Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘ओटीपी’द्वारे ४५ हजाराचा गंडा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
एटीएम कार्डाची माहिती घेऊन आणि ओटीपी क्रमांकाद्वारे अज्ञात व्यक्तीने ४५ हजार रुपयांची रक्कम बँकेतून परस्पर काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएम कार्डची माहिती आणि ओटीपी क्रमांक विचारून संशयिताने एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ४५ हजार २३६ रुपये काढून घेत गंडा घातला. याप्रकरणी जगन्नाथसिंह किशोरसिंह यादव (५६, रा. वडनेर दुमाला, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. यादव यांना ४ जुलैला ७३६२८८०७३६ या मोबाइलवरून फोन आला. संशयिताने यादव यांच्याकडील एसबीआयच्या एटीएम कार्डची माहिती विचारली. तसेच यादव यांना मोबाइलवर आलेला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारला. यादव यांनी ओटीपी सांगताच संशयिताने त्यांच्या बँक खात्यातून ४५ हजार २३६ रुपये काढून घेत यादव यांची फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे तपास करीत आहेत.

तरुणावर प्राणघातक हल्ला

शतपावली करणाऱ्या तरुणीचा विनयभंग होत असल्याते पाहून तिच्या मदतीस धावून जाणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गंगापूररोड परिसरात घडली आहे. गंगापूर रोडवरील संत कबीर नगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित पप्पू मुरलीधर नरवडे (२६, रा. संतकबीर नगर) याच्याविरोधात विनयभंग तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील २८ वर्षीय तरुणी शनिवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास शतपावली करीत होती. त्यावेळी संशयित पप्पू नरवडे याने तरुणीचा विनयभंग केला. हे पाहून तेथून जाणाऱ्या संतोष कांबळे या तरुणाने नरवडे याच्या तावडीतून तरुणीस वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताने संतोषवरच कोयत्याने वार केला. तसेच परिसरातील इतर नागरिकांनाही मारहाण करून पप्पूने पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बुराडे हे तपास करीत आहेत.

विजेच्या धक्क्याने मजूर ठार

सातपूरमधील अशोकनगर परिसरात सेंट्रिंगचे काम करणाऱ्या मजुराचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला आहे. अनिल शिवाजी चौधरी (४०, रा. अशोकनगर, सातपूर) असे संबंधित मजुराचे नाव आहे. चौधरी हे अशोकनगर येथे सेट्रिंगचे काम करत होते. स्टील कापत असताना विजेच्या वायरीचा धक्का त्यांना लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लाखाचा ऐवज लंपास

ओळखीचा गैरफायदा घेत वेळोवेळी महिलेच्या घरी जाऊन घरातून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज तरुणीने चोरल्याचा गुन्हा उपनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. प्रज्ञा प्रसन्न जाधव (रा. रामदास स्वामीनगर, टाकळी रोड) यांनी फिर्याद दिली. जाधव यांची एस. के. भगुरे (रा. जयभवानी रोड) या तरुणीसोबत ओळख होती. संशयित तरुणी १३ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान, भेटण्याच्या बहाण्याने घरी येत होत्या. याच भेटीत त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ९६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाकले हे तपास करीत आहेत.

महिलेचा विनयभंग

इमारतीत कार पार्क करणाऱ्या महिलेचा दुसऱ्या कारचालकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. कुलकर्णी रोड परिसरात महिला तिच्या पतीसह कारमधून घरी आली. दाम्पत्य इमारतीत गाडी पार्क करत असताना एमएच १२ एमआर ०७५० या क्रमांकाच्या कारमधून आलेल्या संशयिताने महिलेच्या कारपुढे कार लावून वाद घातला. तसेच महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘देणे’ होणार सुंदर!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन ज्यांनी दहावीच्या परीक्षेत देदिप्यमान यश मिळवून दाखविले त्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात, योग्य दिशा, भविष्यात उज्ज्वल यशाचा झेंडा रोवण्यात मदत करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ तर्फे हेल्पलाइन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाशिक भरातून जमा झालेले धनादेश त्या मुलांना हस्तांतरीत करण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉलेजरोडवरील आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज, सेमिनार हॉल, तिसरा मजला येथे शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांची तर अध्यक्ष म्हणून सर डॉ. मो. स. गोसावी यांची उपस्थिती राहणार आहे. गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव हेच ते ‘मटा’ने हेरलेले दहा हिरे आहेत.
‘मटा’ने हे दहाजण हेरलेत, आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना ‘त्यांनी’ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, नुसते शिक्षणच नाही घेतले तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर येण्यासाठी ‘ते’ प्रयत्न करीत आहेत. भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे. पण त्यासाठी त्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे अशांसाठी ‘मटा’तर्फे हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत मदतीची हाक देण्यात आली होती. त्याला अभूतपुर्व असे यशही लाभले. नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दाखविली, कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू असा हट्ट धरला तर कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तिन्ही वर्षे मोफत शिकवू असे सांगितले.

