Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रपती भवनाला ‘आरोग्यमंत्र’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. आतापर्यंत विविध राज्यांतील शासकीय व सामाजिक संस्थांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांना निरामय आरोग्याचे धडे देणारे डॉ. हेमंत ओस्तवाल यांना थेट राष्ट्रपती भवनातूनच आरोग्याचे धडे देण्यासाठी बोलावणे आले आहे. आज, शनिवारी (दि. २९) डॉ. ओस्तवाल राष्ट्रपती भवनात निरामय आरोग्य या विषयावर राष्ट्रपती भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करणार आहेत.

आपल्या वडिलांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर कोसळलेल्या संकटाचा यशस्वी सामना करणारे डॉ. ओस्तवाल रुग्ण आजारीच पडू नयेत यासाठी गेल्या ३२ वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे जगात दर वर्षी एक कोटी ७३ लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी भारतात एक कोटी ११ लाख व्यक्ती दर वर्षी मृत्युमृखी पडतात. हृदयविकार, ब्लडप्रेशर आणि डायबिटिज या तीन आजारांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. कॅन्सर, एड्स व अपघात या तिघांपेक्षाही जास्त व्यक्ती वरील तीन आजारांना बळी पडतात. वास्तविक आरोग्याची काळजी वेळीच घेतली तर या तीनही आजारांना अटकाव होऊन अकाली मृत्यू टळू शकतो. त्यामुळे डॉ. ओस्तवाल यांनी या तीन आजारांबाबत जनजागृती सुरू केली असून, निरामय आरोग्य या विषयावर त्यांनी दोन तासांचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार केले आहे.

स्वयंस्फूर्तीने कार्यरत

हृदयविकार, ब्लडप्रेशर आणि मधुमेह या तीन आजारांसदर्भात आधीपासूनच दक्षता घेतली, तर देशभरातील ८० टक्के अकाली मृत्यू हे टाळता येतील, असा डॉ. ओस्तवाल यांचा दावा आहे. जगप्रसिद्ध डॉक्टर, साहित्यिक व फिलॉसॉफर या तज्ज्ञांचा दाखला देत दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोंडीवर भाष्य करत ते जनजागृती करतात. विशेषतः स्वयंस्फूर्तीने ते शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था व खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्याचा मंत्र देतात. महाराष्ट्रासह विविध राज्ये, तसेच लष्करातील अधिकाऱ्यांनाही त्यांनी आरोग्याचे धडे दिले आहेत. आता राष्ट्रपती भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते आरोग्याचे धडे देणार आहेत.

आतापर्यंत मी ५७९ ठिकाणी निरामय आरोग्य या विषयावर सादरीकरण केले आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनाने माझ्या कार्याची दखल घेतली असून, शनिवारी (दि. २९) राष्ट्रपती भवनात माझे सादरीकरण होणार आहे.

-डॉ. हेमंत ओस्तवाल, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुक्त’मधील अपात्र पीएच.डी. गाइडशिप रद्द

$
0
0

नाशिक ः ज्ञानगंगोत्री म्हणविणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शुद्धीकरणाची मोहीम धडाक्यात सुरू झाली असून, नवनियुक्त कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी अपात्र पीएच.डी. गाइड्सवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना शिक्षणक्रमापासून बेदखल केले आहे. त्यामुळे जवळपास दहा जणांची गाइडशिप रद्द झाली असून, येथून पुढे त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची बंदी करण्यात आली आहे. विद्यार्थी ज्या विषयात पीएच.डी. करीत आहेत, त्या विषयाशी काडीमात्रही संबंध नसणारे गाइड असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

ज्या प्राध्यापकांची पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. एकाच विषयात आहे, असेच प्राध्यापक पीएच.डी.साठी गाइड म्हणून काम करू शकतात, या यूजीसीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या, कोअर सब्जेक्टमध्ये नसणाऱ्या प्रा. ऋचा गुजर, प्रा. सुनंदा मोरे, प्रा. मनोज किल्लेदार, सुरेंद्र पाटोळे, सज्जन थूल, प्रकाश देशमुख, सुरेश पाटील आदी प्राध्यापकांची गाइडशिप रद्द करून संशोधक विद्यार्थ्यांना ते करीत असलेले मार्गदर्शन थांबविण्यात आले आहे.

अपात्र गाइडमुळे मुक्त विद्यापीठाची विश्वासार्हता देशपातळीवर घसरली होती. या प्राध्यापकांच्या सेवेत असण्याबद्दल यापूर्वी उच्च शिक्षण विभागाने आक्षेप नोंदवून त्यांनी घेतलेल्या वाढीव वेतनश्रेण्या रद्द केल्या होत्या. मुक्त विद्यापठातून २००९ नंतर घेतल्या गेलेल्या पीएच.डी.ला उच्च शिक्षण विभाग व यूजीसी यांनीही नकार दिला होता. कृषी विद्याशाखेतील पीएच.डी. गाइड हा प्राध्यापकपदावर नसताना २००९ नंतर अवैध पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या तांत्रिक सहाय्यकास कृषी विस्तार पीएच.डी. गाइडशिप दिल्याचे आश्चर्य अद्याप कायम आहे. त्यांचीही गच्छंती होणे अटळ आहे.

