Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जीएसटीने भाववाढीला निमंत्रणच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने जीएसटी कायदा लागू केल्यानंतर त्यात कापड व्यावसायिकांचाही समावेश केल्यामुळे कापड व्यापारी प्रचंड नाराज आहे. मुंबई, सुरत, बंगळुरूसह देशातील इतर ठिकाणी कापड व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात बंद करून आपला संताप व्यक्त केल्यानंतर नाशिकमध्येही त्याचे पडसाद उमटले आहेत. या कराविरुद्ध गुरुवारी नाशिकच्या रिटेल कापड व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले, तर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

आतापर्यंत कापड, साडी, चादर, ब्लँकेट, टॉवेल या सर्वसामान्यांच्या वस्तूंसाठी विक्रीकर व व्हॅट नव्हता; पण सरकारने आता त्यांना जीएसटी लावण्याची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे सरकारने भाववाढीस निमंत्रण दिल्याचा आरोपही या कापड विक्रेत्यांनी केला आहे. जीएसटीमुळे कापड व्यापाऱ्यांना नवीन फॉर्म भरणे, रिटर्न भरणे, अशा किचकट बाबींना सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या मालांची वेगवेगळी जंत्री ठेवणे, विक्रीची बिलेसुद्धा वेगवेगळी बनविणे, रिटर्नसुद्धा वेगवेगळे भरणे या सर्व गोष्टी किचकट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या विरोधात नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यावर अध्यक्ष दिग्विजय कापडिया, नरेश पारख, रामेश्वर राजू, सतीश शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हौस पुरवा गाडीची!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र जुन्या वाहनांमधून फिरताना रुबाबाचा फिल येत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समिती सभापती, सभागृह नेता आणि प्रभाग समित्यांच्या सभापतींकडे असलेल्या जुन्या गाड्या बदलून नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौरांनीही आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्यांची हौस तत्काळ पूर्ण केली आहे.


नव्याने निवडून आलेल्या दहा पदाधिकाऱ्यांसाठी दहा नव्या गाड्या खरेदीचे फर्मान महापौरांनी काढले असून, त्यावर तब्बल पाऊण कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. विशेष म्हणजे स्थायी समिती सभापती आणि सभागृहनेत्यांसाठी ‘मारुती सियाझ’ ही महागडी कार खरेदी केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारच्या महासभेत ठेवण्यात आला असून, त्यात उपसभापतींसाठी वाहने खरेदीच्या धोरणात्मक विषयावरही चर्चा केली जाणार आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती डामडोल असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी गेल्या मह‌िन्यात चक्क ठेवी मोडाव्या लागल्या आहेत. चालू वर्षाच्या बजेटमध्ये भाडवली कामांसाठी केवळ १३० कोटींचा निधी शिल्लक असून, त्यातूनच शहर विकासाची कामे करायची आहेत. तर जीएसटीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी थेट बजेटमध्ये तरतूद करावी लागत आहे. अशा बिकट समयी पालिकेतील खर्चाला ब्रेक लावून काटकसरीचे धोरण सत्ताधाऱ्यांनी स्वीकारणे अपेक्षित आहे. परंतु, भाजपच्या धुरीणांनी पालिकेत सध्या नगरसेवकांचे पुनर्वसन करण्याची स्पर्धा सुरू केली आहे. पालिकेत विविध समित्या अस्तित्वात असताना शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन नव्या समित्या तयार केल्या आहेत.

स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, चार प्रभाग समिती सभापती, मह‌िला व बालकल्याण समिती सभापती यांच्याकडे सध्या जुनी वाहने आहेत. परंतु, या वाहनांचा रुबाब जनतेवर पडत नाही. त्यामुळे या सर्वांसाठी नवी वाहने खरेदी केली जात आहेत. स्थायी समिती सभापती व सभागृहनेत्यांसाठी मारुती सियाझ ही गाडी खरेदी केली जाणार आहे, तर उर्वरीत आठ जणांसाठी स्विफ्ट डिझायर ही कार खरेदी केली जाणार आहे. या सर्व वाहनांच्या खरेदीवर तब्बल ७४ लाख १ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

जुनी वाहने अधिकाऱ्यांना
सध्या सात पदाधिकाऱ्यांकडे पालिकेच्याच जुन्या गाड्या आहेत. परंतु, या गाड्यांचा वीट आल्याने नव्या गाड्या खरेदी केल्या जात आहेत. नव्या गाड्या पदाधिकाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर जुन्या गाड्या मात्र अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांकडे असलेल्या गाड्यांचे काय करणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे. वाहनखरेदीची लगीनघाई चर्चेचा विषय बनली आहे.

उपसभापतींनाही वाहने
घटनात्मकदृष्ट्या पालिकेतील विषय समित्यांच्या उपसभापतींना कोणतेही अधिकार नसतात. परंतु, अधिकार नसले तरी या उपसभापतींनाही वाहने पुरवण्याचा हट्ट सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाकडे धरला आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दार्जिलिंगमधील तणावाचा नाशिककरांना फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) सुरू केलेले आंदोलन आता चिघळत चालले असून, या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. या आंदोलनाचा फटका पर्यटकांना बसला असून, नाशिकमधील पर्यटक माघारी आले आहेत. या ठिकाणी विविध राज्यांतून आलेले किमान दहा हजारांवर यात्रेकरू अडकले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील एका पर्यटन व्यवसाय करणाऱ्या कंपनीने नाशिकहून पर्यटकांना नेले होते. मात्र, वातावरणातील अस्थिरतेमुळे अर्धे लोक परतले आहेत व अर्धे लोक परतीच्या मार्गावर आहेत. गंगटोकपासून सहल रद्द करावी लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकमधील पर्यटक स्वप्ना लिमये म्हणाल्या, की मुलांना सुटी असल्याने आम्ही शहरातील एका प्रथितयश ट्रॅव्हल कंपनीतर्फे बुकिंग केले. ठरल्या वेळेनुसार प्रवास व्यवस्थित सुरू झाला. नाशिकहून कोलकाता- जलपैगुडी- गंगटोक- दार्जिलिंग असा प्रवासाचा मार्ग होता. मात्र, गंगटोक येथे पोहोचल्यानंतर पुढे दंगलीचे वातावरण असल्याचे समजले. त्यामुळे गंगटोकपासून दार्जिलिंगपर्यंत जाता आले नाही. या ठिकाणी ट्रॅव्हल कंपनीतर्फे छोट्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, दंगलीचे वातावरण असल्याने दार्जिलिंगवरून येणाऱ्या गाड्या गंगटोककडे आल्याच नाहीत. त्यामुळे सर्वच पर्यटकांना माघारी फिरावे लागले. या ठिकाणी निदर्शक आणि पोलिसांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली, तर अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये या आंदोलनाच्या प्रमुखाशी संबंधित संकुलांमधून शस्त्रे हस्तगत करण्यात आली. त्याचप्रमाणे ऐन सुटीच्या मोसमांत हिंसाचार उसळल्याने त्याची झळ पर्यटन उद्योगालाही सहन करावी लागत आहे. गुरुवारीही आंदोलकांची निमलष्करी दलासमवेत चकमक झडली आणि तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांनीही दगडफेकीनेच त्याला प्रत्युत्तर दिले. आमच्याबरोबरच्या काही पर्यटकांनी कलिम्पाँग येथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका तासातच त्यांना माघारी यावे लागले. या आंदोलनाचे लोण पसरत असून, जलपैगुडीपर्यंत पोहोचले आहे. सुदैवाने आम्ही यातून बाहेर पडलो. मात्र, काही राज्यांचे प्रवासी आजही दार्जिलिंगमध्ये अडकले आहेत. अनेकांना जेवणाचे हाल आहेत. आम्हीसुद्धा हॉटेलमध्ये फक्त डाळभात खाऊन राहिलो. भारत सरकारने अडकलेल्या प्रवाशांसाठी कोलकत्याहून दिल्लीसाठी दोन विमानांची व्यवस्था केली होती. तरीही रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी आहे. लोक मिळेल त्या वाहनाने आपल्या सहली अर्धवट सोडून येत आहेत. सहलीचे पैसे वाया गेले, याचे दुःख नाही. जीव वाचला हे सर्वांत महत्त्वाचे आहे. आम्ही दिलेले पैसे तर परत मिळणार नाही, परंतु इतक्या लांब जाऊन केवळ दंगलीमुळे दार्जिलिंग पाहता आले नाही ही मोठी रुखरुख आहे.

