Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहतूक ‘एकतर्फी’च!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

इंदिरानगर येथील बोगद्यातील वाहतूक पोलिसांनी एकतर्फी करण्याचा निर्णय जाहीर केल्याने सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली वाहतूक व्यवस्थाच कायमस्वरूपी राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बोगद्यातील वाहतूक एकतर्फी केल्याने दुचाकीस्वारांची अडचण झाली असली, तरी या नवीन नियमामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे फुटली असून, वाहतुकीच्या बदलामुळे या ठिकाणी अपघातांची संख्या कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रशासनाने या नवीन वाहतूक मार्गाबरोबर सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे ये-जा करण्यासाठी उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या बोगद्यातून ही वाहतूक होत होती. पूर्वी हा बोगदा सर्वच वाहनांसाठी दुतर्फा सुरू होता. त्यानंतर अपघात व वाहतुकीचे नियोजन होत नसल्याने पोलिसांनी हा बोगदाच बंद केला होता. राजकीय आंदोलनांनंतर हा बोगदा कार्यान्वित करण्यात आला. मात्र, त्यातून गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येताना फक्‍त दुचाकींनाच प्रवेश होता. दुचाकींव्यतिरिक्‍तच्या वाहनांना प्रकाश पेट्रोलपंपाजवळून यू टर्न घेऊन इंदिरानगरकडे यावे लागत होते. मात्र, यामुळेसुद्धा बोगद्याजवळ सकाळी व सायंकाळी खूपच गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत होती.

पाहणीनंतर निर्णय

ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलिसांनी गेल्या आठवड्यात अचानकपणे प्रायोगिक तत्त्वावर इंदिरानगरकडून गोविंदनगरला जाण्यासाठी सर्व गाड्यांना हा बोगदा खुला केला, तर गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येण्यासाठी सर्वच वाहनांना हा बोगदा बंद केला. आठवडाभर या वाहतुकीच्या बदलाची पाहणी केल्यानंतर पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी याबाबतची अधिसूचना अधिकृतपणे जाहीर केली.

...तर होणार कारवाई

ही अधिसूचना जाहीर केल्यामुळे आता या अधिसूचनेचा भंग केल्यास व अपघात झाल्यास त्यास कोणतीही नुकसानभरपाई मिळत नसल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अधिसूचनेचा भंग करून कोणीही हा नियम मोडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले

आहे. पोलिसांच्या नियमाची अंमलबजावणी न करता कोणत्याही वाहनाने या नियमाचा भंग केला, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही स्‍पष्ट केले आहे.


अशा प्रकारे होणार वाहतूक

नव्या अधिसूचनेमुळे आता हा बोगदा ‘वन वे’साठीच खुला राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच पोलिसांनी प्रकाश पेट्रोलपंपाकडून आल्यावर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडे जाण्यासाठी बोगद्याच्या पूर्वीच पंक्चर तयार केल्याने बोगद्याच्या चौफुलीवरील वाहतूक कोंडीत घट होत असल्याचा

प्रशासनाचा दावा आहे. या नवीन अधिसूचनेमुळे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येताना प्रकाश पेट्रोलपंपाजवळून वळण घेऊन यावे लागणार आहे. इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाताना बोगद्याचा वापर करता येणार असून, बोगद्यातील वाहतूक एकतर्फीच राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबई नाका ते लेखानगर व लेखानगर ते मुंबई नाका हे दोन्ही सर्व्हिसरोड दुतर्फा वाहतुकीसाठी राहणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.



सिग्नल, सीसीटीव्हीची निकड

बोगद्यातील वाहतुकीत बदल केला असला, तरी येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिग्नल यंत्रणा उभारल्यास वाहतुकीस त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मतही व्यक्‍त होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनाच येथे थांबावे लागत असते. रात्री पोलिस नसताना वाहनचालक सर्रासपणे नियम मोडत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यावर उपाय म्हणून बोगद्यात सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवीण तिदमे वेटिंगवर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवाजी सहाणे हेच म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे २६ मेपर्यंत अध्यक्ष राहतील. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत नव्या अध्यक्षांची घोषणा होईल, अशी माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. गेल्या आठवड्यापासून तिदमे अन् सहाणे यांच्याविषयी उठणाऱ्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करीत ती केवळ संवादातील दरी होती, असे सांगत या विषयावर समेट घडविण्याचा प्रयत्न बोरस्ते यांनी केला.

म्युनिसिपल कर्मचारी-कामगार या शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेच्या अध्यक्षपदाच्या वादावरून शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मात्र या प्रकरणात मंगळवारी समेट घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, अॅड. शिवाजी सहाणे आणि स्थायी समितीचे सदस्य प्रवीण तिदमे उपस्थित होते. यावेळी गत आठवडाभरापासूच चर्चेत आलेल्या तिदमे-सहाणे यांच्या सुंदोपसुंदीबाबत चर्चा झाली. या दोन्हीही कार्यकर्त्यांमध्ये आपसात कुठलेही मतभेद नसून, पक्षातील एकोपा कायम असल्याचा निर्वाळाही बोरस्ते यांनी दिला.