कृषी विभागातही होणार कारवाई

कृषीविस्तार पदव्युत्तर पदवी व कृषीविस्तार पीएच.डी. या दोन्ही संशोधन पदव्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषद या सर्वोच्च कृषी क्षेत्रातील संस्थेची परवानगी नाही. यूजीसीनेदेखील त्या त्या विद्याशाखेच्या सर्वोच्च संस्थेची परवानगी असेल तरच कृषी पदवी अथवा संशोधन पदवी विद्यापीठाला सुरू करता येईल, असे स्पष्ट केले असताना या पदव्यांना बाजारातील उठाव पाहून काहींनी दिशाभूल करून मुक्त विद्यापीठात कृषी विद्याशाखेच्या एम.एस्सी. एम.फिल. व पीएच.डी. सुरू ठेवल्या आहेत. अपात्र गाइड व परवानगीशिवाय या पदव्या म्हणजे विद्यार्थ्यांची व सरकारची फसवणूकच असून, कुलगुरूंनी शुद्धीकरण मोहिमेत याचाही विचार करणे गरजेचे आहे.

अपात्र गाइडमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

कृषीच्या व पीएच.डी.साठी कृषी अनुसंधान परिषदेची मान्यता नसल्याचे प्रॉस्पेक्टमध्ये लिहिलेले आहे. अपात्र गाइड, यूजीसीची आणि कृषी संशोधनसारख्या नियंत्रण करणाऱ्या संस्थांची परवानगी नाही हे पीएच.डी.ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत होते. मात्र, कोठेही न मिळणारे २५०० रुपयांचे दरमहा मानधन मुक्त विद्यापीठात मिळत असल्याने व डायरेक्ट पदवी पदरात पाडून घेण्याच्या मोहामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांना लाखो रुपये मिळाल्याने हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत तरी विद्यापीठावर दावा मात्र दाखल करू शकणार नाहीत, असे हे त्रांगडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक खर्चात दीड कोटींची बचत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांचा हिशेब विभागीय आयुक्तांना सादर झाला असून, पालिकेने निवडणूक खर्चात तब्बल दीड कोटींची बचत केली आहे. निवडणुकांसाठी पालिकेने पाच कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी केवळ साडेतीन कोटी रुपयेच खर्च झाले असल्याने पालिकेची चांगलीच बचत झाली आहे. दरम्यान, निवडणूक रिंगणात उतरलेल्या ७२१ उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला असून, त्यांनी सात कोटी ७० लाखांचा खर्च केल्याची माहिती विभागीय आयुक्तांना पालिकेने सादर केली आहे.

फेब्रुवारीमध्ये पालिकेच्या ३१ प्रभागांसाठी निवडणूक झाली. या निवडणूक कामासाठी महापालिकेने आपल्या बजेटमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. निवडणूक कामांसाठी येणारा सर्व खर्च यात अंतर्भूत होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतनही याच पैशांतून केले जाणार होते. परंतु, प्रत्यक्षात पालिकेने निवडणूक खर्चात चांगली बचत केली आहे. निवडणूक कामांसाठी मिळालेल्या पाच कोटींपैकी तीन कोटी ५० लाखांचा खर्च झाला आहे. प्रशासनाने काटकसरीने खर्च केल्याने एवढी बचत झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. खर्चासंदर्भातील अहवाल लेखा विभागाला प्राप्त झाला असून, लेखा विभागाने हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

या निवडणुकीत तब्बल ८२१ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. रिंगणात असलेल्या उमेदवारांना मह‌िनाभरात निवडणूक खर्चाचा अहवाल पालिकेला सादर करणे बंधनकारक होते. प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा दहा लाखांपर्यंत होती. तसेच, उमेदवारांना आपला खर्चाचा तपशील देण्यासाठी स्वतंत्र बँक खाते काढण्याचे निर्देश दिले होते. निवडणुका संपल्यानंतर सर्व ८२१ उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे. त्यांनी सादर केलेल्या निवडणूक विवरणपत्रानुसार ८२१ उमेदवारांनी ७ कोटी ७० लाख ७३ हजार रुपये खर्च केला आहे. ८२१ पैकी १५ उमेदवारांनी मात्र मुदतीनंतर खर्च सादर केला असून, निवडणूक प्रकियेचे काम पूर्ण झाल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.

