Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सायगावकरांचे लाक्षणिक उपोषण

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करणारी असल्याचा आरोप करीत येवला तालुक्यातील सायगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ‘भाजप-सेना सरकारची कर्जमाफी म्हणजे खऱ्याच्या आईला घोडा...’, या आशयाचा भव्य डिजिटल बॅनर लावत शासनाच्या निषेधार्थ गावातील रोकडोबा पारावर केल्या गेलेल्या या आंदोलनात गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारने कर्जमाफीची केलेली घोषणा समाधानकारक नसल्याचा सूर ठिकठिकाणाच्या शेतकऱ्यांकडून आता उमटू लागला आहे. त्यामुळेच शासनाच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२६) येथील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनाच दीड लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या कर्जमाफी निकषात केवळ आठ ते दहा टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. उर्वरित नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ९० टक्के शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवले जाणार आहे, असा आरोप यावेळी सायगावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शासनाची कर्जमाफी व निकष ही एकप्रकारे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच असून, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात पेटून उठण्याची गरज यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.

लाक्षणिक उपोषणात भागुनाथ उशीर, सरपंच योगिता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, माजी सरपंच सुनील देशमुख, दिनेश खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, विजय खैरनार, रघुनाथ खैरनार, महेंद्र उशीर, रामनाथ उशीर आदींसह जवळपास सव्वाशे शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेचे नेते संतू पा. झांबरे, बापूसाहेब पगारे, सुरेश जेजुरकर यांनीही उपोषणस्थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागात एक लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नाशिक विभागातील बहुतांश तालुक्यांत मोसमी पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, काही तालुक्यांत पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावीत, यासाठीचे नियोजन केले आहे. नाशिक विभागात एकूण १७ पिकांच्या २ लाख २६ हजार ७४४ क्विंटल बियाण्यांची कृषी विभागाकडून उपलब्धता करून देण्यात आली असून, त्यापैकी १ लाख एक हजार ८८५ क्विंटल बियाण्यांचा प्रत्यक्ष बाजारात पुरवठाही झालेला आहे.

यंदा हवामान खात्याने ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे कृषी विभागाने यंदाच्या खरिपाचे नियोजन करताना बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात नोंदवली होती. महाबीज व खासगी कंपन्यांकडे कृषी विभागाने नोंदविलेल्या बियाण्यांच्या मागणीपैकी २ लाख २६ हजार ७४४ क्विंटल बियाणे नाशिक विभागाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी प्रत्यक्ष बाजारात निम्म्यापेक्षा जास्त बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे.

१७ पिकांचे बियाणे उपलब्ध

कृषी विभागाच्या नियोजनानुसार महाबीज व काही खासगी कंपन्यांचे विविध १७ पिकांचे बियाणे बाजारात उपलब्ध झालेले आहे. त्यात संकरित ज्वारी, सुधारित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, संकरित व सुधारित कापूस, बीटी कापूस, नागली या पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे.

सोयाबीन, मक्याला प्राधान्य

विभागातील शेतकरी सोयाबीन व मका यांसारख्या पिकांना प्राधान्य देत असल्याने यंदाच्या खरिप हंगामात नाशिक विभागासाठी कृषी विभागाने सोयाबीन बियाण्यांचे ६३ हजार ४५२, तर मका बियाणे ७७ हजार १७८ क्विंटलचे वाटप केलेले आहे. त्यापैकी सोयाबीनचे २८ हजार ६८७, तर मक्याचे २८ हजार ५०० क्विंटल बियाणे प्रत्यक्षात बाजारात उपलब्ध झालेले आहे. गेल्या काही वर्षांत विभागातील शेतकरी सोयाबीन व मका या पिकांना प्राधान्य देत असल्याने या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढू लागले आहे. परिणामी कृषी विभागाकडून या पिकांच्या बियाण्यांच्या वाटपातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गुणनियंत्रणासाठी भरारी पथके

विभागातील बियाणे व खतांचा काळाबाजार, बोगस खते व बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर एक, जिल्हा स्तरावर ५, तालुका स्तरावर ५४ अशी विभागात एकूण ६० भरारी पथकांची व ६० गुणनियंत्रण कक्षांची स्थापना कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने या पथकांनी विभागात ७०३४ नमुने काढले होते, तर ४४ विक्रेत्यांवर परवाने निलंबनाची, तर ३४ विक्रेत्यांवर परवाने रद्दची कारवाई केली होती, तर ४९० इतके विक्री बंदचे आदेश देण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महानगरपालिका व देवळाली कटक मंडळ हद्दीतील अकरावी ऑनलाइन प्रवेशअर्ज प्रक्रिया सुरू आहे. यंदा केंद्रीयकृत पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन प्रवेश अर्जांचा भाग एक भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आज (२७ जून) अंतिम मुदत आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भाग १ व भाग २ भरणे आवश्यक आहे. तसेच अर्ज भरल्यानंतर तो आपल्या माध्यमिक शाळेतून अथवा मार्गदर्शन केंद्रावरुन पडताळून घ्यावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेशअर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या निकालानंतर या प्रक्रियेने गती घेतली. इनहाऊस, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन, तांत्रिक या कोट्यांमधून ही प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेचा भाग २ भरण्यास १६ जूनपासून सुरुवात झाली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अद्याप भाग १ देखील भरला नसल्याने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया आजच्या आज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
प्रवेशनिश्चिती आवश्यक
ज्या विद्यार्थ्यांची नावे इनहाऊस, अल्पसंख्याक व २५ टक्के बायोफोकल कोट्यासाठीच्या गुणवत्ता यादीत येतील, त्यांनी २८ व २९ जून रोजी पूर्ण शुल्क भरुन प्रवेश निश्चित करावा. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या मुदतीनंतर प्रवेश नाकारू शकतील. जे विद्यार्थी इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन व २५ टक्के बायफोकल कोट्याअंतर्गत प्रवेश निश्चित करतील, त्यांची नावे पुढील फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहेत. तसेच जे विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकले नाही असे विद्यार्थी फेऱ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग २ भरणे पात्र राहतील.

