Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रोडरोमिओची तरुणींकडून यथेच्छ धुलाई

0
0

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सहा महिन्यांपासून त्रास देणाऱ्या एका रोडरोमिओला कॉलेज तरुणींनी भररस्त्यात चोप दिला. रानवड साखर कारखाना परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करीत यापुढे त्रास द्याल, तर याद राखा असा संदेशच या कॉलेज तरुणींनी रोडरोमिओंना दिला आहे.

खडक ओझर (ता. चांदवड) येथील विवाहित असलेला योगेश पगार हा तरूण रानवड येथे कॉलेजात शिकायला जाणाऱ्या नांदुर्डी परिसरातील विद्यार्थिनींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देत होता. येता-जाता अश्लिल शेरेबाजी करीत तो या तरुणींचा मोटरसायकलवर पाठलागही करीत होता. या प्रकाराने हैराण झालेल्या विद्यार्थिनींना त्रास देण्यासाठी तो शुक्रवारीही परिसरात आला होता. मुलींची छेड काढून पसार होण्याच्या प्रयत्नात असतांना त्याची मोटरसायकल बंद पडली आणि तो या मुलींच्या तावडीत सापडला.

संयमाचा बांध सुटलेल्या या विद्यार्थिनींना स्थानिक नागरिकांनीही मदत केली. या तरुणाला पकडल्यानंतर तोंडाला स्कार्प बांधून चार मुलींनी योगेश पगारची यथेच्छ धुलाई केली. त्‍याची सँडलने चांगलीच धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विकृत असलेला योगेश गोविंद पगार हा विवाहित असून, तो केवळ छेड काढणे, त्रास देणे यासाठी रानवड कॉलेजच्या मार्गावर या मुलींच्या मागावर असायचा. अखेर त्याला या मुलींनी चौदावे रत्न दाखवले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजात शिकायला जाणाऱ्या मुलींना त्रास द्याल तर याद राखा असा संदेशच दिला. योगेशवर पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता पोलिसांनी या रोडरोमिओला धडा शिकवावा, अशी अपेक्षा या मुलींनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एम.एड. सीईटी आज होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नाशिकमधील केंद्रावर नियोजित एम.एड.ची रद्द झालेली सीईटी आज (११ जून) नव्याने आयोजित करण्यात आली आहे. शॉर्ट सर्किट, सर्व्हरमधील तांत्रिक अडसर आणि अत्यंत ढिसाळ नियोजनाअभावी भरडले गेलेले १२५ विद्यार्थी आज पुन्हा ही परीक्षा देणार आहेत. गत प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी परीक्षेचे केंद्रच बदलण्यात आले आहे. आज होणारी परीक्षा अमृतधाम परिसरातील के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलतर्फे २८ मे रोजी घेण्यात आलेल्या या सीईटी परीक्षेच्या नियोजनाचा सर्व्हरच्या अडथळ्यांमुळे बट्ट्याबोळ झाला होता. सर्व्हर प्रॉब्लेम व शॉर्ट सर्किंटमुळे विद्यार्थ्यांना अर्धवट पेपर सोडून १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील केंद्रावर हलविण्यात आले होते. तेथेही सर्व्हर अॅक्टिव्ह होण्याची दिवसभर प्रतीक्षा करूनसुध्दा रात्री आठ वाजेपर्यंतही यश न आल्याने अखेरीस ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

इंदिरानगरच्या डे केअर सेंटरवर २८ मे रोजी ही परीक्षा नियोजित होती. येथे ऑनलाइन पध्दतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले होते. या केंद्रावर सुमारे दीडशे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. परीक्षेचा कालावधी सुरू झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचे लॉग इन झाले नव्हते. त्यामुळे काहींची परीक्षा सुरू झाली तर तांत्रिक कारणास्तव बसून होते.

पेपर सुरू होऊन अवघा तासाभराचा कालावधी उलटत नाही तोच परीक्षा केंद्रावर शॉर्ट सर्किट झाल्याने गोंधळ उडाला होता. चालू ऑनलाइन पेपरमधून कॉम्प्युटर्स बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्यांची व्यवस्था इतरत्र करण्याचा निर्णय होऊन त्यांना पेठरोडवरील आकाश पेट्रोल पंपानजीक प्रो सोल्युशन कन्सल्टन्सी या दुसऱ्या केंद्रावर परीक्षेचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले. तेथेही सर्व्हरमधील तांत्रिक अडसर व ढिसाळ नियोजनामुळे दूरच्या जिल्ह्यांमधून दरमजल करत आलेले विद्यार्थी हात हलवत माघारी गेले होते.

विद्यार्थ्यांना आवाहन

दुपारी २ ते ३.३० या वेळेत होणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर १२.४५ वाजता उपस्थित रहायचे असून, १.३० वाजता परीक्षा केंद्र्राचे प्रवेशव्दार बंद होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना हॉलतिकीटवरील सर्व सूचनांचे पालन करावे व जुन्यासोबत नवेही हॉलतिकीट सोबत आणावे. हॉलतिकीटवर फोटो चिकटवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकावर पिस्तूल रोखत वाहनाची चोरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

वाहनचालकाचे हातपाय बांधून त्याचे वाहनासह अपहरण करून नंतर मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनास‌ह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असा हा प्रकार चांदवड येथील राहुड घाटात घडला. चोरट्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या चालकाने याबाबत त्र्यंबकेश्वर आणि देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चालक सुभाष उपाध्याय (वय ३९, रा.वाराणसी बधोनी, उत्तरप्रदेश) याने दिलेल्या माहितीनुसार, तो मंगळवारी (दि. ६) मुंबई चिंचोरी येथून कॅन्व्हायमधून नवीन पिकअप व्हॅन घेऊन भुवनेश्वर ओरिसा येथे जाण्यासाठी निघाला. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घोटी येथून त्यांच्या वाहनात तीन अज्ञात प्रवाशी बसले. चांदवडच्या पुढे राहूड घाटात लघुशंकेचे कारण सांगून तिघेह संशयित खाली उतरले. त्यानंतर त्यांनी सुभाषवर पिस्तुल रोखले. त्याचे हातपाय बांधले आणि डोळ्यांवर रुमाल बांधून सिटाखाली ढकलले. त्यानंतर मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वरपासून जवळच वाहन थांबवून त्याचे हातापाय व डोळे सोडले. तेव्हा त्याला त्याच्या वाहनामागे एक मोटारसायकल दिसली. त्या मोटारसायकलवर तीन व्यक्ती होत्या. त्यानंतर सुभाषला त्या मोटारसायकलवर दोघांच्या मध्ये बसवले आणि उर्वरित चौघांनी पिकअप घेऊन पोबारा केला. त्यानंतर मोटरसायकलवरून सुभाषला त्र्यंबक-जव्हार रस्त्यावरील घाटात उतरविले. चोरट्यांनी सुभाषजवळील मोबाइल आणि आठ हजार रुपये काढून घेतले. घाटात सोडले तेव्हा त्याच्यावर पिस्तुलही रोखले. मात्र सुभाषने दगड मारून जवळच्या जंगलात पळ काढला.

