Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुभाजकांतील झाडांना मिळतोय वेगळा न्याय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरातील दुभाजकातील झाडे वाढूनही त्यांची छाटणी केली जात नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बिटको ते देवळालीगाव दरम्यानच्या दुभाजकातील झाडांची व्यवस्थित छाटणी करण्यात आली आहे. कारण महापालिकेने एका बिल्डरला ही जबाबदारी दिली आहे.

बिटकोपासून जेलरोडच्या जनार्दन स्वामी पुलापर्यंत दुभाजकात झाडे लावण्यात आली आहेत. काही आपोआप वाढली आहेत. त्यांची छाटणी होत नसल्याने वाहनचालकांना माणूस किंवा जनावर अचानक रस्त्यात आल्यास दिसत नाही. त्यामुळे अपघात घडल्याची उदाहरणे आहेत. काटेरी झाडे दुभाजकाबाहेर आल्याने वाहनचालकांना दुखापत होण्याची भीती आहे. काही ठिकाणी झाडे वाळून गेली आहेत.

बिटको चौकापासून देवळाली गावापर्यंतच्या दुभाजकात झाडे लाऊन सुशोभीकरण करण्यात आले आहे. एका बिल्डरला ही जबाबदारी स्वीकारली आहे. तो नियमितपणे झाडांचे कटिंग करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे सुरक्षित झाले आहे. जेलरोड, नाशिकरोड, उड्डाणपुलावर चांगली झाडे लाऊन त्यांची योग्य देखभाल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘क्वीन्स’ है हम...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्सुकता... भारावलेपण आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा उत्साह... अशा वातावरणात वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ पॉवर्ड बाय ‘सोनी पैठणी’ स्पर्धेचे चौथे ग्रुमिंग सेशन बुधवारी पार पडले. सकाळी अकरा वाजता नवीन डान्स अकॅडमीचे नवीन तोलानी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रँड फिनालेसाठी इंट्रोडक्शन कसे असावे, याचे प्रशिक्षण तरुणींना देण्यात आले. यासोबतच फिनालेतील वेस्टर्न आणि साडी या आउटफिटवरच्या रॅम्पवॉक राउंडच्या परफॉर्मन्सची जय्यत तयारी करून घेण्यात आली. दुपारी स्पर्धेचे फॅशन पार्टनर असलेल्या आयएनआयएफडी इन्स्टीट्यूटमध्ये मॉडेलिंग करताना फॅशनेबल कसं रहावं, याच्या टिप्स स्पर्धकांना देण्यात आल्या. आयएनआयएफडी फॅशन इन्स्ट‌िट्युटचे संचालक सूरजित मनचंदा आणि फॅकल्टी एक्सपर्स्टसनी या टिप्स तरुणींना दिल्या.

श्रावणक्वीन ग्रुमिंग सेशनमध्ये तरुणींचा उत्साह दिवसेंदिवस वाढता आहे. आपल्या परफॉर्मन्सने ही स्पर्धा गाजवायचीच, हेच स्वप्न प्रत्येकीच्या डोळ्यात दिसतेय. ग्रुमिंग सेशनमध्ये विविध तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत तरुणी खऱ्या अर्थाने मॉडेलिंग विश्वाकडे करीअर म्हणून बघत आहेत. ग्रुमिंगमध्ये स्वतःचं कौशल्य वाढवतानाच एकमेकींसोबतचं बॉण्डिंग आणखीन घट्ट करण्यात स्पर्धक मग्न आहेत. बुधवारी सकाळच्या ग्रुमिंग सेशनमध्ये स्पर्धकांना फायनलच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या. वेस्टर्न आऊटफिटवरचा रॅम्पवॉक आणि सेल्फ इंट्रोडक्शन याचा कसून सराव नवीन तोलाणी यांनी स्पर्धकांकडून करुन घेतला. ‘बोलण्यात आत्मविश्वास ठेवा. परफॉर्मन्स परफेक्ट करा. तुमचं व्यक्त‌िमत्त्व तुमच्या इंट्रोडक्शनमधून समजतं. तुमच्यातील नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता स्वतः थोडक्यात कौतुक करा.’ असा सल्ला यावेळी मिळाला. दुपारच्या फॅशन डिझायनिंग या सेशनमध्ये स्पर्धेचे फॅशन पार्टनर आयएनआयएफडीमध्ये फॅशनेबल राहण्यासाठी नेमके काय करायला हवे, कपडे म्हणजेच फॅशन नव्हे, तर तुमचा लूक आणि पर्सनालिटीदेखील फॅशनेबल असावी, असं आयएनआयएफडीच्या फॅकल्ट एक्सपर्स्टनी त्यांनी सांगितलं. अशा अनेक टिप्समधून श्रावणक्वीन फायनलिस्ट कमालीच्या ग्रूम होत आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धकांचा ‘मी’च स्पर्धा जिंकणार हा आत्मविश्वास आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठीची जिद्द ग्रुमिंग सेशनमध्ये दिसत आहे.

हा आमचा बहुमान

वैयक्तिकरित्या नाशिकची पहिली श्रावणक्वीन होत झगमगता मुकुट आम्हाला पटकवायचा आहे. आम्ही फायनलिस्ट झालो आहोत, हाच आमचा बहुमान आहे. आमच्यातून कोणीतरी एक श्रावणक्वीन होणार असली, तरी आम्ही सर्वजण या ग्रुमिंगमधून ‘क्वीन’ झालोच आहोत.