होम सायन्सचे प्रवेश ऑफलाइन

नाशिक मनपा व देवळाली कॅम्प क्षेत्रातील सर्व प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, प्रवेशइच्छुक विद्यार्थ्यांनी nashik.11thadmission.net या वेबसाइटवर नोंदणी करणे व पसंतीक्रम अर्ज भरणे आवश्यक आहे. इन हाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन व २५ टक्के बायफोकल कोट्याच्या प्रवेशासाठीदेखील ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरणे बंधनकारक आहे. केवळ एसएमआरके कॉलेजमधील होम सायन्स शाखेचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

३५ पेक्षा कमी गुण असल्यास..
एसएससीशिवाय अन्य मंडळाच्या ज्या विद्यार्थ्यांना दहावीची उत्तीर्ण गुणपत्रिका प्राप्त आहे, परंतु एक किंवा दोन विषयांत ३५पेक्षा कमी गुण असतील अशा विद्यार्थ्यांनी बिटको कॉलेज, नाशिकरोड येथे आज (२७ जून) सकाळी ११.३० वाजता योग्य कागदपत्रांसह समक्ष भेटावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक अत्याचारानंतर बालकाचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या पाच वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची संतापजनक घटना पिंपळगाव बसंवत येथील इस्लामपुरा भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीसह त्याच्या आईस अटक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी संशयितास चोप दिला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

या प्रकरणी लुकमान पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी भिकन पिंजारी (वय ४६) आणि त्याची आई अमिना पिंजारी (६४) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. संशयित आरोपी आणि फिर्यादी जवळच राहतात. लुकमान पिंजारी यांचा पाच वर्षीय मुलगा साहील शनिवारी (दि. २४) बेपत्ता झाला. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल होती. पोलिसांसह पिंजारी यांचे नातेवाईकदेखील साहीलचा शोध घेत होते. साहीलचा मृतदेह रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपी भिकनच्या घरात आढळून आला. यानंतर नातेवाइकांचा संताप अनावर झाला. त्यांनी भिकनला बेदम मारहाण केली. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी भिकनला सोडवून त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत बोलताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की संशयिताने बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे समोर आले आहेत. संशयिताने नाक व तोंड दाबल्याने साहीलचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. भिकनने केलेल्या गैरकृत्याची माहिती त्याच्या आईलादेखील होती. मात्र, तिने ही माहिती दडवून ठेवत पुरावे मिटवण्यासाठी भिकनला मदत केली. त्यामुळे तिलाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

जादूटोण्याचा संशय

संशयित आरोपी भिकनची पत्नी त्याच्या अशा उद्योगांमुळे निघून गेली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भिकन आपल्या आईबरोबर एकटाच राहतो. मद्य पिण्याची सवय असलेला भिकन आणि जादूटोणा करणारी त्याची आई, या दोघांनी काही तास साहीलच्या हत्येची घटना उघड होऊ दिली नाही. त्यामुळे या प्रकरणात जादूटोण्याचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होतो आहे.

जवळच्या मामाकडून कृत्य

गादी पिंजून उपजीविका भागवणारी बरीच कुटुंबे इस्लामपुरा भागात राहतात. एकमेकांशी नातेसंबंध असल्याने सर्वांचे एकमेकांच्या घरी जाणे सहज होते. संशयित आरोपी भिकन हा साहीलचा जवळचा मामा लागत होता. ज्याने रक्षण करायचे, त्यानेच घात केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात सोमवारी चौघांचा बुडून मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणेबारीतील फैजा ओहळात पोहण्यासाठी उतरलेल्या दोघा इंजिनीअरिगच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२६) संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पिंपळगावजवळील मुखेड शिवारात दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी चंदू गहिरे (वय १४) व कार्तिक गहिरे (वय १२) हे आईसोबत सुनील कदम यांच्या शेततळ्याजवळून जात असताना दोघांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.

संग्राम शिवाजी शिरसाठ (वय २३, रा. गंगापूररोड, नाशिक) आणि कौस्तुभ प्रमोद भिंगारदिवे (वय २६, रा. राहुरी, जि. अहमदनगर) अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघे एनडीएमव्हीपी या इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. सोमवारी मित्रांसमवेत पहिणे येथे गेले होते. संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शिरसाठ आणि भिंगारदिवे पाण्यात उतरले. त्यांचे इतर मित्र काठावरच होते. पाण्याचा अंदाज न आल्याने एक मित्र बुडत असताना दुसरा मित्र मदतीला गेला. मात्र, दोघेही खोल पाण्यात बुडाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांचा खून, एकाची आत्महत्या

0
0

पिंपळगाव बसवंतमध्ये दोन वेगवेगळ्या घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-मुंबई महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शहर सोमवारी खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी हादरून गेले. एका घटनेत बांधकाम मजुराने पत्नीसह साडूच्या मुलाचा खून करून नंतर स्वतःही आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत संशयित आरोपीने पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचा खून केला. पहिली घटना अनैतिक संबंधांतून घडल्याचे समजते.

पिंपळगाव बसवंत येथील पवननगरमध्ये काही दिवसांपूर्वीच भाडेकरू म्हणून राहण्यास आलेल्या रवींद्र नागमल (वय ३५) याने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखा रवींद्र नागमल आणि साडूचा मुलगा विशाल विजय पानपाटील (वय १०) यांची हत्या केली. तसेच नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. गवंडी काम करणाऱ्या नागमलजवळ आत्महत्येपूर्वी चिठ्ठी सापडली असून, पत्नीच्या साडूशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे हे कृत्य केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. रवींद्रने स्वतःच्या मुलाला काहीच केले नाही.

लैंगिक अत्याचार करून केला खून

दुसरी घटना इस्मालपूर परिसरात घडली. तेथील रहिवाशी लुकमान पिंजारी यांचा पाच वर्षीय मुलगा साहिल याचा मृतदेह रविवारी (दि. २५) रात्री संशयित आरोपी भिकन पिंजारी (४५) यांच्या घरात आढळून आला. संशयिताने मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याचे नाक-तोंड दाबले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी भिकनला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी भिकनला मदत करणारी त्याची आई अमिना पिंजारी (वय ६४) हिलाही अटक करण्यात आली. संशयित आरोपीचे कुटुंब जादूटोण्याचे काम करीत असल्याने पोलिस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.

