचूर चौफुलीवर आगमन झाले. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी आमदार बच्चू संवाद साधत होते. मोदींच्या वडनगरात पोहचल्यावर तेथे एक हजार शेतकरी रक्तदान करतील आणि ‘मोदीजी, चाहे तो खून लो, लेकीन हमारी जान मत लो’ असे आवाहन करणार असल्याचे कडू यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकवला जातो. कांदा कधी कधी महाग झाला तर त्या विरोधात ओरड सुरू होते. मात्र, अनेकदा हा कांदा ढासळतो तेंव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. सर्वच शेतमालाच्या बाबतीत असेच सुरू आहे. शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असताना राज्यकर्त्यांना सोयरेसुतक नाही हे दुर्दैव आहे, असे कडू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रोत्सवातून एसटीला सव्वा कोटी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वणीच्या चैत्र पौणिर्मेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी तब्बल ३ लाख ९० हजार भाविकांनी एसटीने प्रवास केला. त्यामुळे एसटीला यातून १ कोटी २८ लाख रुपये उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते २४ लाख जास्त आहे. ४ ते १२ एप्रिलपर्यंत असलेल्या या यात्रेत जिल्हाभरातून बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यातून एसटीला दिलासा मिळाला. नवरात्रोत्सवात एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मात्र, चैत्र पौर्णिमेत ते गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मिळाले आहे.

यात्रेसाठी १३ बस आगारांतून बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा एसटीच्या तब्बल ८,९९२ फेऱ्या झाल्या. या फेऱ्यांमुळे एकूण ३ लाख ५४ हजार कि.मी. या बसेस धावल्या. २०१६ पेक्षा एसटीला २०१७ ची यात्रा उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर ठरली. चैत्रोत्सवास एप्रिल महिन्यात रामनवमीपासून गडावर प्रारंभ होतो. हा उत्सव दहा ते बारा दिवस सुरू राहतो. या उत्सवात आईचं माहेर म्हणवल्या जाणाऱ्या खान्देशातून लाखो संख्येने भाविक गडावर पायी येतात, तर जिल्ह्यातील बहुतांश भाविक दर्शनासाठी जातात. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी असते. या चैत्रोत्सवासाठी भाविकांसाठी विशेष सुविधाही या वेळी एसटीने ठेवल्यामुळे प्रवाशांनाही त्यातून समाधान मिळाले.

कळवणहून सर्वाधिक फेऱ्या

चैत्रोत्सवासाठी जिल्ह्यातून १३ आगारांतून बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यात कळवण डेपोतून सर्वाधिक ४३९२ फेऱ्या झाल्या, तर सर्वांत कमी फेऱ्या इगतपुरी येथून होत्या. इतर आगारांतून दोनशेहून अधिक फेऱ्या होत्या. त्यामुळे या यात्रेला जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी एसटीला पसंती दिली.

आगारनिहाय फेऱ्या
कळवण ः ४३९२, सटाणा ः ९९३, मालेगाव ः ६०६, सिन्नर ः ६०६, लासलगाव ः ४३८, पिंपळगाव बसवंत ः ३३९, मनमाड ः ३२३, नाशिक- १ ः २९०, नाशिक -२ ः २९२, नांदगाव ः २३०,
पेठ ः १९१, येवला ः १९०, इगतपुरी ः १०२.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग अन् नाशिकची अर्थव्यवस्था

0
0


सुधीर मुतालिक

ब्रिटिश राजवटीत उद्योगांच्या पडत्या काळात नाशिकची अर्थव्यवस्था कोलमडून पडली नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत नाशिकची अर्थव्यवस्था मुख्यत्वे याज्ञिकीवरच विसंबून होती.

रंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होईपर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठ्यांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरू होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखीसारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजवू लागले होते. त्याचे पडसाद इकडे उमटू लागले होते कारण एकूणच हिंदुस्थानातून बनलेल्या उत्पादनांची युरोपातली मागणी घटायला लागली होती. ज्या इंग्लंडमध्ये उद्योग एका अद्भुत पातळीवर म्हणजे मशिन्सच्या आधारावर होऊ घातला होता, त्या इंग्लंडातली शैक्षणिक अवस्था आपल्या शैक्षणिक अवस्थेसारखीच होती. म्हणजे दोन्हीकडचे बहुतांश लोक हे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलेच म्हणावे लागतील. इंग्लंडात शिक्षणाच्या तेही प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा कायदा खूप पुढे शंभर सव्वाशे वर्षांनी म्हणजे १८७० साली आला. इकडे इथे पेशवाई आणि हिंदुस्थानात अन्यत्र अन्य राजवटी असताना इंग्लंडमध्ये जशी ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज महाविद्यालये होती, तशा इकडेही पाठशाळा आणि मदरसे होते. फरक कदाचित असा असेल, त्या महाविद्यालयात थोडेफार व्यावहारिक शिक्षण दिले जात असेल आणि इथे त्यावेळी फक्त धर्मविषयक शिक्षण दिले जात होते. इकडे आम्ही दळणवळणाला बैल वापरायचो ते खेचर वापरायचे. प्रवासाला आम्हीही बैलगाडी वा घोडे वापरले त्यांनी ही घोडे वापरले. रस्ते दोन्हीकडे नव्हतेच किंवा इकडे होते तसेच तिकडे होते. उलट मोगलांच्या काही राजवटींनी काही ठिकाणी दगडांच्या फरशांचे रस्ते इकडे काही ठिकाणी बांधले होते. तिकडे खडी वापरून टेलफर्ड आणि मॅकडम यांनी रस्ते बांधले. खूप पुढे १८२० सालाच्या सुमारास म्हणजे पेशवाई संपल्यावर.

पण, मग मुद्दा असा आहे की पेशवाई आणि अन्य राजवटींना तिकडून बंदरी व्यापारातून येणाऱ्या वेगवेगळ्या मानवनिर्मित वस्तूंकडे बघून हे आपल्याकडे सुद्धा का नाही बनू शकत हा प्रश्न का नाही पडला? तिकडून लोखंड आणि जस्त यायला लागलं होते. चष्मा, दुर्बिणी, घड्याळ, कॅमेरा, थर्मामीटर, कात्री, मेणबत्ती इत्यादी अशा अनेकविध वस्तू पेशव्याकडे इंग्रजांकडून खरीदल्या जात होत्या. अगदी साध्या घडीच्या पाकिटांपर्यंत! आपल्या राज्यातल्या काही विद्वानांच्या एखाद्या शिष्टमंडळाला वा अभ्यासगटाला तिकडे काय चाललंय हे बघून येण्यासाठी पेशव्यांनाच नव्हे तर इथल्या कुठल्याच राजवटीला का नसेल वाटले? इंग्रजांचे व्यापारी हिंदुस्थानभर इथल्या मार्केटचा अभ्यास करत फिरायचे. ३ एप्रिल १६२२ साली सुरतेच्या थॉमस ब्रॉकनेडला तंजावरला मार्केट सर्वेक्षण करायला गेलेल्या जॉन जॉन्सन नामक व्यापाऱ्याने पत्र लिहून कळवले होते की तंजावरात आपल्याला मिरे खरेदी करता येईल आणि आपल्याकडले लोखंड, शिसे आणि जस्त इथल्या मार्केटमध्ये विकता येईल. १७५७ साली वर प्लासीमध्ये इंग्रजांनी विजय मिळवल्यानंतरही तातडीने हिंदुस्थाभर त्यांची दादागिरी सुरू झाली नव्हती. ज्यामुळे आपल्याला काही हालचाल नसता करती आली. पूर्ण शंभर वर्षे नाशिक, पुण्यात १८१८ पर्यंत पेशवाईच होती. पण बदलत्या काळातला विशेषतः इंग्लंडहून येणाऱ्या विशेष चैनीच्या, नाविन्यपूर्ण वस्तू, आपण इथे का नाही बनवू शकत या कुतुहलाअभावी इथल्या औद्योगिक उत्कर्षाच्या पेशवाईतल्या प्रयत्नांना फारसा अर्थ उरला नव्हता. राजवटीमधली अनास्था आणि अस्वस्थता भरीला दळणवळणातल्या अडचणी यामुळे बहुतांश समाज त्यातल्या भागवून, कमीतकमी गरजांमध्ये जगत असणार हे नक्की.

