Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेच्या सिडकोत विभागातील पवननगर येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले असले तरी हा रस्ता पूर्णपणे दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आला आहे. पंधरा दिवसांनी पावसाळा सुरू असतांनाही प्रशासनाने हा रस्ता का खोदला, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यापर्यंत या रस्त्याचे काम होणे आता अशक्य असून, झाले तरी ते योग्य त्या दर्जाचे होईल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. बांधकाम विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पावसाळ्यात पवननगर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होणार हे मात्र निश्चितच आहे.

सिडकोतील दुर्गानगर ते रायगड चौकापर्यंतचा रस्ता मागीलवर्षीच काँक्रिटीकरण करण्यात आला आहे. त्यानंतर रायगड चौकापासून पुढील रस्त्याचे काम काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र हे काम करताना रस्ता एकाबाजूने खोदणे अपेक्षित होते, मात्र संबंधित ठेकेदाराने हा रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवलेला आहे. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांबरोबर वाहनचालकांचे अतोनात हाल होत असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात तर या रस्त्याच्या कामाप्रंसगी थेट मुख्य पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. यावेळी तर या रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. आताही हा रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवल्याने वाहतुकीस खुपच अडथळा होत असून, वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेऊन रस्त्याच्या एकाबाजूचे काँक्रिटीकरण सुरू केले आहे. तरी वाहतुकीचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. या भागातून वाहने चालविणे जिकरीचे झाले असून, या भागातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर याठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन या रस्त्याने ये-जा करणेसुद्धा अवघड होणार आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी याबाबतचे नियोजन केले नव्हते का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची, पावसाळी गटारी व नाल्यांची सफाई होणे अपेक्षित असताना पवननगरच्या या रस्त्याचे काम सुरू करून प्रशासनाने काय साध्य केले, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर जेलरोडला चेंबरची सफाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या मॉडेल कॉलनी चौकातील तुंबलेल्या चेंबरची महापालिकेने बुधवारी (दि. ३१) स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असून, चेंबर तुंबल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेला त्याची दखल घ्यावी लागली.

चौकातील हे चेंबर वर्षातून दोन तीनवेळा तरी तुंबते, असा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असते. जेलरोडच्या शिवाजी चौकापुढे मॉडेल कॉलनी चौक आहे. समोरच महापालिकेचे जेलरोड कार्यालय आहे. तेथे सफाई कर्मचारीही असतात तरीही या तुंबलेल्या चेंबरकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले होते, वाहन गेल्यानंतर चेंबरचे घाण पाणी अंगावर उडत होते. चौक असल्याने वेगात असलेली वाहने या पाण्यावरून घसरण्याची भीती होती. चौकाच्या वळणावर हे सार्वजनिक चेंबर असून, परिसरातील कॉलन्यांचे पाइप त्याला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे ते तुंबल्याने चौकात घाण पाणी साचले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस-नागरिक संवादासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलिस करीत असले तरी संबंधित तक्रारदाराला त्याची पूर्ण माहिती मिळत नाही. आणि पोलिस तपास करीत नसल्याचा समज अनेक तक्रारदारांचा होत असतो. त्यावर उपाय म्हणून तक्रारदार व तपासी अंमलदार यांच्यात संवाद निर्माण करण्यासाठी लवकरच इंदिरानगर पोलिस ठाण्यात खास दिवसाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलदास भोये यांनी सांगितले.

इंदिरानगर भागात अनेक ज्येष्ठ नागरिक असून, पोलिस ठाण्याच्या हद्दसुद्धा खूप मोठी आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्त सुरू असली तरी गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांकडून अनेक योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात सुरुवातीला पोलिस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या व्यापामुळे अनेकदा तपास सुरू आहे, एवढेच उत्तर तक्रारदाराला मिळते. त्यामुळे तक्रारदारांमध्ये गैरसमज होत असतात. तसेच काही जुन्या तक्रारी या अद्यापही निकाली निघाल्या नसल्याचे समोर आले आहे.

असा आहे उपक्रम

इंदिरानगर पोलिस ठाण्यात आठवड्यातून एक दिवस तक्रारदार आणि तपासी अंमलदार यांच्यात संवाद घडवून आणण्यात येणार आहे. ठराविक दिवशी तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवर काम करणारा तपासी अंमलदार तपास कशापद्धतीने सुरू आहे त्यात काय नवीन झाले आहे, याची संपूर्ण माहिती तक्रारदाराला देणार आहे. यामुळे संबंधित तक्रारदारांनासुद्धा आपल्या तक्रारीचा निकाल केव्हा व कसा लागेल व त्यासाठी काय सुरू आहे, याची संपूर्ण माहिती निश्चित मिळणार आहे. यात तक्रारदार आणि तपासी अंमलदार यांच्या संवाद घडविल्याने तक्रारी निकाली निघून पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. तसेच नागरिकांनाही पोलिसांचे काय काम सुरू आहे याची माहिती उपलब्ध झाल्याने विश्वास निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपक्रम लवकरच इंदिरानगर पोलिस ठाण्यात सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते हस्तांतरणास शिवसेनेचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-दिंडोरी आणि डहाणू - त्र्यंबकेश्वर -नाशिक हे दोन महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेस हस्तांतरीत करण्यातून दारू दुकानांना अभय मिळते आहे. यामुळे शिवसेनेने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत या हस्तांतरणास कडाडून विरोध दर्शविला आहे.

या निर्णयाने पालिकेला आणखीन डबघाईला आणले जात असून, तळीरामांचेच हित साधले जात आहे, असे सांगत हे न रोखल्यास शिवसेना प्रसंगी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

