Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टेरेस, बेसमेंटच्या अनधिकृत वापराचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची खाली तिजोरी भरण्यासाठी स्थायी समितीने हालचाली सुरू केल्या असून, उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील खासगी व व्यावसायिक इमारतींच्या टेरेस व बेसमेंटच्या वापराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित जागा वापराचे सर्वेक्षण दीड मह‌िन्यात करून स्थायी समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. या सर्वेक्षणामुळे या इमारतींवरील टेरेस आणि बेसमेंटचा अनधिकृत वापर समोर येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून उत्पन्न वाढविता येणार आहे.

शहरातील खासगी व व्यावसायिक इमारतींच्या बेसमेंट आणि टेरेसचा अनधिकृत वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स, पार्किंग, व्यावसायिक गाळे अनधिकृतपणे थाटण्यात आली आहेत. यापासून स्थानिक इमारतधारकांना उत्पन्न मिळत असले तरी, पालिकेला मात्र कोणताही कर मिळत नाही. स्थानिक रहिवाशांच्या मालकीच्या इमारती असल्या तरी, त्याच्या वापरावर पालिकेकडून कर आकारला जात असून, त्यावर उत्पन्न मिळते. परंतु, शहरात अनधिकृतपणे टेरेस आणि बेसमेंट वापर सुरू असून, त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून पालिकेला मुकावे लागत आहे. या सर्वांकडून कर वसूल केल्यास पालिकेच्या तिजोरीत लाखोंची भर पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या मह‌िन्यात पालिकेला उत्पन्नाचे अधिकाधिक स्रोत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थायी समितीनेही पावले उचलत जास्तीत जास्त उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शुक्रवारच्या स्थायी समिती बैठकीत सभापती गांगुर्डे यांनी शहरातील बेसमेंट आणि टेरेसच्या वापराची माहिती नगररचना विभागाला विचारली.परंतु, नगररचना विभागाकडे अशी माहितीच उपलब्ध नव्हती. त्यामुळे सभापतींनी शहरातील सर्व खासगी व व्यावसायिक इमारतींच्या बेसमेंट आणि टेरेसचा वापर कशासाठी केला जात आहे, याबाबतचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या टेरेस आणि बेसमेंटचा वापर सध्या कशासाठी सुरू केला जात आहे, त्यासंदर्भातील परवानगी तिथे होती काय, याबाबतचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे निर्देश त्यांनी नगररचना विभागाला दिले आहेत.


मोबाइल टॉवरही रडारवर

टेरेस आणि बेसमेंटच्या अनधिकृत वापरासोबतच मोठ्या प्रमाणावर इमारतींवर अनधिकृतपणे मोबाइल टॉवर उभे करण्यात आले आहेत. या टॉवर कंपन्यांकडून पालिकेला कर भरण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या मोबाइल कंपन्यांकडूनही कर वसुली करून उत्पन्न वाढविण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत.

मुदतवाढीला ब्रेक

स्थायी समितीवर वारंवार येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावांना सदस्यांनी शुक्रवारी ब्रेक लावला. भूसंपादन विषयाला मंजुरी देतानाच, जवळपास ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. यासंदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. त्यात वैद्यकीय विभागातील आरोग्य व कुटूंब कल्याण समितीत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या ३३ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका शाळांना घरघर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव येथील महापालिका शाळा क्रमांक ६९ व ७० मधील दुरवस्थेचे ग्रहण कायम असून, पाणी, शाळेत स्वच्छतागृह, नियमित साफसफाईचा अभाव आदी मूलभूत सुविधांची वानवा दिसून येत आहे. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरणाऱ्या या शाळेच्या वर्षभरापासून असलेल्या स्थितीवरून प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड होत असून, शिक्षण समिती व महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी. पालकांकडून करण्यात येत आहे.

महापालिकेच्या या शाळेला विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे शाळेत आल्यावर मुलांचा उत्साह वाढण्याऐवजी निरुत्साह वाढत आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराशेजारीच मोठ्याप्रमाणात कचरा पडलेला असतो. शाळेतील विद्यार्थ्यांची मूलभूत गरज असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. त्याची नियमित स्वच्छता होत नसल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना साथीचे आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतागृहाच्या खिडक्यादेखील तुटलेल्या आहेत.

शाळेच्या जुन्या इमारतीचीही मोठी दुरवस्था झाली आहे. दरवाजे, पत्रे तुटलेले आहेत. त्यामुळे पाऊस आला, तर विद्यार्थ्यांना वर्गात बसणे अवघड होत आहे. शाळेच्या मैदानावरही कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन शहरातील महापालिका शाळांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व पालकांनी केली आहे.

पावसाळ्यात मैदानावर तळे

शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात चढ असल्यामुळे गावातील संपूर्ण पाणी शाळेच्या आवारात जमा होते. त्यामुळे शाळेच्या मैदानात कायम पाणी साचलेले असते. परिणामी डासांचादेखील त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे विद्यार्थ्यांच्या कमरेपर्यंत पाणी साचले होते. यंदाही अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

आवारात ट्री गार्डचे भंगार

शाळेच्या आवारात मोठ्याप्रमाणात ट्री गार्डच्या लोखंडी जाळ्या पडलेल्या आहेत. बऱ्याचदा विद्यार्थीदेखील त्या ठिकाणी खेळत असतात. नकळतपणे धक्का लागल्यास दुखापत होऊ शकते. शिवाय शाळेत अनेकदा गैरप्रकार घडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंचा गैरवापर केल्यास मोठा अपघात होण्याचीदेखील भीती वाढली आहे.

