Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कारमधून मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहनातून तस्करी करण्यात येणारा मद्यसाठा पिंपळगाव बसंवत पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी दिंडोरी येथील दोघा जणांवर कारवाई करण्यात आली असून, संशयितांची कार आणि मद्यसाठा असा आठ लाख ३० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपळगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले यांना सदर तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी सांयकाळी वाहतूक कर्मचारी रवींद्र चिने तसेच कॉन्स्टेबल वडघुले, अमोल आहेर यांनी वणी चौफुली येथे वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी एक कार (एमएच १५ इपी ७२६८) बसवंत पिंपळगावातून वणीच्या दिशेने संशयास्पद पध्दतीने जाताना दिसली. पोलिसांनी ही कार अडवून तपासणी केली असता त्यात विविध कंपनीचे ११ बियरचे खोके आढळून आले. या प्रकरणी सुरेश शंकर खोडे (३२, खेडगाव, ता. दिंडोरी) आणि गणेश मधुकर मौले (रा. खेडगाव, ता. दिंडोरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंपनीतील मालाची भंगार बाजारात विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिन्नरजवळील मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीतील चोरी केलेल्या साहित्याची अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात विक्री झाल्याचे ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघे फरार आहेत.
संशयितांकडून तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुसळगाव एमआयडीसीतील सुपर इंडस्ट्रीज या कंपनीत १२ ऑगस्टच्या मध्यरात्रीस चोरी झाली होती. सीसीटीव्ही किंवा सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कंपनीच्या गेटवरून उडी मारून मेन स्टोअर रुमचे लॉक तोडले. यानंतर, तेथील गॅस सिलिंडरचे पितळी वॉल आणि त्यास लावलेले प्लास्टिकच्या पांढऱ्या कॅप असा तब्बल १० लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी स्टोअर किपर हरिचंद्र राधू गुरूळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सहायक निरीक्षक मोतीराम वसावे, हवालदार तुळशीराम कदम, नंदु कुऱ्हाडे, नाईक तुषार मरसाळे, गौरव सानप, सुनील ढाकणे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची मदतीने अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात छापा टाकण्यात आला. तिथे पाच लाख १७ हजार ४४० रुपयांचा चोरी गेलेला माल आढळून आला. या प्रकरणी संतोष बाबासाहेब जाधव (२८, रा. शंकरनगर, मुसळगाव) आणि अभयसिंग लालसिंग चुंडावत (३४, मंगलमूर्ती अपार्ट., कृष्णनगर, कामटवाडा) यांना अटक करण्यात आली. यांचे तीन साथिदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती वाहन (एमएच १५ डीके ६१५२) हे देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅनकार्ड क्लबवर अखेर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह राज्यभरातील २५ लाख गुंतवणूकदारांकडून तब्बल तीन हजार १०० कोटी रुपये जमा करणाऱ्या आणि गुंतवणुकीवरील आकर्षक परताव्यासह तारांकित हॉटेलमधील खान-पानसह निवासाचीही सुविधा देणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’वर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल झाला. या कंपनीच्या गैरकामामुळे २०१४मध्ये सेबीने निर्बंध टाकले होते.

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनी, सुधीर शंकर मोरावेकर, शोभा रत्नाकर बर्डे, उषा अरुण तारी, मनीश कालीदास गांधी, चंद्रसेन गणपतराव भिसे, रामचंद्र रामकृष्ण (सर्व रा. मुंबई) आणि कंपनीचे नाशिक शाखाधिकारी विक्रम अरिंगळे व एजंट बापूराव त्रंबक इंगळे अशी गुन्हा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी गणेश बाबुराव पवार (५२, रा. राणाप्रताप चौक, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, वरील संशयितांनी विविध योजनांचे आमिष दाखवल्याने त्यांनी कंपनीकडे ५० हजार ४०० रुपये गुंतवले. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाही. पंचवटी पोलिसांनी फसवणुकीसह कपंनी कायदा कलम २०१३ च्या ३६, ३७, ७४, ७५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पीएसआय एम. एम. शेख करीत आहेत.

सेबीकडून निर्बंध कायम
मुंबईस्थित पॅनकार्ड क्लब कंपनीने समूह गुंतवणूक योजनेंतर्गत विविध योजना राबविल्यात. एजंटाचे मजबूत जाळे तयार करून गुंतवणुकदारांना विविध आमिष दाखवण्यात आले. सहा वर्षे आणि नऊ वर्षांच्या गुंतवणुकीनंतर मोठा परतावा देण्याचे आमिष कंपनीने दाखवले. एवढेच नव्हे तर कंपनीच्या व्यवसाय भागीदार असलेल्या हॉटेलमध्ये वर्षांतून एकदा चार रात्रीसाठी निवास मोफत मिळते, असे भासवण्यात आले. गुंतवणुकदारांचा मोफत मेडिक्लेम असल्याचे दाखवण्यात आल्याने राज्यभरात २५ लाख गुंतवणुकदारांनी कंपनीकडे पैसे गुंतवले. मात्र गुंतवणूक व त्यावर परतावा तसेच अन्य भेट अशा कोणत्याही व्यवहारासाठी सेबीने परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट करत २०१४ मध्ये कंपनीवर सेबीने निर्बंध घातले.

