Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

माऊलीनगरला चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत पल्सरवरील चोरट्यांनी तोडून नेली. ही घटना पाथर्डी फाटा परिसरातील माऊलीनगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

शीतल सुनील रसाळ (रा. काळेनगर, आनंदवल्ली) यांच्या फिर्यादीनुसार, रसाळ ७ मे रोजी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी माऊलीनगर येथे गेल्या होत्या. रात्री आठ वाजेच्या सुमारास परत घरी परतत असताना पाथर्डी फाट्याजवळ ही घटना घडली. सप्तशृंगी हॉस्पिटल समोरून रसाळ पायी जात असतांना पल्सर दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची व सुमारे ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत तोडून नेली.

तरुणावर हल्ला

लग्नामध्ये नाचण्यावरून झालेल्या भांडणाची कुरापत काढून पाच जणांच्या टोळक्याने घरात घुसून एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना गौतमनगर परिसरात घडली. कोयत्याने वार करण्यात आल्याने संबंधित तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये प्राणघातक गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल दिनकर पांडव (रा. गौतमनगर, उपनगर) या तरुणाच्या तक्रारीनुसार१२ मे रोजी ही सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विशाल आपल्या घरात असतांना परिसरातील संशयित गौतम पाईकराव, गौरव डोळस, इश्‍वर वाघमारे, पप्पू डोळस, सोनू वाहुळे (सर्व रा. गौतमनगर परिसर) आदी घरात घुसले. नेहरूनगर येथे लग्नामध्ये नाचण्यावरून झालेल्या भांडणाची कुरापत काढून विशाल पांडव यास लाकडी दांडक्याने बेदम

मारहाण केली. तर गौतम पाईकराव याने कोयत्याने डोक्यावर हल्ला केला.

अंबडला पादचारी ठार

भरधाव डंपरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंबड एमआयडीसीतील दत्तनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी डंपर चालक इजाज शेख रसूल शेख याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब कारभारी गांगुर्डे (५२, रा. दातीरनगर, अंबड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गांगुर्डे कामावरून घराकडे परतत असताना ही घडना घडली. दत्तनगर येथील पुलावर पाठीमागून आलेल्या भरधाव आलेल्या डंपरने (एमएच ०४ डीके ३२५१) त्यांना जोरदार धडक दिली. यात गांगुर्डे यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दहशतखोरांना अटकेनंतर तात्काळ जामीन

पंचवटी : किशोर सूर्यवंशी मार्ग आणि मखमलाबाद लिंक रोड परिसरात दहशत माजविणाऱ्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, त्यांना कोर्टातून गुरूवारी जामीन मंजूर झाला. चौघा संशयितांकडून दुचाकी व धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुष्पक शिंगाडे व अक्षय वाघ हे दोघे किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओंकार बंगल्यासमोर तर शांतीदूत लोखंडे व प्रवीण काकड हे चाणक्य सोसायटी परिसरात हातात धारदार शस्त्र घेवून मोठमोठ्याने ओरडून दहशत माजवितांना आढळून आले होते. घटनेचा अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजा तस्कराच्या कोठडीत २२ पर्यंत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गांजाची तस्करी करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत २२ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गोवा येथील संशयित महिलेची चौकशी सुरू असून, तिला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मागील आठ महिन्यांपासून संशयित आरोपी गोवा येथील महिलेच्या संपर्कात असल्याचे समोर आले असून, सर्व संशयितांच्या मोबाइल कॉल्सचे डिटेल पोलिस तपासणार आहेत.

द्वारका परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या सोलापूर येथील तस्कारास मुंबई नाका पोलिसांनी १२ मे रोजी बेड्या ठोकल्या होत्या. मंगलदास बाळासाहेब आखाडे (रा. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित तस्कराचे नाव आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आखाडेस १७ मे रोजी कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आखाडेच्या कोठडीत २२ मेपर्यंत वाढ केली. दरम्यान, आखाड्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठ महिन्यापासून तो क्रिस्टीना डिसुझा (रा. कलंगुट, गोवा) या महिलेसाठी काम करतो. मंगळवारी मुंबई नाका पोलिसांनी तिला गोवा येथून अटक केली. तिला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली असून, तिची मुदत १९ मेपर्यंत आहे.

कॉल्स डिटेल्सकडे लक्ष

क्रिस्टीनाने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. आखाडे हा स्वतंत्र तस्करीचे काम करतो. त्याचाशी संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. तर, आखाडेने मात्र क्रिस्टीनाकडूनच गांजा घेतल्याचे कबुली पोलिसांना दिली आहे. दरम्यान, यातील तथ्य शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयित आरोपींचे मोबाइल कॉल्स डिटेल्सवर भर दिला आहे.

मुख्य डिलर क्रिस्टीना

संशयित आरोपी आखाडे आठ महिन्यांपासून क्रिस्टीनासाठी काम करतो. क्रिस्टीना मुख्य डिलर असून, तिच्याकडून घेतलेला गांजा तो ठिकठिकाणी पुरवतो. क्रिस्टीनाचा पती स्टीफन हा देखील गांजा तस्करीचे काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. सध्या तो तळोदा जेलमध्ये बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीसाठी फसवणूक

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नोकरी देण्याचे अमिष दाखवून रुपाली सिध्देश्वर शिरुरे (रा. प्लॅट नं. २, वृषाली अपार्टमेंट, गजपंथ सोसायटी, म्हसरुळ) या महिलेने १६ जणांकडून १४ लाख २० हजार रुपये उकळून फसवणूक केली. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात सोपान विठ्ठल ठाकरे यांनी फिर्याद नोंदविली आहे.

सोपान विठ्ठल ठाकरे (२७, रा. फ्लॅट नं. ४, बालाजी अपार्टमेंट, एस्सार पेट्रोल पंपामागे, दिंडोरी रोड) यांची रुपाली शिरुरे यांच्याशी ओळख झाली. ठाकरे यांचे इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असून ते अंबडला खासगी कंपनीत कामाला आहेत. शिरुरे यांनी आपली मिलिटरी ऑफिसमध्ये ओळख असल्याचे सांगून माझे मामा दिगंबर कामत हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. गोव्यात इंजिनीअरची गरज असल्याने तेथे तुम्हाला नोकरी मिळून देते, असे सांगून तीन लाख रुपयांची मागणी केली. कामापूर्वी आणि काम झाल्यानंतर प्रत्येक वेळी दीड लाख रुपये लागतील, असे शिरूरे यांनी सांगितले. मात्र, एवढे पैसे देणे शक्य नसल्याचे ठाकरे यांनी सांगितल्यानंतर शिरुरे यांना त्यांच्या बँक खात्यावर ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. ठाकरे यांच्यासह त्यांचा मित्र प्रकाश सुधाकर जगताप (रा. लासलगाव, ता. निफाड) यांनीही नोकरीसाठी ५० हजार रुपये भरले. त्यानंतर शिरुरे यांनी गोवा एक्स्प्रेसच्या तिकिटासाठी एक हजार ८०० रुपयांची मागणी केली. या दोघांनी तिकिटाचे पैसेही दिले. अगोदर तिकिट व्हॉट्सअॅपवर पाठविले. नंतर तिकीट कर्न्फम होत नसल्याने गाडीने जाऊ तसेच सध्या गोव्यात निवडणूका असल्यामुळे पुढच्या महिन्यात जावे लागेल असेही सांगितले. नंतर तिने ठाकरे यांच्याकडे इमेल आयडी मागितला. त्यावर त्यांनी परीक्षेचे शेड्यूल्ड पाठविले. २१ मे २०१७ रोजी मुंबईला परीक्षा असल्याचे सांगितले.