परफॉर्मन्सची सज्जता

श्रावणक्वीनची अंतिम फेरी सोमवारी रंगणार आहे. या ग्रँड फिनालेसाठीचा परफॉर्मन्स, इंट्रॉडक्शन आणि जजेसच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठीची जय्यत तयारी स्पर्धक करत आहेत. खास बाब म्हणजे, एकमेकींना परफॉर्मन्स सुचविले जात असून, एकत्रितपणे जजेसच्या संभाव्य प्रश्नांना सामोरे जाण्याची प्रॅक्ट‌िस केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम होणार नाशिकमध्ये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकच्या उद्योगांना बळ मिळावे यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिकमध्ये ‘वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम’वर केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे शिक्कामोर्तब केले. यात सहभागी होण्यासाठी देशभरातील दहा मोठ्या सरकारी कंपन्यांनी अनुकूलता दर्शविल्याने ‘मेक इन नाशिक’च्या स्वप्नांना झळाळी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

बुधवारी नवी दिल्लीत गिते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात नाशिकमध्ये वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम होणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजडमंत्री अनंत गिते यांनी केली. या बैठकीस उपस्थित असलेल्या भारत सरकारच्या अंगिकृत मोठ्या दहा कंपन्यांनी सहभागी होण्यात रुची दर्शविली. यातील बहुतांश कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘डिफेन्स क्लस्टर’ कार्यक्रमात उत्सुकता दर्शविल्याने भविष्यात नाशिकमधील संरक्षण क्षेत्राशी संबंधीत उद्योगांना नवे बळ मिळण्याची शक्यता आहे.

आपला उद्योग सध्या नाशिकमध्येही असल्याने यापुढील सर्व प्रोजेक्ट आपण नाशिकध्येच घेऊ, असे एचएएलच्या प्रतिनिधींनी सांगितले. डिफेन्सस रेल प्रोजेक्टसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे भारत अर्थ मूव्हर्स कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. वूडकास्टींग, पिस‌िझन कंपोनंटस, इलेक्ट्रॉनिक्स मेट्रो उत्पादन करण्यासाठीही नाशिकला प्राधान्य देण्यास त्यांनी यावेळी सहमती दर्शविली. वेंडर डेव्हलपमेंट व स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करणार असल्याचे भारत इलेक्ट्रॉनिक्सने सांगितले. मॅच मेकिंग आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी माझगाव डॉकने उत्सुकता दर्शविली. एअरोस्पेस कास्टेबल मटेरियल अशा फॅक्टरीबाबत मिश्रा धातूने सहमती दर्शविली. गोवा शिपयार्डनेही या वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक उद्योग व्यवसायांसाठी कसे योग्य आहे याविषयी माहिती दिली.

नाशिकमध्ये ‘वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविण्यासाठी देशभरातील सुमारे दहा मोठ्या कंपन्यांनी अनुकुलता दाखविली आहे. या माध्यमातून या कंपन्या नाशिकमधील सर्व उद्योगांना एकत्र आणणार आहेत.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुरट्या चोऱ्यांनी सातपूरकर त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक विविध योजना अंमलात आणल्या आहेत. तरीदेखील सातपूर भागात भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने सातपूरकर त्रस्त झाले आहेत. गेल्याच महिन्यात सावकरनगर भागात दुचाकींच्या चोरी व घरफोडी झाल्याने नगरसेविका पल्लवी पाटील यांनी पोलिसांना निवेदन देत चोरट्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

सातपूर परिसरातील काही भागांत दुचाकींचे पेट्रोल चोरी करणारीही टोळी सक्रिय झाली असून, कामगारांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागातील रहिवाशी भयभीत झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अंबड-लिंकरोडवरील केवलपार्क येथील तुळजाभवानी देवीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पसार केले आहेत. नेहमीच चोरीच्या घटना होत असल्याने पोलिस आयुक्तांनी अंबड-लिंकरोडवर पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा

कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरू असताना दुचाकी व मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. सातपूर कॉलनीत घरफोड्यांसह दुचाकी चोरीला जात असल्याने पोलिसांना मात्र चोरट्यांचा सुगावाच लागत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सातपूर भागातील धृवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, सावरकरनगर, जाधव संकुल, जाधव टाऊनशिप, अंबड-लिंकरोडवर सर्वाधित भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

देवीचे दागिनेही लंपास

भुरट्या चोरांकडून मिळेल ती वस्तू लंपास करण्याचे काम होत असल्याने कामगार वस्तीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या गरजेच्या वस्तू चोरीला जात असल्याने पोलिसांनी याकडे द्यावे. तसेच या भुरट्या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. सातपूर कॉलनीत घरफोडीचे सत्र सुरू असताना अंबड-लिंकरोडवर पहिल्यांदाच केवल पार्क येथील तुळजाभवानी मंदिरात देवीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. देवी मंदिरात पहिल्यांदाच चोरी झाल्याने परिसरातील महिलांनी नाराजी व्यक्त करत पोलिस चौकी उभारण्याची मागणी केली आहे. चोऱ्यांची वाढती संख्या बघता पोलिस आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

सातपूरच्या कामगार नगरीत गेल्या काही महिन्यांपासून भुरट्या चोरांमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. दुचाकी व घरफोडीचे सत्र सुरू असतांना आता मंदिरांना देखील चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. अंबड-लिंकरोडवर पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र पोलिस चौकी उभारली पाहिजे.

गोरख घाटोळ, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोल्फ क्लबवर उभारणार ‘क्लॉक टॉवर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेनरोड येथे असलेल्या महापालिकेच्या मुख्य इमारतीवरील टॉवरच्या धर्तीवर नाशिक महापालिका हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे ‘क्लॉक टॉवर’ उभारणार आहे.

शहर अभियंता यू. बी. पवार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मेनरोड येथे महापालिकेच्या जुन्या इमारतीवर मोठा टॉवर असून त्यात घड्याळ आहे. शहरात पूर्वी खूप कमी लोकांच्या हातात घड्याळे असायची. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, भद्रकाली परिसरातील व्यापारी याच घड्याळावर अवलंबून होते. काही वर्षांपर्यंत या घड्याळाचे टोलही नाशिककरांना व्यवस्थित ऐकू येत होते. शहराच्या अनेक भागांतून हे घड्याळ दिसत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत नाशिक शहराचा झपाट्याने विकास झाला. मोठ्या इमारतींमुळे हे टॉवर आणि घड्याळ दिसेनासे झाले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जॉगिंगसाठी येणाऱ्या अनेक नागरिकांच्या हातात घड्याळ नसते. प्रत्येक जण एकमेकांना किती वाजले, असे विचारत असतो. त्यासाठी येथे घड्याळ असावे, अशी संकल्पना तत्कालीन नगरसेवक यतीन वाघ व सुजाता डेरे यांनी महापालिकेकेकडे मांडली होती. परंतु, मनसेची सत्ता गेल्यानंतर ही योजना मागे पडली होती. या प्रभागातील नगरसेविका हेमलता पाटील यांनी ही मागणी पुन्हा लावून धरली. त्या मागणीला मूर्त स्वरुप प्राप्त झाले असून ४० फूट उंचीच्या मनोऱ्यास परवानगी देण्यात आली आहे.

