Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आता हरवलेल्यांना मुलांना ‘आधार’

$
0
0

मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये पहिले ओपन शेल्टर होम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रागावून घर सोडून आलेली लहान मुले किंवा हरवलेली मुले एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागून त्या मुलांचा गैरवापर केला जाऊ नये, यासाठी ओपन शेल्टर होम आता मदतशील ठरणार आहे. महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे बालन्याय व संरक्षण अधिनियम २०१५ कलम ४३(१) अन्वये राज्यात प्रायोगिक तत्त्वावर अ वर्ग व ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रात ओपन शेल्टर होम स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिकचाही समावेश असून नाशिक जिल्ह्यात पहिले ओपन शेल्टर होम यानिमित्ताने होणार आहे.

राज्यात मुंबईमध्ये २ तर पुण्यात १ ओपन शेल्टर होम आहे. यानंतर आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, चिंचवड, नाशिक येथे हे शेल्टर होम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अशासकीय संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी १९ मेपर्यंत जिल्ह्यांच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव जिल्हा कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. हे शेल्टर होम स्थापन करण्यासाठी काही अटी, शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संबंधित संस्था धर्मादाय आयुक्त आणि संस्था नोंदणी कायद्याखाली नोंदणीकृत करावी, संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी व निवासी संस्था चालविण्याबाबत परिपूर्ण अशावी, संस्थांकडे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ मधील तरतूदी आणि एकात्मिक बाल संरक्षण योजना मार्गदर्शिकेप्रमाण्‍ाे काम करण्यास तयार असावी अशा अटींचा समावेश आहे. बेघर, रस्त्यावर भटकणारी मुले असल्याबाबत संबंधित परिक्षेत्राच्या पोलिस अधिकार्याचा दाखला संस्थेला प्रथम नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. संस्थांचे प्रस्तावित सेंटर संबंधित शहराच्या, गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा धार्मिक स्थळ यापासून दोन किमी अंतरात असावी. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


नाशिकमध्ये ओपन शेल्टर होम असावे, अशी मागणी करत आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता. शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींना याचा प्रामुख्याने वापर होणार आहे. या मुलांना त्यांच्या घरी पोहोचवणे हा या शेल्टर होममागील उद्देश असून त्यांचा येथे राहण्याचा कालावधीही कमी असणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा अशा मुलभूत गरजाही येथे भागविण्यात येतील.

- गणेश कानवडे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिव्यांगांचे भावविश्वही जाणून घ्या...

$
0
0

नाशिक ः दिव्यांग आणि अनाथांना वयाच्या अठराव्या वर्षानंतरही अनाथालयात राहू द्यावे, या प्राधान्याच्या मुद्द्यावर दिव्यांगांच्या आयुष्यभराचे हित साधण्यासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित करणारा अवलिया म्हणजे अमरावतीचे शंकरबाबा पापळकर. तेथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहात सध्या ९८ मुली व २५ मुले अशा एकूण १२३ दिव्यांग मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुनर्वसनासाठी झटणारे पापळकर नुकतेच एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला येऊन गेले. या निमित्ताने दिव्यांगांच्या विश्वावर त्यांच्याशी गप्पांमधून टाकलेला एक प्रकाशझोत...

प्रश्न : दिव्यांगांच्या जगण्याशी निगडित प्रश्नांना आजही अंत नाही. यातील आपल्या दृष्टीने प्राधान्याचा मुद्दा कुठला?

उत्तर : नियतीने जन्म दिलेल्या अंध, अपंग, मूकबधिर, गतिमंद यांचे उभे आयुष्य म्हणजे केवळ संघर्ष आहे. यातही जर अशी अपत्ये गरीब कुटुंबांमध्ये जन्मली तर त्यांचे पुनर्वसन किंवा सांभाळ हाही एक मोठाच सामाजिक प्रश्न आहे. आजमितीस देशात दिव्यांगांसाठी चालविल्या जाणाऱ्या कुठल्याही सामाजिक प्रकल्पांमध्ये वयाच्या अठराव्या वर्षानंतर त्यांना अनाथालयात राहू दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या वाट्याला पुन्हा एकदा बेवारस मरणयातना येतात. ते थांबवण्यासाठी १८ वर्षांनंतरही त्यांना सांभाळले जावे, असा कायदा होणे अत्यावश्यक आहे. तेथेच त्यांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा मला प्राधान्याचा वाटतो.

प्रश्न : वझ्झरच्या बालगृहात आपण सव्वाशे दिव्यांगांचे पालकत्व स्वीकारले...

उत्तर : अमरावती जिल्ह्यात वझ्झर येथे १९९० मध्ये स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहाची स्थापना झाली, तेव्हापासून या संस्थेसाठी मी घरदार सोडून काम सुरू केले. कालांतराने आमचे म्हणणे समाजालाही पटत गेले. कार्याचा विस्तार होत सध्या या बालगृहात ९८ मुली व २५ मुले असा सुमारे सव्वाशे दिव्यांग भावंडांचा परिवार नांदतो.

प्रश्न : दिव्यांगांसाठीच्या सामाजिक कार्यात अनेक संस्था आहेत. आपल्या संस्थेचे यात वेगळेपण कुठले?

