Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

३७३ उमेदवार मनपासाठी रिंगणात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी माघारीची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एक जागेवर काँग्रेसच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे आता ८३ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली.

सकाळी ११ ते ३ यावेळेत सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना त्या-त्या पक्षाचे चिन्ह मिळाले. अपक्ष उमेदवारांना त्यांनी नामनिर्देशन पत्रात मागितलेली चिन्हे देण्यात आली. एका प्रभागात एक चिन्ह दोन अपक्षांना मागितल्यास त्यासाठी चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. चिन्ह वाटप झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे.

बॅटला मागणी, नारळ नकोसे!

चिन्ह वाटपसाठी आयोगाकडून देण्यात आलेल्या चिन्हांचा चार्ट लावण्यात आला होता. अपक्ष उमेदवारांनी आपल्या पसंतीचे चिन्ह अर्ज दाखल करतांना नमूद केले होते. त्यात अनेकांनी बॅट, शिट्टी, कपबशी या चिन्हांना पसंती दिली. नारळ या चिन्हाला अनेकांनी नापसंती दर्शवली होती.

काँग्रेसचे उमेदवार जास्त

माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाही. सर्वाधिक ७३ उमेदवार काँग्रेसने दिले असून, गेल्या निवडणुकीत भाजपचा एक ही उमेदवार नव्हता. यावेळी भाजपने ५६ उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी ५२, एमआयएम 3५, शिवसेना २६, जनता दल १०, इतर ८, तसेच १०१ अपक्ष उमेदवार रिंगणात कायम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन् जिल्हा बँक ताळ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘कई बार सीधी उंगलीसे घी निकलता नहीं, उसके लिए उंगली टेढी करनी पडती है...’ याचा प्रत्यय महावितरणला नुकताच आला. महावितरणने जिल्हा बँकेविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करताच बँकेने महावितरणचे ३५ कोटी २५ लाख रुपये एकरकमी भरले आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

वीजग्राहकांनी जिल्हा बँकेच्या शाखेत भरलेले वीजबिलाचे ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ६५७ रुपये बँकेने महावितरणकडे जमा न केल्याने महावितरणने मुंबई नाका पोलिस ठाण्यात २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. ही रक्कम जिल्हा बँकेने महावितरणकडे न भरता स्वतःसाठी वापरली. त्यामध्ये नाशिक मंडळाचे १७ कोटी २२ लाख, तर मालेगाव मंडळाचे सुमारे १७ कोटी असे एकूण ३३ कोटी २२ लाख रुपये होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस हेलपाटे मारल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

जिल्हा बँक व महावितरण यांच्यात वीजबिल भरण्याबाबत २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी करार झाला. दोन महिन्यांपासून ग्राहकांनी वीजबिलाचे पैसे बँकेत भरले मात्र, बँकेने ते महावितरणच्या बँक खात्यात भरलेच नाहीत. बँकेने पैसे स्वतःसाठी वापरले, बनावट कागदपत्रे करून पैसे भरल्याचे दाखवले, कराराचे उल्लंघन केले आदी बाबींचे पुरावे महावितरणने सादर केल्यानंतर बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वित्तीय व्यवस्थापकांविरुद्धा गुन्हा दाखल झाला.

--

अखेर पैसे मिळाले

कुमठेकर यांनी सांगितले, की हे पैसे ग्राहकांचे होते. आम्हाला कायदेशीर कारवाई करणे भाग पडले. गुन्हा दाखल होताच बँकेने ३५ कोटी २५ लाख रुपये महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्य कार्यालयात एकरकमी जमा केले. त्यावरील दोन महिन्यांचे व्याजाचे ८० लाख रुपये आता बाकी आहेत. बँकेने पैसे भरले असले, तरी न्यायालयीन प्रक्रिया सुरूच राहील. या बँकेकडे वीजबिल भरणा बंदच ठेवण्यात आला आहे. वीजबिल भरण्यासाठी नवीन केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यामध्ये वक्रांगी संस्थेच्या ३५८ आणि महावितरण ऑनलाइनच्या ३८८ केंद्रांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासक्रमात आधुनिकता आणणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुक्त विद्यापीठामार्फत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षणक्रमावर भर देण्यात येणार असून, अभ्यासक्रमातील सुधारणांबरोबरच त्यात अत्याधुनिकपणा आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. लोकशाहीच्या प्रमुख स्तंभापैकी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे. समाजाच्या तळागाळातील प्रश्न मांडण्याबरोबरच समाजाच्या संवेदना जपण्याची गरज असून, वस्तूनिष्ठ पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांनी केले.
मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभागाच्या वार्षिक गुणगौरव आणि जनसंपर्क या अनियतकालिकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
शंकराचार्य कुर्तकोटी सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोल‌िस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रकाश देशमुख, एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मुक्त विद्यापीठाचे यापूर्वी काही अभ्यासक्रम केवळ खर्च जास्त होतो म्हणून बंद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन बंद पडलेले विविध अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येतील. समाजातील प्रत्येक घटक शिकला पाह‌िजे, यासाठी नाशिकरोड कारागृहातही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र मोफत सुरू करण्यात येणार आहे, असे सांगून वायूनंदन यांनी आगामी काळात अभ्यासक्रमात यूजीसीच्या धर्तीवर बदल करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक पूल होणार भक्कम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता त्यातील चार धोकादायक पुलांचे काम सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅनलाइन निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार साडेसात कोटींच्या खर्चाचे हे काम सहा महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे.