माहितीत विसंगती

पोलिसांनी पिंपळगाव आणि चांदवड टोल नाक्यावर स‌सि‌टिीव्ही तपासले. मात्र त्यात पिकअपमध्ये चालक आणि केवळ एक व्यक्ती दिसते. त्यामुळे माहितीत विसंगती असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माहेरघर’ कोरडेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असून, चालू हंगामात आतापर्यत सरासरीच्या ५.७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नांदगाववर यंदा पाऊस मेहेरबान असल्याचे पहावयास मिळत असून, येथे सर्वाधिक २८.०५ टक्के पाऊस झाला आहे. तर पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये अवघा दोन टक्के पाऊस पडला आहे.

यंदा नाशिकककरांनी असह्य उन्हाच्या झळा सहन केल्या. उकाड्यामूळे घामाच्या धारांमध्ये नाशिककर अनेकदा न्हाऊन निघाले. कधी एकदा पाऊस पडले, असे सर्वांनाच वाटत होते. बळीराजा तर आभाळाकडे डोळे लाऊन बसला होता. मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात सलामी दिली असून, त्यामुळे नाशिककर सुखावले आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३.३९ मिलीमीटर एवढे आहे. दरवर्षी जिल्ह्यात साधारणत: १५ हजार २०० मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी २ हजार ३२४ मिलीमीटर पाऊस जून महिन्यात पडतो. १ ते १० जून या कालावधीत जिल्ह्यात ८७७.२ मिलीमीटर पाऊस पडला असून, जूनमधील पर्जन्यमानाची ही टक्केवारी ३७.७४ टक्के आहे. नांदगाव तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मालेगावात १०९ मि. मी पाऊस पडला आहे. चांदवडमध्ये ९८.२, पेठमध्ये ७४, इगतपुरीत ६९, सुरगाण्यात ६१.५, निफाडमध्ये ६०, नाशिक तालुक्यात ५३.१ मि.मी पाऊस पडला आहे. सर्वात कमी १८ मिलीमीटर पाऊस सिन्नर तालुक्यामध्ये पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) औरंगाबाद या देशभरात नावाजलेल्या संस्थेच्या २०१७ च्या अंतिम गुणवत्ता यादीत नाशिकच्या आठ विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. राज्यभरातून तब्बल सात हजारावर विद्यार्थी येथील प्र्रवेशासाठी इच्छुक होते. यातून राज्यातील अवघ्या ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

निवड झालेले हे आठही विद्यार्थी नाशिकच्या सुदर्शन अकादमीचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये ध्रुव वाल्मिक ढाकणे, आदिनाथ जयंत रोहमारे, राजशेखर सुरेश जाधव, वैभव चंद्रशेखर पाटील, अनिश पराग शिंत्रे, अथर्व धनंजय अभ्यंकर, प्रज्योत भिमाशंकर प्याती आणि आनंद हुंबाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सैन्यातील अधिकारी पदावर अधिकाधिक विद्यार्थ्यांची निवड व्हावी, यासाठी १९७७ साली महाराष्ट्र शासनाने ही संस्था स्थापन केली होती. येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अकरावी व बारावीच्या अभ्यासासोबतच नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) साठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील विद्यार्थी दोन वर्षे सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धडे गिरवतात. आजपर्यंत या संस्थेने देशाला ५०० पेक्षा अधिक सैन्यदल अधिकारी दिले आहेत. त्यामुळे येथील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते.

डिफेन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शहरात मोठी संख्या आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या स्पर्धेत नाशिकचे विद्यार्थी कुठेही कमी नाहीत हेच या यंदा एसपीआय, औरंगाबाद या संस्थेतील निवडीने दाखवून दिले आहे.

- हर्षल अहिरराव, डिफेन्स करिअर मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या कलावंतांनी वाढविली रंगत

0
0

नाशिक : 'मटा' आर्ट फेस्टमध्ये बाळ नगरकर यांच्यासह संजय दुर्गावाड, कैलास परदेशी आदींनी काही व्यक्तींना समोर बसवित त्यांचे हुबेहूब चित्र साकारले. त्यात अनेक जण दंग झाले होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांची लाइव्ह व्यंगचित्रे आणि क्रिएटिव्ह पेंटिंगमध्ये राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांच्या कुंचल्यातून साकारलेले चित्र पाहून नाशिककर हरखून गेले. नंदू गवांदे यांच्या कॅलिग्राफीच्या शैलीने सगळ्यांचीच मने जिंकली. त्यांनी कॅलिग्राफीचे वेगवेगळे प्रकार उपस्थितांना समजावून सांगितले. प्रसाद पवार, समीर बोंदार्डे आणि संजय अमृतकर यांचे फोटोग्राफी या विषयावर लेक्चर हॉलमध्ये माहितीपर मार्गदर्शन झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

श्रद्धा कराळे यांच्या वारली पेंटिगने सगळ्यांनाच भुरळ घातली. समीर बोंदार्डे यांच्या फोटोंचे प्रदर्शन रसिकांना चांगलेच भावल. समीर यांनी कुंभमेळ्यात टिपलेल्या फोटोंचा यात समावेश होता. शिल्पकार द्वीप आहेर यांच्या छत्तीसगडमधील बस्तर येथील डोकरा कास्टिंग या शिल्पप्रकाराने रसिकांची मने जिंकली. चित्रकार वैभव खर्जुल यांनी कोल्हापुरी चपलेचा नमुना सादर केला. त्यासाठी कॅनव्हासवर मिक्स मीडिया प्रकाराचा वापर करण्यात आला. ललित महाजन व नेहा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हेरंब भावसार, हर्षदा मंडोरा, ध्रुव राठोड, आदित्य देशमुख, स्वप्निल अहिरे, मोहिनी येवलेकर यांच्या हँड ग्रुप फाउंडेशनने व्हॉट इज आर्ट हा प्रश्न रसिकांना विचारला होता. यावर आर्ट फेस्टला भेट देणारे या प्रश्नाचे उत्तर स्टिकरवर लिहून देत होते. या आर्ट फेस्टमध्ये मविप्र आर्किटेक्ट कॉलेजच्या थर्ड इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी सेट डिझाइन स्ट्रीमच्या विविध कलाकृती सादर केल्या.


