Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सायबरयुद्धाची नांदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञानावर विसंबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, तंत्रज्ञानाभोवती आपले जीवन फिरत आहे. भविष्यात या परिस्थितीमुळे मेकॅनिकल वस्तूही नाहीशा होणार असून, इलेक्ट्रॉनिक व सॉफ्टवेअरचा वापरच महत्त्वाचा होणार आहे. तंत्रज्ञानाच्या एवढ्या जवळ आपण गेल्यानंतर साहजिकच त्यातील आव्हानेदेखील वाढणार आहेत. ‘वॉनाक्राय’ प्रकरण पाहता भविष्यात सायबरयुद्धाचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत आयटीतज्ज्ञ पीयूष सोमाणी यांनी व्यक्त केले.

गेल्या आठवड्यात जगभरात झालेल्या ‘वॉनाक्राय’ या रॅम्सवेअर व्हायरसच्या हल्ल्याने चांगलाच गोंधळ घातला. या पार्श्वभूमीवर अशा हल्ल्यांपासून समाज सुरक्षित राहावा, यासाठी ‘सायबर हल्ला आणि आपण’ या विषयावर ‘मटा संवाद’ उपक्रमाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सोमाणी यांनी मार्गदर्शन करीत उपस्थितांशी संवाद साधला. वैराज कलादालनात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशनचे वैराज कलादालन हे या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर होते.

सोमाणी म्हणाले, की रॅम्सवेअरने धुमाकूळ घालून सध्या जगभराला वेठीस धरले आहे. परंतु, ही केवळ सुरुवात आहे. येत्या पंधरा-वीस वर्षांत मोबाइल्स, कॉम्प्युटरबरोबरच रेल्वे नेटवर्क, कार नेटवर्क सर्व हॅक होऊन भयावह परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे. परंतु, खेदाची बाब म्हणजे भारतीय आजही याचे गांभीर्य ओळखताना दिसत नाहीत. आपल्या आवश्यक माहितीचा बॅकअप घेण्याचाही कंटाळा त्यांच्यात दिसून येतो. अमेरिकेत प्रत्येक नागरिक याबाबत जागरूक दिसतो. भारतीयांनी वेळीच योग्य काळजी घेणे गरजेचे अाहे.

प्रारंभी सोमाणी, अमर ठाकरे, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गुळवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ‘मटा’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी जुन्नरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

प्रश्नोत्तरांद्वारे शंकानिरसन

सायबर हल्ल्याचे वाढते धोके लक्षात घेता यावेळी उपस्थितांनी आपल्या शंका सोमाणी व ठाकरे यांच्यापुढे मांडल्या. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, सोशल मीडियाचा वापर, बँकेकडून येणारे फोन कॉल्स, पासवर्ड आदी प्रश्नांचे निरसनही यावेळी करण्यात आले. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये व्हायरसला अॅटॅक करणे सहज शक्य होते. त्यामुळे जगभरातील नामांकित संस्था आपले कामकाज लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवरून करत असल्याचे सोमाणी यांनी सांगितले. परंतु, ही सिस्टीम किचकट असल्याने भारतात ती वापरली जात नाही. जेथे विंडोजचा वापर होतो त्यांनी सर्व्हरच्या संरक्षणासाठी इंटरनल फायरवॉल रुल्सते लेयर्सची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.

--

फसवणूक झाल्यास सायबर सेलला कळवा

आयटीतज्ज्ञ अमर ठाकरे यांनी सायबर हल्ल्याच्या जगभरातील वेगवेगळ्या केसेसेबद्दल माहिती दिली. सोशल मीडियाचा, ऑनलाइन व्यवहाराचा वापर करताना अनेकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे वारंवार समोर आली आहेत. त्यातील गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. दर सहा महिन्यांनी पासवर्ड बदलायलाच हवा. भविष्यात हे आव्हान वाढणार असून, आपण याबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेत त्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. एखाद्या फोन कॉलद्वारे, ई मेलद्वारे किंवा अन्य ऑनलाइन मार्गाने फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच ताबडतोब सायबर सेल, पोलिस स्टेशनला ही माहिती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ऑनलाइन व्यवहार करताना आपण आपल्या खात्यासाठी नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी नंबर येतो. हा नंबर केवळ त्या व्यक्तीलाच माहिती असल्याने सुरक्षित व्यवहारासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जगभरात आपल्या वैयक्तिक डेटा संरक्षणासाठी ही यंत्रणा महत्त्वाची मानली जाते.

--

ही काळजी घ्यावी.

• सिस्टीमवर अनावश्यक गोष्टी टाकू नयेत, डाऊनलोड करू नयेत.•आपल्या सिस्टीमवरील डेटाचा बॅकअप घेणे अत्यावश्यक आहे.•विंडोज वापरत असाल, तर अनावश्यक बाबी डाउनलोड करू नका, असल्यास डिलिट करा.•ज्या संस्थेत काम करत आहात ती संस्था सर्व डेटाचा बॅकअप घेते आहे की नाही, याची खात्री करा.•वैयक्तिक पातळीवर व संस्था पातळीवर बॅकअप घेण्याची जबाबदारी घ्या.•अनोळखी मेलवरील फाइल्स, लिंक ओपन करू नका.•गरजेशिवाय नवनवीन अॅप्स, सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका.•सायबर हल्ल्याविषयी जागरूकता निर्माण करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मध्यवर्ती कारागृहात सॅनिटरी व्हेंडिंग मशिन्स

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात महिला कैदी व कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन, तसेच डिस्पोजल मशिनही बसविण्यात आले असून, मंगळवार (दि. २३)पासून त्यांचा वापर करण्यात येणार आहे. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम संस्थेच्या पुढाकाराने ही मशिन्स बसविण्यात आली आहेत. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी ही माहिती दिली. राज्यात प्रथमच असा प्रयोग होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या आणि विस्तीर्ण एरिया असलेल्या नाशिकरोड कारागृहात तीन हजारांवर कैदी आहेत. त्यामध्ये महिला कैद्यांची संख्या १०९ आहे. त्यापैकी न्यायाधीन ४७, तर शिक्षा झालेल्यांची संख्या ६२ आहे. कारागृहात पन्नासच्या वर महिला अधिकारी व कर्मचारी आहेत. हे दोन्ही मशिन बसविल्यामुळे महिला कैद्यांबरोबरच महिला कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

नाशिक येथील जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम या संस्थेने हे दोन्ही मशिन बसविले आहेत. संस्थेचे अध्यक्ष किरण खाबिया म्हणाले, की या आधी संस्थेने अंबडच्या महापालिका शाळा क्रमांक ७४ आणि पाथर्डीच्या शाळा क्रमांक १९ येथेदेखील अशी मशिन्स बसविली आहेत. आता जेलमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. वर्षभरात महापालिका शाळांमध्ये मशिन बसविली जाणार आहेत. देणगीदारांची मदत त्यासाठी मिळत आहे.

