Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निफाड ज्युनिअर कॉलेजचा तिढा अखेर सुटला

$
0
0

जूनमध्ये वर्ग सुरू करण्याचे संस्थाचालकांना आदेश

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील दि न्यू एज्युकेशन संस्थेच्या निफाड इंग्लिश स्कूलमधील ज्युनिअर कॉलेज बंद करण्याच्या घाट घालणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी चांगलाच दणका दिला आहे. तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाऱ्या संस्थाचालकांना कोणत्याही परिस्थितीत ज्युनिअर कॉलेजचा वर्ग जूनमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यात हा वर्ग सुरू करताना स्वतः रामचंद्र जाधव उपस्थित राहणार असल्याने संस्थेचा वर्ग बंद करण्याचा डाव शिक्षण विभागाने उधळून लावला आहे.


निफाड शहरातील दि न्यू एज्युकेशन संस्थेचे ज्युनिअर कॉलेजात कला, वाणिज्य आणि शास्त्रचे अकरावी, बारावीचे वर्ग आहे. मात्र चालू शैक्षणिक वर्षात इमारत कमकुवत असल्याचे कारण सांगत संस्थेने सदरचे कॉलेज बंद करण्याची परवानगी शिक्षण उपसंचालकांकडे मागितली होती. याची विद्यार्थ्यांना कुणकुण लागली. अन् गत पंधरवड्यात आम आदमी पक्ष, विद्यार्थी, पालक यांनी पंचायत समितीवर धडक मोर्चा नेला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २१) निफाडला ज्युनिअर कॉलेजला शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, सहसंचालक दिलीप गोविंद, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, प्राचार्य वाघ, नंदलाल चोरडीया, विद्यार्थी, पालक यांच्यात बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर शिक्षण उपसंचालक जाधव यांनी संस्थेने बारावीचे वर्ग पूर्ण करावे, विद्यार्थ्यांनी कायद्याप्रमाणे फी भरावी, विद्यार्थी शिष्यवृती प्रस्ताव समाजकल्याण खात्याकडे पाठवावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, चांगले शिक्षक नेमून अभ्यासक्रम पुर्ण करण्याचा निर्णय सुनावला. याप्रसंगी तालुकाप्रमुख उत्तम निरभवणे, सागर खडताळे, मनोज खडताळे, संतोष पगारे, रघुनाथ पोटे, विष्णू साबळे, राजेंद्र घुमरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उड्डाणपुलासाठी पुढचे पाऊल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

द्वारका ते नाशिकरोडदरम्यानच्या उड्डाणपुलासाठी तांत्रिक सल्लागार निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. पावसाळा धरून सहा महिन्यांत हे काम होण्याची अपेक्षा आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

द्वारका ते दत्त मंदिर या ५.९ किलोमीटरदरम्यान वाहतूक प्रचंड वाढली आहे. रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया ठप्प झालेली आहे. या मार्गावर उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी खासदार गोडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात केली होती. ऑक्टोबरमध्ये त्यांना पत्र पाठविले होते. नोव्हेंबरमध्ये गडकरी नाशिकला आले असता त्यांना या कामाची गरज पटवून देण्यात आली होती. द्वारका ते दत्त मंदिर चौक हा टप्पा महापालिका हद्दीत आहे. प्रस्तावित पुलाचा खर्च महापालिका करू शकत नसल्याने हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याची विनंती गोडसे यांनी केली होती. या पुलाला चारशे ते पाचशे कोटी खर्च आला, तरी आपण हा पूल बांधू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले होते.

--

सविस्तर अहवालाचे आदेश

या आश्वासनानुसार गडकरी यांनी उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल करण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिलेले आहेत. लवकरच हा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार त्याला मान्यता देईल. त्याचाच एक भाग म्हणून ८ मे रोजी या कामासाठी लागणारी तांत्रिक सल्लागार निविदा जाहीर करण्यात आली आहे. या मार्गाचा प्रकल्प अहवाल करण्यासाठी ई निविदा मागविण्यात आली आहे.

--

वाहतूक कोंडी फुटणार

द्वारका ते दत्त मंदिरदरम्यान वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पुणे, नगर, सिन्नरला जाणारे प्रवासी, शिर्डीला जाणारे भाविक, तसेच नाशिकला धार्मिक व पर्यटनासाठी येणार नागरिक यांची संख्या वाढली आहे. दत्त मंदिर, उपनगर, फेम सिनेमागृह, काठे गल्ली आणि द्वारका अशा पाच ठिकाणी ठिकाणी सिग्नल आहेत. तरीही वाहतूक प्रश्न सुटलेला नाही. अरुंद रस्ता, त्यात अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक यामुळे इंधन व वेळ वाया जात आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल साकारल्यास वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला ओसंडला उत्साह…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धम्माल करण्याच्या मूडमधील नाशिककरांच्या उत्साहाने इंदिरानगरचे रस्ते रविवारी सकाळी ओसंडले होते. अबालवृद्धांसह सर्वच एका वेगळ्याच आनंदोत्सवात दंग झाल्याचे दिसून आले. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स आयोजित हॅप्पी स्ट्रीट्स (सीझन ३)चे. इंदिरानगरच्या शिवाजी चौकात या धमाकेदार उपक्रमाचा प्रारंभ सकाळी सात वाजता झाला अन् काही वेळातच हा परिसर गर्दीने फुलून गेला.

इंदिरानगर येथील कलानगर बस स्टॉप ते नभांगण लॉन्स या मार्गावर पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, तसेच संकलेच्या ग्रुपचे तुषार संकलेचा आणि विशाल संकलेचा आदी मान्यवरांच्या हस्ते रंगीबेरंगी फुले आकाशात सोडून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी अबालवृद्धांनी झुम्बाच्या तालावर थिरकण्याची मजा लुटली. प्रतीक हिंगमिरे व ग्रुपतर्फे हिंदी, इंग्रजी, मराठी गाणी सादर करण्यात आली. राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग सादर करण्यात आले. असंख्य उपस्थितांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

--

गिटारवादनाचा नजराणा

नरेंद्र पुली आणि त्यांचा विद्यार्थ्यांनी गिटारवादन केले. यावेळी त्यांनी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश केला. प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी यांनी नागरिकांना कॅलिग्राफीतील बारकावे समजावून सांगितले. रवींद्र जोशी व त्यांच्या शिष्यांनी बासरीवादन केले. हर्षल शिंदे यांनी ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार इंदिरानगरवासीयांना समजावून सांगितला.

--

टॅटू, रांगोळीने भरले रंग

सौरभ मानकर यांच्या वन ऐट वन टॅट्यूतर्फे उपस्थितांच्या हातांवर, चेहेऱ्यावर टेम्पररी टॅटू काढून देण्यात आले. बचपनगलीत गोट्या, भोवरे, ठिक्कर, दोरीवरच्या उड्या इत्यादी खेळांत अनेक जण हरखून गेले होते. प्रेमदा दांडेकर यांनी पाच बोटांची रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी इत्यादी प्रकारांचे महत्त्व विशद करून काही महिलांना प्रशिक्षण दिले.