नाशिककरांचे स्वागत
मटा हेल्पलाइन उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातून ओढला जावा, असा हेतू होता. नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे तो पूर्णही झाला आहे. हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच; पण नाशिककरांनीही या हृदय सोहळ्याला उपस्थित राहावे, अशी विनंती. चेक स्वीकारण्याची अंतिम मुदत आज, १५ ऑगस्टपर्यंतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत युवकाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
शहरातील बस स्थानकाजवळ किरकोळ कारणावरून करण्यात आलेल्या मारहाणीत पोटात रक्तस्त्राव होऊन युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी येवला शहर पोल‌िस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोल‌िसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला बस स्थानकाजवळ धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून आदील जाकीर पठाण (१७, रा. पिंजारगल्ली, येवला) या युवकास मनोज राजू सोनवणे (१९, रा. जुनी पंचायत समिती मागे, येवला) तसेच त्याच्या अन्य काही सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात पठाण याच्या पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात त्याचा मृत्यू झाला. अकील चांद पठाण यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मनोज सोनवणे यास अटक केली असून या घटनेत त्याचे आणखी इतर कोण कोण साथीदार आहेत, याचाही पोल‌िस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरावी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

स्वतःबरोबर समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी गुरव समाज बांधवांनी उच्च शिक्षणाची कास धरावी. कष्ट, प्रामाणिकपणा व जिद्दीने वाटचाल करत यश संपादन करावे, असे प्रतिपादन महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनाजीराव गुरव यांनी केले.

शैव गुरव समाज नाशिक या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता कार्यक्रम तसेच गुणवंतांचा सत्कार समारंभ नाशिक-पुणे मार्गावरील फेम थिएटरमागील क्षत्रिय मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी शिक्षणाधिकारी अरविंद फुलारी, मुंबई येथील संतोष गुरव, माजी न्यायाधीश प्रकाश हरताळकर, न्या. कुमार भक्त, नाशिक जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष रमेश पवार, अशोक भालेकर प्रमुख पाहुणे होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान शंकर तसेच काशीबा महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संस्थेचे सचिव नितीन काळे यांनी प्रास्तविक केले. कोषाध्यक्ष मंगेश भांडारे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. अध्यक्ष सुधीर चांदसरकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

अरविंद फुलारी म्हणाले की, समाजातील नीतिमूल्ये हरवत चालली असताना आपण मुलांवर बालपणापासून संस्कार करणे गरजेचे आहे. शिरीष गुरव, डॉ. नागेश गुरव, उमेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले तर एन. पी. तायडे यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाचे पाइप चोरीला

0
0

संरक्षक कठडे बसविण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या पुलाच्या संरक्षक कठड्याचे पाइप चोरीला गेल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. येथे त्वरित पाइप लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नाशिक-पुणे मार्गावर काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल उभारण्यात आला. हा पूल होण्याअगोदर रेल्वे मार्गावरील जुन्या उड्डाणपुलावरून वाहतूक होत असे. या पुलाने अनेक वर्षे साथ दिल्यानंतर नवा पूल उभारण्यात आला. जुन्या पुलाचा वापर आता सिन्नरहून नाशिकरोडला येणाऱ्या वाहनांसाठीच फक्त केला जात आहे. हा मार्ग एकेरी करण्यात आल्याने वाहने वेगात जात असतात.


वाहने कोसळण्याची भीती

या उड्डाणपुलाखालून रेल्वे मार्ग जातो. तसेच खाली देवी चौकात व्यावसायिक व अन्य लोक राहतात. वाहने खाली कोसळू नये म्हणून पुलाला सुमारे दोनशे मीटरपर्यंत संरक्षक कठडे बसविण्यात आले होते. त्यातील अनेक टप्प्यावरील पाइप कापून नेण्यात आले आहे. येथे पथदीप नसून, या पुलावरून वाहने वेगात धावत असतात. त्यांचे नियंत्रण सुटले तर वाहने खाली रेल्वेवर किंवा लोकवस्तीवर पडून प्राणहानी होऊ शकते. त्यामुळे लोखंडी पाइप बसविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात गवत वाढले असल्याने पाइप तुटल्याचे वाहनचालकांना लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तरी, या मार्गावर जेथे संरक्षक कठडे नाही तेथे ते बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंदे मातरम्’सक्ती नाशिकमध्येही करा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईपाठोपाठ नाशिकमधील मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी केली आहे. त्या संदर्भातील प्रस्तावही येत्या महासभेत ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावरून मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेतील शाळांमध्ये वंदे मातरम् हे गीत सक्तीचे करण्यावरून वाद सुरू असतानाच नाशिकमधील शिवसेनेच्या नगरसेविका गामणे यांनी महापालिकेला असाच प्रस्ताव दिला आहे. नाशिकमधील मराठी, उर्दू आणि इंग्रजी शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी रोज ‘वंदे मातरम्’ गीत म्हणण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या महतीबाबत रोज शाळांमध्ये एक तास घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव येत्या शनिवारी महासभेत ठेवण्यात येणार आहे.