...असे असेल घड्याळ

सध्याच्या पॅव्हेलियनच्या वर ४० फूट उंचीचा टॉवर बांधण्यात येणार आहे. हा टॉवर म्हणजे मेनरोड कार्यालयाच्या टॉवरची प्रतिकृती असणार आहे. या टॉवरमध्ये असणाऱ्या घड्याळाची डायल १० फूट, तर काटे ९.५० फूट लांबीचे असतील. आतील सांगाडा स्टीलचा, तर बाहेरील भाग फायबरचा असणार आहे. हे टॉवर लान्सर कंपनी उभारणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरण दिघावकर ठरले ‘ऑफ‌िसर ऑफ द मंथ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त व सटाण्याचे सुपुत्र असलेले किरण दिघावकर यांनी आपल्या वैशिष्टेपूर्ण संघटन कौशल्याच्या जोरावर महापालिकेच्या ‘ए’ विभागाचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या कौशल्यपूर्ण कामाची दखल घेत त्यांना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते ‘ऑफ‌िसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबापुरीचे उल्लेखनीय व प्रेक्षणीय स्थळे असलेल्या गेट वे ऑफ इंड‌िया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका मुख्यालय, रिझर्व बँक ऑफ इंडिया, ताजमहल हॉटेल, वानखेडे स्टेडीयम, कफ परेड रोड, मरीन ड्राईव्ह, चर्चगेट या सारखी अनेक जगप्रसिद्ध ठिकाणे मुंबई महापालिकेच्या ‘ए’ विभागाच्या कार्यक्षेत्रात येतात. याच विभागाचे सहाय्यक आयुक्तपद हे सध्या सटाण्याचे भूमिपुत्र किरण दिघावकर यांच्याकडे आहे.

दिघावकर यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर स्वच्छ मुंबई, अतिक्रमण हटाव मोहीम, सुभोशिकरण या माध्यमातून विविध उपक्रम राबवून या विभागाचा चेहरामोहरा बदलला आहे. किरण दिघावकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सटाणा येथील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. २००७ पासून ते महापालिकेच्या सेवेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनाची प्रकरणे प्रथमच लोकन्यायालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी प्रकल्पांसाठी कधीकाळी जमिनी देणाऱ्या बाध‌ितांना वाढीव मोबदल्याची अपेक्षा असते. अधिक मोबदला अथवा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी प्रकल्पबाधित कोर्टाची एकेक पायरी चढत जातात आणि वर्षानुवर्ष त्यांना न्यायासाठी यंत्रणांचे उंबरे झिजवावे लागतात. अशा अधिकाधिक प्रकरणांचा झपाट्याने निपटारा करण्यासाठी नाशिकमध्ये प्रथमच एक अभिनव प्रयोग राबविण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने अशी प्रकरणे पूर्वतयारीनिशी लोकअदालतीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात अशी अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.

छोटी-मोठी अधिकाधिक न्यायप्रविष्ट प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्नशील असते. त्यासाठीच ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वच स्तरांतील विविध प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे भूसंपादन आणि आर्थिक मोबदल्याशी संबंधित प्रकरणे यंदा प्रथमच विशेषत्वाने हाताळण्यात येणार आहेत. त्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाने हात पुढे केला असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांना पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे. बुधवारी खास या विषयावरच जिल्हा न्यायालयात बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एस. तांबे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांसह वकील संघटनेचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी आणि वकील उपस्थ‌ित होते.

हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने विविध न्याय-निवाड्यांद्वारे भूसंपादन मूल्यांकनाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे निश्च‌ित केली आहेत. जमिनींचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रकल्पांसाठी वडिलोपार्जित जमिनी देणाऱ्या बाधितांनाही अधिक मोबदल्याची अपेक्षा असते. परंतु, सरकारी यंत्रणांना मर्यादीत अधिकार असल्याने भूसंपादन अर्ज प्रकरणांमध्ये समझोता होत नाही. त्यामुळे अशी प्रकरणे वर्षानुवर्षे खितपत पडतात. अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी या लोकन्यायालयांद्वारे प्रय‌त्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेण्याचे न‌िश्चित करण्यात आले.

अशी असेल प्रक्रिया

- भूसंपादनाशी संबंधित संपूर्ण प्रलंबित प्रकरणांची माहिती एकत्रित करणे

- कायदेतज्ज्ञांकडून अपेक्षित नुकसान भरपाईची माहिती गोळा करणे

- संबंधित वकिलांनी संपादन संस्थेची माहिती तसेच भूसंपादन निवाड्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांना देणे

- त्यावर संबंधीत खात्याकडून प्रस्ताव तयार करून मंत्रालय स्तरावर त्यास मान्यता घेणे

- प्रस्ताव मान्य झाल्यानंतर भूसंपादन प्रकरणात समझोता करणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुगा गिळल्याने आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

खेळताना फुगा गिळला गेल्याने आठ महिन्यांच्या बालकाचा गुरुवारी मृत्यू झाला. वीर जयस्वाल असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. सिडकोतील हनुमान चौकात सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोल‌िसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हनुमान चौकात विनोद जयस्वाल यांचे कुटुंब राहते. आठ महिन्यांचा वीर वडिलांच्या मांडीवर फुग्याशी खेळत होता. खेळताना फुगा अचानक फुटला. फुग्याचा छोटा तुकडा वीरने गिळल्याचे लक्षात येताच जयस्वाल यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मूळ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील जैसवाल कुटूंब चार वर्षांपूर्वी नाशिक शहरात उदरनिर्वाहासाठी आले. त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. जैसवाल यांना पहिली मुलगी आहे.