कारागृह मध्य विभागाचे (औरंगाबाद) उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २३) मशिन्स कार्यान्वित होतील.कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी पल्लवी कदम, जैन ग्रुप प्लॅटिनमचे किरण खाबिया, माजी अध्यक्ष सतीश हिरण, संस्थापक अध्यक्ष कमलेश कोठारी, पौर्णिमा सराफ, नितीन राका, अतुल जैन, नीरज शहा, प्रीतेश चोपडा, कल्पना पटणी, धीरज पिचा उपस्थित राहतील.


असे आहे मशिन

सॅनिटरी व्हेंडिंंग मशिनमध्ये कच्चा माल टाकल्यावर सॅनिटरी नॅपकिन तयार होतात. हा कच्चा माल जैन ग्रुप पुरवणार आहे. एकावेळी ७५ नॅपकिन्स मशिनमध्ये असतील. कैदी व कर्मचारी गरजेनुसार मशिनचे बटण दाबून ते प्राप्त करू शकतील. वापरलेल्या नॅपकिनमुळे प्रदूषण होऊ नये म्हणून सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशिनही बसवलेले आहे. त्यात नॅपकिन्स टाकून नष्ट केले जातील.


विधायक उपक्रम राबविण्यात नाशिकरोड कारागृह आघाडीवर आहे. सॅनिटरी नॅपकिन मशिन्स हा त्याचाच एक भाग आहे. या मशिनमुळे महिला कैद्यांबरोबरच महिला कर्मचाऱ्यांंनाही लाभ होईल. जैन ग्रुपमुळे हे शक्य झाले.

-राजकुमार साळी, अधीक्षक, कारागृह

समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमने हा उपक्रम राबविला आहे. आगामी काळात महापालिकेच्या शाळांमध्ये अशी मशिन्स आम्ही बसविणार आहोत.

-किरण खाबिया, अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनचा कोंडला श्वास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मध्य रेल्वेच्या मार्गावरील महत्त्वाचे व नाशिक शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्थानकाला सध्या अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच प्रवाशांना हातगाडी व्यावसायिकांच्या जाचाचे दिव्य पार करावे लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासन, मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व शहर वाहतूक पोलिस या समस्यांकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने स्टेशनकडे जाणारे सर्व रस्त्यांवर हातगाडी व्यावसायिकांची दादागिरी वाढली आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवाशी ये-जा करित असतात. मात्र या प्रवाशांना सध्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानक व बसस्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना पुरेशा रस्त्याअभावी प्रवाशी वर्गाला पायी चालणेही अवघड झाले आहे. येथील बसस्थानक व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले दिसून येत आहे. चहा, नाश्ता, जेवण, अंडाभुर्जी, पाणीपुरी, पानटपरी, किसमिस, पाववडा, मिसळ अशा खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांच्या चक्रव्युहात स्टेशनचे प्रवेशद्वार सापडले आहे. या व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे.

वाहतूक कोंडी

या परिसरात हातगाडी व्यावसायिकांसह रिक्षाचालकांच्या अतिक्रमणामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, प्रवाशी वेळेच्या अपव्ययामुळे त्रस्त झाले आहेत. रेल्वे स्थानक प्रवेशद्वार व डॉ. आंबेडकर पुतळा या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे आता या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे.

कमानीद्वारे अतिक्रमण

गेल्या सिंहस्थात रेल्वे स्थानक प्रवेशद्वारावर स्टेशनच्या नावाची कमान उभारली होती. आता या कमानीचा वापर हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमणासाठी केला आहे. या कमानीच्या आधारे अतिक्रमण केलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे भाविक सुरक्षित

$
0
0

उत्तराखंडमध्ये ३३२ जण अडकले; २७ पासून परतीचा प्रवास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तराखंडमधील विष्णूप्रयागजवळ हत्ती पर्वत (हाथी पहाडी) येथे भूस्खलन झाल्याने चारधाम यात्रा विस्कळीत झाली आहे. देशभरातील १५ हजार भाविक तेथे अडकून पडले असून, नाशिकच्या ३३२ भाविकांचाही त्यात समावेश आहे. नाशिकचे सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती यात्रा कंपन्यांचे व्यवस्थापक तसेच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच नाशिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सतर्कता दाखवित सर्व यात्रा कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. तसेच नाशिकहून गेलेले भाविक आणि त्यांच्या सुरक्षेबाबतची माहिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यात्रा कंपन्यांना देण्यात आले आहे. श्रीराम यात्रा कंपनीच्या माध्यमातून नाशिकमधील ९६ भाविक या यात्रेसाठी गेले असून, ते सर्वजण गंगोत्री येथे सुरक्षित असल्याचे कंपनीचे संचालक रामावतार चौधरी यांनी कळविले आहे. या भाविकांचा परतीचा प्रवास २७ मे रोजी सुरू होणार आहे. चौधरी यात्रा कंपनीमार्फत १०० भाविक यात्रेसाठी गेले आहेत. ते सर्व सुरक्षित असल्याचे यात्रा कंपनीचे ब्रिजमोहन चौधरी यांनी कळविले आहे. कळवणमधील २० भाविक अडकले असून, त्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

दिंडोरीरोडवरील वृंदावननगर येथील रहिवासी संजय वाबळे (वय ५८) आणि रोहिणी वाबळे (वय ५५) हे भाविक चारधाम यात्रेसाठी १४ मे रोजी मुंबईहून रवाना झाले होत. सध्या ते सितापूर येथे आहेत. नियोजनानूसार ते २६ मे रोजी मुंबईत परणार आहेत, असे केसरी टुर्सच्या नाशिक कार्यालयातील रेणुका देशमुख यांनी प्रशासनाला कळविले आहे. निफाड येथील बापू गिते (वय ३३), शकुंतला गिते (वय ४९), चिंधु नेताळकर हे भाविक ११ मे रोजी नाशिकरोड येथून रेल्वेने बद्रिनाथ, केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले. ते केदारनाथपासून ५० किलोमीटरवर सुखरुप असल्याचे बाबा गिते यांनी कळविले आहे. यात्रा कंपनीची मदत न घेता मनोहर देसले (वय २८), सुमन देसले (वय ५३) यांसह सात भाविक मालेगाव येथून गेले आहेत. १२ मे रोजी ते सर्व चाळीसगाव येथून ॠषीकेशकडे रवाना झाले. येवला येथील ११० भाविक खासगीरित्या यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हे भाविक घटनास्थळापासून १०० किलोमीटरवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरवरील रिंगरोड अर्धवटच

$
0
0

खडीच्या जैसे थे रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रिंगरोड करण्यात आले असले तरी गोविंदनगर येथून जाणारा रिंग रोड हा दोन्ही बाजूने अजूनही वादात आहे. याबाबत महापालिका व संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अत्यंत वर्दळीचा असलेल्या या रस्त्यात वारंवार होणारे बदलामुळे नाशिककर हैराण झाले आहे.