१५ जणांवर कारवाई

महापालिकेची निवडणूक ही ८२१ उमेदवारांनी लढवली होती. त्यापैकी ८०६ उमेदवारांनीच वेळेत खर्च सादर केला आहे. पंधरा उमेदवारांनी वेळेनंतर खर्च सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक खर्च वेळेत सादर केला नाही, तर थेट दोन ते तीन वर्षांची निवडणूक बंदी केली जाते. त्यामुळे या १५ जणांवर कारवाईची शिफारस महापालिकेकडून करण्यात आली आहे. या १५ उमेदवारांमध्ये मनसेचा एक उमेदवार वगळता सर्व अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे या कारवाईचा त्यांना काहीच फरक पडणार नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत श्रमजीवी संघटनेचा रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

पालघर जिल्हा परिषदेवर केलेल्या डोहाळे जेवण आंदोलनात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आमदार विवेक पंडित यांच्यासह श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ येथील श्रमजीवी संघटनेच्या वतीने मुंबई महामार्गावर वैतरणा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुका श्रमजीवी संघटनेच्या वतीने घोटी येथे मुंबई-आग्रा महामार्गावर हे आंदोलन झाले. श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महामार्गावर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडीत रस्ता रोको आंदोलन केले. श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत महामार्ग काही काळ रोखून धरला. यामुळे वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या. इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे, पोल‌िस निरीक्षक संजय शुक्ला यांनी आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस भगवान मधे यांच्यासह रामराव लोंढे, अशोक लाहंगे, तानाजी शिद, संतू ठोंबरे, काळू भस्मे, विजय मेंगाळ, तुकाराम लचके, रामदास भगत, तुकाराम भस्मे, भगवान डाके आदींसह महिला सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हंडाभर चांदण्या’चा आज प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंगभूमी गाजवित असलेल्या आणि दुष्काळग्रस्तांच्या दाहकतेवर टोकदार भाष्य करणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाचा विशेष प्रयोग आज (दि. २९) रोजी खास ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांसाठी होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कालिदास कलामंद‌िरामध्ये होणारा हा नाट्यप्रयोग रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

नाशिकच्याच मातीशी नाते सांगणाऱ्या दत्ता पाटील यांनी या नाटकाचे लेखन केले असून, सचिन शिंदे यांचे दिग्दर्शन आहे. प्रमोद गायकवाड या नाटकाचे निर्माता आहेत. सध्या या नाटकाची सर्वत्र यशस्वी घौडदौड सुरू असून, मटा सन्मान नाट्य महोत्सवात या नाटकाने बाजी मारली आहे. राष्ट्रीय नाट्य शाळेच्या (एनएसडी) भारत रंग महोत्सवासाठी देश-विदेशांतील ६९ नाटकांमध्ये हे नाटक निवडले गेले. त्यामुळेच या नाटकाचा प्रयोग पहावयास मिळणे ही ‘मटा’च्या वाचकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही हे नाटक गौरविले जात आहे. विविध प्रश्नांचे बिऱ्हाड पाठीवर घेत जगणे सहज करून घेणाऱ्या ग्रामीण भागातील लोकजीवनाचे कंगोरे या नाटकाच्या माध्यमातून रसिकांना पहावयास मिळणार आहेत. शहरी नागरिकांना टँकरची सहसा गरज भासत नाही. परंतु, ग्रामीण भागात पाण्यासाठी आसुसलेले लोक अत्यंत आतुरतेने टँकरची वाट पाहत असतात. टँकर येत नाही हे लक्षात आल्यानंतर जी काही टोकाची पावले उचलली जातात, ती पाहताना दुष्काळाची दाहकता संवेदनशील रसिकांच्या अंगावर आल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे हे नाटक एक वेगळा अनुभव देणारे ठरेल यात शंका नाही.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लब सदस्यांना या नाटकासाठीच्या प्रवेशिका मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. कल्चरल क्लबची नवीन मेंबरशिप घेणाऱ्यांनाही या नाटकाच्या प्रवेशिका दिल्या जाणार आहेत. नवीन मेंबरशिपसाठी २९९ रुपये शुल्क असून, सदस्यांना वर्षभर भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांचा लाभ त्याद्वारे मिळणार आहे.

कात्रण आणा, तिक‌ीट मिळवा

कल्चर क्लब सदस्य नसणाऱ्या परंतु ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वर्षानुवर्ष वाचक असलेल्या नागरिकांकडूनही या प्रयोगाच्या पासेसची मागणी होत होती. वाचकांची निराशा टाळण्यासाठी ‘मटा’ने वाचकांना एक संधी देऊ केली आहे. आजच्या अंकात प्रसिद्ध झालेले नाटकाच्या जाहिरातीचे कात्रण ‘मटा’च्या ऑफिसमध्ये घेऊन येणाऱ्या वाचकांना नाटकाचे तिकीट मोफत दिले जाणार आहे.
g कल्चरल क्लबसाठी नवीन सभासद नोंदणी सुरू.
g नव्याने होणाऱ्या सभासदांनाही मिळणार मोफत प्रवेशिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीज ग्राहकांनी जिल्हा बँकेच्या शाखेत भरलेले वीजबिलाचे ३३ कोटी २२ लाख रुपये महावितरणकडे जमा न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अखेर दोन गुन्हे आज रात्री दाखल झाले. बनावट कागदपत्रे करणे, फसवणूक आणि संगनमताचे असे गुन्हे बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक (वित्त) यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