नाशिकच्या ट्रॅव्हल कंपन्यांचे पर्यटक दार्जिलिंगमध्ये अडकले आहेत का, हे जाणून घेण्यासाठी ट्रॅव्हल असोसिएशनची नुकतीच बैठक झाली. ज्यांच्याकडून पर्यटक दार्जिलिंगला गेले होते, त्यातील काही पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत, तर काही शहरात पोहोचले आहेत. शहरातील सर्व पर्यटक सुखरूप आहेत.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर सफाई ठेक्यात मिलिभगत

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील ३७ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये साफसफाईचे ठेके दिले आहे. परंतु त्या प्रभागांमध्ये स्वच्छता होतांना दिसत नाही. तरीदेखील प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. सफाईच्या ठेक्यात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळेच प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच जळगाव फर्स्टतर्फे १८ जूनरोजी स्वच्छता महाअभियान सर्वेक्षण ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

साफसफाई करण्यासाठी २२ प्रभागांमध्ये सफाईचे ठेके दिले असून, १५ प्रभागांमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात. दरमहा जवळपास दीड कोटी रुपये खर्च करुनही स्वच्छता होतांना दिसत नाही. ठेके दिलेल्या प्रभागांमध्येच स्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यामुळे साफसफाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जळगाव फर्स्टतर्फे १८ जून रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहर स्वच्छता महाअभियान सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सहा भाग करण्यात आले असून व्हॉटस् अॅपवर तक्रारी नोंदविता येणार असल्याची माहिती डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिली. तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘स्मार्ट जळगाव’ अॅप तयार केले आहे. यावर तक्रारी करुनही निराकरण होत नाही. त्यामुळे अॅप कुचकामी असल्याचेही चौधरी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरी जीवनशैलीच्या ओझ्याखालचे ‘बैल मेलाय’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे मटा सन्मान नामांकनप्राप्त, आविष्कार मुंबईनिर्मित ‘बैल मेलाय’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी सादर करण्यात आला.

किशोर व संजीवनी हे निमशहरी भागातले इंजिनीअर झालेले एक तरुण जोडपे आहे. किशोर मूळचा कोल्हापूरचा, पण पुण्यात शिकलेला, तर संजीवनी पंढरपूरची; सोलापुरात शिक्षण घेतलेली. दोघांच्याही घरात शिक्षित अशी ही पहिलीच पिढी. मुंबईत जावे, चांगली नोकरी मिळवावी, मॉडर्न जगावे अशी दोघांची मनीषा. त्यामुळे मुंबईत नोकरी आणि स्थायिक होतात. ग्रामीण भागातून थेट मुंबईसारख्या महानगरीत आल्याने त्यांच्यात आपण गावंढळ असल्याचा न्यूनगंड असतोच. तो घालवण्यासाठी ते मुंबईची सो कॉल्ड ‘मॉडर्न’ जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. मॉडर्न होण्यासाठी मग बोलण्यात इंग्रजी शब्दांची पेरणी, सुटीच्या दिवशी मॉलमध्ये शॉपिंग, सिनेमा, हॉटेलिंग वगैरे गोष्टी करतात. उच्चभ्रू स्त्रिया दारू पितात. मॉडर्न व्हायचे तर दारू प्यावी, असे संजीवनीचे म्हणणे आहे. मात्र, किशोरला मात्र तिचे दारू पिणे मान्य नाही. संजीवनीने तिच्या बॉसबरोबर फ्लर्ट करणेही त्याला आवडत नाही. अशात एक भविष्यवेत्ता त्यांच्याकडे येतो. आधी ते त्याला आपला भविष्यावर विश्वास नाही म्हणून ते घालवून देतात; पण तो त्यांच्याशी गोड गोड बोलत त्यांच्या भविष्यासंबंधीची काही भाकिते वर्तवतो. त्याने त्यांची उत्सुकता चाळवते. बढती, पगारवाढ, आलिशान घर, हायफाय जीवनशैली, परदेशयोग, मुलेबाळे यासंबंधीची त्याची भाकिते ऐकून एकीकडे त्यांना बरेही वाटते आणि त्यातून त्यांच्यात भांडणेही लागतात. आपल्यापेक्षा संजीवनी वरचढ होणार म्हटल्यावर किशोरची पुरुषी वृत्ती डोके वर काढते. तो त्या भविष्यवेत्त्याला हाकलून देतो. तरीही तो पुन्हा पुन्हा येत राहतो. त्यांच्या आयुष्यात भविष्यात घडणाऱ्या घटना- घडामोडींबद्दल सांगत राहतो. भविष्यकथनाने ते कधी सुखावतात, तर कधी त्यांच्यात भांडणे होऊन ते परस्परांचा द्वेषही करतात. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे लेखन युगंधर देशपांडे यांचे, तर दिग्दर्शन ललित प्रभाकर यांचे आहे. नाटकात विकास पाटील, आरती वडगबाळकर व रोशन गुजर यांनी भूमिका साकारल्या. नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश बँकेची प्रथमच होणार निवडणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महेश को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक होत आहे. केवळ एका व्यक्तीच्या विरोधामुळे ही निवडणूक होत आहे. आतापर्यंत सर्व संचालक बिनविरोध निवडून जात असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक मानली जात आहे.