दोघांनीही मांडली बाजू

मला म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदावर रहाण्याची इच्छा नाही. कारण पक्षाने संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा आहे. या पदाच्या जबाबदारी बदलासंदर्भात जी काही चर्चा कानावर आली ती चर्चा विद्यमान अध्यक्ष या नात्याने एकदा तरी विश्वासात घेऊन मला सांगणे अपेक्षित होते असे सांगत सहाणे यांनी नाराजी झाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, २६ तारखेच्या बैठकीत पक्ष निवड करेल त्या नवनिर्वाचित अध्यक्षांकडे कार्यभार सोपवू, असे सांगताना विद्यमान अध्यक्षपदावरील दावा मात्र त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवला. स्थायी समितीवर या पदाच्या निवडीबाबत झालेल्या सत्काराबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यावर तिदमे यांनी आमच्या बाजूने सत्काराचा प्रस्तावच ठेवला गेला नसल्याचा खुलासा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदीवानाच्या हस्तकौशल्यास उपमहानिरीक्षकांची दाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

येत्या गणेशोत्सवात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचा गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल लावण्याचे नियोजन करण्याची सूचना मंगळवारी राज्याचे कारागृह मध्य विभागाचे (औरंगाबाद) उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना केली. कारागृहातील एका बंदीवानाने बनविलेल्या इको फ्रेंडली सुबक गणेशमूर्ती बघून आश्चर्यचकित झाल्यानंतर त्यांनी ही सूचना केली. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत या कारागृहातील बंदीवान गणेशमूर्ती बनवितानाही दिसून येणार आहेत.

उपमहानिरीक्षक धामणे मंगळवारी नाशिकरोड कारागृहाच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याप्रसंगी त्यांच्या हस्ते कारागृहातील डायनिंग हॉलचे उद्घाटन झाले. या ठिकाणी ठेवलेल्या अत्यंत सुबक अशा दोन गणेशमूर्ती बघून या सुंदर मूर्ती कोणी बनविल्या याविषयी त्यांनी चौकशी केली. इतक्या सुंदर गणेशमूर्ती जर बंदीवान बनवू शकत असतील, तर येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांना गणेशमूर्ती बनविण्यासाठीचे सर्व साहित्य उपलब्ध करून द्या व गणेशोत्सवात गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल लावावा, अशी सूचना यावेळी उपमहानिरीक्षक धामणे यांनी केली.

बंदीवानाच्या कलेची मोहिनी

या सुबक गणेशमूर्ती सागर भरत पवार (रा. कोकण) या बंदीवानाने स्वतःच्या हाताने डाय न वापरता साकारल्याचे सांगताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. या मूर्ती बघून उपमहानिरीक्षक धामणे यांनी बंदी सागर पवारचे कौतुकही केले. सागर पवार हा बंदी कोकणात कंपन्यांसाठी गणेशमूर्तींचे केवळ मास्टरपीस बनविण्याचे काम करीत असे. त्याच्या मास्टरपीसच्या आधारेच पुढे या कंपन्या हजारो गणेशमूर्ती बनवित असल्याची माहिती सागर पवार याने यावेळी दिली. त्याने हैद्राबादच्या रामोजी फिल्म सिटीतही एक स्टॅच्यू उभारला असल्याचे सांगितले.

मोबाइल घबाडाबाबत सोडले मौन

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांकडे डिसेंबर २०१६ मध्ये मोबाइल फोन्सचे घबाड आढळून आल्याने या कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते. असे प्रकार कारागृहातील काही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय घडू शकत नाहीत, अशी कबुली उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी मंगळवारी दिली. त्यांच्या कबुलीमुळे येथे काही तत्कालीन सुरक्षा कर्मचारी व बंदीवान यांच्यात मोबाइल फोन पुरविण्याचे रॅकेट सुरू होते, यास दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, येथे नव्याने ४९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह नाशिकरोड, पैठण आणि औरंगाबाद येथील कारागृहांत पेट्रोलपंप सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा पुन्हा चाळिशीजवळ

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

गारव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची ओळख हळूहळू बदलते की काय, अशी शंका नाशिककरांना येत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. मंगळवारी ३९.९ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले असून, यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

मागील काही दिवसांत तापमान घसरल्याने शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण तापमानात पुन्हा एकदा वाढ झाल्याने नाशिककरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासूनच उष्म्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून दिवसेंदिवस तापमानाचा पारा नवनवे उच्चांक गाठत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक सायंकाळीच घराबाहेर पडण्यास प्राधान्य देत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहे. शीतपेय, फळ, नारळपाणी यांच्या स्टॉलवर नागरिक गर्दी करत असून स्कार्फ, टोप्या, गॉगल्स यांनाही चांगली मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारखा उलटूनही लागेना निकाल

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या मार्च-एप्रिल २०१७ अंतिम परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. सायन्स, कॉमर्स, आर्टसच्या एफवाय ते टीवाय वर्गाची अंतीम परीक्षा विद्यापीठामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षांच्या शेड्युल फाइलमध्ये विद्यापीठाने निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालाच्या संभाव्य तारखा उलटून गेल्या तरीही संकेतस्थळावर निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बीकॉमची परीक्षा ३० मार्च रोजी सुरू होऊन ५ ते ७ एप्रिलच्या दरम्यान संपली होती. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असणाऱ्या कॉमर्स शाखेच्या परीक्षा विभागाच्या शेड्युल फाइलमध्ये निकाल जाहीर करण्याची तारीख १८ मे २०१७ अशी नमूद केलेली आहे. ही तारीख उलटून गेली तरी विद्यापीठाने बीकॉमचा निकाल जाहीर केलेला नाही. विद्यापीठानेच जाहीर केलेल्या तारखेला निकाल हाती लागत नसेल तर नेमका निकाल जाहीर होणार कधी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कॉमर्स शाखेच्या निकालाच्या संभाव्य तारखांचा हा घोळ बघून आता सायन्स आणि आर्टस् शाखेचे विद्यार्थीदेखील संभ्रमात पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख‌रिपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज

$
0
0

जिल्हा प्रशासनाने हाती घेतले सुलभ पीककर्ज अभियान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँककडून खरीप हंगामासाठी कर्ज मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना धुसर वाटू लागली आहे. शेतकऱ्यांवर येऊ घातलेले आर्थिक अरिष्ट दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुलभ पीककर्ज अभियान हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे आयोजित करून राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. एक लाखापर्यंतचे कर्ज जागेवर मंजूर केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी दिली.

जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी फोडण्यास वेळ लागण्याची चिन्हे असून, शेतकऱ्यांसाठी कोणते पर्याय उपलब्ध करून देता येतील, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते. वाटप केलेल्या पीककर्जाची वसुली न झाल्याने जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज हवे असून, त्यांना हंगाम वाया जाण्याची भीती सतावते आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्धतेबाबत दिलासा देता यावा यासाठी ‘सुलभ पीककर्ज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकार विभागाच्या समन्वयातून पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गावपातळीवर मेळावे घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केल्या. सर्व सहकारी उपसहायक निबंधकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पीककर्ज घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या संबंधित गावाच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांना तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश त्यांनी दिले. तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी मेळाव्यांचे आयोजन करावे, असे आदेशही देण्यात आले. सुमारे एक लाख शेतकऱ्यांना या अभियानातून कर्ज उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.

एक लाखाहून अधिक कर्जासाठी

दोन फोटो, रेशनकार्ड, लाईट बिल, रहिवासी दाखला, ८ अ तसेच ८ अ प्रमाणे सातबारा उतारा, सर्व गटाच्या चतुःसीमा, फेरफार ६ ड नोंदी, अधिकृत वकिलाकडून सर्च रिपोर्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरांचे कडवे आव्हान

$
0
0

शिवसेना, भाजपमध्येच रंगणार मुख्य सामना

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापलिकेच्या ८३ जागांसाठी तब्बल ३७३ उमेदवार रिंगणात आहेत. हिंदूबहुल पश्चिम भागात शिवसेना आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होणार आहे. मात्र, त्यांच्यासमोर अपक्ष म्हणून उतरलेल्या बंडखोरांचे कडवे आव्हान आहे. पूर्व भागात काँग्रेस, राष्ट्रवादी-जनता दल, एमआयएम, भाजप अशी लढत रंगणार आहे.

प्रभाग १ : सेना बंडखोर भाजपकडून रिंगणात

प्रभागात शिवसेना भाजप दोन्ही पक्षांच्या बंडखोर अपक्षांनी अडचणी वाढविल्या आहेत. शिवसेनेकडून कविता बच्छाव, भारत रायते, जिजाबाई पवार, प्रतिभा पवार तर भाजपकडून युवराज वाघ, वैशाली पवार, अर्चना गोऱ्हे, माजी नगरसेवक विजय देवरे यांच्यात प्रमुख लढत आहे. अपक्ष म्हणून चेतन अहिरे, भारत म्हसदे, शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक रवींद्र पवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. म्हसदे हे ‘रिपाइं’चे तालुकाप्रमुख असून १५ वर्षे भायगाव ग्रामपंचायतीचे सदस्य राहिले आहेत. जगदीश गोऱ्हे शिवसेना बंडखोर असून त्यांच्या पत्नी अर्चना यांना भाजपाने संधी दिली आहे.

प्रभाग ८ : शिवसेनेपुढे सर्वाधिक आव्हान

प्रभागात शिवसेनेपुढे सर्वाधिक आव्हान आहे. नगरसेवक सखाराम घोडके, नरेंद्र सोनावणे व गुलाब पगारे रिंगणात असल्याने लढत लक्षवेधी ठरली आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक राजेश गंगावणे यांच्या पत्नी पुष्पा, रामा मिस्तरी यांच्या पत्नी सुनिता, कधीकाळी काँग्रेसनिष्ठ नगरसेवक सखाराम घोडके, माजी नगरसेवक राजाराम जाधव रिंगणात आहेत. भाजपकडून कलाबाई खडताळे, दीपाली वारुळे, मनसे नगरसेवक गुलाब पगारे व तिसरा महाज गटनेते नरेंद्र सोनावणे यांना संधी दिली आहे. काँग्रेसच्या रिना कापडणे तर राष्ट्रवादीकडून राधा शेजवळ रिंगणात असल्याने चौरंगी लढत आहे. ‘क’ जागेसाठी घोडके विरुद्ध पगारे असा सामना रंगणार आहे. तर ‘ब’ जागेसाठी शिवसेनेचे कैलास तिसगे यांच्या पत्नी कोकिळा तर शिवसेनेचे जितेंद्र देसले यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

प्रभाग ९ : प्रतिष्ठांमध्ये सामना

प्रभागातून भाजप महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने उमेदवारी करीत आहेत. त्यांच्यात थेट लढत नसली तरी कोण विजयी होते याची उत्सुकता आहे. मामको बँकेचे माजी अध्यक्ष राजेद्र भोसले यांनी प्रभागातील चारही जागांवरील अपक्ष उमेदवारांचे पॅनल तयार केले आहे. यात अनंत भोसले, जयश्री पवार, ज्योती पवार, लीना लोंढे यांचा समावेश आहे. अपक्ष देवा पाटील व विजया पवार असा एकूण ६ अपक्षांचे आव्हान प्रस्थापितांपुढे असणार आहे.

प्रभाग १० : भाजपची खास रणनीती

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याची भाजपची रणनीती आहे. शिवसेनेकडून सोयगावाचे माजी सरपंच प्रकाश आहिरे यांच्या पत्नी आशा तर भाजपकडून शेतकी संघाच्या अध्यक्षा मनीषा हिरे यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजप इच्छुक बापू बच्छाव यांच्या पत्नी मंगला यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेना भाजपासाठी कडवे आव्हान असेल.