याबाबत माहिती देताना बोरस्ते यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. ते म्हणाले, शासनाचा डिनोट‌िफिकेशन निर्णय नाशिककरांच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक आहे. या प्रकारच्या निर्णयांमुळे महापालिकेचे दिवाळे काढले जात आहे. मोजक्या दारू दुकानदारांचे हित जपण्यासाठी हा निर्णय भाजपाकडून घेतला गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
जळगाव महापालिकेसमोरही याच धर्तीवर पेच निर्माण झाला असताना तेथील आयुक्तांनी शासनाला स्पष्टपणे भूमिका कळवली आहे. वर्ग करण्यात येणाऱ्या महामार्गांचा खर्च उचलण्याची महापालिकेची क्षमता नसल्याची वस्तुस्थिती तेथील आयुक्तांनी शासनाच्या स्पष्टपणे निदर्शनास आणून दिली आहे. या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनीही येथील खर्चाचा ताळेबंद सादर करत असमर्थता दर्शवून वस्तुस्थिती मांडावी, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
महामार्गावरील दारू दुकानांबाबत आदेश देताना कोर्टाने नागरी हिताचे अनेक मुद्दे विचारात घेतले होते. यात दारू दुकानांच्या परिणामी महामार्गांवर होणारे नागरिकांचे मृत्यू, नागरी सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी होता. मात्र, पद्धतशीर महामार्ग हस्तांतरणाची शक्कल लढवून सत्ताधारी नेमके कुणाचे हित बघत आहेत, सामान्य नागरिकांचे की दारू दुकानदारांचे, असा सवालही यावेळी बोरस्ते यांनी केला.
अगोदरच महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. सद्यःस्थितीत पालिकेला विविध खर्चांचा बोजाही पेलणे कठीण बनले आहे. या स्थितीत महामार्गाचा पांढरा हत्ती पोसायचा कसा, असेही ते म्हणाले.
या निर्णयाच्या विरोधातील भूम‌िका मांडण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ महापौरांचीही भेट घेणार आहे. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा ‘हॅप्पी स्ट्रीट’ची आनंदपर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना वेड लावणारा हॅप्पी स्ट्रीट्स (सिझन ३) हा उपक्रम महाराष्ट्र टाइम्स व संकलेचा कन्स्ट्रक्शन्सच्या सहकार्याने पुन्हा नव्या जोमाने घेऊन येत असून, या उपक्रमाला ७ मेपासून कॉलेज रोड येथे सुरुवात होणार आहे. यंदा शहराच्या चार भागांत हॅप्पी स्ट्रीट्स घेण्यात येणार असून, या अनोख्या उपक्रमात डान्स, म्युझिक, खेळ या सगळ्यांची धमाल करता येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात ७ मे रोजी सकाळी ७ वाजता मॉडेल कॉलनी चौक, कॉलेज रोड येथे होणार आहे.

‘हॅप्पी स्ट्रीट्स’वर सकाळी साडेसात ते साडेनऊ हे या वेळेत सर्व वयोगटांतील व्यक्तींना यामध्ये सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शनमधून तुम्हाला रिलॅक्स करणारी ही स्ट्रीट ठरणार आहे. ७ मे रोजी सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत मॉडेल कॉलनी चौक ते आर्चिस गॅलरी (कॉलेज रोड) या मार्गावर हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे.

कॉलजरोडवर होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीटमध्ये राजू दाणी आणि ग्रुप तर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आदी प्रकार सादर केले जाणार आहेत. यावेळचे खास आकर्षण राहुल आंबेकर यांचा रॉक बँड शो होणार आहे. या वेळी इंडियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकार सादर केले जाणार आहेत. सध्या कॅलिग्राफी या कलेला चांगले दिवस आहेत. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार असून, ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करायचा याची माहिती देणार आहेत. मोहन उपासनी व रवींद्र जाधव बासरीवादन करणार आहेत. त्याचप्रमाणे नृत्यातून योगाभ्यासाचे धडे देण्यासाठी भारतात प्रसिद्ध असलेल्या नृत्यांगना संगीता पेठकर आपली कला सादर करणार आहेत. प्रतीक हिंगमिरे आणि प्रज्ञा तोरसकर झुंबाचे प्रात्यक्षिके सादर करून ते नागरिकांकडून करून घेणार आहेत. मंदार यांचे फोटो एक्झिबिशन होणार असून, अनिकेत जाधव रॉक बँड शो सादर करणार आहेत. हर्षल जाधव हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहे. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटारवादन करणार असून, या वेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. नीलेश हे टॅटू आर्टिस्ट उपस्थिताना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. निधी अग्रवाल व त्यांचा विद्यार्थी समूह स्ट्रीट पेंटिंग करणार आहे. नवीन तोलानी यांचा ग्रुप ‘ग्रुप डान्स’ सादर करणार असून, या वेळी वेस्टर्न व बॉलीवूड डान्समधील नवीन प्रकार हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. ‘मटा’च्या उपक्रमाला नाशिककरांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. या वेळीदेखील असाच प्रतिसाद नाशिककरांनी द्यावा, असे आवाहन ‘मटा’तर्फे करण्यात आले आहे.

रॉक बँडचे आकर्षण

हॅप्पी स्ट्रीटमध्ये रॉक बँड हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. यात नाशिककरांना सहभागी होता येणार असून, आपल्या आवडीची गीते सादर करता येणार आहेत. आपल्या बालपणीच्या खेळांनाही उजाळा मिळणार असून, भोवरा, गोट्या, सागरगोटे, टिक्कर इत्यादी खेळ खेळता येणार आहेत.

बॉडी फिटनेससाठी झुंबा

अनेकांना आपली बॉडी स्लिम असावी असे वाटते. त्यासाठी व्यायाम म्हंटला की कटकट वाटते. यासाठी प्रज्ञा तोरसकर व प्रतीक हिंगमिरे झुंबा सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याचे आगार आजपासून बंद

$
0
0

टीम मटा

संपूर्ण राज्यात भाजीपाला, फळे, कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘भाजीपाल्याचे आगार’ गुरुवारपासून ठप्प होणार आहे. ‌कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बळीराजाने पुकारलेल्या संपाला आजपासून (दि. १) सुरुवात होत आहे. संपकाळात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील सगळ्य ाच बाजार समित्यांसह उपबाजारात भाजीपाल्याची आवक वाढली होती. नोकरदारांसह सर्वसामान्यांनी बुधवारी भाजीपाल्यासह दुधाचा साठा करण्यावर भर दिला.
दुधाचे दर

भडकण्याची शक्यता!

नाशिकरोड : शेतकरी संपावर जाणार असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. बुधवारी दुधाचे भाव पाच ते दहा रुपयांनी वाढले. संपामुळे जनावरांचा चारा नाशिकमध्ये पोहचला नाही तर भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईला याचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

संपाच्या पूर्वंसंध्येला नाशिकरोड परिसरात दुधाचे दर वाढलेले नव्हते. शहरात काही भागात उगीचच ते वाढविण्यात आले. सध्या म्हशीच्या दुधाचा दर ५५ ते ६० रुपये लिटर आहे. गायीचे दूध ३५ ते ४० लीटर आहे. याशिवाय संगमनेरहून राजहंस, गोदावरी, विकास पुण्याहून गोकूळ, गुजरातहून अमूल, मुंबईहून आरे या ब्रॅण्डचे दूध नाशिककरांना उपलब्ध होते.

चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार

नाशिकरोड परिसरात सिन्नरफाटा, पंपिग स्टेशन, खोले मळा, अरिंगळे मळा, उपनगर, देवळालीगाव, जेलरोड, विहितगाव आदी ठिकाणी गायी म्हशींचे सुमारे दीडशे गोठे आहेत. तेथून शहर परिसराला दूध पुरवठा होतो. गायी म्हशींचे प्रमुख खाद्या मका, घ्यास व ऊसाच्या बांड्या आहेत. हे खाद्य दुसऱ्या जिल्ह्यातून नाशिकला येते. मक्याचा भाव अडीच ते तीन हजार रुपये टन, घास पंधरा रुपये पेंडी, ऊसाची बांडी तीन हजार रुपये टन आहे. या वस्तू जर संपामुळे आल्या नाही तर दूधाचे भाव आणखी भडकू शकतात. दुधाचे भाव आज तरी स्थिर होते. गुरुवारीपासून चारा आला नाही तसेच मोठ्या कंपन्याचे दूध आले नाही तर शहरात दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे गवळी समाज संघटनेचे शहराध्यक्ष जगन गवळी यांनी सांगितले.

वकील संघाचा संपाला पाठिंबा

पिंपळगाव बसवंत ः शेतकरी संपाला पिंपळगाव बसवंत वकील संघाने पाठिंबा दिला आहे. शेतकयांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचीही संघाची तयारी असल्याचे, संघाचे अॅड. जनार्दन देवरे यांनी सांगितले. या संदर्भात पिंपळगाव वकील संघाने निवेदन दिले आहे. वकील संघ शेतकऱ्यांसाठी कायदेशीर मदतही मोफत काम करण्यास तयार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अॅड. उत्तमराव गायकवाड, तुषार घुमरे, त्र्यंबकराव वाटपाडे, रणजित चव्हाण आदी उपस्थित होते.

रिपाईंचाही पाठिंबा

मनमाड : शेतकरी संपाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने पाठिंबा देण्याची घोषणा केली. जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, गंगाभाऊ त्रिभुवन, दिलीप नरवडे, कैलास आहिरे, सुरेश आहिरे, योगेश निकाळे, महेंद्र वाघ, शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर बोरसे आदींनी बुधवारी पत्रकाद्वारे शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केला.

दरेगाव संपावर

चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील बहुतांश शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच राजाबाई आहिरे, उपसरपंच समाधान जाधव, सदस्य संजय आहिरे आदींसह शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मालवाहू वाहनधारकांना बसणार फटका

मनमाड : शेतकरी संपाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील छोट्या वाहतूकदारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चांदवड, नांदगाव, मनमाडसह जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांपर्यंत शेतकरी टेम्पो, पीकअप, रिक्षांद्वारे शेतीमाल पोहोचवतात.

या सर्व छोट्या वाहतूकदारांना बाजार समितीत शेतीमाल विक्रीस न आणण्याच्या भूमिकेमुळे मोठा आर्थिक फटका बसणार हे उघड आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्वतःचे वाहन असल्याने मोठ्या वाहतूकदारांना संपाचा मोठा प्रभाव जाणवणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. आठवडे बाजार अथवा रोजच्या भाजी बाजारात भाजी घेऊन जाणारे शेतकरी, विक्रेते संपात सहभागी असल्याने ग्रामीण भागातून शहरात नेणाऱ्या वाहतूक व्यवस्थेलाही त्याचा फटका बसणार आहे.

शेतकरी संपामुळे छोटी वाहने चालवणारे वाहतूकदार आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. अनेकांचे पोट या वाहतूक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या रोजच्या व्यवहारावर नियंत्रण येणार आहे. संपामुळे ही वाहने थांबतील असे राजेंद्र तळेकर यांनी सांगितले.

आवक वाढल्याने भाजीपाला घसरला
पंचवटी ः गुरुवारी शहरात भाजीपाला मिळणार नसल्यामुळे बुधवारी सायंकाळी पंचवटी भाजीबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. गुरुवारपासून संप सुरू होणार असल्यामुळे बुधवारीच भाजीपाला काढून तो बाजारात विक्री करण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळे नाशिक बाजार समितीच्या आवारात बुधवारी प्रचंड आवक वाढली होती. पुढच्या काही दिवसात काढणीस होईल असाही भाजीपाला विक्रीस आणल्यामुळे बाजार समिती भर उन्हात ओव्हर फ्लो झाली होती. संपाच्या धाकामुळे भाजीपालाला मागणी वाढली असली तरी प्रमाणापेक्षा जास्त आवक झाल्यामुळे दर घसरले होते.

शेतकरी संपाच्या पूर्वसंध्येला बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्यासह फळांची प्रचंड आवक झाली. आवारात वाहनांची गर्दी वाढल्याने वाहने पुढे न्यायची कशी? वाहनातील शेतमाल विक्रीसाठी बाजारात उतरवायचा कसा? आलेल्या मालाचे लिलाव करायचे कसे? असे प्रश्न भेडसावत होते. बाजारात शेतमाल ठेवायला जागा शिल्लक नव्हती. तसेच शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी यांना बाजारात पाय ठेवायला जागा मिळत नसल्यामुळे लिलाव करताना अडचणी येत होत्या.

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी बाजाराज शेतमालाच्या आवकेत तिपटीने वाढ झाली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजार भावात घसरण झाली. कोवळ्या भाजीपाल्याचीही काढणी करून तो भाजीपाला बाजारात आणण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. त्याचा परिणाम भाजीपाल्याची आवक वाढण्यावर झाला. उन्हाळ्यात भाजीपाला टिकवून ठेवणे शक्य नसल्यामुळे अतिरिक्त भाजीपाला कसा खरेदी करायचा, हा प्रश्नही व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाल्यामुळे त्यांनीही काहीसा हात आखडता घेतला.

वाहतूक ठप्प

बाजार समितीच्या आवारात भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर वाहतूक ठप्प होत होती. दुपारचे लिलाव साधरणतः तीन ते साडेतीन वाजेपर्यंत आटोपतात. मात्र बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत लिलाव सुरू होते.

