Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मतदारसंघाचे उपग्रहामार्फत सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या सर्वेक्षणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ची मदत घेण्यात येणार आहे. सोमवारी (दि.१४) इस्त्रोचे वैज्ञानिक नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षणाबाबतची चर्चा होणार आहे. इस्त्रोमार्फत प्रथमच जिल्ह्यात असे सर्वेक्षण होत असून, त्यामुळे विकासाला वैज्ञानिक आधार मिळेल असा दावा खासदार हेमंत गोडसे यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. बैठकीला वैज्ञानिक सचिन देवकर, मुख्य व्यवस्थापक वैज्ञानिक कामेश्‍वर राव, तसेच दिल्ली, बेंगळुरू, हैद्राबाद आणि नागपूर येथून अधिकारी नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिकसाठी जीआयएस अॅप्लिकेशन तयार करण्यात इस्‍त्रोने पुढाकार घेतला असून, मतदारसंघातील विविध विषयांची माहिती त्याद्वारे मिळेल.
तसेच नियोजनबद्ध विकासाला गती मिळू शकेल असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला. याचा लाभ शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक विकास व शहरी तसेच ग्रामीण भागाला होऊ शकेल.

इंजिनीअरिंगच्या प्राध्यापकांना निमंत्रण
बैठकीला सर्व सरकारी यंत्रणांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी के. के. वाघ कॉलेज, गुरू गोविंदसिंग, जवाहर एज्युकेशन सोसायटी, संदीप फाऊंडेशन, सपकाळ कॉलेज, ब्रह्मा व्हॅली, आर. एच. सपट, मेट, सर विश्वेश्वरैया आदि इंजिनीअरिंग कॉलेजांचे प्राध्यापक उपस्थ‌ित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात आज चक्काजाम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे आज, १४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यांत हे आंदोलन होणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर सोमवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणाबाबत सुकाणू समितीने गोपनीयता पाळली आहे.

आंदोलनापूर्वी सुकाणू समितीने राज्यभर १० ते २३ जुलै रोजी सभा घेऊन जनजागृती केली. त्यासाठी जिल्ह्यात पत्रकवाटप व बैठकीही घेण्यात आल्या. सरकारच्या धोरणामुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार असून, अनेक शेतकऱ्यांना पीककर्जही मिळाले नसल्याचे सुकाणू समितीने म्हटले आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार नसल्याने चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिल्याचे सुकाणू समितीने स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व महामार्ग व सर्व रस्ते जाम केले जाणार असून, जिल्हा सुकाणू समितीतर्फे वेगवगेळ्या ठिकाणी पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे समितीचे राजू देसले यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांना रोखणार

जिल्हा पातळीवर १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजवंदन न करता ते शेतकऱ्यांच्या हस्ते करावे, अशी सुकाणू समितीची भूमिका आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्य सरकारचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे ध्वजवंदन शेतकऱ्यांच्या हस्ते व्हावे, यासाठी पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करण्यापासून रोखणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

या आहेत प्रमुख मागण्या

- राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे नियमित व थकीत कर्ज माफ करा

- हमी भाव द्या; स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा

- वीजबिल माफ करा; शेतीला मोफत वीज

- निर्यातबंदी उठवा; ‘समृद्धी’साठी बागायती जमिनी घेऊ नका

- शेतकऱ्यांना वृद्धापकाळात तीन हजार पेन्शन मिळावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विमा योजनेस धुळ्यात ठेंगा

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

मराठवाड्यात शेतकरी पीक विम्यासाठी रांगा लावून बसले आहेत. खान्देशात मात्र विपरित परिस्थिती आहे. खान्देशात गेल्यावर्षी जितक्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापेक्षा निम्मे शेतकऱ्यांनीसुद्धा पीक विमा काढलेला नाही. धुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी ७२ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र यावर्षी फक्त २४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यातही पीककर्ज घेणाऱ्या २२ हजार शेतकऱ्यांचा सक्तीने विमा काढण्यात आला आहे. अशा परिस्थितीत केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांनी विमा काढण्यासाठी रस घेतला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३५ टक्के आहे. जिल्ह्यात एकही शेतकरी स्वतःहून पीक विमा काढायला तयार नाही. नाईलाजास्तव पीक विमा काढावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. गेल्यावर्षी धुळे जिल्ह्याचा दुष्काळी जिल्हा म्हणून घोषित केले गेले असताना फक्त २० कोटी रुपये मिळाले. वास्तविक ही रक्कम १०० कोटींच्या घरात पाहिजे होती. मात्र तसे झालेले नाही.

विमा काढून मिळणार लाभ अत्यंल्प असल्याने धुळ्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. लाभच मिळणार नसेल तर पीक विमा का काढावा? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. कृषी आणि महसूल विभागाने चुकीची रंगून ठेवलेली आणेवारी आणि उत्पादनाचे रेकॉर्ड हेच या योजनेला खान्देशात अपयशी करत असलीच असे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांकडून विम्याची भरभरून रक्कम घेतल्यावर त्यांना देताना मात्र विमा

कंपनीने हात आखडून घेतल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली. यावर्षी पुन्हा काही कारण करून विमा कंपनी टोलवून लावेल या विचाराने पीक विमा योजनेला खान्देशातील शेतकऱ्यांनी ठेंगा दाखवला आहे.
तोंडाला पाने पुसणारी योजना

गेल्यावर्षी ६० हजार शेतकऱ्यांचा पीककर्ज घेतानाच सक्तीने पीक विमा काढण्यात आला होता तर उर्वरित शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने विमा काढला. गेल्यावर्षी १२ कोटी रुपयांचा हप्ता भरून धुळ्यातील ७२ हजार शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त २० कोटी रुपये आले. १२ कोटींच्या तुलनेत २० कोटी अधिक वाटत असले तरी सरकारने या १२ कोटी हप्त्यात विमा फरकाची भरलेली रक्कम जोडली तर एकूण पीकविम्याची कंपनीला भरण्यात आलेल्या रकमेपेक्षा कमीच भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. असे असताना कृषी विभाग आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानतो आहे. कृषी विभागाची गेल्या आणि चालू वर्षाची पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पहिली तरी ही तफावत लक्षात येईल. पीकविम्याची मुदत वाढवून मिळावी यासाठी अधिवेशनात रणसंग्राम गाजला. सरकारने फुशारकी मारत ५ ऑगस्टपर्यंत पीक विमा योजनेला मुदतवाढ दिली. मात्र धुळे जिल्ह्याला तर पीक विमा योजना तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवितव्य मतपेटीत बंद

$
0
0

९२.८ टक्के मतदान; आज सायंकाळपर्यंत जाहीर होणार निकाल

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेसाठी अत्यंत चुरस अन् प्रतिष्ठेच्या बनलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण ९२.८ टक्के मतदान झाले. गतवेळच्या तुलनेत ही आकडेवारी जास्त आहे. दरम्यान, आज (१४ ऑगस्ट) सकाळी मविप्र आवारातील जिमखाना परिसरात ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. राज्यातील या बड्या शिक्षणसंस्थेवर प्रगती पॅनल, की समाज विकास पॅनलचा झेंडा फडकतो याकडे आता लक्ष लागले आहे.