लैगिंक अत्याचार करून अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्या संशयितासह त्याच्या आईविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, संशयित अटकेत आहे. दुसरी घटना अनैतिक संबंधामुळे घडल्याचे पुरावे समोर येत असून, मयताने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे.

- विशाल गायकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी डिप्लोमाधारक संतप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य कृषी शिक्षण परिषदेने कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळालेल्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षातील अभ्यासक्रमाचा परीक्षासक्तीचा निर्णय अचानक घेतल्याने कृषी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. या निर्णयास विरोध करण्यासाठी हे विद्यार्थी कृषी शिक्षण परिषदेवर मंगळवारी (२७ जून) मोर्चा काढणार आहेत.

कृषी अभ्यासक्रमात पदविकेचे शिक्षण पूर्ण करून पदवीस प्रवेश घेणारे विद्यार्थी थेट द्वितीय वर्षात प्रविष्ट होतात. पदविकेची अर्हता ते पूर्ण करीत असल्याने त्यांना पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातून पूर्णत: सूट मिळते. यंदा मात्र अचानक कृषी शिक्षण परिषदेच्या वतीने या नियमाविरोधात जाण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भातील निर्णयाची प्रतही काही कृषी महाविद्यालयांमध्ये जाळण्यात आली.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची शासन निर्णयामध्ये तरतूद आहे. मात्र, ६ मे रोजी कृषी शिक्षण परिषदेने नवा शासननिर्णय काढला आहे. यानुसार थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रमाचा अतिरिक्त भार आता सहन करावा लागणार आहे.

या निर्णयावर विचारविनियम करण्यासाठी कृषी पदवीधर संघटनेच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत कृषी शिक्षण परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मोर्चा मंगळवारी काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक महेश कडूस, संघटनेचे विद्यार्थी सेल प्रदेशाध्यक्ष प्रणव टोणपे यांनी दिली. बैठकीस प्रशांत घोलप, अक्षयकुमार देसाई, राजेंद्र मनकर, अक्षय दरंदले, मनोज कानवडे, गणेश सुडके, अभिजित शिंदे, काजल शिंदे, उत्कर्ष निकम, हर्षदा भदाणे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहविक्री व्यवसाय प्रकरणी महिलेसह पाच जणांना कोठडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

बिटको चौकातील सद््गुरू गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईतील पाच संशयितांना सोमवारी नाशिकरोड न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली.

पोलिसांनी बिटको चौकातील सद््गुरू गेस्ट हाऊसवर रविवारी दुपारी साडेचार वाजता छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उद््ध्वस्त केला होता. या कारवाईत देहविक्रीचा अड्डा चालविणाऱ्या शैला गंगाधर शिंगाडे (वय ४५, रा. घर क्रमांक २३३३, बुधा हलवाईजवळ, संभाजी चौक, नाशिक) या महिलेसह गेस्ट हाऊसचा मॅनेजर राजू नारायण घुट्टे (वय २२, रा. कोनाराव पेठ, जि. करीमनगर (तेलंगणा), गोमान पांडेय कामी (वय २४, रा. भीमनगर, जेलरोड) या तिघांसह या देहविक्री अड्ड्यावरील गुरुमूर्ती यरय्या पुट्टी (वय ३९, रा. सीएचक्यू विंग स्टाफ, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) व संदीप भाऊसाहेब दुधाळे (वय २७, रा. धोंगडे मळा, मुक्तिधाममागे, नाशिकरोड) या दोन ग्राहकांसह एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पाच जणांना सोमवारी नाशिकरोड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. देहविक्रीचा अड्डा सुरू असलेल्या सद््गुरू गेस्ट हाऊसचा मालक नरसीम मुल्लू प्रकाश जंगम (रा. गायकवाड मळा, रेजिमेंटल प्लाझामागे, नाशिकरोड) पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. या छाप्यादरम्यान या गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रीसाठी आणलेल्या चार महिलाही पोलिसांना आढळून आल्या होत्या. शैला शिंगाडे ही महिला देहविक्रीच्या व्यवसायासाठी प्रवृत्त करीत असल्याची माहिती या चार पीडित महिलांनी पोलिसांना दिली. उपनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक संध्या तेली यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत ही माहिती नमूद करण्यात आली आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायद्यातील कलमांनुसार वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतःच रंगवा रेनकोट अन् छत्र्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चिखल, रेनकोट, छत्रीचे ओझे. पण या ओझ्याला जर कलरफूल करता आले तर...हे ओझेदेखील आपण एन्जॉय करू शकतो. यंदाचा पाऊस ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांसाठी असाच कलरफूल आणि आनंददायी करण्याच्या उद्देशाने कल्चर क्लब तर्फे येत्या रविवारी कॅलिग्राफी पेंटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. २ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत हे वर्कशॉप होणार आहे.
आपल्या छत्रीवर किंवा रेनकोट वर तुम्ही स्वतः कॅलिग्राफी पेंटिंग करू शकता. त्यासाठीचे प्रशिक्षण या वर्कशॉपमध्ये देण्यात येणार आहे.
नाशिकचे प्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे हे छत्रीवर किंवा रेनकोटवर कॅलिग्राफी करण्याचे प्रशिक्षण देतील. या वर्कशॉपसाठी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची छत्री किंवा रेनकोट तसेच अॅक्रेलिक कलर, एक आणि दोन इंचाचा ब्रश, प्लास्टिकचा मग, रंग कालविण्यासाठी बाऊल, हात पुसायला कापड एवढे साहित्य बरोबर आणावयाचे आहे. या वर्कशॉपला कल्चर क्लबच्या सदस्यांना विनामूल्य प्रवेश आहे तर इतरांसाठी ३०० रुपये प्रवेश मूल्य ठेवण्यात आले आहे.
अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशनसाठी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधा - कमलेश ७०४०७६२२५४ किंवा ०२५३- ६६३७९८७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता-समृद्धीसाठी दुआ

0
0

टीम मटा

शहरातील मुख्य शहाजहाँनी ईदगाहसह शहर परिसरातील देवळाली कॅम्प, सातपूर, नाशिकरोड परिसरात सोमवारी ईद-उल-फित्रनिमित्त सामुदायिक नमाजपठण झाले. यावेळी शांतता व समृद्धीसाठी विशेष दुआ करण्यात आली. ज्येष्ठांसह तरुणाई आणि बच्चेकंपनीमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आकर्षक वेशभूषेतील बच्चेकंपनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देण्यात हरखून गेली होती.