विक्रेते जोमात

पहाटेच्या बाजारातही आवक वाढल्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करीत होते. हा शेतमाल मिळत नसल्याचे सांगत किरकोळ विक्रेते मात्र ग्राहकाला अव्वाच्या सव्वा किमतीत भाजीपाल्याची विक्री करीत होते. बंदच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.संप शेतकऱ्यांनी पुकारलेला असल्याने शेतमाल विक्रीस येणार नाही. तरीही बाजार समिती सुरूच ठेवण्यात येणार आहे. आलेल्या शेतमालाची विक्री करण्याची बाजार समितीची तयारी आहे. मात्र शेतकरी आणि वाहनधारक बाजारात शेतमाल आणण्याची शक्यता कमी आहे.
आठवडाभरचा साठा फ्रीजमध्ये बंद!

सिडको : शहरातील सिडको परिसरात बुधवारी दिवसभर भाजीपाल्याच्या गाड्यांवर आणि दूध डेअरीवर नागरिक खरेदी करताना दिसून आले. शहरातील नोकरदार वर्गाने संपाला सामोरे जाण्यासाठी घरातील फ्रीजमध्ये भाजीपाला, दूध साठवण्यार भर दिला.

बुधवारी सकाळपासून बाजारात दुधासह, भाजीपाल्याची मागणी वाढली. त्यामुळे भाज्यांचे दरही वाढले. संपाच्या भितीमुळे सिडको व इंदिरानगर परिसरात भाजी बाजारात सकाळपासून गर्दी होती. मिळेल ती भाजी व मिळेल त्या भावाने घेण्याकडे नागरिकांनी भर दिला.

आजपर्यंत शेतकरी वगळता सर्वच क्षेत्रांचे संप बघितले आहेत. शेतकरी संपावर जाण्याने थेट भाजीपालाच बंद होणार असल्याने भाज्यांची साठवणूक केली, असल्याचे परिसरातील महिलांनी सांगितले.

देवळ्यात घेतल्या आणाभाका

कळवण : देवळा तालुक्यातील सर्व गावांनी संपात सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. गावागावात विशेष ग्रामसभा घेऊन तसे ठराव करण्यात आले आहेत. काही गावांमध्ये ग्रामदैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून कोणताही शेतमाल, दूध व शेतीव्यवसायावर आधारित वस्तू बाजारात विक्रीसाठी न पाठविण्याबाबत शपथ घेण्यात आली आहे. देवळा तालुक्यात कांद्याबरोबरच भाजीपाल्याचेही उत्पादन घेतले जाते. देवळा बाजार समितीत कांद्याबरोबरच भाजीपाला, भुसार मालाची मोठी आवक असते. शेतकरी संपावर जाणार असल्याने या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे. संपाला देवळा तालुका अॅग्रो डीलर्स असोशिएशन, देवळा तालुका अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, उजनी सोशल ग्रुप आदींबरोबरच सर्वपक्षीय कार्यकर्त, नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे.

पर्यटकांनाही बसणार फटका

त्र्यंबकेश्वर : सध्या सुट्या असल्यामुळे पर्यटक रोजच त्र्यंबकेशवर येथे दर्शनासाठी येतात. या भाविक पर्यटकांच्या सरबराईकरिता चहा, कॉफी, दूध आणि जेवण आदींकरिता भाजीपाला लागणार आहे. त्यामुळे हॉटेल, खाणवळी, चहा-पान नास्ता सेटर चालविणाऱ्यांची उद्यापासून कसोटी लागणार आहे. परप्रांतातून येणारे पर्यटकांनाही या संपाची झळ बसण्याची शक्यता आहे.

शहरातील भाजीबाजारा बुधवारी आवकेत वाढ झाली. ग्राहकांनीही चार दिवस पुरेल, इतका भाजीपाला खरेदी करण्यावर भर दिला. यामुळे भाजीपाल्याच्या दरात किरकोळ वाढ झाली. मात्र प्रत्यक्ष संप सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याचे दर अजून वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण भागात फ्रीज नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक दूध पावडर खेरी करताना दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावली, वाकी धरणांत खडखडाट

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

पावसाळ्यात तालुक्यातील सर्व धरणे ओहरफ्लो होऊनही पाण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे, जिल्ह्याबाहेरील सततच्या मागणीमुळे या तालुक्यातील धरणांनी तळ गाठला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात पहिले ओव्हरफ्लो होणारे भावली, वाकी या धरणातील पाणीसाठा जिल्ह्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वात आधी संपुष्टात आला आहे.

गतवर्षी धरणांमध्ये जानेवारी फेब्रुवारी माहिन्यात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र पाण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत हा साठा ४५ टक्क्यांवर आला होता. मे महिना उजाडताच तालुक्यातील धरणामध्ये अवघा चार पाच टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा मोठा उद्भवणार आहे.

तालुक्यातील मुकणे, दारणा, वैतरणा, कडवा, भावली, वाकी खापरी ही प्रमुख जलसाठ्याची धरणे आहेत. तर लघू पाटबंधाऱ्यामध्ये वाडीवऱ्हे, तळोशी, खेड, त्रिंगलवाडी, शेनवड यांचा समावेश आहे. या छोट्या पाटबंधाऱ्यांचा वापर पारिसरातील गावांसाठी होतो. तर मोठ्या धरणांचे पाणी राज्याच्या विविध भागांमध्ये जाते.