दहा जणांचे पॅनल विरुद्ध १ जण अशी ही लढत होत आहे. सत्तारूढ संचालकांमध्ये एकमत होऊ न शकल्यानेच ही निवडणूक लागली असल्याचे एकमेव विरोधी उमेदवार देवेंद्र भुतडा यांचे मत आहे. या संचालकांच्या हट्टामुळे बँकेचे २० ते २५ लाख रुपये विनाकारण निवडणुकीत खर्च होणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ठराविक सभासदांच्या फायद्यासाठी सामान्य सभासदांना जास्त टक्क्याने कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे सभासद असलेले तरुण उद्योजक नाइलाजाने इतर बँकांचा दरवाजा ठोठावत आहेत. आज बँकेला २० वर्षे पूर्ण झाली; परंतु बँकेला स्वत:चे एटीएम मशीन घेता आलेले नाही, तर नेट बँकिंग सुविधा कधी मिळणार? अशा अप्रगतशील संचालक मंडळाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी निवडणूक हाच पर्याय असल्याचे पत्रक भुतडा यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहुबली महापालिका

0
0

...म्हणे एका दिवसात उचलला ४६ टन प्लास्टिक कचरा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात प्लास्टिक पिशव्यांमुळेच बुधवारी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्याचा जावईशोध सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्यानंतर त्यावर पांघरून घालण्यासाठी आरोग्य विभागाने थेट अकलेचे तारे तोडले आहेत. बांधकाम विभागाची भविष्यवाणी खोटी ठरू नये, यासाठी नाले व पाइप लाइनवरील चेंबर्सवरून तब्बल ४६ टन प्लास्टिक कचरा गोळा केल्याचा अजब दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, या दाव्याला पुष्टी देणारा पुरावा मात्र आरोग्य विभागाला सादर करता न आल्याने कचरा गोळा केला, पण कुणी नाही पाहिला अशी स्थिती अनुभवयास आली आहे.

शहरात बुधवारी (१४ जून) झालेल्या दोन तास पावसाने अर्धे शहर जलमय झाले होते. या स्थितीला शहरातील प्लास्टिक कचरा आणि अतिपाऊस कारणीभूत असल्याचा जावईशोध महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी लावला होता. त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्यानंतर या दाव्याच्या पुष्टीसाठी बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाने नवी टूम सोडली. महापौर व आयुक्तांसमोर आपला दावा कमकुवत होऊ नये, यासाठी थेट प्लास्टिक कचऱ्याची आकडेवारीच फुगवण्यात आली. आरोग्य विभागाने एका दिवसात शहरातील नाले व पावसाळी गटार योजना आणि ड्रेनेज पाइपवर असलेल्या चेम्बर्सवरून तब्बल ४६.५० टन प्लास्टिक कचरा गोळा केल्याचा अजब दावा केला आहे. आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी त २५ कर्मचाऱ्यांनी एवढा प्लास्टिक कचरा गोळा केल्याची आवई उठवली आहे. संपूर्ण नाशिककरांच्या घरातून जरी प्लास्टिक पिशव्या जमा केल्यात तरी, एवढा कचरा गोळा होणार नाही. तरीही आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाने एका रात्रीत बाहुबली कामगिरी करीत महापालिकाच कशी नाशिकची तारणहार आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या दाव्याची पुष्टी करणारा पुरावा अधिकाऱ्यांकडे मागितल्यावर अधिकारीच निरुत्तर झाले. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले तर कुणी डोक्याला हात लावला. बांधकाम विभागाच्या मदतीसाठी धावलेल्या आरोग्य विभागाच्या या मिलीजुलीची चर्चा मात्र पालिकावर्तुळात रंगली आहे.

...तर एका एकरवर ढीग

एकाच दिवशी एवढा कचरा कसा गोळा केला असा उलट प्रश्न अधिकाऱ्यांना केल्यावर प्लास्टिक कचरा हा ओला असल्याने त्याचे वजन वाढल्याची नवी शक्कल त्यांनी लढवली. कचरा गोळा केल्याचे पुरावे मागितल्यावर कचरा खतप्रकल्पावर गेल्याचा दावा करण्यात आला. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या मते ४६ टन प्लास्टिक कचरा एका ठिकाणी साठवला तर एक एकरवर ढीग तयार झाला असता. परंतु, असा कोणताही ढिग खत प्रकल्पावर जमा झालेला नाही. केवळ एकमेकांना वाचवविण्याचा हा प्रयोग प्रशासनाच्या अंगलट येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामरोजगार सेवक वर्षभरापासून मानधनाविना

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रोजगार हमी योजनेत बेरोजगारांच्या रोजगारांची नोंदी ठेवणाऱ्या १०४५ ग्रामरोजगार सेवकांचे वर्षभराचे ६१ लाख ८३ हजार रुपये मानधन सरकारने न दिल्याने या सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दुपारी दोन वाजेपासून सुरू झालेले हे आंदोलन तब्बल तीन तास सुरू होते. आंदोलनाची तीव्रता बघताच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मध्यस्थी करून नागपूर येथील रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांची संपर्क साधला. त्यानंतर दोन दिवसांत मानधनाचे पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात सुरू झाले. उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण यांनी अगोदर आंदोलकांची समजूत घातली. मात्र, मानधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, २५ जूनपर्यंत पैसे न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.

गावपातळीवर रोजगार हमी योजनेतील रोजगारांची नोंदी ठेवण्यापासून त्यांचे मस्टर भरण्यापर्यंतचे काम हे सेवक मानधनावर करतात. त्यामुळे या सेवकांचे मानधन सरकारने वेळेवर देणे गरजेचे असताना त्यांना जुलै २०१६ पासून मानधन देणेच बंद केले. त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकांचा संताप होता. त्यांनी याअगोदर अनेक निवेदने दिली. त्यानंतर त्यांनी रोहयोमंत्री यांची भेट घेतली; पण त्याची दखल न घेतल्यामुळे त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलन करण्याचा निर्धार केला. आंदोलनात बाळासाहेब कदम, तुकाराम देशमुख, रमेश महाले, काशिनाथ गायकवाड, गुलाब चौधरी, दत्तात्रेय चव्हाण, अनिल बिचकुल, हट्टेसिंग धाडिवाल, विजय गायकवाड यांच्यासह ग्रामरोजगार सेवकांनी सहभाग घेतला.

कर्मचाऱ्याची कानउघडणी

रोजगार हमी योजनेत हे आंदोलन सुरू असताना उपजिल्हाधिकारी सुरेखा सोनवणे यांनी शिपायामार्फत संबंधित लिपिकाला माहिती घेऊन बोलावण्यास सांगितले. मात्र, लिपिकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला थारा न देता मग्रुरी दाखवत न जाणेच पसंत केल्यामुळे आंदोलकांचा पारा आणखीच वाढला. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याची चांगलीच कानउघडणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदाही अकरावी, बारावी प्रवेश ऑफलाइनच

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये इयत्ता ११ वी, १२ वीमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार होती. मात्र ऑनलाइन प्रक्रिया ही राज्यातील सहा जिल्ह्यांमध्येच सुरू आहे, त्यानुसार यंदाही जळगावसह जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइनच होणार असल्याचे शुक्रवारी झालेल्या बैठकीत नाशिक येथील सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद यांनी सांगितले.

शैक्षणिक सर्वच कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याने बऱ्याच शैक्षणिक संस्था ऑनलाइन सुरू होण्याची वाट पाहत होती. मात्र शुक्रवारी रोजी झालेल्या एम. जे. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियाबाबतच्या कार्यशाळेत ऑनलाइन प्रक्रियेत फक्त पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशी सहा शहरेच सध्या मोडत आहे. जळगावसह बाकी शहरामध्ये ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे सांगितले. बैठकीप्रसंगी व्यासपीठावर नाशिक येथील सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद, सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक ए. बी. बागुल, जि. प. उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर. एल. माळी, उपप्राचार्य पी. डी. भोळे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड उपस्थित होते.

