Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

द्वारकासाठी पर्यायांची चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शनिवारी सदर ठिकाणी पाहणी केली. लवकरच नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाचे (न्हाई) अधिकाऱ्यांसमवेत वाहतूक पोलिस या संबंधी चर्चा करणार असून, आठ ते दहा दिवसांत नवीन पद्धतीने वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
द्वारका येथील सबवेचा वापर होत नाही. त्यामुळे पुढील अनिश्चित काळापर्यंत द्वारका सबवेला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टाळे ठोकले. तत्पूर्वी येथील व्यावसायिकांना रस्त्यावर पार्क होणाऱ्या वाहनांबाबत नोटिसादेखील बजावण्यात आल्या होत्या. सर्व्हिस रोडचा वापर करीत द्वारका सर्कलचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी करून पाहिला. मात्र, त्यालाही यश मिळाले नाही. उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर द्वारका सर्कल येथील वाहतुकीचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना राबवण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळालेले नाही. हायवे सर्व्हिसरोडसह छोटे मोठे मिळून १२ ते १२ रस्ते द्वारका सर्कल येथे मिळतात. वाहनांना फिरण्यासाठी पुरेसे ‘टर्निंग रेड‌यिस’ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक प्रश्न बिकट बनतो. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले की, द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपायांची गरज आहे. मात्र, तेथे काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी दूर होणे अशक्य असल्याने उपलब्ध पर्यांयांची सातत्याने चाचपणी केली जाते. सध्या, आम्ही या ठिकाणी पाहणी करून द्वारका सर्कलचा वापर बंद करण्याचे नियोजन असल्याचे सिंगल म्हणाले.
असा आहे पर्याय
नाशिककडून नाशिकरोडकडे जाणारी वाहने हायवेने थेट औरंगाबादरोडच्या दिशेने पुढे न्यायची. तसेच जिथे टर्निंग रेड‌यिस मिळेल तेथून ती पुन्हा वळवायची. यामुळे द्वारका सर्कलवरील वाहने एकमेकांना क्रॉस होणार नाही. नाशिकरोडकडून येणारी वाहने आणि हायवेवरून शहराकडे येणाऱ्या वाहनांचा देखील विचार करण्यात येतो आहे. ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा सुरू असून, सात ते आठ दिवसांत काही ठिकाणी किरकोळ बदल केले जातील.

प्रायोग‌कि तत्त्वावर हा बदल आहे. यासंबंधी काही बैठका झाल्या असून, शनिवारी सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दपर्यायी रस्त्यांचा वापर योग्य झाल्यास भविष्यात याच पध्दतीने वाहतूक नियंत्र‌ति केली जाईल.- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रेनेज चोकअपची डोकेदुखी

$
0
0

सातपूरला चेंबरमध्ये दारूच्या बाटल्या; प्लास्टिक कचऱ्याने कर्मचारी हैराण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात महापालिकेने सांडपाणी वाहून जाण्याकरीता ड्रेनेजची व्यवस्था उभारली आहे. परंतु, वाढलेल्या घरकुलांमुळे ड्रेनेज चोकअपची समस्या ही मोठी डोकेदुखी बनली आहे. त्यातच सांडपाणी वाहून जाणाऱ्या लाइनीत नको त्या वस्तू टाकल्या जात असल्याने ड्रेनेज सतत चोकअप होत असतात.

महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या स्वारबाबा नगर व काळे नगरच्या मध्यभागी ड्रेनेजच्या चेंबरमध्ये दारूच्या शेकडो बॉटल कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. सांडपाणी वाहून जाणाऱ्या ड्रेनेजमध्ये अशाप्रकारे घाण, कचरा टाकणे चुकीचे आहे. नेहमीच ड्रेनेजच्या समस्या सातपूर भागात वाढल्याने कर्मचारीही परेशान झाले आहेत. नागरिकांनीदेखील सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये घाण, कचरा टाकू नये, असे आवाहन ड्रेनेज विभागाने केले आहे.

पहिल्याच जोरदार पावसात नाशिककरांची दैना केली होती. सांडपाण्याच्या लाइनीदेखील अनेक ठिकाणी ओव्हरफ्लो झाल्याने चेंबरमधून पाणी रस्त्यावर वाहत होते. वाढत्या लोकवस्तीत महापालिकेने ठिकठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु, अनेक भागात ड्रेनेजच्या वस्तू टाकल्या जात असल्याने ड्रेनेज चोकअपची समस्या वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदारांना पीओएस मशिनचे वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील रेशन दुकानांचा काळाबाजार रोखण्यासाठी सर्वच दुकानांमध्ये पीओएस मशिन बसविण्यात येत आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांसाठीही पीओएस मशीन उपलब्ध झाले असून धुळे तालुक्यासह शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील रेशन दुकानदारांना हे मशिन वाटप करण्यात आले आहेत.

जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकान धारकांना पीओएस मशीन वितरित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरुडे, प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल मोरे, संदीप भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या वेळी रेशन दुकानधारकांनी पीओएस मशिनचा वापर कसा करावा, याविषयी ध्वनिफितीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

धुळे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील ५५ हजार लाभार्थी सदस्यांनी आपले आधार क्रमांक सादर केलेले नाहीत. त्यांना आधार सादर करण्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर जर आधार क्रमांक शिधापत्रिकेची जोडला गेला नाही तर लाभार्थ्यांना स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर गिरवणार मॅनेजमेंटचे धडे

$
0
0

नाशिक ः एरवी, स्टेथोस्कोप हाती घेऊन रुग्णांच्या हृदयाचे ठोके मोजणारे डॉक्टर्स आता नव्याने व्यावसायिक वर्तुळात पाऊल टाकण्याअगोदर व्यवस्थापनशास्त्राचे धडेही गिरविणार आहेत. गेल्या वर्षी पदवीदान सोहळ्यात विद्यापीठाने घोषित केलेले तीन नवे अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत. यात ‘एमबीए इन हेल्थकेअर अॅडमिन‌िस्ट्रेशन’ या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

सन २०१६ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नवीन तीन अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. यंदा २०१७-२०१८ पासून ‘मास्टर ऑफ बिझनेस अडमिन‌िस्ट्रेशन इन हेल्थकेअर’ ‘मास्टर ऑफ पब्ल‌िक हेल्थ’ (न्युट्र‌िशन) आणि ‘मास्टर ऑफ सायन्स इन फार्मा मेडिस‌िन्स’ या तीन नव्या अभ्यासक्रमांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.