प्रभाग ११ : उमेदवारांची कसोटी

शिवसेना-भाजपच्या उमेदवारांची कसोटी असणार आहे. यातील ‘ड’ जागेसाठी सर्वाधिक चुरस आहे. तेथे भाजपतर्फे नगरसेवक मदन गायकवाड आणि राज्यमंत्री दादा भुसे यांचे शालक जयराज बच्छाव यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजप इच्छुक व विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री मच्छिंद्र शिर्के यांनी अपक्ष उमेदवारी करत आव्हान दिले आहे. ‘ब’ जागेसाठी भाजपतर्फे सुधीर जाधव यांच्या पत्नी वैशाली तर शिवसेनेकडून युवा सेनेचे जिल्हा संघटक विनोद वाघ यांच्या पत्नी कल्पना यांच्यात लढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्र-जमावबंदीचे शहरात आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र असलेल्या शहर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष शाखेचे पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी सर्व पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना ४ जून २०१७ पर्यंत प्रतिबंधात्मक तसेच शस्त्रबंदी व जमावबंदीचे लेखी व तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावरील मिरवणुकीतील व्यक्तिंचे वागणे, बिभत्स व अश्लिल हावभाव अथवा कृत्याबाबत आदेश देणे, ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी वापरावयाच्या लाऊड स्पिकरची वेळ, पद्धती, ध्वनीची तिव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे, रस्त्यावर-सार्वजनिक जागेवर गाणी, संगीत ड्रम्स, ताशे, ढोल किंवा इतर वाद्ये, हॉर्न वाजविणे किंवा कर्कश आवाज करण्यावर नियंत्रण ठेवणे, राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध यासाठी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलिस कायद्याच्या कलम १३४ नुसार शिक्षेस पात्र ठरणार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ४ जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समृध्दीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृध्दी महामार्गाच्या कार्यवाहीला गती मिळावी, यासाठी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून सामंजस्याने मार्ग काढा, तसेच जेथे जमीन मोजणी पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांशी थेट वाटाखाटीव्दारे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतची तयारी सुरू करा, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मलिक यांनी आढावा घेतला. समृध्दी महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाले आहे. परंतु, काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार आणि प्रशासकीय स्तरावर मात्र या महामार्गाबाबतची कार्यवाही वेगाने सुरू आहे. जमीन खरेदी आणि खासगी वाटाघाटीसाठी गटनंबर जाहीर करून आता दर निश्चितीचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागपूर पाठोपाठ वर्धा आणि ठाण्यातही प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिकमध्येही १५ दिवसांत दर जाहीर करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात काही गावांमध्ये या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यात आला असून, या गावांमधील शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढा, असे आदेश मलिक यांनी दिले.
दर निश्चितीच्या सूचना

ज्या गावातील मोजणी पूर्ण झाली तेथील दर निश्‍चिती करून सरकारकडे निधीची मागणी करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणचे गेल्या पाच वर्षांत झालेले व्यवहार, तेथील रेडीरेकनर दराचा ताळमेळ घेऊन सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि दुय्यम निबंधकांच्या संयुक्त विद्यमाने दरांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. दर निश्चितीची सरकारी प्र‌क्रिया पूर्ण झाल्यानंतर येणारा सर्वाधिक दर निश्चित धरत व त्यामध्ये २५ टक्के रक्कम वाढवून देत दर अंतिम केले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, करूया बीज संकलन...

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक परिसर हिरवागार करण्यासाठी आता डॉक्टरांनीही पुढाकार घेतला आहे. ‘हरितविश्व’च्या छताखाली डॉक्टर एकत्र आले असून, त्याद्वारे वृक्षलागवडीचा संकल्प त्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांत यशस्वी बीजारोपण केल्यानंतर यावर्षी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यासाठीच बीज संकलनाची मोहीम या ग्रुपने हाती घेतली आहे. त्यात नाशिककरांना सहभागी होता येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हरितविश्व या संस्थेतर्फे नाशिक व जवळपासच्या डोंगराळ भागात वृक्ष लागवड केली जाते. हे विश्व हरित ठेवण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आयुर्वेद डॉक्टरांची एक टीम जून २०१६ पासून वृक्षारोपण व त्यांचे संगोपन करीत आहे. मागील वर्षभरापासून दर रविवारी नाशिकमधील डॉक्टर्स त्र्यंबकेश्वर येथे जाऊन वृक्षारोपण व त्यांचे संगोपन करीत आहेत. याही वर्षी त्याच उत्साहात संस्था आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मदतीने आणि जनसामान्यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड करण्यास सज्ज आहे. आपल्यालाही वृक्ष लागवड करण्याची इच्छा असेल, तर आपणही यात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपल्याकडे घरात असलेल्या फणस, जांभुळ, चीकू, सीताफळ, आंंबा, आवळा अशा व यांसारख्या अन्य औषधी व इतर झाडांची रोपे, बिया आपण देऊ शकता. सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याच्या कोयींची लागवड आपण ‘हरितविश्व’च्या मदतीने करू शकता. त्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या संस्थेेच्या मदतीने वृक्ष लागवडीच्या कार्यात सहभागी व्हावे व या पावसाळ्यात जास्तीत जास्त बीजरोपण करून अधिकाधिक झाडे लावावीत, असे आवाहन संस्थेेच्या वतीने डॉ. राहुल चौधरी यांनी नाशिककरांना केले आहे.

---

येथे करा बीज संकलन

--

-माधव आयुर्वेद चिकित्सालय, साची होंडा शोरूमसमोर, महात्मानागर, नाशिक.

-डॉ. राहुल चौधरी, औदुंबर चिकित्सालय, फ्लॅट नंबर बी-४, दुर्गेश रेसिडेन्सी, पाइपलाइनरोड, गंगापूररोड, आनंदवली, पतंजली मॉलच्या वर, नाशिक.

-डॉ. संदीप पाटील, माधव चिकित्सालय, फ्लॅट नंबर १, अरुणोदय सोसायटी, समर्थनगर, नाशिक.

-डॉ. तुषार सूर्यवंशी, विश्वागंध चिकित्सालय, तोरणा पॅलेस, पहिला मजला, ७-ब, माणिकनगर, गंगापूररोड, नाशिक.