प्रवेशासाठी मार्गदर्शन करावे

जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वाढीव प्रवेशासंदर्भात मंजुरी घेऊन जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन केंद्र उघडावे आणि तेथे प्रवेश संबंधी सर्व माहिती देण्यात यईल, तसेच प्रवेशाबाबत प्रत्येक फेरीनिहाय रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध करावे. क्षमतेपेक्षा जादा प्रवेश होतील तेथे प्राचार्यांनी किती विद्यार्थी जास्त आहेत याची यादी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून प्रवेशाची कार्यवाही करावी, विज्ञान शाखेसाठी ३५ टक्के गुण आवश्यक आहे. जातीच्या प्रमाणपत्रासाठी प्रवेश अर्ज नाकारू नयेत, अशा अनेक सूचना उपस्थित मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक यावेळी देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटचारीवर होणार पूल

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मागील आठवड्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने शहरात दाणादाण उडविली. काही भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होवून नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी शुक्रवारी काही भागांची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान, अंबरझरी पाटचारीवर दोन छोटे पूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करून जलसंपदा विभागाकडे सादर करण्याची तसेच सम्राट कॉलनी, एकनाथ नगरात गटारी बांधण्याची सूचना देखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली.

मनपा आयुक्तांनी मान्सूनपूर्व नालेसफाई करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी आणि प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार नालेसफाई झाल्याचा दावा करून अधिकाऱ्यांनी तसा अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नालेसफाईबाबत आणि स्वच्छतेबाबत साशंकता निर्माण झाली होती. दस्तुरखुद्द महापौर नितीन लढ्ढा आणि नगरसेवक कैलास सोनवणे यांनीही नालेसफाईबाबत आयुक्तांना पत्र देवून तक्रार केली होती. त्या अनुषंगाने शहरातील चारही प्रभांगामध्ये दोन दिवस अधिकाऱ्यांसह पाहणी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार कानळदा रोडवरील लक्ष्मीनगर, न्यू. बी. जे.मार्केट, सम्राट कॉलनी, रामेश्वर कॉलनी, एकनाथ नगरमधील अंबरझरा पाटचारी या भागात आयुक्त जीवन सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी प्रभारी शहर अभियंता सुनील भोळे, प्रभाग अधिकारी उदय पाटील, सुशील साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, अग्निशमन अधिकारी वसंत कोळी, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच. एम. खान यांच्यासह त्या-त्या भागातील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

भराव करण्याची सूचना

मुळसधार पावसामुळे लक्ष्मीनगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. सकल भाग असल्यामुळे या भागात भराव करण्याची सूचना आयुक्तांनी केली.

इस्ट‌मिेट तयार करण्याचे आदेश

सम्राट कॉलनीत पाणी साचत असल्यामुळे गटारीचे तत्काळ इस्टीमेट तयार करण्याचे आदेश आयुक्त जीवन सोनवणे यांनी बांधकाम विभागाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गम भागापर्यंत साधणार क्रीडाविकास

0
0

नाशिक जिल्ह्यात असलेली क्रीडाविषयक सर्व पेंडिंग कामे तातडीने निकाली काढून नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या क्रीडांगणांचा नाशिक महापालिकेच्या सहकार्याने विकास केला जाईल. ज्या दुर्गम भागात खेळाडूंपर्यंत सरकारी सुविधा पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी खेळाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी व्यक्त केला. क्रीडाविषयक संकल्पना त्यांनी ‘मटा’शी टॉकटाइमच्या माध्यमातून शेअर केल्या.

--

-शहराच्या दृष्टीने तुमच्या कोणत्या संकल्पना आहेत?

-माझा जन्म नाशिक जिल्ह्यातील पेठ येथेच झाला. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण नाशकातच झाले. गेली अनेक वर्षे कामानिमित्त बाहेरगावी होतो. ज्या शहराने मला खूप काही दिले, त्या शहरात जाऊन काही तरी ठोस करावे, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती आता फलद्रूप झाली आहे. अनेक संकल्पना आहेत. माझी नाशिकची कारकीर्द नाशिककरांना निश्चित काहीतरी वेगळे देऊन जाईल, अशी ग्वाही देतो.

--

-कोणत्या कामापासून सुरुवात करणार?

-नाशिक जिल्हा हा खेळाडूंची खाण आहे. शहराप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर आगामी ऑलिंपिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील एक तरी खेळाडू चमकेल, अशी आशा आहे. त्यासाठी टॅलेंट सर्च कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक तालुका क्रीडा संकुले तयार झाली असून, कार्यान्वित होण्यास अडचणी आल्या आहेत. अशा क्रीडा संकुलांच्या अडचणी तातडीने सोडवून खेळाडूंना ती उपलब्ध करून दिली जातील. जी क्रीडा संकुले बंद आहेत, त्या क्रीडा संकुलांच्या समितीची बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील. त्र्यंबकेश्वर येथे अॅडव्हेंचर स्पोर्ट सेंटरच्या कामाची माहिती घेऊन त्यालगत असलेले क्रीडा संकुल तातडीने कसे कार्यान्वित होईल, याकडे लक्ष दिले जाईल.

--

-खेळाडूंना अर्थिक मदत मिळवून देण्याबाबत...

-आदिवासी भागातील अनेक खेळाडूंचा खेळ चांगला असतो. त्यांना खेळाबरोबरच सकस आहाराचीदेखील आवश्यकता असते. केवळ पैशाअभावी ते आहार घेऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे स्पर्धेला जाण्यासाठी पैसेदेखील नसतात. अशा खेळाडूंना थेट अार्थिक साहाय्य कसे मिळेल, यासाठी जिल्हा नियोजन विभागातर्फे मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे काही खासगी कंपन्यांशी बोलून त्यांच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीमधून फंड देता येतील का, याविषयीदेखील चर्चा करणार आहोत. त्यामुळे अनेक खेळाडूंचे जीवनमान उंचावेल व नाशिक शहरातून कविता राऊतसारखे जास्तीत जास्त खेळाडू तयार होतील.

--

-बोगस क्रीडा संस्थांवर कारवाई करणार का?

-बोगस क्रीडा संस्था ही क्रीडा क्षेत्राला लागलेली कीड आहे. अनेक संस्थांनी विविध खेळांच्या एकापेक्षा अनेक संस्था उघडल्या आहेत. या संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर्ड केल्या जात असल्याने त्यावर आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही. मात्र, अशा संस्थांच्या कारभाराला बळी पडू नये यासाठी लवकरच क्रीडाशिक्षक व पालक यांचाशी चर्चा करण्यात येणार आहे. कोणत्याही संस्थेत प्रवेश घेताना ती संस्था मान्यताप्राप्त आहे की नाही, याची पालकांनी खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. काही शंका असल्यास आमच्या कार्यालयाकडून माहिती करून घ्यावी. अनेक संस्था पालकांना आपला मुलगा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळेल, असे खोटे अाश्वासन देतात. पालकांनी झटपट यशाच्या मागे न लागता अधिकृत संस्थेतर्फेच आपला पाल्य खेळेल याची दक्षता घ्यावी.

