Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकला मिळणार जिल्हा क्रीडा संकुल

$
0
0

नाशिकः विभागीय क्रीडा संकुल, एकलव्य क्रीडा प्रबोध‌िनी, सय्यद पिंप्री येथील तालुका क्रीडा संकुल यांच्याबरोबरच नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला बुस्ट देण्यासाठी नाशिक येथील शिवाजी स्टेड‌ियमच्या जागेवर जिल्हा क्रीडा संकुलाचे काम प्रस्तावित आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली. त्यात संकुलाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासकीय पूर्तता होताच या कामाला सुरुवात होणार आहे.

याबाबत जिल्हा क्रीडा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात आठ कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. नाशिक शहरातील खेळाडूंना हक्काचे स्टेड‌ियम नाही. त्यासाठी शहरात एखादे स्टेड‌ियम असावे, या विचाराने तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी स्टेड‌ियमचा आराखडा तयार केला होता. या आराखड्यात खेळाडूंना लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात अशी तजवीज करण्यात आली आहे. हा आराखडा प्रत्यक्षात यावा यासाठी सध्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हेदेखील प्रयत्न करीत आहेत.

शहराच्या मध्यवस्तीत असलेले शिवाजी स्टेड‌ियम अत्यंत जीर्ण झाले आहे. मुळातच ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याने या ठिकाणी वापराला व दुरुस्तीला मर्यादा येतात. या ठिकाणी स्टेड‌ियम झाल्यास खेळाडूंना हक्काची जागा मिळेल व अनेक खेळ एकाच छताखाली सुरू होतील. आजही या जागेत कबड्डी, खोखो, नेमबाजी, फुटबॉल अशा खेळांचे सामने आयोजित केले जातात. परंतु या ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने महिला खेळाडूंचे हाल होतात. तांत्रिक बाबतीतही अनेक तडजोडी कराव्या लागतात. नव्याने होणाऱ्या स्टेड‌ियममध्ये इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही खेळांचा विचार करण्यात आला आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर कशा होतील याचा प्रामुख्याने विचार केला आहे. या कामात ग्राऊंड तयार करणे, इनडोअर हॉलचे काम करणे, डॉर्मेटरी हॉल व वसत‌िगृहाच्या १२२ खोल्यांचे काम करणे, कार्यालय इमारत व सुसज्ज अशा स्टेजचे काम करणे, पार्किंग ग्राऊंड तयार करणे, प्रेक्षक गॅलरी तयार करणे, फर्निचर व इतर कामे करणे इत्यादींचा समावेश आहे. ज्या जिल्ह्यामध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे, अशा ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल देण्यात येत नाही. परंतु, नुकतेच नागपूरला विशेष बाब म्हणून जिल्हा क्रीडा संकुल देण्यात आले. निवडणुकीच्या आधी नाशिकला जे काही हवे असेल, ते मी देण्यास कटीबध्द असेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या सभेत दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर हे स्टेड‌ियम होत असल्याची चर्चा खेळाडूंमध्ये होती.

सध्याच्या छत्रपती स्टेड‌ियमवर विशेष बाब म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रशासकीय पूर्तता झाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होईल.

- रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

खेळाचे मैदान-१ कोटी ९७ लाख ३६ हजार ३५३ रुपये

इनडोअर हॉल- १ कोटी ३७ लाख १५ हजार ६२५ रुपये

वसत‌िगृह- २ कोटी ४१ लाख ३९ हजार ५०० रुपये

ऑफिस बिल्डिंग- ४३ लाख ८९ हजार रुपये

अंतर्गत पार्किंग - ४९ लाख ८० हजार रुपये

गॅलरी- ४७ लाख ८८ हजार रुपये

फर्निचर- ७५ लाख रुपये

अतिरिक्त खर्च - ३८ लाख ७ हजार ९२४ रुपये

एकूण प्रस्तावित खर्च- ७ कोटी ९९ लाख ६६ हजार ४०१ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोलचोरी भोवली

$
0
0

नाशिक-चांदवड महामार्गावरील दोन पेट्रोलपंपांवर कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोलपंपाच्या मशिनमधील पल्सरमध्ये टेम्परिंग व शोल्डरिंग करून त्यातील आयसी पार्टच्या सहाय्याने प्रत्येकी पाच लिटरमागे २०० मिली पेट्रोलची चोरी करण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला आहे. राज्य गुन्हे शाखेने नाशिक-चांदवड महामार्गावरील दोन पेट्रोलपंपावर सोमवारी कारवाई करून हे पेट्रोलपंप सील केले. राज्यभर अशा चोरींचा पर्दाफाश केला जात आहे. भिवंडी, ठाणेसह इतर जिल्ह्यातही असे प्रकार उघडकीस आले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलपंपावर चिप आणि रिमोटच्या सहाय्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल चोरीचे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानंतर वैधमापन शास्त्र विभागाचे अपर पोलिस महासंचालक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यभर मोहीम उघडली होती. त्यात राज्यातील १६३६ पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत ११,४१८ पंपाची तपासणी करण्यात आली. तसेच २५२ पंपांद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले होते. नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची चौकशी करून २००० पंप तपासण्यात आले होते. यामध्ये दोन पंप दोषी आढळल्यामुळे बंद करण्यात आले. दोघा वितरकांविरोधात खटला दाखल केला गेला. या कारवाईनंतर पुन्हा महिनाभरानंतर दोन पंपावर कारवाई करण्यात आली. पण पेट्रोलपंपावर होणाऱ्या चोरीचे प्रमाण कमी झाले नाही.

गुन्हे शाखेच्या पथकांनी राज्यभरात पेट्रोलपंपावर धाडी टाकण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये विविध कंपन्यांचे ३६० पेट्रोलपंप आहेत. यावर त्यांची करडी नजर असणार आहे. गुन्हे शाखेला पेट्रोलपंप हेराफेरी करणारा म्होरक्या हाती लागला असून, त्यामुळे राज्यातील किती पेट्रोलपंपांवर हा चोरीचा प्रकार चालतो याची माहिती त्यांच्या हाती आली आहे. या चोरीच्या प्रकाराबरोबरच हेराफेरी करण्याचे अनेक प्रकार असून, त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

वैद्यमापन विभाग करतो काय?

वैद्यमापन शास्त्र विभागाने नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची चौकशी करून २००० पंप तपासले होते. त्यात दोन पंप दोषी आढळले. त्यानंतर पुन्हा महिनाभरानंतर दोन पंपावर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर ही तपासणी व कारवाईची प्रक्रिया थंडावली व पेट्रोलपंपावर पुन्हा चोरीचे प्रकार घडू लागले.

