Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिस कोठडीतील संशयिताचे पलायन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरफोडीच्या गुन्ह्यातील चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिस स्टेशनमधून पोबारा केला. ही घटना सोमवारी सांयकाळच्या सुमारास घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, ग्रामीण पोलिसांसह शहर पोलिस फरार संशयिताचा शोध घेत आहेत.

संभाजी विलास कावळे (२३, रा. औदुंबर प्लाझा, औदुंबरनगर, अंबड लिंकरोड) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या सात संशयितांमध्ये कावळेचा सहभाग होता. याच गुन्ह्यात इतर संशयितासह कावळेला क्राइम ब्रँचच्या पथकाने आठ दिवसांपूर्वी अटक केली होती. मातोरी (ता. नाशिक) येथे घरफोडी केल्याचीही कबुली कावळेने दिली होती. मातोरी प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनने कोर्टाकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने तालुका पोलिस स्टेशनच्या पथकाने सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कावळेचा सेंट्रल जेलमधून ताबा घेतला. दुपारच्या सुमारास त्यास कोर्टात हजर केले. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यानंतर, चौकशीसाठी कावळेला तालुका पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तेथे कोठडी नसल्याने कावळेला एका कोपऱ्यात बसवण्यात आले. सायंकाळी त्याने हातातील बेडी उघडून स्टेशनच्या मागील बाजूने धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बॉटनिकल’मधील झाडांना फुटला कंठ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहराचे नवनिर्माण करण्याच्या हेतूने महापालिका निवडणूकीपूर्वी पांडवलेणीच्या मागील बाजूस नेहरू उद्यानात साकारलेल्या बॉटनिकल गार्डनचे गाजावाजा करून उद्‌घाटन करण्यात आले होते. येथील लेझर शोमधील बोलकी झाडे सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरत होती. मात्र, हा लेझर शो पंधरा दिवसांपासून बंद पडल्याने नागरिकांचा हिरमोड होत होता. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत लेझर शो बंद झाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्‍त केली होती. मात्र, आता हा शो पुन्हा सुरू झाला असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

बॉटनिकल गार्डनमधील बोलक्या झाडांच्या लेझर शोच्या आकर्षणामुळेच या ठिकाणी नागरिक, पर्यटकांची गर्दी होत होती. परंतु, हा लेझर शोच बंद झाल्याने नागरिकांचा हिरमोड होत होता. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन पुण्यातील तंत्रज्ञांच्या सहकार्याने हा लेझर शो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर रविवारी या लेझर शोची चाचणी घेतल्यानंतर हा शो पूर्ववत सुरू झाला असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

शालेय सुटीच्या काळात लहान-थोरांची गर्दी वाढलेली असतानाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बॉटनिकल गार्डनचे आकर्षण ठरलेला बोलक्या झाडांचा लेझर शो बंद पडला होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली असली, तरी त्यात अनेक दिवस गेल्याने बॉटनिकल गार्डनला भेट देणाऱ्या दर्शकांचा भ्रमनिरास होत होता. मात्र, आता हा शो पुन्हा सुरू झाल्याने येथे पर्यटकांची संख्या निश्चितच वाढेल, असे येथील व्यवस्थापनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

--

विनातिकीटची मजा

विशेष म्हणजे रविवारी चाचणी घेण्यात येत असताना आलेल्या पर्यटकांना विनातिकीट हा शो दाखविण्यात आला. असंख्य पर्यटक, नागरिकांनी या विनातिकीट शोची मजा लुटली. शो सुरू झाल्यानंतर येथील गर्दी वाढल्याचेदेखील रविवारी व सोमवारी दिसून आले. येथील झाडे पुन्हा बोलकी झाल्याने पर्यटक, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतिपदी सरोज आहिरे बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका सरोज आहिरे यांची तर उपसभापतिपदी कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांनी माघार घेतल्याने सभापतिपदाची निवड बिनविरोध होऊ शकली. दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवारामुळे भाजपला फाटाफुटीची भीती वाटल्याने भाजपने बहुमत असतानाही व्हीप बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी दुपारी चार वाजता विभागीय अप्पर महसूल आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया झाली. भाजपचे पाच तर शिवसेनेचे तीन सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव सदस्य असल्याने भाजपचे स्पष्ट बहुमत होते. सभापती व उपसभापतिपदाच्या उमेदवारांसह भाग्यश्री ढोमसे, प्रियंका घाटे, शीतल माळोदे प्रथम हजर झाल्या. शिवसेनेच्या उमेदवार नयना गांगुर्डे यांच्या व्यतिरिक्त विरोधातील शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, पूनम मोगरे उपस्थित झाल्या. सर्वात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन सभागृहात उपस्थित झाल्या. विरोधातील सर्व सदस्य हजर होण्याच्या आतच नयना गांगुर्डे यांनी माघारीचा अर्ज मागे घेऊन सरोज आहिरे यांचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर कावेरी घुगे यांच्या विरोधात उमेदवारच नसल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.


समितीसाठी बजेटच्या पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या पाच टक्के निधीबरोबरच विविध प्रकल्पांसाठी शासनाकडून निधी आणला जाईल. तसेच अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाईल.

- सरोज आहिरे, सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटमार करणारे दोन तासांत जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोघा तरुणांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह सोन्याचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी दोन तासात जेरबंद केले. लुटीच्या घटनेनंतर संशयित कॉलेजरोड परिसरात फिरत होते. पंपिंग स्टेशन रस्त्यावर रविवारी (दि.१४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास लुटीची घटना घडली होती.