--

सेल्फी कॉर्नरवर धूम

संकलेच्या ग्रुपने उपलब्ध करून दिलेल्या सेल्फी कॉर्नरला उदंड प्रतिसाद लाभला. रश्मी मतलानी यांच्या किड्झी झोनच्या वतीने लहान मुलांसाठी सेल्फी कॉर्नरचे आयोजन केले होते. आयआयटीयन्स पेस अॅकॅडमीतर्फे कॅनॉपी स्टॉल, आयएनएफडीतर्फे लहान मुलांसाठी विविध अॅक्टिव्हिटीज, विजयराज यांचे जादूचे प्रयोग, आनंद हास्य क्लबतर्फे हास्याचे प्रकार शिकविण्यात आले. श्री शक्ती बचतगटातर्फे कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. डिकेथलॉन स्पोर्टस संकुल, तसेच गणेश स्पोर्टसतर्फे खेळांचे साहित्य पुरवण्यात आले होते.

--

गाण्याची साधली संधी

पोलिस बॅण्ड पथकाने गर्जा महाराष्ट्र माझा, जयोस्तुस्ते इत्यादी धून वाजवून रसिकांत स्फूर्ती निर्माण केली. वैष्णवी मोरे यांनी विविध कलाप्रकार सादर केले. हॅण्ड फाउंडेशनचे कैलास परदेशी यांनी स्ट्रीट पेंटिंग केले, तर आशा घोडके यांनी पियानो वादन केले. यावेळी वेस्टर्न क्लासिकल गाणीही सादर करण्यात आली. शंकर कंडेरांतर्फे कराओके सिंगिंग सादर करण्यात आले. या माध्यमातून नवी-जुनी हिंदी गीते ऐकण्याची व गाण्याची संधी अनेकांनी साधली.

--

चित्रकलेत हरखले चिमुकले

विवेक सोहनी यांनी केकचे विविध प्रकार सादर केले. स्पार्टन ग्रुपतर्फे आज सादर होणाऱ्या हंडाभर चांदण्या या नाटकाची तिकिटे मोफत वाटण्यात आली व शेतकऱ्यांविषयीचे भाव उपस्थितांकडून रेखाटण्यात आले. भारती जाधव यांच्या आवास संस्थेतर्फे लहान मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संस्कृत भारतीतर्फे संस्कृत प्रचारासाठीच्या विशेष स्टॉलवर संस्कृत बोलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

--

आयुक्तांनी वाढविली रंगत

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी हॅप्पी स्ट्रीट्समध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनाही सहभागासाठी प्रेरित केले. डॉ. सिंगल यांनी अबालवृद्ध व तरुणाईसोबत संवाद साधला. ‘दिल दिया है जान भी देंगे एे वतन तेरे लिए’ या गाण्याची झलकही आयुक्तांनी यावेळी सादर केली. त्यासाठी उपस्थितांकडून ‘वन्स मोअर’ची डीमांड झाली. आयुक्तांनी अनेक खेळांची मजा लुटतानाच सेल्फी पॉइंटवर पोलिस टीमसह नाशिकरांसोबत सेल्फी काढत उत्साह आणखी वाढविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमवर आयपीएलचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयपीएल टी- २० क्रिकेट स्पर्धेच्या दशकपूर्ती विजेतेपदासाठीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण एम. जी. रोडवरील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मोठ्या पडद्यावर करण्यात आले.

मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या दिग्गज खेळाडूंचा समावेश असणारा सामना रविवारी रात्री या स्टेडियमवर आयपीएल फॅन पार्क उपक्रमांतर्गत प्रक्षेपित करण्यात आला. तुफान जल्लोष, टाळ्या, शिट्ट्या, कधी उत्कंठेचे क्षण तर कधी निराशेचे क्षण, चेहऱ्यावर प्रकटणारे भाव अशा उत्साही वातावरणात क्रिकेट चाहत्यांनी सामन्याचा आनंद लुटला.

आयपीएल सामन्याचे हे विक्रमी दहावे वर्ष आहे. यापूर्वी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या फॅन पार्क्सच्या संकल्पनेची सलग तिसऱ्यांदा पुनरावृत्ती झाली आहे. २०१५ मध्ये पहिल्यांदा देशातील १६ शहरांमध्ये हे फॅन पार्क्स उभारण्यात आले होते. नाशिकमध्ये २०१५ मध्येही अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. गतवर्षी सलग दोन दिवस फॅन पार्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

या सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश नि:शुल्क असला तरीही प्रवेशासाठी मोफत पासचे वितरण करण्यात आले होते. प्रेक्षकांची संख्या लक्षात घेता पार्किंग आणि सुरक्षेची व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. येथे उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्समधून खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि गरजेच्या वस्तू आयोजकांकडून उपलब्ध करून दिल्या गेल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात सावतानगरचा तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकरोडवर दोन दुचाकींमध्ये रविवारी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात सिडकोमधील सावतानगर येथील आकाश रमेश कर्नावट (वय २०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

आकाश कर्नावट दुचाकीने सातपूरकडे जाताना व्हिक्टर बस थांबा येथे वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिली. अतिवेगाने असणाऱ्या आकाशच्या दुचाकीची धडक इतकी जोरदार होती, की तो हवेत उडत रस्त्यावर पडल्याने जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्रावामुळे आकाशचा जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीस्वाराला दुखापत झाली असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सावतानगरमधील रवी किरण अर्पाटमेंटमध्ये आकाश राहत होता. घरातील तो कर्ता मुलगा होता. आकाश सहा महिन्यांचा असतानाच त्याचे वडीलही अपघातात मरण पावले असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. बीवायके कॉलेजात एस. वाय. बी. कॉमची त्याने परीक्षा दिली होती. बहिणीच्या लग्नाला पैसे जमवण्यासाठी आकाश अंबड औद्योगिक वसाहतीतील आयटी पार्कमध्ये यू. एस. कॉल सेंटरमध्ये दोन वर्षांपासून नोकरीला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी सिगारेटचा १३ लाखांचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तसेच विदेशातील तब्बल १३ लाख रुपये किमतीचा सिगारेटचा मोठा साठा पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केला.