एका लिटरमागे तीन ते चार रुपये

प्रत्येकी पाच लिटरमागे २०० मिली पेट्रोलची चोरी केली जात आहे. त्यामुळे एका लिटरमागे ही चोरी ४० मिली असून, त्याची किमत तीन ते चार रुपये आहे. त्यामुळे एक हजार लिटर पेट्रोल विकणाऱ्या पेट्रोलपंपाची रोजची कमाई ३० ते ४० हजार रुपये आहे. हीच कमाई महिन्याला १० ते १२ लाख रुपये आहे. त्यात रॉकेलमिश्रित प्रकार असला तर ती कमाई कितीतरी मोठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एएमसीएच्या सहसचिवपदी शोभराज खोंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नागपूरचे आमदार डॉ. परिणय फुके, सचिवपदी संजय केडगे, तर सहसचिवपदी नंदुरबार येथील शोभराज खोंडे यांची निवड झाली. संघटनेची पुणे येथे नुकतीच निवडणूक झाली.

संघटनेवर कार्याध्यक्षपदी औरंगाबादचे विजय देशपांडे, उपाध्यक्षपदी मुंबईचे प्रफुल्ल झवेरी, तर कोशाध्यक्षपदी पुण्याचे राजेंद्र कोंडे यांची निवड झाली. शोभराज खोंडे २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पंच परिक्षा उत्तीर्ण झाले, तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे ते दोन वेळा प्रशिक्षक होते. त्यांच्या निवडीबद्दल नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे अध्यक्ष बळवंत निकुंभ यांनी त्यांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहात टेलिमेडिसिन!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी टेलिमेडिसिनची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बंदिवानांच्या आजाराचे ऑनलाइन निदान करणाऱ्या टेलिमेडिसिनच्या मात्रेने यापुढे बंदिवानांच्या बड्या रुग्णालयांतील ‘पाहुणचारा’ला ब्रेक लागणार आहे.

कारागृहातील काही बंदिवान कारागृहातून स्वतःची सुटका करवून घेण्यासाठी प्रकृतिअस्वास्थ्याचा बहाणा करून सिव्हिल रुग्णालयात ‘पाहुणचार’ घेत असत. काही बंदिवान तर वारंवार आजारांचा बहाणा करून रुग्णालयातील आरामास चटावले होते. परंतु, आता बंदिवानांच्या या सवयीवर शासनाने टेलिमेडीसीनचा उतारा शोधला आहे. या उताऱ्याची मात्रा वापरण्यासाठी नाशिकचे सिव्हिल रुग्णालय, मुंबईचे जे. जे. रुग्णालय ऑनलाइन पद्धतीने नाशिकरोड कारागृहाला जोडण्यात आले आहे.

--

बहाण्यांना लागणार चाप

टेलिमेडिसिन उपचारपद्धतीत नाशिकरोड कारागृह रुग्णालयातील डॉक्टर्स ऑनलाइन पद्धतीने बंदिवानांच्या आरोग्यविषयक तक्रारी सिव्हिलसह जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांपुढे मांडणार आहेत. याशिवाय संबंधित डॉक्टर्स थेट बंदिवानाशी बोलून त्यांची आरोग्यविषयक माहिती घेणार आहेत. त्यातून संबंधित तज्ज्ञ डॉक्टर्स बंदिवानांवर उपचार करणार आहेत. या सुविधेमुळे आता बंदिवानांना वैद्यकीय उपचारांसाठी कारागृहाबाहेर न्यावे लागणार नाही. परिणामी त्यांच्या बहाण्यांना आता चाप बसणार आहे.

--

धोका झाला दूर

कारागृहात रुग्णालय असले, तरी काही बंदिवान बाहेरील रुग्णालयात जाण्याची संधी शोधण्यासाठी आजाराचे बहाणे करीत असत, तर काही बंदिवानांना खरोखरच बाहेरील रुग्णालयात उपचारांसाठी न्यावे लागत असे. परंतु, आता टेलिमेडिसिनच्या सुविधेमुळे बंदिवानांना कारागृहाबाहेर नेण्याचा धोका दूर झाला आहे. ज्या विकारांवर उपाय होणार नाहीत, अशा परिस्थितीत डॉक्टरांनाच कारागृहात बोलावले जाणार असल्याने बंदिवानांचा रुग्णालयांतील पाहुणचार आता इतिहासजमा होणार आहे.

--

गैरमार्ग होणार बंद

आजाराच्या बहाण्याने जिल्हा रुग्णालयात उचारासाठी आलेल्या बंदिवानाला काही दिवसांसाठी दाखल करण्याची गरज आहे की नाही, याचा निर्णय स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरच अवलंबून असे. त्यामुळे सकारात्मक अहवाल मिळविण्याकामी गैरमार्गाचा होणारा वापरही आता बंद होणार आहे.

--

गृह खात्याच्या माध्यमातून नाशिकरोड कारागृहात बंदिवानांवर वैद्यकीय उपचारांसाठी टेलिमेडिसिन सेंटर कार्यान्वित झाले आहे. या सेंटरमुळे बंदिवानांना वैद्यकीय उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्याची गरज राहणार नाही.

-राजकुमार साळी, अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलै रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७चे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापने, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्यास १५ जूनपासून सुरू झाले असून, ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट १० ते २२ जुलै या कालावधीत काढता येणार आहे. या परीक्षेचा पेपर १, २२ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ याचदिवशी दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अर्जासाठी वेबसाइटवर

या परीक्षेसंबंधी सर्व शासन निर्णय, माहिती, सूचना तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, अर्ज स्वीकृती, परीक्षेची वेळ व यांसारखी इतर सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mahatet.in आणि www.mscepune.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता व्हर्च्युअल ड्रेसिंगद्वारे निवडा कपडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महिलांच्या चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे बसविल्याच्या घटना वारंवार समोर येतात. असे प्रकार टाळण्यासाठी महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनींनी ‘व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम युझिंग कायनेट’ हा प्रकल्प तयार केला आहे.
या सॉफ्टवेअरच्या वापराने मॉल असो किंवा शॉप, चेंजिंग रूममध्ये महिलांची सुरक्षा अबाधित राहिल, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
संघवी कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनीरिंगच्या प्राजक्ता जगताप, कांचन मते, शीतल भोळे या विद्यार्थिनींनी ‘व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम युझिंग कायनेट’ या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. महिला महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करू शकतात, ही भावना या विद्यार्थिनींनी यावेळी व्यक्त केली.