--

देवळाली कॅम्प परिसरात रौनक

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

परिसरातील मुस्लिम बांधवांनी वडनेररोडवरील ईदगाह मैदानावर मौलाना सादिक रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, तर भगूर येथे हाफिज इक्बाल दाऊद यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक नमाजपठण केले. यावेळी देशात शांतता व समृद्धी नांदावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली. ईदनिमित्त परिसरात रौनक दिसून आली.

नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांना खैरात वाटप करीत ईद-उल-फित्र अर्थात, रमजान ईदनिमित्त एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. अन्य धर्मीयबांधवांनीही यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री बबनराव घोलप, नगरसेवक

सचिन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले, पोपट जाधव, बाळासाहेब गोडसे, संजय गोडसे, छावा संघटनेचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशीद सय्यद आदी उपस्थित होते.

ईदनिमित्त दोन्ही शहरांत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. लष्करानेही ईदगाह मैदान परिसरात जवान तैनात केले होते. देवळाली पोलिस ठाण्यात छावा मुस्लिम आघाडी फ्रेंड सर्कलच्या वतीने शिरखुर्मा वाटप करण्यात आला. याप्रसंगी मुस्लिम आघाडीचे सय्यद राशीद, जहाँगीर शेख, शाहीद शेख, मोहसिन शेख, नजफ सय्यद, अब्दुल्लाह शेख आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

--


लष्करी जवानांप्रति कृतज्ञता

रमजान ईदनिमित्त येथील लष्करी हद्दीत असलेल्या ईदगाह मैदानावर सुरक्षेसाठी पोलिसांसह लष्करी जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आलेली होती. यावेळी काही मुस्लिमबांधवांनी लष्करी जवानांप्रति कृतज्ञता दाखविताना थेट गळाभेट घेत शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. काही चिमुकल्यांनी जवानांना सॅल्युट करीत त्यांच्याप्रतिचा आदर व्यक्त केला.

--

नाशिकरोडला पारंपरिक उत्साह

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड परिसरातील जेलरोड, विहितगाव, चेहेडी, देवळालीगाव, शिंदे, पळसे, जाखोरी, सिन्नर फाटा आणि मुख्य ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त

मुस्लिमबांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. मुस्लिम समाजबांधवांनी पारंपरिक उत्साहात एकमेकांना शुभेच्छा दिल्या. इतर समाजबांधवांनीही मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

नमाज अदा करण्यासाठी सोमवारी सकाळी देवळालीगाव व विहितगाव येथील मुख्य ईदगाह मैदान, उपनगर मदरसा, अंजुमन पैजाने हजफिया, नूरी ट्रस्ट मदरसा, कौनेन मदरसा, डीजीपीनगर, अशफिया गुलशने चित्तीया, कॅनॉलरोड, विहितगाव, रोकडोबावाडी, सोमाणी गार्डन, जामा मशीद मरकज, मस्जिद-ए-नूरिया, नूर-ए-महंमदिया मदरसा मस्जिद शिंदे, अश्रफिया मस्जिद अरिंगळे मळा, इमाम अहमद रजा मस्जिद, सिन्नर फाटा व देवळालीगाव येथील मशीद आदी ठिकाणी सामुदायिक नमाजपठण झाले. मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन, पंढरीनाथ ढोकणे, नगरसेवक सूर्यकांत लवटे आदी उपस्थित होते.

--

सातपूरला दिसला सर्वधर्म समभाव

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

परिसरात सोमवारी सामुदायिक नमाजपठण करून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. देशात शांतता व समृद्धी राहावी, यासाठी यावेळी विशेष दुआ करण्यात आली. नमाजपठणानंतर मुस्लिमबांधव एकमेकांना शुभेच्छा देण्यात दंग झाले होते. त्र्यंबकेश्वररोडवरील रजविया मशिदीत राजकीय नेत्यांनी मुस्लिमबांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदच्या पार्श्वभूमीवर सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश सोनावणे, राजेश आखाडे

यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर, मनसेचे गटनेते सलिम शेख, रिपाइंच्या गटनेत्या दीक्षा लोंढे, नगरसेवक सुदाम नागरे,

योगेश शेवरे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, नितीन निगळ, भिवानंद काळे, अरुण काळे, रवी काळे, रामहरी संभेराव आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चौदा हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरीदेखील गणवेश न मिळाल्याने मुलांना विना गणवेशच शाळेत जावे लागत आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन कपडे आणि नवीन पुस्तके मिळावेत, अशी ओढ बालकांमध्ये सर्वत्र असते. मात्र शासनाला त्र्यंबकमधील विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचे दिसून येते. नवीन लाभाच्या योजना देताना शासन त्याचे पैसे पालकांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. हा उपक्रम निश्चितच चांगला आहे. तथापि, जुलै महिना उजाडला तरी देखील पैसे नसतील तर सर्वसामान्य पालक गणवेश स्वखर्चाने खरेदी तरी कसे करणार? पोषण आहाराचे बिल आठ महिन्यांपासून दिलेले नाही.

अनुदानाची प्रतीक्षा

प्रत्येक पात्र विद्यार्थ्यास ४०० रुपये गणवेश अनुदान दिले जाणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २५४ शाळा असून, त्यामध्ये ७४५४ मुली, अनु.जाती ४१६ मुले, अनु. जमाती ६२२३ मुले आणि बीपीएल ५६५ मुले असे एकूण १४६५८ मुले व मुली गणवेशाच्या लाभास पात्र आहेत.


