Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दारू दुकाने बंदीसाठी गांधीगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
मालेगाव स्टॅण्ड येथील दारू दुकाने बंद करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रविवारी जनआंदोलन केले. महिला, मुलांनी गांधीगिरी करीत दुकानमालकास दुकान बंद करण्याविषयीचे पोस्टर, पुष्पगुच्छ, शाल भेट दिली. परिसरातील मुला-मुलींच्या भविष्यासाठी व महिलांच्या संरक्षणासाठी ही दुकाने कायमस्वरुपी बंद करावीत, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

पंचवटीतील बरीचशी दारू दुकाने महामार्गालत असल्यामुळे ती बंद झाली. मात्र, जुना मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या मालेगाव स्टॅण्ड येथे दोन देशी दारू दुकान, एक वाइन शॉप आणि एक बिअर बार यांना अभय मिळाले. इतर सर्व दारू दुकाने बंद असल्यामुळे येथील दुकानांवर गर्दी वाढली. या गर्दीचा त्रास येथील नागरिकांना होऊ लागला आहे. त्यासंदर्भात येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देऊन ही दुकाने बंद करण्याची मागणी केली होती. मागणी करून पंधरा दिवसांचा कालावधी झाला तरी त्याबाबत विचार झालेला दिसला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.

येथील दारू दुकानांमुळे महिला व मुले असुरक्षित झाली आहेत. गुंडांचा आणि चोरांचा वावर वाढला आहे. स्थानिकांवर त्यांची दादागिरी वाढली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सायंकाळच्या वेळी महिलांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. या त्रासांना येथील रहिवासी वैतागले असल्याचे मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुकाने बंद करण्याची मागणी करण्यात आली. सुमारे तासभर चाललेले हे जनआंदोलन शांततेत करण्यात आले. दारू दुकाने हटलीच पाहिजेत अशा घोषणा देण्यात आल्या.
येथील अशोक ब्रदर्स आणि हिरामण पवार यांची दुकाने बंद होती. न्यू पंजाब रेस्टॉरंट अॅण्ड बिअर बार व एस. पी. लोणारी ही दोन दुकाने सुरू होती. त्या दुकानदारांचा सत्कार करून त्यांना दुकाने बंद करण्याची विनंती करण्यात आली. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक कमलेश बोडके, गुरुमित बग्गा, विमल पाटील, नंदिनी बोडके, दारूबंदी जनआंदोलन समितीच्या महानगरप्रमुख दीप्ती गायकवाड, लक्ष्मी शिरसाठ डॉ. दिनेश बच्छाव, खंडू बोडके आदी या आंदोलनाप्रसंगी उपस्थित होते.

जेलरोडला निदर्शने
नाशिकरोड ः जेलरोडच्या दसक येथील मामाज् बार अॅण्ड वाइन शॉप बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस समितीतर्फे दुकानासमोर नुकतीच निदर्शने करण्यात आली. यावेळी समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शालीग्राम बनसोडे, महिला जिल्हाध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, रावसाहेब गायकवाड, शाम क्षत्रिय, मुक्तार शेख, शाहीदखान पठाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखेडचे पाणी आयुक्तदरबारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पालखेड डाव्या कालव्यामार्फत सध्या सोडण्यात आलेल्या आवर्तनातून जिल्हा प्रशासनाने येवला तालुक्यातील अनेक गावे आरक्षणातून वगळल्याने संताप व्यक्त होत आहे. तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील अंदरसूलसह परिसरातील गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. पालखेडच्या आवर्तनातून अंदरसूलसह कोळगंगा नदीवरील सर्व बंधारे भरून दिले जावेत, या मागणीसाठी शनिवारी ग्रामस्थांनी अंदरसूल येथे चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल आयुक्त महेश झगडे यांची भेट घेतली. प्रासंगिक आरक्षण करतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येवला तालुक्यातील अनेक गावे वगळून तालुक्यावर अन्याय केल्याची भावना शिष्टमंडळाने झगडे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्त झगडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

यंदाच्या हंगामासाठी पालखेडच्या पिण्याच्या पाणी आवर्तनाचे आरक्षण करताना जिल्हाधिकारी कार्यालयाने येवला तालुक्यातील अनेक प्रासंगिक गावे वगळली आहेत. यामुळे तालुक्यावर अन्याय झाला असल्याचे शिष्टमंडळाने शनिवारी महसूल आयुक्त झगडे यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रासंगिक आरक्षण करतेवेळी १६ गावे वगळल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र झाला आहे. गेल्या ३६ वर्षांपासून तालुक्याच्या अंदरसूलसह पूर्व पट्ट्यातील कोळगंगा नदीवरील गावांचे बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून दिले जात होते. त्यातून उन्हाळ्यात या भागातील मुक्या जनावरांचाही पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला जात होता. २०१५ मधील अल्प पावसामुळे करंजवण, पालखेड, ओझरखेड धरणसमूहात पाणीसाठा कमी असल्याने गेल्या वर्षी पालखेडचे पाणी मिळाले नाही. गेल्या वर्षी २०१६ मध्ये धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे यंदा या धरणसमूहात समधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पालखेडचे पाणी देणे शक्य होते. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने पालखेडच्या पाणी आवर्तनातील प्रासंगिक गावांसाठी पिण्याचे पाणी आरक्षण करताना येवला तालुक्यातील अनेक गावे वगळली. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसह पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील गावांनी सादर केलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने विचारात घेतले नाहीत. सादर झालेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रासंगिक आरक्षणाच्या यादीतून गावे वगळली. परिणामी, सध्या या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. टंचाई परिस्थिती लक्षात घेता पालखेडच्या चालू आवर्तनातून अंदरसूलसह कोळगंगा नदीवरील बंधारे भरून द्यावेत. पालखेडचे सध्या सुरू असलेले आवर्तन पुढील केवळ चार दिवस चालणार असल्याने हे पाणी तत्काळ सोडण्याचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

