Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दारू विक्रीविरोधात एल्गार

0
0

टीम मटा

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटरपर्यंत दारू विक्रीला बंदी केल्यानंतर शहर परिसरात अनेक ठिकाणी रहिवासी परिसरात दारू विक्रीची दुकाने खुली झाल्याने नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला आहे. नाशिकरोड, दिंडोरीरोड, सिडको, सातपूर परिसरात या दुकानांविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला असून, त्यात महिला आघाडीवर आहेत.

--

चौथ्या दिवशीही ठिय्या

नाशिकरोड ः नाशिक-पुणे महामार्गावरील फेम थिएटरमागील दारूचे दुकान हटविण्यासाठी परिसरातील महिलांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सोमवारी त्यांनी हे दुकान उघडण्यास आलेल्या दुकानदाराला पिटाळून लावत दुकानासमोर ठिय्या आंदोलन केले.

या इमारतीत राहणाऱ्या श्री १००८ दीपानंदजी सरस्वती या साध्वीच्या नेतृत्वाखाली वैशाली दारोले, नीलम पगारे, मेघा थूल, ज्योती चांदवानी, डॉ. स्नेहल पाटील, समाधान पगारे, संजय दारोले, मुक्तार शेख, नाझिया शेख, जगदीश चांदवानी, कुंदन घडे, नाना पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

शासकीय पातळीवर लेखी निर्णय होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरू राहणार असून, रोज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, असे या महिलांनी स्पष्ट केले. हे दुकान हटविण्यासाठी महिलांनी काही दिवसांपूर्वी उपनगर पोलिस ठाणे गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, कार्यवाही न झाल्याने नगरसेविका सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली फेसबुकवर लाइव्ह आंदोलन केले. सध्या या महिला दररोज सायंकाळी दुकानासमोर धरणे आंदोलन करीत आहेत.

नागरिकांनी सांगितले, की सह्यांची मोहीम राबवून उपनगर पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन दिले आहे. दुकान सुरू करताना सोसायटीच्या रहिवाशांची परवानगी घेण्यात आली नाही. मद्यपींकडून महिला, विद्यार्थी यांना त्रास होत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

--

दुकानदाराला हुसकावले

आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले, की आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. इमारतीमध्ये आणि परिसरात राहणाऱ्या सर्व महिला एकत्र होऊन सकाळी नऊ वाजल्यापासून आंदोलन करीत आहेत. दारू दुकानाचे कर्मचारी आणि मालक दारुचे दुकान उघडण्यासाठी दोन वेळा आले, मात्र, महिलांनी त्यांना हुसकावून लावत दारू दुकान उघडू दिले नाही.

०००

सिडकोत दुकानाला टाळे!

इंदिरानगर ः सिडकोतही डीजीपीनगर भागात रहिवासी भागात दारू विक्रीचे दुकान सुरू झाले होते. त्यास नगरसेवक व नागरिकांनी विरोध दर्शविला होता. परंतु, ते दुकान बंद होत नसल्याने नगरसेवकांसह नागरिकांनी थेट या दुकानाला टाळे लावले आहे.

--

पाथर्डीत वाढता विरोध

महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर दारू विक्री करावी लागत असल्याने पूर्वी पाथर्डी फाटा येथे असलेले दुकान स्थलांतरित करण्यात आले आहे. या दुकानामुळे या परिसरातील मदयपींची वर्दळ वाढल्याने मुख्य रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. याच रस्त्यावर अजून दोन दारू विक्रीची हॉटेल्स असल्यासने सायंकाळी या रस्त्याने वाहन चालविताना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. भरवस्तीतील हे दारू दुकाने प्रशासाने तातडीने बंद करावे अन्यथा त्याविरोधात आंजोलन छेडावे लागेल, असा इशारा परिसरातील रहिवाशांकडून देण्यात आला आहे.

--

इंदिरानगरचे दुकान सुरू

इंदिरानगरमध्ये चार्वाक चौकात भरवस्तीत सुरू करण्यात आलेल्या दारू दुकानाविरोधात स्थानिक नगरसेवकांसह महिलांनी आंदोलन केले. परंतु, हे दुकान आजही सुरूच असून, सायंकाळी येथे मद्यपींच्या होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातून पायी चालणेही अवघड झाले आहे. एकेकाळी अत्यंत शांतताप्रिय असलेल्या चार्वाक चौकात हे दुकान झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असतो. तसेच या दुकानापासून जवळच एक क्लास असल्याने सायंकाळी येथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या दुकानाबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--

सातपूरला विरोध कायम

सातपूर ः अशोकनगर भागात महिलांनी मद्यविक्रीचे दुकान बंद करावे, अशी मागणी केली होती. परंतु, शहरात असलेल्या त्र्यंबकरोडवर देशी, विदेशी मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी मिळाल्याने रहिवाशांना माघार घ्यावी लागली आहे. मात्र, त्यांचा या दुकानास विरोध कायम आहे. यामध्ये नावालाच पुढारी असलेल्यांनीदेखील मद्य व्यावसायिकाकडून आर्थिक लाभ घेत आंदोलन मागे घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सातपूर भागातील अनेक ठिकाणी सुरू असलेली अवैद्द दारूची दुकाने उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी बंद करीत कठोर कारवाई केली आहे.

०००


दिंडोरीरोडवरील दुकान पाच दिवस ठेवणार बंद

पंचवटी ः दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर येथील अमित वाइन्स शॉप हे दुकान तातडीने बंद करावे, या मागणीसाठी येथील महिलांनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी या आंदोलकांची म्हसरूळ पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदर वाइन शॉप पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच दिवसांत आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांची यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून त्यावर तोडगा काढावा, असे सांगण्यात आले.

हे वाइन शॉप सुरू झाल्यापासून येथील रहिवाशांनी त्यास विरोध केला आहे. त्यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पंधरा दिवसांपूर्वी निवेदन दिले. त्यानंतर शनिवारी (दि. १५) सायंकाळपासून आंदोलनास सुरूवात केली. येथील दुकानाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी येथील नागरिकांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी त्यांनी दुकानाचे शटर उघडण्यास दुकानदाराला विरोध केला. महिलांचा या दुकानासमोरील ठिय्या सोमवारी दुपारीपर्यंत होता. त्यानंतर बैठक घेण्यात आली या बैठकीत स्थानिक महिलांनी त्यांना दुकानामुळे होणारा त्रास कथन केला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाच दिवस दुकान बंद ठेवण्याचा निर्णय झाला. पाच दिवसांत स्थलांतराविषयी काही कारवाई करता आली नाही, तर सहाव्या दिवशी पुन्हा येथेच दुकान सुरू करण्यात दुकानदाराला काही हरकत नसावी, असे या आंदोलकांना सांगण्यात आले. ही अट त्यांनी मान्य केल्याने पाच दिवसांनंतर या दुकानाविषयीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषधनिर्मिती प्रक्रिया पेटंटकेंद्रित

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

मुख्य पेटंट फाइल करताना प्रयोगाचे पेटंट आणि डेटा सादर करावा लागतो. त्यामुळे औषधनिर्मिती ही प्रक्रिया संपूर्णपणे पेटंटभोवतीच आधारलेली आहे, असे प्रतिपादन पेटंट आणि कॉपीराइट विषयाच्या अभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी केले. ‘कथा औषध आणि पेटंटची’ या विषयावर त्या बोलत होत्या.

