Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व्हॉट्सअॅप आहे तुजपाशी, पण...

$
0
0

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर अशा सोशल मीडियाचा बोलबाला फक्त नवीन पिढीपुरता मर्यादित नाही. तंत्रज्ञानातील सुलभता, इंटरनेटचा सहज वापर यामुळे साठी पार केलेली व्यक्तीही सोशल मीडियाचा विरंगुळा म्हणून वापर करतात. कम्युनिकेशन ‘सुलभ’ व्हावे म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातून व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो. आवड असो किंवा नसो, ८० टक्के नागरिक या घटकांशी जोडले गेले आहेत. अगदी दोन मिनिटे मेसेज टोन वाजला नाही तर अस्वस्थ होणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आढळून येतात. काही महिन्यांपूर्वी पुणे किंवा तत्सम शहरातून एक मुलगी बेपत्ता झाल्याचा मेसेज फोटोसह व्हायरल झाला होता. पोलिस, तसेच नातेवाइकांनी काही तासांत मुलीला शोधून काढले. मात्र, व्हॉट्सअॅपवर सामाजिक पुळका ठेवणाऱ्या महाभागांनी हा मेसेज पुढील काही दिवस फिरवत ठेवला. कोणतीही खातरजमा नाही, विचारपूस नाही. एकाने फॉरवर्ड केला म्हणून दुसऱ्याने करायचा ही प्रवृत्ती त्रासदायकच नाही तर धोकादायक ठरते. दुर्दैवाने प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या जागतिक व्यासपीठावर आपल्यापुरता विचार करतो. फेसबुक हॅक होण्याचा प्रकार निश्चित नवीन नाही. उपद्व्यापी हॅकर अधूनमधून खळबळ उडवून देतात. दहशतवादी संघटनादेखील या आयुधांचा खुबीने वापर करतात. मात्र, व्हॉट्सअॅपसारखे अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर हॅक होण्याचा शहरातील नव्हे, तर देशातील पहिलाच प्रकार असावा. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार ३० नागरिकांना हॅकरने झटका दिला आहे. त्यात २८ महिला किंवा तरुणींचा समावेश आहे.

महिलांचे अकाउंट हॅककरून त्याद्वारे कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना अश्लील मेसेज किंवा फोटोग्राफ्स हॅकरने पाठवले. या मानसिकतेची नक्की व्याख्या सांगता येणार नाही. मात्र, हा मानसिक आजार नक्कीच असला पाहिजे. आपल्याकडील ज्ञानाचा वाईट वापर करून फक्त खळबळ उडवून देण्याच्या नादात हॅकरला काय समाधान मिळाले? आज ना उद्या पोलिस हे कृत्य करणाऱ्याच्या मुसक्या आवळतील. आयटी क्षेत्रातील वाढता रोजगार अनेक तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षित करतो आहे. सर्वांनाच रोजगार मिळतो असे नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करण्यासाठी तरुणांना भरपूर वेळ मिळतो. अशा वेळी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपला पाल्य नेमकी कशाच्या आहारी जातोय, तो मोबाइलवर काय बघतोय याकडे पालकांनी लक्ष ठेवायला हवे. प्रत्येक समस्येचे उत्तर पोलिसांच्या गळी उतरवून नामानिराळे राहता येऊ शकत नाही. वन टाइम पासवर्ड (ओटीपी) हा तसा परवलीचा शब्द. विविध अॅप्लिकेशन किंवा स्मार्ट फोन सहजतेने हातळणाऱ्या व्यक्तींना ओटीपीचा वापर करावा लागतो. वन टाइम पासवर्ड हा गोपनीय, तसेच वैयक्तिक वापरासाठी असतो. तशी सूचना ओटीपी मेसेजमध्ये असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्याचा परिणामदेखील सर्वांसमोर आहे. स्मार्ट फोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सतत आपला पाठलाग केला जातो. आपल्या त्रुटी शोधल्या जातात. या त्रुटी भेदण्यात हॅकरला यश मिळाले, की आपली मालमत्ता आपली राहत नाही. पोलिस आणि हॅकरचा तपास हा नंतरचा भाग आहे. वास्तविक हॅकरला रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या यंत्रणा सदैव प्रयत्नशील असतात. तेही हॅकिंगचा अभ्यास करून संभाव्य त्रुटी-धोके दूर करण्यासाठी सिक्युरिटी फीचर्स अपडेट करतात. दुर्दैवाने बहुतांश यूजर्स याकडे दुर्लक्ष करतात. सिक्युरिटी फीचर्सचा व्यवस्थित वापर करण्यासाठी तेवढे सजग असायला हवे. व्हॉट्सअॅप सुरू केल्यानंतर सेटिंगमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन हा पर्याय असतो. हा पर्याय वापरात आणल्यानंतर व्हॉट्सअॅप सुरू करताना पिनकोड टाकावा लागतो. पिनकोड टाकल्याशिवाय हॅकर तर दूरच, पण स्वत:लाही ते सुरू करता येत नाही. हा प्रकार क्षणिक त्रासदायक असला तरी मोठी सुरक्षितता प्रदान करणारा ठरतो. फेसबुकमध्येही सुरक्षितता देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आपण आपले मानतो अशी एकही वस्तू आपली नाही. धार्मिक दृष्टिकोनातून हाच सार अनेक पिढ्यांनी पुढील पिढ्यांमध्ये रुजवला. किंबहुना तीच आपली जीवनशैली मानली. तो काळ आता सरला. हे माझे ते माझे, किंबहुना माझ्या मालकीचे ही संकल्पना जोर धरू लागली आहे. तंत्रज्ञानात हा अहंकार उपयोगी नाही. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारखे आयुध कधी उलटतील हे मास हॅकिंगच्या एका घटनेने दाखवून दिले आहे. व्हॉट्सअॅपचा वापर अनेक सुरक्षा एजन्सीजदेखील करतात. हॅकिंगच्या प्रकारामुळे यातील सुरक्षिततेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सायबर पोलिस काळाची गरज

शहर पोलिसांनी एक मे रोजी सायबर पोलिस स्टेशन सुरू केले. साधारणतः‍ दीडदोन महिन्यांच्या कालावधीत या पोलिस स्टेशनमध्ये ११ गुन्हे दाखल झाले. यातील सात गुन्हे फक्त महिलांची सोशल मीडियावर बदनामी करण्याशी संबंधित आहे. बदनामीकारक मजकूर, फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याचे हे प्रकार पोलिसांनी शोधून काढले आहेत. एक मात्र खरे, की तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामांसाठी होतो, तितकाच तो वाईट बाबींसाठीदेखील होतो आहे. अनेक घटना तर पोलिसांपर्यंत पोहोचतदेखील नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल साइट्स किंवा अॅप्लिकेशनचा वापर करताना आपणही तांत्रिकदृष्ट्या तेवढेच सजग असायला हवे. शहर पोलिसांनी सुरू केलेले सायबर पोलिस स्टेशन ही शहराच्या दृष्टीने जमेची बाजू ठरते आहे. तंत्रज्ञानाचा पदोपदी वापर होतो आहे. रोज हजारो कोटी रुपयांचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतात. स्मार्टफोनमधील अॅप्लिकेशन आपली माहिती वेळोवेळी थर्ड पार्टींना विकत असतात. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक हॅक होणे ही मोठी घटना नाही. सायबरविश्व त्याहून मोठे आणि अनाकलनीय ठरते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पाठपुरावा करून सुरू केलेले सायबर पोलिस स्टेशन नक्कीच विशेष बाब ठरते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्यासह त्यांची टीम आपले काम चोख बजवताना दिसते. अद्याप गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. हा व्याप जसा वाढेल तसे तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करणे ही पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने भविष्यात कळीचा मुद्दा ठरू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दंतवैद्यकाने कम्युनिटी एज्युकेशन बळकट करावे

$
0
0

प्रामाणिकपणा, मेहनतीची तयारी आणि समर्पण भाव या तीन गुणांच्या आधारावर उत्तम डेंटिस्ट घडू शकतो. या गुणांचा समुच्चय साधून दंतशास्त्रात करिअर करण्याची स्वप्न बघत असाल तर तुम्हाला उत्तम भविष्य आहे, असा संदेश महात्मा गांधी विद्यामंदिरच्या पंचवटी डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय भावसार यांनी ‘मटा’ शी बोलताना दिला.

