Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेळके दाम्पत्याची २१६ वेळा वारी

$
0
0

अनोखी विठ्ठलभक्ती; मनमाडमध्ये सत्कार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक सामाजिक, राजकीय, क्रीडा साहित्य व इतर अनेक गोष्टींबाबत तसेच जन्मदिनानिमित्त अनेक प्रसंगी सत्कार व सन्मानाचे कार्यक्रम होत असतात. परंतु, सन १९९९ पासून दरमहा प्रत्येक एकादशीस श्रद्धा आणि भक्तीने मनमाड येथून पंढरपूरला जाऊन श्रीविठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आजपर्यंत २१६ वारींचा विक्रम करणाऱ्या सीताराम पांडुरंग शेळके आणि कलावती सीताराम शेळके या दाम्पत्याचा सत्कार त्याहूनही अनोखा ठरला आहे.

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आलेल्या या सत्काराने नव्या पिढीला श्रद्धा आणि भक्तीचा एक आदर्श दिला. वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, नरेश गुजराथी यांच्या कल्पकतेतून झालेला हा अनोखा सत्कार चर्चेचा विषय ठरला.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेच्या या वारीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरपूर वारीत भाविक सहभागी होतात. परंतु, प्रत्येक महिन्याला वादळवारा, पाऊस, सांसारिक अडचणी यांची तमा न बाळगता नेमाने वारी करणारे मनमाड शहरातील शेळके दाम्पत्य अनोखे वारकरी होय. संतोष बळीद, किशोर पाटोदकर, प्रज्ञेश खांदाट, नीलकंठ त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार पार पडला.

१९९९ साली सीताराम शेळके यांचा नांदगाव-मनमाड रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातात ते जबर जखमी झाले. या दुखापतीत ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बेशुद्धावस्थेत होते. अशा कठीण संकटप्रसंगी त्यांची पत्नी कलावती यांनी त्यांच्या उशाशी पांडुरंगाची मूर्ती ठेवून सतत धावा केला. आणि अत्यंत दुर्धर दुखापतीतून सीताराम शेळके हे बरे झाले. यानंतर शेळके दाम्पत्याने पंढरीच्या वारीला दर महिन्यास जाण्याचा नेम केला. यानंतर ते बरे झाल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून हे दाम्पत्य तो नेम पाळत आहेत. आतापर्यंत त्यांनी २१६ वारी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन शेतकऱ्यांची जिल्ह्यात आत्महत्या

$
0
0

दिंडोरी : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यावर अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त होणार, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात अध्यादेश निघाल्यानंतर त्यांची घोर निराशा झाली. याच नैराश्यातून दिंडोरी तालुक्यातील सोनजांब आणि नामपूर येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील माधव बळवंत जाधव (वय ७२) यांनी द्राक्ष बागेसाठी सुमारे साडे पाच लाख कर्ज सोसायटीकडून घेतले होते. त्यांचे कर्ज २०१२ पूर्वीचे असल्याने त्यांना याचा लाभ मिळणार नव्हता. या निराशेतून त्यांनी दि. २९ जूनला द्राक्षबागेत विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि. १) रात्री प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत सटाणा तालुक्यातील नामपूर येथील भिकन श्रावण सावंत या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी रविवारी (दि. २) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी जायखेडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांची बिले रोखली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभऱात १ जुलैपासून जीएसटी लागू झाला असला तरी, या कररचनेसंदर्भात महापालिकांना कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे ठेकेदारांच्या बिलांचे करायचे काय, असा प्रश्न पालिकेसमोर आहे. जीएसटीत नोंदणी नसलेल्या ठेकेदारांची ब‌िले तूर्तास अडवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
त्यासंदर्भात सर्व खातेप्रमुखांना फर्मान काढण्यात आले असून, स्पष्टता येत नाही तोपर्यंत फाइल फिरवू नका, असा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांवर नवीन आफत ओढावली आहे. पालिकेने विक्रीकर विभाग आणि चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडून यासंदर्भात मार्गदर्शन मागवले आहे.
महापालिकेकडून ठेकेदारांवर यापूर्वी वर्क कंट्रोल टॅक्स आकारला जात होता. नोंदणीकृत ठेकेदारांवर हा टॅक्स दोन टक्के तर नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदाराला पाच टक्के टॅक्स आकारला जात होता. जीएसटीमुळे हा टॅक्स आता एक टक्का झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांना दिलासा मिळाला असला तरी, जीएसटीतील तरतुदी आणि ठेकेदारांच्या बिलांवर टॅक्स लावण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे या ठेकेदारांबाबत करायचे काय, असा प्रश्न पालिकेच्या लेखा विभागाला पडला आहे. ठेकेदारांच्या बिलांसाठी पालिकेने जीएसटी नोंदणी सक्तीची केली आहे. ज्या ठेकेदारांची जीएसटीत नोंदणी झाली आहे, त्या ठेकेदारांची बिले अडवली जाणार नाहीत.

चार कोटी रखडले
जीएसटीच्या अस्पष्टतेमुळे सध्या लेखा विभागात असलेल्या जवळपास चार कोटींची बिले थांबण्यात आली आहेत. जीएसटीसंदर्भात पूर्ण स्पष्टता येत नाही, तोपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेकेदारांनी जीएसटी नोंदणीसाठी घाई सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणीपुरवठा’त टंचाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची अत्यावश्यक सेवा असलेला पाणीपुरवठा विभाग हा अभियंते आणि कर्मचाऱ्यांअभावी अपंग बनला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ५० अभियंत्यांची गरज असताना केवळ सहा अभियंत्यांवर विभागाचा गाडा सुरू आहे. विशेष म्हणजे विभागाचा प्रमुखही प्रभारीच आहे. विभागाला साडेतीनशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना १३५ कर्मचाऱ्यांवर विभागाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याची स्थिती आहे.

महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असला, तरी या विभागात सध्या अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांची मोठी वानवा आहे. सन २००० पासून या विभागात एकही पद भरले न गेल्याने हा विभाग जणू व्हेंडिंलेटरवरच सुरू आहे. शहराचा पाणीपुरवठा विस्तारत असताना विभागात मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची मात्र कमतरता होत चालली आहे. या विभागात सध्या ५० अभियंते, ३२ शिफ्ट इन्चार्ज आणि ३५६ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, निवृत्तीमुळे हा विभाग सध्या ६० टक्के रिता झाला आहे. सध्या या विभागात सहा अभियंते आणि १३५ कर्मचारीच शिल्लक आहेत. विभागाची बरीचशी पदे ही प्रभारींच्या हातात आहेत. त्यातच सहा अभियंत्यांना शाखा अभियंत्यांचेही कामकाज करावे लागत आहे. जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, बुस्टर स्टेशनवर काम करण्यासाठीदेखील कर्मचारी नाहीत. सन २००३ मध्ये पाणीपुरवठा विभागाकडे मलनिस्सारण केंद्रांचीही जबाबदारी आली आहे. त्यामुळे एकीकडे अतिरिक्त कामांचा ताण असताना दुसरीकडे मात्र कर्मचारी आणि अधिकारी यांची कमरतरता जाणवत आहे.

--

विभागप्रमुखदेखील प्रभारी

या विभागात अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांची वानवा असतानाच या विभागाचे अधीक्षक अभियंतापदही प्रभारीच आहे. यू. बी. पवार यांच्याकडे शहर अभियंतापद दिल्याने त्यांच्या रिक्त जागेवर शिवाजी चव्हाणके यांना पदभार देण्यात आला आहे. त्यांच्यावर अभियंतापदासह अधीक्षक अभियंतापदाचीही जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाअनुदानित ‘पीजी’साठी नवे शुल्कधोरण

$
0
0

नाशिक : व्यावसायिक विद्याशाखेचा पदव्युत्तर विभाग अनुदानित नसताना तो अनुदानित असल्याचे स्टेटस जाहीर करणाऱ्या सर्व संस्थांनी आता त्वरीत शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांच्याकडून त्या-त्या वर्षाचे शुल्क मंजूर करून घ्यावे, असे निर्देश नुकतेच उच्च शिक्षण विभागाने संबंधित शिक्षण संस्थांना दिले आहेत.
याशिवाय शासकीय संस्थांमधील विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या फी निश्चितीचे धोरण ठरविण्यासाठी डीटीईच्या वतीनेही सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती एका तक्रारदारास तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक चंद्रशेखर ओक यांनी दिली आहे.
राज्यातील बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर विद्याशाखांना (पीजी कोर्सेस) अनुदान उपलब्ध नसतानाही त्यांचे ऑनलाइन स्टेट्स सर्रास चुकीचे दर्शवून शासन अन् पालकांच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या नफेखोर संस्थांना या नव्या आदेशांमुळे दणका बसला आहे. पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी अंशत: अनुदान घेऊन संस्थेतील पीजी अभ्यासक्रम पूर्णत: अनुदानित असल्याचे भासविणाऱ्या संस्थांनी अनुदानाच्या मुद्द्याचा गैरफायदा उचलत नफेखोरी चालविल्याचे काही दिवसांपूर्वी एका माहितीच्या अधिकारात उघड झाले होते.
यासंदर्भात ‘मटा’ ने ‘फार्मसी कॉलेजकडून दिशाभूल?’ असे १२ मे २०१७ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या प्रकारे व्यावसायिक विद्याशाखेचा पदव्युत्तर विभाग अनुदान‌ित असल्याचे स्टेटस जाहीर करणाऱ्या सर्व संस्थांनी आता त्वरीत शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांच्याकडून त्या त्या वर्षाचे शुल्क मंजूर करून घ्यावे. शिवाय शासकीय संस्थांमधील विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या फी निश्चितीचे धोरण ठरविण्यासाठीही डीटीईच्या वतीने सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्राधिकरणाच्या भूमिकेकडे लक्ष

पदवी स्तरापर्यंत अनुदानित असणाऱ्या काही संस्थांनी त्यांच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांनाही अनुदानित म्हणून चुकीची माहिती जाहीर केल्याचा आक्षेप पालकांनी घेत शासनापर्यंत चिकाटीने पाठपुरावा केला आहे. यामुळे शुल्क नियंत्रण प्राधिकरण या कोंडीत पकडलेल्या संस्थांवर काय कारवाई करणार किंवा कशा पध्दतीने शुल्क निश्चिती करणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांकडून बिटकोचे ‘ऑपरेशन’!

$
0
0

पाण्याच्या टाकीत पाल; एका इन्क्युबेटरमध्ये दोन बाळं

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
आजारी बिटको हास्पिटलला नाशिकरोडच्या नगरसवेकांनी सोमवारी सरप्राइज व्हिज‌िट दिली. यावेळी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाल सापडली तर काचेच्या एका पेटीत दोन बालकं ठेवलेली आढळली. व्हेंटिलेटर लावण्यास डॉक्टर नसल्याचे निदर्शनास आले. सोलर, सीसीटीव्ही बंद असल्याचा, तसेच येथील औषधे बाहेर जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
वैद्यकीय अधिकारी जयंत फुलकर समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने नगरसेवकांनी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना येण्यास भाग पाडले. पंधरा दिवसांत बिटकोचा सेटअप बदलू, सहाय्यक निवासी वैद्यकीय अधिकारी देऊ, आपण स्वतः आठवड्यातील दोन दिवस येथे थांबू, १२ जुलैला पुन्हा नगरसेवकांसोबत बैठक घेऊ आदी आश्वासने डेकाटेंनी दिल्यानंतर नगरसेवक शांत झाले.
बिटको हॉस्पिटलबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रभाग सभापती सुमन सातभाई, नगरसेविका सीमा ताजणे, सरोज आहिरे, जयश्री खर्जुल, पंड‌ित आवारे, मीरा हांडगे, अंबादास पगारे आदींनी सोमवारी दुपारी हॉस्पिटलला सरप्राइज व्हिज‌िट दिली. जगन गवळी, सागर गवळी, महेंद्र आहिरे, नितीन खर्जुल, गणेश सातभाई, जगदीश पवार आदी उपस्थित होते.
‘पाणी पिऊन दाखवा’
रुग्णांना ज्या टाकीतून प‌िण्याचे पाणी येते त्यामध्ये नगरसेवकांना पाल आढळली. तसेच गाळही साचलेला आढळला. अनेक वर्षांपासून ही टाकी साफ केली नसल्याचे समजताच नगरसेवकांनी ते पाणी वैद्यकीय अधिकारी जयंत फुलकर यांना पिण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. रुग्ण येथे बरे होण्यासाठी येतात की आजारी पडण्यासाठी, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला. व्ह‌िज‌िटआधी मला कळवायला हवे होते. स्टाफ माझे ऐकत नाही, अशा सबबी फुलकर यांनी सांगताच नगरसेवकांचा पारा चढला. त्यांनी डेकाटे यांना तातडीने येण्यास भाग पाडले. डेकाटे आल्यावर त्यांच्याशी दोन तास वादळी बैठक झाली. त्यांनी येथील समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले.