ठाकरे यांनी गजपंथ येथे त्यांच्या फ्लॅटवर जाऊन भेट घेण्याचे ठरविले; मात्र त्यांच्या फ्लॅटला कुलूप असल्याचे दिसले. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हसरुळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्याप्रमाणेच यशवंत नंदकुमार खोलमकर, संध्या म्हस्के, भाग्यश्री म्हस्के, विनोद वायकर, तुषार पवार, जगदीश डहाळे, छाया जगदीश डहाळे, बाळासाहेब पवार, अक्षय सोनवणे, संतोष लोहार, किरण हिरे, सुरेश सावंत, अमित भोईल, विजय खोलमकर यांच्याकडूनही तिने नोकरी लावून देते असे म्हणून वेळोवेळी चेकद्वारे ८ लाख ४९ हजार आणि आरटीजीएसद्वारे ६ लाख २१ हजार असे एकूण १४ लाख २० हजार रुपये डिसेंबर २०१६ ते १७ मे २०१७ या कालावधीत उकळले असल्याचे ठाकरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयपीएल’वर नाशकातून सट्टा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या आठ जणांच्या टोळीला क्राइम ब्रँचच्या युनिट एकने जेरबंद केले. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी नागपूरहून सर्व संशयित नाशिकमध्ये दाखल झाले. कोलकाता नाइट राइडर्स विरूध्द सनराइजर हैदराबाद संघाच्या आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्यावर बेटिंग सुरू असताना पोलिसांनी छापा मारून संशयितांना जेरबंद केले.

वडाळा परिसरातील एक बंगला भाड्याने घेऊन संशयितांनी जुगाराचा उद्योग सुरू केला होता. संशयितांच्या ताब्यातून सुमारे चार लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकेश उर्फ लकी मनोहरलाल खत्री (३३, रा. रतन गोवर्धन अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०३, चिटणीस पार्क चौकाच्या मागे, महल, नागपूर), शरद मोहन नाकोते (४६, रा. गणेश अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०१, जुने शुक्रवारी, नागपूर), महम्मद शहबाज महम्मद इजाज शेख (२७, रा. जोहरीपुरा, न्यू शुक्रवारी रोड, महल, नागपूर), राजेश लक्ष्मण काळे (४५, रा. गोरोबा मैदान, सीए रोड, वर्धमाननगर, सुगंध बौद्ध विहारनगर, नागपूर), साजीद वाहेद बख्त (३०, रा. कालिमंदिराजवळ, गोंदिया), अमित रमाकांत त्रिवेदी (३३, रा. इलेक्‍ट्रॉनिक मार्केट, सीताबर्डी, नागपूर), सुरज कलाया कमती (४०, रा. बेलॉनबगी, टोनबेहडा, जि. दरबंधा, बिहार), राजेश नथुनी कमती (२२, रा. सुहद, बेहडा, जि. दरबंधा, बिहार) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून, सर्वांच्या नजरा अंतिम दोन संघाच्या लढतीकडे लागल्या आहेत.

कोलकाता नाइट राईटर्सविरुद्ध सनराईज हैदराबाद या दोन संघांमध्ये बुधवारी (दि. १७) रात्री चुरशीचा सामना झाला.

या सामन्यावर जुगाल लावला जात असल्याची माहिती युनिट एकचे कर्मचारी स्वप्निल जुंद्रे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी वडाळा परिसरातील विधातेनगरमधील ठक्कर इस्टेट येथील बंगल्यावर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी ७९ मोबाइल, तीन लॅपटॉप, एलइडी टीव्ही, एक सेटटॉप बॉक्‍स, एक लाख २० हजार रुपयांचे पाच पांढऱ्या रंगाच्या लोखंडी लाईन पेट्या, ज्यावर मोबाइल चार्ज करण्याची तसेच स्पिकर लावण्याची व्यवस्था होती. दोन पेनड्राईव्ह, ६६ लहान मोबाइल व १३ मोठे मोबाइल हॅण्डसेट, रेकॉर्डर, नेटसेटर असा सुमारे चार लाख २२ हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, क्राइम ब्रँचचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहाय्यक निरीक्षक नागेश मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, संजय पाठक, जाकीर शेख, अनिल दिघोळे, संजय मुळक, शंकर गडदे, स्वप्निल जुंद्रे, विशाल काटे, विशाल देवरे, शांताराम महाले, निलेश भोईल, गणेश वडजे, श्रीकांत साळवे, निर्मला हाके, फरिद शेख, संजय सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

कोर्टातून लागलीच जामीन

सर्व संशयितांना गुरूवारी कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, त्यांची लागलीच जामीनावर सुटका करण्यात आली. नागपूरमध्ये संशयित नेहमीच पोलिसांच्या रडारवर असतात. यापूर्वी, त्यांच्यावर अशी कारवाई झाली आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी नाशिकचा रस्ता पकडला होता. मात्र, क्राइम ब्रँचला एक टिप मिळाली अन् संशयितांचा भांडाफोड झाला. नागपूरमधील अनेक जणांशी संशयित संपर्कात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीए, एमसीए कार्यशाळा उद्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता एमबीए व एमसीए प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यशाळा होणार आहे. यात तज्ज्ञांकडून एमबीए व एमसीए प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती दिली जाणार आहे.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रिया समजावून सांगितली जाणार आहे. तसेच सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्रके तपासणी, नोंदणी व अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक सहभागी विद्यार्थ्यांनी येताना सोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन आल्यास ऑनलाइन नोंदणीसाठी मार्गदर्शनही केले जाईल.

उद्योग व्यवस्थापन आणि आयटी, सॉफ्टवेअर या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही कार्यशाळा विनाशुल्क आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नारायण दीक्षित व प्रभारी संचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अपर्णा हवालदार (९३७११८०९४१) किंवा नितीन चौधरी (९४२१५१३६९२)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य शिक्षणात व्हावा आधुनिक तंत्राचा वापर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य शिक्षणात आधुनिक तंत्राचा वापर व्हावा, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. हेल्थ सायन्सेस एज्युकेशन टेक्नॉलॉजी या विषयावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर उपस्थित होते.

कार्यशाळेबाबत माहिती देतांना कुलगुरू म्हैसेकर म्हणाले, की आज वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यासाठी उच्च दर्जाच्या संशोधनाची गरज आहे. आरोग्य क्षेत्रात विविध कौशल्य आत्मसात करून प्रगती करावी, शिक्षणात आधुनिक तंत्राचा वापर व्हावा या अनुषंगाने कार्यशाळा होत आहे.

विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले, की वैद्यकीय क्षेत्रात अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडविण्यासाठी योग्य शिक्षण व मार्गदर्शन गरजेचे आहे. त्यासाठी या विषयातील तज्ज्ञ व शिक्षकांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेद्वारे अद्ययावत माहितीची देवाण-घेवाण करावी. तसेच अद्ययावत ज्ञानाचा अधिकाधिक वापर करून समस्यांचे निराकरण केले पाहिजे, असे सांगितले.

विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले, की विद्यापीठाचा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड टिचर्स ट्रेनिंग अंतर्गत कार्यशाळा होत आहे. यात डोमेन अॅण्ड टॅक्झॉलॉजी, फेनॉमेनॉन ऑफ लर्निंग अॅण्ड प्रिंसिपल ऑफ अडल्ट लर्निंग, कम्युनिकेशन स्किल, मायक्रोटिचिंग, टिचिंग स्मॉल ग्रुप, एन्ट्रोडक्शन टिचिंग मेथड, असेसमेंट ऑफ नॉलेज : स्ट्रक्चर अॅण्ड ओरल एक्झामिनेशन, प्रॅक्टिकल रिलेटेड इश्यू, इंटरग्रेटेड टिचिंग अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत डॉ. पायल बन्सल, डॉ. एस. यू. मुंघल, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. श्वेता तेलंग, डॉ. प्रशांत शिवगुंडे, डॉ. दीपांजली लोमटे मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. पायल बन्सल यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला तालुक्यात पाणीसंकट गडद

0
0

२४ गावे, ३ वाड्यांना १० टँकरद्वारे पुरवठा

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या एप्रिल महिन्यापावेतो मोठी तग धरणाऱ्या येवला तालुक्याला आता पाणीटंचाईची मोठी झळ बसू लागली आहे. गेल्या तीनचार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यातील टंचाईची धग कमी असली तरी, मे महिन्यातील वाटचालीत तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावे टंचाईच्या फेऱ्यात अडकली आहेत.

पालखेडच्या नुकत्याच मिळालेल्या पिण्याच्या पाणी आवर्तनामुळे एकीकडे येवला शहरासह ग्रामीण भागातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट गावांचा उन्हाळ्यातील प्रश्न मार्गी लागला आहे. तर दुसरीकडे तालुक्याच्या ग्रामीण भागातील उर्वरित अनेक तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. टंचाईग्रस्त गावांमधून पाणी टँकर सुरू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव येवला पंचायत समिती दरबारी येताच मंजुरी मिळालेल्या गावे अन् वाड्या वस्त्यांवर टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील २४ गावांसह ३ वाड्यांना सध्या एकूण १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

येवला तालुक्याला गेल्यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे यंदाच्या उन्हाळ्यात बरेच दिवस सावरले होते. तालुक्यातील गतवर्षीचा पाऊस, जलयुक्त शिवार योजनेचा मोठा हातभार लागला. त्यानंतर मात्र पुढे चित्र बदलत तालुक्यातील अनेक गावांचे जलस्रोत आटल्याने आता एप्रिल मध्यानंतर बरीच गावे व वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. विशेषतः पालखेडचा कमांड एरिया नसलेल्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य तीव्रतेने जाणवू लागल्याचे चित्र समोर आले आहे. तेथील विहिरींनी तळ गाठलेल्या गावांमधून साहजिकच ‘पाणी द्या हो,पाणी’ अशी आर्त साद घातली जात आहे.

तालुक्यातील काही गावांची तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी नुकतीच संयुक्त पाहणी केली असून, उर्वरित गावांची पाहणी येत्या दोन दिवसांत केली जाणार आहे. पिण्यासाठी पालखेडचे नुकतेच पाणी आवर्तन देताना या आवर्तनातून जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील २७ गावांपैकी तब्बल १६ प्रासंगिक गावे यंदा वगळली नसती, तर तालुक्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या घटली असती. त्यामुळे पुढील वर्षीचे पालखेडच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना तालुक्यातील प्रासंगिक गावांच्या पाणी आरक्षणाची नितांत गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमध्ये आयपीएल फॅन पार्क्स

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना क्रिकेटच्या चाहत्यांची उत्सुकता अधिक ताणली जात आहे. नाशिक येथे आयपीएल फॅन पार्कचे २१ मे रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम, जिल्हा न्यायालयाच्या समोर, महात्मा गांधी रोड येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजन करण्यात येणार आहे.

आयपीएल सामन्यांचे हे विक्रमी दहावे वर्ष असून, यापूर्वी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या फॅन पार्क्सच्या संकल्पनेची सलग तिसऱ्यांदा पुनरावृत्ती होणार आहे. दहाव्या वर्षाला साजेसे असे भव्यपण यंदाच्या फॅन पार्क्समध्ये पहावयास मिळणार आहे. २०१५ साली पहिल्यांदा देशातील १६ शहरांमध्ये हे फॅन पार्क्स उभारण्यात आले होते. नाशिकमध्ये २०१५मध्येही अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यावेळी नाशिककरांनी प्रचंड गर्दी करून आनंद लुटला होता. मागील वर्षी सलग दोन दिवस फॅन पार्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

यंदाच्या वर्षी २१ राज्यांतील ३६ शहरांमध्ये असे फॅन पार्क्स उभारून देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेटच्या चाहत्यांना प्राणप्रिय असलेला क्रिकेटचा खेळ एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने बघण्याची संधी मिळणार आहे. या शहरांमध्ये भुवनेश्वर, बरेली, कोच्ची, लुधियाना, टुमकूर, नागरकोइलसारख्या १४ शहरांचा पहिल्यांदाच समावेश केला गेला आहे. तसेच शिमला, शिलाँगसारख्या क्रिकेटवेड्या शहरांमध्येही पहिल्यांदाच असे आयोजन केले जात आहे.

