Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धुळे शिक्षणाधिकारी कार्यालय रामभरोसे

0
0

वरिष्ठ लिपिकाने नेमला खासगी व्यक्ती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी स्वत:ची कामे करण्यासाठी कार्यालयात खासगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. याबाबत शिक्षण विभागाला कोणतीही कल्पना त्यांनी दिली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून लिपीक रवींद्र बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील यांनी दिले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यांत शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर रिक्त जागेवर प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित असताना, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी शांताराम दुसाणे यांच्याविरोधात आधीच फौजदारी गुन्हे दाखल असताना त्यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत लिपीक रवींद्र बेडसे यांनी स्वत:च्या सोयीसाठी कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तीची कार्यालयात नेमणूक करून दररोज या व्यक्तीकडून कार्यालयीन वेळेत कामकाज करून घेत आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही संबंधित व्यक्ती कार्यालयात काम करताना दिसते, असेही यात नमूद केले आहे. शासनाची परवानगी नसतांना एक लिपिक स्वत:च्या सोयीसाठी खासगी कर्मचारी नियुक्त करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संग्राम पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभारी शिक्षणाधिकारी यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणाचे पाणी देण्यास विरोध

0
0

साक्री तालुक्यातील मालनगाव धरणाबाबत शेतकऱ्यांसह समिती आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शनिवारी (दि. २२) धरणालगतच्या गावातील शेतकऱ्यांसह मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने तीव्र विरोध केला. तसेच याविरोधात आंदोलन करण्याचा इशारादेखील या आंदोलकांनी प्रशासनासह सिंचन विभागाला दिला आहे.

मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पाठबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र, मालनगाव धरणाच्या लाभदायक क्षेत्रातील २५ गावातील शेतकऱ्यांनी या प्रस्तावास जोरदार विरोध दर्शवित मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीकडून आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात मालनगाव रोपवाटिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत साक्री शहराला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही. पण जलवाहिनी ऐवजी साक्री शहरासाठी आरक्षित पाणी कॅनलद्वारे किंवा नदीपात्रातून घेऊन जावे, अशी भूमिका घेण्यात आली. मालनगाव धरणातून थेट साक्रीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी घेऊ दिले जाणार नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंचन विभाग काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांसह संघर्ष समितीचे लक्ष लागले आहे.

समितीने धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी घेतल्यास परिसरातील व नदीपात्रालगत असणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी कमी होईल. परिणामी, दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही कोरड्या होतील. धरण बांधण्यासाठी ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्या त्यांच्याच तोंडाचे पाणी पळवण्याचा हा प्रकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपाताचे निर्णयाधिकार समितीकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गर्भपातांवर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीवर अतिरिक्त सिव्ह‌िल सर्जन लक्ष ठेवून असतील. समितीत एकूण तज्ज्ञ चार डॉक्टरांचा समावेश असून, गर्भपातप्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार या डॉक्टरांना देण्यात आला आहे. यामुळे एका विभागप्रमुखाची सद्दी संपुष्टात आली असून, यामुळे अवैध बाबींना आळा बसू शकतो.

सिव्ह‌िल हॉस्पिटलचा प्रसूती विभाग मोठा असून, रोज २० ते २५ प्रसूती, तसेच पाच ते सात सिझेरियन पार पडली जातात. याशिवाय गर्भपात केंद्रात सातत्याने महिला दाखल होत असतात. गर्भात काही दोष असेल किंवा तांत्रिक दोषामुळे गर्भ राहिला असल्यास गर्भपात केंद्रात तो काढून टाकण्यात येतो. महाराष्ट्र गर्भपात कायद्याने महिलांना तसे संरक्षण पुरवले आहे. मात्र, या आड काही महाभाग सर्रास स्त्रीभ्रूण हत्या करतात. सिव्ह‌िलमधील प्रसूती विभागाच्या तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांना याच कारणामुळे निलंब‌ित करण्यात आले. तसेच त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हेदेखील दाखल झाले. या प्रकरणाची सिव्ह‌िल प्रशासनाने गंभीर दखल घेत गर्भपात प्रकरणात एका डॉक्टरवर जबाबदारी सोपवायची नाही, असा निर्णय घेतला. याबाबत माहिती देताना सिव्ह‌िल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले, की गर्भपात कायद्याचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. साधारणतः १२ आठवड्यांपुढील गर्भपात करताना किमान चार डॉक्टरांना ठोस कारण पटल्याशिवाय गर्भपाताचा निर्णय घेण्यात येणार नाही. यासाठी क्लास वन अधिकारी डॉ. प्रदीप नरोडे यांची विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नरोडे यांच्या मदतीला किमान तीन डॉक्टर असून, हे पथक सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आपला निर्णय घेईल. यानंतर अतिरिक्त सिव्ह‌िल सर्जनदेखील १२ आठवड्यांपुढील प्रकरणांचा आढावा घेतील. यामुळे एका डॉक्टरला सर्वाधिकार राहणार नाही, तसेच गैरप्रकारास वावदेखील मिळणार नाही, असे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले. याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गर्भपात केंद्रांचा सातत्याने आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे. अवैध गर्भपात करण्यास वाव मिळू नये, यासाठी आणखी काही कडक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणरागिणींचा उद्रेक