या आहेत समस्या

एका रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्यास डॉक्टर नसल्याने त्याचा मृत्यू झाला. काचेच्या एकाच पेटीत दोन बालके ठेवली जातात. स्टाफ नम्रतेने वागत नाही. २००५ पासून रुग्णांना पिण्यास घातक पाणी मिळत आहे. टाक्या धुतल्या जात नाहीत. सोलर २०१३ पासून बंद आहे. रुग्णांची बेडशीट्स नियमित बदलली जात नाहीत. सीसीटीव्ही बंद आहेत. वैद्यकीय अधिकारी फुलकर पूर्णवेळ थांबत नाहीत. त्यांचे कोणी एकत नाहीत. त्यांच्याकडे तीन चार्जेस असल्याने प्रशासनाचा खेळखंडोबा झाला आहे. श्वान व सर्पदंशावरील लशीची तीव्र टंचाई आहे. डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी आहे. रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागतात. बिटकोतील औषधे बाहेर विकली जातात. औषधांचे ऑडिटच झालेले नाही. बायोमेट्रिक बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे फावते.

डेकाटेंची आश्वासने

g पंधरा दिवसांत बिटकोचा सेटअप बदलणार.
g आठवड्यातील दोन दिवस सकाळी नऊ ते पाच बिटकोत थांबणार
g वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीस सहाय्यक देणार
g डॉक्टरांनी बाहेरुन औषधांचे प्रिस्क्र‌िप्शन दिल्यास कारवाई करणार
g औषधे बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना महापालिकेचे लेबल लावणार.
g ८ जुलैपर्यंत नवीन डॉक्टरांची नियुक्ती करणार.
g सीसीटीव्ही तातडीने सुरू करणार.
g दर आठवड्याला बिटकोच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार.
g वैद्यकीय अधिकारी आठ तास हॉस्पिटलमध्ये थांबतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’सिंचनातून फुलणार उद्याने!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्राच्या अमृत योजनेतून शहरातील उद्यानांचा कायापालट केला जात आहे. पंचक आणि मखमलाबाद येथे सुसज्ज उद्यानांचे काम प्रगतीपथावर आहे. पंचक येथे चार एकरवरील उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, हे उद्यान १ ऑगस्टपासून नागरिकांसाठी खुले होणार आहे. तर मखमलाबादच्या तवली फाटा येथील उद्यान सुशोभिकरणाची निविदा काढण्यात आली आहे. या दोन्ही उद्यानांच्या कामांनतर वसंत कानेटकर उद्यानाचे सुशोभिकरणही अमृत योजनेतून केले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.
अमृत योजनेतून पंचक येथे चार एकर जागेवर सुसज्ज असे उद्यान तयार केले जात आहे. यासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिव्ह‌िल वर्क हे ३१ जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार असून हे उद्यान नागरिकांसाठी १ ऑगस्टपासून खुले केले जाणार आहे. पंचकपाठोपाठ मखमलाबाद येथील तवली फाटा येथे दहा एकर जागेवर भव्य उद्यान तयार केले जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत कामाला लगेच मंजुरी दिली जाणार आहे. जानेवारीपर्यंत या उद्यानाचेही काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी दोन मोठी सुसज्ज उद्याने नागरिकांसाठी खुली होणार असल्याची माह‌िती आयुक्तांनी दिली. याशिवाय गंगापूर गाव येथील वसंत कानेटकर या उद्यानाच्या सुशोभिकरणाचे कामही अमृत योजनेतून केले जाणार आहे. या दोन उद्यानांच्या कामांतून मिळणारा वाढीव निधी हा कानेटकर उद्यानाच्या कामासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे कानेटकर उद्यानाचाही वनवास संपणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत अडीच लाखांची दारू जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोड येथील लक्ष्मणनगर येथे देशी आणि विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि. ३) रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करून भरत रामकिसन गुंजाळ (रा. लक्ष्मण नगर, पेठरोड, पंचवटी) यांना ताब्यात घेतले, त्याच्याकडील दोन लाख ४९ हजार ६०० रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.

पंचवटी पोलिसांना पेठरोड येथील लक्ष्मणनगरात शांताबाई गुंजाळ यांच्या किराणा दुकानामागे एका खोलीत देशी दारू आणि विदेशी दारूच्या बाटल्या विनापरवाना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. त्या खोलीत प्रिन्स संत्रा देशी दारुच्या १८० मिलीलिटरच्या आणि प्रिन्स संत्रा टँगो पंच देशी दारूच्या १०० पेट्या आढळल्या. त्यांची किंमत दोन लाख ४९ हजार ६०० रुपये आहे. या बाटल्या विनापरवाना बेकायदेशीर विक्री करण्यात येत होत्या.