अंबड आणि भद्रकाली परिसरामध्ये अनधिकृतरित्या विदेशी सिगारेटची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची तक्रार पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना मिळाली होती. आयुक्तांनी यासंदर्भात गुन्हे शाखेच्या युनिट एकची पथके तयार करून एकाचवेळी अंबड आणि भद्रकालीत दोन अशा तीन ठिकाणी छापे टाकले असता सुमारे साडेतेरा लाख रुपयांचा विदेशी सिगारेटचा साठा सापडला. केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार सिगारेट पाकिटांवर काही सूचना फोटोसह छापणे बंधनकारक आहे. मात्र, भारतात उत्पाद‌ीत होणारे काही ब्रॅण्ड्स, तसेच परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या पाकिटांवर अशा सूचना दिल्या जात नाहीत. परदेशी सिगारेटमुळे महसूलदेखील बुडतो. या पार्श्वभूमीवर ‘वुई केअर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. सदर प्रकरण क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडे सोपवण्यात आले. यानंतर क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दोन ते तीन पथके तयार करुन तपास सुरू केला. अंबड परिसरातील करिश्मा ट्रेडर्स येथे एका पथकाने शनिवारी रात्री छापा मारला. करिश्मा ट्रेडर्स हे आशिष अमरचंद फिरोदिया (४६, रा. वास्तू पार्क, अश्विननगर, सिडको) यांचे असून, या ठिकाणी दोन लाख ७७ हजार रुपयांची विदेशी सिगारेटची ८०० पाकिटे जप्त करण्यात आली. दुसऱ्या पथकाने भद्रकालीत मोहसीन खलील शेख (२०, रा. खडकाळी, घर नं. १३३५, भद्रकाली) यांच्या भद्रकालीतील बॉम्बे ट्रेडर्स या दुकानावर छापा मारला. तिसऱ्या पथकाने आसिम आरिफ भिमानी (३०, रा. ३४२५, बडी दर्गासमोर, भद्रकाली) यांच्या कोकणीपुऱ्यातील ए-वन सुपारी या ठिकाणी छापा टाकला. या दोन्ही ठिकाणांहून पोलिसांनी १० लाख ५७ हजार रुपयांच्या विदेशी सिगारेटची पाकिटे जप्त केली. तिन्ही ठिकाणी मिळून एकूण १३ लाख ३४ हजार रुपयांच्या विदेशी सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रकरणी अंबड आणि भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये सिगारेट अॅण्ड अदर टोबॅको प्रॉडक्टस्‌ (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार निर्मिती पुरवठा वितरण) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एपीआय दीपक गिरमे, सचिन खैरनार, पीएसआय हनुमंत वारे, एएसआय संजय पाठक, हवालदार संजय मुळक, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, पोलिस नाईक शरद सोनवणे, संतोष कोरडे, जितेंद्र ठाकरे, श्रीकांत साळवे, हर्षल बोरसे, नीलेश भोईर आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या गैरहजेरीचा प्रवासी महिलेला फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड बसस्थानकावर ‘पाकीटमार ड्युटीवर अन् पोलिसदादा सुटीवर’ ही स्थिती नवीन नाही. मात्र, पोलिसांच्या या नाकर्तेपणाचा फटका बसल्याने एका प्रवासी महिलेला गुरुवारी साडेतीन हजार रुपये गमवावे लागले. नाशिकरोड बसस्थानकाच्या पोलिस चौकीवर पोलिस जागेवर थांबत नसल्याचे वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे.

वडनेर (दुमाला) येथील सुनीता धनाजी जोर्वेकर ही महिला मंचर येथे जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकावर सकाळी पावणेअकराच्या सुमारास आली. त्यानंतर लागलीच त्यांना पुणे बस मिळाली. मात्र, बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली. पहिल्या प्रयत्नात त्यांना या गाडीत चढता आले नाही. काही प्रवासी बसमध्ये चढल्यावर त्याही बसमध्ये चढल्या. त्यानंतर ही बस नाशिकरोड बसस्थानकातून पुढे मार्गस्थ झाली. बस शिवाजी पुतळा चौकात आली असता तिकिटाचे पैसे देण्यासाठी जोर्वेकर यांनी पर्समधील पाकीट काढण्याचा प्रयत्न केला असता, पाकीट चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पाकिटात ३५०० रुपये होते. घडला प्रकार त्यांनी बस कंडक्टरला सांगितला व बसमधून उतरून त्या पुन्हा नाशिकरोड बसस्थानकात आल्या. त्यांनी हा सर्व प्रकार वाहतूक नियंत्रकांच्या सांगितला. बसस्थानकावरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची त्यांनी विनंती केली. मात्र, वाहतूक नियंत्रकांनी प्रथम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास सांगितले. वाहतूक नियंत्रकांनी मदत नाकारताच जोर्वेकर बसस्थानकावरील पोलिस चौकीत गेल्या. मात्र, पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी जागेवर नव्हता. त्यामुळे हतबल जोर्वेकर यांना पोलिस चौकीतच रडू कोसळले. तब्बल पाऊणतास त्यांना पोलिसांची प्रतीक्षा करावी लागली. मोठ्या विश्वासाने व मदतीच्या अपेक्षेने आलेल्या जोर्वेकर यांना पोलिसांच्या गैरहजेरीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जोर्वेकर यांना तक्रारही देता आली नाही. ही घटना घडली तेव्हा पोलिस कर्मचारी जागेवर असते तर कदाचित पाकीटमाराचा शोध घेणे सोपे झाले असते. या पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी कायम परागंदा असतात, अशी माहिती या वेळी उपस्थित नागरिकांनी दिली.

पुणे बसमध्ये चढत असताना गर्दीत माझ्या पर्समधील पाकीट चोरीला गेल्याचे बसमध्ये बसल्यावर लक्षात आले. मी तातडीने बसस्थानकावरील पोलिस चौकीत गेले. मात्र तिथे पोलिस कर्मचारी नव्हते. त्यानंतर बसस्थानक प्रमुखांकडे गेले. त्यांनी पुन्हा पोलिसांकडे पाठवले. तेव्हाही पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी नव्हते. पोलिस कर्मचारी जागेवर असते तर कदाचित पाकीटमाराला शोधणे सोपे गेले असते.

- सुनीता जोर्वेकर, प्रवासी, वडनेर दुमाला

प्रवासी म्हणतात....

देवळाली कॅम्प, भगूर या मार्गाने प्रवास करताना सतत चोरीच्या घटना घडत असतात. बसना प्रचंड गर्दी असल्याने चोरटे याचा फायदा उठवतात. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अशा घटनांना आळा घातला पाहिजे.

- संजय जाधव, प्रवासी

मी रोज शालिमार- देवळाली असा प्रवास करतो. सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यावर काही तरी उपाययोजना करावी.

- गोपाल वर्मा, प्रवासी

दिवसाढवळ्या बसमध्ये चोऱ्या होत असून प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा व्यसनी लोकं प्रवाशांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. हे कुठे तरी थांबायला हवं.

- अनुज शर्मा, प्रवासी

बसमध्ये सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, गर्दीही प्रचंड असते. गर्दीमुळे महिलांना प्रवास करणे कठीण होते. त्यामुळे अनेकदा टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागतो. या घटनांना लवकर आळा घातला जावा.

- सुमन काळे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधातेनगरमध्ये सव्वा लाखाची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पंचवटीतील हिरावाडी रोडवरील विधातेनगरमध्ये घडली.