उत्तर : बहुतांश संस्था शासकीय अनुदान वा पुरस्कारांच्या प्रोत्साहनावर वाटचाल करतात. मात्र, त्यांना त्या वेळी दिव्यांगांच्या हितास बाधा आणणारे नियमही सांभाळावे लागतात. आमच्या संस्थेने सरकारचे अनुदान नाकारून लोकाश्रयावर अस्तित्व टिकविले. सरकारचे अनुदान स्वीकारले असते तर कुटुंबाप्रमाणे जोपासलेल्या या संस्थानामक घरातून येथील दिव्यांग लेकरांना बेघर करावे लागले असते. मला वाटते, हे आमच्या संस्थेचे वेगळेपण आहे.

प्रश्न : या कार्यात येण्यापासून झोकून देण्यापर्यंतचा आपला प्रवास कसा झाला?

उत्तर : तीस वर्षे ‘देवकीनंदन गोपाला’ या नावाने एक मासिक मी चालविले. माझ्या उदरनिर्वाहाचेही ते साधन होते. या मासिकाच्या निमित्ताने अनेक सेवावस्ती किंवा रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी संपर्क आला. तेथे दिव्यांग मुलांचे होणारे शोषण अंतर्मुख करून गेले अन् सर्व सोडून मी या सामाजिक क्षेत्रात झोकून दिले. कुटुंबानेही साथ दिली. मुले शिकलीसवरली, स्वत:च्या पायावर उभी राहिली. पत्नीच्या निधनानंतर मात्र माझे मूळ घर सोडून या संस्थेतच माझ्या कुटुंबाचा पाश तयार झाला आहे.

प्रश्न : दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठीही आपला सातत्याने पुढाकार आहे. समाजाचा प्रतिसाद याबाबत कसा मिळतो?

उत्तर : दिव्यांगांबाबत समाजाचे काही पूर्वग्रह आहेत. हे पूर्वग्रह बदलण्याची गरज आहे. या मुलामुलींच्या विवाहापश्चात अनेकांचे नवे संसार उभे राहिल्याचे, त्यांना हुशार आणि व्यंगरहित अपत्य झाल्याची उदाहरणे माझ्याकडे कमी नाहीत. समाजाने आपल्या धारणा बदलून सकारात्मक मानसिकतेने या मुलांकडे बघावे ही अपेक्षा घेऊन समाजात मिसळलो, बोललो तर समाज नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतो, असा आजवरचा अनुभव आहे.

प्रश्न : या मुलांना देण्यात येणारी शिक्षणपद्धती पूरक आहे का?

उत्तर : दिव्यांग मुलांच्या बाबतीत एकूणच खूप अपूर्ण विचार केला जातो. त्यांच्या पालनपोषणात केवळ काही वर्षे पुढे ढकलली जातात. मात्र त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांना स्वावलंबी बनविणारे जे शिक्षण आहे ते सध्या त्यांना दिलेले अभ्यासक्रम देत नाही. परिणामी, त्या मुलांचा विकास खुंटलेला राहतो. या मुलांना स्वावलंबी शिक्षण मिळायला हवे.

प्रश्न : सरकारकडून या समूहासाठी काय अपेक्षा आहेत?

उत्तर : या मुलांना वयाच्या अठरा वर्षानंतर आधाराश्रमांमध्ये निवासी राहण्याची तरतूद व्हावी. याशिवाय या मुलांच्या नावे तरतूद होणाऱ्या एकूण रकमपैकी बहुतांश रक्कम संबंधित सेवा संस्था किंवा प्रकल्पांच्या आस्थापना व कर्मचाऱ्यांच्या पोषणापोटी खर्च होते. मूळ लाभार्थी असणारे अनाथ दिव्यांग या लाभाचे वाटेकरी होतच नाहीत. ही दरी मिटण्यासाठी सुधारित धोरणे राबविणे गरजेचे वाटते.

प्रश्न : सर्वसामान्यांप्रमाणे या मुलांना वागणूक मिळत नाही, हा आपला आक्षेप आहे. वझ्झर मॉडेल काय आहे?

उत्तर : होय, हा आक्षेप आहेच. सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक या मुलांना असती तर त्यांना मतदानाचा अधिकार असता, त्यांच्याकडे आधार कार्ड असते. त्यांना रहिवासी दाखले मिळाले असते. या हक्कांपासून त्यांना कुठल्या कायद्यावर नाकारले जाते, या मुद्द्यांसाठी माझा संघर्ष सुरूच आहे. आमच्या संस्थेतील मुलांसाठी या तरतुदी मी ग्रामपंचायतीद्वारे अमलात आणल्या आहेत. मग हा प्रयोग देशपातळीवर शक्य नाही का? मी जे ‘वझ्झर मॉडेल’ मांडतो ते हेच!

प्रश्न : दिव्यांगांचे विवाहादि कार्य पार पडणे अन् त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळणे खूपच अनिश्चित असेल ना?

उत्तर : त्यांची बाजू समजावून घेणारे, ती मांडणारा एक घटक आणि मोठ्या मनाने त्यांना स्वीकारणारा, आपलंसं करणारा दुसरा घटक यांचा सांधा जमला, की या गोष्टी पुढे सहज जुळून येतात. माझ्या १२३ दिव्यांग मुलांपैकी १९ मुलींचा ३० एप्रिल रोजी जळगावात विवाह होतो आहे. माझी १२ दिव्यांग मुले सरकारी नोकरीत आहेत. काही मुले संस्थेतच विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. ही बाजूही समाजाने विचारात घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या समस्या सोडवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांसाठी स्वच्छतागृह, रस्त्यांचा प्रश्न आदी समस्या सोडविण्याची मागणी नाशिकमधील मटा सिटीझन रिपोर्टरने केली आहे.