0
0

सटाण्यात दारू दुकान पेटविले; महामार्गावर ठिय्या आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरालगतच्या आरम नदीपात्रातील देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, मद्यपींकडून होणारी छेडछाड व संसाराच्या होणाऱ्या राखरांगोळीने मळगावच्या रणरागिणींच्या संतापाचा शनिवारी उद्रेक झाला. संतप्त महिलांनी देशी दारू दुकानाची तोडफोड करून पेटविण्याबरोबरच दुकानमालक भाऊसाहेब सूर्यवंशी यांनाही चोप दिला. तसेच, पोलिसांना न जुमानता राज्य महामार्गावर रास्ता रोको करीत प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसपाटीलसह चार जणांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य महामार्गावरील दारूचे दुकाने बंद झाल्याने सटाणा शहरापासून हाकेच्या अंतरावरील आरम नदीपात्रातील देशी दारूचे दुकानात सातत्याने मद्यपींची गर्दी वाढत होती. मळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, याकरिता महिलांसह ग्रामस्थ सातत्याने मागणी करीत होते. दुकानमालकाला या संदर्भात नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा करित दुकान सुरूच होते. मद्यपींकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढले होते. या गोष्टींचा परिपाक म्हणून की काय शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महिलांनी एकत्रित येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता मोर्चा देशी दारू दुकानाकडे वळविला. दुकानावर हल्लाबोल करीत दुकानातील साहित्यासह दारू बाटल्यांची तोडफोड करण्यास प्रारंभ केला. पत्र्यांचे शेडही उद्‍ध्वस्त केले. पोलिसांनी अधिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी जमाव पांगविण्यास प्रारंभ केला असता संतप्त महिलांनी पोलिसांवरच हल्लाबोल केला.

सिलिंडरचा स्फोट

संतप्त झालेल्या महिलांनी दुकानाला आग लावून दारूचे खोके पेटविले. या आगीत दुकानातील गॅस सिलिंडर व फ्रिजचा स्फोट झाला. आग विझविण्यासाठी आलेला पालिकेचा बंबदेखील महिलांसह ग्रामस्थांनी परतून लावल्याने पोलिसदेखील हतबल झाले होते. या धुमश्चक्रीत महिलांनी अधिक आक्रमक होत आपला मोर्चा राज्य महामर्गावर वळविला. सुमारे २०० हून अधिक महिलांनी शहरातील ताहाराबाद नाक्यावर असलेल्या चौकात रास्ता रोकोस प्रारंभ केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. देशीदारू दुकानाच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी पोलिस पाटलांना या घटनेस जबाबदार धरून ताब्यात घेतले असता, ग्रामस्थ व महिला अधिक संतप्त होत रास्ता रोको केला.

सोमवारी बैठक

शनिवारच्या सुटीमुळे अधिकारी अनुपस्थित असल्याने सोमवारी (दि. २४) मळगाव ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसह महिलांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन नायब तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिले.

कळवणमध्ये अड्डे उद्ध्वस्त

दारू दुकाने ५०० मीटर बाहेर नेण्यास बंधन टाकल्यामुळे ग्रामीण भागात गावठी दारूला मागणी वाढली आहे. खेड्यापाड्यावर गावठीचे पेव फुटल्याने पोलिस यंत्रणेने त्याविरोधात मोहीम उघडली आहे. कळवण तालुक्यातील बेजनंतर गिरणा नदीकाठी पिळकोस शिवारात गावठी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष दर घसरल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

खेडगाव येथील तरूण द्राक्ष उत्पादक शेतकरी माणिक अशोक रणदिवे यांनी शनिवारी (दि. २२ एप्रिल) पहाटे शेताजवळील झाडाला दोर बांधून गळफास घेत जीवन संपविले. नाशिक जिल्ह्यातील ही २५वी शेतकरी आत्महत्या आहे.

माणिक रणदिवे यांची साडेतीन एकर शेती असून, सर्व द्राक्षबाग आहे. मागील चार ते पाच वर्षे झालेल्या नुकसानीमुळे त्याचे वडील अशोक रणदिवे यांच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज झाले होते. यंदा चांगले उत्पन्न येऊनही शेवटच्या टप्प्यात द्राक्षाचे बाजारभाव अगदी दहा ते बारा रुपये किलोवर आल्याने माणिक यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

शेतकरी संपावर!