यासंदर्भातील निविदा प्रक्रिया १२ मेपासून सुरू झाली असून, २३ मे रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. धोकादायक पुलामुळे गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली होती. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पुलांचे दुसऱ्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार आता या चार पुलांच्या कामाच्या दुरुस्तीला वेग येणार आहे. शासनाच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे या पावसाळ्यात हे पूल दुरुस्त होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

--

हे पूल टाकणार कात

महाडच्या दुर्घटनेनंतर सर्वाधिक चर्चेत आलेल्या व धोकादायक ठरलेल्या सायखेडा येथील पुलाबाबत प्रचंड तक्रारी होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील जड वाहतूक बंद केली होती. आता हा गोदावरी नदीवरील पूल दुरुस्त केला जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी २३ लाख ३४ हजार ६९४ रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर डुबेरे-सोनारी-सोनांबे-पांढुर्ली-भगूर रस्त्यावर असणाऱ्या दारणा नदीवरील पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ४९ लाख ९८ हजार ७४७ खर्च केला जाणार आहे. या दोन पुलांबरोबरच घोटी-सिन्नर येथील पुलाचीदेखील दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ३८ लाख १३ हजार २९२ रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर-देवगाव-घोटी रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख १८ हजार ८०० रुपये खर्च केले जाणार आहेत.

--

पावसाळ्यातही काम

तब्बल साडेसात कोटींच्या कामातून जिल्ह्यातील चार पुलांचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची अट या निविदेत नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सहा महिन्यांच्या कालावधीत पावसाचा कालावधी पकडण्यात आल्यामुळे हे काम कंत्राटदाराला वेगाने पूर्ण करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिमासंवर्धनासाठी घ्यावा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जलद आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ प्रयत्नशील आहे. प्रशासनाची प्रतिमा चांगली राहील, अशी कामगिरी अधिकाऱ्यांनी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी शुक्रवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे महासंघाची बैठक झाली. बैठकीत महासंघाचे अध्यक्ष मनोहर पोकळे, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष सुनील टावरे, बाळासाहेब घोरपडे, रामदास खेडकर, प्रदीप जायभाये, प्रमोद वानखेडकर, सरोज जगताप, उत्तमराव सोनकांबळे, ए. आर. पाटील, बाबासाहेब शिंदे, पंडितराव गवळी, सुनंदा जरांडे आदी उपस्थित होते.

कुलथे म्हणाले, की सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिकारी महासंघ प्रयत्नशील आहे. मात्र, त्याचबरोबर रिक्त पदे भरण्याबाबत महासंघाची आग्रही भूमिका आहे. जनतेने या कायद्याचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना महासंघाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

राजपत्रित अधिकारी महासंघामार्फत उभारण्यात येणाऱ्या कल्याण केंद्र इमारतीबाबत ते म्हणाले, की महासंघ स्वमालकीची इमारत असलेली एकमात्र संघटना ठरणार आहे. जुलै महिन्यात इमारतीच्या कामास सुरुवात होणार आहे. इमारतीत ३०० चौरस फूट आकाराच्या ३५ वातानुकूलित सदनिका, मोठे सभागृह, दोन लहान सभागृहे, दोन मजल्यांवर मोठ्या डॉर्मिटरी, महिला व गरजू नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय, पार्किंग व्यवस्था राहणार आहे. एकूण ३० हजार चौरस फुटांचे बांधकाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण केंद्रासाठी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने निधी द्यावा, असे आवाहनही पोकळे यांनी केले.

--

मागण्यांप्रश्नी भूमिका

भाटकर यांनी सातव्या वेतन आयोगातील तरतुदींची माहिती दिली. बालसंगोपन रजा, पाच दिवसांचा आठवडा आदी महासंघाच्या मागण्यांविषयी त्यांनी भूमिका मांडली. यावेळी कल्याण केंद्र इमारतीसाठी नाशिक जिल्ह्यातर्फे तीन लाख ५१ हजारांचा निधी एकत्रित करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपार गुंडाचा धुमाकूळ

$
0
0

तक्रार केल्याने पुन्हा केली जाळपोळ; नारायणबापू सोसायटीमधील घटना

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील नारायणबापू सोसायटीचे स्टोअर रूम व कार्यालय पेटविणारा तडीपार गुंड रुपेश जाधव याच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी तक्रार केल्यानंतरही त्याने त्याच रात्री सोसायटीच्या कार्यालयात पेटते बोळे टाकून पेटवले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक होताच पोलिसांनी रुपेशला अटक केली.

