Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पदाधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदीचा घाट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपने सत्तेत येताच शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याऐवजी सत्तापदे निर्माण करण्याचा सपाटा लावला. त्याचा पहिला फटका आता तिजोरीला बसण्यास सुरूवात झाली आहे. नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या तीन विषय समित्यांच्या सभापतींसह तीन प्रभाग समित्यांच्या
सभापतींसाठी सहा नवीन वाहने खरेदी करावी लागणार आहेत. सद्यस्थितीत सहा प्रभाग समिती सभापतींपैकी तीन प्रभाग सभापतींची वाहने कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे या तिघांसह नव्याने स्थापन होणाऱ्या शहर सुधार, आरोग्य व विधी या तीन समिती सभापतीपदासाठी वाहनांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची सुरूवात विकासाऐवजी खरेदीने होत असल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या पालिकेच्या तिजोरीवर खरेदीचा अतिरिक्त भार पडणार आहे.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, शिक्षण समिती सभापती, सभागृह नेत्यांसह सहा प्रभाग समिती सभापतींना पालिकेकडून वाहनांसह कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात. सद्यस्थितीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण सभापती, शिक्षण सभापी व सभागृहनेत्यांसाठी जुनीच वाहने वापरात आहेत. सोबतच विरोधी पक्षनेत्यांसाठीही वाहन उपलब्ध आहे. परंतु, सहापैकी तीन प्रभाग समिती सभापतींकडील वाहने कालबाह्य झाली असून, त्यांना नव्याने वाहने द्यावी लागणार आहेत. या तीन सभापतींना नव्याने वाहने खरेदीचा विचार सुरू असतानाच आता भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी पालिकेत नव्याने तीन विषय समित्यांची स्थापना केली आहे.
महासभेने नुकतेच शहर सुधार समिती, आरोग्य व विधी अशा तीन समित्यांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या तीन समित्यांसाठी कार्यालय, कर्मचारी वर्गासह तीन सभापतींना वाहनेही उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. तीन प्रभाग समित्या आणि तीन विषय समित्या अशा एकूण सहा वाहनांची तातडीने आवश्यकता आहे. त्यामुळे यांत्रिकी विभागाकडून नव्याने सहा वाहने खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यास सुरूवात झाली आहे. या सहा
वाहनांवर चालकांचीही गरज भासणार आहे. कर्ज काढून सण साजरा करण्यासारखा हा प्रकार मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलमापन चाचणीचा निकाल जाहीर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

माध्यमिक शिक्षण बोर्डामार्फत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कलमापन चाचणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर आतापर्यंत २९ विद्यार्थ्यांनी समुपदेशन केंद्रांत जाऊन समुदेशकांकडून मार्गदर्शन घेतले आहे. १५ मेपर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे.

मार्च २०१७ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या वतीने कलमापन चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत गेल्या वर्षीपेक्षा दोन घटकांची यंदा वाढ करण्यात आली. या कलमापण चाचणीचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यात नाशिक येथील शासकीय कन्या विद्यालय व नाशिकरोड येथील विभागीय व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्था येथे समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिकरोड येथील समुपदेशन केंद्रावर अशोक रुद्रके (८०८७३११६१०) आणि विवेक राठोड (७५८८१७६५६१) या समुपदेशकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या दोन्ही केंद्रांवर दोन दिवसांत २९ विद्यार्थ्यांनी समुपदेशनाचा लाभ घेतला. याशिवाय नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण, व्यावसायिक विकास संस्था येथेही समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

दहावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना करियरच्या दृष्टीने समुपदेशनाची आवश्यकता असते. त्यासाठी शिक्षण विभागाने समुपदेशकांची नेमणूक केली आहे. १५ मेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल. वेबसाइटवरही समुपदेशनाविषयी माहिती दिली आहे.
- नरेंद्र खंदारे,
विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानावर महिलांचा हल्लाबोल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महाकाली चौकातील दारू दुकान बंद करावे, अशी मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न केल्याने परिसरातील संतप्त महिलांनी गुरुवारी रुद्रावतार धारण केला. दारू दुकानाला थेट कुलूपच लावले. दुकान बंद झाले नाही तर ते थेट जाळून टाकू, असा इशारा परिसरातील रहिवाशांसह महिलांनी दिला आहे.

सिडको परिसरातील महाकाली चौकात असणाऱ्या देशी दारू दुकानामुळे परिसरात मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. या ठिकाणाहून ये जाणेही महिला व मुलींना कठीण झाले आहे. छेडछाड करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले. काही मद्यपी तर थेट परिसरातील घरांचे दारे वाजवून महिलांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. याप्रश्नी स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी दारू दुकानावर हल्लाबोल केला.

मुख्य लोकवस्तीत असलेल्या देशी दारू दुकानामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित होत आहे. लहान मुलांवर वाईट संस्कार होत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. अनेकदा मद्यपींकडून रहिवाशांच्या घरांच्या काड्या बाहेरून लावून घेतल्या जातात. वाहनांमधील पेट्रोल अथवा साहित्याची चोरी केली जाते. यामुळे महिलांनी गुरूवारी दारू दुकान फोडून पेटवून टाकण्याची तयारी केली हेाती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोल खोल पाणी...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील सटाणा, देवळा, कळवण, चांदवड, मालेगाव या तालुक्यातील पाणीपातळी सर्वाधिक घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्चमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १५ पैकी सटाणा तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक कमी असून ती ९.९३ मीटरने कमी झाली आहे.

गेल्या पाच वर्षात या तालुक्याची सरासरी पातळी १०.८८ ने कमी झाली होती. त्यामुळे यावर्षी ही घट कमी असली तरी ती चिंतेचीच आहे. सटाणापाठोपाठ देवळा ८.७० मीटर, कळवण ७.८२ मीटर घट आहे. सर्वाधिक कमी घट धरणांचे तालुके म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. इगतपुरीची घट ३.०८ मीटर तर त्र्यंबकेश्वर येथील घट ३.३६ मीटर आहे. गेल्या पाच वर्षात ती जास्त होती पण यावेळेत ती १ मीटरने कमी आहे.