ग्रामीण गुंतवणूकदार अधिक
पॅनकार्ड क्लबच्या अन्य सात योजनांमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यावरही ‘सेबी’कडून मर्यादा घालण्यात आली. यानंतर, कंपनीचे सर्व व्यवहार गोत्यात आले. २०१२ मध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणुकदारांना परतावा मिळत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलने झाली. नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात गुंतवणुकदारांची संख्या मोठी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी बँकांचा संप; खासगी सुरुच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारकडून बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा निषेध व विविध मागण्यांसाठी आज, मंगळवारी देशव्यापी बँक कर्मचारी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील ४३० बँक शाखा बंद राहणार असून, सुमारे चार हजार कर्मचारी व अधिकारी संपावर जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील ७०० कोटींचे व्यवहार ठप्प होतील. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला असून, नाशिक व मालेगाव येथे गेट मिटिंग घेऊन धरणे आंदोलन केले जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून बँकांचे विलीनीकरण करण्यात येत आहे. त्याला कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या बँक धोरणाच्या विरोधात देशभरातील बँकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात देशभरातील बँक कर्मचारी व अधिकारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. त्यात नाशिकचाही समावेश आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे गिरीष जहागिरदार, के. एफ. देशमुख, डी. टी. राजगुरू यांनी दिली.

व्यवहार सुरळीत

खासगी व सहकारी बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस व कोटक या खासगी बँकांतील कारभार सुरळीत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात या बँकांच्या १३२ शाखा आहेत.

सहकारी बँका

४४ नागरी सहकारी बँकांच्या ३१० शाखा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३१३ शाखा व ४५० पतसंस्थेच्या एक हजाराहून अधिक शाखा सुरूच राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याला’ जीवदानाने पोळा सत्कारणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहर परिसरात सोमवारी बैलांचे औक्षण करून त्यांना गोडधोड नैवेद्य भरवून बैलपोळा साजरा केला जात असतानाच जय भवानीरोडला एका जखमी गोऱ्ह्याला सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. त्यामुळे बैलपोळा खऱ्या अर्थाने सत्कारणी लागल्याची भावना परिसरातून व्यक्त करण्यात आली.

सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जय भवानीरोडच्या कडेला जखमी अवस्थेतील गोऱ्हा मंगेश राठोड या युवकाला अढळून आला. रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा गोऱ्हा तीव्र वेदना आणि तहानेने तडफडत होता. फर्नांडिसवाडीजवळ चिखलामध्ये या तीन वर्षांचा गोऱ्ह्याची उठण्याची धडपड सुरू होती. राठोड यांच्याकडून ही घटना समजताच बीइंग कॉमन संस्थेचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने या जखमी गोऱ्ह्याला वाचविण्याची मोहीम सुरू केली. प्रारंभी त्याला ओंजळीने पाणी पाजण्यात आले. जनावरांच्या डॉक्टरांना बोलावणे धाडले गेले. यावेळी रस्त्यावरचे लोक येऊन बघायचे. काही थांबून फक्त चौकशी करायचे, तर काहींनी मदतीचा हातही दिला. प्रज्ञा कांबळे या युवतीने मदतकार्यास सुरुवात केली.

मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्टचे पुरुषोत्तम आव्हाड दुपारी तीनच्या सुमारास या ठिकाणी आले. त्यांनी टेम्पो बोलावला. उपचारांसाठी गोऱ्हा उचलून गाडीत ठेवावा लागणार असल्याने लाकडी बल्ल्या, दोर जमा करण्यात आले. गोऱ्ह्याचे वजन जास्त असल्याने तीनदा प्रयत्न निष्फळ झाले. शेवटी हातानेच सगळ्यांनी त्याला उचलून ठेवायचे ठरवले. त्यानंतर त्याला शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचारांना सुरुवात करण्यात अाल्यानंतर या गोऱ्ह्यासह संबंधित कार्यकर्त्यांच्याही जिवात जीव आला.