येवला पंचायत समितीचे माजी सभापती तथा स्थानिक शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे, अरुण काळे, आकाश सोनवणे, किरण दाभाडे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या प्रभारी नगराध्यक्षपदी काण्णव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा अभिजित काण्णव यांच्याकडे आली आहे. नगराध्यक्ष विजया लढ्ढा रजेवर गेल्याने काण्णव यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी काण्णव म्हणाले, की राज्य सरकारचे अडीच कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्यानंतर लगेच प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आल्याने जबाबदारी वाढली आहे. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष दीपक लढ्ढा, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, योगेश तुंगार, धनंजय तुंगार, तृप्ती धारणे, यशोदा अडसरे, अनघा फडके, माधुरी जोशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

उन्हाळ कांद्याच्या दरात घसरणीचे सत्र सुरूच असून, शेतकऱ्यांसमोर ‘अर्थसंकट’ गडद होत चालल्याचे चित्र आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी अवघा पावणेचारशे रुपये दर मिळाला.

येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी बाजारभावाचा आलेख घसरत चालला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ५८० (सरासरी ४५०) असा बाजारभाव मिळाला होता. नुकत्याच संपलेल्या आठवड्यात दर पुन्हा खाली आल्याचे चित्र दिसून आले. येवला बाजार समितीच्या मुख्य आवारात शनिवारी सुमारे ७ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. मात्र, किमान २०० ते कमाल ५२० (सरासरी ३७५) रुपये क्विंटलमागे दर होते. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शनिवारी सुमारे ४ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असताना किमान २०० ते कमाल ४७५ (सरासरी ३५०) रुपये दर क्विंटलमागे होते. बहुतांश शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपये दर मिळाला होता. म्हणजेच अवघा एक ते दीड रुपया किलोचा भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये जोरदार पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहर व परिसरात रविवारी दुपारी वादळवारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

अचानक आलेल्या पावसाने रविवारच्या आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची त्रेधा उडाली. मनमाडनजीक बुधलवाडी, माधवनगर परिसरात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. तासभर पावसाच्या सरी कोसळल्याने कडाक्याच्या उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. नांदगाव व चांदवडमध्ये रविवारी ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतापूरच्या देवस्थानाच्या पैशांची चौकशी करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तालुक्यातील अंतापूर येथील दावल मलिक देवस्थानच्या पंचमंडळी देवस्थानला प्राप्त होणाऱ्या धनप्राप्तीचा दुरुपयोग होत असून, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शेख जैनोद्दीन शेख करीम मुजावर यांनी तहसीलदार व जायखेडा पोलिस ठाण्यात केली आहे.

तक्रारीत नमूद केले आहे, की या देवस्थानची पंचमंडळी गेल्या दहा वर्षांपासून कामकाज करीत आहे. दावल मलिकबाबा देवस्थानात दर गुरुवारी भाविक कंदोरीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे बोकडाच्या चामडीपासून अंदाजे ५० हजार रुपये पंच कमिटीला मिळतात. दावल मलिक मूळ देवस्थान, बिबीसाहब देवस्थान, कवड्यापीर देवस्थान, पाचपीर देवस्थान यांना भाविकांनी चढवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू असे मिळून लाखो रुपये पंच कमिटाला प्राप्त होतात. या रकमेचा विनियोग पंच कमिटी कशा प्रकारे करते याचा कोणत्याही प्रकारचा हिशेब गेल्या दहा वर्षांपासून पंच मंडळी देत नाही. या उत्पन्नातून देवस्थानाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च पंच मंडळी करीत नाही. दावल मलिक देवस्थानचा गाभारा व परिसरात सुधारणा नाहीत. परिसरात भक्तनिवास नाही. पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. उत्पन्नाच्या बाबतीत पंच मंडळींना कुणी विचारणा केल्यास अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देतात. पंच मंडळी देवस्थानच्या उत्पन्नाचा अपहार करीत असून, त्यांची चौकशी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३ वाहतूक नियमांचा वापर ‘शून्य’

$
0
0

नाशिक: वाहतूक आणि वाहनांसंदर्भांत तब्बल ८० नियम असून, त्यातील ३३ नियमांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यास वाहतूक शाखेस वेळच मिळत नाही. मागील साडेतीन महिन्यांत या नियमानुसार एकही कारवाई झालेली नाही. एखाद-दुसरी कारवाई झालेल्या नियमांचा आकडा १७ इतका आहे. उर्वरीत ३० नियमांचा आधार घेत वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होते. यात ‘नो पार्किंग’मध्ये वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर दंडाची कुऱ्हाड कोसळलेली दिसते.

सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक नियमन व्हावे, यासाठी वाहतूक पोलिस कार्यरत असतात. कागदपत्रे नसणे, लायसन्स नसताना वाहन चालवणे, सिग्नल जम्प‌िंग, नो पार्किंग, हेल्मेट परिधान न करणे, सीट बेल्टचा वापर टाळणे, फ्रंट सीट बसवणे, जादा मालाची वाहतूक करणे अशा तब्बल ८० नियमांनुसार वाहतूक पोलिस बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करू शकतात. अगदी वाहनांचा रंग बदलला तरी कारवाई होऊ शकते. मात्र, शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळून सुरळीत वाहतूक ठेवण्याच्या नादात ८० पैकी तब्बल ३३ नियमांकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होते. यात, सायलेन्सर फाटलेला असणे, मालवाहू वाहनातून प्रवासी नेणे, वेग मर्यादेपेक्षा जोरात वाहन चालवणे, बस थांब्यापासून ५० मीटर आत वाहन उभे करणे, साइड मिरर नसणे, वायफर नसणे, प्रेशर हॉर्नचा वापर करणे अशा नियमांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अशाच प्रकारच्या १७ वाहतूक नियमांनुसार मागील साडेतीन महिन्यांत १० पेक्षा कमी कारवाई झालेली आहे. याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, शहरातील एकंदरीत परिस्थितीचा विचार करता, वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही आणि वाहतूक सुरक्ष‌ित राहील हे डोळ्यासमोर ठेऊनच वाहतूक विभाग काम करतो. वाहतूक नियमांचा पसारा मोठा आहे. सर्व नियमांबाबत वाहनचालकाने अवगत होऊन त्यांचे पालन करणे महत्वाचे आहे. पार्किंगसारख्या प्रश्नामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अशावेळी आम्ही याकडेच लक्ष पुरवतो.


या नियमांनुसार सर्वाध‌िक कारवाई

नियम…केसेस…दंडाची रक्कम

नो पार्कींग…६३९२…१२,७८,४००

कागदपत्रे नसणे…३९७६…७,९५,२००

हेल्मेट न वापरणे…३३१५…१६,५७,५००

वाहतूक चिन्हांकडे दुर्लक्ष…२२७७…४,५५,४००

फ्रंटसीट बसवणे…१७४७…३,४९,४००

लायसन्स जवळ नसणे…१३४४…२,६८,८००

सीट बेल्ट न लावणे…१०१३…२,०२,६००


सर्व केसेस-२५,७१९

वसूल दंड - ६३,५७,८००


वाहतूक नियमनासाठी वाहनचालकांची मानसिकता महत्वाची आहे. वाहनचालकांनी जबाबदारीने नियमांचे पालन करायला हवे. बेशिस्तपणा असेल तर प्राणांत‌िक अपघात घडतात. वाहतूक नियमन आणि सुरक्षिततेला प्राधन्य दिल्याने ठराविक नियमांचा वापर सर्वाध‌िक झालेला दिसतो. मात्र, परिस्थितीनुसार ते योग्य ठरते.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाची फेरमतमोजणी पुन्हा वादात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाची तीस दिवसांनंतर ठेवण्यात आलेली फेरमतमोजणी पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली असून याप्रकरणी चर्चा करण्यासाठी रविवारी धनंजय बेळे, बी.जी. वाघ यांना बोलावले असता बेळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात दिवाणी न्यायालय आणि धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्याचे पत्र त्यांना दिले. धर्मादाय आयुक्तांनाही या तक्रारींचा विचार करून ९ मे रोजी सुनावणी ठेवली असल्याने सावानाच्या राजकारणाने पुन्हा एक वेगळे वळण घेतले आहे.

सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक २ एप्रिल रोजी झाली तर मतमोजणी ३ एप्रिलला झाली होती. या निवडणुकीत जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांना ८९५ तर ग्रंथमित्र पॅनलचे बी. जी. वाघ यांना ८९४ मते मिळाली. वाघ यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र, ४ एप्रिलला रामनवमी, तर ५ एप्रिलला सावानाला साप्ताहिक सुटी असल्याचे कारण देत भणगे यांनी तो कार्यक्रम पुढे ढकलला. यावर बेळे यांनी आक्षेप घेत घटनेनुसार २४ तासांत फेरमतमोजणी करायला हवी असे सांगितले.

त्यावेळी भणगे यांनी दोघांना कायदेशीर पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. या ३० दिवसांमध्ये काहीही न होऊ शकल्याने निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी ५ मे रोजी बेळे व वाघ यांना पत्र पाठवले. बेळेंनी पत्र प्राप्त होताच भणगे आता निवडणूक निर्णय अधिकारीच नाहीत असा पवित्रा घेत दिवाणी न्यायालयात रिट याचिका आणि धर्मादाय आयुक्तांकडे या सर्व प्र्रकरणाविषयी तक्रार केली. त्यांनी माधवराव भणगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निवडणुकीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकार संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात कोणताही सुनावणी, कोणताही निर्णय, फेरमतमोजणी, पत्रव्यवहार करण्याचा अधिकार राहिलेला नसल्याने आता मतपत्रिका बाहेर काढल्या तर फौजदारी दाखल करू असेही पत्रात म्हटले आहे. ७ मे रोजी अथवा त्यानंतर कधीही ट्रस्टकरीता झालेल्या निवडणुकीतील मतपत्रिकांचे कोणत्याही कारणाने फेरमतमोजणी केल्यास त्याकामी होणाऱ्या परिणामास व कायदेशीर कारवाईस भणगे जबाबदार राहतील असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखेड गटाच्या बैठकीत विकासकामांवर चर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा परिषदेच्या पालखेड गटाची आढावा बैठक नुकतीच झाली. बैठकीत पालखेड गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या मंदाकिनी बनकर यांनी मंजूर विकासकामांची माहिती दिली. या वेळी अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, तसेच प्रभाग सचिव महेश नागपूरकर, माजी आमदार दिलीप बनकर या वेळी उपस्थित होते.

योजनानिहाय करावयाच्या विविध कामांचा जिल्ह्याचा आराखडा मंजूर झाला असून, त्याअंतर्गत जिल्हा परिषद व सरकारच्या इतर विभागांतर्गत विविध विकासकामांची माहिती जिल्हा परिषदेच्या पालखेड गटातील ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंचांना माहीत होणे गरजेचे आहे. कोणत्या योजनेतून कोणकोणती विकासकामे करता येतील, आपल्या गावातून प्राधान्याने कोणती कामे चालू वर्षात घेणे गरजेचे आहे, त्या कामांचे प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन बैठकीपूर्वी जिल्हा परिषदेस सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. माजी आमदार बनकर यांनी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे, शरद काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिंसेच्या मार्गाने शेतकरी संप करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त शेतकऱ्यांपर्यंत जाऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संयोजकांकडून प्रचार- प्रसार सुरू आहे. संयोजकांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या वेळी अण्णा हजारे यांनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन संयोजकांना केले.