भूजल सर्वेक्षण विभागातर्फे मार्च महिन्यात जिल्ह्यातील १८५ सार्वजनिक विहिरींतील पाण्याची पातळी पाहिली असता त्यात घट झाल्याचे निष्पन्न झाले. एकीकडे ही घट झाली असली तरी पाच वर्षातील मार्च महिन्यातील सरासरी पातळी व या वर्षातील मार्चमधील पातळी यामधील फरक काढली. यानंतर या मार्चमधील पातळी चांगली असल्याचे बोलले जात आहे. भूजल पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची निश्चिती करण्यात आली आहे. या विहिरीतून वर्षातून चार वेळा भूजल पातळी मोजली जाते. त्या आधारावरच सरासरी भूजल पातळी काढली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभवा, सरकारवाडा पुन्हा साकारताना...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांदवडच्या रंगमहालानंतर नाशिकचा सरकारवाडा वाडासंस्कृती अन् काष्ठशिल्पाच्या कलाकृतीचे उत्तम उदाहरण म्हणून आजही प्रतिनिध‌त्वि करताना दिसतो. पुण्यासाठी शनिवारवाड्याचे जसे महत्त्व आहे तसेच नाशिकसाठी सरकारवाड्याचे आहे. पेशवाईची ओळख करून देणाऱ्या या वाड्याला कालांतराने पडझड सहन करावी लागली. हा वाडा पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभाग अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. हा वाडा सज्ज झाल्यानंतर पाहण्यात मजा आहेच, पण हा वारसा पुन्हा नव्याने उभा करताना अनुभवता यावा यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ३० एप्रिल रोजी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठेशाहीच्या बहराच्या काळात १७६० ते १७८० दरम्यान सरदार रंगनाथ ओढेकरांनी हा वाडा बांधला. त्यावेळी त्याला ओढेकरांचा वाडा म्हटले जात असे. त्याला नंतर रामसेतू पुलाच्या नावावरून ‘पुलावरचा वाडा’ असेही म्हटले गेले. वाड्याला वापरलेले दगड गुळगुळीत आहेत म्हणून या वाड्याला चोपडा वाडा असेही संबोधले गेले. रघुनाथ पेशवे नाशिकला स्थायिक होण्यास आल्यानंतर कारभार पाहण्यासाठी ओढेकरांनी हा वाडा बांधण्यात आला असेही म्हटले जाते.

या वाड्यातून उत्तर विभागाचा कारभार चालविला जात असे. गोपिकाबाई पेशवे यांनीही नाशकात मुक्कामी असताना या वाड्यातून कारभार पाहिला, असे सांगितले जाते. त्यामुळे त्याला सरकारवाडा असे नाव पडले. दुसऱ्या बाजीरावांनीही सरकारवाड्यातून कामकाज गेल्याची नोंद मिळते. दुसऱ्या बाजीरावांच्या मेव्हणीचे लग्न बडोद्याचे दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या मुलाशी ठरले होते. हा लग्न सोहळा या सरकारवाड्यात होणार होता. यासाठीही सरकारवाडा सजविण्यात आला होता. मात्र हे लग्न मोडले. म्हणजेच सरकारवाड्याचा वापर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणांनी झालेला दिसतो. अगदी पेशव्यांच्या राज्यकारभाराचे कार्यालय, दरबार, तुरुंग, पोलिस स्टेशन म्हणूनही सरकारवाड्याचा वापर झाला असून, सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या (सावाना) ग्रंथालयाची सुरुवातही याच वास्तुतून झाली आहे. इंग्रजांनीही येथे आपले कार्यालय थाटले होते, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे यांनी दिली.

दरम्यानच्या काळात सरकारवाड्याचे मोठे नुकसान झाले. हा वाडा पुन्हा नव्याने उभा रहावा म्हणून परिसरातील नागरिकांनी मोठा लढा उभा केला. सरकारवाड्यासाठी अनेक आंदोलनेही झाली, असे कृष्णा नागरे यांनी सांगितले. राज्य पुरातत्त्व विभागाने सरकारवाडा पुन्हा उभा करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. वर्षभरात सरकारवाडा नाशिककरांसमोर नव्याने उभा झालेलाही असेल. मात्र, हा वारसा पुन्हा साकारला जात असताना त्याची धामधूम पाहणेही आवश्यक आहे. काष्ठशिल्पाचे सुरू असलेले काम, पूर्वी सरकारवाडा जसा होता तसाच उभा करण्यासाठी घेतले जात असलेले कष्ट अनुभवणे हाही एक वारसा जतन प्रक्रियेतील घटक आहे. कारंजे, चौक, दरबार हॉल, नक्षीकाम, जुने ज‌निे हे सगळे वैभव हेरिटेज वॉकच्या सफरीत अनुभवता येणार आहे. तसेच सरकारवाड्याशी संबंधित माहिती राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, आण्णा बेळे व कृष्णा नागरे यावेळी देणार आहेत.

नाशिककरांनी आपला वारसा जतन करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे. पुण्याची ओळख शन‌विारवाडा आहे तशी नाशिकची ओळख सरकारवाडा असावी, यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. सरकारवाड्याचे काम कसे होत आहे हा अनुभव नाशिककरांना या हेरिटेज वॉकमधून मिळू शकेल.
- डॉ. श्रीकांत घारपुरे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

कुठे भेटायचे ?
सकाळी ८.३० वाजता, सराफ बाजारातील सरकारवाड्यासमोर एक‌त्रित जमायचे आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक : ८३८००९८१०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध महिलेची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

१७ हजाराचे अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृध्द महिलेला रिक्षात फिरवून तब्बल ७० हजार रुपयांचे दागिने काढून एकाने पोबारा केला. ही घटना गोदाघाटावरील रामकुंड परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत भामट्याने वृध्द दाम्पत्याची फसवणूक करीत दागिने लंपास केले होते.

या प्रकरणी बतुलबी मोईउद्दीन शेख (६५, रा. समतानगर, द्वारका) यांनी तक्रार दिली आहे. वसीम नावाच्या संशयित व्यक्तीने शेख यांची फसवणूक केली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वृध्दा घराबाहेर पडली. द्वारका सर्कल भागात वृध्देची भेट वसीम नावाच्या तरुणाशी पडली. यावेळी संशयिताने रिक्षातून शेख यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेले. यावेळी त्याने १७ हजार रुपयांचे थकित अनुदान काढून देण्याचा बहाणा केला. तसेच, शेख यांना गोदाघाटावर नेऊन रामकुंड परिसरात वृध्देच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेत पोबारा केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.कार्यालयातून रोकडची चोरी

फायनान्स व वाहन खरेदी-विक्रीचे काम चालणारे कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे ४७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. कार्यालयातील कम्प्युटरचीदेखील चोरट्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद वझिर खान (रा. रेणुकानगर, वडाळानाका) यांच्या तक्रारीनुसार, खान यांचे गुरूद्वार रोडवरील सिल्वर हाईटस या इमारतीच्या तळमजल्यामधील गाळा क्रमांक चारमध्ये कार्यालय आहे. रिलेशन एन्टरप्रायझेस फायनान्स कार्यालयाचे मंगळवारी रात्री चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करून चोरी केली.

ऑनलाइनद्वारे ४० हजारांना गंडा

आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्डवरील नंबर मिळवित तिघा परप्रांतीय भामट्यांनी एकाच्या बँक खात्यातील चाळीस हजार रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. जनार्दन धर्मा सोनवणे (रा. महालक्ष्मीनगर, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, सोनवणे अंबड एमआयडीसी तील एका खासगी कंपनीत कामास आहे. २० मार्च रोजी त्यांना एका भामट्याने मोबाइलवर कॉल केला. तसेच, आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत एटीएम कार्डचा नंबर मिळवला. यानतंर, त्यांच्या बँक खात्यातील ४० हजार रुपयांची रक्कम नंदन पासवान, शंकरदास (दोघे रा. बिहार) व जगदीश नास्कर (रा. उत्तरप्रदेश) या तिघा परप्रांतीयांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड करीत आहेत.