या शाळेतील स्वच्छतागृहासह आवारदेखील स्वच्छ राहील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. पावसाळ्यात गावातील संपूर्ण पाणी उताराने शाळेच्या आवारात जमा होते. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

-संदीप लभडे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’साठी नाशिक सज्ज

$
0
0

देशभरात १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीसाठी नाशिकच्या कामटवाडे येथील सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स व कस्टम कार्यालय सज्ज झाले आहे. या कार्यालयात सॉफ्टवेअर अपडेट करण्यापासून विविध साहित्य शिफ्टिंगचीही तयारी सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी जीएसटीची ट्रेनिंग, विविध क्षेत्रातील व्यापारी, उद्योजकांची कार्यशाळाही या कार्यालयात सुरू आहेत. नाशिकमध्ये असलेल्या कार्यालयात एका आयुक्तांसोबत दोन अधिकचे आयुक्त असतील. त्यात एक ऑड‌िट व दुसरे अपील विभाग सांभाळणार आहेत.

प्रस्तावित वस्तू व सेवाकराच्या तरतुदी जिल्हा आणि ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यासह जीएसटीचे कार्यालयही सज्ज करण्याचीही तयारी सुरू आहे. नाशिकमध्ये सेंट्रल एक्साइज ऑफिसमध्ये फाइलींचे गठ्ठे, संगणक, झेरॉक्स मशिनसह रॅकचे शिफ्टिंगचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. १ जुलैपर्यंत सर्व कर्मचारी या नव्या दालनात जबाबदारी स्वीकारतील. कामटवाडा येथे सेंट्रल एक्साइजचे कार्यालय असून, त्यात ४० दालने आहेत. त्यातील सर्व कार्यालय बदलले आहेत. या कार्यालयात आयुक्तासह विविध अधिकारी व ३११ कर्मचारी आहेत. त्याचबरोबर अपील आयुक्त व ४१ कर्मचारी याच इमारतीत काम करणार आहेत. त्यामुळे आता ३५२ कर्मचारी व दोन आयुक्त या कार्यालयात काम करणार आहेत. त्याचबरोबर गडकरी चौकात इन्कम टॅक्स ऑफिसजवळ असलेल्या कार्यालयात आता ऑडिटचे आयुक्त बसतील. त्यांच्याकडे १८१ कर्मचाऱ्यांचा ताफा असेल.

असे आहेत आयुक्त

g जीएसटीसाठी केंद्रीय वस्तू व सेवाकर आयुक्त-राजपाल शर्मा

g ऑड‌िट आयुक्त - श्रीकांत पाटील

g अपील आयुक्त - मनोज कृष्णा

जीएसटीसाठी गेल्या काही दिवसांपासून आम्ही जनजागृती करून कार्यशाळा घेत आहोत. त्याचप्रमाणे कार्यालयतही आमची तयारी सुरू असून, कर्मचाऱ्यांनाही ट्रेनिंग दिले जात आहे. १ जुलैला आमचे कार्यालय जीएसटीसाठी सज्ज असणार आहे.

-राजपाल शर्मा, आयुक्त सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स व

कस्टम ऑफिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

$
0
0

राज्य सरकारची कर्जमाफी; जिल्ह्यातील सुमारे ६८० कोटींचे कर्ज होणार माफ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांचे ६८० कोटी रुपयांच्या आसपास कर्ज माफ होणार आहे. दीड लाखापर्यंत ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९१ हजार ३३६ आहे. त्यांच्याकडे ५०० कोटी ५४ लाख थकीत रक्कम असून, ती सर्व माफ होणार आहे.

त्याचप्रमाणे दीड लाखाच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त त्यातून दीड लाख मिळणार आहे. त्याची संख्याही मोठी आहे. जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत व इतर बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजार रुपये मिळणार असून, त्याचा आकडा अद्याप आलेला नाही.

सरकारच्या कर्जमाफीचा २०१६ - २०१७ या आर्थिक वर्षात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.

जिल्हा बँकेने या काळात तब्बल १,७१९ कोटी १८ लाख रुपये कर्ज वाटप केले. ते एकूण उद्दिष्टांपैकी ३४२ कोटींनी जास्त होते. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असून, यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्जदेखील माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज

भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे.

सरकारने २०१७ पर्यंत जर सरसकट कर्जमाफी केली असती तर जिल्ह्यातील अल्प, मध्यम, बहुभूधारक अशा जिल्हा बँकेच्या ३ लाख ६० शेतकरी सभासदांना फायदा झाला असता. पण सरकारने जून २०१६ पर्यंतच ही कर्जमाफी केल्याने सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनाच तो

मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील अमरधामला समस्यांचा विळखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशवाडीच्या दक्षिणेला बांधण्यात आलेल्या पंचवटी अमरधामची दुरवस्था वर्षानंतरही कायम आहे. वर्षभरात या अमरधाममध्ये कोणत्याच प्रकारची सुविधा देण्यात आली नाही. तसेच येथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न झालेला नाही. चोरीला गेलेल्या लोखंडी जाळ्या, प्रवेशद्वाराजवळ साचलेला कचऱ्याचा ढिगारा, पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या गटारी तुंबलेल्या, ढापे गंजलेले अशा विविध समस्यांनी पंचवटी अमरधामला ग्रासले आहे.

पंचवटी अमरधाममध्ये असलेल्या नऊ बेडपैकी पहिल्या आणि नवव्या बेडच्या जवळच्या लोखंडी जाळ्या भुरट्या चोरट्यानी चोरून नेल्या आहेत. या जाळ्या पुन्हा बसविण्याची तसदी घेण्यात आली नाही. चौथ्या बेडच्या जवळच्या पायऱ्यांच्या फरशा उखडून निघाल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा ढिगारा नित्याचा झाला आहे. पाण्याच्या टाकीलगत असलेल्या गटारीतही कचरा आणि प्लास्टिक पिशव्या साचल्याने पाणी तुंबले आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अमरधाममध्ये अत्यंविधीप्रसंगी अनेक लोकप्रतिनिधी येत असतात. त्यांचेही या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या समस्या वर्षभरानंतरही तशाच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंदीकरणात ‘खासगी’ अडथळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालक व रहिवाशांनी गंगापूररोड रुंदीकरणाची मागणी केली होती. यानंतर रस्त्यात येणाऱ्या वृक्षांचा अडथळा महापालिकेने न्यायालयाच्या आदेशावरून दूर केला होता. परंतु आता रस्ता रुंदीकरणात खासगी शिक्षण संस्थेच्या जागेचा अडथळा आला आहे. याबाबत महापालिकेने वेळोवेळी खासगी संस्थेला रस्त्यासाठी जागा देण्याबाबत पाठपुरावाही केला होता. खासगी संस्थेने मात्र रस्त्यासाठी जागाच दिली नसल्याने अरूंद रस्त्यावरून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी गंगापूररोडवरील रहिवाशांनी केली आहे.