किसान क्रांतीच्या राज्यभरात जिल्हा, तालुका कोअर कमिटी तयार करून प्रत्येक‌ जिल्ह्यात शेतकरी संपाबाबत जागृती करावी. राज्यभरातील प्रतिनिधींनी‌ त्याचा सविस्तर अहवाल तयार करून संपाची चळवळ अहिंसेच्या मार्गाने पुढे न्यावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी किसान क्रांतीच्या समन्वयक समितीला राळेगणसिद्धी येथील भेटीप्रसंगी केले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारे यांना शेतकरी संपाचे सर्व नियोजन व रूपरेषा याची माहिती दिली.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विशेष ठरावही करण्यात आला. सरकारने आंदोलनाची दखल‌ घ्यावी म्हणून किसान क्रांतीचे समन्वयक किशोर जाधव, संदीप थेटे, संदीप जगताप, योगेश रायते, डॉ. योगेश गोसावी, विजय काकडे, शंकर दरेकर, सचिन थेटे, बापू अडसारे, गंगाधर निखाडे, भास्कर भगरे आदींनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंची भेट घेऊन माहिती दिली. शेतकरी संपाचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणार असेल तर मी यात नक्की सहभागी होईन, असे आश्वासन अण्णा हजारे यांनी दिले. या वेळी राळेगणचे सुरेश पठारे, पारनेर येथील दिनेश बापू औटी, भाऊ पठारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या महिला संघाला विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन आणि के. एन. डी. बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर १८ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत गटातील अंतिम सामना यजमान नाशिक आणि सांगली यांच्यात झाला.

यामध्ये दोन्ही संघांनी निकराने खेळ केल्यामुळे हा सामना तिसऱ्या सेटच्या निर्णायक गेला. पहिला एकेरी सेट सांगलीच्या आसिफ मुळानी यांनी जिंकून आघाडी घेतली. मात्र त्यानंतर झालेल्या दुहेरीच्या सामन्यात नाशिकच्या हेमंत पाटील आणि मंगेश मंडले यांनी हा दुहेरी सामना जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर झालेल्या परतीच्या एकेरी सामन्यात नाशिकचा सचिन वाघ आणि सांगलीच्या रोह‌ति ननावरे यांनी चांगलीच चुरस निर्माण केली. पहिला सेट सचिन वाघने जिंकून आघाडी घेतली. मात्र, सांगलीच्या रोहितने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. या बरोबरीनंतर तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये दोन्हीही खेळाडूंनी कधी ड्रॉप्स तर कधी सुंदर जोरदार स्मॅश लगावून चांगला खेळ करत ११-११ अशी बरोबरी साधली. मात्र रोहितने १३-१३ अशी गुणसंख्या असतांना सुंदर प्लेसिंग करून गन वसूल कला आणि त्यानंतर आपल्या सर्व्हिसवर जोमाने खेळ करून महत्वाचा १५वा गन वसूल करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात महत्वाची कामगिरी केली. मुलींमध्ये मात्र नाशिकच्या प्रांजल उगले, सोनार, संजना जगताप, दर्शन काळे, मृणाल साळवे आणि गरगटे या सर्वांनीच पहिल्यापासून शेवटपर्यंत सहज सुंदर खेळ करून एकही सामना न गमावता महिला गटात वर्चस्व राखत विजेतेपदाला घातली. महिलांमध्ये द्वितीय क्रमांक रायगडने तर तिसरा क्रमांक नवी मुंबई संघाने मिळविला. याबरोबरच झालेल्या मिश्र दुहेरी प्रकारात नवी मुंबईच्या गणेश कडाळे आणि लता भाबड या जोडीने सर्व सामने जिंकून विजेतेपद पटकावले. यामध्ये रायगडला दुसरे तर नाशिकला तिसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत समावेश असलेल्या वयस्क गटाच्या स्पर्धेत केवळ दुहेरीचे सामने खेळविले गेले. यामध्ये अंतिम सामन्यात नाशिकच्या संघाने मुंबई संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले, तर मुंबईला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे पदवीधर संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल
पुरुष गट :- प्रथम- सांगली, द्वितीय नाशिक, तृतीय - मुंबई
महिला गट :- प्रथम- नाशिक,‌ द्वितीय रायगड, तृतीय नवी मुंबई
मिश्र दुहेरी गट :- प्रथम- नवी मुंबई, द्वितीय रायगड, तृतीय नाशिक
वयस्क गटः - प्रथम - नाशिक, द्वितीय - मुंबई, तृतीय पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हटके स्टॉल्सना दाद...

$
0
0

कॉलेजरोडवरील हॅप्पी स्ट्रीटच्या उपक्रमातील विविध हटके स्टॉल्सना नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अगदी अनपेक्षितपणे वेगळीच अनुभूती देणाऱ्या अशा स्टॉल्सकडे नागरिकांची पावले आपसूक वळताना दिसून आली. त्यापैकी काही लक्षवेधी स्टॉल्स असे...

बचपनगली

बचपनगलीमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. यावेळी सायकल चालविणे, दोरीवरच्या उड्या मारणे, भोवरा फिरविणे आदी आठवणींतले खेळ खेळण्याचा आनंद लुटत नागरिकांनी स्मृतींना उजाळा दिला. पकडा-पकडीसारखे खेळ अबालवृद्ध खेळत असल्याचे बघताना अनेक जण हरखून गेले होते.