शेतकरी आत्महत्या लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी निफाड तालुक्यातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संपावर जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटारूंची टोळी जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिस्तुलचा धाक दाखवत चारचाकी, मोबाइल आणि रोकड असा मुद्देमाल लंपास करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. यातील सराईत गुन्हेगारांनी केलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

घोटी येथील सिन्नर फाटा येथे ९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास लूटमारीची घटना घडली होती. आरोपींनी सिल्व्हर रंगाच्या कारमधील चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडूल मोबाइल व २,८०० रुपयांची रोकड घेतली, तसेच चालकाला संगमनेर येथे सोडून त्याची कार पळवून नेली. या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पोलिस अधीक्षक अकुंश शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी माहिती घेऊन तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना सूचना केल्या. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वेहेळगाव येथे राकेश राजेंद्र संसारे (वय २१, देवळाली प्रवरा, ता. राहुरी), रजनीकांत संजय गरुड (२१, नागपूर एमआयडीसी, अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी त्यांचे साथीदार रामा वस्ताद आणि राहुल जायभावे यांच्यासह लूटमार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून कार (एमएच ४१/व्ही ७५१६) एक मोबाइल जप्त केला.

संशयित आरोपी राकेश संसारे सराईत गुन्हेगार असून, मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात तो फरार होता. संसारेने मालेगाव मनमाड रोडवर चोंढी घाटात तब्बल १६ टन लसूण भरलेला मालट्रक दरोडा टाकून पळवून नेला होता. या गुन्ह्याची कबुलीदेखील संसारेने दिली असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासिकेत समस्यांचा पाठ

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पिण्यासाठी पाणी नाही,स्वच्छतागृहांची स्वच्छताही विद्यार्थ्यांनाच करावी लागते, अभ्यासिकेत एकही पुस्तक उपलब्ध नाही, फॅन व ट्युबलाइटचा खर्चही विद्यार्थ्यांना वर्गणी काढून करावा लागतो. ही आपबिती असून, दसक-पंचक येथील वामनदादा कर्डक अभ्यासिकेत रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची भविष्यात मोठे अधिकारी होऊन देशाची व समाजाची सेवा करण्याचे ध्येय आहे. मात्र या अभ्यासिकेत तासनतास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाच्या दुरदृष्टीहीन कारभारामुळे प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र या अभ्यासिकेत बघायला मिळत आहे.

दसक-पंचक येथे गेल्या दहा वर्षांपासून वामनदादा कर्डक स्मारक व अभ्यासिकेची वास्तू बांधून उभी होती. परंतु, दोन वर्षांपूर्वी तत्कालिन नगरसेवक अशोक सातभाई यांच्या प्रयत्नांतून या स्मारकाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी १२ लाख रुपये खर्चाचे या अभ्यासिकेत फर्निचर व वीज पुरवठाविषयक कामे झाली होती.

खिडक्यांना काचा नसल्याने डासांचा प्रादुर्भाव

या अभ्यासिकेत सध्या ६० विद्यार्थी अभ्यासाठी बसतात. फॅन, ट्युबलाइट, वर्तमानपत्रे यासाठी विद्यार्थी वर्गणी काढून खर्च करतात. स्वच्छतागृहाची स्वच्छताही विद्यार्थ्यांनाच करावी लागते. छतावरील टाकीत पाणी पोहचत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहांत पाणी नसते. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. खिडक्यांना काचा व जाळ्या नसल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढतो. टेबलांची उंची जास्त असल्याने विद्यार्थी पाठदुखीने त्रस्त झाले आहेत.

अभ्यासिका पुस्तकाविना

या अभ्यासिकेत पालिकेने अद्याप एकही पुस्तक उपलब्ध करून दिलेले नाही. इंटरनेट, वायफाय, संगणक सुविधाही नाही. गटचर्चेसाठी स्वतंत्र रुमची सुविधा, पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या अभ्यासिकेत पुस्तकच नाही. अशा परिस्थितीत प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचेच चित्र आहे.


आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यास स्थानिक गुंडांकडून त्रास होतो. पालिकेकडे तक्रारी करू नये म्हणून दबावही टाकला जातो.

- तुषार सावकर, विद्यार्थी


येथील संपूर्ण मेंटेनन्सचा खर्च आम्ही विद्यार्थी वर्गणी काढून करतो. पालिका प्रशासन कोणतीही मूलभूत सुविधा देत नाही. नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी नुकतेच चार फॅन दिले आहेत.

- प्रशिक लोखंडे, विद्यार्थी


पालिकेने गेल्या पाच वर्षांपासून अद्यापही पुस्तके उपलब्ध करून दिलेली नाहीत. पुरेशा खुर्च्या, पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही.