प्रत्येक ठिकाणी भव्य आकाराच्या एलईडी स्क्रीन्सवर क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून, दर्शकांना आपल्या शहरांत अगदी स्टेड‌ियमसारखा थरार अनुभवता येईल. या पार्क्समध्ये प्रवेश निःशुल्क असून संगीत तसेच विविध स्टॉल्समधून खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू तसेच आयपीएलच्या प्रायोजकांकडून इतरही अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी या फॅन पार्क्समध्ये तब्बल तीन लाख लोकांनी आयपीएलच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतला होता. यंदा आयपीएलच्या दहाव्या आवृत्तीसाठी फॅन पार्क्सच्या प्रेक्षकसंख्येत अधिक भर पडावी या हेतूने सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी अधिवेशनातून सेनेचा भाजपवर नेम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सत्तेत येण्यासाठी तपोभूमीत महाअधिवेशन घेणाऱ्या शिवसेनेने राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या एल्गारासाठी पुन्हा नाशिकचीच निवड केली आहे. शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये भव्य कृषी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी चळवळीचा प्रारंभ केला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही बळ लाभणार असून, हे दोन्ही नेते सरकारविरोधातील आक्रमकतेची नव्याने पायाभरणी करणार आहेत. शिवसेनेच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या भाजपला निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरेंकडून नाशिकमध्ये दिला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संघर्षयात्रा काढून युती सरकारच्या काळात आपणच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरुवातीपासून आग्रही असलेली शिवसेना काहीशी पिछाडीवर फेकली गेली. कर्जमाफीसाठी राजीनामे खिशात घेऊन फिरणारे मंत्रीही गपगार झाल्याने शिवसेनेच्या भूमिकेबद्दल राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ग्रामीण टापू हातचा जाण्याची भीती असल्याने शिवसेना कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाली. या आक्रमकतेसाठी शिवसेनेने कृषी अधिवेशनाची निवड केली असून, राज्यात कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या वतीने चळवळ उभी केली जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या चळवळीचा प्रारंभ तपोभूमीतून होणार आहे. यासाठी शिवसेनेने भाजपपासून दुरावलेल्या व शेतकऱ्यांमध्ये चांगली प्रतिमा असलेल्या राजू शेट्टींचे बळ सोबतीला घेतले आहे. काँग्रेसचे विनायकदादा पाटील यांनाही यात सहभागी करून घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी शुक्रवारी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यासह भाजपला थेट निर्वाणीचा इशारा देणार असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांसह भाजपला या अधिवेशनातून थेट इशाराच दिला जाणार असून, उद्धव ठाकरेंसह शेट्टी सरकारसंदर्भात निर्णायक भूमिका जाहीर करणार असल्याचा दावा पक्षातीलच काही नेत्यांनी केल्याने अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

अधिवेशनावर भाजपचा वॉच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने अधिवेशन आयोजित केले असले तरी, सेनेचा नेम हा भाजपवर असणार आहे. या अधिवेशनाचे मुख्य लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या अधिवेशनावर भाजपचा वॉच राहणार असून, भाजपनेही आपले काही सैनिक या अधिवेशनात तैनात केले आहेत. अधिवेशनात येणाऱ्या शिवसैनिकांसह शेतकऱ्यांच्या हालचालींवर भाजपचे लक्ष राहणार असून, त्याचे थेट मुख्यमंत्र्याना रिपोर्टिंग राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाएेेवजी व्हावेत रिंगरोड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे महामार्गावर द्वारका ते दत्त मंदिररोडवरील उड्डाणपुलाचा नकाशा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत आता टीकेचे सूरही व्यक्त होत आहेत. या पुलापेक्षा रिंगरोड करण्यावर भर देण्याचा युक्तिवादही केला जात असून, वाहतूक अभ्यासक अजित पतकी यांनी या उड्डाणपुलावर टीका करणारे एक पत्रच प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे, की केंद्रीय मंत्री ​नितीन​ गडकरी यांनी ​ठरवलेल्या​ या पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे.​ या पुलाचा जो नकाशा प्रकाशित झाला त्याप्रमाणे जगात कुठेही एक्स्प्रेस रस्त्यावर टी पॉइंट बांधला गेला नाही. या पुलावर तो राहणार असून, ते हास्यस्पद व नाशिककरांची थट्टा करणारे आहे.

पतकी यांनी म्हटले आहे, की पुणे रस्त्याहून नाशिक, धुळे, मुंबई व वापीकडे जाणाऱ्या वाहनांना थेट मार्ग उपलब्ध करणे, तसेच स्थानिक वाहतूक सुरक्षित करणे यासाठी हा उड्डाणपुलाचा उपाय वरकरणी योग्य वाटत असला, ते योग्य नाही. पुण्याकडून येणारी वाहने दत्त मंदिरकडून पुलाद्वारे थेट पाथर्डी व आडगावकडे वळवली जाऊ शकतात. त्यासाठी पुलाद्वारे सध्या उपलब्ध असलेल्या रिंग रुटला कनेक्ट करून या पुलाचा खर्च कमी करता येऊ शकतो. आजकाल दिल्ली काय किंवा अजून कुठलेही मोठे शहर काय, शहरे प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी बाहेरील वाहतूक आउटर बायपासमार्गे वळविणे हा राजमार्ग बनला असताना आपल्या शहरात मात्र यावर कुणीही विचार करत नाही.

--

बाहेरून वळवावी ‘ती’ वाहतूक

नाशिक शहराशी ज्याचा संबंध नाही अशी सर्व वाहतूक बाहेरून वळवून शहरातील प्रदूषण, वाहतूक कोंडी टाळता येऊ शकते. अशाने धुळे-मुंबईकडची, तसेच पेठ, दिंडोरी, वापीकडची वाहतूकसुद्धा रिंगरोडवरून वळवता येईल.​ दत्त मंदिर येथून थेट पूल काढून तो दोन बाजूंना विभागून शहराची वाहतूक बाहेर वळविणे शहाणपणाचे ठरेल. एका बाजूला औरंगाबादरोड प्रशस्त असल्याने त्याकडे धुळ्याची वाहतूक वळवावी व दुसरीकडे मुंबई, वापीसाठी थेट पाथर्डी फाटा येथे मिळण्यासाठी पूल वाढवावा. यात कुठेही स्थानिक वाहतूक प्रदूषित न करता शक्य तेथे थेट मुंबई ओव्हरब्रिजला मिळवावी, असेही पतकी यांनी म्हटले आहे.

--

५०-१०० वर्षांचे व्हावे नियोजन

एसटी महामंडळास त्यांचे सर्व स्टॉप्स, स्थानके, शहराच्या रिंग रुटवर नेण्यास सांगावे. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल, प्रदूषण वाचेल. सर्व मोठ्या शहरांत अशीच व्यवस्था आहे. खासगी लक्झरी बसेसनाही तसेच भाग पाडावे. ​आजपर्यंत कुणाच्या तरी बळाने झुकणाऱ्या या शहराला आता मोकळा श्वास महत्त्वाचा ठरतोय. त्यासाठी आगामी ५०-१०० वर्षांचे नियोजन हवे. आता दत्त मंदिर-द्वारका पूल बांधून ​पुढच्या पिढीला अनेक ​वर्षे पुन्हा स्थानिक ​वाहतुकीच्या​​ ​घोळात ​​लोटण्या​पेक्षा अनेक पर्यायांवर विचार करावा, असेही पतकी यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वामी नारायण’चा डोम अनधिकृत

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

स्वामीनारायण मंदिर ट्रस्टच्या साडेतीन एकर जागेवर व्हीआयपी लग्न सोहळ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून कायमस्वरूपी अत्याधुनिक सुविधा असलेले डोम मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. पण ते बांधताना महानगरपालिका प्रशासनाची परवानगी घेतलेली नसल्याने नगररचना विभागाने बेकायदेशीर बांधकामांबाबत नोटीस बजावली आहे.