महिलांसाठी व शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून शहरातील ठराविक अंतरावर प्रत्येक भागात स्वच्छतागृह उभारायला हवे. नागरिकांनीही या स्वच्छतागृहाचा योग्य फायदा घेत त्याची स्वच्छता राखावी. घाण करणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी.

- प्रतिमा पुंडे, मखमलाबाद रोड

मोठ्या रस्त्यांचे किंवा हायवेच्या टेंडरला मान्यता देताना त्याच्या आजूबाजूच्या बायपास व सर्व्हिस रोडचादेखील विचार पालिकेने करायला हवा. अनेकदा यामुळे वाहतुकीच्या समस्या उद््भवतात, तसेच स्मार्ट अॅपवर या संदर्भात तक्रार केल्यास कोणतेही कारण न देता तक्रार बंद, असा मेसेज पालिका पाठवते. हे प्रकरण मार्गी लावत पालिकेने नाशिककरांचे समाधान करायला हवे.

- संजय परांजपे, म्हसरूळ

राजीवनगर व पाथर्डी रोडवर अनेक झाडे पालिका प्रशासनाने लावली. मात्र, या वेळी खोदलेले रस्ते अजूनही तसेच आहेत. रस्त्यात असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे अनेकदा या परिसरात अपघात होत आहेत. महापालिकेने नाशिक स्मार्ट करताना कामाच्या बाबतीत सुसूत्रता पाळणे महत्त्वाचे आहे.

- अंजली गाडे, इंदिरानगर

हरित लवादाने कचरा जाळू नये असे निर्देश दिले आहेत. मात्र, अजून शहरातील अनेक भागांत नियमित घंटागाडी येत नसल्याने घरात दिवसेंदिवस साचलेला कचरा अनेकदा जाळला जातो. यासाठी घंटागाडी व उद्यान विभागाची गाडी झाडांचा पालापाचोळा घेऊन जाण्यासाठी नियमित होणे गरजेचे आहे.

- मनोज पाटील, इंदिरानगर

शहरात अनेक मुख्य रस्त्यांवर दुपारी मोकाट जनावरे बसलेली असतात. मोकाट जनावरांच्या अडथळ्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येतोच, पण ही मोकाट जनावरे अनेकदा जखमी होतात. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच जनावरांच्या मालकांनी याची तंबी द्यावी.

- लक्ष्मण आहेर, आरटीओ कॉर्नर

चांगल्या दर्जाचे रस्ते बांधून झाल्यानंतरच कायम पाण्याची पाइपलाइन टाकली जाते. मग ड्रेनेज ओपन, रस्त्यात खड्डे या समस्या निर्माण होतात. यामुळे उत्तम दर्जाचे रस्ते पुन्हा खराब होतात. यात पालिकेचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो. म्हणून पालिकेने योग्य आराखड्याचे नियोजन करून रस्ते बांधकाम पूर्ण करायला हवे.

- स्वप्निल देवरे, पाथर्डी फाटा

महापालिकेने सुरू केलेली नागरी सुविधा केंद्राची सुविधा अद्याप ऑनलाइन झालेली नाही. नाशिककरांना सतावणाऱ्या समस्यांविषयी निराकरण होण्यासाठी ऑनलाइन तक्रार मागविल्या जातात, असे सांगूनही त्यांचे अॅप योग्यतेने काम करीत नाही. पालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष घालावे.

- समीर भडांगे, बोधलेनगर

जसे नो पार्किंगमध्ये असणारी वाहने टोइंग करून नेली जातात, तशीच रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे पालिकेने ताब्यात घ्यावी. कोंडवाडा किंवा पांजरापोळमध्ये ही जनावरे जमा करावीत. त्यांच्या मालकांनी पालिकेत बोलावून दंड स्वीकारून तेव्हाच ती जनावरे ताब्यात द्यावीत. म्हणजे जनावरांची हेळसांड थांबेल व नाशिक सुंदर अन् स्वच्छ दिसेल.

- विलास सोनार, उपनगर

नवी मुंबईप्रमाणे ई-टॉयलेटची सुविधा नाशिकमध्ये सुरू व्हावी म्हणजे स्वच्छचागृहांचा प्रश्न सुटेल, तसेच पालिकेने जशी कर्जवसुलीसाठी ढोल बजाव मोहीम केली, तशीच स्वच्छतेसाठी चौकाचौकांत करावी व जे कचरा किंवा इतर प्रकारे घाण करत असतील, त्यांच्या घरासमोर ढोल वाजवावेत.

- स्वप्निल काजळे, पाटीलनगर

शहरात नुकतेच वाहतुकीला अडथळे ठरणारे मोठे वृक्ष गंगापूर रोडवरून हटविण्यात आले. या वेळी कोणत्याही कारागिराच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते. हे कारागीर जिवाची बाजी लावत अनेक मोठ्या इमारतींवर चढून वायरिंग हलवत होते. या वेळी त्यांचा पाय सरकला असता किंवा काही झाले असते तर जीव गमवावा लागला असता. पुढील वेळी कारागिरांना सेफ्टी हेल्मेट सक्ती करावी.

- प्रवीण नागरे, लवाटेनगर

शहरातील अनेक रस्त्यांवर गतिरोधकांची उंची खूप आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. शहरातील गतिरोधकांची उंची ठराविक असावी किंवा नव्या शैलीचे व चांगल्या दर्जाचे गतिरोधक सर्वत्र उभारावेत.