वर्षा रामदास रोहमारे (रा. इंदू हाइट्स, विधातेनगर, पंचवटी) यांच्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रोहमारे कुटुंबीय बाहेर गेले असता शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधली. चोरट्याने अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटच्या दाराचे लॉक कशाच्या तरी साह्याने तोडले आणि घरात प्रवेश केला. या वेळी चोरट्यांनी लाकडी कपाटातील १५ ग्रॅम व २५ ग्रॅमची सोन्याची पोत, १० ग्रॅमची कानातील जोड, रोख रक्कम असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

जेलरोडला रिक्षाची चोरी

जेलरोड परिसरातील राजराजेश्‍वर मंगल कार्यालयाच्या पार्किंगमधे पार्क केलेली ४० हजार रुपयांची ऑटो रिक्षा चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रशीद अब्बास शेख (रा. मौलानी रोड, जेलरोड) यांनी तक्रार दिली आहे. नऊ मे रोजी शेख राजराजेश्‍वर मंगल कार्यालयात गेले होते. त्या वेळी त्यांनी त्यांची ऑटो रिक्षा (एमएच १५/झेड ४०३३) मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री साडेआठ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी रिक्षा लंपास केली. रिक्षामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्ससह महत्त्वाची कागदपत्रे होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकावर कोयत्याने वार

जुन्या भांडणाच्या वादातून एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रकाश अशोक उन्हवणे (रा. संतकबीरनगर, भोसला शाळेमागे) याने गंगापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. उन्हवणेच्या फिर्यादीनुसार, तो काही मित्रांसमवेत संत कबीरनगरमधील साईबाबा मंदिरासमोर रस्त्यावर उभा होता. संशयित समीर सय्यद व शबीर सय्यद दुपारी चार वाजेच्या सुमारास तेथे आले. काही कारण नसताना दोन्ही संशयितांनी उन्हवणेशी वाद घातला. संत कबीरनगरचा भाई आहेस का, असे बोलून शिवीगाळ करू लागले. शिवीगाळीचा जाब विचारला असता, संशयित समीर सय्यदने त्याच्याकडील कोयता काढला आणि उन्हवणेच्या उजव्या हातावर वार केला. यानंतर दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, संशयितांचा शोध सुरू आहे.

पत्नीला बेदम मारहाण

दारू का पितो, असे विचारल्याने नवऱ्याने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना पेठरोड परिसरात घडली. सोनी संतोष जाधव (रा. दत्तनगर, पेठरोड) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. जाधव यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा पती बंटी उर्फ संतोष गंगाराम जाधव (वय ३५) शनिवारी दारू पिऊन आला आणि पत्नीला शिवीगाळ करू लागला. पत्नीने त्याचा जाब विचारला असता, त्याने घरातील लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बंटी जाधवला अटक केली आहे.


तडीपार गुंडांवर कारवाईचा बडगा

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात तडीपार गुंड धिंगाणा घालत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गुंड जाळपोळ करून नागरिकांना धमकावत आहेत. या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपनगर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. तीन गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात जेलरोडच्या नारायणबापू चौकात रूपेश जाधव या तडीपार गुंडाने नारायणबापू सोसायटीचे स्टोअर रूम रात्री पेटवून दिले. याबाबत सोसायटीचे संचालक उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन येताच रात्री पुन्हा त्याने सोसायटीचे कार्यालय पेटवून दिले. जाधव शिर्डीला तडीपार असतानाही राजरोसपणे नाशिकरोडला वावरत होता. त्याने आधीही दोन-तीन वेळा जाळपोळ केली होती. त्याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. अर्जुन रुंजा पवार (वडारवाडी) याला पोलिसांनी १५ मे रोजी अटक केली, तर अनिकेत पंढरीनाथ वाजे (ऋषभ हाइट, सदगुरुनगर, बिग बझारमागे) याला १४ मे रोजी अटक करून कारवाई केली.

बॉम्बसंदर्भात पाहणी करावी

नाशिकरोड : नाशिकरोडला जुने जिवंत बॉम्ब सापडत असल्याने लष्करी तज्ज्ञांनी परिसराची पाहणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिन्नर फाटा येथील त्रिशरणनगरमध्ये शनिवारी लष्कराचा जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. दीड वर्षापूर्वी वालदेवी नदीच्या पात्रात पुलाचे काम सुरू असताना असाच बॉम्ब सापडला होता. हे बॉम्ब जुने असले तरी दबाव निर्माण होताच त्यांचा स्फोट होऊ शकतो. नाशिकरोड परिसरात ब्रिटिश काळापासून लष्कराचे अधिपत्य आहे. नागरी वस्ती येथे वाढली आहे. परिसरात जिवंत बॉम्ब असल्याचा कयास आहे. त्यामुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा शंभर रुपये क्विंटल

$
0
0

येवला बाजार समितीतील प्रकार; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या हंगामात उन्हाळ कांदा बाजारभावाने ठेंगा दाखवताना उत्पादक शेतकऱ्यांसमोरचे अर्थसंकट गेल्या दोन आठवड्यातील बाजारभावाच्या पडझडीने गहिरे झाले आहे. ख्‍ारिपाचा पुढील हंगाम तोंडावर आलेला असताना जिल्हा बँकेच्या तिजोरीतील खडखडाटामुळे खरीप पीक कर्जाची शाश्वती दिसत नाही. दिवसागणिक कोसळणाऱ्या बाजारभावातून हाती उत्पादन खर्चही पडत नसल्याने ‘संकट टळेना, कांदा बाजारभावाचा सूर जुळेना’अशीच गत कष्टकरी शेतकऱ्याची झाली आहे. येवला बाजार समितीत तर चालू आठवड्यात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटलमागे किमान केवळ शंभर रुपयांचा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे.

गेल्या आठवड्यातील कांदा बाजारभावातील मोठ्या घसरणीतून हाती पडलेल्या अगदी कवडीमोल दामाने शेतकऱ्यांना घाम फोडला आहे. या मार्च महिन्यात मिळालेला बाजारभाव आज ना उद्या सुधारेल आणि हा उन्हाळ कांदा श्रम व घामाचे दोन पैसे अधिकचे नक्कीच हाती टेकवेल, ही उत्पादक शेतकऱ्यांची आशा चालू मे महिना सरतीकडे असतानाही फलद्रूप होऊ शकली नाही. उन्हाळ कांद्याचा भाव सध्या अवघ्या १०० रुपये क्विंटलवर आल्याने कष्टकरी शेतकऱ्याची व्यथा राज्यकर्ते समजून घेणार की नाही? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

उत्पादन खर्चही निघेना

उन्हाळ कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आलेला खर्च बघितला तर प्रतिएकर जवळपास ५० ते ६० हजार खर्च ठरलेला. उन्हाळ कांद्याचे एकरी साधारण सव्वाशे ते दीडशे क्विंटल उत्पादन निघते. या कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये भाव मिळाला तर दीडशे क्विंटलचे ४५ हजार रुपये शेतकऱ्याच्या हाती पडतात. हाती पडणारे हे दाम अन् एकरी झालेला एकूण उत्पादन खर्च बघितला तर उत्पादन खर्चही निघेना हे वास्तव नाकारता येत नाही.