-डॉ. चंदन उमाळे, पुनर्नवा चिकित्सालय, स्वानंद सोसायटी, काठे गल्ली, नाशिक.

-डॉ. केतन पाटील, वेदस्पर्श चिकित्सालय, ड्रीम कॅसल बिल्डिंगसमोर, मखमलाबाद नाका, नाशिक.

-महाराष्ट्र टाइम्स कार्यालय, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक.

--

वृक्ष लागवड होणारी ठिकाणे

ब्रह्मगिरी, अंजनेरी पायथा, गंगापूर गाव, चुंचाळे शिवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-मनसेचा कन्नडिगांना ‘जय महाराष्ट्र’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सीमाभागात मराठीची गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेने मंगळवारी सेना स्टाइल आंदोलन केले. कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये असलेल्या कर्नाटक बँकेच्या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या गळ्यातच ‘जय महाराष्ट्र’ बोर्ड लावून सेना पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला. तर मनसेने कर्नाटक महामंडळाच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून संताप व्यक्त केला.

सीमाभागात ‘मराठी’ची गळचेपी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या कर्नाटक सरकारने आता ‘जय महाराष्ट्र’ घोषणेविरोधातच फतवा काढला आहे. नगरसेवक किंवा स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांनी ‘जय महाराष्ट्र’ किंवा कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या तर त्यांचे सदस्यत्वच रद्द होणार असून, तसा कायदा राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आणला जाणार आहे. यामुळे आता मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील कार्यक्रमात सदस्यांना ‘जय महाराष्ट्र’ घोषणा देता येणार नाही. कर्नाटकच्या या दडपशाहीविरोधात सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी सोमवारी ‘जय महाराष्ट्र’ विरोधात गरळ ओकली. ‘जय महाराष्ट्र’ किंवा कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी केल्यास नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबतचा कायदाच आगामी अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असल्याची धमकीच बेग यांनी दिली आहे. ‘मंगळवारी महापालिकेला भेट देऊन नगरसेवकांसमोर याबाबतची भूमिका स्पष्टपणे सांगणार आहे. कर्नाटक सरकारविरोधात सातत्याने होणाऱ्या घोषणाबाजीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे बेग यांनी सांगितले. या साऱ्या प्रकाराची दखल घेत शिवसेनेने मराठीच्या गळचेपीला शिवसेना स्टाइल उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी शहरात आंदोलन करण्यात आले.

भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, महानगरप्रमुख संदीप गायकर, उपमहानगरप्रमुख राजाभाऊ क्षीरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी कॅनडा कॉर्नरजवळील वसंत मार्केट येथे असलेल्या कर्नाटक बँकेकडे धाव घेतली. यावेळी या सर्व कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. कर्नाटक सरकारला त्यांची जागा दाखवू, मराठीचा झेंडा बेळगावात फडकवू अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. बँकेच्या बाहेर आंदोलन केल्यानंतर सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँकेत शिरुनही घोषणाबाजी केली. याप्रसंगी ‘जय महाराष्ट्र’ लिह‌िलेला बोर्ड बँकेत लावण्यात आला. तसेच, बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जावून सेना कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे, संतप्त कार्यकर्त्यांनी शाखाधिकाऱ्यांच्या गळ्यातच ‘जय महाराष्ट्र’ बोर्ड लावत आपला संताप व्यक्त केला.

मनसेने रंगवल्या बस

कर्नाटक परिवहन महामंडळाच्यावतीने ‘ऐरावत’ ही लक्झरी बस सेवा नाशिकहून दिली जाते. नाशिक ते बेळगाव अशी दररोज सेवा असते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या बसला आपले लक्ष्य केले. कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी रंगाच्या स्प्रेद्वारे ऐरावत या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिह‌िले. तसेच, या बसचे कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यासमोर तसेच बसच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जय महाराष्ट्रच्या घोषणांनी सीबीएस परिसरात दणाणून गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला तहसीलवर ‘स्वारिप’चा आक्रोश मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शासकीय योजनांसाठी शासनाच्या जाचक अटी, शेतकरी संकटात सापडला असतानाच बँकांनी सुरू केलेली सक्तीची वसुलीच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २३) येवल्यात ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे व भाऊसाहेब गरुड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात सहभागी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा देत येवला तहसील कार्यालयावर धडक दिली. या वेळी निवासी नायब तहसीलदार सविता पठारे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शहरातील विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निघालेला मोर्चा पुढे मनमाड-नगर राज्य महामार्गावरून घोषणा देत तहसील कार्यालयावर पोहचला. याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सतत तीन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती.ह्या वर्षी पाऊस झाला पण सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. तसेच नोटबंदी, बँकेची सक्तीची वसुली व शासकीय योजनेच्या जाचक अटी व शर्ती यासर्व गोष्टींना शेतकरी व शेतमजूर वैतागला आहे. शासन व प्रशासन सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केला. शेतकरी व शेतमजुरासाठी दलित आदिवासींसाठी हे सरकार अपयशी ठरत असल्याचेही ते म्हणाले. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही पगारे यांनी दिला. यावेळी शशिकांत जगताप, दीपक लाठे, तुषार आहिरे, निषाचंद्र मोरे आदींची भाषणे झाली. मोर्चात राजाभाऊ बनसोडे, विजय घोडेराव, आकाश घोडेराव, तुळशिराम जगताप, दिनेश आहिरे, बाळू आहिरे, मंगेश शिंदे, बाळू कसबे, बाळू गायकवाड आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर आराखड्याप्रकरणी कारवाईची मागणी

$
0
0

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांच्यासह नगरसेवक, नगराध्यक्षा आदींची तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी त्र्यंबकेश्वर शिवसेनेने मंगळवारी (दि. २३) जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