--

-शहराच्या बाबतीत काही योजना?

-नक्कीच आहेत. जिल्ह्याचा क्रीडाविकास साधताना शहराकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. नाशिक शहरात महापालिकेने आरक्षित केलेले अनेक भूखंड पडून आहेत, त्यावर काही होत नाही. कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड झाले आहेत. अशा भूखंडांवर केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत काम केले जाणार आहे. हे भूखंड स्थानिक नागरिकांच्या ताब्यात देऊन त्यांचा विकास केला जाणार आहे. याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन या उपक्रमाबाबत माहिती दिली जाणार आहे.

--

-शिवाजी स्टेडियमची दुरुस्ती होणार का?

-शिवाजी स्टेडियमचा काही भाग व्यावसायिकांनी खराब केला आहे. त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. याबाबत व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भिंतीवर तारेचे कुंपण टाकले जाणार आहे, ज्यामुळे ग्राउंडमध्ये कचरा होणार नाही.

--

-क्रीडा विभाग लोकाभिमुख होण्यासंदर्भात...

-राज्य सरकारच्या धोरणानुसार जास्तीत जास्त लोकांचा सहभाग क्रीडा विभागात कसा वाढेल, त्यात नागरिक सहभागी कसे होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक निर्णय घेताना त्या खेळाच्या तज्ज्ञांना बरोबर घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत. सध्या नवीन खेळ आले आहेत. ज्या खेळांना मान्यता आहे, अशाच खेळांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. जुन्या संस्थांच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष दिले जाईल.

शब्दांकन : फणिंद्र मंडलिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आम्हाला दिसतात बातम्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घर, ऑफिस, तसेच परिसरात आम्हाला आता अनेक बातम्या दिसू लागल्या आहेत. मटा सिटिझन रिपोर्टर या अॅपमुळेच हे शक्य झाले आहे. आम्ही पाठविलेल्या बातम्यांची तातडीने दखल घेतली जात असल्याने त्याचा मोठा आनंद होत आहे, अशी भावना मटा सिटिझन रिपोर्टर्सने व्यक्त केली.

दर आठवड्याप्रमाणेच यंदाही मटा सिटिझन रिपोर्टर्सला सन्मानित करण्यात आले. टाइम्स ग्रुपने मटा सिटिझन रिपोर्टर हे नावीन्यपूर्ण शस्त्रच सर्वसामान्यांच्या हाती दिले आहे. या अॅपद्वारे सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी, समस्या अगदी सहजच मांडता येतात. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप विनामूल्य उपलब्ध असून, ते नाशिकमध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहे. या अॅपद्वारे दररोज शेकडो नाशिककर त्यांच्या समस्या, अडचणी, तक्रारी पाठवतात. फोटोसह वृत्त पाठविण्याची, मराठीत लिहिण्याची, तसेच एकापेक्षा अधिक फोटो पाठविण्याची सुविधा त्यात उपलब्ध आहे. तसेच, प्रसिद्ध झालेले वृत्त ऑनलाइन पेजवर पाहण्याचा अनोखा पर्यायही आहे. या अॅपद्वारे पाठविलेल्या समस्या दररोज नाशिक प्लस या पुरवणीत

प्रसिद्ध केल्या जातात. या आठवड्याला सुयश देशमुख, नेहा वाघमारे, गिरीश पवार आणि भगवान महाले या सिटिझन रिपोर्टर्सना ‘मटा’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

--

अशोक स्तंभ परिसरातील कचऱ्याचा विषय मी पाठविला होता. त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि स्वच्छता झाली.

- सुयश देशमुख

बोरगड परिसरात मोबाइल नेटवर्कची मोठी समस्या आहे, याबाबतची समस्या मी पाठविली होती. या भागात नेटवर्क नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.- भगवान महाले

जेलरोडला आमच्या घराच्या परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता. अॅपद्वारे मी तो पाठविला. तो तत्काळ प्रसिद्ध झाला आणि कचरा उलण्यात आला. ‘मटा’चे आभार. - नेहा वाघमारे

त्र्यंबकरोडच्या दुरवस्थेची समस्या मी पाठविली होती. त्याची दखल घेऊन रस्ता सुधारण्यात आला. हे ‘मटा’चेच यश आहे. - गिरीश पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांवरील अतिक्रमणे रडारवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेसह शहरातील नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि बांधकामे झाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारच्या पावसाने त्याचा प्रत्यय आला. या पावसात शहराची दाणादाण उडाली होती. त्यामुळे पावसाळी गटार योजनेच्या उगमावर आणि नाल्यांवरील अतिक्रमणे आयुक्तांनी रडारवर घेतली आहेत. नैसर्गिक नाले मोकळे करण्यासह अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करून नाले नियमित प्रवाही करण्यासाठी पालिका मोठी मोहीम हाती घेणार असल्याचे संकेत आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या या अतिक्रमणविरोधी मोहिमेकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

शहरात बुधवारी दोन तासांत झालेल्या पावसामुळे अर्धे नाशिक जलमय झाले होते. पावसाळी गटार योजनाही कुचकामी ठरली होती. रस्त्यांवरच पाणी जमा झाल्याने ते नदीपात्रात जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. पावसाळी गटार योजनेच्या सुरुवातीच्या ठिकाणी आणि चेंबर्सवरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. नैसर्गिक नाल्यांवरही बिल्डरांनी अतिक्रमण करून थेट इमारतीच उभ्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी नाल्यांवरच झोपड्या उभ्या राहिल्याने वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीच्या दिशेने शहरातील पाणी वाहून नेणारे नालेच अतिक्रमणामुळे बंद झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शहरात बुधवारची स्थिती ओढवल्याचा निष्कर्ष आयुक्तांनी काढला आहे.

नैसर्गिक नाले, गटार योजनेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीमच आखण्याचे आदेश आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. नाल्यांवर कच्चे असो वा पक्के बांधकाम, ते जमीनदोस्त करून नाला प्रवाहित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नाला वळविण्यात आला असेल तो सरळ करून प्रवाह नियमित करण्याचे फर्मान काढले आहेत. झोपडपट्ट्यांसह हातगाडी, गाळे यांचेही अतिक्रमण तातडीने काढा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. शहरात पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही अतिक्रमण मोहीम राबवून नाले व गटार योजना अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेशच त्यांनी काढले आहेत.

नाल्यांवरच इमारती

शहरातील नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन तेथे टोलेजंग इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी इमारतींसाठी नाल्यांचाच मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नदीपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ही अतिक्रमणे रडारवर घ्यावीत, अशी मागणी नागरिकांसह नगरसेवकांकडून केली जात आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या कामांवर हातोडा चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांच्या ड्रेसचा प्रश्न मार्गी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेस, रेनकोट, गमबूटचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ड्रेस खरेदी अंतिम झाली असून, रेनकोट आणि गमबूटसाठी ठेकेदारांचे सॅम्पल टेस्टिंगसाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना महिनाभरात या तिन्ही वस्तू मिळणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सुविधांसाठी सुरू असलेला वनवास अखेर संपणार आहे.

महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना विविध सुविधांसह ड्रेस पालिकेकडून पुरविले जातात. महापालिकेत सध्या १७२४ सफाई कामगार, ३०९ स्वच्छता मुकादम, ३८ स्वच्छता निरीक्षक, १२ स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. या सर्वांना पावसाळ्याच्या तोंडावर आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिकेकडून अत्यावश्यक सुरक्षेच्या सुविधा दिल्या जातात. त्यात ड्रेस, रेनकोट, स्वेटर, गमबूट, मास्क व ग्लोव्हजचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना या सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली तयार केली असून, दर तीन वर्षांनी या सुविधा कर्मचाऱ्यांना नव्याने देणे अपेक्षित आहे. मात्र, पाच वर्षांपासून महापालिकेने या वस्तूंची खरेदीच केली नसल्याने कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळालेल्या नाहीत. या संदर्भातले वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्याची दखल घेत, कर्मचाऱ्यांना ड्रेससह रेनकोट, गमबूट उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांसह पालिकेतील जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना ड्रेस देण्यासाठी प्रक्रिया राबवली होती. मात्र, कधी रोख रक्कम, तर कधी कपडे देण्याचा प्रस्ताव महासभा आणि स्थायी समितीत फिरला. अखेरीस महासभेने ड्रेससाठी कापड देण्याचा प्रस्ताव पारित केला होता. त्यानंतर निविदाप्रक्रिया राबवण्यात आली. त्यात कर्मचाऱ्यांना शर्ट व पँट देण्याचा निर्णय झाला आहे. महिलांसाठी साडीचे सॅम्पल लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, लॅबमध्ये हे सॅम्पल फेल गेल्याने आता नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना ड्रेस आणि महिलांच्या साडीसाठी जवळपास एक कोटीचा खर्च येणार आहे. महिनाभरात सर्व कर्मचाऱ्यांच्या ड्रेस व साड्या मिळणार असल्याने ड्रेसचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गमबूट आणि रेनकोटचे सॅम्पल टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर तातडीने खरेदीचे आदेश दिले जाणार असून, महिनाभरात गमबूटसह रेनकोटही कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी कार्यालयास मिळेना जागा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची निवड केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत होऊन आता नऊ मह‌िने लोटले तरी, स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी अद्याप जागा सापडली नाही. प्रशासनाने कंपनीच्या कार्यालयासाठी महापालिकेतच जागा सुचवली होती. मात्र, अध्यक्षांनी त्याला नकार दिला आहे. पालिकेसारखाच कंपनीचा कारभार होण्याचा धोका असल्याने स्वतंत्र ठिकाणी कार्यालय असावे, अशी त्यांची इच्छा असल्याने प्रशासनाकडून तीन जागांवर अभ्यास सुरू आहे. येत्या २२ तारखेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला होता. नाशिकच्या निवडीनंतर स्मार्ट सिटीचा कारभार हाकण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे स्वतंत्र कार्यालय, तसेच कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी असणार आहेत. स्मार्ट सिटीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून, येत्या २२ रोजी चौथी बैठक होत आहे. या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कार्यालयावरही चर्चा केली जाणार आहे. प्रशासनाकडून महापालिकेच्या मुख्यालयातच जागा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू होती. परंतु, अध्यक्षांनी पालिकेच्या कामकाजाची सावली स्मार्ट सिटीच्या कामकाजावर पडू नये, अशी भूमिका घेतली आहे. कंपनीने अन्यत्र जागा शोधण्याचे फर्मान काढले आहे.
तीन जागांचा विचार
सध्या प्रशासनाकडून तीन जागांवर विचार सुरू आहे. यात गोल्फ क्लबच्या शेजारील पालिकेची जागा, दुसरी तारांगणाची तर पंड‌ित कॉलनीतल्या नाशिक पश्चिम कार्यालयाच्या इमारतीमधील जागा अशा तीन ठिकाणांचा विचार केला जात आहे. यापैकी एका जागेची निवड केली जाऊन तेथे कार्यालयाची उभारणी केली जाईल. त्यानंतरच स्मार्ट सिटीच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाले बुजले, शहर थिजले

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरात बुधवारी झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने सारेच रस्ते जलमय झाले होते. शहरातील सराफ बाजारासह एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल सिग्नल व त्र्यंबकेश्वररोडवर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने मोठे नुकसान होऊन वाहतुकीचा खेळखंडाेबा झाल्याने शहरच थिजल्याचे दिसून आले. पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक नाले व अन्य स्रोतच नाहिसे झाल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने असे नैसर्गिक स्रोत मोकळे करावेत, तसेच नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ अनेकांवर आली होती. त्यातच सखल भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्याचा त्रासही रहिवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले स्रोत गेले कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नैसर्गिक नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे केली गेल्याने नालेच गायब झाले आहेत. साहजिकच यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येत असल्याची स्थिती दिसून येत आहे.

पाइपलाइनमध्ये ‘हरवला’ नैसर्गिक नाला

शहरातील अनेक ठिकाणचे नैसर्गिक स्रोत गायब झाले आहेत. एबीबी सर्कलला लागून असलेला नैसर्गिक नालाही दिसेनासा झाला आहे. एकीकडे नैसर्गिक नाला मोठा असल्याचे दिसते. परंतु, दुसऱ्या बाजूला १० इंची पाइपलाइनमध्ये नालाच गायब झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे साहजिकच पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच नसल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होत आहे. सिटी सेंटर मॉलजवळ व त्र्यंबकेश्वररोडवर पाणी वाहून जाण्याची सुविधाच नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ अनेकांवर आली. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने पावसाळी नाले केले. परंतु, त्यात पाणी वाहून जाण्याची योग्य सुविधा करण्यात आलेली नाही. त्यातच नैसर्गिक नालेही अनेक ठिकाणी बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी रस्त्यांवर साचत असून, यावर उपाय करावेत.