गुन्हा दाखल व्हावा म्हणून महावितरणचे अधिकारी तीन दिवसांपासून पोलिस ठाण्यात चकरा मारत होते. वरिष्ठांशी चर्चा करून बँकेविरुद्ध गुन्हा दाखल करू, असे सांगून पोलिसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची दोन दिवस बोळवण केली. शनिवारी रात्री मालेगाव सर्कलतर्फे पहिला, नंतर नाशिक सर्कलतर्फे दुसरा गुन्हा दाखल झाला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेकडे महावितरणच्या ग्राहकांचे ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ६५७ रुपये जमा आहेत. ही रक्कम जिल्हा बँकेने महावितरणकडे न भरता स्वतःसाठी वापरली. त्यामध्ये नाशिक मंडळाचे १७ कोटी २२ लाख, तर मालेगाव मंडळाचे सुमारे १७ कोटी असे एकूण ३३ कोटी २२ लाख रुपये आहेत. जिल्हा बँक व महावितरण यांच्यात वीजबिल भरण्याबाबत २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी करार झाला. दोन महिन्यांपासून ग्राहकांनी वीजबिलाचे पैसे बँकेत भरले. मात्र, बँकेने ते महावितरणच्या बँक खात्यात भरलेच नाहीत. बँकेने हे पैसे स्वतःसाठी वापरले. बनावट कागदपत्रे करून पैसे भरल्याचे दाखवले. कराराचे उल्लंघन केले आदी बाबींचे पुरावे महावितरणने सादर करूनही गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडमधून आज सुटणार पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला, मनमाडसह ३५ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी रविवार (दि. ३० एप्रिल) पासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पावसाळ्यापर्यंत निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणास त्यामुळे मदत होणार असून, जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे.

येवला, मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, लासलगाव, निफाडमधील काही प्रासंगिक गावांना दरवर्षी पालखेड कालव्यातून पाणी आरक्षित केले जाते. उन्हाची तीव्रता वाढली की या परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागते. त्यावेळी पालखेड कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. पाणी चोरीस जाऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने डोंगळे काढण्याची मोहीम राबविण्यात आली. वहनमार्गावरील डोंगळे काढण्यात आल्याने रविवारी दुपारपर्यंत पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी वहनमार्गाच्या दोन्ही बाजूस पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी प्रत्येक पाच किलोमीटरवर एक पथक कार्यरत राहणार आहे. पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पाणी सोडताच कालव्यालगतच्या गावांमधील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पोलिस बंदोबस्त

पोलिस बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक, दोन पोलिस उपअधीक्षक, त्या त्या पोलिस स्टेशनचे निरीक्षक, राखीव पोलिस दलाची तुकडी पाण्याच्या सुरक्षेवर लक्ष ठेऊन असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मनपात स्वतंत्र तांत्रिक कक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता राज्य सरकारने महापालिकांना तांत्रिक कक्ष निर्मितीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेतही आवास योजनेसाठी तांत्रिक कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी केंद्र सरकार ५० टक्के निधीही देणार आहे. घरकुल योजनांसाठीचा तांत्रिक आराखडा तयार करण्याचे काम या कक्षाकडे असणार असून, घरकुल योजनांचे काम काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला सन २०२२ पर्यंत घरकुल देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. नाशिक शहरात घरकुलांसाठी आतापर्यंत तब्बल ६७ हजार अर्जांची विक्री झाली आहे. आतापर्यंत १७ हजार अर्ज दाखल झाले आहेत. केंद्र सरकारने आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील ३६ महापालिका व नगरपालिकांमध्ये तांत्रिक कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने दिले आहेत. नाशिक महापालिकेतही स्वतंत्र तांत्रिक कक्षाची निर्मिती केली जाणार असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडून निधीही मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक विभागात ९४ गावांमध्ये पाणीटंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिन्नर फाटा

एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाशिक विभागातील बहुतांश तालुक्यातील विहिरींनी तळ गाठल्याने विभागातील ९४ टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून ८१ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

नाशिक विभागातील बहुतांश तालुक्यात गेल्या पावसाळ्यात धो-धो पाऊस बरसला होता. तरीही जानेवारी २०१७ मध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३९ तालुक्यांतील भूजलपातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १ ते ३ मीटरपर्यंत खालावली आहे. त्यामुळे नाशिक विभागात पाणी टंचाईची समस्या उद्भवण्याचे निश्चितच होते. त्यातच नाशिक विभागातील बहुतांश गावात जलयुक्त शिवारची कामे झाल्याने पाणी टंचाईचा कालावधी घटला आहे.