लाइव्ह शिल्पकलेची अनोखी अनुभूती

शिल्पकला ऐकून माहिती असली, तरी तिचे लाइव्ह प्रात्यक्षिक बघण्याची संधी क्वचितच मिळते. कलासंगम आर्ट फेस्टमध्ये ही संधी नाशिककरांना शनिवारी मिळाली. मातीतून साकारणारे शिल्प, व्यक्तींचे चेहरे, त्यावरील अचूक हावभाव यानिमित्ताने नाशिककरांना टिपता आले. अनेकांनी अशा स्वरूपाचे प्रात्यक्षिक प्रथमच पाहिल्याने शिल्पकलेविषयी मोठे आकर्षण दिसून आले. नीलेश ढेरे, श्रेयस गर्गे, यतिन पंडित व भूषण कोंबडे यांनी यावेळी शिल्पकला साकारली.


पेंटिंग्जने वेधले लक्ष

आर्ट फेस्टमधील कॅनव्हास, अॅबस्ट्रॅक, कॉटन अशा अनेक लक्षवेधक स्टाइल्सच्या पेंटिंग्जने कलाप्रेमींना मोहिनी घातली होती. यात थ्रीडी पेंटिंग्ज अनेकांच्या पसंतीस उरतल्या. प्रामुख्याने वारली, निसर्ग, व्यक्ती, ट्रॅफिक प्रबोधन या पेंटिंग्ज आकर्षण ठरल्या.


फोटोग्राफीची भुरळ

पक्षी, कीटक, प्राणी, फॉरेस्ट, नेचर, सनसेट यांसारख्या अनेक विषयांवरील फोटोंची प्रेक्षकांना भुरळ पडली होती. यासोबतच प्रासंगिक, तसेच ऑफबिट फोटोंनाही प्रेक्षक दाद देत होते. योगेश तांबट यांनी विविध अँगल्सने काढलेले फोटो प्रेक्षक बारकाईने न्याहाळत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांनी घेतली शेतकरी संपाची धास्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुकाणू समितीच्या रचनेनंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपच्या मंत्र्यांनीही शेतकरी संपाची धास्ती घेतली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. या सोहळ्याच्या नियोजित निमंत्रण पत्रिकेतील तीनही मंत्री हेतूपूर्वक कार्यक्रमास अनुपस्थितीत राहिल्याची चर्चा शनिवारी येथे रंगली होती.

आरोग्य विद्यापीठाचा १९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास नियोजित निमंत्रण पत्रिकेनुसार पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार होते. यात विद्यापीठाचे प्रतिकुलपती या नात्याने महाजन यांची उपस्थिती विद्यापीठ वर्तुळास अपेक्षितच होती. मात्र, ऐनवेळी या तीन मंत्र्यांपैकी एकही जण या कार्यक्रमाकडे फिरकले नाही. परिणामी सोहळ्याचे अध्यक्षस्थान ऐनवेळी महाजन यांच्याऐवजी कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांना सांभाळावे लागले. या मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत विद्यापीठ प्रशासनाने मौन बाळगले असले तरीही शेतकरी संपाची धास्तीच मंत्र्यांच्या अनुपस्थितीला कारणीभूत असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

गेल्या आठवड्यापासून राज्यभरात धुमसणाऱ्या शेतकरी आंदोलनाचे केंद्र नाशिक बनले आहे. नगर जिल्ह्यातील पुणतांब्यापाठोपाठ नाशिकमध्ये संघटीत झालेल्या शेतकरी वर्गाने शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संवेदनशील बनत चाललेल्या वातावरणात आंदोलकांचा विरोध, माध्यमांसमोरील प्रश्नोत्तरे आणि या विषयावरील शेरेबाजी टाळण्यासाठीच मंत्र्यांना पक्षाने छुपी आचारसंहिताच लागू केल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटमधूनच वेतनाची केली तरतूद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारकडून येत्या एक जुलैपासून जीएसटी ही नवी एक देश-एक करप्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे या नव्या जीएसटीची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या अनुदानाचा अंदाज नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाची अडचण होणार आहे. त्यामुळे महापालिकेला शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानात विलंब होण्याची श‍क्यता गृहीत धरून महापालिकेच्या लेखा विभागाने तीन महिन्यांचे वेतन व अन्य खर्चाची तजवीज अगोदरच केली आहे. त्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये कर्मचारी वेतनासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद गृहीत धरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या महापालिकेचा गाडा हा दर महिन्याला एलबीटीतून मिळणाऱ्या ७५ कोटी रुपये अनुदानातून सुरू आहे. त्यात ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांकडून मासिक सुमारे ३५ कोटी रुपये प्राप्त होतात. याशिवाय, मुद्रांक शुल्कातून सुमारे पाच कोटी रुपये मिळतात. उर्वरित तूट भरून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या ३४ कोटीच्या अनुदानातून भरली जाते. परंतु जीएसटीमुळे या अनुदानाच्या पद्धतीत बदल होणार आहेत. येत्या एक जुलैपासून संपूर्ण देशात जीएसटी करप्रणाली लागू होणार असल्याने एलबीटी बंद होणार आहे. जीएसटीत केंद्र सरकारने एलबीटीचे अनुदान देणार असले तरी, ते केव्हा मिळेल याची शाश्वती नाही. त्यातच केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देईल. राज्य सरकार त्यानंतर पालिकेला वर्ग करेल. त्यामुळे या प्रक्रियेला बराच विलंब होणार आहे. त्यामुळे अनुदान मिळाले नाही तर पालिकेचे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने शक्कल लढवत महापालिकेने अधिकारी व कर्मचारी वेतनासाठी तीन महिन्यांकरिता ७० कोटी रुपयांची तजवीज बजेटमध्येच करून घेतली आहे.