डेंटिस्ट विद्याशाखेतील स्पर्धा वाढीला लागली आहे. येथे करिअरसाठी उत्तम संधी आहेत?

स्पर्धा वाढली म्हणजे संधी घटतात, असा अर्थ गृहीत धरून चालणार नाही. अलिकडील एक ते दोन दशकात मेडिकल ट्रिटमेंटच्या पलिकडे जाऊन डेंटिस्ट या स्वतंत्र शाखेकडे रुग्ण बघू लागले आहेत. हे प्रमाणही एकूण समाजाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. शिवाय उपचारांसोबतच सौंदर्यशास्त्र म्हणूनही या विषयाचे महत्त्व वाढते आहे. परिणामी करिअरच्या संधी वाढीला लागल्या आहेत.

वैद्यकीय शाखेत येण्यासाठी अभ्यासाचा मूळ पाया कच्चा नको...

मानवी आरोग्याशी थेट संबंध असणारी ही शाखा आणि त्यातील व्यवसाय ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे या शाखेकडे येताना अभ्यासाच्या मुद्द्याशी कुठल्याही टप्प्यावर तडजोड करून चालत नाहीच. यासाठीच आमच्याकडील विद्यार्थ्यांवर सुरुवातीपासून विशेष मेहनत घेतली जाते. याच्याच परिणामी संस्थेतील २५ विद्यार्थ्यांनी यंदा ‘नीट’ परीक्षा क्रॅक करून एमबीबीएसला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे. कुठल्याही संस्थेसाठी ही अभिमानास्पद आकडेवारी आहे.

गेल्या वर्षातील काही अचिव्हमेंट्स सांगता येतील?

गेल्या वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे आमच्या संस्थेतील होते. याशिवाय बायोकेमेस्ट्री, फार्माकॉलॉजी, प्रॉस्थॉडॉन्टिक्स या विषयांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकही मिळविले.

वैद्यकीय शाखेच्या अभ्यासाचे स्वरूप व्यापक आहे; तरीही इतर उपक्रमांमध्ये आपले विद्यार्थी सहभागी होतात का?

तीन वर्षांपासून आमच्या कॉलेजने विद्यापीठ स्तरावर स्पोर्टसमध्ये ठसा उमटविला आहे. एक विद्यार्थिनी आंतरराष्‍ट्रीय स्तरावर बुध्दीबळात खेळते. याशिवाय स्पोर्टस आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत बाजी मारली आहे.

संस्थेचे काही सामाजिक दायित्वही आहे. त्यादृष्टीने काही प्रयत्न?

मेडिकल कॉलेजची ओपीडीही मोठी आहे. रोज सुमारे ५०० रुग्णांना सेवा दिली जाण्याइतकी व्यवस्था आहे. याशिवाय जे रुग्ण आमच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो. यासाठी कॉलेजची मोबाइल डेंटल व्हॅन आहे. या माध्यमातून गरजू रुग्णांपर्यंत जाऊन मोफत उपचार दिले जातात.

इतरांनी प्रेरणा घ्यावा असा आपला काही उपक्रम?

समाजामध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. यातही प्रामुख्याने तंबाखूसारख्या पदार्थांच्या सेवनाने हे प्रमाण वाढीला लागते आहे. यावर आळा बसविण्यसाठी कॉलेजने काही वर्षापासून अँटी टोबॅको कॅम्पेन हाती घेतली आहे. या अंतर्गत पथनाट्यापासून ते शक्य त्या माध्यमाद्वारे तंबाखूमुक्तीचा संदेश समाजास देण्यात येतो.

यंदा आपल्याकडे काही नवीन अभ्यासक्रम?

उत्तर : यंदापासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पीएच.डी.चा अभ्यासक्रम सुरू केला आहे. वैद्यकीय शाखेतून थेट पीएच.डी. करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. या अगोदर पीएच.डी.चा मार्ग विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवीतून जात होता. ‘प्रॉस्थॉडॉन्टिक्स’ या विषयातील पीएच.डी.चे केंद्र आमच्या कॉलेजमध्ये सुरू झाले आहे. या विषयाचा पीएच.डी. गाईड म्हणूनही माझ्याकडे जबाबदारी आली आहे.


भावी डॉक्टरांच्या स्कील डेव्हलपमेंटसाठी काही विशेष प्रयत्न?

डेन्टल ही विद्याशाखा बहुतांशी स्कीलवर अवलंबून आहे. परिणामी मेडिकलच्या विद्यार्थ्यापेक्षा डेंटल विद्याशाखेचा विद्यार्थी लवकर समाजाभिमुख होतो. त्याची पदवी पूर्ण होण्याअगोदरपासून त्याचा रुग्णांशी संपर्क येतो. पर्यायाने संवादासह आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण सांभाळण्याची त्याची कौशल्य लवकर विकसित होतात. मात्र, या विद्याशाखेत संशोधनाची आणखी गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना संशोधनास प्रेरणा देण्यासोबतच ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ सारख्या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येते.


दंतवैद्यक शाखेसमोरील आव्हाने काय?

पाश्चात्य देशांच्या तुलनेत बदलत्या तंत्रज्ञासोबत स्पर्धा करणे व कम्युनिटी एज्युकेशनची दरी भरून काढणे ही महत्त्वाची आव्हाने आहेत. एकूण समाजापैकी अवघा १० टक्के समाज अद्याप डेंटिस्टकडे जातो. शक्यतो मेडिकल ट्रिटमेंटला एकूण समाजाचे प्राधान्य आहे. दातांचेही स्वतंत्र आरोग्य असते हे समजावून सांगणे म्हणजे कम्युनिटी एज्युकेशन सारख्या संकल्पनेसाठी समाजात मोठी जागरुकता उभी करण्याचे आव्हान या विद्याशाखेसमोर आहे.


नवीन डॉक्टर्स व समाजास काय संदेश द्याल?

प्रामाणिकपणा, समर्पित वृत्ती आणि मेहनतीशिवाय भविष्य नाही. याशिवाय समाजाने डॉक्टरांकडे बघताना पूर्वग्रह दूषितपणा, अपूर्ण माहिती किंवा अफवांना बळी पडून त्यांच्यावर हल्ला करण्यासारखी पावले उचलू नयेत. डॉक्टरांचीही बाजू समाजाने समजावून घ्यायला हवी.