या घटनेची माहिती परिसरात समजातच नागरिकांनी हळहळ व्यक्‍त केली. याप्रकरणी अंबड पोल‌िसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


मुळात लहान मुलांना फुगा खेळायला देणे योग्य नाही. फुगा फुटल्यावर त्याच्यातील हवेच्या जोराने फुग्याचा तुकडा थेट श्वास नलिकेवर जाऊन अडकू शकतो. तसेच फुग्यात वापरलेले केमिकल हेसुद्धा मुलांच्या दृष्टीने घातक असते. बऱ्याचदा फुग्यांमध्ये वाजण्यासाठी काही वस्तू टाकल्या जातात. त्यामुळेही लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. फुग्याचा तुकडा किंवा फुगा तोंडात गेल्यावर तो श्वासनलिकेला चिकटण्याची शक्‍यता असते. त्यामुळेच असे अपघात होतात.

- डॉ. शामा कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थाचा झगमगाट गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिकला दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे पर्व संपून एक वर्ष पूर्ण झाले आहे. २०१५-१६ या वर्षाच्या कालावधीत झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी दोन वर्षे अगोदरपासून केली गेली. मात्र, आता वर्षभरातच रस्ते आणि गोदाघाट वगळता या सिंहस्थाच्या ठळक, तसेच झगमगाटाच्या खुणाही शिल्लक राहिलेल्या नाहीत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या काळातील गजबज तिन्ही शाहीस्नान पर्वण्या संपल्यानंतर शांत झाली. उरलेला सिंहस्थ पर्वाचा काळ हा केवळ नावापुरता शिल्लक होता. ध्वजावतरणाच्या कार्यक्रमात सत्कार समारंभ झाले. त्यानंतर सिंहस्थाचे वातावरण अन् झगमगाटही लोप पावला आहे.

सिंहस्थाला एक वर्षाचा कालावधी उलटत नाही तोच या काळात झालेल्या रस्त्यांमध्ये पावसाळ्यात खड्डे पडले आहेत. असंख्य पथदीप तर जणू रस्त्यांच्या दुभाजकांवर शोकरिताच लावण्यात आलेले दिसत आहेत. निम्यापेक्षाही जास्त पथदीप कधी सुरू नसतात. नदीकाठी बांधण्यात आलेल्या घाटांचा उपयोग अवैधरीत्या वाळू नदीतून काढून ती चाळण्यासाठी करण्यात येऊ लागला आहे.

सीसीटीव्ही गेले कुठे?

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गल्लोगल्ली, चौकांत, रस्त्यांवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी ठेवण्याच्या घोषणाच फक्त करण्यात आल्या होत्या. त्या घोषणाही हवेतच विरल्या. सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी असते, तर गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला असता.

बागायती शेती दुरापास्त

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी तपोवनातील घेण्यात आलेल्या शेकडो एकर जागेतील साधुग्राम उठल्यानंतर पुन्हा बागायती शेतील करणे अवघड झाले आहे. त्यामुळे या भागातील बरीचशी जमीन नापीक झाली आहे. पूर्वीच्या बागायती शेतीत केवळ चाऱ्याचे पीक घेण्याची येथील शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. पूर्वीचा डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता साधुग्राम विकसित करताना खडीकरणाचा करण्यात आला आणि तो तसाच ठेवण्यात आल्याने सिंहस्थाने या भागातील रस्त्याचीदेखील वाट लागली आहे.


झोपड्यांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या तपोवनातील ५६ एकर जागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे या जागेत अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. या झोपड्यांची वाढणारी संख्या ही सुरक्षेच्या, स्वच्छतच्या, आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणारी आहे. मात्र, यासंदर्भात परिसरातून तक्रारी करूनदेखील उपाययोजनाच केली जात नसल्याचा आरोप परिसरातून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल्सची शौचालये महिलांसाठी खुली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या हद्दीत महिलासांठीच्या स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने दिल्ली महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने आहार संघटनेच्या मदतीने महिलांना हॉटेल्समधील स्वच्छतागृहे मोफत खुली करून दिली आहेत. शहरातील तारांकित ते साध्या हॉटेल्समधील स्वच्छतागृहांचा वापर महिलांना करता येणार आहे. त्यासाठी संबंधित हॉटेल्सकडून बोर्डही लावण्यात येणार आहेत. महापालिका आणि आहार संघटनेमध्ये याबाबत करार झाला जाणार असून, येत्या १५ ऑगस्टपासून त्यांची सुरुवात होणार आहे.

महिलासांठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा प्रश्न कायम ऐरणीवर राहिला आहे. त्यासाठी ‘राईट टू पी’ची चळवळही राबवली जात आहे. नाशिक शहरातही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. पालिकेने यासाठी प्रयत्न सुरू केले तरी, त्यात फारसा फरक पडलेला नाही. महिलांसाठी स्वतत्र स्वच्छतागृहे नसल्याने त्याचा विपरीत परिणाम महिलांच्या आरोग्यावरही होत असल्याचे चित्र आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे असले तरी, महिला त्यांचा वापर करत नाहीत. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असले तरच, महिला त्याचा वापर करत असल्याचे चित्र आहे.

दिल्ली महापालिकेच्या धर्तीवर शहरातील सर्व हॉटेल्समधील स्वच्छतागृहे महिलांना मोफत वापरता येणार आहे. तसे फलक हॉटेल्सबाहेर लावले जाणार आहेत.

