Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चोरीच्या २० दुचाकी जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहनचोरी करणाऱ्या तिघांना पकडून पोलिसांनी तब्बल २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. संशयितांमध्ये धुळे येथील दुचाकी विक्रेत्याचा समावेश आहे.
बँक लिलावातून मोटारसायकली खरेदी केल्याची बतावणी करून तो चोरीच्या दुचाकी विक्री करीत होता. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित दरोड्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये असून, त्यास पोलिस पुन्हा ताब्यात घेणार आहे. नितेश उर्फ बळ्या अजय सुरजुसे (रा. क्रांतीनगर, पंचवटी), समाधान सरदार हाके (रा. उडाणे, जि. धुळे) आणि सचिन उर्फ बोचऱ्या पांडुरंग हिरे (रा. लोखंडेमळा, जेलरोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
युनिट एकचे कर्मचारी विशाल काठे यांना सदर वाहनचोरांबाबत माहिती मिळाली. नितेश उर्फ बळ्या सुरजुसे यास पोलिसांनी पेठ फाटा परिसरात बेड्या ठोकल्या असता वाहनचोरीचा उलगडा झाला. पोलिस चौकशीत त्याने संभाजी विलास कावळे (रा. त्र्यंबकरोड, सातपूर) या साथिदारांसमवेत शहर परिसरातून ठिकठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या दुचाकी उडाणे (जि. धुळे) येथे पोहचविण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, संशयितास घेवून पोलिसांनी उडाणे गाठले. तिथे समाधान हाके यास अटक करून त्याने विक्री केलेल्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. बळ्या सुरजुसे आणि संभाजी कावळे दुचाकी चोरी करून अवघ्या पाच हजार रुपयात समाधान हाके यास विक्री करीत होते. बँकेच्या लिलावातून दुचाकी घेतल्याचे सांगत हाके त्या आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांना जास्त दरात विक्री करीत होता. या गुन्ह्यातील चौथा संशयित संभाजी कावळे हा जेलमध्ये आहे. लाखलगाव येथील गौरव पेट्रोलपंप दरोडा प्रकरणी त्यास अटक करण्यात आली होती.

मालेगाव, निफाडमधून चोरी
लोखंडे मळ्यातील सचिन हिरे संशयित वेगवेगळ्या दुचाकी घेऊन फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्यास अटक केली असता त्याने मालेगाव, निफाड व जेलरोड परिसरातून चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या चारही दुचाकी जप्त केल्यात. दरम्यान, दोन्ही कारवाईत पोलिसांनी सुमारे चार लाख रुपयांच्या २० दुचाकी हस्तगत केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वा लाखाची बोरगडला घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बोरगड परिसरातील पुष्पकनगर भागात घरफोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश बाळासाहेब कोटकर (रा. विश्वेश्वर सोसा. अवतार पॉईंट बसस्टॉप शेजारी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शनिवारी कोटकर कुटुंबीय बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ३५ हजाराची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख २२ हजाराचा ऐवज चोरून नेला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेगर करीत आहेत.

सातपूरला चेन स्नॅचिंग
जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना सातपूर कॉलनीत घडली. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
योगिता संजय भुसारे (रा. आनंदछाया बस थांब्याजवळ, सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. १९) रात्री जेवण आटोपून भुसारी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता चोरट्यांनी संधी साधली. परिसरातील लिबर्टी बेकरीजवळून पायी जाणाऱ्या भुसारी यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातून १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र आरबोडून धूम ठोकली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