अधिकारी व कर्मचारी वेतनासाठी मासिक २० कोटी रुपये खर्च होतात. देखभाल दुरुस्तीसाठी सात कोटी, शिक्षण मंडळ कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेबर या तीन महिन्यांमध्ये जीएसटी अनुदानाला उशीर झाल्यात थेट बजेटच्या तरतुदीतून ही रक्कम वापरण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाची तरतूद अनोख्या पद्धतीने करून घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलाकारांच्या अदाकारीची भुरळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रंगीबेरंगी पताकांनी फुललेले आभाळ, विविधरंगी कागदी झिरमिळ्यांनी सजवलेली दुतर्फा रांग, कार्यक्रमस्थळापर्यंत हिरवळीतून जाणारा अतिशय सुखद असा रस्ता आणि मुख्य प्रवेशद्वारावर तयार केलेल्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून आत नेऊन सोडण्याची केलेली व्यवस्था हा माहोल होता ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने आयोजित कलासंगम कार्यक्रमाचा.

सांस्कृतिक नाशिकला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने शनिवार व रविवार हे दोन दिवस कलासंगम (आर्ट फेस्ट) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसाद मंगल कार्यालयासमोरील मविप्र आर्किटेक्ट कॉलेज येथे ‘मटा’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त हा महोत्सव सुरू आहे. या ठिकाणी कलावंतांचे एक वेगळेच जग उभारण्यात आलेले असून, कॉलेजच्या सुरुवातीलाच ‘महाराष्ट्र टाइम्स’ची भव्य कमान स्वागताला उभी आहे.

आतमध्ये प्रवेश केल्यावर लगेचच रंगबेरंगी पताकांनी सजविलेला मांडव आणि विविधरंगी झिरमिळ्यांनी सजवलेली दुतर्फा रांग लक्षवेधक ठरत आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाताना दुतर्फा झाडी असून, दोन्ही बाजूंनी वेगवेगळी शिल्प ठेवण्यात आलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेर कुंभमेळ्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, प्रवेशद्वाराला कॅमेऱ्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. कॅमेऱ्याच्या लेन्समधून आत जाताना पितळेचा मोर आपल्या स्वागताला उभा असून, एका बाजूला वारकऱ्याचे शिल्प आहे, तसेच या ठिकाणी वारली पेंटिंग्जही लावण्यात आलेली आहेत.

आत जाताना पेन्सिलच्या आकाराची ओरिगामी केलेली असून, दुतर्फा विविध पेंटिंग्ज लावण्यात आलेली आहेत. नाशिककरांनी उद्घाटनप्रसंगी या कलासंगम महोत्सवाला लावलेली हजेरी कार्यक्रमाला चार चाँद लावून गेली. मोजक्या भाषणांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

कलाप्रकारांनी रंगत

आर्ट फेस्ट जेथे सुरू आहे तेथे राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांची काही चित्रे प्रदर्शित करण्यात आली असून, त्यातील ड्रीम या थीमवर काढलेल्या चित्राला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळत आहे. गौतम बुद्धांचे चित्रही अप्रतिम असून, मिठाई विकत घेणारे बाबा सर्वांनाच भावले. विविध आर्टमध्ये पेन्सिल वर्क, बांबूचे शिल्प, फ्लाय अॅशच्या विटांपासून तयार केलेला मुखवटा, तसेच शर्टांपासून बनविलेले चित्र, चित्रात चिकटविण्यात आलेल्या चपला यादेखील

आकर्षणाचा भाग बनल्या. नांगर घेतलेला शेतकरी, नर्तकी, लाकडी ओंडक्यावर दाणे टिपणारा पक्षी, कागदी पक्षी, लाकडी बासरी अशा एक ना अनेक वस्तू येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.

--


व्यंगचित्रांना दिलखुलास दाद

प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने व्यंगचित्रे काढून दाखवत कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला. त्यांनी सुरुवातीला गणेशाला नमन करण्यासाठी त्याचे चित्र रेखाटले आणि नंतर व्यंगाकडे वळत अंघोळीला जाणारी नटी लीलया साकारली. स्त्री-पुरुष संवादाचे एक चित्र आणि पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे कॅरिकेचर काढून एका वेगळ्याच उद्घाटनाचा आनंद उपस्थिताना दिला. संपदा हिरे यांनी मारलेल्या रेषेतून सरकार व शेतकरी यांचे चित्र काढत दोघांनाही अधिक काही न बोलता एकत्र यावे, असा संदेश त्यांनी या चित्राद्वारे दिला. नाशिककरांची त्यांना दिलखुलास दाद लाभली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज पडून पिता-पुत्रासह चार ठार

0
0

टीम मटा, नाशिक

जिल्ह्यात वीज पडून पिता-पुत्रासह चार जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. यात एका महिलेचा समावेश असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांत चोंढी (ता. सिन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४०) व त्यांचा मुलगा कृष्णा रघुनाथ मवाळ (वय १८), कसाबखेडे (ता. नांदगाव) येथील रामदास पोपट राठोड (वय ३०), उर्धूळ (ता. चांदवड) येथील कविता बापू ठाकरे (वय ३२) यांचा समावेश आहे.

सिन्नर तालुक्यातील चोंढी येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ मवाळ व त्यांचा मुलगा कृष्णा मवाळ शनिवारी वीज कोसळून अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाले, तर प्रशांत गंगाधर मवाळ (वय २६) गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव तालुक्यात कसाबखेडे शिवारात पाऊस सुरू असताना रामदास राठोड शेतात मका लावत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ते जागीच ठार झाले. नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार भोईर तपास करीत आहेत. उर्धूळ (ता. चांदवड) येथे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात सायंकाळी साडेसातच्या सुमारास वीज पडून कविता ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा मार्गावरील अपघातात एक ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरापासुन तीन किलोमीटरवर असलेल्या देवळा रस्त्यावरील तुर्कीहुडीजवळ कंटेनरने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे.

मोरेनगर येथील प्रवाशी वाहतूक करणारी अ‍ॅपे रिक्षा (एमएच २ वायए ६७२१) देवळा येथून सटाणा शहराकडे दुपारी ३ वाजेच्या सुमारास येत होती. तुर्कीहुडीजवळ सटाण्याकडून देवळ्याकडे जाणाऱ्या कंटेनरने (आरजे १९ जीसी ३१८९) रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालक समाधान उर्फ आबा खंडू पवार (३२, रा. मोरेनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षामधील प्रवाशी राजा मानसिंग सडमाके (२१, रा. तुर्कीहुडी) हा गंभीर जखमी झाला. त्यास मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेे.