नवीन आडगाव नाका येथील तपोवन परिसरातील साडेतीन एकर जागेत अत्याधुनिक सुविधा असलेले डोम उभे केले आहे. या ठिकाणी शहरातील अनेक प्रतिष्ठ‌ित कुटुंबांचे विवाह सोहळे होतात. येथे विविध देशांतील प्रसिध्द इमारतींच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून, संपूर्ण हॉल एसी आहे. येथे एका दिवसासाठी तब्बल साडेसात लाख रुपये भाडे आकारले जाते. शिवाय जेवण आणि इतर सुविधांचे वेगळे पैसे घेतले जातात. मंगल कार्यालय भाड्याने घेतल्यानंतर कच्च्या पावत्या दिल्या जातात, ज्यात ट्रस्टचा उल्लेख नसतो. काही राजकीय हस्तींना हा हॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याचीही चर्चा आहे. या बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावून १५ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. खुलासा न केल्यास अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, असेही नोटिशीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅप्पी स्ट्रीटसाठी इंदिरानगर सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगरच्या हॅप्पी स्ट्रीट सिझन ३ ला अवघे दोन दिवस बाकी असून, इंदिरानगरवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या हॅप्पी स्ट्रीटमध्ये नक्की काय असणार याची सातत्याने विचारणा होत असून, ‘महाराष्ट्र टाइम्स’चा हा मनोरंजनाचा धमाका अनुभवण्याची उत्सुकता लागली आहे. इंदिरानगरला होणारा हॅप्पी स्ट्रीट स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातर यंदाच्या वर्षी प्रथमच होत असून, येथील मंडळींनी हॅप्पी स्ट्रीटसाठी आतापासूनच तयारी केली आहे.

हॅप्पी स्ट्रीट्समध्ये सर्व वयोगटांतील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शनमधून तुम्हाला रिलॅक्स करणारी ही स्ट्रीट ठरणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची गरज नाही. रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत इंद‌िरानगरला उपस्थित राहायचं आहे. टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िट‌िजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. इंदिरानगरचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.

राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉ‌पिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. यावेळी उपस्थितांना हे प्रकार करुन घेता येतील. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्य़ा साधनांचा वापर करायचा याची माह‌िती देणार आहे. रवींद्र जोशी व त्यांचे शिष्य बासरीवादन करणार आहेत. हर्षल शिंदे हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहेत. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटारवादन करणार असून, यावेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. सौरभ मानकर हे टॅटू आर्टिस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. बचपन गलीत गोट्या, भोवरे, ठिक्कर, दोरीवरच्या उड्या इत्यादी खेळांचा समावेश असेल. प्रेमदा दांडेकर यांच्यातर्फे रांगोळीचे प्रशिक्षण दिले जाणार असून, विविध प्रकार कसे साकारायचे याचे प्राथमिक शिक्षण त्या आपल्या कलाकृतीतून देणार आहेत. पोलिस बॅण्डही यात सहभागी होणार आहे. नाशिकरोड येथील दंडे ज्वेल्सच्या वतीने महिलांचे ढोलपथक कला सादर करणार आहे. संकलेच्या ग्रुपच्या वतीने सेल्फी कॉर्नरचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटीच्या पाटील यांच्या वतीने कॅनॉपी स्टॉल, आयएनएफडीच्या वतीने लहान मुलांसाठी विविध अॅक्ट‌िव्ह‌िटीज, विजयराज यांचे जादूचे प्रयोग, भक्ती आणि मुक्तीच्या वतीने विविध प्रकारचे क्राफ्ट, आनंद हास्य क्लबच्यावतीने हास्याचे प्रकार शिकवले जाणार आहेत. श्री शक्ती बचतगटच्या वतीने कापडी पिशव्यांचे मोफत वाटप होणार आहे. वैष्णवी मोरे या विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. हॅण्ड फाउंडेशनचा रॉक बॅण्‍ड हेही आकर्षण असेल. यावेळी लल‌ित महाजन आणि ग्रुप हे वेस्टर्न क्लासिकल गाणी सादर करतील. आशा घोडके या पियानो आर्टीस्ट तेथे आपले वादन पेश करणार आहेत, रश्मी यांनी लाहान मुलांसाठी सेल्फि कॉर्नरचे आयोजन केले आहे. शंकर केडेरा यांच्यावरीने कराओके सिंगींग इन्सट्रूमेंमट यांच्या सोबत असणार आहे त्याच्या माध्यमातून लोकांनी नव्या जुन्या हिंदी गाणे ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. कैलीस परदेशी हे स्ट्रीट पेन्टींग करणार आहेत. मोहीनी येवलेकर या सापशिडी व इतर खेळ उपस्थितांकडून खेळवून घेणार आहे. विक्रम दराडे हे मार्शल आर्टची प्रात्यक्षिके दाखवणार आहे. प्रतिक हिंगमिरे आणि त्यांच्या ग्रुपतर्फे फिटनेस डान्सचे सादरीकरण केले जाणार आहे.

कलाकारांनी येथे संपर्क साधावा

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ टॉप ट्वेंटीत!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शॉर्ट फिल्म थिएटर ह्यांच्या वतीने शॉर्ट फिल्म फेस्टिवल (ओएसएफ) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महोत्सवात नाशिकच्या ‘इन सर्च ऑफ विठ्ठल' (शोध विठ्ठलाचा) या लघुपटाने राष्ट्रीय पातळीवर अंतिम २० मध्ये स्थान पटकवण्याचा बहुमान मिळवला. या फेस्टिव्हलमध्ये संपूर्ण भारतातून विविध भाषांतील ८०० पेक्षा जास्त लघुपट दाखविण्यात आले. यापैकी शॉर्ट फिल्म थिएटरच्या वतीने अंतिम २० लघुपटांची निवड एसएफटीच्या परीक्षकांनी केली.

‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ हा वारीवर आधारीत लघुपट आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आला होता. सोशल साइट्सवर या व्हिड‌िओला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अनेकांच्या पसंतीस उतरलेला हा व्हिडिओ अजूनही मोठ्या संख्येने बघितला जातोय. कारा स्टुडिओची निर्मिती असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अभिषेक कुलकर्णी यांनी केलेले आहे. सहाय्यक छायाचित्रणकार म्हणून रोहित खैरनार आणि संकेत कुलकर्णी यांनी काम पाहिले. तसेच पार्श्वसंगीत आनंद ओक यांचे असून सदानंद जोशी यांचा आवाज या लघुपटाला लाभलेला आहे. लेखन आणि पटकथा प्राजक्त देशमुख यांची आहे.

येत्या ३० मे रोजी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) पुणे या ठिकाणी या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेले आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, भाऊराव कऱ्हाडे, सचिन तावरे, सतीश जकातदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या फेस्टिव्हलमधल्या लघुपटांमधून विविध अंतिम पुरस्कारांची घोषणा होणार आहे.