नारायणबापू सोसायटीतच रुपेश जाधव हा तडीपार गुंड राहतो. त्याने सोसायटीचे कार्यालय काही दिवसांपूर्वी पेटवून दिले होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी त्याने स्टोअररूम पेटवून दिली होती. त्यामुळे विजेच्या वायरी जळून सोसायटी कार्यालयाचे कामकाज बंद पडले आहे. अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी रुपेश विरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर काही तासातच रुपेशने रात्री साडेबारा ते दोनच्या दरम्यान सोसायटी कार्यालयाच्या खिडकीची काच फोडून पेटते बोळे आत फेकले. त्यामुळे सोसायटीचा महत्त्वाचा दस्तावेज दुसऱ्यांदा खाक झाला. रात्री सोसायटीचे संचालक उपनगर पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी कैफियत मांडल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहेबराव पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रुपेशला सकाळी अटक केली.

जाळपोळीचा सूत्रधार

नारायणबापू सोसायटी व परिसरात जाळपोळ करण्यामागे तडीपार गुंड रुपेश जाधवचाच हात आहे. २०११, २०१२, २०१६ आणि आता २०१७ अशा चार वर्षांत त्याने सोसायटी रहिवाशांची वाहने पेटवली होती. महिनाभरापूर्वी सोसायटी ऑफिसच्या काचा फोडून त्याने आत पेटते बोळे फेकले होते.

पंधराशे लोक वेठीस

नारायणबापू हौसिंग सोसायटीत २४ इमारती असून, त्यामध्ये ३५० प्लॅट आहेत. त्यामध्ये सुमारे दीड हजार रहिवाशी राहतात. सर्व जाती धर्माचे हे रहिवासी मध्यमवर्गीय आहेत. सोसायटीचे वीस संचालक कारभार पाहतात. रुपेशन चार वेळा जाळपोळ करून आपल्याच सोसायटीच्या लोकांना वेठीस धरले आहे. पोलिसांच्या मते तो मनोविकृत आहे.

तडीपार असूनही वावर

रुपेशने रहिवाशांची रिक्षा आणि दुचाकी पेटवल्यानंतर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याला शिर्डी येथे तडीपार करण्यात आले होते. तरीही तो सोसायटीत खुलेआम वावरत असतो. सोसायटीच्या गार्डनमध्ये गोंधळ घालत असतो. त्यामुळे बायका-मुलींना सायंकाळी बाहेर पडणे अवघड झाले आहे. महिनाभरात त्याने तीनदा जाळपोळ केली.

तडीपार गुंडामुळे महिलावर्गात दहशत आहे. सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. त्याच्यावर कठोर कारवाई करून महिलावर्ग आणि रहिवाशांना पोलिसांनी दिलासा द्यावा.

- एक त्रस्त नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युततारांना अडथळे ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीकडून अनेक कामी हाती घेण्यात आली आहेत. यात रस्त्यालगत असलेल्या विद्युत पोलांवरील तारांना अडथळे ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणीचे कामही जोमाने सातपूर भागात सुरू आहे.

दरवर्षी विद्युततारांना अडथळा ठरू पाहणाऱ्या वृक्षांच्या फांद्या काढव्या लागत असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात विद्युततारांमध्ये वृक्षाच्या फांद्या राहिल्यास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे अनेक प्रकार होत असतात.

यामुळे पावसाळ्यापूर्वी सातपूर भागातील सर्वच परिसरात तारांना धोका ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. तसेच विद्युत जनित्रांचीदेखील तपासणी करत स्वच्छता केली जात आहे. यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह खासगी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

रहिवाशी हैराण

दरम्यान पावसाळ्यापूर्वी अनेक काम महावितरणला करावी लागत असल्याने शनिवारी सकाळी १० ते ५ वाजेच्यादरम्यान महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला जात असतो. दिवसभर विद्युत पुरवठा खंडित असल्याने त्याचा मात्र रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. बत्तीगुल असल्याने उकाड्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाझर तलावातील गाळ उपशासाठी निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत ० ते १०१ हेक्टर क्षेत्राच्या पाझर तलावांमधील गाळ काढण्यासाठी सरकारी निधीतून इंधन खर्च दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी नाशिक येथे केली.