--

टॅटू अन् नेल आर्ट

टॅटू आणि नेल आर्ट या प्रकाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अमित कांबळे आणि आरती ओक यांनी टॅटू आणि मेंदी, तर नूपुर येवलेकर यांनी नेल आर्ट यामध्ये नवनवीन डिझाइन्सचे सादरीकरण केले.

--

रांगोळी

उत्कृष्ट कलात्मकतेचे दर्शन घडविणाऱ्या रांगोळीचे प्रदर्शन वैभव निकम यांनी घडविले. या प्रदर्शनात सौंदर्यदृष्टी असणाऱ्या रांगोळ्यांसोबतच सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या रांगोळ्यांचाही समावेश होता. स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर सूचित पाटील आणि शीतल जैन यांनी, तर ‘सेव्ह बर्डस’ या विषयावर नितीन पाळेकर यांनी रांगोळी रेखाटली.

--

मॅजिक

मॅजिशियन विजय राय यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मॅजिकल ट्रिक्स सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. विशेषतः बच्चेकंपनीचा जास्त प्रतिसाद लाभला. यात कप अॅण्ड बॉल, नोट्स प्रॉडक्शन अॅण्ड व्हॅनिशिंग, कार्डस या प्रकारांतील मॅजिकल ट्रिक्स सादर करण्यात आल्या.

--

इको फ्रेंडली बॅग्स

हॅप्पी स्ट्रीटच्या उत्साही वातावरणात सामाजिक भानही जपले गेले. स्त्रीशक्ती महिला बचतगटाच्या वतीने यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरणरक्षणाचा संदेश देण्यात आला.

--

पोलिस बँड लक्षवेधी

शहर पोलिस बँड पथकातर्फे राष्ट्रभक्तीपर गीते सादर करीत वातावरण स्फूर्तिदायी बनविले. या शिस्तबद्ध बँड पथकाने दिलेल्या सलामीने तरुणाईला आकर्षित केले. ‘इस्ट अॅण्ड वेस्ट म्युझिक इन्स्टिट्यूट आणि एमएच १५ या म्युझिक ग्रुप्सने वेस्टर्न-बॉलिवूड संगीताचे सादरीकरण करून प्रेक्षकांना थिरकायला लावले.

--

आल्हाददायी वेणूनाद

‘वेणूनाद’ आणि ‘वेणूवंदना’ या दोन ग्रुप्सतर्फे बासरीच्या आल्हाददायक सुरांनी प्रेक्षकांना आकर्षित केले. रवींद्र जोशी आणि मोहन उपासनी या संगीतप्रेमींतर्फे या दोन्हीही ग्रुपने सादरीकरण केले.

---

नाशिककर गेले हरखून...

--

ही संकल्पना अत्यंत सुंदर आहे. परिवारासह या उपक्रमात आम्ही सहभागी झालो. रोजच्या जगण्यात परिवारासोबत असा एन्जॉय रोज करता येत नाही. ही संधी या उपक्रमाने दिली.

-श्रीधर बागुल

--

हॅप्पी स्ट्रीट हा उपक्रम अतिशय सुंदर असून, प्रत्येक वेळी नवनवीन खेळ अनुभवता येतात. तरुणांचा उत्साह बघून ज्येष्ठांतही उत्साह संचारतो. मेंदी, झुंबा डान्सने अधिक मजा आली.

-सुमन शिरसाठ

--

रोजच्या ट्रॅफिकसाठीच्या प्रमुख रस्त्यावर चक्क मनसोक्त नाचण्याची संधी हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाने उपलब्ध करून दिली. कॉलेज ग्रुपसह सहभागाचा आनंद वेगळाच होता.

-अमृता पिंपळवाडकर

--

कॅलिग्राफीच्या टिप्स, प्रदर्शन, झुम्बा डान्स यांसारख्या उपक्रमांनी आम्हा सर्वांची रविवारची सकाळ उत्साही बनवली. असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत.

-मनोज बिरारी

--

सगळेच खेळ खरंच खूप छान असल्यामुळे अगदी लहान झाल्यासारखे वाटले. ‘मटा’मुळे लहानपणाची आठवण आली. या उपक्रमामुळे आम्ही जुने मित्र भेटलो आणि धमाल केली.

-वेदांत भावसार

--

संकलन : कॉलेज क्लब रिपोर्टर टीम हर्षल भट, रुचिका ढिकले, पूनम ‌अहिरे, प्रतीक गंगेले, सौरभ झेंडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंधाणे फाट्यावरील अपघातात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील राज्य महामार्गावरील कंधाणे फाट्यावर मोटारसायकल व टेम्पो वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. या आठवड्यात राज्य महामार्गावरील हा तिसरा अपघात असून, आतापर्यंत तीन जणांना अपघातात प्राण गमवावा लागला आहे. राजेंद्र बाबूराव चंद्रात्रे (वय ५५, रा. सटाणा) मोटारसायकलने डांगसौदाणे येथून शेतीकामे आटोपून घरी परतत होते. या वेळी कंधाणे फाट्यावर वळणावर मोटारसायकल समोरून येणाऱ्या टेम्पोवर (एमएच ०६/जी ८५४५) जावून आदळली. यात मोटारसायकलस्वार चंद्रात्रे जागीच ठार झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच चंद्रात्रे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘‌नीट’ नियोजन नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी मेडिकल कॉलेजेसमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ (नॅशनल इलिजीबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट) या रविवारी पार पडलेल्या परीक्षेत सीबीएसईच्या गैरनियोजनामुळे मोठा गोंधळ उडाला. एका परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता हॉल तिक‌टिावर छापण्यात आल्याने शंभरापेक्षाही
जास्त विद्यार्थ्यांना अर्धा तास परीक्षेला उश‌रिा बसावे लागले. याशिवाय, तपासणीदरम्यानही अनेक कसोट्यांना सामोरे जावे लागल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी काही केंद्रांवर पोलिसांना पाचारण करावे लागले.

रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर ‘नीट’ परीक्षेसाठी आसन व्यवस्था केली होती. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून ५० हजार तर शहरातून १० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पेठरोड परिसरातील एकलव्य निवासी विद्यालयाचा पत्ता हॉल तिक‌टिावर मुंढेगाव (ता. इगतपुरी) असा छापण्यात आल्याने सुमारे शंभरावर विद्यार्थी मुंढेगावला जाऊन पोहचले. मात्र, तेथे अशी कोणतीही परीक्षा नसल्याचे समजताच विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. अधिक माहिती घेत विद्यार्थ्यांनी मिळेल त्या वाहनाने नाशिकमधील पेठरोडचे एकलव्य निवासी विद्यालयाचा शोध घेऊन ते गाठले. संबंधितांना विनवण्या केल्यानंतर कसेबसे त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले. मात्र, तोपर्यंत पेपर सुरू होऊन अर्धा तास झालेला होता. तीन तासांच्या कालावधीपैकी या विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाया गेला तसेच मानसिक त्रासही झाला. वाया गेलेला वेळ त्यांना वाढवून देण्यात आला नाही. याबद्दलही विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

केम्ब्रिजमध्ये कापल्या शर्टच्या बाह्या

इंदिरानगरमधील केम्ब्रिज स्कूलच्या परीक्षा केंद्रावर ड्रेसकोड न पाळणारे बहुसंख्य विद्यार्थी होते. परीक्षेसाठी हाफ शर्ट सक्तीचा असल्याच्या नियमापासून अनभिज्ञ असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकण्याची वेळ आली. तेव्हा अत्तार तडवी हे विद्यार्थ्यांच्या मदतीला कात्री घेऊन आले. फुल बाहीचे शर्ट जागेवर फाडून हाफ बाहीचे करून देण्यात आले. या केंद्रावर यंत्रणेशी सतत खटके उडत असल्याचे बघून पोलिसांना पाचारण करावे लागले. पंचवटीत के. के. वाघ परीक्षा केंद्रावरही विद्यार्थिनींच्या कानातील, नाकातील दागिने, डोक्याच्या क्ल‌पिाही काढण्याची सक्ती करण्यात आल्याने पालक संतप्त झाले होते. यावेळी पालकांनी संबंधितांशी वाद घातला. नवीन नाशिकमध्ये सिम्बायोसिस कॉलेजला ऐनवेळी ओळखपत्रासाठी फोटो काढण्यास बाहेर पाठविलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला प्रवेश देण्यात आला नाही.

विद्यार्थ्यांची परवड

सीबीएसईने परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कडक नियमावली अवलंबिल्याचे स्थानिक परीक्षा समन्वयकांकडून सांगण्यात आले. आधुनिक पध्दतीने कॉपीचा अवलंब होऊन या परीक्षेचा दर्जा घसरू नये, यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याच्या निर्णयाशी पालक अन् विद्यार्थी सहमत असले तरीही सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची मात्र अनभिज्ञतेमुळे परवड झाली. या नियमावलीबद्दल जागरूकता करण्यास सीबीएसई कमी पडल्याची भावनाही अनेक विद्यार्थी व पालकांनी ‘मटा’ शी बोलतना व्यक्त केली.

या होत्या तुघलकी अटी

केवळ हाफ बाहीचेच शर्ट हवेत
मुलींनी सलवार, ट्राऊजर्स, जीन्सच घालाव्यात, साडी नको
बूट वापरण्यास मनाई, चप्पल, सँडलला परवानगी
मुलींना उंच टाचेचे सँडल्स वापरण्यास मनाई
रिंगा, नथ, पेंडंट, नेकलेस, हेअरपीनही नको
कपड्यांना मोठ्या आकाराची बटने नसावीत
पाणी, चहा वा थंड पेयाच्या बॉटल्स वापरण्यास मनाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला डॉक्टरसह परिचारिकेला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

वैद्यकीय उपचारावरून राज्‍यात डॉक्टरला मारहाण करण्याचे प्रकार सुरूच आहेत. मनमाड येथेही रविवारी (७ मे) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोंगडे यांच्यासह परिचारिकेला एका महिलेसह दोघांनी उपचारावरून शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून त्या महिलेसह दोन तरुणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेला ताब्यात घेतले आहे. दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

मनमाड येथील मुमताज शेख ही महिला जुलाब होत असल्याने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. रविवारी मुमताज शेख हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ती घरी गेली व तिच्यासह बबलू सय्यद आणि आणखी एका तरुणाने येऊन डॉ. घोंगडे व ड्युटीवरील परिचारिकेला शिवीगाळ करून मारहाण केली, अशी फिर्याद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात दिली. यावरून शहर पोलिसांनी मुमताज शेख, बबलू सय्यद व अनोळखी तरुणाविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या महिलेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वाद झाले होते.

आज बाह्य रुग्‍ण विभाग बंद

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी मॅग्मो संघटनेने नाशिक येथे चर्चा केली. त्यानुसार डॉक्टर मारहाण प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मॅग्मोच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

माझ्यावर डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नाहीत. गेल्यावेळीही मला असाच अनुभव आला होता. माझ्यावर उपचार करताना डॉक्टर कुचराई करतात.