दोन दुचाकींची चोरी
शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणाहून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या. या प्रकरणी मुंबईनाका आणि अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सुचितानगर येथील लक्ष्मीकांत अरुण घरटे (रा. आर्या रेसि. मुंबई नाका) यांची एक लाख रुपयांची क्लासिक बुलेट (एमएच १८ एटी ५०२५) चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये हातोहात चोरी केली. ही ३ ते १८ ऑगस्ट दरम्यान घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार ठाकूर करीत आहेत. वाहनचोरीची दुसरी घटना चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागात घडली. रुपचंद्र परशुराम राठोड (रा. पाण्याच्या टाकीजवळ, दत्तनगर) यांची डिस्कव्हर (एमएच १५ ईएन ७४१०) मोटारसायकल शनिवारी (दि. १९) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरणकर्त्यास जन्मठेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्यास कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपीची तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अपहरणाची घटना ९ एप्रिल २०१६ रोजी वडनेरगेट परिसरातील शिवराजनगर येथे घडली होती. पोलिसांनी तीन दिवस आणि रात्र दिवस तपास करून संशयितास जबलपूर येथे अटक केली होती.
राजू उर्फ राकेश धनीराम पटेल (रा. भिकरावा, ता. पतन, जि. जबलपूर, मध्य प्रदेश) असे कोर्टाने शिक्षा दिलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१६ च्या सुरुवातीला संपत बबन पोरजे यांच्याकडे आरोपी राजू शेतीकामासाठी आला होता. कोणतीही ओळख नसताना फक्त गरजू म्हणून पोरजे यांनी राजूला कामाला ठेवले. एक दिवस राजूने पोरजे यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. आता पैसे नाही नंतर देतो, असे सांगत पोरजे दुसऱ्या कामात व्यस्त झाले. ९ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास राजूने पोरजे यांच्या प्रसाद या पाच वर्षाला मुलाला खेळवण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन थेट नाशिकरोड पोलिस स्टेशन गाठले. तेथून तो थेट जबलपूरला गेला. प्रवासादरम्यान राजूने दुसऱ्या एका प्रवाशाच्या मोबाइलवरून फोन करून पोरजे यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. राजूचा तो एक फोन कॉल वगळता त्याची कोणतीही माहिती पोरजे यांच्यासह पोलिसांकडे नव्हती. पोलिसांनी पुढील तीन दिवस सतत तपास केला. जबलपूर पोलिसांच्या मदतीने सर्व बस स्टॅण्ड, आश्रम, सार्वजनिक ठिकाणी पालथी घातली. अखेर एका बस स्टॉपवर राजूला जेरबंद करण्यात आले. या प्रकरणी राजूवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा हजारांचा दंडही
खटल्याची सुनावणी जिल्हा कोर्टात न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या समोर झाली. उपनगर पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. के. माळी यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी पुराव्यांआधारे कोर्टाने राजूला दोषी ठरवत जन्मठेपेसह १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली. तसेच दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षाही कोर्टाने सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी सल्ला फलकाचे अनावरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून जिल्हा सत्र न्यायालयाने शहरातील सर्वच पोलिस स्टेशन व शासकीय कार्यालयांमध्ये मोफत विधी सल्ला फलक लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पीडित व पोलिसांची भिती बाळगणाऱ्यांसाठी मोफत विधी सल्ला फलक लावण्यात आले.
गंगापूर पोलिस स्टेशनला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीरकुमार बुके यांच्या हस्ते मोफत विधी सल्ला फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गंगापूर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश बुके यांनी पीडित व पोलिसांची भीती बाळगणाऱ्यांना न्यायालयाकडून मोफत सल्ला दिला जाणार असल्याचे सांगितले. यात पोलिसांचाही ताण वाचणार आहे. पोलिस स्टेशनला जाण्याची भीती असेलेल्यांनी जिल्हा न्यायालयात मोफत विधी सल्ला घेण्यासाठी यावे, असे आवाहनही बुके यांनी केले आहे. अनावरण करण्यात आलेल्या फलकावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वैयक्तिक वाद निवारण केंद्र जिल्हा सत्र न्यायालय नाशिक असे नाव पत्ता सह देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हीइएस हॅक करणाऱ्याचा शोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ऑटोमेटिव्ह व्हेइकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरची (एव्हीइएस) सिस्टिम हॅक करणाऱ्या कॉम्प्युटरचा आयपी अॅड्रेस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही आयपी अॅड्रेस पोलिसांच्या हाती लागले असून, व्हेरीफिकेशन झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
‘एव्हीइएस’ सिस्टिम हॅक करून दोन वाहनांची प्रत्यक्ष तपासणी झाली नसताना फिटनेस सर्टीफिकेट वितरत करण्यात आल्याची बाब ५ ऑगस्ट रोजी घडली. ही बाब १६ ऑगस्ट रोजी निरीक्षक हेमंत हेमाडे यांच्या लक्षात आल्यानंतर हॅकिंगच्या प्रकाराला वाचा फुटली. यानंतर, हेमाडे यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली. फिटनस सर्टिफिकेट घेण्यासाठी प्रत्यक्ष वाहनाची तपासणी होणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने आरटीओच्या वेबसाइटवरील फिटनेस व्हेरीफिकेशन व अप्रोव्हल येथे हेमाडे यांच्या नावे लॉगिन करून दोन वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट मिळविले. वास्तविक अशा प्रकारे शेकडो वाहनांना सर्टिफिकेट मिळाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे. सूत्रांनी सांगितले, की हॅक झाल्याच्या प्रकरणात तथ्य असून, संबंधित कॉम्प्युटरचे आयपी अॅड्रेस संकलित करण्यात आले आहे. हे आयपी अॅड्रेस व्हेरीफाय झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषण अखेर सुटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ठेकेदारांची जेवण सुविधा पुरविण्याची बिले रखडल्याने झालेल्या लाक्षणिक संपावर तात्पुरता पडदा पडला आहे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुटले आहे. या ठेकेदारांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने आश्वासन देण्यात आले असून सोमवारपासून त्यांनी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुन्हा जेवण सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे.
आदिवासी विकास भवन अंतर्गत येणाऱ्या शहर आणि जिल्हाभरातील आदिवासी विद्यार्थ्यांना रविवारी उपवास घडला होता. या वसतिगृहांमध्ये जेवणाची सुविधा पुरविणाऱ्या ठेकेदारांनी बिले न मिळाल्याने संप पुकारला होता. विशेष म्हणजे या ठेकेदारांनी पाच महिन्यांपासून बिले अदा झाली नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. शिवाय त्यांना या सुविधेच्या मोबदल्यात देण्यात येणारी रक्कमही न परवडणारी असल्याचा त्यांचा दावा आहे. ठेकेदारांना जेवण सुविधेपोटी मिळणारी रक्कम वाढवून द्यावी आणि बिले वेळेवर अदा करण्यात यावीत, अशा त्यांच्या मागण्या आहेत. गत १५ दिवसांपूर्वी त्यांनी आदिवासी विकास भवनातील अधिकारी वर्गास बिले न मिळाल्यास संप पुकारण्याचा इशारा दिला होता. तरीही दरम्यानच्या काळात या समस्येची दखल घेण्यात प्रशासनाने हलगर्जीपणा दाखविल्याने या विद्यार्थ्यांना जिल्हाभरातून रविवारी उपाशीपोटी आदिवासी भवनाकडे धाव घ्यावी लागली होती.