- आकाश तोटे, शिवाजी चौक, सिडको

नो हॉर्नप्रमाणे शहरातील रिक्षांमध्ये नो साऊंड सिस्टीम मोहीम आखावी. शहरातील रिक्षाचालक रिक्षेत मोठ्याने विचित्र गाणी लावतात. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे ध्वनिप्रदूषण होते. यावर आळा म्हणून पोलिस यंत्रणेने अशा रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करावी.

- दिलीप सांगळे, दिंडोरी रोड

मैत्रेय घोटाळ्यात ज्या नाशिककरांचे पैसे अडकले आहेत त्यातील काही नागरिकांना पैसे मिळाले आहेत; पण काहींना अजूनही चेक मिळाले नाहीत. पोलिस यंत्रणा यासाठी राबत आहेच, पण लवकरात लवकर उरलेल्यांनाही चेक देण्यात येतील यासाठी पाठपुरावा व्हावा.

- भूषण गायकवाड, पंचवटी

सध्या नाशिक पोलिस अनेक चांगले उपक्रम राबवत आहेत. यामुळे नाशिककरांना शिस्त लागत आहेत. यालाच जोड म्हणून व महिलांच्या सबलीकरणासाठी पोलिस यंत्रणेतर्फे शहरातील शाळा-कॉलेजांमध्ये स्वरक्षणाचे धडे देण्याचे प्रशिक्षण तरुणींना व विद्यार्थिनींना देण्यात यावे.

- पल्लवी चंपानेरकर, गंगापूर रोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संदीप’च्या रिसर्च सेंटरला आठवे नामांकन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

भारतीय पेटंट कार्यालयात विविध विद्याशाखांतर्गत येथील संदीप इन्स्टिट्यूटच्या रिसर्च सेंटरने सुमारे १४० पेक्षाही अधिक पेटंटची नोंदणी केली आहे. इन्स्टिट्यूटच्या या अनोख्या कामगिरीमुळे भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन विकास संस्थानने राष्ट्रव्यापी पाहणीतील पहिल्या १० संस्थांच्या यादीत या इन्स्टिट्यूटला आठवे नामांकन जाहीर केले आहे.

इंजिनीअरिंग विभागातील विविध क्षेत्रातील नाविण्यपूर्ण प्रयोग संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. हे प्रयोग उद्योजक कौशल्य विकासास पूरक ठरणारे आहेत, असा विश्वास रिसर्च सेंटरच्या प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे.

या द‌हा संस्थांच्या यादीत संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर सोबतच देशातील सीएसआयआर, सॅमसंग, संशोधन आणि विकास संस्था, भारत डीआरडीओ

आणि सी-डॅक आदी नामांकित संस्थांचा समावेश आहे. या यशाबद्दल संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीपकुमार झा, प्रा. डॉ. एस. टी. गंधे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर सिक्युरिटीबाबत ​ शुक्रवारी मार्गदर्शन

$
0
0

निमा व सायबर आयटी सिक्युरिटीतर्फे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

डिजीटल क्रांती झाल्याने इंटरनेट हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढल्याने इंटरनेट क्षेत्रातील सायबर क्राईमचे प्रमाणही वाढले आहे. ‘सायबर क्राईमचे स्वरुप, कारणे आणि घ्यावयाची काळजी यावर जनजागृती करण्यासाठी सायबर सुरक्षा’ या विषयावर निमा व सायबर आयटी सिक्युरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी ४ ते ६ वाजता या वेळेत सातपूर येथील निमा सेमिनार हॉलमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन असणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. त्यासाठी बाजारात दररोज विविध ऑनलाइन सेवा सिस्टिम्सची भर पडत आहे. परिणामी सायबर क्राईमही वाढत असून, पार्श्वभूमीवर आपल्या गोपनीय माहितीची सुरक्षा अबाधित ठेवणे काळाची गरज बनली आहे. याप्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल उपस्थित राहणार असून, सायबर आयटी सिक्युरिटीचे सीईओ अमर ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानास नागरिकांना विनामूल्य प्रवेश असून, व्यावसायिक, उद्योजकांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, उदय खरोटे, निमा आयटी समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक परिषदेत विविध निर्णय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, अमृतधाम

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू हे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कोकण, मराठवाडा व नागपूर विभाग शिक्षक निवडणुकीबाबत आढावा घेण्यासंदर्भात, कोकण व मराठवाडा विभागात शिक्षक परिषदेच्या उमेदवारांचा झालेल्या पराभवाबाबत चर्चा करण्यात आली.

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाबाबत शिक्षक परिषदेने शिक्षकांच्या केजी टू पीजी या घटकांबरोबरच विद्यापीठस्तर, प्राथमिक विभाग, आश्रमशाळा, जिल्हा परिषद या विभागातील संघटन मजबूत करून परिषदेचे कार्य पोहोचवावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासोबतच संघटनेच्या गतिमानतेसाठी सभासद नोंदणी वाढविणे, शिक्षक परिषदेचे कार्य सामान्य शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर शिक्षकांचा अभ्यासवर्ग घेण्यात यावा, असेही निश्चित करण्यात आले.