रिक्षाप्रवासात मोबाइल चोरी

रिक्षातून प्रवास युवकाच्या खिशातील महागडा मोबाईल सहप्रवाशाने चोरी केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल निवृत्ती गायकर (२५, रा. लहवित, अंबडगाव) यांनी तक्रार दिली आहे. दत्तमंदिर येथून बिगबाजार येथे जाण्यासाठी रिक्षातून प्रवास करीत असताना चोरीचा प्रकार घडला. सोमवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार विंचू करीत आहेत.

कामगाराचा सटाण्यात मृत्यू

सटाणा : विंचूर-शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या रामसाई गुप्ता (५५) या परप्रांतीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सटाण्यात खळबळ उडाली आहे. रामसाई गुप्ता असे त्याचे नाव आहे. तो उर्दू शाळेजवळ हेमंत रामचंद्र कापडणीस यांच्या घरात भाडेतत्वाने राहत होता. तीन दिवसांपासून घराला कुलूप नसतांनाही रामसाई दिसला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कापडणीस यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता रामसाईचा मृतदेह आढळून आला. कापडणीस यांनी याबाबत रामासाई काम करीत असलेल्या हॉटेलचे संचालक प्रवीण सोनवणे यांना माहिती दिली. सोनवणे यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून रामसाई गुप्ता याचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

गोवंशाची वाहतूक

नाशिक : छोटा हत्ती वाहनात दोन बैल कोंबून वाहतूक करणाऱ्या तिघांच्या भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील वाहन जप्त करण्यात आले असून. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज रशिद शेख (रा. गंगापूर, औरंगाबाद), मन्सूर बाबुलाल पठाण आणि अब्बार बशीर शेख (रा. दोघे नायगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

तडीपारास अटक

नाशिक : शहर व जिल्ह्यातून तडीपार असताना शहरात वास्तव्य करणाऱ्या देवळालीगावातील एका गुंडास पोलिसांनी पकडले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुड्या रूंझा पवार (२६, रा. वडारवाडी, देवळालीगाव) असे संशयित तडीपाराचे नाव आहे. गुड्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याला शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. मात्र, तडीपारीनंतरही त्याचा शहरात वावर होता. पोलिसांनी छापा टाकून त्यास सोमवारबाजार भागात पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट झाल्यावरच शहराला सीसीटीव्ही!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात सीसीटीव्ही बसवण्यास सरकारची प्राथमिकता असून, १ मे २०१७ रोजी सीसीटीव्ही कार्यन्वित होतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, मंत्रालयातील सचिवांनीच या प्रयत्नांना हाणून पाडल्याचे समोर आले आहे. नाशिक स्मार्ट होणारच असून, त्याच कामात सीसीटीव्हींचा समावेश करावा, असे सांगत हा प्रस्ताव लांबवणीवर टाकण्यात आला आहे. आता नाशिक कधी स्मार्ट होईल आणि कधी सीसीटीव्ही कार्यान्वित होतील, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ठाऊक!

शहरात जवळपास एक हजार सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खासगी तज्ज्ञ समितीमार्फत सीसीटीव्ही बसवण्यासाठी जागांचा सर्व्हे करण्यात आला. तत्काल‌नि पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन् यांनी सादर केलेल्या प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरीदेखील दिली आहे. सर्व्हे आणि इतर तांत्रिक कामांनंतर फक्त टेंडर प्रक्रिया राबवणे बाकी होते. साधारणतः १ मेपर्यंत शहरातील सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित होण्याची दाट शक्यता होती. किंबहुना सीसीटीव्ही बसवण्यासाठी काम करणाऱ्या तांत्रिक सल्लागार समितीने १ मे ही तारीखसुध्दा जाहीर केली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर टेंडरचे काम सुरू होताच प्रधान सचिवांसह राज्याच्या आयटी विभागाला जाग आली. नाशिकचा स्मार्ट स‌टिीत सहभाग झाला असून, त्याअंतर्गतच सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, याविषयी मंत्रालयात खल झाला. लागलीच या विषयाला मंजुरीदेखील मिळाली. आता आयटी विभागाच्या देखरेखीखाली शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम होणार आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, नवीन प्रस्तावामुळे कालापव्यय होतो आहे. पूर्वीच्या प्रस्तावानुसार आजमितीस ९० टक्के काम पूर्ण झाले असते. आता स्मार्ट स‌टिीसाठी निधी मिळणे, त्यास मंजुरी घेणे अशा तांत्रिक कामांमध्ये सीसीटीव्हीचे काम अडकून पडले आहे. सीसीटीव्ही कधी कार्यान्वित होतील, याविषयी आज निश्चित माहिती समोर येत नाही.

शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तसेच, महत्वाच्या भागांमध्ये सीसीटीव्ही बसणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. विशेषतः रस्ते अपघात आणि गुन्हेगारी घटनांना रोखणे यामुळे शक्य आहे. रात्रीच्या वेळी बिनधास्त फिरणाऱ्या चोरट्यांना यामुळे आळा बसू शकतो. राज्य सरकारने सुरक्षेच्या दृष्ट‌किोनातून या कामास चालना देण्याची मागणी केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेविरुद्ध महावितरणची तक्रार

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीज ग्राहकांनी जिल्हा बँकेच्या शाखेत भरलेले बिलाचे कोट्यवधी रुपये महावितरणकडे जमा न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा बँकेकडे महावितरणच्या ग्राहकांचे ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ६५७ रुपये जमा आहेत. ही रक्कम जिल्हा बँकेने महावितरणकडे भरलेली नाही.

महावितरणचे अधिकारी प्रथम नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, आपल्या हद्दीत फसवणूक झालेली नसल्याने अधिकाऱ्यांना मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात जावे लागले. महावितरण व नाशिक बँक यांच्यातील करारातील अटींचे बँकेने उल्लंघन केल्यामुळे वीज ग्राहकांनी तूर्त जिल्हा बँकेच्या शाखेत वीज बिल भरू नये, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी नुकतेच केले होते.

ग्राहकांनी जिल्हा बँकेकडे जमा केलेले परंतु, बँकेने महावितरणकडे न भरलेल्या बिलाची रक्कम अशी : शहर मंडळ - एक मार्च ते ३१ मार्च २०१७ दरम्यान १३ कोटी २६ लाख १४ हजार २६२ तर एक एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान तीन कोटी ९६ लाख ४२ हजार ६०५ असे एकूण १७ कोटी २२ लाख ५६ हजार ८६७ रुपये. मालेगाव मंडळ - एक मार्च ते ३१ मार्च २०१७ दरम्यान ११ कोटी ८४ लाख ४५ हजार ४९५ तर एक एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान चार कोटी १५ लाख ३५ हजार २९५ असे एकूण १५ कोटी ९९ लाख ८० हजार ७९०.