मुकणे धरण- ४ टक्के

दारणा धरण - १० टक्के

भावली, वाकी- ० टक्के साठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत पितापुत्रांवर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी शहरातील सिन्नर फाटा परिसरात बुधवारी पहाटे हॉटेल मालक मंगेश पवार यांच्या राहत्या घरात दोन अज्ञातांनी घुसून पवार व त्याचा लहान मुलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. दोघे पितापुत्र गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेने घोटी शहरात खळबळ उडाली असून, या हल्ल्यामागचे कारण मात्र समजू शकले नाही. मंगेश पवार व त्याची पत्नी हे दोघेही अपंग आहेत. या प्राणघातक हल्ल्याचा उलगडा करण्याचे व हलेखोरांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हल्लेखोरांनी पवार यांच्या घराची खिडकी तोडून प्रवेश केला. पवार व त्याचा लहान मुलगा ओम यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोर पसार झाल्यानंतर ओमने पोटावरची जखमेला हाताने धरून घरातील दुसऱ्या खिडकीतून बाहेर येऊन मदतीसाठी याचना केली. त्यावेळी शेजारच्या हॉटेल चालकांनी धाव घेऊन पोलिसांना खबर दिली. जखमी पितापुत्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नाशिकचे उपविभागीय अधिकारी घोगरे यांच्यासह पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक निरीक्षक जनार्धन तेली यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथक, ठसे तज्ज्ञ यांचीही मदत घेण्यात आली. पोलिसांनी दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यातही शेतकरी संपाचा परिणाम

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । येवला

शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा प्रभाव आज नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातही दिसून आला. येथील मालेगाव-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर अन्नधान्य, भाजीपाला व फळांची वाहनं अडवून शेतकऱ्यांनी यातील सर्व माल रस्त्यावर ओतला आणि सरकारचा निषेध केला.

सुरुवातीला आंबे वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील आंबे रस्त्यावर फेकल्यानंतर लिंबू, टोमॅटो , लसूण यांच्यासह गहू , तांदुळ, डाळी, साखर, साबण, बिस्किटपुडे, तेलडबे, गोडतेल या गाड्यातून माल काढीत अक्षरक्षः रस्त्यावर फेकला. टोलनाक्यावरील रस्त्यावर अन्नधान्याचा चिखल झाला होता. हाच चिखल तुडवत प्रवासी वाहने ये-जा करत होती. दरम्यान या ठिकाणी गोमांस असलेला टेम्पो पकडण्यात आला. या टेम्पोला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. संप करत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन गोडेतेलाचे टँकर रस्त्यावर ओतून दिले. तेलाचे टिनचे डबे घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकमधील डबे बाहेर काढून रस्त्यावर ओतून दिले. शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या दोन टेम्पोमधील मालही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिला. एका आश्रमात गहू घेऊन चाललेल्या ट्रकमधील गहू, दोन-तीन ट्रकमधील लसूण, पाच-दहा आंब्याच्या ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने अर्धा ते पाऊण किलोमीटरपर्यंत अन्नधान्याचा चिखल दिसून येत होता.

अपुऱ्या संख्याबळामुळं पोलीस हिंसक आंदोलकांना थांबवू शकत नसल्याचं चित्र होतं. पोलिसांनी संपकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता तुरळक दगडफेकही करण्यात आली. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. अंदरसूल, जळगाव, नेवून, पाटोदा येथे गावकऱ्यांनी शेतकरी संपाला पाठिंबा देत बंद पाळला. येथील आठवडे बाजारही बंद होता. मनमाड-नगर राज्य मार्गावरील येवला तालुक्यातील सावरगाव येथे शेकडो शेतकरी सकाळी दहाच्या सुमारास अचानक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक ठप्प होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वादग्रस्तां’ची प्रतिनियुक्ती!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलासाठी प्रशासकीय तसेच विनंती बदल्याची प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली. विशेष म्हणजे पोलिस आयुक्तालयातील तब्बल ३६ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्र पोलिस अकादमीत (एमपीए) रवानगी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच पोलिस कर्मचारी वर्ग करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, यातील बरेच कर्मचारी वादग्रस्त असून, काहींची चौकशी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मे महिन्याच्या अखेरीस पोलिस कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवण्यात येते. दरवर्षी एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार एक तृतीयांश कर्मचारी प्रशासकीय तसेच विनंती अर्जानुसार बदलीला समोरे जातात. यंदा ही प्रक्रिया नुकतीच संपली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मोठ्या प्रमाणावर बदल केले. विशेषतः मुख्यालयात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस स्टेशनसह इतर महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मागील अनेक वर्षांपासून फिल्डवर तळ ठोकून असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट माघारी बोलवण्यात आले. नव्या दमाचे कर्मचारी फिल्डवर हजर झाल्याचा फायदा दिसून येईल, असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केला.

फक्त शहर पोलिसांची ‘वर्णी’

क्राइम ब्रँचच्या युनिटमधील सात ते आठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. दुसरीकडे, शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या मात्र विविध कारणांमुळे विवादास्पद ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ‘एमपीए’त पाठवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. ‘एमपीए’साठी दरवर्षी ठराविक कर्मचारी शहर आणि ग्रामीण पोलिस दलातून पाठवले जातात. मात्र, यंदा शहर पोलिसांनीच ३६ कर्मचाऱ्यांची रवानगी केली.

बदलीपूर्वी ‘कुंडली’ तपासणी

शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द तुलनेत छोटी आहे. शहरातंर्गत बदलीने काही कर्मचाऱ्यांना फरकच पडत नाही. एका ठिकाणी सुरू असलेले उद्योग ते पुन्हा दुसऱ्या ठिकाणी सुरू करतात. निलंबन कारवाई केली तरी तीन ते चार महिन्यानंतर संबंधित कर्मचारी पुन्हा हजर होतात. या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच सतत तक्रारी येणाऱ्या, विविध पातळींवर कारवाईला सामोरे गेलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृध्दीमुळे शेतकरी उघड्यावर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृध्दी महामार्गाच्या रुपाने महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत असून त्यांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र रचत आहे. मुंबई आणि नागपूर असे दोन मार्ग अस्तित्वात असताना तिसऱ्या महामार्गाचा घाट हे सरकार घालत असून यामुळे शेतकरी रस्त्यावर येणार असल्याचे प्रतिपादन डाव्या आघाडीचे नेते भालचंद्र कानगो यांनी केले.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कॉ. नामदेव गावडे लिखित ‘समृध्दी कुणाची? शेतकऱ्याची की सरकारची?’ या पुस्तकाचे प्रकाशन हुतात्मा स्मारकात झाले. यावेळी ते बोलत होते. सरकारने औद्योगिकरणाच्या नावाखाली शेतीला दुय्यम स्थान देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे शेतीचा विकास खुंटला असून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नसल्याचे दृष्य दिसते आहे. या धोरणामुळे शेतकरी परावलंबी होऊन त्याची पिळवणूक होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या उत्पदनांचे परिणाम शेतकऱ्यांच्या भावावर होत असून महाराष्ट्रातील मानवनिर्मित दुष्कळाला तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रस्त्यांसाठी, धरणासाठी जमिनी दिल्या; परंतु त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर असताना राज्य सरकारने उचललले पाऊल म्हणजे शेतकऱ्यांचे फसवणूक असल्याचा आरोप कानगो यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन कामगार भरतीची प्रतीक्षाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरात सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत सन १९७८ नंतर कारखान्यांचे मोठे जाळे पसरले होते. बाँश, महिंद्रा, क्रॉम्प्टन, एबीबी, एप्काँस, सिएट आदी मोठ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्याही वाढली. परंतु, गेल्या तीस वर्षांपासून काम करणारे हजारो कामगार निवृत्त झाले आहेत. त्यातच निवृत्त कामगारांची संख्या सातत्याने वाढत असताना कायमस्वरूपी कामगार कारखान्यांमध्ये दिवसेंदिवस कमी होत चालले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