अनेक वर्षांपासून फोटोग्राफी आणि सिनेमाबाबतची मेहनत सार्थकी लागल्यासारखी वाटते आहे. कोणत्याही स्पर्धेला किंवा फेस्टिव्हलला देण्यासाठी हा लघुपट केलाच नव्हता. फक्त वारी या परंपरेचे गूढ जवळून अनुभवायचे होते आणि कॅमेरात बंदिस्त करायचे होते. रोहीत आणि संकेतच्या सोबतीने ते शक्य झाले. त्याला आनंदने संगीताची जादू केली आणि जोशी सरांनी या प्रवासाला बोलते केले. प्राजक्तच्या शब्दांनी हा शोध अर्थपूर्ण झाला. प्राजक्त आणि मी आता असे अनेक प्रयोग करणार आहोत. या निमित्ताने ‘वारी’ घडली, तो पुरस्कार सगळ्यात मोठा होता.

- अभिषेक कुलकर्णी, दिग्दर्शक, छायाचित्रणकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आशा’देणार व्होटर स्लिप

0
0

मतदानासाठी जागृती करणार; सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेसाठी येत्या २४ मे रोजी मतदान होत असून, मतदारांना आपले मतदान केंद्र क्रमांक तत्काळ लक्षात यावा यासाठी येथील निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्याकरिता सर्व मतदारांना घरपोच व्होटर स्ल‌िप देण्यासाठी प्रशासनाने आशा व लिंक वर्कर महिलांची मदत घेतली आहे. या महापालिका निवडणुकीत शहरातील ३ लाख ९१ हजार ३२० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी मंगळवारपासून या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेचे सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांनी दिली.

येथील पालिका सभागृहात नुकतीच आयुक्त रवींद्र जगताप, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या उपस्थितीत आशा आणि लिंक वर्कर यांची बैठक घेण्यात येऊन त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. एका आशा महिलेला ४ ते ५ मतदान केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ५०० ते ७०० कुटुंबाना व्होटर स्लीप वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे एक आशा कर्मचारी सुमारे १० मतदारांना घरपोच त्यांचे मतदान केंद्र व मतदार क्रमांक याची माहिती देणार आहे. सोबतच मतदानाचे महत्त्व पटवून देणारी पत्रके वितरित केली जाणार असून, यामुळे मतदारांचे प्रबोधन केले जाणार आहे. या कामासाठी या महिलांना मानधन देण्यात येणार असून, जास्तीत जास्त व्होटर स्लीप वाटप करणाऱ्या महिलांचा गौरवदेखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आशा वर्करला त्यांच्या परिचित प्रभागाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे मतदारापर्यंत १०० टक्के व्होटर स्लीप पोहोचवल्या जातील, असा विश्वास खैरनार यांनी यावेळी व्यक्त केला.

आयुक्त सहारिया शनिवारी मालेगावी

येथील महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया व सचिव शेखर चेन्ने हे प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी, मालेगावी येत असल्याची माहिती आयुक्त जगताप यांनी दिली. शनिवारी (दि. २०) दुपारी ११ वाजता ते मालेगावी येत असून, यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बँक शाखाधिकारी आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या आधी द‌ि. ९ मे रोजी आयुक्त सहारिया दौऱ्यावर आले होते. शनिवारी दुसऱ्यांदा ते मालेगावी येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुड मॉर्निंग’ने धारणगाव हागणदारी मुक्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील धारणगाव ग्रामसेविका वनिता वर्पे यांच्या प्रयत्नांमुळे हागणदारीमुक्त झाले आहे. महिला असूनही पहाटे ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी वर्पे यांनी केलेले प्रयत्न ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. धारणगाव येथे जून २०१६ मध्ये हा उपक्रम सुरू झाला व नंतर हळूहळू गाव हागणदारी मुक्त झाले. या गावात १९२ पैकी ८१ कुटुंबांकडे शौचालय होते. त्यामुळे ज्यांच्याकडे शौचालय नाही अशाच्या बैठका घेण्याचे काम वर्षे यांनी सुरू केले.

ग्रामसेविका पदावर वनिता वर्पे या २००३ मध्ये सोनारी येथे रुजू झाल्या. त्यासाठी अनेकदा रात्रीच्या ग्रामसभादेखील त्यांनी घेतल्या. मात्र त्यांच्या प्रयत्नांना मर्यादित यश आले. मात्र त्याचवेळी त्यांनी एकतरी गाव पूर्णत: हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्यांना धारगणाव येथे हे यश मिळाले. वर्पे स्वत: पहाटे साडेतीन वाजता उठून घरातली कामे करीत साडेपाचला गावात पोहोचायच्या. उघड्यावर विधीसाठी जाणाऱ्या लोकांना गाठून त्यांना गुलाबाचे फूल दिले जायचे. समोरच्या व्यक्तीला या प्रकाराची चीड आल्यास शौचालय लवकर बांधले जातील या हेतूने त्यांनी महिला पथक पुरुषांना आणि पुरुष पथक महिलांना ‘गुड मॉर्निंग’ करेल, अशी शक्कल लढवली आणि त्यात त्यांना यश आले. या उपक्रमात सरपंच जिजाबाई शेळेके, जयाबाई वाळेकर, उपसरपंच दीपक शिसोदे यांनी त्यासाठी चांगले सहकार्य केले.

ग्रामस्थ सकाळी गावात गेल्यावर ‘पुढच्या वेळी पथक आले तर गोटे मारू’ असे सांगायचे. मात्र नंतर याच ग्रामस्थांनी सहकार्य केले. आज स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे.

- वनिता वर्पे, ग्रामसेवक

लहान-मोठ्यांना शौचालयाचा चांगला उपयोग झाला आहे. विशेषत: महिलांना आत बाहेर जावे लागत नाही. सुरुवातीला महिला ऐकायच्या नाहीत. मात्र आता सर्वांना समस्या सुटल्याचा आनंद आहे.

- जिजाबाई शेळके, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तालुका स्टेशनची असून अडचण...

0
0

नाशिक, म. टा. प्रतिनिधी

पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या तालुका पोलिस स्टेशनची हद्द म्हणजे असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. पोलिसांसह तक्रारदारांनादेखील हद्दीचा विषय अडचणीचा ठरत आहे. या पोलिस स्टेशन हद्दीत येणारी गावे शहर पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करावीत, असा एक प्रस्ताव धूळखात पडला असून, त्यावर गृह विभाग कार्यवाही केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घरफोडीच्या गुन्ह्यातील चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तालुका पोलिस स्टेशनमधून १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पोबारा केला. संभाजी विलास कावळे (वय २३, रा. औदुंबर प्लाझा, औदुंबरनगर, अंबड लिंकरोड) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताचा अद्यापपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. तालुका पोलिस स्टेशनमध्ये कोठडीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे संशयितांना रात्रीच्या वेळी त्र्यंबकेश्वर किंवा ओझर पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात येते. संभाजी कावळेलादेखील ओझर येथे नेण्यात येणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्याने बेड्या काढून धूम ठोकली.