कराराचे उल्लंघन

जिल्हा बँक व महावितरण यांच्यात वीज बिल भरणा प्रक्रियेबाबत २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी करार झाला. बँकेने दोन महिन्यांपासून ग्राहकांनी वीज बिलाचे भरलेले पैसे महावितरणच्या बँक खात्यात भरलेच नाहीत. जिल्हा बँकेने त्यांच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केल्याबाबतच्या पावत्या महावितरणकडे दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. लहाडेंची अटक अटळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. लहाडेंना शुक्रवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टात गुरूवारी अटकपूर्व अर्जावर सुनावणी सुरू असताना डॉ. लहाडे यांच्या पतीने दोन्ही अर्ज माघे घेत असल्याचे सांगितले.

सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर म्हसरूळ तसेच सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. ‘सिव्हिल’मध्ये अवैध गर्भपात झाल्याची घटना २२ मार्च रोजी समोर आली होती. त्यानंतर चौकशी प्रक्रिया राबवून डॉ. लहाडे यांना राज्य सरकारने निलंबित केले. तसेच या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये १५ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी डॉ. लहाडे यांच्यावतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी अर्ज सादर केले होते. दोन वेगवेगळे अर्ज आल्याने हे दोन्ही अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. शर्मा यांच्या कोर्टात वर्ग करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी बचावपक्षाने युक्तिवाद केला होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. अजय मिसर यांनी गुरूवारी कोर्टात आपले म्हणणे मांडले. ही सुनावणी इन कॅमेरा घेण्याची विनंती त्यांनी कोर्टाकडे केली.

युक्तिवाद सुरू असतानाच माघार

सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर डॉ. लहाडे यांचा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता होती. तसे अनेक पुरावे पोलिसांसह सरकारी वकिलांनी पुढे आणले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू असताना डॉ. लहाडे यांच्या पतीने दोन्ही अर्ज माघे घेत असल्याचे सांगितले. ही माहिती अॅड. कासलीवाल यांनी कोर्टाला देताच पोलिसांनी त्यास आक्षेप घेतला. डॉ. लहाडेंना अटक करण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. लहाडेंना शरण येण्याबाबत सांगितले असता डॉ. लहाडे यांच्या पतीने शुक्रवार (दि. २८) सकाळपर्यंतचा वेळ देण्याची विनंती कोर्टाला केली. सदर विनंती मंजूर करण्यात आली असून, डॉ. लहाडे शुक्रवारी सकाळी ११ वाजता सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये हजर होतील.

रॅकेटचा आरोप

डॉ. लहाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषध साठा सापडला होता. ही औषधे कोठून आली? कोणी दिली? त्याचा कोणासाठी वापर झाला हे शोधणे महत्त्वाचे असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले. सिव्हिलमध्ये ज्या महिलेचा गर्भपात झाला त्या महिलेने गर्भपातापूर्वी सोनोग्राफी केली होती. पिंपळगाव बसवंत येथील संबंधित डॉक्टरने गर्भपात करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच पुढील तपासणीसाठी ‘सिव्हिल’ला पाठवले. मात्र, ‘सिव्हिल’मध्ये लागलीच संबंधित महिलेचा गर्भपात करण्यात आला. ग्रामीण भागात या प्रकरणाचे मोठे रॅकेट असून त्याची सखोल चौकशीची गरज असल्याचा मुद्दा सरकारी पक्षाने मांडला. गर्भपात झाल्यानंतर सदर भृण कोठे लपवण्यात आले, याचीही माहिती पोलिसांना असून, कोर्टाच्या अनुमतीने ते भ्रुण बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

सिव्हिल सर्जन अडचणीत?

सुनावणी सुरू असताना सरकारी पक्षाने कागदपत्रात फेरफार झाल्याचे सांगितले. महापालिकेच्या पथकाने सिव्हिलमध्ये छापा मारल्यानंतर पुरावे म्हणून कागदपत्रे जप्त केलीत. ही कागदपत्रे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांच्या कस्टडीत असताना त्यात फेरफार करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. पोलिसांच्या या दाव्यामुळे गर्भपात प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून, डॉ. लहाडेंच्या चौकशीनंतर अनेक गंभीर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंग नसूनही सर्रास वसुली

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील रेल्वे स्टेशन परिसरातील बेकायदेशीर पार्किंगने पुन्हा उचल खाल्ली आहे. पार्किंगचा परवाना नसतानाही सुभाषरोडवरील तळावर चारचाकी वाहनचालकांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी रेल्वेच्या भुसावळ व मुंबई कार्यालयाकडे केल्या आहेत. येथे दुचाकी पार्किंगच्या पावत्या दिल्या असून, त्या बनावट असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. दरम्यान, जेथे पार्किंगचा बोर्ड असेल तेथेच योग्य शुल्क द्यावे, लूट होत असल्यास तक्रार करावी, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण यांनी केले आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन आवारातच बसस्थानकही आहे. त्यामुळे येथील पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर झालेला आहे. नातेवाइकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी आलेल्यांचा गोंधळ होतो. गाडी कुठे पार्क करावी, असा प्रश्न पडतो. आवारात गाडी लावल्यास कधी कारवाई होईल, हे सांगता येत नाही. याचाच फायदा समाजकंटक घेत आहेत. मुक्तिधामजवळ महापालिकेच्या पावत्या छापून पार्किंगचा घोटाळा झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती येथे होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.


तीन अधिकृत पार्किंग

रेल्वे प्रवाशांना आपली वाहने लावण्यासाठी अधिकृत तीन पार्किंग आहेत. देवी चौकात, तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयामागे फक्त दुचाकी पार्किंगचा ठेका आहे. पार्सल कार्यालयाजवळ चारचाकी वाहनांचे अधिकृत पार्किंग आहे. एक-दोन दिवसांसाठी रेल्वेने जाणारे, तसेच पंचवटी, राज्यराणी, तपोवनने अप-डाऊन करणारे या तिन्ही ठिकाणी पार्किंगचा वापर करतात. काही जण पार्किंगचा पास काढतात. त्यांची वाहने व्यवस्थित सांभाळली जातात. मात्र, येथील घोळाचा अधिकृत पार्किंगलाही फटका बसत आहे.

--

चुकीची पावती

नातेवाइकांना स्थानकावर सोडायला येणाऱ्यांचा अधिकृत पार्किंगशी क्वचितच संबंध येतो. ते रिझर्व्हेशन ऑफिस आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात वाहने पार्क करतात. आंबेडकर चौक परिसरात पार्किंगला जागा नसल्याने काही जण सुभाषरोड भागात गाड्या पार्क करतात. येथील तळाशेजारीच म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयामागे फक्त दुचाकीचा पार्किंग तळ आहे. या तळावर चारचाकी येण्याचे मार्ग लोखंडी कठडे लावून बंद केलेले आहेत. या तळाशेजारील जागेत प्रवासी चारचाकी उभी करतात. हा तळ निःशुल्क असतानाही पैसे घेतले जात आहेत. प्रवाशांनी सतर्कता दाखवली तर पावती दिली जाते. मात्र, ती दुचाकाची पावती असते. त्यामुळे भ्रष्टाचार लगेच लक्षात येत नाही. दुचाकीच्या ठेकेदाराने येथे चारचाकीची अधिकृत पार्किंग सुरू करून ठेका मिळावा म्हणून प्रशासनाला पत्र दिले आहे. मात्र, त्यावर उत्तर आलेले नाही.