राज्यातील धरणे व जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेमध्ये वाढ व्हावी, तसेच काढलेला गाळ शेतामध्ये पसरवून जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याअंतर्गत राज्यातील लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलावांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढला जाणार आहे. गाळाच्या साठवण क्षमतेवर होणारा परिणाम लक्षात घेता २५० हेक्टरपर्यंतच्या लाभक्षेत्रातील तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधनावरील खर्च सरकारकडून तसेच सीएसआरच्या माध्यमातून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र शून्य ते शंभर हेक्टर लाभक्षेत्राच्या तलावातील गाळ काढण्यासाठी इंधन खर्च देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता शून्य ते १०० हेक्टर लाभक्षेत्रातील तलावातील गाळ काढण्यासाठी सरकार इंधन खर्च देणार असून, दोनच दिवसांत याबाबतचा शासन निर्णय राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित केला जाईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. कृषी विभागाकडील १६ हजार ४६९ अधिकारी व कर्मचारी जलसंधारणकडे वर्ग करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. तसेच औरंगाबाद येथे जलसंधारण विभाग आणि आयुक्तालय स्थापन करण्यास मंजुरी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलयुक्तच्या कामांना मुदतवाढ नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जलयुक्त शिवार ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, २०१६-१७ अंतर्गत हाती घेतलेली सर्व कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा. गतवर्षी त्यासाठी मुदतवाढ दिली. परंतु, यंदा मुदतवाढ मिळणार नाही. कामे मुदतीत पूर्ण झाली नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिला.

जलयुक्त शिवार योजनेचा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक झाली. यावेळी आमदार अनिल कदम, डॉ. राहुल आहेर, राजाभाऊ वाजे, नरहरी झिरवाळ, यांसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, रोजगार हमी आणि जलसंधारणचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी २०१५ ते मे २०१७ या कालावधीतील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची माहिती दिली. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे करण्यास निधीअभावी मर्यादा येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जलयुक्तच्या काही धोरणांत बदलाची आवश्यकता आमदार कदम यांनी व्यक्त केली.

जलयुक्तसारख्या योजनेत ठेकेदारांची चलती नको अशी अपेक्षा वाजे यांनी व्यक्त केली. ज्या गावांमध्ये मोठे तलाव आहेत. त्या गावांचा प्राधान्याने जलयुक्त शिवार योजनेत समावेश करावा, तेथील पाझर तलावांची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी आमदार आहेर यांनी केली. गतवर्षी सीएसआर अंतर्गत केवळ १९ लाख रुपये मिळाले. सीएसआरमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवार फेरी या चांगल्या उपक्रमाला अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याबद्दल डवले यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ टोळक्याने फिरणे म्हणजे शिवार फेरी नव्हे असे ते म्हणाले. सरकारचा खर्च वाचवून जलसंधारणाची परिणामकारक कामे करता येतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०१७-१८ मधील जलयुक्तच्या २०० प्रकल्प अहवालांना मंजुरी देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, असे आदेश शिंदे यांनी दिले.

अधिकाऱ्यांची कानउघाडणी

गतवर्षी सुरगाणा तालुक्यात २१ गावांमध्ये गाळ काढण्याची कामे होणे अपेक्षित होते. परंतु, ही कामे का झाली नाहीत. यासह कळवण येथील लागवड अधिकारीदेखील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाहीत. चांदवडचे गटविकास अधिकारी बैठकीला उपस्थितच नव्हते. गोल गोल उत्तरे देऊन बनवाबनवी करू नये, असा दमही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेलनेस सेंटरचे गिफ्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुर्वेद, योगा, मेडिटेशन, नेचरोपेथी यांसह विविध प्रकारच्या सुविधा असलेले वेलनेस सेंटर इगतपुरी येथे सुरू करून त्याद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्याचे संकेत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी दिले. या सेंटरसाठी शंभर एकर जागा शोधण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी जिल्ह्यातील पर्यटनाला कशी चालना देण्यात येईल यावर सविस्तर विवेचन केले. त्यात त्यांनी इगतपुरीचे महत्त्व सांगून येथे वेलनेस सेंटरला मोठा वाव असल्याचे सांगितले. मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरी येथे पर्यटनाचा विकास करण्यासाठी या सेंटरचा मोठा उपयोग होणार आहे. इगतपुरी येथे अगोदरच असलेल्या विपश्यना केंद्रात परदेशांतूनही असंख्य जण येतात. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरजवळील तळवाडे येथील आंतरराष्ट्रीय योगा सेंटरही अनेकांना आकर्षित करीत आहे. नाशिकरोड येथील योगधाममध्येही येणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन खासगी स्वरुपाच्या हेल्थ रिसॉर्टचे प्रमाण गेल्या दोन ते तीन वर्षांत शहर परिसरात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरीत सुरू होणारे वेलनेस सेंटर सर्वांना आकर्षित करणारे ठरणार असल्याचा आशावादही यावेळी व्यक्त झाला.