- चिदंबर कुंजीर, विद्यार्थी


अभ्यासिकेत पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मुलभुत सुविधा उपलब्ध आहेत. अजून काही समस्या असतील त्यांची शहानिशा करून त्यावर नक्कीच उपाय करून त्याचे तात्काळ आदेश देतो.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, मनपा, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ भूलतज्ज्ञाचा चौकशीपूर्वीच राजीनामा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. वर्षा लहाडे यांच्या प्रयाग हॉस्पिटलशी संबंधित असलेल्या ‘त्या’ भूलतज्ज्ञाने पदाचा राजीनामा देत चौकशी प्रकरणातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. या डॉक्टरचा राजीनामा शनिवारी (२२ एप्रिल) सिव्हिल प्रशासनाला मिळाला. मात्र, चौकशीप्रक्रिया सुरू असून, हा डॉक्टर दोषी आढळल्यास कारवाई होणारच, असे सिव्हिल प्रशासनातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाच्या तज्ज्ञ डॉ. लहाडे यांच्यावर अवैध गर्भपात केल्याप्रकरणी कारवाई झाली. यानंतर त्यांचे खासगी हॉस्पिटल असल्याचे उघड झाले. या हॉस्पिटलमधील आरोग्य विभागात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरचा थेट संबंध येत असल्याचे वृत्त ‘मटा’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी तीन सदस्यीय कमिटी चौकशीकामी नियुक्त केली. या डॉक्टरचे एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण झाले असून, नोकरीत असताना त्याने भूलतज्ज्ञाची पदवी मिळवली. या पदवीबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. चौकशी समिती या डॉक्टरच्या शिक्षणाबाबत, तसेच सरकारी नोकरीत असताना खासगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करण्याबाबत चौकशी करीत आहे. त्यातच या डॉक्टरचा थेट संबंध डॉ. लहाडे यांच्या प्रयाग हॉस्पिटलशी जोडला गेला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भूलतज्ज्ञाने शनिवारी दुपारी आपला राजीनामा सिव्हिल प्रशासनाकडे पाठवून दिला. चौकशी संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने भूलतज्ज्ञांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की या डॉक्टरने राजीनामा दिला असला तरी चौकशी सुरू झाली आहे. ही चौकशी पूर्ण होईल. त्यात या डॉक्टरच्या शिक्षणासंबंधी झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यास, त्यांनी आजवर घेतलेले वेतन वसूल करण्यात येईल. खासगी प्रॅक्टिसचा आरोप सिद्ध झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईदेखील केली जाईल. भूलतज्ज्ञाच्या राजीनाम्यामुळे सिव्हिलमध्ये चर्चेला पेव फुटले असून, याकडे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजीबाजाराने केली वाहतूक कोंडी

0
0

कार्बन नाक्यावर बाजाराने नागरिक त्रस्त

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहराच्या वाढत्या रस्त्यावर भाजीबाजाराचे वाढते अतिक्रमण चिंतेचा विषय बनला आहे. सातपूर भागातील शिवाजीनगरच्या कार्बन नाक्यावरील भाजीबाजाराच्या वाढत्या अतिक्रमणाने रस्त्याचा श्वास कोंडला जात असल्याने हे कोण रोखणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कार्बननाका परिसरात भरणारा भाजीबाजार थेट एमआयडीसीच्या म्हसोबा मंदिरापर्यंत पोहचला आहे. या वाढलेल्या अतिक्रमणामुळे रोजच वाहतूक कोंडीला वाहनचालक व पादचारी यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी वाढलेल्या अतिक्रमणावर ठोस उपाय शोधावा. तसेच वाढलेल्या भाजीबाजाराच्या अतिक्रमणावर रोख बसवावा, अशी मागणी होत आहे.

शहराचा विकास होत असताना नागरी सुविधा पुरविणे महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी असते. वाढलेल्या लोकवस्तीत महापालिका अनेक सुविधा देण्याचा प्रयत्नही करते. परंतु, महापालिकेने उभारलेल्या वास्तूंकडे अनेकजण दुर्लक्षच करतानाच दिसतात. यामुळे रस्त्यांवर २० ते ३० रुपयांची विविध कर विभागाची पावती फाडत व्यवसाय करण्यास अनेकांची पसंती असते. त्यातच रस्त्यांवर भाजीपाला विक्री करणे जणू फॅशनच बनली आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या असतात. याचा रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

सातपूर भागातील शिवाजीनगर भागातील कार्बन नाक्याला भरणारा बाजार आज थेट एमआयडीसीच्या म्हसोबा महाराज मंदिरापर्यंत पोहचला. रस्त्यालगत वसलेल्या भाजीबाजाराचे वाढते अतिक्रमण रोखणार कोण असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यातच सांयकाळी कारखान्यातून घरी परतणाऱ्या महिला वर्गाला रस्त्यालगत भरत असलेल्या भाजीबाजाराचा रोजच त्रास सहन करावा लागतो. रस्ता अरुंद होत असल्याने रोजच वाहतूक कोंडीदेखील होते. यासाठी महापालिकेने अतिक्रमणावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी कष्टकरी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा चार अंशांनी घसरला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळेच काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. शहरात शनिवारी ३६, तर किमान १९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा कमी झाला आहे. गेल्या मंगळवारी चाळिशी पार केलेला पारा आता थेट ४ अंशांनी घसरला आहे. त्यामुळे भरदुपारी शुकशुकाट असलेले शहरातील रस्तेही गजबजत आहेत. ऐन लग्नसराईत उन्हामुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. पारा घसरल्याने आता व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरात शनिवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हे तापमान बरेच खाली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये ३२.६ अंश सेल्सिअस तापमान असून, त्यानंतर नाशिकचे तापमान आहे. नाशिकच्या किमान तापमानातही घट झाली आहे. त्यामुळेच रात्री गारवा आणि दुपारी ऊन असे वातावरण सध्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती घोषित करा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शेतकरी आत्महत्यांबाबत अनेक गैरसमज पसरविले जातात. लग्नातील उधळपट्टी, अति मद्यसेवन अशा प्रकारचे कारणे देऊन शेतकऱ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करणे गरजेचे आहे, असे मत अमर हबीब यांनी व्यक्त केले

नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला आयोजित ‘कृषी प्रधान देशातील शेतकरी आत्महत्या थांबतील का?’ या विषयवार किसानपुत्र आंदोलनाचे संकल्पक अमर हबीब यांचे गुरुवारी (दि. २०) व्याख्यान हुतात्मा स्मारक येथे आयोजित केले होते. शेतकरी दारूच्या आहारी का जातात, याचादेखील विचार करणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे माणसं वाचवण्यासाठी लागणारी धडपड आपल्याकडे केली जात नाही. त्यामुळे सामाजिक जाण असलेल्या व्यक्तींनी त्याचा शोध घ्यायला पाहिजे.

जाचक कायद्यांमुळेच आत्महत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जागतिकीकरण किंवा गरिबीमुळे होत नसून, जाचक कायद्यांमुळे होत असल्याचे सांगितले. जागतिकीकरणामुळे शेतकरी आत्महत्या झाल्या असत्या तर त्या सर्वच राज्यांमध्ये झाल्या असत्या. मात्र, तसे होताना दिसत नाही. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र, पंजाब यासारख्या विकसनशील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. कारण या ठिकाणी विकास होत असला तरी सर्वांचा होत नाही तर काही लोकांवर लादला जातो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अति मद्यसेवन हे जर मृत्यूचे कारणे असेल तर सगळ्यात जास्त मृत्यू राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पत्रकार या वर्गातून झाल्या असत्या, असेही हबीब यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यावर पुन्हा नोटाटंचाईचे संकट?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेला चलनतुटवडा टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नाशिकसाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मात्र, फार तर दोन- तीन दिवसच पुरेल एवढे हे चलन असून, आणखी चलन उपलब्ध झाले नाही तर नाशिककरांना पुढील आठवड्यात पुन्हा चलनटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढावे, यासाठी आरबीआय जाणीवपूर्वक रोकड कमी देत असावी, अशी शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.

नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे नाशिककरांनी काही महिने चलनटंचाईच्या समस्येचा सामना केला. तासन् तास रांगेत थांबून गरजेपुरते पैसे मिळविले. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली. मात्र, आता पुन्हा शहरासह जिल्ह्यातदेखील पुन्हा नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सद्यःस्थितीत अनेक एटीएम सेंटर्सवर कॅश उपलब्ध नसल्याचा फलक पाहावयास मिळतो आहे. त्यामुळे पैसे मिळू शकतील, अशा एटीएमचा शोध घेत नागरिकांना फिरावे लागते आहे.

नोटाबंदीचा निर्णय होऊन सहा महिने उलटले. मात्र, अजूनही आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊ शकलेले नाहीत. सद्यःस्थितीत नाशिकमध्ये स्टेट बँक आणि खासगी बँका मिळून ९० कोटी रुपये इतकेच चलन उपलब्ध आहे. जिल्ह्याला शहर आणि ग्रामीण मिळून रोज ५० कोटींच्या चलनाची आवश्यकता असते. रिझर्व्ह बँकेकडे ३५० कोटींची मागणी करण्यात आली. मात्र, केवळ ५० कोटी रुपये पदरात पडल्याने जिल्ह्यातील बँकांची स्थिती गंभीर झाली आहे. ग्रामीण भागात एसबीआयकडे २० कोटी, तर शहरात ३० कोटी आणि खासगी बँकांकडे ४० कोटी शिल्लक आहेत. मात्र, दोन- तीन दिवसांत ही रक्कम संपण्याची शक्यता असून, त्यानंतर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण, बेलापूर आणि मुंबई या तीन ठिकाणच्या चेस्ट बँकांकडून जिल्ह्याला चलनपुरवठा न झाल्यास जिल्हावासीयांना नोटाटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किड्स कार्निव्हल’ची आजपासून धम्माल

0
0

नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित केलेल्या ‘किड्स कार्निव्हल’ला आजपासून (२३ एप्रिल) सुरुवात होणार आहे. त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉल येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कार्निव्हल होणार असून त्यासाठी आजच नोंदणी करणे आवश्यक आहे. ‘मटा’च्या कार्यालयात किंवा थेट कार्निव्हलच्या ठिकाणीही नोंदणी करता येणार आहे.

