Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘सुसंस्कारांसाठी केंद्रे गरजेची’

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सध्याची परिस्थिती पाहता समाजात सुसंस्कार रुजविण्यासाठी संस्कार केंद्रांची आवश्यकता असून, २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के सामाजिक बांधिलकी जपून समाजाच्या विचारांत परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श पिढी व नागरिक घडवावेत, हा संस्कार केंद्रांचा मूळ उद्देश आहे, असे मत गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ केंद्र सुशोभीकरण व बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शांतीनगर, मखमलाबाद येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वामी दरबार, सभामंडप, पारायण सभामंडप व इतर सुविधांसाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, त्याअंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर परिसरातील महिला मंडळाने स्वागतगीत सादर केले. यावेळी साधकांनी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने साधक उपस्थित होते.

महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी महापौर अशोक मुर्तडक, भाजपचे विजय साने, नगरसेवक पुंडलिक खोडे, नगरसेविका भिकूबाई बागुल, सुनीता पिंगळे, पंचवटीच्या प्रभाग सभापती प्रियंका माने, नगरसेवक जगदीश पाटील, उद्धव निमसे, गणेश गिते, सुरेश खेताडे आदी उपस्थित होते. ऋषिकेश आहेर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगचे नवे फंडे

0
0

ओटीपीशिवायही होऊ शकते हॅक

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : व्हॉट्सअ‍ॅप हॅक होत असल्याचा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, ओटीपीशिवाय व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकते. गुगल प्लेवर असणाऱ्या काही अ‍ॅप्सच्या मदतीने कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणीतीही व्यक्ती सहजपणे जॉइन होऊ शकेल, असे अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. हे अ‍ॅप्स मुख्यत्वे हॅकिंग विश्वातले छुपे फंडे असल्याचा संशय आहे.

आता व्हॉट्स अ‍ॅपवरील ग्रुप्स देखील असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही ओटीपी किंवा पासवर्डशिवाय मोफत काही अ‍ॅप्स चालवले जात असून, हजारो व्हॉट्सअ‍ॅप्सच्या ग्रुप्सची लिंकही या अ‍ॅप्सवर उपलब्ध आहेत. किंबहुना या लिंकच्या माध्यमातून पर्सनल नंबर्स, डाटा अप्रत्यक्षरित्या हॅक केला जात असल्याचे दिसते. व्हॉट्स अ‍ॅप्स युजर्सने देखील मोफत अ‍ॅप्सला बळी न पडता मोबाइलमध्ये अॅन्‍टी व्हायरस अपलोड करीत अगदी महत्त्वाच्या ग्रुप्सलाच जॉइन असायला हवे. या सगळ्या अ‍ॅप्समुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगचे प्रकार आणखी वाढू शकतात. आता हॅकर्स सोबतच कोणत्याही परवानगीशिवाय ग्रुपच्या लिंक अपलोड करणाऱ्या या अ‍ॅप्सच्या चालकांवरही पोलिसांनी कठोर व तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

इथून ऑपरेट होतात जॉइन ग्रुप अ‍ॅप्स

तुर्की, गुजरात, सांताक्रूझ यासोबतच देशांतर्गत व परदेशांतून हे अ‍ॅप्स चालवले जात आहेत. तसेच प्रत्येक अ‍ॅप्सचे दोन ते पाच लाखांहून अधिक युजर्स असून यात भारतीयांची संख्या अधिक आहे. या अ‍ॅप्सवरील ग्रुप्समध्ये भारतातील अनेक ग्रुप्सच्या लिंक्स असून, या लिंक्सवर परदेशातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर जॉइन झाल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅडमिन्सनी वेळीच काळजी घेत ओळखीचे नसलेल्या युजर्सला रिमूव्ह करणे सुरक्षित असेल.

असे ‌केले जाते हॅकिंग

‘ग्रुप्स फॉर व्हॉट्सअ‍ॅप, जॉइन ग्रुप ऑन व्हॉट्सअ‍ॅप’ यांसारखे अनेक अ‍ॅप्स गुगल प्लेवर उपलब्ध. हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर यात ‘आर्ट अॅण्ड फोटोग्राफी, बिझनेस, कम्युनिटी, फन क्लब, फूड, गेम्स, फनी, अॅडल्ट’असे ग्रुप्सचे ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन्समध्ये लाखो ग्रुप्सच्या लिंक असून, या लिंकवर क्लिक केल्यास जॉइन ग्रुप असा ऑप्शन देण्यात येतो. जॉइन ग्रुपवर क्लिक केल्यानंतर कोणत्याही ओटीपी किंवा युजर्सच्या खात्रीशिवाय तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट या ग्रुपमध्ये समाविष्ट होते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यास किंवा या अ‍ॅपच्या माध्यमातून यूजर कोणत्याही ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करतो तेव्हा त्याच्या ट्सअ‍ॅपचा सर्व डाटा हा अ‍ॅप्स कंपनीकडे आपोआप सेव्ह केला जातो. या अ‍ॅप्सवर ‘अ‍ॅड व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’असाही ऑप्शन आहे. कोणताही युजर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची लिंक परवानगीशिवाय अपलोड करू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो खातोय भाव; किलोला शंभरीची धाव!

0
0

टोमॅटो खातोय भाव; किलोला शंभरीची धाव!


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाळ्यात सिंचनाचा प्रश्न असल्याने टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात झाली. पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाच्या सततच्या सरींमुळे टोमॅटो पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्याचा परिणाम उत्पादन घटण्यावर झाला. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर प्रचंड वाढले आहेत. वीस किलोच्या टोमॅटोच्या क्रेटला कृषी उत्पन्न बाजार समितीत ८०० ते १२०० रुपयांचा दर मिळत आहे. परिणामी, किरकोळ बाजारात टमाट्यांचे भाव ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे दैनंदिन भाज्यांच्या नियोजनातून टोमॅटो गायब होणार आहे.

