Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हेल्मेटसाठी चिमुरड्यांची साद

$
0
0

इस्पॅलियरमध्ये हेल्मेट, सीटबेल्टसंदर्भात प्रबोधन

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

घरामध्ये आईबाबांच्या हेल्मेटवर रस्ता सुरक्षेसंदर्भातील स्टिकर चिकटविण्यापासून तर रस्त्यावर उतरून नाटिका, अभिनय आणि संगीत सादरीकरणासारख्या विविध उपक्रमांमधून मंगळवारी (दि. १८) पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी नागरिकांना हेल्मेट घालणे आणि सीट बेल्ट लावण्यासंदर्भात प्रबोधन केले. निमित्त होते इस्पॅलियर स्कूलच्या वतीने आयोजित हेल्मेट जागृती विषयक सामाजिक उपक्रमाचे.

त्रिमूर्ती चौक परिसरात या विद्यार्थ्यांनी नागरिकांना रस्ता सुरक्षेचा संदेश दहा प्रयोगांच्या माध्यमातून दिला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. या प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांनी मुलांनी हेल्मेट घातलेल्या कुटुंबाचे वर्कशीट रंगविले. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नियमांचे वर्कशीट अभ्यासातून सोडविले. यासाठी खास शिक्षकांनी वर्कशीट बनवून घेतले होते. इयत्ता तिसरी आणि पाचवीच्या मुलांनी आई वडिलांना रस्ता सुरक्षा या विषयावर पत्र लिहिले. हे पत्र आता टपाल पेटीत टाकण्यात आले असून लवकरच त्यांच्या पालकांना ते मिळणार आहे. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह यू फॉर वेअरिंग हेल्मेट’असा संदेश असणारे स्टिकर्स विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या हेल्मेटला चिकटवले.

सहावीच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट जनजागृती या विषयावर नृत्य सादर केले. पाचवीच्या मुलांनी अपघात होऊ नये यासाठी ट्रॅफिक नियमांच्या आधारावर नाटिका सादर केली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापर आणि नो हॉर्न यासाठी प्लास्टिकच्या डस्टबीनपासून रॉकबॅन्डचे सादरीकरण केले. डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एव्हरी डे, नो-हॉर्न डे या उपक्रमावरही गीत सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पालिकेतील निर्णय एकमतानेच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील वादावर शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी पडदा टाकला आहे. पालिकेतील सर्व निर्णय हे एकमतानेच होत असल्याचा दावा सानप यांनी केला आहे. पालिकेत नवीन नगरसेवक मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. त्यामुळे कामांसाठी त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना साकडे घालण्यास सुरूवात केली आहे. परंतु पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही असमन्वय नाही. गैरसमजूतीतून काही प्रकार झाला असला, तरी सर्व निर्णय हे पदाधिकारी एकमतानेच घेत असल्याची पुष्टी त्यांनी दिली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वाद निर्माण झाला होता. विविध पदाधिकारी स्वतंत्र दरबार भरवत असल्याने महापौर रंजना भानसी नाराज झाल्या होत्या. त्यावरुन भाजपमध्ये नवा वाद सुरू झाला होता. पालिकेत सत्ता येवून चार महिने झाले तरी विकासकामांना गती मिळत नसल्यामळे नगरसेवक सैरभैर झाले होते. त्यामुळे त्यांनी अनुभवी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरूवात केली होती. त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. हा वाद पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहचला होता. जिल्हा संघटनमंत्री किशोर काळकर, माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी मंगळवारी पालिकेत येवून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पालिकेतील पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देण्यात आल्यात. महापालिकेत भाजपची सत्ता आल्याने नागरिकांच्या विश्वासाला तडा जावू देवू नका, असा सल्ला भूसारी आणि काळकर यांनी दिला.

नव नगरसेवकांचा अभ्यास वर्ग

येत्या २० जुलैला महासभा आहे. भाजपमध्ये अनेक नगरसेवक नवखे आहेत. अभ्यासू नगरसेवकांची कमतरता असल्याने भाजपला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विरोधक हे अभ्यासपूर्ण असल्याने महासभेत पक्षाची भूमिका योग्य रितीने मांडली जात नाही. म्हणून मंगळवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा अभ्यास वर्ग घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानाविरोधात महिलांचा पुन्हा ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आरटीओ कॉर्नरवरील अमित वाइन्स हे दारूचे दुकान पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि. १७) बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास या दुकानाचे शटर उघडल्याचे येथील महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्या संतप्त झाल्या व त्यांनी दुकानासमोर पुन्हा ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. दुकानाकडे जाणारा ग्राहकांचा मार्गच या महिलांनी ठिय्या देऊन बंद पाडला.