पोलिसांच्या छाप्यात या पेट्या ताब्यात घेऊन जप्त करण्यात आल्या. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले, एस. के. म्हात्रे, प्रवीण कोकाटे, संजय पाटील, सुरेश नरवडे, प्रभाकर पवार, संदीप शेळके, संतोष काकड, महेश साळुंके, विलास चारोस्कर यांनी छापा टाकून ही कारवाई केली.

येवल्यात सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने येवला येथे दोन वेगवेगळे छापे मारून मद्याच्या तब्बल २८९ तसेच बियरच्या १२ बॉटल्स जप्त केल्या. या कारवाईत एकूण एक लाख २५ हजार १३९ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हायवेवरील शेकडो बार बंद झाले असून, चोरी छुपे मद्य विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पी. पी. सुर्वे तसेच अधिक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वेगवेगळे पथक अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर लक्ष ठेऊन आहे. याच पार्श्वभूमीवर येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक सुचित कपाटे, सहायक दुय्यम निरीक्षक एन. के. मोरे, जवान डी. आर. रतवेकर, जी. एन. गरूड, के. आर. चौधरी, डी. आर. नेमनार आदींनी येवला शहर व येवला रोडवरील पिंपळगाव जलाल शिवार येथून वाहतूक होणारा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत एकूण २८४ देशी विदेशी मद्याच्या बॉटल्स, १२ बिअरच्या बॉटल्स तसेच एमएच १५ सीडी १७४९ ही ओमनी कार जप्त केली. या प्रकरणी योगेश पोपटराव जावरे (३१, रा. नामपूर, ता. सटाणा) आणि यशवंत सोपान शिंदे (३५, नांदगाव) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, या छाप्याचा सखोल तपास केला असता बनावट दारूचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या दोन्ही घटनांचा अधिक तपास निरीक्षक श्रीवास्तव करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योगशिक्षणाचे मिळणार धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री शारदा मल्टीपरपज संस्था संचलित श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण, अनुसंधान आणि साधनापीठ इन्स्टिट्यूटमध्ये योगशास्त्र अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. योगशास्त्र आणि संस्कृत या विषयातील डिप्लोमासोबतच योगशास्त्रातील पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

तिडके कॉलनी परिसरात श्री आदियोग कॉलेज आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्न असून डिप्लोमा इन योगशास्त्र, डिप्लोमा इन संस्कृत आणि एम. ए. इन योगशास्त्र असे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आठवड्यातून शनिवार व रविवारी या दोन दिवशी अभ्यासक्रमांचे लेक्चर्स होणार असून विविध विद्याशाखांमधील युवकांसोबतच गृहिणी वर्ग, महिला, विविध आस्थापनांमधील कर्मचारी यांच्यासाठीही या प्रवेशांची संधी आहे. योगशास्त्र डिप्लोमा हा अभ्यासक्रम कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्णांसाठी असून या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षे आहे. डिप्लोमा इन संस्कृत हा अभ्यासक्रमही एक वर्षे कालावधीचा असून यासाठी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. तर एम. ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमासाठी योग पदविका उत्तीर्णतेसोबतच कुठल्याही विद्याशाखेतील पदवी असे निकष आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ईश्वरकृपा, दुसरा मजला, नाशिक ब्लड बँकेच्या जवळ, चांडक सर्कल, तिडके कॉलनी, नाशिक येथे किंवा प्राचार्य अतुल तरटे (७५०७७७८६९५ / ९८५००३७२६३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संशोधनास मोठा वाव

योगशास्त्र शिक्षणासाठी अलिकडील काळात केंद्र आणि आयुष मंत्रालयाची अनुकूल बनलेल्या धोरणांमुळे करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या डिप्लोमा किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांनंतर योगशिक्षक, योग समुपदेशक, योगा मार्गदर्शक अशा पदांवर शिक्षणसंस्था, पर्यटन विश्रामगृह, स्वास्थ्यकेंद्र, समुपदेशन केंद्र आदी ठिकाणी करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. याशिवाय योगशास्त्रात संशोधनासाठीही मोठा वाव असून अप्लाइड योगामध्ये पाश्चात्य देशांमध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत, अशी माहितीही कॉलेजने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ महा ई सेवा केंद्र लवकरच करणार रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वारंवार हेलपाटे मारूनही सेतू कार्यालयांमधून दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून बनावट दाखले वितरीत करण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत. पंचवटीत पुन्हा एकदा असा प्रकार उघडकीस आला असून, जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. हे केंद्र रद्द करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