का घटले उत्पादन?

-उन्हाळ्यात पीक असेल तर फुले कोमेजतात

- उन्हाळ्यात पुरेसे पाणी नसते

- वळवाचा पाऊस, वाऱ्याने फुले, फळे झडतात

- सततच्या पावसाने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

- ‌पावसामुळे फळे सडू लागतात

आवक कधी वाढेल?

-दोन महिने आवक कमीच

- पावसाळ्यातील टोमॅटो ऑगस्टनंतर बाजारात


पिंपळगावला आवक घटली

टोमॅटोचे मोठे मार्केट असलेल्या पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोमॅटोची आवक होत नाही. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामात पाच ते सात हजार क्विंटल टोमॅटोची आवक होत असते. गुरुवारी फक्त ४४६ क्विंटल आवक झाली आहे. या बाजारात प्रतिक्रेट सरासरी ९५० रुपये असा भाव मिळाला. त्यातही चांगल्या दर्जाचा टोमॅटो दुर्मिळ झाला आहे.

यंदा उत्पादन कमी..

टोमॅटोची लागवड होण्यास सुरुवात झाली असली, तरी श्रावणात मोठ्या प्रमाणात लागवडी होतात. हा टोमॅटो निर्यात होत असल्याने त्याला चांगले दर मिळतात. मात्र, गतवर्षी टोमॅटोच्या निर्यातीला अडचणी आल्यामुळे भाव घसरले होते. शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागल्याने त्याचा परिणाम होऊन यंदा टोमॅटोचे उत्पादन कमी राहील की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.


नवीन वाणांची लागवड

टोमॅटोचे नवी विकसित वाण दरवर्षी येत असल्यामुळे काही वाण चांगले निघतात, तर काही बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूकही होत असते. त्यामुळे नव्या वाणाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी धजावत नाही. प्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेले टोमॅटोचे शेत बघितल्यानंतर खात्री करूनच अशा नव्या वाणांची लागवड करण्यात येते. जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या दर्जेदार वाणांची शेतकरी पारखून लागवड करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी मार्क्स, नंतर परीक्षा!

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर
कॉलेजरोडवरील एनबीटी लॉ कॉलेजमध्ये एलएलएमच्या विद्यार्थ्यांना इंटर्नलचे मार्क्स आधी देण्यात आले आणि त्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाने सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली आहे.

सध्या विविध विद्यापीठांचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबई विद्यापीठापाठोपाठ आता सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणांमधील गैरप्रकार उघडकीस आला आहे. भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष अजिंक्य ग‌िते यांनी केलेल्या तक्रारीनुसार, एनबीटी लॉ कॉलेजमध्ये सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात एलएलएमच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याची तारीख उलटली, त्यापूर्वीच कॉलेजने मार्क्स विद्यापीठाला कळविले. ही तारीख उलटल्यानंतर कॉलेजने इंटर्नल परीक्षा घेतल्याचे म्हटले आहे. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा न घेता परस्पर गुण पुणे विद्यापीठाला पाठवले. परीक्षेची तारीख निघून गेल्यावर विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. तसेच तोंडी परीक्षेअंतर्गत कॉलेजच्या प्राचार्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही भाजयुमोने केला आहे. कॉलेजांच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे नाव आणि तोंड पाहून गुण दिल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. सन २०१४-१५ मध्येही प्राचार्यांना अशा प्रकारच्या वागणुकीमुळे गुण प्रक्रियेपासून दूर ठेवले होते, असा संदर्भही पत्रात देण्यात आला आहे. तसेच बीएलएल आणि एलएलबी या अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षाचे गुण देतानाही कॉलेजमध्ये अधिकाराचा गैरवापर झाल्याची तक्रार पत्रात करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची योग्य चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमोने पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षलागवडीत नाशिक ठरणार अव्वल

0
0

म. टा.वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्य सरकारतर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमात पहिल्या पाच दिवसांतच नाशिक विभागाने ७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्द‌िष्ट्य पार केले असून, आतापर्यंत नाशिक विभागात ८२ लाख ७२ हजार ८० रोपांची लागवड झाली आहे. या मोहिमेच्या उर्वरित कालावधीत लागवड केलेल्या रोपांची संख्या सव्वा कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता असल्याने राज्यातील सहा महसूल विभागांत सर्वाधिक रोपे लागवडीचा मुकूट नाशिक विभागाला मिळणार आहे.

नाशिक विभागात १ जुलै रोजी वृक्ष लागवड मोहिमेस विभागातील पाचही जिल्ह्यांत प्रारंभ झाला. या मोहिमेत विभागातील सर्व जिल्ह्यांत शासकिय यंत्रणांसह स्वयंसेवी व शैक्षणिक संस्थांसह, ग्रीन आर्मी, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रोपांची लागवड केली. यंदा राज्यात ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य ठेवलेले आहे. त्यापैकी नाशिक विभागात ७६ लाख ४३ हजार रोपे लागवड केली जाणार होती. परंतु या वृक्षलागवडीच्या मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांतच नाशिक विभागात तब्बल ८२ लाख ७२ हजार ८० इतक्या रोपांची लागवड पूर्ण झाली आहे. आतापर्यंत उद्द‌िष्टाच्या सुमारे १०८ टक्के रोपांची लागवड झाली आहे.