उद्योजक, व्यावसायीक, सरकारी अधिकाऱ्यांसह अनेकांची आवड गंगापूररोडला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत झपाट्याने गंगापूररोडची लोकवस्ती वाढली आहे. वाढत्या लोकवस्ती गंगापूररोडचा रस्ता रुंदीकरणा करण्यात यावा, अशी सातत्याने मागणी केली जात होती. परंतु रस्त्यात येणाऱ्या वृक्षांच्या अडथळ्यांमुळे रस्ता रुंदीकरण होऊन देखील वाहनचालकांना वृक्षांच्या अडथळा सहन करावा लागत होता. यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने रस्त्यात येणाऱ्या वृक्षांचा अडथळा दूर केला खरा. परंतु अनेक ठिकाणी रुंदीकरणासाठी जागाच खासगी मालकांनी दिल्या नसल्याने महापालिकेचे अडचण झाली आहे. यात एका नामांकीत शिक्षण संस्थेने रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली असताना रस्त्यासाठी मात्र जागाच दिली नसल्याने अरूंद रस्त्यावरून वाहनचालकांना कसरत करून वाहने चालविण्याची वेळ आली आहे.

रहदारीवर परिणाम

गंगापूर रोडवर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळे आल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक ठिकाणी खासगी जागांचे हस्तांतरण अजून बाकी आहे. त्यामुळे या भागात रस्त्याच्या कडेला असलेली वाहने आणि रस्त्यावरील वाहनांमुळे रोजच वाहतूक कोंडी होते.

दुभाजक टाकण्यात अडथळे

बेंडकुळे मळ्यापासून गंगापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीही खासगी मालकांनी जागा न दिल्याने दुभाजक टाकण्यात अडथळे आले. यामुळे नेहमीच रहदारी असलेल्या गंगापूररोडवर वाहनचालकांना कसरतीचा सामना करण्याची वेळ येत आहे. महापालिका आयुक्तांनी खासगी जागा मालकांची स्वतंत्र बैठक घेत रस्ता रुंदिकरणासाठी जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांसह रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलवारीचे पंढरपुराकडे प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्टच्या पंढरपूर सायकलवारीने शुक्रवारी सकाळी विठूनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान केले. भरत सोनवणे व रामचंद्र गावित हे त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तिनाथांच्या चरणी माथा टेकवून भगवा ध्वज नाशिकला घेऊन आले. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी भगवा झेंडा दाखविल्यानंतर गोल्फ क्लब मैदानावरून सायकलिस्ट पंढरपूरकडे रवाना झाले.

यावर्षी प्रथमच वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज, रविवारी (दि. २५) रोजी सायकलचा रिंगण सोहळा रंगणार आहे. पंढरपूरजवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात हा सोहळा होणार असून, तो अनुभवण्याची उत्सुकता वारीमध्ये सहभागी सायकलिस्टमध्ये दिसून आली. वारीचे संकल्पक आयपीएस अधिकारी हरीश बैजल आपल्या दोन मुलांसह वारीत सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई येथील एसीपी रवींद्र क्षीरसागर, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीपी वाल्मीक पाटील, ठाणे शहर येथील एसीपी कन्हय्या थोरात, ठाणे आरटीओचे नीलेश धोटे यात सहभागी झाले आहेत. अहमदनगर, पुणे, मुंबईसारख्या महानगरांतूनही सायकलिस्ट वारीमध्ये सहभागी होणार आहेत. या वारीत सहभागी झालेल्या साडेचारशेहून अधिक सायकलिस्ट वारकऱ्यांना विठ्ठलभेटीची आस लागली आहे. त्यामुळे ३८ अंश तापमानातही सर्व सायकलिस्टने उत्साहात सायकलवारीचा पहिला टप्पा पार केला. लोणी गावाजवळील अतिशय जुन्या अशा २० ते ३० वडाच्या झाडांजवळ नंदनवनात विश्रांती घेताना सायकलिस्टचा सर्व थकवा निघून गेल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.

--

सिन्नरमध्ये जोरदार स्वागत

सिन्नर सायकलिस्टने पंढरपूर सायकलवारीचे सिन्नरमध्ये जोरदार स्वागत केले. दांडेकर कॉलेजच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी यांनी सिन्नर शहरातून सहाव्या सायकलवारीसाठी सहभागी झालेल्या सायकालिस्टचे स्वागत केले. पुढच्या वर्षी होणाऱ्या वारीसाठी सिन्नर शहरातून शंभरहून अधिक सायकलिस्टने सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, नगराध्यक्ष किरण डांंगळे, दांडेकर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सोनखासकर, नगरसेवक रामभाऊ लोणारे, वारीत सहभागी झालेले सिन्नर सायकलिस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप मोरे, मुकेश चव्हाणके आदी उपस्थित होते.

--

सायकलवारी टेंभुर्णीत...

सायकलवारी शनिवारी दुसऱ्या दिवशी टेंभुर्णीत पोहोचली आहे. या वारीच्या अखेच्या टप्प्यात पंढरपूरच्या खेडलेकर महाराज पटांगणात सायकल रिंगण सोहळा रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या सायकल रिंगण सोहळ्यात सुमारे ४०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. त्यात ५० लहान मुलांचा समावेश राहणार आहे. या सर्वांना रिंगण सोहळ्याची अनुभूती घेण्याची संधी मिळणार आहे. सोहळ्याची तयारी ​​करण्यासाठी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी आणि त्यांची कृती स​​मिती प्रयत्न करीत आहे.​​ पर्यावरणरक्षणाचा संदेश देत सायकलवारीत सहभागी लहान मुलांनी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांत स्वच्छता व पर्यावरणाबाबत जनजागृती केली.