जिल्हा परिषद शाळांत गणवेश लवकरात लवकर द्यावेत अन्यथा आंदोलन केले जाईल.

- भगवान मधे, श्रमजीवी संघटना

विद्यार्थी गणवेशाची रक्कम थेट पालकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. जि. प. ला अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.

- भास्कर कनोज, गट शिक्षणाधिकारी, त्र्यंबक पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारची वाटचाल हॅटट्रिकच्या दिशेने?

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडची अर्थवाहिनी असलेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेत सत्ताधारी सहकार पॅनल विजयाची हॅटट्रिक करण्याची चिन्हे आहेत. सोमवारी झालेल्या मतमोजणीच्या एकूण तीन फेऱ्यांपैकी पहिल्या फेरीत सहकारचे २१ पैकी १९ उमेदवार आघाडीवर होते. विरोधी श्री व्यापारी पॅनलचे नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर मतमोजणीच्या ठिकाणी फिरकलेही नाहीत. त्यांच्या पत्नी व पॅनलच्या उमेदवार तथा भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर या पहिल्या फेरीअखेर शेवटच्या स्थानी होत्या. गेल्यावेळी विरोधी श्री व्यापारी पॅनलकडे सहा जागा होत्या.

बँकेसाठी रविवारी ३४.६४ टक्के (२१,२६४) मतदान झाले होते. बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी सहकार पॅनलचे तर विजय करंजकर, हेमंत गायकवाड यांनी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्त्व केले. सत्ताधाऱ्यांना धूळ चारून आमचे पॅनल परिवर्तन घडवून आणणारच असा ठाम विश्वास करंजकर यांनी व्यक्त केला होता. सहकार पॅनलचा पारदर्शी कारभार, प्रगतीचा मुद्दा प्रभावी ठरला. आमच्या हातीच बँक सुरक्षित राहील, अशी मतदारांची भावना दिसली, अशी प्रतिक्रिया दत्ता गायकवाड यांनी ‘मटा’कडे व्यक्त केली.

करंजकरांना धक्का

शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या व्यापारी पॅनलने आक्रमक व हायटेक प्रचार केला होता. प्रचंड खर्चही केला होता. पॅनल मागे पडल्याने त्यांना धक्का बसला. महिला गटात त्यांची पत्नी तथा भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर ३२२५ मते मिळवून चौथ्या स्थानी होत्या. रंजना बोराडे (४४४९) पहिल्या, कमल आढाव (४२४३) दुसऱ्या तर जयश्री गायकवाड (३५५१) तिसऱ्या स्थानी होत्या. अन्य गटात सहकारच पुढे होते. भटक्या जाती गटात शाम चाफळकर (५१५२) यांनी हनुमंता देवकरांवर (२८२९), तर ओबीसी गटात संचालक सुधाकर जाधव (४८८५) यांनी सुधाकर ताजनपुरेंवर आघाडी घेतली होती. अनुसुचित जाती जमाती गटात संचालक रामदास सदाफुले (४८६२) हे नगरसेवक प्रशांत दिवे (३४४९) यांच्या पुढे होते.

हे होते आघाडीवर

पहिल्या फेरी अखेर सर्वसाधारण गटातून निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, डॉ. दत्तात्रय पेखळे, श्रीराम गायकवाड, अशोक सातभाई, सुनील आडके, भाऊसाहेब पाळदे, जगन्नाथ आगळे, प्रकाश घुगे, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, डॉ. प्रशांत भुतडा, जयंतीलाल लाहोटी हे आघाडीवर होते. व्यापारी पॅनलचे आर. डी. धोंगडे आघाडीवर होते.

मतमोजणीचा वेग कमी

निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे, सहायक अधिकारी एस. पी. कांदळकर आणि एम. डी. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठला के. एन. केला शाळेत ४३ टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतपेट्या नव्हत्या. पाच मतपत्रिका होत्या. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल लागण्यास सायंकाळ झाली. या फेरीत ८१०० मतांची मोजणी झाली. त्यात के. एन. केला, मनपा शाळा क्र. १२५ आणि आनंद ऋषीजी शाळेतील १ ते ४२पेट्यांची मते होती. रात्री उश‌िरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाच्या प्रगतीत प्रत्येकाने योगदान द्यावे

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक परिसरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी हातभार लावावा, असा संदेश तमाम मुस्लिम बांधवांसह नाशिककरांना गोल्फ क्लब येथील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला. जुन्या नाशिकसह शहराच्या विविध भागांतून हजारो मुस्लिम बांधवांनी नमाजपठणासाठी येथे हजेरी लावली. पारंपरिक पध्दतीने उपस्थितांनी सामूहिकरित्या विशेष नमाज अदा केली.

रमजान ईदनिमित्त (ईद-उल-फित्र) शहरातील ईदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह मुस्ल‌िम बांधवांनी नमाजपठण केले. थोड्याफार प्रमाणात वातावरणातील बदलामुळे काही काळ नमाज होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, नमाजाच्या वेळी ढगाळ वातावरणाची स्थिती बदलून लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने चिंता दूर झाली. नाशिकच्या विविध भागांतून सकाळी साडेआठच्या सुमारास नमाज अदा करण्यासाठी मैदानाच्या दिशेने मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव येत होते. नऊ वाजेच्या सुमारास संपूर्ण मैदान नागरिकांनी गच्च भरून गेले होते. खास पद्धतीने बांधण्यात आलेल्या हिरव्या-पांढऱ्या पगड्या, आकर्षक पठाणी कुर्ते-इस्लामिक पद्धतीच्या गोल टोप्या परिधान करीत मुस्लिम बांधव मैदानावर जमत होते. स्वयंशिस्तीने एका रांगेत बसत ईदगाह व सुन्नी मरकजी सिरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थितांना ‘ईद’ व ‘ईदगाह’चे महत्त्व पटवून दिले. तसेच हजरत मुहम्मद पैगंबर यांनी सांगितलेल्या धार्मिक बाबींवर आपल्या खास शैलीत विवेचन केले. यावेळी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-काजी मोईजोद्दीन, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, मौलाना शाकीर रजा, मौलाना महेबुब आलम आदि मान्यवर उपस्थित होते. दहा वाजता खतीब यांनी ध्वनिक्षेपकावर येत उपस्थितांना विशेष नमाजपठणाच्या पद्धतीची माहिती दिली आणि नमाजपठणाला सुरुवात केली. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये उपस्थित हजारो समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने नमाज अदा करीत एकमेकांची गळाभेट घेत ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या. कबरीस्थानामध्ये देखील आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा, म्हणून अनेकांनी प्रार्थना केल्या.