पंचवटीत तीन महिन्यांपूर्वी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेला बनावट दाखले वितरणाचा उद्योग उघडकीस आला होता. पंचवटीतील गोदावरी चेंबर या इमारतीमधील अग्रवाल असोसिएट्सच्या कार्यालयात बनावट रेशन कार्ड तसेच, बोगस दाखले बनवून दिले जात असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विविध शाळांचे दाखले तसेच अधिकाऱ्यांच्या पदांचे शिक्के करणारे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले. या केंद्रचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला होता. हा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा पंचवटी परिसरात महा ई सेवा केंद्रातून वय, जात, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसह रेशनकार्ड बनावट दिले जात असल्याच्या तक्रारी सेतू केंद्रचालकास प्राप्त झाल्या. जिल्हा समन्वयक भोसले व महसूलच्या अधिकाऱ्यांनी या केंद्राची तपासणी केली. त्यावेळी काही दाखल्यांची पुनर्पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले. येथेही अधिकाऱ्यांचे बनावट स्वाक्षरीचे शिक्के तसेच काही दाखले आढळून आले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, दुकाने सुरू करण्याचे परवान्यांसंबंधीची कागदपत्रेही आढळली. ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, संबंधित ई सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. हे केंद्र रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली. हे महा ई सेवा केंद्र ज्या केंद्रचालकाला दिले होते त्या व्यक्तीने ते अन्य व्यक्तीला चालव‌ण्यिास दिल्याचा खुलासाही प्रशासनाकडे संबंधितांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅकरचा गुजरातलाही दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करणारा राजस्थानमधील दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा याने राजस्थानसह गुजरात आणि राज्यातील पुणे येथील महिलांचे अकाउंट हॅक करून अश्लील मेसेज पाठवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. हॅकरमुळे नक्की किती व्यक्तींचे व्हॉट्सअॅप हॅक झाले, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टी. वाय. बी.कॉम.च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दीप्तेशला १ जुलै रोजी सायबर पोलिसांनी राजस्थानमधील बाडमेल जिल्ह्यातील पचपदारा तालुक्यातील जसोलगाव येथून अटक केली. त्याला रविवारी रात्री उशिरा शहरात आणण्यात आले. दीप्तेशने यू ट्यूबवर पाहिलेल्या काही हॅकिंगच्या ट्रिक प्रत्यक्षात वापरल्या. राजस्थानच्या एका छोट्या शहरात पोलिस पकडण्यासाठी येणारच नाही, याची भ्र्रामक कल्पना बाळगणाऱ्या दीप्तेशने मुंबई, पुणे आणि नाशिकमधील महिलांचे व्हॉट्सअॅप लक्ष्य केले. त्यातून तो अश्लील चॅटिंग करणे किंवा अश्लील मेसेज पाठवण्याचा उद्योग करीत होता. दरम्यान, हा प्रकार वाढल्यानंतर नाशिकमध्ये तक्रारदार पुढे आले. मास हॅकिंग होत असल्याचा गंभीर प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी सर्व पुरावे तपासून दीप्तेशला जेरबंद केले. चौकशीदरम्यान त्याने राजस्थानसह गुजरातमधील अनेक महिलांचे व्हॉट्सअॅप हॅक केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दीप्तेशच्या या कृत्याचा नक्की किती महिलांना फटका बसला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरकरांची कोंडी जैसे थे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावरील माळेगाव ते गुरेवाडी असा बायपास नुकताच सुरू झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहने शहरातून न जाता आता बायपासने जाऊ लागली आहेत. त्यामुळे पुण्याकडे आणि नाशिकडे जाणाऱ्यांचा वेळ वाचत आहे. मात्र शिर्डीला जाणारी वाहने अद्याप सिन्नर शहरातूनच जात असल्याने शहरावरील वाहतूक कोंडीचा ताण काही अंशी कायम आहे. गुरेवाडी ते मुसळगाव एमआयडीसी असा बायपास होणे गरजेचे आहे.

शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला पर्याय म्हणून बायपास केल्यामुळे कोंडी काही अंशी सुटली आहे. शिर्डीकडे जाणारा बायपास अद्यापही न झाल्याने या दिशेने जाणारी मुंबई-गुजरातकडील वाहने मात्र शहरातून जात आहेत. हा बायापास जेव्हा सुरू होईल तेव्हाच सिन्नर शहर वाहतूक कोंडीच्या समस्येतून बाहेर पडू शकेल. तुर्तास सिन्नर शहरवासीय, पोल‌िसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

स्थानिकांना त्रास

नाशिक-पुणे बायपास सुरू झाल्यानंतर रमजान ईदच्या दिवशी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. अन्यथा सुट्यांच्या काळात या रस्त्यावर वाहने अक्षरश: रांगत पुढे सरकत होते. शहरात अर्धा किलोमीटर अंतर कापायला अर्धा तासही अपुरा पडायचा. साहज‌िकच त्याचा त्रास शहरवासीयांना सोसावा लागत होता.


सिन्नर-नाशिकचे काम संथगतीने
सिन्नर-नाशिकरस्ता चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०१७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केला होता. मात्र जुलै उजाडला तरी हे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. हे कामही पूर्ण झाले तर प्रवाशांचा अजून अर्धा तास वाचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर आषाढीचा फीवर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आषाढी एकादशीचा महासोहळा पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांप्रमाणेच सोशल मीडिया यूजर्सनीदेखील मंगळवारी अनुभवला. सोशल मीडियावर दोन दिवस आधीच आषाढी एकादशीचे पडघम वाजू लागले होते. पंढरपूरला गेलेले वारकरी तेथील वातावरणाच्या विविध पोस्ट टाकत होते. त्यामुळे पंढरपुरात दाखल होणाऱ्या दिंड्या, रिंगण याचा सोहळा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना याचि देही याचि डोळा अनुभवायला मिळाला.देवस्थानाच्या फेसबुक पेजवरूनदेखील वारीची दृश्ये लाइव्ह दाखविण्यात येत होती संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह अनेक साधू-संतांच्या पालख्यांचे पंढरीत आगमन होत असतानाची दृश्ये दाखविली जात होती. त्यामुळे अवघी पंढरीनगरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जात असतानाच सोशल मीडियादेखील विठ्ठलमय झाला होता. ज्याप्रमाणे टीव्ही चॅनल्स प्रसारण करतात त्याप्रमाणे नेटकरी वारीचे दर्शन घडवित होते. पंढरपूरकडे येणारे रस्ते वारकरीमय झाले आहेत, हेदेखील सोशल मीडियावरून पाहता येत होते. विविध गावांतील प्रसिद्ध विठ्ठल-रखूमाई मंदिराच्या पोस्टदेखील टाकल्या जात होत्या.

ऑडिओ, व्हिडीओने रंगत

सोशल मीडियावरून एकादशी साजरी करताना अनेकांनी पं. भीमसेन जोशींची ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपातील अभंगवाणी पोस्ट केली. पाउले चालती पंढरीची वाट, विठु माझा लेकुरवाळा अशा गाण्यांच्या रेकॉर्डिंग्ज डाऊनलोड करून फेसबुकवर टाकल्या जात होत्या. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या साइटवरूनदेखील लाइव्ह वृत्तांत दिला गेला. व्हॉट्सअॅप, ट्विटरच्या माध्यामातूनही विठोबाचे दर्शन घडत होते. अनेकांनी आपले डीपी, मोबाइलच्या रिंगटोन, डायलरटोनदेखील अभंगांच्या ठेवल्या होत्या. अनेकांनी विठ्ठल-रखूमाईचे फोटो, अभंग असलेल्या पोस्ट एकमेकांना पाठविल्या, तर काहींनी ‘विठ्ठल’ हे नाव कॅलिग्राफीच्या माध्यमातून तयार करीत आपल्या डीपीवर टाकले होते. एकंदरीतच फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप ही सोशल मीडियाची साधने विठ्ठलमय झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावचे पीआय निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आत्महत्या आणि आकस्मात मृत्यू प्रकरणात खून झाल्याचे स्पष्ट होऊन त्याची वेळीच नोंद न करता तपासात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण दामोदर निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. एक नव्हे तर तब्बल तीन खूनांच्या घटनांकडे कानाडोळा करण्याच्या या प्रकारामुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