वंदे मातरम् या गीतावरून मुंबईत अगोदरच वाद सुरू आहेत. त्याच धर्तीवर ‘वंदे मातरम्’ला नाशिकमध्येही विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर या महासभेत याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या महासभेत गायीला श्रद्धांजली देण्याचा प्रस्ताव पारित करून महापौरांनी वाद ओढवून घेतला होता. त्यामुळे या प्रस्तावाबाबत त्या काय निर्णय घेतील, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणे, दोन हजारांत केअर टेकर ठेवा!

0
0

नाशिक : किमान वेतनासाठी केंद्र सरकारने कायदा बनवला. महागाई व गरजा विचारात घेऊन कायद्यातील तरतुदींपेक्षा कमी वेतन देणे गुन्हा ठरतो. या कायद्याला हरताळ फासण्याचा उद्योग महिला व बालकल्याण विभागाने केला आहे. बाल निरीक्षणगृहाच्या सुरक्षेची जबाबदारी पाहणाऱ्या केअरटेकरला दोन, तर ५० मुलांचा स्वयंपाक बनवणाऱ्या कर्मचाऱ्यास तीन हजार रुपये देण्याचे पत्र प्रशासनाने धाडले आहे. इतक्या कमी पैशांमध्ये काम करण्यास कोणी राजी नसल्याने राज्यातील ४४ बाल निरीक्षणगृहे (रिमांड होम) बंद पडण्याची भीती व्यक्त होते आहे.

अनाथ आणि विधी संघर्षित बालकांसाठी निरीक्षणगृहे महत्त्वपूर्ण ठरतात. याच संस्थेच्या माध्यमातून अनाथ किंवा परिस्थिती नसलेल्या बालकांचे संगोपन केले जाते. येथेच गुन्हेगारी मार्गावर निघालेल्या मुलांना पुन्हा मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांना निवासासह जेवणाची, तसेच शिक्षणाची सुविधा बाल निरीक्षणगृहामार्फत पुरवली जाते. या संस्थेत शिकलेली अनेक मुले सरकारी हुद्द्यावर आज काम करीत आहे. दुर्दैवाने, सध्या राज्यातील ४४ रिमांड होम्स कर्मचाऱ्यांअभावी अनेक समस्यांचा सामना करीत आहे. नाशिकमध्ये उंटवाडी रोडवर बालकांचे निरीक्षणगृह असून, संस्थेचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी सांगितले, की संस्थेत ५० मुलांची क्षमता असून, मुलांसाठी चार तर मुलींसाठी चार अशी आठ केअर टेकरची पदे मंजूर आहेत. मंजूरपैकी चार पदे रिक्त असून, नवीन पदे भरण्यास मंजुरीच मिळत नाही. काही वर्षांपूर्वी ही पदे मानधनावर भरण्याचा आदेश काढण्यात आला होता. यासाठी सुरुवातीस आठ, तर नंतर ११ हजार रुपये ठरवण्यात आले. काही महिन्यांपूर्वी निरीक्षणगृहातून मुले पळून जाण्याचा प्रकार घडला असता, संस्थेने केअर टेकर भरण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, असे पद आउटसोर्सिंगने भरावे, तसेच यासाठी फक्त दोन हजार रुपये देता येतील, असे पत्र महिला व बालकल्याण विभागाने संस्थेच्या अध्यक्षांना पाठवून दिले. स्वयंपाक्यास तीन हजार रुपये द्यावेत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. इतक्या कमी पैशांमध्ये काम करण्यास कोण राजी होईल, असा प्रश्न शहा यांनी उपस्थित केला.

दानशूरांची मदत प्रशासकीय कामांवर खर्च

अनेक दानशूर व्यक्ती संस्थेला मदत करतात. संस्थेतील मुलांना चांगले शिक्षण, तसेच जेवण मिळावे, अशी दानशूरांची अपेक्षा असते. मात्र, सरकारकडून वेळीच आर्थिक मदत मिळत नाही. दुसरीकडे प्रशासकीय कामेही बाजूला ठेवता येत नाहीत. त्यामुळे मुलांसाठी मिळालेली आर्थिक मदत नाइलाजाने प्रशासकीय कामावर खर्च होते. याचमुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडून बंद होते. राज्यातील अनेक संस्था अशाच बंद पडल्या असून, त्या संस्थेतील मुलांचा भार इतर संस्थांवर पडत असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमधील खेळाडूंचा अभिमान

0
0

डॉ. सुचेता कोचरगावकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेली दहा वर्षे सतत ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्याचा मान भोसला मिलिटरी कॉलेजला मिळाला आहे. कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव आणि आरती पाटील या भोसलाच्या विद्यार्थिनींनी ही परंपरा राखली आहे. कॉलेजच्या या राष्ट्रीय खेळाडूंचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे प्रतिपादन भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुचेता कोचरगावकर यांनी व्यक्त केले.

नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजची विद्यार्थिनी मोनिका आथरे हिचा लंडन जागतिक स्पर्धेतील सहभागाबद्दल व २८ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात आरती पाटीलचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. कोचरगावकर बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, शारीरिक आणि मानसिक क्षमता या विद्यार्थिनींनी स्वतः मिळवली. वैयक्तिक आयुष्यातील अनंत अडचणी या विद्यार्थिनींनी सहजपणे सोडवल्या आहेत. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच त्या या स्तरापर्यंत पोहचू शकल्या आहेत. जिंकणे आणि हारणे हा जीवनाचा एक भाग असतो, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

मोनिका आथरे आणि आरती पाटील या दोघींची मुलाखतही घेण्यात आली. ‘८ किमीवर मनोबल टिकवण्याचे मोठे आव्हान समोर असताना आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो आहोत आणि देशासाठी मला ही शर्यत पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे’, याच भावनेने मी ही शर्यत पूर्ण केल्याचे मोनिका आथरे हिने सांगितले. भोसलाची शिस्त आहे म्हणून मी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचू शकले असे मतही तिने यावेळी मांडले. तर पायाला दुखापत झाल्यामुळे गेले वर्षभर कुठल्याही स्पर्धेत आरती पाटील हिला सहभागी होता आले नव्हते. ‘या काळात आपण पुन्हा धावू शकू असे वाटल्याने मोठ्या निश्चयाने मी ठाण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत उतरले आणि गेली सलग नऊ वर्षे, २००७ पासून असलेले भोसला आणि नाशिककडे असलेले विजेतेपद टिकवण्यात यश मिळवले’, अशा भावना तिने आरती पाटीलने मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन अहिरराव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नारायण गायधनी यांनी केले. याप्रसंगी कॉलजेच्या शिक्षक व विद्यार्थी यांनी भोसला बँडसह मोनिका आथरे आणि आरती पाटील यांचे सभागृहात स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारशी बांधवांकडून पतेती उत्साहात

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भारतीय स्वातंत्र्याच्या आधीपासून येथील संस्कृतीत साखरेप्रमाणं विरघळून जाऊन आपल्या संस्कृतीशी एकरूप झालेल्या पारशी धर्म‌ियांचा ‘पतेती’ हा उत्सव देवळालीतील ‘द झोरोस्ट्र‌ियन फायर टेम्पल’ अर्थात अग्यारी (अग्निमंदीर) येथे समाजबांधवांची गळा भेट घेत एकमेकांना नववर्षांच्या शुभेच्छा देत नुकताच झाला.

देवळाली परिसरात अत्यंत शांततेत जगणारा आणि असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारा समाज ही पारशी समाजाची ओळख आहे. या धर्मात फारसे सण-उत्सव नाहीत. पतेती, नवरोज व जमशेद नवरोज हे त्यांचे वर्षभरातील प्रमुख सण. त्यापैकी मुख्य असलेल्या पतेती सणानिमित्त वर्षातील शेवटचे नऊ दिवस हे पितरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात. दहाव्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात होते. यावर्षी गुरुवारपासून पारशी नववर्षाचा पहिला फरवर्दिन महिना सुरू होऊन नूतन वर्ष सन १३८७ प्रारंभ झाला.

आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी दहा दिवस वेगवेगळे उपचार करण्यात येतात. या धर्मामध्ये पितरांच्या शांतीला अत्यंत महत्त्व आहे. यावेळी अग्यारीत दस्तुरजी (पुजारी) नोजर मेहंती यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे अग्निपूजा, १० वाजता पूर्वजांचे स्मरण करून ‘जश्न पूजा’ करण्यात आली. पारशी धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘अवेस्ता’ या धार्मिक ग्रंथाचे पठण करण्यात आले. परिसरातील सगळी पारशी कुटुंबे नवीन कपडे परिधान करुन घरात गोडधोड पदार्थाची मेजवानी करतात. मित्र-नातेवाईक यांना आमंत्रित करून त्यांच्यासोबत या पक्वान्नांचा आस्वाद घेतला जातो. त्यात गोड खीर, गव्हाच्या सुजीचा (रव्याचा) शिरा, दह्यापासून बनविल्या जाणाऱ्या पक्वान्नांची रेलचेल प्रत्येक घरात असते. सर्वांना मिठाई वाटून, समाजबांधवांची गळा भेट घेत एकमेकांना नववर्षांच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार एकर भूखंड बिल्डरच्या घशात?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नवीन नाशिकमधील प्रभाग क्र. २५ मध्ये असलेल्या मलनिस्सारण केंद्राचा सुमारे चार एकर भूखंड बीओटी तत्तावर विकस‌ित करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. सदर भूखंड हा पालिकेने विकस‌ित करण्याऐवजी खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न प्रशासन आणि सत्ताधारी करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक शामकुमार साबळे यांनी केला आहे. या भूखंडाची बाजारभावातील किंमत ही ३५ कोटीच्या आसपास असून त्यावर डोळा ठेवलेल्या विकासकाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर जागेवर नाट्यगृह, अभ्यासिका किंवा विरंगुळा केंद्र पालिकेने स्वखर्चाने विकसीत करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