या मोहिमेच्या उर्वरीत कालावधीत १ कोटी २५ लाख पेक्षा जास्त रोपांची लागवड होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यात सर्वाधिक वृक्ष लागवड करण्याचा मान नाशिक विभागाला मिळणार आहे. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीही या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी होत मोहाडी (ता दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म्स येथे व बोरटेंभे (ता. इगतपुरी) येथे वृक्षलागवड केली. यावेळी दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळी वीकएण्डचा बदलता ट्रेंड

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गेल्या काही वर्षांत शहराची लोकवस्ती चोहोबाजूंनी झपाट्याने वाढली आहे. राज्यातूनच नव्हे, तर देश-विदेशांतून कामानिमित्ताने नागरिक नाशिकला वास्तव्यास आले आहेत. अशा असंख्य सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यटनप्रेमी नागरिकांत सुटीचा दिवस निर्सगाच्या ठिकाणी घालविण्याचा ट्रेंड वाढीस लागत असून, पावसाळी वीकएण्ड निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

त्र्यंबकेश्वर व गिरणारे परिसरात निर्सगाच्या ठिकाणी सुटीच्या दिवशी पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. सुटीचा एक दिवस पूर्णपणे कुटुंबासह चाकरमाने देत असल्याने डोंगर भागात रस्ते वाहनांनी हाउसफुल्ल झालेले पाहायला मिळत आहेत. डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात मिळेल त्या ठिकाणी भिजत पर्यटक सुटीचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

रोजच कामाच्या दगदगीतून सुटका करणारा सुटीचा दिवस घालवावा कुठे, असा प्रश्न उभा राहतो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून चाकरमाने वीकएण्डचा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंबासह घालविताना दिसून येत आहेत. नाशिक शहराला लागून असलेल्या त्र्यंबकेश्वर व गिरणारे परिसरात डोंगर भागात पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्यांमध्ये मिळेल त्या ठिकाणी पर्यटक कुटुंबासह निसर्गस्नान करण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्र्यंबकेश्वररोडवर डोंगरावरून पडणाऱ्या झऱ्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी चिमुकल्यांसह अबालवृद्धही मजा घेत आहेत.

दरम्यान, सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक निर्सगाच्या ठिकाणी जात असल्याने प्रशासनाकडून मात्र पाहिजे त्याप्रमाणात काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. अनेकदा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीवही गमवावा लागला आहे. माहिती नसलेल्या पाण्याच्या ठिकाणी प्रशासनाने नोटीस फलक लावले पाहिजेत, असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे.

--

सुटीचा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. यात त्र्यंबकेश्वर व गिरणारे रस्त्यावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. चिमुकल्यांसह अबालवद्ध भरपावसात डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्यात ओलेचिंब होत आहेत.

-दिगंबर निगळ, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीला आक्षेप घेणाऱ्यास मारहाण

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

झाडे तोडण्याआधी महापालिकेची परवानगी घ्या, असे सांगणाऱ्या पर्यावरणप्रेमी ऋष‌िकेश नाझरे यांना समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. पर्यावरणप्रेमींनी याचा निषेध केला आहे.

नाझरे हे अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहेत. महापालिकेने गंगापूररोडसह शहरात विविध ठिकाणी केलेली चुकीची वृक्षतोड त्यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास वेळोवेळी याचिकेद्वारे आणून दिली आहे. त्यांच्या याचिकेमुळेच सध्या नाशिकमधील वृक्षतोडीस हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. गंगापूररोडवर रस्त्याला अडथळा न ठरणारी गुलमोहराची बारा झाडे तोडली जात असल्याचे पर्यावरणप्रेमींनी नाझरे यांना कळवले. त्याची माहिती घेण्यासाठी नाझरे गेले असता एका नेत्याच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली. हायकोर्टाची स्थगिती असतानाही झाडे तोडल्याचे सांगून नाझरे म्हणाले की, पर्यावरण रक्षण करणे हे घटनेनुसार माझे कर्तव्य व हक्क आहे. हायकोर्टाची स्थगिती असताना झाडे तोडून कोर्टाचा अवमान करू नका, इमर्जन्सी बाब असेल तर महापालिकेची परवानगी घ्या, एवढेच आपण सांगितले, तरी बारा झाडे तोडण्यात आली व मला मारहाण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विन झळकेने दिले १३ व्यक्तींना जीवदान!

0
0

नाशिकमधून आठव्यांदा ग्रीन कॉरिडॉर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्तदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. पण आता अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रक्तामुळे एका जणाला जीवदान मिळते, तर अवयवदानाने अनेक जणांना. नाशिकमध्ये अपघातात ब्रेन डेड झालेल्या अश्विन झळके या युवकाचे अवयव दान करण्याचा, त्याच्या नातेवाईकांनी घेतलेल्या निर्णयामुळे तब्‍ल १३ लोकांना जीवदान मिळाले आहे.

जेलरोड येथील अश्विन झळके अपघातात ब्रेन डेड झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांच्‍या परवानगीनंतर अवयव दानाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी ऋषिकेष हॉस्पिटलच्या १४ डॉक्टरांची टीम मेहनत घेत होती. ऋषिकेष हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपासून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

किडनी रस्तामार्गे

दुपारी १२ वाजता त्यांची किडनी रस्त्याच्या मार्गाने पुण्याला पाठविण्यात आली. तर दुसरी किडनी ऋषिकेश हॉस्पिटल येथे असलेल्या एका रुग्णाला देण्यात आली. पुण्याला पाठवलेली किडनी ३ वाजून १५ मिनिटांनी पुण्याला पोहचली.