सन २०१७ ते २०२२ या पंचवार्षिक कालावधीसाठी रविवारी निवडणूक शांततेत पार पडली. जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर १० हजार ६११ मतांपैकी ९ हजार ८५७ मतदारांनी मतदान केले. यात सेवकांचे मतदान ४६४ पैकी ४३६ होते. ३१ मार्च २०१७ पर्यंतची यादी मतदानासाठी ग्राह्य धरण्यात आली होती. या तारखेपर्यंत निवृत्त सेवकांना घटनेनुसार मतदानाचा अधिकार राहिला नाही. अशा सभासदांची संख्या २५ आहे.

नाशिक मनपा क्षेत्रासाठी गंगापूर रस्त्यावरील मराठा हायस्कूल, महापालिका क्षेत्रातील २० गावे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी अभिनव बालविकास मंदिर आणि सेवक सभासद मतदारांसाठी शिवाजीनगर येथील केआरटी कॉलेज येथे मतदान केंद्रांची व्यवस्था होती.

काहीवेळ तणाव

या मतदानासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत मुदत होती. चार वाजण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असतानाच मविप्रच्या आवारात एका सभासद मतदारास घेऊन रुग्णवाहिका केटीएचएम कॉलेजच्या गेटवर दाखल झाली. यावेळी कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अवधी संपल्याचे सांगत मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव केला. यावेळी रुग्णाच्या हितचिंतकांनी कर्मचाऱ्यांची कशीबशी समजूत काढत आतील गेटवर रुग्णवाहिका नेली. तेथेही या प्रकाराची पुनरावृत्ती होऊन मतदानाची वेळ संपुष्टात आली.

अखेरीला रुग्ण सभासदाचे मतदान झाल्याशिवाय केंद्रातून मागे जाणार नाही, अशी भूमिका रुग्णावस्थेतील सभासद निंबा शिंदे यांच्या हितचिंतकांनी घेतल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून वादावर पडदा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिहर्सलमधून वाढला आत्मविश्वास

$
0
0

नाशिक प्लस टीम
नक्षीदार पैठणीचा पदर सावरत अन् वेस्टर्न आउटफिटवर दिमाखदार केला जाणारा रॅम्पवॉक... नऊवारीपासून ते जीन्सपर्यंत ड्रेसअप करुन परफॉर्मन्सचा केला जाणारा सराव... डोळ्यांत श्रावणक्वीन होण्यासाठीची जिद्द... अंतिम फेरीत स्वतःला सिद्ध करण्याची चिंता... अशा वातावरणात फायनलिस्ट फिनालेसाठीची रिहर्सल करताना दिसून आल्या.
वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ पॉवर्ड बाय सोनी पैठणी स्पर्धेची अंतिम फेरी आज रंगणार आहे. स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी फायनलिस्टनी रविवारी कसून सराव केला. श्रावणक्वीन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अवघा एक दिवस उरल्याने स्पर्धकांच्या चेहऱ्यावर चिंता जाणवत होती. मात्र, स्पर्धेचा मुकूट आपणच पटकवायचा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकीची जिद्द रिहर्सलदरम्यान दिसून येत होती. गेल्या सात दिवसांपासून होणाऱ्या ग्रुमिंग सेशनमधून धडे घेत सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि पर्सनालिटी बाबतीत स्पर्धक तरबेज झाले. स्पर्धेअगोदर शेवटच्या सरावात कमालीचे परफेक्शन होतेच, सोबतच प्रचंड आत्मविश्वास स्पर्धकांमध्ये निर्माण झाल्याचे जाणवत होते. श्रावणक्वीन होण्यासाठी प्रत्येकीला स्वतःला सिद्ध करायचे आहे. ‘मी’च श्रावणक्वीन होणार यासाठी स्व-परीक्षण करत दिवसभर सराव स्पर्धक करत होत्या.
साडी व वेस्टर्न आउटफिटवरच्या रॅम्पवॉक सोबतच टॅलेंट राउंडसाठीचा परफॉर्मन्सची जय्यत तयारी केली जात होती. खास बाब म्हणजे, जजेसकडून कोणताही प्रश्न विचारला जाईल, म्हणून प्रत्येक क्षेत्राची माहिती एकमेकींना स्पर्धक शेअर करत होत्या. मैत्रीतून स्पर्धेकडे वळताना एकमेकींचा धीरदेखील वाढवला जातोय.
श्रावणक्वीन स्पर्धेच्या ग्रुमिंग सेशनमधून ग्रूम झाल्यावर अंतिम फेरीत टफ फाइट देण्यासाठी सगळ्याजणी सज्ज आहेत. या पंधरा स्पर्धकांतून एक ‘श्रावणक्वीन’च्या मुकुटाची मानकरी होणार आहे.

उत्सुकता ‘श्रावणक्वीन’ होण्याची
श्रावणक्वीन स्पर्धेच्या आज रंगणाऱ्या अंतिम फेरीत ‘श्रावणक्वीन’चा झळाळता मुकूट कोण पटकवणार, याची उत्सुकता स्पर्धकांना लागून राहिली आहे. श्रावणक्वीनच्या मुकुटासोबतच बेस्ट स्कीन, बेस्ट स्माइल, बेस्ट आइज, बेस्ट हेअर, मिस टॅलेंटेड, बेस्ट रॅम्प, बेस्ट ग्रुम्ड, बेस्ट परफॉर्मर, मिस पॉप्युलर हे टायटल्स कोण मिळवणार यासाठी स्पर्धकांमधील उत्कंठा वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांचे पाणी थेट गोदेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरी प्रदूषणुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असल्याचे देखावा वारंवार करीत आली आहे. मात्र, पावसाळ्यात गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली, की गोदावरी प्रदूषणाच्या विषयाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असते. असेच चित्र सध्या दिसत असून, पूर ओसरल्यानंतर पुन्हा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात असल्याची स्थिती आहे. पंचवटी अमरधामजवळ, तसेच अन्य ठिकाणीदेखील नाले, गटारींचे सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याचे दिसून येत आहे.