शनिवार (दि. १५) सायंकाळपासून या दारू दुकानासमोर महिलांनी आंदोलनास सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशीही स्थानिक महिलांनी दारू दुकान उघडण्यास विरोध केला होता. दुकानासमोर खुर्चीवर गणेशाची मूर्ती ठेवून भजन-गायन, थाळीनाद, घोषणाबाजी करण्यात आली. सोमवारी सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी या आंदोलक महिलांशी चर्चा केली. पुढील पाच दिवस हे दुकान बंद ठेवण्यात यावे, या पाच दिवसांच्या कालावधीत येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तोडगा काढावा, पाच दिवसांत तोडगा निघाला नाही, तर सहाव्या दिवशी दुकान सुरू करण्यास काही हरकत नसावी, असे ठरविण्यात आले. मात्र, तरीही मंगळवारी दिवशी हे दारू दुकान उघडण्यात आल्याने महिलांनी या दुकानासमोर ठिय्या देत ग्राहकांचा मार्गच अडविला. यावेळी महिला पोलिसांनी त्यांना म्हसरूळ पोलिस ठाण्यात या, तेथे या विषयावर चर्चा करू, असे सांगितले. मात्र, या महिलांनी आंदोलनाची जागा सोडली नाही. त्यामुळे ग्राहकांचीही दुकानाकडे येण्याची हिंमत झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब’चे घरबसल्या व्हा सदस्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सतर्फे वाचकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. कल्चर क्लब त्यातीलच एक असून, या माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रमांची संधी वाचकांना ‘मटा’ने उपलब्ध करून दिली आहे. अशा बहुढंगी ‘कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी ‘मटा’ने वाचकांना घरबसल्या उपलब्ध करून दिली आहे. मटा कल्चर क्लबचे फॉर्म वाचकांना घरबसल्या मिळणार आहेत.

मटा कल्चर क्लबतर्फे सातत्याने विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहानांपसून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा ‘हॅप्पी स्ट्रीट’ असो वा तरुणींसाठी ‘श्रावण क्वीन’ असो, त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मराठी संस्कृतीशी जोडलेली नाटके असोत किंवा वेस्टर्न झुम्बा डान्स, खाऊचा डबा, अशा विविध कार्यशाळा ‘मटा’ने आजवर आयोजित केल्या आहेत. कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, किटी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निव्हल, सहल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा लाभ सदस्यांना वर्षभर घेता येतो. वाचकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात येते. नाटकांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. त्यासाठी आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा. हे सदस्यत्व घरबसल्या घेता येईल. आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधून सदस्य व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.


सदस्य होण्यासाठी हे करा...

तुम्हाला तुमच्या घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करा. चेकच्या मागे तुमचे नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. हा चेक क्लीअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. त्यामुळे आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्या!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलिम्पिकसाठी खेळाडूंनी माहिती द्यावी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी सहभागी होऊन प्राविण्य मिळविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राज्याचा ऑलिम्पिक व्हिजन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय प्राविण्यप्राप्त सर्व गटांतील खेळाडूंनी आपली वैयक्तिक व खेळाबाबतची माहिती शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रीडा विभागामार्फत सन २०२०, २०२४, २०२८ व २०३२ या वर्षांत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी राज्याचा ऑलिम्पिक व्हिजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी खेळाडूंनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील https://goo.gl/GNcsBN या लिंकवर जाऊन माहिती भरावी, असे आवाहन क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी केले आहे. राज्यातील सर्व गटांतील प्राविण्यप्राप्त खेळाडू, पालक, शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळे, त्यांचे प्रशिक्षक यांनी वरील संकेतस्थळावरील लिंकवर जाऊन माहिती भरून सदर माहितीची एक प्रत संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे आपल्या छायाचित्रासह जमा करावी.

सन २०१६-१७ मधील सर्व गटांच्या खेळनिहाय, शालेय राष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा, अख‌िल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांतील प्रथम, व्दित‌ीय व तृतीय क्रमांकाचे खेळाडू, शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्पर्धा व वर्ल्ड विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांतील प्रथम, व्दितीय, तृतीय व सहभागी खेळाडू तसेच दिव्यांग खेळाडूंनी (पॅरा गेम्स- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) आपल्या कामग‌िरीची माहिती संकेतस्थळावरील विहित अर्जात देण्यात आलेल्या खेळ प्रकारानुसार भरण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे. याबाबत काही शंका असल्यास संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही डॉ. दुबळे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक दरावरून पानेवाडीत संप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पानेवाडी येथील भारत पेट्रोलिअम कंपनीने वाहतूक दराची निविदा काढताना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच नवीन दर मान्य नसल्यामुळे माल वाहतुकदारांनी सोमवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. या संपात तब्बल ४०० टँकरधारक सहभागी झाले आहेत. संपामुळे राज्यातील विविध राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

पानेवाडी येथील भारत पेट्रोलिअम कंपनी व पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे माल वाहतूकदार यांच्यात वाहतूक दरावरून संघर्ष सुरू आहे. गेल्या आठवड्यातही वाहतूकदार संपावर गेले होते. मात्र दराबद्दल आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला होता. सोमवारी कंपनी प्रशासनाने नवे दर निश्चित केले. हे दर कमी असून कंपनी प्रशासनाने विश्वासात न घेता दर निश्चित केल्याचा आरोप माल वाहतूकदार संघटनेचे नाना पाटील, संजय पांडे, सचिन गवळी यांनी केला आहे. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून संप सुरू पुकारण्यात आला. या संपात ४०० टँकरधारक सहभागी झाले आहेत. मंगळवारी पानेवाडीतून एकही टँकर बाहेर गेला नाही.

बैठक निष्फळ

दरम्यान, मुंबई येथून पानेवाडी येथे दाखल झालेले कंपनीचे अधिकारी विनोदकुमार व नरसिंहन यांनी मंगळवारी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र वाहतूक दरावर एकमत न झाल्याने बोलणी फिसकटली. कंपनी वाहतूक दर कमी देणार असल्यामुळे संप पुकारल्याचे नाना पाटील, सचिन गवळी, संजय पांडे यांनी सांगितले.