‘हेल्थकेअर’ या क्षेत्राकडे वेगाने विस्तारणारे सेवाक्षेत्र म्हणून बघितले जात आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकावरचे हे सेवा क्षेत्र आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या विपणण पध्दतींमुळे या क्षेत्राची वेगवान प्रगती होत असल्याचे आरोग्य विद्यापीठाच्या एका अहवालात म्हटले आहे. तर हेल्थकेअर विभागासाठी व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने या अहवालात म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छ‌िणाऱ्या युवकांसाठी या विषयातील एमबीए हा चांगला पर्याय या अभ्यसाक्रमाच्या निमित्ताने समोर आला आहे. विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयासह पुणे आणि ठाणे येथील विभागीय केंद्रांच्या हद्दीत हा अभ्यासक्रम चालविला जाईल. या अभ्यसक्रमासाठी एकूण ९० जागा उपलब्ध आहेत. आरोग्य विज्ञान विषयातील पदवीधरांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएएएलपी हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए इन हेल्थकेअरसाठी प्रवेश घेता येणार आहे. याशिवाय बीएससी नर्सिंगच्या पात्रतेनंतरही प्रवेश देण्यात येतील.

यातील ‘मास्टर्स इन पब्ल‌िक हेल्थ (न्युट्र‌िशन)’ हा दोन वर्षीय अभ्यासक्रम केवळ पुण्यातील केंद्रात चालविला जाईल. ‘युनिसेफ’ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यापीठासोबत या विषयाचा अभ्यासक्रम बनविला आहे. तर मास्टर्स इन सायन्स (फार्मा मेडिस‌िन्स) मध्ये औषधनिर्माण शास्त्र विषयातील शोध, विकास, मूल्यमापन, नोंदणी नियंत्रण आदी कंगोरे अभ्यासले जाणार आहेत.


प्रवेशाचे वेळापत्रक

- ऑनलाइन अर्जाची मुदत : ३० जून

- हार्ड कॉपी जमा करणे : ७ जुलै

- अर्जांची छाननी : १० ते १५ जुलै

- सीईटीसाठी प्रवेशपत्र : १७ ते २१ जुलै

- सीईटी परीक्षा : ३० जुलै सकाळी ११ वाजता

- गुणवत्ता यादी प्रकाशन : १० ऑगस्ट

- समुपदेशन आणि प्रवेश : १८ ते २२ ऑगस्ट

- अभ्यासक्रमासाठी रिपोर्टिंग : २८ ऑगस्ट

- वर्गांना सुरुवात : १ सप्टेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंच्या दौऱ्यामुळे आंदोलनाला येणार धार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतर थंडावलेल्या शेतकरी आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याने पुन्हा धार येणार आहे.

पुणतांब्याच्या सुकाणू समितीने राज्य सरकारशी परस्परबोलणी करून निर्णय घेतल्यानंतर आंदोलनाचे केंद्र नाशिक झाले होते. शेतकऱ्यांचे हे आंदोलन फसले असे वाटत असतानाच नाशिकच्या शेतकऱ्यांनी त्यात जीव ओतत आंदोलनाला निर्णायक स्थितीत नेले. मात्र, सरकारने केलेल्या घोषणेनंतर आता शेतकऱ्यांची घुसमट स्पष्ट समोर येऊ लागली आहे. निफाडला रविवारी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी करून संघर्ष स्पष्ट केला, तर दहा हजारांच्या कर्जावर सरकारने लादलेल्या निकषाचीही सर्वांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या २५ जून रोजीच्या दौऱ्यामुळे थंड झालेले हे आंदोलन पुन्हा उचल खाणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा असला तरी शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी या दौऱ्यातून समोर येणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

निफाडमध्ये भाकरीपेक्षा भोकरच जड म्हणत शेतकऱ्यांनी जिल्हाभर कर्ज निकषावर जागृती करण्याची घोषणा केली आहे. दहा हजारांचे कर्जही सरकारला तत्काळ देता आले नाही. या कर्जासाठी लावलेल्या निकषामुळे अवघ्या २० हजार शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे शेतकरी सांगत असून, प्रत्यक्ष कर्जमाफी मिळणेही या हंगामात अवघड असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे सरकारचे निकष व पवित्रा कर्जमाफी न मिळून देणे असाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घुसमट झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा पिंपळगाव, निफाड, येवला येथून आहे. या भागातील शेतकरी अगोदरच संतापले आहेत. त्यामुळे त्यांच्या थंड आंदोलनाला आता ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे धार येणार आहे.

‘समृद्धी’बाधिता शेतकऱ्यांचाही संताप

एकीकडे कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचा रोष आहे, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेले शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे या दौऱ्यात उद्धव ठाकरे कोपरगाव येथे या शेतकऱ्यांनासुद्धा भेटणार आहे. त्यातही शेतकऱ्यांचा सरकारविरोधात असलेला संताप पुन्हा समोर येणार असून, त्याला शिवसेनेची साथ मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरेंचा नाशिक ते पुणतांबा दौरा

नाशिक ः शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ जून रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी मार्गातील बाधित शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. नाशिक ते पुणतांबा असा हा दौरा असून, सकाळी नऊ वाजता त्यांचे ओझर विमानतळ येथे आगमन होणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे यांचा हा जिल्हा दौरा आहे. ठाकरे यांचे सकाळी ९ वाजता ओझर विमानतळावर आगमन, १० वाजता पिंपळगाव बसवंत, १०.४५ निफाड, ११.३० वाजता नैताळे, १२.४५ वाजता विंचूर, १ वाजता येवला, १.४५ पिंपळगाव नाका, २.३० कोपरगाव (जंगली महाराज आश्रमाजवळ समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची भेट), २.४५ वाजता शिर्डी (भोजन), ४ वाजता पुणतांबा, ५.३० वाजता संभाजीनगरकडे प्रयाण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुगंधाने दरवळली रमजानची बाजारपेठ!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