--

तक्रारदारांचीही गैरसोय

तालुका पोलिस स्टेशन हद्दीत शहरालगतच्या गावांचा समावेश होतो. मात्र, ही बाब पोलिसांसह तक्रारदारांना त्रासदायक ठरते. पूर्वी शहराचे आकारमान छोटे होते. शहरातून बाहेर पडण्यासाठी फार तर १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागायचा. आज शहराचे वाढलेले आकारमान आणि होणारी वाहतूक कोंडी यामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी कधी-कधी एक ते दीड तासाचा कालावधी खर्ची होतो. तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनादेखील याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत कर्मचारी बोलून दाखवतात.

--

प्रस्तावावरील निर्णय प्रलंबित

तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काही गावे, तर पोलिस स्टेशनपासून २५ किलोमीटर दूर असल्याने काही घटना घडल्यास पोलिस वेळेवर पोहोचू शकत नाहीत, असा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक कार्यालयाने एक प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला आहे. तालुका पोलिस स्टेशन हद्दीत येणारी गावे सोयीनुसार शहराच्या पोलिस स्टेशन हद्दीत समाविष्ट करावीत आणि तालुका पोलिस स्टेशनच्या जागेचा वापर सहायक पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी व्हावा, असा तो प्रस्ताव आहे. मात्र, अनेक महिन्यांपासून या प्रस्तावावरील निर्णय प्रलंबित आहे.

---

तालुका पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावांचा शहर पोलिस स्टेशन हद्दीत समावेश करावा, याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर विचारविनिमय झाला असून, लवकरच निर्णय होईल. तालुका पोलिस स्टेशन जागेचा वापर सहायक पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

-अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड रेल्वेस्थानकाची गटांगळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देशभरातील स्वच्छ रेल्वेस्थानकांत दोन वर्षांपासून पहिल्या दहामध्ये असणारे नाशिकरोड स्थानक यंदा ६६७ गुणांसह १६९ व्या स्थानी फेकले गेले आहे. ओव्हरऑलमध्ये पहिल्या दहांत महाराष्ट्रातील फक्त अहमदनगर स्थानकाचा (चौथा) समावेश आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या रेल्वेस्थानक स्वच्छता थर्ड पार्टी आडिट रिपोर्टद्वारे ही स्थिती स्पष्ट झाली आहे. अहवालात ए वन गटात आंध्रचे विशाखापट्टणम देशातील सर्वांत स्वच्छ स्थानक ठरले आहे, तर अ गटात पंजाबच्या बिआसला प्रथम आणि खम्मामला दुसरा क्रमांक मिळाला. गेल्या वेळी खम्माम २८५ व्या स्थानी होते. झोनमध्ये साउथ ईस्ट सेंट्रल सर्वांत स्वच्छ झोन ठरला आहे.

रेल्वेने स्थानक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेल्या वर्षीपासून थर्ड पार्टी क्लीनलीनेस इंडेक्स सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानकांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा सुरू झाली आहे. रेल्वे कोच, रूळ, स्थानक, स्वच्छतागृह यांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. रेल्वेने क्लीन माय कोच सर्व्हिस सुरू केली आहे.

भारतीय रेल्वेचे जाळे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे. त्यामध्ये ६६ हजार किलोमीटरचा मार्ग आणि आठ हजार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर भारतीय रेल्वेनेही स्वच्छ रेल अभियान सुरू केले. २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारतचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

--

क्यूसीआय टीमचा सर्वे

रेल्वेतर्फे देशातील स्थानक स्वच्छतेचा सर्वे केला जातो. गेल्या वर्षीपासून इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या पुढाकाराने थर्ड पार्टी आडिट सुरू झाले आहे. २०१५ च्या रेल्वे बजेटपासून रेल्वेस्थानक स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छेतची स्पर्धा सुरू करणे, अस्वच्छतेची ठिकाणे शोधून उपाय योजणे हा त्यामागील उद्देश आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (क्यूसीआय) टीमने देशातील १६ रेल्वे विभागांतील ४०७ स्थानकांमध्ये यंदा सर्वे केला. त्यामध्ये ए वन गटात ७५, तर ए गटात ३३२ स्थानकांचा सर्वे झाला. पार्किंगमधील स्वच्छता, प्रवेशाचा मुख्य मार्ग, मुख्य स्थानक, वेटिंग रूम या सर्वांना ३३.३३, तर प्रवाशांच्या फीड बॅकला ३३.३३ टक्के वेटेज देण्यात आले. सर्वेसाठी चोवीस तासांचा नियंत्रण कक्ष स्थापन करून लक्ष ठेवण्यात आले. टीमच्या सदस्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. ४० विविध मुद्यांच्या आधारे त्यांनी प्रवाशांना प्रश्न विचारून स्थानकाला मानांकन देण्यास सांगण्यात आले. क्यूसीआयचा अंतिम अहवाल आल्यानंतर रेल्वे मंत्रालय स्वच्छतेच्या उपाययोजना करणार आहे.

--

तफावतीबाबत प्रश्नचिन्ह

याआधी झालेल्या पाहणीत नाशिकरोड स्थानकाला २०१५ मध्ये सहावा आणि २०१६ मध्ये सातवा क्रमांक मिळाला होता. आता थर्ड पार्टी ऑडिटमध्ये ओव्हरऑलमध्ये यंदा मात्र नाशिकला ६६७ गुणांसह १६९ वा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छतेचे पॅरामीटर बदलले, की संस्था बदलली म्हणून ही तफावत निर्माण झाली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. महिन्यापूर्वी नाशिक, इगतपुरी व अऩ्य स्थानकांचा सर्वे क्यूसीआयने केला होता असे नाशिकरोड रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

--

अहमदनगरची झेप

ओव्हरऑल रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील पाच स्थानके पहिल्या पंचवीसमध्ये आहेत. त्यामध्ये अहमदनगर (४), बडनेरा (११), रंगीया (१४), पुणे (१७) आणि अमरावती (२२) यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालचे दुर्गापूर पाचव्या, तेलंगणाचे मंचेरियल सहाव्या, सिकंदराबाद सातव्या, जम्मू तावी आठव्या, आंध्रचे विजयवाडा नवव्या, तर दिल्लीचे आनंदविहार दहाव्या स्थानी आहे. सविस्तर अहवाल http://www.railswachh.in या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.