सर्वदूरच संपन्न लोकांची क्रयशक्ती रोडावली आणि कारागिरांच्या आश्रय जवळपास संपायला आला होता. सबब पेशवेकाळात कारागिरांचा प्रचंड तुटवडाच निर्माण झाला. शिवाय इकडे बनत असलेले जिन्नस इंग्रज बघत आणि इथे मिळत त्यापेक्षा अत्यंत सरस वस्तू बनवून आणत. उदाहरणार्थ : चाकू, मेणबत्त्या इथे बनायच्या पण फिरंग्यांच्या मेणबत्त्यांची बातच वेगळी होती. बांगड्या अगदी पुरातनकाळापासून इथे होत्याच पण तरीही काचेची चित्रविचित्र भिंगे इंग्रजांनी इथल्या लोकांच्या माथी पेशवाईत मारलीच. तीच बाब अत्तराची. जे इथे हवे त्या सुगंधाचे तयार व्हायचे. पण इंग्रजाने हा ही स्थानिक धंदा बंद पडला आणि इंग्रजी अत्तराची चटक लावली. पेशवाईत कुलुपांचा स्थानिक धंदा आणि उत्पादन बंद पडले. एकुणात त्यामुळे स्वदेशी मालाच्या खपाची पुरती वाट लागली होती. या सर्वाचा परिणाम या कालावधीत इथे एकूणच औद्योगिक उत्कर्ष न होण्यामध्येच झाला. इंग्लंडच्या तुलनेत आणि दुसऱ्या बाजूला बाहेरून येणाऱ्या वस्तूंचा रेटा वाढत चालला होता. बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर इंग्लंडमध्ये तयार झालेली कोणतीही नवीन वस्तू इथे त्यांच्या व्यापाऱ्यांमार्फत वर्षभरात खरेदी विक्रीला येऊ लागली होती.

एकूणच या सुमारास उद्योगांच्या पिछाडीमुळे आर्थिक घडीचा पार बोजवारा उडाला होता. पण उद्योगांच्या या पडत्या काळात नाशिकची अर्थव्यवस्था कोलमडून मात्र पडली नाही. नाशकात अर्थाजनाचा गुंता सोडवताना एक प्रघात प्रबळ झाला याज्ञिकीचा. नाशकातल्या मंदिरांमुळे यात्रस्थांचा ओघ नाशिकला वाढला होताच. त्यामुळे पुढे सुमारे दीडशे वर्षे म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत संपूर्ण नाशिकची अर्थव्यवस्था मुख्यत्वे याज्ञिकीवरच विसंबून होती. यात्रस्थांच्या स्थानिकांकडे होणाऱ्या व्यवस्थेमुळे आजूबाजूच्या शेतीमधून येणारे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, दूधदुभते तसेच तांबे, चांदी यांची भांडी, दागिने, अन्य पूजेचे सामान, भेट वस्तू या सगळ्या वस्तू आणि जिन्नसांना एक बाजारपेठ उपलब्ध झाली. वेगवेगळ्या जिन्नसांच्या ट्रेडिंगचा व्यापारही जम बसवून होता. पुढे १८६२ साली मध्ये नाशकात रेल्वे आली. १८६४ साली नाशिकची नगरपालिका अस्तित्वात आली आणि १८८९ मध्ये नाशिक रोड स्टेशन ते नाशिकचा मेनरोड जोडणारी अडीच फुटी गेजची ट्राम आली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी एकदा भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूपही भव्य झाले. एका शहराच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या संपूर्ण व्यवस्थेचे योगदान. विशेषतः समस्याग्रस्त काळात सदैव नोंद घेण्यासारखे निश्चितच आहे.