--

यंदाची प्रमुख वैशिष्ट्ये

-खेडलेकर महाराज पटांगणात रंगणार सायकल रिंगण

- ‘शून्य कचरा, शून्य प्लास्टिक’ची अंमलबजावणी

-वय वर्षे ८ पासून ७० वर्षीय वारकरी सहभागी

-मुंबई, पुणे, ठाणे शहरातून येणार सायकलिस्ट वारकरी

-वैद्यकीय व्यवस्था सेवेस राहणार तत्पर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाऊचा डबा बनवा ‘पौष्टिक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळा नवीन वर्षासह नुकत्याच सुरू झाल्या असून, चिमुकल्यांना रोज डब्यात काय द्यायचे, हा प्रश्नदेखील नव्याने त्यांच्या आईसमोर उभा राहिला आहे. हा प्रश्न मिटविण्यासाठी व चविष्ट, पण आरोग्यदायी खाऊच मुलांना मिळावा यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ‘आरोग्यदायी आणि चविष्ट खाऊचा डबा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पौष्टिक पिझ्झा, स्पिनॅच रोज, नॅचोज असे चिमुकल्यांच्या आवडीचे वेगवेगळे, पण पौष्टिक पदार्थ व शाळेच्या डब्यात देता येतील असे पदार्थ शिकण्याची संधी आज, रविवारी (दि. २५) मिळणार आहे. वैविध्यपूर्ण, रुचकर आणि चिमुकल्यांना आवडणारे पदार्थ या कार्यशाळेत शिकविले जाणार आहेत.

ही कार्यशाळा दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार असून, प्रिया करंदीकर यामध्ये खाऊचा पौष्टिक डबा बनवायला शिकविणार आहेत. कल्चर कल्ब सदस्यांना २०० रुपये, तर इतरांना ४०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पी अॅण्ड टी कॉलनी, हॉटेल सिबलजवळ, त्र्यंबकरोड ही कार्यशाळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंदिवानही करणार कॅशलेस व्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना कॅशलेस व्यवहार करता यावेत यासाठी लवकरच स्मार्ट कार्ड योजना राबविली जाणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी दिली. एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या योजनेमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ३२०७ बंदिवानांना कॅशलेस व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे.

डिजिटल इंडिया हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. या योजनेद्वारे नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. याच उद्देशाने नाशिकरोड कारागृहातील सर्व बंदिवानांना एचडीएफसी बँकेचे स्मार्ट कार्ड लवकरच देण्याचे नियोजन कारागृह प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ३०८७ पुरुष व १२० महिला बंदी आहेत.

--

कँटीनमध्ये कॅशलेस खरेदी

या अभिनव योजनेमुळे मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना दरमहा अडीच हजार रुपयांपर्यंतची खरेदी कारागृह कँटीनमध्ये करता येणार आहे. कार्ड स्वाइप करून बंदिवान खरेदी करू शकतील. या सुविधेसाठी प्रत्येक बंदिवानांकडून वार्षिक दीडशे रुपये कर आकारणी केली जाणार आहे. शासनाच्या निर्देशांनुसार ही योजना राबविली जात आहे.

--

वेळेची होणार बचत

कारागृहातील बंदिवानांना खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे मिळविण्यासाठी सध्या अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. फोन करण्यासाठी पाच रुपये मिळविण्यासाठीदेखील बंदिवानांचा व प्रशासनाचा मोठा वेळ खर्च होत असे. परंतु, कॅशलेस सुविधेमुळे आता वेळेची बचत होणार आहे.

--

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सर्व बंदिवानांना कॅशलेस व्यवहार करता यावेत यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेमुळे बंदिवानांसह प्रशासनाच्या वेळेच्या बचतीसह प्रशासकीय मनुष्यबळाचीही बचत होण्यास मदत होईल.

-राजकुमार साळी, अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंग‍ळेंचा फैसला मंगळवारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास ठरावाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सहकार कायद्यानुसार पंधरा दिवसाच्या आत बाजार समितीची सभा बोलावून सभापतींची निवड करावी लागणार आहे, असे असले तरी मंगळवार (दि. २७) रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे बाजार समितीच्या संचालकांच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यात काय निर्णय होईल, संचालक मंडळ बरखास्त होईल की नाही, पुन्हा निवडणुका होतील काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम हडप करण्याच्या आरोपामुळे अडचणीत असलेल्या पिंगळे यांचे बाजार समितीचे सत्तास्थान आता हा ठराव मंजूर झाल्यास हातातून जाणार आहे. मासिक सभांमध्ये विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा न करता अन्य विषय इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. बाजार समितीच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. स्वतःच्या प्रसिध्दीसाठी जाहिरातींवर बाजार समितीच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. बाजार समितीवरील १२१ कोटी रुपयांच्या कर्जांपैकी राज्य सरकारी बँकेने सामोपचार परतफेड योजनेत ४४ कोटी रुपये माफ केले होते. त्यामुळे ७७ कोटी रुपये ३० जून २०१४ पर्यंत भरणे आवश्यक होते. पण, ही रक्कम फेडण्यास चालढकल केल्याने ४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले असे संचालक म्हणणे असल्याने अविश्वास ठराव आणण्यासाठी १३ संचालकांनी विशेष सभा बोलावण्याची विनंती केली आहे.बाजार समितीच्या या घडामोडींकडे सत्ताधारी स्थानिक आमदारांनी लक्ष घातल्याची चर्चा होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीदेवी मंदिर आजपासून खुले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

संरक्षक जाळीत दगड अडकल्याने सप्तशृंग गडावरील (ता. कळवण) येथील श्री सप्तशृंगदेवी मंदिर २१ जूनपासून बंद करण्यात आले होते. हे दगड काढण्याचे काम पूर्ण झाले असून, मंदिर रविवारपासून (२५ जून) पूर्ववत खुले होणार आहे. मात्र, हे मंदिर पहाटे साडेपाच ते रात्री साडेनऊपर्यंतच खुले राहणार आहे.