- संजय चव्हाण, अध्यक्ष, आहार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासाठी शासनाने निधी मंजूर केला असल्याने पालिकेने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा विरोध असतांनाही, पालिकेने जबरदस्तीने जमीन संपादन सुरू केले आहे. त्यासाठी जमवाजमव सुरू असतानाच, येथील शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. न्यायालयाच्या निकालापूर्वीच एकतर्फी संपादन करण्याचा प्रयत्न केला तर स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे पालिकेला एसटीपीसाठी जागा मिळणे अवघड झाले आहे.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून महापालिकेसाठी पिंपळगाव खांब येथे मलजलनिस्सारण केंद्र मंजूर झाले आहे. अमृतमध्ये मंजूर झालेल्या गंगापूर केंद्राचे काम सुरू झाले असले तरी, जागेअभावी पिंपळगाव खांब येथील काम अद्यापही सुरू झालेले नाही. राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने पिंपळगावसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करताना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पिंपळगाव खांब येथे पाच हेक्टर भूसंपादन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापूर्वी भूसंपादनासाठी रेड‌िरेकनरप्रमाणे दर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंरतु त्यानंतर आरक्षित भूखंड ताब्यात घेताना शेतकऱ्यांना अडीचपट मोबदला देण्याचा कायदा संमत झाला. परंतु शेतकरी जमीन देण्यास तयार नाही. पाच पट मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे हा निकाल येण्याआधीच महापालिकेकडून संपादनाची तयारी मान्य नाही. हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगत, त्यापूर्वीच जमीन संपादनाची जबरदस्ती केली तर आत्महत्या करू, असा सरळ इशाराच शेतकऱ्यांनी दिला आहे. येत्या १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा भिवा बोराडे, देवराम बोराडे, सुकदेव बोराडे, कचरू बोराडे, गोपाळा बोराडे, दत्तु बोराडे, रामदास बोराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्यामुळे पालिकेची जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वेळा पाणीपुरवठा करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणात भरपूर पाणीसाठा असतानाही, शहरात सध्या केवळ एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. धरणात पाणीसाठा असतानाही, शहरातील अनेक भागांत पिण्याचे पाणी पोहचत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. पुन्हा जायकवाडीला पाणी पळवून नेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नाशिकचे पाणी आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला आहे. धरणात पाणीसाठा चांगला असल्याने पूर्वीप्रमाणे दोन वेळचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली असून, दोन वेळा पाणीपुरवठा केला नाही तर महासभेत जाब विचारणार असल्याचा इशारा दिला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणात सध्या चांगला पाणीसाठा आहे. गंगापूरमध्ये ८४ तर दारणात ८६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, तरीसुद्धा नाशिककरांवर पाण्याचे संकट आहे. नाशिकरोड, सातपूर, सिडको या भागात पाण्याचा तुटवडा आहे. धरणातील पाणीसाठा चांगला असला तरी, सध्या एकच वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या आहे. धरणातील पाणीसाठा बघता पूर्वीप्रमाणे दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते यांनी महापौरांकडे केली आहे. एकवेळ पाणीपुरवठा करुन सत्ताधारी नाशिकचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिकचे आरक्षण कमी झाल्यास उर्वरित पाणी मराठवाड्याला पळवण्याचा पुन्हा डाव रचला जात असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच दोन वेळा पाणीपुरवठा केला नाही तर येत्या महासभेत सत्ताधाऱ्यांना या संदर्भातील जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या महासभेत पाणीपुरवठ्यावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

झाडू खरेदीला विरोध

यांत्रिक झाडूच्या खरेदीसाठी महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला होता. या दौऱ्यात सहा यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा मानस महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला होता. परंतु, शिवसेनेचा यांत्रिकी झाडू खरेदीलाच विरोध असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे. शहरात यांत्रिक झाडू भाडेकराराने घ्यावेत. खरेदी केल्यास त्यांचा खर्च पालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे या यांत्रिक झाडू खरेदीला शिवसेनेचा तीव्र विरोध राहणार असल्याचे बोरस्ते यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी अपघातात चार ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर येवला तालुक्यातील खामगाव पाटी शिवारात गुरुवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास दोन कार आणि एक ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातात हुंदाई कारचा अक्षरशः चक्काचूर होवून त्यातील तिघांसह मारुती कारमधील एका युवकाचा मृत्यू झाला. यात पाच जण गंभीर जखमी आहेत. हुंदाई कारमधील युवक मुंबई येथील मराठा मोर्चानंतर औरंगाबादकडे परतताना हा अपघात झाला.

नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावरील येवला तालुक्यातील खामगाव पाटी शिवार येथे आजपर्यंत अनेक अपघात झालेले आहेत. गुरुवारी सकाळी येवल्याकडून औरंगाबादच्या दिशेने जाणारी हुंदाई कार (एमएच २०, ईई ७२६४), तसेच औरंगाबादच्याच दिशेने जाणारी मारुती कार (एमएच १५, बीडब्ल्यू ५१८७) आणि समोरून येवल्याकडे येणारा ट्रक (एमएच १८, एम ३१९४) यांच्यात जोरदार धडक झाली. या तिहेरी अपघातात मारुती कार रस्त्याच्या कडेला दूरवर फेकली गेली. त्यातील वैभव राधाकृष्ण गटकळ (वय २१, रा. मातेरवाडी, ता. दिंडोरी) हा युवक ठार झाला. तर मारुती कारमधील राधाकृष्ण संपतराव गटकळ (४५), त्यांची पत्नी उर्मिला गटकळ (४०) व मुलगा मयुर गटकळ (२३) हे गंभीर जखमी झाले. वैभव गटकळ याचा अपघातस्थळावरून येवला ग्रामीण रुग्णालयात नेत असताना मृत्यु झाला.

या अपघातात मालट्रक व हुंदाई वरणा कार यांच्यात जोरदार धडक झाली. हुंदाई कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेत कारमधील हर्षल अनिल घोलप (वय २४, रा. गावठाण, रोहकडी, ता. जुन्नर, जि. पुणे), नारायण कृष्णा थोरात (२१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) व अविनाश नवनाथ गव्हाणे (२३, रा. बजाजनगर, औरंगाबाद) हे जागीच ठार झाले. हुंदाईमधील गौरव रामपालसिंग प्रजापती (रा. सिडको, औरंगाबाद) व उमेश गोपाळ भगत (बजाजनगर, औरंगाबाद) हे दोघे गंभीर जखमी झाले.

महामार्गावर साचले रक्ताचे थारोळे

मालट्रक व हुंदाई वरणा कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत हुंदाई कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने या कारमधील तिघे जागीच ठार झाले. त्यात अपघातस्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोल‌िस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोल‌िस निरीक्षक नरेंद्र खैरनार व देवीदास पाटील, सहायक पोल‌िस उपनिरीक्षक वाय. एस. खैरे व पोल‌िस नाईक विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. हुंदाई कारचा मृतदेह तसेच जखमींना परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढताना पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. काही जखमींना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मराठा मोर्चाहून परतताना अपघात

हुंदाई कारमधील नारायण थोरात, अविनाश गव्हाणे हे पुणे येथील आपला मित्र हर्षल घोलप तसेच इतरांसह बुधवारच्या मुंबई येथील मोर्चासाठी गेले होते. बुधवारचा मोर्चा आटोपल्यावर हे सर्व जण औरंगाबादला परतत असताना अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातला.

