Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मदतीसाठी संस्थाही सरसावल्या पुढे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हेल्पलाइन उपक्रमाला व्यक्तिगत प्रतिसाद तर मिळतो आहेच, परंतु आता या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी संस्थाही सरसावल्या आहेत. अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थांसोबतच जॉगर्स क्लब, ज्येष्ठ नागरिक संघटना यादेखील मागे राहिल्या नसून, त्यांचेही चेक येत आहेत.

नांदूर नाक्यावरील श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ‘मटा हेल्पलाइन’च्या दहाही मुलांना मदत करण्यात आली असून, कळवण येथील एका पतसंस्थेतर्फे भरघोस मदत करण्यात आली आहे. जिल्हाभरातून मदतीचे धनादेश येत आहेत. शहरातील जॉगर्स पार्कवर गप्पा रंगवणारे वृद्ध आपल्या थरथरत्या हातांनी चेक लिहितात आणि मदत करतात. सोबत आशीर्वादाचे चार शब्दही लिहितात. तेव्हा या मुलांच्या श्रीमंतपणाची जाणीव होते. ‘मटा हेल्पलाइन’ची मुले आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत; परंतु त्यांच्या डोक्यावर सरस्वतीमातेने वरदहस्त ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. त्यांची स्वप्नेही फार मोठी आहेत. कुणाला देशसेवा करायचीय, तर कुणाला सीए व्हायचेय. ग्रेड वनचे अधिकारी बनून कुणाला आईवडिलांना खूप सुखात ठेवायचे आहे. या त्यांच्या कथा वाचून धनादेश येत आहेत. संस्था मदतीला सरसावल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे स्वप्न नक्की साकार होणार, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाळिंब आले हो…

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले लासलगाव बाजारपेठ आता डाळिंबाची बाजारपेठ म्हणून उद्यास येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून येथून येथे डाळिंब लिलाव सुरू झाले आहेत. येथून दररोज दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारसह इतर राज्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब निर्यात केले जात आहे. लासलगावसह निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यात डाळिंबाची लागवड झाली आहे.


तीन वर्षांचा आढावा

जुलै २०१५

आवक-४ हजार ७०० क्रेट

भाव – जास्ती जास्त १२५००, सरासरी ५ हजार प्रती क्रेट

जुलै २०१६

आवक-२ हजार ९० क्रेट

भाव – जास्ती जास्त १२५०५, सरासरी ६,१४२ प्रती क्रेट

जुलै २०१७

आवक-५० हजार क्रेट

भाव – जास्ती जास्त ७ हजार, सरासरी ४५०० प्रती क्रेट

शेतकऱ्यांनी क्रेटमध्ये एकसारखा माल प्रतवारी करून आणावा. रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी साडे नऊ ते दुपारी एकपर्यंत अथवा आवक संपेपर्यंत लिलाव सुरू राहील.

- जयदत्त होळकर,
सभापती, लासलगाव बाजार समिती


१३ जुलैनंतर ड‌ाळिंबाची आवक वाढली; दरात ४५० रुपयांनी वाढ

दररोज ३ ते ४ हजार क्रेटची आवक

जास्तीत जास्त दीड हजार, सरासरी १०५० रुपये २० किलोच्या क्रेटला भाव

यंदा १० एप्रिलपासून आतापर्यंत ५० हजार क्रेट डाळिंबाची आवक

तीन वर्षांतील आवक (क्रेटमध्ये)

सन २०१५ मध्ये ९५ हजार

सन २०१६ मध्ये १ लाख ६५

यावर्षी ५ ते ६ लाख क्रेटची आवक होण्याची शक्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्रमानांकितांच्या आक्रमक चाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेषा असोसिएशनतर्फे नाशिक येथील स्वामीनारायण मंदिराच्या बँक्युट हॉलमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन स्पर्धेत गुरुवारी चौथ्या फेरीअखेर अग्रमानांक‌ित खेळाडूंनी पटावर आक्रमक चाली रचत आपली आघाडी टिकवून ठेवली आहे.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम फेरीत अग्रमानांकितांच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यात पहिल्या पटावर खेळताना स्पर्धेतील सर्वोच्च मानांक‌ित तामिळनाडूचा सर्वाना कृष्णन पी. याच्याविरुद्ध खेळतांना मुंबईच्या अग्रमानांकित प्रणव शेट्टीला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या पटावर मात्र महाराष्ट्राच्या निख‌िल दीक्षितने आंतरराष्ट्रीय मास्टर राजेश व्ही. ए. व्ही. याच्याविरुद्ध खेळताना सावध चालीचा पवित्रा घेत डाव बरोबरीत साधत धक्कादायक निकालाची नोंद केली. तिसऱ्या पटावर तामिळनाडूचे मुथैय ए. आय. व सेन्थली मारन के. यांनी आपल्या पटावर बरोबरी साधत स्पर्धेत आगेकूच केली. सम्मेद शेटे, पवन दोडेजा, आंतरराष्ट्रीय मास्टर चक्रवर्ती रेड्डी यांनी आपली विजयी मोहीम यशस्वी करत स्पर्धेत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आघाडी घेतली आहे.

जागतिक बुद्धिबळ दिन असल्याने गुरुवारी स्पर्धेसाठी भारतभरातून आलेल्या खेळाडू आणि पालकांसाठी रेषा असोसिएशनने आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी आनंद वैशंपायन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नाशिककधील पहिल्या महिला पंच महाशब्दे, जीवन गौरव पुरस्कारप्राप्त डॉ. महाशब्दे, अॅड. कडवे, प्रख्यात खेळाडू व प्रशिक्षक भूषण ठाकूर, स्पर्धेतील दिव्यांग खेळाडू सौंदर्यकुमार प्रधान यांच्यासह फिडे मास्टर सौरव खर्डेकर, कोल्हापूरचे पंच सूर्याजी भोसले, संधेश नगरनाईक, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, रेषा आसोसिएशनच्या संचाल‌िका अर्चना कुलकर्णी आदी उपस्थित होते. नाट्यलेखक शिरीष हिंगणे यांनी जागतिक बुद्धिबळ दिनाचे महत्व सांगितले. नाशिकचा बालखेळाडू इंद्रजीत जोशी याचा वाढदिवस साजरा करुन कार्यक्रमाची सांगता झाली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून पुण्याचे नितीन शेणवी व सहपंच म्हणून नंदुरबारचे शोभराज खोंडे काम पाहत आहेत.