विद्यार्थ्यांसमोर आव्हाने
ठेकेदारांच्या प्रश्नामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांनी पुन्हा लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातून आदिवासी वसतिगृहातील मुले शेकडो मैल पायपीट करत समस्या मांडण्यासाठी आदिवासी भवनात आले होते. मार्च महिन्यात पेठ आणि हरसूल भागातील विद्यार्थ्यांनीही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि वसतिगृह इमारती संदर्भातील विविध समस्यांची कोंडी फोडली होती. वसतिगृहात निवासी असताना पायाभूत सुविधांसह विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी चांगला माणूस होणे महत्त्वाचे

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आयुष्यात चांगला माणूस म्हणून उभे राहणे महत्त्वाचे आहे. शिकून तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनिअर व्हा पण त्याआधी चांगले माणूस होणे आवश्यक आहे. शांतारामबापू वावरे हे केवळ राजकारणी नव्हते. त्यांना राजकारणाच्या पलीकडे एक दृष्टी होती. त्यांनी मुलांना सिडको परिसरात उच्च शिक्षण देता यावे यासाठी अपार मेहनत केली. त्यांच्या प्रयत्नामुळे हे महाविद्यालय सुरू झाले, असे प्रतिपादन कवी संदिप जगताप यांनी केले.
ते सिडको येथील शांतारामबापू वावरे कॉलेजमध्ये आयोजित जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक नानासाहेब महाले होते. मंचावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, सुलोचना हिरे-वावरे, विक्रम वावरे, विक्रांत वावरे, उपप्राचार्य डॉ. नितीन पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, वाङमय मंडळाचे प्रमुख प्रा. डी. टी. जाधव उपस्थित होते. कॉलेजमधील वाङमय मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात नाना महाले म्हणाले, की शांतारामबापू वावरे म्हणजे माणसातला देवमाणूस. माझ्या जडणघडणीत डॉ. वसंतराव पवार आणि बापू यांचा मोठा वाटा आहे. मुस्लिम समाजानेही त्यांच्यावर प्रेम केले. जातीय सलोखा राखण्यासाठी ते आग्रही असत, असे सांगत शांतारामबापू वावरे यांचे कार्य विषद करताना त्यांनी विविध अनुभवांचे कथन केले.
प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की सिडको कॉलेजची उभारणी आणि इमारत मिळविणे या कामात शांतारामबापू यांनी घेतलेला पुढाकार सविस्तर सांगितला. त्यांना अटक होण्याची वेळ आली असतानासुद्धा ते डगमगले नाहीत म्हणून हे कॉलेज उभे राहिले. वाङमय मंडळ प्रमुख डी. टी. जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. एस. टी. घुले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन पाटील यांनी आभार मानले. मविप्र संस्थेत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल प्राचार्य डॉ. शिंदे यांच्या हस्ते महाले यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या धास्तीपोटी शाळेला सुटी

0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
दिंडोरी रोड ते पेठ रोड यांना जोडणाऱ्या तारावाला नगर सिग्नलजवळच्या रस्त्यावर रविवारी (दि. २०) रोजी एका दाम्पत्याला बिबट्या दिसल्याची चर्चा मेरी परिसरात पसरली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चर्चा काही क्षणात व्हायरल झाल्याने या परिसरात प्रचंड घबराट पसरली. बिबट्या कुणाच्याही नजरेस पडला नाही. मात्र, बिबट्या भितीपोटी भागातील सीडीओ मेरी शाळेला सोमवारी सुट्टी देण्यात आली.
मेरी परिसराच्या काही भागात मोठे वृक्ष, वाढलेले गवत असा भाग असल्याने बिबट्या त्यात शिरला असावा असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी केली मात्र, बिबट्या आल्याच्या खुणा कुठेच आढळल्या नाहीत. ज्यांच्या नजरेस बिबट्या पडला ते नेमके कोण होते, पोलिसांना कुणी माहिती दिली या विषयी या परिसरातील नागरिकांनाही सांगता येत नाही. या भागात बिबट्या असल्याच्या सोशल मीडियावरील मेसेजमुळे येथील नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याचे चित्र या परिसरात दिसत होते. विशेषतः लहान मुले घराबाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली.