असे काम करते सॉफ्टवेअर

हे सॉफ्टवेअर डॉट नेट लँग्वेजमध्ये तयार करण्यात आले आहे. यासाठी केवळ २० हजार रुपये खर्च आला असून सर्वप्रथम हे कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केले जाते. त्यानंतर कॉम्प्युटरला कायनेट डिव्हाइस एक्स बॉक्स ३६० हा सेन्सर जोडावा लागतो. व्हर्च्युअल ट्रायल करताना सेन्सर समोर जाऊन व्हर्च्युअल इमेज घेतली जाते. सॉफ्टवेअरद्वारे पसंत केलेल्या वेअरेबल प्रॉडक्टसचे आभासी चित्र आपल्याला स्क्रीनवर दिसू लागते. प्रकल्पातील विद्यार्थिनींना प्रा. बाजीराव शिरोळे, प्रा. शीतल मोरे, विभागप्रमुख पुष्पेंदू बिश्वास, प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी या प्रकल्पाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकरे यांना चौकशीसाठी नोटीस

$
0
0

महिना उलटूनही कारवाई नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमआयडीसीच्या बहुचर्चित फाइल गहाळ प्रकरणात सातपूर पोलिसांनी निलंबित भूमापक आर. डी. बकरे यांना हजर राहण्याची नोटीस काढली आहे. या प्रकरणात बकरे यांनी जबाब पोस्टाने पाठवल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी ही नोटीस आहे. या प्रकरणात तक्रार देऊन महिना उटल्यानंतरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

फाइल गहाळ प्रकरणात एका उद्योजकासह, तत्कालीन मोठे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे हे प्रकरण कसे मिटेल यासाठी काहींचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची महिनाभरापूर्वी एमआयडीसीने तक्रार केल्यानंतर काही जणांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यामुळे यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असे वाटत असताना अचानक या प्रकरणाची चौकशी संथ झाली. त्यामुळे याबाबत एमआयडीसीत उलटसुलट चर्चेलाही उधाण आले होते. पण पोलिसांनी पुन्हा बकरे यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. बकरे यांची बदली नांदेड येथे केली असून, ते निलंबित आहेत. एमआयडीसीची ही फाइल गहाळ करण्यामागे कोणाचा हात होता याचा पोलिस शोध घेत असून, या जबाबानंतर त्याला उलगडा होणार आहे.

व्हिजिटर्सच्या चेअरवर फाइल

या प्रकरणात शिपाई बाळू पारधी यांचा याअगोदर जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्यात व्ह‌िजिटर्सच्या चेअरवर ही फाइल २६ एप्रिल रोजी मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. सर्व व्ह‌िजिटर निघून गेल्यानंतर ती फाइल खुर्चीवर होती. त्यामुळे व्ह‌िजिटरची ही फाइल असेल म्हणून ती बाजूला ठेवण्यात आली. त्यानंतर सलग सुट्या आल्यामुळे २ मे रोजी ही फाइल व्हिजिटरची नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वर्तमानपत्राचे रॅपर व सेलोटेप लावलेल्या या फाइलचे कव्हर काढल्यानंतर ही गहाळ फाइल असल्याचे लक्षात आल्याचे पारधी यांनी सांगितले. एमआयडीसीने केलेल्या तक्रारीला जुळणारा हा जबाब असल्यामुळे त्यात नवीन काहीच नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडाची रक्कम भरा, ‘अभय’ मिळवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत नळकनेक्शन दंड भरून नियम‌ति करण्यासह पाणी पुरवठ्यांतील त्रुटी सुधारून महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी महासभेने प्रशासनाच्या अभय योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेतंर्गत अनधिकृत नळकनेक्शन धारकांना अर्जाद्वारे दंड भरून कनेक्शन नियम‌ति करता येणार आहे. कनेक्शन अधिकृत कण्यासाठी संबंधिताना एक हजार ते दोन हजारापर्यंत कर भरावा लागणार आहे. आता कनेक्शन नियम‌ति केले नाही तर पाच ते दहा हजाराचा दंड आकारला जाणार आहे. या योजनेमुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

शहरातील पाणीपुरवठा योजनेत मोठ्या त्रुटी असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळकनेक्शन आहेत. शहरातील मिळकतींची संख्या चार लाखाच्या आसपास असतांना नळकनेक्शनधारकांची संख्या पावणेदोन लाख आहे. त्यामुळे ग्वाल्हेर महापालिकेच्या धर्तीवर महापौर रंजना भानसी यांनी अभय योजनेचा पॅटर्न अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता. शंभर रुपये भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घेतल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली व पाणी गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा तेथील करण्यात आला होता. अशीच योजना नाशिकमध्ये लागू करण्याचा निर्णय भानसी यांनी घेतला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. शहरात सहा विभागांमध्ये विभागिय अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंतांमार्फत योजना राबविली जाणार आहे. योजनेची घोषणा वर्तमानपत्रातून जाहिरातींद्वारे केली जाणार आहे. जाहीर नोटीस निघाल्यानंतर तीस दिवसांमध्ये अनाधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रचलित दर तक्का जाहीर केला आहे. घरगुत अर्धा इंची नळकनेक्शनसाठी एक हजार, तर बिगर घरगुतीसाठी दोन हजार रुपये दर निश्चित केला आहे. पाऊण इंची कनेक्शनसाठी घरगुती दीड हजार तर बिगर घरगुती दर तीन हजार रुपये आहे. महापालिकेकडे प्रचलित दरानुसार पैसे भरल्यानंतर ते नळ कनेक्शन अधिकृत केले जाणार आहे.

महिनाभराचा अल्ट‌मिेटम

पालिकेने यासाठी महिनाभराचा अल्ट‌मिेटम दिला आहे. त्यानंतर अनाधिकृत नळकनेक्शन शोधण्यासाठी मोहीम राबणार आहे. त्यात पाणी वापरापोटी दंड वसुल केला जाणार आहे. अर्धा इंची नळ कनेक्शनसाठी घरगुती पाच हजार रुपये तर बिगर घरगुतीसाठी दहा हजार रुपये आकारणी केली जाणार आहे. सोबतच तेवढीच रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. पाऊण इंची कनेक्शनसाठी सात हजार रुपये, घरगुती तर बिगर घरगुतीसाठी पंधरा हजार रुपये, एक इंची साठी दहा हजार रुपये, घरगुती तर बिगर घरगुतीसाठी वीस हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट बारकोडद्वारे दाखल्यांचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेतू कार्यालयाकडून वितरीत होणाऱ्या दाखल्यांवर बनावट बारकोड टाकून अफरातफर केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार देवळा सेतू कार्यालयात उघडकीस आला आहे. दाखले वितरणात‌ील अनियमिततेबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण चार सेतू कार्यालयांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. शहरातील एका महा ई सेवा केंद्रावरही अशा प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले असून, शैक्षणिक प्रवेशाकरिता विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. दाखले वितरणाचे काम त्या त्या तालुक्यांमधील सेतू कार्यालये आणि महा ई सेवा केंद्रांकडून केले जाते. ग्रामीण भागात टेरासॉफ्ट कंपनीला, तर शहरात गुजरात इन्फोटेक कंपनीला हे काम दिले आहे. दाखले वितरण प्रणालीमध्ये सावळा गोंधळ असल्याचे यापूर्वी देखील अनेकदा उघडकीस आले आहे. आता थेट बारकोडच बनावट तयार करून दाखले वितरीत होत असल्याचा धक्कादायक प्रकार देवळा तालुक्यात उघडकीस आला आहे. निर्धारीत बारकोड असल्यास संबंधित प्रत्येक दाखल्याचे ३३ रुपये शुल्क सरकारच्या तिजोरीत जमा होते. परंतु, बारकोडच बनावट असल्याने हे शुल्क थेट संबंधित सेतूचालकाला मिळत होते, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली. तहसीलदारांमार्फत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर संबंधितांस ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