--

स्पेशल टाउन प्लॅनिंग

लोणावळ्यात टाउन प्लॅनिंगमध्ये ज्या चुका झाल्या त्यामुळे तेथे पर्यटकांना फिरण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे इगतपुरीमध्ये त्या अडचणी येऊ नयेत यासाठी स्पेशल टाउन प्लॅनिंग येथे केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

--

पर्यटनविकासाची संधी

इगतपुरीतील हॉटेल व्यवसायिकांनी यावेळी इगतपुरीचे महत्त्व सांगणारी एक क्लिप दाखवली. त्यानंतर पर्यटनमंत्र्यांनी येथे पर्यटनविकासाला मोठी संधी असल्याचे सांगत मुंबईपासून हे स्थळ जवळ आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटक येथे वळतील, यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात अवैध विदेशी दारू जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील कॅम्प भागातील कॉलेज रस्त्यावरील एका राहत्या घरावर कॅम्प पोलिसांनी छापा टाकून ९५ हजार ४१ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. अवैध दारू विक्री प्रकरणी घरमालक प्रदीप कृष्णराव पवार याच्याविरुद्ध कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस प्रशासनाने अवैध दारू विक्री विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत कॉलेज रस्त्यावरील प्रदीप पवार, लक्ष्मी निवास, याच्या घरी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती कॅम्प विभागाचे पोलिस उपाधीक्षक अजित हगवणे यांना मिळाली होती. याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल करून मद्यसाठा व रोख रक्कम असा १ लाख २४ हजार ६५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पवार यांना अटक केली आहे. या पथकात पोलिस हवालदार भूषण खैरणार, नरेंद्र कोळी, दीपक वानखेडे, अक्षय पाटील, महिला कर्मचारी मीरा शिंत्रे, आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी संशयितास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित सुभाष झंवर यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयिताच्या कुटुंबीयांना जमावाकडून झालेल्या मारहाणीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी कोर्टाच्या आवारात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्तामुळे कोर्ट परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

नाशिकरोड येथील फरसाण कारखान्यात काम करणाऱ्या महिलेच्या चार वर्षांच्या चिमुरडीवर ओढारोड येथे राहणाऱ्या संशयित झंवरने अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये संबंधित संशयिताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेची माहिती समजल्यानंतर संतप्त नागरिकांना झंवरला बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. संशयितास उपचारासाठी लागलीच बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संशयितास पोलिस शुक्रवारी न्यायालयात हजर करतील या शक्यतेने नागरिक न्यायालयाच्या आवारात जमले होते. मात्र, संशयिताला कोर्टात हजर करण्यात आले नाही. यावेळी संशयिताची पत्नी, मुलगा व भाऊ जमावाच्या हाती सापडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. शनिवारी (दि.१३) सकाळी संशयितास कडेकोट बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर यांनी बाजू मांडताना सदर गुन्ह्याची तीव्रता कोर्टासमोर मांडली. संशयित आरोपीचे मेडिकल करण्यासह इतर महत्त्वाचे पुरावे संकलीत करणे आवश्यक असून, यापूर्वी त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत काय हे पोलिसांना तपासायचे असल्याचे स्पष्ट केले. पीडित मुलीचे वय अवघे चार इतके आहे. तर, संशयिताचे वय हे ५१ असून, हा प्रकार अतिशय घृणास्पद असल्याचे सरकारी पक्षातर्फे कोर्टात म्हणणे सादर करण्यात आले. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी संशयितास आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती अॅड. चंद्रकोर यांनी कोर्टाला केली. बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने झंवरला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा शनिवारी बुडून मृत्यू झाला. रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीजवळ आणि सातपूरला शिवाजीगर येथील तलावात या दुर्दैवी घटना घडल्या. यात अनुक्रमे आठ आणि १४ वर्षीय मुलांचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वराज सुनील बागुल (वय ८, रा. जुने पंचवटी) दुपारी २ वाजेच्या सुमारास पोहोण्यासाठी रामकुंड परिसरात गेला होता. दोन दिवसांपूर्वीच गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याची खोली वाढली असून, वेगही आहे. यात पाण्यात उतरलेल्या स्वराजला पाण्याचा अंदाज आला नाही. तो दुतोंड्या मारुतीजवळ बुडाला. हे लक्षात येताच तेथील युवकांनी तत्काळ पाण्यात उड्या मारून त्यास बाहेर काढले. उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

--

सातपूरला तलावात घडली घटना

सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या शेतातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. अबिरल लालमल क्लोन (रा. शिवाजीनगर) हा शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास इतर मुलांबरोबर पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात उतरल्याबरोबर त्याने गंटागळ्या घेतल्या. वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. इतर मुलांनी त्यास शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरणसाठी केवळ ठरावाची गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली परिसरात बच्चे कंपनीसह क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी देवळालीतील नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटत असतांना नगरसेविका आशा गोडसे यांनी जलतरण तलावाची लवकरात लवकर उभारणी करण्यासाठी प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे,अनेक दिवसांपासून होत असलेल्या या मागणी आता लोकप्रतिनिधींनी देखील दुजोरा दिल्याने नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे.