रमजान महिन्यात शहरातील अत्तर बाजारात रोजेदारांना नमाजीआधी शरीराला लावण्यासाठी अत्तर व डोळ्यांत घालण्यासाठी सुरमा लागत असतो. रमजान महिन्यामुळे या साहित्याच्या विक्रीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. जुन्या नाशकातील दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अत्तरे व सुरमा खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने विक्रेत्यांमध्येही उत्साह आहे.
बाजारात शेकडो प्रकारची अत्तरे ग्राहकांच्या बजेटनुसार उपलब्ध आहेत. याशिवाय आकर्षक अशा बाटल्यांमध्ये हे अत्तर असल्याने ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. जुन्या नाशिक भागातील चौक मंडई येथील विक्रेत्यांनी सांगितले की, शहरात मद्रास, हैदराबाद, मुंबई, सौदी अरेबिया आदी भागांतून अत्तर विक्रीसाठी आणण्यात येते. यामध्ये मजमुआ, व्हाईट ऊद, देहनूल ऊद, जन्नतूल फिरदौस, फसली गुलाब या प्रकारच्या अत्तरांची जास्त मागणी आहे.
इस्लाम धर्मानुसार अल्लाह तालाच्या आदेशानुसार पवित्र नमाज अदा करताना आपल्या डोळ्यांमध्ये सुरमा लावण्याबाबत सांगण्यात आले आहे. या सुरमाचेदेखील नाशिकमध्ये साधारण १५ ते २० प्रकार उपलब्ध आहेत. सिन्नर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांसह परराज्यांमधून व अरब राष्ट्रांमधूनदेखील सुरमा विक्रीसाठी आणला जातो.

सुरम्याचे प्रकार
९, १३, २४ असे नंबर असलेल्या सुरम्यांसह खोजाती, अस्माह साधा, ममेरा, उत्तम ब्लॅक, खास व्हाइट, रेड स्मिथ, डिलक्स असे प्रकार उपलब्ध आहेत. सध्या बदामाचे तेल मिक्स असलेला सुरमा अधिक पसंत केला जात आहे. महिलांमध्ये मुमताज, डिलक्स, कामत आदी सुरमा प्रसिद्ध आहे.
या अत्तरांना मागणी
हीना, रुहे गुलाब, मोगरा, चार्ली, फंटाशिआ, असिल, जन्नतूल नईम, रतलाम, सिगार, उद, हायवॉक, रसासी, हयाशा, रॉयल ब्लू, अल रियाब, राशा, मदिना, मक्का अशी अत्तरे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांना अनेक पर्याय आहेत.

शहरात रमजान महिन्यात अत्तरांना विशेष मागणी आहे. इतर इस्लामिक साहित्याशिवाय अत्तरांची विक्री चांगल्या प्रकारे होते. काही जणांकडून महागड्या अत्तरांना मागणी असल्याने ते विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
- मुबीन अत्तार,
अत्तर विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागातील ३४ टक्के कुटुंबे शौचालयाविना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने देशभर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून निधी दिला जात आहे. २०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसारच्या वैयक्तिक शौचालयांची सुविधा असलेल्या नाशिक विभागातील कुटुंबांची टक्केवारी पाच वर्षांत ३४.६७ वरून ६५.६० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. असे असले तरी विभागातील तब्बल ३४.४० टक्के कुटुंबांकडे आजच्या आधुनिक काळातही शौचालय नसल्याचे वास्तव आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यात येत आहे. २०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार विभागातील २२ लाख ६ हजार २१ कुटुंबांपैकी केवळ ७ लाख ६४ हजार ९२४ अर्थात ३४.६७ टक्के कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालयांची सुविधा होती. त्यानंतर मार्च २०१६ पर्यंत त्यात १६.५७ टक्के कुटुंबांची भर पडली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षाच्या कालावधीत आणखी ३ लाख ४९ हजार ९८३ कुटुंबांना या योजनेतून वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध झाल्याने आता विभागातील वैयक्तिक शौचालयांची सुविधा असलेल्या कुटुंबांची टक्केवारी ६५.६० इतकी झाली आहे. या एकाच वर्षात १४.३६ टक्के कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

नगर-नाशिक आघाडीवर

विभागातील नगर जिल्ह्यातील ६ लाख ४३ हजार ८०४ कुटुंबांपैकी ४ लाख ९४ हजार १४३ म्हणजेच ७६.७५ टक्के कुटुंबांकडे, तर नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार ५२ कुटुंबांपैकी ३ लाख ८० हजार ६८२ कुटुंबांकडे अर्थात ७१.१५ टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

खान्देश पिछाडीवर

धुळे जिल्ह्यातील ५२ टक्के, जळगावमधील ५६.५९ टक्के, तर नंदुरबारमधील ५८.१९ टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीत ही तिन्ही जिल्हे पिछाडीवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगाव, पांजरवाडीला तडाखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वरुणराजाने यंदाच्या पावसाळयात सुरुवातीलाच येवला तालुक्याच्या पदरात दमदार पावसाचं दान टाकलं असलं तरी दुसऱ्या बाजूला शुक्रवारी रात्री पावसासोबत आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. तालुक्याच्या पूर्व भागातील सायगाव, पांजरवाडी आदी गावांना या सुसाट वाऱ्याचा सर्वाधिक तडाखा दिल्याचे चित्र आता समोर आलं आहे. या परिसरातील काही मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली. काही ठिकाणी महावितरणचे विजेचे पोल तिरपे होताना तारा तुटून खाली पडल्या, तर अनेकांच्या घराची तसेच कांदा चाळीची पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले.