जेव्हा इनोव्हेटर औषधांची निर्मिती सुरू असते, तेव्हा प्रचंड प्रमाणात संशोधन आणि प्रयोग केले जातात. सुमारे दहा ते बारा वर्षे एक इनोव्हेटर औषध तयार होण्यास अवधी लागतो. यादरम्यान औषधांच्या मात्रांचा प्राणी, तसेच इतर जिवांवर प्रयोग सुरू असतो, तेव्हा त्या प्रत्येक प्रयोगाचा पेटंट फाइल करणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर या प्रयोगांचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. जेव्हा संपूर्ण प्रयोगप्रक्रिया पूर्ण होऊन औषध विक्रीसाठी तयार होते,असेही त्या म्हणाल्या.

दवप्रभा फिल्म प्रॉडक्शन आणि झेप कला व क्रीडा मंडळ यांच्यातर्फे शिक्षणतज्ज्ञ भावनाताई भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर झेप संस्थेचे संस्थापक गुरुमित बग्गा, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. भार्गवे यांनी प्रास्ताविकात शिक्षणतज्ज्ञ भावनाताई भार्गवे यांच्या जीवनातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याची थोडक्यात माहिती विशद केली. यावेळी डॉ. मृदुला बेळे यांच्या शैक्षणिक कार्यकाळासोबतच पेटंट विषयावरील ज्ञान, फार्मसीचा अभ्यास करताना एलएल.बी., एलएल.एम. करीत आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या यशोगाथेचा आढावा चित्रफितीद्वारे सादर झाला.

जेनेरिक औषधांचे समज-गैरसमज, त्यांचे अर्थकारण, औषधांचे पेटंट आणि कायदे या मुद्यांवर नाशिककरांसमवेत संवाद साधताना डॉ. बेळे म्हणाल्या, कोणतेही औषध तयार होण्यास २.६ बिलियन यूएस डॉलर इतका अवाढव्य खर्च येतो. भारतीय फार्मा कंपन्यांकडे ज्ञान आहे, त्यांनी औषधनिर्मितीत आता जगभरात तिसऱ्या क्रमांकावर स्थान फटकावले आहे. भारतीय पेटंट आणि कायदे यासाठी खूप लाभदायक आहेत. मुख्यत्वे कोणत्याही पेटंटचे वय म्हणजे त्याची मान्यता ही फक्त २० वर्षे असते. जेव्हा तुम्हाला पेटंट दिले जाते, तेव्हाच ते पब्लिक डोमेनमध्ये अपलोड केले जाते. त्यानंतर तुमचा संपूर्ण रिसर्च कोणीही वाचू शकतो. तुमच्या पेटंटची मान्यता संपेपर्यंत हा रिसर्च कोणी वापरू शकत नाही. पण, त्यानंतर मात्र त्याचा वापर करायला सर्वांना परवानगी आहे.

--

औषधांतील फरक केला विशद

डॉ. बेळे यांनी जेनेरिक औषधे व इनोव्हेटर औषधे यातील फरक श्रोत्यांना सांगितला. डॉ. बेळे म्हणाल्या, की जेनेरिक औषधे तयार होण्यास कमी वेळ व खर्च येतो. इनोव्हेटर औषधांप्रमाणेच आमचे औषध असल्याचा रिसर्च आणि डेटा जेनेरिक कंपन्यांना सादर करावा लागतो. त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत कमी असते. पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत आणि फार्मासिस्टच्या अर्थकारणावरही डॉ. बेळे यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या अखेरीस अनेकांनी पेटंट आणि कॉपीराइट तसेच औषधांबाबतीत असलेल्या आपल्या शंकांचे डॉ. बेळे यांच्याकडून निरसन करवून घेतले. नाशिकच्या अनेक मान्यवरांसोबत तरुणाईने या व्याख्यानास हजेरी लावली.

--

...असे मिळते पेटंट

पेटंट म्हणजे संशोधनकर्ता आणि सरकार यांच्यातील करार होय. पेटंट फाइल केल्यावर त्या संशोधनाची गरज, रिसर्च पद्धती, नावीन्य आणि आतापर्यंत कुठेच लिखित, चित्रीत, तसेच इतर कुठल्याही स्वरूपात उपलब्ध नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच पेटंट फाइल करण्याची प्रोसेस सुरू केली जाते. पेटंट मिळण्याची प्रोसेस खूप किचकट असून, प्रत्येक देशाच्या पेटंटचे कायदे वेगळे आहेत. पेटंट मिळवण्यासाठीचा रिसर्च हा नवीन आणि ठोस असणेच गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या सेवासमाप्तीचा निर्णय?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण विभागाने धक्कादायक निर्णय घेत राज्यात २ मे २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या राज्यातील सुमारे २५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. या निर्णयास शिक्षकभारती संघटनेसह शिक्षकांनी विरोध दर्शविला असून, अशा प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांना याचा फटका बसू शकतो.

दोन मे २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या राज्यातील २५०० शिक्षकांवर या निर्णयाचा परिणाम शक्य आहे. या संदर्भात ज्या त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांना सेवासमाप्तीच्या नोटिसा बजावल्याचे शिक्षकभारती या संघटनेने म्हटले आहे. मात्र, या विरोधात संघटितपणे दाद मागण्यात येईल, अशी माहिती शिक्षकभारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.

२००५ नंतरच्या नेमणुकांनाही सरकारने नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २००५ नंतरच्या नेमणुकांची संख्या सुमारे ५० हजारांच्या घरात जाते. सरकारच्या या धोरणांना विरोध दर्शविण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जागोजागी निदर्शने काढण्यात येणार असल्याचीही माहिती संघटनेने दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या नेमणुका चुकीच्या ठरवून त्याबाबत चौकशीही लावण्यात आली आहे.