(लेखक उद्योजक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी इलेक्शन फिवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य निवडणूक आयोगाकडून बुधवारी येथील महापालिकेचा निवडणूक जाहीर करण्यात आला. २४ मे रोजी निवडणूक होणार असून २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासूनच शहरात तापमानाचा पारा वाढत असून, निवडणूक जाहीर झाल्याने आता रणरणत्या उन्हात राजकीय वातावरणही तापणार आहे.

येथील महापालिकेची मुदत येत्या १५ जून रोजी संपुष्टात येत असल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर केली. येथील पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचना, मतदार यादी, हरकती व सूचना तसेच मतदान केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना बदलली आहे. एक प्रभाग वाढला आहे. एकूण २१ प्रभागातून एकूण ८४ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. सध्याचे सदस्य संख्या ८० इतकी असून प्रभाग रचना बदल्याने यात ४ नगरसेवकांची वाढ झाली आहे. बदललेल्या प्रभाग रचनेमुळे राजकीय समीकरणे देखील बदलणार आहेत. मुस्ल‌िमबहुल असलेल्या येथील महापालिकेत पूर्व भागातून ६४ तर पश्चिम भागातून २० प्रतिनिधी येणार आहेत. त्यामुळे पूर्व भागातून सर्वाधिक नगरसेवक निवडून येणाऱ्या पक्षाचीच सत्ता स्थापन होऊ शकते.

मागील (२०१२) निवडणुकीत तिसरा महाज व काँग्रेसमध्ये स्पर्धा रंगली होती. ८० सदस्यीय पालिकेत त्यावेळी तिसरा महाज व काँग्रेसच्या समसमान २४ जागा तर, शिवसेना आघाडी १२, शहर विकास आघाडी ११, जनता दल ४, मालेगाव विकास आघाडी ४, जनराज्य १ असे पक्षीय बलाबल होते. दरम्यानच्या पाच वर्षाच्या काळात अडीच-अडीच वर्ष काँग्रेस व ‘महाज’ने महापौर पदाची सत्ता आपल्याकडे राखली.

आगामी निवडणुकीसाठी अवघा एक महिन्याचा कालावधी हातात असल्याने राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर पूर्व भागात राष्ट्रवादी व जनता दल यांनी युती झाली आहे. तर काँग्रेसमध्ये विद्यमान नगरसेवकांची नाराजी चर्चेचा विषय आहे. कधीकाळी तिसरा महाज म्हणून येथील मुस्ल‌िम धर्मगुरुंनी सुरू केलेला राजकीय पक्ष आता अस्तित्वहीन आहे. तर भाजप-सेना आधीपासूनच स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याने पश्चिम भागात या दोघांमध्येच प्रमुख सामना असेल. मुस्ल‌िम बहुल पूर्व भागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल यांच्यात प्रमुख लढत असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकरांनी वंचितांना विकासप्रवाहात आणले

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना वजा करून तत्त्वज्ञान पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रवासवर्णन लिहिले नसले तरी त्यांनी आपल्या लिखाणातून प्रगल्भ विचारांची निर्मिती करून सर्व समाजाला ज्ञानी बनवण्याबरोबरच वंचित घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले, असे मत निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. एल. वाघमारे यांनी व्यक्त केले.

वकील विचारमंचतर्फे वकील दिनानिमित्त शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक न्यायाची भूमिका’ या विषयवार आयोजित व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प वाघमारे यांनी गुंफले. ज्येष्ठ विधिज्ञ दौलतराव घुमरे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. का. का. घुगे, अॅड. अविनाश भिडे, अॅड. जयंत जायभावे, माजी सरकारी वकील श्रीधर माने, इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, सिन्नर वकील संघाचे अॅड. विलास पगार उपस्थित होते.