शब्दांकन : जितेंद्र तरटे
Jitendra.tarte@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटी डेटाची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

राज्यभरातील इंजिनीअरिंग आणि फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी इमानेइतबारे राज्य सरकारची सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती असलेला लाखभर विद्यार्थ्यांचा डेटा शिक्षणसंस्थांना विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

या प्रकरणी तंत्रशिक्षण संचलनालय (डीटीई) आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) या संस्थांकडे पालकांची संशयाची सुई वळते आहे. दरम्यान, पालकांनी डीटीईकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत. काही वर्षांपासून इंजिनीअरिंग कॉलेजेसच्या समोर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीही राज्यभरात इंजिनीअरिंगच्या सुमारे १ लाख ४३ हजारांपैकी तब्बल ७९ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. परिणामी अनेक संस्थांसमोर अस्तित्व टिकविण्याचेही आव्हान आहे. या शैक्षणिक संस्थांना सद्यस्थितीत विद्यार्थी मिळविण्यासाठी मार्केटिंगवर भर द्यावी लागत आहे.

तरीही डेटा लिक?

सीईटीचा अर्ज विद्यार्थ्यांनी ‘डीटीई’च्या वेबसाईटवरून भरला होता. ‘डीटीई’ या प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाची जबाबदारी बाह्य संस्थेवर सोपविते. यामुळे ही माहिती प्राथमिक संस्था म्हणनू केवळ ‘डीटीई’ आणि या पाठोपाठची संस्था म्हणून ‘एमकेसीएल’कडे असताना खासगी मार्केटिंग कंपन्यांकडे हा डेटा कसा लिक झाला याबाबत शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे.

२० हजारात लाखभर विद्यार्थ्यांची माहिती!

यंदा इंजिनीअरिंगसाठी (पीसीएम गट) सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार होती. पैकी १ लाख १९ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तर राज्यात इंजिनीअरिंगच्या १ लाख ३२ हजार जागा आहेत. परिणामी, किमान २० हजारांवर जागा रिक्त रहाण्याचे चित्र आत्ताच स्पष्ट आहे. ही तफावत आणखी वाढण्याचा अंदाज घेता शैक्षणिक संस्थाही धास्तावल्या आहेत. याच संधीचा फायदा उचलत काही खाजगी संस्थांनी ‘डीटीई’कडे ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून हा जमा असलेला सुमारे लाखभर विद्यार्थ्यांची वैयक्तीक माहिती मिळविली आहे. विद्यार्थ्याचा संवर्ग, मोबाइल क्रमांक, इ मेल आयडी आदी माहिती कॉलेजला उपलब्ध करून देण्याचे आमिष या खासगी संस्था एसएमएस तंत्राद्वारे दाखवत आहेत. हा डेटा २० हजारात सुमारे लाखभर विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारीही ‘डीटीई’कडे आहेत.

असा आहे सीईटीचा डेटा

नाशिक जिल्ह्यातून नोंदणी २१ हजार
नाशिक जिल्हाभरातून प्रविष्ट २० हजार ५७६
जळगावमधून प्रविष्ट १२ हजार ९५
धुळे जिल्ह्यातून प्रविष्ट ७ हजार ८४०
नंदुरबार जिल्ह्यातून प्रविष्ट ५ हजार ६९०
नाशिक विभागातून प्रविष्ट ४६ हजार २०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिसांचे अवैध धंद्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिसांनी घोटी, इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जुगार अड्डे तसेच अवैध मद्य विक्री ठिकाणांवर छापे मारीत संशयितांना जेरबंद केले. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्र्यंबकेश्वर शहरालगतच्या महामार्गावरील ढाब्यावर होणाऱ्या मद्यविक्रीबाबत चौकशी करीत असताना पोलिस निरीक्षक किशोल नवले यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खंबाळे शिवारातील हॉटेल जय मल्हार येथे छापा मारला. या ठिकाणी गोरख शिवराम मोरे (रा. खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर) हा विना परवाना देशी विदेशी मद्याच्या बॉटल्स जवळ बाळगताना सापडला. त्याच्याकडून ३४ बॉटल्स जप्त करण्यात आल्या. खंबाळे शिवारातील हॉटेल नवरंग येथेही पोलिसांनी कारवाई केली. येथे अनिल दामू वाघ (२०, रा. अळवंड, ता. त्र्यंबकेश्वर) याच्याकडे एक हजार ९७० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. या दोघांविरोधात मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे घोटी-सिन्नर रोडवरील भरविहिर शिवारातील हॉटेल विसावा येथे पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी देशी विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या हेमंत बारकू सहाणे (संभाजीनगर, घोटी) याच्याकडून पोलिसांनी २४ बॉटल्स जप्त केल्या. ही सर्व कारवाई शुक्रवारी, ३० जून रोजी करण्यात आली. यानंतर, शनिवारी (दि. १ जुलै) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गावातील इंदिरानगर परिसरात छापा टाकून इसमोद्दीन जाउद्दीन सैय्यद उर्फ अज्जु यास पकडले. हा संशयित मटका खेळताना तसेच खेळवताना मिळून आला. त्याच्याकडील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा दोन हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी निफाड, येवला, बसवंत पिंपळगाव, मनमाड या ठिकाणी देखील कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

अनधिकृत हुक्का पार्लरला दणका

सहायक पोलिस निरीक्षक जे. बी. गिरी आणि त्यांच्या पथकाने चांदशी गावासमोर असलेल्या शॅक रेस्टॉरंट येथे छापा मारला. या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापक राजू विष्णु जगताप यास अटक केली. हॉटेलच्या बाजूस हुक्का पार्लर सुरू होता. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये सिगारेट अॅण्ड ऑदर टोबॅको प्रोडक्ट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावरील संदीप फाउंडेशनच्या होस्टेलमध्ये १९ वर्षीय तरुणीने ओढणीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अपर्णा रमेश जाधव (रा. इंद्रायणी अपार्टमेंट, डहाणू) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. ती संदीप फाउंडेशन शिक्षण घेत होती.

अपर्णाने रविवारी (दि. २) दुपारी दोन वाजेपूर्वी होस्टेलच्या खोलीत दरवाजा आतून बंद करून घेतला. तिच्या रुममेटने दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा उघडत गेला नाही म्हणून त्यांनी हास्टेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. होस्टेल प्रशासनाने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने त्र्यंब पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मागदर्शनाने उपनिरीक्षक अकुले, नाईक ए. जी. जाधव, हवालदार रमेश पाटील आदींसह पथक संदीप फाउंडेशन येथे तातडीने पोहचले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अपर्णाने छताला ओढणीच्या सहायाने गळफास लावलेला आढळून आला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीला आला. अपर्णाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. संदीप फाउंडेशनमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिस या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. शिक्षणात गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थी बळी जातात म्हणून शासकीय पातळीवर विविध प्रकारे अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत, मात्र, तरीही स्पर्धेचे मायाजाल कमी होत नसल्याने येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वीच्या ओळखीचा फायदा घेत घरात घुसलेल्या संशयित आरोपीने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयिताविरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अली (पूर्व नाव पत्ता नाही) असे संशयित आरोपीचे नाव आहे. भारतनगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपीचे आणि या कुटुंबाची पूर्वीपासून ओळख आहे. याचा फायदा घेत २९ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयित पीडित मुलीच्या घरात घुसला. तिथे त्याने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. तसेच अश्लिल शिवीगाळ करून पळून गेला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड करीत आहे.