यांनी घेतला पुढाकार

विक्रम कदम, पुरुषोत्तम आव्हाड, प्रज्ञा कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मंगेश राठोड, बंटी गोहर, लकी मेहेरोलिया, वाहनचालक बाळू मेटे आदींच्या प्रयत्नांमुळे या गोऱ्ह्याला जीवदान मिळाले. परिसरातील नागरिकांकडून या युवकांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नावा’च्या अध्यक्षपदी विठ्ठल देशपांडे बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील जाहिरात संस्थांची संघटना नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा)च्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी ज्येष्ठ सभासद आणि वामा अॅडव्हर्टायझिंगचे संचालक विठ्ठल देशपांडे यांची, तर सरचिटणीसपदी वत्सदा अॅडव्हर्टायझिंगचे संचालक दिलीप निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

‘नावा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल करी लिव्हजमध्ये झाली. मावळते अध्यक्ष विठ्ठल राजोळे अध्यक्षस्थानी होते. कार्यकाळ पूर्ण झाल्याने नूतन कार्यकारिणी निवडीची सूचना त्यांनी मांडली. उपस्थित सदस्यांनी राजोळे यांच्या सूचनेला अनुमोदन देत नवीन कार्यकारिणी निवडीस मान्यता दिली. त्यानुसार निवडणूक अधिकारी अॅड. भाऊसाहेब गंभिरे यांनी अध्यक्षपदासाठी देशपांडे यांची व सरचिटणीसपदासाठी निकम यांच्या नावांची

घोषणा केली.

या दोघांच्या निवडीला एकमताने संमती देण्यात आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. यावेळी माजी सरचिटणीस मंगेश खरवंडीकर, माजी उपाध्यक्ष सचिन गिते-पाटील, संदीप भालेराव, अभिजित चांदे, श्रीकांत नागरे, प्रवीण मोरे, नितीन शेवाळे, किरण पाटील, सुनील महामुनी, अनिल अग्निहोत्री आदी ‘नावा’चे सदस्य उपस्थित होते.





नूतन कार्यकारिणी

निमंत्रित सदस्य- संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, माजी अध्यक्ष नितीन राका, रवी पवार, विठ्ठल राजोळे, उपाध्यक्ष- श्याम पवार व प्रवीण चांडक, चिटणीस- मिलिंद कोल्हे-पाटील, कार्याध्यक्ष- राजेश शेळके, खजिनदार- अमोल कुलकर्णी, ज्येष्ठ सल्लागार- सतीश बोरा, संचालक- गणेश नाफडे, दीपक जगताप, सुहास मुंदडा, महेश कलंत्री, महावीर गांधी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवावर उदार होऊन आरोग्यसेवा

$
0
0

पेठ तालुक्यात माया महाजन यांचे आदर्शवत काम

ज्ञानेश्वर क्षीरसागर, मटा सिटिझन रिपोर्टर

नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याला नुकतीच ७० वर्षे पूर्ण झाली असली तरी आदिवासी आणि दुर्गम भागात अद्यापही दळणवळणाच्या सुविधा नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. पेठ तालुक्यातील खामशेत या गावात आरोग्यसेवा अक्षरशः जीवावर उदार होऊन करावी लागत आहे. आरोग्यसेविका माया महाजन या नदी ओलांडून लसीकरण आणि आरोग्याची सेवा देत असल्याचे समोर आले आहे.

सरकारी कर्मचारी हे कामचुकार असतात. दुर्गम आणि ग्रामीण भागात योग्य सेवा मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी असतात. पण, काही कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे त्यांची सेवा बजावत असल्याचे वारंवार समोर येते. आताही तसाच प्रकार पुढे आला आहे. पेठ या आदिवासी तालुक्याच्या विविध दुर्गम भागात अद्यापही दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. पेठ शहरापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेले खामशेत हे गावही त्याला अपवाद नाही. तालुक्यातील भुवन या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून खामशेत येथे आरोग्य सेवा पुरविली जाते. खामशेतला जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही. या गावालगत असलेली नदी ओलांडणे त्यासाठी अपरिहार्य आहे. भुवन आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका माया महाजन दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी खामशेत येथे आरोग्यसेवेसाठी जातात. गावातील लहान बालकांचे लसीकरण आणि गर्भवती महिलांना आरोग्य सेवा देण्यासाठी महाजन या आग्रही आहेत. त्यामुळे गेल्या शुक्रवारी नदीला पूर आलेला असतानाही याच नदीलगत झोपडीत राहणाऱ्या नारायणबाबांच्या मदतीने त्यांनी नदी पार केली. अतिशय खडतर प्रवास करून त्या आरोग्यसेवा देत असल्याने खामशेत ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नदी ओलांडणे अपरिहार्यच

खामशेत गावाची लोकसंख्या ६४० इतकी आहे. या गावातील प्राथमिक विद्यालय आणि अंगणवाडी येथे काम करणाऱ्या शिक्षक तसेच, अंगणवाडीसेविकांनाही अशाच प्रकारे नदी ओलांडूनच गावात जावे लागते. अशा स्थितीतही शिक्षक आणि सेविका या कर्तव्यावर हजर होत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

गेल्या नऊ वर्षांपासून आरोग्यसेवेत कार्यरत आहे. गेल्या दीड वर्षांपासून खामशेतला नदी ओलांडूनच जात आहे. लहान बालकांना लसीकरण मिळावे या हेतूनेच तेथे सेवा देण्यासाठी जात असते.