वाघमारे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत सामाजिक न्यायाचा उल्लेख केला आहे. संविधान लिहिताना कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आहे. डॉ. आंबेडकर यांना समजून घेण्यासाठी त्यांच्याविषयी वाचन करणे गरजेचे आहे. वाचल्याशिवाय डॉ. आंबेडकर समजू शकत नाही.

पुणे येथील प्रा. डॉ. आनंद करंदीकर यांचे ‘घटना समितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. बाबासाहेब नन्नावरे यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अरुण दोंदे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आधीच बाजारभाव नसल्याने हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे. लासलगाव व निफाड उपबाजार व्यापाऱ्यांनी येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य व निफाड उपबाजार आवारावर विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम रोख अथवा एनइएफटीद्वारे (NEFT) द्वारे अदा करणेस नकार दिला आहे. त्यामुळे गुरुवारपासून (दि. २०) बाजार समितीस लासलगाव मुख्य व निफाड उपबाजार आवारावरील कांदा व धान्य लिलाव बंद असतील अशी माहिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.

नोटाबंदीनंतर पणन संचालनालय व सहकार खात्याच्या आदेशानुसार चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत लासलगावसह सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची रक्कम चेक/RTGS/NEFT द्वारे अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १८ नोव्हेंबर २०१६ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम चेकद्वारे अदा करण्यात येत आहे. मात्र व्यापाऱ्यांनी दिलेले चेक संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होण्यासाठी १५ दिवस ते महिन्याभराचा कालावधी लागत आहे. तसेच १३ मार्च २०१७ पासून रिझर्व बँकेने बँकेतील रोख रक्कम काढण्याची मर्यादा शिथ‌िल करून चलन पुरवठा सुरळीत केल्याने रोख अथवा NEFT द्वारे शेतमालाची रक्कम अदा करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये रोख व NEFT द्वारे रक्कम देणे सुरू झाल्याने इतर बाजार समित्यांप्रमाणेच येथील व्यापारी वर्गाने कार्यवाही करावी यासाठी बाजार समितीने लासलगांव मर्चन्टस् असोशिएशनच्या सभासदांशी आतापर्यंत तीन वेळा चर्चा केली. मात्र तरीही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर चेकद्वारेच व्यवहार सुरू ठेवला, असे बाजार समितीच्या निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरपट्टीसाठी सामुदायिक मुंडण!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौतमनगर, साठेनगर, रमाबाई आंबेडकरनगर व शांतीनगर परिसरातील नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्यांच्या घरांना घरपट्टी लागू होत नसल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी महापालिकेच्या गेटसमोर सामुदायिक मुंडण आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक मुलांनी व पुरुषांनी मुंडण करून निषेध नोंदवला.

शहराच्या मध्यवस्तीतील अनेक घरांना अद्याप घरपट्टी लागू करण्यात आलेली नाही. याबाबत महापालिकेच्या आयुक्तांशी वारंवार चर्चा करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. या मागणीला आयुक्तांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. यापूर्वीच्या आयुक्तांनी घरपट्टी लागू केली जाईल असे लेखी आश्वासन दिले आहे. या भागातील घरांना घरपट्टी लागू नसल्याने मूलभूत सुविधांना मुकावे लागत आहे. आंदोलकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की आमच्या वस्त्यांना आपण लेखी दिल्याप्रमाणे घरपट्टी त्वरित लागू करावी, ज्या लोकांचा पंडित जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेला विरोध आहे अशा लोकांना त्याच जागेवर घर देण्यात यावे, गौतमनगर, साठेनगर येथे जे गट शौचालय बांधले आहे, त्याची अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत. अनेक लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. वारंवार सूचना करूनही ती दूर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना दूरवरून पाणी भरावे लागते.

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

सकाळी झालेल्या आदोलनामुळे राजीव गांधी परिसरातील वाहतुकीची कोंडी झाली होती. राजीव गांधी भवनचे मुख्य गेट आंदोलनामुळे बंद असल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रामायण बंगल्याजवळील गेटमधून आत यावे लागत होते. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्तीवादामुळे साधूंमध्ये फूट!