निफाड, नाशिक येथील सेतू कार्यालयांमध्ये देखील दाखले व‌ितरणात अनियिमितता आढळून आली आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनाही प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इगतपुरी येथील सेतू कार्यालयास २५ हजारांचा तर, शहरातील एका महा ई सेवा केंद्रास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

देवळा सेतू कार्यालयात अलीकडेच बनावट बारकोट बनविल्याचा प्रकार पुढे आला. संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली असून, कामकाजात सुधारणा न केल्यास त्याचे केंद्र कायमचे रद्द केले जाईल. दाखल्यांचे वेळेत वितरण होत नाही म्हणून अन्य सेतू केंद्रांवरही कारवाई केली असून, अन्य सेतू केंद्रांनाही हा इशारा आहे.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडले जाणार चामरलेणीचे गूढ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म्हसरूळमधील नाशिकच्या उत्तरेला त्रिकोणाकार डोंगर म्हणजे चामरलेणी. चामरलेणी ही जैन लेणी आहेत. ही लेणी अकराव्या शतकात कोरली गेली आहेत. जैनांच्या पवित्र तीर्थस्थानांमध्ये या लेणीचा समावेश असून, लेणीचा इतिहास अन् जैन परंपरेतील एक मानबिंदू असलेल्या या स्थळाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे येत्या रविवारी (दि. २५) सकाळी ८.३० वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चामरलेणी व लेणीच्या पायथ्याचे दुर्मिळ मूर्ती संग्रहालयदेखील पाहता येणार आहे.

नाशिक परिसरात अनेक जैन लेणी आहेत. नाशिकवरील जैन धर्माचा प्रभाव या लेणी दाखवून देतात. यातील चामरलेणी साधारण हजार वर्षांपूर्वी साकारल्या गेल्या आहेत. चामरलेणीत तीन गुहा आणि एक मंदिर आहे. पहिल्या गुहेत पार्श्वनाथ भगवानांच्या तीन मूर्ती आहेत. मूलनायक भगवान महावीर स्वामींचीही मूर्ती आहे. गुहेच्या बाहेर भगवान नेमीनाथ, चंद्रप्रभ आणि आदिनाथ यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या गुहेत शांतिनाथ, कुंथूनाथ आणि अरहनाथ यांच्यासह तीन चोविसी भगवानांच्या सुबक मूर्ती आहेत. तिसऱ्या गुहेत अकरा फूट उंचीची भगवान पार्श्वनाथांची पद्मासनातील अप्रतिम मूर्ती आहे. शेजारी मंदिरातही अनेक सुंदर मूर्ती आहेत. ही लेणी दक्षिणेतला राजा चामराज याने साकारली आहेत, म्हणूनच या लेणीस चामरलेणी म्हणतात. बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनीराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याची म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणाला गजपंथही म्हटले जाते. लेणीशी संबंधित अनेक अाख्यायिका व जैन धर्माचे वेगवेगळे पैलू यावेळी ज्येष्ठ लेखक डॉ. जी. बी. शहा यांच्याकडून अनुभवता येणार आहेत.

चामरलेणीच्या पायथ्याशी बेलोरकर गुरुजींच्या प्रयत्नांतून साकारलेले जैन मंदिर व विविध दुर्मिळ मूर्ती व शिल्पांनी सजलेले संग्रहालयदेखील पाहण्याची संधी यावेळी मिळणार आहे. या संग्रहालयात चोवीस तीर्थंकरांच्या बारीक कलाकुसरीच्या मूर्ती, कच्च्या पाचूच्या दगडातील मूर्ती, कन्नड शिलालेखांसहितच्या दाक्षिणात्य मूर्ती, गारगोटीसारख्या दगडावरच्या मूर्ती, हस्तलिखिते, पोथ्या व ब्राँझ धातूच्या विविध मूर्ती असून, ‘मटा हेरिटेज वॉक’मध्ये असा सर्व संग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे.


चामरलेणीचा वॉक असा

नाशिक-पेठ रस्त्याने सीबीएसपासून आठ किलोमीटवर उजव्या हाताला चामरलेणीकडे जाणारा रस्ता लागतो. रस्त्यात बोरगड एअर फोर्स स्टेशनचा फलक आहे. मुख्य रस्त्यावरून दीड किलोमीटरवर आपण चामरलेणीच्या पायथ्याशी पोहोचतो. सकाळी ८.३० वाजता मंदिराजवळ सर्वांनी एकत्रित जमायचे असून, तेथून चामरलेणी पाहण्यासाठी जायचे आहे. ११ वाजता हा वॉक संपेल.

नावनोंदणी आवश्यक

चामर लेणीच्या मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावर एसएमएस अथवा व्हॉटस् अॅपवर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या कळवायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळापूर्व कामांच्या भ्रष्टाचाराला अभय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही, विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधाऱ्यांनी गुडघे टेकले. सोमवारी पावसाळीपूर्व कामांवरील लक्षवेधीवरून महापौरांना महासभा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. पावसाळीपूर्व कामांवरून विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीला सभागृहनेते दिनकर पाटील यांनी फाटे फोडत थेट पावसाळी गटार योजनेवरून विरोधकांवरच आरोप केले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी खुलाशाची मागणी करत गोंधळ घातला. आमच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरे देवू देण्याची मागणी करण्यावरून विरोधक आक्रमक झाल्याने महापौरांनी आमने-सामने चर्चा होऊ देण्याऐवजी थेट महासभाच गुंडाळण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे विरोधकांनी महासभेतच ‘सत्ताधाऱ्यांचा निषेध’, ‘दादागिरी नही चलेगी’, ‘महापौरांचा निषेध’ अशी घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे साडेचार तास पावसाळीपूर्व कामांवरून सुरू असलेली चर्चा फोल ठरली. त्यामुळे पावसाळीपूर्व कामांतील भ्रष्टाचाराला आपोआपच अभय मिळाले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या कारभारावरच संशय निर्माण झाला आहे.