विसे चौक परिसरातून गणेश विष्णू सरकाते, विशाल दिपक अहिरे, प्रथमेश पगारे हे मित्र रविवारी दुपारी दुचाकीने (एमएच १५, डीएन ६९४२) सोमेश्वलकडे निघाले होते. पपिंग स्टेशनमार्गे ते विसे चौक येथे आले. यावेळी संशयित आरोपी सारनाथ गणकवार (२८, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी) याने त्याच्या साथिदारासह दुचाकी आडवी लावत दोघांना थांबवले. तसेच सुमित याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून धमकावत तीन मोबाइल, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, एक हजाराची रोकड लुटून पळ काढला. यावेळी सुमीतने मोबाइल देण्यास नकार दिला. मात्र, चाकूचा धाक दाखवत तसेच मारहाण करीत संशयिताने दोघांकडील १५ हजार, तीन हजार तसेच ८०० रुपयांचे मोबाइल तसेच तीन हजार रुपयांचे सोन्याचे ओमपान असा मुद्देमाल घेऊन गंगापूर नाक्याच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी दोघा मित्रांनी जुना गंगापूर नाक्याच्या सिग्नलपर्यंत संशयित आरोपींचा पाठलाग केला. मात्र, सिग्नलचा दिवा हिरवा झाल्याने संशयित पुढे निघून गेले. पाठीमागून आलेल्या गणेश व सुमित येईपर्यंत सिग्नल पुन्हा लाल झाला. त्यामुळे या दोघांना चोरट्याचा पुढे पाठलाग करता आला नाही. या दोघांनी लागलीच सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठले. तिथे झाल्या प्रकाराची माहिती सांगितली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी लागलीच त्वरित एक शोधपथक तयार केले. दुसरीकडे, त्यांनी आपल्यासोबत साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन खासगी वाहनाने तपास सुरू केला. कॉलेजरोड परिसरात शोध सुरू असताना संशयित आरोपी गणकवार बिग बाजारजवळ सापडला. पोलिसांनी लागलीच त्याच्या मुसक्या आवळल्या. गणकवारचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस त्याच्या मागावर आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे समजते.

गच्चीवरून मोबाइल चोरी

कुटुंबीय झोपी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी गच्चीवर चढून महागडा मोबाइल पळविल्याची घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश वसंतराव दुसाने (रा. अचानक चौक, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. दुसाने कुटुंबीय रविवारी रात्री झोपण्यासाठी गच्चीवर गेले असता चोरीचा प्रकार घडला. सर्व झोपत असल्याची संधी साधत चोरट्यांनी उशी जवळ ठेवलेला २२ हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार हळदे करीत आहेत.

झंवरला २० पर्यंत कोठडी

सिन्नर फाटा : येथील नेहे मळा परिसरात चिमुरडीवरील बलात्कार प्रकणातील आरोपी सुभाष झंवर याची नाशिकच्या विशेष न्यायालयाने शनिवार २० मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. झंवर यास अटकेनंतर नाशिकरोड पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर झंवर याला संतप्त जमावाने बिटको चौकात बेदम चोप दिला होता.

शालिमारला जुगारी गजाआड

सतत वर्दळ असलेल्या शालिमार चौकात पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या तिघा जुगारींच्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. जुगारींच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे कर्मचारी श्रीकांत साळवे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शालिमार चौकातील हॉटेल हॉली डे प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस पथकाने छापा टाकला असता सिडकोतील राकेश कोळपकर व त्याचे दोन साथीदार जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून एक हजार २६० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

माऊलीनगरला चेन स्नॅचिंग

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना माऊलीनगर भागात रविवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा संतोष अहिरे (३२, रा. रघुपती सोसायटी, विद्युतभवन) या रविवारी रात्री शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. माऊलीनगर भागातील कॉलनीरोडने आहिरे पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक खोडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपावर पीककर्जाचे संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कृषी विभागाने चांगल्या पावसाच्या शक्यतेवर आधारित खरिपाचे नियोजन केले आह. मात्र, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पिककर्ज वाटपासाठी फुटकी कवडीही उपलब्ध नसल्याने यंदाच्या खरीप हंगामाचे नियोजित उद्दिष्ट्य साध्य होणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदाही चांगली राहणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत तीन टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याचे जास्त उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळातील ५५ दिवसांत १०२ टक्के पाऊस झाला होता. यंदाही ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ तीन टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षीच्या २८ हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा २८ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. खताची मागणी गेल्या वर्षीच्या ७.२२ लाख वरून यंदा ११.१० लाख मेट्रीक टनवर पोचली आहे. तर ३ लाख ५हजार ३८५ क्विंटल बियाण्याची मागणी केलेली आहे. यंदा ४५ लाख ८५ हजार २९४ बी. टी. कापसाच्या पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे.

विभागातील ५ हजार २०८ गावांतील २८.५८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप बहरणार आहे. यंदाच्या खरीप नियोजनानुसार भात, मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात वाढ तर ज्वारी व बाजरी या पिकांखालील क्षेत्रात घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या खरिपाच्या तुलनेत यंदा तृणधान्याच्या पेरणीत दोन टक्के तर कडधान्याच्या पेरणीत चार टक्के वाढ प्रस्तावित आहे. २०१७ च्या खरिपातील गुणनियंत्रणासाठी विभागस्तरावर १, जिल्हास्तरावर ५ व तालुकास्तरावर ५४ अशी एकूण ६० भरारी पथके स्थापन केली आहेत.

कृषीचे नियोजन कोलमडणार?

शेतकऱ्यांना वेळेवर अर्थ सहाय्य मिळावे, यासाठी विविध वित्तीय संस्था प्रतिनिधींशी मेळावेही झाले. एक मे रोजीच्या ग्रामसभेतही या अभियानाबद्दल माहिती देण्यात आली. विभागात जिल्हा बँकेकडून ३७९७.९६ कोटी रुपये इतके पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले. मात्र नाशिक जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने कृषी विभागाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी अद्याप शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या ज्येष्ठांच्या जीवनात फुलली ‘खुशी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

स्वतःच्या घरी संपत्ती अन् समृद्धी सर्व काही पुरेसे असूनही केवळ रक्ताच्या नात्यांनीच अव्हेरल्याने ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाच्या आश्रयाला असलेल्या ६५ ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सोमवारी ‘खुशी’ फुलली. जागतिक कुटूंब दिनाच्या दिवशी नाशिकच्या ‘मानव उत्थान मंच’ ने ‘खुशी’ प्रकल्पाचा श्रीगणेशा केल्याने या ज्येष्ठांची कौटूंबिक स्नेह व प्रेमाची उणीव भरुन निघाली.