मंदिर खुले करण्याबाबतचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी व देवस्थानला पाठविले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाची महती असलेल्या सप्तशृंगीदेवी मंदिर परिसरात १२ जून रोजी लहान-मोठे अनेक दगड कोसळले होते. मात्र, संरक्षक जाळीत हे दगड अडकल्यामुळे धोका टळला. अद्याप दुसऱ्या टप्प्यातील थांबलेले संरक्षक जाळीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. जाळीत अडकलेल्या एका दगडाचे वजन अडीच टन होते, तर एक दगड ७०० किलो वजनाचा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षद सपकाळच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

तक्रारदारांची संख्या १०च्या घरात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉलीवूडसह मराठी सिनेमांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरूण तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित हर्षद आनंद सपकाळच्या पोलिस कोठडीत २८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली. एकास तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी हर्षदला अटक केली होती.

शरद पाटील या व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा येथे एका अलिशान भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारा हर्षद एजंट म्हणून काम करीत असल्याचे भासवत होता. या प्रकरणी २० जूनला अटक केल्यानंतर कोर्टाने त्यास २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. हर्षदविरोधात आतापर्यंत जवळपास १० तक्रारदार पुढे आले आहेत. त्यात एका मोलकरणीचा देखील समावेश असून, अभिनेता रितेश देशमुख याच्या घरी कामाला लावून देतो असे सांगत त्याने तिच्याकडून २५ हजार रुपये उकळले आहेत. याबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले, की संशयित आरोपीविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा वेगळा गुन्हा दाखल आहे. सध्या तो मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात अटक असून, चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यातील चौकशी संपल्यानंतर त्याला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरे माझ्या मागल्या...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या १४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाच्या आठवणी ताज्या असतानाच शनिवारी पुन्हा शहराला संततधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा शहराची दैना उडाली. पावसाळापूर्व कामांच्या ढिलाईमुळे शनिवारी पुन्हा ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज गायब झाली, तर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतुकीवर त्याचा विपरित परिणाम झाला. पंचवटी, जुने नाशिक, भद्रकाली, सीबीएस, शालिमार, द्वारका, इंदिरानगर, सातपूर या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे वादानंतर प्रशासनाने घाईघाईत केलेल्या नालेसफाईचा कोणताही फायदा झाला नाही. अनेक भागात दिवसभर वीज गायब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, महावितरणच्या कामांचीही पोलखोल झाली. गेल्या वेळेपेक्षा पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात असल्याने सराफ बाजारात काहीसी समाधानकारक स्थिती होती.

--

खंडित वीजपुरवठ्याचा ‘वार’

सिन्नर फाटा ः देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील विविध भागातील तब्बल सतरा वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा वेगवेगळ्या वेळेत खंडित राहिल्याने लाखो नाशिककरांना खंडित वीजपुरवठ्याचा ‘वार’ सहन करावा लागला. खंडित वीजपुरवठयाचे वेळापत्रक जाहीर केलेले असले, तरी बहुतांश ठिकाणी नियोजित वेळेपेक्षाही जास्त काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. काही भागात तब्बल पाच तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिक बेहाल झाले महावितरणकडून प्रत्येक आठवड्याला वीजवाहिन्यांची दुरुस्ती का करावी लागते, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. वीजपुरवठ्यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी महावितरणने मोबाइल ऍपची सुविधा सुरू केलेली आहे. या सुविधेचा नागरिक वापर करीत आहेत.या पद्धतीने तक्रार केल्यानंतर नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्याचा मोबाइल नंबर एसएमएसद्वारे कळविला जातो. मात्र, या मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यास संबंधित कर्मचारी नागरिकांची तक्रार सोडविण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

---

औरंगाबाद नाक्यावर साचले पाणी

पंचवटी ः रस्ता तयार करताना पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था केली नसल्याने औरंगाबाद नाका येथील रस्त्यावरच पाणी साचू लागले आहे. शनिवारी येथे साचलेल्या पाण्यातून वाहने चालविणे अवघड बनले होते. थोड्याशा पावसाने येथे पाणी साचत असल्यामुळे, तसेच वाहनचालकांना या पाण्याचा आणि खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे.

--

महात्मानगरला वृक्ष कोसळले

सातपूर ः परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या व घरात पावसाचे पाणी जाण्याच्या घटना शनिवारी घडल्या. जोरदार पावसामुळे महात्मानगर भागात चार ठिकाणी वृक्ष कोसळले. सुदैवाने हानी टळली. गणपती मंदिर, गुलमोहर कॉलनी, गंगापूररोड व नरसिंहनगर येथे पावसाने वृक्ष कोसळल्याचा घटना घडल्या. रस्त्यालगत झुकलेल्या वृक्षांच्या फांद्याही अग्निशमन दलाचे जवान व उद्यान विभागाने काढल्या. सातपूर अग्निशमन दलाच्या जवानांनी उद्यान विभागाच्या वतीने कोसळलेले वृक्ष हटविले. परिसरात ठिकठिकाणी साचलेले पाणी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून वाहते करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

--

सिडकोत रस्ते जलमय

सिडको ः परिसरात संततधार पावसाने हजेरी लावल्याने सिडकोतील सर्वच रस्ते जलमय झाले होते. महापालिकेच्या वतीने मागील आठवड्यातील गटारी व नाले साफसफाई झाल्याने पाणी साचण्याचे प्रमाण काहीसे कमी होते. महापालिकेच्या बांधकाम विभागाने विविध भागात साचलेले पाणी काढण्याचे काम सकाळपासूनच केल्याचे दिसून आले. बांधकाम विभागाच्या वतीने उंटवाडी येथील नंदिनी पुलाजवळ, गोविंदनगर, मनोहरनगर, आनंदनगर या ठिकाणी साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू होते. इंदिरानगर भागात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. कलानगर, चार्वाक चौक या मुख्य वर्दळीच्या चौकांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.