या संदर्भातील पहिला राज्य कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग २० मेला नागपूर येथे घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर अभ्यासवर्ग घेतले जाणार असल्याचेही ठरविण्यात आले. बैठकीत कार्यवाह नरेंद्र वातकर, आमदार नागोजी गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संजीवनी रायकर, किरण भावठाणकर, सुनील पंडीत, गुलाब भामरे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येय निश्चित केल्यास यश हमखास मिळते

$
0
0

कुसुम नाईक यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक अडचणींना तोंड देत नाईट हायस्कूलमधील शिक्षण पूर्ण केले. स्त्री असल्यामुळे नाईट हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यास थोडे वेगळे वाटले. परंतु, येथील शिक्षकांनी मुलीला जीव लावता त्याप्रमाणे शिक्षण दिले. त्यामुळे रात्र शाळेतील शिक्षण आयुष्यात खूप संस्मरणीय ठरले. लग्नानंतर शिक्षण घेऊन आज स्वतःच्या पायावर उभी आहे. त्यामुळे एकदा शिकण्याची जिद्द व ध्येय निश्चित केल्यावर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन नाईट हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी कुसुम नाईक यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाईट हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जु. स. रुंगठा हायस्कूलमध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी नाईक माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना बोलत होत्या. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ १ मे २०१७ पासून शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या शतक महोत्सवानिमित्त संस्थेने अनेक संकल्प केले आहेत. त्यात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने संस्थेच्या विविध संकल्पांची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी माजी विद्यार्थी मेळावे आयोजित केले जात आहेत.

माजी विद्यार्थ्यांना जोडणार

यानंतर शाळेचा माजी विद्यार्थी व सध्या नाशिक येथे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी ब्राच मॅनेजर असलेले दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेसाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शाळेचे १९७३चे विद्यार्थी आर जी कुलकर्णी, नुकताच शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला मिलिंद साळवे व सरकारी नोकरी करून पोल्ट्री व्यवसाय करणारे नंदकिशोर माळी या माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाणी यांनी केले. प्रास्ताविकात सांस्थेचे शतक महोत्सवी वर्षातील विविध उपक्रमाची माहिती दिली व या मेळाव्यातून माजी विद्यार्थ्यांना पुन्हा

शाळेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या परिचित विद्यार्थ्यांना शाळेशी जोडून घ्यावे व आपला सहभाग शाळा व संस्थेच्या विकासासाठी द्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी शिक्षक किनगे व ज. गं. मेतकर हे होते. तर अध्यक्षस्थानी शिवाजी कुमावत होते. पाहुण्यांचा परिचय दिलीप अहिरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कुणाल जोशी यांनी केले.

यावेळेची नाशिक आकाशवाणीवर दर सोमवारी सकाळी ९ वाजता संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर प्रकाशित होणा-या संचित शतकांचे स्वप्न उज्ज्वल भविष्याचे कार्यक्रमाची ऑडिओ क्लिप सर्वांना ऐकवली. कार्यक्रमास राजेश कायस्थ, गोरखनाथ क्षीरसागर, भाऊसाहेब गुळवे, योगेश कुलकर्णी, शशिकांत खोत, विलास सोनार, ज्ञानेश्वर रोकडे, दिगंबर बिरारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ उत्तरपत्रिकांप्रकरणी प्राध्यापकांची चौकशी

$
0
0

कॉलेजऐवजी विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका वापरल्याची कबुली

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

भंगारच्या गाडीवर मॅथ्स विषयाच्या सापडलेल्या उत्तरपत्रिका पुणे विद्यापीठांतर्गतच असल्याची कबुली देत परीक्षा विभागाने संबंधित कॉलेजच्या प्राध्यापकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. परिणामी, काही दिवसांपूर्वीच देशपातळीवरील सरकारच्या पाहणीत पहिल्या दहांत स्थान मिळविणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत येथे एका भंगारच्या गाडीवर उत्तरपत्रिकांचा गठ्ठा तेथील सामाजिक कार्यकर्ते दीपक गोसावी यांना सापडला होता. हा गठ्ठा जुना असला तरीही त्यातील गुणदान हे व्हाईटनरने खाडाखोड करून व उत्तरे न तपासताच अंदाजपंचे झाल्याचे चित्र उत्तरपत्रिकांच्या अवस्थेवरून उघड होत होते. या प्रकरणास ‘मटा’ ने ही ‘गणिताच्या विद्यार्थ्यांना अंदाजपंचे मार्क्स’ या मथळ्याखाली १८ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडली होती.

आता याप्रकरणी पिंपळगाव येथील के. के. वाघ कॉलेजच्या प्राध्यापकाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश डॉ. गाडे यांनी दिले आहेत. कॉलेज अन् विद्यापीठास दिलेल्या खुलाशात सुर्वेंनी कॉलेजच्या ऐवजी विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका वापरल्याचे मान्य केले आहे. मात्र उत्तरपत्रिका कशा बाहेर पडल्या, त्याचे उत्तर त्यांना देता आलेले नाही. सुर्वे यांना कॉलेज प्रशासनाने बोलावून समज दिली असून, याशिवाय त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिरवणुकीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

परभणी जिल्हयातील पूर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर गावातील जातीयवादी मानसिकता असणाऱ्या जमावाने अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे स्त्री-पुरुष व बालकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे गुरुवारी (दि. २०) मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

याप्रकरणी प्रशासनाने हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अटक न करता मिरवणुकीतील जखमीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच अल्पसंख्यांकाना संरक्षण देण्यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात यावे, दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचे सामाजिक ऑडीट करण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. यावेळी दलित पँथरचे सिद्धार्थ वाघ, विशाल थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांचा अंत पाहू नका’

$
0
0

धुळे : सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये संपूर्ण कर्जमाफी करून राज्य सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आता कर्जमाफी द्यावी. तसेच शेतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

‘संवादपर्व’ अंतर्गत खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. २०) जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी धुळे शहरातील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, शेतकरी आत्महत्या विषय गंभीर असल्याचे सांगितले. आतापर्यंत कधी नव्हे एवढे गंभीर चित्र असताना सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाही. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महापौर कल्पना महाले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोका सांगे ब्रह्मज्ञान...