भविष्यात कामगार चळवळ मजबूत ठेवण्यासाठी कामगारांनी संघटित राहणे गरजेचे असल्याचे डॉ. डी. एल. कराड यांनी ‘मटा’शी बोलतांना सांगितले. तसेच कारखान्यातून निवृत्त होणाऱ्या कायमस्वरूपी कामगारांच्या जागेवर नवीन कामगारांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही कामगार विभागाकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत मदर इंडस्ट्री असलेल्या कारखान्यांमध्ये गेल्या काही वर्षांत हजारो कामगार निवृत्त झाले आहेत. एकीकडे निवृत्त होणाऱ्या कामगारांची संख्या हजाराने असताना कायमस्वरूपी कामगारांची संख्या शेकडो पण होत नसल्याचे चित्र आहे. तसेच आयटीआय पास झालेल्या कुशल कामगारांना मोठ्या उद्योगांनी कायमस्वरूपी कामगार म्हणून कामगार घ्यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला येथे गुरुवारपासून झालेल्या किसान क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागले असून, अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर येवल्यात एक वाहन पेटविण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबाराने प्रचंड धावपळ उडाली. या वेळी येवला येथे संपात सहभागी झालेले नाटेगाव (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील अशोक शंकर मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

मोर्चात धावपळ सुरू असताना मोरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते एका झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. येवला येथे संचारबंदीही लागू झाली असून, संपाचा फटका सामान्यांना बसण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचा वाद हायकोर्टात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची कोणतीही मागणी नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर महापालिका हद्दीतील दोन रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचा वाद आता आणखी पेटला आहे. शिवसेनेने या निर्णयाविरोधात आता थेट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवमानना झाली म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. सोबतच या निर्णयाविरोधात आता थेट जनमत आजमावण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली. दोन रस्ते हस्तांतरण ही लिटमस टेस्ट असून, उर्वरित तीन रस्तेही दारू व्यावसायिकांसाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादीनेही या निर्णयाविरोधात आयुक्तांना निवेदन देत हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे.

शहरातील नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक-दिंडोरी हे दोन रस्ते हस्तांतरण करण्याची कोणतीही मागणी नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० मे रोजी अचानक हे रस्ते महापालिकेकडे अवर्गीकृत केले आहेत. शहरातील बार व दुकानमालकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याने या निर्णयाला विरोध वाढला आहे. एक बडा हॉटेलचालक आणि भाजपचा एक प्रदेश उपाध्यक्ष यांनी शक्ती पणाला लावून हा निर्णय पदरात पाडून घेतला आहे. या निर्णयात मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचा आरोप केला जात असून, या निर्णयाला नाशिककरांचा विरोध होत आहे. दारूविरोधी संघटनांनी बुधवारी महापालिकेच्या समोर आंदोलन करत त्याला विरोध केला होता. शिवसेनेनेही यावरून भाजपची कोंडी केल्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या निर्णयाला विरोध असल्याचे म्हटले आहे. आता शिवसेनेने आणखीन एक पाऊल पुढे उचलत सत्ताधारी भाजपला तोंडघशी पाडण्याची तयारी सुरू केली आहे.

--

पत्रकबाज आमदार कुठे?

भाजपचे तीनही आमदार पत्रकबाजी करून सरकारकडे धाव घेत, नागरिकांचा कळवळा असल्याचे दाखवतात. परंतु, आता या दोन रस्त्यांच्या निर्णयात भाजपचे तीनही आमदार गप्प का, असा सवाल अजय बोरस्ते यांनी केला आहे. भाजप आमदारांचे मौन संशयास्पद असून, पालकमंत्र्यांचीही भूमिका संशयास्पद आहे. नाशिककरांचा भाजपला कळवळा असेल, तर आमदार व पालकमंत्र्यानी हा निर्णय रद्द करून जनतेला न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

-

राष्ट्रवादीही मैदानात

दारू दुकाने, बारमालकांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाविरोधात आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व महापालिकेतील गटनेते गजानन शेलार यांनी गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. शहराचे प्रश्न प्रलंबित असताना सरकार त्याबाबत कोणतेही निर्णय घेत नाही. या रस्त्यांच्या हस्तांतरणाबाबत मागणी नसतानाही केवळ दारू दुकानदारांच्या भल्यासाठी पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप शेलार, ठाकरे यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्यासह नागरिकांचे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटी’ एक सामाजिक संस्था

$
0
0

नाशिकरोडला हॅप्पी बर्थडे ‘लालपरी’ कार्यक्रम

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एसटी एक सामाजिक संस्थाच असून, गेल्या ६९ वर्षांत एसटीने अनेक चढउतार अनुभवले आहे. मात्र प्रवाशांचे प्रेम अद्याप तसुभरही कमी झालेले नसल्याचे मत याप्रसंगी पंचवटी आगारप्रमुख विश्वास गावित यांनी व्यक्त केले. सकाळी वाचायवयास हवे असलेले वर्तमानपत्र, दुध, जेवणाचे डबे यांची वाहतूक करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, पत्रकार, शासकीय पुरस्कार विजेते, अंध-अपंग, कुष्ठरोगी, शालेय विद्यार्थी अशा समाजातील विविध घटकांना सन्मानाने सेवा पुरविणाऱ्या ‘लालपरी’. अर्थात एसटीचा ६९ वा वाढदिवस नाशिकरोड बसस्थानकात केक कापून व प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

‘रस्ता तिथे एसटी’ व ‘प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी’ असे बिरुद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातील शहरांसह गावांतील प्रवाशांची सेवा करणारी लालपरीने काल ७० व्या वर्षात पदार्पण केले.