- माया महाजन, आरोग्यसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशमंडळांवर अटींबाबत शिवसेना आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सार्वजनिक गणेश मंडळांवर लादलेल्या जाचक अटींविरुध्द शिवसेनेने आक्रम पवित्रा घेतला आहे. या अटी शिथ‌िल कराव्यात, यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकारांना दिली. हिंदू सणांवरच या जाचक अटी का, असा प्रश्न उपस्थित करुन उत्सव हा उत्सवासारखाच व्हावा असे मतही व्यक्त केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत सार्वजनिक गणेश मंडळांसाठी यावर्षी मार्गदर्शक नियमावली करण्यात आली असून, त्यातील अनेक नियम जाचक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोरस्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गणेश मंडळांवर आवाजाच्या बंधनापासून मंडप उभारणीवर लावण्यात आलेले नियम जाचक असून, त्यामुळे गणेश मंडळांच्या समस्या वाढल्या आहेत. मंडप उभारण्यासाठी ३० दिवस अगोदर अर्ज, त्यानंतर मंडप उभारणीसाठी वेगवेगळ्या अटी असून, त्यामुळे पुढील वर्षी कोणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सव हा सामजिक समरसता निर्माण करणारा सण आहे. यात सर्वधर्मियांचा सहभाग असतो.

मंडपाच्या भाड्यात वाढ

महानगरपालिकेने गणेश मंडळांसाठी दहा बाय दहा मंडपासाठी ४५० रुपयावरुन ७५० रुपये इतकी भाडेवाढ केली आहे. त्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही भाडेवाढ कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. गणेश मंडळे मंडप उभारत असताना प्रांत, तहसीलदार, पोलिस यांची समिती येऊन मंडपाचे सामान घेऊन गेल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या अटी व समितीच्या या कृतीमुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले. मंडप उभारताना अनेक नियम तयार करण्यात आले आहेत.

गुजरातचा आदर्श घ्या...

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री उत्सवात आवाजाचे बंधन झुगारतात. गुजरातमध्ये नवरात्रोत्सव दांडिया रात्री ४ पर्यंत चालतात. तसा आदर्श राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा व अटी शिथील कराव्यात, असेही ते म्हणाले. किमान दत्तक घेतलेल्या नाशिकसाठी तरी अटी शिथ‌िल कराव्यात, असा टोलाही त्यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धबधब्यावर जीवघेणी कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेला सोमेश्वर धबधबा सध्या ओसंडला असून, येथे मोठी गर्दी होत आहे. मात्र, या धबधब्यावर कुठलीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने असंख्य पर्यटक जीवघेणी कसरत करताना दिसून येत आहेत. विशेषतः तरुणाई अशा बेफिकिरीत पुढे असून, सेल्फी काढण्यासाठी अनेक जण जीव धोक्यात घालत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने या धबधब्यावर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी आवडीचे धबधबे आणि धरणांच्या परिसरात होत आहे. परंतु, अशा ठिकाणी पाण्याचा प्रवाह वेगात असतानाही अनेकांकडून जीवघेणी कसरत केली जात असल्याचे दिसून येत आहे. सेल्फी काढण्याची तर जणू स्पर्धाच अशा ठिकाणी लागल्याचे दिसून येते. मात्र, गेल्या काही महिन्यांत पर्यटनासाठी गेलेल्या अनेकांना पाण्यात बुडून, तसेच सेल्फी काढण्याच्या नादात प्राण गमवावे लागले आहेत. असे असतानादेखील पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या अतिउत्साही तरुणांकडून जीव धोक्यात घातला जात अाहे.

शहर परिसरासह जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर व गिरणारे भागात पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, अशा सर्वच ठिकाणी अनेक अतिउत्साही पर्यटकांडून जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रकार सुरू आहेत. शहरातील सोमेश्वर धबधब्यावरदेखील अशीच गर्दी सध्या होत आहे. परंतु, तेथे सुरक्षा उपायांचा अभाव असल्याची स्थिती आहे.

महापालिकेने धबधब्यावर तयार केलेली सुरक्षा यंत्रणा जर्जर झाली असून, पर्यटकांनी पाण्यात उतरू नये यासाठी केलेले लोखंडी बॅरिकेडिंग पुराच्या पाण्याने वाहून गेले आहे. त्यामुळे धोकादायक स्थिती असूनही अनेक हौशी पर्यटक धबधब्याच्या अगदी जवळ जात सेल्फी काढण्याची जीवघेणी कसरत करीत आहेत. अतिउत्साही पर्यटकांना असे प्रकार करण्यापासून रोखण्याची यंत्रणाच येथे नसल्याने एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.