--

पुन्हा लूटमार

रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयामागील दुचाकी वाहनतळावर चारचाकी वाहनचालकांकडूनही बेकायदेशीरपणे शुल्क घेतले जात असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच येथील गैरप्रकार थांबला होता. या तळाला दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे लावून चारचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, लुटारूंनी सुभाषरोडच्या मोफत पार्किंग तळावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. येथे पार्किंगचा बोर्ड नाही की पार्किंग ठेकाही नाही. चारचाकी वाहन आल्यावर पैशांची मागणी केली जाते. दिले नाहीत, तर वाहनांचे नुकसान केले जाते. रेल्वेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी वाहने लावली, तर त्यांच्याशी वाद घातला जातो. वाहनचालकांना रेल्वेच्या पावत्या देऊन बेकायदेशीर शुल्क वसुलीचे प्रकार घडत असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

--

‘..तर कारवाई करणार’

पार्किंग नसलेल्या ठिकाणी बेकायदेशीर शुल्क वसुली होत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी सांगितले, की जेथे पार्किंगचा बोर्ड आहे तेथेच शुल्क द्यावे. बेकायदेशीर शुल्क वसुली होत असल्यास नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करावी, आम्ही तातडीने कारवाई करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येचा इशारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्य सरकारने ७/१२ कोरा न केल्यास विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच एक जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा एकमुखी निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी संदर्भात कोणतेही पाऊल उचलत नाही. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. उपासमारीची वेळ आल्याने शेतकऱ्यांकडून संपाचे हत्यार उपसले जाणार आहे. वाहेगावसाळ येथील ग्रामसभेत गावातील सरपंच शोभा न्याहारकर, अरूण न्याहारकर, निवृत्ती न्याहारकर, उपसरपंच महेश न्याहारकर, योगेश रायते, प्रकाश चव्हाण, केशव खैरे, राजाराम मंडलिक, कैलास गांगुर्डे, चिंधू आहेर, नंदू मंडलिक आदींनी आपपल्या भूमिका मांडल्या. शेती करून आम्ही कर्जबाजारी होणार असू तर ही शेती न कसलेलीच बरी. सर्व कामगार, कर्मचारी, उद्योजक आदींना संप करण्याचे आधिकार आहे. मग शेतकऱ्यानी संप का करू नये, असे अनेक मुद्दे या बैठकीत उपस्थित करण्यात आले. या ग्रामसभेत शेतकरी भास्कर सोमवंशी व हरिश्चंद्र खैरे यांनी दोरखंड फास सभेत आणून एक जूनपर्यंत ७/१२ कोरा न झाल्यास फाशी घेण्याचा इशारा दिला. तुकाराम खैरे, दीपक खैरे, बाबाजी खैरे, चिंधू आहेर,राजेंद्र न्याहारकर आदींसह गावकरी बैठेकीस हजर होते.

शेतकरी संपासाठी येवल्यातही हालचाली

येवला ः कर्जमुक्तीच्या मागणीसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत असताना येवला तालुक्यात यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी येत्या एक मे रोजीच्या तालुक्यातील गावोगावी होणाऱ्या विशेष ग्रामसभांमध्ये शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याच्या मागणीसह इतरही ठराव केले जाणार आहेत. हे ठराव ग्रामपंचायतींनी १ मे रोजी करावेत असे आवाहन केले गेले आहे. गावोगावच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीत केलेल्या या ठरावाची प्रत घेऊन २ मे रोजी सकाळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमावे. त्यानंतर हे ठराव तहसीलदारांकडे सादर केले जाणार असल्याची माहिती अंगणगावचे सरपंच विठ्ठलराव आठशेरे, अनकुटेचे सरपंच बापूसाहेब गायकवाड आदींनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल अर्ज जमा करण्यासाठी तोबा गर्दी

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठीचा अर्ज जमा करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याने येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात गुरुवारी नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. या गर्दीवर नियंत्रण मिळविताना महापालिका कर्मचाऱ्यांवर घामाघूम होण्याची वेळ आल्याचे चित्र दिसून आले. अर्ज जमा करण्यासाठी काही नागरिकांनी चक्क महापालिका कार्यालयापुढे रात्रभर ठिय्या मांडल्याचेही दिसून आले.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण आणि मागणी सर्वेक्षणाच्या महापालिकानिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेसाठी गेल्या महिन्यात नाशिकरोड विभागीय कार्यालयातून सुमारे साडेआठ हजार मागणी सर्वेक्षण अर्जांची विक्री झालेली आहे. सध्या मागणी सर्वेक्षण अर्ज जमा करण्याचे काम सुरू आहे. दि. ३० एप्रिलपर्यंतच हे अर्ज जमा करण्याची मुदत असल्याने नाशिकरोड विभागीय कार्यालयात अर्ज जमा करण्यासाठी नागरिकांची दररोज झुंबड उडत आहे.

कार्यालयाला जत्रेचे स्वरूप

दररोज हजारो नागरिक येथील विभागीय कार्यालयात अर्ज जमा करण्यासाठी येत आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजताच नागरिकांची महापालिका कार्यालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत शेकडो महिलांनी दिवसभर ठिय्या मांडला होता. या गर्दीमुळे विभागीय कार्यालयाला जत्रेचे स्वरूप येत होते.


वशिलेबाजीचा आरोप

दिवसभर रांगेत तिष्ठत उभे राहूनही शेकडो नागरिकांना अर्ज जमा करताच आला नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी मोठा गोंधळ घालत वशिलेबाजीचा आरोप केला. यातील काही महिला नागरिकांनी रात्रीही महापालिका आवारात ठिय्या मांडला होता. कर्मचाऱ्यांनी दुपारी लंच ब्रेकसाठीही जास्त वेळ घेतल्याचा आरोप यावेळी उपस्थित नागरिकांनी केला. काही स्थानिक नगरसेवकही याकामी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याने नागरिक व अर्ज तपासणी करणारे कर्मचारी यांच्या शाब्दिक खटके उडू लागले आहेत. अर्ज तपासणीसाठी कर्मचारीसंख्याही कमी असल्याने नागरिकांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई निकालात नाशिकची वृंदा देशात प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सीबीएसईकडून इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून, नाशिकमधील वृंदा नंदकुमार राठी ही देशात मुलींमध्ये पहिली आली आहे. ३६० पैकी ३२१ गुण मिळवून तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे नाशिकच्या शिक्षणक्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वृंदा हिने नाशिकमधील लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेजमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले असून, ती आयआयटी पेसची विद्यार्थिनी आहे. आयआयटी, एनआयटीसह विविध कॉलेजांमधील २४ हजार जागा जेईई परीक्षांमधून भरल्या जाणार आहेत. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने दोन एप्रिल रोजी व ऑनलाइन परीक्षा ८ व ९ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. साधारणतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, कोटा येथील विद्यार्थ्यांचे नेहमी अशा परीक्षांमध्ये देशभरात वर्चस्व असले तरी यंदा नाशिकचे नाव पहिल्या क्रमांकाने झळकले आहे. ती बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस)मध्ये पुढील शिक्षण घेणार आहे. संशोधन क्षेत्रात करिअर करायची तिला इच्छा असून, सायंटिस्ट होण्याचे स्वप्न असल्याचे ती म्हणाली.