गेल्या बुधवारी नाशिक शहरात दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्धे नाशिक जलमय झाले होते. पावसाळी गटार योजनेचे अपयश आणि शहरात पावसाळापूर्व कामे झाले नसल्यामुळे पहिल्याच पावसात नागरिकांची दैना उडाल्याचा आरोप केला जात होता. त्यासंदर्भात सोमवारच्या महासभेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी लक्षवेधी दाखल केली होती. ही लक्षवेधी चर्चेला घेण्यावरूनही सभागृहात गदारोळ झाला. महापौर रंजना भानसी यांनी विषयपत्रिकेवरील विषय प्रथम संपल्यानंतर लक्षवेधी दाखल करून चर्चा करू असे सांग‌ितले. त्यावरून विरोधक पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी महापौरांच्या समोर वेलमध्ये धाव घेतली. बराच वेळ गदारोळ सुरू राहिल्यानंतर महापौरांनी नमते घेत, लक्षवेधी दाखल करून घेत चर्चेला सुरुवात केली. विरोधकांनी पावसाळापूर्व कामांवरून सत्ताधाऱ्यांना घेरत, पावसाळी गटार योजनेच्या अपयशावर बोट ठेवले. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीही पावसाळी पूर्व कामांवर शंका उपस्थित केली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला.

साडेचार तास पावसाळापूर्व कामे आणि पावसाळी गटार योजनेतील भ्रष्टाचारावर चर्चा सुरू असताना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विषयाला कलाटणी दिली. पावसाळी गटार योजनेतील भ्रष्टाचाराची लक्षवेधी ही २८ मे २०११ रोजीच्या महासभेत अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, संभाजी मोरुस्कर, डॉ. हेमलता पाटील यांनी लावली. या लक्षवेधीमुळे तत्कालिन अधीक्षक अभियंता सुनील खुने निलंबित झाले. परंतु, ज्यांनी लक्षवेधी मांडली त्यांनीच खुनेंना परत घेण्यासाठी प्रयत्न केलेत, असे सांगत एवढा चमत्कार कसा झाला, असा थेट आरोप केला. बोरस्ते, डॉ. पाटील,मोरुस्कर, बडगुजर यांनी पावसाळी गटार योजनेच्या भ्रष्टाचारात थेट सेटींग केल्याचा अप्रत्यक्ष आरोप पाटील यांनी केल्याने विरोधक आक्रमक झालेत. त्यामुळे बोरस्ते, बडगुजर, डॉ. पाटील यांनी आपल्याला खुलासा सादर करू द्या, अशी मागणी केली. परंतु, महापौरांनी आधी प्रशासनाचे स्पष्ट‌ीकरण घेऊ द्या, असा आग्रह केला. त्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महापौरांनीही प्रशासनाला पाठ‌िशी घालण्याची आणि पावसाळापू्र्व कामांना क्लिनचीट देण्याची योग्य वेळ असल्याचे संधी साधत सभा गुंडाळली. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला प्लास्टिकचा विळखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर शहराला सध्या वाढत्या प्लास्टिक समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य, पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. या समस्येवर नगर परिषदेकडून केवळ तात्पुरता इलाज केला जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे सध्या संपूर्ण शहर कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. परिषदेकडून प्लास्टिक नियंत्रणाच्या नावाखाली अधूनमधून व्यावसाय‌िकांकडून कॅरिबॅग जमा करणे अशा प्रकारची पोकळ मोहीम राबविण्यात येते. मात्र केवळ कॅरिबॅगा जमा केल्याने ही समस्या दूर होणारी नाही. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे पेले, कप, पॅकबंद खाद्यपदार्थांचे पाऊच आदी सर्वच प्लास्टिक वेष्टणात येत असल्याने जागोजागी हे प्लास्टिक पडलेले दिसते. त्यामुळे वाढते प्लास्टिक रोखणे हे पर्यटनस्थळ म्हणून परिच‌ित असलेल्या त्र्यंबकेश्वरपुढे मोठे आव्हान आहे.

कचरा डेपो नावालाच

शहरात वाढते प्लास्टिक ही समस्या डोके वर काढत असताना खेदाची बाब म्हणजे नगरपालिकेच्या कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, हे दुर्दैव आहे. नगरपरिषद गत पाच वर्षांपासून कचरा प्रक्रियेबाबत विविध प्रयोग राबव‌ित आहे. मात्र त्यात यश आलेले नाही. कधी कचऱ्याचे जागेवरच विघटन करणे, तर कधी अपूर्ण विघटन झालेला कचरा मोकळ्या जागी हलवून तेथे डम्प करणे, अशा काही युक्त्या वापरण्यात येत आहेत. मात्र यामुळे प्लास्टिक पूर्णपणे नष्ट होत नाही.

आश्रमाचा आशादायक उपक्रम

डॉ. बिंदू महाराज यांच्या प्रेरणने त्यांचे शिष्य श्रिकांत महाराज यांनी बिंदूजीधाम सेवा संस्थेच्या माध्यमातून २० लाख रुपये खर्चाचा प्लास्टिक रिसायकलिंग प्रोजेक्ट सुरू केला आहे. सिंहस्थ कालावधी सुरू होत असतांना येथे सुमारे १६ लाख रुपये किमतीची मशनरी स्वखर्चाने उभारण्यात आली. यासाठी पालिकेने पूर्वीच्या सिंहस्थात शेड दिले होते. मात्र तेथे हा प्रकल्प चालविणे अशक्य झाले. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी उलटला. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने खतप्रकल्पाची जागा दिली आहे. बिंदुजीधाम संस्थेने पाच लाख रुपये खर्च करून यंत्रणा उभी केली आहे. हा प्रकल्प स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे. प्रारंभी या प्रकल्पाला दरमहा १६ हजार रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पात शहरातील प्लास्टिक क्रश करून त्यापासून प्लास्टिकच्या बारीक गोळ्या तयार करून त्यांच्या विक्रीतून या प्रकल्पाचा खर्च भागविण्यात येणार आहे. मात्र यासाठी नगर परिषदेने शहरात जमा होणारे प्लास्टिक वेगळे करून देणे आवश्यक आहे.

प्रशासन उदासीन

शहरात यात्रा-उत्सव कालावधीत प्लास्टिक कचरा प्रमाणापेक्षा वाढतो. इतरवेळेस दररोज सहा टन कचरा जमा होतो. त्यामध्ये एक टन प्लास्टिक कचरा असतो. ठेकेदारांकडून या कचऱ्याचे संकलन होते. आरोग्य विभागात ठेकेदारीत काम करणारे कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवासवलींच्या प्रतिक्षेत आहेत. नगर पालिकेत सॅनेटरी इन्सपेक्टरची जागा चार वर्षांपासून रिक्त आहे. एकूणच शहराच्या आरोग्याबाबत शासन उदसीन आहे.