दराचा वाद कायम

सध्या कंपनी वाहतूक दर प्रती किलोमीटर २ रुपये ३० पैसे देत आहे. त्यात वाढ करायचे सोडून कंपनी नव्या निविदेप्रमाणे प्रती किलोमीटर २ रुपये १६ दर पैसे देणार असल्याचे, माल वाहतूकदारांचे म्हणणे आहे. हे दर मान्य नसल्याने दर वाढवून मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपातावर अॅपद्वारे नजर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्भपातासाठी उपयोगी असलेल्या औषधी गोळ्यांचे आता पूर्ण ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यासाठी पालिका अॅप तयार करीत असून, त्याद्वारे कंपनी ते वितरकापर्यंतचा औषधी गोळ्यांचा हिशेब ठेवला जाणार आहे. त्यामुळे गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर टळणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.

स्रीरोग तलज्ज्ञांच्या शिफारशीशिवाय गर्भपातचे औषधी आता दिल्या जाणार नसून, त्याचीही माहिती पालिकेला देणे बंधनकारक केले जाणार आहे.

अवैध गर्भपातासाठी व स्री भ्रुण हत्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी शिवायच गर्भापाताच्य औषधांचा वापर केला जातो. स्रीरोग तज्ज्ञ आणि औषधी वितरक हे या गोळ्या परस्पर देत असल्याने गर्भापाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने गर्भापाताच्या औषधींचा अनधिकृत वापर रडारवर घेतला आहे. त्यासाठी अॅप विकस‌ित केले जात असून, या अॅपद्वारे उत्पादक कंपनी ते वितरकांपर्यंतचा दररोजचा हिशेब ठेवला जाणार आहे. गर्भपाताच्या औषधांचे डेली मॉन‌िटरिंग केले जाणार असल्याची माहिती डॉ. डेकाटे यांनी दिली आहे.

रेकॉर्ड ठेवणार

शहरातील सर्व मेडिकल स्टोअर्स आणि स्री रोग तज्ज्ञांची नोंदणी या अॅपवर केली जाणार आहे. त्यांच्यांकडून वापरल्या जाणाऱ्या डे टू डे गर्भपाताच्या औषधांची नोंदणी होवून त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्याचा तपशील पालिकेकडे मिळणार आहे. त्यामुळे मेडिकल स्टोअर्ससह डॉक्टरांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

असे चालणार अॅप

स्री रोग तज्ज्ञाने गोळ्या दिल्यानंतर त्यांची अॅपवर नोंद करावी लागणार.

वितरकालाही स्टॉकचा डेली रिपोर्ट वैद्यकीय विभागाला सादर करावा लागणार.

आपल्या रुग्णांसाठी डॉक्टरांना प्रथम अॅपवर नोंदणी करावी लागणार

औषधी कुठून घेतली, त्याचा वापर कशासाठी हवा, औषधांची गरज का हा सर्व तपशील या अॅपवर द्यावा लागणार


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांनी शिकविला ‘धडा’

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकिकडे आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची घोषणा आणि दुसरीकडे नामांकित इंग्रजी शाळांची संख्या कमी करणाऱ्या आदिवासी विभागाच्या दुटप्पी भूमिकेवर संतप्त पालकांनी अनोखे आंदोलन केले. आदिवासी आयुक्ताच्या मुख्य प्रवेशद्वारावरे या पालकांनी

ट्विंकल ट्विंकल लिटीर स्टार, जॉनी जॉनी एस पापा, अशा इंग्रजी कविता सादर करून या विभागाच्या कारभारावर टीका केली. नाशिक प्रकल्पात ५८६ अर्ज आले असताना फक्त २०६ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे उर्वरीत ३८२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी आदिवासी आयुक्तालयावर आंदोलन केले. पाल्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी पालकांनी मंगळवारी आयुक्तालयाच्या मुख्य द्वारावरच इंग्रजी वर्ग भरवून प्रवेशाची मागणी लावून धरली.

गेल्या चार वर्षांपासून या विभागाकडून आदिवासी मुलांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश उपलब्ध करून दिला जातो. शासनाने नामांकित शाळेत प्रवेश योजनेसाठी आदिवासी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. नाशिक प्रकल्पातून ५८६ अर्ज आलेले असून, प्रत्यक्षा केवळ २०६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील ,असे आदिवासी विकास विभागाकडून कळविण्यात आले. त्यामुळे उर्वरीत ३८२ विद्यार्थ्यांच्या प्रवेश होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. हा प्रश्न कायम असतानाच शासनाने पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बदलण्याचा तसेच बंद करण्याचा जो घाट घातला आहे, त्यामुळे पालक संतप्त झाले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पालकांकडून मंगळवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जाहीरपणे इंग्रजी कवितांचे वाचन केल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची कोंडी झाली होती.

दोन तास दिल्या घोषणा

शिष्टमंडळाने आदिवासी आयुक्तांची भेट घेतली. परंतु बोलणी फिस्कटल्याने शिष्टमंडळांसह १०० ते २०० आदिवासी बांधवांनी आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय काही आदिवासी बांधवांनी प्रवेशद्वारावरच इंग्रजीचा वर्ग भरविला. सुमारे दोन तास हे पालक प्रवेशद्वारासमोर बसून होते. या

आंदोलनाची दखल

घेवून विभागाने पालकांशी चर्चा केली. परंतु ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खुलेपणाने करा वीजबिलांच्या तक्रारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सरासरी वीजबिलापेक्षा जास्तीच्या वीजबिलांचे प्रमाण शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. अशा वीजबिलांबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार करणाऱ्या वीजग्राहकांना आधी वीजबिल भरण्याची सक्ती महावितरणकडून केली गेल्यास संबंधित वीजग्राहकांनी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे यांनी केले आहे.