उन्हाळ्याच्या सुटीची धमाल लुटतानाच अनेक नवीन बाबी शिकण्यासाठी मटा किड्स कार्निव्हल महत्त्वाचा ठरणार आहे. ४ ते १४ वयोगटातील मुलांना यानिमित्त कलाकुसरीच्या वस्तूंपासून ते सोप्या चवदार पदार्थांपर्यंत अनेक गोष्टी शिकण्याची संधी या दहादिवसीय कार्निव्हलमधून मिळणार आहे. सुटीच्या आनंदाबरोबरच ही सुटी लक्षात राहील, असा आठवणींचा व ज्ञानाचा खजिना मुलांना यातून उपलब्ध होऊ शकणार आहे. या दहा दिवसांमध्ये वेगवेगळ्या वस्तू, पदार्थ सहभागींना शिकण्यास मिळणार आहे. यामध्ये क्राफ्ट या प्रकारात टाकाऊपासून टिकाऊ, ग्रिटींग कार्ड डिझाइन, अम्ब्रेला थ्री डी ग्रिटिंग कार्ड, स्प्रिंग ट्री क्राफ्ट्स, इनोव्हेटीव्ह कॅण्डी स्टीक्स प्रकारात कॅण्डीस्टीक्सपासून कलाकुसरीच्या वस्तू, पेन स्टॅण्ड, स्क्रॅप बुक, टी कोस्टर, किड्स योगा प्रकारात जीवनशैलीच्या दृष्टीने आवश्यक योगा प्रकार, लहान मुलांना योगामध्ये रस वाटेल असे २४ प्रकार, फन गेम्समध्ये सॅक रेस, हुलाहूप, सायन्स अँड नॉलेज या प्रकारात संभाषण कौशल्य, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, व्हिनेगर सोडा व्होलकॅनो, फ्लोटींग एग्ज यांचे प्रत्यक्ष प्रयोग शिकविण्यात येणार आहे.

नो गॅस कुकिंग या प्रकारात मिल्कमेड कोकोनट लाडू, नो बेक ओरिओ कुकीज, चॉकलेट सॅण्डविच आदी पदार्थ शिकविले जाणार आहेत. त्याचबरोबर कॅण्डल मेकिंग, डान्स व झुम्बा, वृक्ष लागवड असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे कार्निव्हल संपल्यानंतर अकराव्या दिवशी एकदिवसीय सहल नेण्यात येणार आहे. यामध्ये नाश्ता, जेवणाचाही समावेश असणार आहे.

येथे करा नोंदणी

किड्स कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी कमलेश यांच्याशी ७०४०७६२२५४ या किंवा ०२५३-६६३७९८७ आज (२३ एप्रिल) दुपारी २.३० वाजेपर्यंत या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच पिनॅकल मॉल येथे होणाऱ्या या कार्निव्हलमध्ये प्रत्यक्ष जाऊन थेट नोंदणी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ३० मोबाइल टॉयलेट्स

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात शहर हागणदारीमुक्त करण्याचा विडा पालिकेने उचलला असून, तब्बल साडेसहा हजार लाभार्थ्यांना शौचालय बांधून दिले आहेत. वैयक्तिक शौचालयापाठोपाठ गटशौचालय उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र, जागेअभावी अनेक ठिकाणी गटशौचालयांची उभारणी शक्य नसल्याने अशा ठिकाणी आता मोबाइल टॉयलेट्स बसविले जाणार आहेत. सोबतच नदीकाठावरही काही ठिकाणी मोबाइल टॉयलेटचा वापर केला जाणार आहे. नव्याने ३० मोबाइल टॉयलेट खरेदीसाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.

केंद्र सरकारने २०१८ पर्यंत शहरे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी वैयक्तिक व गटशौचालये दिली जात आहेत. महापालिकेने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून नुकतीच साडेसहा हजार वैयक्तिक शौचालये पूर्ण केली आहेत, तसेच काही ठिकाणी गटशौचालये उभारण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. मोठ्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी गटशौचालये उभारली जाणार होती. मात्र, या ठिकाणी जागेची कमतरता असल्याने गटशौचालय उभारले गेले नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी महापालिकेने आता मोबाइल टॉयलेटचा प्रस्ताव ठेवला आहे. दहा टॉयलेटचे तीन नग खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टीच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेटचाही वापर केला जाणार आहे, तसेच गोदावरीच्या नदीकाठावरही काठी ठिकाणी हे मोबाइल टॉयलेट बसविले जाणार आहेत. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण नियंत्रित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी परिसरातील उद्याने कोमेजली

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाळ्यात उन्हाच्या काहिलीने हैराण झाल्याने उद्यानाकडे वळतात. तेथील हिरवळ मनाला आल्हाददायक वाटते, मात्र त्यासाठी उद्यानांची अवस्था चांगली असली पाहिजे. सध्या पंचवटीतील १०४ उद्यानांपैकी निम्म्या उद्यानांची अवस्था बिकट आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ही अवस्था झाली आहे. ५४ उद्याने ही ठेकेदारांना देण्यात आलेली आहेत.

पंचवटी परिसर हा धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा असल्याने येथे पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या उद्यानाचा अभाव आहे. तपोवनात साकारण्यात आलेली रामसृष्टी उद्यान हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असताना त्याची दुरवस्था झालेली आहे. येथील हिरवळ वळून गेली आहे. अशीच अवस्था इतरही उद्यानाची झालेली आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंती तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या असून, बाके तुटली आहेत. शोसाठी बसविण्यात आलेली झाडे मोडकळीस येऊन पडली आहेत. कारंजेही बंद पडलेत. त्यांच्या नळांच्या तोट्या लंपास झाल्या तर पेव्हर ब्लॅक निघाले आहेत.