--

गंगापूर धरण समूहात मात्र भर
मान्सूनच्या पावसाचे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच आगमन झाले असले, तरी शनिवार खऱ्या अर्थाने पावसाचा ठरला. नाशिककरांची सकाळ उजाडली तेव्हा पावसाची संततधार सुरूच होती. ना ढगांचा गडगडाट. ना विजांचा कडकडाट. पावसाच्या संततधार सरींनी केवळ शहरातच नव्हे, तर बहुतांश ग्रामीण भागातही दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असले, तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणी पातळी वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

--

अनेकांनी लुटला पावसाचा आनंद

शहरात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत शहरात ५४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी औद्योगिक वसाहतींमधील कामगार, तसेच सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने अनेकांनी कुटुंबीयांसमवेत पावसाचा आनंद लुटला. शहरातील बहुतांश भागात दिवसभर विजेचा खेळखंडोबा झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. नाशिक तालुक्यात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉफिट बुकिंगला चाप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शेतीखालील वहिवाटी जमिनीसाठी अकृषक परवाना मिळविण्यासाठीच्या निकषांतील क्लिष्टता राज्य सरकारने पूर्णतः दूर करण्यास मंजुरी दिली आहे. अकृषक करण्याबाबतची प्रक्रिया जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये दुरुस्ती करून शिथिल केल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असून, अकृषक परवाना मिळविण्यासाठी एजंटांच्या जाचातूनही सुटका झाली आहे. यलो झोनमधील जमिनी अकृषक करण्यासाठीचा कर भरणा केल्याची पावतीच अकृषक दाखला मानली जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची यापुढे कोणतीही गरज राहणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी येथे दिली. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, सहाय्यक आयुक्त उन्मेष महाजन, तहसीलदार मंजूषा घाटगे आदी उपस्थित होते.

मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या धोरणांच्या अनुषंगाने नवीन उद्योग व प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमिनी अकृषक करण्यासाठी कोणतीही अडचण अथवा पूर्वपरवानगीची अट नसावी, या दृष्टीने शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मध्ये सुधारणा केली असून, विविक्षित क्षेत्रातील जमिनी अकृषक करण्यावरील निर्बंध अधिक सुलभ केले आहेत.

--

नागरिकांचे दिव्य टळणार

अकृषक दाखला मिळविण्यासाठी नागरिकांनी मोठे दिव्य पार करावे लागत होते. शेतजमिनीचा व्यावसायिक अथवा औद्योगिक कारणासाठी वापर करण्यासाठी अकृषक परवाना आवश्यक असतो.त्यासाठी अनुभवी वकिलामार्फत गेल्या ३० वर्षांच्या फेरफार नोंदींच्या आधारे सर्च रिपोर्ट तयार करावा लागत असे. याशिवाय शासनाच्या विविध १८ विभागांचा ना हरकत दाखला मिळवावा लागत असे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी जात असे. शिवाय एजंटगिरीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत असे. परंतु, आता नवीन सुधारणांमुळे शहर विकास आराखडे अथवा प्रादेशिक योजनांमधील यलो झोनमधील जमिनींचा अकृषक कर भरला, की संबंधित जमीन अकृषक होणार आहे. त्यासाठी शासनदरबारी इतर कोणत्याही स्वरुपाचा अर्ज सादर करावा लागणार नाही. अकृषक कराव्यतिरिक्त अकृषक कराच्या पाच पट रुपांतरण करही भरावा लागणार आहे. या सुधारणेमुळे अवघ्या एका दिवसात यलो झोनमधील जमीन अकृषक होणार आहे. औद्योगिक कारणासाठी जमिनीचा वापर करावयाचा असेल तर ३० दिवस आगोदर तहसीलदारांना नोटीस द्यावी लागणार आहे. या कालावधीनंतर सदरची जमीन आपोआप अकृषक जमिनीत रुपांतरित होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व बांधकाम परवाने मात्र मिळवावे लागणार आहेत.

--

जमीन खरेदीत येणार सुलभता

प्रादेशिक योजना अथवा शहर विकास योजनेतील, वतन, आदिवासींच्या व शासनाच्या (वर्ग दोनच्या) जमिनीही आता शेतकरी नसलेल्यांनाही खरेदी करता येणार आहेत. मात्र, या जमिनींचा पाच वर्षांत वापर केला पाहिजे. त्यासाठी बाजारमूल्याच्या २ टक्के कर भरून एकदा मुदतवाढ मिळविता येणार आहे. मात्र, एकदा मुदतवाढ मिळूनही संबंधित जमिनीचा वापर न झाल्यास अशी जमीन मूळ शेतकऱ्याला पुन्हा मिळणार आहे. या बदलामुळे जमिनी खरेदीतील प्रॉफिट बुकिंगला आळा बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था, कंपन्या यांनाही आता अशा जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आदिवासींची जमीन शेतीसाठी खरेदी करता येणार नाही. खऱ्याखुऱ्या अौद्योगिक वापरासाठी मात्र खरेदी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपादित क्षेत्राचा लागला हिशेब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामासाठी भूसंपादनादरम्यान पळसे येथील शेतकरी संजय डहाळे यांच्यावर भूमी अभिलेख खात्याकडून झालेल्या अन्याय दूर झाला असून, या शेतकऱ्यास त्याच्या अधिग्रहित संपूर्ण जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची चोरीला गेलेली जमीन अखेर सापडली आहे. या अन्यायाला गेल्या वर्षी ‘मटा’ने सर्वप्रथम वाचा फोडली होती.

नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० च्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जमिनीचे भूसंपादन २००९ पासून सुरू होते. या भूसंपादन प्रक्रियेत पळसे गावाच्या शिवारातील संजय डहाळे या शेतकऱ्याच्या सहा गुंठे जमिनीचे संपादन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या मालकीच्या गटातील चौदा गुंठे क्षेत्र कमी झाल्याचा त्यांचा दावा होता. आठ गुंठे क्षेत्र संपादन करावयाचे राहून गेल्याने संजय डहाळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तशी तक्रारही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणकडे केली होती. परंतु, भूमी अभिलेख विभागाचा तसा दाखला असेल, तरच त्यांचा दावा मान्य केला जाणार होता. त्यामुळे संजय डहाळे यांनी नाशिकच्या भूमी अभिलेख विभागाकडेही आपले अधिग्रहित क्षेत्र पुन्हा मोजून देण्याची मागणी केली होती.

--

भूमी अभिलेखची दिरंगाई

संजय डहाळे यांच्या नाशिकच्या भूमी अभिलेख विभागाकडे आपले क्षेत्र मोजून देण्याच्या केलेल्या विनंतीला कचऱ्याची पेटी दाखविण्यात आली होती. त्यामुळे वैतागलेल्या संजय डहाळे यांनी या भूसंपदनावर मनाई हुकूम मिळविला होता. परिणामी महामार्गाचे काम पळसे येथे रखडले होते. यासंदर्भात ‘मटा’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच हा प्रश्न मार्गी लागला. भूमी अभिलेख विभागाने तत्काळ त्यांच्या क्षेत्राची मोजणी केल्याने संजय डहाळे यांचे संपादनाचे राहून गेलेले आठ गुंठे क्षेत्र संपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

---

माझी १४ गुंठे जमीन नाशिक-पुणे महामार्गासाठी संपादित झाली होती. मात्र, कागदोपत्री केवळ सहा गुंठेच नोंदविली गेली होती. या प्रकरणाची दखल ‘मटा’ने घेतल्याने माझ्या अतिरिक्त संपादित क्षेत्राचा हिशेब अखेर लागला असून, या क्षेत्राची खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. या क्षेत्राचा महत्तम मोबदलाही निश्चित झाला आहे.

-संजय डहाळे, शेतकरी, पळसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड देवळाली बँकेसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडची अर्थवाहिनी असलेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज, रविवारी (दि. २५) होत असून, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २६) जेलरोड येथील के. एन. केला हायस्कूलमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. सायंकाळी सहापर्यंत निकाल लागेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ कऱ्हे, सहाय्यक अधिकारी एस. पी. कांदळकर आणि एम. डी. परदेशी यांनी दिली.

मतदार सत्ताधारी सहकार पॅनललाच पुन्हा सत्ता देणार, की विरोधी श्री व्यापारी पॅनल परिवर्तन घडविणार हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनलने सलग दोन टर्म सत्ता मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. २०१२मध्ये साली त्यांचे २२ पैकी १६ संचालक विजयी झाले होते. यंदा नवीन नियमानुसार २१ संचालक आहेत. विरोधी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, हेमंत गायकवाड करीत आहेत. गेल्या वेळी या पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. पारदर्शी कारभार आणि बँकेची केलेली चौफेर प्रगती यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा दावा सहकारने केला आहे. तर, प्रगतीचा खोटा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा पराभव करून बँकेत यंदा नक्कीच परिवर्तन घडवू, असा दावा व्यापारी पॅनलने केला आहे.

--

२१ जागांसाठी ४९ उमेदवार

२१ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. बँकेचे सभासद ६५ हजारांवर, तर मतदार ६१ हजार आहेत. मतदार हे प्रामुख्याने नाशिक व सिन्नरमध्ये आहेत. मतदानासाठी एकूण ११० बूथ असून, आठशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रमुख मतदान केंद्रे- नाशिकरोड- मनपा शाळा १२५, देवळालीगाव- आनंदऋषीजी शाळा, जेलरोड- के. एन. केला शाळा, उपनगर- मनपा शाळा १०८, चेहेडी-मनपा शाळा ७९, सिडको- हिरे विद्यालय, इंदिरानगर- विवेकानंद विद्यालय, नाशिक- व्ही. एन. नाईक कॉलेज, देवळाली कॅम्प- कॅन्टोन्मेंट शाळा, भगूर- जि. प. शाळा, सिन्नर- मविप्रचे वाजे विद्यालय.

--

प्रतिष्ठा पणाला

महिनाभरात दोन्ही पॅनलने नाशिक व परिसर पिंजून काढला. सोशल मीडियासह हायटेक टेक्नॉलॉजीचा प्रचारासाठी वापर केला. टीम्स तयार करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. सहकारचे नेते दत्ता गायकवाड शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, तर व्यापारी पॅनलचे नेते विजय करंजकर विद्यमान जिल्हाप्रमुख आहेत. या दोन्ही ‘वाघां’नी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. करंजकर यांनी पत्नीला उमेदवारी मिळवून दिली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप सहकारच्या व्यासपीठावर दिसले, तर आमदार योगेश घोलप प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज चंद्रदर्शन झाल्यास उद्या रमजान ईद

$
0
0

सामूहिक नमाजपठणासाठी ईदगाह मैदान सज्ज

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

इस्लामिक कालदर्शिकेच्या नियमाप्रमाणे नववा रमजान महिना आज, रविवारी (दि. २५) संपत असून, सोमवारी (दि. २६) दहावा महिना शव्वालचा प्रारंभ होत आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मुस्लिमबांधव ईद-उल-फित्र अर्थात, रमजान ईद साजरी करतात. मात्र, जेव्हा ईदचा उल्लेख होतो तेव्हा चंद्रदर्शनाचादेखील उल्लेख हमखास होतो. त्याप्रमाणे आज सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यास सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.