शहरात वीजग्राहकांना वाढीव वीजबिले येणे, वीज मीटर वेगाने चालणे आदी समस्यांनी ग्रासले आहे. सरासरी वीजबिलापेक्षा वाढीव वीजबिल आलेल्या ग्राहकांकडून महावितरण कंपनीकडे तक्रार केल्यास आधी वीजबिल भरण्यास सक्तीही केली जात असल्याचा अनुभव काही वीजग्राहकांना आला आहे. वाढीव वीजबिलांच्या तक्रारींसंदर्भात महावितरण कंपनीकडून असहकार्य केले जात असल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. अशा वीजग्राहकांनी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दररोज सरासरी दहा तक्रारी

वाढीव वीजबिले, सदोष वीज मीटर अशा स्वरूपाच्या दिवसाला सरासरी दहा तक्रारी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे येत आहेत. या सर्व तक्रारींवर जिल्हा ग्राहक पंचायतीकडून वीजग्राहकांना मार्गदर्शन केले जात आहे. ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या ३० हजार तक्रारींचा जिल्हा ग्राहक पंचायतीने नुकताच निपटारा केला आहे. या सर्व तक्रारींतील वीजग्राहकांची वाढीव वीजबिले रद्द करण्यात आली आहेत.

महावितरणचे वीज मीटर घेणे वीजग्राहकांना बंधनकारक नसते. कंपनीचे सध्याचे २० टक्के वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना वाढीव वीजबिले येत आहेत. आजवर कंपनीने कोणत्याही ग्राहकाला टेस्ट रिपोर्ट दिलेला नाही. वाढीव वीजबिलासदर्भात अंतर्गत तक्रार निवारण समितीकडेही वीजग्राहक तक्रार करू शकतात. मात्र, याची माहिती महावितरण वीजग्राहकांना देतच नाही. वीजपुरवठ्याविषयीच्या तक्रारी वीजग्राहक जिल्हा ग्राहक पंचायतीकडेही करू शकतात.

-विलास देवळे, सचिव, जिल्हा ग्राहक पंचायत

--

ज्या ग्राहकांना वाढीव वीजबिले आलेली आहेत त्यांच्यासाठी शहरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली आहेत. यापुढे तालुका स्तरावरही अशी शिबिरे घेतली जाणार आहेत. अजूनही वीजबिल, वीज मीटर यासंदर्भात काही तक्रार असल्यास अशा वीजग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. तक्रारदार वीजग्राहकांना वीजबिल भरण्याची सक्ती महावितरणकडून केली जात नाही.

-सुनील पावडे, अधीक्षक अभियंता, नाशिक शहर मंडल, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावण दारात; त्र्यंबक अंधारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या सार्वजन‌िक दिवाबत्ती व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, शहरातील बहुतांश परिसरात पथदीप बंदावस्थेत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. श्रावण महिन्याच्या तोंडावर शहरात अशी समस्या उद्भवल्यामुळे भाविकांसह, रहिवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

नगरपालिका महिन्याला लाखो रुपयांचे वीजबिल भरते. मात्र, नागरिकांना व भाविकांना अंधारात धडपडावे लागते. सिंहस्थ नियोजनात पथदीपांच्या तारा भूमिगत करण्यासाठी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. वीजेचा दाब अधिक झाल्याने या केबल भ्रष्ट झाल्याचे सांगण्यात येते. मुळातच योग्य मानांकाच्या केबल वापरल्या नसल्याने त्या जळाल्या आहेत. शहरात वापरण्यात आलेले एलईडीही कमी प्रतीचे असून, ते पुरेसा प्रकाशही देत नाहीत. अवघ्या वर्षभराच्या आत हे एलईडी बंद पडण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या भूमिगत केबल जळाल्याने पुन्हा ओव्हरहेड वायरच्या सहायाने पथदीपांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही वारा, पाऊस सुरू होताच हे पथदिप बंद होतात. वीजवितरण कंपनीने साडेचार कोटी रुपये खर्च करून ओव्हरहेड वायर भूमिगत केली. त्यात आता नगरपालिकेने पथदीपांसाठी पुन्हा वायारीचे जंजाळ निर्माण करण्यास सुरवात केली आहे. अगदी अलिकडे देखभाल दुरुस्तीचा ठेका देण्यात आला आहे. परंतु ठेकेदार याकडे लक्ष देत नसल्याची चर्चा आहे.

नगरपालिकेकडे वीज अभियंता नाही...

त्र्यंबक शहराची लोकसंख्या १३ हजारांच्या आसपास आहे. शहराची हद्द वाढलेली असताना नगरपालिकेस वीजव्यवस्था सांभळण्यास इंज‌िन‌िअर नाही. यापूर्वीचे कर्मचारी निवृत्त झाले आहेत. बहुतांश भार आता ठेकेदारीवर असून, कार्यालयीन कामकाजासाठी पालिकेच्या एखाद दुसऱ्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी टाकण्यात येते. पाणीपुरवठा अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक ही पदेही रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभम पार्क परिसरात पाणी बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