नांदगाव पोलिस स्टेशन हद्दीत ७ ऑक्टोबर २०१६ रोजी बंधाऱ्याच्या पाण्यात एक अनोळखी प्रेत आढळून आले होते. त्याची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षकांनी तब्बल आठ महिने या प्रकरणाचे भीजत घोंगडे ठेऊन गुन्हा दाखल केला. गुन्हाच दाखल नसल्याने तपासाचा प्रश्नही उद्भवला नाही. दरम्यान, तांदुळवाडी येथील विवाहिता पुनम काळे हिने ५ मे रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची बाब उघड झाली होती. पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. मात्र, पुनमचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे स्पष्ट केले. तिसऱ्या प्रकरणात डोक्यास गंभीर जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल असताना १४ दिवसांनंतरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनिप्रदूषण झाले, कुणीच कसे नाही ऐकले?

$
0
0

नाशिक : दिवसाआड ठिकठिकाणच्या परिसरातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळव‌िता यावे अन् त्रस्त नागरिकांनाही सुटकेचा नि:श्वास टाकता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्षभरापूर्वी कार्यरत करण्यात आलेली हेल्पलाइन सपशेल अपयशी ठरली आहे. ३६५ दिवसांत या हेल्पलाइनकडे एकाही नागरिकाला तक्रार दाखल करावीशी वाटले नाही, हे विशेष!

ध्वनिप्रदूषण रोखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. शहरात त्याबाबत लोक काहीसे जागरूकता दाखवितात. शहरातील रस्त्यांवर पोलिसांचा वावर तुलनेने अधिक असतो. त्यामुळे जाणीवपूर्वक ध्वनिप्रदूषण टाळता येते. ग्र‍ामीण भागात मात्र दूरदूरपर्यंत पोलिस पोहोचू शकत नाहीत. याचाच फायदा घेत स्थानिकांकडून ध्वनिप्रदूषणाचे नियम खुंटीला टांगून ठेवले जातात. मात्र, त्याचा विपरित परिणाम त्या परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांच्या आरोग्यावर होतो. ग्रामीण भागात ध्वनिप्रदूषण रोखता यावे यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना केल्या जातात. अलीकडेच नाशिक शहर पोलिसांनी प्रत्येक सोमवारी नो हॉर्न डे हा उपक्रम राबविला. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभला. ग्रामीण भागातील ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचाव्यात आणि असे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर वर्षभरापूर्वी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, त्याचबरोबर नाशिक आणि मालेगाव तहसील कार्यालयाचे हेल्पलाइन क्रमांक या वेबसाइटवर ठळकपणे नमूद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अशा तक्रारी स्वीकारण्यासाठी नाशिक आणि मालेगाव तहसील कार्यालयांत प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, तक्रार देण्यासाठी तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी त्यांचा मोबाइल क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात या हेल्पलाइन क्रमांकांवर एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातही ध्वनिप्रदूषणाबाबतच्या तक्रारींचे फोन अभावानाचे येतात. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात ध्वनिप्रदूषणाबाबतचे बोटांवर मोजण्याइतपत फोन कॉल्स आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

या क्रमांकांवर साधा संपर्क

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठीचे हेल्पलाइन क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटपर्यंतच मर्यादित राहिले आहेत. ध्वनिप्रदूषणाशी संबंधित कारवाया पोलिसांकडून होत असतात. थेट पोलिसांपर्यंत न जाऊ शकणाऱ्या ग्रामीण भागातील रहिवाशांना महसूलच्या या हेल्पलाइनमुळे आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार असल्यास लोक आपत्तीव्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ०२५३–२३१७१५१ किंवा ७७९८९०६८८० या क्रमांकावरही नागरिक संपर्क साधू शकतात. नाशिक तालुक्यांशी संबंधित तक्रारींसाठी ०२५३–२५७५६६३ या क्रमांकावर फोन करून किंवा ९४०३५९०१०९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करता येणार आहे. मालेगाव तालुका संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथील तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. ०२५५४–२५४७३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९८५०१७९९२९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरुपौर्णिमा उत्सवाचा श्रीगणेशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विठुरायाच्या जयघोषात सारा महाराष्ट्र रंगून गेलेला असतानाच त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुकुलपीठात आषाढी एकादशीच्या मंगलदिनी सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झाला. यानिमित्त विठुरायाप्रमाणेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊली यांच्या चरणी हजारो सेवेकरी लीन झाले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी व समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरच्या अंतर्गत देशभर हजारो समर्थ केंद्रे कार्यरत असून, लाखोंच्या संख्येने महिला व पुरुष सेवेकरी सक्रिय आहेत. सेवेकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता गुरुपौर्णिमा उत्सवाचे नियोजन नीटनेटके व शिस्तबद्ध व्हावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून या उत्सवास आषाढी एकादशीपासूनच प्रारंभ होतो.