दुरुस्तीची मागणी

ऐन उन्हाळ्यात उद्यानात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उद्यानात नव्याने खेळणी बसविण्यात आली आहे. तर काही जुन्या खेळण्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. उन्हाळयात पाण्याची टंचाई भासत असल्याने उद्यानातील हिरवळ कमी झालेली आहे. त्यामुळे उद्यानांची अवस्था बिकट झालेली दिसत आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देत उद्यानांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाळी सुटीत ३३ जादा बसेस

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शाळांना सुटी लागली आहे. त्यामुळे गावाकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे विभागातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारातून ३३ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ एप्रिल ते ३० जूनदरम्यान जादा बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज राहणार असल्याची माहिती यावेळी विभाग नियंत्रक देवरे यांनी ‘मटा’ला दिली.

मार्च ते एप्रिल या कालावधीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपुष्टात येतात. बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच सुट्टीच्या काळात वाढती प्रवाशांची संख्या लक्षात परिवहन महामंडळाच्या धुळे विभागतून निरनिराळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ३३ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्राबाहेर सुरत, वापी, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, सेलवास तसेच इंदौर याठिकाणी जाण्यासाठी २४ जादा बसेस सुरू करण्यात येणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. मे महिन्याच्या सुट्टीत लग्नसराईच्या तारखा असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसेस फायद्याच्या ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलस्त्रोतांच्या तपासणीस अॅपचा आधार

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाइल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. हे कर्मचारी जिल्ह्यातील तीन हजार जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी मोबाइल अॅपद्वारे करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकतीच देण्यात आली.

धुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष हा उपक्रम राबवित असून, या कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी दरवर्षी जून महिन्यात पाणी गुणवत्ता कार्यशाळा घेतली जाते. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम जैविक तपासणी अभियान राबविले जाते.

३,००० जलस्त्रोतांचे नमुने संकलन

यंदा नागपूर येथील एमआरएसएसी निर्मित अॅप्सची मदत घेतली जात आहे. ‘जिओफेन्सिंग मोबाइल अॅप्लिकेशन’ असे या अॅप्सचे नाव आहे. त्याच्या मदतीने पाण्याच्या नमुन्यांचे संकलन तसेच जलस्त्रोतांचे मॅपिंग केले जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे तीन हजार जलस्त्रोत असून, या सर्व स्त्रोतांची तपासणी याद्वारे होणार आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा साक्री तालुक्यातील आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. तसेच प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवातही केली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या पूर्ण तपासणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसायन ड्रमच्या स्फोटात दोन जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनीत रसायन भरलेल्या ड्रमचा स्फोट झाल्याने रविवारी दोन कामगार गंभीर जखमी झाले. किशोर भुफा (वय १८) व संतोष कुपरेकर (२६, रा. दोघेही मुसळगाव, सिन्नर) अशी या अपघातांत जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील गोल्ड केमिकल कंपनीत भुफा व कुपरेकर सफाईचे काम करत होते. सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक रसायनांचा ड्रम लिक होऊन त्याचा स्फोट झाला. ड्रम व त्यातील रसायन अंगावर उडाल्याने दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये व यानंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

एकाची आत्महत्या

नाशिक तालुक्यातील शिलापूर येथील एकाने राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दिलीप शिवराम सशेरे (५८, रा. शिलापूर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सशेरे यांनी अज्ञात कारणातून शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचे निधन झाले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर व सिक्युरिटीच्या सबचॅप्टरचा प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल बिल्डिंग कोड २०१६ हा सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसमावेशक असून, अनेक नव्या बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी असून, त्यातील सूचनांचा स्वीकार प्रत्येक शहरातील सरकारी संस्थांनी करावा, असे प्रतिपादन नॅशनल बिल्डिंग कोड २०१६ व्हॉइस चेअरमन व्ही. सुरेश यांनी केले. ते फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक सबचॅप्टरच्या प्रारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढलेल्या शहरीकरणाने बांधकाम व इमारतींचे स्वरूप बदलत असून, वाढीव उंचीमुळे अग्नी व सुरक्षा उपकरणांची गरज वाढली आहे. यासोबतच प्रशिक्षित मनुष्यबळासोबत सुरक्षिततेसाठी तिचे महत्त्व या जागृतीसाठी फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया कार्य करेल, असा आशावादही व्ही. सुरेश यांनी व्यक्त केला.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर म्हणाले, की आकड्यानुसार दरवर्षी वीस हजारहून अधिक मृत्यू आगीमुळे होतात. अपुरी अग्निशमन यंत्रणा किंवा ती कशी वापरावी याच्या माहितीचा अभाव यामुळे ही अमूल्य जीवित व वित्तीय हानी होते. फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने याकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्यासोबतच शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सरकारी संस्था, महिला, वरिष्ठ नागरिकांसाठी प्रशिक्षण व जनजागृती, तसेच अभियंते, वास्तुविशारद यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. महाराष्ट्र फायर सेवेचे माजी संचालक एम. व्ही. देशमुख उपस्थित होते. नाशिकमध्ये या विसाव्या चॅप्टरच्या उद्घाटनप्रसंगी १०० सदस्यसंख्या पार झाली असून, आगामी काळात अनेक जनजागृतीपर व शैक्षणिक उपक्रम घेण्यात येतील असे नाशिक चॅप्टरचे नवनियुक्त सहसचिव जितेंद्र कोतवाल यांनी नमूद केले. नाशिक मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारीख व उपमुख्य अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले यांनीही मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिली व्यवसायातील ‘दौलत’