भंगाराची चोरी

पेठरोडवरील एसटी वर्कशॉपमधून चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपये किंमतीचे कॉपर, तांबे व इतर धातूंचे भंगार चोरी केले. यापूर्वी वर्कशॉपमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास प्राधन्य देण्याची आवश्यकता आहे. अरविंद सिताराम कहार यांच्या फिर्यादीनुसार, पेठरोडवरील एसटी वर्कशॉपमध्ये तांब्याचे स्क्रॅप मटेरियल गोडावूनमध्ये ठेवण्यात येते. विशेष म्हणजे सर्व मुद्देमालाची मोजणी करून तो सिलबंद केलेला असतो. २८ जून ते २९ जून या काळात चोरट्यांनी अॅटो स्क्रॅप गोडावूनच्या शटरच्या खिडकीचे गज तोडून, काचा फोडून त्यावाटे आत प्रवेश केला. तसेच, तब्बल एक लाख रुपयांचे स्क्रॅप धातूचे भंगार चोरी केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बेडवाल करीत आहे.

प्लॉट विक्रीतून फसवणूक

प्लॉट विक्री करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन ते परत न करणाऱ्या तिघा जणांविरोधात अंबड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमलदीप गुरूदास देवरे, मंगेश रत्नाकर वाघमारे आणि राजू आंबादास दहिजे (रा. कृष्ण अपार्ट. वासननगर, पाथर्डी फाटा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रिया शंकरभाई कापसे (२८, वरदलक्ष्मी अपार्ट, कामटवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. कापसे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी त्यांना युनायटेड सिटी प्रोजेक्टमधील राजूर बहुला येथील गट क्रमांक १३१/१३ मधील १७१ चौरसमीटर प्लॉट विक्री करण्याचे आमिष दाखवले होते. तसेच ऑगस्ट २०१३ च्या सुमारास कापसे यांनी करारनामा करून १५ लाख ३३ हजार ८७० रुपये दिले. मात्र, काहीच दिवसात संशयितांनी प्लॉट विक्री करणार नसल्याचे सांगत कापसे यांना चार लाख रुपये परत केले. उर्वरित नऊ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम मात्र अद्यापपर्यंत परत केली नाही. प्लॉटही मिळत नाही आणि संशयित पैसेही परत देत नसल्याने कापसे यांनी अंबड पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

अपघातात महिलेचा मृत्यू

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेस अज्ञान वाहनाने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास नागझिरा नाल्याजवळ, देवळाली कॅम्प येथे झाली. मीराबाई विजू सानप (४५, रा. शिकलकरी वस्ती, सिन्नर फाटा, ना. रोड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मीराबाई यांना पहाटेच्या सुमारास भरधाव वाहनाने जोराची धडक दिली.

जुगार अड्ड्यावर छापा

वडाळा गावातील महापालिका शाळेच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारीत पोलिसांनी ११ जणांना जेरबंद केले. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. आयूब अब्बास शेख (रा. केबीएच शाळेसमोर, वडाळागाव) असे मुख्य संशयिताचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या १० साथिदारांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. वडाळा गावातील गौसिया मशिदीसमोरील महापालिकेच्या शाळेच्या मोकळ्या जागेत हा अड्डा सुरू होता. पोलिसांनी १९ हजार ८४० रुपयांची रोकड तसेच जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी पोलिस नाईक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पठाण करीत आहे.

लॉटरी सेंटरवर छापा
भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्लीतील आंनद एजन्सीसमोर असलेल्या शुभ लॉटरी दुकानात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी संतोष जयराम चौधरी (३८, वज्रेश्वरीनगर, दिंडोरी रोड) आणि त्याच्या १० साथिदारांना जेरबंद केले. ही कारवाई ३० जून रोजी रात्री पाऊणे अकरा वाजेच्या सुमारास झाली. घटनास्थळावरून कॉम्प्युटर, रोकड आणि इतर साहित्य असा ६१ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित चौधरी या ठिकाणी मिलन मटका नावाचा जुगार खेळताना आणि खेळवताना मिळून आला. या प्रकरणी पोलिस शिपाई निंबाळकर यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आली. अधिक तपास पीएसआय जोनवाल करीत आहे.

अपघातात दोघे ठार

घोटी : घोटी-सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात रविवारी सकाळी कंटेनर-ट्रक अपघातात कंटेनरचालकासह दोन जण ठार झाले. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. कैलासकुमार माली असे ठार झालेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे. त्यासह अन्य मृताचे नाव कळू शकले नाही. सकाळी साडेआठच्या सुमारास सिन्नरहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर आणि मुंबईहून सिन्नरच्या दिशेने जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील घरफोडीत २५ तोळे सोने लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील सुंदरबन कॉलनीत झालेल्या घरफोडीत सुमारे २५ तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये असे सुमारे पाच लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मयूर प्रकाश सांब्रे (३०, रा. आरव्ही व्हिला, सुंदरबन कॉलनी) यांनी या प्रकरणी पोलीसांत फिर्याद दिली आहे. सांब्रे हे २९ जूनपासून अहमदनगर येथे गेले असतांना त्याच्या घरी चोरी झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपये रोख रक्‍कम व एक मोबाइल असा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

वाढत्या घरफोड्यांनी नागरिक हैराण
सध्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भरदिवसा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घरफोडी झाली होती, त्यानंतर हे घरफोडीचे सत्र सुरूच असून पोलिसांना अद्याप या घरफोडीतील संशयितांना पकडण्यात यश न आल्याने आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे. पोलिसांकडून हद्दीत गस्तच होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून वारंवार होणाऱ्या घरफोड्याबाबत पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या हातावर तुरी

$
0
0

नाशिक ः बनावट नोटा छापून त्या वितरित करण्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपींपैकी एकाने टॉयलेटच्या खिडकीचे गज वाकवून धूम ठोकली. ही घटना रविवारी (दि. २) सकाळी आठ वाजेच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या कार्यालयात घडली. पोलिसांच्या सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली गावात संशयितास जेरबंद करण्यात आले.

कांतीलाल यशवंत मोकाशी (रा. खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला क्राइम ब्रँचच्या युनिट एकने शनिवारी (दि. १) रात्री त्याच्या साथिदारांसह पाथर्डी फाटा येथून अटक केली होती. संशयित आरोपीकडे मोठ्या स्वरूपात बनावट आढळून आल्याने या नोटा कुठे छापल्या, कोठे वितरित करण्यात आल्या. अशा प्रश्नाची उत्तरे पोलिसांना शोधायची होती. अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून क्राइम ब्रँचच्या पथकाने मोकाशी व अन्य एका संशयितास मुख्यालयातील युनिट एकच्या कार्यालयात आणले. उर्वरित दोघा संशयितांना घेऊन एक पथक रात्री खर्डीकडे रवाना झाले. युनिट एकच्या कार्यालयात मोकाशीसह अन्य एकाची प्राथमिक चौकशी सुरू होती. सकाळच्या सुमारास मोकाशीने जुलाब सुरू झाल्याचे सांगत टॉयलेट गाठले. मात्र, या दरम्यान टॉयलेटच्या खिडकीचे गज वाकवून त्याने धूम ठोकली.

पोलिस मुख्यालयच्या मधोमध असलेल्या युनिटच्या कार्यालयातून संशयिताने धूम ठोकल्याची माहिती समजताच पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिसांच्या दोन ते तीन पथकांनी रेल्वे स्टेशन, बसस्टॉप तसेच शहरातील इतर काही भाग पिंजून काढला. दरम्यान, फरार संशयित मोकाशी इगतपुरी तालुक्यात गेल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार, एका पथकाने म्हसुर्ली गावात दडून बसलेल्या मोकाशीला जेरबंद केले.