पांजरवाडी येथील गणपत रघुनाथ देवरे यांचे राहते घर पूर्ण उद्ध्वस्त झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला. कुशिराम गायकवाड, चंद्रभान गायकवाड, तुकाराम गायकवाड, झेल्याबाई गायकवाड, अरुण भालेराव, गुलाब जेजुरकर आदींच्या घरांचे देखील या वादळी वाऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. अशोक ढाकणे, दिलीप जेजूरकर, रत्नाकर भालेराव आदी शेतकऱ्यांच्या कांद्याचे या पावसात नुकसान झाले. तालुक्यातील अंदरसूल येथील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्रीचे पत्रे तर जोरदार वाऱ्याने हवेत उडून जात परिसरातील एका विजेच्या तारांवरच लटकले गेले होते. पत्रे वीजतारांना चिकटताच जोरदार आवाज होत वीजपुरवठा खंडित झाला होता. सुदैवाने याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

महावितरणलाही जोराचा झटका

जोरदार वादळी वाऱ्याने येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील जनतेला मोठा फटका देताना महावितरण वीज कंपनीला देखील जोराचा झटका दिला. उत्तरपूर्व भागातील कंपनीचे अनेक ठिकाणचे वीजवाहिनीचे असंख्य पोल या फटक्यात कुठे आडवे झाले, तर कुठे अक्षरशः तुटून पडल्याचे चित्र शनिवारी पाहणीदरम्यान पुढे आले. येवला अर्बन उपविभागांतर्गत येणाऱ्या तालुक्याच्या पूर्व व उत्तर ग्रामीण भागातील ३३ केव्ही भारम उच्चदाब वीजवाहिनीचे ६ पोल, ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचे १५ पोल, तसेच अनेक ठिकाणचे लघुदाब वीजवाहिनीचे ५२ पेक्षा अधिक पोल काही ठिकाणी आडवे व काही ठिकाणी तुटले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर परिसरात उद्या योगाचा जागर

$
0
0

टीम मटा

संयुक्त राष्ट्रातर्फे दि. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. नाशिक शहरातही त्यानिमित्त बुधवारी (दि. २१) ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात सर्वमान्यांसह मान्यवर सहभागी होणार आहेत.

--

आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकाराने अांतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यांतर्गत १०८ देशांमध्ये आणि देशातील १०८ शहरांमध्ये त्या-त्या ठिकाणच्या प्रसिद्ध स्थळांसमोर सूर्यनमस्कार घालून उगवत्या सूर्याला वंदन करण्यात येणार आहे. त्यात देशभरातील २१ तुरुंगांतील कैदीही सहभागी होतील. आर्ट ऑफ लिव्हिंग योगाचे कमलेश बारवाल म्हणाले, की देशातील भव्य सोहळ्यासाठी सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी एक महिन्याचे ‘योगदान’ हे योग शिबिर ५०० हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आले असून, त्याची सांगताही बुधवारी होईल.

--

‘नाशिक योग’तर्फे योगाभ्यास

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे नाशिक योग विद्या केंद्रातर्फे नाशिककरांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सकाळी ६.४५ वाजता होणाऱ्या या विनामूल्य योगाभ्यासासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे. सोबत स्वत:चे मॅट, आसन आणावे. योगरत्न गुरुवर्य कीर्तिकुमार औरंगाबादकर मार्गदर्शन करणार आहेत, असे कळविण्यात आले आहे.

--

मोफत योग प्रशिक्षण

योग विद्या धामची पंचवटी शाखा व टोटल हेल्थ सोल्युशनतर्फे मोफत योग प्रशिक्षण शिबिर होणार आहे. सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत प्रभात फेरी होईल. ७.३० ते ८.३० योगासने, प्राणायाम, ओंकार साधना व योगाविषयी मार्गदर्शन होईल. माहितीसाठी ९७३०५५८८८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

--

भालेकर मैदानावर शिबिर

हजारो वर्षांपासून आरोग्याचा मंत्र देणाऱ्या योगाविषयी माहिती देण्यासाठी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट व पतंजली प्रतिष्ठानतर्फे बी. डी. भालेकर मैदानावर पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत योग शिबिर होईल. माहितीसाठी ०२५३-२५०७००१-२-४-५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

--

खुटवडनगरला योग शिबिर

लाडशाखीय वाणी मित्रमंडळ, सन्मित्र मंडळ आणि संस्कारवाणीतर्फे सकाळी ६ ते ८.३० या वेळेत माहेरघर कार्यालय, सीटू भवनजवळ, आयटीआय पुलापुढे, खुटवडनगर येथे योग शिबिर होणार आहे. या शिबिरात सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांना सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात आले आहे.

--

देवळालीत योग प्रात्यक्षिके

देवळाली कॅम्प ः कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे छावणी परिषद हायस्कूल येथे सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान योग्य प्रात्यक्षिके होणार आहेत. आमदार योगेश घोलप, बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार आदी उपस्थित राहतील. अण्णाज ग्रुपतर्फे खंडेराव टेकडी येथे डॉ. चेतन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिक होईल. देवळालीकरांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णाची फसवणूक; डॉक्टरांना आर्थिक दंड

$
0
0

धुळे ग्राहक तक्रार निवारण मंचाचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील सुशिलाबाई मोहन पोलादे या महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून झालेल्या खर्चाच्या व नुकसानापोटी शहरातील निरामय हॉस्पिटलमधील डॉ. विपूल बाफना व डॉ. माधुरी बाफना यांना दोन लाख साठ हजार रुपये दंड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने केला आहे.तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करून तीस दिवसांच्या आत रकमेची पूर्तता करावी, असेही डॉक्टरांना आदेश देण्यात आले आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून या तक्रारीविषयी अनेक चौकशी व पत्रव्यवहार, आंदोलने मात्र पोलादे यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली. या तक्रारबाबत ग्राहक मंचाने दोन्ही बाजू समजून घेत सुशिलाबाई पोलादे यांना वैद्यकीय खर्चापोटी दोन लाख साठ हजार रुपये दंड डॉ. विपुल बाफना व डॉ माधुरी बाफना यांनी तक्रारदारास द्यावे, असा आदेश जारी केला आहे.

काय आहे प्रकरण?