$
0
0

हे छायाचित्र १८ एप्रिल २०१७ रोजी मेहेर सिग्नलवर दुपारी १२.०० वा. काढलेले आहे. सामान्य जनतेवर नियमपालनाची सक्ती ही स्वागतार्हच आहे; पण त्यासोबत कायदा अन् सुव्यवस्था राखणाऱ्यांनी याचे पालन केल्यास लोकांमध्ये चांगला संदेश जाईल. (खाकी वर्दीतील या दोहोंनी हेल्मेट घातलेले नाही, तसेच सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी उभी केलेली आहे.)

- योगेश्वर मोजाड, सिटीझन रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बससेवा १ मेपासून बंद!

$
0
0

तोटा भरून न निघाल्याने एसटी महामंडळाचा निर्णय

नाशिक : महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक बससेवा ही महापालिकांनीच सांभाळण्याचे संकेत आहेत. हीच स्थिती राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये आहे. मात्र, ही बाब नाशिकला अपवादात्मक होती. तोटा वाढत असल्याने शहर बस वाहतूक सेवा महापालिकेने चालवावी, यासाठी एसटी महामंडळाने वारंवार प्रयत्न केले. मात्र वेगवेगळ्या कारणांनी ही सेवा महापालिकेने टाळली. अखेर तोटा भरून निघणे शक्य नसल्याने येत्या १ मेपासून शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

पाच वर्षांपासून १०८ कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने १ मेपासून शहर बससेवा बंद करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. याबाबत गोपनीयता पाळली जात असली तरी असे पत्र महापालिकेला पुन्हा देण्यात येणार आहे. वाढत्या तोट्यामुळे शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा तोटा भरून द्यावा, असे सांगत १ फेब्रुवारी रोजीच ही सेवा बंद करण्याचे एस टी महामंडळाने नाशिक महापालिकेला कळवले होते. पण, महापालिका निवडणुकीनंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ही शहर बससेवा सुरू ठेवण्यात आली. अडीच महिने उलटूनही यावर काहीच निर्णय न झाल्यामुळे आता पुन्हा एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाच वर्षांत नाशिक शहर बस वाहतुकीसाठी महामंडळामार्फत दैनंदिन सरासरी २०८ नियते व एकूण ८९१.३२ कि. मी. (लाख) वाहतूक सेवा पुरविण्यात आली आहे. त्यातून महामंडळाला सुमारे १०८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे ही बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा तोटा भरून द्यावा, अशी मागणी केली होती. पुढे त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. याअगोदर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले होते.

पहिल्या टप्प्यात ४५ बसेस बंद

सर्व बसेस एकाच वेळी बंद कराव्या की टप्याटप्याने याबाबत महामंडळ विचार करीत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ४५ बसेस बंद करण्यात येणार आहेत. शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे हा निर्णय दरवर्षी घेतला जात असला तरी या बसेस पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे ज्या मार्गावर सेवा परवडत नसेल तेथेही बस बंद केली जाण्याची शक्यता आहे. या अगोदर अनेक मार्गाच्या फेऱ्या बंद केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पुणे जादा रेल्वे हवी

$
0
0

पुणे जादा रेल्वे हवी

नाशिकहून पुणे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सद्यःस्थितीत पुण्याला जाण्यासाठी एकमेव रेल्वे आहे. मात्र ती अपुरी पडते. त्यामुळे आणखी एक एक्स्प्रेस सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांची अडचण दूर होईल.

- अनिस शेख, सिटीझन रिपोर्टर

कारवाई होणार का?

सौभाग्यनगर, विहितगाव येथे मोठ्या प्रमाणात बंगले आहेत. मात्र, काही जण अनधिकृत बांधकाम करीत आहेत. याची दखल घेतली जात नाही. अवैध बांधकामातून अनेक समस्या निर्माण होतात. एकाने तर थेट रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले आहे. संबंधित यंत्रणा कारवाईचे धाडस दाखवणार का?

- टी. नागनाथन, सिटीझन रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानदाराकडून लूट

$
0
0

दारू दुकानदाराकडून लूट

नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ दारूचे दुकान असल्याने रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची लूट होत आहे व हे दारूचे दुकान पाचशे मीटरच्या बाहेर असल्याने ते एकमेव दारूचे दुकान आहे. दारू घेण्यासाठी तेथे रांगेत उभे राहावे लागते. पोलिसांनी यांचा काही तरी बंदोबस्त करावा व लूट थांबवावी.

- तेजस शेरताटे, सिटीझन रिपोर्टर

महापुरुषाचा महावृक्ष

घारपुरे घाटाजवळील एक जुनी व प्रसिद्ध वास्तू तिवारी महालच्या प्रांगणात २६ जुलै १९३७ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वहस्ते लावलेल्या लिंबाचा वृक्ष आजमितीस असा ऐसपैस डेरेदार शाखापल्लवांनी बहरलेला दिसत आहे. त्याची शीतल छाया वाटसरूंना आल्हाददायक वाटते. मात्र, या महावृक्षाकडे दुर्लक्ष झालेले दिसते.