याबाबत नगरसेवक भगवान कटारिया यांनी आपली भूमिका मांडत रेस्ट कॅम्प रोडवरील वॉर्ड क्रं. ६ मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे असलेल्या ‘सी’ दर्जाची ६.५ एकर जागेपैकी केवळ ३ एकर परिसरात जलतरण तलावासह क्लब हाऊसची उभारणी करता येऊ शकते. याशिवाय देवळाली परिसरात राहत असलेल्या सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून वर्षाकाठी ठराविक रक्कम आकारली गेल्यास यारूपानेदेखील प्रशासनाच्या महसुलात निश्चित चांगली वाढ होणार आहे. लवकरात लवकर खासदार तथा केंद्राकडून एखाद्या निधीची मंजुरी मिळवत शहरात जलतरण तलावाची उभारणी केल्यास क्रीडाप्रेमी नागरिकांकडून जलतरण तलावाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र याकामी आगामी बोर्डाच्या बैठकीत तसे रिझोल्युशन पास करणे गरजेचे असल्याने लोकप्रतिनिधींसह नियुक्त प्रतिनिधी व अध्यक्ष यांच्या भूमिका आता निर्णायक ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रीडाभीष्म’पंचत्वात विलीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ आणि इंटेलिजन्स ब्यूरोचे निवृत्त सहसंचालक डॉ. भीष्मराज बाम शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पंचत्वात विलीन झाले. पंचवटीतील अमरधाममध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, विविध क्रीडा संघटनांसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, तसेच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येकाला आपलेसे वाटणाऱ्या डॉ. बाम सरांच्या अंत्यदर्शनाने नागरिकांची मने हेलावून गेली.

महात्मानगरमधील एका व्याख्यानादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी आठ वाजेदरम्यान त्यांचे पार्थिव महात्मानगर क्रिकेट ग्राऊंडजवळील महात्मा वाचनालयाच्या सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख मार्गदर्शक धनश्री तळवलकर, महापौर रंजना भानसी आदींसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान त्यांची अंत्ययात्रा महात्मानगर येथील निवासस्थानापासून निघून त्र्यंबक रस्त्याने पंचवटीतील अमरधाम येथे पोहोचली. विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे आणि नाशिकचे शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी येथे डॉ. बाम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी अंत्ययात्रेत सहभागी मान्यवरांमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, दीपाली देशपांडे, सुमा शिरूर, कविता राऊत, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, शिवाजी गांगुर्डे, कोंडाजी आव्हाड, योगेश हिरे, हेमलता पाटील, अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, मनीष बस्ते, अविनाश धर्माधिकारी, प्रशिक्षक विजेंदरसिंह, शंकर बोऱ्हाडे, श्रीकांत बेणी, धनंजय बेळे, सचिन जोशी, प्रमोद पुराणिक आदींचा समावेश होता.

आज शोकसभा

डॉ. बाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज (१४ मे) सायंकाळी ६.३० वाजता शोकसभा होणार आहे. महात्मानगर येथील क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या सार्वजनिक सभागृहात विविध संघटना, संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी शोकसभेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात अवकाळीचा तडाखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहर व परिसरात शुक्रवारी, सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुपारनंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ढगांचा गडगडाट होऊन शहरभर प्रचंड धुळीचे लोळ उठू लागले. यामध्ये शहरातील बऱ्याच भागातील घरांचे पत्रे उडाले. तसेच रस्त्यांवरही झाडे कोसळून शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिवारी (दि. १३) शहरात काही परिसरात वीज नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यामध्ये रामवाडीत संतप्त नागरिकांनी वीज कार्यालयाची तोडफोड केली.