पहिल्याच दिवशी नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून आलेल्या हजारो सेवेकऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी चंद्रकांत मोरे यांनी सपत्नीक श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केली. सेवेकऱ्यांनी शिस्तीत रांगेत उभे राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून चरणतीर्थ घेऊन आपले गुरुपद महाराजांकडे सोपविले. आज, बुधवारी (दि. ५) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकणातील सेवेकरी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतील. त्यानंतर दोन दिवस परराज्य व परदेशांतील सेवेकरी व भाविकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. शनिवारी (दि. ८) गुरुपौर्णिमेचा मुख्य सोहळा दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह सर्व समर्थ केंद्रांवर होणार आहे. यावर्षी दिनदर्शिकांत शनिवार व रविवार असे दोन दिवस व्यास पौर्णिमा दाखविण्यात आली आहे. काही धार्मिक संस्था रविवारी (दि. ९) गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आस ही विठुरायाच्या दर्शनाची

$
0
0

टीम मटा

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध ठिकाणी चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा करून ‌दिंडी सोहळा साजरा केला.

कोटमगावी फुलला भक्तांचा मळा

येवला ः कपाळी बुक्का...हाती टाळमृदंग अन् भगवे ध्वज घेत विठूनामाचा जयघोष करत निघालेल्या गावोगाववरून थडकणाऱ्या दिंड्या...अन् मनी ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची... असे चित्र मंगळवारी (दि. ४) तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलाच्या कोटमगावी दिसले. प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र कोटमगावात आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विठ्ठलभक्तीचा मळा फुलला होता. जवळपास एल लाखापेक्षा अधिक भाविका येथे नतमस्तक झाले.

येवला तालुक्यातील गावोगावचे असंख्य भाविक दरवर्षी कुठल्या ना कुठल्या दिंडीत नेमाने सहभागी होताना आषाढी एकादशीला पंढरपूरात पांडुरंगाचे दर्शन घेतात. ज्यांना हे शक्य होत नाही त्यांच्यासाठी तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक अर्थातच ‘विठ्ठलाचं कोटमगाव’ म्हणजे एकप्रकारे प्रतिपंढरपूरच. नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर येवला शहरापासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या श्रीक्षेत्री कार्तिकी एकादशी तसेच आषाढी एकादशीला भक्तांची मोठी गर्दी उसळत असते. यंदाही आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर भक्तीचा मळा फुलला होता. तालुक्यातील गावोगावसह नजीकच्या कोपरगाव, वैजापूर आदी ठिकाणचे भाविक भल्या पहाटेपासून विठूनामाचा गजर करत, पांडुरंगाचे गोडवे गात पायी पायी थडकत होते. भक्तांची गर्दीने दिवसभर कोटमगाव फुलले होते.

येवल्यातील धडपड मंचच्या वतीने शहरातील खांबेकर खुंट येथे विठ्ठलाची प्रतिमा ठेवून भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. यशवंत खांगटे, नंदलाल भांबारे, नारायण शिंदे, प्रभाकर आहिरे, मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके आदी उपस्थित होते.

चिमुकलेही रमले दिंडीत

आषाढी एकादशीनिमित्त सकाळी येवला शहरातून निघालेल्या विविध शाळांच्या दिंड्या सर्वांचेच लक्ष वेधून गेल्या. निघालेल्या पालखी दिंडीत वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झालेली शाळकरी बच्चेकंपनी मोठे आकर्षण ठरले. डोक्यावर महाराष्ट्रीयन संस्कुतीचा अमुल्य ठेवा असलेली तुळस, नऊवारी साड्या परिधान केलेल्या चिमुकल्या शाळकरी मुली, वारकऱ्यांच्या वेशातील मुले, कुणी पोतराज तर कुणी स्वयंसेवकाच्या खाकी वेशात असं चित्र सगळ्यांचीच दाद मिळवून गेले. हाती भगवे झेंडे, पालखी असे महाराष्ट्रीयन वारकरी संप्रदायाचं दर्शन घडविणारे हे चित्र लक्षवेधी ठरले.

ग्रामदैवताची कळवणला विधिवत पूजा

कळवण ः येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक नतमस्तक झाले. ग्रामदेवतेच्या पूजेचा मान रुपेश चंद्रकांत कोठावदे यांना सपत्नीक मिळाला. कळवण शहरात प्रतिपंढरपूर म्हणून नावारूपाला आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवस्थान ट्रस्टतर्फे आषाढी एकादशीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली. कोठावदे परिवारातर्फे भाविकांना प्रसाद वाटण्यात आला.

जाणकाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करीत मिरवणूक काढली. तालुक्यातील वारकऱ्यांनी कळवणच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी होती.

विठ्ठल मंदिरात निफाडमध्ये गर्दी

निफाड ः ज्ञानोबा माउली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय अशा नामघोषत निफाड येथील शंभर वर्षापूर्वीच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी झाली. निफाड येथील या विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली. वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय विद्यालय, वैनतेय इंग्लिश मेडिअम, जिल्हा परिषद शाळा न २ यांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या साथीने 'ज्ञानबा-तुकाराम' व विठुनामाचा गजर करीत निफाड परिसर दणाणून सोडला. कलशधारी मुली, विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर, निवृत्त‌िनाथ, सोपानदेव, मुक्ताबाईसह विविध संत यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील लोकांचे लक्ष वेधले. शनी चौकातून विठ्ठल मंदिरांत विठ्ठल दर्शनानंतर दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यातील प्रवेशांबाबत आज नोंदवा हरकती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेत इनहाऊस कोट्याची दुसरी यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. याबाबतचा तपशील प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर कळविण्यात आला आहे. दुसऱ्या यादीत नावे असणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ जुलैपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये अकरावीचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. याबाबतच्या सूचना संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
या प्रवेशांसाठी मुख्य गुणवत्ता यादी १० जुलै रोजी प्रसिध्द होणार आहे. त्या अगोदरचे टप्पे पूर्ण होत आहेत. ९ ऑगस्टपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे. यादरम्यान एकूण चार मेरीट लिस्ट प्रसिध्द करण्यात येतील. यापैकी पहिली लिस्ट १० जुलै, दुसरी मेरीट लिस्ट २० जुलै, तिसरी २९ जुलै रोजी तर ६ ऑगस्ट रोजी चौथी मेरीट लिस्ट प्रकाशित होणार आहे. आज (५ जुलै) विद्यार्थ्यांच्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीवरील त्रुटी स्वीकारून हरकती नोंदविण्यात येणार आहेत. ६ जुलैपर्यंत कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन रिक्त जागांचे समर्पण करण्यात येईल. यानंतर १० जुलै रोजी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. १ ते १३ जुलैदरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश निश्चित केले जातील. १४ जुलै रोजी रिक्त जागा व पहिल्या फेरीतील कट ऑफ जाहीर होणार आहे. १५ ते १८ जुलै या कालावधीत ऑप्शन फॉर्म भरणे व भाग १ आणि २ भरण्यासाठी मुदत दिली जाईल. २० जुलै रोजी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. २९ जुलै रोजी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी तर ६ ऑगस्ट रोजी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडजवळ अपघातात दोन तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-शिर्डी मार्गावर मालेगावकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. या दोघांपैकी एकाचे नाव विक्रम चिंतामण पवार (वय २५, मालेगावनजीक पिंपळगाव दाभाडी) असून, दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