त्र्यंबक कचरा डेपोसाठी शासनाने दिलेली जागा न्यायालयीन वादात आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. जेथे कचरा टाकलो जातो तेथे रासायनीक प्रक्रियेने जागेवरच विघटन करण्यात येत आहे. गोदावरीत कचरा जाणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. — डॉ. चेतना केरूरे, मुख्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवशी शुभेच्छा अन् धिक्कारही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बजेटमध्ये नगरसेवकनिधी ७५ लाख केल्याबद्दल भाजपच्या नगरसेवकांकडून महापौर रंजना भानसी यांचा, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. भाजप वगळता इतर नगरसेवकांनी मात्र या ठरावावरूनच भाजपची खिल्ली उडवली. त्यामुळे महापौरांच्या वाढदिवसीच पक्षपाती निर्णयाचा आरोप करत त्यांचा धिक्कार केला. त्यातच आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगरसेवक निधीबाबत आर्थिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणार असल्याचे सांग‌तिल्याने सत्ताधाऱ्यांच्या अभिनंदन ठरावाची हवा निघून गेली.

पहिल्याच पावसात शहराची कोंडी झाली असतांना सत्ताधारी भाजपचा पालिकेतील कारभार भरकटत असल्याचे सोमवारच्या महासभेत पुन्हा सिद्ध झाले. गटनेते संभाजी मोरुस्कर, जगदीश पाटील, उद्धव निमसे यांनी मुख्यमंत्र्यांसह महापौरांच्या अभिनंदनाचा ठराव सादर केला. आर्थिक वर्षाला सुरुवात होवून तीन महिने उलटले. महासभेचा नगरसेवक निधी देण्याचा ठराव अद्यापही नगरसचिव विभागाला सादर झाला नसताना ७५ लाख रुपयांचा निधी देण्याचे श्रेय महापौरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. भाजपच्या नगरसेवकांनी बाके वाजवून ठराव मंजूरही केला. परंतु आयुक्त कृष्णा यांनी आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच प्रस्तावाचे पाहू, असे स्पष्टीकरण दिल्याने सत्ताधारी भाजपच्या आनंदावर विरजन पडले. साडेचार तास चाललेल्या सभेत सर्वच सदस्यांनी महापौर भानसी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु या अभिनंदनासोबतच नगरसेवक निधी कधी मिळेल, याबाबत शंका उपस्थित केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ राजकीय महिलेकडून कष्टकऱ्यांची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो महिलांना राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याचे दाखविणाऱ्या एका पदाधिकारी महिलेने एक लाख ते पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला. उन्नती खाडम (रा. मुंबई नाका) असे फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

उन्नतीने तयार केलेल्या अर्जांवर संजय गांधी योजना (बेंगळुरू), इंदिरा गांधी स्वयंरोजगार योजना (दिल्‍ली) तसेच एका राष्ट्रीयीकृत बँकेचेही नाव टाकल्याने राजीवनगर, पांडवनगरी, पाथर्डीगावासह अनेक भागातील या कष्टकरी महिलांनी विश्वास ठेवल्याचे समजते. दरम्यान, अनेक दिवसांपासून गायब झालेल्या उन्नतीला कष्टकरी महिलांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पकडून आणले. पोलिसांकडून फसवणूक झालेल्या महिलांचे रात्री उशिरापर्यंत जाबजबाब व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

उन्नतीने रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना एक लाखापासून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले होते. अर्ज भरतांना त्यांच्याकडून पाच हजारापासून दीड लाख रुपयांपर्यंतची रक्‍कम गोळा केल्याचा आरोप आहे.

रक्‍कम दिल्यानंतर संबंधित अनेक महिलांनी उन्नतीकडे विचारणा केली. मात्र, ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. काही दिवसांपासून ती भेटत नसल्याने कष्टकरी महिला संतापल्या होत्या. त्यांनी थेट इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती पोलीसांनी दिली. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या आवारात सायंकाळपासून शेकडो महिलांनी तक्रार झाल्याची कैफियत मांडली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिस तक्रारदार महिलांचे जाबजबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणात अजून बऱ्याच महिलांची फसवणूक झाली असल्याचे समोर येण्याची शक्‍यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. शासकीय योजनांद्वारे मिळणाऱ्या कर्ज पुरवठ्यावरून अनेक गरजूंची फसवणूक होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या आदेशावरून खुनाचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

धरण परिसरात तरुणाच्या संशयास्पद मत्यूप्रकरणी त्याच्यात दोन मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने सातपूर पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी संबंधित तरुणाच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली होती.

गंगापूर धरणावर ४ एप्रिल २०१५ रोजी पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी राजू गुप्ता या तरुणाचा पाण्यात दुखापत झाल्याने मृत्यू झाला होता. यानंतर अन्य दोघे मित्र घाबरून त्याचा मृतदेह वासाळी, महिरावणी रस्त्यावर फाशीच्या डोंगराजवळ टाकून निघून गेले होते. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु, राजूचे वडील गणेश गुप्ता यांनी सदर मृत्यू आकस्मात नसून खून करण्यात आल्याचा आरोप केला होता. याबाबत कोर्टाने नुकतेच आदेश देत सातपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यात संशयित आरोपी म्हणून शिवशंकर देवेंद्र सिंग व गौरव रतन सिंग यांच्यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक राजेश आखाडे करत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॉडेलिंगच्या नावाखाली फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयिताविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसविल्या गेलेल्या एकास तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

हर्षद आनंद सकपाळ (२१, रा. पाथर्डी फाटा परिसर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. शरद पाटील या व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षदविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी फाटा येथे एका अलिशान भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारा हर्षद एजंट म्हणून काम करीत असल्याचे भासवत होता. मोठ-मोठ्या दिग्दर्शकांसह निर्मात्यांबरोबर ओळखी असून, इच्छूक तरुण-तरुणींना थेट पिक्चरमध्ये काम मिळवून देण्याचा दावा तो सोशल मीडियावर करीत होता. मॉडेलिंग क्षेत्रातही मुलींना संधी मिळवून देण्याचा त्याने उद्योग सुरू केला होता. हर्षदच्या अशाच एका व्हॉट्सअॅपवरील जाहिरातीची माहिती शरद पाटील यांच्या मुलीपर्यंत पोहचली होती. तिला अभिनयात रस असल्याने तिने ही माहिती वडिलांना सांगितली. हर्षदने लागलीच पाटील यांच्याशी ओळख काढत परदेशात शुटींग सुरू असल्याचे सांगितले. पाटील यांच्या तरुणीला पिक्चरमध्ये काम करण्याची संधी मिळवून देण्याचे सांगत त्याने त्यांच्याकडून टप्प्या-टप्याने तब्बल १० लाख रुपये उकळले. मात्र, पैसा घेणारा हर्षद काम मिळवून देत नसल्याची बाब पाटील यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पाठपुरावा सुरू केला. यानंतर हर्षदने मोबाइल बंद ठेवणे सुरू केले. घरीही तो सापडत नव्हता. त्यामुळे पाटील यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा आपल्याप्रमाणे हर्षदने १० ते १२ जणांना अगदी पाच ते २० लाख रुपयांना गंडा घातल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचण्याची शक्यता लक्षात घेऊन हर्षद परागंदा झाला. मात्र, पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासमवेत तसेच शहर पोलिसांच्या मदतीने मुंबई, गोवा आदी ठिकाणी त्याचा शोध सुरू ठेवला. अखेर पुण्याच्या कोथरूड येथे एका मित्राच्या घरी दडून बसलेला हर्षद त्यांना सापडला. त्याला पकडून लागलीच मुंबई नाका पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले. पोलिसांनी पाटील यांच्या फिर्यादीनुसार हर्षद विरोधात कलम ४२० तसेच ४०६ नुसार गुन्हा दाखल केला.