त्र्यंबकच्या प्रारुप शहर विकास आराखड्याच्या बाबत आपली दिशाभूल करून स्वाक्षरी घेतली, असे मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी म्हटले आहे. ते तर्क विसंगत असून जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी असे वक्तव्य करत नगराध्यक्षांसह नगरसेवकांवर केलेल्या आरोपांनी त्र्यंबक शहराची बदनामी होत आहे.येथील ग्रामस्थ यामुळे व्यथित झाले आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्र्यंबक शहर विकास आराखडा हा भविष्यातील शहर विकासाचा पाया असून, त्याबाबत अशाप्रकारे वादळ निर्माण केल्याने शहर विकास थांबणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी आणि दोषी असेल त्यांना शासन करावे त्याप्रमाणे मुख्याधिकारी यांना पालिकेच्या कारभारापासून दूर ठेवावे त्याजागी सक्षम अधिकारी नेमावेत, अशी मागणीही केली आहे. याप्रसंगी तालुकाप्रमुख निवृत्ती लांबे, शहरप्रमुख सचिन दीक्षित, भूषण अडसरे, शाम भुतडा, सतीश कदम, महेंद्र बागडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळ‍ू वाहतूकदारांना दणका

$
0
0

दहा वाहने जप्त; दंड वसुलीच्या बजावल्या नोटिसा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांवर नाशिक तहसील कार्यालयाने जप्तीची कारवाई केली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये अशा स्वरुपाच्या अनेक कारवाया करण्यात आल्या असून, संबंधित वाहन मालकांना १६ लाख रुपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहरातच नव्हे तर जिल्ह्यात अवैधरित्या वाळू आणि तत्सम गौन खनिजांची वाहतूक होत असल्याचे यापूर्वी वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा वाहनांवर कारवाईची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून हाती घेतली जाते. नाशिक तहसील कार्यालयानेही अशा अवैध वाहतुकी विरोधात मोहीम उघडल्याची माहिती तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी दिली. या मोहिमेंतर्गत गेल्या पाच दिवसांमध्ये दहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने धुळे आणि नंदुरबारमधून आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या वाहनांपैकी नऊ वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वाळू असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले. तर एका वाहनामध्ये कचखडीचे प्रमाण अधिक होते असे सूत्रांचे म्हणणे आहे. कारवाई केलेल्या वाहनांपैकी सात वाहने नाशिक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तर उर्वरित तीन वाहने नाशिकरोड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. प्रशासनाने या वाहन मालकांना बाजारभावाच्या पाचपट दंडाच्या नोटिसा बजावल्या असून, १६ लाख ६५३ रुपये दंड वसुली अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठेगल्लीत होणार मनोरंजनाची लयलूट

$
0
0

स‌िझन-३ चा अखेरचा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ मोठ्या जल्लोषात साजरा होणार


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या आपुलकीचा अन् जल्लोषाचा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ रविवार २८ मे रोजी बनकर चौक, काठेगल्ली येथे रंगणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ तर्फे आयोजित या उपक्रमात बॉल‌िवूड गाण्यांवरचा धमाकेदार झुम्बा, सुगम गाण्यांची बहारदार मैफल, उत्साह वाढवणारे खेळ अन् अनेक सदाबहार परफॉर्मन्सेस या सगळ्यांची लयलूट करता येणार आहे. बनकर चौक ते त्रिकोणी गार्डनपर्यंत तुम्हाला आनंदाचा ‘सीझन-३’मधील शेवटचा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’चे रमणीय क्षण अनुभवता येणार आहेत.

‘हॅप्पी स्ट्रीट्स’वर सकाळी साडे सहा ते साडे नऊ या वेळेत बच्चेकंपनी, तरुणाई आणि अबालवृध्दांना मनोरंजनाच्या आनंदोत्सवात सहभागी होता येणार आहे. आठवड्याभराच्या टेन्शनमधून मुक्त होत नाशिककरांची संडे मॉर्निंग उत्साहात, आनंदात, जल्लोषाच्या वातावरणात साजरी करण्यासाठी ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ ही मनोरंजनाची अस्सल मेजवानी ठरणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकाराची नाव नोंदणी करण्याची गरज नाही. कामाचा शीण, रोजची धावपळ हे सगळं टाळून रविवारची अल्हाददायक सकाळ तुमच्या हक्काच्या रस्त्यावर ‘फुल्ल टू टशन’मध्ये एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. काठेगल्लीच्या या ‘हॅप्पी’ रस्त्यावरील विविध अॅक्टिव्हिटीज््मध्ये सहभागी होत तुम्ही धम्माल मस्ती करत आनंदाची अविस्मरणीय लयलूट करू शकता. येत्या रविवारचा काठेगल्लीचा रस्ता फक्त आणि फक्त तुमच्या जल्लोषासाठी अन् आनंदासाठी खुला असणार आहे. ‘मटा’ तर्फे आयोजित ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ सीझन-३चा हा शेवटचा रविवार असल्याने तुम्हाला कल्ला, धम्माल अन् मस्ती करण्याची शेवटची संधी असणार आहे.