चिमुरडीवर अतिप्रसंग

पंचवटीः पंचवटी परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीवर अज्ञात नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. संशयित आरोपीच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पॉस्को) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पेठरोड परिसरातील कर्णनगर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांच्या पाच वर्षीय चिमुरडीचे शुक्रवार (दि. ९) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या अज्ञात व्यक्तीने घराजवळ खेळत असताना अपहरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर चोरांचे राज्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

‘‘चौकीत पोलिस गैरहजर, सीसीटीव्हीही बंद, वेळेवर कुणाचीही मदत नाही आणि बाहेर मात्र चोरट्यांचा सुळसुळाट! मदतीला कोणीच नाही तर पोलिस काय कामाचे?’’ असा उद्विग्न सवाल आहे भुसावळच्या सुरेखा आनंद सोनवणे याचा. मोबाइल आणि पैसे असलेली पर्स गमावल्यानंतर पोलिसांच्या असहकार्य आणि कामचुकारपणाचा अनुभव घेत त्यांनी रेल्वेने परतीचा मार्ग धरला.

सुरेखा सोनवणे या नाशिकमधील सिडको येथे आपल्या आजारी नातेवाइकांना भेटण्यासाठी रविवारी रेल्वेने नाशिकरोड येथे आल्या. नाशिकरोड बसस्थानकात विजयनगर बसमध्ये चढत असतांना चोरट्याने त्यांची मोबाइल आणि पैसे असलेली पर्स पळवली. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ बसस्थानकावरील पोलिस चौकी गाठली. परंतु नेहमीप्रमाणे या चौकीतील पोलिस कर्मचारी गायब होते. त्यामुळे सुरेखा सोनवणे यांनी नाशिकरोड बसस्थानक प्रमुखांना आपली आपबीती सांगितली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. मात्र, सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगून बसस्थानकातील सोनवणे यांना परत पाठविले.

सुरेखा सोनावणे यांनी जवळ पैसेच नसल्याने पायपीट करीत नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. तेथे उपस्थित दोन पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे अंमलदाराला झालेली घटना सांगण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइलमध्ये ‘व्यस्त’ असलेल्या या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे साधे लक्षही दिले नाही. सुमारे तासभर पोलिसांचा हा तमाशा पाहिल्यावर सुरेखा सोनवणे यांच्या सहनशिलतेचा अंत झाला. त्या आल्या पावली बसस्थानकावर पुन्हा परतल्या. इतर प्रवाशांच्या मदतीने आपल्या मुंबईमधील भावाशी संपर्क साधला. भावाने नाशिकमध्ये राहणाऱ्या मित्राशी संपर्क करीत त्याला नाशिकरोड बसस्थानकावर पाठविले. भावाच्या मित्राने सुरेखा सोनवणे यांना गोदान एक्स्प्रेसचे भुसावळपर्यंतचे तिकीट काढून दिले. पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहत, नाशिकचा कटू अनुभव पदरात घेऊन त्या भुसावळला मार्गस्थ झाल्या.

नाशिकरोड बसस्थानकात गेल्याच आठवड्यात वडनेर दुमाला येथील एका महिलेलाही अशाच अनुभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नाशिकरोड बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस चौकी असून अडचण, नसून खोळंबा ठरू लागली आहे. अशाच प्रसंगाची रविवारी पुनरावृत्ती झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती मंदिरात चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मानगर येथील गणपती मंदिरातील दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी सुमारे चार हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. गंगापूर पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बाबुराव सोनार (४८, रा. महात्मानगर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. १०) मध्यरात्री दोनच्या सुमारास दोघा चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरातील दोन दानपेट्या फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भद्रकालीत चोरी

दारू पिण्यास नकार दिला म्हणून तिघा संशयितांनी त्यांच्या एका मित्राचा मोबाइल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. भद्रकाली परिसरात हा प्रकार घडला. समाधान पांडुरंग भारस्कर (२४, रा. घोटी, ता. इगतपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. जयेश उर्फ जयड्या नाळे, लखन शिरसाठ आणि समाधान उर्फ सम्या गांगुर्डे (सर्व रा. फुलेनगर) यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १०) दुपारी दोनच्या सुमारास तलवाडी परिसरात संशयितांनी समाधानकडे दारू पिण्याची मागणी केली. मात्र, समाधानने दारू पिण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने तिघांनी समाधानजवळील मोबाइल आणि १,४३० रुपयांची रोकड असा चार हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

‘तो’ युवक ताब्यात

घरफोडीच्या गुन्ह्यात पकडलेला १७ वर्षीय विधीसंघर्षित युवक उंटवाडी रोडवरील रिमांड होममधून पळून गेला होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला गंगाघाटावरून ताब्यात घेतले. सरकारवाडा पोल‌सि स्टेशनमध्ये दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात या युवकाला ताब्यात घेतले होते. कोर्टाच्या आदेशानुसार त्याला उंटवाडीतील रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. परंतु, ७ जून रोजी त्याने रिमांड होममधील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तेथून पळ काढला. याप्रकरणी मुंबई नाका पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

चोरीचे मोबाइल जप्त

मोबाइल चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात आडगाव पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून सहा मोबाइल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार सॅमसंग, लिनोव्हासह आणखी एका कंपनीचा मोबाइल असा ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१५ गायींची सुटका

कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या १५ गायी आणि सहा गोऱ्ह्यांची आडगाव पोलिसांनी सुटका केली. जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आडगाव पोलिस रविवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास गस्त घालत असताना एका आयशर ट्रकची (एमएच १७ बीडी ४७१६) तपासणी करण्यात आली. या ट्रकमधून १५ गायी आणि सहा गोऱ्ह्यांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टेम्पोचालकासह व्यापाऱ्याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीचे आमिष दाखवून फसविणाऱ्या महिलेस अटक

0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरी रोडवरील म्हसरुळ गजपंथ स्टॉपजवळ राहणारी रुपाली सिध्देश्वर शिरुरे हिने नोकरीचे आमिष दाखवून १६ जणांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून तिने १४ लाख २० हजार रुपये उकळले होते. तिच्या विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हसरुळ पोलिसांनी पुणे येथे जाऊन तिला ताब्यात घेतले.