सोशल मीडियावरून मार्गदर्शन
मेरी परिसरात बिबट्या आला, पण तो कुणाला दिसला हे कुणीच ठामपणे सांगू शकले नाही. वन विभागालाही त्याचा माग लागला नाही, प्रत्यक्षात बिबट्या दिसला नसला तरी तो सोशल मीडियावर मात्र चांगलाच फिरला. काही क्षणात सोशल मीडिवावर सतर्क रहा, असे सांगणे मेसेजेस फिरवले गेले. सोमवारीही घाबरण्याचे कारण नाही, बिबट्याचा चालण्याचा वेग आणि धावण्याचा वेग लिहून बिबट्या खरंच या भागात आला असेल तर रात्रीतून तो किती लांब गेला असेल, असेही दिलासा देणारे मेसेजेस व्हायरल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शेताकडे जात असताना किकवी नदी ओलांडताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमाळपाडा तळेगाव येथील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. तुकाराम सोमा पारधी (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यात रविवारी, २० ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाल्याने किकवी नदीत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी शेताकडे जात असताना ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तुकाराम पारधी रविवारी सकाळी शेताकडे गेल्यापासून घरी न परतल्याने नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. पारधी यांचा मृतदेह सोमवारी चंदर सुखा खाडे यांच्या शेताजवळील झुडपात आढळून आला. त्र्यंबक पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाची नाशिककरांना सफर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिन्याचा शेवटचा रविवार म्हटलं की, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हेरिटेज वॉकची प्रत्येकाला आस लागते. यावेळी गणेशोत्सवानिमित्त नाशिककरांना हेरिटेज वॉकमधून दुर्मिळ गणेशांचे दर्शन घडविले जाणार आहे. रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या फाळके स्मारकातील राज्य पुरातत्त्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या संग्रहालयातील दुर्मिळ गणेशमूर्तींसह जैन, बौद्धकालीन मूर्तींचा खजिना नाशिककरांना अनुभवता येणार आहे.

फाळके स्मारकातील हे संग्रहालय १९७५ मध्ये स्थापन झाले. येथील एक मोठ्या दालनात नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाच शहरांसाठीचे हे वस्तुसंग्रहालय आहे. येथे अनेक दुर्मिळ मूर्ती, नाणी व शिल्पे पहायला मिळतात. संग्रहालयात छायाचित्रे व रंगचित्रे, धातूशिल्प, शस्त्रास्त्र, पाषाणशिल्प व नाणी विभाग अशी स्वतंत्र दालने आहेत. त्या-त्या शहरात पुरातत्त्व विभागाला मिळालेल्या वस्तू व शिल्पे या दालनाची शोभा वाढविताना दिसतात. पाचव्या शतकातील गंधर्व मूर्ती या दालनाचे मुख्य आकर्षण आहे. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडून या दालनात अनेक दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रात्रे व चित्रांचा ठेवा मिळालेला आहे. तोही पाहणे एक वेगळा अनुभव ठरतो. धातूशिल्प दालनात इ. स. १७ वे शतक ते १९ व्या शतकातील अनेक धातूशिल्पे फोक ब्रॉन्झेस या प्रकारातील आहेत.

शस्त्रांवर चितारलेल्या कलात्मक आकृत्या व नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. तलवारीवरील दशावतार पाहताना तर डोळ्याचे पारणे फिटते. तसेच काही शस्त्रांवर कुराणातील कल‌िमांची कॅलिग्राफी नजरेत भरते. शस्त्रास्त्रांना सजविण्यासाठी सोन्याचा कलात्मक वापरही पाहता येतो. पाषाणशिल्प दालनात मथुरा कलाशैली, गुप्त कलाशैली तसेच यादवकालीन कलाशैली पहायला मिळते, अशी माहिती नाशिकच्या प्रादेशिक वस्तूसंग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहाणे देतात. हेरिटेज वॉकदरम्यान वाहाणे मॅडव व जैन शिल्पांबाबत इतिहास अभ्यासक प्रा. रामनाथ रावळ मार्गदर्शन करणार आहेत.

नावनोंदणी आवश्यक

नाशिकच्या प्रादेशिक वस्तूसंग्रहालयातील मटा हेरिटेज वॉकसाठी पांडवलेणी येथील फाळके स्मारकाच्या गेटवर सकाळी ८.५० वाजता एकत्र जमायचे आहे. वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या मोबाइल क्रमांकावरील व्हॉटसअॅपवर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या कळवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताची जुळवाजुळव सुरू केली आहे. शहर पोलिस दलातील जवळपास अडीच हजार कर्मचारी अधिकाऱ्यांसमवेत राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या आणि ७०० होमगार्डस् तैनात करण्यात येणार आहेत.

सर्वांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू असून, बाजारपेठेतील उलाढालीवर याचा परिणाम दिसून येत आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांनी कंबर कसली असून, मोठ्या बंदोबस्ताची जुळवाजुळव सुरु केली आहे. शहर पोलिस दलात जवळपास तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, स्थानिक पोलिस स्टेशनच्या मदतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. या शिवाय ७०० होमगार्डस् देखील तैनात करण्यात येणार आहेत. यात २०० महिला होमगार्डसचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात दरवर्षी ९०० ते हजार छोटी मोठी गणेश मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजर करतात. याशिवाय ६० ते ७० हजार गणेशमूर्तींची घरांमध्ये प्रतिष्ठापणा होते. या काळात जुगार, खंडणी वसुली, हाणामारी असे प्रकार घडतात. याचबरोबर धार्मिक सलोखा कायम ठेवत १० दिवस शांतता निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते.