काठेगल्लीत होणाऱ्या ‘हॅप्पी स्ट्रीट्स’मध्ये यूथचा नवा ट्रेंड असलेला झुम्बा वेस्टर्न अँड मॉडर्न म्युझिकवर प्रतीक हिंगमिरेच्या इलाइट फिटनेसतर्फे सादर होणार आहे. तसेच नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार रचना आर्ट अकॅडमीचे राजू दाणी आणि टीमकडून करुन दाखवले जाणार आहेत. इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकारातले सुगम संगीत, इस्ट अँड वेस्ट म्युझिक अकॅडमीचे नरेंद्र पुली आणि त्यांचे शिष्यगण यांचे गिटार वादन, बासरी वादनाची रवींद्र जोशी यांची मैफल तुम्हाला अनुभवता येणार आहे. सोबतच नाशिक पोलिस बॅण्डचा खास नजराणा भेटीला येणार आहे. दंडे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद दंडे यांच्यातर्फे महिला ढोल पथक देखील हॅप्पी स्ट्रीट्सवर ढोलवादन करण्यासाठी सज्ज असणार आहे. वर्ड कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे बारकावे समजावून सांगणार आहेत. ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार हर्षल शिंदे दाखवणार आहे. विजयराज यांचा मॅजिक शो, भक्ती आणि मुक्ती यांचं पॉफस्टिकल क्राफ्ट, प्रेमदा दांडेकर यांची स्ट्रीट रांगोळी असे अनेक उपक्रम लक्ष वेधून घेणार आहेत. सोबतच सौरभच्या वन एट वन ग्रुपतर्फे अनोख्या स्टाइल्सचे टेम्पररी टॅटू काढून मिळणार आहेत. रुद्र आणि दीप आहेर यांची स्ट्रीट पेंटिंगची कालाकुसरता अनुभवता येईल. आनंद लाफ्टर क्लबची एक खास पेशकश इथे होणार आहे. सुरजित मानचंदा यांच्या आयएनआयएफडीतर्फे काही वैशिष्ट्यपूर्ण चिल्ड्रन अॅक्टिव्हिटी होणार आहे. प्रमोद पाटील यांच्याकडून कॅनॉप‌ि स्टॉल इथे असणार आहेत. यासोबतच लहानग्यांसाठी बचपन गलीचे आकर्षण यंदाही असून भोवरे, ठिक्कर, व्हॉल‌िबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग असे अनेक गेम्स डी-कॅथलॉनकडून असणार आहेत. तुषार संकलेचा यांच्याकडून एक झक्कास सेल्फी पॉइंट असणार आहे.


कलाकारांनी इथे साधावा संपर्क

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे. अशा कलावंतांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डीसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खेडगावला आज कृषी कविसंमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या तीन वर्षांत विविध संकटामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. परंतु, आत्महत्या करून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही तर संकटांना सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी खेडगाव (ता.दिंडोरी)येथे आज, बुधवारी (दि. २४) कृषी कविसंमेलन होणार आहे. प्रख्यात कवी रामदास फुटाणे हे विविध ठिकाणी कविसंमेलने घेऊन सकारात्मक विचारांची जागृती करणार आहे. या अभिनव कृषी संमेलनाचा प्रारंभ दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील संमेलनातून होणार असल्याची माहिती निमंत्रित कवी प्रा. संदीप जगताप यांनी दिली.

संमेलनाचे सूत्रसंचालन कवी रामदास फुटाणे करणार असून यावेळी संभाजी भगत (मुंबई), अशोक नायगावकर (मुंबई), सुरेश शिंदे (करमाळा), महेश केळुस्कर (मुंबई), संदीप जगताप (चिंचखेड), दुर्गेश सोनार (पंढरपूर), नितीन देशमुख (अमरावती), भरत दौंडकर (शिरूर), अरुण मात्रे (मुंबई), प्रा. लक्ष्मण महाडिक (पिंपळगाव बसवंत), प्रकाश होळकर (लासलगाव), अनिल दीक्षित (पुणे), नारायण पुरी (नांदेड), साहेबराव ठाणगे (पारनेर), प्रशांत केंदळे (नाशिक), तुकाराम धांडे (इगतपुरी), अरुण पवार (बीड), रवींद्र कांगणे (सिन्नर) आदी नामवंत कवी सहभागी होणार आहे. तरी या संमेलनास मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतफेड करणाऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्जफेडनंतरही जिल्हा बँक आपल्याला पुन्हा कर्ज देईल याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. म्हणूनच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. कर्जफेड करतानाच शेतकऱ्याने पुन्हा तेवढेच कर्ज मागितले तर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याला लगेचच कर्ज उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हा बँकेला करण्यात आल्या आहेत. बँकेने भंग केल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेला दिला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी पीककर्जाबाबत आढावा घेतला. या आढावा बैठकीला प्रशासकीय अधिकाऱ्यांसह बँकांचे अधिकारीही उपस्थित होते. कर्जाची परतफेड करणे शक्य असूनही अनेक शेतकरी परतफेड करीत नाहीत. पुन्हा कर्ज मिळेल याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळेच जिल्ह्यात केवळ २२ हजार ६५४ शेतकऱ्यांनी कर्ज परत केले असून, दोन लाख १७ हजार ६३० शेतकऱ्यांनी अजूनही कर्जाची परतफेड केलेली नाही. म्हणूनच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याने पुन्हा नवीन कर्जाची मागणी केल्यास ती तत्काळ पूर्ण करा, अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी जिल्हा बँकेला केली आहे. अशा व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगकर्मींसाठी नवी दालने खुली होणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनंत कुबल या एकांकिका स्पर्धेला वलय येत असून, येथे परफॉर्मन्स करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या तरुण रंगकर्मींना नाट्य परिषद व्यासपीठ उपलब्ध करून देते, ही चांगली बाब असून, भविष्यातही नाट्य परिषद रंगकर्मींना नवनवीन दालने खुली करून देणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांनी केले.

नाशिकमधील नाट्य चळवळीला बळ देणाऱ्या कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांना मंगळवारपासून सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

यावेळी निर्मला कुबल, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, स्पर्धा प्रमुख महेश डोकफोडे यांची उपस्थिती होती.