त्यानुसार नाशिकरोड बसस्थानकावर लालपरीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. एसटी आणि प्रवाशी यांच्यात एक अतुट नाते तयार झालेले असून, एसटीतील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या समस्यांसह भावना जाणून घेतल्या पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र केसरी डॉ. भास्कर म्हरसाळे यांनी व्यक्त केली.

अजोड योगदान

द्विभाषिक राज्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर राज्याच्या विकासात्मक जडणघडणीत ज्या घटकांचे विशेष योगदान होते त्यात एसटीचे योगदान अजोड असल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त मुख्याध्यापक अय्याजउद्दीन शेख यांनी काढले. खासकरून ग्रामीण भागात एसटीने केलेल्या प्रवाशांच्या सेवेला इतिहासात तोड नाही. मात्र समाजात जेव्हा संघर्षाची ठिणगी पडते तेव्हा समाजातील विध्वंसक प्रवृत्तीचा एसटीलाच रोष सहन करावा लागतो. ही पुरोगामी विचाराच्या राज्यासाठी निंदनीय बाब असल्याचेही शेख अय्याजउद्दीन यावेळी म्हणाले.

वाहतूक नियंत्रक कुमार पगारे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी वाहतूक निरीक्षक सर्वेश गोहिल, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एन. सी. गायकवाड, नाशिकरोड बसस्थानक वाहतूक नियंत्रक सोमनाथ जाधव, एस. इ. सोनवणे, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरावी ऑनलाइन प्रवेशांसाठी आजपासून नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी निकालाच्या तारखेविषयी उत्कंठा वाढीला लागलेली असतानाच दुसरीकडे अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. अकरावीच्या या ऑनलाइन प्रवेशनोंदणीस शुक्रवारपासून (२ जून) सुरुवात होणार आहे. एकूण दोन टप्प्यांत ही नोंदणी होईल. दहावीचा निकाल जाहीर होण्याअगोदर पहिला टप्पा व निकालानंतर दुसऱ्या टप्प्यात ही नोंदणी पूर्ण होणार असल्याची माहिती समुपदेशन केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.

यंदा प्रथमच नाशिकमध्ये मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठीचे पूर्वनियोजन झाले असून, शहरात सुमारे २४ हजार माहितीपुस्तिकांचे वाटप १६५ शाळांमध्ये करण्यात आले. दरम्यान, माहितीपुस्तिका विक्रीस शाळांमधून सुरुवात झाली असून, शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना दिलेल्या लॉगइन आयडी आणि पासवर्डद्वारे त्यांचे अकाऊंट सुरू करता येईल.

अशी असेल प्रवेशप्रक्रिया

ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्याने खाते उघडल्यानंतर त्यात वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. त्या वेळी विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या आधारावर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी शहरात पाच विभागांतर्गत १० केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना गोंधळून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन समुपदेशन केंद्रांच्या वतीने करण्यात आले आहे.

दहावीच्या निकालाकडे लक्ष

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाची तारीख कुठल्याही क्षणी जाहीर होणे शक्य असल्याने याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे. शैक्षणिक वर्तुळातील काही विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा निकाल शुक्रवारी (९ जून) लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, याबाबत राज्य मंडळाने अधिकृत घोषणा केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संतुलन साधण्यासाठी निर्यातीकडे वळावे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निर्यातीचे क्षेत्र असुरक्षित आणि अनिश्चितेचे असले, तरी त्याला पर्याय नाही. देशाची आणि परिस्थितीची गरज आहे. त्याचबरोबर संधींचेही क्षेत्र निश्चितपणे आहे. भविष्यात आपणास बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये संतुलन साधण्यासाठी निर्यातीकडे वळावेच लागेल आणि निर्यातदारांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी तसेच संबंधित सुविधा देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र सक्षम आणि उत्सुक आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल प्रमुख आर. एम. पाटील यांनी केले.

ते नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार असोसिएशनतर्फे आयोजित निर्यातीसाठी वित्तपुरवठा व परकीय चलनाचे व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.

चर्चासत्रात बँक ऑफ महाराष्ट्राच्या आशा कुलकर्णी यांनी निर्यातदारांनी जुन्या शिपमेंटच्या कागदपत्रांची २० जुनपर्यंत पुर्तता करावी म्हणजे त्यानंतर निर्यातीस अडचण येणार नाही, अशी माहिती देण्यात आली. चर्चासत्रात बँक ऑफ महाराष्ट्रांमार्फत सुविधा, तसेच हॅलकॉन नाशिकने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा आणि एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमार्फत सुविधा व उपाय योजना अशा एकूण तीन सत्रांचा अंतर्भाव होता. या चर्चासत्रातून अनेकांचे शंका निरसन होऊन अनेकांना निर्यात व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. प्रारंभी ह रमेश पवार यांनी चर्चासत्रामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमात अॅड. गोरख पगार यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. किशोर कुवर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस फेऱ्या घटल्याने मनस्ताप

$
0
0

शहर वाहतुकीत रिक्षा चालकांकडून प्रवाशांची होतेय आर्थिक लूट

कॉलेज क्लब रिपोर्टर

शहर बस सेवेच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्याने बस प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. बसचे प्रवासी रिक्षा सेवेकडे वळत असतानाच या प्रवाशांची आर्थिक लूट सुरू झाली आहे. आर्थिक भूर्दंडासह प्रचंड मनस्तापही प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नेहमीच्या दरांऐवजी रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असून, प्रवाशांनाही नाइलाजास्तव या लूटीला बळी पडावे लागत आहे.