नाल रोखण्याचे आवाहन कायम

शहरातील काही ठिकाणी जुगार (नाल) खेळला जातो. जुगारातून मिळालेले पैसे गणेश मंडळे खर्चांसाठी वापरतात. अवघ्या १० ते १२ दिवसांत नाल प्रकारातून लाखो रुपयांची उलाढाल होते. दोन ते तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी हा प्रकार मोडीत काढला. मात्र, ही पध्दत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे उत्सव काळात खेळल्या जाणाऱ्या जुगारावर पोलिस काय कारवाई करतात, याकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात माकपचे आंदोलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी करवाढीला माकपनेही विरोध केला असून, या करवाढीच्या विरोधात मंगळवारी माकपच्या वतीने पालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

स्मार्ट सिटीला माकपचा सुरुवातीपासून विरोध आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली केली जाणारी करवाढ ही नागरिकांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप माकपने केला आहे. या करवाढीच्या विरोधात अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घरपट्टीत १८ तर पाणीपट्टीत पंचवार्षिक १२० टक्के करवाढ प्रस्तावित केली आहे. स्थायी समितीने याला मंजुरी दिल्याने यावरून भाजपची कोंडी झाली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे पाठोपाठ आता माकपनेही या करवाढीला विरोध केला आहे. शनिवारी माकपचे माजी गटनेते अॅड. तानाजी जायभावे, माजी नगरसेविका डॉ. वसुधा कराड, कॉ. सीताराम ठोंबरे, सिंधू शार्दूल यांच्यासह माकपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करीत या करवाढीला विरोध केला.

भाजपने प्रस्तावित केलेल्या करवाढीला माकपचा विरोध असून, ही करवाढ करण्यापेक्षा करबुडव्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांचा विरोध डावलून करवाढ केली, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माकपच्या वतीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एआयफुक्टो’कडून काळा दिवस

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघ तथा ए. आय. फुक्टोच्या आदेशांनुसार शहर आणि जिल्ह्यातील प्राध्यापकांनी काळा दिवस पाळला. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व सीन‌िअर कॉलेजेसमध्ये काळ्या फिती लावून या आंदोलनात प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

संघटनेच्या वतीने सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात याआधी दिल्ली आणि मुंबई येथे आंदोलने करण्यात आली. सरकार या मागण्यांबाबत निर्णय घेत नाही. सातवा आयोग देत असताना वाढीव खर्चापोटी पाच वर्ष सर्व राज्यांना शंभर टक्के मदत केंद्र सरकारने करावी व उच्च शिक्षण क्षेत्रात सातवा वेतन आयोग एकाच वेळेस व सुरळीतपणे लागू व्हावा, यासाठी प्राध्यापाकांनी सरकारच्या विरोधात काळी फीत लावून निषेध व्यक्त केला.

जिल्ह्यात या आंदोलनास शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी पाठिंबा दिला. त्यांनीही प्राध्यापकांसोबत काळी फ‌ित लावून निषेध व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी डॉ. नंदू पवार, प्रा. एस. जे. पाटील व इतर सदस्य यांच्याशी प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली. प्राध्यापकांच्या रास्त मागण्यांसाठी संघटना प्राध्यापकांसोबत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या आहेत मागण्या

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, २०१० मध्ये ‘युजीसी’ ने काढलेली अधिसूचना रद्द करणे, बढतीसाठी आवश्यक असलेले रिफ्रेशर व ओरिएंटेशन कोर्सला मुदतवाढ द्यावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सहाय्यक प्राध्यापकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, उच्चशिक्षणबाबत धोरण ठरविताना व शिक्षण विषयक निर्णय घेताना प्राध्यापक महासंघाच्या प्रतिनिधीना सोबत घ्यावे, एपीआय रद्द करावा, शिक्षणाचे बाजारीकरण व खासगीकरण रोखावे, प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरीत भराव्यात, चॉइस बेस क्रेडिट सिस्ट‌िम बंद करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात नियमांचा अतिरेक नको

0
0

मंड‍ळांच्या कार्यकर्त्यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशाचे घरोघर आगमन होणार असून, घरातील सजावटीबरोबरच बहुतांश सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्णत्वाकडे आहे. मात्र मांडवाचे आकार कमी करण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याने काही मंडळांमध्ये नाराजी आहे, तर काही मंडळांनी पोलिसांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवानिमित्त बाजारात खरेदीने वेग घेतला आहे. नाशिक शहर पोलिसांनी मंडळांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. त्यानुसार वाहतुकीच्या रस्त्यावर आपत्कालीन परिस्थितीत अॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी जागा सोडावी, असे आदेश दिले आहेत. परंतु, शहरात मांडवांचे आकार मोठे व रस्त्याची रुंदी कमी असल्याने पोलिसांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे पोलिस परवानगी देत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महापालिकेनेही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे काम रखडले आहे.