तिघे एकुलते!

हुंदाई कारमधील मयत झालेले तिनही तरूण एकुलते एक होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळच कोसळले आहे. अपघातातील मयत हर्षल घोलप हा पुणे येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. मोर्चानंतर मित्रांबरोबर तो औरंगाबाद येथे चालला होता. मयत अविनाश याचा सिमकार्ड वितरणाचा व्यवसाय होता. तर नारायण थोरात याचीही मोबाईल शॉपी होती. इतर जखमी तरूणही इंजिनीरिंगचे विद्यार्थी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातोहात संपल्या जेलमधील गणेशमूर्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी यंदा प्रथमच साकारलेल्या शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती नुकत्यास विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या सर्व गणेशमूर्तींची हातोहात विक्री झाल्याची माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी दिली.

या कारागृहात दहा वर्षांची शिक्षा भाेगणारा पेण येथील बंदी सागर पवार याने गणेशमूर्ती तयार करण्याची इच्छा अधीक्षक साळी यांच्याकडे व्यक्त केली होती. माती, रंग आदी साहित्य आणून दिल्यानंतर त्याने सुबक मूर्ती तयार साकारल्या. त्याची कलाकृती पाहून पुढील काम देण्यात आले. त्यासाठी त्याने अन्य पाच बंद्यांनाही प्रशिक्षण दिले. या कामामुळे त्यांनाही रोजगार मिळाला. यंदा प्रायोगिक तत्त्वावर १७५ गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. त्या कारागृहाच्या विक्री केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. त्यांची हातोहात विक्री झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ आठवणीत बहरतेय पर्यावरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शाश्वत सत्य असलेला मृत्यूनंतर मानवाची राख होते. ती राख विधिपूर्वक गंगेत विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र तालुक्यातील रौळसकरांनी आप्तांच्या मृत्यूपश्चात स्मृती जपण्यासाठी या राखेचे विसर्जन न करता वृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्यात ही राख ठेवून त्यावर आप्तांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा आदर्श उपक्रम सुरू केला आहे. यामुळे आप्तांची एक आठवणीसह पर्यावरणाचेही जतन होत आहे.

रौळस येथील गंगुबाई गवळे या वृद्ध स्त्र‌ीचा दीड महिन्यापूर्वी मृत्यू झाला. अंत्यविधीसमयी त्यांना अखेरचे वस्त्र देण्यासाठी नातेवाईकांनी भरपूर लुगडे आणले होते. सामाजिक कार्यकर्ते तथा पिंपळगाव बाजार समितीचे माजी संचालक माणिकराव शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी हे कपडे गरिबांसह गरजुंना देण्याचा विचार मांडला. त्यास गवळे परिवार व नातेवाईकांनी संमती दिली. दुसऱ्या दिवशी राखेचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या अस्थी गोदावरीत विसर्जित करण्याऐवजी त्यांच्या शेतात पुरण्यात येऊन त्यावरच गंगुबाईंच्या स्मरणार्थ एक झाड लावण्यात आले.

याच प्रसंगातून प्रेरणा घेत गावातील आदर्श शेतकरी बहुउद्देशीय कृषी विकास गट व वसुंधरा बहुउद्देशीय कृषी विकास गटातील तरुणांनी गंगुबाई गवळेंच्या दशक्रियाच्या दिवशी गाव परिसरात साडेआठशे रोपे लावण्याचा निश्चय केला. गावातील सर्व मंदिरे, सार्वजनिक जागा, स्मशानभूमी, घरे, शेती, वाडी आदी परिसरात रेन ट्री, शिसव, खैर, गुलमोहर, कांचन, जांभुळ, आंबा, चिंच आकाशिया आदी प्रकारच्या वृक्षांचे रोपण करत आले.

स्मशानभूमीचे नूतनीकरण

मित्रपरिवार आणि पोरजे परिवाराने दत्तात्रय यांच्या स्मरणार्थ चार लाख रुपये खर्च करून वृक्षारोपण केलेल्या झाडांना संरक्षक जाळ्या, स्मशानभूमीचे नूतनीकरण, अंत्यविधीसाठी ओटे बांधकाम, पाण्याची टाकी, स्मशानभूमी परिसरात पेव्हर ब्लॉक आदी समाज उपयोगी कार्य हाती घेत ते पूर्ण केले आहे. या कामात माणिकराव शिंदे, तुकाराम कर्डेल, सुजीत जाधव, सोमनाथ कुंदे, सुनील शिंदे, विकास जाधव आदींसह रौळस ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

प्रत्येकाच्या घरासमोर झाडे लावली आहेत. पडिक जागा तसेच शेतीवाडी बांधावर झाडे लावत हा स्मृती जतन करण्याचा उपक्रम राबविला आहे. नदीत होणारे प्रदूषणही टळणार आहे.- माणिकराव शिंदे, माजी सरपंच,

दिवंगत दत्तात्रय पोरजे हे माझे मित्र होते. या उपक्रमात सहभागी होत स्मशानभूमी परिसर सुशोभित व नुतनीकरण करणेसाठी पोरजे परिवार व मित्रपरिवाराने योगदान दिले. पोरजेंच्या स्मृती यानिमित्ताने चिरकाल राहतील.

- तुकाराम कर्डेल, सापुतारा

झाडांचे संगोपन करण्यासाठी पाणी देण्याची व्यवस्था बचत गटाच्या तरुणांसह स्वयंसेवकांवर आहे. दर पंधरा दिवसांतून ही जबाबदारी पार पाडली जाते. - सचिन पोरजे, रौळस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गार्डनच्या खोल्या बळकावल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील बहुतांश उद्याने देखभाल व दुरूस्तीसाठी खासगी ठेकेदाराला देण्यात आली आहेत. त्यामुळे या उद्यानातील माळी आता गायब झाले असून, त्यांची जागा आता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पालिकेच्या अनेक उद्यानामंध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बस्तान मांडले असून, येथूनच सध्या अवैध धंदे सुरू आहेत. काही नगरसेवकांनी आपल्याकडे आलेल्या आगतुकांना राहण्यासाठी थेट गार्डनमधील या खोल्या दिल्याचे एका संस्थेच्या पाहणीत समोर आले आहे.