-उमेश पवार, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्तेश्वर’च्या नशिबी अद्याप वनवासच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रभू रामचंद्रांनी पिता दशरथ यांचा दशक्रियाविधी रामगया कुंडावर केल्याने या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच रामकुंडाच्या अवतीभवती एकूण २४ कुंड असून, त्यांनाही तितकेच महत्त्व आहे. पैकी रोकडोबा मंदिराच्या समोरील मुक्तेश्वर नामक कुंडदेखील अत्यंत पवित्र स्थान असून, ते दुर्लक्षित राह‌िले आहे. अद्याप या कुंडाच्या नशिबी वनवासच असून, या कुंडाला कधी कीर्ती लाभणार या प्रतिक्षेत भाविक आहेत.
मुक्तेश्वर कुंड मोरेश्वर विनायक दीक्षित यांनी १७८८ मध्ये बांधलेले आहे. त्यानंतर १८२८ मध्ये त्यांच्या चिरंज‌ीवांनी याचे महात्म्य वाढविण्याचा प्रयत्न केला. या कुंडामध्ये कोटीतीर्थ व मेघातीर्थ येते. गोदावरी नदीच्या तीरावर अनेक प्राचीन कुंड आहेत. पैकी रामकुंड, लक्ष्मणकुंड हे सर्वांनाच परिचित आहे. सध्या गोदेच्या काठावर होत असलेले दशक्रिया विधी कार्यक्रम अस्थ‌िविसर्जनासाठी अर्थात पूर्णत्वाच्या कार्यभागासाठी रामकुंडातच येतात. लक्ष्मणकुंडाचाही महिमा याचप्रमाणे आहे. या कुंडांबरोबच प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचे श्राध्द केले ते रामगया कुंडदेखील नारोशंकर मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे. याच कुंडांच्या जोडीचे अत्यंत महत्त्वाचे असलेले कुंड म्हणजे मुक्तेश्वर. या ठिकाणी पूजा अर्चना केल्याने पितरांना मुक्ती लाभते अशी आख्यायिका आहे. परंतु, या कुंडाची माहितीच कुणाला नसल्याने येथपर्यंत कुणीही पोहोचत नाही. त्यामुळे ते कीर्तिपासून वंचित राह‌िले आहे.
कुरूक्षेत्र विश्व विद्यालयाचे इतिहास संशोधन व पुरातत्त्व विभागाचे अध्यक्ष डॉ. हरी अनंत फडके हे नाशिकस्थित झाले असता २००३ मध्ये त्यांनी एक अभिनव कल्पना मांडली होती. गोदावरीचा मूळ उगम आणि गोदावरीच्या त‌िरावरील प्राचीन त‌िर्थांची स्थान निश्चिती करण्याची ही कल्पना होती. अवघा पन्नास हजार रुपये खर्च होता. परंतु, संबंधितांनी नकार दिल्याने ही कल्पना मूर्त रूपात येऊ शकली नाही. ही स्थाननिश्चिती नसल्याने अनेक कुंड अद्याप दुर्लक्ष‌ित राहिलेले आहेत.

मुक्तेश्वर कुंडाची एक विशेषता म्हणजे त्याची स्थाननिश्चिती आहे. या ठिकाणी प्रदोष असताना पूजाही केली जाते. परंतु, अशी पूजा नित्य व्हावी अशी अपेक्षा आहे. या कुंडाचे पुनरूज्जीवन झाल्यास अधिक उत्तम.
-देवेन्द्रनाथ पंड्या,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गानतंत्र’साठी आज अखेरची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ल्ड म्युझिक डे (दि. २१ जून)निमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गानतंत्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज, शनिवारी (दि. १७) रात्री ११ वाजेपर्यंत आपले गाणे ई-मेलद्वारे पाठविण्याची शेवटची संधी आहे.

ही स्पर्धा आहे वाचकांमधील गायकांसाठी. तुम्ही बाथरूम सिंगर असाल किंवा गृहिणी... गाणं हे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच मनात येत असते. कुणी गुणगुणते, तर कुणी कट्ट्यावरच्या मित्रांमध्ये ही हौस भागवते. ‘गानतंत्र’च्या निमित्ताने तुमच्यातील गायकाला सर्वांसमोर आणण्याची ही नामी संधी आहे.

आपल्याकडील सांग‌ीतिक वारशाला अभिवादन हा तर या स्पर्धेमागचा हेतू आहेच; त्याशिवायही आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उद्देश यामागे आहे. आपला आवाज उत्तम असूनही आपल्याला केवळ चांगले व्यासपीठ न मिळाल्यामुळे आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, अशी खंत वाटणाऱ्या सर्वांसाठी ‘गानतंत्र’ ही स्पर्धा आहे.

आपला आवाज मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचावा आणि उत्तमोत्तम तज्ज्ञांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळावे, अशी इच्छा असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी स्वतःच्या आवाजातील एकच गाणे रेकॉर्ड करून mtgaantantra.nsk@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ई-मेलवर ध्वनिमुद्रण पाठवण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ध्वनिमुद्रण एमपी ३ व एमपी ४ या फॉर्ममध्येच असावे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २० गायकांना १९ जून रोजी स्टुड‌िओत गाण्याची संधी मिळणार आहे. त्यातून निवडलेल्या १० स्पर्धकांना २१ जून रोजी होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे रेड‌िओ मिर्ची हे म्युझिक पार्टनर आहेत. स्पर्धेचे परीक्षण प्रथितयश गायक आणि गायिका करणार आहेत. यातील विजेत्या गायकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या गाण्यासाठी भाषेचे बंधन नाही. दरम्यान, ‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लब सभासदत्वाचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा नव्याने सभासद होण्याची संधीही उपलब्ध आहे.

--

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येयासक्त अभ्यासाने यश

0
0

दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविताना अभ्यासात सातत्य असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेत मिळविण्याच्या गुणांचे टार्गेट कायम समोर ठेवून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते, असे मत नाशिकच्या स्कॉलर्सनी महाराष्ट्र टाइम्स आयोजित राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये व्यक्त केले. दहावी, बारावी आणि जेईई या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या. अभ्यासाचे वेळापत्रक कसे आखले, फोकस कायम राखण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले, तसेच त्यांच्या ध्येयप्राप्तीचे रहस्य काय, हे या चर्चेतून जाणून घेण्यात आले.

--


काठीण्यपातळी जाणून केला अभ्यास

सुरुवातीपासून अभ्यास केला, तर कुठल्याही क्षेत्रातला अभ्यास अवघड वाटत नाही. मी सुरुवातीला तीन ते चार तास अभ्यास करायचो. त्यानंतर रोज आठ ते दहा तास अभ्यासाला सुरुवात केली. खरे तर अभ्यास रोज केला पाहिजे. परीक्षा आली म्हणून अभ्यास करणेे योग्य नाही. आपल्या मेंदूमध्ये आपण एकाच वेळी पाच गोष्टी लक्षात ठेवू शकतो किंवा त्याबद्दल आकलन करू शकतो. मी माझ्या अभ्यासाच्या वेळी हेच तत्त्व समोर ठेवून अभ्यास केला. त्यामुळे आज मी हे यश संपादन करू शकलो. जेईई मेन्सनंतर पुढील परीक्षेत यश मिळविणेे अवघड होते. परीक्षेेची काठीण्यपातळी अधिक असल्याने त्यासाठी सतत अभ्यास करणेे आणि मेहनत घेणेे याला पर्याय नाही, हे ओळखून अभ्यास केला. मला मित्रांचीही खूप मदत झाली.