जोराचा पाऊस सुरू होताच यंदाही पावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे पडले. ड्रेनेज लाइनमध्ये हे पाणी जात असल्याने सर्व गटारींचे पाणी गोदापात्रात येत असल्याचे पूर परिस्थितीच्या वेळी बघायला मिळाले. पाऊस थांबल्यानंतर गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी होत गेली आणि पुन्हा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागली आहे.

पंचवटीत परिसरातील इंद्रकुंड, मालवीय चौक, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर परिसर येथून येणारी ड्रेनेज लाइन रामसेतूच्या समोरच्या भागात उघडी झालेली दिसते. या भागात सिमेंटच्या पोलचे ढापे या लाइनवर टाकण्यात आले आहेत. हे पाणी वाघाडी नाल्याच्या पाण्यात मिसळले जाते. दोन्हीकडून येणाऱ्या या घाण पाण्याचा प्रवाह पुढे नवीन सिंहस्थ शाहीमार्गाजवळून पुढे नेण्यात आला आहे. पंचवटी अमरधाम येथे या नाल्यातील पाणी थेट गोदापात्रात जात आहे.

शहरात गंगापूरपासून ठिकठिकाणी असे नाले, गटारी थेट गोदापात्रात सोडून दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गोदाप्रेमींकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्यामनंतरदेखील उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती असून, हे चित्र नेमके बदलणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

--

संवर्धन कक्ष नावापुरताच

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करायची आणि दुसरीकडे गटारीचे पाणी थेट नदीपात्रात सोडायचे, अशी स्थिती दिसत आहे. जणूकाही पुरामुळे गोदावरीच्या पात्रातील सर्व घाण वाहून गेली आहे, आता गोदावरीकडे बघण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाला वाटत असावे. म्हणून ते गोदावरीच्या प्रदूषणाकडे गांभीर्याने बघत नाहीत, असा आरोप गोदाप्रेमींकडून केला जात आहे.

--

गोदावरीच्या पात्रात गटारीचे घाण पाणी मिसळत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही या परिस्थितीत सुधारणा झाली नाही. तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गोदावरीचे प्रदूषण काही थांबत नसल्याची स्थिती आहे.

-निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडूनही मंडळांना बक्षिसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ग्रामीण पोलिस दलात यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या आणि चांगले देखावे सादर करणाऱ्या मंडळांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. पोल‌िस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. दरम्यान, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन दराडे यांनी केले आहे.
पोल‌िस स्टेशन, विभागीय व जिल्हा स्तरावर ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी परीक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये विभागीय स्तरावर उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, त्या कार्यक्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, अल्पसंख्याक सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. दहा दिवसांच्या उत्सव काळात गणेश मंडळांची प्रत्यक्ष पाहणी करून समिती मंडळांनी केलेली सजावट, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे देखावे, यांसह अन्य उपक्रमांची माहिती घेऊन गुणांकन करणार आहे. त्याचा अहवाल जिल्हा समितीला सादर केला जाईल. जिल्हा परीक्षण समितीमध्ये अपर पोलिस अधीक्षक व त्यांचे सहकारी जिल्ह्यातील उत्कृष्ट पाच गणेशोत्सव मंडळांची आदर्श मंडळे म्हणून निवड करतील. त्यांना प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल. या योजनेमध्ये सहभागासाठी त्या-त्या पोलिस स्टेशनमध्ये नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी दहा निकष ठेवण्यात आले असून, प्रत्येक निकषासाठी प्रत्येकी दहा गुण असणार आहेत.
कायदा-सुव्यवस्था राखा
गणेशोत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू न देता साजरा करण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, शांतता कमिटी सदस्यांच्या, पोलिस मित्र सदस्य, प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या. गावोगावी ‘एक गाव एक गणपती’साठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाहतुकीसाठी अडथळे ठरणार नाहीत, अशा पद्धतीने मंडप उभारण्याचे आदेश दिले आहेत.

गुणांकनासाठी निकष

मंडळांनी सर्व परवानग्या घेतल्या आहेत काय?
स्टेज, प्रकाश योजना, स्वतंत्र वीज व्यवस्था
मंडपाचा रहदारीस अडथळा नसावा
देखावे व त्यांचा दर्जा
पोल‌िसांच्या अटी व नियमांचे पालन
श्रींच्या मूर्तीच्या संरक्षणाची तरतूद
गर्दी नियंत्रण, दर्शन रांग व्यवस्था
सुरक्षेसाठी केलेली उपायोजना, यंत्रणा
पर्यावरण जागृतीचे संदेश
ध्वनी प्रदूषण अटींचे पालन, वेळेचे पालन

आज चोपडा लॉन्सला बैठक
गणेशोत्सव भक्तीपूर्ण व शांततेच्या वातावरणात पार पडावा यासाठी पोलिस तयारीला लागले आहेत. गणेशोत्सव मंडळांना सूचना देण्यासाठी सोमवारी (दि.१३) गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे दुपारी १२ वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता समितीच्या सदस्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. कायदा आणि सुव्यवस्थेला उत्सव काळात गालबोट लागू नये यासाठी गणेश मंडळे आणि शांतता समितीच्या सदस्यांचे सहकार्यही गरजेचे असते. म्हणूनच आवश्यक त्या सूचना करण्यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांसह अधिकारी यावेळी उपस्थ‌ित राहणार आहेत. यंदा प्रथमच गणेश मंडळांना द्यावयाच्या परवानगीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. त्यामुळे हे अर्ज कसे भरावेत, याची माहितीदेखील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

मंडळांचा सत्कार
गतवर्षी आकर्षक आणि समाज प्रबोधनपर देखावे सादर करणाऱ्या आणि पोलिसांना सहकार्य करणाऱ्या मंडळांना या बैठकीवेळी गौरविण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीसाठी आला अन् चोरी करून गेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूरच्या महादेव वाडीत कपाट दुरुस्तीसाठी आलेल्या एकाने कपाटातील सुमारे ६० हजारांचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद किशोर बिसुडे (रा. महालक्ष्मी चौक, महादेव वाडी, सातपूर) यांनी दिली आहे. शुक्रवारी (दि. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास बिसुडे यांनी त्यांच्या घरातील कपाट दुरुस्तीसाठी एकास बोलावले होते. बिसुडे यांची नजर चुकवून त्याने ५९ हजार २०० रुपयांचे सोन्या-चांदीची दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अश्विन नगरात चोरी

अश्विन नगरमध्ये घराच्या उघड्या दरवाजावाटे आत येऊन चोरट्याने दहा हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. अमित अशोक पवार यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून हॉलमध्ये ठेवलेला मोबाइल चोरून नेला. पुढील तपास अंबड पोल‌िस करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

सातपूर : अंबड-लिंकरोडवरील जाधव टाऊनशिपमध्ये हार्डवेअरच्या व्यवसाय करणाऱ्या होतकरू तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. जाधव टाऊनशिपमध्ये राहणारे संजय फकिरा सोनवणे (४०) यांनी घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली.