- मुमताज शेख, रुग्‍ण

आम्ही त्या महिलेवर व्यवस्थित उपचार केले. कुठलीही कुचराई केली नाही. गेल्यावेळीही या महिलेने उपचारांदरम्यान गोंधळ घालत दमदाटी केली होती.

- डॉ. संदीप घोंगडे, वैद्यकीय अधिकारी, मनमाड

या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. ही घटना उजेडात यावी व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आज सिव्हिल, उपजिल्हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालयांचे बाह्य रुग्‍ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत. इमर्जन्सी सेवा सुरू राहतील.

- डॉ. अरविंद माऊलकर, अध्यक्ष, मॅग्मो नाशिक जिल्हा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदूरमध्यमेश्वरमध्ये दारणाचे पाणी दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नांदूरमध्यमेश्वर धरणात दारणा नदीतून नगर जिल्ह्यासाठी आवर्तनाचे पाणी रविवारी दुपारी दाखल झाले. दारणाच्या या आवर्तनामुळे नगर जिल्ह्याला पिण्यासाठी पाणी मिळणार आहेच, त्यासोबतच निफाड व सिन्नर तालुक्यातील काही गावांना या आवर्तनाचा लाभ होणार आहे.

लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजना, सिन्नर तालुक्यातील बारा गाव पिंप्रीसह १३ गाव पाणीपुरवठा, सिन्नर औद्योगिक वसाहत, अशा पाणी योजनांतील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा किमान पुढील एक महिन्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्या सोबतच अजूनही काही पक्षी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात आहेत. गेल्या पंधरा ते वीस दिवसापांसून धरण कोरडेठाक झाल्याने या पक्ष्यांच्या अधिवासावरही परिणाम झाला होता. त्या पक्ष्यांचाही पाणीप्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे. दारणा धरणातील या पाण्याच्या आवर्तनावर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूरसह अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. धरण सोमवारपर्यंत पूर्ण भरेल. त्यानंतर कालव्यातून नगर जिल्ह्यातील शहरांसाठी पाणी सोडण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या कार्याने समाजाला दिशा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भावी पिढीला ज्ञान देत आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असतो व त्यांच्यामुळेच समाजाला दिशा मिळत जाते, अशा शिक्षकांचा गौरव करणे हे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले.

भगूर येथील शिवाजी चौकात आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्का​राच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, आमदार अनिल कदम, आमदार राजाभाऊ वाजे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगराध्यक्षा अनिता करंजकर, उपनगराध्यक्षा मनीषा कस्तुरे, विलास शिंदे, गुंडाप्पा देवकर, प्रकाश म्हस्के, अंबादास कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी करंजकर म्हणाल्या की, पुस्तकाच्या माध्यमातून घडवले जाणारे विद्यार्थी भावी आयुष्यात जबाबदार नागरिकांची भूमिका पार पडत असतात. अशा जबाबदार समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे क्रमप्राप्त आहे. प्रास्ताविकातून संग्राम करंजकर यांनी पुरस्कार देण्यामागील हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमात आमदार वाजे, महानगरप्रमुख बोरस्ते यांची भाषणे झाली. यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांच्या

हस्ते कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांना जीवनगौरव, तर आदर्श संस्था पुरस्कार साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड यांसह प्रमोद पाटील, अनिल निकम, कवी विलास पगार, भरत शेलार, नरेंद्र माळवे, ताराचंद मेतकर, सुनील देवरे, यू. के. आहेर, प्रा. नानासाहेब दाते, दिलीप अहिरे, लता पवार, संगीता सोनवणे, कामिनी पवार, यशवंत ढगे, टिकमदास बैरागी, प्रा. डॉ. हिरालाल बावा, स्वाती गायकवाड, अनुपमा पाटील, प्रभाकर सूर्यवंशी, तर विशेष पुरस्कार अनिल ढोकणे व अनुपमा पाटील, शिक्षकेतर कर्मचारी साहेबराव पवार, रवींद्र जाधव आदींना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी, तर आभार रघुनाथ गायकवाड यांनी मानले केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुल टू एन्जॉय @ कॉलेजरोड!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

झुम्बा डान्सची रंगत अनुभवत मुक्तछंदात बागडणारी तरुणाई अन् पालकांसोबत धम्माल करणारी बच्चेकंपनी, गुलाबी आँखे जो तेरी देखी, गर्जा महाराष्ट्र माझा... या व अन्य वेस्टर्न आणि क्लासिकल गीतांचे सुखावणारे संगीत यामुळे नाशिककरांची रविवारची सकाळ बहारदार झाली. निमित्त होते ‘मटा’ आयोजित हॅप्पी स्ट्रीट (सीझन-३) उपक्रमाच्या प्रारंभाचे. कॉलेजरोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमास प्रारंभ झाला.

शहराच्या विविध भागातून नागरिकांचे जथे सकाळी सहा वाजेपासून कॉलेजरोडच्या दिशेने येताना दिसत होते. काही सायकलपटूंच्या वेशात अवतरल होते, तर काही आपापली वाद्ये घेऊन कॉलेजरोडवर दाखल होत होते. सकाळी सात वाजता उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ झाला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. मॉडेल कॉलनी चौक ते बिग बझार चौक हा रस्ता उत्साही नाशिककरांनी व्यापला होता. नवीन डान्स अॅकॅडमीतर्फे सादर झालेल्या झुम्बा डान्सने हॅप्पी स्ट्रीचची रंगत वाढविली. वेस्टर्न गीतांच्या तालावर आयुक्तांनीही झुम्बाचे काही प्रकार आत्मसात केले. येथेच उपस्थितांकडून गाणी सादर केली जात होती.