देवळालीतही नमाजपठाण

ईद-उल-फित्रनिमित्त शहरातील मुस्लिम बांधवांनी ‌नमाज अदा केली. शहरातील इदगाह मैदानावरही हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत शांतता व समृद्धीसाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. देवळाली कॅम्पला वडनेररोडवरील इदगाह मैदानावर मौलाना सादिक रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तर भगूर येथे हाफिज इकबाल दाउद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांना खैरात वाटप करत ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद निमित्त एकमेकांना तर सर्वधर्मियांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुस्ल‌िम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री बबनराव घोलप, नगरसेवक सचिन ठाकरे, वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक सुभाष डौले, पोपट जाधव, बाळासाहेब गोडसे, संजय गोडसे, छावा संघटनेचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशीद सैय्यद आदी उपस्थित होते. ईदनिमित्त पोलिसांनी बंदोबस्त तर लष्करानेही आपले सैनिक ईदगाह मैदान परिसरात तैनात केले होते. देवळाली पोलीस स्थानकात छावा मुस्लिम आघाडी फ्रेंडसर्कलच्या वतीने शिरखुरमा वाटप करण्यात आला. याप्रसंगी मुस्लिम आघाडीचे सैय्यद राशीद, जहांगीर शेख, शाईद शेख, मोहस‌िन शेख, नजफ सैय्यद, अब्दुल्लाह शेख आदींसह पोलिस बांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलचोरीने ग्राहकांना चाट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोलपंपाच्या मशिनमधील पल्सरमध्ये टॅम्परिंग व शोल्डरिंग करून त्यातील आयसी पार्टच्या साहाय्याने प्रत्येकी पाच लिटरमागे २०० ते ६०० मिलिलिटर पेट्रोलची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आॅइल कंपन्यांचेसुद्धा धाबे दणाणले आहे. नाशिक जिल्ह्यातही यासंदर्भात कारवाई झाली असून, काही पेट्रोलपंप सील करण्यात आले आहेत. या चोरीतून असंख्य पेट्रोलपंपचालकांनीनी ग्राहाकांच्या खिशाला लाखो रुपयांची चाट लावली आहे.

अनेक दिवसांपासून ही चोरी होत असतानाही संबंधित कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष कसे केले व वैद्यमापनशास्त्र विभाग नेमके काय करीत हाेता, असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत. ठाणे गुन्हे शाखेने राज्यात ४४ पेट्रोलपंपांवर धाडी टाकून ३० पंपांवरील चोरी उघड केली आहे. त्यात सहा जणांना या चोरी प्रकरणात अटक केली आहे. नाशिकमध्येही अशी कारवाई झालेली आहे.

उत्तर प्रदेशमधील पेट्रोलपंपांमध्ये सॉफ्टवेअर चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलमध्ये घोटाळा करणाऱ्या दोन संशयितांना ठाणे पोलिसांनी डोंबिवली आणि पुण्यातून अटक केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्यभर पेट्रोलपंपांवर धाडी टाकून ही चोरी पकडली. या चोरीचे लोण राज्यभर पसरले असून, पोलिसांच्या कारवाईमुळे काही जणांनी हा छुपा चोरीचा प्रकार तात्पुरता बंद केला आहे. पल्सर मशिनमध्ये फेरफार करून एक चिप पेट्रोलपंपांच्या मशिनमध्ये बसविली की, पाच लिटर पेट्रोलमागे २०० मिलिलिटर ते ६०० मिली लिटरची चोरी करण्याचा हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून बिनबोभाट सुरू असल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. मात्र, याप्रश्नी अजूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याअगोदर उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलपंपांवर चिप आणि रिमोटच्या साहाय्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचोरीचे कनेक्शन एप्रिल महिन्यात उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे अपर पोलिस महासंचालक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यभर मोहीम उघडली होती. त्यात राज्यातील १,६३६ पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत ११,४१८ पंपांची तपासणी करण्यात आली, त्यात २५२ पंपांद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले होते. पण, त्यात पल्सरमध्ये टॅम्परिंग व शोल्डरिंगचा प्रकार प्रकर्षाने पुढे आला नाही.

७० टक्के पंप संशयास्पद

पोलिसांनी यासंदर्भातील सहा संशयित तंत्रज्ञांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातून अटक केली आहे. या अटक केलेल्यांपैकी एक तंत्रज्ञ शिबू थॉमसने १५०० पेट्रोलपंपांवरील मशिनमध्ये छेडछाड केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे राज्यातील हा पेट्रोलचोरीच्या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे दिसून येत असन, तब्बल ७० टक्के पेट्रोलपंप संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रक्रियेमुळे गोंधळ टळण्याची अपेक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या निकालात दिसून आलेल्या गुणांच्या फुगवट्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठीची अकरावी प्रवेशाची मेरिट लिस्ट यंदाही नव्वदीपार जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षीही शहरात खुल्या प्रवर्गातून सायन्ससाठी पहिल्या मेरिट लिस्टने ठेवलेले नव्वदीपारचे आव्हान तब्बल तिसऱ्या लिस्टनंतरही कायम राहिले होते. यंदा गुणांच्या फुगवट्यामुळे याच दरम्यानच्या आकडेवारीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमध्येही वाढ झाल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांना यासाठी चित्रकला, लोककला आणि स्पोर्टस कोट्यातील १५ गुणांचा फायदा झाल्याने त्यांची एकूण टक्केवारीही वधारली आहे. परिणामी, राज्याप्रमाणेच नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही एकूण ५०० पैकी ५०० गुण मिळविण्याचा किंवा त्या आकडेवारीच्या आसपास पोहोचण्याचा विक्रम केला आहे. परिणामी, यंदाही शहरातील रँकिंग असणाऱ्या कॉलेजांमध्ये सायन्स शाखेसाठी पहिल्या तीन मेरिट लिस्टची आकडेवारी ९२ टक्क्यांच्या आसपास राहील, तर कॉमर्ससाठी ही टक्केवारी ९० च्या आसपास लागण्याची शक्यता आहे.