गोविंदनगर भागातून जाणारा रिंग रोड हा सिटी सेंटर मॉल ते इंदिरानगरपर्यंत असून, या रस्त्याच्या सुरुवातीचाच भाग अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरला आहे. संबंधित रस्त्याच्या जमीन मालकांशी सुरू असलेल्या वादामुळे वर्ष उलटूनही रस्ता डांबरीकरण झालेला नाही. खडीच्या या रस्त्यावर महापालिकेकडून महिन्यांतून किमान एकदा तरी सुधारणेचा प्रयत्न होत असतो. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. खडीच्या या रस्त्यामुळे येथे धुराळ्याचे कायमच साम्राज्य असते, तर खडी व खड्ड्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. मनोहर नगरकडून सिटीसेंटर मॉलकडे जाताना असलेल्या चौफुलीवरच हा रस्ता अर्धवट ठेवण्यात आला आहे.

डांबरीकरण नसल्याने या रस्त्यावरून वाहनांची येजा होताना खूपच धूळ उडत असते. या धुळीमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास झाला आहे तर काहीजणांना यामुळे श्वसनाचे आजारही सुरू झाल्याचे समजले आहे. शहराला वळसा न घालता लवकर इंदिरा नगरहून सातपूर, सिडकोकडे जाता यावे म्हणून या रस्त्याचा वापर होत असतो. त्यातच रात्रीच्यावेळी याठिकाणी पथदीपांचीही सोय नसल्याने अपघातही होत असतात. त्यामुळे हा रोड पालिकेने रिंगरोड केला असला तरी तो अर्धवट का ठेवला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी या रस्त्याचे तातडीने काम करून इतर रस्त्यांप्रमाणे याठिकाणीही डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० उमेदवार कोट्यधीश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्यात येवून पोहचला आहे. यंदाच्या या निवडणूक रिंगणात तब्बल ५४ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, ३७ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सगळ्याच पक्षांनी उमेदवारी देऊ केली आहे. तसेच ३० उमेदवार हे कोट्यधीश असल्याचीही माहिती समोर आली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफोर्म अर्थात एडीआर या संस्थेने पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३७३ पैकी ३५८ उमेदवारांच्या सादर केलेल्या प्रतिज्ञापात्रांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्ती, वय, शिक्षण याबाबत विश्लेषण केले आहे.

काँग्रेस आघाडीवर

राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. याला येथील महापालिकेचे राजकारण देखील अपवाद नसल्याचे या माहितीतून स्पष्ट होत आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार गंभीर स्वरूपातील गुन्हे असलेल्यांना उमेदवारी देण्यात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसच्या १२ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी ६, भाजप ४, एमआयएम ६, जनतादल, शिवसेना प्रत्येकी एक तर ६ अपक्ष उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

निवडणुकीत

महिला उमेदवार कमी

उमेदवारी देतांना राजकीय पक्षांनी जेष्ठांनाच प्राधान्य दिल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. २१ ते २४ वयोगटातील केवळ १३ उमेदवार रिंगणात आहेत. २४ ते ५० वयोगटात १०० आणि ५१ ते ८० च्या वयोगटात ९० उमेदवार आहेत. प्रभाग ७ मधील रशीद अक्रम शेख हे सर्वाधिक ८३ वर्षांचे उमेदवार आहेत. ५० टक्के महिला आरक्षण असूनही पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवार कमी आहेत. या निवडणुकीत १६१ महिलांना उमेदवारी मिळाली आहे.

टॉप टेन कारोडपती

उमेदवारी देतांना आर्थिक निकष देखील महत्त्वाचा ठरला असून, तब्बल ३० उमेदवार कोट्यधीश आहेत. टॉप टेन कारोडपती उमेदवारांमध्येदेखील सर्वपक्षीय उमेदवार असून प्रभाग ८ मधील भाजपचे नरेंद्र सोनवणे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती १६ कोटी इतकी आहे. तर १८ उमेदवार असे आहेत जे लखपती आहेत. विशेष म्हणजे प्रभाग १० मधील यशवंत काळू खैरनार यांनी त्यांच्या नावे काहीही संपत्ती नसल्याचे म्हटले आहे. तर केवळ ३ उमेदवारांनी आपले वार्षिक उत्पन्न १० लाखापेक्षा अधिक असल्याचे मान्य केले आहे. या उमेदवारांमुळे या निवडणुकीचे वजन वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमसीए प्रवेशास ३ जूनपर्यंत संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) या संगणक शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. यासाठी अर्ज करण्यास ३ जूनपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांना या प्रक्रीयेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

एमसीए अभ्यासक्रमासाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. या प्रक्रियेच्या माध्यमातून खासगी आणि सरकारी एमसीए कॉलेजांमध्ये प्रवेश मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी विविध परीक्षा केंद्रांवर एमसीए सीइटी पार पडली. या सीइटीचा निकाल राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकताच तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर जाहीर केला. त्यानुसार लवकरच कॅपच्या फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १७ मेपासून सुरू झाली असून ती ३ जूनपर्यंत करता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना जवळच्या सुविधा केंद्रातून दिलेल्या कालावधीतच शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून ते वेबसाइटवर अपलोड करावे. त्यानंतर कागदपत्रे बरोबर असल्याची पोचपावती घ्यावी. विद्यार्थ्यांना ही संपूर्ण प्रक्रिया ३ जूनपर्यत सायंकाळी ५ वाजेपर्यत करावी , अशा सूचना डीटीईने दिल्या आहेत.