२५ रुपये भाव ही तर थट्टाच

दहा दिवसांपूर्वी तर येवला बाजार समितीमधील समोर आलेलं उदाहरण अन् एका शेतकऱ्याच्या उन्हाळ कांद्याला मिळालेला अवघा २५ रुपये क्विंटल हा भाव या शेतकऱ्याचे एकप्रकारे डोळे पांढरे करणारा ठरला. तालुक्यातील मुखेड येथील शेतकरी भास्कर निवृत्ती आहेर यांनी भाडोत्री ट्रक्टर लाऊन आपला उन्हाळ कांदा बाजार समितीत आणला. कांदा गोल्टी असल्याचे कारण देत त्याला लिलावात भाव मिळाला तो अवघे २५ रुपये क्विंटल. १० क्विंटल ६५ किलो क्विंटल उन्हाळ कांद्याचे २६६ रुपये २५ पैसे झाले. त्यातून ५७ रुपये ७२ पैसे हमाली, ४२ रुपये साठ पैसे तोलाई तर ७ रुपये ९८ पैसे वाराई, गेट पासचे ५ रुपये असे एकूण ११३ रुपये ३० पैसे वजा जावून आहेर यांच्या हाती पडले, ते अवघे १५२ रुपये ९५ पैसे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आमदार कोकाटे यांना मातृशोकच्या मातोश्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मातोश्री सरस्वती शिवाजी कोकाटे यांचे रविवारी सकाळी नऊ वाजता निधन झाले. माणिकराव कोकाटे यांचे बंधू पोपटराव कोकाटे यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांचा मंगळवारी दशक्रिया विधी होता. मात्र, तत्पूर्वीच पुत्रवियोगामुळे आमदार कोकाटे यांच्या मातोश्री सरस्वती कोकाटे यांचे रविवारी सकाळी नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सरस्वती कोकाटे यांच्यावर सोमठाणे (ता. सिन्नर) येथे रविवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र, राज्यातील सरकार, नव्हे सावकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचे काम केले आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे, पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जात आहेत, शेतकरी आत्महत्या करतो आहे, यंत्रमाग उद्योग डबघाईला आला आहे, त्यामुळे हे सरकार नसून सावकार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. गरीब जनतेची लूट करणाऱ्या या सरकारला खाली खेचण्याचे काम येथील जनता महापालिका निवडणुकीतून करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

मालेगाव येथील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार असिफ शेख, माजी आमदार रशीद शेख आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी कठोर शब्दात भाजपवर टीका केली.

अन् चव्हाणांची जीभ घसरली

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरून केलेले विधानामुळे त्यांच्यावर सर्वच बाजूने टीका होते आहे. आपल्या भाषणातून दानवेंचा समाचार घेताना मात्र चव्हाण यांची जीभ घसरली. उर्दू, हिंदी भाषेतून भाषण करीत असताना चव्हाण यांनी दानवे यांचा उल्लेख एकेरी शब्दात करीत भाषेची मर्यादा ओलांडली, यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तहसील’चा मेकओव्हर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तहसील कार्यालयातील जीर्ण वायरिंग तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे बदलण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकाचवेळी दोन सिलिंग फॅन कोसळल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाची पाहणी केली. येथे अनेक उपाययोजना करणे आवश्यक असून त्या लवकरच केल्या जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नाशिक तालुका तहसील कार्यालयात तसेच त्याच्याच बाजूला असलेल्या सेतू कार्यालयात गुरूवारी (दि. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास दोन सिलिंग फॅन अचानक कोसळले. या अपघातात सेतू कार्यालयातील एक अधिकारी जखमी झाला तर तहसील कार्यालयातील खुर्ची मोडली. एकाचवेळी दोन फॅन कोसळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने शनिवारी (दि. २०) प्रसिध्द केले. नेहमी वर्दळ असणाऱ्या या कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात आल्याची बाब या वृत्तामधून प्रकाशझोतात आणण्यात आली. कार्यालयातील जीर्ण झालेली वायरिंग आणि त्यामुळे संगणकांचे झालेले नुकसान याकडेही लक्ष वेधण्यात आले. या सर्व प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. येथील जीर्ण वायरिंग दुरुस्तीसह आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे पत्र नाशिक तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. ‘सार्वजनिक बांधकाम’च्या अधिकाऱ्यांनीही या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. वायरिंग बदलण्यासह अनेक उपाययोजना कराव्या लागणार असल्याबाबत अधिकाऱ्यांची खात्री पटली आहे. कार्यालयीन कार्यवाही पूर्ण करून लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मागणी प्रशस्त कार्यालयाची

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अनेक वर्षांपासून नाशिक तहसील कार्यालय आहे. मात्र, कार्यालयास येथील जागा तोकडी ठरू लागली आहे. तसेच ही इमारत जुनी झाली असून सुविधांअभावी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. अन्य तालुक्यांमध्ये अत्याधुनिक, सोयी सुविधांनीयुक्त आणि प्रशस्त तहसील कार्यालये बनविण्यात आली आहेत. मात्र, नाशिक तालुका यास अपवाद ठरला आहे. तालुक्यासाठीही त्र्यंबककरोडवरील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात प्रशस्त तहसील कार्यालय बनवावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, ती अद्याप प्रशासकीय पातळीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली, भगूरमधून ३४ बसफेऱ्या बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

राज्य परिवहन महामंडळाने तोट्यातील मार्गांवरील शहरी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देवळाली कॅम्प व भगूर या मार्गावरील शहर बसच्या ३४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, नाईलाजाने त्यांना खासगी वाहतूक साधनांचा वापर करावा लागत आहे. देवळाली कॅम्प व भगूर येथून शहरातील शालिमार, पंचवटीसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात १५६ शहर बसफेऱ्या सुरू होत्या.

भगूर, देवळालीतून शहरात जाण्याकरिता पहाटे ५ वाजेपासून मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध आहे. सध्या लग्नांचे मुहूर्त असल्याने दोन्ही ठिकाणांहून शहराकडे जाणारा प्रवासीवर्ग वाढला असला, तरी अपुऱ्या बसेसअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गांवरील ३४ बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने नागरिकांसह मासिक पासधारक प्रवासी, कॉलेज व खासगी क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महात्मानगर, मेरी, म्हसरूळ, आडगाव मेडिकल कॉलेज, एचपीटी कॉलेज अशा महत्त्वाच्या बसफेऱ्या मात्र नियमित आहेत.

--

ग्रामीण भागाची गैरसोय

देवळाली, भगूरलगत ३२ गावे असून, त्यापैकी लहवित, पांढुर्ली, शिवडा, राहुरी दोनवाडे या मार्गांवर प्रत्येकी एक शहर बस याआधी धावत होती. मात्र, आता ती बंद करण्यात आल्याने प्रवाशांना एक तर ग्रामीण बसची वाट पाहावी लागते अथवा खासगी वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडावा लागत आहे.

--

सर्वांच्या सोयीच्या असलेल्या शहर बससेवेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने देवळाली, भगूर परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत पुनर्विचार व्हावा.

-बाळासाहेब बडदे, प्रवासी

--

देवळालीतून बहुतेक सर्वच बसेस पूर्वलत असून, केवळ ज्या बसफेऱ्यांना प्रवासी मिळणे अवघड होते, अशा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

-देवीदास भांगरे, वाहतूक नियंत्रक, देवळाली कॅम्प

--

राहुरी, दोनवाडे, लहवित यांसारख्या गावांना जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीशी गैरसोय सहन करावी लागत आहे.