निधी नेमका गेला कुठे?

महापालिका व जिल्हा प्रशासनाने सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत समावेश असलेल्या सोमेश्वर धबधब्याचा निधी नेमका गेला कुठे, असा सवालही पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

--

गंगापूर येथील सोमेश्वर धबधब्यावर सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असून, अनेक जण जीव धोक्यात घालून सेल्फी काढताना दिसत आहेत. मात्र, पुरामुळे या धबधब्याभोवतीचे बॅरिकेडिंग वाहून गेल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. येथे त्वरित उपाययाेजना करावी.

-राहुल आहिरराव, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवलेकरांना श्रावणसरींचा दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या पावसाळ्यात अनेकदा लपाछपीचा खेळ खेळतानाच नक्षत्रामागून नक्षत्रे मोठी दडी मारणाऱ्या वरुणराजाने संकटग्रस्त येवला तालुक्यातील बळीराजावर अखेर कृपादृष्टी केली आहे. तब्बल महिनाभर आभाळाकडे आशाळभूतपणे नजरा लावूनही पाठ दाखविणाऱ्या श्रावणसरी रुसवा सोडत सरते शेवटी बरसल्या. यामुळे तालुक्यातील खरीपाला जीवदान मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.

यावर्षीच्या पावसाळ्याची दमदार पर्जन्यवृष्टीने सुरुवात करताना प्रारंभी जिल्ह्यात आघाडी घेतलेला येवला तालुका पुढे प्रत्येक नक्षत्रागणिक पावसाने अगदी मोठी ओढ दिल्याने जिल्ह्यात पिछाडीवर पडला होता. परिणामी तालुक्यातील अनेक ठिकाणची खरीप पिके पाण्याअभावी कोमजून जाताना शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली होती. पालखेडचे आवर्तन सुटल्याने या पालखेड डाव्या कालव्याच्या लाभखेत्रातील शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा काय तोच तालुक्याच्या जमेची मोठी बाजू. तालुक्यातील उर्वरित भागातील पिकांचे नुकसान होत होते. श्रावण महिन्यातील श्रावणसरींनीही दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची काळजी अधिकच वाढली होती. मात्र, जाताजाता श्रावणसरींनी तालुक्याला मदतीचा हात देवू केला आहे. गेल्या दोन दिवसात अधूनमधून तालुक्यात ढगाळी वातावरण होताना शनिवारी मध्यरात्री तालुक्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली. त्यानंतर रविवारी सायंकाळी साडेचारनंतर तालुक्यात जोरदार सरी बरसल्या. रविवारी मध्यरात्री अन् त्यानंतर सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत पडलेल्या दमदार सरींनी तालुक्यातील शेतशिवार भिजले आहे.

असा झाला पाऊस

तालुक्यातील सहा मंडळनिहाय शनिवारी सकाळी सात ते सोमवार सकाळी सात दरम्यान येवला मंडळात ६१, अंदरसूल ७२.६, नगरसूल ५८, पाटोदा २१, सावरगाव ४६.५, तर जळगाव नेऊर मंडळात ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर परिसरात बैलपोळा उत्साहात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रंगवलेल्या शिंगांना बांधलेली रंगबेरंगी गोंडे, कपाळाला बाशिंग, गळ्यात कवड्यांच्या आणि घुंगरांच्या माळा, पाठीवर आकर्षक झूल अशा थाटात सजलेल्या बैलांची गावोगावी रस्त्याने निघालेली मिरवणूक... असा पोळ्याचा उत्साह शहर परिसरातील गावांमध्ये काल ‌सायंकाळी दिसून आला. म्हसरुळ, मखमलाबाद, मातोरी, आडगाव, पाथर्डी, देवळाली वगैरे गावांमध्ये सजवलेल्या बैलांच्या पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढण्यात आल्या. शहरीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली असली तरी पोळ्याचा उत्साह मात्र टिकून होता. बैलांना गावात मिरवून मारुती मंदिरापुढे त्यांची सलामी देण्यात येत होती.

आधुनिक शेतीच्या काळात बैलांची संख्या कमी झाल्याने पूर्वीप्रमाणे आता गावात बैलांची मोठी मिरवणूक बघायला मिळाली नाही. बैलांचे प्रमाण कमी असल्याने सजवून आलेल्या बैलांना बघण्यासाठी लहान-मोठ्यांची गर्दी होत होती. शेतकरी असूनही बैल नसलेल्या घरी आपल्या दारात बैल यावेत, त्याची पूजा करावी, त्याला पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालावा म्हणून सुवासिनी शेतकऱ्यांना आग्रह करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. गावात मिरवून, दर्शन करून बैल घराच्या रस्त्याने माघारी फिरत असताना अनेक ठिकाणाहून त्यांना पूजा करण्यासाठी थांबविण्यात येत होते. बैलांची पूजा करून त्यांना धान्य, पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालण्यात येत होता.