महापालिकेच्या मालकीची शहरात जवळपास साडेचारशेच्यावर उद्याने आहेत. या उद्यानांची देखभाल व दुरुस्ती यापूर्वी पालिकेकडूनच केली जात असे. या उद्यानामंध्ये असलेली खेळणी, वीज पुरवठा आणि झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक उद्यानात माळी काम पाहत असे. त्यासाठी प्रत्येक उद्यानात त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या बांधण्यात आल्या होत्या. परंतु कालातंराने पालिकेने आपली निम्मे उद्यानांची देखभाल-दुरूस्ती खासगी ठेकेदारांमार्फत सुरू केली. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या माळींनी खोल्या खाली केल्या. त्याचाच फायदा काही गुन्हेगारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या रिकाम्या खोल्यांमध्ये सध्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वावर आहे.

काही उद्यानांमध्ये नगरसेवकांनीच आपल्याकडे आलेल्या काही आगंतुकांची व्यवस्था या खोल्यांमध्ये लावली आहे. त्यामुळे ही उद्याने आता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या राबत्याचे केंद्र बनले आहे. काही ठिकाणी गुन्हेगार तर काही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांनी या उद्यानांमधील खोल्या बळकावल्याने परिसरातील नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. बहुतांश नागरिकांनी या खोल्यांमधील रहिवाशांच्या भितीने या उद्यानांकडे पाठ फिरवली आहे. या सर्व प्रकाराने परिसरातील नागरीक त्रस्त झाले असून, यांसदर्भात त्यांनी उद्यान विभागाकडे तक्रार केली आहे. परंतु त्यांची दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.

गुन्हेगारीचा अड्डा

महापालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या खोल्यांकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने काही उद्यानांमधील खोल्या या गुन्हेगारांचा अड्डा बनल्या आहेत. या ठिकाणी कोणाचेही वास्तव्य नसल्याचे बघून काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथेच पत्त्याचे अड्डे सुरू केले आहेत. काही गार्डनमध्ये तर थेट गुन्हेगारांनीच तळ ठोकला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने या खोल्यांमध्ये राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेस्ट कंट्रोलवरून खडाजंगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या सातपूर विभागात गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. यंदादेखील शंभरहून अधिक जणांना त्याची लागण झाल्याने सातपूरकर त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रभाग सभेत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावरून चांगलीच खडाजंगी झाली. पुरेशा नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोपही सर्वच सदस्यांनी करीत अधिकारी आपले काम योग्य रीतीने करत नसल्याचा आक्षेपही नोंदवला. सभापती माधुरी बोलकर यांनी नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी केले.

विभागीय कार्यालयात सभापती बोलकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत सर्वच नगरसेवकांनी डेंग्यूसदृश आजाराची साथ सुरू असताना मलेरिया विभाग त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. याप्रसंगी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगरसेविका सीमा निगळ, आरपीआय गटनेत्या दीक्षा लोंढे, दिलीप दातीर, नयना गांगुर्डे, रवींद्र धिवरे, सुदाम नागरे, योगेश शेवरे, हेमलता कांडेकर, डॉ. वर्षा भालेराव, राधा बेंडकोळी, हर्षदा गायकर, संतोष गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक दातीर यांनी सभागृहातील आसनव्यवस्थेच्या दुरवस्थेचा मुद्दाही उपस्थित केला. पाच प्रभागांतील एकूण २० नगरसेवक आहेत. गेल्याच प्रभाग सभेत दातीर यांनी आसनव्यवस्थेची दुरुस्ती करण्याबाबत सांगितले होते. परंतु, गुरुवारच्या प्रभाग बैठकीतही तुटलेल्या आसनांवरच बसण्याची वेळ नगरसेवकांवर आली.

पावसाळ्यात डेंग्यूची साथ पसरते. महापालिकेने याबाबत नागरिकांचे प्रबोधन केली पाहिजे, तसेच नागरिकांनीदेखील नितळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत नगरसेविका निगळ यांनी सूचना मांडली. त्यासाठी आरोग्य विभागानेदेखील मोहीम हाती घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.

गंगापूररोडच्या प्रभाग ८ मध्ये असलेल्या महापालिकेच्या अनेक मोकळ्या भूखंडांचा वापर खासगी विकसक करीत असल्याचा आरोप नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केला. याबाबत वेळोवेळी महापालिकेच्या विविध कर विभागाला संबंधित खासगी विकसकाला दंड आकारण्यात यावा, असेही आदेशित केले होते. परंतु, प्रत्यक्षात महापालिकेचे अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप नगरसेवक गायकवाड यांनी केला.

घंटागाड्या अनियमित

महापालिकेने नवीन घंटागाड्या घेऊनदेखील विभागातील बहुतांश प्रभागांत अनियमित घंटागाड्या प्रभागात येत असल्याचा आरोप नगरसेविका हर्षदा गायकर यांनी केला. घंटागाड्यांची वेळच निश्चित नसल्याने अनेकांना उघड्यावर कचरा टाकण्याची वेळ येत असल्याने दुर्गंधी पसरत अाहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाड्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी मांडली.