सोमवारपर्यंत ११ वीचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले गेले आहेत. यामुळे आता पाच जुलै रोजी लागणाऱ्या मेरिट लिस्टवर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. यंदा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पहिल्यांदाच ऑनलाइन राबविण्यात आली. यामुळे एकाच कॉलेजभोवती होणारा विद्यार्थिसंख्येचा फुगवटा दूर होऊन विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया राबविली जाण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनैतिक संबंधातून पत्नीसह मुलाचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीसह नातेवाइकाच्या दहा वर्षीय बालकाचा खून करून स्वतः आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २६) सकाळी पिंपळगाव बसवंत येथील पवननगर भागात उघडकीस आली.

रवींद्र नागमल (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रवींद्रने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखा नागमल (२३) आणि विशाल विजय पानपाटील (१०) याची गळा दाबून हत्या केली. नागमल कुटुंब मूळचे धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सोनगीर येथील आहे. गवंडीकाम करणारा रवींद्र कुटुंबासह १५ दिवसांपूर्वी पिंपळगाव बसवंत येथे आला होता. पवननगर येथील अनसूया निवास येथील रूम क्रमांक आठ ही रूम त्याने भाड्याने घेतली. शेजारी राहणाऱ्या एका मुलीला सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नागमलच्या घरात कोणी तरी गळफास घेतल्याचे दिसले. तिने ही माहिती लागलीच घरमालक निखिल शिंदे यांना कळवली. त्यांनी नागमलच्या घराचा दरवाजा उघडून पाहिला असता नागमलने गळफास घेतल्याचे, तर सुरेखा आणि विशाल निपचित पडलेले आढळले. शिंदे यांनी ही माहिती पिंपळगाव बसवंत पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना तेथे सुसाइड नोट आढळून आली. त्यात त्याने पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे ही हत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत बोलताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय गायकवाड यांनी सांगितले, की पत्नीचे विजय पानपाटील या साडूबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय नागमलला होता. त्यातच चार दिवसांपूर्वी या दोघांना रवींद्रने एकत्र पाहिले. पत्नीने जाणीवपूर्वक पानपाटीलच्या मुलाला शिक्षणासाठी बरोबर ठेवल्याचा रवींद्रचा संशय होता. याच कारणातून त्याने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखासह पानपाटील यांचा दहा वर्षीय मुलगा विशाल याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेतला. त्याच्या सुसाइड नोटमुळे हा प्रकार अनैतिक संबंधावरून झाल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पोटच्या मुलाला सोडले

नागमल दाम्पत्यास सहा ते सात वर्षांचा मुलगा असून, त्याला रवींद्रने काही केले नाही. त्याचा सर्व राग पत्नीसह विशालवर होता. मध्यरात्रीच्या सुमारास रवींद्रचा मुलगा गाढ झोपेत असताना त्याने या दोघांचा गळा दाबला. यानंतर स्वतः आत्महत्या केली. सकाळी हा मुलगा उठला. मात्र, त्याला काही समजलेच नाही. यानंतर थोड्याच वेळात इतर शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला. या मुलास काहीच कसे झाले नाही, त्याचे इतर नातेवाईक कोण, याचा तपास सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर मानीव खरेदीखत डीडीआरनेच करून द्यावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील नोंदणीकृत ३,२४६ गृहनिर्माण सोसायट्यांचे डीम कन्व्हेन्स (मानीव खरेदीखत) होणे अजूनही बाकी आहे. परिणामी सातबारा उताऱ्यावर बांधकाम व्यावसायिकाचेच नाव असून, सोसायटीचे आणि ग्राहकांचे नावच येत नसल्याने भविष्यात घर विक्रीसाठीही त्यांना अडचणी येऊ शकतात. म्हणूनच ग्राहकांनी त्वरित जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क साधावा, तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून अडवणूक केली जात असल्यास डीडीआरने स्वत:च्या अधिकारात डीम कन्व्हेन्स करून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ग्राहकांना घरे खरेदी करण्यासाठ‌ी बांधकाम व्यावसायिकांकडे धाव घ्यावी लागते. व्यवहार निश्च‌ित झाल्यावर प्रथम केवळ सेलडीड केले जाते. डीम कन्व्हेन्स करून देणे आवश्यक असतानाह‌ी बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची अडवणूक करतात. असे प्रकार सर्रास होऊ लागल्याने सरकारने २०१२ पासून बिल्डरच्या वतीने डीम कन्व्हेन्सचे अधिकारी डीडीआरला दिले आहेत. त्यासाठी सोसायटीतील एकुण सदनिकाधारकांपैकी ६० टक्के ग्राहकांची संमती असावी आणि इमारत पूर्णत्वाचा दाखला असावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता करणाऱ्याचे डीम कन्व्हेन्स डीडीआरही करून देऊ शकतो.