कॅप राउंड जुलैपर्यंत

कक्षातर्फे ६ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यत सर्व विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास त्यांना तो ७ आणि ८ जूनला घेता येणार आहे. त्यानंतर कक्षातर्फे अंतिम गुणवत्ता यादी १० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत नोंदणी व गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय प्रवेश फेऱ्यांना (कॅप) सुरुवात होणार आहे. कॅप राऊंड जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील काही एमसीए कॉलेजेस

एमईटी कॉलेज, आडगाव
आर. एच. सपट कॉलेज, कॉलेजरोड
केटीएचएम कॉलेज, गंगापूररोड
केबीटी इंजीनिअरिंग कॉलेज, गंगापूररोड
डॉ. मूंजे इन्स्टिट्यूट, भोसला कॅम्पस, गंगापूररोड
संदीप यूनिर्व्हसिटी, त्र्यंबक रोड
के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज, अमृतधाम
जी. डी. सावंत कॉलेज, पाथर्डी फाटा
एचपीटी अॅण्ड आरवायके कॉलेज, कॉलेजरोड
जेडीसी बिटको कॉलेज, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंड परिसरात पोलिसांचे मॉकड्रिल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
रविवारी सकाळी नऊची वेळ... रामकुंड परिसरात रोजच्याप्रमाणे भाविकांची पूजाविधी आणि श्राध्दासाठी सुरू असलेली लगबग... रामकुंडात स्नानासाठी झालेली गर्दी अन् अशातच रामकुंडावर बेवारस बॅग पडलेली असल्याचे पोलिसांना कळविण्यात येते. काही मिनिटांतच सायरन वाजवत पोलिसांच्या व्हॅन, श्वान पथक, बॉम्ब शोधकपथक असा मोठा फौजफाटा रामकुंडावर हजर होतो आणि सुरू होतो बॉम्ब नष्ट करण्याचा प्रयत्न! हे सर्व बघताना उपस्थितांचे श्वास रोखले जातात. भीती, उत्सुकता आणि थराराची अनुभूती येते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या उपस्थितीत दहशतवादविरोधी दिनानिमित्त हे मॉकड्र‌लि असल्याचे जाहीर होताच उपस्थितांचा जीव भांड्यात पडतो.
गंगागोदावरी मंदिराच्या उत्तरेला रामकुंडाकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या उतारावर बेवारस बॅग असल्याचे विजय मोजवती यांना दिसली. त्यांनी आजूबाजूच्या भाविकांना बॅग तुमची आहे का, अशी विचारणा केली.सुमारे अर्धा तास ती बॅग तेथेच पडून असल्याचे बघून त्यांनी पोलिसांना कळविले. थोड्याच वेळात पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) आनंद वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी आदींसह पोलिस कर्मचारी रामकुंड परिसरात दाखल झाले. परिसरातील गर्दी हटविण्यात आली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.
जेथे बेवारस बॅग ठेवली आहे तेथे श्वानपथक गेले. बॅगेजवळून ते श्वान पायऱ्या चढून मालेगाव स्टॅण्डच्या दिशेने गेले. बॉम्बशोधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी विशिष्ट पोषाख परिधान करून बॅगेच्या बाजूला स्कॅनिंग मश‌नि लावले. रामकुंडावर बॉम्ब असल्याची माहिती क्षणात पसरली. अफवेमुळे रामकुंडावर प्रचंड गर्दी झाली. या वाढलेल्या गर्दीला काबूत ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

आयुक्तांचे मार्गदर्शन

मॉकड्र‌लिच्या वेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपल्या आजूबाजूच्या भागात काय चालले आहे, याकडे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनी कशाप्रकारे जागृत रहावे यासाठी रामकुंडासारख्या नेहमीच गजबजलेल्या परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू दिसल्यावर काय खबरदारी घेतली जावी, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. हे करीत असताना गजबजलेल्या या भागात गर्दीच्या वेळी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले. अशी जेव्हा एखादी गंभीर परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणतीही बेवारस वस्तू दिसल्यास तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरीत पोलिसांना कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिकरोडलाही प्रात्यक्षिक

सिन्नर फाटाः रविवारी सायंकाळी येथील सोमाणी गार्डनमध्ये नेहमीप्रमाणेच बच्चेकंपनीसह नागरिकांची मोठी गर्दी होती. या गार्डनमध्ये एक बेवारस बॅग आढळून आल्याने उपस्थितांपैकी एका सजग युवतीने पोलिस कंट्रोल रुमला कळविले. त्यानंतर काही क्षणातच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजय मगर,सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन, नाशिकरोडचे सूरज बिजली यांच्यासह बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथक, शीघ्र कृती दल सोमाणी गार्डन येथे दाखल झाले व तत्काळ परिसराचा ताबा घेत बेवारस बॅगेतील बॉम्बचा शोध घेतला. हा मॉकड्रिलचा भाग असल्याचे पोलिसांनी नागरिकांना सांगितले. यावेळी असा प्रसंग खरोखर घडल्यास नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती पोलिसांनी उपस्थित नागरिकांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आनंदोत्सवात हरखले सारे…

$
0
0

हॅप्पी स्ट्रीट्सच्या इंदिरानगर येथील आनंदानुभूती देणाऱ्या उपक्रमात नाशिककर रविवारी चांगलेच हरखून गेले होते. या उपक्रमात झुम्बा डान्स, नेल आर्ट, फेस पेंटिंग, टॅटू रंगविणे, वन मिनीट गेम, मार्बल गेम्स आदी उपक्रमांत साऱ्यांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

संकलेचा ग्रुपचा सेल्फी कॉर्नर, मेट्रो झोन, सेल्फी पॉइंट, स्पार्टन्सची शेतकरी वाचवण्याची हाक, गाणी गाण्याची संधी, केक डिझायनिंग, हॅण्डमेड वस्तूंचे प्रदर्शन, पेंटिंग्ज, बॅडमिंटन, गोल्फ, तीरंदाजी, सायकलिंग, स्केट बोर्ड, रिंग फिरविणे, फुटबॉल, सोंगट्या, रोड सापशिडी, स्केटिंग आदी गेम्स व उपक्रमांत लहानग्यांसह मोठ्यांनीही हिरिरिने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना माहितीपर पुस्तके, बोर्ड, जेईई-नेट आदी परीक्षांविषयी माहिती मिळाली. क्विलिंग आर्टबाबत महिलावर्गात उत्साह दिसून आला.

विजय राज यांचा मॅजिक शो, वसंतराव पेखळेंचा हास्याचा धमाका, कॅलिग्राफी, स्ट्रीट रांगोळी आदी उपक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इंदिरानगरच्या बच्चेकंपनीच्या ग्रुपने ‘वेलकम महाराष्ट्र टाइम्स, सुस्वागतम ऑन हॅप्पी स्ट्रीट्स’ अशी पाटी अंगावर लावत मटा टीम व नाशिककरांचे केलेले स्वागत लक्षवेधी ठरले.