नाशिकच्या खेळाडूंची चमक

नाशिकचा नवोदित खेळाडू आर्य बहाळकर याने मानांक‌ित खेळाडू वरद देव याला पराभूत करत जागतिक क्रमवारीसाठीची आपली गुणवत्ता सिद्ध केली. नाशिकच्या वेदांत पिंपळखरे, कार्तिक सिंग, गणेश ताजणे, हर्षल पाटील, हर्षल वालदे, शंतनू भांबुरे, ऋषिकेश शिंपी, सिया कुलकर्णी, प्रच‌िती चंद्रात्रे आदी खेळाडू आपली चमक दाखव‌ित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर बंदोबस्तात ५० टँकर इंधन रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भारत पेट्रोलियम कंपनी प्रशासन आणि मालवाहतूकदार यांच्यात वाहतूक दराबाबत कोणतीही तडजोड न झाल्याने पानेवाडी येथे मालवाहतूकदारांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पानेवाडीत शेकडो टँकर अद्याप उभे असून, संभाव्य पेट्रोलटंचाई लक्षात घेऊन अखेर पोलिस बंदोबस्तात ५० टँकर इंधन गुरुवारी रवाना करण्यात आले. यामुळे इंधनटंचाईचे सावट तूर्तास टळले असले तरी सलग तीन दिवसांपासून संप सुरू असल्याने गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनीही संपकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, कंपनी प्रशासनाकडून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका मालवाहतूकदारांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रेत्यांना फूटपाथ आंदण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील निमाणी बसस्थानक ते दिंडोरी नाका या पादचारी मार्गावर अनेक विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. महापालिका व शहर वाहतूक शाखा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने विक्रेते फूटपाथवर अन् पादचारी रस्त्यावर, अशी स्थिती येथे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, यासंदर्भात तातडीने

उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

दरम्यान, फूटपाथवर केलेले अतिक्रमण, या मार्गाचा केला जाणारा दुरुपयोग याबाबत शरणपूररोड व कॉलेजरोडवरील व्यावसायिकांना शहर वाहतूक शाखेने नोटिसा काढल्या आहेत. त्याप्रमाणेच पंचवटी परिसरातील संबंधित व्यावसायिकांनाही नोटिसा काढाव्यात आणि हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दिंडोरी नाका ते निमाणी बसस्थानक या मार्गावर फूटपाथ हा कधीच मोकळा नसतो. जणू हा मार्ग फळे आणि इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठीच आहे की काय, अशा थाटात येथे दुकाने थाटलेली असल्याचे दिसून येते. अाख्खा फूटपाथच या दुकानदारांनी व्यापल्यामुळे पादचाऱ्यांवर थेट मुख्य रस्त्यावरून ये-जा करण्याची वेळ येत आहे. फूटपाथवर निर्माण होणारा हा अडथळा येथील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरताना दिसतो. कायमच प्रचंड वर्दळ असणाऱ्या या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, बसस्थानकावर जाणारे, तसेच स्थानकामधून बाहेर पडणारे प्रवासी थेट मुख्य रस्त्यावरूनच जाताना दिसतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडण्यासह अपघाताची शक्यता वाढल्याचे चित्रदेखील दिसून येत आहे.

निमाणी बसस्थानकावर येणाऱ्या बसेसमुळे येथे वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. त्यात येथे बेशिस्तपणे थांबणाऱ्या रिक्षांची भर पडते. अशा वाहनांच्या गर्दीतून वाट काढणे प्रवाशांना आणि शाळकरी मुलांना कठीण होत अाहे. बऱ्याचदा नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या जागेवरच वाहने थांबलेली असतात. येथील व्यावसायिकांसाठी अन्य ठिकाणी दुकाने मांडण्याची व्यवस्था करून हा फूटपाथ मोकळा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--


वरदहस्त असल्याचा आरोप

येथील फूटपाथवर फळविक्रेत्यांनी दुकाने मांडल्याची तक्रार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे केली असता या विभागाच्या अधिकाऱ्यांनीच त्या फळविक्रेत्यांना जाऊन सांगितले, की नगरसेवक पवार यांनी तुमच्याविरोधात तक्रार केली आहे, असा किस्सा नगरसेवक अरुण पवार यांनी पंचवटी प्रभाग समिती सभेत सांगितला. त्यामुळे फूटपाथवरील दुकाने कुणाच्या तरी वरदहस्तावरच सुरू आहेत, असा आरोपही परिसतून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभागाच्या गैरकारभाराचे वाभाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांची दुरावस्था आणि या शाळांमधील शिक्षक आणि काही मुख्याध्यापकांकडे असलेल्या बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांवरून विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची कोंडी केली. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत, सदस्यांनी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या गैरकारभाराचा पाढाच वाचला. शिक्षण विभागाच्या कारभारावर सभागृहनेते दिनकर पाटील आणि शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी टीकास्र सोडत गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केली. नगरसेवकांनी शाळांची दयनीय स्थिती चव्हाट्यावर आणल्यानंतर महापौरांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सर्व शाळांची तपासणी करून सद्यःस्थिती अहवाल पुढच्या महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोगस प्रमाणपत्रांच्या तक्रारी असलेल्या ४९ शिक्षक, मुख्याध्यापकांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गुरुवारच्या महासभेत महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेवर आणि शिक्षण विभागाच्या गैरकारभारावर वादळी चर्चा झाली. केंद्रप्रमुख जयश्री पंगुडवाले यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून सुरू झालेल्या प्रश्नोत्तराने विषयांतर होऊन थेट पालिका शाळांची दुरावस्थाच सदस्यांनी चव्हाट्यावर आणली. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी हे २० लाख नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. त्यांचा कारभार यापूर्वी वादग्रस्त राह‌िला असताना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे. आरटीईनुसार प्रवेश नाहीत, तरीही खोट्या बातम्या ते देत असतात. त्यामुळे शिक्षण विभागात चुकीचे काम सुरू असल्याचा आरोप करत, भाजपच्या कारभाराची खिल्ली उडवली. सुधाकर बडगुजर यांनी पंगुडवाले यांच्याबाबत सभागृहाची कशी दिशाभूल केली जात आहे, याचे पुरावेच सभागृहात मांडले. त्यामुळे सत्ताधारी बॅकफूटवर गेले. शांता हिरे, शिवाजी गांगुर्डे, चंद्रकात खाडे, हेमलता पाटील, शशिकांत जाधव, किरण गामणे यांनी शाळांची स्थिती आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिनकर पाटील यांनी उपासनी यांच्या चौकशीची मागणी केली.