नाशिकच्या ‘मानव उत्थान मंच’च्या वतीने सामनगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात जागतिक कुटूंब दिनी ‘खुशी’ प्रकल्पाची सुरुवात झाली. माधवी घुमसाना, मानसी राका, ज्युलिएस ठकोरिया, अजिंक्य जाधव या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या व चंदर नरसिंघानी या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून ‘खुशी’ हा प्रकल्प आकाराला आला आहे. सोमवारी या प्रकल्पाच्या लोगोचे पेंटिंग करुन या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना मानव उत्थान मंचच्या कार्यकर्त्यांनी नाश्‍ता दिला. ज्येष्ठ महिलांच्या हातावर मेहेंदी काढली.


विविध सोयी सुविधा उभारणार

‘खुशी’ प्रकल्पाद्वारे ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात वास्तव्यास असणाऱ्या ज्येष्ठांसाठी या ठिकाणी विविध सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत. या कामासाठी घोटी येथील जिंदाल कंपनीतील कामगारांसह दिल्ली व दुबई येथील नागरिकांनी आर्थिक मदत केली आहे. ‘खुशी’च्या पहिल्या टप्प्यात या वृद्धाश्रमातील इमारतींच्या रंगरंगोटीसह आकर्षक गार्डन उभारले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक इमारतीभोवती वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ज्येष्ठांच्या करमणुकीसाठी एक अॅक्ट‌िव्ह‌िटी सेंटरही उभारले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक साहित्यही सोमवारी ‘मानव उत्थान‘मंच’ने वृद्धाश्रमाला दिले. ‘खुशी’च्या दुसऱ्या टप्प्यात या वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठांची महिन्यातून एकदा सहल, जेवण, वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले जाणार असल्याची माहिती जसवीर सिंग यांनी दिली.


‘खुशी’साठी यांनी दिला निधी

‘मदर्स डे’ निमित्ताने हिना पटेल, सीमा चौधरी, दक्षा भामरे, अफशा ताहेरी, दीप्ती चिटणीस, सुजाता खत्री, नीती चौहाण, अर्चना गुप्ता, पिंकी शर्मा, मीना बिस्ट, सरोज ज्याला, मंजू गोयल, ज्योती शर्मा, रीना ग्रोव्हर, बिन्नी शानी, लक्ष्मी मेहरा, अंजली गोस्वामी, शुभम गांजरे, रिचा शिंदे, नीरज कदम आदींनी ‘खुशी’ साठी स्वखुशीने निधी दिला. याप्रसंगी जगबीरसिंग, सचिन पाटील, निर्मल गोदा अभियानचे नितीन शुक्ला, नितीन राऊत, जितेंद्र भावे, ‘आवास’च्या भारती जाधव, सुनंदा जाधव, नेहा राऊत, पंकज जोशी, सौरभ चव्हाण, राजू बेहरा आदींनीही या उपक्रमात सहभागी होऊन ज्येष्ठांच्या जीवनात ‘खुशी’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे जगणे सुखकर नसल्याचे बघून वाईट वाटे. त्यांची एकटेपणाची जाणीव दूर व्हावी व ते खूश रहावेत यासाठी ‘खुशी’ उपक्रमाचे नियोजन केले.

-मानसी राका, आर्किटेक्चर विद्यार्थिनी

वृद्धाश्रमातील नागरिकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. उच्च शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर या ज्येष्ठांच्या जीवनात ‘खुशी’ भरण्यासाठी करणार आहे.

-माधवी घुमसाना, आर्किटेक्चर विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियुक्तीवरून सेनेत यादवी

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित १९ मेच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेतील यादवी उफाळून आली आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अॅड. शिवाजी सहाणे यांना परस्पर हटवून नगरसेवक प्रवीण तिदमे यांची नियुक्ती केल्याने पक्षात नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी मंत्री बबन घोलप यांनी ही नियुक्ती केली असली तरी, अशी नियुक्ती झालेली नाही. नवीन अध्यक्षाची नियुक्ती लवकरच करू, असे अॅड. सहाणे यांनी स्पष्ट केले आहे.

म्युनिसिपल कर्मचारी-कामगार हि शिवसेनेची अंगिकृत संघटना असून महापालिकेतील सर्वात मोठी संघटना आहे. महापालिका स्थापनेपासून कार्यरत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत अनेक प्रश्‍न सुटले आहे. माजी मंत्री बबन घोलप हे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. माजी नगरसेवक अशोक गवळी यांच्या निधनानंतर २०१२ मध्ये तत्कालिन नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांच्याकडे संघटनेची सूत्रे देण्यात आली. महापालिका निवडणूक न लढविल्याने अॅड. सहाणे राजकारणाच्या बाहेर असले तरी अद्यापही ते संघटनेचे अधिकृत अध्यक्ष आहेत. संघटनेच्या घटनेनुसार अध्यक्षपदावर अन्य सदस्यांची नियुक्ती करायची झाल्यास आधी बैठक बोलवावी लागते. त्यात प्रस्ताव सादर करून पदाधिकारी त्यातून नव्या अध्यक्षांची निवड करतात. मात्र, नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे सोमवारी अचानक सूत्रे सोपविण्यात आल्याने संघटनेत खळबळ उडाली. तिदमे यांच्यासह संघटनेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत विसपुते यांची वर्णी लागली आहे. या दोन्ही पदांची ‌नियुक्ती भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या आदेशाने केल्याचे नियुक्तीपत्र मााजी मंत्री बबन घोलप यांच्या हस्ते तिदमे यांना देण्यात आले. परंतु, या नव्या निवडीबाबत अॅड. सहाणे यांना कोणतीही माहिती नाही.

सदरची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा अॅड. सहाणे यांनी केला आहे. त्यामुळे निवडीच्या या प्रकारावरून शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. ज्येष्ठ नेत्यांना सुध्दा निवडीची माहिती नाही. ‘एचएएल’मधील कामगार संघटनेचा अनुभव असल्याने तिदमे यांची निवड केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सहाणे यांना हटविण्यामागे अंतर्गत राजकारण असून त्यास महापालिकेच्या नाशिकरोडमधील निवडणूकीतील जय-पराजय कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

वादाची मुहूर्तावर पेरणी

महापालिका निवडणुकीत एबी फॉर्म वाटपावेळी शिवसेनेत ‘फ्री-स्टाइल’ झाली होती. तेव्हापासून सुरू असलेली धूसफुस अजूनही दिसून येत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटबाजीमुळे महापालिका निवडणुकीत

नाशिकरोड येथे शिवसेनेच्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला होता. उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. १९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुद्दाम हा वाद उकरून काढल्याची चर्चा आहे. महापालिकेतील सध्याच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देवून शिवसेना डिस्टर्ब करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. ठाकरे ही गटबाजी कशी मोडतात, याकडे लक्ष लागून आहे.