हृदय एअर अॅम्ब्युलन्सने प्रथमच रवाना

सकाळी १० वाजता : ऋषिकेश हॉस्पिटलहून अॅम्ब्युलन्स निघाली. १०.३० वाजता : अॅम्ब्युलन्स ओझर विमानतळावर पोहचली.
११.३० वाजता : ओझरहून एअर अॅम्ब्युलन्स पुण्यात पोहचली. ११.४५ वाजता : हृदय रुबी हॉस्पिटलला पोहचले. लिव्हर सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात गढूळ पाणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर आणि दारणा धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दिलासा मिळाला असतानाच, शहरात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. शहरातील पंचवटी, नाशिकरोड, सिडको, द्वारका आणि जुने नाशिक परिसरात गढूळ पाणीपुरवठ्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने लोकप्रतिनिधीही त्रस्त झाले आहेत. अगोदरच साथीच्या आजारांचे थैमान शहरात सुरू असताना गढूळ पाणीपुरवठ्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी गढूळ पाणीपुरवठ्याची गंभीर दखल घेतली असून, दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गढूळ पाणीपुरवठा टाळण्यासाठी पालिकेने खरेदी केलेले कोट्यवधीचे अॅलम कुठे गेले, असा प्रश्नही या निम‌ित्ताने उपस्थित होत आहे.

गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून, गंगापूर धरणाचा साठा हा ४१ टक्क्यांच्या वर गेला आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने गढूळ पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत येत आहे. परंतु, जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याची शुद्धता पुरेशी होत नसल्याने गढूळ पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः पंचवटी, नाशिकरोड, सिडकोतील काही भाग, जुने नाशिक, द्वारका, इंद‌िरानगर या भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरिकांकडून पालिकेच्या अॅपवरही तक्रारी करण्यात आल्या असून लोकप्रतिनिधीही त्रस्त झाले आहेत.


अॅलमचा योग्य वापर नाही

शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असताना पाणीपुरवठा विभाग मात्र सुस्त आहे. गढूळ पाणीपुरवठा थांबवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फिल्टर बॅकवॉश आणि फिल्टर वॉशिंगचे प्रमाण वाढवलेले नाही. तसेच अॅलमचा योग्य प्रमाणात वापरही होताना दिसत नाही. पाणीपुरवठा नियंत्र‌ित करणाऱ्या पथकात तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारीही उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा बेभरवशावर होत आहे. या प्रकाराची महापौरांनी गंभीर दखल घेतली असून, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांना पाचारण करत, त्यांना जाब विचारला आहे. तसेच दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. गढूळ पाणीपुरवठ्यामुळे शहरात साथीचे आजार वाढण्याची भीती असून, तातडीने फिल्टरेशन प्लान्टमधील बिघाड दूर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोट्यवधींची औषधे गेली कुठे?

पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य गढूळ पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर जलशुद्धीकरण केंद्रासाठी कोट्यवधींचे अॅलम आणि औषधे खरेदी केली जातात. परंतु, तीन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असताना या औषधांचाही वापर झालेला दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधीची औषधखरेदी जाते कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे नवीन खरेदीसाठी विभागाकडून हा पुरवठा मुद्दाम गढूळ केला जात असावा असा संशयही व्यक्त केला जात आहे.


गढूळ पाणीपुरवठा का होतोय याची माहिती घेऊन पाणीपुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी. साथीचे आजार वाढू नयेत याची दक्षता घ्यावी.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुराच्या मुलीला हवं आर्थिक पाठबळ

0
0

नामदेव पवार, सातपूर

घरात अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांची मोलमजुरी तर आईचा शिवणकाम व्यवसाय. कुटुंबात शिक्षणाचे वातावरण नसताना दीपालीने इयत्ता दहावीत ९०.६० टक्के गुण मिळविले. पण, एवढे गुण मिळाल्यावरही पुढे करायचे काय, हा प्रश्न तिला सतावतो आहे. इंजिनी‌अरिंग बनण्याचे स्वप्न असले तरी शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा या प्रश्नाने वरघडे कुटुंब चिंतीत आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ तिच्यापाठी लाभले तरच हे शक्य होणार आहे.

त्र्यंबकेश्वररोडलगत असलेल्या तिरडशेत या छोट्याश्या आदिवासी गावात शासनाने दिलेल्या घरकुलात दीपालीचे कुटुंब वास्तव्य करीत आहे. शिकण्याची जिद्द असेल तर कुठेही शिक्षण घेऊन पुढे जाता याचे याचे उदाहरण म्हणजे दीपाली देवराम वरघडे हिचेच द्यावे लागेल. घरात कुणीही शिकले नसताना शाळेतील शिक्षकांच्या सांगण्यावरून दीपाली अभ्यासात आपली चुणूक दाखवू लागली. दीपालीला भरारी घ्यायची आहे. त्यासाठीच तिला समाजातील दातृत्वाची साथ हवी आहे.

दीपालीला बनायचंय इंजिनीअर

तिरडशेत गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ चौथीपर्यंत शिक्षणाची सोय होती. यानंतर दीपालीला कोणत्या शाळेत टाकायचे? असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या स्वाती वानखेडे या दीपालीच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी गंगापूररोडवरील नवरचना शाळेत दीपालीचा प्रवेश करून दिला. यानंतर शाळेतील होस्टेलमध्ये दीपालीच्या निवासाची सोय झाली.

होस्टेलच्या रेक्टर सीमा गायकवाड यांच्या सहकार्याने कुठलाही क्लास न लावता दीपालीने दहावीत ९०.६० टक्के गुण मिळविले. पुढील शिक्षणासाठी दीपालीला समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे. भविष्यात दीपालीला इंजिनीअर बनण्याची इच्छा आहे.

आदिवासी गाव असलेल्या नाशिक तालुक्यातील तिरडशेतमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या केवळ बोटावर मोजण्याइतकीच आहे. शहराला लागून असलेल्या गावाचा समावेश महापालिकेत न झाल्याने गावात दारिद्रय पसरलेले आहे. अशा नकारात्मक परिस्थितीवर मात करीत दीपालीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. आई, वडील दोघेही अशिक्षित असताना शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे दीपालीला शिक्षणाची जिद्द निर्माण झाली. गावातील जिल्हा परिषद शाळेतही तिने चमकदार कामगिरी केली. दीपालीच्या घराची परिस्थिती बेताचीच. शासनाने दिलेल्या घरकुलात दीपालीचे कुटुंब वास्तव्यास आहे. वडील देवराम पाच वर्षांपूर्वी एका पायाने अधू झाले. मोलमजुरी करणाऱ्या दीपालीच्या आईने बचतगटाच्या माध्यमातून शिवणकाम शिकून घेतले. दीपालीही वेळ मिळेल तेव्हा आईला शिवणकामात मदत करते. तिची छोटी बहीण मयुरी नववीत तर भाऊ अभिषेकही सातवीत नवरचना विद्यालयात शिकत आहे.

आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या दीपालीच्या डोळ्यात इंजिनीअर होण्याची स्वप्ने आहे. मात्र, पुढील शिक्षण घ्यावे कसे, असा मोठा प्रश्न तिच्या कुटुंबासमोर आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी सहाय्य केले तर तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शिक्षिका सीमा गायकवाड यांचे मार्गदर्शन आणि मदत दीपालीला आजवर मोलाची ठरली आहे. घरात आई, वडील अशिक्षित असतांना शिक्षकांच्या मदतीने दीपाली व तिची भावंडे शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहेत. दीपालीला वेगळे करण्याची आस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला वनविभागाने गाठले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वनमहोत्सवांतर्गत १ ते ७ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यभरात तब्बल ४ कोटी वृक्ष लागवडीच्या राज्य शासनाच्या यंदाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांत येवला वनविभागाने मोहिमेच्या सहाव्या दिवशीच आपले उद्दिष्ट गाठले आहे. येवला वनविभागाच्या हद्दीत ठरवून देण्यात आलेल्या एकूण ७८ हजार १९३ वृक्षलागवडीच्या उद्दिष्ठातील ७७ हजार ७१० वृक्षांची लागवड बुधवारी सायंकाळपर्यंत झाल्याची माहिती येथील वनविभागाच्या सूत्रांनी दिली. उर्वरित अवघ्या ४८३ वृक्षलागवडीचे काम गुरुवारी करण्यात आले. येवला वन विभागाच्या वतीने आपल्या हद्दीतील कुळवाडी-श्रीरामनगर व बोकडदरे (तालुका निफाड), तसेच सावरगाव व राजापमर (येवला) या वनहद्दीतल एकूण ७१ हेक्टर क्षेत्रात ही वृक्षलागवड करण्यात आली आहे.

आयटीआयमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

येवला ः बाभूळगाव येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था व सामाजिक वनीकरण येवला उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीआय इमारत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसिलदार नरेशकुमार बहिरम, वनक्षेत्रपाल अनिल परब, निवृत्त सहाय्यक वन संरक्षक विजय चोंडेकर, प्राचार्य विजय बाविस्कर आदींच्या हस्ते विविध प्रकारच्या ७५ रोपांचे रोपण करण्यात आले. संस्थेच्या वतीने यावेळी उपस्थित मान्यवरांचे नेहमीप्रमाणे गुलाबपुष्प देवुन नव्हे, तर प्लास्टिक कुंडीतील गुलाबाचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले.

वनमहोत्सवाचे औचित्य साधून येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात शाळेतील चिमुकल्यांनी वृक्ष लागवडीचा आनंद घेतला. मुक्तानंद कॉलेजमध्येही वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोल‌िस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पाला ५१ तालांचा विश्वविक्रमी ‘प्रसाद’

0
0

नाशिकचे शिवराय ढोल पथक विश्वविक्रमाला गवसणी घालणार असून, या पथकातील तीनशे वादक एकाच वेळी ५१ श्लोक ५१ कला, ५१ तालात, एका संकल्पनेवर सादर करून पाच विश्वविक्रम करणार आहेत. हे वादन ६ ऑगस्ट रोजी विश्वास लॉन्स येथे सादर केले जाणार आहे.

घराघरांमध्ये पूर्वी मुखोद्गत असणारे ५१ श्लोक नव्या पिढीपर्यंत पोहचावे यासाठी हा उपक्रम शिवराय ढोल पथक राबविणार आहे. श्लोक सादर करतानाच भारतीय पारंपरिक कला लोकांपर्यंत पोहचाव्यात हा देखील या मागचा उद्देश आहे. या कला पोहचविण्यासाठी ५१ कलाकार एकाच वेळी ५१ कलांचे सादरीकरण करणार आहे. या कलांमध्ये पोर्ट्रेट, रांगोळी, लमसा, मधुबनी, वारली इत्यादी पारंपरिक कलांचा समावेश आहे. या ढोलवादनात भारतीय श्लोक ५१ तालात बांधले असून, एकावेळी तीनशे वादक ते सादर करणार आहेत. या उपक्रमाचा सराव रोज संध्याकाळी ठक्कर डोम येथे सुरू असून, जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे अवाहन शिवराय ढोल पथकाच्यावतीने करण्यात आले आहे. या ढोल पथकात ६० टक्के महिला असून ४० टक्के पुरुष आहेत. त्याचप्रमाणे यातील वादक हे इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील असे उच्च विद्याविभूषीत आहेत. याच कार्यक्रमाबरोबर गणेशोत्सवाच्या निमित्ताने ५१ तालांचा नैवेद्य बाप्पाला देण्याची यामागची संकल्पना आहे. त्याचप्रमाणे डी. जे आणि ढेलपथक यांची अनोखी जुगलबंदी देखील यावेळी लोकांना पहायला मिळणार आहे. असा प्रयोग भारतात प्रथमच सादर केला जाणार आहे. त्याच बरोबर आपल्या पारंपरिक वाद्याबरोबर ढोल पथकाचा स्टेज शो देखील सादर करणार आहे.