विद्यार्थी वाढल्याचा दावा

उपासनी यानी १२७ शाळांमध्ये ३४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थी वाढल्याचा दावा केला. तसेच ५४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे सांग‌ितले. महापौर रंजना भानसी यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली. पालिकेतील सर्व शाळांची तपासणी तत्काळ करून त्यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश दिले. किती शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, कुठे शाळांना इमारती नाहीत त्याची सविस्तर माह‌िती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. ज्या ४९ शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात तक्रारी आहेत. त्यांचीही सत्यता पडताळून त्याबाबत सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

बडगुजरांनी पाडले उघडे

जयश्री पंगुडवाले यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या विषयावरूनही भाजपचीच कोंडी झाली. त्यांची पदवी बोगस असल्याचा आरोप करणाऱ्या भाजप सदस्यांना सुधाकर बडगजुर यांनीच उघडे पाडले. पंगुडवाले यांची बदली आणि त्यांच्यावरील आरोपामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे विद्यापीठाने त्यांनी बीएडची डीग्री ही बीएची पदवी तपासूनच दिली असेल, असे सांगत त्यांना २०१० मध्येच मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाशी २०१४ च्या डीग्रीचा काय संबंध, असा सवाल केला. शिक्षण क्षेत्रात राजकीय हेतूने कारवाई होऊ नये, असा टोला हाणत त्यांना निवड श्रेणी ही उपासनी यांनीच दिली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पलटी खाल्ली, तर आरोप करणाऱ्यांची बोलतीच बंद झाली.


नितीन उपासनी हे यापूर्वीही वादग्रस्त राह‌िले आहेत. जिल्हा परिशदेचे शिक्षक त्यांनी महापालिकेत वर्ग करून घेतले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

- दिनकर पाटील, सभागृहनेते

केंब्रिज शाळेतील प्रवेश प्रकरणात संस्थाचालकावर गुन्हा दाखल होण्याऐवजी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाला. संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई शिक्षण विभागाकडून अपेक्षित होती. परंतु ती झाली नाही.

- शाम बडोदे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर अवतरणार ज्ञानाचा खजिना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विद्यार्थ्यांसह मोठ्यांनाही बहुविध ज्ञानाचा खजिना याचि देही याचि डोळा अनुभवण्याची संधी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दि. २४ ते २६ जुलैदरम्यान मिळणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे वैशिष्ट्यपूर्ण सायन्स एक्स्प्रेस येत्या सोमवारी येथे येणार असून, त्यानिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने जय्यत तयारी केली आहे. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत फ्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सकाळी दहा ते सायंकाळी सहादरम्यान मोफत पाहता येईल. त्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटातूनही सूट देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना देशातील महत्त्वाची निसर्गसंपदा, पर्यटनस्थळे माहिती व्हावीत, पर्यावरण जागृती व्हावी, विज्ञानातील करामती, ग्रह-ताऱ्यांची माहिती मिळावी म्हणून भारतीय रेल्वेने १७ फेब्रुवारी ते ८ सप्टेंबरदरम्यान सायन्स एक्स्प्रेस सुरू केली आहे. ती नाशिकसह ६८ स्थानकांत थांबणार आहे.

कोचनिहाय ज्ञानवर्धनाची पर्वणी

सायन्स एक्स्प्रेस म्हणजे तेरा डब्यांची आधुनिक एसी रेल्वेगाडी आहे. त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन आहे. माहिती देण्यासाठी तज्ज्ञ असून, मानवामुळेच जलवायू परिवर्तन होऊन पृथ्वी संकटात कशी सापडली आहे याची माहिती पहिल्या कोचमध्ये देण्यात येते. दुसऱ्या कोचमध्ये भारताने जलवायू बदलाबाबत का चिंता करावी, जलवायू बदलामुळे मानवाचे आरोग्य कसे धोक्यात आले आहे व जागतिक तापमानवाढ कशी होते, याची माहिती आहे. प्रदूषण टाळण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात काय पर्याय उपलब्ध आहेत हे तिसऱ्या आणि चौथ्या कोचमध्ये सांगितले जाते. माणसाची जीवनशैली तातडीने बदलली आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा व स्रोतांचा वापर केला, तरच पृथ्वीचा विनाश टळणार आहे. ते कसे करता येईल, याचे ज्ञान पाचव्या कोचमध्ये मिळते. जलवायू परिवर्तन थांबविण्यासाठी भारताने धोरणे, वित्त, तंत्रज्ञान, प्रशिक्षण याद्वारे अनेक उपाय सुरू आहेत. त्यांची माहिती सहाव्या कोचमध्ये देण्यात येईल.

जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, करार करण्यात आले आहेत. याबाबत कोच सातमध्ये माहिती मिळते. पर्यावरण वाचविण्यासाठी कोणत्या शंभरावर कल्पना आहेत याची माहिती आठव्या कोचमध्ये मिळते. प्रवाळ, कासव, वाघ, साप आदी पर्यावरणरक्षणात कशी भूमिका बजावतात याची माहिती कोच नऊमध्ये मिळते. नागरिकांमध्ये पशू-पक्षी, झाडे याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उपाय येथे सांगितले आहेत. कृषी, औषध, लसीकरणबाबत झालेले नवीन संशोधन, आघाडीच्या संशोधन संस्था यांची माहिती कोच दहामध्ये मिळते. अकरा नंबर कोच हा सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विकसित केला आहे. प्रदर्शन पाहणाऱ्यांनी प्रेरणा घेऊन समस्या कशा ओळखाव्यात आणि स्वतःच तंत्रज्ञान तयार करून समस्या कशा सोडवाव्यात, याची माहिती कोच नंबर अकरात मिळते. या कोचमध्ये एनर्जी इफिशिएंट स्टोव्ह, नैसर्गिक डायपासून केलेली खेळणी, हातपंप, मल्टी ट्री क्लायम्बर, शुगरकेन बड चिपर आदी प्रयोग केलेले आहेत.

--

मुलांसाठी स्पेशल

लहान मुलांसाठी कोच नंबर बारा आहे. येथे दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना विज्ञानाच्या जादू, तसेच वैज्ञानिक प्रयोग शिकविले जातील. वैज्ञानिक खेळ, कोडी सोडवून घेतली जातील. मुलांमध्ये गणित व विज्ञानविषयक दृष्टिकोन वाढीस लागावा हा या मागील उद्देश आहे. तेरा नंबर कोचमध्ये इयत्ता सहावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करता येतील. या कोचमध्ये गणित, विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, जलवायू परिवर्तन, जैव तंत्रज्ञान आदींचे मॉडेल असून, मुलांना त्यांची जिज्ञासा शमवता येणार आहे. या कोचमध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण मिळणार आहे. याशिवाय प्लॅटफॉर्मवरही वैज्ञानिक खेळ, प्रश्नोत्तरे आदी स्पर्धा होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घरच्या घरी ‘चॉकलेट मेकिंग’ची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. २३) दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराजवळ, पंचवटी येथे हे वर्कशॉप होणार आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर्स आणि बंपर प्राइज जिंकण्याची संधीही सहभागी झालेल्यांना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांच्या आवडीचा विषय असतो, तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट ठरतो. त्यासाठी सर्वांनाच आवडणारे चॉकलेट्स तुम्हाला घरी बनवता आलेत तर? सर्वांची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी होणाऱ्या या वर्कशॉपमध्ये सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे तसेच, चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राउनिज आदी बनवून दाखविणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत असून, या वर्कशॉपसाठी नावनाेंदणी आवश्यक अाहे. त्यासाठी ७०४०७६२२५४ किंवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

सेल्फी विथ पॅरेंट स्पर्धेचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे सेल्फी विथ पॅरेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वाचकांनी पालकांसोबतचा सेल्फी events.mata@gmail.com या ई-मेलवर शनिवार (दि. २२)पर्यंत पाठवायचा आहे.

भाग्यवान ५० विजेत्यांना हेल्थ चेकअप व्हाउचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइज जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

पालकांसोबतचा सेल्फी वरील ई-मेलवर मेल करा आणि चॉकलेट कसे बनवायचे हे शिकण्यासाठी आजच चॉकलेट मेकिंग वर्कशॉपसाठी नावनोंदणी करा, सोबत व्हाउचर्स आणि बंपर प्राइजेस जिंकण्याची संधीही मिळवा. अधिक माहितीसाठी ०२५३-२६६३७९८७ किंवा ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकाचौकात कचराकोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील कचरा संकलनाचे घंटागाडी ठेकेदारांकडून योग्य नियोजन होत नसल्याने शहरात सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने निर्माण होणाऱ्या कचराकोंडीने चौकाचौकांना ओंगळवाणे स्वरूप आल्याची स्थिती असून, दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील विविध चौकांत सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात कचरा संकलनाची घंटागाडीची वेळ दुपारनंतरची आहे, अशा भागात विशेषतः कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जीपीएस प्रणालीचा वापर होत असल्याने आता घंटागाडी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या मार्गावरील सर्व कचरा संकलित करावा लागत आहे. परिणामी कचरा संकलनासाठी उशीर होताना दिसत आहे. काही प्रभागांत तर दुपारनंतरच कचऱ्याचे संकलन केले जाते. त्यामुळे अशा प्रभागांत दिवसभर कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे.

--

वर्दळीच्या भागात ढीग

शहरातील बहुतांश चौकांत आजूबाजूच्या व्यावसायिकांसह नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. परिणामी असे चौक आता चौक न राहता त्यांना कचराकुंडीचे स्वरूप येऊ लागले आहे. शहरासह नाशिकरोड भागातील विशाल मॉल, वॉस्को चौक, जयराम हॉस्पिटल चौक, राजेंद्र कॉलनी अादी वर्दळीच्या परिसरातील चौकांत दररोज कचऱ्याचे ढीग साचलेले आढळून येत आहेत. या भागात घंटागाडी येण्याची वेळ उशिराची असल्याने होणारी कचराकोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

--

कारवाईशून्य कारभार

सार्वजनिक जागेवर व उघड्यावर कचरा टाकणे कायदेशीर कारवाईस पात्र असतानाही महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

--

स्थानिक रहिवासी बेजार

सध्या रिमझिम पाऊस पडत असल्याने ज्या चौकांत कचरा साचलेला आहे अशा ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्यात पावसाचे पाणी साचत असल्याने कचरा कुजण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच काही ठिकाणी भटकी जनावरेही कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त करीत असल्याने काही ठिकाणचा कचरा आजूबाजूला पसरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी बेजार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदोष मीटरची बिले भरू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नियमितपेक्षा वेगात फिरणाऱ्या सदोष मीटर्सच्या आधारे येणाऱ्या ब‌िलांच्या माध्यमातून ग्राहकांकडून लाखो रुपयांची वसुली केली जाते. अशा ग्राहकांनी वीज‌बिले भरू नयेत, असा खुलासा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केला आहे.