मनमाड बसस्थानकासमोर हा अपघात घडला. मनमाड शहर पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. मालेगावकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कंटेनरची (एचआर ५५/डब्लू ७३४६) मोटारसायकलला (एमएच ४१/एच४५६४) समोरून जोरदार धडक बसली. मनमाड बसस्थानकाजवळ कोर्ट परिसरातून मालेगावकडे जाण्यासाठी ही मोटारसायकल वळत होती. अपघातात मोटारसायकल कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली जाऊन आदळल्याने मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी कंटेनरचालक धर्मेंद्र उमेश रॉय (रा. वैशाली, बिहार) याला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजमंदिर समाजालाच बंद!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्यमवर्गीय, गरिबांसाठी उपयुक्त ठरणारे देवळालीगावातील महापालिकेचे छत्रपती शिवाजी समाजमंदिर महापालिका आयुक्तांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी देणे बंद केले आहे. फक्त खेळांसाठीच समाजमंदिर राखीव ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

या समाजमंदिराच्या पाचशे मीटरवर महापालिकेचा ईगल क्लब, तसेच जवळच जॉगिंग ट्रॅक व मैदान उपलब्ध आहे. त्यामुळे समाजमंदिराचा वापर खेळांसाठी करण्यात येऊ नये, अशी नागरिकांची मागणी आहे.

देवळालीगावातील लिंगायत कॉलनीत हे २६ वर्षे जुने समाजमंदिर असून, केवळ तीन हजार शुल्कात विवाह, साखरपुडा, वाढदिवस, वधू-वर मेळावे, सेवानिवृत्ती, दशक्रिया विधी, जयंती आदींसाठी ते उपलब्ध केले जाते. वर्षाला किमान दीडशे कार्यक्रम येथे होतात. देवळालीगावात अन्य समाजमंदिर नाही. रोकडोबावाडी, सुंदरनगर, राजवाडा, वाल्मीकनगर, सिन्नर फाटा, जियाउद्दीन डेपो, बागुलवाडी, सुभाषरोड, जेलरोड, उपनगर, देवळाली कॅम्प आदी भागातील असंख्य कष्टकरी येथील सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र, तरीही हे समाजमंदिर धार्मिक कार्यक्रमांसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

--

१ जूनपासून कार्यवाही

१५ ऑगस्ट १९९० रोजी तत्कालीन खासदार डॉ. दौलतराव आहेर, माजी खासदार बाळासाहेब देशमुख, बबनराव घोलप, बी. के. पाटील, अजय मेहता आदींच्या उपस्थितीत या समाजमंदिराचे लोकार्पण झाले होते. नाशिकरोड देवळाली सोशल अॅण्ड कल्चरल असोसिएशनकडे समाजमंदिराचे पालकत्व तेव्हापासूनच देण्यात आले आहे. डॉ. राजेंद्र जाधव हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. समाजमंदिरात गैरप्रकार चालतात अशा तक्रारी गेल्याने १ जूनपासून हे समाजमंदिर फक्त क्रीडा प्रकारांसाठीच देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

--

अन्य उपक्रमांना ना नाही

डॉ. राजेंद्र यांनी सांगितले, की हे समाजमंदिर सामाजिक कार्यांसाठी देणेदेखील सुरू राहावे, अशी आमचीही प्रामाणिक इच्छा आहे. त्याचबरोबरच क्रीडा, हास्य क्लब, प्रक्षिशण शिबिरे, महापालिका शाळांतील गरजू विद्यार्थ्यांसाठीही येथे उपक्रम सुरू करण्यात यावेत, असा आमचा प्रयत्न आहे. महापालिका आयुक्तांना आम्ही भूमिका पटवून दिली आहे. ते लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन सुवर्णमध्य साधतील, अशी आशा आहे.

--

राजकीय पक्षांचाही विरोध

या निर्णयाला राजकीय पक्षांचाही विरोध असून, खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीयांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन हे समाजमंदिर बंद ठेवण्यास विरोध केला आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर चव्हाण, भाईजान बाटलीवाला, सय्यद मंजूर, कामिल इनामदार, अतुल हांडोरे आदींनी महापालिकेला निवेदन दिले आहे. मनसेचे विभागीय अध्यक्ष बंटी कोरडे, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, संतोष क्षीरसागर, अस्लम मणियार, संदीप पाटील आदींनीही समाजमंदिर पुन्हा खुले न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

----

देवळालीगावातील समाजमंदिर हे सर्वच जाती-धर्माच्या नागरिकांना उपयुक्त आहे. कमी शुल्कामध्ये ते मिळते. त्यामुळे हे समाजमंदिर केवळ खेळांसाठी देण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिक तीव्र आंदोलन करतील.

-ज्ञानेश्वर चव्हाण, नागरिक

---

देवळालीगावातील समाजमंदिर गरजूंना आधार ठरणारे आहे. कमी शुल्कामुळे कष्टकऱ्यांना त्याचा लाभ मिळायचा. त्यामुळे सामाजिक कार्यासाठी समाजमंदिर पुन्हा खुले न केल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल.

-बंटी कोरडे, विभागीय अध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images