२०१२ ते २०१५ या तीन वर्षांदरम्यान राज्यात सुमारे ४,३१७ मान्यता शासनाच्या वतीने तपासण्यात आल्या होत्या. या कालावधीत दोन वेळा मान्यतांची तपासणी करण्यात आली होती. यातील १,४९३ मान्यता नियमानुसार असल्याचा अहवाल सरकारला सादर कण्यात आला होता, तर २,८२४ मान्यता या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी दिल्याबाबत सरकारचा आक्षेप होता. यापैकी २५०० मान्यतांच्या सेवेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे वृत्त आहे. यात नाशिकमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने दिलेल्या सुमारे २०० मान्यतांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवरील अतिक्रमणे पोलिसांच्या रडारवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शरणपूररोडसह कॉलेजरोडवरील जवळपास ५० लहान-मोठ्या व्यावसायिक आस्थापनांना शहर वाहतूक शाखेने नोटिसा बजावल्या आहेत. पादचारी मार्गावर केलेले अतिक्रमण, या मार्गाचा केला जाणारा दुरुपयोग याबाबत या नोट‌िसा असून, व्यावसायिकांना यात सुधारणा करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

राजीव गांधीभवन ते कॉलेजरोडवरील भोसला कॉलेज सर्कलपर्यंत हजारो व्यावसायिक आस्थापना आहेत. मात्र, वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने अरूंद रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्यासह अपघाताच्या घटना घडतात. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी संबंध‌ित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. पादचारी मार्ग उंच करणे, त्यावर विविध साहित्य विक्रीस ठेवणे किंवा बोर्ड लावणे असे प्रकार केले जातात. यामुळे पायी चालणाऱ्यांना जागाच मिळत नाही. त्यात अशा व्यावसायिकांकडे येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने पार्क करतात. या वाहनांमुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना फारच कमी जागा उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर आजपासून नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

या व्यावसायिकांना नोटिसा

शहर वाहतूक शाखेने दिवसभरात ५० पेक्षा अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या. यात नंदन स्वीट्स, तनिष्क शोरूम, पीएनजी शोरूम, आडगावकर सराफ, सुराणा ज्वेलर्स, रुपाली अॅनेक्स अशा व्यावसायिकांचा समावेश असल्याचे पोलिस उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले. ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू असून, संबंध‌ितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


बेशिस्त वाहनचालकांना तंबी

दरम्यान, वाहतूक पोलिस निरीक्षक नम्रता देसाई यांनी पथकासह पायी फिरत कॉलेजरोडवर कारवाई केली. रस्त्यावरच पार्क केलेल्या वाहनचालकांना तंबी देत पोलिसांनी जॅमर बसवले. यादरम्यान, वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या हातगाड्या किंवा विक्रेत्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांची त्रेधा उडाली.

कॉलेजरोडवरसह शरणपूररोडवरील पादचारी मार्गावर निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत उद्भवतो. या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावण्यासह थेट कारवाई केली जात आहे. रस्ता मोकाळा असेल तरच वाहतूक सुरळीत होऊ शकते.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही भागात धो धो बरसणारा पाऊस, दिवसाला दहा-वीस टक्क्यांनी वाढणारी धरणांमधील पाणी पातळी, खबरदारी म्हणून धरणांमधून सुरू असलेला हजारो दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग असे सुखावह चित्र जिल्ह्यातील काही भागात असतानाही काही तालुके पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: आसुसलेले आहेत. कधी नव्हे, ते पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. बागलाण, सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड तालुक्यांमध्ये २१ टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी निसर्गाची कृपा आणि अवकृपेचा अनुभव जिल्हावासीय घेत आहेत.

नाशिकसह इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर व इतर काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावत परिसर सुजलाम केला असला तरी काही तालुक्यांमध्ये जुलैमध्येही दुष्काळाची दाहकता अनुभवावी लागत आहे. टंचाई कृती आराखड्याची मुदत ३० जूनपर्यंतच असल्याने एक जुलैपासून जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे खेड्यापाड्यांतील रहिवाशांची तहान शमली असे नाही. त्यानंतरही सातत्याने टँकरची मागणी जिल्हा प्रशासनाकडे होत राहिली. मात्र, भूजल सर्वेक्षण विभागाच्या (जीएसडीए) अहवालाशिवाय टँकर सुरू न करण्याचे सरकारी धोरण असल्याने जिल्हा प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर या धरणांमधील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा व‌िसर्ग सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड आणि बागलाण या तालुक्यांमधील काही गावे आणि वाड्या पाण्यासाठी आसुसल्या आहेत.

६८ गावांमध्ये अद्याप टँकर

भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल मागवण्यात येऊन या तालुक्यांतील ४५ गावे, २३ वाड्या अशा एकूण ६८ गावांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बागलाण तालुक्यातील १४ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. तालुक्यातील खिरमाणी, सारद, राहूड, इजमाने, बहिराणे, देवळाणे, भाक्षी, कातरवेल, नवेगाव, महाड या गावांकडून टँकरची मागणी नोंदविण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने केली पोलखोल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे नव्या रस्त्यांसह सिंहस्थातील दर्जेदार रस्त्यांचीही चाळण झाली. गंगापूर रोडसह शहरांतर्गत रस्ते संततधार पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न आता वाहनधारकांना पडला आहे.

दावा केलेले सिंहस्थातील दर्जेदार रस्ते आणि गेल्या वर्षी १९२ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्याच आठवड्यात पालिकेने या रस्त्यांची डागडुजी केली होती. परंतु पावसाने त्यावर पाणी फिरव‌िल्याने सध्या शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. दरम्यान आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या रस्त्यांच्या कामांचा अहवाल मागवला आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरात कधी जोरदार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. पावसाळी गटार योजना कुचकामी ठरल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवास हा रस्त्यानेच गोदावरी नदीपात्राकडे होत आहे. रस्त्यांवरच पाणी साचल्याने या रस्त्यांची खरी गुणवत्ता समोर आली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने १९२ कोटी रुपये खर्चून रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांचीही अवस्थाही बिकट झाली आहे. त्यांच्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामळे संततधार पावसाने सिंहस्थात तयार केलेल्या रस्त्याची पोलखोल पावसाने केली.

पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः चाळणी झाली आहे. यातून सिंहस्थात तयार झालेले चकचकीत रस्तेही सुटले नाहीत.

वाहतुकीचा बोजवारा

प्रमख चौकांसह जागोजागी खड्डे पडल्याने नाशिककरांना रस्ता कुठे अन खड्डा कुठे, असा प्रश्न पडला. त्यामुळे वाहन चालवणेही अवघड झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. रस्त्यांवरून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हीच का रस्त्यांची गुणवत्ता, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी १९२ कोटींचे रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. परंतु पावसाळ्यात या रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. ठेकेदाराने निविदेच्या अटींप्रमाणे लेयरचे काम अद्यापही पूर्ण केलेले नाही. कुठे एक लेयर टाकला, तर कुठे दुसरा व तिसरा लेयरच टाकलेला नाही. त्यामुळे नवे रस्ते उखडले आहेत. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या रस्त्यांच्या कामांचा सविस्तर अहवाल शहर अभियंत्याकडून मागव‌िला आहे. निविदेतील अटी व शर्ती आणि प्रत्यक्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारांसह अधिकाऱ्यांचाही पोलखोल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मैत्रेय'विरोधात धुळ्यात गुंतवणूकदारांचे आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

'परताव्यासाठी एकजूट-न्यायासाठी वज्रमूठ', 'आता आम्ही थांबणार नाही, तोपर्यंत कष्टाचा पैसा मिळणार नाही', अशा घोषणा देत मैत्रेय कंपनीने विविध उपक्रमात गुंतविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा परत मिळाव्यात या मागणीसाठी सोमवारी (दि. १७) धुळे शहरात मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे मोर्चा काढण्यात आला.