- विजय भदाणे, सिटीझन रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल दिवा ठरला औटघटकेचा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभर बोकाळलेल्या ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाल दिव्यांच्या वाहनांना प्रतिबंध घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे नवनियुक्त महापौर रंजना भानसी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांना या लाल दिव्याचा आब फार काळ मिरवता आला नाही. भानसी महापौरपदी विराजमान झाल्यानंतर केवळ ३८ दिवस, तर सांगळे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर ३१ दिवसच लाल दिवा मिरवता आला.

पंतप्रधानाचा हा निर्णय १ मेपासून लागू होणार असला तरी महापौर रंजना भानसी यांनी लाल दिवा काढला आहे, तर सांगळे सध्या बाहेरगावी आहेत. त्यामुळे त्यांना वाहन वापरता आलेले नाही. या लोकप्रतिनिधींबरोबरच महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी अंबर दिवा काढल्यामुळे जिल्ह्यातील अन्य अधिकाऱ्यांनीही आपल्या वाहनांचे दिवे काढले आहेत. या निर्णयामुळे देशात कोणीही व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरू शकणार नसल्यामुळे सर्वसामान्यांनी त्याचे स्वागत केले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, राज्यांचे मुख्यमंत्रीही १ मेपासून लाल दिव्याची गाडी वापरू शकणार नाहीत. केवळ आणीबाणीच्या परिस्थितीत सेवा प्रदान करणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलिस व्हॅनला निळे दिवे लावण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे व्हीआयपी संस्कृतीला चाप बसणार असून, याची चर्चा आज दिवसभर ठिकठिकाणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिमुकल्यांच्या संगतीने ‘किड्स कार्निव्हल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित केलेल्या ‘किड्स कार्निव्हल’ नोंदणीला लहानग्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्निव्हलविषयी त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असून येत्या रविवारपासून (दि. २३) हा दहादिवसीय कॅम्प त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉल येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे. कलाकुसरीच्या आकर्षक वस्तूंपासून योगासारख्या शरीर तंदुरुस्त ठेवणाऱ्या क्रियांचा यात समावेश असून, श्रुतिका सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे.

उन्हाळ्याची दीड ते दोन महिन्यांची सुटी ही केवळ दंगामस्तीत वाया न घालवता त्यातून काही चांगले शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा कार्निव्हल आयोजित करण्यात आला आहे. ४ ते १४ वयोगटातील मुलामुलींसाठी हा दहादिवसीय कार्निव्हल आयोजित करण्यात आला आहे.

या दहा दिवसांमध्ये चिमुकल्यांना क्राफ्ट या प्रकारात टाकाऊपासून टिकाऊ, ग्रिटींग कार्ड डिझाइन, अम्ब्रेला थ्री डी ग्रिटिंग कार्ड, स्प्रिंग ट्री क्राफ्ट्स, इनोव्हेटीव्ह कॅण्डी स्टीक्स प्रकारात कॅण्डीस्टीक्सपासून कलाकुसरीच्या वस्तू, पेन स्टॅण्ड, स्क्रॅप बुक, टी कोस्टर, किड्स योगा प्रकारात जीवनशैलीच्या दृष्टीने आवश्यक योगा प्रकार, लहान मुलांना योगामध्ये रस वाटेल असे २४ प्रकार, फन गेम्समध्ये सॅक रेस, हुलाहूप, सायन्स अँड नॉलेज या प्रकारात संभाषण कौशल्य, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, व्हिनेगर सोडा व्होलकॅनो, फ्लोटींग एग्ज यांचे प्रत्यक्ष प्रयोग शिकविण्यात येणार आहे. नो गॅस कुकिंग या प्रकारात मिल्कमेड कोकोनट लाडू, नो बेक ओरिओ कुकीज, चॉकलेट सॅण्डविच आदी पदार्थ शिकविले जाणार आहेत.

त्याचबरोबर कॅण्डल मेकिंग, डान्स व झुम्बा, वृक्ष लागवड असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे कार्निव्हल संपल्यानंतर अकराव्या दिवशी एकदिवसीय सहल नेण्यात येणार आहे. यामध्ये नाश्ता, जेवणाचाही समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो हॉर्न डे

$
0
0

उन्हाची प्रखरता

उन्हाळ्याची प्रखरता वाढत चालली आहे. सर्व मानवांसोबत प्राणी-पक्षीदेखील या उन्हात होरपळून निघत आहेत. असाच एक मोर उन्हापासून वाचण्यासाठी श्री रेणुकामातेच्या मंदिरात (चांदवड) आश्रयाला आला आणि सर्व भाविकांचे लक्ष त्याने वेधून घेतले.

- अमोल बालापुरे, सिटीझन रिपोर्टर

ड्रंक अँड ड्राइव्ह

दारू पिऊन गाडी चालविण्याचा उद्योग काही केल्या कमी होताना दिसत नाही. गंगापूर रोडवरील खतीब डेअरीच्या ठिकाणी असा अपघात घडला. वाहतूक नियमांकडे आपण इतक्या किरकोळ दृष्टीने पाहतो का?