- निखिल चव्हाणके (जेईई अॅडव्हान्स)

--


मेहनत घेतल्यास यशप्राप्ती नक्की

परीक्षेवेळी अभ्यास करण्यापेक्षा रोजरोजचा रोज अभ्यास कधीही सोयीस्कर असतो. सात दिवस एखादा टॉपिक सतत वाचल्यास व महिनाभराने त्याचा पुन्हा सराव केल्यास तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. दिवसभर अभ्यास करताना काही वेळ ब्रेक घेणे खूप महत्त्वाचे आहे. या ब्रेकमध्ये मेडिटेशन, व्यायाम आणि अवांतर वाचन या गोष्टी करायला हव्यात. त्यामुळे आपल्यातली तल्लखता जोपासायला मदत होते, तसेच आपली ब्रेन पॉवर आणखी बळकट होते. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते कायम आपल्यासमोर असायला हवे, यासाठी एक चार्ट आपल्या स्टडी बोर्डसमोर असावा. अभ्यास करताना स्वतःच्या नोट्स काढणे, तसेच आपल्याला लक्षात राहतील या स्वरूपात सूत्र, पॉइंट्सची आखणी करून घ्यावी. मी सर्वाधिक भर सॅम्पल पेपर सोडविण्यावर दिला. त्यातून मी कुठे कमी पडत आहे, हे समजत होते. - तन्वी चव्हाण (दहावी, ९९.४० टक्के, एसएससी बोर्ड)

--


वेळच्या वेळी अभ्यास गरजेचा

शाळेत जे काही शिकविले त्या थिअरी मी रोजच्या रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे वाचायचो. रोजचा अभ्यास वेळच्या वेळी केल्याने अभ्यासाचा जास्त ताण माझ्यावर कधीच आला नाही. मी कायम क्वॉलिटी स्टडीला प्राधान्य द्यायचो. थोडा वेळ अभ्यास करा, पण तो असा करा की कायमस्वरूपी लक्षात राहील. अभ्यासाच्या वेळी आपला स्वतःवर ताबा असायला हवा. आपले मन इतर कुठेतरी भरकट असताना अभ्यासाचे पुस्तक वाचणे गैर आहे. अभ्यासावेळी शांत चित्ताने सराव करणेच महत्त्वाचे आहे. दहवीच्या पूर्वपरीक्षेला मी अभ्यास न करता जायचो. मला जे काही येत आहे, ते लिहून घरी आल्यावर जे अवघड वाटले त्याचा सराव करायचो. आपण कायम स्वतःचे परीक्षण करायला हवे. त्यामुळे चूक सुधारण्याची संधी मिळते. परीक्षा कोणत्याही स्वरूपाची असली, तरी त्याकडे परीक्षा म्हणूनच बघायला हवे.

- राहुल डालकरी (दहावी, ९८ टक्के, आयसीएसई बोर्ड)

--


अभ्यासाबाबत मुलांवर बंधन नको

मी कधीही माझ्या मुलीवर अभ्यासासाठी दबाव टाकला नाही. मुलांना सततच्या अभ्यासानंतर थोडा विरंगुळाही आवश्यक असतो. बोर्डाची परीक्षा आहे त्यामुळे तू सतत अभ्यास करायला पाहिजे, अशा प्रकारचा दबाव मी कधीच तिच्यावर टाकला नाही. मुलांना त्यांच्या कलेने अभ्यास करू द्यावा. माझी मुलगी तर गाणेे एेकत गणिते सोडवायची. त्यामुळे मुलांवर अभ्यास करताना बंधन घालणेे योग्य नाही. परीक्षेेच्या शेवटी दोन महिने अनेक तास अभ्यास करण्यापेक्षा दररोज दोन तास पूर्ण एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाचा फायदा होतो. मुख्य म्हणजे मुले अभ्यास करीत असताना घरातील वातावरणदेखील प्रसन्न असावे लागते. शेवटी मुलांनी घेतलेली मेहनतच त्यांना उपयोगी पडते. मात्र, त्यासाठी पालकांनी त्यांना प्रेरित करणे गरजेचे ठरते.

- अविनाश चव्हाण, पालक

--


अभ्यासाच्या प्लॅनिंगसाठी पालकांनी घ्यावा पुढाकार

विद्यार्थ्यांनी कायम फोकस असायला हवे. पालकांनी विद्यार्थ्यांना सतत अभ्यास कर, असे सांगणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवाच. पण, त्यासोबतच खेळ, व्यायाम करीत आपले छंद जोपासायला हवे. पालकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीचे प्लॅनिंग करून द्यायला हवे. कोणत्याही गोष्टी प्लॅनिंग नसेल, तर कधीच साध्य करता येत नाहीत. विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच एकाग्रचित्ताने अभ्यास केल्यास परीक्षेच्या अगोदर सराव केला नाही, तरी ते चांगले गुण प्राप्त करू शकतात. मात्र, त्यासाठी सततचा सराव असणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमाचे व्यवस्थित विभाजन नंतर सराव केल्यास चांगले यश मिळविणे अगदी सोपे आहे.

- ज्ञानेश्वर डालकरी, पालक

--


लक्षवेधी मुद्दे ...

➤ पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर वाचन महत्त्वाचे.

➤ नियोजनबद्ध अभ्यासासाठी सुरुवातीपासूनच अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे.

➤ रोजचा रोज अभ्यास करून रविवारी महिन्याच्या शेवटी सराव करावा.

➤ सेल्फ स्टडी व सेल्फ नोट्सवर भर द्यावा.

➤ सराव पेपर सोडवून आपण कुठे कमी पडत आहोत याचे परीक्षण करावे.

➤ विषय शिक्षकांकडून अडलेले टॉपिक, थिअरी समजून घ्याव्यात.

➤ आपल्याला समजेल अशा बोलीभाषेत किंवा कथेच्या रूपात नोट्स काढाव्यात.

➤ अभ्यासासोबतच रोज व्यायाम, मेडिटेशन, छंद जोपासणेही महत्त्वाचे आहे.

➤ आत्मविश्वास, आत्मपरीक्षण, चिकाटी, मेहनत, फोकस, पालकांचा विश्वास हेच यशप्राप्तीचे गमक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त अधिकाऱ्यांशी मद्यधुंद एजंटची हुज्जत

0
0


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातील परिवहन अधिकाऱ्यांशी मद्यधुंद एजंटनी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान परिवहन अधिकारी यांनी एजंटसह दलालांना कार्यालयाबाहेर काढून प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने काही वेळासाठी आवारात गोंधळ निर्माण झाला होता.

आरटीओ कार्यालयात दलालाचा वावर पुन्हा वाढला आहे. दलाल ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी देखील अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी गणेश नामक एजंटने मद्यधुंद अवस्थेत परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात हुज्जत घातली. यावेळी परिवहन अधिकारी पाटील यांनी त्या एजंटला बाहेर जाण्यास सांगितले असता, त्याने पाटील यांना शिवीगाळ केली. दरम्यान परिवहन अधिकाऱ्यांनी एजंटसह सर्व दलालांना कार्यालयबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वार बंद केले. या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

अधिक पैसे घेतात..

पाटील यांनी दलाल ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अधिक पैसे घेतात. तसेच परिवहन कार्यालयात दलालांचा वावर वाढत असल्याने वाहन चालविण्याची चाचणी घेण्यासाठी अडचणी येत असल्याने सर्व अधिकृत एजंट व दलाला कार्याबाहेर जाण्यास सांगितले आहे.

दलालांपासून सावध रहा

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी दलाल जास्त पैसे घेतात अशा तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी ड्राईव्हिंग स्कूल व महाऑनलाईनवरून फार्म भरावे तसेच दलालांपासून सावध राहावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images