---

संकलन : हर्षल भट, सौरव बेंडाळे, स्वप्निल देवकर, सौरभ झेंडे, रुचिका ढिकले, पवन बोरस्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिनियमातील सुधारणा विक्रेत्यांना मारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने कीटकनाशके अधिनियमातील काही कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांवर आक्षेप नोंदवत नाशिक अॅग्रो डीलर्स असोसिएशनने (नाडा) हायकोर्टात धाव घेतली आहे. केंद्राने केलेल्या सुधारणा विक्रेते, तसेच शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचा दावा संघटनेने पत्रकाद्वारे केला आहे.

केंद्र सरकारने कीटकनाशके अधिनियमाच्या दहाव्या क्रमांकाच्या कायद्यात सुधारणा केली आहे. कीटकनाशके विक्रेत्यांना परवाना देताना किंवा परवान्याचे नूतनीकरण करण्यापूर्वी शेतकी शास्त्रातील पदवी म्हणजेच बी. एस्सी. अॅग्री. करणे बंधनकारक केले आहे. ही तरतूद जाचक आणि अव्यवहार्य असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष भगवान खैरनार आदींनी केला आहे. फेब्रुवारी २०१७ च्या राजपत्रानुसार पदवीधरऐवजी पदविकेची अट नव्याने दुरुस्त करण्यात आली आहे, तसेच ४५ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या व्यावसायिकांना या कायद्यामधून सूट देतानाच वार्षिक व्यवसाय किमान पाच लाख रुपयांपर्यंत असायला हवा, अशी अव्यवहार्य अट घालण्यात आली आहे. म्हणूनच संघटनेने या सुधारणांना हायकोर्टात आव्हान दिले आहे. सद्यःस्थितीत परवानाधारकांच्या संख्येइतके कृषी पदवीधर उपलब्ध नाहीत. तेवढे पदवीधर उपलब्ध करून देण्याची विद्यापीठांचीदेखील क्षमता नाही. व्यावसायिक शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी सकाळी आठ ते रात्री अकरा या वेळेत व्यवसाय करतात. ग्रामीण भागात वेळेत अनियमितता असते. कृषी पदवीधर कर्मचारी कामावर रुजू झाला तरी तो एवढा वेळ उपलब्ध राहील याची शाश्वती देता येणार नाही. कर्मचाऱ्यांकडून दुकानदाराची अडवणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पगाराचा बोजा दुकानदारावर व पर्यायाने शेतकऱ्यावर पडेल. ग्रामीण दुकानदारांना कर्मचारी उपलब्ध होणे अशक्य असून, ग्रामीण भागातील दुकाने बंद होतील, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. परिणामी, व्यावसायिकांमधील स्पर्धा संपून शेतकऱ्याचीच आर्थिक पिळवणूक होईल, असेही पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोग्राफी हा पॅशनचा खेळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फोटो घेण्यासाठी आपल्याला स्वत:ला विसरावे लागते. आपले अस्तित्व विसरले म्हणजे आपण समोरच्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होतो आणि तसे झाले तर फोटो येतो. फोटोग्राफी हा पॅशनचा खेळ आहे, असे प्रतिपादन छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेत आयोजित एकविसावे पुष्प ‘फोटोग्राफी कशी कराल?’ या विषयावर ते बोलत होते. हे पुष्प अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. वसंत व्याख्यानमालेचे ९६ वे वर्ष असून, गोदा घाटावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे.

प्रारंभी पवार यांनी मान्सून या शीर्षकाची फोटोंची शृंखला असलेली चित्रफीत दाखवली. पोखरा, चितवन, थायलंड, कोलंबोतील काही भाग अशा ठिकाणचे हे फोटोग्राफ्स होते. पाण्याचा थेंब पडताना त्याचा आकार केवढा आहे येथपासून तर त्याच्या ठिबकण्यापर्यंतच्या प्रवासाचा विचार फोटोग्राफ घेताना करावा लागतो. पाण्याचा स्पीड, किडे, पक्षी, प्राणी यांचेही काही फोटो त्यात होते. मान्सूनचे फोटो घेण्यासाठी ३५००० फुटांपर्यंत मी गेलो. त्यासाठी ७२ वेळा विमानप्रवास केला. एका सेकंदाच्या २५० व्या भागाला आपण क्लिक करतो आणि फोटो निघतो, परंतु त्यात विचारांची शृंखला मोठी असते, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, की फोटोग्राफी कशी करावी, हे कॅमेरा उचलण्याआधीचे वाक्य आहे. एकदा का कॅमेरा उचलला, की विचार सुरू होतात आणि जो क्षण क्लिक करायचा आहे, त्या वेळी अंतरंगातून आपण पेटले जातो. फोटोग्राफी हे पॅशनचे काम आहे. खूप संयम आपल्याला ठेवावा लागतो. एखादा फोटो मिळण्यासाठी जंग जंग पछाडावे लागतात. त्यातही तो फोटो मिळाला नाही तर तितक्याच संयमाने पुन्हा प्रयत्न करावे लागतात, असेही ते म्हणाले.

सावळीराम तिदमे यांनी प्रास्ताविक केले. अरुण शेंदुर्णीकर यांनी दिनविशेष सांगितले. या वेळी राजा पाटेकर, कवी प्रशांत केंदळे उपस्थित होते. अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतीस श्रीकांत येवलेकर यांनी उजाळा दिला. प्रसाद पवार यांचा परिचय श्रीकांत बेणी यांनी करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रशाळेचे दरवाजे ‘त्या’ शिक्षकांसाठी बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात अनुदानित, विनाअनुदानित किंवा खासगी शाळांमध्ये दिवसा पूर्णवेळ सेवा देणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षण विभागाच्या नव्या जीआरने रात्रशाळेचे दरवाजेच बंद केले आहेत. या निर्णयामुळे रात्रशाळांची संकल्पनाच धोक्यात येण्याची शक्यता शिक्षक संघटनांनी वर्तविली असून, या निर्णयास विरोधही दर्शविला जातो आहे.

दिवसाचे काम सांभाळून रात्रशाळेतही नोकरी करणाऱ्या शिक्षकांची रात्रशाळेतील सेवा या जीआरने संपुष्टात आली आहे. यामुळे रात्रशाळेत रिक्त होणाऱ्या पदांवर राज्यात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरीही यामुळे रात्रशाळांची संकल्पनाच धोक्यात येण्याची शक्यता शिक्षकांच्या संघटनांकडून वर्तविली जात आहे.