प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ४,९९० गृहनिर्माण सोसायट्यांपैकी केवळ १,७४४ सोसायट्यांचेच डीम कन्व्हेन्स झाले आहे. उर्वरित ३,२४६ सोसायट्यांचे डीम कन्व्हेन्स अजूनही होऊ शकलेले नाही. पैसे देऊनही केवळ सेलडीडच मिळत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. परिणामी, घरे खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांना अडचणी येत असल्याची तक्रार ग्राहक तक्रार निवारण समितीच्या बैठकीत अशासकीय सदस्यांकडून अलीकडेच करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हा उपनिबंधकांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. अडचणीतील सोसायट्यांनी, तसेच तेथील रहिवाशांनी त्वरित डीडीआरशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधकांकडे गृहनिर्माण सोसायटी म्हणून नोंदणी झालेल्या, परंतु अजूनही डीम कन्व्हेन्स न झालेल्या सोसायट्यांना नोटिसा देऊन ते नोंदवि‌ण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बैठकीला सुरेशचंद्र राहटकर, दीपक पाटोदकर, सुधीर काटकर, हरीश मारू, लक्ष्मण गव्हाणे, शिवाजी मोंढे, प्रकाश वैशंपायन, डॉ. प्रतिभा औंधकर यांच्यासह अधिकारी आणि समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यातही रमजान उत्साहात

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरासह जिल्ह्यातील चारही तालुक्यात पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मौलवी गंज, ऐंशी फुटी रोडवरील बाजारपेठ भागात तात्पुरता स्वरुपात कपड्यांसह विविध वस्तू खरेदीसाठी दुकाने थाटण्यात आली होती. तर ईदनिमित्त शहरातील पाझंरा नदीकिनारी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू-मुस्लिम

एकतेचे प्रतीक असलेले अंजान शाह बाबा दर्गाबाहेर पोलिस अधीक्षक

एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव, पोलिस निरीक्षक अनिल वडनेरे, पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, एसआरपीएफचे समादेशक चंद्रकांत गवळी यांच्यासह शहरातील सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच ईदनिमित्त जिल्हाभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील चारही तालुक्यात एक हजाराहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि सहाशे गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाभरात सर्वत्र रमजान ईद सण उत्साहात साजरा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशसेवेसाठी निवडा स्पर्धा परीक्षा

0
0

‘करिअर मार्गदर्शन’मध्ये अविनाश धर्माधिकारी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षांचा प्रांत हा ग्लॅमरचा नक्कीच नाही. केवळ ग्लॅमर म्हणून या क्षेत्राकडे बघत असाल तर येथे येण्याअगोदर एकदा विचार करा. या मार्गाव्दारे मिळणारी देशसेवेची मोठी संधी ही सर्वाधिक मूल्यवान आहे. त्यापुढे इतर सर्व गोष्टी गौण आहेत. देशसेवेसाठी या मार्गाची निवड नक्की करा, असे आवाहन माजी आयएएस अधिकारी आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना केले.

‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गर्दीने खच्चून भरलेल्या सभागृहाशी त्यांनी संवाद साधला. ‘दहावी व बारावीनंतरचे करिअर आणि स्पर्धा परीक्षा’ या विषयावर बोलताना धर्माधिकारी म्हणाले, की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रत्येक विद्यार्थ्याने एक त्रिसूत्री कायम स्मरणात ठेवायला हवी. स्वत:ची ओळख हे पहिले सूत्र, मानसिक कलानुसार करिअरच्या क्षेत्राची निवड हे दुसरे क्षेत्र आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात कमालीचे नैपुण्य या तीन सूत्रांची सांगड घातल्यास यशाचा किल्ला दूर नाही, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्पर्धा परीक्षांकडे वळताना विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरसमज असतात. कधी शिक्षणाचे माध्यम, शिक्षणाची विशिष्ट शाखा, कौटुंबिक परिस्थितीचे स्वरूप आदी मुद्द्यांचा यात समावेश होतो. पण आजवर यूपीएससी आणि एमपीएससी या सेवांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा अभ्यासल्यास तुमच्या डोळ्यांसमोरचे गैरसमज दूर होतील.

बुध्दीमत्तेविषयी समाजात भ्रामक संकल्पना आहेत. त्या संकल्पना बदलत्या जग प्रवाहासोबत आपण दूर केल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. विशिष्ट टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले म्हणजे तो हुशार किंवा केवळ इंजिनीअरिंग आणि मेडिकल शाखेचे शिक्षण घेतो तो हुशार अशा चुकीच्या व्याख्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विषमता तयार केली आहे. आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ट असा आविष्कार सादर करण्याला दिवंगत क्रीडामानसोपचारतज्ज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांच्यासारख्या मार्गदर्शकांनी यश म्हटले आहे, असेही धर्माधिकारी यांनी नमूद केले.

स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र आज व्यापक बनले आहे. आपण निवडू त्या करिअरमध्ये स्पर्धा परीक्षांचा एक पर्याय समोर येतो आहे. त्यामुळे विशिष्ट शाखा निवडून मग स्पर्धा परीक्षा देऊन करिअर घडविणे हा समज चुकीचा होईल, असे त्यांनी सांगितले. या क्षेत्राला बुध्दिवान आणि विशाल दृष्टिकोन असणाऱ्या तरुणांची गरज आहे. तुम्ही येथे नक्की या मात्र येताना देशसेवेचे ध्येय उराशी बाळगून या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘स्लाइड शो’तून प्रकाशझोत

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षांचे स्वरूप या विषयावर स्लाईड शोच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला. यूपीएससी परीक्षेत यश मिळविणारा नाशिकचा विद्यार्थी आदित्य रत्नपारखी यानेही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्याची यशोगाथा मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारिका जगताप यांना पीएच.डी.

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडनेरभैरव येथील महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका प्रा. सारिका जगताप यांना स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

सारिका जगताप या राष्ट्रीय कबड्डीपटू असून, कबड्डी खेळात मातीचे मैदान व मॅटवर खेळाडूंकडून खेळल्या जाणाऱ्या कौशल्यांचा अभ्यास या विषयावर संशोधन पूर्ण करून अवघ्या २९ व्या वर्षी सेट व डॉक्टरेट मिळविण्याचा बहुमान मिळविला. जगताप यांनी मिळविलेल्या पीएच.डी.बद्दल मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. सुनील ढिकले, अॅड. नितीन ठाकरे, नाना महाले, शिक्षणाधिकारी काजळे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, प्राचार्य अमोल भगत, अशोक दुधारे यांनी त्यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images