सिडकोतील सर्वात मोठी खासगी घरांची वसाहत असलेल्या शुभम पार्कमधील काही इमारतींना पाणीपुरवठाच बंद झाला आहे. विशेष म्हणजे, या इमारतींमध्ये आमदार सीमा हिरे यांचे व नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचे संपर्क कार्यालये आहेत. नगरसेवक व आमदारांचे संपर्क कार्यालय असलेल्या इमारतींमध्ये पाण्याची अशी अवस्था असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिडकोतील उत्तम नगर जवळ असलेल्या शुभम पार्क याठिकाणी सुमारे बारा इमारती असून, साडेपाचशेहून अधिक फ्लॅट आहेत. या इमारतीतील काही इमारतींसह इमारत क्रमांक २ मध्ये पाणीपुरवठाच बंद झाल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच या परिसरातील इमारतींमध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत असून, पूर्वी बऱ्याचदा दोनवेळेस पाणी येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून कधी पाणी येते तर कधी येतच नाही. या प्रकाराबाबत स्थानिक नगरसेवक, महापालिका कार्यालयात कळविण्यात आले असून, त्यांच्याकडून अद्यापही कोणतीही कार्यवाही याबाबत केलेली नाही.

----------------------

या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत असून, इमारतीतील पाइपलाइन कमी व्यासाच्या आहेत. त्या बदलण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.

- संजीव बच्छाव, उपअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी बाधितांबाबत लवकरच तोडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाला दिशा देणारा प्रकल्प आहे. राज्यातील शेतकरी या महामार्गासाठी जमिनी देण्यासाठी वाजत-गाजत आमच्याकडे येऊ लागले आहेत. यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी मी तसेच मुख्यमंत्री स्वत: चर्चा करण्यास तयार आहेत. त्यांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी नाशिकमध्ये दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी महाजन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिन‌धििंशी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील पाच ते सहा गावांमधून समृद्धी महामार्गाला विरोध होत आहे. मात्र राज्यात अन्य ठिकाणी शेतकऱ्यांकडून या महामार्गाच्या भूसंपादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महामार्गासाठी बागायती जम‌निी जिरायती दाखवून त्यांचे भूसंपादन करण्याचा घाट जात असल्याच्या आरोपाचे महाजन यांनी खंडण केले. जमिनींची मोजणीच होऊ दिली नाही तर पाण्याखालच्या जमिनी कोणत्या हे कसे समजणार, असा सवाल महाजन यांनी उपस्थ‌ति केला. महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला वेळेत दिला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या महामार्गावर कुणीही राजकारण करू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


…आता तसे होणार नाही

पूर्वी घोटी-शिर्डी रस्त्यासाठी संपदित केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होण्याची वेळ आल्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. परंतु या विषयाची माहिती घ्यावी लागेल असे सांगत या महामार्गाच्या बाबतीत असे होणार नाही. शेतकऱ्यांना लगेचच मोबदला मिळेल असे आश्वासन महाजन यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी विकासाच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ९०० कोटी ५२ लाखांचा संभाव्य आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडून सादर करण्यात आला; मात्र तो फसवा ठरणार आहे. आराखडा बनविताना जिल्हा नियोजन समितीने हात सैल सोडला असला तरी शेतकरी कर्जमाफी धोरणामुळे निधीत ३० टक्के कपात अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला गेल्या वर्षीपेक्षा अधिक निधी मिळण्याची अपेक्षा फोल ठरण्याचे संकेत आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत २०१६-१७ मध्ये विविध योजनांतर्गत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सदस्या सुधा कोठारी, जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलिस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्यानुसार सरकारकडून जो निधी वर्ग होतो त्याचे नियोजन या बैठकीत केले जाते. जिल्हा नियोजन समितीकडून सर्वसाधारण योजनांसाठी ३२१ कोटी ३८ लाख रुपये, आदिवासी उपयोजनांसाठी ४८१ कोटी ५९ लाख रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनांवर ९७ कोटी ५५ लाख रुपये खर्च असे एकूण ९०० कोटी ५२ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वसाधारण योजनेसाठी २७ कोटी २५ लाख रुपयांचे वाढीव नियतव्यय मंजूर झाले, ही यंदाच्या आराखड्यातील समाधानकारक बाब आहे.

२०१६-१७ मध्ये हा आराखडा ८६९ कोटी ८० लाखांचा होता. सरासरी ९७.७७ टक्के निधी खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी यांनी बैठकीत दिली. यंदा मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सरकारच्या धोरणानुसार निधी वितरणाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सर्वसाधारण योजनांसाठी ७० कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी ९६ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी २० कोटींच्या निधीला कात्री लागू शकते. त्यामुळे ९०० कोटींच्या आराखड्यापैकी १८९ कोटींचा निधी कापला जाण्याची शक्यता आहे.

संभाव्य विकास आराखडा

सर्वसाधारण योजना : ३२१ कोटी ३८ लाख, आदिवासी उपयोजना : ४८१ कोटी ५९ लाख, अनुसूचित जाती उपयोजना : ९७ कोटी ५५ लाख, एकूण : ९०० कोटी ५२ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची दुसरी यादी आज

$
0
0

सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीतील आपला प्रवेश निश्चित केलेला नाही, असे विद्यार्थी आता ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीतही आपले प्रवेश निश्चित केलेले नाहीत त्यांची प्रवेशप्रक्रिया शासनाच्या निर्णयानंतरच होईल, अशी माहिती इयता अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी बुधवारी दिली. अशा विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १६०० इतकी असून, अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी, २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे.