नाशिक जिल्हा आघाडीवर

विभागात सर्वात जास्त टँकरची संख्या नगर जिल्ह्यात असली तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, चांदवड, त्र्यंबकेश्वर, येवला, सिन्नर अशा नऊ तालुक्यांतील ३८ गावांत पिण्याची पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या बागलाण तालुक्यात सर्वात जास्त असून, त्यानंतर येवला व त्र्यंबकेश्वर तालुक्यांचा नंबर लागतो. चांदवड या कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त तालुक्याला मात्र जलयुक्तने तारले आहे. तर नगरमध्ये पारनेर तालुक्यातील १८ गावे १०७ वाड्यांत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कश्यपीग्रस्तांसाठी नवा पर्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना नेमका किती मोबदला मिळायला हवा हे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून ठरवावे. त्यावर जी काही चर्चा होईल त्याचे जॉईंट अॅग्रीमेंट तयार करून ते कोर्टात सादर करावे, असा पर्याय जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीतून पुढे आला.

कश्यपी धरणासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या आहेत. परंतु, हक्काचा मोबदला मिळाला नाही म्हणून धरणग्रस्तांचा प्रशासन आणि सरकारविरोधात लढा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह पाटबंधारे, महापालिकेचे अधिकारी आणि धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते. धरणग्रस्तांना नोकरी देण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त प्रधान सचिव तिचे प्रमुख आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांना सरकारी नोकरी देण्याबाबतचा विषय त्यांच्या स्तरावर हाताळण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नांच्या वेलींवर चालविली कुऱ्हाड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

देशात आणि परदेशात द्राक्ष उत्पादनाला भाव नाही, त्यातही बागेचा व्यवहार केल्यानंतर पैसे बुडवून पलायन करणारे व्यापारी अशा अनेक कारणांमुळे मेटाकुटीस आलेल्या द्राक्षबागायतदारांनी आता द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालविली आहे. तालुक्यातील शिवडी येथील येथील एकनाथ शिंदे यांनी असपल्या दीड एकर द्राक्ष बागेला कुऱ्हाड चालवून आपला संताप व्यक्त केला आहे.

द्राक्ष उत्पादनाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, या नैराश्याने शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीच नको असा निश्चय केला आहे. या वर्षीच्या हंगामात कमालीच्या दर घसरणीमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट आले आहे. वर्षभरात पाणीटंचाई हवामानातील बदल आणि उत्पादनासाठी केलेला खर्च याचा ताळेबंदच जुळत नसल्याने शिवडी येथील एकनाथ शिंदे यांनी दीड एकर द्राक्ष बाग काढून टाकली आहे

गारपीट, अवकाळी पाऊस, खतांच्या वाढणाऱ्या भरमसाठ किमती, औषधांच्या किंमती यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. शिवडी येथील ७० वर्ष वय असलेल्या एकनाथ शिंदे यांनी वर्षभरात दीड एकर द्राक्षबागेच्या मेहनत मशागतीला औषधे, खते, किटकनाशके, मजुरी यासाठी दोन लाख रुपये खर्च केले. मात्र त्यांच्यावर सोळा, सतरा रुपये किलोने द्राक्ष विकण्याची वेळ आली. त्यामुळे शिंदे यांनी द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालविली.

दीड एकरात दोन लाख रुपये खर्च करून हातात ८० हजार रुपये आले. सातबारा कर्जबोजाने दबला आहे. म्हणून वडील आणि मी द्राक्षबाग तोडायचा निर्णय घेतला. एक जूनपासून आमचे कुटुंब संपावर जाणार आहे.

- रोशन शिंदे, शिवडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवंत पाण्याचे स्रोत प्रदूषणमुक्त

$
0
0

जय बजरंग युवक प्रतिष्ठानतर्फे मोहीम

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जय बजरंग युवक प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेल्या गोदावरी संवर्धन मोहिमेंतर्गत शनिवारी (दि. २९) गाडगे महाराज धर्मशाळेजवळील गोदावरी नदीला मिळत असलेल्या जिवंत पाण्याचे स्रोत प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले. याठिकाणी असलेले झऱ्यांमधील दगड, माती, प्लास्टिक कचरा, कापड यांच्यामुळे बंद झाले होते. ते मोकळे करून त्याची या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या ठिकाणाचे पाणी अगोदर ड्रेनेजमध्ये आणि त्यानंतर ते गोदापात्रात सोडले जाते. ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख महापालिका उपायुक्त रोहिदास दोरपुळकर यांच्या लक्षात आणून दिली. ही चूक लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित विभागाशी चर्चा करून हे प्रदूषण रोखण्यात येणार असल्याचे आवाहन दोरपुरकर यांनी दिले. या मोहिमेत जय बजरंग युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उदय सोनवणे, राजेश पंडित, रवी जन्नावार, दिलीप कोठावदे, चंदन खेतले, गणेश मोरे, अनुजा कुलकर्णी, प्रियंका शेंबेकर आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या शनिवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीत शहरातील पाच नव्या विकासकामांसाठी २६ कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यात हनुमान घाट ते रामवाडीदरम्यान नव्याने पूल प्रस्तावित करण्यात आला असून, त्यासाठी १६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सोबतच महाकवी कालिदास कलामंदिरसह पंडित पलुस्कर सभागृहाच्या नूतनीकरणासाठीही निधी मंजूर केला आहे. विद्युत शववाहिका, तसेच नेहरू उद्यानाच्या विकासासाठीही निधी दिला जाणार आहे. सदरील कामांसाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरातील स्मार्ट सिटीच्या विकासकामांना आता प्रारंभ होणार आहे.