पांझरा चौपाटीपासून हा पायी मोर्चा काढत मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सपकाळ यांच्यासह कंपनीच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. आणि ही आकडेवारी कोट्यवधीचे रुपयांमध्ये आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून गुंतवणूकदारांना कंपनीकडून कोणताही परतावा मिळालेला नाही. प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने अखेर मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व मैत्रेय ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप सिसोदे, नीलेश वाणी, गौतम महाजन यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांना’ तारतेय ‘मटा हेल्पलाइन’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना ‘त्यांनी’ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नुसतेच शिक्षण नाही घेतले, तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर पडण्यासाठी ‘ते’ प्रयत्न करीत आहेत. भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे. त्यासाठी हवी होती आर्थिक मदतीची गरज. ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमांतर्गत त्यांच्यासाठी नाशिककरांना २०११ मध्ये मदतीची हाक देण्यात आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत नाशिकमध्ये प्रथमच असा प्रयत्न झाला. त्याला अभूतपूर्व असे यशही लाभले. ‘मटा’ने दहावी उत्तीर्ण झालेले तीन जण हेरले व त्यांना मदत केली. या मदतीमुळे त्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर होत आहे.

तेजस आमले. वडिलांना पगार दोन हजार रुपये... त्यातही पाचशे रुपये घराचं भाडं जाणार. घराला दहा ठिकाणी ठिगळं लावलेली... तरीही पाणी ठिबकतंच. पुस्तकांसाठी शेजाऱ्यांनी मदत केलेली. घरात अठराविशे दारिद्र्य; पण आभाळाला गवसणी घालण्याची उमेद ठेवणाऱ्या तेजसनं दहावीत नेत्रदीपक गुण मिळवले होते. तो मेकॅनिकल इंजिनीअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या तेजसला यशाची आणखी शिखरं पादाक्रांत करण्यासाठी गरज होती मदतीची. ‘मटा’ने हेल्पलाइनच्या माध्यमातून त्याला साथ दिली.

तेजस शिंदे. वडिलांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय. त्यातून घरात तीन हजार रुपये येतात. त्यातही किराणा, लाइटबिल, घरपट्टी खर्च जाता जाता हाती शिल्लक राहतात ते खुळखुळण्याइतकेच पैसे. घरात लक्ष्मीची अवकृपा असली तरी तेजसच्या बुद्धिमत्तेच्या रूपानं सरस्वतीचे मात्र अगदीच झुकते माप होते. त्याला दहावीच्या परीक्षेत ९२.७३ टक्के गुण होते. डॉक्टर व्हायची इच्छा उरी बाळगून त्याने शिकण्यासाठी कंबर कसली खरी, पण आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याचे शिक्षण पूर्ण होईल का, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला होता. मात्र, ‘मटा’ने हात दिल्याने तो आज डॉक्टर होण्याची उमेद बाळगून आहे.

रोशनी गांगुर्डे. खाणारी तोंडे पंधरा अन् कमावणारे मात्र दोघेच. घरची परिस्थिती बेताची. एकत्र कुटुंब पद्धतीत असल्याने कितीही कमावलं तरी ‘पुराटी’ पडत नाही, अशी सततची ओरड. मात्र, हलाखीच्या काळोखीत रोशनीने तिच्या यशाचा प्रकाश झाकोळू दिला नव्हता. तिने दहावीत चांगले गुण मिळवले होते. कम्प्युटर इंजिनीअर बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला या शाबासकीची आवश्यकता तर होतीच, पण आर्थिक मदतीचीही गरज होती. ‘मटा’ने तिच्यातील स्पार्क ओळखून तिला आर्थिक मदत मिळवून दिली.

नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याचीही तयारी दाखविली होती. कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू, असा हट्ट धरला होता, तर कित्येक कॉलेजांनी या विद्यार्थ्यांना तिन्ही वर्षे मोफत शिकवू, असे सांगितले होते. मात्र, हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातूनच ओढला जावा, असा हेतू नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे पूर्णदेखील झाला. हे ति‌न्ही विद्यार्थी नाशिककरांच्या मदतीमुळे आज चांगले शिक्षण घेत आहेत. मदतीचा ओघ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मटा’ माध्यम झाल्यामुळेच हे सर्व शक्य झाले. ‘मटा हेल्पलाइन’चे हे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आज काहीअंशी तरी आर्थिक विवंचनेपासून दूर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेत महापौरच बॉस!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालिकेत बहुमत मिळाल्यानंतरही पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे आणि समांतर सत्ता केंद्रामुळे भाजपची बदनामी होवून पालिकेतील कारभार भरकटला आहे. वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून, महापौरांना डावलून होणाऱ्या परस्पर बैठका आणि पदाधिकाऱ्यांचे दरबार बंद करण्याचे फर्मान पक्षाने काढले आहेत. पालिकेत महापौरच पक्षाची भूमिका जाहीर करतील, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महापौरच प्रमुख सत्ताकेंद्र असतील.

निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, पालिकेच्या सर्व कारभारावर पालिकेची पकड आहे. परंतु चार महिने उलटूनही पालिकेचा कारभाराला चालना मिळण्याऐवजी पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे आणि परस्पर सत्ताकेंद्र निर्माण झाल्यानेच पालिकेचा कारभार चर्चेला येत आहे. महापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, गटनेता या पाच पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नव्हता. महापौरांना डावलून पदाधिकारी परस्पर अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून निर्देश देत होते. त्यामुळे महापौरही नाराज झाल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र दरबार भरवणे सुरू केले होते.

गेल्या आठवड्यात महापौरांना डावलूनच गाळेधारकांची बैठक घेण्यात आली होती. त्यामुळे महापौरांनी नाराजी व्यक्त केली होती. तर पदाधिकाऱ्यांच्या सूचनांनी पालिकेतील अधिकारीही वैतागले होते. पक्षाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. पाच ही पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, गटनतेा संभाजी मोरुस्कर यांना एकत्र‌ित बसवून त्यांना सबूरीचा सल्ला देण्यात आला आहे. पालिकेत पक्षाची धोरणात्मक निर्णयाची भूमिका महापौरच मांडतील, असे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना समन्वयाने व सर्व सहमतीने काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिकेत महापौरांच्याच शब्दाला महत्त्व राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मायलेकींची झाली भेट

0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

सगळीकडे गो-रक्षक आणि गो-वंश हत्या यावर चर्चा सुरू असताना येथील गो-रक्षकांनी मात्र नुकत्याच जन्मलेल्या वासराची अन् त्याच्या आईची भेट घडवून आणली आहे. या मायलेकींची ताटातूट झाली होती, मात्र गो-रक्षकांनी तत्परता दाखविल्यामुळे ते पुन्हा एकत्र आले आहेत.