गिनीज रेकॉर्डसाठीही प्रयत्न

या विश्व विक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वंडर बुक्स ऑफ रेकॉर्ड लंडन, वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंड‌िया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये देखील या उपक्रमाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाचा प्रस्ताव या संस्थांना पाठवल्यानंतर लगेचच या पाचही संस्थांच्या प्रतिनिधींनी हे वादन युनिक असल्याचे सांगून येण्याचे निश्चित केले आहे.


विश्वविक्रमी वादनासाठी वर्षभरापासून प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घोऊन कार्यदेशीर कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे. वादनासाठी वादकही सराव करीत आहे.

शौनक गायधनी, संस्थापक

५१ ताल, ५१ कला याचा मिलाप पहाण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे. महिलांची संख्या नेहमी प्रमाणे जास्त आहे.

- अमी छेडा, वादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न सुटणार!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नगरपालिका प्रशासनाकडून सटाणा शहरात सध्या तब्बल दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होत आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने बुधवारी (दि. १२) ‘सटाणावासीयांची भागेना तहान’ या म‌थळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्ष सुनील मोरे, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ७) गिरणा नदीपात्रात ४८० दलघफू इतके बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सटाणा शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

शहराला कळवण तालुक्यातील चणकापूर, पुनद व सटाणा तालुक्यातील केळझर धरणातून गिरणा नदीद्वारे आवर्तन मिळते. सटाणा शहराला खऱ्या अर्थाने जानेवारीपासून ते थेट जून महिन्यापर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने सटाण्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

शहरातील चार जलकुंभावर आठ विभाग करण्यात आले होते. एका जलकुंभावरून दोन विभागांना तब्बल दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो.

शहरवासीयांना बारमाही दररोज पाणीपुरवठा केल्यास ४५ लाख लिटर पाण्याची गरज असतांना पालिका प्रशासनाकडे इतके पाणी उपलब्ध होत नाही. किंबहुना पालिका प्रशासनाकडे पाणी साठविण्यासाठी पर्याय नसल्याने शहरवासीयांना एक दिवसाआड नियमित सुमारे २२ लक्ष लिटर पाणी वितरित करण्यात येत आहे. मात्र गत महिनाभरापासून गिरणा नदी व शहरातील आरम नदी पात्र कोरडेठाक असल्याने शहरातील नदीपात्रालगत असलेल्या विहिंरींच्या उद्भवावरून पालिका प्रशासन मोठ्या कसरतीने दहा दिवसाआड पाणी पुरवित आहे. अवघ्या ४ ते ४.५ लाख लिटर इतक्या कमी प्रमाणात पाणी जलकुंभाद्वारे पुरविले जाते. परिणामी शहरातील सुमारे ४० हजारांहून अधिक लोकसंख्येला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी जनतेला उन्हाळ्यापासून पावसाळा सुरू झाला तरी रस्त्यावर वणवण भटकावे लागत असल्याने स्थानिक नागरिक मेटाकुटीस आले होते. पावसाळा सुरू होवूनही पाण्याचे टँकर्स धावत होते. मात्र आता शहरात पाणीपुरवठा होणार आहे.

असे मिळाले शहरासाठी आवर्तन

१२ एप्रिल - केळझर धरणातून तिसरे व अखेरचे आवर्तन

३ मे - पुनद व चणकापूरचे एकत्रित आवर्तन. या दोन आवर्तनामुळे मे महिन्याचा पहिला पंधरवाडा पार पडला. मात्र नंतर पाणीटंचाई जाणवली.

२८ मे - पुन्हा पुनदचे आवर्तन मिळाले. हे आवर्तन मिळूनही शहरातील जनतेला तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता.

८ जून - चणकापूरचे मालेगावसाठीचे आवर्तन लांबले. जूनमध्ये शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत होता.

६ जुलै - नगराध्यक्ष मोरे, आमदार आहेर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.

जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडले वास्तव

नागरिकांमधील संताप आणि ‘मटा’च्या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शहरातील पाणीप्रश्नाचे वास्तव मांडले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चणकापूरमधून आवर्तन सोडण्यासाठी परवानगी दिली. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी गटार योजनेला अखेर मान्यता

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटार योजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांत यासाठी दीडशे कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. या योजनेमुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत भुसे बोलत होते. शहराच्या भुयारी गटार योजनेच्या मागणीसाठी भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला मालेगाव भुयारी गटारीचा कामाचा समावेश करून केंद्र शासनास प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते. केंद्राने या प्रस्तावाचा अमृत योजनेत समावेश केला, अशी माहिती भुसे यांनी दिली. लवकरच या संदर्भात शासन पातळीवरून किंवा महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे माध्यमातून सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रके, आराखडे तयार करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात होणार आहे. दरम्यान या योजनेचा प्रकल्प मार्गी लागत असताना मालेगाव महापालिका हद्दवाढ झालेल्या गावांचा समावेशसह ही योजना मार्गी लावावी व त्यासाठी जास्तीजास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती फडणवीस यांना केल्याचे भुसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्जासाठी वेटिंगच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात जून अखेर जिल्हा सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतक-यांना अवघे ११.४१ टक्के म्हणजे ३२० कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. या सर्व ३४ बँकांना २८०६ कोटींचे उद्दिष्ट सरकारने दिले होते. पण, त्याची टक्केवारी खूपच कमी असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गेल्या वेळेस खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ३ लाख ३ हजार ६९६ शेतकऱ्यांना २,७८३ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याने त्याची टक्केवारी ११८ टक्के झाली होती. त्यात जिल्हा बँकेने सर्वाधिक १७१९ कोटी १८ लाख कर्ज वाटप केले होते. यावर्षाच्या मे अखेर जिल्हा सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी फक्त शेतकऱ्यांना १६८ कोटी १४ लाख रुपयांचे कर्जवाटप केले होते. त्यात जूनची १५२ कोटींची भर पडली आहे. आतापर्यंत १५ हजार ९४३ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांची संख्याच ८ लाखांच्या आसपास आहे. जे सभासद झाले अशा शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. इतकी मोठी संख्या असतांना केवळ सुमारे पंधरा हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शेतीवर होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे काहीसा फायदा झाला असला तरी त्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी अजून दोन महिने लागणार आहेत. त्यानंतर त्यांना नवीन कर्ज मिळेल तोपर्यंत खरीप हंगाम संपलेला असेल. या सर्व परिस्थितीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवाणी करून किंवा सावकाराकडून कर्ज घेवून खरीप हंगामाचे पीक घेतले आहे. पावसाळ्यात खरीप हंगामासाठी खरं तर मार्चनंतर कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो. मात्र, यंदा नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले, तर कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाही परिणाम या कर्जवाटपावर झाला आहे.