सोनवणे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास अंबड पोलिस करत आहेत.

अपघातांत दोन महिला जखमी

सिन्नर फाटा : जेलरोड व दुर्गा गार्डन येथे झालेल्या दोन अपघातांत दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली. सैलानी बाबा चौकातून पायी जाणाऱ्या गायत्री अशोक वाघ (वय २०) या युवतीस पाठीमागून येणाऱ्या वाहनाने ठोस दिली. तर कमलाबाई गवळी (वय ६५, रा. अरिंगळे मळा) या वृद्धेस दुचाकीने धडक दिल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या दोन्ही अपघातांची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातनिहाय गणना करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मूळ ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, तसेच ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रांत आरक्षण द्यावे यांसह १६ मागण्यांचे ठराव रविवारी ओबीसी जनक्रांती परिषदेच्या विभागीय मेळाव्यात करण्यात आले.
ओबीसींचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी, तसेच ओबीसींच्या प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी ओबीसी जनक्रांती परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचा उत्तर महाराष्ट्र स्तरावरील मेळावा रविवारी पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल सेव्हन हेवन येथे पार पडला. ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन, विनायक यादव, मनोरमा पाटील, भगवान खैरनार, विजय राऊत, अनिल कोठुळे, बाजीराव तिडके आदी मान्यवरांसह नाशिक, अहमदनगर, जळगावसह पाच जिल्ह्यांतील ओबीसी संघटनांशी संबंधित प्रतिनिधी उपस्थ‌ित होते.
यावेळी परिषदेच्या वतीने १६ ठराव करण्यात आले. महा‌त्मा ज्योतिराव फुले, तसेच सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, संसदेच्या आवारात त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी आरक्षण द्यावे, मुंबईतील प्राणी संग्रहालय स्थलांतरित होईल त्यावेळी ती पूर्ण जागा महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी द्यावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे, त्यासाठी घटनात्मक दुरुस्त्या कराव्यात, दहा एकरपर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, ओबीसी तरुणांना कमीत कमी दराने दीर्घ मुदतीचे कर्ज द्यावे, दरवर्षी ११ ते १४ एप्र‍लि या कालावधीत परिवर्तन सप्ताह साजरा करावा. ओबीसींच्या शिष्यवृत्तीबाबतच्या अडचणी सोडवाव्यात, लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण मिळावे, भूम‌िहीन, अल्पभूधारक अशा प्रत्येक कुटुंबाला किमान दोन हेक्टर जमीन मिळावी, डॉ. स्वाम‌िनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी ५०० कोटींची स्कॉलरशिप ५४ कोटींवर आली आहे. ती पूर्ववत करावी आदी मागण्यांचे ठराव यावेळी करण्यात आले.

संभाजीराव पाटलांना हटवा

मागासवर्गीय आयोगावर माजी न्यायाधीश संभाजीराव पाटील यांची सरकारने नियुक्ती केली आहे. ती तत्काळ रद्द करावी, तसेच आयोगावर ओबीसी व्यक्तींची निवड करावी अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली. वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण होते. ते दोन टक्क्यांवर आणण्यात आले आहे. ते वाढायला हवे, अशी मागणीदेखी‌ल या मेळाव्यात करण्यात आली. नाशिकमध्ये ओबीसी भवन व्हावे, अशीही या परिषदेची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जा-राजाच्या सजावटीचा रंग फिका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कृषी संस्कृतीतील श्रमनिष्ठेचे प्रतीक असलेल्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण तोंडावर येऊन ठेपल्याने बाजारात पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. आपल्या आवडत्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी मनपसंत साहित्याच्या शोधात शेतकऱ्यांची पावले आतापासूनच दुकानांकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, सजावट साहित्याच्या किमती वाढल्याने यंदा सर्जा-राजाची सजावट फिकी होण्याची चिन्हे आहेत.

शेतीसाठी शेतकऱ्यांना जीवनभर निष्ठेने साथ देणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणातून उतराई होण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा. श्रावण महिना सुरू झाला, की शेतकरीवर्ग श्रावणी अमावास्येची अर्थात, बैलपोळा सणाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो. यंदाचा हा सण अगदी जवळ येऊन ठेपल्यान बाजारपेठांतील दुकानेही बैलपोळ्याच्या साहित्याने सजली आहेत. रंगीबेरंगी साहित्य विक्रीस आल्याने बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

--

महागाईचे सावट

बैलपोळ्याच्या निमित्ताने दारापुढील सर्जा-राजाला सजविण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य वापरले जाते. वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या सर्जा-राजासाठी प्रत्येक शेतकरी बाजारातून सजावटीचे नवीन साहित्य दर वर्षी खरेदी करीत असतो. यंदा बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या बहुतांश साहित्याच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पोळ्यावर महागाईचे सावट दिसून येत आहे. बैलांना सजविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या झूल, पितळी शेंबी, माठोड, कासरे, चंगाळा, बाशिंग आणि घुंगरू, पैंजण अशा प्रमुख साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या वर्षी शेतपिकांचे उत्पादन समाधानकारक झाले होते. मात्र, शेतमालाला मातीमोल भाव मिळाल्याने शेतकरीवर्ग अगोदरच आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत बैलपोळ्याचे साहित्यही महागल्याने शेतकरीवर्गात नाराजी दिसून येत आहे.