रुपाली शिरुरे हिने सोपान विठ्ठल ठाकरे (रा. दिंडोरी रोड) यांच्याशी ओळख वाढवून माझी मिलिटरीत ओळख आहे. गोवा येथील खाणीत खूप इंजिनीअर्सची गरज आहे, असे सांगून ठाकरे यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. उरलेली रक्कम काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठाकरे यांनी त्याचे मित्र प्रकाश सुधाकर जगताप (रा. लासलगाव) यांनाही नोकरी विषयी सांगितल्याने त्यांनी ५० हजार रुपये या महिलेला दिले. अशाच प्रकारे रुपाली शिरुरे हिने यशवंत खेलमकर, संध्या म्हस्के, भाग्यश्री म्हस्के, विनोद वायकर, तुषार पवार, जगदीश डहाळे, छाया डहाळे, बाळासाहेब पवार, अक्षय सोनवणे, संतोष लोहार, किरण हिरे, सुरेश सावंत, अमित भोईर, विजय खेलमकर यांना नोकरी मिळवून देते असे सांगून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी ठाकरे यांच्या तक्रारीनंतर म्हसरुळ पोलिस ठाण्यात तक्रार रुपालीविरोधात १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती फरार होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएसस‌ी परीक्षेला १,१६७ उमेदवारांची दांडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी सकाळी लिपिक टंकलेखक गट-क संवर्गासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. नाशिकमध्ये सहा हजार ६५० उमेदवार या परीक्षेला सामोरे गेले. तर एक हजार १६७ उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आयोगाने जाहीर केल्यानुसार जिल्हा प्रशासनाने परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी करून ठेवली होती. लिपिक टंकलेखक मराठी/इंग्रजी या गट-क या पदांसाठी शहरातील १९ केंद्रावर ही परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आली. या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी एकूण सात हजार ८८७ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी सहा हजार ६५० उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले तर एक हजार १६७ उमेदवार गैरहैजर राहिले. परीक्षा प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी ६०० कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

उमेदवारांची स्पर्धा वेळेशी

सकाळी साडेदहा वाजेपासून उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. भाषा, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयांना अनुसरून प्रश्न विचारण्यात आले होते. ६० मिनिटांत १०० प्रश्न सोडविण्याचे आव्हान उमेदवारांपुढे होते. वेळ अपुरा ठरल्याची खंत अनेक उमेदवारांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


..हा तर आंदोलनाचा पराभव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले काही दिवस शेतकऱ्यांनी न्याय्य हक्कांसाठी जीवाचे रान करूनही त्यांच्या पदरात सरकारने फार काही टाकले असे नाही. जे टाकले आहे तेही सरकारच्या आणि जिल्हा बँकांच्या आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे वाटत नाही. त्यामुळे गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर पराभवच झाला अशी खंत सुकाणू समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ शेतकरी नेते गिरीधर पाटील यांनी रविवारी व्यक्त केली.

सुकाणू समितीचे पदाधिकारी आणि मंत्री गटातील सदस्य यांच्यात रविवारी दुपारी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परंतु, ज्या तत्वत: या शब्दाला ३ जून रोजीच्या बैठकीत सुकाणू समितीच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता त्याच शब्दावर ठाम राहत सरकारमधील काही मंत्री हे आंदोलन गुंडाळण्यात यशस्वी झाल्याची टीका गिरीधर पाटील यांनी केली. ते म्हणाले, की ३ जून रोजी झालेल्या बैठकीत सरकार ज्या मागण्या मान्य करीत होते त्याच मागण्यांवर सरकारने आजही सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे त्यात नवीन असे काहीच नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्यासमोर शेतकरी आंदोलकांचा तमाशा नको, याचा सरकारवर दडपण होते. म्हणूनच राज्य सरकारचा मंत्रिगट आंदोलन शमविण्यासाठी अधिक सक्रीय झाला होता. नवीन काही न देता मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. तत्वत: शब्द आला की त्यानुसार काही निकष आणि अटी लागू असतात. म्हणूनच तत्वत: शब्दाला समितीमधील सदस्यांचा आक्षेप होता.

मग आजच्या बैठकीत या शब्दाला आक्षेप का घेण्यात आला नाही? असा सवाल पाटील यांनी उपस्थ‌ति केला आहे. सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा नाही. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. नोटाबंदीच्या न‌णियानंतर जिल्हा बँकाही जायबंदी झाल्या असून अल्पभूधारकांनाही कर्जमाफी मिळेल की नाही? याबाबत पाटील यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

‘जल्लोष फार काळ टिकणार नाही’
कर्जमाफीच्या निर्णयामुळे जल्लोष होत असला तरी तो फार काळ टिकणारा नाही. हक्कांसाठी एकवटलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून त्यामुळे यापुढील आंदोलनांमध्ये तो उतरेल की नाही, याबाबत पाटील यांनी साशंकता व्यक्त केली. आजच्या बैठकीनंतर सरकारची सरशी झाली आणि आंदोलनाचा पराभव झाल्याचेही गिरीधर पाटील म्हणाले.

शेतकरी संघटनांकडून आनंदोत्सव
कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर गोल्फ क्लब मैदानाजवळील अतिथीगृहासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपावर गेलेल्या शेतकऱ्यांचे हे मोठे यश असल्याची भावना यावेळी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी हंसराज वडघुले, माधुरी भदाणे, करण गायकर, चेतन शेलार, गणेश कदम आदी उपस्थ‌ति होते.

शेतकरी संघटना अंशत:च समाधानी

सरकारच्या निर्णयाबद्दल शेतकरी संघटना अंशत:च समाधानी आहे. अल्पभूधारकांची कर्जमाफी आधीच्या चर्चेतच झाली होती, ती नव्याने जाहीर केली एवढेच. यामुळे निदान काही आत्महत्या टळतील अशी आम्ही प्रार्थना करतो. शेतमालाची अनावश्यक चढ्या भावाने केली जाणारी आयात, शेतमाल-साठवणुकीवरील बंधने, निर्यातबंदी, आयात-शुल्क माफ करणे, निर्यात शुल्क वाढवणे अशा प्रकारच्या अनेक मुक्त-बाजारविरोधीनीती, संदर्भात चर्चा होणे आवश्यक होते, ती चर्चा सदर संघटना व सरकारने टाळली. अन्य मागण्याही दुर्लक्षिल्या गेल्या. दरवर्षी कटोरा घेऊन सरकारच्या दारात उभे राहण्यापेक्षा शेतकऱ्यांना ताठ मानेने शेती-व्यवसाय करता आला पाहिजे, अशी शेतकरी संघटनेची भूमिका कायम आहे. त्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.
- अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना

शेतकऱ्यांवर टांगती तलवार

अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत असले तरी अन्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही याबाबतची टांगती तलवार कायम राहिल्याबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी देखील व्यक्त होऊ लागली आहे. हमीभावासह अनेक मागण्यांच्या बाबतती ठोस निर्णय न देता आस्थे कदम चालण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारल्याबद्दल असमाधानाचे भावही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत. सुकाणू समितीने आंदोलन मागे घेण्याबाबत घाई केली की काय? असा सूरही आता शेतकऱ्यांमधून उमटू लागला आहे.