पीक विम्यावर परिणाम
जिल्हयात खरीप पिकाचे कर्ज वाटप कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम पीक विम्यावर झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणेला पीक विमा काढण्याचे निर्देश दिले आहे. बँकेतून कर्ज घेतल्यानंतर पीक विमाचे पैसे त्यातून कट होत होते. यावेळेस कर्ज नसल्यामुळे परिणाम झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तालुका, गावपातळीवर समित्यांचे गठण

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मुंबई येथे येत्या ९ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी जिल्हा, तालुका, शहर अशा वेगवेगळ्या समित्यांच्या स्थापना करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी नांदूर येथे जिल्हास्तरीय बैठक झाली. यात जिल्हास्तरीय नियोजन कशा प्रकारे असावे यासाठी चर्चा करण्यात आली. गाव व तालुका पातळीवरील समित्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. समाज प्रबोधनासाठी वाहनांवर स्टिकर लावणे, गावागावात होर्डिंग, बॅनर लावणे, प्रसिध्दी समिती, वाहतूक समिती, स्वयंसेवक समिती यांच्या माध्यमातून कामकाज करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी ठराविक स्वयंसेवकांवर सोपविण्यात आली. गावोगावी बैठका घेण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात होणाऱ्या बैठकांसाठी उमेश शिंदे व संतोष माळोदे यांच्याकडे तर शहरातील बैठकांसाठी योगेश नाटकर व विशाल कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईला होणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव कसे सहभागी होतील याविषयीचे चर्चा करण्यात आली. त्यामध्ये करण गायकर, मधुकर कासार, शिवाजी मोरे, अमोल वाजे, शरद तुंगार, मच्छिंद्र निमसे, सागर माळोदे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरणाने गावांचा विकास

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिका हद्दीबाहेरील गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास प्राधिकरणाने गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर नाशिकचा क्रमांक आहे. रस्ते जोडणीसह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न आवश्यक आहे. नाशिक हे गुंतवणूकीसाठी अग्रेसर झाले पाहिजे, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी केले.

निमा आणि क्रेडाई यांच्यातर्फे विकास प्राधिकरण नियोजनाबाबत चर्चासत्र झाले. यावेळी झगडे बोलत होते. कार्यक्रमास यावेळी आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्‌, नगरविकास विभागाच्या प्रतीभा भदाणे, ‘क्रेडाई’चे राजूभाई ठक्कर, ‘निमा’चे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी उपस्थित होते. महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे, नागपूर आणि आता नाशिक प्राधिकरण स्थापन झाले आहे. यामुळे गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. नाशिकला ही संधी मिळाली आहे. नाशिकची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरासह लगतच्या गावांचा विकास झाला पाहिजे. शहराची देखभाल करण्यासाठी महापालिका सक्षम आहे, परंतु लगतच्या सिन्नर, दिंडोरी, त्र्यंबक व निफाड ही गावे एकमेकांना जोडले जाणार आहे, अशी माहिती झगडे यांनी दिली.

मुंबई आणि पुण्याचा विकास झाला असला तरी नाशिक अद्याप मागे आहे. नाशिक हे संपूर्ण भारताचे गुंतवणूकीचे केंद्र झाले पाहिजे. त्यासाठी याठिकाणी सुरुवातीला रस्त्यांची जोडणी योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. तसेच रोजगाराचे साधन उपलब्ध होणेही तितकेच गरजेचे आहे. भविष्यातील चांगली शहरे विकसित करण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना झाल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांचे मते जाणून घेतली.

नाशिकमध्ये ‘मेक इन नाशिक’ची संकल्पना राबविण्यात येत असून त्याद्वारे संरक्षण, कृषी या क्षेत्रातून अधिक रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेजारी-शेजारी असणारे गावे एकमेकांना जवळची व वाहतुकीला सुरळीत वाटली पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न केला जाणार असल्याचेही झगडे यांनी सांगितले. यावेळी ‘नाईस’चे विक्रम सारडा, दिग्विजय कापडिया, अनुप मोहबंसी, जितूभाई ठक्कर, किरण चव्हाण, धनंजय बेळे, नरेश कारडा आदी उपस्थित होते.

विकास प्राधिकरण जादू नाही
विकास प्राधिकरण सुरू होणार म्हणजे खूपच विकास लगेच होणार असेही नाही. त्यासाठी काही अवधी लागेल. प्राधिकरण हे सर्वांच्या सूचना विचारात घेऊनच काम करीत असते. कोणत्याही कायद्यात बदल करून प्राधिकरणाकडून विकास होत नाही. त्यामुळे प्राधिकरण आले म्हणजे लगेच उद्या विकास होईल, असेही मानू नका, याकडेही झगडे यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याकूळ नामपूरचा पाणीप्रश्न सुटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने सटाणा तालुक्यातील नामपूर गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत १६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नामपूर गावात सटाणा, ताहराबाद, मालेगाव, साक्री गावातील शेतकरी कामानिमित्त येतात. तसेच मुलांच्या शिक्षणसाठी काही शेतकरी बांधव नामपूर येथे स्थायिक झाल्याने गावाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढत असताना गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.