-एस. ए. घुगे, वाहतूक नियंत्रक, भगूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेसाठी अर्जांचा पाऊस!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ५२ उमेदवारांनी एकूण ८२ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. उमेदवारी दाखल करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने व्यापारी बँकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी २४ उमेदवारांनी एकूण ३० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर चौथ्या दिवसअखेर दाखल उमेदवारी अर्जांची संख्या ११२ वर जाऊन पोहचली आहे. यातील बहुतांश उमेदवारांनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारी अर्जांचा पाऊसच पडल्याने यावेळी व्यापारी बँकेसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याचे उघड झाले आहे.

दिग्गज रिंगणात

ही निवडणूक दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यात अशोक चोरडिया, निवृत्ती अरिंगळे, डॉ. दत्तात्रय पेखळे, श्रीराम गायकवाड, सुधाकर जाधाव, शाम चाफळकर, रामदास सदाफुले, रमेश धोंगडे, सतीश मंडलेचा, शिवाजी भोर, अशोक सातभाई, हेमंत गायकवाड, राजीव टर्ले, वामन हगवणे, डॉ. प्रशांत भुतडा, प्रशांत दिवे, प्रकाश घुगे यांच्यासह महिला गटातून रंजना बोराडे, जयश्री गायकवाड, कमल आढाव आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई-चलान’ शेवटच्या टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांना आवर घालण्यासाठी शहर पोलिस लवकरच ‘ई-चलान’ पध्दतीचा अवलंब करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दंडवसुली होणार असून, पोलिसांच्या नोट‌िशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनमालकास थेट कोर्टाचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनादेखील प्रशिक्षण दिले जात आहे.

दंडात्मक कारवाईत सुसूत्रता आणण्यासाठी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर त्वरीत कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांनी आपला मोर्चा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवला आहे. ‘ई-चलान’ हा त्याचाच भाग असून, पुढील काही दिवसांतच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ई-चलान कार्यप्रणालीमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात ऑनलाइन कारवाई केली जाणार आहे. यासाठी वाहनाचे छायाचित्र काढून त्याचा पुरावा म्हणून वापर करणे, दंड-कपातीची माहिती वाहनचालकाच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठवणे, दंड जागेवर घेण्यासाठी क्रेडिट अथवा डेब‌िट कार्डचा वापर करणे, ऑनलाइन पध्दतीचा वापर करून दंड घेणे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एखाद्या वाहनावरील पेंडिंग केसबाबत माहितीदेखील यामुळे एका क्ल‌िकवर समजू शकणार आहे.
कर्मचाऱ्यांना यासाठी स्मार्टफोन तसेच स्वाइप मशिन्स पुरवण्यात येणार आहेत. ही कार्यप्रणाली लवकरच सुरू होणार असून, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. स्पार्कन आयटी सोल्युशन कंपनीमार्फत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. आजमितीस वाहनचालकावर जागेवर दंडात्मक कारवाई केली जाते. फारतर वाहने उचलून शरणपूररोडवरील वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा केली जातात. यामुळे वाहनांचे नुकसान होणे तसेच आर्थिक गैरकारभार होणे या विषयी तक्रारी येतात. विशेषतः चारचाकी वाहनमालकांकडून ही ओरड नेहमीच होते. या पार्श्वभूमीवर ई चलान ही पध्दत फायदेशीर ठरू शकते.

अशी असेल पध्दत

ई-चलान पध्दतीचा वापर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काही सुधारणा केली जाईल. रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्क असल्यास वाहतूक पोलिस सदर वाहनाचा फोटो काढून घेईल. त्यापूर्वी वाहनावर कारवाई बाबतचे स्ट‌िकर लावले जाईल. हा फोटो लागलीच वाहतूक शाखेतील यंत्रणेला पाठवण्यात येईल. तेथे वाहन क्रमांकाच्या मदतीने वाहनाच्या मूळ मालकाचे नाव आणि पत्ता शोधून काढला जाईल. या पत्त्यावर सदर वाहनाचा फोटो, दंडाची रक्कम व इतर माहिती नोटीशीद्वारे धाडली जाईल. नोटीस मिळाल्यानंतर सात ते आठ दिवसांच्या आत वाहनचालकाने वाहतूक शाखेत दंडाची रक्कम भरली नाही, तर हे प्रकरण कोर्टात पाठवले जाऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवयवदानाविषयी मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे विद्यार्थी गृह माजी विद्यार्थी मंडळ, नाशिक शाखेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त अवयवदान व देहदान विषयक प्रदर्शन पुणे विद्यार्थी गृहाच्या नाशिक शाखेत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाची निर्मिती व संकल्पना माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉ. एकनाथ कुलकर्णी यांची होती. त्यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. भाऊसाहेब मोरे व कार्याध्यक्ष सुभाष जिरगे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले.

अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगताना डॉ. संजय रकिबे म्हणाले की, आपले अवयव स्वर्गात घेऊन न जाता ते लोकांना दान करा. मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, त्वचा, डोळे, स्वादूपिंड, हृदय, आतडी आदी अवयव दान करता येतात. सर्व धर्मांची अवयवदानास व देहदानास मान्यता असून, अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रिया १९९४ च्या कायद्यानुसार चालते असेही त्यांनी सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यात चालू असलेल्या अवयव व देहदानाच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मेंदू मृत म्हणजे काय हेही त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. डॉ. भाऊसाहेब मोरे म्हणाले, स्वत:वर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेतली असून, त्यामुळे माझा पुनर्जन्म झाला आहे. माझे उर्वरित आयुष्य अवयव दानाच्या प्रचारास मी समर्पित केले असून, अवयवदान ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असुरक्षिततेचा मालधक्का!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

रेल्वे व वेअर हाउसला वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या रेल्वे मालधक्क्यासह येथील शेकडो माथाडी कामगार आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. करोडो रुपयांच्या मालाची ने-आण या मालधक्क्यावरून होत असूनही येथील सुरक्षाव्यवस्था मात्र रामभरोसे आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला लागूनच रेल्वे मालधक्का आहे. येथे सिमेंटसारखा दररोज लाखो टन माल उतरवला जातो. या मालधक्क्यावर सध्या दिवसा २५०, तर रात्रपाळीत १०० माथाडी कामगार काम करतात. परंतु, या मालधक्क्याच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले असल्याचे चित्र सध्या दिसून येते.

रेल्वे मालधक्क्याची संरक्षक भिंत अनेक ठिकाणी ढासळली आहे. त्यामुळे मालधक्क्यावर अनधिकृत व्यक्तींचा वावर वाढला असून, चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. भटकी जनावरे थेट रेल्वे ट्रॅकवर येत आहेत. प्रवासीही या मार्गाने ये-जा करीत आहेत. पूर्वेला संरक्षक भिंतच नसल्याने चेहेडी रस्त्याने पायी येणारे प्रवासी व सायकलस्वार थेट रेल्वे रूळ ओळांडून येतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.

--

इन-आऊट एकाच मार्गाने

मालधक्क्यावर दररोज शेकडो ट्रक येतात. या गाड्यांसाठी इन व आउटसाठी एकच मार्ग आहे. बाहेर पडणाऱ्या लोडेड गाड्या देवळालीगाव राजवाड्यातील रहिवासी भागातून जातात. त्यामुळे येथे अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. बाहेर जाण्यासाठीचा रस्ता वेगळा असावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अद्याप प्रलंबित आहे.