सरकारने कर्जमाफी दिली त्याचे स्वागत आहे; परंतु यापुढे उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि ५० टक्के नफा अधिक दिल्यास शेतकऱ्याला कर्जमाफी व अनुदानासारख्या बाबींची गरज राहणार नाही.
- संपतराव व्यवहारे, निफाड

आंदोलनातील मागण्या मान्य करण्याकरता, तसेच आपल्या हक्कासाठी व अस्तित्वासाठी लढलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे व संघटनेचे अभिनंदन केले पाहिजे. सरकारने भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, हमीभाव व स्वामीनाथन आयोग लवकरात लवकर अंमलात आणावा, शेतकरी मुलांसाठी शिक्षण व नोकरीत सवलत मिळावी. सरकारने जाहीर केलेल्या तसेच मान्य तातडीने लागू कराव्यात.
- सचिन आहेर, भालूर, नांदगाव

मागील वर्षात दुष्काळ त्यानंतर शेती मालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत होता. त्यामुळे कर्जमाफीची गरज होती. राज्य सरकारने कर्जमाफी दिल्याने आनंद झाला आहे. आता अंमलबजावणीची गरज आहे. हे ऐक्याचे हे फळ आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
- गोविंद तळेकर, भालूर नांदगाव

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केला हा सर्वात आनंदाचा दिवस आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखावह करणारा हा निर्णय आहे. सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. अल्पभूधारकांना कर्जमाफी व दुधाविषयीचे धोरण हे निर्णय स्वागतार्ह आहेत.
- गणेश निंबाळकर, दहिवद, चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी कर्मचाऱ्याची महिलांकडून धुलाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सातपूर कॉलनीच्या कामगार वस्तीत एमआयडीसी भवनातील जाधव नावाच्या कर्मचाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेची छेड काढल्याचा आरोप करत महिलांनी त्याची चपलांनी धुलाई केली. या कर्मचाऱ्यावर पोलिसांनी कारवाई, करावी अशी मागणी एमआयडीसी भवनातील महिला कर्मचाऱ्यांसह इतरांनीही केली आहे.
हा कर्मचारी घरगुती काम करणाऱ्या एका महिलेला गेल्या महिन्याभरापासून त्रास देत होता. संतापलेल्या महिलेने अखेर सातपूर कॉलनीतील रहिवाशांना याबाबत सांगितले. या महिलेचा पिच्छा करताना तरुणांनी जाधव याला म्हसोबा मंदिराजवळ पकडले. यानंतर पीड‌ति महिलेने पायातील चप्पल काढत त्याला यथेच्छ चोप दिला. यावेळी इतरही महिलांनी जाधवला मार दिला. यावेळी जाधवसोबत असलेला एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला. याबाबत सातपूर पोलिसांकडे माहिती देऊनही उद्योग भवनातील या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस आयुक्तांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी घरकाम करणाऱ्या महिलांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहेगावकरांची पाण्यासाठी वणवण

0
0

नळ कनेक्शन नसल्याने ऐन पावसाळ्यात हाल; पाणी योजनेसाठी ठोस निर्णयाची मागणी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

वाहेगाव (ता. निफाड) या गावाशी संलग्न असणाऱ्या ग्रुपग्रामपंचायतमधील दहेगावला पावसाच्या दमदार आगमनानंतरही पाणीटंचाई भेडसावत आहे. दहेगाव या भरवस फाट्याजवळील गावात भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तासनतास सार्वजनिक नळावर थांबावे लागत आहे. तरी येत्या काळात या गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील भरवस फाट्याजवळील या गावाचा कारभार वाहेगाव ग्रुपग्रामपंचायतीकडे आहे. त्यामुळे प्रत्येक उपाययोजनांसाठी या ग्रमास्थांना वाहेगावावरच अवलंबून राहावे लागते. दहेगाव या गावात साधी नळ पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित नसून, गावात राहणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक नळ कनेक्शनवरून पाणी भरावे लागते. तसेच गावातील विहिरीतून या नळाला पाणी सोडले जाते. मात्र नळाला पाणी सोडण्याच्यावेळी लाइट गेल्याने सतत पाणीपुरवठा बंद होतो. अशा एक ना अनेक अडचणींचा सामना दहेगाव ग्रामस्थांना करावा लागत आहे.

या समस्येबाबत महिलांना विचारले असता त्यांनी गावात नळ पाणीपुरवठा नसल्याची माहिती दिली. तसेच गावात नळ पाणीपुरवठा योजना लागू करण्यासाठी वाहेगाव ग्रामपंचायतीने आमच्याकडून घरपट्ट्या वसूल केल्या. मात्र अजूनही नळ कनेक्शन दिले नसल्याचे कल्पना पेंढारी, मंजू गुप्ता, मीरा पवार, शारदा पवार, मंगल सोनवणे, अश्विनी घोटेकर या महिलांनी सांगितले. गावात असलेल्या कूपनलिकांना खारट पाणी आहे, असेही त्या म्हणाल्या. बऱ्याचदा दोन नळांवर संपूर्ण गावाच्या महिला पाणी भरायला आल्याने भांडण होते. अशा परिस्थितीत अनेकदा मागणी करूनही नळ कनेक्शन मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चे मंडळी रंगणार आज रंग-रेषांच्या द‌ुनियेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शहरात सध्या विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या सोहळ्यात बच्चेकंपनीलाही खास स्थान देण्याचे उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आज (सोमवार ) सकाळी ९ ते ११ या वेळेत मते लॉन्स, सावरकरनगर येथे होणार आहे.

नाशिक शहराला वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे आदींपर्यंत प्रसिद्ध व दिग्गज चित्रकारांची परंपरा आहे. या परंपरेला सलाम करून ‘मटा’ने वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहान कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा होणार आहे.

तीन गटांत रंगणार स्पर्धा

पाचवी व सहावी (एक गट), सातवी व आठवी (दुसरा गट), नववी व दहावी (तिसरा गट) अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘स्मार्ट सिटी’ हा विषय देण्यात आला आहे.