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पार्वती माता मूर्ती अंदोलनाशी आमचा काही संबंध नाही, असे येथील साधू महंतांनी सांग‌ितले. षड्दर्शन आखाडा परिषद सिंहस्थासाठी होती. ती विसर्जित झाली आहे, असेही महतांनी जाहीर केले. त्यामुळे मूर्ती प्रतिष्ठापणाच्या विषयावरून आखाडा परिषदेचे फूट पडल्याचे दिसून आले.

येथील आवाहन आखाड्यात ठाणापती आनंदपुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आणि डॉ. बिंदू महाराज यांच्या अांदोलनास आमची सहमती नाही, असे आवाहन आखाड्यात झालेल्या बैठकीत जाहीर केले आहे. या बैठकीस आवाहन आखाड्याचे आनंदपुरी महाराज, पवनभारती महाराज, रामभारती महाराज, निर्मल आखाड्याचे राजेंद्रसिंह महाराज, निरंजनी आखाड्याचे कुमारगिरी महाराज, जुना आखाड्याचे मंगलानंदपुरी महाराज, विष्णुगिरी महाराज, सुशिलगिरी महाराज, अग्नी आखाड्याचे अभयानंद ब्रह्मचारी महाराज, नया उदासीन आखाड्याचे तिरथदास महाराज आदी उपस्थित होते. या बैठकीने स्थानिक षड्दर्शन आखाडा परिषेदत फूट पडल्याने दिसून आले. बुधवारच्या बैठकीस एकूण दहा आखाड्यांपैकी सहा आखाड्याचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पवनभारती महाराज यांनी अखिल भारतीय आखाडा परिषद वेगळी आहे. येथील सिंहस्थासाठी षड्दर्शन आखाडा परिषद स्थानिक समस्या सोडविण्यासाठी तयार करण्यात आली होती. सिंहस्थ संपला तेव्हाच ती विसर्जीत झाली आहे. तसेच पार्वती माता प्रतिष्ठापना हा देवस्थान ट्रस्ट, तुंगार ट्रस्ट यांचा वैयक्त‌िक विषय आहे. याबाबत आम्हाला काही देणे घेणे नाही. त्यामुळे झालेल्या अंदोलनात आखाडा परिषदेचे समर्थन नव्हते असे स्पष्ट केले. आवाहन आखाड्याचे ठाणापती आनंदपुरी यांनी आखाडा परिषदेच्या माध्यमातून करण्यासारखे आणखी कितीतरी कामे आहेत. साधू म्हणून आपण समाजासाठी काही देणे लागतो ते दिले पाहीजे असे मत मांडले. निर्मल आखाड्याचे राजेंद्रसिंह यांनी आखाड्यांच्या जम‌िनी शासनाच्या उपक्रमांसाठी दिलेल्या आहेत तरी देखील आरक्षण टाकले आहे. याबाबत आपणास या षडदर्शन आखाडा परिषदेने साथ दिली नाही, अशी खंत व्यक्त केली. मंगळवारी मंदिरात आंदोलन प्रसंगी साधू महंतांमध्ये फुट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरच तुमची स्कॉलरशिप थेट खात्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना पैसे थेट आधार संलग्न खात्यात हवे असतील तर वर्गातही किमान ५० टक्के हजेरी लावणे त्यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. बहुतेकदा कॉलेज कट्ट्यांचे वारे लागल्यानंतर लेक्चर्स बंक करण्याच्या सवयींमुळे या वर्गातील विद्यार्थिसंख्या घटत असल्याचे सरकारचे निरीक्षण आहे. हे हेरूनच सरकारने विद्यार्थ्यांचे नेमक्या ठिकाणी नाक दाबले आहे.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपचे पैसे आता थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा होणार आहेत. इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असला तरीही यासाठी वर्गामध्ये किमान ५० टक्के हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा, यासाठी सरकारने विविध स्कॉलरशिपच्या योजना लागू केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेचा समावेश आहे. या योजनांची रक्कम यापूर्वी कॉलेजांकडे सुपूर्द करण्यात येत होती. मात्र, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नियमांत बदल केल्याने आता ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०१७- १८च्या शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रथम सत्रासाठी हजेरीचे बंधन शिथिल करण्यात आले आहे.