0
0

आयुष्यात कुणालाही दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढायला लागू नये, असे म्हटले जाते. पण, त्याच कोर्टाची पायरी चढावी लागली, तर ती वाट सुसह्य कशी होईल यासाठी अॅड. दौलतराव घुमरे प्रयत्नशील असतात. याच वाटेवरून प्रवास करताना अॅड. घुमरे यांनी अनेकांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळवून दिली आहे. गोरगरिबांच्या केसेस मोफत लढवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला अशांसाठी ते देवदूत ठरले आहेत, तर ज्यांनी अन्याय केला त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत. वयाची नव्वदी ओलांडूनही त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे.

दौलतराव घुमरे यांचा जन्म चांदवड तालुक्यातील शेलू या गावी झाला. वडिलांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यंत अल्प असल्याने त्यांना गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेत जायची इच्छा होती म्हणून वडिलांनी पाटी आणि पेन्सिल आणून दिली तेवढाच काय तो वडिलांचा शिक्षणाशी संबंध आला. पुढील सर्व शिक्षण घुमरे यांनी स्वतःच्या मेहनतीवर पूर्ण केले. शाळेत जाण्याचा रस्ता गरीब वस्तीतून जात असल्याने त्यांचे होणारे हाल पाहून मन हेलावून जायचे. त्यांच्यासाठी काही तरी करावे, असे मनोमन वाटायचे. पण, आपल्याकडेच काही नाही, तर त्यांना कशी मदत करणार म्हणून पाय पुन्हा मागे वळायचे. याच काळात शाळेतील शिक्षक चांगले असल्याने त्यांनी देशसेवेचे संस्कार केले. एका शेतावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली आणि तो दिवस आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. घुमरेंनी तेव्हा जमेल त्या मार्गाने चळवळीला हातभार लावला. काही काळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही गेले. संघाच्या शाखेत त्यांची घुसमट होऊ लागल्याने त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कार्याला सुरुवात केली. येथे त्यांचा थोरा-मोठ्यांशी संबंध आला. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांना जवळून पाहता आले. त्यामुळे सावरकर, गांधी, नेहरू या तीनही व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आजही जाणवतो. त्या काळात त्यांनी अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. भात लढ्याच्या चळवळीत त्यांना अडीच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. पुढे मुंबई येथून कायद्याची पदवी घेतल्यानंतर नाशिकमध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी दिवाणी स्वरूपाचे खटले चालविण्यास प्रारंभ केला. मात्र, त्यात तोच तोपणा आल्याने ते काही कालावधीनंतर फौजदारी दाव्यांकडे वळाले. वकिली हा एकमेव ध्यास असल्याने महाराष्ट्र बँक दरोडा, वैभव कट्यारे खून खटला अशा अनेक मोठ्या केसेस त्यांनी जिंकल्या. अनेक गुन्हेगारांना त्यांनी जेलची हवा खायला लावली. नाशिक कोर्टात सध्या सुरू असलेल्या तेलगी प्रकारणीची केसदेखील त्यांच्याकडेच आहे. वकिली व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्यांनी ते एक व्रत मानले. त्यामुळे ते यशस्वी होऊ शकले. मला ज्या क्षेत्राची आवड होती, त्याच क्षेत्रात काम करायला मिळाल्याने मी आजही तंदुरुस्त आहे, असे ते म्हणातात. नाशिकचेच नव्हे, तर हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे अनेक वकील त्यांच्याकडून ज्ञानाची शिदोरी घेऊन गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत ते आजही कार्यरत असतात. नाशिक शहरात प्रॅक्टिस करणारे अनेक नामवंत वकील त्यांचे ज्युनिअर आहेत. माणसाच्या तोंडाकडे पाहिले, की त्याची अार्थिक अवस्था समजते. वकिली व्यवसायात लोकांनी पैसे दिले, तर त्यांनी घेतले. केवळ पैशासाठीच केस घेणार, असे त्यांनी कधी केले नाही. अनेक गरिबांना मोफत न्याय मिळवून दिला व आजही ते कार्य करीत आहेत. वयाची नव्वदी उलटली, तरी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कोर्टात हजर असतात. ते म्हणतात, देवाने मला भरभरून दिले. मान-सन्मान, प्रसिद्धी आणि जगण्यापुरता पैसा. त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. माझी दोन्ही मुले माझी गादी चालवत असून, आता नातीदेखील वकिली व्यवसायाला सुरुवात करणार आहेत. अॅड. घुमरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक मानसन्मान मिळाले आहेत.


नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images