शहरात वीज कंपनीकडून वेगात चालणारी सदोष मीटर्स परस्पर बसवून अवास्तव वीज बिलाची आकारणी केली जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दरमहा येणाऱ्या नियमित वीज बिलापेक्षा दुप्पट, तिप्पट जादा वीज बील, वीज मीटर्सचे फोटो न काढता अवास्तव बील देणे हे ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ व वीज कायदा २००३ नुसार बेकायदेशीर असून, वीज कंपनी अनुचित व्यापारी प्रथेने अशा प्रकारची वीज बिले देत आहे. ग्राहकांना मीटरचे फोटो काढून दरमहा वीज बिल देणे व २१ दिवस अगोदर बील देणे वीज कायदा, २००३ नुसार बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांना स्वतः नवीन मीटर विकत आणून बसविण्याचा अधिकार आहे. ग्राहकाने स्वतःचे मीटर बसविण्यास असमर्थ असल्याचे वीज कंपनीला लेखी कळविले तरच वीज कंपनी आपले मीटर बसवू शकते. वीज कंपनीने मीटर बसवल्यास मीटर योग्य चालू असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. ‘आधी वीजब‌िल भरा मगच तक्रार करा’ या पध्दतीने वीज कंपनी सक्ती करते ते बेकायदेशीर आहे. वीज कायदा २००३च्या कलम ५६ नुसार अंदाजे, सरासरी, अवास्तव वीज बिलापोटी हक्क राखून मागील महिन्याच्या ब‌िलाएवढी बील रक्कम चेकद्वारे कंपनीत भरता येते व वादग्रस्त ब‌िलाची तक्रार निकाली निघेपर्यंत कंपनीस ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसांची लेखी नोटीस दिल्याशिवाय वीज पुरवठा बंद करता येत नाही. जादा ब‌िलाच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण केंद्रात तक्रार करावी, मात्र अवास्तव बिल भरू नये असे आवाहन नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या कातड्यासह नाशिकच्या एकास अटक

$
0
0

टीम मटा नाशिक/ठाणे

बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या नाशिकच्या एका व्यक्तीस गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले असून, ५० हजार रुपये किमतीच्या या कातड्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४० लाख रुपये किंमत असल्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पेठ तालुक्यातील करंजाळी येथील रामचंद्र एकनाथ भुसारे (वय ५९) असे या आरोपीचे नाव आहे. या बिबट्याची शिकार नाशिकमध्ये करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पेठच्या मुली नाशिकला

नाशिक : पेठ येथील अनाथ बालगृहात एका बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन जागे झाले आहे. महिला व बालकल्याण उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी या बालगृहाला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या ५८ मुलींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे, तर या गुन्ह्यातील आरोपी तथा बालगृह संचालिका सुशीला अलबाड आणि त्यांचा मुलगा अतुल अलबाड यांना त्र्यंबकेश्वरच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीबाबत आणि त्यांना आढळलेल्या बाबींबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

बंधारा फुटल्याने पिकांचे नुकसान

कळवण ः मुळाणे वणी (ता. कळवण) येथील वनबंधारा फुटल्याने पिकांचे नुकसान झाले, तर पश्चिम पट्ट्यात बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बिलवाडी येथील नदीला पूर आला. या पुरात पाच जनावरे वाहून गेल्याने १ लाख ६८ हजारांचे नुकसान झाले आहे. मोकभणगी येथील काही घरांची पडझड झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळवणमध्ये ३३ मिलिमीटर, तर तालुक्यात एकूण सरासरी २२२.४७ मिमी पावसाची बुधवारी नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळवाड्याचे पाणी पेटले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तळवाडे साठवण तलावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करून दाभाडी गावास पाणी देणे व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांततर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यावरून गुरुवारची महासभा गाजली. साठवण तलावातून दाभाडीसाठी ५० एमटीएफसी पाण्यासाठी मतदान घेऊन मंजुरी देण्यात आली.

पालिका सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थित महासभा झाली. नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थित ही पहिलीच महासभा होती. विषयपत्रिकेवर शिवसेना गटनेते नीलेश आहेर यांच्या सुचनेवरून पालिकेच्या तळवाडे साठवण तलावाचा पाणी पुरवठ्याचा नियोजनाचा विषय चांगलाच तापला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावातून दाभाडीसाठी पाणी

देण्याबाबत आहेर यांनी आग्रही भूमिका मांडली. महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल, एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज आदींनी आक्षेप घेतला. त्यामुळे महासभेत गोंधळ झाला.

मानवतेच्या भावनेतून या दाभाडीसाठी पाण्याचे आवर्तन देण्यात यावे अशी मागणी आहेर यांनी केली. एमआयएमचे गटनेते खालिद यांनी शहाराचा पाणीसाठा जैसे थे राहणार असल्यास पाणी देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र बुलंद इक्बाल यांनी उपसूचना मांडल्याने त्यावर हात उंचावून मतदान घेण्यात आले. शिवसेनेच्या ठरवाच्याबाजूने एमआयएमच्या नगससेवकांनी मतदान केल्याने यास मंजुरी देण्यात आली. यासह शहरातील हागणदारीमुक्त अभियानाचा विषयावर देखील जोरदार चर्चा झाली.

या विषयांना मंजुरी

मनपा कर्मचारी, अधिकारी यांच्या वैद्यकीय भत्ता वाढ

मनपा हद्दीत उद्यान व ग्रीन स्पेस विकसित करणे

नादुरुस्त शौचालय दुरुस्तीसाठी खर्चास मंजुरी

मनपाने नेमून न दिलेल्या जागेत कचरा फेकल्यास दंड

आरोग्यविषय सेवांचे शुल्क रद्द करणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊसकवितांत श्रोते चिंब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘अरे नाभाळ्या तू घेणा, तुला वावर आंगण’, ‘ती हसावी जराशी, अमृतरू मोहरावा’ अशा पावसाच्या कवितांमध्ये रसिक श्रोते चिंब झाले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेने घेतलेल्या पावसावरील ‘रंग अक्षरांचे’ या कवी संमेलनाचे. बाहेर सुरू असलेला पाऊस आणि आत सुरू असलेले कविता सादरीकरण यामुळे कार्यक्रमात रंगत आली.