शासकीय मान्यतेनुसारच आजही राज्यात दिवसाच्या शाळांमध्ये काम करणारे शिक्षक कर्मचारी रात्रशाळेतही कार्यरत आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठीही रात्रशाळांचा पर्याय उपयुक्त ठरतो आहे. आता मात्र शिक्षण विभागाच्या बदलत्या धोरणाने या कर्मचाऱ्यांची रात्रशाळेतील अतिरिक्त सेवा थांबवून त्यांच्या जागी अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थिसंख्येच्या गुणोत्तरावर आधारित शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली. या प्रक्रियेत राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरले. सरकारच्या धोरणाविरोधात अतिरिक्त शिक्षकांचा न्यायालयातही लढा सुरू आहे. एकीकडे अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांना सेवेशिवाय सरकारला पगार द्यावा लागतो, तर दुसरीकडे रात्रशाळेत सेवा देणारे शिक्षक दुहेरी नोकरी करत असल्याने हा निर्णय घेतल्याची भूमिका शासन मांडते आहे.

राज्यभरात सुमारे दीडशेपेक्षाही अधिक रात्रशाळा आहेत. नव्या निर्णयानुसार आता रात्रशाळांसाठीही दिवसाच्या शाळांसारखेच कठोर निकष लावण्यात आले आहेत. एमईपीएस रुलमध्ये दिलेल्या सगळ्या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. २८ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार नवे निकष ठरवण्यात आले असून, विद्यार्थिसंख्या व शिक्षकांची संच मान्यता यासाठी रात्रशाळांसाठी असलेली विशेष सवलतही काढून घेण्यात आली आहे.

१५ जूनपासून आंदोलन

रात्रशाळा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक भारतीने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रात्रशाळांमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याची आवई या शासन निर्णयात उठवली असल्याचा आरोप शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केला आहे. जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रात्रशाळा बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली असून, १५ जूनपासून आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई घटली; दंड कोटीच्या घरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत गत वर्षीच्या तुलनेत तब्बल ४४ टक्के घट झाली आहे. कारवाई कमी झालेली असताना दंडाचा आकडा मात्र कोटीच्या घरात पोहचला आहे.

शहर वाहतूक शाखेने गतवर्षी जानेवारी ते १८ मे या कालावधीत ७२ हजार २१९ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत ७७ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा मात्र कारवाईचा आकडा ४० हजार ६१६ इतका झाला आहे. यातून ९९ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

दंडाच्या रक्कमेत झालेल्या भरीव वाढीचा हा परिणाम असून, वर्षाअखेरीस दंडाची रक्कम तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. फ्रंटस‌टि, लायसन्स नसणे, हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष, सिग्नल जम्पिंग, कागदपत्रे नसणे, जादा प्रवासी वाहतूक, नो पार्किंग, नो एंट्री अशा तब्बल १८ प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिस वाहतूक शाखेकडून दररोज कारवाई केली जाते. गतवर्षात जानेवारी ते १८ मे या कालावधीत वाहतूक पोलिसांनी तब्बल ७२ हजार २१९ वाहनचालकांवर कारवाई केली होती. यातून ७७ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा मात्र याच कालावधीत पोलिसांच्या कारवाईत जवळपास ४४ टक्के घट झाली. वाहतूक पोलिसांनी यादरम्यान ४० हजार ६१६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत ९९ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडाच्या रक्कमेत भरीव वाढ करण्याचा निर्णय झाल्याचा हा फायदा आहे. या निर्णयाची अंमलबजावणी वर्षाअखेरीस सुरू झाली. अगदी १०० रुपयांचा दंड आता ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः हेल्मेट वापर, सीट बेल्ट वापर याबाबत सतत मोहिमा हातात घेण्यात आल्या. फक्त दंडवसुली हे ध्येय नसून, नागरिकांच्या मनात वाहतूक नियम पाळण्याबाबत इच्छा निर्माण होणे आवश्यक असल्याचे संबंधीत अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यात सुरुवातीचे दोन महिने पोलिसांचा बराच वेळ निवडणुकीच्या कामात गेला. त्यामुळे वाहतूक शाखेकडून कारवाई कमी झाली. पोलिसांनी कारवाईसाठी जोर दिला तर वर्षाअखेरीस एकूण दंडाची रक्कम साडेतीन कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. वाहतूक शाखेने २०१६मध्ये दोन लाख तीन हजार ४३४ वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल दोन कोटी ४२ लाख ३० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला होता. २०१५ मध्ये वाहतूक शाखेने एक लाख २५ हजार ५४५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत एक कोटी ३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा मे महिन्याच्या मध्यापर्यंत दंडाचा आकडा एक कोटीच्या घरात पोहचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पदंशाने मुलाचा मृत्यू

$
0
0


घराच्या ओसरीत झोपलेल्या साहील काशिनाथ मोरे या बारा वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दिंडोरी तालुक्यातील जालखेड येथे शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. गरम होत असल्याने शनिवारी रात्री साहील घराच्या ओसरीत झोपलेला असताना हा प्रकार घडला. रात्री पावणेबाराच्या सुमारास साहीलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ सर्पदंश झाला. सर्पदंशाचा त्रास सुरू झाल्याने त्याला उमराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून त्याला सिव्हिल हॉस्पिटलला आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे विक्रीसाठी आलेला परराज्यातील मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक भरारी पथकाने पकडला. उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २१) पहाटे लोणखेडा चौफुली, खेतिया शहादा रोडवर ही कारवाई करण्यात आली. संशयित वाहनचालक भटू डुल्या वसावे आणि वासुदेव कैलास यांना या प्रकरणी अटक झाली आहे. पथकाने त्यांच्याकडून बॉम्बे स्पेशल व्हिस्कीच्या साडेसात हजार सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या मालाची अंदाजित रक्कम साडेसात लाख रुपये आहे. पथकाने एक महिंद्र पिकअपदेखील जप्त केली असून, ही कारवाई निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक वाय. आर. सावखेडकर, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे यांनी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तलाक धार्मिक नव्हे, सामाजिक प्रश्न’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तिहेरी तलाक हा धार्मिक विषय नसून सामाजिक प्रश्न आहे. मुस्ल‌मि समाजावर लागलेला हा डाग आहे. यामुळे वर्षानुवर्ष मुस्ल‌मि महिलांवर अन्याय होत असून, भाजपने याबद्दल घेतलेल्या भूमिकेस मुस्ल‌मि समुदायाचे खासकरून महिलांचे समर्थन मिळत आहे. येथील महापालिका निवडणुकीत देखील भाजपने २९ मुस्ल‌मि उमेदवारांना संधी दिली असून, त्यात १६ महिला उमेदवार आहेत. हीच भाजपची सर्वात मोठी उपलब्धी म्हणता येईल, असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री डॉ. नाहिदा शेख यांनी केले.