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्र‌ियेची पहिली फेरी नुकतीच पार पडली. त्या पार्श्वभुमीवर या फेरीतील प्रवेश झालेल्या आकडेवारीचा आढावा बैठक बुधवारी दुपारी समितीच्या सदस्यांच्या उपस्थ‌ित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पार पडली. या बैठकीत रामचंद्र जाधव यांनी वरील माहिती दिली. याप्रसंगी सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, अशोक बागुल आदी उपस्थ्ति होते. बैठकीत पहिल्या फेरीतील प्रवेशित विद्यार्थी संख्येचा आढावा घेण्यात आला. तर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षणसंचालक यांच्याकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी गुरूवारी, २० जुलै रोजी सायंकाळी ५ वा जाहीर होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांनी २१, २२ व २४ जुलै रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचे आवाहन प्रवेश समितीने केले आहे. दि.१५ ते १८ जुलै या कालावधीत ३५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नव्याने ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार दुसऱ्या फेरीसाठी केला जाणार आहे.

विद्यार्थी अभिप्राय द्यावा

ज्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमापैकी पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले असुनही काही कारणास्तव प्रवेश घेता आला नसेल अशा विद्यार्थ्यांनी nashik.11thadmission.net या संकेतस्थळावर स्टुडंट फिडबॅक द्यावा, असे आवाहन प्रवेश समितीने केले आहे.


काही विद्यार्थ्यांच्या अजूनही शाळांत खेटा

ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या अर्जात तांत्रिक चुका पालकांच्या निदर्शनास येत असल्याने अशा विद्यार्थ्यांना अद्यापही शाळांत खेटा घालाव्या लागत आहेत. काही विद्यार्थ्यांनी अद्यापही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरलेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंचाळेत रस्त्यांवर सांडपाणी मोकाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत समावेश असतानादेखील चुंचाळे गावाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. चुंचाळे गावातील वरच्या चुंचाळे भागातील सांडपाणी थेट उघड्यावर साचत असल्याने यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनदेखील न्याय दिला जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या शाळेच्या समोरच सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. दोन प्रभागाच्या सीमारेषेवर चुंचाळे गावाचा परिसर येत असल्याने स्थानिक नगरसेवकही समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यावर त्यामध्ये आजूबाजूच्या २२ खेड्यांचा समावेश करण्यात आला होता. यात चुंचाळे गावाचाही समावेश महापालिकेत झाला होता. परंतु, महापालिकेत समावेश होऊनदेखील नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात दिल्या जात नाही. गावाच्या बाजूला झपाट्याने लोकवस्ती वाढली आहे. सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुविधा देण्यात दुजाभाव

चुंचाळे गावाचा समावेश वरचे व खालचे अशा दोन भागात झाला आहे. यात वरच्या चुंचाळे गावातील सांडपाणी उघड्यावर वाहून येत खालच्या चुंचाळे गावाच्या मोकळ्या भूखंडावर जमा होत असते. ते सांडपाणी जमा होत असलेल्या ठिकाणी बस थांबा व महापालिकेची शाळा आहे. उघड्यावर सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनदेखील समस्या सुटत नसल्याने आता उपाययोजना आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. महापालिकेत समावेश होऊनदेखील चुंचाळे गावाला सुविधा देण्यात दुजाभाव केला जात असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक वर्षांपासून चुंचाळे गाव दोन प्रभाग टाकले जात असल्याने नगरसेवकही लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, दोन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

पुणे- नाशिक महामार्गावर सिन्नरजवळील बायपासवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पुणे येथील दोन तरुण ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास झाला.

पुण्यातील आकुर्डी येथील सहा तरुण नाशिककडे इटिऑस कारने (एमएच १४/एफसी ४३६८) जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. यात चालक दत्ता शहाजी गवळी (वय २३) व रोहित किरण गंगावणे (२४, रा पुणे) ठार झाले, तर विष्णू संजू शिगवण (१९), विकास अंकुश भिशे (२३), सूरज प्रताप गुप्ता (२१), अविनाश शिवाजी पेंढारकर (१९, सर्व रा. आकुर्डी, पुणे) गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातून लांबविले ९१ हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलवरून पेन्शन खात्याची माहिती मिळवित वृद्ध निवृत्ताच्या बँक खात्यातून ९१ हजार रुपयांची रोकड परस्पर लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अशोक यशवंत देशमुख (वय ७० रा. प्रभातनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. काही भामट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. वेळोवेळी पेन्शन खात्याची माहिती घेतली. यानंतर १४ ते १५ जुलै दरम्यान संशय‌तिांनी एसबीआयच्या मेरी शाखेतील खात्यातून परस्पर ९१ हजार ३९६ रूपयांची रोकड काढून घेतली.

वाळूसह ट्रक पळविला

नाशिक ः मर्यादेपेक्षा अधिक गौणखनीजाची वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आलेला सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मालट्रक चोरट्यांनी भरलेल्या वाळूसह पळवून नेला. गंगापूररोड परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील आनंदनगर भागात राहणाऱ्या घनश्याम नामक चालकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २ जुलै रोजी घनश्याम यांच्या मालट्रकवर महसूल विभागाने कारवाई केली. मर्यादेपेक्षा अधिक गौणखन‌जिाची वाहतूक केली जात असल्याने मालट्रकचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर गंगापूररोडवरील ऑरम इस्टेटच्या आवारात सील करून हा ट्रक पार्क केला होता. दातार ट्रान्सपोर्ट आणि बिल्डींग मटेरियल सप्लायर्सने हा ट्रक पळवून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