अचानक आलेल्या या पावसाने शहरातील मोगलाई परिसरातील गवळी वाड्यात संतोष माधवराव मनगटे, योगेश सिदप्पा गवळी, जाकीर कुरेशी यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाल्याने केवळ भिंती उभ्या होत्या. त्यांच्या घरातील सामानही अस्ताव्यस्त होऊन पावसामुळे पाणी साचले होते. जाकीर कुरेशी यांच्या घराचे उडालेले पत्रे महेफुजा शेख मझर यांच्या मुलाच्या लग्न मंडपावर कोसळल्याने मंडप कोलमडून पडल्याने वऱ्हाडींची धांदल उडाली होती. शहरातील वडजाईरोड, देवपुरातील वाडीभोकररोड, तसेच चाळीसगावरोड परिसरातील घरांचीही पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे काही ठिकाणी कच्च्या घरांच्या भिंती कोसळून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले होते. शुक्रवारी सायंकाळी वादळामुळे शहरातील चहूबाजूला झाडे कोसळल्याने वीजतारा तुटून महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी विद्युत रोहित्र जळाल्याच्याही घटना घडल्या आहेत. महावितरणचे अधीक्षक अभियंता डी. व्ही. पडाळकर, मचिये यांच्यासह वीज अभियंते, कर्मचारी तसेच शहरातील वेगवेगळ्या भागात सात ते आठ ठेकेदार वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. टप्प्याटप्प्याने तो सुरळीत केला जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. डी. पावरा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड तालुक्यात गारपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील निफाड, चांदवडसह अन्य काही तालुक्यांमध्ये शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. निफाड तालुक्यात सुमारे अर्धा तास पाऊस झाला; तर चांदवड येथील बहादुरी परिसरात पाऊण तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. शहरातील आडगाव परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्हावासीयांना उकाड्यापासून काहीअंशी दिलासा मिळाला. काही परिसरात सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. निफाड तालुक्यात गोदाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक शेतांमध्ये मोठे नुकसान झाले.

शेडनेट, घरांचे नुकसान

सायखेडा, पिंपळगाव निपाणी, सावळी, चाटोरी परिसरात बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांचे छप्पर कोसळले. शेडनेटचेही नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी, दुकानदारांची धांदल उडाली. चाटोरीमध्ये रामदास हांडगे, बाळासाहेब सोनवणे, सोमनाथ जाधव, सुनील हांडगे, संतोष भोईर यांचे शेडनेट वादळी वाऱ्यामुळे उडाले. अनेक शेतांमधील काढणी केलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. चांदोरी, लासलगाव आणि विंचूर परिसरात तुरळक सरी कोसळल्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. कळवण शहर आणि परिसरातही सायंकाळी पावसाचे आगमन झाले. पंधरा मिनिटे चाललेल्या पावसांच्या सरीने शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर डबकी साचली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले.

नाशिक शहरात वीज गूल

नाशिक औद्योगिक वसाहतीला शनिवारी सुटी असल्याने शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त झाले. पंचवटी, आडगाव परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांचे अधिकच हाल झाले.

शहरात पाऊस

नाशिक शहरात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटात व विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली असली तरी ती तुरळक होती. आडगाव, पंचवटी, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारच्या सुटीमुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची या पावसाने मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पावसाच्या शिडकाव्यामुळे सर्वत्र मृदगंध पसरला. रविवारपासून शुक्रवारपर्यंत लग्नतिथी दाट असून, त्यावर पावसाचे सावट आहे. शनिवारी अनेक ठिकाणी हळदीचे कार्यक्रम होते. मात्र, सायंकाळी आलेल्या पावसाने वधू-वराकडील मंडळींची धांदल उडविली. बाजारपेठांमध्येही वीज गूल झाल्याने व्यापारी वर्गाचे हाल झाले. नाशिकरोड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीविक्रेते व अन्य व्यावसायिकांचे हाल झाले. त्यांना बाजार आटोपता घ्यावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाचे पैसे उकळणाऱ्या टोळीच्या कोठडीत वाढ

$
0
0

अटक झालेल्या संशयितात महिलेचाही समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वृध्द व्यक्तीचे अपहरण करून त्याकडील पैसे लुबाडणाऱ्या टोळीतील तिघांच्या कोठडीत १६ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात एका महिलेस पोलिसांनी अटक केली असून, तिलाही कोर्टाने १६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली असून, एक संशयित फरार आहेत.

या प्रकरणी गंगापूर रोडवरील नरसिंह नगरमध्ये राहणाऱ्या दामोदर नारायण जोशी (वय ८०) यांनी गंगापूर पोलिसांकडे तक्रार दिली. साधारणतः तीन वर्षांपूर्वी दिगंबर भागुजी आव्हाड (अशोका मार्ग, साई मंदिराच्या समोर, नाशिकरोड) मोहिनी मैंद उर्फ नलिनी बहिवाल (उपनगर), जगदीश भोईर, सचिन आबड, पंढरीनाथ गिते या पाच संशयितांनी जोशी यांचे अपहरण करून चार महिने डांबून ठेवले होते. या काळात संशयित आरोपींनी जोशी यांच्याकडील १८ लाख ५५ हजार रुपये, दोन लाख रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिणे, २० हजार रुपयांचे चांदीचे भांडे, घराची कागदपत्रे, पॅनकार्ड, पासबुक, आधारकार्ड, एफडीच्या पावत्या आदी वस्तू काढून घेतल्या होत्या. यासाठी संशयित दमबाजी करीत तर कधी मारहाणदेखील करीत होते. एका रात्री संधी साधून जोशी यांनी सुटका करून घेतली. मात्र, यानंतर पोलिसांनी जोशी यांची तक्रार नोंदवून घेतलीच नाही. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यापर्यंत पोहचले. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गंगापूररोड पोलिसांनी दिगंबर भागुजी आव्हाड, पंढरीनाथ गिते, दत्तात्रय आव्हाड या तिघांना अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या मोहिनी मैंद उर्फ नलिनी बहिवाल हिलाही प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. एस. शिंदे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. जागृती ठाकरे यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने सर्व संशयितांच्या कोठडीत १६ मेपर्यंत वाढ केली.