शहराच्या बाहेर असलेल्या मंडळांना पुरेशी जागा उपलब्ध असल्याने त्यांना या अडचणींचा सामना करावा लागत नसल्याने त्या मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व गणेश मंडळे पोलिसांच्या निर्णयाबाबत एकत्र येत नसल्याने पोलिसही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. उपनगरांमधील मंडळांचे पोलिसांच्या निर्णयाला समर्थन आहे. शहरातील काही मंडळांनी मंडप टाकले आहेत परंतु, पोलिसांनी त्यांचे आकार कमी करून जास्तीत जास्त १० बाय १० इतके ठेवावेत असे सांगितले आहे. परंतु, ऐनवेळी आकारा कमी करणे शक्य नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे महापालिकादेखील अतिक्रमण केल्याचे गुन्हे दाखल करणार असल्याचे समजते. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मंडळाचे कार्यकर्ते हे काही गुन्हेगार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच कारवाई करू नये. प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करताना अतिशयोक्ती करू नये. प्रत्येक मंडळाला समान न्याय द्यावा.

- जगदीश पाटील, नगरसेवक

पोलिस करीत असलेल्या सूचना अतिशय योग्य आहेत. वाहने जाण्यासाठी जागा सोडली पाहिजे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप नसावा असे वाटते.

- सदाशिव बांगर, कार्यकर्ते

पोलिसांची भूमिका योग्य आहे परंतु, त्याचा अतिरेक व्हायला नको. कार्यकर्त्यांच्या भावनादेखील समजावून घ्यायला हव्यात. कोणताही कार्यकर्ता नागरिकांना त्रास होईल असे काम करीत नसतो. अनावधानाने एखादी गोष्ट घडल्यास त्याला सुधारण्यासाठी वाव द्यावा.

- महेंद्र बडवे, गणेशमंडळ पदाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! पुलाला पडलेय भगदाड

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहर आणि पसिरात झालेल्या सिंहस्थ कामांचा सुमार दर्जा अवघ्या दोन वर्षांत उघड झाला आहे. येथील जुना आखाडा महामंडलेश्वर नगरकरिता सार्वजनीक बांधकाम खात्याने बांधलेल्या रस्त्यावरील पुलास मोठे भगदाड पडले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात येथील रस्ता खचला असून, पडलेल्या भगदाडाने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

गोलदरी या नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलाने परिसरातील शेतकऱ्यांना दळणवळण सोयीचे झाले आहे. पावसाळ्यात हा मार्ग बंद असायचा आणि दुग्धव्यवसाय‌िकांसह शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. मात्र सिंहस्थ २०१५ पूर्वनियोजनात अनेक वर्षांपासून प्रलंब‌ित असलेला रस्ता जुना आखाड्याचे राष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरी महाराज यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आला. त्याच वेळेस पुलाचे काम करण्यात आले आहे. सिंहस्‍थात बिल्वतीर्थ रिंगरोड असाच निकृष्ट झाला आहे. तलावाच्या काठाने फूटभर देखील जागा सोडलेली नाही. महिनाभरापूर्वी भीषण अपघात होऊन दोघांना प्राण गमवावे लागले होत. या दोन्ही रस्त्यांच्या कामांची चौकशी होण्याची गरज आहे. कोट्यवधी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता आणि दर्जा अत्यंत सुमार आहे.

उपअभियंता संपर्क क्षेत्राबाहेर!

जुना आखाडा महामंडलेश्वर नगरजवळील या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. मात्र या पावसात पुलाला पडलेले भगदाड दुर्लक्ष‌ित झाले आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याचे संबंध‌ित विभागाचे उपअभियंता व शाखा अभियंता मोबाइल कॉल रिजेक्ट करत असल्याने ही समस्या कोणाकडे सांगणार, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांसमोर उभा आहे. मंगळवारी एका ग्रामस्थाने या भगदाडाभोवती दगड लावून वाहनधारकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपअभियंता येथील लोकशाही दिन अथवा अन्य बैठकांना देखील उपस्थित नसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुंदोपसुंदीत विकासाला ब्रेक!

0
0

कैलास येवला, सटाणा

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या बागलाण तालुका दौऱ्यानंतर तालुक्यातील आरोग्यसेवा बाळसे धरणार की नाही हे येणारा काळ सांगणार असला, तरीही कोनशिला प्रकरणामुळे तालुक्यातील राजकारण मात्र ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या मंत्र्याच्या दौऱ्याला अपशकून झाल्याचे म्हटले जात असतांना शिवसेना व शिवसैनिकांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतल्याने पक्षांतर्गत कमालीची अवस्थता निर्माण झाली आहे. याऊलट भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आततायीपणामुळे आता पक्षांतर्गतच कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

सटाणा शहरात गेल्या पाच वर्षांपासून सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करून उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर युनिटचा शुभारंभ आरोग्यमंत्री शिवसेनेचे असल्यामुळेच होऊ शकला. हे खाते भाजपकडे असते तर कदाचित अद्यापही ही इमारत उद‌्घाटनाच्या प्रतिक्षेत असती. कारण शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले प्रशासकीय भवन तीन वर्षांपासून पडून आहे. त्याचे अजूनही उद‌्घाटन झालेले नाही. भाजप व राष्ट्रवादी पक्षातील तालुका पातळीवरील कलगीतुऱ्यामुळे उद्घाटनचा पेच वाढतच आहे.