डॉ. भामरे यांनी प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने नामपूरसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २०१७-१८ च्या आराखड्यात १६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हरणबारी ते नामपूर अशा ३६ किलोमीटरच्या पाइपलाइनद्वारे २.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. चार लाख लिटर आणि तीन लाख लिटरच्या अशा दोन टाक्या उभारण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ २० हजार लोकसंख्येला होणार असून वाढीव भागातील वितरण व्यवस्थेचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. येत्या काळात योजना पूर्ण होऊन जनतेचा पाणी आणि आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी दूर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैदीकुंडली एका क्लिकवर

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

कैद्याची सर्व माहिती म्हणजेच संपूर्ण कुंडली आता संगणकावर प्रशासनाला उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. संगणकावर आधारीत ही प्रिझम प्रणाली नाशिकरोडसह राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये कार्यान्वित झाली आहे. नाशिकमध्ये त्याचा तीन हजार कैद्यांना त्याचा लाभ होणार आहे.

प्रिझम प्रणाली ही इंटरनेट व संगणकाच्या सहाय्याने चालणारी आधुनिक प्रणाली आहे. सध्या राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहात ती लागू झाली असली तरी राज्यातील लहान कारागृहांमध्येही ती लागू होणार आहे. त्यामुळे राज्यातील कैद्यांची कुंडली एक क्लिकवर प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. प्रिझम प्रणालीत कैद्यांचा फोटो तसेच हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात. कैद्याची संबंधित माहिती जेल कर्मचारी संगणकात फीड करतात. कैद्याची शिक्षेची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केली जातात. ही माहिती जेलचे वरिष्ठ अधिकारी चेक करतात. या माहितीत कैद्यावर कोणते गुन्हे आहेत? त्याला शिक्षा काय झाली? कधी झाली? तो जेलमध्ये कधी आला? त्याची सुटका कधी होणार? तो रजेवर आहे का? सध्याचे स्टेटस काय आदी माहिती या प्रणालीत मिळते.

नियंत्रण पुण्याहून

राज्यात नऊ सेंट्रल जेल (मध्यवर्ती कारागृह) आहेत. येरवडा, मुंबई, ठाणे, नागपूर, तळोजा, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि नाशिक येथेच सेंट्रल जेल आहेत. नाशिकबरोबरच या जेलमध्येही प्रिझम प्रणाली सुरू झाली आहे. पुण्यात कारागृह महानिरीक्षक कार्यालय आहे. तेथून प्रिझम प्रणालीवर नियंत्रण ठेवले जाईल. राज्यातील अन्य छोट्या जेलमध्येही ही प्रणाली सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. नाशिक जेलमध्ये सव्वातीन हजार कैदी आहेत. त्यांची माहिती प्रिझम प्रणालीत भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नाशिकरोड जेलमध्ये मोबाइल सापडण्याच्या घटना नियमित घडत असतात. कैदी कोणत्या ना कोणत्या मार्गाने मोबाइल मिळवत असतात. कारागृहातून खंडणीसाठी फोन केल्याचीही घटना घडली होती. या सर्वांना प्रतिबंध करण्यासाठी कारागृह व परिसरात २७ नवीन व जास्त क्षमतेचे जॅमर आले असून ते बसविण्याचे काम सुरू आहे.

सर्वानांच फायदा

प्रिझम प्रणालीद्वारे कैद्याची माहिती नेटवर उपलब्ध केली जाते. नाशिकच्या जेलमधील एखाद्या कैद्याची माहिती राज्यातील अन्य कारागृहाला हवी असेल तर कैद्याचे नाव व सीआर नंबर टाकला की लगेच उपलब्ध होईल. एखाद्या कोर्टाला ही माहिती पाहिजे असेल ती लगेच मिळेल. एखादा कैदी अन्य गुन्ह्यांमध्येही अडकलेला असतो. त्यामुळे पोलिसांना कैद्याचे स्टेटस पाहिजे असेल तर प्रिझम ते उपलब्ध करेल. ही माहिती नेटवर असल्याने इतर राज्यातील कारागृहांना मदत मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीय तरुण ठार

0
0

सातपूर : त्र्यंबकरोडवर गुरूवारी (दि. ६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तिरडशेत गावाच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सुदीपकुमार विश्वरंजन माहेती (२४, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. रस्त्यालगत असलेल्या खांबाला धडक दिल्याने अपघात झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

ईमेल अकाउंट हॅक
मनमाड : चांदवड येथे एका व्यावसायिकाचे ईमेल अकाउंट हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. चांदवड येथील संगणकविक्री आणि दुरुस्ती करणारे सागर निकम यांचा ई-मेल हॅक झाला आहे. ते दोन वर्षांपासून ई-मेलचा व्यावसायिक कामासाठी वापर करतात. परंतु, दोन दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने आपले ई-मेल अकाउंट हॅक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आरोपी ताब्यात
सातपूर : सातपूर कॉलनीत २००९ मध्ये झालेल्या जबरी चोरीतील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. नईम फईम शेख असे संशयित आरोपीचे नाव आहे. चोरीनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देत नईम फरार झाला होता. सातपूर पोलिस स्टेशनचे हवलदार एस. बी. तुपे पेट्रोलिंग करत असतांना चोरीच्या गुन्हातील आरोपी नईम दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तरुणाची आत्महत्या
नाशिक : नीलगिरी बाग परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्ता संतोष सूर्यवंशी असे तरुणाचे नाव आहे.

त्र्यंबकला दारू जप्त
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन ठिकाणी छापे टाकून ५१ हजार ४४८ रुपयाचा माल जप्त केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील मुरंबी या गावात ज्ञानेश्वर फुपाणे याच्यावर शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images