‘एसपीव्ही’चे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची दुसरी बैठक झाली.या बैठकीला प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी., प्रभारी सीईओ विजय पगार, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह पोलिस आयुक्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शहरात पाच नव्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये हनुमान घाट ते रामवाडी पुलासाठी १६ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. नागरिकांच्या रहदारीसाठी या पुलाचा वापर केला जाणार आहे, तसेच महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी सहा कोटींचा निधी देण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण मार्गी लागणार आहे.

महाकवी कालिदास कलामंदिरासोबतच पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहाच्या नूतनीकरणासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या सभागृहाचाही कायापालट होणार आहे, तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नवीन विद्युत शववाहिनीचाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सोबतच शालिमार येथील नेहरू उद्यानाच्या विकासासाठीही निधी देण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी २६ कोटी ४० लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली गेली. या बैठकीत या पाचही कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.


टीसीएसच्या प्रकल्पांना चालना

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. टीसीएसच्या वतीने मातृत्व अॅप तयार करण्यात आले असून, अंबडच्या पायलट प्रोजेक्टनंतर त्याची अंमलबजावणी आता संपूर्ण शहरात केली जाणार आहे. सायकल शेअरिंगचाही विस्तार केला जाणार आहे. टीसीएसच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन ब्लड बँक योजनेचाही विस्तार संपूर्ण शहरात केला जाणार असून, रक्ताची गरज असलेल्यांना सद्यःस्थिती ऑनलाइन कळणार आहे. त्यामुळे टीसीएसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांना चालना दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भानसी, बोरस्ते यांची स्मार्ट सिटीवर निवड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत झालेल्या सत्ताबदलामुळे नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनवरील जुन्या पदाधिकाऱ्यांच्या जागेवर शनिवारच्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. म

हापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्यासह जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांचे नविन प्रतिनिधींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पदासाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अटी व शर्तींमध्ये शिथीलता दिली जाणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असलेले सीईओंसह, अभियंते, लेखा परिक्षक आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांची पदे आता स्पर्धात्मक पद्धतीने भरली जाणार आहेत. त्यासाठीची वयोमर्यादा ही ६२ वर्षांपर्यत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीची दुसरी बैठक झाली. त्यात विविध निर्णय घेण्यात आले. एसपीव्हीच्या सदस्यांमध्ये यापूर्वी जुने पदाधिकारी होते. परंतु पालिकेत सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे या बैठकीत महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून शहरी विकास मंत्रालयाच्या उपसचिव रेणू सतिजा यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट या पदासाठी आतापर्यंत दोनदा निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यासाठी दोनच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे पद महत्त्वपूर्ण असून, यासाठी काही ठराविक कंपन्यांसाठी विश‌ष्टि नियमावली तयार करण्यात आल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला. त्यामुळे कुंटे यांनी नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. प्रभारी सीईओपदी विजय पगार यांना कायम ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमर्जन्सी लोडशेडिंगचा झटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

उन्हामुळे उष्णता भडकली असल्याने शहरी व ग्रामीण भागात विजेच्या मागणीत अचानक वाढ होत असल्याने विजेचे उत्पादन व मागणी यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. परिणामी महावितरणवर इमर्जन्सी लोडशेडिंग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. विजेच्या उत्पादनात वाढ न झाल्यास येत्या मे व जून या दोन महिन्यांत इमर्जन्सी लोडशेडिंग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्याने सध्या उकाडा वाढला आहे. शहरातही विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेस इमर्जन्सी लोडशेडिंग केले जात आहे. परिणामी नागरिकांसह व्यावसायिकही हैराण झाले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातही पिकांना पाणी देण्याची वारंवारता वाढल्याने विजेच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही इमर्जन्सी लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. या इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे शेतकरीवर्गही वैतागला आहे. या समस्येमुळे कित्येक पिकांना वेळेवर पाणी देता येणे शक्य होत नसल्याने पिके जळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. इमर्जन्सी लोडशेडिंगशिवाय नियोजित लोडशेडिंगचाही शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.