घरोघरी मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली. पूजेसाठी लागणाऱ्या या मातीच्या बैलांचा शहर परिसरातील रस्त्यांवर मोठा बाजार भरला होता. २५ ते ३० रुपये जोडीपासून ते ५०० ते ६०० रुपये जोडीपर्यंत आकारानुसार या बैलांच्या किमती होत्या. परंपरेनुसार साध्या मातीच्या बैलांना पूजेसाठी मागणी होती.


आडगावात रंगली मिरवणूक

आडगाव ः आडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढली. सजलेल्या बैलांना गावातील मारुती मंदिरात दर्शनसाठी आणले होते. मिरवणूक पाहण्यासाठी गावातील मारुती मंदिर परिसरात आबालवृद्धांची गर्दी झाली होती. बैलांना अंघोळ घालून, शिंगे साळून त्यांना रंगरंगोटी करून आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. शिंगांवर घुंगराच्या पितळी छंब्या, गळ्यात घोगरमाळा, घंट्या, नवी वेसण, कासरा, माथोटी आणि अंगावर रंगीत झूल अशा सजलेल्या रुपात बैलांनी मारुतीला सलामी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड-चांदवड रस्त्यावर खड्डेच खड्डे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-चांदवड रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना विविध व्याधी जडल्या आहे. अपघाताला आमंत्रण देणारे मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी होत आहे. चिंतेची बाब म्हणजे या मार्गावरून दररोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या ज‌िवाला धोका निर्माण झाला आहे.

मनमाड ते चांदवड रस्ता अत्यंत खडतर झाला आहे. या मार्गावर ठराविक अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांची व प्रवाशांची यामुळे मोठी डोकेदुखी वाढली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक असूनही या मार्गावर असणारे खड्डे वारंवार मागणी करूनही दुरुस्त न केल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनमाड-शिंगवे-दुगाव-चांदवड या मार्गावरही खड्ड्यांचे वाढते साम्राज्य धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रस्त्यांवर प्रवासी व्हॅन, बसेस, जीप यांची कायम रेलचेल असते. मनमाड-दुगाव परिसरातून दररोज हजारो विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने या मार्गावरून प्रवास करतात.

नुसतेच आश्वासन...
या रस्त्यांबाबत मनमाडचे मनसे पदाधिकारी सुनील हांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन तातडीने रस्ते सुधारण्याची मागणी केली आहे. मनमाड-चांदवड रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या आश्वासनाची पूर्तता कधी होईल, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्सवमूर्ती सन्मान’वाढवणार उत्सवाची रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विघ्नांचे सावट दूर करून मांगल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवाला अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. गणेशाच्या या उत्सवाचा जल्लोष आणखी रंगतदार करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ घेऊन आला आहे ‘उत्सवमूर्ती सन्मान’ हा अनोखा उपक्रम.
सार्वजनिक गणेशोत्सवात नाशिक ढोलने आपला दबदबा कायम राखला आहे. सर्वांगसुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मांगल्यपूर्ण वातावरणात बाप्पाची पूजा, रंजक आणि प्रबोधन करणारे देखावे करून सार्वजनिक मंडळे या उत्सवाची शान वाढवतात. त्यामुळे आपले वैशिष्ट्य जपण्यासाठी मंडळांचाही खास प्रयत्न असतो. मंडळांना व्यापक व्यासपीठ देण्यासह त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने खास मंडळांसाठी उत्सवमूर्ती सन्मान आयोजित केला आहे. यंदा या उपक्रमाचे
दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेलाही मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
‘उत्सवमूर्ती सन्मान’मध्ये सर्वोत्तम गणेशमूर्ती, इकोफ्रेंडली गणेशमूर्ती, सर्वोत्तम मंडळ आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंडळ अशा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या उपक्रमासाठी सोमवारपासून नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘मटा’च्या कार्यालयात येऊन, प्रवेश अर्ज भरून आपल्या मंडळाची नावनोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी

संपर्क ः ९५५२५६६८४२
वेबसाइट ः www.mtganeshutsav.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये संततधार

$
0
0

धरणांमधून विसर्ग सुरूच; विभागात उघडीप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरूच आहे. एका दिवसातच अर्धा महाराष्ट्र जलमय झाला. शनिवार व रविवारच्या तुलनेत मात्र सोमवारी पावसाने थोडी उघडीप दिली. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. ना‌शिक विभागात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होत. मात्र, नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने धरणांमधील विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता.