--

सजावट साहित्याचे दर

--

साहित्य -किंमत (रुपयांत)

वेसण २० ते ५०

कासरे १५० ते २५०

झूल १०० ते १२००

माठोड ८० ते ३५०

म्होरकी ३० ते ६०

चंगाळा ९०० ते ११००

केसऱ्या १० ते २०

गेरू पाकीट ५ ते १०

हिंगोळ १५ ते २०

शेंबी प्लास्टिक ७० ते ८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीकृष्ण जन्मोत्सवाने अवतरणार चैतन्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्रावण मासातील सण-उत्सवांमध्ये चैतन्याची भर टाकणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव आज, सोमवारी (दि. १४) साजरा करण्यात येत आहे. सर्वांचे लाडके दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असून, कृष्ण मंदिरे, तसेच इतर मंदिरांमध्येदेखील हा जन्मोत्सव दहीहंडी फोडून साजरा करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये कापड पेठेतील मुरलीधर मंदिर, भाभानगरमधील इस्कॉनचे मंदिर, पंचवटीतील कृष्णनगर येथील कृष्ण मंदिर येथे जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, मूर्तींच्या भोवती सजावट करण्यात येत आहे. श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. रात्री जन्मोत्सवात पाळणा करून महिला गाणी सादर करतात. श्रीकृष्णाने गायी चारताना स्वतःची आणि सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्यांचा काला सर्वांना खाऊ घातला, म्हणून जन्मोत्सवात काला करण्याची परंपरा आहे. काल्याची दहीहंडी फोडण्यात येते.

दहीहंडीच्या तयारीला गती

शहर परिसरात विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. दहीहंडी फोडण्यासाठी युवक-युवतींची तयारी सुरू आहे. त्यासाठी लागणारे मटकी, लाह्या, दही आदी साहित्याला मागणी वाढली आहे. या वर्षीच्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या अगोदर आणि नंतर येणाऱ्या लागोपाठच्या सुट्यांमुळे अनेक शाळांमध्ये जन्मोत्सव आणि दहीहंडी उत्सव अगोदर साजरे करण्यात आले. बालगोपालांना श्रीकृष्णाची व राधा यांची वेशभूषा आणि रंगभूषा करण्यात आली होती. त्यासाठी लागणारी वेशभूषा अलंकार, मुकुट आदी भाडेतत्त्वावर दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. श्रीकृष्ण मंदिरांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी साजऱ्या करण्यात येणाऱ्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मूर्ती, त्यांचा टोप, बासरी, मोत्यांच्या माळा, पोषाख, जरिपटका, मोरपीस मुकुट आदी बाजारात उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिलावाचे संकट गडद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत शासनाकडून मिळावी यासाठी दिलेले एनओसी जिल्हा मध्यवर्ती बँकेने रद्द ठरविल्याने ‘नासाका’वरील लिलावाचे संकट गडद झाले आहे. परिणामी नासाका सुरू व्हावा यासाठी वर्षभरापासून जोरदार प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकीकडे आर्थिक मदतीचे दाखविलेले गाजर व दुसरीकडे जिल्हा बँकेला नासाकावर लिलावासारख्या कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्यास भाग पाडणाऱ्या सहकारमंत्र्यांनी एका अर्थाने नासाकाच्या बॉयलरमध्येच पाणी ओतले आहे. या खेळीत नासाकाचा बळी गेल्यास भाजपच्याच प्रतिमेला तडा जाणार आहे. जिल्हा बँकही वसुलीअभावी आर्थिक अडचणीत सापडल्याने या बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सहकार खात्याने कडक उपाययोजना आखल्या आहेत. ज्या सहकारी संस्थांकडे मोठी थकबाकी आहे, अशा सहकारी संस्था आता जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्या रडारवर आहेत.

आतापर्यंत संचालक मंडळाची मेहेरबानी असल्याने थकबाकीचा डोंगर वाढला होता. नासाकाकडेही कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने जिल्हा बँकेने नासाकाकडील थकबाकी वसुलीसाठी कडक धोरण स्वीकारले आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत नासाकाच्या लिलावाच्या ठरावास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच जिल्हा बँकेने नासाकाला दिलेली एनओसी लिलावाच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला होता.मात्र गुरुवारी जिल्हा बॅंकेने नासाकाला दिलेले एनओसी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता नासाका लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जिल्हा बँक नासाकाच्या लिलावाची कायदेशीर प्रक्रिया कोणत्याही क्षणी पार पाडण्याची शक्यता आहे. नासाकासह जिल्ह्यातील निसाकाचे मूल्य निर्धारण पुण्यातील मिटकॉन या कंपनीद्वारे जिल्हा बँकेने यापूर्वीच केलेले असून, या कंपनीने आपला अहवाल जिल्हा बँकेकडे सुपूर्दही केला आहे.

--

वाचविण्यासाठी प्रयत्न सुरूच

नाशिक सहकारी साखर कारखाना कर्जबाजारी झाल्याने गेल्या चार गळीत हंगामांसून बंद आहे. नासाका बंद झाल्याने नासाका कार्यक्षेत्रातील नाशिकसह त्र्यंबकेश्वर, सिन्नर व इगतपुरी या तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक अारिष्ट कोसळले होते. सुमारे ९७ कोटी रुपये कर्ज असणाऱ्या नासाकाला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून गेले वर्षभर जोरदार प्रयत्न सुरू होते. नासाकाचा प्रश्न शासनदरबारी पोहोचवून नासाकावर अशासकीय प्राधिकृत संचालक मंडळाची नेमणूक करण्याबरोबरच नासाकाला अंशतः आर्थिक मदत मिळविण्याच्या प्रक्रियेला त्यांच्याच प्रयत्नांतून चालनाही मिळाली होती. सहकार मंत्र्यांनी नासाकाला आर्थिक मदतीसाठी थकहमी देण्यास नकार देताच संचालक मंडळाने वैयक्तिक हमीस सहमती दर्शविली होती. त्यामुळे नासाकाचा बॉयलर पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. आता नासाकाकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने नासाकाभोवती कायदेशीर मार्गाने लिलावाचा फास आवळला असला, तरी आमदार सानप व प्राधिकृत अशासकीय संचालक मंडळाने नासाका वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सोडलेले नाहीत.

---

नासाकाला दिलेले एनओसी रद्द झाल्याबाबत माहिती नाही. मात्र, नासाका सुरू होणार हे नक्की. संचालक मंडळ, जिल्हा बँक व शासन सर्व जण नासाका सुरू करण्यासाठी सकारात्मक आहेत. नासाकाला जिल्हा बँकेने दिलेले एनओसी रद्द झाल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत.