पॉश लाईफ स्टाईलची भुरळ
हर्षदचे आई-वडील नाशिकमध्येच राहतात. त्याची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. हर्षद आई-वडिलांना सोडून एकटाच राहतो. पाथर्डी फाटा येथे त्याने पाच रुमचा अलिशान फ्लॅट भाड्याने घेतला होता. हर्षदचा फिल्म इंड्रस्ट्रीशी थेट संबंध नाही. मात्र, तो संपर्कात आलेल्या तरुण-तरुणींना गोरेगाव येथील स्टुडीओमध्ये फिरवून आणत असे. हर्षदच्या पॉश लाईफ स्टाईलमुळे कोणाला संशय येत नव्हता. मात्र, फिर्यादी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हर्षदचे पितळ उघडे पडले.

बंटीसोबत ती ‘बबली’ कोण?
सूत्रांच्या माहितीनुसार, हर्षदसोबत एक तरुणी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहते. या तरुणीचा सदर गुन्ह्यात काही संबंध आहे काय, हे पोलिस तपासणार आहे. अनेकदा पैशांचे व्यवहार या तरुणीनेच केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, हर्षद मॉडलिंगच्या नावाखाली तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास संशयित प्रवृत्त करत असावा, असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. हर्षदने जिल्ह्यातील १० ते १२ जणांची फसवणूक केली असून, हा आकडा आणखी वाढू शकतो.


संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, हर्षदला अटक झाली आहे. हर्षदने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. फसवणूक झालेल्या नागरिकांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनशी संपर्क साधून तक्रार द्यावी. या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व बारकावे तपासले जात आहेत.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मटा भूमिका

आर्थिक लुबाडणूक करणारे असे ‘बंटी आणि बबली’ आपल्याकडे पावलोपावली आढळून येतात. मुंबईबरोबरच आता नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये निव्वळ चंदेरी दुनियेच्या आकर्षणापोटी या ठगांकडून फसवणुकीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. प्रसारमाध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्याही येत असतात. तरीही अनेक जण अशा सडकछाप मंडळींच्या भुलथापांना बळी पडतात हे विशेष. नाशिकमधील या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असण्याची शक्यता आहे. मॉडेलिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करतानाच तरुणींना वाममार्गाला लावले असण्याचा संशयही आहे. त्यामुळेच या रॅकेटचा छडा लावण्याबरोबरच तक्रारदारांना पुढे आणण्याचे आव्हानही पोलिसांना पेलावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी समितीचा २९ जूनपासून दौरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरुवार (दि. २९) पासून जिल्ह्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. ही समिती जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांचा आढावा घेणार आहे.

२९ जून ते २ जुलै या कालावधीत ही समिती नाशिकमध्ये असणार आहे. विविध सरकारी विभागांमध्ये अनुसूचित जमातीच्या पदांवर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा, रिक्त पदे, अनुसूचित जमातीसाठी राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, तसेच या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती यासह विविध विषयांवर ही समिती आढावा घेणार आहे. आमदार रूपेश म्हात्रे या समितीचे अध्यक्ष असून, त्यामध्ये १५ सदस्य आहेत. समिती गुरुवारी (दि. २९) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहे. नाशिक शहर व ग्रामीण पोलिस विभाग, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, एकात्मिक आदिवासी प्रकल्प नाशिक व कळवण विभाग, महापालिका, जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा त्यामध्ये घेतला जाणार आहे. शुक्रवारी (दि. ३०) वस्तीशाळा व आदिवासी प्रकल्पांना भेटी देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीत शिवसेनेचे राजकारण

$
0
0

सुकाणू समितीमधील सदस्यांचा नाशिकमध्ये आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरसकट कर्जमाफी हीच सुकाणू समितीचा मुख्य मागणी असून, सरकारने ती तत्वत: मान्यदेखील केली आहे. परंतु, याचे श्रेय मिळत नसल्यामुळेच शिवसेनेने शेतकऱ्यांना १० हजार रुपये तत्काळ कर्जाची मागणीमध्ये घुसवली. तसा शासन निर्णयही करवून घेतला. परंतु, त्यामधील अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. कर्जमाफी आणि शेतकरी आंदोलनाचे शिवसेना स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण करीत आहे, असा आरोप सुकाणू समितीच्या काही सदस्यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केला. शेतकरीहिताच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

एका लाखापर्यंतच्या कर्जमाफीची सरकारने घोषणा केली असली तरी ती मान्य नसल्याचा पवित्रा शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीने स्वीकारला आहे. सोमवारी राज्य सरकारची उच्चाधिकार समिती आणि सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. कर्जमाफीसाठी शेतजमिनीची अट न ठेवता एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. एक ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या परतफेडीमध्ये सरकार काही वाटा उचलणार असून, नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना आणणार असल्याचे या बैठकीत जाहीर केले आहे. परंतु, सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले. त्यानंतर मंगळवारी नाशिकमध्ये सुकाणू समितीच्या काही सदस्यांनी पत्रकार परिषदेत समितीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी समितीचे सदस्य करण गायकर, गणेश कदम आणि औरंगाबाद येथील आप्पासाहेब कुडेकर उपस्थ‌ति होते. यावेळी गायकर म्हणाले, एक लाखांपर्यंतचेच कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु, त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील. म्हणूनच सरसकट कर्जमाफी हीच आमची मागणी आहे. किमान १५ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जावे, असा पर्याय आम्ही सरकारच्या समितीमधील पदाधिकाऱ्यांना सुचविला आहे. चर्चेसाठी आम्ही केव्हाही तयार असून, सरकारकडून सन्मानजनक तोडग्याची अपेक्षा आहे. मागण्या मान्य करण्याऐवजी सरकार वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे सरकार विरोधात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सरकार शेतकऱ्यांचे आहे, की व्यापाऱ्यांचे असा प्रश्न आम्हाला पडला असून, सरकार शेतकरीहिताच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप कदम यांनी केला. सुकाणू समितीला बैठकीसाठी बोलावल्यानंतर समितीमधील अनेक सदस्यांना बैठकीस बसू न देण्याची भूमिका सरकारच्या समितीने घेतली. सरकारचे हे कृत्य म्हणजे शेतकऱ्यांचा अवमान असल्याचे ते यावेळी म्हणाले. शेतकरी आंदोलन आणि कर्जमाफी या विषयात शिवसेनेचे नेते राजकारण करीत असल्याचा आरोप कुडेकर यांनी केला. शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे तत्काळ कर्ज देण्याच्या शासन निर्णयात अनेक जाचक अटी आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना सुकाणू समितीच्या सदस्यांना विश्वासात घेतले गेले नाही.