माझ्या व्यावसायिक कारणामुळे यापुढे संघटनेचा अध्यक्ष राहणे मला शक्य नाही. नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करण्याबाबतचा निर्णय हे विद्यमान अध्यक्ष या नात्याने ज्येष्ठ आणि संस्थापक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाईल.
- अॅड. शिवाजी सहाणे, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजात मनुष्यबळ निर्मितीवर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व गव्हनर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचेही त्यांनी आदेश दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज या एकमेव ठिकाणी १०० विद्यार्थ्यांमागे ५०० रुग्णखाटा अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५४५ रुग्णखाटा आहेत.

गव्हनर्मेंट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल्सला पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यसेवेचा दर्जा वाढविणे, अध्यापक डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करणे, उपलब्ध सोयी-सुविधांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे, यामुळे शक्य होणार आहेत. पेशन्टस् आणि डॉक्टरांच्या हिताबरोबरच डॉक्टरांच्या सेवा व कर्तव्यामध्ये समतोल साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले असून त्याची पूर्तता करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून पाठपुरावा करीत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील विविध शासकीय मेडिकल कॉलेजेसमध्ये अध्यापकांची पदे निर्माण करताना संबंधित कॉलेज फक्त विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाते. ही विद्यार्थी संख्या ठरविताना संबंधित मेडिकल कॉलेजात आवश्यक रुग्णखाटांचे किमान प्रमाण भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिले आहे. तथापि, राज्यात बहुतांश गव्हनर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिलेल्या रुग्णखाटांपेक्षा कितीतरी जास्त खाटा उपलब्ध असून त्या सर्व रुग्णांना वैद्यकीयसेवा पुरविण्यात येते. अतिरिक्त रुग्णखाटांची सेवा करताना डॉक्टरांवर, विद्यार्थ्यांवरही ताण येतो. त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा टिकविण्यासाठी व डॉक्टरांवरील ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले आहेत.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार, गव्हनर्मेंट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल्समध्ये १ हजार रुग्णखाटा असल्यास तेथे २०० विद्यार्थीसंख्या असे प्रमाण आवश्यक आहे. प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. यात २०० एमबीबीएस विद्यार्थीसंख्या असलेल्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजही अपवाद ठरलेले नाही. अतिरिक्त रुग्णखाटांसाठी समप्रमाणात अध्यापक, वैद्यकीय विद्यार्थी, मनुष्यबळ यांची गरज आहे. हा समतोल साधण्यासाठी मनुष्यबळ निर्मिती करण्याचे आणि त्याचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेंट्रलाइज प्रवेशाबाबत पालक अनभिज्ञ

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

शहरात येत्या शैक्षणिक वर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज पद्धतीने राबविणार येणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कॅप राउंडमध्ये जाहीर होणाऱ्या कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. यामुळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे.

शहरातील दहावीची परीक्षा दिलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सायन्स, कॉमर्स शाखेत प्रवेश घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये एप्रिल २०१७ पासूनच प्रवेश घेतले आहेत. शहरातील अनेक नामांकित कोचिंग क्लासेसचे वर्गही सुरू झाले आहेत. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये शहरात सेंट्रलाइज पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने जाहीर केलेल्या वेबसाइटवर एकच प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना भरावा लागेल. कॅप राउंडनुसार, शहरातील सर्व कॉलेजेससाठी हा एकच अर्ज दाखल करावा लागेल. यानंतर शासनातर्फे गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून यात विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या कॉलेजमध्येच प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करतांना कॉलेजचा प्राधान्यक्रम दिल्यानंतर यातील कोणत्याही एकाच कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश निश्चित केला जाईल. पण संबंधित कॉलेज नाशिकच्या दुसऱ्या भागात असेल किंवा त्याच्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसपासून दूर असेल तर सायन्स किंवा कॉमर्स फॅकल्टीच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतले आहेत अशा विद्यार्थ्यांची कसरत होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक क्लासेस पाच ते सात तास लेक्चर्स घेत असल्याने पालक क्लासजवळील नामांकित कॉलेजेमध्ये घेऊन देण्याची दृष्टीने आपल्या पाल्याना सोयिस्कर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला पाठवितात. यंदाही अनेक पालकांनी त्याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना क्लासेसला पाठविण्यास सुरुवात केली. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा हवे ते कॉलेज मिळण्याची शक्यता कमी असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना क्लासेसच्या दृष्टीने कॉलेज निवडणे अवघड होणार आहे.

यंदाच्या अकरावी सेंट्रलाइज प्रवेशाबाबत क्लासेस किंवा कॉलेजेस पालकांना योग्य माहिती देत नसल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे. क्लासेस मात्र आपली तिजोरी फुल्ल करण्याचा नादात योग्य मार्गदर्शन करणे टाळत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे प्रवेश अर्जात विद्यार्थ्याने दिलेल्या कॉलेजेसच्या प्राधान्यक्रमांनुसार दूर अंतरावरील कॉलेज विद्यार्थ्याला देण्यात आले किंवा क्लासेसच्या वेळेत कॉलेजचा ताळमेळ साधणे शक्य होणार नसेल तर याचा मानसिक त्रास पालक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागू शकतो.

संलग्न कॉलेजेसचे धाबे दणाणणार!