प्रशासकीय भवनाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची तारीख मिळाली असताना केवळ खासदार सुभाष भामरे यांना कल्पना देण्यात आली नसल्यामुळे समारंभ रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रशासकीय भवन आजही उद्घाटनाच्या प्रतिक्षेतच आहे.

नामपूर येथे उभारण्यात आलेले तालुका क्रीडासंकूल देखील पूर्ण झाले आहे. मात्र आमदार दीप‌िका चव्हाण व केंद्रीय राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यात मानापमानाचे नाट्य लावून त्यांचेच समर्थक आपली पोळी भाजून घेत असल्याने तालुक्यातील महत्त्वाच्या सुविधा उद्घाटनाविनाच पडून आहेत. ट्रॉमा केअर शुभारंभप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांना रितसर निमंत्रण दिल्याचे सांगितले जाते. मात्र तरीही भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला आततायीपणा पक्षाच्या प्रतिमेला मारक ठरणारा असल्याच्या प्रतिक्रिया पक्षपातळीवरूनच उमटू लागल्या आहेत. बागलाणच्या विकासाबाबत आमदार दीपीका चव्हाण व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी एकमत केल्यास निश्चितपणे तालुक्याचे प्रश्न मार्गी लागण्यास वेळ लागणार नाही, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाक सेवकांचा मागण्यांसाठी मोर्चा

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

तुटपुंज्या पगारावर सेवा देणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांना (जीडीएस) सेवेत सामावून घ्यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी जीडीएस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले. विविध मागण्यांसाठी देशभरातील दोन लाख ७३ हजार जीएसडी कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील जीएसडी कर्मचाऱ्यांनी देखील शालिमार येथील जीपीओ कार्यालयात संप पुकारला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया पोस्टल जीडीएस एम्प्लॉईज युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जीपीओ कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा शालिमार, नेहरू गार्डन, एमजी रोड, मेहेर सिग्नलमार्गे हुतात्मा स्मारकापर्यंत पोहोचला.

जीडीएस कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन व इतर सुविधा द्याव्यात, अनुकंपातत्त्वावर सर्वांना १०० टक्के नोकरीत सामावून घेण्यात यावे, उद्दिष्टपूर्तीसाठी दिली जाणारी पिळवणूक थांबवावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. युनियनचे नाशिक विभागाचे अध्यक्ष राजाराम जाधव, चंद्रकांत कसबे, भाऊसाहेब बेनकर, योगेश हाके, सविता कदम, जया मुरकुटे यांच्यासह इतर कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले.

जीडीएस कर्मचाऱ्यांची विभागांत ४६७ पदे आहेत. त्यापैकी ५५ जागा रिक्त आहेत. या जागांवर अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक व्हायला हवी. तसेच, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी आमची मागणी आहे.

- राजाराम जाधव, विभागीय अध्यक्ष, जीडीएस युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी एक्स्प्रेस बनविणार आदर्शवत

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिककरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी पंचवटी एक्स्प्रेस येत्या गांधी जयंतीपासून (दि. २ ऑक्टोबर) आदर्श ट्रेन म्हणून घोषित करण्यासाठी रेल परिषदेने पुढाकार घेतला आहे. ही समाजसेवी संस्था रेल्वे प्रशासनाच्या मदतीने पंचवटी एक्स्प्रेस फेरीवाले, भिकारी, पाकीटमार, चेन स्नॅचर्स यांच्यापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

याबाबत रेले परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी यांनी सांगितले, की यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दि. १५ ऑगस्ट रोजी परिषदेने पत्र लिहिले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना वरील जाचापासून मुक्तता मिळणार आहे. एखादी रेल्वेगाडी अशा पद्धतीने आदर्श ट्रेन म्हणून ओळखली जाण्याचा दृष्टीने होणारा रेल्वेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग आहे. या गाडीतून फुकटे प्रवासी व चोरांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे विशेष पथक नेमण्याची विनंती रेल परिषदेने रेल्वेला केली आहे. मनमाड ते नाशिक आणि इगतपुरी ते कल्याणदरम्यान ही पथके कारवाई करतील.

--

‘आदर्श कोच’ प्रभावी

रेल्वे परिषदेने २००९ मध्ये पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आदर्श कोच ही संकल्पना राबविली. या कोचमध्ये पासधारकच असतात. गाडी सुरू झाल्यावर त्यांना आराम मिळावा म्हणून कोणी कोणाशी संवाद साधत नाही की मोबाइल सुरू करीत नाही. वीज बचतीसाठी दिवे बंद केले जातात. गाडीत प्रथमोपचार पेटीची सुविधा आहे. प्रवाशांना पुस्तक वाचण्यासाठी वेगळा वेळ दिला जातो. फेरीवाले, भिकाऱ्यांना या कोचमध्ये प्रवेश नाही. २०१३ मध्ये या कोचमध्ये छोटेखानी विवाह समारंभ झाला. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली. कोचच्या स्वच्छतेबाबतही २०१२ मध्ये नोंद झालेली आहे. २०१५ मध्ये या कोचच्या प्रवाशांनी रेल्वेला शंभर पत्रे दिली. प्रत्येक पत्राला पोच मिळाली. त्याबद्दलही लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या अंकिता पारख झळकल्या मोदींसोबत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या पुढाकाराने नवी दिल्लीत झालेल्या चॅम्पियन ऑफ चेंज या दोन दिवशीय विशेष कार्यक्रमांतर्गत संवाद सत्रात नाशिकच्या ‘पर्स्क मी डॉट कॉम’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता आदित्य पारख यांनी आपला सक्र‌िय सहभाग नोंदवला. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर झालेल्या चर्चात्मक सत्रातही त्यांना सहभागी होण्याची, मत मांडण्याची संधी लाभली.