शालिमार, निमाणी, नाशिकरोड या ठिकाणी नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. यामध्ये सर्वात जास्त चाकरमान्यांचा समावेश असतो. पण अचानक मागील काही दिवसांपासून बस फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना अन्य पर्यायांचा वापर करावा लागत आहे. प्रवाशांच्या याच अडचणीचा फायदा रिक्षाचालक उठवत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेत तर रिक्षाचालक नेहमीपेक्षा जास्त भाडे आकारतात. शालिमार ते नाशिकरोड रिक्षा प्रवासाचे भाडे प्रतिव्यक्ती २० रुपये आहे पण हाच दर रात्रीच्या वेळेस ३० ते ५० रुपयांपर्यंत जातो. हीच परिस्थिती शहराच्या अन्य भागांमध्येही पहायला मिळत आहे. ओला, उबेर यांसारख्या पर्यायांविषयी जास्त माहिती नसल्याने या पर्यांयाचा विचार प्रवासी करत नाही. एसटी महामंडळाने सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देऊन फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी करत आहे.गोदावरीला मागील वर्षी आलेल्या महापूराने नाशकात हाहाकार उडाला होता. रस्ते, लाइट, दुकाने व शहर बस सेवा बंद असल्याने त्यावेळी घरी जाणाऱ्या नोकरदारांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला होता. याचाच फायदा उठवत सर्व रिक्षाचालकांनी एकी करत नाशिकरोडचे भाडे २० रूपयांऐवजी चक्क ५० ते १०० रुपये इतके आकारले होते. त्यावेळी अनेकांनी आर्जवे करूनही रिक्षाचालकांनी माणूसकीचे दर्शन घडवले नाही. त्याचीच पुनरावृत्ती होताना सध्या पहायला मिळत आहे.

नवीन पासविषयी संभ्रम

शहर बस सेवा बंद होणार या अफवेने विद्यार्थी, चाकरमानी मासिक बस पास काढताना विचार करत असून अनेकजण पास काढू की नको या मनःस्थितीत अडकले आहे. तसेच नवीन बस काढण्याविषयी प्रवाशांमध्ये संभ्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा शहरांत शिवशाही बस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकहून थेट कोल्हापूर, पंढरपूर, शेगाव, माउंट अबू, पणजी, तुळजापूर, महाबळेश्वर, रत्नागिरी व शिर्डीमार्गे हैद्राबादला जाण्यासाठी नाशिकहून थेट स्लीपर कोच एसी बसेस नाशिकहून सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाला पाठविण्यात आला असून, प्रवाशांना सुखदायी प्रवासासाठी या बसेस लवकरच नाशिकला येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.

राज्यात शिवशाहीच्या ११०० बसेस दाखल होणार असून, त्यात दोन बसेस पुणे येथे सुरू झाल्या आहेत. नाशिकला याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, त्यात फारशी अडचण नसल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्य परिवहन महामंडळाला ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या बसेसबरोबरच जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांचे नूतनीकरण टप्प्याटप्प्याने केले जाणार असल्याचे सांगितले. त्यात मालेगाव, कळवण व दिंडोरी येथील बस स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित स्थानकांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकच्या मेळा बस स्टँडच्या १४ कोटी रुपये खर्चाच्या नूतनीकरणाचे टेंडर मंजूर झाले असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. महामार्ग बस पोर्टचे कामही लवकरच सुरू केले जाणार असून, त्याची टेंडर प्रोसेस सुरू होणार असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ नागरिक व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिन ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी रांगोळी व स्वच्छता मोहीमही घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचे आवाहनही कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे.

कन्या सुरक्षा योजना

एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्या सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून २६ जणांनी नाव नोंदविले असून, त्यांच्या नावाने बँकेत पैसे डिपाॅझिट करण्यात आले आहेत. त्यात २१ वर्षांनी एक लाख रुपये मिळणार आहेत.

--

आरटीओ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

एसटीतर्फे आता आरटीआेच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांना एसटीकडून ट्रेनिंग दिले जाणार आहे. याअगोदर या नव्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देताना एसटी सुविधा देत होती. पण, आता ही ट्रेनिंग एसटी देणार आहे. या ट्रेनी अधिकाऱ्यांना कामाचा अनुभव व जड वाहन चालविण्याचे लायसन्स गरजेचे होते. पण, आता ते लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातची रसद दिंडोरीत रोखली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

शेतकरी संपात दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तालुक्यातून हजारो टन भाजीपाला, दूध, फळे बाजारपेठेत पोहोचले नाही. तालुक्यातून नाशिक, मुंबईसह गुजरातकडे जाणारा शेतमाल पूर्णतः बंद करण्यात आला. बाहेरून येणारे दूध, भाजीपाला, फळांची वाहनेही ठिकठिकाणी अडविण्यात आली.

शेतकरी संपाला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी नाशिक-सापुतारा, पिंपळगाव-सापुतारा, नाशिक-बलसाड या गुजरातला जोडणाऱ्या मार्गांवरुन होणारी वाहतूक अडविली. सकाळी सहा वाजेपासूनच दिंडोरीसह ठिकठिकाणी रस्त्यावर युवक शेतकऱ्यांनी जमा होत वाहनांची तपासणी केली. भाजीपाला फळे व दूध वाहतुकीचे वाहने रोखून धरले. कोणतेही नुकसान न करता वाहने बाजार आवारात लावण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी आंबे, भाजीपाला व दुधाचे ट्रक अडविण्यात आले.

दिंडोरी येथे नाशिक-सापुतारा रस्त्यावरील पालखेड चौफुलीवर शेतकऱ्यांनी वाहनांची तपासणी केली. यात चार दुधाचे टँकर, दहा आंब्याचे ट्रक, एक टोमॅटोचा ट्रक अडविण्यात आला. उमराळे येथे पेठ तसेच गुजरातमधून आलेले आंब्याचे वीस ट्रक परत पाठविण्यात आले. रासेगाव, लखमापूर फाटा, उमराळे, पांडणे, वणी, खेडगाव, पिंप्री, अचला आदी ठिकाणी भाजीपाला, फळे, दुधाची वाहने रोखण्यात आली. युवा शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढव‌िला. काही काळ तणाव निर्माण होऊन पोल‌िस व शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनीही समजुतीची भूमिका घेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले.

तीन लाख लिटर दूधाचे संकलन बंद

दिंडोरी तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे आठ कंपन्यांचे विविध गावात दूध संकलन केंद्र आहेत. शेतकऱ्यांनी डेअरीला दूध न देण्याचा निर्णय घेतल्याने सर्व दूध संकलन केंद्र बंद होते. त्यात आठ शीतगृह प्रकल्प असून येथे दररोज सुमारे दोन लाख ७५ हजार लिटर दूध गोळा होते. मात्र, गुरुवारी एकही लिटर दूध आले नाही. तालुक्यात संपूर्ण दूध विक्री बंद झाल्याने चाकरमान्यांना दुधाविना चहा पिण्याची वेळ आली आहे. दिंडोरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतही शुकशुकाट होता. संपाला दिंडोरी व्यापारी असोसिएशने पाठिंबा दिला. शुक्रवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images