प्रभाग क्र. २५ मध्ये महापालिकेचा चार एकर भूखंड असून, त्यावर मलनिस्सारण केंद्र असून, सध्या ते बंद पडले आहे. नवीन नाशिकमधील मध्यवर्ती भागात असलेल्या पालिकेच्या मालकीवर काही खासगी विकासकांचा डोळा असून त्यांनी ती जागा बळकावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सदर भूखंडाची बाजार भावातील किंमत ही ३५ कोटीच्या आसपास आहे. परंतु बाजारात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हा भूखंड प्रशासनाने बीओटी तत्वावर विकस‌ित करण्याचा घाट बजेटमध्ये घालण्यात आला आहे. पेलिकन पार्कही अशाच प्रकारे बीओटी तत्वावर विकस‌ित करण्याच्या नावाखाली ठेकेदाराच्या घशात घालण्यात आला होता. त्याचा कोणताही बोध न घेता पुन्हा मध्यवर्ती भूखंड हा खासगी विकासकाला देवून तेथे मार्केट तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.

नवीन नाशिक हा विकस‌ित भाग असून येथे सुसज्ज नाट्यगृह, अभ्यासिका, धार्मिक केंद्र, विरंगुळा केंद्र किंवा निसर्गौपचार केंद्राची गरज आहे. त्यासाठी पालिका अन्यत्र पैसे देवून जागेचा शोध घेत असतांना आपल्याच ताब्यातील भूखंड बिल्डराच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एक‌िकडे आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जातात, तर दुसरीकडे ताब्यात असलेला भूखंड खासगी विकासकाला दिला जात असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे. सदरील भूखंड हा बीओटी तत्वावर विकस‌ित न करता पालिकेनेच विकस‌ित करावा, अशी मागणी साबळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


मश‌िनरी कुठे गेली

चार एकर जागेवर यापूर्वी मलनिस्सारण केंद्र होते. परंतु ते कालांतराने बंद पडल्यानंतर येथील कोट्यवधी रुपये किंमतीची मश‌िनरी गायब करण्यात आली आहे. त्यामुळे या यंत्रसामग्रीचाही शोध आयुक्तांनी घ्यावा अशी मागणी साबळे यांनी केली आहे. संबंधित यंत्रसामग्री गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलवर शॉक लागून विद्युत कर्मचारी ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

वीजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने शॉक लागून विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीमधील समन्वयाचा अभाव समोर आला असून, या प्रकाराने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर झाला आहे. मटाने सोमवारीच वीज कामगारांच्या धोकादायक पद्धतीने काम करण्याचे छायाचित्र प्रसिद्ध करून यातील धोका लक्षात आणून दिला होता.

इंदिरानगरच्या देवदत्त सोसायटी भागातील एका बंगल्यातील वीज पुरवठा खंड‌ित झाल्याची तक्रार इंदिरानगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल झाली होती. वीज वितरण कंपनीचे सागर वाघ व हेमराज केडकर हे दोघे ही तक्रार निवारण करण्यासाठी घटनास्थळी गेले. यावेळी जवळील विद्युत खांबावरील विद्युत पुरवठा सुरू असल्याने हा पुरवठा बंद करण्यात आला. विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर सागर वाघ यांनी खांबावर चढून दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच सागर यांना विजेचा झटका लागल्याचा अंदाज हेमराज केडकर यांना आला. त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधून वीज पुरवठा सुरू झाला असून, तो बंद करण्याची सूचना केली. वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री झाल्यानंतर हेमराज यांनी पोलवर चढून पाहणी केली तर सागर यांना विजेचा धक्का लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने कृत्र‌िम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी याबाबत तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती कळविली. अग्निशामक दलाच्या जवानांनी सागर यांना खाली काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

इंदिरानगर भागात भरवस्तीत हा प्रकार झाल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर तातडीने नगरसेवक अॅड. शाम बडोदे व सामाजिक कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वीज मंडळाचा असमन्वय

हा प्रकार घडला त्यावेळी वीज पुरवठा खंड‌ित करण्यात आला होता. मात्र, काम सुरू असताना अचानक वीजपुरवठा कसा काय सुरू झाला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या असमन्वयाचा हा परिणाम असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मालेगाव तालुक्यातील असलेले सागर हे साडेतीन वर्षांपूर्वीच वीज वितरण कंपनीत नोकरीला लागले होते. दोन महिन्यांपासून ते इंदिरानगर विभागात कार्यरत होते.