--

आर्ट अॅण्ड स्पोर्ट फेस्ट

या उपक्रमात राजू दाणी आणि ग्रुप यांनी नेल आर्ट, मेंदी, फेस पेंटिंग, कॅन्व्हास पेंटिंग, शॉपिंग बॅगमेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले. उपस्थित बच्चेकंपनीला विविध प्रकारचे खेळ खेळण्याची संधी ‘मटा’ने उपलब्ध करून दिली होती. त्यामध्ये बॅडमिंटन, फुटबॉल, स्केटिंग अादींचा समावेश होता. डॉन बॉस्को स्कूलजवळील फोटोसाठी ठेवण्यात आलेल्या सायकलसोबत सेल्फीसाठी उत्साह दिसून आला. नीलेश यांनी बच्चेकंपनीला टॅटू काढून दिले. निधी अग्रवाल व त्यांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्ट्रीट पेंटिंग साकारली. नवीन तोलानी यांनी ग्रुप डान्स सादर करून वेस्टर्न व बॉलिवूड डान्समधील नवीन प्रकार शिकवले.

--

कॅलिग्राफीच्या टिप्स

प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी यांनी कॅलिग्राफीतले बारकावे उपस्थिताना समजावून सांगितले. ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करायचा, याची माहितीही देण्यात आली. बासरीवादनाने वातावरणात चैतन्य अवतरले होते. हर्षल जाधव यांनी ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवला.

--

पुढील हॅप्पी स्ट्रीट नाशिकरोडला

नाशिकरोडच्या नागरिकांना हॅप्पी स्ट्रीटचा आनंद घेता यावा यासाठी हॅप्पी स्ट्रीट सीझन-३ उपक्रमातील दुसरे पर्व नाशिकरोड येथे येत्या रविवारी (दि. १४) सकाळी ६ वाजता सादर होणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळा या मार्गावर हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या उपक्रमाप्रमाणेच नाशिकरोड येथील उपक्रमाचीही नागरिकांत उत्सुकता दिसून येत आहे.

--

पोलिस आयुक्त झाले सेलिब्रिटी

या उपक्रमात अधिकारीवर्गासह सहभागी झालेल्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी रात्री उशिरापर्यंत ड्युटी करून नागरिकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सकाळपासून आपण येथे उपस्थित असल्याचे सांगताच नाशिककरांनी जल्लोष केला. नंतर त्यांनी उपक्रमातील विविध स्टॉल्सना भेटी देत या अनोख्या उपक्रमाचा आनंद लुटला. नरेंद्र पुली आणि शिष्यगणांनी सादर केलेल्या गिटारवादनात गुलाबी आँखे या गीतावर आयुक्त डॉ. सिंगल यांनीही सुरात सूर मिसळत जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश केला. नागरिकांनी डॉ. सिंगल यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी साधली. काही कुटुंबांसह लहानगे आणि तरुण-तरुणींनीही त्यांच्यासोबत सेल्फीची संधी साधली. डॉ. सिंगल यांनीही या उपक्रमात नागरिकांशी मुक्त संवाद साधला. परदेशातील प्रशिक्षणादरम्यानचे त्यांचे अनुभवही त्यांनी मांडले. ‘मटा’च्या उपक्रमाचे कौतुक करून जे या उपक्रमाला हजर राहू शकले नाहीत, त्यांनी पुढील हॅपी स्ट्रीटमध्ये जरूर सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील पंचायत समितीच्या सभांना तीन महिन्यांपासून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा निकाल नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयाने दिला आहे. दि. २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना हे सदस्य गैरहजर राहिल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत नुकताच निकाल देण्यात आला असून, या सदस्यांमध्ये विद्यमान सभापतींचा समावेश असल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

धडगाव येथील पंचायत समितीचे सदस्य तथा विद्यमान सभापती काळूसिंग सुन्या पाडवी, सदस्या मिसरीबाई गोविंद पाडवी, कविता तानाजी पावरा, देवजी पारशी वळवी, गौतम दशरथ वसावे हे पाच सदस्य २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना वारंवार गैरहजर राहिले होते. याबाबत सदस्य रवींद्र पराडके यांनी सदस्यांविरुद्ध अपात्र करण्यात यावे, या मागणीची तक्रार नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली होती. नुकतीच याबाबत सुनावणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात घेण्यात आली. सभांना गैरहजर राहिल्यामुळे या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. हा निकाल नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या न्यायालयाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेचे मनपाकडे हस्तांतरण करू नये

$
0
0

शिवसेनेच्या सतीश महालेंचे धुळे महापौरांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे मनपाकडे हस्तांतरण करू नये, असा महापालिकेने महासभेत ठराव पारित करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन नुकतेच महापौर कल्पना महाले यांना दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बहुतांश दारू विक्रीची दुकाने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. मात्र, आदेशानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्ग हा शहरातील जाणारे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मोठ्या प्रमाणात सपाटा लागलेला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. परंतु, धुळे महानगरामध्ये कुठल्याही परिस्थितीत नवीन दारू दुकाने उघडण्यात येऊ नये. याची दक्षता म्हणून धुळे महानगरातून जाणारे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग मुंबई-आग्रा व सुरत-नागपूर महामार्ग हे धुळे महापालिकेकडे वर्ग करण्यात येऊ नये. तसेच यासंदर्भात तातडीने महासभेत ठराव करून सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी यात केली आहे. जेणेकरून धुळे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच कायम राहतील. त्यामुळे महापालिकेला या दोन्हीही महामार्गांवर वर्षाकाठी येणारा ५ ते ६ कोटी रुपयांचा नूतनीकरणाचा खर्च पेलावा लागणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी गंगाधर माळी, सुनील बैसाणे, दिनेश पाटील, डॉ. माधुरी बाफना, संजय गुजराथी, प्रशांत श्रीखंडे, अॅड. राजू गुजराथी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images