नाशिकरोड येथे झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी विवेक उगलमुगले होते. कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, नाशिकरोड बँकेचे जेष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, मविप्रचे सभापती नितीन ठाकरे, मंगला सातभाई, पी. बी. गायधनी, रवींद्र मालुंजकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा न्यायाधीश वसंत पाटील, प्रा. शंकर बोऱ्हाडे, प्रशांत केंदळे, डॉ. माधवी मुठाळ, अलका अमृतकर, राजेंद्र उगले, संतोष हुदलीकर, काशिनाथ महाजन, भक्ती आठवले, वृषाली सातम, पांडुरंग कुलकर्णी, राजेंद्र सोमवंशी, नितीन कोकणे, रामचंद्र शिनाडे आदींनी कविता सादर केल्या. कवी प्रशांत केंदाळे यांच्या कवितांना रसिकांनी वन्समोअर दिला.

उगलमुगले म्हणाले की, पाऊस म्हटला की आपल्याला आठवतात कविता. आज पडणारा पाऊस आणि कविता यांचा संगम म्हणजे अनोखा योगच. त्यामुळे आजच्या पावसाने या कवी संमेलनाची मजा वाढवली आहे.

दशरथ लोखंडे, राहुल बोराडे, महेश वाजे, कामिनी तनपुरे, रमेश औटे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, संतोष हुदलीकर, मानसी घमंडी, मनीषा विसपुते, अलका अमृतकर, मंगला सातभाई, सुशांत उबाळे, हर्षल भामरे, शिवाजी म्हस्के, रमेश औटे, राहुल बोराडे, महेश वाजे, ज्ञानेश्वर बोराडे आदींनी संयोजन केले.

भाऊसाहेब बोराडे स्वागत तर सुजाता हिंगे यांनी सूत्रसंचलन केले. राहुल बोराडे यांनी स्वागतगीत म्हटले. अंबादास गोडसे यांनी आभार मानले.


पाऊस व दंगल

पाऊस एकदा हिंदू-मुसलमानाच्या दंग्यात सापडला, हिंदूने मुसलमान म्हणून झोडपला, मुसलमानांनी हिंदू म्हणून झोडपला. ‘मी पावसाला कोपऱ्यात रडताना पाहिले’ ही कविता टाळ्या मिळवून गेली. ‘तिला पाऊस खूप आवडतो, मला पावसात ती, त‌िला बोलायला खूप आवडते, मला बोलताना ती, मला ती खूप खूप आवडते, त‌िला आवडत नाही मी, खड्ड्यात गेला पाऊस आणि खड्ड्यात गेली ती’ ही कविताही दाद देऊन गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावली धरण ओव्हर फ्लो

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्याची जीवनवाहिनी व संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिले भरणारे धरण म्हणून ख्याती असलेले भावली धरण गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले. गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत होती.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. तालुक्यातील कडवा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. दारणा धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असून, विसर्गही सुरू आहे. गुरुवारी दुपारी चारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहू लागले. धरणातून २५० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती तहसीलदार अनिल पूरे यांनी दिली. गतवर्षी २७ जुलै रोजी हे धरण भरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकांची रणधुमाळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी दीपमाला चौधरी यांनी सोडत जाहीर केली. शहरात एकूण आठ प्रभाग आहेत. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सोडत जाहीर करताना मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, संजय मिसर उपस्थित होते.
लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याप्रमाणानुसार अनुसुचीत जातीकरिता एक जागा, अनुसुचीत जमातीकरिता ६ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग ५, सर्वसाधारणसाठी ५ जागा अशी विभागणी झाली आहे. ५० टक्के आरक्षणानुसार महिलांसाठी ९ जागा राखीव आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झालेले आहे ते सर्वसाधारण जागेसाठी आहे. मतदारांमधून थेट निवड असल्याने १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष असे १८ लोकप्रतिनिधी यावेळेस निवडून येणार आहेत. अनाजी रणमाळे या लहान मुलाने सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. नगराध्यक्षा तृप्ती धारणे, शामराव गंगापुत्र, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे उपस्थित होते.

शहरात ‘स्मार्ट पोल’ची चर्चा

त्र्यंबकमध्ये सोशल मीडयिावर ‘स्मार्ट पोल’ या वेबसाइटची धूम सुरू झाली असून, त्र्यंबकचा भावी नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा याबद्दल चाचणी घेतली जात आहे. स्मार्ट पोल या वेबसाइटवर स्वतःचा प्रश्न तयार करता येतो. त्याचे पाहिजे त्या संख्येत पर्याय निवडण्याचे बटन तयार होतात. त्यानंतर तेथे निकाल देखील पाहता येतो. ही लींक शेअर करता येते. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडला जाणार असल्याने या वेबसाइटची अधिक चर्चा आहे. सोशल मीडयिावर असे पोल घेण्यात येत आहेत.