---

मागणीत झालीय वाढ

नाशिक परिमंडळातील नाशिक शहर, मालेगाव आणि अहमदनगर या तिन्ही सर्कलमध्ये १३२ केव्हीची १७ सब स्टेशन्स आहेत. या सब स्टेशन्सला एकलहरे येथून पारेषण कंपनी वीजपुरवठा करते. या सब स्टेशन्सअंतर्गत ३३ केव्हीची १९८ उपकेंद्रे आहेत. येथून महावितरण वीजग्राहकांना वीजपुरवठा करते. मात्र, उत्पादनात वाढलेल्या मागणीप्रमाणे वाढ न झाल्याने सध्या महावितरणवर इमर्जन्सी लोडशेडिंगची वेळ आली आहे.

--

संच बंदचा फटका

एकलहरे येथे एकूण पाच वीजनिर्मिती संच आहेत. त्यापैकी १४० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक १ व २ काही वर्षांपबर्वीच बंद झालेले आहेत. उर्वरित २१० मेगावॅट क्षमतेच्या तीन संचांपैकी संच क्रमांक ३ बंद असून, संच क्रमांक ४ व ५ सुरू आहेत. मात्र, या दोन्ही संचांपैकी ज्या संचाची दुरुस्ती करावयाची असते तो संचही तात्पुरता बंद ठेवावा लागतो. त्यामुळे भविष्यातही वाढीव वीज उत्पादनाची शक्यता मावळली आहे.

--

उन्हाळ्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विजेचे उत्पादन व मागणी यात मोठी तफावत निर्माण होत आहे. परिणामी नियोजित लोडशेडिंगशिवाय इमर्जन्सी लोडशेडिंग करण्याची वेळ आली आहे.

-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक परिमंडळ

---

एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा बंद असलेला संच क्रमांक ३ शनिवारी रात्रीपासून पुन्हा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त विजेची मागणी पूर्ण करणे काही प्रमाणात शक्य होऊ शकेल.

-उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, महानिर्मिती, एकलहरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रपतिपदक नव्हे, सेवेला मिळालेला आशीर्वाद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेथे जिवलग व्यक्तीच्या मृतदेहाला स्पर्श करण्यास लोक धजावत नाहीत, तेथे ही असामी ६० फुटांपर्यंतच्या खोल पाण्यात उतरून मृतदेह शोधून बाहेर आणते. थोडेथोडके नव्हे, असे ७०० मृतदेह गोविंद तुपे या अवलियाने बाहेर काढले. बुडणाऱ्या १८ जणांना जीवदान दिले. तुपे यांना राष्ट्रपतींचे उत्तम जीवनरक्षक पदक जाहीर झाले असून, महाराष्ट्र दिनी ते प्रदान करण्यात येणार आहे. आजवरच्या सेवेला प्राप्त होणारा हा आशीर्वादच असल्याची भावना तुपे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केली.

सिन्नर तालुक्यातील बेलू हे त्यांचे गाव. शेतीवरच कुटुंबाची उपजीविका चालते. १९८४ मधील एका प्रसंगाने तुपे यांच्या जीवनात कमालीचे परिवर्तन घडविले. तेव्हा ते अवघ्या १६ वर्षांचे होते. चुलती आणि चुलत बहिणीसमवेत ते दारणा नदी पार करीत होते. बहिणीला ते सुखरूप नदीपार घेऊन गेले. परंतु, चुलती नदीमध्ये बुडू लागली. त्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्नही केला. परंतु, दुर्दैव आड आले. स्वत:ला सावरत त्यांनी चुलतीचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. तिला वाचवू शकलो नाही, याचे शल्य त्यांच्या मनात कायमस्वरुपी राहिले. तेव्हापासून त्यांनी सेवाव्रत म्हणून जीवरक्षकाचे काम स्वीकारले. गेली २९ वर्षे रुपयाच्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ते हे सेवाव्रत जोपासत आहेत. त्यांच्या या सेवाकार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांनी गौरविले. वामनदादा कर्डक संस्थेने राज्यस्तरीय शौर्य पुरस्कार दिला. अनेक पोलिस स्टेशन्सने त्यांना पोलिसमित्र म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना अतिशय मानाचे राष्ट्रपतींचे ‘उत्तम जीवनरक्षक पदक’ जाहीर केले आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी त्यांना मान्यवरांच्या हस्ते हे पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

इतर जिल्ह्यांतही सेवा

केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर जवळच्या अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातही त्यांनी कुणाच्याही मदतीशिवाय अनेक मृतदेह बाहेर काढले आहेत. आतापर्यंत ७०० हून अधिक मृतदेह बाहेर काढण्याचा विक्रमच त्यांनी केला असून, ‍पाण्यात बुडणाऱ्या १८ जणांचे प्राणही वाचविले आहेत. याखेरीज २०० हून अधिक रस्ता अपघातांत त्यांनी जखमींना सर्वतोपरी मदत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंबकळत्या वीजतारांचे घोंघावतेय संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणचे कलंडलेले, तिरपे झालेले वीज वाहिन्यांचे खांब, तारांना पडलेल्या झोळमुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. महावितरण कंपनीने येत्या पावसाळ्यापूर्वी हे पोल व तारा दुरुस्त करावेत, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्यात असा इशारा भागवत यांनी महावितरणला निवेदनाद्वारे दिला आहे.