शहरातील अनेक नामांकित प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे नॉन ग्रँट कॉलेजेससोबत संलग्न असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. संबंधित क्लासेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला संबंधित संलग्न कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो. विद्यार्थी आणि त्या कॉलेजचा संबंध केवळ परीक्षेपुरताच असतो, असे चित्र शहरात दोन वर्षात तयार झाले आहे. मात्र, सेंट्रलाइज अकरावी प्रवेशामुळे हे सर्व प्रकार थांबणार असून संलग्न कॉलेजेस आणि क्लासेसचे धाबे दणाणणार असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहाच्या नाण्यांवरून झडताहेत वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ देवळाली कॅम्प
एक‌ीकडे चलन टंचाई, एटीएममधील खडखडाट यामुळे नाशिककर हैराण झाले असतानाच आता दहा रुपयांची नाणी वटविताना नागरिकांची दमछाक होऊ लागली आहे. व्यवहारात दहा रुपयांची बोगस नाणी आल्याची वार्ता सर्वदूर पसरल्याने ही नाणी स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. विशेष म्हणजे एका राष्ट्रियीकृत बँकेनेही नाणी स्वीकारण्यास प्रारंभी नकार दिल्याने दोन शेतकऱ्यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. दहाच्या नाण्यांवरून निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दैनंदिन व्यवहारांमध्ये सध्या चलन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नोटांच्या तुटवड्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असताना पुरेसे चलन केव्हा उपलब्ध होणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे चलन टंचाईच्या झळा सोसवेनाशा होत असताना दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होऊ लागला आहे. व्यवहारात दहा रुपयांची बनावट नाणी आल्याची आणि त्यामुळे ही नाणी व्यवहारातून बाद ठरणार असल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने लोक आपल्याजवळील नाणी वटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, ही नाणी स्वीकारण्यास छोटे-मोठे व्यावसायिक नकार देत असल्याने नागरिकांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. याच गोंधळात आता बँकांचीही भर पडू लागली आहे. बँकांकडून ग्राहक दहा रुपयांचे क्वाइन स्वीकारत नसल्याने बँकाही ग्राहकांकडून असे नाणी स्वीकारण्यास नकार देऊ लागल्या आहेत. देवळाली कॅम्पमधील वडनेर रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शिवडे येथील दोन खातेदार शेतकरी गेले. त्यांच्याकडे दहा रुपयांची सात हजार रुपये किमतीची नाणी होती. ही सर्व नाणी एकाच वेळी स्वीकारण्यास बँकेने नकार दिला. त्यामुळे शिवाजी वाघ आणि नामदेव वाघ या दोन शेतकऱ्यांनी बँकेसमोरच आंदोलन सुरू केले. गर्दीची वेळ टाळून भरणा करण्यास येण्याबाबत त्यांना नंतर सांगण्यात आले. बँक प्रशासन दहाच्या नाण्यांचा भरणा स्वीकारत आहे. मात्र, तोच भरणा पुन्हा नागरिकांना वापरण्यासाठी देण्यात यावा, असे रिझर्व बँकेने सांगितले आहे. मात्र, ग्राहक ही नाणी स्वीकारण्यास तयार होत नसल्याने बँकांचीही डोकेदुखी वाढली आहे. संबंधित शेतकऱ्यांची नाणी स्वीकारण्यासाठी त्यांना दुपारी साडेतीननंतर येण्याची विनंती केल्याचा दावा बँक प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मोजणी यंत्राची गरज
संबंधित बँकेच्या शाखेत क्वाइन मोजणीचे मशीन नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली. तातडीने वेंडिंग मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

आमच्या बँकेत सर्वाधिक ग्राहक ग्रामीण भागातून येतात. त्यांच्याकडून भरणा होणारी नाणी स्वीकारणे आमच्यावर बंधनकारक आहे. मात्र दररोज मोठ्या प्रमाणावर नाणीरुपी चलन ठेवणे जोखमीचे झाले आहे. नागरिकांनीच चलनात अशी नाणी फिरती ठेवल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो.
- एस. के. धुळे, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया
आम्ही १० रुपयांची नाणी बँकेत घेऊन गेलो असता कॅशियरने आधी ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला. नंतर १० रुपयांची केवळ १०० रुपये किमतीची नाणी स्वीकारू असे सांगितले.
- नामदेव वाघ
बाजारात व्यवहार करताना अनेक ठिकाणी ग्राहक, तर काही ठिकाणी दुकानदारही १० रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत. यामुळे अनेकांच्या मनात या चलनाविषयी संभ्रम निर्माण होतो व यामुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत.
-प्रवीण पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’साठी येवल्यात फिल्डिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आगामी निवडणुकीचे येवला तालुक्यात वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला संचालक पदावर नजरा ठेवून असलेल्या तालुक्यातील इच्छुकांच्या आशा आकांक्षांना घुमारे फुटले आहेत.

‘मविप्र’ संस्थेची निवडणूक येत्या जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. येवल्यातून अनेक नावे चर्चेत असली तरी प्रामुख्याने जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता साहेबराव पा. सैद, नेत्रतज्ज्ञ डॉ. शशिकांत गायकवाड, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विश्वासराव आहेर यांच्यासह गेली अनेक वर्षे हे पद भूषविणारे विद्यमान संचालक अंबादास बनकर या चौघांची नावे सध्या आघाडीवर आहेत. या प्रबळ दावेदारांनी गाठीभेटींचा सिलसिला सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराणेशाहीचा बोलबाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

प्रस्थापित राजकीय पक्ष या ना त्या निमित्ताने एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करीत असतात. परंतु या घराणेशाहीपासून आता कोणीच दूर राहिलेले नाही. कधीकाळी काँग्रेस म्हणजे घराणेशाहीचा पक्ष अशी ओळख होती. मात्र आता सर्वच पक्ष घराणेशाहीच्या रंगात न्हाहून निघाले आहेत. येथील महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून, त्यात देखील या घराणेशाहीचाच बोलबाला असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीत सर्व पक्षांतर्फे नेतेमंडळीने आपली मुले, सुना, पत्नी, भाऊ, जावई यांना निवडणूक रिंगणात उतरव‌िले आहे. राजकीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी नेतेमंडळीसोबतची नातीगोती हा देखील महत्त्वाचा निकष ठरला आहे. मुस्ल‌िमबहुल असलेल्या पूर्व भागात आता जनता दलाचा प्रभाव निहाल अहमद यांच्या जाण्याने कमी झाला असला तरी त्यांचे पुत्र नगरसेवक बुलंद इक्बाल यांनी एकहाती किल्ला लढवला आहे. या निवडणुकीत ते स्वतः प्रभाग १२ मधून निवडणूक लढत असून, त्यांच्या विरोधात त्यांचेच बंधू इश्तियाक अहमद समाजवादी पक्षाकडून लढत आहेत. तर बुलंद इक्बाल यांची बहीण शानेहिंद निहाल अहमद या प्रभाग १५ मधून निवडणूक लढत आहेत. निहाल अहमद यांचे पुतणे अतिक कमाल (प्रभाग १५) राष्ट्रवादीकडून या रणधुमाळीत नशीब अजमावत आहेत.