सुरक्षा ऐरणीवर

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीने विजेच्या खांबावर चढावे लागत असते. त्यामुळे पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, यासाठी वीज वितरण कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे. अचानक विद्युत पुरवठा सुरू होणे किंवा यासारख्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा हेल्पलाइन’च्या धनादेशांचे आज हस्तांतरण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमांतर्गत जमा झालेले धनादेश त्या मुलांना हस्तांतरीत करण्यासाठी आज समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज, सेमिनार हॉल, तिसरा मजला येथे आज, शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल.

या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांची तर अध्यक्ष म्हणून सर डॉ. मो.स. गोसावी यांची उपस्थिती राहणार आहे. गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव हेच ते ‘मटा’ने हेरलेले दहा गुणवंत आहेत. हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच पण नाशिककरांनीही या हृदय सोहळ्याला उपस्थित राहावे अशी विनंती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले भाजपात

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार शिवराम झोले यांच्यासह पंचायत समितीचे काही माजी सभापती भाजपमध्ये प्रवेश करणार आल्याची चर्चा सुरू होती. अखेर गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. शिवराम झोले यांच्या भाजप प्रवेशाने इगतपुरी मतदारसंघाचे राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. आगामी इगतपुरी नगरपालिका व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. झोले यांच्यासह ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, माजी जि. प. सदस्य केरू दादा खतेले, विनायक माळेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, चेअरमन यांसह बाळासाहेब झोले, नामदेव साबळे, निवृत्ती गवारी, शांताराम कोरडे, आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आज सभा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संच मान्यता दुरुस्ती, शिक्षक मान्यता, आरटीई अशा अनेक प्रश्नांशी मोठ्या कालावधीपासून झगडत असलेल्या शिक्षकवर्गाच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी आज (दि. १८ ऑगस्ट) सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक नाशिक, माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज, (दि. १८ ऑगस्ट) दुपारी २ वाजता सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक भारत स्काऊट गाईड येथे आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, नितीन बच्छाव व राजीव म्हसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

संच मान्यता दुरुस्ती करण्यात यावी, आरटीई प्रमाणपत्र त्वरित मिळावे, सेमी इंग्रजी तुकड्यांना त्वरित मान्यता मिळावी, २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या शिक्षकांच्या मान्यता रद्द न करणे व तातडीने या लोकांच्या सुनावण्या थांबविणे, प्रलंबित मेडिकल बिलावर चर्चा करणे व त्वरित मंजूर करणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी व त्या लोकांना त्यांच्या कपातीचा हिशोब देणे, शालेय पोषण आहारातील धान्यादि मालाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर न देता सेन्ट्रल किचन शेडची व्यवस्था करावी, एनडीसीसी बँकेत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे पगाराचे पैसे त्वरित देण्याची व्यवस्था करावी.तसेच स्मरण पत्र त्यांना तातडीने पाठवावे. नववी व दहावीला ८ जानेवारी २०१६च्या शासन निर्णयानुसार सरसकट मान्य पदे तीन देत असतांना विद्यार्थी संख्यांची अट शिथिल करावी, वर्ष २०१६-१७ संच मान्यतेतील त्रुटींची दुरुस्ती होऊन प्रयोग शाळा परिचर पदे पुन्हा पूर्ववत करावी, संच मान्यतेतील प्रस्तावित पदांना त्वरित मान्यता मिळावी, आपले परिपत्रक १६ जून २०१६ प्रमाणे पाचवी ते दहावीला ९ शिक्षक पदे मंजूर करावेत अशा मागण्या मांडण्यात येणार आहे. त्याबरोबरच ऐनवेळी येणाऱ्या विषयांवरही या सभेत चर्चा करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व संलग्न सर्व तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व कार्यवाह यांनी नाशिक व मालेगाव शहर मुख्याध्यापक संघासह सर्वांनी हजर रहावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ एकर जमीन सिंचनाखाली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावात जलुयक्त शिवार योजना आणि ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्याने २०३ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. गावातील साठ एकर पड‌िक जम‌िनीवर नाल्यातील आणि पाझर तलावातील काढलेला गाळ टाकल्याने त्याठिकाणी शेतकऱ्यांनी पीक लागवड केली आहे.

वडझिरे गावाला पाणी पुरवठा नऊ गाव योजनेतून होतो. काहीवेळा उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळी पिकांसाठी पाणी उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके आणि सरपंच संजय नागरे यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले. आमदार राजाभाऊ वाजे यांचे सहकार्य आणि उपविभागीय अधिकारी महेश पाटील तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनदेखील गावाला मिळाले.

‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत पाझर तलावातील ३७ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढल्याने पाणीसाठा वाढला. हा गाळ सहा हेक्टर क्षेत्रावर टाकल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

पाझर तलावात पाणी

जिल्हा परिषदेमार्फत एका पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून काढल्याने ७ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. वडझिरे गावाच्या प्रत्येक भागात आज पाणी साठल्याचे चित्र पहायला मिळते आहे. विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

जलयुक्त शिवार योजना गावासाठी समृद्धी आणणारी ठरली आहे. वडझिरेसह जायगाव, नायगाव आणि सोनगिरीचा काही भागाची पाण्याची समस्या दूर झाली आहे.

-अर्जुन बोडके, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकरोड अखेर मोकळा

0
0

मनपाकडून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई; फेरीवाले हटविले

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी महापालिकेने हॉकर्स झोन शहरातील अनेक भागात ठरवून दिले आहेत. असे असतानादेखील अतिक्रमणधारक रस्त्यांवरच व्यवसाय करत असल्याने त्यांच्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

महापालिकेच्या सातपूर विभागात विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, सहाय्यक अधीक्षक शिवाजी काळे व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि. १७) एबीबी सर्कलपासून रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणीच टपरीधारकांनी आपले व्यवसाय करावे, अशी सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

शहरातील अनेक भागात रस्त्यांवर टपरी धारकांचे अतिक्रमण वाढले होते. वाहनचालकांना रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांचा अडथळा होत असल्याने न्यायालयाने हॉकर्स झोनची उभारणी करण्याबाबत महापालिकेला आदेश केले होते. यानंतर महापालिकेची यंत्रणा जागी होत टपरी धारकांना हॉकर्सची नोंदणी करण्याबाबत आवाहन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात तरुण उद्योजकाचा मृत्यू

0
0

दिंडोरी : नाशिक-कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाऱ्या कारचे टायर फुटून गाडी झाडावर धडकून झालेल्या अपघातात दिंडोरी येथील तरुण उद्योजक अजिंक्य संजय राजे (२९) यांचा मृत्यू झाला.
दिंडोरी येथील अजिंक्य राजे हे बुधवारी मध्यरात्री नाशिकहून दिंडोरीला स्कॉर्पिओ कारने (एमच १५ बीएक्स १५२०) येत असताना हॉटेल राजयोग जवळील उतारावर मागील टायर अचानक फुटल्याने झाडावर गाडी आदळली. यात अजिंक्य राजे हे गंभीर जखमी झाले. दिंडोरी पोलिसांच्या गस्त पथकाने त्यांना तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. अजिंक्य यांनी अल्पावधीत बांधकाम व्यवसायात जम बसविला होता. त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी व सात महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर दिंडोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री स्वामी समर्थ टॅक्सी युनियनचे अध्यक्ष संजय राजे यांचे ते पुत्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेल हत्येप्रकरणी १७ निर्दोष

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये २००२ मध्ये झालेल्या ओ. पी. सिंग मर्डर प्रकरणात जिल्हा व सत्र कोर्टाने १७ संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात दोन जेलर, एक सुरक्षा रक्षक तसेच डॉक्टरांवरही आरोप ठेवण्यात आले होते. छोटा राजन गँगच्या सदस्यांनीच कट रचून हा खून केल्याचा आरोप पोलिसांनी केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती.
शरद शिवाजी शेळके (तत्कालीन जेलर, मुंबई), जयवंत अर्जुनराव शिंदे (तत्कालीन जेलर, नाशिकरोड), भरत बाबुराव मस्कर (गार्ड, नाशिकरोड), डॉ. रामचंद्र नामदेव काळे (वैद्यकीय अधिकारी, नाशिकरोड), रवी मल्लेश बोरा (होरा) उर्फ डी. के. राव (मुंबई), निरंजन काशिनाथ शाहू उर्फ बिल्डर यासह एकूण १७ जणांची कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. खूनाची घटना २४ नोव्हेंबर २००२ रोजी जेलमधील सेप्रेट यार्डाच्या आंघोळीच्या हौदावर दुपारी सव्वा दोन ते पाऊणे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. सिंगच्या शरीरावर गंभीर खुणा असताना जेल प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेची चौकशी सुरू झाली. पोलिस तसेच राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) चौकशी केल्यानंतर १७ संशयितावर खून तसेच कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला. शरद शेळके हे आर्थररोड कारागृहात न्यायाधीन विभाग प्रमुख असताना त्यांनी गरज नसताना इतर कैदी कमी करून छोटा राजन गँगशी संबंधित १३ जणांची एकाचवेळी नाशिकला रवानगी केली होती. पुढे नाशिक सेंट्रल जेलमध्ये संशयितांनी जाणिवपूर्वक सिंगला एकटे पाडून इतर संशयितांना त्याचा खून करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला.