वृंदा परीक्षेला अतिशय आत्मविश्वासाने सामोरी गेल्याचे तिची आई कृष्णा राठी यांनी सांगितले. सीबीएसईचे चेअरमन आर. के. चतुर्वेदी यांनी फोनवर वृंदा प्रथम आल्याचे सांगताच अत्यानंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

छंदालाही प्राधान्य

जेईईमध्ये देशभरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही अतिशय मोठी बाब आहे. त्यासाठी योग्य मेहनत घेतल्याचे मत व्यक्त करतानाच छंदांनाही प्राधान्य दिल्याचे वृंदा हिने सांगितले. बासरीवादनाची तिला आवड असून, नाशिकमधील प्रसिद्ध बासरीवादक रवींद्र जोशी यांच्याकडे ती बासरी शिकते. अभ्यासातून रिलॅक्स होण्यासाठी या छंदाचा आधार ती घेते. याशिवाय वाचनाचीही तिला आवड असून, कथा, कादंबरी, कवितांचे वाचन ती करते.

२३ मेस जेईई अॅडव्हान्स

देशभरातील साडेबारा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पास झाले आहेत. त्यातील केवळ दहा हजार विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. येत्या २३ मेस जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे.

जेईई क्रॅक करायचा निर्धार केला आणि दोन वर्षे या अभ्यासासाठी स्वतःला समर्पित केलं. त्यामुळे ही परीक्षा पास होणे सोपे गेले. अभ्यासातून जरा निवांत वाटावे यासाठी मी बासरीवादन करायचे. त्याचाही मला या यशात खूप लाभ झाला.

- वृंदा राठी

अतिशय शांतपणे अभ्यास करणे हे वृंदाचे वैशिष्ट्य आहे. मानसिकदृष्ट्या स्थिर राहून अवघड गोष्टीही ती सहज करते. तिच्या या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे.

- प्रमोद पाटील, संचालक, आयआयटी पेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकुशल सिंहस्थाचे मोठे समाधान

0
0


सिंहस्थ पर्वणीकाळात विविध कारणांसह पापक्षालनासाठीही असंख्य लोक गोदास्नान करतात. अशा कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी करताना गैरव्यवहाराद्वारे पाप करू नका, अशा प्रकारचे इमोशनल ट्रेनिंग आम्ही अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी घेतले. कुंभमेळा पार पडला, पण गैरव्यवहाराचे आरोप होऊ शकले नाहीत. टीम चांगली होती म्हणून कुंभमेळा यशस्वी होऊ शकला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणारे रिझल्ट फ्रेमवर्क डॉक्युमेंट मी माझ्या नाशिक येथील कार्यकाळात तयार केले. महसूल विभागाने ते राज्यासाठी स्वीकारले. नाशिकमधील कार्यकाळ चांगला गेला, अशी भावना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पदभार सोडण्यापूर्वी व्यक्त केली.

सिंहस्थाच्या पूर्वतयारीविषयी काय सांगाल?

ऑक्टोबर २०१३ मध्ये सिंहस्थाचा आराखडा तयार झाला. त्यानंतर दोन-तीन महिने विभागीय आयुक्तपद रिक्तच होते. सिंहस्थाचे आव्हान समोर असताना नाशिकचा विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पूर्वी नाशिकमध्ये काम केले होते. स्कूटरवरून फिरल्याने शहराची थोडीफार माहिती होती. सिंहस्थाची पहिल्यापासून सर्व तयारी करावी लागणार होती. पदभार स्वीकारला, तेव्हा बजेट सेशन सुरू होते. त्यामुळे सर्वप्रथम सिंहस्थासाठी निधी मिळविण्यास प्राधान्य दिले.

नियोजनाबद्दलचा अनुभव कसा राहिला?

रमणी समितीने एक कोटी लोक येतील, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे एवढ्या लोकांना शहरात सामावून घेण्यासाठी काटेकोर नियोजन गरजेचे होते. स्नानासाठीचे घाट, शाहीमार्ग आणि साधुग्राम हे तीन विषय मार्गी लावण्याला प्राधान्य दिले. पूर्वीच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीसारखी दुर्दैवी घटना घडली होती. तशा अनुचित घटना टाळण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे नियोजन करताना अत्यंत काळजी घेतली गेली. सर्व शक्यता पडताळून पाहण्यात आल्या. पहिल्या पर्वणीत रेल्वेने येणाऱ्या भाविकांना अधिक पायपीट करावी लागली. त्यांना जेलरोडवरील सैलानीबाबा, तसेच द्वारका चौकापर्यंत बसने सोडता आले असते. अनुभवातून नियोजनातील त्रुटी दूर करण्यास प्राधान्य दिले. सोशल मीडिया आणि टेक्नोलॉजीचीदेखील सिंहस्थात खूप मदत झाली.

सिंहस्थातील लक्षात राहिलेला अनुभव...

सिंहस्थातील अनेक अनुभव आहेत. पर्वणी काळात पावसाचे मोठे आव्हान समोर होते. मालेगावात सुरू झालेला पाऊस राहूड घाटाच्या पुढे सरकला, तर लगेच कळवा, असी मी चांदवडचे प्रांत आणि तहसीलदारांना सांगून ठेवले होते. रात्री दोन वाजता तहसीलदारांचा फोन आला. जोरदार पाऊस सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोलॉजीतील थोडेफार समजत असल्याने आम्ही सावध झालो. पहाटे चारला नाशिकमध्येही जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे उद््भवणाऱ्या समस्यांची जाणीव झाली. वेळीच उपाययोजना केल्या. काही ठिकाणी घाटांच्या वरपर्यंत मोठ्या प्रमाणावर चिखल आणि सांडपाणी साचले होते. घाटांवर भाविकांचा ओघ सुरू होण्यापूर्वी ते हटविणे आवश्यक होते. आमच्या सर्व यंत्रणांनी अवघ्या दोन तासांत हे काम फत्ते केले.

डवले सर खूप स्ट्रिक्ट आहेत, असे अधिकारी सांगतात...