२२४ नुसार गुन्हा

पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी मोकाशीविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुन्हा मोकाशीस अटक झाल्यानंतर त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. एवढेच नव्हे तर अशा कलमानुसार गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीला सेंट्रल जेलमध्येही अधिक ‘सुरक्षित’ ठेवण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभरच्या बनावट नोटांचे रॅकेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाचशे, हजार किंवा दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाई सर्वश्रृत आहे. मात्र, आता १०० रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात असल्याचे समोर आले आहे. तब्बल पाऊणे दोन लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा छापून वितरित करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला क्राइम ब्रँचच्या युनिट एकने जेरबंद केले आहे. पाथर्डी फाटा परिसरात शनिवारी (दि. १) रात्री सापळा रचून संशयितांना जेरबंद करण्यात आले.

प्रशांत विनयाक खरात (रा. आसनगाव, शहापूर जि. ठाणे), राजेंद्र परदेशी (रा. खर्डी, शहापूर जि. ठाणे), उत्तम गोळे (रा. शहापूर जि. ठाणे) आणि कांतीलाल यशवंत मोकाशी (रा. खर्डी, ता. शहापूर, जिल्हा ठाणे) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. बनावट नोटांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळा येथे सापळा रचला. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास संशयास्पद इंडिका कार शिवाजी पुतळा येथे आल्यानंतर क्राइम ब्रँचच्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळल्यात. वाहनांची तपासणी केली असता पोलिसांना १०० रुपयांच्या बनावट नोटांचे १७ बंडल सापडले. एक लाख ७० हजार २०० रुपये किंमती दराच्या या बनावट नोटा विक्री करण्यात येणार होत्या. साधारणतः एक बनावट ५० रुपये दराने विक्री केली जाणार होती. सर्व संशयित ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील रहिवाशी असून, संशयितांनी यापूर्वी शहरात बनावट नोटांची विक्री केली असावी, अशी शक्यता व्यक्त होते आहे. या प्रकरणी पोलिस नाईक दिलीप मोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये कलम ४८९ मधील अ, ब आणि क या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास क्राइम ब्रँचचे एपीआय मोहिते करीत आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी खर्डी येथेच बनावट नोटा छापल्या असाव्यात, अशी शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक खर्डी येथे रवाना झाले आहे.

छोट्या नोटांकडे द्या लक्ष!
ग्राहक साधारणतः पाचशे किंवा दोन हजाराच्या मोठ्या दराच्या नोटा पारखून घेतात. त्यातुलनेत ५० किंवा १०० रुपयांच्या नोटांकडे दुर्लक्ष होते. याचाच फायदा घेऊन समाजकंटकांनी आपला मोर्चा या छोट्या किमतीच्या नोटांकडे वळवला आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड पोलिसांनी ५० रुपये दरांच्या बनावट नोटा छापणाऱ्यास जेरबंद केले होते. आता, क्राइम ब्रँचने ही टोळी पकडली आहे. चलनात अशा बनावट नोटांचा वापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक : सोनालीला व्हायचंय आयएएस अधिकारी...!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

वडील संतोष एका खासगी सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड. अनेक वर्षांपासून अगदी मेहनती रिक्षाचालक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. मात्र ब्रेन ट्युमरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासल्याने त्यांना रिक्षा सोडावी लागली. त्यांनी ‘सिक्युरिटी गार्ड’ म्हणून काम करण्याचा निश्चय केला. घरी कसला आधार नाही. याशिवाय दोन लहान बहिणींचं शिक्षणंही सुरू आहे. त्यासाठी पैसा कमी पडू नये म्हणून आईही घरकाम करून वडिलांना मदत करतेय. अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची जाण ठेवून सोनाली कुंवरने दहावीत ९२.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देत आयएएस अधिकारी होण्याचे सोनालीचे स्वप्न आहे. सोनालीने आतापर्यंत ज्या ज्या शालेय परीक्षा दिल्या, त्यात ती अव्वल आली आहे. यापुढेही स्पर्धा परीक्षा देत कलेक्टर किंवा तत्सम मोठ्या अधिकारीपदावर काम करण्याचे तिचे ध्येय आहे.

सोनाली संतोष कुंवर ही भगूर येथील नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी. तिच्या जन्मापासूनच तिचे वडील या परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. संतोष यांना वृद्ध वडील व दोन भाऊ. ते आपला प्रपंच चालविण्यासाठी नोकरी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवितात.

कुंवर कुटुंबातील धार्मिक वातावरण आणि कुणाच्याही मदतीला धावून जाण्याची वृत्ती, यामुळे या परिसरातील घराघरांत ते परिचित आहेत. अगदी १२ बाय १५ च्या खोलीमध्ये आपल्या वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित घरातील एका माडीवर त्यांनी अतिशय हलाखीचे दिवस काढत कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. रिक्षाचालकाचा व्यवसाय २०१४ पासून ब्रेन ट्युमरसारख्या आजारामुळे सोडून दिला. पत्नी व आपल्या तीन मुलींसह त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांनी ‘सिक्युरिटी गार्ड’सारख्या कामात स्वतःला झोकून दिले आहे. दिवस-रात्र नशिबी आलेल्या आजाराशी झुंज देत ईश्वराने पदरी टाकलेल्या तिन्ही मुलींचा सांभाळ करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा परिस्थितीतही सोनालीने खचून न जाता दहावीत ९२.२० टक्के गुण मिळविले आहेत.

सोनालीसोबत दोन लहान बहिणी आहेत. दोन नंबरची पूजा दहावीत शिक्षण घेतेय, तर लहान बहीण विद्या सहावीमध्ये नूतन विद्यामंदिरात शिक्षण घेत आहे. दोघीही अभ्यासात हुशार आहेत. त्यांनाही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून यशाची भरारी घेण्याची इच्छा आहे. सकाळी लवकर उठून आईला घरकामात मदत करून अभ्यासाला सुरुवात करायची. रात्री उशिरापर्यंत मन लावून अभ्यास करायचा. कुंवर यांच्या घरी मनोरंजनासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे अभ्यास हेच तिने सर्वस्व मानले. चिकाटीने अभ्यास एके अभ्यास करीत तिने सर्व विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळवत नेत्रदीपक यश मिळविले. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे पुढच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न तिच्यापुढे आहे. सध्या तिने अकरावी सायन्समध्ये नूतन विद्यामंदिरातच अॅडमिशन घेतले आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससीची परीक्षा देत आयएएस अधिकारी होणार असल्याचे सोनाली सांगते. सोनालीने आतापर्यंत ज्या-ज्या शालेय परीक्षा दिल्या, त्यात ती एक किंवा दोन क्रमांकाने उत्तीर्ण होत गेली. यापुढेही स्पर्धा परीक्षा देत कलेक्टर किंवा तत्सम मोठ्या अधिकारीपदावर काम करण्याचे तिचे ध्येय आहे. आपल्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी ती आतापासूनच झटून अभ्यासाला सुरुवात करणार आहे. सोनालीच्या पंखांना बळ देण्यासाठी आपल्या दातृत्वाची गरज आहे. यातून सोनालीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणसाठ्यात आठ टक्क्यांची भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठसह बहुतांश भागात संततधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गंगापूर आणि पालखेड धरण समूहांमधील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी पातळीत २४ तासांत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहोचला असून, दारणा धरणातील पाणीसाठाही ३३ वरून ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दारणा धरणातून शनिवारी सायंकाळपासून ११०० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नांदूर मध्यमेश्वरमधूनही दोन हजार क्युसेसने विसर्ग सुरू झाला आहे.