०००
बजेट तब्बल १८०० कोटींवर!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या बजेट मंजुरीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बजेट मंजुरीसाठी येत्या २९ मे रोजी विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. त्यात स्थायी समितीकडून महासभेला बजेट सादर केले जाणार असून, त्याच दिवशी त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. स्थायी समितीकडून बजेटमध्ये तब्बल ३८९ कोटींची वाढ सुचविण्यात आली असल्याने बजेट आता १७९९ कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात बजेटचा वनवास लवकर संपण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीमुळे महापालिकेचे बजेट यावर्षी उशिराने सादर झाले. प्रशासनाने स्थायी समितीला १४१० कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. परंतु, या नव्या बजेटमध्ये विकासकामांना प्राधान्य देण्यात आलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा या बजेटसाठी कस लागत आहे. स्थायी समितीने या बजेटवर अंतिम हात फिरविला असून, भाजपच्या योजनांना मूर्त रूप देण्यासाठी बजेटमध्ये तब्बल ३८९ कोटींची वाढ सुचविली आहे. स्थायी समितीने सुचविलेल्या या वाढीमुळे बजेट १७९९ कोटींवर पोहोचले आहे. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. नगरसेवकांना विकासकामांसाठी ४० लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. स्थायी समितीने बजेटला अंतिम रूप दिले असून, ते महासभेला सादर करण्याची तयारी केली आहे. या बजेटला मंजुरी देण्यासाठी २९ मे रोजी विशेष महासभेचे आयोजन केले आहे. त्यात बजेटला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

--

करवाढीची टांगती तलवार

दरम्यान, स्थायी समितीने प्रशासनाने सुचविलेली घरपट्टी व पाणीपट्टीतील प्रस्तावित करवाढ फेटाळली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा महासभेवर थेट करवाढीसाठीचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेच्या काळातही महासभेवर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा महासभेवर प्रस्ताव ठेवून मालमत्ता करात १५, तर पाणीपट्टी करात सरासरी ५ टक्के करवाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या करवाढीसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी पार्किंगला मिळेना ठेकेदार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पार्किंगचा त‌िढा सोडविण्यासाठी पुढाकार घेत शहरातील वर्दळीच्या १२ ठिकाणी चारचाकी वाहनांसाठी रोटरी पार्किंग सिस्टिम उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात सीबीएस, शालिमार, अशोक स्तंभ या ठिकाणांचा समावेश आहे. या कामासाठी आतापर्यंत त‌िनदा निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु, ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निविदेतील अटी व शर्तींवर फेरविचार करण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय म्हणून पार्किंगकडे पाहिले जाते. शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, भद्रकाली, अशोक स्तंभ, मेनरोड आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. पार्किंगसाठी ठिकाणच नसल्याने येथे रस्त्यावरच पार्किंग केले जात असल्याने सर्वसामान्यांना येथून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतुकीच्या कटकटीतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी शहरात १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग स्टेशन उभारले जाणार आहेत. एका पार्किंग स्टेशनमध्ये १४ कार बसणार आहेत. हे सात मजली रोटरी पार्किंग हायड्रोलिक पद्धतीचे राहणार असून, त्याचा संपूर्ण खर्च महापालिका उचलणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्यालय, अशोक स्तंभ, शालिमार, रविवार कारंजा या वर्दळीच्या ठिकाणी हे पार्किंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या ठिकाणी जवळपास १६० वाहनांचे पार्किंग होणार असून, त्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. कंपन्यांना रोटरी पार्किंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

या कामासाठी आतापर्यंत पालिकेने तीनदा निविदा काढल्या आहेत.पहिल्यांदा,दुसऱ्यादा आणि तिसऱ्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेत एकही कंपनीने रस दाखवलेला नाही. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. या अटी व शर्तींत संबंधित कंपनीलाच तीन वर्षांचे देखभाल व दुरुस्तीचे काम दिले जाणार आहे. त्यामुळे ही अट कंपन्यासाठी जाचक मानली जात असून त्यात काही शिथ‌िलता द्यायची का याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. या अटी व शर्तींवर विचार करण्यासह मोठ्या शहरातील ठेकेदारांपर्यंत पालिका पोहचण्याचा विचार करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामात हलगर्जी केल्यास कारवाई

0
0

आमदार अनिल कदम यांचा वीजवितरण अधिकाऱ्यांना इशारा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील अवाजवी वीज भारनियमन व विजेच्या इतर समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये तत्काळ सुधारणा न झाल्यास कामात हलगर्जीपणा करणाऱ्या वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला.

बेरवाडी येथे मारुती मंदिरात विजेच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नाशिक विभागाचे वीज कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गुल्हाने, ओझरचे उपअभियंता जाधव, शाखा अभियंता कातकाडे व इतर अधिकारी उपस्थित होते. पिंपळगाव निपाणी, तळवाडे, बेरवाडीच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या तक्रारींचा पाढाच आमदार अनिल कदम यांच्यासमोर मांडला.

या सर्व तक्रारींची आमदार कदम यांनी तातडीने दखल घेऊन सर्व वीजसमस्या सोडविण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अंबादास जामकर, बस्तीराम खालकर, खैरनार सर, जयराम सांगले, रवींद्र बोडके, कान्हू खालकर, संजय बोडके, पांडुरंग बांगर, दादा बोराडे, दिलीप कदम, रामनाथ उकाडे या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आमदार कदम व अधिकारी यांच्यासमोर मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय मदतीअभावी नवजात तिळ्यांचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव जवळच्या रायपाडा येथील महिलेस तिळे झाले. परंतु, वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने तीनही बालके दगावली आहेत. सरकारच्या महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजना या मातेपर्यंत पोहचल्या नसल्याचे श्रमजीवी संघटनेने उघड केले आहे. या घटनेनंतर अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय परिस्थिती समोर आली आहे.

तालुक्यातील देवगाव रायपाडा येथील महिला संगीता पांडुरंग वारे या मंगळवारी (दि. १६) च्या रात्रीस राहत्या घरी प्रसुत झाली. तिने दोन मुले आणि एक मुलगी यांना जन्म दिला. जन्मानंतर एक मुलगा काही वेळातच मृत झाला. त्यानंतर बुधवारी (दि. १५) सायंकाळी रायपाडा येथे भगवान मधे हे लग्न सोहळ्यासाठी गेले असता त्यांना ही सर्व बाब समजली. तेव्हा तातडीने त्यांनी शेतकरी कुटुंबास भेट देऊन वास्तव जाणून घेतले.

देवगाव आणि परिसर अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेसाठी रात्री उशीरा वाहन धाडले. मात्र या बालकांना अंबोली येथे आणत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तीन मुले होऊन एकही न वाचलेली महिला हताशपणे आक्रोश करत राहिली. मात्र या महिलेला गर्भवती असल्यापासून कोणताही शासकीय लाभ मिळाला नाही. तिला या कालावधीत केवळ एकदा इंजेक्शन दिल्याचे समजते. रायपाडा येथे अंगणवाडी मदतनीस जागा रिक्त असून, येथे अंगणवाडी इमारत पडकी आहे. म्हणून थेट मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता मात्र तहसीलदार महेंद्र पवार यांनी आश्वासन देऊन वेळ निभावून नेली. मात्र अद्यापही ती परिस्थिती कायम आहे. सामुंडी, डहाळेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले पाहिजे, अशी मागणी कित्येक वर्षांची असून ठराव होतात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. याबाबत सावळा गोंधळ असून, त्यामध्ये गरीब शेतमजूर कुटुंबातील बालकांचा बळी जातो आहे.

श्रमजीवी संघटनेने याबाबत गटविकास अधिकारी मुरकुटे यांना निवेदन दिले आहे. तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

- भगवान मधे, श्रमजीवी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images