कामगाराचा मृत्यू

एकलहरे येथील एका कारखान्‍यात रंगकाम कामगाराचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विशाल भगवान कर्डिले (वय २५, रा. नवीन सामनगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. एकलहरे येथील एका कारखान्यात रंगकाम करण्यासाठी शुक्रवारी विशाल पोहचला होता. उंचावर काम करीत असतांना सेल्फी बेल्ट खोलल्याने तो खाली कोसळला. या घटनेत विशाल गंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात चौघांचा मृत्यू

$
0
0

येवला ः येवला तालुक्यात चार ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोन विवाहित महिलांचा समावेश आहे.

गवंडगावजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात राहुल शिवाजी भागवत (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत पुरणगाव येथील मंगलबाई संदीप ठोंबरे (वय २५) ही विवाहिता शेततळ्यामध्ये पडून मृत्युमुखी पडली. तिसऱ्या घटनेत जऊळके येथे जयश्री रवींद्र नागरे या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. चौथ्या घटनेत तांदुळवाडी शिवारामध्ये एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आला. या वृध्दाची ओळख पटलेली नाही. या चार घटनांपैकी तीन घटनांची अकस्मात मृत्यू म्हणून, तर एका घटनेत मोटार अपघात म्हणून येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टपासून कार्यान्वित करा फनिक्युलर ट्रॉली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सप्तश्रृंगगडावरील फनिक्युलर ट्रॉलीचे काम १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून ही सेवा तातडीने भाविकांसाठी सुरू करावी, असे निर्देश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी वणी येथे संबंधित विभागाला दिले. नाशिकमधील एका कार्यक्रमात त्यांनी अंदमान येथे दाखविला जाणारा स्वातंत्र्यलढ्याचा लाइट अॅण्ड साउंड शो भगूर येथे सुरू करणार असल्याचे संकेतही दिले.

नाशिक जिल्ह्यात पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी शनिवारी दिवसभर रावल यांनी विविध ठिकाणी भेट देत काही ठिकाणी कामांचा प्रारंभही केला. शनिवारी दुपारी नाशिक ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की नाशिकच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी अगोदरच तीन बैठका झाल्या असून, आता प्रत्यक्षात काम सुरू करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यटन क्षेत्रातील संघटनांनी एकत्र येऊन आराखडा तयार करावा, बैठका घ्याव्यात. त्याकरिता पर्यटन विकास महामंडळ मदत करेल.

असोसिएशनने एक फिल्म दाखवत नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करून पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल, याची माहिती दिली. मंत्री रावल यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भालेराव, उपाध्यक्ष राजेंद्र बाकरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वाइन संघटनेनेसुद्धा आपले प्रश्न मांडले. त्यावर रावल यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश दिले.

टूर पॅकेजेसवर द्याव भर

जहाजातून येणाऱ्या प्रवाशांना नाशिककडे कसे वळवता येईल, यावर त्यांनी भर दिला. त्याचप्रमाणे औरंगाबाद, नाशिक, मुंबई अशा टूर पॅकेजसह वेगवेगळे पॅकेजेस कशी करता येतील, यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी एमटीडीसी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

--

शहरासह भगूरला प्राधान्य

नाशिक येथे पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी अगोदरच गंगा आरती सुरू करण्याचे निश्चित झाले असून, त्यात सातत्य व भव्य-दिव्यता येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. अंदमान येथे दाखविला जाणारा स्वातंत्र्यलढ्याचा लाइट अॅण्ड साउंड शो भगूर येथे सुरू करणार असल्याचे संकेतही पर्यटनमंत्र्यांनी दिले.

--

फेस्टिव्हल्सची भर

नाशिकमध्यो होणाऱ्या फेस्टिव्हलबरोबरच एमटीडीसीकडून काही फेस्टिव्हल्स घेतले जाणार आहेत. त्याअंतर्गत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त फेस्टिव्हल्स आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे कोणते प्रयोग करता येतील, त्यासाठी त्यांनी असोसिएशनला सूचना करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images