निहाल अहमद यांच्या घराण्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. स्वतः शेख व त्यांच्या पत्नी माजी महापौर ताहेरा शेख (प्रभाग २०) निवडणूक लढवीत आहेत. या निमित्ताने शेख यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची काँग्रेसची खेळी आहे. त्यामुळे महापौरपदाचे स्वप्न ते पाहत आहेत. त्यांचे पुत्र शेख मो. खालिद शेख व त्यांच्या पत्नी शेख नसरीन बानो. मो. खालिद (प्रभाग २१) निवडणूक लढवीत आहेत. स्थायी समिती सभापती एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मिन बेग प्रभाग १६ मधून निवडणूक रिंगणात आहेत.

घराणेशाहीच्या या परंपरेत एमआयएम मागे राहिलेली नसून, उपमहापौर युनुस इसा यांचा कुटुंब कबिलाच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. स्वतः युनुस इसा (प्रभाग २१), त्यांचे तीनही चिरंजीव विद्यमान नगरसेवक मलिक इसा (प्रभाग १७ व २०), अब्दुल माजित (प्रभाग १८), डॉ. खालिद परवेज (प्रभाग २१) निवडणूक लढवीत आहेत. तसेच युनुस इसा यांच्या सुना तसलीम खालिद परवेज (प्रभाग १७) तर शेख बुशरा अब्दुल माजीद (प्रभाग २०) निवडणूक रिंगणात आहेत.

पश्चिममध्येही गोतावळा

इकडे पश्चिम भागात शिवसेना भाजप देखील याला अपवाद ठरलेले नाहीत. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष नगरसेवक सुनील गायकवाड (प्रभाग ९), त्याचे बंधू नगरसेवक मदन गायकवाड (प्रभाग ११) भाजपची धुरा सांभाळत आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेले स्वीकृत नगरसेवक सखाराम घोडके (प्रभाग ८) व त्यांच्या कन्या कल्पना वाघ (प्रभाग ११), भोसले कुटुंबातील ज्योती भोसले व त्यांचे दीर अनंत भोसले (प्रभाग ९) निवडणूक लढवीत आहेत. राज्यमंत्री दादा भुसे यांचे शालक जयराज बच्छाव शिवसेनेकडून (प्रभाग ११) निवडणूक रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनारोग्याचा ट्रॅक!

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

शरणपूररोड परिसरातील वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे या ट्रॅकचाच कचरा झाल्याची स्थिती दिसून येत आहे. या ट्रॅकच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचलेले असून, संपूर्ण पी अॅण्ड टी कॉलनी परिसरच कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या जॉगिंग ट्रॅकलगतच्या काही हॉटेल्समधील ओला व सुका कचरा ट्रॅकच्या पुढील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत टाकला जातो. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रॅकच्या मागच्या बाजूसदेखील अशीच स्थिती दिसते. अनेक दिवस हा कचरा पडून राहत असल्याने पी अॅण्ड टी कॉलनी परिसरात अस्वच्छतेसह दुर्गंधी पसरली आहे.

--

घंटागाड्यांचा उपयोगच नाही

शरणपूररोड परिसर व पी अॅण्ड टी कॉलनीत दिवसातून दोनहून अधिक घंटागाड्या येतात. परंतु, ट्रॅकमागील कचरा उचलण्यास ते लोक नकार देतात. कॉलनीतील किरकोळ कचराच उचलला जातो. परिसरातील एमराल्ड पार्क हॉटेेलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेस उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मोकळ्या जागेत हा कचरा पडून असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्याचा स्थानिकांसह रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही त्रास होत आहे.

--

लाइट, म्युझिक बंद

जॉगिंग ट्रॅकच्या काही भागात लाइट नाहीत, तसेच जॉगिंग ट्रॅकवर असणारी म्युझिक सिस्टीमदेखील बंद पडलेली आहे. ट्रॅकवर असणाऱ्या ग्रीन जिममधील काही उपकरणांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पी अॅण्ड टी कॉलनी परिसरातील रहिवाशांककून कचऱ्याच्या समस्येेमुळे व ट्रॅकवरील प्राथमिक सोयींच्या अभावामुळे लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित घटकांनी तातडीने उपाययोजना करण्याची भावना नागरिकांकडूून व्यक्त होत आहे.

--

ट्रॅकच्या मागच्या बाजूस अनेक दिवसांपासून कचरा साचलेला आहे. अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही. सकाळच्या वेळी जॉगिंग करताना या दुर्गंधीचा खूप त्रास होतो. महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी.

-संतोष शिंदे, स्थानिक रहिवासी

--

कोणतेही हॉटेल असले, तरी त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते याचा आढावा घेणेे महत्त्वाचेे आहे. पण, तसे होत नाही. नगरसेवकांनी या समस्येेप्रश्नी जातीने लक्ष घालायला हवे. शक्य असल्यास अॅप डेव्हलप करावा.

-रोहित केदार, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारीही दणाणताहेत हॉर्न!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहरात सोमवार हा नो हॉर्न डे म्हणून पाळण्यात येत आहे. मात्र, पंचवटीत रामकुंड परिसरात सोमवारीच सर्वांत जास्त प्रमाणात हॉर्न वाजविले जात असल्याचे आढळून येत आहे. सोमवारी येथे होणाऱ्या भाविकांच्या गर्दीने वाहतुकीची कोंडी होते. कोंडी झालेल्या वाहनांचे चालक जोरजोरात हॉर्न वाजवित असल्याने, तसेच वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे ध्वनी व वायू प्रदूषणाने भाविक त्रस्त होत आहेत.