-तानाजी गायधनी, चेअरमन, अशासकीय प्राधिकृत संचालक मंडळ, नासाका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष औषध कंपनीसह विक्रेत्याला दणका

$
0
0

४ लाख ३८ हजार नुकसान भरपाईचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

द्राक्षाच्या घडावर सिलिक्सॉल औषधाची फवारल्यास सूर्यजळीपासून संरक्षण मिळते, अशी दिशाभूल करणारी जाहिरात करून अनिष्ठ व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सूर्यजळीमुळे ५० ते ५५ टक्के नुकसान झाले. याबाबतचा निष्कर्ष काढत जिल्हा ग्राहक न्यायमंचाने ४ लाख ३८ हजार ७५० रुपयांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश औषध कंपनीसह विक्रेत्याविरुद्ध दिला आहे. त्याचप्रमाणे या मानसिक त्रासापोटी २५ हजार तर अर्ज खर्चापोटी १० हजार असा ३५ हजाराचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

लोहशिंगवे येथील जगदीश पुंडलिक रकिबे यांनी नवीन मुंबई येथील प्रिव्हिलाईफ सायन्सेस प्रा. लि. व नाशिक येथील वैभव अॅग्रो सोल्यूशन्स, मे. यश अॅग्रो एजन्सी याविरुद्ध तक्रार केल्यानंतर न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. लोहशिंगवे येथे १.८७ हेक्टर शेतजमीन असून, त्यात द्राक्ष बाग लावली आहे. या बागेत उन्हामुळे द्राक्षाचे घड जळू नये यासाठी कंपनीच्या दाव्यानुसार सिलिक्सॉल औषधाची फवारणी केली. पण, या फवारणीनंतर सूर्यजळीमुळे ५० ते ५५ टक्के नुकसान झाले, असे रकिबे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल तयार केला. या नुकसानीनंतर कंपनी व औषध विक्रेते यांच्याकडे नुकसानीची मागणी केली पण त्यांनी रकिबे यांना नुकसान भरपाई दिली नाही.

या तक्रारीवर प्रिव्हिलाईफ सायन्सेस प्रा. लि. यांनी आपली बाजू मांडताना, सिलिक्सॉलमुळे झाडांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची शक्ती वाढते. याबाबत प्रयोग चाचणी झाल्यानंतर कृषी विभागाच्या संचालकांनी त्या औषधाची विक्री करण्याची परवानगी दिलेली आहे, असे सांगितले. त्या औषधाच्या उपयोगाची पद्धत दिलेली आहे. तक्रारदारांनी चुकीच्या रितीने ते औषध वापरले असेल त्यामुळे हे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने त्यांना नुकसान भरपाई व दंड शेतकऱ्यांना द्यावा, असा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’ आज ठरणार...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सौंदर्य, दमदार परफॉर्मन्स, बुद्धिमत्ता या तिन्हींच्या बळावर ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पंधरा सौंदर्यवतींमध्ये आज टफ फाइट होणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विजयी होण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. श्रावणक्वीनचा मुकुट पटकावण्यासाठी या स्पर्धक तरुणी आज संध्याकाळी रॅम्पवॉक करण्यासाठी सिद्ध होतील. अंतिम फेरीचा हा झगमगता सोहळा स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये सायंकाळी पाच वाजेपासून रंगणार आहे. स्पर्धेत चुरस वाढल्याने कोण बाजी मारतेय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ पॉवर्ड बाय सोनी पैठणी स्पर्धेची खास बाब म्हणजे, नाशिक शहराची श्रावणक्वीन यंदा निवडली जाणार आहे. दरवर्षी नाशिकच्या प्राथमिक फेरीतून तीन स्पर्धक मुंबईत अंतिम फेरीसाठी पाठवले जायचे. यंदाच्या वर्षी प्राथमिक फेरीतून पंधरा स्पर्धकांची निवड करत त्यांना नाशिकमध्येच ग्रूम केले गेले. स्पर्धेची अंतिम फेरीदेखील नाशिकमध्ये रंगणार असल्याने स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नाशिकची श्रावणक्वीन होण्याचा मान मिळवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा आत्मविश्वास स्पर्धकांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेने मराठी मुलींमधील गुणवत्ता शोधून इंडस्ट्रीला उत्तमोत्तम टॅलेंट मिळवून दिलं आहे. अभिनय, नृत्य, चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ‘मटा’च्या श्रावणक्वीन्स चमकताहेत. यंदाच्या पंधरा स्पर्धकांना गेले सात दिवस ग्रूम केलं जातयं. ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या दिग्जजांकडून स्पर्धकांना मॉडेलिंग, अभिनय, जाहिरात क्षेत्रात व्यक्तिमत्त्व खुलवण्याचे धडे देण्यात आले आहेत. सौंदर्यासोबतच पर्सनॅलिटी घडवण्याचे मार्गदर्शन मिळाल्याने स्पर्धकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. यामुळे अंतिम फेरीला सामोरे जाण्यासाठी सगळ्या सज्ज झाल्या आहेत. आता उत्सुकता आहे ती श्रावणक्वीनच्या झळाळता मुकुट मिळवण्याची. प्रसिद्ध सिनेअभिनेते, अभिनेत्री, मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.

मैत्रीतून स्पर्धेकडे...

प्राथमिक फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत त्या जीवाभावाच्या मैत्रिणींसारख्या एकत्र राहिल्या. स्वतःच्या कलागुणांचे दर्शन घडवतानाच त्यांनी मैत्रिणींनाही सांभाळून घेतले. आज मात्र त्या रॅम्पवर उतरणार आहेत स्पर्धक म्हणून. स्पर्धेचा मुकुट पटकावत या ‘पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट’ची राणी कोण होणार ठरणार, यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसमादे पट्ट्यात उत्कंठा

$
0
0

टीम मटा

कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. मालेगावमध्ये ९२.६० टक्के, सटाण्यात ९३.४० टक्के, कळवणमध्ये ९१.८७ टक्के, तर देवळा येथे ९५.५७ टक्के मतदान झाले. तालुका सदस्य तसेच अध्यक्षपदामुळे कसमादे पट्ट्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

मालेगाव तालुक्यात प्रतिष्ठा पणाला

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी येथील सोयगाव भागातील मविप्र विद्यालयात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण ७१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सुमारे ९२.६० टक्के मतदान झाले.