कधी नव्हे एवढी जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावून नाश‌िककरांना खुश केले. जुलैमध्येही पावसाने जिल्हावासियांवर मेहेरबानी कायम ठेवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस‌ सुरू असल्याने धरणांमधील पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा १४८८ दशलक्ष घनफूटांवरून १९२७ दशलक्ष घनफूटांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या २४ तासांमध्ये ४३९ दशलक्ष घनफूटने पाणी पातळीत वाढ झाली आहे. काश्यपी धरणातील पाणीसाठाही २३ वरून २७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गौतमी गोदावरीमधील उपयुक्त पाणीसाठा १० वरून १४ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून गंगापूर धरण समूहाच्या एकूण पाणी पातळीतही एकाच दिवसात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरण समूहात एकाच दिवसात ६१७ दशलक्ष घनफूटांनी पाणी वाढले आहे.

पालखेड धरण समूहातील दारणा धरणातील पाणीसाठ्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली असून, हा पाणीसाठा ३३ वरून ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. भावली धरणातील पाणीसाठ्यातही चार टक्क्यांनी वाढ होऊन तो आता ४१ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात २४ धरणे असून, त्यांच्या एकूण पाणी पातळीतही एकाच दिवसात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा पाणीसाठा आता २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांमध्ये सध्या १३ हजार ८९८ दशलक्ष घनफूट पाणी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सहा धरणे तहानलेली

जिल्ह्यातील सहा धरणे अजूनही पूर्णत: कोरडी आहेत. त्यामध्ये पालखेड धरण समूहातील पुणेगाव, तीसगाव, मुकणे, भोजापूर, गिरणा खोऱ्यातील नागासाक्या, माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे.

दारणातून पाण्याचा विसर्ग

जुलैच्या पहिल्या आठवड्यात दारणा धरणात ३३ तर गंगापूर धरणात ३५ टक्के एवढाच पाणी साठा असायला हवा असा प्रशासनाचा निकष आहे. परंतु, दारणा धरणात आजमितीस ४५ टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळेच येथील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, शनिवारी सायंकाळपासून विसर्गाला सुरुवात झाली आहे. दारणातून ११०० क्युसेसने तर नांदुरमध्यमेश्वरमधून दोन हजार क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा लाभ औरंगाबादला होणार आहे.


धरण आणि पाणीसाठा

धरण पाणीसाठा

गंगापूर ३४

काश्यपी २७

गौतमी गोदावरी १४

आळंदी ५

पालखेड १२

करंजवण ६

वाघाड २

दारणा ४५

भावली ४१

वालदेवी ८

नांदूर मध्यमेश्वर ८६

चणकापूर २६

हरणबारी १०

केळझर ६

गिरणा २६

पुनद ३०

एकूण २१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींचे गाळे धूळ खात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिकेने गंगापूररोडवरील आनंदवली गावात भव्य व्यापारी संकुल उभारले आहे. मात्र, मुख्य रस्त्यावरच असलेल्या या संकुलातील कोट्यवधींचे गाळे धूळ खात पडून असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. व्यावसायिकांची मागणी असूनदेखील केवळ स्थानिक राजकारणात गाळे अडकले असल्याचा आरोप केला जात आहे. महापालिका आयुक्तांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

व्यावसायिकांसह सर्वच समाजघटकांना पुरेशा सेवा, सुविधा मिळाव्यात म्हणून महापालिका नेहमीच प्रयत्न करत असते. त्याच अनुषंगाने शहरातील विविध भागात महापालिकेने व्यापारी संकुले उभारली आहेत. आनंदवली गावातदेखील गंगापूररोडवर भव्य व्यापारी संकुल महापालिकेने उभारलेले आहे. एकीकडे खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून लाखो रुपये देऊन असंख्य व्यावसायिक गाळे घेत असतात. परंतु, दुसरीकडे नाममात्र भाडे असूनदेखील कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले आनंदवली गावातील गाळे मात्र धूळ खात पडून आहेत. यात स्थानिकांकडून राजकारण केले जात असल्याने महापालिकेची वास्तू पडून असल्याने व्यावसायिक रोष व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे नामांकित बँकांनी महापालिकेकडे गाळे मिळावेत यासाठी मागणीदेखील केली होती. अनेकदा महापालिकेने गाळ्यांचे लिलावही केले होते. परंतु, काही स्थानिक व्यावसायिकांनी महापालिका जास्त भाडे आकारत असल्याचा आरोप केल्याने लिलाव बारगळले होते.

एकंदरीतच व्यावसायिकांची निकड पाहता शहरातील सर्वाधिक रहदारीचा रोड असलेल्या गंगापूररोडवरील आनंदवली गावातील या महापालिकेच्या गाळ्यांचे लिलाव करावेत, अशी मागणी परिसरातून केली जात आहे. काही नामांकित बँकांनीदेखील मुख्य रस्त्यावरील गाळे मिळावेत यासाठी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरवा केला आहे. परंतु, स्थानिक राजकारणात कोट्यवधींचे गाळे धूळ खात पडून असल्याने महापालिका आयुक्तांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील गरजू व्यावसायिकांनी केली आहे.

--

१३ वर्षांपासून वापराविना

शहरातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर असलेल्या महापालिकेच्या संकुलातील गाळे तब्बल १३ वर्षांपासून वापराविना धूळ खात पडून असल्याची स्थिती आहे. याप्रश्नी परिसरातील गरजू व्यावसायिकांनी लोकप्रतिनिधी, तसेच महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील स्थानिक राजकारणामुळे केवळ लिलाव घेण्यापुरताच निर्णय होऊ शकला आहे. त्यापुढील कार्यवाही मात्र होतच नसल्याने व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

--

आनंदवली गावातील महापालिकेच्या संकुलातील असंख्य गाळे केवळ स्थानिक राजकारणामुळे वापराविना पडून आहेत. त्यामुळे परिसरातील गरजू व्यावसायिकांची नाहक कोंडी होत असून, हे गाळे संबंधित व्यावसायिकांना तातडीने देण्यासाठी कार्यवाही होण्याची गरज आहे.

-राजू जाधव, अध्यक्ष, नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन अर्जांनंतरही रांगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

‘आयटीआय’मधील प्रवेशप्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलेली आहे. परंतु, त्यानंतरही विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी दमछाक होताना दिसत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला. मात्र, ऑनलाइन अर्ज भरल्यावर पुन्हा सत्यप्रती दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. ऑनलाइन भरलेले अर्ज तपासण्यासाठी आयटीआयमध्ये पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. दरम्यान, आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून, २ जुलैपर्यंत तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर केले असल्याचे आयटीआयचे प्राचार्य आर. एफ. पाटील यांनी ‘मटा’ला सांगितले.

शासकीय आयटीआयमध्ये २७ विविध ट्रेड्ससाठी एकूण १३०७ जागा उपलब्ध आहेत. आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली असून, ७ जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश घेऊ शकतात. परंतु, ऑनलाइन अर्ज भरल्यावरही सत्यप्रती प्रत्यक्ष दाखविण्यासाठी आयटीयमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याने सत्यप्रती तपासणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. येथील ऑनलाइन प्रवेश ७ जुलैपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर प्रथम सर्वसाधारण गुणवत्तायादी आयटीआयच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.

ऑनलाइन प्रवेश अर्ज करूनदेखील सत्यप्रती तपासण्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागले. या कामासाठी आयटीआयने जादा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय टळू शकेल.