येथील महापालिकेसाठी येत्या २४ मे रोजी मतदान होत असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉ. शेख पत्रकार परिषदेत बोलत होत्या. अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, लातूरचे माजी महापौर अख्तर मिस्तरी, महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड उपस्थित होते.

डॉ. शेख म्हणाल्या, या निवडणुकीत पक्षाने सर्वाधिक मुस्ल‌मि उमेदवारांना संधी दिल्याने मुस्ल‌मि समुदायात पक्षाची प्रतिमा बदलली आहे. सर्वांचेच या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. शहरातील मुस्ल‌मिबहुल पूर्व भागातील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान मुस्ल‌मि समुदायाचा खास करून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पसंख्यांक समुदायाला भाजप आपला विकास करेल, हा विश्वास वाटू लागला आहे.

जमाल सिद्दिकी यांनी विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले. सुनील गायकवाड यांनी भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जेईई अॅडव्हान्स्ड’ची काठिण्यपातळी मध्यम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयआयटीसारख्या नामांकित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी घेण्यात आलेली जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा नाशिकमधील केंद्रांवर शांततेत पार पडली. ‘नीट’प्रमाणेच या परीक्षेसाठीही उमेदवारांना कठोर नियम असले तरीही कुठे गोंधळाच्या घटनेची नोंद झाली नाही. दरम्यान, यंदा या परीक्षेची काठिण्यपातळी अतिकठीण किंवा अतिसोपी अशा दोन्हीही प्रकारात मोडणारी नव्हती, तर मध्यम स्तर म्हणजे मॉडरेट स्तरावरील प्रश्नपत्रिकेस यंदा विद्यार्थी सामोरे गेले.

शहरात केबीटी इंजिनीअरिंग कॉलेज, केटीएचएम कॉलेज, के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज या केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी नाशिकमधून सुमारे हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दोन सत्रांत पार झालेली ही परीक्षा सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ या वेळेत घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ११ जून रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

रविवारीही या परीक्षेत विद्यार्थिनींना गळ्यातील लॉकेट, हार, अंगठी, बांगड्या, कानातले दागिने, चमकी, हेअर पिन, हेअर बँड घालण्यास मनाई करण्यात आली होती, तर विद्यार्थ्यांना बूट, फूल स्लिव्ह शर्ट घालण्यास मनाई आहे. शिवाय स्मार्ट वॉच, लॅपटॉप, वायफाय डिव्हाइस, हँड बँड, मोठे बटण असलेल्या कपड्यांनाही बंदी होती.

फिजिक्स कठीण; केमेस्ट्री सोपा

प्रश्नपत्रिकेत मॅथ्स आणि केमेस्ट्रीच्या तुलनेत फिजिक्सच्या पेपरचा काठिण्यस्तर जास्त असल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. याबाबत बोलताना आशिष चौधरी या विद्यार्थ्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले, की पहिल्या पेपरच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचा पेपर सोपा होता. केमेस्ट्री तिन्ही पेपरमध्ये अधिक सोपा होता. सर्वच प्रश्नांचा स्तर सोपा नसला तरीही अभ्यास केला असल्याने केमेस्ट्रीचे बहुतांश प्रश्न सोपे वाटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका बिटकॉइनमागे १० लाखांचे आमिष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बिटकॉइन या इंटरनेटवरील व्हर्च्युअल करन्सीत गुंतवणूक करणाऱ्यांना एका कॉइनमागे चक्क १० लाख रुपये परतावा देण्याचे आमिष संशयितांकडून दाखवण्यात येत होते. सध्या भारतात बिटकॉइन चलनावर बंदी आहे. लवकरच ही बंदी उठवण्यात येईल. त्यानंतर गुंतवणूकदारांना हा मोबदला मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. फसवणुकीच्या दृष्टीनेच बिटकॉइनचा प्रचार आणि प्रसार केला जात असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

बिटकॉइन हे इंटरनेटवरील एक चलन आहे. या चलनाचा परदेशात वापर केला जातो. विशेषतः अंडरवर्ल्डद्वारे ड्रग्ज, हत्यारे खरेदी- विक्रीच्या व्यवहारांसाठी या चलनाचा वापर केला जातो. भारतात या चलनाच्या वापरावर बंदी आहे. पुणे, नागपूर, शिर्डी या शहरांसह नाशिकमध्ये बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीस उद्युक्त करणाऱ्या एका टोळीला शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली. सध्या ही टोळी पोलिस कोठडीत आहे. त्यांची चौकशी केली असता, या टोळीने नाशिकसह पुणे, नागपूर, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अनेक बैठकी घेतल्याचे समोर आले आहे. मल्टिलेव्हल मार्केटिंग पद्धतीने ही टोळी बिटकॉइनचा प्रसार करून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त करीत होते. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होण्याचे आमिष संशयितांकडून दाखवण्यात येत होते. भारताने बिटकॉइनवरील बंदी हटवल्यानंतर गुंतवणूकदारास एका बिटकॉइनमागे तब्बल १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक मोबादला मिळू शकतो, असा दावा संशयितांकडून करण्यात येत होता. संशयित आरोपींमध्ये निशेद महादेवजी वासनिक (वय २९, नागपूर), रोमजी बिन अहमद (मलेशिया), आशिष शंकर शहारे (वय २८, कोपरगाव, जि. अहमदनगर), दिलीप प्रेमदास बनसोड (वय २९, पाथर्डी फाटा), कुलदीप लखू देसले (वय ३८, रा. सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) यांचा समावेश आहे. यातील रोमजी अहमद हा मलेशिया येथील संशयित www.futurebit.com या वेबसाइटच्या मदतीने राज्यात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत होता. तो या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, शहरापर्यंत तो कसा पोहोचला याचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकाचा भुयारी मार्ग अखेर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका येथील सब-वेचा वापर होत नाही. रात्रीच्या वेळी गर्दुल्ले सबवेचा आसरा घेतात. त्यामुळे पुढील अनिश्चित काळापर्यंत द्वारका सब-वेला पोलिसांनी टाळे ठोकले आहे. पोलिसांसह महापालिका आयुक्त आणि नॅशनल हायवे अॅथोरिटीच्या अधिकाऱ्यांनी सब-वेची सातत्याने पाहणी केली. मात्र, या कामाच्या रचनेतच घोळ असून, त्याची किंमत सर्वसामान्यांना चुकवावी लागत आहे.