येथील विश्व हिंदू परिषदेचे मच्छिंद्र शिर्के यांना गुरुवारी (१३ जुलै) रात्री सिद्धेश दुसाने व विशाल आहिरराव या तरुणांचा फोनवरून मामको हॉस्पिटलनजीक नुकतेच जन्मलेले वासरू सापडल्याची माहिती दिली. शिर्के व त्यांचे सहकारी बहादूर परदेशी, दिनेश चौधरी, भावेश भावसार, नरेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. काही संशयास्पद लोक गाय व वासरू बळजबरीने घेवून जात असल्याची माहितीही त्यांना प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या लोकांना शिर्के आणि त्यांच्या साथीदारांनी हटकले असता त्यांनी तेथून पळ काढला. वासरू तर सापडले होते, मात्र गाय जवळपास कुठेच नसल्याने त्यांनी शोध सुरू केला. थोड्याच वेळात एकात्मता चौकाजवळ ती गाय सापडली. मात्र तिने नुकताच वासराला जन्म दिला असल्याने तिला असह्य वेदना होत होत्या. गो-रक्षकांनी तिच्यावर उपचार करून तटातूट झालेल्या त्या मायलेकींची भेट घडवून आणली. सध्या शिर्के त्या मायलेकींचा सांभाळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ते मद्यदुकान आठ दिवस बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिडके कॉलनीतील हिरा वाइन्ससंदर्भात आठ दिवसांमध्ये लेखी अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी सोमवारी लंबोदर अॅव्हेन्यूमधील रहिवाशांना दिले. या काळात दुकान बंद ठेवण्याची सूचना दुकान मालकाला देण्यात आली आहे.

नवीन तिडके कॉलनीमध्ये हिरा वाइन्स हे दुकान सुरू करण्यास तेथील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दुकान सुरू करण्याच्या मु्द्दयावर व्यावसायिकही ठाम असल्याने हा तिढा सुटण्याऐवजी वाढू लागला आहे. या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि. १७) सुनावणी ठेवण्यात आली होती. लंबोदर अॅव्हेन्यूमधील रहिवाशी आणि वाइन शॉप मालक यांना या सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. तुमच्या आदेशावर तुम्हीच कशी सुनावणी घेणार, असा आक्षेप वकिलांनी घेतला. रहिवाशांच्या वतीने मांडण्यात आलेल्या बाजूचा अहवाल आठवडाभरात सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच या कालावधीत दुकान बंद ठेवण्याची सूचना दुकान मालकाला देण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून ५०० मीटरच्या आतील बाधित वाइन्स आणि बियरशॉपीला स्थलांतरणासाठी परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र, अशी दुकाने सुरू होऊ देण्यास रहिवाशी विरोध करू लागले आहेत. पंचवटीमधील दिंडोरी रोडवरील अमित वाइन्सबाबतदेखील स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुकान बंद करण्याची मागणी केली.

रहिवाशांना मतदानाचा हक्क

लंबोदर अॅव्हेन्यूबरोबरच शहरातील अन्य तीन दुकानांबाबत सध्या वाद सुरू आहे. एखाद्या ठिकाणी बियर अथवा वाइन शॉप नको असेल, तर त्याबाबत त्या परिसरातील नागरिकांचे मतदान घेण्याची तरतूद कायद्यात आहे. नागरिकांनी मतदानातून दुकानांना विरोध दर्शविल्यास दुकानाला परवानगी नाकारता येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहरात तसेच ग्रामीण भागातही रीतसर परवानगी न घेता कोणी वाइन अथवा बियरशॉपी सुरू केल्यास अशा दुकानांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच संबंधिताचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दुकानांच्या तुलनेत घट कमीच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्री बंदीने ७६३ दुकाने बंद झाली आहेत. मात्र, बंद दुकानांच्या संख्येचा विचार करता मद्यविक्रीत झालेली घट कमी आहे. दारूविक्रीचा भार उर्वरीत ३५३ दुकानांवर पडल्यामुळे या दुकानांतून दारूविक्री ६० ते ७० टक्क्यांनी वाढली आहे.

मार्चनंतर जिल्ह्यातील १११६ पैकी तब्बल ७६३ मद्यविक्री दुकाने बंद झाली. चालू असलेल्या ३५३ दुकानांमधील तीन महिन्यांच्या विक्रीचा आकडा ६० ते ७० टक्के वाढलेला असल्याचे समोर येत आहे. सरकारी आकडेवारीवरुन जिल्ह्यात देशी, विदेशी दारू व बिअर विक्रीत घट झाली आहे, तर वाइन विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. १११६ दुकानांमधून जी विक्री होत होती, तीच आता चालू असलेल्या ३५३ दुकानांतून होत असून, त्यात एकूण विक्रीत १० ते २५ टक्के घट झाली आहे. खरेतर हा घटीचा आकडा ७० टक्के हवा होता. पण बंद असलेल्या दुकानांचा भार या दुकानावर पडल्यामुळे ही विक्री कायम आहे. या सरकारी आकड्याबरोबरच अवैध दारू विक्रीचा आकडाही मोठा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दारू दुकाने बंद झाली असली, तरी एकूण विक्रीत घट न झाल्याचे चित्र आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एप्रिल, मे व जूनचे आकडे समोर आले असून, दारु विक्रीत घट झाली असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. २०१६ मध्ये १११६ दुकाने व २०१७ मध्ये ३५३ दुकानांतून विक्री झाल्यानंतर ही घट झालेली आहे. त्याची टक्केवारी तीन महिन्यांची असून ती अल्प आहे.


२०१६ च्या विक्रीच्या तुलनेत घट (टक्केवारीत)

दारुचा प्रकार - एप्रिल - मे - जून

देशी - १७.१६ - १२ - ६.४२

विदेशी ३०.४६ - १६.३६ -१८.५४

बिअर - ३८.७५ -२७ - ३६.२९

वाईन - +१२.४५ - १३- १५.८९



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी विरोधात काढणार मुंबईत मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला आता चांगलाच विरोध होवू लागला आहे. येत्या अधिवेशन काळात मुंबईत मंत्रालयावर थेट मोर्चा काढण्याचा निणर्य सोमवारी नाशिक येथे झालेल्या समृद्धीबाधीत शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या या मेळाव्यात सहा ठरावांना मंजुरी देण्यात आली.

नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात समृद्धीबाधीत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष्‍ा तुकाराम भस्मे, बबन हरणे, राजू देसले, भाऊ मांडे, डॉ. राम बाहेती, भाऊसाहेब शिंदे, डी. एस. मोरे, प्रल्हाद पोळेकर, अॅड. रतनकुमार इचम, वैशाली महिस्कर, प्रशांत वाडेकर आदींसह विविध जिल्ह्यातून सहभागी झालेले समृद्धीबाधीत शेतकरी उपस्थित होते.

मुंबई-नागपूर हा समृद्धी मार्ग नसून शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा मार्ग आहे. या मार्गासाठी शेतकऱ्यांचा विराध असून, सरकार शेतकऱ्यांशी संवादच साधत नसल्याचा आरोप करण्यात आला. हा मार्ग जाणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यावर त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध म्हणून शेकडो हरकती घेतल्या असल्या तरीही सरकारने त्याची अजूनही दखल घतलेली नाही, असा अरोप करण्यात आला.