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव आरक्षण स्थिती

प्रभाग १ अ, अनु. जमाती (स्त्री राखीव),

प्रभाग १ ब, सर्वसाधारण



प्रभाग २ गुळवेवाडी, दोबाडे वाडी, तलाठी कॉलनी, कामगार कॉलनी, पोस्टलेन २ अ, अनु. जमाती



प्रभाग २ ब, सर्वसाधारण (स्त्री राखीव)



प्रभाग ३ राजवाडा, इंदिरा नगर ३ अ, अनु. जमाती

3 ब, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)



प्रभाग ४ पाटील लेन, कडलग लेन ४ अ, अनु. जमाती (स्त्री राखीव)

४ ब, नागरिकांचा मागास प्रवर्ग



प्रभाग ५ गोकुळदास लेन, गायधनी लेन,

तेली गल्ली, कोथे गल्ली ५ अ, अनु. जाती (स्त्री राखीव)

५ ब, नागरिकांचा मागास प्रवर्ग



प्रभाग ६ गढई, पाच आळी, बल्लाळेश्वर चौक ६ अ, अनु. जमाती

६ ब, सर्वसाधारण (स्त्री राखीव)



प्रभाग ७ मेनरोड, रतनलेन, लक्ष्मीनारायण चौक,

पाच आळी ७ अ, नागरिकांचा मागासप्रवर्ग (स्त्री राखीव)

७ ब, सर्वसाधारण



प्रभाग ८ टेलीफोन एक्सचेंज कॉलनी, वेताळ आळी, भांगरे आळी ८ अ, अनु. जमाती (स्त्री राखीव)

८ ब, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)

८ क, सर्वसाधारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महासभेत चक्क गायीला वाहिली श्रद्धांजली!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून गायीचे महत्त्व चांगलेच वाढले असून, दिल्ली ते गल्ली गायीने सध्या संपूर्ण जीवन व्यापून टाकले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला आणि भाजपलाही गाय ही प्रिय असल्याने त्याचा फायदा घेत कथित गोरक्षकांनीही देशभर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गायीचा विषय आला, की भाजपचे पदाधिकारी हे चांगलेच हळवे होतात. त्याचाच प्रत्यय गुरुवारी महासभेत आला. सिडकोत विजेचा शॉक लागून मृत्युमृखी पडलेल्या गायीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव सादर करून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला खरा; पण भाजपनेही तो घाईघाईत दाखल करून घेत, इतर मान्यवरांबरोबरच या गायीलाही श्रद्धांजली वाहून गायीप्रती आपली निष्ठा दाखवली. गायीला श्रद्धांजली अर्पण करण्याची कदाचित ही पहिलीच घटना आहे.

प्रभाग क्र. २५ मधील पवननगरमध्ये गेल्या १३ तारखेला विजेचा धक्का बसून एका गायीचा मृत्यू झाला होता. भूमिगत केबलमुळे गायीला विजेचा धक्का लागून ती जागेवरच मृत्युमुखी पडली होती. संबंधित प्रभागात शिवसेनेचे तीन, तर भाजपचा एक नगरसेवक आहे. शिवसेनेचे श्यामकुमार साबळे यांनी या गायीची विधिवत पूजा करून तिचे दफन केले. मात्र, यंत्रणेच्या चुकीमुळे संबंधित गायीला जीव गमवावा लागल्याचे दुःख साबळे यांना चांगलेच जिव्हारी लागले. भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत यंत्रणेच्या अकार्यक्षमतेने गायीचा मृत्यू झाल्याने साबळे यांनी भाजपचीच कोंडी करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारच्या महासभेत साबळे यांनी चक्क या गायीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली.

श्रद्धांजलीचा हा प्रस्ताव स्वीकारला नाही तर गायीबद्दलचे बेगडी प्रेम उघडकीस येईल या भीतीपोटी महापौरांनी हा प्रस्ताव स्वीकारत सायकलपटू जसपालसिंग विर्दी, अभिनेत्री उमा भेंडे यांच्यासोबतच गायीलाही दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महासभेत चक्क गायीला श्रद्धांजली वाहण्याची कदाचित ही देशातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका महासभेच्या इतिहासात नव्या घटनेची नोंद झाली असून, भाजपेयींनीही आपल्याला माणसांप्रमाणेच गायही प्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.

मृत्यूचीही चौकशी

श्यामकुमार साबळे यांनी या गायीला श्रद्धांजली वाहण्यासह तिच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. महापौरांनी ही मागणीही मान्य करीत, गायीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश विद्युत विभागाला दिले आहेत. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आता गायीच्या मृत्यूची चौकशीही केली जाणार आहे. त्यामुळे गायीच्या मृत्यूचे भूत अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणे, त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती व त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायासंबंधी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. २०) सकाळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने धुळे विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करीत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या काळात या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचेही संघटनेने सांगितले आहे.

एसटी कामगारांचा वेतन करार प्रलंबित असून कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाण्‍ाे सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावा, सात टक्के महागाई भत्ता लागू करून त्याचा फरक त्वरित देण्यात यावा, चालक कम वाहक ही दुहेरी कामगिरी बंद करावी, कामगारांना जाचक असे शिस्त अपील कार्यपद्धतीचा गैरवापर करून काढण्यात आलेले जाचक परिपत्रके रद्द करावे, लांब पल्ल्याच्या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्या यासह विविध मागण्या प्रलंबित असल्याने त्याकडे महामंडळ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, सचिव संतोष वाडीले, उपाध्यक्ष जी. एस. ठाकरे, रवींद्र शिरसाठ, दिलीप राजपूत, सुजित पाटील, टी. के. पठाण, नाना भामरे, दिलीप वळवी, गणेश मराठे, प्रवीण सोनार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व एसटी चालक-वाहक, कामगार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्सल्टंटच्या अहवालावर धावणार शहर बस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात रस्त्यांची निर्मिती शास्रोक्त पद्धतीने करून अपघात रोखण्यासाठी महासभेने स्ट्रीट डीझायनरच्या नियुक्तीसह सुरक्षितता अहवाल तयार करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच पालिकेने शहर बससेवा चालवावी की नाही याबाबतही कन्सल्टंटची नियुक्ती केली जाणार असून, त्याच्या अहवालावर शहर बससेवेचे भविष्य अवलंबून राहणार आहे. सोबतच पालिकेच्या मालकीचे असलेले मोठे प्रकल्प बीओटीवर देण्यासाठी कन्सल्टंट नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे.