सरकारी कर्मचारी सरकारचा पगार घेतात. शिवाय या सेवेत येण्याचे त्यांना कुणी निमंत्रण दिलेले नाही. ते स्वतःच्या इच्छेने आले आहेत. त्यामुळे पगाराला साजेसे काम त्यांनी करायलाच हवे. खासगी क्षेत्राप्रमाणेच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन व्हावे यासाठी ‘रिझल्ट फ्रेमवर्क डॉक्युमेंट’ प्रणाली विकसित केली. अधिकाऱ्यांनी दररोज केलेल्या कामाची माहिती देणे आणि स्वत:चे मूल्यमापन करणे त्यामध्ये अपेक्षित होते. ही प्रणाली महसूल विभागाने स्वीकारली असून, ती कार्यान्वितदेखील केली, याचे समाधान आहे. नायब तहसीलदार व तत्सम अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले. बदल्यांमध्ये पारदर्शकता असायलाच हवी, असा माझा नेहमीच आग्रह राहिला असून, बदली आणि नोकरी हे विषय घेऊन माझ्याकडे येऊ नये, असा फलकच मी माझ्या कार्यालयात लावला आहे.

कार्यकाळात मार्गी लावलेल्या निवडक कामांबद्दल सांगा...

सरदार सरोवरचे गेट बंद करण्याचा निर्णय असो किंवा नाशिक-पुणे महामार्गाचे गेली अनेक वर्षे रखडलेले काम असो, असे अनेक विषय मार्गी लावले. सरदार सरोवर येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला. नाशिक-पुणे महामार्गाचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेशी संबंधित अनेक निर्णय घेऊन कामे मार्गी लावली.

शेतकरी आत्महत्या, पुरवठातील भ्रष्टाचाराबद्दल काय सांगाल?

हे दोन्ही विषय अत्यंत संवेदनशील आहेत. ते तेवढ्याच संवेदनशीलतेने हाताळायला हवेत. मी अकोल्यात जिल्हाधिकारी असताना माझा मोबाइल क्रमांक सर्वांसाठी जाहीर केला. आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारापर्यंत आलेल्या शेतकऱ्याने मला थेट फोन करावा, असे आवाहन केले होते. लोक त्यांच्या अनेक समस्या फोनवरून सांगत. शक्य तेवढ्या समस्यांच्या निरसनाचा प्रयत्न केला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. सुरगाणा रेशन घोटाळ्यामुळेही नाशिक चर्चेत आले. परंतु, आता एकूणच रेशन प्रणालीमध्ये सुसूत्रता येण्यास सुरुवात झाली आहे.

काही करायचे राहून गेले, असे वाटते का?

कामे कधीच पूर्ण होत नाहीत. करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. परंतु, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करणे शक्य होतेच असे नाही. आपण फक्त चांगली कामे करीत राहावे. समाधान हे मानण्यावर असते. त्यामुळे जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणे, पूर्ण क्षमेतेने आणि व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करेन.

(शब्दांकन ः प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवार, मंगळवारी पूर्णवेळ थांबा

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत पंचायत समितीच्या विविध विभागांसह तालुक्यातील कृषी, महावितरण, पालखेड आदी शासकीय विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशाताई साळवे होत्या. जनतेची कामे वेळीच व्हावी यासाठी सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर सोमवार व मंगळवारी कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी सभापती साळवे यांनी दिल्या.

सभेत तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी चालू आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाने निवडलेल्या तालुक्यातील १५ गावांची यादी वाचून दाखवली. शेतकऱ्यांना पुरविण्यात येणारे विविध साहित्य व औजारे खरेदी करताना कार्यालयाची मंजुरी घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महावितरण कंपनीच्या येवला अर्बन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांनी तालुक्यातील वीजजोडणी संदर्भात माहिती दिली. २०१० ते १२ या कालावधीत कृषीपंप वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी कंपनीने नियोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील १०४ विद्युत रोहित्रे दुरुस्तीसाठी स्थानिक स्तरावर निविदा मागवून कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या व मंजुरी दिल्या गेलेल्या कामांची माहिती गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी दिली. पंचायत समितीतील रिक्त पदे तत्काळ भरली जावीत यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. बैठकीस उपसभापती रुपचंद भागवत, अॅड. मंगेश भगत, कविता आठशेरे, सुनीता मेंगाने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा वर्गीकरण सक्तीचे

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात नवीन घंटागाड्या पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांसह ठेकेदारांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची अट ठेकेदारांना घालण्यात आली असून, येत्या सोमवार (दि. १ मे)पासून नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगवेगळा स्वीकारण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ठेकेदारांसोबतच नागरिकांनाही ओला व सुका असा स्वतंत्रपणे कचरा घंटागाड्यांमध्ये टाकावा लागणार आहे. हा नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून पाचशे ते हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक घरात दोन डस्टबिन आणि सोसायट्यांना दोन डस्टबिन ठेवणे आता बंधनकारक राहणार आहे. तसेच, घंटागाडी ठेकेदारांनाही नियमाचे पालन न केल्यास प्रतिदिन पाच हजारांचा दंड केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने आता शहरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. महापालिकेचा खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला असून, नवीन सर्व २०६ घंटागाड्या दाखल आता झाल्या आहेत. नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा गोळा करण्याची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. परंतु, नागरिकांकडूनच एकत्रित ओला व सुका कचरा येत नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे महापालिकेने आता १ मेपासून नागरिकांनीच ओला व सुका कचरा घंटागाड्यांमध्ये टाकावा, असे फर्मान काढले आहे. प्रत्येक घरात नागरिकांनी दोन डस्टबिन ठेवावेत, त्यातच ओला व सुका असा कचरा स्वतंत्र करावा. त्यानंतर सोसायटीच्या दोन डस्टबिनमध्ये तो स्वतंत्ररीत्या जमा करावा आणि नंतरच घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा टाकावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

दि. १ मेपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागणार आहे. महापालिने ओला व सुका कचऱ्याच्या निर्देशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंडाची तरतूद केली आहे. पहिल्यांदा एकत्रित कचरा आणला, तर पाचशे व त्यानंतर हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. नागरिकांसोबत घंटागाडी ठेकेदारासाठीही दंडाची तरतूद केली आहे. घंटागाडी ठेकेदाराने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर त्यालाही पाच हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांवरच आता ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवण्याचे बंधन आले आहे.


घंटागाड्यांची बोंब

महापालिकेने नवीन घंटागाड्यांसंदर्भात करार करताना ठेकेदारांना नव्या घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तरतूद करावी, असे म्हटले आहे. परंतु, अद्यापही बहुसंख्य घंटागाड्यांमध्ये स्वतंत्र ओला व सुका करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतंत्रपणे कचरा आणला, तरी ठेकेदार त्याची अंमलबजावणी करतील का, असा प्रश्न आहे. घंटागाडी ठेकेदारांनी आता भाजपसोबतच घरोबा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी कितपत होते याबाबत शंकाच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय सहनिबंधकांना शिक्षकांचा घेराव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या पाच महिन्यांपासून मिळत नसल्याच्या निषेधार्थ येथील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत गुरुवारी विभागीय सहनिबंधकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. वारंवार आंदोलन करुनही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने संताप अनावर झालेल्या शिक्षकांनी विभागीय सहनिबंधकांना घेराव घातला. त्यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन शिक्षकांनी मागे घेतले.

जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार पूर्वीपासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होतात. परंतु, नोव्हेंबर २०१६मध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुमारे १८ कर्मचाऱ्यांना बँकेतून पगाराचे पाहिजे तेवढे पैसे मिळत नसल्याच्या समस्येने शिक्षकवर्ग हैराण झाला आहे. शाळा सोडून कर्मचाऱ्यांना तासन््तास रांगेत उभे राहून केवळ दोन-तीन हजार रुपये कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. यासंदर्भात बँकेच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार भेटून पगाराचे पैसे देण्याची मागणी केली. यापूर्वीही शिक्षकांनी वारंवार आंदोलने केली असून, एनडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयातही तीव्र आंदोलन केले आहे. मात्र, केवळ आश्वासने तसेच उडवाउडवीची उत्तरे देऊन शिक्षकांची पाठवणी करण्यात आली. सातत्याने असा अनुभव येत असल्याने जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन केले. ‘पगार द्या, भीक नको’, ‘राष्ट्रीयकृत बँकेतूनच पगार झाले पाहिजे’ अशी घोषणाबाजी करुन आक्रमक झालेल्या शिक्षकांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार दणाणून सोडले होते. महिला शिक्षकांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन आपली कैफियत मांडली.

पगारावाचून बेहाल

कोणाच्या घरी लग्न तर कोणाकडे आजारी व्यक्ती.. बँकांचे हप्ते थकलेले. त्याच्या व्याजाच्या भाराचीही चिंता, अशा अनेक अडचणींमुळे जिल्ह्यातील शिक्षक बेहाल झाले आहेत. गरज असतानाही हक्काचे पैसे मिळत नसल्याने शिक्षकांचा संताप अनावर झाला. विभागीय सहनिबंधकांशी चर्चा करतानाही अनेकांनी खोटे बोलून आम्हाला वेड्यात काढू नका, असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

जिल्हा बँकेकडे कॅशलेसची कोणतीही सुविधा नाही. या बँकेचे चेकदेखील इतर बँका स्वीकारत नाहीत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशीदेखील याविषयी तीन वेळा संवाद साधला आहे. तरीदेखील अद्याप कोणताही ठोस निर्णय नाही.

- शंकर सांगळे,
जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षक परिषद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष विद्यापीठाबाबत रविवारी बैठक

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील देवस्थान ट्रस्टींच्या रविवारी (दि. ३०) होणाऱ्या बैठकीत आयुष विद्यापीठासाठी (आयुर्वेदीक युनानी निसर्गोपचार व होमिओपॅथी उपचार पद्धती शिक्षण देणारे विद्यापीठ) जम‌निीबाबतचा निर्णय होणार असल्याने भाविकांसह ग्रामस्थांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे याच बैठकीत पार्वतीमाता मूर्ती प्रतिष्ठापना महूर्ताबाबत निर्णय होणार असल्याने साधु-महंतांनाही याबाबत उत्सुकता आहे.

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारचे आयुषमंत्री डॉ. श्रीपाद नाईक येथे आले असता त्यांनी आयुष मंत्रालयाच्या विद्यापीठ स्थापण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच यासाठी २५ एकर जागा आवश्यक असल्याचे समजते. दरम्यान एका उच्चपदस्थ नेत्याने देवस्थानकडे २५ एकर जागेची मागणी केली असून, त्याबाबत रविवारच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे समजते. या विद्यापीठाला स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांचा विरोध आहे. तर काही विश्वस्तांना मात्र हे विद्यापीठ गरजेचे वाटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्तपदी ऋचेश जयवंशी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच बुधवारी येथील मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी ऋचेश जयवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयवंशी हे २००९ च्या बॅचचे आयएएस असून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात प्रकल्प संचालक म्हणून ते कार्यरत होते. येथील महापालिकेला आयएएस दर्जाचा अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. त्या पार्श्वभूमीवर एक वर्षापूर्वीच जगताप यांची येथील पालिकेत नियुक्ती झाली होती. जगताप यांनी पालिकेच्या प्रशासनात शिस्त आणली होती. अनेक लेटलतीफ अधिकाऱ्यांना त्यांनी चाप लावाला होता. तसेच पालिकेच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. येथील महासभेत गोंधळ नित्याचाच झाला होता. मात्र जगताप यांना महासभादेखील अत्यंत कौशल्यपूर्ण हाताळल्या. नुकतीच पालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, आचारसंहितेचे पालन व्हावे यादृष्टीने देखील त्यांनी नियोजन करायला सुरुवात केली होती. दरम्यान गुरुवारी सायंकाळपर्यंत येथील पालिका प्रशासनास जगताप यांच्या बदली संदर्भात कोणताही आदेश प्राप्त झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ शिवारं होणार ‘जलयुक्त’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या दोन वर्षांत राज्याच्या कानाकोपऱ्यात जलसंधारणाच्या प्रभावी कामानंतर राज्य सरकारने जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. गतवर्षी तालुक्यातील १५ गावांसाठीचा जलयुक्त शिवार फुलल्यानंतर यंदासाठी आणखी १५ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील कामे व स्थळ निवडीसाठी तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांनी शिवारफेऱ्या देखील सुरू केल्या आहेत.

या गावांमध्ये फुलेले शिवार

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात येवला तालुक्यातील कुसमाडी, चांदगाव, देवरगाव, सोमठाण जोश, डोंगरगाव, कोळम बुद्रुक, कोळम खुर्द, ममदापूर, वाघाळे, पांजरवाडी, जायदरे, अनकाई, गोरखनगर, खिर्डीसाठे, नीळखेडे, नगरसूल, अंदरसूल या १७ गावांची तर २०१६-१७ मण्ये कुसूर, धामोडे, धानोरे, अनकुटे, पिंपळखुटे तिसरे, कातरणी, आडगाव रेपाळ, मुरमी, सोमठाण देश, सावरगाव, सायगाव, कोळगाव, अंगुलगाव, खरवंडी व पिंपळखुटे बुद्रुक या १५ गावांची निवड करण्यात आलेली होती. या गावांमध्येही योजना रा‌बविण्यात आली. बऱ्याच ठिकाणचे जलस्त्रोत उंचावले आहेत.

शिवार फेऱ्या सुरू

तालुक्यातील या १५ गावांमध्ये अंमलबजावणी करणाऱ्या विविध शासकीय यंत्रणांनी शिवार फेऱ्या सुरू केल्या आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार नरेशकुमार बहिरम, सचिव तथा तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांच्यासह समिती सदस्य असलेल्या कृषी, लघु पाटबंधारे, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, वन विभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सर्व्हे आदी विभागांचे अधिकारी शिवार फेऱ्या करीत आहेत. गुरुवारी नांदूर, रेंडाळे, बाळापूर व रहाडी या चार गावांची शिवारफेरी झाली. उर्वरित ११ गावांची शिवार फेरी शनिवारी (दि.२९) केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images