-कल्पेश जाधव, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांचा पर्यावरण संरक्षणाचा संदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरातील जनता विद्यालय येवला येथील विद्यालयात वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किशोर नागपुरे होते. गेल्यावर्षी १ जुलै रोजी जनता विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील सर्वच्या सर्व झाडे विद्यालयाने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत जगविले आहेत. आपण आपल्या कुटुंबातील सदस्य असलेल्या लहान मुलांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करत असतो. यावेळी ओम गायकवाड या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असल्याने त्याचाही वाढदिवस झाडासोबत साजरा करण्यात आला. एक वर्ष पूर्ण झालेल्या झाडाला फुगे लाल रिबन, रंगीबेरंगी पताका आणि रांगोळ्या काढून सुशोभित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एस. गायकवाड, एस. एन. जाधव, संजय पाटील आदी शिक्षकांनी सहकार्य केले. आभार एस. बी. शेवाळे यांनी मानले. उपमुख्याध्यापक देवरे, पर्यवेक्षक पगार यावेळी उपस्थित होते.

रामवाडी वस्तीशाळा

वन सप्ताहाचे औचित्य साधून रामवाडी जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेत मागील वर्षी लावलेल्या वटवृक्षाचा पहिला वाढदिवस केक कापून व मिठाई वाटून मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच योगिता भालेराव व माजी सरपंच गणपत खैरनार यांच्या हस्ते केक कापण्यात आला. राममंदिर व शाळा परिसरात रविवारी, पाच वृक्षांची लागवड करण्यात येऊन पुढील वर्षी सहा वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी येवभागुनाथ उशीर, सुनील देशमुख, बशीर शेख, गोरख उशीर, चांगदेव कांडेकर, विलास उशीर आदी उपस्थित होते.

ममदापूर शाळेत वृक्षदिंडी

ममदापुर येथे वृक्षदिंडीचे आयोजन करून वृक्षारोपण करण्यात आले. नूतन माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत ममदापूर आणि छत्रपती मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गावात विद्यार्थ्यांनी हातात वृक्ष घेऊन 'झाडे लावा झाडे जगवा', 'पर्यावरणाचे संरक्षण करा', 'कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव', 'झाडे लावा दारोदारी पाऊस पडेल लय भारी' अशा घोषणा देत वृक्षदिंडी काढून जनजागृती केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय परिसर, शाळेच्या आवारात तसेच गावात व रस्त्याच्या कडेलादेखील झाडे लावण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांसह उपसरपंच अलका वैद्य, रावसाहेब काळे, संजय म्हस्के, मुख्याध्यापक भुसे यांच्यासह विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताळी ग्रामपंचायत

साताळी (ता. येवला) ग्रामपंचायत यांच्यावतीने पर्यावरण संतुलनासाठी येथील गावठाण, स्मशानभूमी परिसर, ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी ३०० रोपांचे वृक्षारोपण केले. यावेळी सरपंच भाऊसाहेब कळसकर, दत्ताजी काळे, मच्छिंद्र काळे, तुळशीराम कोकाटे, गोरखनाथ काळे, उपसरपंच शहाजीराजे काळे, राधाकिसन आहेर, मुख्याध्यापक वंदना नागपुरे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धूळगावात वृक्षदिंडी

कै. नारायणराव पवार माध्यमिक विद्यालयाच्या वतीने धुळगावमध्ये मेन रोड भागातून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत वृक्ष दिंडी काढण्यात आली. ढोकणे यांनी वृक्ष रोपणाचे महत्त्व पटवून दिले. या वृक्षदिंडीसाठी विद्यालयाचे विद्यार्थी व मुख्यध्यापक कदम, सरपंच ललिता खोडके, शशिकांत जगताप, कैलास खोडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

इगतपुरीत वृक्षलागवड मोहिमेला सुरुवात

घोटी : तालुक्यातील वाळविहिर ग्रामपंचायत येथे चार कोटी वृक्ष लागवड अंतर्गत गावठानात ३६४ झाडे व सामाजिक वनीकरण विभागाचे चार हजार झाडे लागवडीला रविवारी (दि. २) सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण सोनवणे, वनपाल महेश वाघ, सरपंच सुनीता लचके, माजी उपसभापती प्रकाश लचके, कडू बाबा, ग्रामसेवक प्रमोद ठाकरे, जगदीश कदम उपस्थित होते.


मानोरीला कृषीदिन

येथील ग्रामपंचायतमध्ये माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची १०४ वी जयंती व कृषीदिन साजरा करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण सदूभाऊ शेळके होते. भाऊसाहेब शिंदे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रम अंतर्गत प्रिया जेजुरकर, प्रतीक्षा निकम, नलिनी तांबे, शुभांगी थेटे, शुभांगी सोनवणे या विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी छगन आहेर, कृष्णराव गुंड, नवनाथ काळे, अनंत आहेर, सरपंच स्वाती वावधने, ग्रामसेवक बी. के कुशारे, मुख्याध्यापक अगरचंद शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकवासीयांना पाण्यासाठी प्रतीक्षाच

$
0
0

धरण भरले, मात्र पाणी दिवसाआड

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे त्र्यंबक शहरातील अहिल्या धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र तरीही शहरात नळांना एक दिवसाआड पाणी येत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत त्र्यंबक नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे दर्शन होत आहे. पाऊस असूनही पाण्यासाठी एक दिवसानंतर पाण्याची प्रतीक्षा करावे लागण्याचा अनुभव त्र्यंबकच्या नागरिकांना येत आहे.

जिल्ह्यासह त्र्यंबकला धो-धो पाऊस सुरू आहे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई अशी परिस्थिती त्र्यंबक नगरी अनुभवत आहे. शहरास अंबोली, गौतमी बेझे आणि अहिल्या असे तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असतो. यापैकी अहिल्या धरण पाण्याने ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच या धरणाचे पाणी शहरात उपयोगात यावे म्हणून चार वर्षांपूर्वी तेथे सुमारे ८५ लक्ष रुपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला. त्यानंतर गतवर्षी लाखो रुपये खर्च करून गाळही काढण्यात आला. तरीदेखील धरण गाळाने उथळ झाल्याने पावसाळ्यात पहिल्याच आठवड्यात ओव्हरफ्लो होत असते. धरणाचे पाणी वाहून जात असेल तर कोट्यवधी रुपये खर्च केलेला जलशुद्धीकरण प्रकल्प चालवून हे पाणी शहराला पुरवले पाहिजे. मात्र नगरपरिषदेकडून एक दिवसाआडच पाणीपुरवठा का केला जातो, हाही प्रश्न आहेच. या पाण्याचा अधिकाधिक वापर झाल्यास नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही आणि हजारो रुपयांची दरमहा वीजबिलात बचत होणार आहे, याकडेही नगरपरिषदेने लक्ष दिले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संततधारेने पहिनेत पर्यटकांची वर्दळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पावसाची संततधार आणि पर्यटकांची वर्दळ रविवारी (दि. २) पहिने परिसरात पहावयास मिळाली. यावेळी वाडीवऱ्हे पोलिसांनी धडक मोहीम राबवत पहिने बारीत नाकाबंदी करत मद्यपींना पिटाळून लावले. पोलिस पेट्रोलिंग पाहून दुचाकीचर जोडीने आलेली तरुणाई माघारी जाताना दिसत होती. मागच्या सोमवारी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाण्यात उतरण्याच्या मोहापायी प्राण गमवावे लागले. त्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे पोलिसांनी रविवारी बंदोबस्त कडक करत हॉटेल, धाबे चालकांना सक्त सूचना दिल्या आहेत. याकरिता पोलिस निरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक नेहते यांच्यासह पोलिस कर्मचारी या भागात ठाण मांडून होते. वाहनांची तपासणी करण्यात येत होती तर काही ठिकाणी दारूबाजांना समज देऊन त्यांच्या दारूच्या बाटल्या ओतून देण्यात आल्या. जोरदार पाऊस अनुभवण्यासाठी कुटुंबासह सहलीला आलेले पर्यटक अधिक संख्येने दिसून येत होते. खळाळणारे धबधबे आणि नाले यामध्ये बसून पावसाच्या सरींचा आनंद घेणारे पर्यटक सर्वत्र दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅप हॅकर सापडला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून नाशिककरांची झोप उडवून देणाऱ्या हॅकरला सायबर पोलिसांनी अखेर राजस्थानमध्ये अटक केली. या संशयिताला रविवारी रात्री उशिरा घेऊन पोलिस पथक नाशिकमध्ये परतले. त्याला पकडण्यासाठी परराज्यातील एका महिलेच्या हॅक अकाउंटची मदत घेण्यात आली होती.