या मार्गासाठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकऱ्यांवर दडपण आणून जमिनी हस्तांतरीत करून घेत आहेत. या मार्गाचे काम पाहणाऱ्या एमएसआरडी या कार्यालयातील दहा ते बारा अधिकारी हे भ्रष्ट असल्याचाही आरोप मेळाव्यात करण्यात आला. या मार्गाची जबाबदारी असलेले राधेश्याम मोपलवार हे तेलगी घोटाळ्यातील आरोपी असून, त्याबाबतच्या तक्रारी पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आल्या असल्याचे कागदपत्र यावेळी दाखविण्यात आले. तसेच धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनीही या व्यक्तीविरोधात तक्रार दिली असल्याचे सांगण्यात आले.

अधिकारी भ्रष्ट

समृद्धीचे काम पाहणारे मुख्य अधिकारी राधेश्याम मोपलवार हे भ्रष्ट असून, त्यांच्या विरोधात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून काहीही उपयोग झाला नसल्याचा आरोप सतिष मांगले यांनी केला आहे. बैठकीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा स्वच्छतेसाठी ‘एनएसई’चा पुढाकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) सामाजिक उत्तरदायित्व या उपक्रमाअंतर्गत फिनिश सोसायटी या संस्थेने नाशिकमधील नऊ शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा पुरविल्या आहेत. यात स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, हात धुण्याचे युनिट, स्वच्छ पाण्यासाठी ‘आरओ’ तसेच थंड पाण्यासाठी कूलर आदिंचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्वच्छ व आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमध्ये स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधांअभावी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, तसेच त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी या सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. याशिवाय, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करावे यासाठी संस्थेकडून ‘एमराल्ड पार्क’ येथे एक दिवसाचे शिक्षक प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये शिक्षक, शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशा ६५ व्यक्त‌िंनी सहभाग घेतला होता. या नऊ शाळांमधून एका स्मार्ट स्कूलची निवड करण्यात येणार आहे. या निवडपद्धतीवरही यावेळी चर्चा करण्यात आली. विधिज्ञ राजेश हिवरे यांनी शिक्षकांच्या नेतृत्वाचा विकास व्हावा यासाठी फिल्म, खेळ, गटचर्चा आदींचे आयोजन केले होते. फिनिश सोसायटीचे अमोल नेमणार, प्राजक्ता चव्हाण, पूजा झुबरे, आशुतोष अग्रवाल आदीं यावेळी उपस्थित होते.

स्वच्छतेविषयी मार्गदर्शन

स्वच्छतेच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक शौचालय याचा वापर कसा करावा या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. स्त्री-पुरुषांच्या पौगंडावस्थेमध्ये शरीरात होणारे बदल व शारीरिक स्वच्छता, अन्न-पाण्याची स्वच्छता यावर पावरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. तसेच अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात त्याचा विद्यार्थ्यांच्या वाढीवर आणि कार्यक्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो. हे आजार होऊ नये, यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, स्मार्ट स्कूल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.


या शाळांचा सहभाग

धोंडेगाव, गिरणारे जिल्हा परिषद शाळा, श्रीराम विद्यालय पंचवटी, गांधीनगर शाळा, महादेवपूर, अभयवाडी जिल्हा परिषद शाळा आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरांचे स्मृतिस्तंभ उभारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गडकिल्ल्यांवर व त्या परिसरात इतिहासातील पराक्रमी शूरवीरांच्या बलिदानाचे कुठलेही स्मारक किंवा स्मृतिस्तंभ नाहीत. यासंदर्भात तातडीने लक्ष घालून ऐतिहासिक घटनांचे, पराक्रमी शूरवीरांचे स्मृतिस्तंभ उभारावेत, असे साकडे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालण्यात आले. यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांसाठीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना नुकतेच देण्यात आले.

नाशिक जिल्ह्याला लाभलेल्या सह्याद्री, सातपुडा, सातमाळा पर्वतरांगेत साठहून अधिक उत्तुंग ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. आजपर्यंत शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्त्व, वन, पर्यटन विभाग सामाजिक पातळीवर गडकिल्ल्यांची कायमच उपेक्षा झाली आहे. या दुर्लक्षित गडकिल्ल्यांची दुरवस्था झाल्याने या किल्ल्यांवरील ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक संदर्भाचा विसर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर पराक्रमी शूरवीरांचे कोणतेही स्मारक अथवा त्यांचा स्मृतिस्तंभ नाही, याकडे निवेदनातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.

मोहिमांमध्ये आढळल्या उणिवा

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था २०१२ पासून नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी श्रमदानाच्या मोहिमा काढून गडकोट संवर्धन व दुर्गजागृती अभियान राबवीत आहे. संस्थेच्या वतीने आजपर्यंत ४९ दुर्गसंवर्धन मोहिमा नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर झाल्या. दुर्गसंवर्धन कार्यात विविध कामे श्रमदानातून सुरू आहेत. मोहिमेत विविध क्षेत्रांतील अभ्यासक आहेत. या मोहिमांतील अभ्यासानुसार नाशिकच्या गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, असे संस्थेचे निरीक्षण आहे. स्थानिक प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याची स्थिती आहे. याकामी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था राज्य शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीशी सतत पत्रव्यवहार करीत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देताना शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, निमंत्रक प्रा. सोमनाथ मुठाळ, मानद सल्लागार संदीप भानोसे, आर. आर. कुलकर्णी, कृष्णचंद्र विसपुते आदी उपस्थित होते.

--

या ठिकाणी आहे गरज

नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ले रामशेज किल्ल्यावर शंभू महाराजांच्या काळात सहा वर्षे झालेल्या अजिंक्य लढ्याचे कुठलाही स्मृतिस्तंभ, स्मारक नाही. सातमाळा पर्वतरांगेत किल्ले कांचन-मंचनला लागून असलेल्या कांचनबारीत सुरतेहून परतत असताना छत्रपती शिवराय व दाऊद खानच्या मोगली सैन्यात घमासान लढाई झाली. या अजिंक्य लढाईचे कांचनबारीत कुठलेही स्मारक नाही. सातमाळा पर्वतरांगेत असलेल्या किल्ले कन्हेरागडाच्या अजिंक्य लढ्यात शिवकालीन किल्लेदार रामजी पांगेरा या शूराने अवघ्या ७०० मावळ्यांसह दिलेरखानच्या हजारोंच्या फौजेला पहाटेच्या प्रहरात दिलेली निकराची झुंज अन् या लढाईत रामजी पांगेरा धारातीर्थी पडल्याचे संदर्भ इतिहासात क्वचित आढळतात. या लढ्याचा कुठलाही स्मृतिस्तंभ किल्ले कान्हेर गडावर अथवा पायथ्याला नाही. या ठिकाणी स्मृतिस्तंभ असावेत, ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांमुळे रस्त्यांची ‘वाट’

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात पंचवटी परिसरातील रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्यात आला होता. मात्र, ही कामे किती निकृष्ट दर्जाची आहेत हे आता उघड होत असून, यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पंचवटीतील रस्त्यांची अक्षरशः वाट लागल्याचे दिसून येत आहे. पंचवटीतील चौकांच्या भागात प्रचंड खड्डे पडल्याने तेथून वाहन चालविणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे ठरत आहे.