तालुक्यात शेतशिवारासह इतरही अनेक ठिकाणाहून गेलेले पोल तिरपे झाले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी वीजतारांना मोठा झोळ पडलेला आहे. अनेक ठिकाणी तर वीजतारांची अवस्था बिकट झाली आहे. या सर्व दुरवस्थेबाबत गावोगावच्या ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता रुपचंद भागवत यांनी पुढाकार घेतला आहे. या समस्यांबाबत महावितरण कंपनीचे दार ठोठावले आहे. भागवत यांनी महावितरणचे शहर व ग्रामीण या दोन्ही उपविभागांच्या उपकार्यकारी अभियंत्यांचे निवेदनाद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले आहे. वीज तारांना अनेक ठिकाणी पडलेल्या झोळमुळे तारा एकमेकांत गुंतण्याचे वाढलेले प्रमाण, कलंडलेले व तिरपे झालेले पोल बघता भविष्यात वारा आणि पावसामुळे हे पोल जमीनदोस्त होऊन दुर्घटना होण्याच्या शक्यता भागवत यांनी व्यक्त केली आहे. विद्युत तारा तुटल्याने कंपनीचे नुकसान होतानाच शॉर्टसर्किट व इतर संभाव्य संकटामुळे शेतकरी, पशुधनाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता भागवत यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी विजेचे पोल, तारा यांची दुरुस्ती करावी, असे साकडे भागवत यांनी घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरला पाणीटंचाईचे सावट

$
0
0

आठ दिवस पुरेल एवढाच साठा; नगरपरिषदेला प्रतीक्षा धरणातील रोटेशनची

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगुरवासियांना गेल्या दोन दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही. कारण सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पंप हाऊसमधील बिघाड कारणीभूत होता. तरीही प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला होता. भविष्यात भगूर नगरपालिकेकडे केवळ आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भगुरकरांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

शनिवार (दि. २९) पासून भगुरकरांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. दारणा पात्रातून पाण्याची पातळी राहिलीच नसल्याने पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरणे जिकरीचे झाले असून, आठ दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. दारणा नदीपात्रात लष्कराने नवीन पाणी साठवण बंधारा निर्माण केल्यामुळे भगुरकरांना मिळणाऱ्या पाण्यामध्ये कपात झाली आहे. मागील वर्षापर्यंत बंधाऱ्यातून गळती होणाऱ्या पाण्यामधून भगुरकरांना लागणाऱ्या पाण्याची पूर्तता सहज होत असे. आता नवीन बंधाऱ्यामुळे पाणी गळतीदेखील होत नाही. तरीही परिसरातील काही नागरिक चक्क सार्वजनिक शौचालयाच्या नळावरून पिण्याचे पाणी भरत असल्याचे वास्तववादी चित्र दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तिनाथ समाधी मंदिरासाठी एकमत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

देशविदेशातील कोट्यवधी वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर भव्य व्हावे. संजीवन समाधी स्थळावर उभी राहणारी वास्तू जगाला मानवतेचा संदेश देणारी ठरणार असल्याने ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्धार वारकरी सहविचार सभेत एकमुखाने व्यक्त करण्यात आला.

सभेत मंदिर विकासाच्या दृष्टीने तयार केलेला प्रस्तावित आराखडा हा उपस्थित वारकऱ्यांसमोर अमृता पवार यांनी सादर केला. मंदिराला आंतरराष्ट्रीय झळाळीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात येणार असून, निधी जमविण्यासाठी वारकऱ्यांनी कामास लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर जीर्णोद्धार तसेच परिसर विकासाच्या संदर्भात जिल्ह्यातील कीर्तनकार, वारकऱ्यांची विचार सभा त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ समधी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

आगामी काळाच्या पाऊलखुणा ओळखून मंदिराचे काम करण्यात यावे, अशी सूचना माधव महाराज राठी यांनी केली. आपली मत मतांतरे सर्वच उपस्थित व्यक्त करत असतांना वारकरी महामंडळाचे राज्याचे प्रसारक राम खुर्दळ यांना शांत राहण्याचा सल्ला दिल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. लहवितकर यांनी सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांना निधी जमा करण्याचे आवाहन यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबीर आजपासून

$
0
0

धुळे : राज्य सरकारतर्फे नंदुरबार शहरातील मोदी मैदानावर आज, रविवारी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिरात दोन हजार तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करणार आहेत. शनिवारी शिबिरस्थळी सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकाऱ्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>