- सूरज मोरे, सिटीझन रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी, नेटवर्कच्या समस्या सुटेनात!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जनतेच्या सोयीसाठी सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असावेत या मुख्य उद्देशाने आणि गतिमान प्रशासनाच्या नावाखाली कळवण शहरातील सर्व शासकीय कार्यालय कोल्हापूर फाटा येथील नवीन प्रशासकिय इमारतीमधे स्थंलातरीत करण्यात आले आहेत. हे कार्यालय सुरू होऊन सात आठ महिने झाले तरीही येथे विविध समस्या आजही जैसे थे आहेत. पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही, मोबाइल नेटवर्क नाही, कार्यालयात इंटरनेट कनेक्शन आदी समस्यांमुळे जनतेची गैरसोय होत आहे.

या कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी खेड्यापाड्यातून दररोज शेकडो लोक येतात. मात्र येथे येणाऱ्या लोकांना तळपत्या पिण्यासाठी घोटभर पाणीही मिळणे अवघड झाले आहे. या इमारतीत चार ते पाच ठिकाणी शौचालये आहेत. मात्र पाणी नसल्याने ती बंद केली आहेत. तसेच बीएसएनएलशिवाय अन्य कोणत्याच मोबाइलला या परिसरात रेंज नसल्याने सर्वसामान्य जनतेची फार मोठी अडचण होत आहे. या इमारतीच्या शेजारी बसून काम करणाऱ्या शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांची परिस्थिती बिकट आहे. ते काम करीत असलेल्या पत्र्याच्याशेडमध्येही विविध समस्या आहेत. महसूल व बांधकाम विभागाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर परिसर आगीने होरपळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शहर व परिसरात बुधवारी सलग घडलेल्या आगीच्या पाच घटनांनी अग्निशामक यंत्रणेसह साऱ्यांचीच तारांबळ उडाली. वाढलेली उष्णता, आणि कमी जास्त दाबाचा वीज पुरवठामुळे पाच ठिकाणी आग लागली. अग्निशमनकडे अवघे तीनच पथक असूनही त्यांनी यशस्व‌िरीत्या आगीवर नियंत्रण मिळविले.

बुधवारी दुपारी बारागाव पिंपरी येथील गोराडे यांच्या वस्तीजवळून कांद्यासह वैरणाला अचानक आग लागली. अंदाजे अडीच ट्रॅक्टर कांदा आणि चार ट्रॅक्टर वैरण आगीच्या भक्षस्थानी सापडले. सिन्नर अग्निशामक दलाने तासभर प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, दुपारी माळेगाव एमआयडीसीतील सी ३१ प्लॉटमधील कंपनीत केमिकलने पेट घेतला. एमआयडीसी अग्निशामक विभागाने फोमच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.

दापूर रोडवरील टाहाकरे मळा येथील गायकवाड यांच्या दुमजली घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशामक दलाचे चार जवान पत्र्यावर चढून आग विझवत असतांना स्थानिकही तेथे चढले. वजनाने सिमेंट पत्रा तुटून सर्वच जण खाली कोसळले. या अपघातात दोन जवानांना दुखापत झाली. ही आग विझव‌िण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या घराने पेट घेतला. दापूर रोडवरील शिंदे यांच्या बंद घरात शॉर्ट सर्किटने आग लागली. आधीच्या घराला लागलेली आग विझवताना दोन्ही अग्निशमक गाडीमधील पाणी संपल्याने धावपळ उडाली. अखेर आमदार राजाभाऊ वाजे यांनी रतन इंडिया कंपनीला संपर्क करून तिसरी गाडी मागवली. माळरानात नादुरुस्त झालेली गाडी नागरिकांनी पूर्वपदावर आणत केवळ १० मिनिटांत आग आटोक्यात आणली. ही आग विझविण्याचे काम संपत आले असतानाच घोरवड घाटात ट्रकने पेट घेतल्याची खबर मिळाली. तेथे उपस्थित असलेली गाडी पाठविण्याच्या तयारीत असतांनाच आधी पेटलेले गायकवाडांचे घर पुन्हा पेटले. त्यामुळे सदर कंपनीची परवानगी घेऊन आमदार वाजे यांनी आधी गायकवाड यांच्या घराकडे वाहन पाठविले. सिन्नर शहरातील गाडीत पाणी भरून घोरवडच्या घाटात जाण्याविषयी सूचना दिल्या. घोरवड घाटाच्या सरळ चढावर महिंद्रा कंपनीचे मश‌िन घेऊन जाणारा इगतपुरी येथील मालट्रक पेटला. तालुक्यात तील अग्निशामक पथक असूनही एकाचवेळी अनेक घटना घडल्याने घटनास्थळी पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. हा ट्रक तासभर आगीने धुमसत होता. रात्री साडे अकरा वाजता सिन्नरचे अग्निशामक वाहन तेथे पोहोचल्यानंतर अतिशय चपळाईने काही मिनिटात आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूनिर्मिती कारखान्यांवर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पारोळा रोडलगत भरवस्तीत बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांना समजले. यावर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पथकाने छापा टाकून मद्य तयार करण्याचे साहित्य व हजारो रुपयांचे स्पिरिटपासून तयार केलेले विषारी मद्य जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मद्यविक्री बंद झाल्यानंतर धुळे जिल्ह्यासह शहरात बनावट मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळेच शहरात मद्याची सर्रासपणे विक्री होत आहे. याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांना मिळताच त्यांनी पारोळारोडवरील एका घरात बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुमारे दोनशे लीटर बनावट दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात घटनांवर पोलिस विभागातील एलसीबी विभागाकडून लक्ष ठेवण्यात येते. मात्र अवैध मद्यनिर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समजताच एलसीबी विभागाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images