नावालाच केली जातेय फवारणी

प्रभाग ११ मध्ये अनेकांना डेंग्यूसदृश रोगाची लागण होत असताना पेस्ट कंस्ट्रोलचे कर्मचारी नावालाच फवारणी करीत असल्याचा आरोप नगरसेवक सलिम शेख यांनी केला. पेस्ट कंट्रोलचे काम करणारे कर्मचारी प्रभागातील नागरिकांना तुम्ही मत कुणाला दिले, असा सवाल करीत असल्याने त्यांचे नेमके काम काय, असा सवालही नगरसेवक शेख यांनी उपस्थित केला. नगरसेविका पल्लवी पाटील यांनी तर पेस्ट कंस्ट्रोलचा ठेकाच तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

जनावरांचा प्रश्न ‘मोकाट’

अलीकडे परिसरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे दिसून येते. त्यामुळे अपघातही होत असल्याने मोकाट जनावरे ताब्यात घेणार ठेकेदार कोण, असा सवाल नगरसेविका निगळ व नयना गांगुर्डे यांना विचारला. परंतु, त्यावर अतिक्रमण विभागालादेखील मोकाट जनावरे ताब्यात घेणारे कोण, हे माहिती नसल्याने नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नि:स्वार्थींच्या पाठीशी रहा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजधुरिणांच्या योगदानाने पावन झालेल्या संस्थेमध्येही सत्ताधाऱ्यांनी साखर कारखान्यासारखे राजकारण पेरून समाजाची दिशाभूलच केली आहे. एका कुटूंबाभोवती फिरणारी आर्थिक व राजकीय स्वारस्याची गणिते, लोकशाहीस केला जाणारा विरोध आणि संस्थेत जिल्हाबाह्य शक्तींचा वाढता हस्तक्षेप हा प्रवाह लक्षात घेऊन सभासदांनी नि:स्वार्थी उमेदवारांनाच साथ द्यावी, असे आवाहन माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी केले. सारोळे आणि खडक माळेगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

सत्ताधारी मंडळी पाऊणशे कोटींच्या संस्थेच्या ठेवींचा उल्लेख करीत असतील तर संस्थेकडील या अर्थाचा विनियोग ‘फिक्स पे’वर वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसारख्या घटकांवर किंवा समाज हिताच्या कामांवर का केला गेला नाही असाही सवाल त्यांनी केला.

शैक्षणिक गैरसुविधा मिटविण्या ऐवजी स्वतःची प्रसिद्धी करणाऱ्या इव्हेंट्सवरच या पैशांचा खर्च केला गेला. गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले. फार्मसी, नर्सिंग यासारख्या विद्याशाखांच्या प्रवेश प्रक्रियेत दुर्लक्ष आहे, ही लक्षणे संस्थेसाठी चांगली नाहीत , असे यावेळी अड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. सभासदांनी निवडून दिलेल्या कार्यकारिणीला नाममात्र न मानता सर्वानुमते निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, असे दिलीप मोरे यांनी म्हटले. प्रचारदौऱ्यात विकासराव कवडे, रत्नाकर पवार, अद्वय हिरे, नितीन आहेर, काशिनाथ पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला नकारच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथे झालेल्या मेक इन नाशिक कार्यक्रमात ‘तुम्ही सांगाल तो उद्योग स्थापन करू’, या केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या आश्वासनाला भारत सरकाच्या अंगीकृत कंपन्यांनी मुळीच महत्त्व दिलेले नाही. नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास असमर्थता दाखवत या कंपन्यांनी नाशिकमध्ये केवळ व्हेंडर डेव्हलमपेंट प्रोग्राम घेण्याचे आश्वासन दिले आहे.

नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करावी, यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी बुधवारी दिल्लीत उद्योग भवनात सरकारी उद्योगांच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक घेतली. त्यात नऊ कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसह नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंसह निमा व आयमा संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत हे व्यवस्थापकीय संचालक नाशिकमध्ये एखादा कारखाना सुरू करून नाशिकला मोठी गुंतवणूक करणार असल्याची सर्वांना अपेक्षा होती. पण या सर्व संचालकांनी याकडे पाठ फिरवली आहे. या संचालकांनी नाशिकमधील उद्योगांना काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी नाशिकमध्ये व्हेंडर डेव्हलपमेंट कार्यक्रम राबवण्याचेही सांगितले आहे.

या बैठकीस महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष उदय खरोटे, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे हे उपस्थित होते. या बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., भारत अर्थ मुव्हर्स लि., भारत डायनामिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, गार्डन रिच शिपबिल्डर्स अॅण्ड इंजिनिअर्स, गोवा शिपयार्ड लि., हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि., हिंदुस्तान शिपयार्ड लि., या नऊ कंपन्याचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. पण त्यांनी सर्वांची बोळवण करत नकारघंटाच वाजवली.

आशा ठरल्या फोल

गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी पाठ फिरवल्यामुळे उद्योग क्षेत्र चिंतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू व्हावेत व १० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक व्हावी, असे टार्गेट ठरवत ‘मेक इन नाशिक’च्या कार्यक्रमाचे निमाने आयोजन केले होते. पुणे-मुंबईपासून नाशिकजवळ असून, या सुवर्ण त्रिकोणामध्ये नाशिक मागे राहिले आहे. त्यामुळे मुंबईच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा नाशिकचे ब्रँडिंग देशभर करू, असे सांगून दिलासा दिला होता. पण त्या ब्रँडिंगचे परिणाम अजून दिसलेले नाहीत. त्यामुळे गिते यांनी बोलावलेल्या या बैठकीत सर्वांच्या आशा उंचावल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारू किंवा मरू…

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून विरोध दर्शवला. हा मार्ग करणाऱ्या अधिकाऱ्यांना मारू नाहीतर आम्ही तरी मरू, अशा शब्दांत येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाला विरोध दर्शिवला आहे.

मुंबई येथे होणाऱ्या मराठा मोर्चामुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर गुरुवारी दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा कडून समृद्धी रद्दसाठी साकडे घालण्यात आले. तालुक्यातील शिवडे, सोनाबे, डुबेरे, पाथरे यासह अन्य गावातील शेतकऱ्यांनी तहसीलवर मोर्चा काढला. सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला रोष प्रकट केला. मोजणीसाठी गावात येणाऱ्या अधिकाऱ्यांना मारू नाहीतर आम्ही मरू, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, सोनाथ वाघ, शांताराम ढोकाने, यांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले.

इगतपुरीतही आंदोलन

घोटी ः समृद्धी बाधीत शेतकऱ्यांनी इगतपुरी तहसीलसमोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी याआधी अने प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या आहेत. शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पूरे यांना निवेदन दिले. आंदोलनात अॅड. रतनकुमार इचम, कचरू डुकरे, भास्कर गुंजाळ सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images