सोमवारी रामकुंडावर स्नानासाठी आणि कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. विशेषतः सायंकाळी ही गर्दी वाढते, ती रात्री उशिरापर्यंत राहते. दुचाकीवर येणारे भाविक त्यांची वाहने कपालेश्वर मंदिराच्या समोरच्या भागात पार्क करतात. येथील मिठाई दुकानाच्या समोर रिक्षा स्टॅण्ड आहे. त्यामुळे पूर्वेला रिक्षा स्टॅण्ड, उत्तरेला दुचाकी वाहनांचे पार्किंग यांच्यामुळे मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड, गोदाघाट आणि पुरिया मार्ग येथून येणाऱ्या वाहनांना ये-जा करण्याचा मार्ग अरुंद होतो. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

ही कोंडी फोडण्यासाठी येथे वाहतूक शाखेचा एकही पोलिस कर्मचारी येथे नसतो. वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. या वाढलेल्या रांगेतील वाहनचालक जोरजोरात हॉर्न वाजवित असतात. त्यामुळे येथील ध्वनी प्रदूषणाची पातळी इतर दिवसांपेक्षा सोमवारी वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन निदान सोमवारी तरी येथे सायंकाळच्या वेळी वाहनांना बंदी करण्यात यावी. त्यामुळे कर्कश वाजणाऱ्या हॉर्नच्या त्रासातून नागरिकांची सुटका होईल, अशा प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

--

सोमवार हा नो हॉर्न डे म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मात्र, याच दिवशी रामकुंड परिसरात कर्कश हॉर्न वाजविले जातात. येथे वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी नसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली, की हॉर्न वाजू लागतात.

-सुरेश मानसिंघानी, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्याचा सहा जणांना चावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील काकासाहेब नगर (रानवड साखर कारखाना) येथे सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने सहा वर्षाच्या बालिकेसह एकूण सहा जण जखमी झाले. या कुत्र्याने दुभत्या जनावरनांवरही हल्ला केल्याने रानवड कारखाना परिसरात दहशत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यांनी घाबरलेल्या या परिसरात आता भटक्या कुत्र्यांची दहशत असल्याने नागरिक भयभीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रानवड कारखान्याने वीज बिल न भरल्याने या ठिकाणचे वीज कनेक्शन बंद आहे. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. सोमवारी रात्री अंधारातच गचाले वस्ती परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने बाहेर झोपलेल्या लोकांना चावा घेतला. पांडू वाघ (वय ७०), मीना वाघ (वय ४०), ताराबाई सोमवंशी (वय ७०), मधुकर गायकवाड (वय २५), सावित्रीबाई चव्हाण (वय ७०), आश्मिन शेख (वय ६) असे या जखमीचे नावे आहेत. या सर्व जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवून त्यांना प्रतिबंधक इंजेक्शन दिले असून उर्वरित तीन इंजेक्शन पालखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. शिंदे यांनी सांगितले

गणपत पवार या शेतकऱ्याच्या जवळपास एक लाख रुपये किमतीच्या बैलांनाही या कुत्र्याने गंभीर जखमी केले. यासह पसिरातील वासरू, बोकड आणि एका गाईलाही कुत्र्यानेे चावा घेतला. दरम्यान जीवघेणा हल्ला करणाऱ्या या पिसाळलेला कुत्र्याला परिसरातील नागरिकांनी पळवून लावले आहे. परिसरात रात्री वीज द्यावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ही कुत्री नाशिकची?

रानवड ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक महानगरपालिकेकडून नाशिक शहरात पकडलेली भटकी कुत्री गाडीत भरून ती रानवड परिसरासह अनेक गावांमध्ये सोडले जातात. तिच कुत्री जनावरांवर, नागरिकांवर हल्ला करतात.

नवरदेवही जखमी

मंगळवारी कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमींमधील मधुकर गायकवाड या तरुणाचे बुधवारी (दि.१७) लग्न आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याने तो घाबरला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्याने नियोजित लग्नविधी होणार असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरण कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यातील अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. परिणामी, वीजग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वीजग्राहकांची या गैरसोयीतून सुटका करण्यासाठी खंडित वीजपुरवठा तत्काळ सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी नुकतेच दिले आहेत. जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ‘शॉक’ बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिवेशनासाठी सेनेची जोरदार तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या समजून घेऊन त्यावर दीर्घोपयोगी उपाययोजना करण्यासाठी १९ मे रोजी सकाळी नऊ वाजता चोपडा सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे शिवसेना कृषी अधिवेशन २०१७ होणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नेते बुधवारी नाशिकमध्ये येणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांसह अधिवेशनात सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. निसर्गाचा कोप, दुष्काळ, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेना करीत आहे. अधिवेशन दोनच दिवसांवर येऊन ठेपले असून, शिवसेना नाशिक महानगराच्या वतीने त्यासाठीची तयारी सुरू आहे. अधिवेशनाला येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाहनव्यवस्था, निवासव्यवस्था, स्वागत कक्ष, नोंदणी कक्ष, खानपान व्यवस्था, आसनव्यवस्थेचा आढावा या वेळी घेण्यात येणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी बुधवारी सकाळी नाशिकमध्ये येणार आहेत. देसाई यांचे सकाळी दहाच्या सुमारास सरकारी विश्रामगृहावर आगमन होणार आहे. राऊत आणि चौधरी हेदेखील नाशिकमध्ये येणार असून, सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत ते शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांना वाढीव वीजबिलाचा भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावितरणच्या शहरातील कॉन्ट्रॅक्टरांनी वीजबिलाचे रीडिंग व वाटप उशिरा केल्याने शहरातील ग्राहकांना वाढीव बिलाचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