जुना आडगाव नाक्याच्या चौफुलीवर आणि दिंडोरी नाक्याजवळील भडक दरवाजा भागात रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आलेले आहेत. हे पेव्हर ब्लॉक सततच्या रहदारीमुळे फुटले आहेत, काही रस्त्यात गाडले गेले आहेत. त्यामुळे येथे खड्डे तयार झाले आहेत. या चौकांच्या भागातून वाहने चालविणे अत्यंत खडतर बनले आहे. फूटपाथवर टाकण्यात येणारे पेव्हर ब्लॉक रस्त्यावर का टाकले जातात, हा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. या पेव्हर ब्लॉकमुळे पडलेले खड्डे वाचवून वाहन चालविताना दुसऱ्या वाहनांवर आदळण्याचे प्रकार होऊन या परिसरात किरकोळ अपघातांत वाढ झाली आहे.

नवीन आडगाव नाका परिसरातील बस स्थानकासमोरच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यावर वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा खड्ड्यांमध्ये जोराने वाहने आदळत आहेत. खड्ड्यांतील पाणी जवळ बस स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांवर, पादचारी, अन्य वाहनचालक व विद्यार्थ्यांवर उडत असून, त्यामुळे वादावादीचे प्रकारही होत आहेत. येथे अपघातही वाढले आहेत.

निमाणी बस स्थानकाच्या समोर मोठे खड्डे पडलेले होते. ते बुजविण्याचा सोपस्कार केला असला, तरी तो तात्पुरता असल्याने येथे पुन्हा खड्डे पडण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादरोडवर दुभाजकांच्याजवळ पाणी साचणाऱ्या भागात खड्डे पडू लागले आहेत. हे खड्डे त्वरित बुजविले नाहीत, तर येथील अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

--

या रस्त्यांवर पडलेत खड्डे

मुंबई-आग्रा महामार्ग, औरंगाबादरोड यांसारख्या मुख्य रस्त्यांबरोबरच नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका, निमाणी बस स्थानकासमोरील रस्ता, दिंडोरी नाक्याजवळील चौक, गंगाघाट रस्ता, तसेच उड्डाणपुलावरील रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धोकादायक रस्त्यांना स्ट्रीट डिझायनरचा आधार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात जवळपास दोन हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे असले, तरी या रस्त्यांची निर्मिती शास्रोक्त पद्धतीने झाली नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठे आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची वळणे, चौक, सिग्नल्स धोकादायक असून, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने ते सोयीचे नाहीत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांचा शास्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रस्त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी अत्यावश्यक सूचना करण्यासाठी स्ट्रीट डिझायनरची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवण्यात आला आहे. संबंधित डिझायनर रस्त्यांचा अभ्यास करून त्यात आ‍वश्यक ते बदल करण्याच्या सूचना करणार असून, त्यानुसार रस्त्यांमध्ये बदल केले जाणार आहेत.

महापालिका हद्दीत सध्या लहान-मोठे जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असले, तरी अनेक रस्त्यांची निर्मिती पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे. जुने रस्ते रुंद आहेत, तर नवीन रस्त्यांची रचनाही वाहतुकीसाठी योग्य नाही. रस्ते तयार करताना धोकादायक वळण, चौक यांचा अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. प्रमुख रस्त्यांवर वाहन चालविताना कुठून कोण येईल, याचा अंदाज नसतो. त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. अनेक ठिकाणी सिग्नल्स चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. शहर वाहतुकीत सुसूत्रता नसल्याने वाहतूक आणि पार्किंगचीही समस्या निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने स्ट्रीट डिझायनर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहर वाहतुक सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास स्ट्रीट डिझायनरमार्फत केला जाणार आहे. दिल्ली, मुंबईच्या धर्तीवर कन्सल्टंट कंपनीकडून स्ट्रीट डिझायनिंगचे काम केले जाणार आहे. संबधित डिझायनर शहरातील प्रमुख रस्त्यांचा अभ्यास करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करणार आहे. रस्त्यांमधील त्रुटी, धोकादायक वळणे, चुकीच्या ठिकाणी तयार केलेले सिग्नल, चौकांचे नियोजन या संदर्भात आवश्यक सूचना महापालिकेला करणार आहे. त्यामुळे महापालिकेला या रस्त्यांचे शास्रोक्त पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला असून, त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अपघातमुक्त होऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली जाणार आहे.

प्रकल्पांसाठी कन्सल्टंट

रस्त्यांच्या नियोजनासोबत महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांसाठी कन्सल्टंट नियुक्त केला जाणार आहे. दादासाहेब फाळके, पेलिकन पार्क, तारांगण, नेहरू उद्यान यांसारखे बडे प्रकल्प पालिकेसाठी डोईजड झाले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकल्प पीपीपीच्या धर्तीवर खासगी कंपन्यांना देण्याचा विचार पालिका करीत आहे. त्यासाठी पालिकेने आता कन्सल्टंट नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा प्रस्ताव येत्या (२० जुलै) महासभेत ठेवण्यात येणार आहे. कन्सल्टंट कंपनी या प्रकल्पांचा सविस्तर डीपीआर तयार करून पालिकेला सादर करणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचाही वनवास कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने एकाचा बळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिनाभराच्या शांततेनंतर जिल्ह्यात पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील एक रुग्ण स्वाइन फ्लूने दगावला असून, अन्य तीन जणांवर सिव्हिलमधील विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. या वर्षात आतापर्यंत ३६ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

कैलास गणत टाकळकर (वय ३६, रा. निफाड) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूसदृश आजाराचे दोन रुग्ण १० जुलैदरम्यान दाखल झाले होते. पैकी टाकळकर यांचा उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. त्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चालू वर्षात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे १६८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर जिल्ह्यात ३६ पेक्षा अधिक रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. बळी गेलेल्यांमध्ये नाशिक शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने निफाड, सिन्नर, बागलाण, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांतील रुग्णांची संख्या अधिक आहे.