दोघांना अटक

मालेगाव : तालुक्यातील ज्वार्डी येथील रोशन दैतकार (२०) या तरुणास विहिरीत उडी मारून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी निमगाव येथील आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी रोशनचा भाऊ प्रशांत दैतकार (१९, रा. ज्वार्डी) याने तक्रार दाखल केली आहे. दीपक नामदेव आहिरे, सचिन नंदू आहिरे, दिनेश नंदू आहिरे, संजय विष्णू आहिरे, सोनू हिरामण मोरे, रवींद्र बाबुलाल आहिरे, बबन पुंजाराम आहिरे, विशाल बागूल (सर्व रा. निमगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांनी एका युवतीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून रोशनसह त्याच्या जोडीदाराला रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच रोशनला आम्ही जिवंत सोडणार नाही, असे धमकावले होते. संशयित आरोपींच्या भितीपोटी निमगाव शिवारात विहिरीत रोशनने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकाचा मृतदेह आढळला

त्र्यंबकेश्वर : बेपत्ता झालेल्या सिन्नर येथील आयटी विद्यार्थ्याची त्र्यंबकेश्वर येथे गंगाद्वार पर्वतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर येथील प्रवीण राजेंद्र काटे (वय २३) हा इंज‌निीअरिंग शिक्षण घेणारा युवक बेपत्ता असल्याची नोंद १७ जुलै रोजी त्याचे नातेवाईक राजेंद्र पाटील (रा. सिन्नर) यांनी त्र्यंबकेश्वर पोल‌सि ठाण्यात दिली होती. मंगळवारी (१८ जुलै) सायंकाळी उशिरा त्याच वर्णनाच्या मृतदेह गंगाद्वारच्या पाठीमागील बाजूस आढळून आला आहे. या युवकाने गंगाद्वारच्या मागच्या बाजूने वरून खाली उडी मारली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कारमधून गायीची वाहतूक

मालेगाव : कारमध्ये गायीस बांधून तिची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अंजुमन चौक येथे कारवाई झाली. निवृत्ती नामदेव भामरे (२५, रा. पोहाणे), समा, रवी (रा. चिंचवे) आणि फिरोज (रा. मालेगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पणन महासंघ अध्यक्षपदी उषा शिंदे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षपदी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषाताई माणिकराव शिंदे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. शिंदे यांच्या निवडीने नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महासंघाच्या उपाध्यक्षपदी प्रसेनजीत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या आजवरचा इतिहास पाहता शिंदे यांच्या निवडीमुळे प्रथमच विदर्भ सोडून उत्तर महाराष्ट्राला अध्यक्षपद मिळाले आहे. तसेच शिंदे यांच्या रुपाने या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला विराजमान होत आहे.

महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात घेण्यात आलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शिंदे, उपाध्यक्षपदासाठी पाटील यांचेच अर्ज आले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सतिष भोसले यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरीष्ठ पातळीवरील नेत्यांमधील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमधील चर्चेच्या फेऱ्या अन् वाटाघाटीअंती आपसात ठरलेल्या धोरणानुसार अध्यक्षपद हे राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे निश्चित झाले होते.

शिंदे यांच्या निवडीमुळे शहरातील विंचुर चौफुलीवर शिंदे समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

यावर्षी कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय खरेदीची गरज निर्माण झाल्यास शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून खरेदीची योजना कार्यक्षमपणे राबविली जाईल.

- उषाताई शिंदे, अध्यक्षा, कापूस पणन महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुंदरपूरची ‘दहशत’ जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सुंदरपूर, काथरगाव, जळगावसह परिसरात धुमाकूळ घालणारा नर बिबट्या वन विभागाने सुंदरपूर येथे लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. गेल्या अने‌क दिवसांपासून या बिबट्याची परिसरात दहशत पसरली होती. मात्र या घटनेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सुंदरपूर येथे चिंचबन भागात रवींद्र जनार्दन चिखले यांच्या शेतात अनेक वेळा बिबट्या नजरेस पडला होता. याबाबत वनविभागाला कळव‌ल्यिानंतर शेतात पिंजरा लावला होता. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल पी. एस. पाटील, विंचुरचे वनरक्षक विजय टेकणर आदींच्या पथकाने या बिबट्याला ताब्यात घेतले. गेल्या महिन्यात २४ जून रोजी तारुखेडले येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला होता. यावर्षी निफाड तालुक्यात आतापर्यंत पाच बिबटे पिंजऱ्यात जेरबंद केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनाचा कल ओळखूनच निवडा करिअर

$
0
0

करिअरची निवड करताना ज्यामध्ये स्वत:चे मन रमते त्या विद्याशाखेची निवड करावी. मनाच्या नैसर्गिक कलास न्याय देताना त्याच्या जोडीला समर्पणाचा भाव मात्र आचरणात नक्की हवा. या सूत्रातून तुमचे खरे करिअर आकार घेईल, असा संदेश भोसला मिल‌िटरी कॉलेजच्या प्राचार्या सुचेता कोचरगावकर यांनी ‘मटा’ शी बोलताना दिला.


प्रश्न : मिल‌िटरी एज्युकेशन या संबोधनामुळे आपल्या कॉलेजकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन व अपेक्षा वेगळ्या आहेत?

उत्तर : अकॅडम‌िक्स शिक्षणाच्या बरोबरीलाच मिल‌िटरी एज्युकेशनमधून येणाऱ्या मूल्यांचे संस्कार व्हावेत, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडावा यावर आमचा कटाक्ष नक्कीच आहे. येथे निवासी विद्यार्थ्यांसाठी मिल‌िटरी एज्युकेशन सक्तीचे आहे. अभ्यासक्रमाच्या पलीकडे राष्ट्राभिमुख विद्यार्थी घडविण्याची संस्कार पध्दती आम्ही राबवितो. या अंतर्गत इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘रामदंडी’ म्हणजे प्रभू रामांचा आदर्श घेऊन पुढे चालणारा विद्यार्थी असे संबोधले जाते. समाजाच्या अपेक्षांना अनुकूल धोरण असल्याने त्या पूर्ण होतात.

g प्रश्न : आपल्याकडे उपलब्ध असणारे अभ्यासक्रम?