सरकार ‘चले जाव’

सुकाणू समितीने केलेल्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सरकार विरोधात पुन्हा संघर्ष करण्याची तयारी या पत्रकार परिषदेमध्ये दर्शविण्यात आली. सरकार विरोधात चलेजावचा नारा देण्यात आला असून, बुधवारी (२१ जून) तहसील कार्यालयांवर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी १० हजार रुपये तत्काळ कर्जच्या शासन निर्णयाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे निधन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचावन्नहून अधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारे प्रख्यात कलादिग्दर्शक व राज्य पुरस्कारप्राप्त अरुण (दादा) विठ्ठल रहाणे (वय ५७) यांचे हृदयविकारामुळे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शकुंतला, दोन मुले प्रसाद व राहुल, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नाशिक अमरधाममध्ये दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘जत्रा’ या मराठी चित्रपटातील भरत जाधव व क्रांती रेडकर यांच्यावर चित्रित झालेल्या ‘कोंबडी पळाली’ या गीतासह ‘आई भवानी तुझ्या कृपेने पावशी भक्तांना’ या गीताचेही कलादिग्दर्शन अरुणदादांनी केले होते.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शूटिंगच्या निमित्ताने त्यांनी प्रवास केला होता आणि त्या परिसरातील कलावंतांशी त्यांचा संवाद होत असे. कलादिग्दर्शनातील अनेक मानाचे सन्मान त्यांना प्राप्त झाले. चित्रपटाच्या विषयानुसार प्रभावी आणि वास्तवाकडे नेणारी मांडणी हे त्यांच्या कलादिग्दर्शनाचे वैशिष्ट्य होते. अनेक नव्या- जुन्या दिग्दर्शकांशी ते अभ्यासपूर्ण चर्चा करीत असत. त्यामुळे चित्रपटाची नेमकी गरज त्यांना कळत असे. कमीत कमी जागेत आवश्यक त्या वस्तूंचा उपयोग करून वास्तवतेचा आभास करण्याची त्यांची खासियत होती.

वॉचमन ते कलादिग्दर्शन

अरुण रहाणे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे येथील होते. मात्र, कामाच्या निमित्ताने नाशिकला येणे झाले आणि ते नाशिकचे झाले. नाशिकमध्ये आल्यानंतर वॉचमन कम कामगार असे काम करून त्यांनी सुरुवातीचे दिवस काढले. ते दिवसभर कंपनीतील काम व रात्री साइनबोर्डाचे पेंटिंग करीत असत. व्यावसायिक कलाकार प्रकाश देशपांडे यांनी चांगल्या कामाची शिस्त लावली. कामातूनच १९८९ मध्ये शिस्तप्रिय दिग्दर्शक प्रदीप पाटील यांच्याशी ओळख झाली.

नाटकाची आवड असल्याने त्यांनी हरीश जाधव यांच्याशी ओळख करून दिली आणि मालेगाव येथील एकांकिका स्पर्धेसाठी त्यांना एंट्री मिळाली. ‘व्हाइट केन’ नावाची ही एकांकिका पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवून गेली आणि अरुण रहाणे यांचा प्रवास सुरू झाला. प्रत्येक राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळत असे. नाटकांप्रमाणेच चित्रपटांचे कलादिग्दर्शन करावे, असे त्यांच्या मनात आले आणि संधी चालून आली. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजस्विनी’ चित्रपटाच्या युनिटमध्ये त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांनी एक भूमिकादेखील केली होती.

कलादिग्दर्शक म्हणून ‘जय सप्तशृंगीमाता’ या चित्रपटाने अरुण रहाणे यांनी सुरुवात केली. पुढे ‘तोचि एक समर्थ’ हा चित्रपट केला. राजू फिरके दिग्दर्शित ‘कवडसे’, राजीव पाटील दिग्दर्शित ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. १९९९ ते २०११ दरम्यान ‘कवडसे’, ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘राजमाता जिजाऊ’, ‘उमंग’, ‘ऑक्सिजन’, ‘पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’, ‘तमाशा’, ‘हाच खेळ उद्या पुन्हा’, ‘जय अठरा भुजा सप्तशृंगीमाता’ असे ५५ हून अधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदागौरव, जनस्थान या सोहळ्याच्या नेपथ्याचे कामही रहाणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८३ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कॅम्प रस्त्यावरील स्टेट बँक कॉर्नर परिसरात पोलिसांनी मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान एका चारचाकी वाहनातून पाचशे व हजाराच्या सुमारे ८३ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

येथील अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यापासून शहरात जुन्या नोटा कमिशनवर बदलून देण्याचे रॅकेट सक्रिय झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी शहरातील स्टेट बँक परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचला. त्यांनी चारचाकी वाहनाची (एमएच १६/बीएच १०००) तपासणी केली असता, एका बॅगमध्ये सुमारे ८३ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक अब्दुल अहमद अब्दुल रज्जाक (वय ३२, रा. मूळ सुरत, हल्ली मुक्काम वडाळा, नाशिक) याच्यासह अब्दुल अहमद गुलाम अहमद (वय ४७, रा. इस्लामपुरा मालेगाव), मोहम्मद अमीन मोहम्मद हसन (५६ रा. कुंभारवाडा, मालेगाव) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी अब्बास खान जरबून खान (४७ रा. नंदुरबार), नटवरलाल शिवलाला वर्मा (रा. मालेगाव), वर्मा यांचा जावई संकेत मांडण (रा. बांबोरी, नगर) व वाहनमालक रहीम युसूफ मन्सुरी (४७, रा. दोंडाईचा), रईस दलाल (रा. मालेगाव) हे संशयित या रॅकेटमध्ये सामील असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून या चौघांनाही पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात शहरातील मोठी हस्ती सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या नोटा गुजरातमधून मालेगाव येथे कमिशनवर बदलून घेण्यासाठी आणण्यात आल्या असल्याची माहिती प्राथमिक तपासाअंती समोर आली आहे. या कारवाईबाबत प्राप्तिकर विभागालाही माहिती कळवण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरात प्रथमच जुन्या नोटा जप्त करण्याची कारवाई झाली असून, यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके, नाना बरडे, लक्ष्मण खांडगे, अनिल पाटील, विजय देवरे आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images