कॉलेजेसना बायोमेट्रिक सक्तीचे

आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणारी स्कॉलरशिपची रक्कम मिळविण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांची हजेरी पन्नास टक्के असणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांच्या हजेरीची माहिती सरकारला प्राप्त होण्यासाठी सर्व कॉलेजांनी स्वखर्चाने बायोमेट्रिक प्रणाली बसवून घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डबल वोटींग केल्यास बाराच्या भावात जाल

0
0

नाशिक : केवळ राज्यात नव्हे, तर देशात एकाहून अधिक ठिकाणी मतदार नोंदणी असलेले दुबार मतदार (डुप्लिकेट मतदार) शोधून काढणारी अद्ययावत ‘ईआरओ’ प्रणाली विकसित करण्यात भारतीय निवडणूक आयोगाला यश आले आहे. त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळ मिटवितानाच एकाहून अधिक ठिकाणी मतदान करणाऱ्यांनाही चाप बसविणे शक्य होणार आहे. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मे महिन्यापासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे निवडणूक कामात पारदर्शकता येतानाच लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे.

निवडणूक प्रक्रियेतील हा मागासलेपणा दूर व्हावा, मतदार यादी अद्ययावत आणि परिपूर्ण असावी यासाठी निवडणूक आयोगाने ‘इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर’ (ईआरओ) ही प्रणाली पूर्ण देशात कार्यान्वित करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये मतदार नोंदणी अधिकारी म्हणून देशभरात कार्यरत उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच समकक्ष अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र इंटरनेट कनेक्शनद्वारे जोडण्यात येणार आहे. यासाठी विशेष प्रणाली विकसित केली असून, ती हाताळण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. अलीकडेच पुण्यात काही तज्ज्ञांनी निवडक अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले.

मतदारांची लबाडी होणार उघड

महापालिका क्षेत्रात राहणारी व्यक्ती शहरात आणि गावाकडेही मतदान करते. दुबार नावे असलेल्या मतदारांना शोधून त्यांचे नावे कुठल्यातरी एका मतदार यादीमधून वगळणे प्रशासकीय यंत्रणेपुढे आव्हान ठरत होते. परंतु, या नवीन प्रणालीमुळे निवडणूक यंत्रणांच्या डोळ्यात धुळफेक करणारे मतदार सहज पकडले जातील, असा दावा अधिकारी करीत आहेत. या प्रणालीमुळे मतदारांचे डॉक्युमेंट स्कॅन होऊन त्यांचे व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर अशा मतदाराचे परमनंट रेकॉर्ड तयार होईल. कुठलाही अधिकारी ते केव्हाही पाहू शकतील.

‘ईआरओ’ प्रणाली

एकाच नावाचे दोन अथवा अधिक मतदार या प्रणालीद्वारे शोधता येणार. मतदाराचा फोटो, माहिती एकसारखी असल्यास त्याचे एका मतदार यादीमधील नाव वगळले जाईल. मतदाराला नाव वगळण्याबाबतची नोटीस दिली जाईल. दोन ठिकाणी नाव नोंदणीचा प्रयत्न केल्यास त्याबाबतची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना प्राप्त होऊन हा प्रकार वेळीच टाळणे शक्य होईल.

मतदार याद्यांमधील त्रूटी दूर करून डुप्लिकेट मतदारांचा शोध घेणे आणि मतदाराने एकाच ठिकाणी मतदान करावे, या उद्देशाने इआरओ प्रणाली काम करेल. या प्रणाली वापराबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जात आहे.