--

कामगारांचे हाल

येथील कामगारांना कोणत्याही स्वरुपाच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे मालधक्क्यावर दोन स्वच्छतागृहे आहेत. परंतु, त्यापैकी एक २००६ पासून बंदच आहे, तर दुसऱ्याची पडझड झाली आहे. त्यामुळे येथील माथाडी कामगारांना शौचविधीसाठी उघड्यावरच जावे लागते. या मालधक्क्यावर सुमारे ७०० परवानाधारक माथाडी कामगार आहेत. मात्र, त्यांच्या आरोग्यासाठी येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. साधी प्रथमोपचार पेटीदेखील येथे उपलब्ध नाही. काम करताना कामगार जखमी झाल्यास त्यांना स्वखर्चाने उपचारांसाठी बाहेर जावे लागते. रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांसाठीचे विश्रांतिगृह २००६ पासून बंद आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना वेअर हाउसमधील सिमेंटच्या धुळीतच विश्रांती घ्यावी लागते. परिणामी या कामगारांना श्वसनविषयक विकार जडले आहेत.

----

रेल्वेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रातील चंद्रपूर व भादली येथून रस्तामार्गे सिमेंटची वाहतूक वाढली आहे.

-शिवनारायण सोमाणी, कार्टिंग एजंट

--

रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांना आरोग्य व सुरक्षाविषयक कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. मात्र, पगारातून माथाडी बोर्ड ३५ टक्के लेव्ही कपात करते.

-रामबाबा पठारे, जिल्हा संपर्कप्रमुख, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन जिल्हा सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे व त्यासंबंधित प्रक्रिया लवकरात लवकरात पूर्ण व्हावी, या मागणीसाठी येथील शिक्षकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सोमवारी भेट घेतली. रिझर्व्ह बँकेचे निकष व निष्कर्षानुसार येत्या काही दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वेतन सुरू करण्याचा निर्णय होईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री तावडे यांनी शिक्षकांना यावेळी दिली.

नोटाबंदीनंतर जिल्ह्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नाशिक जिल्हा बँकेतून वेळेवर होत नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलने करूनदेखील जिल्हा सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वेतन मिळण्यासंदर्भात निर्णायक कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले आहे. त्याबरोबरच पक्षीय राजकारण व निवडणुकीतील यशापयशाचे मोजमाप लावले जात असल्याने सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भूमिका शिक्षकांनी मांडली. त्यांचे विमा, भविष्यनिर्वाह निधी, आयकर, गृहकर्ज आदी विषय प्रलंबित राहून त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी झाले असून, लवकरात लवकर या प्रकरणी निष्कर्ष निघणे अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याविषयाचा विचार करून डीडीएफचे कार्यक्षम कार्यकर्ते शशांक मदाने यांनी सर्व संघटना व पक्षरहीत शिक्षक, शिक्षकेतर वेतन संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. तसेच या समितीच्या माध्यमातून प्रसंगी न्याय मागण्याचा मानस व्यक्त केला आहे. यावेळी संघटनेचे सतीश नाडगौडा, मिलिंद जोशी, अरुण जाधव, किशोर ठाकूर, इस्कूचे सूर्यभान जगताप, टीडीएफ नेते शशांक मदाने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड बसस्थानकातून शहर बससेवेच्या फेऱ्यांत अचानक मोठी कपात करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच लालपरीच्या गैरहजेरीने असंख्य रिक्षाचालकांचे चांगलेच फावले असून, त्यांच्याकडून प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट होत आहे. हजारो पासधारकांना तर दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा प्रवासीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

--

या मार्गांवर बसतोय फटका

शहर बसेसच्या तोट्यात चालणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने गेल्या आठवड्यात घेतला. त्यामुळे नाशिकरोड बस स्थानकातून अंबड, सातपूर, म्हसरूळ, इंदिरानगर, श्रमिकनगर, उत्तमनगर, विजयनगर, महात्मानगर, निमाणी, शालिमार अशा प्रमुख मार्गांवरील काही फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी या मार्गांवरील बसफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने दररोजच्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या निर्णयामुळे शेकडो प्रवाशांवर नाईलाजाने खासगी प्रवासी वाहनांचा वापर करण्याची नामुष्की ओढावली आहे.

--

पासधारकांची गैरसोय

शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करण्यात आल्याचा सर्वांत जास्त फटका मासिक पासधारकांना सहन करावा लागत आहे. नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड येथून नाशिकला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस उपलब्ध होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अशा पासधारकांना दुप्पट आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

--

रिक्षाचालकांची मुजोरी

शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय रिक्षाचालकांच्या चांगलाच पथ्थ्यावर पडला आहे. ज्या मार्गावरील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत, अश मार्गांवरील रिक्षाचालक प्रवाशांकडून दुपटीने भाडे वसूल करताना दिसून येत आहेत. काही रिक्षाचालक थेट बसस्थानकात शिरून प्रवासी पळवत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. नवीन प्रवाशांकडून जास्त भाडे उकळत आहेत. परिणामी प्रवासी त्रस्त झाले आहेत.

--

भुसावळ, तपोवन, पंचवटी व गोदावरी या गाड्या येतात, तेव्हा बसस्थानकातून बस उपलब्ध होत नाहीत. बसफेऱ्या कमी केल्यामुळे पासधारकांची परवड होत असून, रिक्षाने प्रवास करावा लागत असल्याने दुप्पट भुर्दंड सहन करावा लागत आहे.

-दीपक सिनकर, शहर बस पासधारक

--

नाशिकरोड रेल्वे व बसस्थानक भागातील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे. प्रत्येक रिक्षात प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. बस उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने सारे सहन करावे लागत आहे.

-एस. डी. गरुड, प्रवासी

---

रेल्वे स्थानकापासूनचे बस व रिक्षा भाडे (रुपयांत)

थांबा - शहर बस भाडे - रिक्षा भाडे

निमाणी १७ ३०

शालिमार १४ २०

श्रमिकनगर ३१ ५०

सातपूर २४ ५०

अंबड ३१ ५०

इंदिरानगर १४ ५०

उत्तमनगर ३१ ५०

एकलहरे १४ २०

म्हसरूळ २७ ५०

पाथर्डी ३१ ५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळपटूंनी पटावरच अभ्यास करावा

$
0
0

ऑल इंड‌िया चेस फेडरेशनशी संलग्न असलेल्या ऑल मराठी चेस असोसिएशनचे सहसचिव छत्रपती पुरस्कारप्राप्त बुद्धिबळ खेळाडू जयंत गोखले यांनी नुकतीच नाशिकला भेट दिली. गोखले हे फिडे प्रशिक्षक असून, आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आकांक्षा हगवणे हिला त्यांनी प्रशिक्षित केलेले आहे. गोखले यांनी नुकतीच नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बुध्दिबळाच्या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. या वर्गात त्यांनी नाशिकच्या बुध्दिबळपटूंशी संवाद साधला व काही टिप्स दिल्या. त्यांच्याशी केलेली बातचीत..