मतदानासाठी विद्यालयात एकूण तीन बूथ होते. सकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. प्रगती पॅनल व समाज विकास पॅनलचे उमेदवार, कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर मतदारांना हात जोडून मतदानासाठी आवाहन करीत होते. सकाळच्या सत्रात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे, संचालकपदाचे उमेदवार डॉ. जयंत पवार, काशिनाथ पवार, बाजार समिती सभापती प्रसाद हिरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मविप्रच्या इतिहासात पहिल्यांदाच मालेगावला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. मालेगावातून डॉ. तुषार शेवाळे व सटाण्यातून प्रतापदादा सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सटाण्यात तीव्र चुरस

सटाणा : येथील महाविद्यालयात १३१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण ९३.४० टक्के मतदान झाले. समाज विकास पॅनलचे अध्यक्षपदाचे उमदेवार प्रतापदादा सोनवणे, व उपसभापतिपदाचे उमेदवार रवींद्र पगार, उमेदवार दिलीप दळवी तसेच प्रगती पॅनलचे उपसभापतिपदाचे उमेदवार राघो अहिरे, तालुका संचालकपदाचे उमेदवार डॉ. प्रशांत देवरे हे महाविद्यालयाच्या आवाराबाहेर दिवसभर तळ ठोकून होते. सटाणा महाविद्यालयाच्या मध्यवर्ती हॉलमध्ये सहा बूथ करण्यात येऊन प्रत्येकी २५० मतदारांची मतदानाची सोय करण्यात आली होती. अत्यंत सुरळीत व शांततेत मतदान पार पडले.

कळवणमध्ये उत्साह

कळवण : मविप्र निवडणुकीत कळवण तालुक्यात ९१.८७ टक्के मतदान झाले असून, ३४८ पैकी ३१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कळवण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महविद्यालय या केंद्रावर मतदान घेण्यात आले. सकाळपासूनच दोन्ही पॅनेलच्या समर्थकांनी मतदारांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली असल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. प्रगती पॅनलतर्फे अशोक पवार, तर समाज विकास पॅनेलतर्फे बाजीराव पवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान संपल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी मतदार, कार्यकर्ते व मतदान अधिकाऱ्यांचे आभार मानले. या निवडणुकीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

देवळ्यात सरळ लढत

कळवण : मविप्र निवडणुकीत देवळा तालुक्यात ९५.५७ टक्के मतदान झाले. तालुक्यातील एकूण ५८७ पैकी ५६१ मतदारांनी मतदान केले. येथील रामरावजी आहेर महाविद्यालयात तीन बूथ असले तरी दुपारपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. प्रगती पॅनलचे उमेदवार डॉ. विश्राम निकम व समाज विकास पॅनलचे नारायण पवार यांच्यात सरळ लढतीसाठी मतदान झाले. मतदारांना ने-आण करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली.

येवला, चांदवड, नांदगावात उत्साह

येवला, चांदवड व नांदगावमध्ये मतदरांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. नांदगावमध्ये ९०.११ टक्के, चांदवडमध्ये ९८ टक्के, तर येवल्यात ९४ टक्के मतदान झाले. अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, आता निकालाकडे लक्ष लागले आहे.

येवला तालुक्यातील २०४ सभासद मतदारांपैकी १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदगावमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला. अत्यंत खेळीमेळीने निवडणूक पार पडली. एकूण २९४ पैकी २६२ मतदान झाले. हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडते याची उत्सुकता वाढली असून, ९०.११ टक्के मतदान झाल्याने उमेदवार व समर्थक यांच्यात समाधान पसरले आहे. चांदवड येथे विक्रमी मतदान झाले. ६९१ पैकी ६८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तब्बल ९८ टक्के मतदान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपट्टीवाढीचा चटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा
पाणीपट्टीत कोणतीही करवाढ न करण्याचा निवडणूक काळात दिलेला वचननामा सत्ताधाऱ्यांनी अवघ्या सहा महिन्यात मोडीत काढला. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टीत घसघशीत वाढ करून समस्त सटाणावासीयांना पाणी पाजल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
विद्यमान नगरसेवकांनी १३ जून २०१७ रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १०५ अन्वये पाणीपट्टीत सुधारित दरवाढ लागू केली आहे. सदरची दरवाढ १ ऑक्टोबर २०१७ पासून अंमलात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी हेमलता डंगळे यांनी दिली. पाणीपट्टीतील नवीन दरवाढ ही अत्यंत अयोग्य असून शहरातील जनतेला प्रतिव्यक्ती आवश्यक असलेल्या १४० लिटर पाणी सुद्धा पालिका पुरवित नाही. तसेच शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना पालिका प्रशासनाने केलेली दरवाढ ही अत्यंत चुकीची व अयोग्य असल्याची प्रतिक्रिया शहरातून व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे पाणीपट्टी पूर्ववत ठेवण्याची मागणी माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे यांनी केली आहे.
अर्धा इंची नळाद्वारे घरगुती ग्राहकांसाठी पाणीपुरवठा होत असलेल्या ग्राहकांना पूर्वी ९०० रुपये पाणीपट्टी होती. आता ती नव्याने १ हजार ५१० रुपये आकारण्यात येणार आहे. तर बिगर घरगुती व्यावसायिकांसाठी जवळपास दुप्पट म्हणजे ४ हजार ५३० वरून ९ हजार ०३० इतकी भरमसाठ वाढविण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत या विषयी रोष व्यक्त होत आहे.

असा आहे वाढता करभार
पाणीपट्टी...................पूर्वीचे दर........नवीन दर
घरगुती (अर्धा इंची).......९१०.............१,५१०
बिगर घरगुती (१२ इंची)..४,५३०........९,०३०
मोठे व्यावसायिक (१८ इंची)........४,५८०........२०,३८५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला २२५ किलो मांस जप्त

$
0
0

म. टा. प्रतिन‌िधी, नाशिक
इंदिरानगर परिसरात अवैधरित्या जनावरांचे मांस विक्रीसाठी आलेल्या संशयितांकडून सुमारे सव्वा दोनशे किलो मांस व कार असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे उपनिरीक्षक रवींद्र सहारे यांना इंदिरानगर परिसरात एका वाहनातून अवैधरित्या मांस विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, युनिट दोनच्या पथकाने इंदिरानगर परिसरात सापळा रचला. एका लाल रंगाच्या मारुती कारला थांबविण्यात आले. कारचालक संशयित सईद सलीम कुरेश (रा. नानावली दर्गा, जुने नाशिक) यास ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. २२५ किलोचे अवैधरित्या जनावरांचे मांस विक्रीसाठी आणल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील मांसाचे नमुने हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ताजणे, आत्माराम रेवगडे, देवकिसन गायकर, राहुल सोळसे, नितीन भालेराव, कैलास महाजन, संतोष ठाकूर याच्या पथकाने ही कामग‌िरी बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात-बाराला सर्व्हरमुळे खोडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्रशासकीय सेवा अधिक गत‌िमान करतानाच कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाकडून स्वातंत्र्यदिनापासून जिल्ह्यात डिज‌िटल सात-बारा उतारे देण्याची घोषणा अल‌िकडेच करण्यात आली. परंतु, स्वातंत्र्यदिन एका दिवसावर येऊन ठेपला असताना संगणकीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने डिजिटल सात-बारा वितरणाचा मुहूर्त साधला जाणार की टळणार, याबाबत चर्चा आहे.
जमाबंदी आयुक्त चोकलिंगम यांनी दीड महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या संगणकीय कामकाजाचा आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातून महाराष्ट्रात ई-फेरफार उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १०० टक्के संगणकीकृत सातबारा देण्याचे प्रशासनाने महसूलदिनी जाहीर केले. परंतु, री-एडिट सॉफ्टवेअरला सर्व्हरमुळे अडचणी येत आहेत. परिणामी संगणकीय काम पूर्ण करण्यातील प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत. हस्तलिखित सात-बारा उतारा व ऑनलाइन सात-बारा उतारा यामध्ये असलेल्या तफावती दुरुस्त करण्याची संधी प्रशासनाला मिळाली आहे. या दोन्ही उताऱ्यांमधील माहिती तंतोतंत जुळविण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सात-बारा दुरुस्तीसाठी एडिट मॉड्युलचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. तलाठ्यांनी भरलेली माहिती मंडलाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम मान्यतेसाठी तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे.