उत्तर : ‘केजी टू पीजी’ अशा स्तरातील शिक्षण आमच्याकडे उपलब्ध आहेत. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांसह मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, डिफेन्स स्टडीज आणि स्ट्रॅटेजीकसह विविध विद्याशाखांचा अंतर्भाव आहे. याशिवाय एनडीएसाठी तयारी करून घेण्याकरिता स्पेशल बॅचही प्रशिक्षित केली जाते.

g प्रश्न : नव्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा भविष्यात काही मानस?

उत्तर : विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान मिळत राहावे यासाठी गरजेनुसार आवश्यक ते बदल घडविले जातात. अलीकडेच ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ हा समुद्री संपत्तीसंदर्भातील एक नवा अभ्यासक्रम संस्थेने सुरू केला आहे. या अंतर्गत डिफेन्स आणि स्ट्रॅटेजीक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.

g प्रश्न : मिल‌िटरी एज्युकेशन प्रत्येकास सक्तीचे असावे असे वाटते का?

उत्तर : अनेक भिन्न मतप्रवाहांमुळे काही प्रसंगी तरूणांमध्ये देशाबद्दल निराशेची भावना तयार होते. ज्यांच्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांनीच असे निराश होऊ नये यासाठी मिल‌िटरी एज्युकेशन हा महत्त्वाचा संस्कार वाटतो. त्यासाठी हे शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे व्हावे, असा एक प्रस्ताव शासनाला दिला आहे. किमान आमच्या संस्थेतील शक्य त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही तशी व्यवस्था केली आहे.

g प्रश्न : सैन्यदलाशी संबंधित काही उपक्रम आपल्याकडे सुरू आहेत.

उत्तर : मुलींच्या सैनिकी शिक्षणासाठीची व्यवस्था याशिवाय सैन्यदलाचे मानसशास्त्र अभ्यासण्यासाठी ‘मिल‌िटरी सायकॉलॉजी’ आणि ‘जम्मू अँड काश्मिर’ हे सर्टीफिकेट अभ्यासक्रम दिल्लीतील जम्मू आणि काश्मिर केंद्राद्वारे चालविले जातात. यासाठी मर्यादीत प्रवेश व मर्यादीत दिवसांचे शिक्षण आहे.

g प्रश्न : काही प्रेरणादायी उपक्रमही आपल्याकडे सुरू आहे आहेत?

उत्तर : जीवनात प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या आपल्या भोवतालच्या आदर्श व्यक्तींचे संघर्षमय जीवन विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चित्रपटाद्वारे दाखविले जाते. याशिवाय आपण जी फळे खातो त्यांच्या बिया कचऱ्यात न फेकता त्या एकत्रित करून त्या कागदाच्या पुडीवर फळाचे नाव लिहायचे आणि मध्यवर्ती ‘सीड बँक’मध्ये या बिया जमा करायचा असा एक उपक्रम सुरू केला आहे. योग्य ऋतूत विद्यार्थ्यांच्याच हस्ते या बियांचे रोपण करायचे, असा शिरस्ता आहे.

g प्रश्न : विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीवही जागृत व्हायला हवी?

उत्तर : त्यासाठी शनिवारचा दिवस महत्त्वाचा असतो. ‘रामदंडी’ अर्थात आमचे विद्यार्थी शनिवार कॅम्पसमधील विख्यात श्रीराम मंदिरासमोर परेड सादर करतात. यानंतर त्यांना सण परंपरा यांपासून तर एखादा प्रासंगिक सामाजिक विषय घेऊन त्याचे त्यांच्या स्तरावर विश्लेषण केले जाते. त्यांच्या विचार प्रक्र‌ियेला सामाजिकदृष्ट्या चालना दिली जाते. याशिवाय परिसरातील संत कबीर नगर या सेवावस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकविण्यापासून तर त्यांना इंग्रजी भाषा किंवा व्यक्त‌िमत्त्व विकासाची कौशल्यही शिकविली जातात.

g प्रश्न : पालक आणि विद्यार्थ्यांसमोर कुठले आव्हान महत्त्वाचे वाटते ?

उत्तर : पालक आणि पाल्याचे नाते घट्ट असायला हवे. अलीकडे कुटूंब व्यवस्थांसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या आव्हानांमुळे यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आहे. याशिवाय सोशल मीडिया, मीडिया आणि इंटरनेटसारखी आधुनिक माध्यमांची हाताळणीचे धडे विद्यार्थ्यांना देणे आणि या आधुनिक माध्यमांच्या नकारात्मक परिणामांपासून विद्यार्थ्यांना वाचविणे महत्त्वाचे आव्हान वाटते.

g प्रश्न : विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?

उत्तर : करिअरची निवड करताना ज्यामध्ये स्वत:चे मन रमते त्या विद्याशाखेची निवड करावी. मनाच्या नैसर्गिक कलास न्याय देताना त्याच्या जोडीला समर्पणाचा भाव मात्र आचरणात नक्की हवा. या सूत्रातून तुमचे खरे करिअर आकार घेईल.

(शब्दांकन : जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images