बुध्दिबळासाठी नाशिकमध्ये टॅलेंट आहे का?
- नक्कीच टॅलेंट आहे. आज विद‌ितसारखा खेळाडूने नाशिकचे नाव जगात पोहचवले आहे. खरे सांगायचे झाल्यास नाशिकमध्ये अनेक टॅलेंटेड खेळाडू आहेत, अनेक चांगले प्रशिक्षक आहेत. थोडे चॅनलाइज होण्याची गरज आहे, असे मला वाटते. आज मुंबई-पुण्यामध्येही खेळाडू आहेत. कदाच‌ित नाशिकसारखे त्यांच्याकडे टॅलेंट नसलेही. परंतु, ते आज चॅनलाइज पध्दतीने नियोजनबध्द खेळत आहेत. यासाठी नियोजन हे जास्त महत्वाचे आहे, असे वाटते. सरावासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज आहे.
आदिवासी भागातील खेळाडूंसाठी काही योजना आहेत का?
- आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. फिडे रेटिंग स्पर्धा घेतल्यास एएमसीए निश्चित त्यासाठी मदत करेल. अशी स्पर्धा एखादी जिल्हा संघटना घेणार असेल तर तिचे स्वागतच असेल. एएमसीएकडून जेवढ्या
सुविधा देता येतील तेवढ्या देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. चेस बोर्ड,
चेस क्लॉक आदींबाबत संघटना नेहमीच मदत करेल. बाकी स्थानिक
पातळीवर आम्ही जाऊ शकत नाही.
तेथे जिल्हा संघटनांनी पोहचणे गरजेचे आहे.
सॉफ्टवेअर्सचा वापर कितपत करावा?
- शक्यतो खेळाडूंनी पटावरच अभ्यास करावा. तांत्रिक साधनांचा खूपच कमी वापर करायला हवा. कारण शिकायचं खेळाडूंनाच आहे. कारण तंत्रज्ञान तुम्हाला एखादी चाल सुचवू शकेल. पण त्या चालीमागचा हेतू सांगणार नाही. त्याचं विश्लेषण तुम्हाला पटावरच करावं लागणार आहे. त्यामुळे पटावर जास्तीत-जास्त सराव करावा. जगात कितीही सॉफ्टवेअर आली असली तरीही आज जे जगज्जेते म्हणून खेळत आहे, त्यांनी पटावरच जास्तीत जास्त सराव केला आहे. उगाच खर्च करुन काही उपयोग नाही. आपल्यापेक्षा सरस खेळणाऱ्याशी केळ करावा.
करिअरबाबत पालकांनी काय निर्णय घ्यायला हवा?
- सर्वांत प्रथम म्हणजे पालकांनी मुलांचा कल ओळखणे आवश्यक आहे. उगाच मुलांवर बुद्धिबळ लादणे योग्य होणार नाही. राहिला करिअरचा प्रश्न, बुद्धिबळात करिअर करता येते. मात्र, त्यासाठी बुद्धिबळाचे योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे बुद्धिबळाचा सराव कसा करावा. कोणत्या स्पर्धा खेळाव्यात आदींचे मार्गदर्शन घ्यावे. पालकांनी मुलांवर कोणताही दबाव आणू नये. त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळू द्यावे. उणिवा काय असतील त्या प्रशिक्षक सोडवेल. पालकांनी फक्त त्याला प्रोत्साहन द्यावे. मुलांना खरंतर जास्तीत जास्त अधिकृत स्पर्धा खेळवाव्यात. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाची एक प्रकारे यातून चाचणी होते.
छत्रपती पुरस्कारात समावेशासाठी एएमसीए प्रयत्न करणार का?
- प्रयत्न सुरूही झाले आहेत. क्रीडामंत्र्यांच्या सचिवांकडे याबाबतचा प्रस्तावही गेला आहे. त्यावर लवकरच म‌िटिंग होणार आहे. आम्हाला आशा आहे, की लवकरच बुद्धिबळाचा छत्रपती क्रीडा पुरस्कारांत समावेश होईल. राज्यात अनेक खेळाडू आहेत. त्यांना छत्रपती पुरस्कार मिळालयला हवा. परंतु, सरकारच्या नियमापुढे काहीच करू शकतच नाही
एआयसीएफच्या संलग्नत्वानंतर एएमसीएची ध्येयधोरणे काय?
- कसे आहे की आधीच्या संघटनेबाबत एआयसीएफला काही उण‌िवा जाणवल्या. त्या वादात मला जायचे नाही. मात्र, एआयसीएफ हीच बुद्धिबळाची शिखर संघटना असून, ही संघटना फिडेशी संलग्न आहे. या अधिकृत संघटनेने एएमसीएला मान्यता दिल्याने संघटनेने महाराष्ट्रातील स्पर्धा, प्रशिक्षण, बुद्धिबळाचा प्रचार व प्रसार या सर्वच पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा संघटनांची नव्याने उभारणी सुरू केली असून, बुद्धिबळाचा विकास करणाऱ्या समविचारी लोकांना त्यात सहभागी करून घेतले आहे. शिखर संघटनेच्या मान्यतेनेच हे सर्व निर्णय होत असल्याने नव्या संघटना अधिकृत संघटना म्हणूनच काम करणार आहेत. त्याबाबत खेळाडूंच्या मनात कोणतीही शंका असणार नाही. संघटनात्मक पायाभरणी एएमसीएने प्राधान्याने हाती घेतली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोणती संघटना अधिकृत आहे?
- नाशिक जिल्ह्यात आम्ही अनिल देवधर, मिलिंद कुलकर्णी, सुधीर पगार आदींच्या कार्यकारिणीला मान्यता दिली असून, त्यांच्याच संघटनेला आम्ही संलग्नत्व दिले आहे. त्यामुळे या कार्यकारिणीची संघटना ज्या स्पर्धा आयोजित करेल त्यालाच एएमसीए आणि एआयसीएफची मान्यता असेल. अन्य कुणी दावा करीत असेल तर तो चुकीचा असेल.
संलग्नत्वामुळे मुलांना कसा फायदा मिळेल?
- ज्या संघटनेला शिखर संघटनेची संलग्नता असते ती अधिकृत संघटना असते हे पालकांनी, खेळाडूंनी नेहमी लक्षात ठेवावे. जिल्हा संघटनांना संलग्नता नसेल तर अशी संघटना दात, नखे नसलेल्या वाघासारखी असते. अशी संघटना काय कामाची, जी संघटना खेळाडूंसाठी अधिकृत स्पर्धाच घेऊ शकत नाही. म्हणूनच संघटनेला संलग्नतेचं महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचं (फिडे) भारतीय बुद्धिबळ महासंघाला (एआयसीएफ), एआयसीएफची जिल्हा संघटनांना आणि जिल्हा संघटनांची तालुका संघटनांना मान्यता असेल तरच खेळाडूंना क्रीडागुण, शासनाची रोख बक्षिसे, एसटी, रेल्वे प्रवासात सवलत आदी सुविधा पुरवता येतात.(शब्दांकन : फणिंद्र मंडलिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images