ईद-उल-फित्रच्या सामूहिक नमाजपठणासाठी शहरातील ऐतिहासिक शहाजहाँनी ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले आहे. त्याप्रमाणे नाशिकरोड भागातील देवळालीगाव व देवळाली कॅम्पमधील ईदगाह मैदानेदेखील सज्ज करण्यात आली असून, या मैदानांवर हजारो मुस्लिमबांधव सामूहिक नामजपठणासाठी एकत्र येतात. त्यानंतर गळाभेट घेऊन परस्परांना शुभेच्छा देतात. मित्र, आप्तेष्ट परस्परांना शिरखुर्मा खाण्यासाठी आग्रहाने निमंत्रित करतात. याद्वारे तसेच इफ्तार पार्टीमुळे परस्परांत बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत होते. सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी ईद महत्त्वाची भूमिका निभावते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसलेला बाजार पुन्हा काढणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशावरून भंगार बाजार जमिनदोस्त केला होता. मात्र तेथे पुन्हा भंगार बाजार वसलेला आहे. कारवाई करून अनेक महिने उलटले तरी बाजार जैसे थे अाहे असा आरोप नगरसेवक दिलीप दातीर यांनी केला आहे. त्यामुळे स्वच्छता मोहिमेसाठी आलेले महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त किशोर बर्डे, आरोग्य अधिकारी डॉ. बुकाणे यांसह अधिकाऱ्यांनी बाजाराची पहाणी केली. त्यामुळे लवकरच आयुक्तांच्या आदेशाने भंगार बाजारात दुकाने थाटलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
रात्रीच खाली होतात ट्रक

भंगार बाजार न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात आला असला, तरी व्यवसाय मात्र आजही तेजीत सुरू आहे. दररोज रात्री चोरीच्या मालाचे तब्बल दहा ट्रक भंगार बाजारात खाली होत असतात. तसेच संबंधित स्टील व्यावसायिक रात्रीतून माल आपल्या गोडाऊनमध्ये नेतात. याबाबत महापालिका, पोलिस प्रशासन व नगरसेवकांना देखील माहिती आहे. परंतु प्रशासनाला लाखो रुपयांचा हप्ता मिळत असल्याने संबंधित स्टील चोरी करून विकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. पोलिस आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशी मागणी केली आता जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील मराठा मोर्चासाठी सूक्ष्म नियोजनावर भर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सकल मराठा समाजातर्फे मुंबई येथे काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी शनिवारी नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबईत ९ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे जिल्ह्यातील सहभागाची सूक्ष्म नियोजन, आणि मोर्चाबाबत आखणी करण्यात आली. त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विविध समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. तालुका, गाव आणि विभागानुसार बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

नांदूर येथील वरदलक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या बैठकीत करण गायकर, उमेश शिंदे, संतोष माळोदे, गणेश कदम, शिवाजी मोरे, संदीप लभडे, सागर माळोदे आदींनी सूचना मांडल्या. ग्रामीण भागातील बैठकींच्या नियोजनाची जबाबदारी उमेश शिंदे, संतोष माळोदे, विलास जाधव यांच्यावर तर शहरी भागाची जबाबदारी योगेश नाटकर, विशाल कदम, संदीप लभडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा समिती, तालुका समिती, शहर समिती गठीत करून त्यांना पुढील नियोजनात काय काम करायचे आहे हे ठरविण्यात येणार आहे. गावा-गावातील बैठकांच्या तारखा, वेळा, ठिकाण निश्चित करूनच त्या घेण्यात याव्यात. मोर्चाचा प्रचार आणि प्रसार योग्य पद्धतीने आणि परिणामकारक व्हावा यासाठी गावात, तालुक्याच्या चौकात बॅनर, होर्डिंग लावण्यात यावेत. तसेच वाहनांवर स्टिकर चिटकविण्यात यावेत. त्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करणे, प्रसिद्धी, वाहतूक अशा विविध समित्यांची नेमणूक करण्याची तयारी या बैठकीत करण्यात आली.

दोन जुलैला बैठक

नियोजनासाठी २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरद लक्ष्मी लॉन्स येथे जिल्हास्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यात झालेल्या कामांचा आढावा तसे पुढे करण्याचे कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थीसुरक्षेला शाळांमध्ये धक्का पोहोचू नये यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने गेल्या वर्षी दिले होते. मात्र, अद्याप हा निर्णय कागदावरच असून, त्याची अंमलबजावणी अत्यल्प शाळांमध्ये झाली असल्याचे समोर आले आहे. सर्व व्यवस्थापनाच्या पाचशेहून अधिक शाळा आहेत. त्यातील निम्म्या शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. महापालिका शाळा अद्याप सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रक्रियेत आहेत. ग्रामीण भागातील शाळा मात्र अद्यापही विद्यार्थी सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे चित्र नाशिकमध्ये आहे.

गेल्या वर्षी दादर येथील एका शाळेत चौथीतील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यातील शाळांमधील विद्यार्थी सुरक्षा हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावर तातडीने प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले. जोपर्यंत हा विषय चर्चेत होता तोपर्यंत स्थानिक स्वराज्य शाळा व इतर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या. नियोजन करण्यात आले. परंतु, जसजसे दिवस सरले विद्यार्थीसुरक्षा पुन्हा दुर्लक्षित झाली. शहरातील परिस्थिती बरी असली, तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मात्र शाळांनी गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. जिल्ह्यातील शाळांमध्ये सीसीटीव्हीचे प्रमाण अत्यल्प आहे.

--

१८२ शाळांमध्ये सीसीटीव्ही

शहरात २२३ खासगी शाळा असून, १८२ खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान, तालुका स्तरावर परिपत्रक काढून सूचना देण्यात येणार आहेत. निधीबाबत अडचणी असून, निधी उपलब्ध करून घेऊन मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या असल्याची प्रतिक्रिया माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार सांभाळत असलेल्या नितीन उपासनी यांनी दिली.

--

जुलैअखेर मनपा शाळांमध्ये कॅमेरे

नाशिकमध्ये महापालिकेच्या १२८ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. प्रतिशाळा तीन याप्रमाणे हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जुलैअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व शिक्षा अभियानाच्या उपलब्ध तरतुदीतून शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images