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात संततधार पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. रविवारी तर पावसाने नाशिककरांना घरांमध्येच कैद करून ठेवले. सोमवारीदेखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे तब्बल महिनाभरानंतर नाशिककरांना पुन्हा पूरपरिस्थ‌िती पहावयास मिळाली.

सोमवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ७७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात ८२.२ मिलीमीटर पाऊस झाला. विशेष म्हणजे दिवसभर त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने उघडीप दिली. नाशिक शहरात दिवसभरात १०.२ मिलीमीटर पाऊस झाला. सोमवारी सकाळपर्यंत सर्वाधिक मिलीमीटर पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात झाला. पाण्याचे तळे साचल्यामुळे श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. गंगापूर धरणातून पाच हजार ९८२ क्युसेक पाणी सोडण्यात आले. इगतपुरीत चोवीस तासांत ९८ मि.म. पाऊस झाला.

नगरमध्ये उघडीप

एका दिवसाच्या पावसानेच संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून, चोवीस तासांत सरासरी १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ९७ महसूल मंडळांपैकी तब्बल ७३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

जळगावमध्ये विश्रांती

रविवारी जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी मात्र हात आखडता घेतला. दिवसभर ढगाळ होते. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतपिकांसाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणतर्फे आता ‘कनेक्शन ऑन कॉल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी आहे, अशा इच्छुक ग्राहकांसाठी महावितरण कंपनीतर्फे कनेक्शन ऑन कॉल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाइल क्रमांक व घरचा पत्ता आदी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.

नवीन वीज जोडणी सुलभतेने मिळावी, तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी, तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल २०१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यंत सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.


येथे साधावा संपर्क

‘कनेक्शन ऑन कॉल’अंतर्गत नवीन वीज जोडणीसाठी इच्छुक ग्राहकाने मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाच्या ०२२-२६४७८९८९ व ०२२-२६४७८८९९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


अशी होईल प्रक्रिया

‘कनेक्शन ऑन कॉल’अंतर्गत नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील. त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल. त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीज जोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरून घेतील. यावेळी कर्मचारी ग्राहकाची सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचा प्रयत्न करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवड चाचणीत सायकलिस्टचा कस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या सायकलिंग संघासाठीची निवड चाचणी अटीतटीची झाल्याने निवड समितीला निकाल राखून ठेवावा लागला अाहे. येत्या दोन दिवसांत तो जाहीर केला जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनमार्फत महिरावणी येथे ही निवड चाचणी झाली.

एमटीबीसारख्या स्पर्धांसाठी लागणाऱ्या सर्वोत्तम वातावरणात पार पडलेल्या या निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातून विविध वयोगटांतील तब्बल १८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात कोल्हापूर, पुणे, सांगली, नांदेड अादी जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांची संख्या मोठी होती.

पुणे येथे २० ते २४ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या चौदाव्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा वीस जणांचा संघ येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील, १८ वर्षांखालील आणि खुला अशा मुले व मुलींच्या आठ गटांतील २० खेळाडूंची निवड करण्यासाठी ही स्पर्धा रंगली. ओरोबोरसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ भोगले, जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून चाचणीचा प्रारंभ झाला.

संजय साठे, मीनाक्षी ठाकूर आणि नितीन नागरे यांची त्रिसदस्यीय निवड समिती खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करीत असून, ओरोबोरस या सायकल उत्पादक कंपनीच्या सहाय्याने नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेला पहिल्यांदाच अशी स्पर्धा भरविण्याचा मान मिळाला आहे.

सायकलिंग कॅपिटलसाठी प्रयत्न

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, की नाशिक शहराला सायकलिंग कॅपिटल बनविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होत आहेत. नाशिकचे वातावरण सायकलिंगसाठी पोषक असून, महाराष्ट्रातील खेळाडूंनी नाशिक जिल्ह्यातील विविध भागात सराव शिबिरास यावे, त्यांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी पूर्णपणे नाशिक पोलिसांची असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तबलावादन, गीतांनी रसिक झाले मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
वैरागकर संगीत अकादमी आणि अथर्व संगीत विद्यालयातर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सामूहिक तबलावादन आणि जुन्या गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन, पंडित शंकरराव वैरागकर, सुधा वैरागकर, किशोर सुधारलयाचे प्राचार्य भुसारे, शशांक मणेरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. सरिता वैरागकर यांनी प्रास्तिवकात संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमात प्रारंभी तबलावादनात विद्यार्थ्यांनी तीनताल, झपताल, मतताल या तालांमध्ये सुंदर अशा रचनांचे सादरीकरण केले. यानंतर गायनामध्ये छोटा व छोट्या गटात जुन्या नव्या गीतांचे सादरीकरण झाले. शुभांगी देवधर यांनी सूत्रसंचलन केले.