या घटनेत सुशिलाबाई पोलादे यांना पोटदुखीची त्रास होऊ लागल्याने आणि गॅसस्ट्रीस असल्याचे निदान झाल्यानंतर सन २००८ मध्ये निरामय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी टेस्ट केल्यावर सुशिलाबाई यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. टप्प्याटप्प्याने चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेल्याने त्यांना धुळ्यातील आस्था हॉस्पिटलनंतर मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईत त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर पोलादे यांनी या सर्व प्रकरणात डॉक्टर बाफना यांच्याविरुद्ध नोटीस पाठवून झालेला खर्च व नुकसान भरपाईची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार चषक कबड्डी लीगचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमदार चषक कबड्डी लीगचे आयोजन २७ ते ३० जूनदरम्यान पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे बंदिस्त सभागृहात करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा कबड्डी संघटना व क्रीडा प्रबोधिनी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पहिल्या अव्वल १६ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. या संघांची चार गटांत विभागणी करण्यात येणार आहे. प्रथम साखळी पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत. हे सामने दररोज सायंकाळी ५ ते ९ दरम्यान मॅटवर प्रकाशझोतात खेळविले जाणर आहेत.
विजेत्या संघास ३१ हजार रुपये रोख व चषक, उपविजेत्या संघास २१ हजार रुपये रोख व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्या संघास प्रत्येकी ११ हजार रुपये रोख व चषक अशी सांघिक पारितोषिके व स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडूस ५ हजार रुपये रोख व चषक, स्पर्धेतील पकड व चढाईपटूस प्रत्येकी तीन हजार रुपये रोख व चषक अशी वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी पुरुष गटाच्या संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्याचप्रमाणे के. व्ही. एन. नाईक नाशिक कबड्डी प्रीमियर लीगसाठीसुद्धा संभाव्य खेळाडूंची निवड या स्पर्धेतून केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी दिली. निमंत्रित केलेल्या संघांनी आपली प्रवेशिका २२ जूनपर्यंत संघटनेकडे द्यायची आहे. अधिक माहितीसाठी मोहन गायकवाड (मो. ९४२३१८४९५२), विलास पाटील (मो. ९५६१७१०७३१), शरद पाटील (मो. ९९२२४२०२१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे अध्यक्ष नगरसेवक मच्छिंद्र सानप, रुची कुंभारकर, पंचवटी विभागाच्या सभापती प्रियांका माने, राज्य संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे, आंतरराष्ट्रीय पंच सतीश सूर्यवंशी, पंच मंडळाचे अध्यक्ष अनिल अहिरे, सचिव राजेंद्र निकुंभ, विजय बनसोडे, गौरव पाटील, भारती जगताप आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार कावळे अखेर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुका पोलिस स्टेशनमधून धूम ठोकणाऱ्या संशयितास पोलिसांनी सांगली येथून अटक केली. कैदी पार्टीची नजर चुकवत संशयित आरोपीने महिनाभरापूर्वी पोलिस स्टेशनमधूनच धूम ठोकली होती. पोलिसांनी सतत त्याचा माग काढत मंगरूळ (जि. सांगली) येथे त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी दोन पोलिस कर्मचारी निलंबित झाले आहेत.

संभाजी विलास कावळे (वय २३, रा. औदुंबर प्लाझा, औदुंबरनगर, अंबड लिंकरोड, मूळ कोल्हापूर) असे या संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीस गजाआड केले होते. त्यात कावळेचा सहभाग होता. पोलिस तपासात या टोळीतील गुन्हेगारांनी दरोड्यासह दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली होती. शहर पोलिसांनी सर्व गुन्ह्यांमधील एकूण सात लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल संशयितांकडून जप्त केला होता. यानंतर सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कावळेने मातोरी (ता. जि.नाशिक) येथील एका घरफोडीची कबुली दिल्याने त्यास न्यायालयीन प्रक्रिया पार पाडत नाशिक तालुका पोलिसांनी १५ मे रोजी ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याने त्यास तालुका पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. मात्र, संध्याकाळच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवत कावळेने धूम ठोकली. हातातील बेडी सफाईदारपणे काढून पोलिस स्टेशनच्या पाठीमागे धाव घेत त्याने भूमिअभिलेख कार्यालयाच्या भिंतीवरून उडी मारली. यानंतर पोलिसांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडत नव्हता. या घटनेची गंभीर दखल घेत तत्कालीन अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, संशयिताच्या मागावर असलेल्या पोलिसांना तो सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, रविवारी पोलिसांनी मंगरूळ गाठून सापळा लावून त्यास जेरबंद केले. ही कारवाई निरीक्षक बी. बी. ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के. एम. कमलाकर, पोलिस हवालदार जयेश भाबड, योगेश शिंदे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी समितीचे पुनर्गठण करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पावसाळापूर्व कामे झाली नसल्याचा दाखला खुद्द सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच दिला असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र या कामांच्या चौकशीऐवजी भुयारी गटार योजनेच्या चौकशीची मागणी केली. पावसाळी गटार योजनेची चौकशी समिती पुनर्गठीत करून त्यातील त्रुटी शोधा आणि भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केली. यात जवळपास दीड हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

सोमवारच्या महासभेत पावसाळापूर्व कामांमधील त्रुटी, पावसाळी गटार योजनेचा उडालेला बोजवारा, प्लास्ट‌िक वेळेत न उचलणे, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण व भद्रकालीत चुकीच्या पद्धतीने उभारलेले सिव्हरेज पंपिंग स्टेशन यामुळे शहरात पाणी साचल्याचा आरोप विरोधकांनी करत सत्ताधारी भाजपची कोंडी केली.परंतु, विरोधकांच्या आक्रमणामुळे पिछाडीवर गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांकडून बचावाचा केविलवाणा प्रयत्न केला. पूर्व पावसाळी कामांमुळे प्रशासनाचे पितळ उघडे पडले, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. प्रभागनिहाय ठेके का दिले व कार्यारंभ आदेश का दिले नाहीत, असा सवाल करून प्रशासनाच्या त्रुटींवर बोरस्तेंनी बोट ठेवले. तसेच पावसामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसचे गटनेते शाहु खैरे यांनी सदोष पावसाळी गटार योजना, सदोष रस्ते व भद्रकालीमध्ये चुकीच्या पध्दतीने सिव्हरेंज पंपिंग उभारण्यात आल्याने शहर पाण्याखाली गेल्याचा आरोप केला.

काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी तर थेट प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शहरात अठरापैकी तीनच नैसर्गिक नाले शिल्लक राहिल्याचा आरोप केला. पाऊस सुरू असताना अग्निशमन दलाचे अधिकारी जागेवर नव्हते1 पावसाळी गटार योजनेचा खर्च वाया गेला. शहरातील पंपिंग पूर्ण क्षमेतेने चालत नसल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी केला. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोडी कमी होती की, काय दिनकर पाटील यांनी भाजपसह विरोधकांवर हल्लाबोल केला. पावसाळी भुयार गटार योजनेत विरोधकातील काही नेत्यांनी गोलमाल केल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी यापूर्वी नियुक्त झालेली चौकशी समिती पुनर्गठित करण्याची मागणी त्यांनी केली.

भाजपच्या अडचणी वाढणार

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी त्यांच्याकडे अभ्यासू नगरसेवकांची संख्या कमी आहे.भाजकडे बहुमत असले तरी, विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यची क्षमता आहे. आतापर्यंत महासभेत सत्ताधारी व विरोधकांचे खेळीमेळीचे चित्र दिसत होते. परंतु, सोमवारी महापौरांनी चर्चा करण्याऐवजी सभा गुंडाळल्याने विरोधक नाराज झाले आहेत. त्यामुळे पुढच्या सभेत महापौर कसे कामकाज करतात ते पाहू, असा इशारा विरोधकांनी दिल्याने भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलगीकरणाचाच ‘कचरा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेकडून घरोघरच्या कचरा संकलनासाठी अभिनव अशी घंटागाडीची योजना शहरात राबविली जात आहे. त्याद्वारे कचरा विलगीकरण करणेदेखील नुकतेच बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, बहुसंख्य नागरिकांकडून एकत्रितच कचरा टाकला जात असल्याने शहरात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांच्या कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा संकलित करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अगोदर असा कचरा टाकणाऱ्यांचे ओला व सुका कचरा वेगळा करून टाकावा याबाबत पुरेसे प्रबोधन करावे, अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने नवीन घंटागाड्या नेमल्या आहेत. आधीच शहरातील अरुंद रस्त्यांवरून कचरा संकलन करण्यासाठी अनेकदा घंटागाडीचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच आता ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुका कचरा वेगळा संकलित करण्यासाठी नुकताच घंटागाड्यांत जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला. सातपूर विभागातील अनेक घंटागाड्यांत अशा जाळ्याही बसविण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक नागरिकांकडून घंटागाड्यांत एकत्रितच कचरा टाकण्यात येत असल्याने सुका कचऱ्यासाठी लावण्यात आलेल्या या जाळ्यांचा खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे. या जाळ्यांमुळे अगोदरच लहान असलेल्या घंटागाड्या आणखी अपुऱ्या पडत आहेत. या जाळ्यांमुळे अडचणींत वाढ झाल्याचे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

-

प्रकल्पावर मात्र एकत्रित संकलन!

घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा संकलित केल्यावरही खत प्रकल्पावर तो एकत्रितच घेतला जातो. त्यामुळे ओला व सुका कचरा संकलन करून महापालिका नेमके काय साध्य करते, असा सवालही उपस्थित केला जात आहे. घंटागाड्यांद्वारे घरोघरी कचरा संकलन करण्याचे काम केले जात असताना बहुसंख्य नागरिकांकडून एकत्रितच कचरा दिला जात असल्याने महापालिकेने अगोदर या समस्यांवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीस फाशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातीबाहेर लग्न केले, म्हणून गर्भवतीचा जीव घेणाऱ्या बापास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी सोमवारी (दि. १९) फाशीची शिक्षा सुनावली. दुर्मिळातील दुर्मीळ घटना असे निरीक्षण नोंदवत या कृत्याला देहदंडाची शिक्षाच होऊ शकते, असे कोर्टाने स्पष्ट केले. ऑनर किलिंग प्रकरणात नाशिक कोर्टाने प्रथमच फाशीची शिक्षा सुनावली असून, या ऐतिहासिक निर्णयाने जातीच्या नावावर विष पेरणाऱ्यांना बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकनाथ किसन कुंभारकर (रा. मोरे मळा, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ‘ऑनर किलिंग’चा हा धक्कादायक प्रकार २८ जून २०१३ रोजी गंगापूर रोडवरील सावरकर हॉस्पिटलजवळ घडला होता. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रमिलाचा गळा घोटल्यानंतर कुंभारकरला कोणताही पस्तावा नव्हता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी लागलीच कुंभारकरला अटक करून गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. पौर्णिमा नाईक यांनी १० साक्षीदार व इतर पुरावे कोर्टासमोर सादर केले. त्यात रिक्षाचालक, तसेच फिर्यादी आणि डॉ. अनंत पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपास पथकाने कोर्टासमोर भक्कम पुरावे सादर केले. कुंभारकरने अत्यंत शांत डोक्याने कट रचून मुलीसह तिच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायाधीश घोडके यांनी कुंभारकरला हत्येप्रकरणी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

जातीबाहेरील मुलाशी लग्न केले म्हणून गर्भवतीचा जीव घेणाऱ्या बापास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. १९) फाशीची शिक्षा सुनावली. नाशिक जिल्हा कोर्टाने ऑनर किलिंग प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, असे अॅड. पौर्णिमा नाईक यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, २००७ मध्ये साटोटे हत्याकांडात चौघांना फाशीची शिक्षा झाली होती. मात्र, हे हत्याकांड दरोड्यादरम्यान झाले होते. कुंभारकरचे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर त्याच्याच जातीतील एकाने मुलीला मारू की आत्महत्या करू, अशी फिर्याद पोलिसांसमोर मांडली. जातपंचायतीच्या दाहकतेचा हा प्रकार ‘मटा’ने समोर आणल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय सर्वच प्रमुख जातपंचायतींनी घेतला असून, कोर्टाच्या या निकालाने या प्रकाराला चाप बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अशी झाली होती हत्या