सब-वे सुरू झाल्यापासूनच पादचाऱ्यांनी त्याच्या वापराकडे दुर्लक्ष केले. सब-वेमध्ये पावसाळ्यात अनेकदा पाणीही भरले गेले. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले. गर्दुल्ले किंवा व्हाइटनर नशाबाजांचा वावर मात्र कायम राहिला. ‘नो हॉर्न डे’च्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल द्वारका परिसरात गेले होते. तिथे त्यांनी सबवेची पाहणी केली. यानंतर, सदर सब-वे सुरक्षेच्या दृष्ट‌किोनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पोलिस आयुक्तांनी सांगितले की, सब-वेचा वापर पादचारी करीतच नाही. बऱ्याचदा तिथे टवाळखोर बसलेले असतात. यातून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षिततेच्या दृष्ट‌किोनातून हा सब-वे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट २०१६ मध्ये महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीदेखील सब-वेची पाहणी करून याबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पुढे काही झाले नाही. आता, पोलिसांनी सब-वेला टाळे ठोकले आहे.

सब-वे नव्हे पांढरा हत्ती
१३ ऑगस्ट २०१३ रोजी हा सबवे सुरू करण्यात आला होता. त्यापूर्वी तब्बल दोन वर्षे सबवेचे काम सुरू होते. खाली सबवे आणि वर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी फक्त ३० टक्के रस्ता होता. त्यामुळे दोन वर्षे येथे वाहतुकीचा प्रचंड गोंधळ उडाला. मात्र, इतका त्रास सहन करूनही नाशिककरांच्या हाती धुपाटणे पडले. सब-वेचा एक भाग द्वारका हॉटेलजवळील सर्व्हिसरोडवर मोकळा आहे, दुसरा भाग हनुमान मंदिराजवळ, तिसरा भाग द्वारका पोलिस चौकीजवळ, चौथा भाग गोदावरी हॉटेलजवळ तर अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यालगतही सब-वेमध्ये प्रवेश करता येतो. १६५ मीटर लांबीच्या भिंती आणि साडेतीन मीटर उंची असे बांधकाम असलेल्या सब-वेचा दुचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी वापर करण्याचे प्रयोजन झाले होते. मात्र, शार्प टर्नमुळे हा प्रस्ताव बारगळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासाभरात उरकली एनडीएसटीची सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षभराच्या वादग्रस्त कारकिर्दीमुळे चर्चेत राहिलेल्या एनडीसीटी संस्थेची ५५वी वार्षिक सर्वसाधारण सभा भ्रष्टाचार आणि संचालकांच्या बरखास्तीसह विविध मुद्द्यांवरुन गदारोळ होत असल्याने विविध विषयांना मंजुरी देऊन उरकण्यात आली. वर्षभरातील वादग्रस्त विषय अवघ्या तासाभरात चर्चिले गेले. कर्जाचा व्याजदर कमी करणे, ठेवींचा व्याजदर वाढविण्यासोबतच ९ टक्के डिव्ह‌डिंड आणि इतर विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, संभाव्य निवडणुकीचा मुद्दाही सभासदांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होता.

नाशिक ड्रिस्ट्र‌क्टि सेकंडरी टिचर्स अँड नॉन-टिचिंग एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ५५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी प. सा. नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या पतसंस्थेवरील विद्यमान संचालक मंडळाच्या वादग्रस्त कामकाजामुळे हे मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या यावर प्रशासक असल्याने जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांची या सभेत मुख्य भूमिका होती. ठेवींवरील व्याज ७.५ टक्क्यांवरुन ८ टक्के, डिव्ह‌डिंड ९ टक्के व कर्जाचा व्याजदर ९.५ टक्क्यांवरुन एक टक्क्याने कमी करत ८.५ टक्क्यांपर्यंत नेणे हे निर्णय या सभेत घेण्यात आले.

सर्व बँकांचे कर्जाचे व्याजदर कमी होत असल्याने एनडीएसटीचे व्याजदरसुद्धा एक टक्क्याने कमी करावे अशी मागणी करण्यात आली. यावर जिल्हा उपनिबंधक करे यांनी ९.५ टक्क्यावरुन ०.५ टक्के कमी करत ९ टक्के करीत असल्याचे जाहीर केले. मात्र, एक टक्क्याने व्याजदर कमी करावा या मागणीसाठी सभासदांनी व्यासपीठावर जाऊन तगादा लावला. त्याला करे यांनी मान्यता दिली. तसेच ज्या कर्जदारांचे एनडीसीसीमार्फत कर्ज मान्य करण्यात आले आहे परंतु, बँकेवर असलेल्या निर्बंधांमुळे अजूनही ते कर्जदारांपर्यंत पोहोचले नाही, अशांचे हप्ते कर्ज सभासदांच्या खात्यावर प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच सुरू होईल, असे आश्वासन करे यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत सभासदांकडून करण्यात आले.

प्रकाश सोनवणे म्हणाले, संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने कामकाज केले म्हणून बरखास्त करावे लागले. यापुढे कामकाज सुरळीत चालावे यासाठी ‘अ’ वर्गाचा ऑडिटर नेमावा, तसेच गेल्या वर्षी १२ लाखांवरुन १७.५० लाखांपर्यंत ऑड‌टि फी गेली ही फी सरकारी पद्धतीची आहे की नाही याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. बाळासाहेब ढोबळे यांनी अतिरिक्त स्टेशनरीबाबत सवाल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचे काम केले’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचे काम केले आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे, पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जात आहेत, शेतकरी आत्महत्या करतो आहे, यंत्रमाग उद्योग डबघाईला आला आहे त्यामुळे हे सरकार नसून सावकार आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. गरीब जनतेची लूट करणाऱ्या या सरकारला खाली खेचण्याचे काम येथील जनता महापालिका निवडणुकीतून करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

येथील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. २०) रात्री आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार असिफ शेख, माजी आमदार रशीद शेख, डॉ. तुषार शेवाळे, शोभा बच्छाव, हेमलता पाटील, शरद आहेर आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी कठोर शब्दात भाजपवर टीका केली.

भाजपच्या नेत्यांना सत्तेची नशा चढली आहे, असे चव्हाण म्हणाले. भाजपचे आव्हान केवळ काँग्रेस पक्षच पेलू शकतो. युपीए सरकारच्या काळात देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले गेले. मात्र भाजप सरकारच्या काळात देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम झाले आहे. तसेच एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचे टीका त्यांनी केली.

अन चव्हाणांची जीभ घसरली

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सर्वच बाजूने टीका होते आहे. आपल्या भाषणातून दानवेंचा समाचार घेतांना मात्र चव्हाण यांची जीभ घसरली. उर्दू, हिंदी भाषेतून भाषण करीत असताना चव्हाण यांनी दानवे यांचा उल्लेख एकेरी शब्दात करीत भाषेची मर्यादा ओलांडली, यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>