ओम नमो शिवाय, सायोनारा, आ चलके तुझे, दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ, मेरा जुता है जपानी, नन्ना मुन्ना राही हू, पल पल दिलके पास, चक धूम, ये अपना दिल तो आवारा, रे मम्मा रे रे मम्मा रे, पापा कहते है, हमको मन की शक्ती आदी गाण्यांचे सादरीकरण लहान मुलांनी केले. मोठ्या गटात ओ पालन हारी, हे राम हे राम, ये तो सच है के भगवान है, सुरमई आखियोंने, मेरी आवाज ही पहचना हे, फुल तुम्हे भेजा हे खतमे, जिये तो जिये कैसे, मेरा दिल भी कितना पागल है, अभी ना जाओ छोडकर, पियू बोले पिया बोले, एक प्यार का नगमा है, अजीब दासता है ये, किसी की मुस्कुराठों पे हो निसार, जब कोई बात बिघड जाए, दिवाना हुआ बादल, जिंदगी के सफर में, रुक जाना नहीं, और इस दिल में, छुकर मेरे मन को, हसता हुआ नूरानी, कजरा मोहब्बत वाला आदी गाण्यांचे सादरीकरण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी जपावी सामाजिक बांधिलकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन पालकांचा नावलौकिक वाढविला पाहिजे. जीवनात यशस्वी होऊन सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.
भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिर नुकतेच झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक व माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, अजय मित्र मंडळाचे संस्थापक सचिन कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, की सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी या सोशल मीडियाचा जीवनात चांगले बदल घडविण्यासाठी वापर केला पाहिजे. वेगवेगळ्या मोबाइल गेमच्या माध्यमातून जीवनाची राखरांगोळी करण्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे प्रगती करण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे.
नगरसेवक दिनकर पाटील यांनी राजकारणातील संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी योगेश पंचाक्षरी व अविनाश बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना कॉमर्स, सायन्स व इंजिनीअरिंग क्षेत्रात कशी प्रगती करता याबाबतचे मार्गदर्शन केले. नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. स्नेहल काळे व मंजुषा पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्तृत्व स्पर्धेतून घडतात उत्तम वक्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या (नाएसो) माध्यमातून माजी खासदार गो. ह. देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा व राज्यस्तरावरील वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून उत्तम वक्ते तयार करण्याचे केले जाणारे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. नाएसोच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर उपस्थित होते. स्पर्धेत जिल्हा व राज्यातून सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. इयत्ता चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन गटात स्पर्धा अतिशय चुरशीच्या झाल्या. प्रत्येक संघाला फिरती ढाल व चषक देण्यात आला. यावेळी प्रा. रहाळकर यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यकारी सदस्य विलास देशपांडे, सहकार्यवाह दिलीप अहिरे, लक्ष्मी कस्तुरे, निमंत्रक सुनंदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हर्षल कोठावदे यांनी परिचय करून दिला. श्वेता देशपांडे, संगीता कोरे यांनी पारितोषिक यादी वाचन केले. प्रशांत केंदळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुनंदा कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकीपेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान मिळणे गरजेचे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा आत्मविश्वास प्रबळ होईल. अटल टिंकरिंग लॅबच्या सहाय्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत समाजात नवे परिवर्तन घडवून आणू शकतील. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यासही हातभार लागेल, असे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डातील ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी केले.

जिल्ह्यांमधून फक्त कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलसाठीच केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या माध्यमातून अटल टिंकरिंग लॅब मंजूर झाली आहे. त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी मोजाड बोलत होते. कार्यक्रमास बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, नगरसेवक सचिन ठाकरे, भगवान कटारिया, प्रभावती धिवरे, मीना करंजकर, आशा गोडसे, कावेरी कासार, तानाजी करंजकर, रतन कासार, चंद्रकांत गोडसे, शालेय समितीच्या अध्यक्षा सुचित्रा दोंदे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुनीता आडके, चंद्रप्रीती मोरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुभाष बोराडे आदी उपस्थित होते.
पुणे विद्यापीठात रेवती काळे, प्राजक्ता निर्मळ, ऐश्वर्या चव्हाण या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या उत्कृष्ट प्रकल्पामुळे अटल टिकरिंग लॅब मंजूर झाली आहे. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी सांगितले, की सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स तंत्रज्ञानावर आधारित या आधुनिक लॅबमुळे रोबोटिक, इलेक्ट्रोनिक व मॅकेनिकल तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मूर्त रूप देण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे. लॅबच्या स्थापनेसाठी मुख्याध्यापिका नलिनी लोखंडे, विज्ञान विभाग प्रमुख राजश्री खैरनार, शिक्षक प्रमोद वैद्य, किरण जाधव, महेंद्र कापुरे, सौरभ देवरे, आदींचे सहकार्य लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images