शहरात विभागनिहाय बिलाचे रीडिंग घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक केली आहे. या कॉन्ट्रॅक्टरांनी बिलाचे रीडिंग घेण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक केली असून, ते रीडिंग घेण्यासाठी वेळेवर येत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. बिलाचे रीडिंग वेळेवर घेतले गेले तर युनिटची संख्या कमी होते. मात्र उशिरा घेतले गेले तर युनिटची संख्या वाढते. युनिटच्या संख्येत वाढ झाल्याने बिलाचे टेरिफही बदलते. या बदललेल्या टेरिफचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागतो. शहरात सध्या ७ मे ते २३ एप्रिलदरम्यानच्या बिलांचे वाटप करण्यात आले आहे. ० ते १०० युनिटसाठी ३ रुपये ७६ पैसे आकारले जातात. १०१ ते ३०० युनिटसाठी ७.२१ पैसे आकारले जातात, तर ३०१ ते ५०० युनिटसाठी ९ रुपये ९५ पैसे आकारले जातात. एखाद्या ग्राहकाचे एक महिन्याचे बिल १०० युनिटच्या आत येत असेल तर त्याला ३ रुपये ७६ पैशाने विजेच्या बिलाची आकारणी केली जाते. मात्र वीजबिल ७ मे ते २३ एप्रिल या ४८ दिवसांचे पाठवल्यामुळे युनिटची संख्या शंभर युनिटच्या पुढे गेली आहे. विजेच्या युनिटमध्ये वाढ झाल्याने बिल ७ रुपये २१ पैसे दराने आकारले गेले. त्यामुळे ग्राहकांना एका युनिटमागे ३ रुपये ४५ पैशांचा नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयाकडे तक्रार केली असता, बिलिंगचे काम कॉन्ट्रॅक्टरकडे दिले असल्याने त्याला वेळ लागेल. तत्पूर्वी पैसे भरा, नंतरच्या बिलातून ते वळते केले जातील, असे सांगण्यात आले. ज्या ग्राहकांना जास्तीत जास्त ३०० रुपये बिल येत होते त्या ग्राहकांना सहाशे ते सातशे रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. संपूर्ण शहरात अशीच परिस्थिती असल्याने ग्राहकांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न पडला आहे. विजेच्या बिलाबाबत नेहमीच तक्रारी असताना मात्र ग्राहक संघटनादेखील ग्राहकांच्या या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही.

आमच्या परिसरातील अनेक ग्राहकांना अशा प्रकारची बिले आली आहेत. या बिलांचे फेर रीडिंग घ्यावे व कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे झालेला भुर्दंड आम्ही का सोसावा, याचे उत्तर महावितरणने द्यावे

- सीमा सूर्यवंशी, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरचे रस्ते होणार आता ‘हॅप्पी स्ट्रीट्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंदीरानगर वासियांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ रविवार दि. २१ रोजी शिवाजी महाराज चौक, इंदिरानगर येथे रंगणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या अनोख्या उपक्रमात डान्स, म्युझिक, खेळ या सगळ्यांची धमाल करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नभांगण लॉन्सपर्यंत तुम्हाला हे आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहेत.
‘हॅप्पी स्ट्रीट्स’वर सकाळी साडेसहा ते साडेनऊ हे या वेळेत सर्व वयोगटातील व्यक्तींना या मनोरंजनाच्या मेळ्यात सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शनमधून तुम्हाला रिलॅक्स करणारी ही ट्रीट ठरणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० यावेळेत इंद‌िरानगरला उपस्थित राहायचं आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िट‌िजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. इंदिरानगरचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.
इंदिरानगर येथे होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीटमध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉ‌पिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. यावेळी उपस्थितांना हे प्रकार करुन घेता येतील. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्य़ा साधनांचा वापर करायचा याची माह‌िती देणार आहे. रवींद्र जोशी व त्यांचे शिष्य बासरीवादन करणार आहे. हर्षल शिंदे हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहे. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटारवादन करणार असून, यावेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. सौरभ मानकर हे टॅटू आर्टिस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. बचपन गली या उफक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांना विस्मृतीत गेलेले खेळ खेळायला मिळणार आहेत. त्यात गोट्या, भोवरे, ठिक्कर, दोरीवरच्या उड्या इत्यादी खेळांचा समावेश असेल. प्रेमदा दांडेकर यांच्यातर्फे रांगोळीचे प्रशिक्षण दिले जाणार असून, विविध प्रकार कसे साकारायचे याचे प्राथमिक शिक्षण त्या आपल्या कलाकृतीतून देणार आहेत. पोलिस बॅण्डही यात सहभागी होणार आहे. नाशिकरोड येथील दंडे ज्वेल्सच्या वतीने महिलांचे ढोलपथक कला सादर करणार आहे. संकलेच्या ग्रुपच्या वतीने सेल्फी कॉर्नरचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटीच्या पाटील यांच्या वतीने कॅनॉपी स्टॉल, आयएनएफडीच्या वतीने लहान मुलांसाठी विविध अॅक्ट‌िव्ह‌िटीज, विजयराज यांचे जादूचे प्रयोग, भक्ती आणि मुक्तीच्या वतीने विविध प्रकारचे क्राफ्ट, आनंद हास्य क्लबच्यावतीने हास्याचे प्रकार शिकवले जाणार आहेत. श्रीशक्ती बचतगटच्यावतीने कापडी पिशव्यांचे मोफत वाटप होणार आहे. वैष्णवी मोरे या विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. हॅण्ड फाउंडेशनचा रॉक बॅण्‍ड हेही आकर्षण असेल. यावेळी लल‌ित महाजन आणि ग्रुप हे वेस्टर्न क्लासिकल गाणी सादर करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात सिन्नरला तिघे जखमी

$
0
0

सिन्नर : भोकणी शिवारात डावखर वस्तीजवळ मंगळवारी बिबट्याने खडी फोडणाऱ्या दोन मजुरांसह सहा वर्षांच्या बालिकेवर हल्ला करून तिघांना जखमी केले. जखमींवर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्या चाऱ्याखाली लपला असल्याचा संशय वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

खंबाळेतील भोकणीत मऱ्हळ रस्त्यावर भगवान सानप यांची वस्ती आहे. येथे रस्त्यालगत खडी फोडण्याचे काम करीत असताना तिघांवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. यामध्ये दयाराम नवले (वय ४०) भाऊसाहेब डावखर (वय ४७) व कोमल डावखर (वय ६) हे तिघे जखमी झाले आहेत. घटनेची गांभीर्यता लक्षात घेत वन कर्मचाऱ्यांनी सानप वस्तीजवळ पिंजरा लावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images