महासभेत शहर बससेवेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कन्सल्टंट नियुक्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. सध्या शहरात शहर बससेवा ही एसटी महामंडळामार्फत चालविली जाते. मात्र त्यांनी याबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे पालिकेने शहर बससेवेचे करायचे काय, याबाबत कन्सल्टंट नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रस्तावाला गुरुवारी महासभेत मंजुरी मिळाली. संबंधित कन्सल्टंट कंपनी महापालिका बससेवा चालवण्यास सक्षम आहे की नाही याबाबतच अहवाल सादर करणार आहे. सोबतच अनेक ठिकाणी रस्त्यांची वळणे, चौक, सिग्नल्स धोकादायक असून, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ते सोयीचे नाहीत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांचा शास्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सूचना करण्यासाठी स्ट्रीट डीझायनरच्या नियुक्तीलाही मंजुरी मिळाली आहे. रस्त्यांच्या नियोजनासोबत मोठ्या प्रकल्पांसाठी कन्सल्टंट नियुक्त केला जाणार आहे. दादासाहेब फाळके, पेलिकन पार्क, तारांगण, नेहरू उद्यान यांसारखे बडे प्रकल्प पालिकेसाठी डोईजड झाले आहेत. हे सर्व प्रकल्प पीपीपीच्या धर्तीवर खासगी कंपन्यांना देण्याचा विचार आहे. पालिकेने आता कन्सल्टंट नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या महासभेत सत्ताधारी भाजपच्या मानगुटीवर बसलेले पावसाळी गटार योजनेचे भूत गुरुवारच्या महासभेत पुन्हा एकदा थैमान घालणार असे चित्र होते. मात्र पावसाळी गटार योजनेवर चर्चा न करताच या विषयाला सोईस्करपणे बगल ‌देण्यात आली. तो विषय वगळता इतर विविध विषयांवरून भाजपची कोंडी करण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही. त्यामुळे मताधिक्य असूनही अभ्यासू नगरसेवकांच्या कमतरतेमुळे सत्ताधाऱ्यांना बँकफूटवर यावे लागले.

गटार योजनेवरून गेल्या महासभेत दिनकर पाटील यांनी शिवसेनेच्या अजय बोरस्तेंसह सुधाकर बडगुजर यांची कोंडी केली होती. मात्र बोरस्तेंनी तत्काळ खुलासा करून पाटील यांच्यावरच बाजी पलटवली होती. त्यामुळे गत सभेप्रमाणेच या सभेकडेही सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही अभ्यास करून आले होते. नेहमीप्रमाणे भाजपला या सभेतही अभ्यासू नगरसेवकांची कमतरता जाणवली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही. भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर विरोधकांना न जुमानता आपल्या सोयीचे निर्णय घेत, विरोधकांना धोबीपछाड दिली. गायीला श्रंद्धांजली वाहणे, शाहू महारांजा फोटो, प्रश्नोत्तरे, दीडशे कोटींचे कामे यासह विविध विषयावर भाजपला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही.

गटार योजनेचे भूत शांत

पावसाळी गटार योजनेच्या चौकशीचे भूत पालिकेत गेल्या चार पाच वर्षांपासून कायम आहे. पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कोंडीत पकडायचे असेल, तर तीन कोटींच्या गटार योजनेच्या चौकशीला फोडणी दिली जाते. गेल्या महासभेत दिनकर पाटील यांनी बोरस्ते व बडगुजर यांना कोंडीत पकडले होते. तर बडगुजर यांनी तत्कालीन अभियंता सुनील खुनेंच्या कामावर घेण्याच्या प्रवासावर प्रश्नोत्तरे दाखल केली होती. ही प्रश्नोत्तरे आज चर्चेला येणे अपेक्षित होते. परंतु दिनकर पाटील यांनी तांत्रिकतेचा मुद्दा उपस्थित करून हा विषय टोलवला. तर बडगुजरांनीही सबुरीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे गटारीचे भूत अचानक कसे शमले याचीच चर्चा होती.

शाहू महाराजांवरून कोंडी

शिवसेनेचे सदस्य प्रशांत दिवे यांनी महापौर व सत्ताधारी भाजपची शाहू महाराजांच्या प्रतिमेवरून चांगलीच कोंडी केली. सभागृहात आरक्षणाचे जनक असलेल्या शाहू महाराजांची प्रतिमा लावावी, अशी मागणी केली होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने दिवे यांनी शाब्दिक हल्ल्याने महापौरांची कोंडी केली. महापौरांनी सभागृहात शाहू महाराजांची प्रतिमा लावू, असे आश्वासन दिले. दिवे एवढ्यावरच न थांबता, त्यांनी थेट प्रतिमाच भेट देवून महापौरांसह भाजपची कोंडी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीच्या आरक्षणावर आक्षेप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी नगरपरिषदेच्या १८ जागांसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. नऊ प्रभागातील प्रत्येकी दोन अशा १८ जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.

नियंत्रण अधिकारी तथा प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सोडतीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राहुल पाटील यांनी दूरध्वनीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रभाग रचना प्रसिद्ध नसताना सोडत काढण्यात आली. जातीनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण न काढता नियम मोडून सरसकट आरक्षण काढले गेले आहे, असा अरोप जाधव यांनी केला.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग १ (अ), अनुसुचित जाती.
(ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्‍त्री राखीव)
प्रभाग २ (अ) - अनुसुचित जमाती
(ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्‍त्री राखीव)
प्रभाग ३ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
(ब) सर्वसाधारण
प्रभाग ४ (अ) अनुसुचित जाती
(ब) सर्वसाधारण (स्‍त्री राखीव)
प्रभाग ५ (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
(ब) सर्वसाधारण (स्‍त्री राखीव)
प्रभाग ६ (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
(ब) सर्वसाधारण (स्‍त्री राखीव)
प्रभाग ७ (अ) अनुसुचित जाती (स्‍त्री राखीव)
(ब) सर्वसाधारण.
प्रभाग ८ (अ) अनुसुचित जाती (स्‍त्री राखीव)
प्रभाग ९ (अ) अनुसुचित जमाती (स्‍त्री राखीव)
(ब) सर्वसाधारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images