- गणेश राठोड, तहसीलदार निवडणूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकहून मुंबईला एअरटॅक्सीने करा प्रवास

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने उडान योजनेत नाशिकचा समावेश केल्यानंतर आता विमानसेवेसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. एअर डेक्कननंतर आता मुंबईतील एका एअरटॅक्सी कंपनीने नाशिककरांना सेवा देऊ केली आहे. मुंबई आणि पुण्यासाठी ही सेवा मिळणार असून, त्यासाठी नाशिककरांना अवघे ३ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

नाशिकच्या विमानसेवेला लागलेले ग्रहण आता दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्र सरकारने प्रादेशिक पातळीवर विमानसेवा विस्तारण्यासाठी योजलेल्या उडान योजनेत नाशिकचाही समावेश केला आहे. ओझर येथील एचएएलच्या विमानतळावरुन एअर डेक्कन कंपनीद्वारे नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा येत्या १ सप्टेंबरपासून दिली जाणार आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर विमानसेवेसाठी हालचाली गतिमान

झाल्या आहेत. एचएएलने १९ आसनी डॉर्निअर या प्रवासी विमानाची यशस्वी निर्मिती केली आहे. ही दोन विमाने येत्या १ मेला ओझर विमानतळावर दाखल होणार आहेत. या विमानांद्वारे एचएएलकडूनच प्रवासी विमानसेवा देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असतानाच आता मुंबईतील एका एअरटॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीने नाशिकसाठी ऑफर जाहीर केली आहे. ओझर विमानतळ ते जुहू आणि जुहू ते ओझर अशी सेवा सर्वप्रथम सुरू करण्याचे कंपनीने म्हटले आहे. डबल इंजिन असलेल्या आणि चार आसनी क्षमतेच्या या विमानाद्वारे सेवा देण्यास कंपनी इच्छूक आहे. अवघे तीन हजार रुपये भाडेही त्यासाठी आकारले जाणार आहे. फक्त नाशिककरांनी पहिल्या २५० तासांचे फ्लाईंग (म्हणजे नाशिकहून मुंबईला १५० वेळा जाणे आणि मुंबईहून नाशिकला १५० वेळा येणे) एवढे बुकिंग करावे, असे आवाहन कंपनीने केले आहे. नाशिक-मुंबई (जुहू) यशस्वी झाल्यानंतर पुण्यातील लोहगाव येथे सेवा देण्याचे कंपनीने सांगितले आहे.

असा होणार फायदा

ओझरहून अवघ्या जुहू विमानतळावर अवघ्या ४० मिन‌िटात प्रवास करता येणार आहे. सांताक्रुझ येथील विमानतळावर असलेली गर्दी आणि त्यामुळे लागणारा वेळ यामुळे वाचणार आहे. जुहू येथून अवघ्या १० मिन‌िटात मुंबईतील कामासाठी प्रवासी जाऊ शकणार आहेत. तसेच तिकडून येतानाही अशाच प्रकारे वेळेची बचत होणार आहे.

एका कंपनीचा पुढाकार

एअरटॅक्सी कंपनीच्या या आवाहनाला सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका आयटी कंपनीने तत्काळ प्रतिसाद दिला आहे. दररोज सकाळी नाशिकहून मुंबईसाठी नऊ सिटांचे तसेच संध्याकाळच्या सुमारास मुंबईहून नाशिकसाठी नऊ सिटांचे बुकिंग देण्याची तयारी या कंपनीने दर्शविली आहे. अन्य कंपन्यांनीही अशाच प्रकारे पुढाकार घेतल्यास एअरटॅक्सीची सेवा नाशिककरांना लाभणार आहे.

शहरात होणार बैठक

एअरटॅक्सी सेवेला प्रतिसाद देण्याबाबत निमा, आयमा, क्रेडाई, आयएमए, आर्किटेक्ट असोसिएशन यासारख्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येत्या एक-दोन दिवसात होणार आहे. या बैठकीतील निर्णय एअरटॅक्सी कंपनीला कळविला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images