संशयितांचे एन्काउंटर?
जिल्हा व सत्र न्यायालयात तब्बल १५ वर्षे हा खटला चालला. जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी गुरूवारी सबळ पुराव्याअभावी संशयितांची निर्दोष सुटका केली. दरम्यान, खटला सुरू असताना ​ १३ पैकी चार ते पाच जणांचे वेगवेगळ्या ठिकाणी तसेच वेळेत एन्काउंटर झाल्याचे समजते.

सरकारी पक्षाकडे साक्षिदार नव्हते. परिस्थिती जन्य पुरावे सादर करण्यात आले. मात्र, हे पुरावे संशयित आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पुरेश नव्हते. ही बाब कोर्टात स्पष्ट करण्यात आली.
- अॅड. श्रीधर माने, बचाव पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातोश्री कॉलेजमध्ये आजपासून परिषद

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री इंजिनीअरिंग कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे १८ व १९ ऑगस्ट रोजी आयसीसीसीसी - २०१७ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद होणार आहेत. यात भारतासह परदेशातून विविध विषयांतील तज्ज्ञ संगणक, माहिती तंत्रज्ञान, अणुविद्युत व दूरसंचार, विद्युत, स्थापत्य तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विद्याशाखेतील शोधनिबंध सदर करणार आहेत.
परिषदेच्या उद्‍घाटनाप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विश्वास गायकवाड, संस्थेचे सचिव कुणाल दराडे व प्राचार्य डॉ. गजानन खराटे उपस्थित राहणार आहेत. वॉशिंग्टन येथील मशीन लर्निंग लॅबचे संचालक डॉ. अजिथ अब्राहम परिषदेचे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते ‘डिजिटल इकोसिस्टिम - चॅलेन्जेस फ्रॉम ए डाटा अॅनालिसीस पर्स्पेक्टिव’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे आयोजन कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या विभागप्रमुख व उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील यांनी केले आहे.
परिषदेचे समन्वयक प्रा. रणजीत गावंडे, प्रा. स्वाती भावसार असून या समितीत डॉ. विजय शर्मा, प्रा. दत्तात्रय पाळंदे, प्रा. रुपाली खुळे, प्रा. ज्ञानेश्वर आहिरे, प्रा. प्रमोद साठे, प्रा. प्रमोद पाटील, प्रा. प्रवीण आंधळे, प्रा. दत्तात्रय शिंगटे, प्रा. प्रांजली जाधव, प्रा. शीतल वाघ, प्रा. अक्षता दिघे, प्रा. जान्हवी बोरसे, प्रा. हर्षला अंतापूरकर काम बघणार आहेत. संशोधन परिषदेविषयी अधिक माहितीसाठी प्रा. पूनम ढोली, प्रा. अल्पना बोरसे यांच्याशी संपर्क सांधण्याचे आवाहन डॉ. वर्षा पाटील यांनी केले. परिषदेच्या यशस्वीततेसाठी जयश्री बेदाडे, जगदीश धोंगडे, आकांक्षा कुलकर्णी, वैभव सोनोने आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगलबंदीत रंगला तबल्याचा ताल!

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक
आदिताल तबला अकादमीचा पंधरावा गुरुपौर्णिमा सोहळा प्रेक्षकांची उपस्थिती व कलाकारांची जुगलबंदी यामुळे रंगला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तबला सहवादनात मोठा उत्साह दिसून आला. सोहळ्याच्या प्रारंभी उस्ताद अहमदजान थिरकवाँ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सोहळ्यास ज्येष्ठ तबलावादक पंडित कमलाकर वारे उपस्थित होते.
तबला सहवादनात पाच ते ६५ या वयोगटातील कलावंतांचा सहभाग होता. कायदा, रेला, तुकडे, मुखडे, चक्रधार, गत, गतपरण, फरमाईशी चक्रधार यांच्या समावेश तबलासहवादनात करण्यात आला होता. नाविण्यपूर्ण रचनांचे वादन हे रसिक श्रोत्यांसाठी मेजवानी ठरली. रसिक कुलकर्णी याने त्रितालात सोलो सादर केला. तबला सहवादनासाठी दिगंबर सोनवणे यांनी हार्मोनियम वर साथसंगत केली. आदिताल तबला अकादमीच्या सोहळ्यास नाशिकमधील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांचे वादन ठरले आकर्षक
जयेश कुलकर्णी, वैभव महाजन, मिहिर ठाकूर आणि नवनाथ राठोड यांनी सादर केलेल्या केरवा तालातील लग्गी प्रकार हे सोहळ्याचे आकर्षण ठरले. विविध लग्गी प्रकार सादर करून त्यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. तसेच जागृती नागरे, जान्हवी कुलकर्णी आणि मृणाल जोशी यांनी अहमदजान थिरकवाँ यांच्या पारंपारिक शैलितील पेशकार रंग सादर केले. अर्थव वारे याने रुपक तालात सोला सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. त्याच्या वादनात कायदा, रेला, तुकडे, बंदिशी यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images