प्रमिला कुंभारकर (वय १८) हिने बुलडाण्यातील दीपक कांबळे याच्याशी प्रेमविवाह केला होता. ती महात्मानगर परिसरातील एका बिल्डिंग साइटवर आपल्या पतीसोबत राहत होती. या विवाहास कुंभारकरचा विरोध होता. मुलीने आंतरजातीय लग्न केल्याने कुंभारकर संतप्त झाले होते. त्यातच प्रमिलाला दिवस गेल्याने कुंभारकरच्या संतापात आणखी भर पडली. हा विषय कायमचा संपवायचा म्हणून त्याने २८ जून २०१३ रोजी मनाशी खूणगाठ बांधत पहाटे त्याच्या घराजवळ राहणारा प्रमोद आहेर या रिक्षाचालकास सोबत घेतले. नातेवाइकाची तब्येत बरोबर नसल्याने मुलीला घेऊन यायचे, असा बनाव त्याने रचला. रिक्षा घेऊन तो प्रमिलाकडे गेला. ‘तुझी आई सीरिअस असून, तू लवकर चल’ असा निरोप कुंभारकरने दिल्याने प्रमिला त्याच्यासोबत निघाली. वडिलांवर विश्वास असल्याने तिने पतीला बरोबर घेतले नाही. मात्र, काळ बनून आलेल्या बापाच्या मनात वेगळाच विचार घोंगावत होता. कुंभारकरने रिक्षा गंगापूररोडवरील सावरकर हॉस्पिटलजवळ नेण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यानंतर रिक्षाचालक आहेर याला ‘हॉस्पिटलमध्ये प्रमिलाचे मामा असून, त्यांना घेऊन ये’ असे सांगितले. त्यानुसार आहेर हॉस्पिटलमध्ये घुसताच कुंभारकरने आपल्याकडील नॉयलॉन दोरी काढून प्रमिलाचा गळा आवळण्यास सुरुवात केली. नववा महिना सुरू असलेल्या प्रमिलाचा प्रतिकार निष्प्रभ ठरला. हा प्रकार सुरू असताना रिक्षाचालक आहेर परत आला. त्यांनी कुंभारकरला विरोध केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय समोर आला. सर्व साक्षीदारांनी भक्कमपणे बाजू मांडली. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, तसेच कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्याआधारे कोर्टाने दुर्मिळातील दुर्मीळ घटना असे स्पष्ट करीत आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली.

- पौर्णिमा नाईक, सरकारी वकील

दुर्मिळ असा निर्णय कोर्टाने दिला असून, याचा चांगला परिणाम दिसून येईल. फाशीची शिक्षा देताना शक्यतो देशविघातक कृत्यांकडे पाहिले जाते. ऑनर किलिंग हा प्रकार तितकाच घृणास्पद होता, हे कोर्टाच्या निकालावरून स्पष्ट होते. पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला.

- डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

या प्रकरणात सुरुवातीपासून प्रसारमाध्यमांनी चांगले काम केले. यामुळे एक सामाजिक दबाव निर्माण झाला होता. त्यातूनच पुढे जातपंचायत मूठमाती अभियान सुरू झाले. हजारो पीडितांना न्याय मिळाला. कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेमुळे प्रमिलाला न्याय मिळाल्याची भावना असून, ही लढाई पुढे सुरूच राहील.

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गानतंत्र’ची अंतिम फेरी उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ल्ड म्युझिक डेनिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गानतंत्र’ या स्पर्धेस नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी उद्या दि. २१ रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी ई-मेलद्वारे गाणी मागविण्यात आली होती.
सोमवारी (१९ जून) रोजी या स्पर्धेचा स्टुडिओ राउंड ‘रेडिओ मिर्ची’च्या स्टुडिओत झाला. यावेळी २० पैकी १० स्पर्धक निवडण्यात आले. प्रसिध्द संगीतकार आणि गायक संजय गीते, शास्त्रीय गायक प्रा. अविराज तायडे तसेच रेडिओ मिर्चीचे प्रोग्रामिंग हेड श्रीकांत नायर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्टुडिओ राऊंडमधून निवडलेल्या १० स्पर्धकांची उद्या दि. २१ रोजी सेंट्रल मॉल येथे संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या अंतिम फेरी होईल. अंतिम फेरीत स्पर्धकांची ‘अनप्लग्ड कॉन्सर्ट’ होईल. अंतिम तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे ‘रेडिओ मिर्ची’ हे म्युझिक पार्टनर आहेत. सांग‌ीतिक वारशाला अभिवादन आणि आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या स्पर्धेमागे उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या श्रीमूर्तींचे बहरिनमध्ये योगधडे

$
0
0

नाशिक ः तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बहारिनमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या योगा इन्स्ट‌ट्यिूटच्या माध्यमातून आखाती देशास योगाचे धडे देण्यासाठी नाशिकमधील योगशिक्षक डॉ. श्रीमूर्ती यांची निवड झाली आहे. या कार्यासाठी देशभरातून केवळ तीन योगशिक्षकांना ही संधी मिळाली आहे. यातील डॉ. श्रीमूर्ती हे नाशिकचे तर उर्वरित दोघांपैकी एक जण पश्चिम बंगाल आणि दुसरे बिहारमधील रहिवासी आहेत.

चेन्नईतील १३६.१ योगा सेंटरच्या माध्यमातून यावेळी ते एक वर्षासाठी बहारीन मध्यपूर्वेकडील पार्शियन आखातीमधील छोट्याशा व्दीपावर वसलेल्या देशात जाणार आहेत. तेथील राजधानी मनामा येथे ते वास्तव्यास असतील. मुळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखलीचे रहिवासी असणारे ज्ञानोबा लाड तथा डॉ. श्रीमूर्ती यांनी योगाभ्यासात पुढे जाण्यासाठी अत्यंत खडतर परिस्थितीशी दोन हात केले आहेत. आई-वडिलांना शेती कामात मदत करत होमिओपॅथीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ डॉक्टर म्हणून रूग्णांना सेवा दिली. मात्र योगाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. डॉ. श्रीमूर्ती यांनी बिहार स्कूल ऑफ योगामधून ‘अप्लाईड योगा’ (व्यवहारातील योगशास्त्र) या विषयात एम.एससी. पदवी मिळविली. यानंतर दीड वर्ष कतार या आखाती देशातील नागरिकांना योग शिकविल्यानंतर मालदीव बेटावरही हे कार्य त्यांनी केले. नाशिकमध्ये स्थिर होत त्यांनी नाशिककरांना योगाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. ते पुढील आठवड्यात बहरिनमध्ये जाणार आहेत. ते तेथे वर्षभर सेवा देतील.