मास व्हॉट्सअॅप हॅकिंगचा प्रकार बुधवारी, २८ जून रोजी उघडकीस आला. काही डॉक्टर, तसेच सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. वन टाइम पासवर्डच्या मदतीने संशयिताने एकापाठोपाठ एक तब्बल ३१ व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले. याशिवाय काही फेसबुक अकाउंटवरही हॅकरने डल्ला मारला. सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदारांची रीघ लागल्यानंतर हा प्रकार मोठा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लागलीच तपासास सुरुवात केली. मात्र, हॅकरदेखील तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करीत असल्याने त्याचे लोकेशन सतत बदलत ठेवले. पोलिसांनी शंभराहून अधिक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांचा डेटा तपासून संशयिताचा माग काढला. यात एका परराज्यातील महिलेच्या हॅक अकाउंटची मदत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तब्बल तीन दिवस संशयित पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी हॅकरच्या लोकेशनचा सतत पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर शनिवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास हॅकरला राजस्थानातून अटक करण्यात आली. तेथील कायदेशीर प्रक्रिया आटोपून पोलिसांचे पथक नाशिककडे परतले.

हॅकिंगचे कोडे उलगडणार

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडे अद्याप चौकशी करण्याचे काम बाकी आहे. त्याची पोलिस कोठडी मिळाली, की त्याचे साथीदार, हॅकिंगमागचा उद्देश या विषयी अधिक माहिती देता येईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले. दरम्यान, हॅकरच्या अटकेने शहरातील नव्हे, तर इतर जिल्ह्यांतील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शहराचा विचार करता हॅकरने एकूण ३१ व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केल्याचे स्पष्ट झाले होते. यात २९ महिलांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर आता डिजिटल व्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्र सरकारच्या मिशन कॅशलेस इंडिया उपक्रमांतर्गत मध्य रेल्वेने आपल्या विभागातील नाशिकरोडसह १५ रेल्वे स्टेशन्सवर डिजिटल ट्रॅन्झॅक्शन फॅसिलिटी सुरू केली आहे. त्यासाठी पीओएस मशिन्स देण्यात आली आहेत. स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या साहाय्याने इतर स्थानकांवरदेखील ही सुविधा लवकरच पुरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मध्य रेल्वेने आपल्या विभागातील १५ रेल्वे स्टेशन्सवर शंभर टक्के डिजिटल ट्रॅन्झॅक्शन फॅसिलिटी देण्यास सुरुवात केली आहे. त्यात भुसावळ विभागातील नाशिक, भुसावळ, अमरावती, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे विभागातील पुणे, मिरज कोल्हापूर, सोलापूर विभागातील सोलापूर, साईनगर, कोपरगाव, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, बल्लारशा या स्टेशन्सचा समावेश आहे. डिजिटल व्यवहारांसाठी या येथील पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम, अनरिझर्व टिकिटिंग सिस्टिम, लगेज, पार्सल, साहित्याचे शेड अशा ठिकाणी पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिन्स देण्यात आली आहेत. या मशिनद्वारे प्रवाशांना कॅशलेस मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचे रेल्वे तिकिटासाठी रांगेत तिष्ठत उभे राहणे टळणार आहे.

--

अन्यत्रही होणार कार्यान्वित

इतर स्थानकांमध्येही ही सुविधा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोलापूर विभागातील शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशन हे शंभर टक्के डिजिटलायझेशन व्यवहार करणारे मध्य रेल्वेचे पहिले स्टेशन ठरले आहे. स्टेट बॅँकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून, देशातील दहा हजार ठिकाणी पीओएस मशिन्स देण्यात येणार आहेत. प्रवाशांना पेटीएमसारखी कॅशलेस सुविधा देण्यासाठी खासगी कंत्राटदारांनाही सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीकाठी सतर्कतेचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रविवारी सकाळी साडेआठपर्यंत ४७१.६ मिल‌िमीटर पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत नाशिकसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

गेल्या दोन-तीन ‌द‌िवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर आणि दारणा पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळीसाडेआठ या २४ तासांच्या कालावधीत जिल्ह्यात ४७१.६ मिम‌‌ी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक १४२ मिमी पाऊस पडला असून, पेठमध्ये ८३ आणि इगतपुरीत ७४ मिम‌ी पाऊस पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नाशिक शहरासह तालुक्यातही संततधार सुरू असून ५८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चांदवड, देवळा, येवला, मालेगाव, बागलाण आणि कळवण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून प्रत्येकी अवघा १० मिमीच्या आतच पाऊस पडला आहे.


रविवारी जोर कमी

रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत पावसाचा जोर काहीसा ओसरला. या नऊ तासांत जिल्ह्यात १४८.८ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक तालुक्यात ४१ मिमी पाऊस झाला तर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रत्येक २० मिमी पाऊस पडला. पेठ तालुक्यात १८.२, कळवणमध्ये १७, सुरगाण्यात १०.४ मिल‌िमीटर पाऊस पडला. दिंडोरी, येवला, निफाड तालुक्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सिन्नर, नांदगाव, मालेगाव, बागलाण आणि देवळा या तालुक्यांमध्ये पावसाने आजही दांडी मारली. रविवारी दिवसभरात शहरात १२.४ मिल‌िमीटर पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजीरोडवरील कारवाईत सातत्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमजीरोडवर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या चारचाकी वाहनांना आवर घालण्यासाठी शहर वाहतूक पोलिस कारवाईत सातत्य ठेवणार असून, त्याचा प्रत्यय या आठवड्यात येईल, असा इशारा पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिला आहे. वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी दंडात्मक कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एमजीरोड नेहमीच गजबजलेला असतो. शेकडो व्यावसायिक आस्थापने असताना या ठिकाणी पार्किंग व्यवस्थेकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे व्यावसायिकांसह आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पार्क होणाऱ्या वाहनांमुळे फारच कमी रस्ता धावणाऱ्या वाहनांसाठी उपलब्ध होतो. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अचानक रस्त्यावर पार्क झालेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई सुरू केली. त्यात काही दुचाकींचाही समावेश होता. गुरुवारी दिवसभरात तब्बल ८० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यानंतर, शुक्रवारी देखील पोलिसांनी आपल्या कारवाईत सातत्य ठेवले. या दिवशी जवळपास १०० बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई झाली. या बाबत बोलताना पोलिस उपायुक्त उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. वास्तविक तिथे पार्किंग नियमांबाबत फलक लावण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसह इतर समस्या निर्माण होतात. एमजीरोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग यापूर्वी राबवण्यात आले आहेत. मात्र, त्याचा उपयोग होत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीकोनातून रस्त्यावर पार्क होणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे आवश्यक असून, या कारवाईत सातत्य ठेवण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images