वर्षभरात सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने आदी ठिकाणी मिळून ५४ हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची चाचणी करण्यात आली आहे. पैकी १ हजार ४२१ रुग्णांना टॅमी फ्लू गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगीतले. जिल्ह्यामध्ये मागील महिनाभरापासून कमी होत जाऊन स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पूर्ण बंद झाला होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेला स्वाइन फ्लू कक्षही काही दिवसांपासून बंद होता. मात्र मागील आठवड्यापासून पुन्हा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृगात बरसला, नंतर रुसला

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला. मात्र, बागलाण, मालेगाव तालुक्यासह देवळा तालुक्यातील काही भागाकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे या तीन तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. बागलाण तालुक्यात तर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

जूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावणाऱ्या वरूण राजाने बागलाण तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. दिवसदिवसभर केवळ ढगाळ वातावरण असल्यामुळे कधी एकदाचा पाऊस पडतो, याकडे तालुक्यातील बळीराजाचे लक्ष आहे. महागाचे बियाणे खरेदी करून ते डोळ्यांदेखत वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

तालुक्यातील खरिपाचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ३०८ हेक्टर असतांना यंदा जेमतेम ५६.१५ टक्के म्हणजेच ४० हजार ५९८.५० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. १० जुलैअखेर पर्यंत तालुक्यात अवघ्या ११९ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेने अत्यंत तोकडे आहे. तालुक्यात तब्बल महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुरुवात दमदार, नंतर ओढ

बागलाण तालुक्यात यंदा मृग नक्षत्रापासून सलग दोन ते तीन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यानंतर अधूनमधून एकखादी सर हजेरी जावून जाते. गतवर्षाच्या अनुभवावरून शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसानंतर पेरणी केली. महागडे बियाणे खरेदी करून शेतीची कामे सुरू केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतीची कामे थंडावली आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी आहे, त्यांनी ठिबकने पणी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती नाजूक आहे. दुष्काळाची दाहकता अनुभवलेल्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात पेरणी झाली, मात्र पावसाने पाठ दाखविल्याने त्यांचे स्वप्न भंगते की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

खतांचा साठा पडून

तालुक्यातील सर्वच शेतकरी दुबारच्या संकटामुळे नाराज झाले आहेत. बी-बियाणे विक्रेत्यांनी तर मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवला आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकरीही खतांची खरेदी करताना विचार करीत आहेत. त्यामुळे व्यापारीही संकटात सापडले आहेत. गतवर्षी जून तालुक्यात ११४ मि.मी. इतका पाऊस झाला होता. तर जून अखेर केवळ ८४ मि.मी पाऊस झाला आहे. १० जुलैअखेर यात अवघी पाच मि.मी इतकी वाढ झाली आहे. यंदाच्या पावसात सातत्य नसल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील हरणबारी, केळझर या धरणांतही पाणीसाठा नगण्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोझमेर्टा’चे शटर अखेर डाऊन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनातील तांत्रिक दोष शोधणाऱ्या ऑटोमॅट‌िक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरचे (एव्हीइएस) काम पाहणाऱ्या रोझमेर्टा कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. यापुढे हे सेंटर प्रादेश‌िक परिवहन विभागाच्या अधिपत्याखाली सुरू राहणार आहे. यासाठी एसटी महामंडळाचे पाच चालक आणि पाच मेकॅनिक आरटीओत वर्ग करण्यात आले आहेत.

प्रादेश‌िक परिवहन विभागातील (आरटीओ) पाच एकर जागेत हा प्रकल्प साकारला गेला आहे. जून २०१५मध्ये हे सेंटर सुरू झाले. वाहनांच्या फिटनेस टेस्टची स्वयंचलित पद्धतीने तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने एव्हीईएस यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच हे केंद्र वाहनचालकांकडून लक्ष्य करण्यात आले. अगदी किरकोळ दोषही तपासणीत समोर आल्याने शेकडो वाहने फेल होऊ लागली. यातून वाहनचालक आणि एजंटांनी हे केंद्र बंद करण्याची मागणी सुरू केली. हा वाद वाढल्याने वाहनचालकांनी केंद्रच बंद पाडून तेथे तोडफोडदेखील केली. यामुळे केंद्र सुरू झाल्यानंतर काही दिवसांपुरते बंद करण्यात आले. आरटीओनेही सोयीने कधी वाहनचालकांना सोबत घेतले तर कधी कंपनीच्या संचालकांना. यामुळे काही महिन्यांपासून फार वाद न होता तसेच अगदीच किरकोळ दुरुस्त्यांकडे दुर्लक्ष करून कामकाज करण्यात आले. रोझमेर्टा कंपनीचा करार जुलै २०१७पर्यंत होता. तो आता संपुष्टात आला असून, यापुढे तपासणीसह सर्टिफिकेट देण्याचे काम आरटीओमार्फत सुरू राहणार आहे. यासाठी आरटीओने एसटी महामंडळाचे पाच बसचालक तसेच पाच मेकॅनिक वर्ग करून घेतले आहेत. या दहा कर्मचाऱ्यांसह आरटीओचे सहा अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. रोझमेर्टा कंपनीने याच कामासाठी ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

सर्टिफिकेट्साठी वाद

हेडलाईटसचा कमी प्रकाश, वायफर नसणे, वाहनांचे स्ट्रक्चर, ब्रेकिंग सिस्टिम, टायर, वेट बॅलन्सिंग येथपासून मशिन्समधील अगदी छोट्या परंतु दुर्लक्षीत केलेल्या बिघाडांमुळे वाहनांचा अपघात होऊ शकतो. या सेंटरमध्ये हेच काम चालते. वाहनाची स्थिती चालण्यासारखी नसली तरी वाहनचालकास फिटनेस सर्टिफिकेट हवे असते. अगदी हेडलाईटस नसलेली वाहने पात्र करून घेण्यासाठी सेंटरमध्ये वाद झाल्याचे अनेक किस्से आहेत. एव्हीईएस स्थापन करण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) सहकार्याने हाती घेतले होते. सार्वजनिक-खासगी सहभाग तत्वावर (पीपीपी) उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये नियमांची मोडतोड न करता पारदर्शक काम झाले, तरच या योजनेचा खरा फायदा होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या व्हा ‘कल्चर क्लब’चे सदस्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सतर्फे वाचकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यातीलच एक ‘कल्चर कल्ब’ होय. या माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रमांची संधी वाचकांना ‘मटा’ने उपलब्ध करुन दिली आहे. ‘कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी मटाने वाचकांना घरबसल्या उपलब्ध करून दिली आहे. मटा कल्चर क्लबचे फॉर्म वाचकांना घरबसल्या मिळणार आहेत.

मटा कल्चर क्लबतर्फे सातत्याने विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहानांपसून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाचा हवाहवासा वाटणारा ‘हॅप्पी स्ट्रीट’ असो वा तरुणींसाठी ‘श्रावण क्विन’ असो. त्याला तुमच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळालाय. मराठी संस्कृतीशी जोडलेली नाटकं असोत किंवा वेस्टर्न झुम्बा डान्स, खाऊचा डब्बा. अशा विविध कार्यशाळा ‘मटा’ने आजवर आयोजित केल्या आहेत. कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किटी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निव्हल, सहल, मँगो फेस्टिव्हल, नवरंग नवरात्रीचे, मंगळागौर, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा लाभ सदस्यांना वर्षभर घेता येतो. तसेच वाचकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘मटा कल्चर क्लब’तर्फे व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात येते. नाटकांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा. हे सदस्यत्व तुम्हाला घरबसल्या घेता येईल.


सदस्य होण्यासाठी हे करा..

तुम्हाला तुमच्या घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करा. चेकच्या मागे तुमचं नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. हा चेक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images