देशपांडे म्हणाले, की तरुणांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेकडे वळावे. त्यातून भविष्याची दालने खुली होणार आहेत. नाटक हा टीव्ही व चित्रपटाकडे जाण्याचा सोपान असून, या मार्गावरून अनेक तरुण आजपर्यंत गेलेले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी निर्मला कुबल म्हणाल्या, की तरुणपिढीचा नाटकाकडे बघण्याचा दृष्ट‌िकोन बदलला आहे. हल्ली नाटकात काम करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे अनेकांनी याकडे संधी म्हणून पाहिले पाह‌िजे. सुनील ढगे यांनी तरुणपिढी जे सादर करीत आहे, ते अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले, तसेच तरुण रंगकर्मींकडून असेच सक्षम प्रयोग सादर करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रा. रवींद्र कदम यांनी ही स्पर्धा स्वर्गीय रीमा लागू यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे ही तीन दिवसांची स्पर्धा भविष्यात पाच दिवस करण्याचा विचार नाट्य परिषदेतर्फे होत असल्याचेही कदम यांनी सांगितले. स्पर्धेच्या उद्घाटनाआधी दोन एकांकिका सादर करण्यात आल्या, तर उद्घाटनानंतर इतर एकांकिका सादर करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘हंडाभर चांदण्या’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी स्पार्टन हेल्प सेंटरतर्फे मदतीचा हात म्हणून ‘हंडाभर चांदण्या’ हे दुष्काळी भागातील पाणी प्रश्नावर भाष्य करणारे नाटक कालिदास कलामंदिर येथे सादर करण्यात आले.

पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडणारे ‘हंडाभर चांदण्या’ हे नाटक दिल्लीतील भारंगम महोत्सव गाजवून आलेले आहे. वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये भरघोस पारितोषिके मिळविणाऱ्या या नाटकाचा नाशिकचा हा प्रयोग चांगलाच गाजला.

पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट या नाटकातून उमलत जाते. नाटकात लोकसंगीताच्या प्रभावी माध्यमातून साध्या जगण्यातून सद्यःस्थितीवर उपहासात्मक भाष्य करण्यात आले आहे. संभ्या हा वाड्यावरच्या शाळेतील शिपाई आहे. मात्र, वाड्यावर कधी एकदा पाण्याचा टँकर येतो असे त्याला झाले आहे. त्यासाठी तहसीलदार बाईंच्या अनेक मिन्नतवाऱ्या करून शेवटी तो त्यांचे अपहरण करून आणतो. तेथे मास्तर, चंद्री, मलेरियाचा डॉक्टर, आणखी दोघे शिक्षक त्याची वाटच बघत राहतात. ते त्याला त्या अपहरणात साथ देतात. टँकर आल्यानंतर सुटका करू असे सांगून तहसीलदार बाईंना तेथेच ठेवण्यात येते. त्यानंतर ‌पाण्याच्या टँकरची वाट पाहण्याचा तो दिवस तहसीलदार बाईंना वर्षभरासारखा मोठा वाटतो. त्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींनी हे नाटक परिपूर्ण आहे.
या नाटकाची निर्मिती प्रमोद गायकवाड यांची आहे. लेखन दत्ता पाटील तर दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. नाटकात प्राजक्त देशमुख, प्रणव पगारे, दीप्ती चंद्रात्रे, नुपूर सावजी, अरूण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, देव चक्रवर्ती, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. निर्मिती व्यवस्था लक्ष्मण कोकणे यांची तर नेपथ्य ईश्वर जगताप व राहुल गायकवाड, प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा श्रद्धा देशपांडे, रंगभूषा माणिक कानडे, संगीत आनंद ओक व रोहित सरोदे यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाख मतदार ठरविणार भवितव्य

$
0
0

मालेगावात आज महापालिकेसाठी मतदान, ८३ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणात

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या ८३ जागांसाठी आज (दि. २४) सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र अन्य साहित्याचे वाटप मंगळवारी करण्यात आले. सकाळी १० वाजेपासून साहित्य वाटप सुरू करण्यात येऊन दुपारपर्यंत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकार, शिपाई, पोलिस कर्मचारी आपापल्या मतदानकेंद्रांवर रवाना झाले.

सोमवारी (दि. २२) सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्यानंतर खऱ्या अर्थाने मनपा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाल्याचे चित्र साहित्य वाटप केंद्रांवर पाहायला मिळाले. शहरातील जाखोटे भवन, शिवाजी जिमखाना, तालुका क्रीडा संकुल व तंत्रनिकेतन विद्यालय या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र जगताप व निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, शरद पवार, जितेंद्र काकुस्थे, रामसिंग सुलाणे, प्रकाश थवील, शशिकांत मंगरुळे, भीमराज दराडे याच्या मार्गदर्शनाखाली साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली. सकाळपासूनच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सर्वच केंद्रांवर साहित्य वाटपासाठी १६ ते १८ टेबल, भव्य मंडपची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच साहित्य वाटप करण्यासाठी प्रत्येकी २४ ते ३० कर्मचारी, ८ ते १० शिपाई व ५ ते ७ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. वाटपापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले. यानंतर मतदान केंद्रांनुसार साहित्यवाटप करण्यात आले. यात १ कंट्रोल युनिट व २ बेलेट युनिट व अन्य साहित्य देण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांनी मतदान यंत्राची तपासणी करून मॉकपोल घेवून मशीन्स सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली. मतदान केंद्रावर जाण्यासाठी एकूण २०७ वाहने उपलब्ध करण्यात आली होती.

मतदानासाठी सुटीचे आदेश

आज, होत असलेल्या मतदानासाठी महापालिका क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी एक दिवसाची सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली. पालिकाक्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना भरपगारी सुटी देण्यात येणार आहे. ही सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व अस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. मतदाराकडून मतदानासाठी योग्यती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबद्दल तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त जगताप यांनी सांगितले. दरम्यान मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी शहरातील सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासनाकडून दिले आहेत.

प्रशासनाची सज्जता

निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, ५१६ मतदान केंद्र असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी ५७० केंद्राध्यक्ष, १ हजार ७१० मतदान अधिकारी, ५७० शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. या निवडणुकीत ५१६ मतदान यंत्र वापरण्यात येणार असून राखीव १०० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images