भारतातील युवा उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर संवादाची संधी मिळावी, या उद्देशाने नीती आयोगाने ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ प्रवासी भारतीय केंद्रात हा कार्यक्रम नुकताच घेतला. देशभरातून दोनशे निवडक उद्योजकांना यात सहभागी होता आले. त्यांच्यापैकीच नाशिकमधून अंकिता आदित्य पारख या एकमेव होत्या. सहभागी युवा उद्योजकांचे वेगवेगळे गट करण्यात आले होते. त्यात अंकिता यांना डिज‌िटल इंडिया या गटात सहभागाची संधी मिळाली. या गटात कॉर्पोरेट जगतातील नामांकित व्यक्त‌िमत्वांचा समावेश होता. त्यात पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा, चोलामंगलमचे व्यवस्थापकीय संचालक वेलियान सुब्बियाह, अर्बन लॅडरचे अशिष गोयल आणि होंडाकॉर्पचे अभिमन्यू मुंजाल यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी आजच्या स्थितीत भारतीय बदल व विकासासाठी नव्या संकल्पांवर आधारीत गटनिहाय चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी गटचर्चेतून पुढे आलेल्या विविध संकल्पनांचे एकत्रिकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले.

या संवादात्मक कार्यक्रमातील सहभागाबद्दल भावना व्यक्त करताना अंकिता म्हणतात, कार्यक्रमातील माझा सहभाग ही एक जीवनातील अविस्मरणीय बाब म्हणता येईल. नवयुवा उद्योजकांनी पंतप्रधान आणि सरकारी स्तरावर करण्यात आलेले मार्गदर्शन हे हुरूप, प्रोत्साहन वाढविणारे होते. राष्ट्रीय विकासाच्या प्रक्र‌ियेत सहभागी होण्याची संधी यानिमित्ताने नवउद्योजकांनी मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आनंदोत्सवा’त साधली तणावमुक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्तीसगडमधील नक्षल क्षेत्र ते त्रिपुरा आणि आसाममधील भाग, महाराष्ट्रातील लातूर ते उत्तर प्रदेशमधील सहारणपूर, जम्मू ते कन्याकुमारी अशा भारतभरातील सर्व ठिकाणी एक लाख लोकांनी वेबकास्टद्वारे आनंदी, प्रसन्न आणि तणावमुक्त राहण्याची रहस्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडून जाणून घेतली.

निमित्त होते देशभरात सुमारे २००० केंद्रांवर आयोजित आनंदोत्सव या विशेष उपक्रमाचे. राज्यातून १२,५०० हून अधिक, तर नाशिकमधून ११५० हून अधिक साधकांनी या अनोख्या उपक्रमाचा लाभ घेतला.

नाशिक येथे टागोरनगर, गंगापूररोड सिडको, नाशिकरोड, लासलगाव, मखमलाबाद, निफाड अशा एकूण १८ ठिकाणी एकाच वेळी हा कोर्स घेण्यात आला. युवकांच्या आत्महत्या आणि नैराश्य यांसारख्या सध्याच्या ज्वलंत विषयांवर बोलताना कमी झालेला आत्मविश्वास, आपापसांत होणारे संघर्ष आणि अतिरेक यावर मात करण्यासाठी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी प्रत्यक्षात करण्यासारखे काही उपाय सांगितले. स्तुती केली गेली किंवा टीका झाली, तरी मनाचा समतोल कसा राखावा, याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात नव्याने मिळालेली ऊर्जा, आनंद टिकवून ठेवण्यासाठी आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्यक्ष वापरण्याची काही तंत्रे शिकविण्यात आली. गेल्या ३६ वर्षांत जगभरातील सर्व स्तरांतील, पार्श्वभूमीतील, धर्मांतील व्यक्ती, जसे डॉक्टर्स, गृहिणी, आयटी प्रोफेशनल्स आदी घटक अशा तणावमुक्तीसाठी एकत्र आल्याचे आयोजकांनी सांगितले.


शांतपणाची मिळाली अनुभूती

बेंगळूरू येथील आंतरराष्ट्रीय केंद्रात या कार्यक्रमासाठी आलेली एमबीएची विद्यार्थिनी दीप्ती कारिवाला म्हणाली, की आनंदी राहण्याचे मार्ग प्रत्यक्ष गुरुदेव यांच्याकडून शिकणे हा एक सुंदर अनुभव होता. या उपक्रमात भाग घेतल्यानंतर मला खूप शांत आणि मोकळे आणि आशावादी वाटते आहे. चेन्नई येथून वेबकास्टद्वारे या उपक्रमास उपस्थित असलेले केमिकल इंजिनीअर अग्निहोत्र चिंता यांनी सुदर्शनक्रिया हा खास अनुभव असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images