बक्षिसांची लयलूट

विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे. या ठिकाणी चित्र काढण्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था असल्याने बसण्यासाठी छोटी सतरंजी व कागद धरण्यासाठी प्रत्येकाने पॅड आणायचे आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

हौशी कलाकारांनी येथे साधावा संपर्क

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइल क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. ऐनवेळी नोंदणी केली तरी चालेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलात्मक जुगलबंदीची ‘अनुभूती’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कथकचा पदरव, बासरीचा सूर, तबल्याचा नाद अन् त्यातच पावसाची साथ अशी अनोखी कलात्मक जुगलबंदी मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्चर कॉलेजचा परिसरात रविवारी ‘मटा’च्या कलासंगम आर्ट फेस्टद्वारे नाशिककरांना अनुभवायला मिळाली. कलासंगमचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडल्यानंतर विविध कलाप्रकार सादर करण्यात आले. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय गायनाने झाली. दिवसभर नृत्य, नाट्य, शिल्प, संगीत अशा कलांच्या सादरीकरणानंतर संगीतमय कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्याला सायंकाळी तबलावादनाने सुरुवात झाली.

--

हे गजानन वक्रतुंड महाकाय...

‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘कलासंगम’ अार्ट फेस्टमध्ये रविवारी उत्तरार्धाची सुरुवात गणेशवंदनेने करण्यात आली. ही गणेशवंदना गुरू सुमुखी अथनी यांच्या शिष्यांनी सादर केली. क. का. वाघ परफॉर्मिंग आर्टमधील नृत्य विभागाच्या वतीने ही गणेशवंदना सादर करण्यात आली. यात अक्षय शहाणे, संतोष, पंकज ठाकरे आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे गजानन वक्रतुंड महाकाय असे गणेशवंदनेचे बोल होते. गणेशवंदनेनंतर गुरू सुमुखी अथनी यांचा सन्मान करण्यात आला.

--

तबलावादनाने रंगत

नाशिकमधील तबलानवाज नितीन पवार व नितीन वारे यांच्या पवार तबला अकादमी व अदिताल अकादमीच्या विद्यार्थ्य़ांनी तबला सहवादन केले. एका वेळी २५ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वादनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी आर्किटेक्ट कॉलेजचे सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. लहान वादकांच्या हातातून निनादणारे तबल्याचे बोल, त्यांच्या वादनातील तयारी पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रितालात वादन झाले. यात कायदे, पलटे यांचा समावेश होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तिस्त्र जाती कायदा सादर केला. रेला, तुकडे, फर्माईशी चक्रदार सादर करण्यात आले. ताल सादर करताना तिहाईतील पहिला ‘धा’ समेवर, दुसऱ्या आवर्तनातला दुसरा ‘धा’ समेवर तिसऱ्या आवर्तनातला तिसरा ‘धा’ समेवर सादर करून आपल्या तयारीचे दर्शन घडविले. त्यानंतर ‘नग नग’ शब्दांचा वापर करून चक्रदार सादर करण्यात आले. यावेळी अजराडा व फरुखाबाद या घराण्यांच्या गती सादर करण्यात आल्या. त्यानंतर ‘धीर’ ‘धीर’ शब्दयुक्त रेला सादर करण्यात येऊन दोन बंदिशी सादर करण्यात आल्य़ा याचे वैशिष्टय म्हणजे या तीन तालांमध्ये वाजविण्यात आल्या. त्यात अडाचौताल, दादरा, झपताल त्रिताल आदींचा समावेश होता. ‘तिरकीट’ आणि ‘तीट’ या दोन शब्दांचे कायदे सादर करण्यात आले.

--

बासरीचे गुंजले सूर

बासरीवादक मोहन उपासनी यांच्या विद्यार्थ्यांनी बासरीवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात भूप रागाने झाली. यात सरगम, आलाप, तानांसह सादरीकरण करण्यात आले. शास्त्रीय वादनानंतर वेस्टर्न प्रकारात भूप सादर करण्यात आला. त्यानंतर यमन व तिलककमोद राग सादर करण्यात आला. जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बासरी वादनातदेखील २० मुले व ६ मुलींनी सहभाग घेतला. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमासही रसिकांची दाद लाभली.

--

विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

आर्ट फेस्टमध्ये मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्ट कॉलेजच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या वर्षाच्या मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सेट डिझाइन स्ट्रीमच्या विविध कलाकृती सादर केल्या. त्याचप्रमाणे विजेता भामरे, पूर्वा घिया, कृतिका जाधव, सिमरन कर्णिक, मुक्ता कावळे, सायली पवार, हेतांसा राजकोटिया, ऋषभ शिवाल, अक्षय तिवारी, श्रिया तोरणे, प्राची भोसले, पलाश कडलग, प्रियंका पिंपळे, पुष्कराज ठाकूर, महेश अहिरे, पुष्कराज अहिरे आदींनी विविध कलाप्रकार सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमात हॅण्ड फाउंडेशनच्या सदस्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा सत्कार करण्यात आला.

--

सतारवादनात रसिक तल्लीन

येथील विख्यात शाहीद परवेज गुरुकुलच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सतारवादनाच्या बहरदार कार्यक्रमात श्रोते तल्लीन झाले. गुरुकुलचे अध्यक्ष उद्धव अष्टुरकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सतारवादनास श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी त्यांनी यमन रागातील चित्तवेधी रचना सादर केल्या. याशिवाय विविध रागांमध्ये त्यांनी सादर केलेल्या रचनांनी श्रोत्यांना मुग्ध केले. गौरव तांबे यांनी यावेळी तबल्यावर उत्तम साथ दिली. मोहिनी कुलकर्णी, अंजली नांदूरकर, राधिका गोडबोले, सोनल शहाणे, वासंती खाडिलकर, सुनीता जळगावकर या कलावंतांनी या सादरीकरणात सहभाग घेत रंगत आणली.

---

कथकची रसिकांवर मोहिनी

शहरातील विख्यात नृत्यांगना व कलानंदच्या संचालक सुमुखी अथनी, कीर्ती कलामंदिरच्या संचालक रेखा नाडगौडा आणि नृत्यांगणच्या संचालक कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी मुरली मनोहर रे... या कृष्ण भजनावर सादर केलेल्या कथक नृत्यातील तालबद्ध पदन्यास अन् भावोत्कट मुद्राभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. बहरदार सतार वादनानंतर कथक नृत्याने रसिकांना खिळवून ठेवले. या तीनही नृत्यसंस्थांच्या शिष्यांनी ‘एक से बढकर एक’ कलाविष्कार सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले. ऐश्वर्या कुलकर्णीच्या सुंदर नृत्याने सगळ्यांचीच मने जिंकली. सजन श्याम गर्जत आले... या गाण्यावर सादर करण्यात आलेले हे नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. मेरी सखी कासे कहूँ कान्हा कि चतुराई... या गाण्यावर सुंदर नृत्य अदाकारी सादर झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images