बुधवारी (२१ जून) बहारिनमधील योग इन्स्ट‌ट्यिूटचे उद‌्घाटन होणार आहे.

या निमित्ताने ‘मटा’शी बोलताना डॉ. श्रीमूर्ती म्हणाले , ‘मुस्लीमबहूल देश आणि योग या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. त्या देशांमधील नागरिक योगाला स्वीकारून या शास्त्रात अचंबित करणारी प्रगती करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकरांचा बिबट्याने पाडला फडशा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील तामसवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्याचे कोकरू ठार झाल्याची घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथील मेंढपाळ साईनाथ करू ढेपले हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी तालुक्यातील तामसवाडी परिसरात आले आहेत. त्यांचा मुक्काम तामसवाडी येथील शेतकरी शंकर नामदेव शिंदे यांच्या शेतात होता. रविवारी रात्री बिबट्याने या मेंढ्यांच्या कळपातील तीन कोकरांवर हल्ला केला. मेंढ्याचा आरडाओरडा ऐकून ढेपले कुटुंबीयांनी लाठ्या काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केला. मात्र बिबट्या फरार झाला. त्यांना काही अंतरावर तीन कोकरू मृतावस्थेत पडलेले आढळले. ही घटना वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर येवला विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी सहाकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाची ‘पोलखोल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

गेल्या आठवड्यात अभोणा परिसरात झालेल्या पावसाने आदिवासी बांधकाम विभागाने केलेल्या कामचलाऊ ‘कामकाजा’ची पोलखोल केली आहे. बांधकाम विभागाने भूमिगत गटारी बनवून पावसाचे पाणी जाण्यास कुठलीही सोय न केल्याने अभोणा-कळवण रोडला जोडणारा महत्त्वाच्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या पावसात रस्त्याचे नाले झाल्यासारखी स्थिती झाली होती.

या पुलाच्या दोनी बाजुचा भराव पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे आधीच कमकुवत असलेला पूल सध्या अधिकच धोकेदायक झाला आहे. उरलेल्या अडीच महिन्याच्या पावसाळ्यात या पुलाची काय अवस्थ होईल, यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून पावसाळा सुरू झाला आहे. पहिल्याच पावसात या पुलाचे ‘बांधकाम’ उघडकीस आले आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत का पूल तग धरणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

होत आहे.

अभोणासह पाश्चिम पट्ट्यातील आदिवासींना संपूर्ण ‘कसमादेना’ला जोडणारा हा एकमेव पूल असल्याने त्याचे महत्त्व अजुनच वाढले आहे. पुलाला काही नुकसान झाल्यास पाश्चिम पट्ट्यातील गावांचा कळवणशी संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर पुलाची लवकर डागडुजी करून पावसाचे पाणी रस्त्यावर न येता नाल्यात जाण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वारास दोघांनी लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालमत्तेच्या वादातून दोघांनी एकास रस्त्यात अडवून लुटले. ही घटना टिळकपथ भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कृष्णल उत्तम कोथमिरे (वय २७, रा. भद्रकाली टॅक्सीस्टॅण्ड, शेलार हॉटेलमागे) या युवकाच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लुटीचा प्रकार घडला. कामावरून घराकडे परतत असताना सिडकोतील बडदेनगर भागात राहणारा अमित संजय कोथमिरे (वय २५) आणि त्याचा साथीदार अभिजीत साळुंके या दोघांनी कृष्णलला रस्त्यात थांबवले. संजय आणि कृष्णल यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहे. त्याच वादातून दोघा संशयितांनी जगन्नाथ हॉटेल परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमशेजारी अडवले. तसेच, शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संशयितांनी मारहाण करीत बळजबरीने कृष्णलच्या खिशातील मोबाइल व रोकड असा सुमारे नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

डीजीपीनगरला चेन स्नॅचिंग

स्पीड ब्रेकरमुळे दुचाकीचा वेग कमी केल्याचा फटका महिलेला बसला. दुचाकीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेल्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत तोडून नेली. ही घटना नाशिक-पुणे हायवेजवळील डीजीपीनगर भागात विघ्नहर गणेश मंदिराजवळ घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता जगदीश कुलथे (रा. सप्तशृंगीनगर, जेलरोड) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रविवारी सकाळी कुलथे आपल्या मुलीस सोबत घेऊन डीजीपीनगर भागात गेल्या होत्या. दहा वाजेच्या सुमारास काम आटोपून त्या घराकडे परतत असताना चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. विघ्नहर गणेश मंदिरासमोर कुलथे यांनी दुचाकीचा वेग कमी केला. यावेळी स्पीडब्रेकरवर पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या पल्सरस्वारांनी याचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोन्याचे पोत ओरबाडून नेली. कुलथे यांनी आराडाओरड करीत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव वेगात चोरटे निघून गेले. चेन स्नॅचर्सवर नजर ठेवण्यासाठी येथे नेहमी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. चेन स्नॅचिंग झाली त्यावेळी मात्र येथे बंदोबस्त नव्हता. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

पाइप चोरीचा प्रयत्न

औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातून अ‍ॅल्युमिनीअम पाइप चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी दोघांविरुध्द सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल नेत्रापाल राठोड व अरुण लक्ष्मणदेव पंडित (रा. दोघे संभाजीचौक, नानावली) अशी संशयितांची नावे आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सारडा बंगल्यासमोरील सह्याद्री इंडस्ट्रीजमध्ये ही घटना घडली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोघा संशयितांनी कारखान्यातील अ‍ॅल्युमिनीअम सेक्शनचे पाइप चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अमित शरद विसपुते यांनी तक्रार दाखल केली असून, अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.

पंचवटीत तरुणीची आत्महत्या

पंचवटीतील सुकेनकर लेन भागात राहणाऱ्या २५ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हर्षा प्रशांत जैन (रा. वसंत अपार्टमेंट, सुकेनकरलेन) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हर्षाने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.

युवकाचा मृत्यू

झाडावरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना महामार्गावरील स्प्लेंडर हॉल परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय गंगाराम पवार (वय २८, रा. भगतसिंगनगर, इंदिरानगर) असे झाडावरून पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी विजय आपल्या घरामागील झाडावरून पडल्याने गंभीर झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक हादगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images