‘री-एडिट’मुळे व्य‌त्यय
संगणकीय सात-बारामधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ‘री-एडिट’ मॉड्यूल सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. परंतु, या सॉफ्टवेअरमध्ये काम करताना सरकारचे सर्व्हर वेळोवेळी डाऊन होत असून, स्पीड मिळत नसल्याचे तलाठ्यांचे गाऱ्हाणे आहे. हे गाऱ्हाणे दूर होत नसल्याने स्वातंत्र्यदिनापासून जिल्ह्यात शंभर टक्के ऑनलाइन पद्धतीने डिज‌िटल सात-बारा उपलब्ध कसा होणार, असा प्रश्न उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेस कामगारांना पंतप्रधानांचे ‘धन्यवाद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या नोट प्रेसमधील कामगारांनी नोटाबंदीच्या काळात केलेल्या कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘मैं आप सभी को इस राष्ट्रीय कार्य के लिये शत-शत धन्यवाद देता हूँ’, या शब्दांत कामगारांची पाठ थोपटत प्रेसचे आधुनिकीकरणाचे आश्वासनही त्यांनी दिले. नोटाबंदीच्या काळातील जास्त कामाबद्दल कामगारांना प्रोत्साहन रक्कम देण्यास सीएमडींनी मान्यता दिली.

खासदार हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघटनेचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. दोन्ही प्रेसचे आधुनिकीककरण करावे, एक जास्तीचे इंटिग्लो मशिन मिळावे, आनलाइन, ऑफलाइन तपासणी मशिन मिळावे, आयएसपी पासपोर्टमधील एचएयूव्ही फिल्म बनविण्याचे काम प्रेसला द्यावे आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या. नोटाबंदीच्या काळात देवासच्या प्रेस कामगारांनी जादा काम केले. त्यासाठी टार्गेट अलाऊन्सची ५० रुपयांची जास्तीची रक्कम त्यांना देण्यात आली. सीएनपी कामगारांनी एकही सुटी न घेता उत्पादन केले. त्यामुळे त्यांनाही ती मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्रोत्साहन भत्ता देण्याचे सीएमडींनी मान्य केले.

--

अन्य मंत्र्यांना साकडे

नाशिकरोड प्रेसमध्ये संपूर्ण पासपोर्ट तयार होतो. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असलेले पासपोर्टमधील एचएयूव्ही फिल्म बनविण्याचे कामही याच प्रेसला मिळावे, अशी मागणी शिष्टमंडळाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पासपोर्टचे काम बाहेर न देता प्रेसलाच देण्याची मागणी केली. अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन नोटांचा कागद तयार करणारी पेपर मिल नाशिकलाच स्थापन करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेअभावी होतेय पायपीट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गणेशगाव येथील गोदावरी नदीपात्रातील पुलाची दुरुस्ती होऊन सहा महिने उलटले, तरी बससेवा पूर्ववत न झाल्याने नाशिक तालुक्याच्या महिरावणी, शिवणगाव, पिंपळगाव (गरुडेश्वर), गणेशगाव (नाशिक), गणेशगाव (त्र्यंबकेश्वर), दुडगाव व राजेवाडी या सात गावांतील दोनशेवर विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असून, त्यांचा शिक्षणाचा प्रवास प्रवासाच्या सुविधेअभावी थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दररोजची तब्बल आठ किलोमीटरची पायपीट अशक्य होत असल्याने खासकरून या गावांतून नाशिकमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या सुमारे ८० मुलींवर पुढील शिक्षणाला कायमचा रामराम ठोकण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील वरील गावांसाठी सीबीएस येथून नाशिक-शिवणगाव अशी बससेवा अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र, राज्यातील विविध नद्यांच्या पात्रांवरील जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येऊन त्यात गणेशगाव येथील गोदावरी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे दुरुस्तीचे काम करण्याच्या कारणाखाली या पुलावरील वाहतूक काही महिने बंद ठेवण्यात आली होती. गेल्या जून महिन्यात या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. जून महिन्यात दि. १५ पासून बससेवा सुरू झाली. परंतु, दि. २५ जूननंतर ही बससेवा पुन्हा बंद झाली. अद्यापही ही बससेवा बंद असल्याने या भागातून नाशिकमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात सुमारे ८० मुलींचा समावेश आहे.

--

मुलींच्या शिक्षणावर संक्रांत

सध्याची बससेवा केवळ गणेशगाव येथील पुलापर्यंतच सुरू असल्याने त्यापुढील भागातील गावातील मुला-मुलींन पायपीट करून गणेशगाव पुलापर्यंत यावे लागत आहे. सुमारे आठ किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत असल्याने बहुतांश मुलींनी शिक्षण अर्धवट सोडले आहे. प्रवास सुविधेअभावी उर्वरित मुलींचाही शिक्षणाच्या प्रवास थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

--

सध्या बससेवा गणेशगाव पुलापर्यंतच सुरू आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांना सुमारे ८ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. आम्ही बससेवा पूर्ववत सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. परिवहन महामंडळाचे अधिकारी केवळ आश्वासने देऊन आमची दिशाभूल करीत आहेत.

-दौलत कालेकर, नागरिक, शिवणगाव

--

पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बससेवा बंद केली असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात पुलाच्या दुरुस्तीचे काम कधीच झालेले आहे. बससेवेअभावी आम्हाला दररोज आठ किलोमीटरचा पायपीट करावी लागत आहे.

-सुभाष रणमाळे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images