Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तीर्थक्षेत्र कावनईत हातसफाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील तीन लोखंडी दानपेट्या व कामाक्षी मंदिरातील दानपेटी अशा चार दानपेटीतील दीड लाखांची रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याआधीही या मंदिरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान या चोरी प्रकरणातील तीन दानपेट्या कुलूपे तुटलेल्या अवस्थेत मंदिरालगत आढळल्या. मंदिरातील एक पेटी जागीच रिकामी करून त्यातील रक्कमही चोरट्यांनी गायब केली.

डोंगराळ भागात ही मंदिरे असल्यामुळे येथे रात्री फार कुणाची ये-जा नसते. नेकमा याचाच फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी उचलून नेल्या. एक दानपेटी उचलता न आल्याने तिचे कुलूप तोडून ती जागीच रिकामी केली. तर जवळच असलेल्या कामाक्षी देवी मंदिरातील दानपेटीही चोरट्यांनी उचलून नेऊन रक्कम चोरून नेली. एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेट्या व त्यातील रक्कम चोरीस गेल्याने खळबळ उडाली.

बुधवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडीस आले. मंदिराचे पुजारी उडिया महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घोटीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक माळी, पोलिस कर्मचारी संदीप शिंदे, सुहास गोसावी आदींनी घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला.

पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण केले. श्वानाने मंदिर परिसाराचा माग दाखवला. ठसे तज्ज्ञांनी ठशांचे नमूने घेतले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरटे कैद झाल्याने पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीर्थक्षेत्राचे महंत फलाहारी महाराज, ट्रष्टी कुलदीप चौधरी, दीपक मंगे, भरत पटेल आदींनी याबाबत माहिती घेतली.

दीड लाखांची चोरी?

कपिलधारा तीर्थक्षेत्र परिसरातील तीन दानपेट्यांतून जवळपास एक ते सव्वा लाख रुपये तर कामाक्षी मंदिरातील दानपेटीतून जवळपास वीस पंचवीस हजार रुपये चोरी झाल्याची माहिती महंत फलाहारी महाराज व उडिया महाराज यांनी दिली. श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दोन महिन्यापूर्वी दानपेटी उघडल्या होत्या. त्यानंतर दानपेट्या उघडल्या नसल्यामुळे रकमेचा अंदाज येत नसला तरी सर्व रक्कत दीड लाखांच्या आसपास असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या मंदिरात नेहमीच चोऱ्या होतात. त्यामुळे पोलिसांनी कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी पुजाऱ्यांसह भक्तांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेबसाइटवर चुकीची माहिती

0
0

आडगाव पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक चुकीचा

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शासनाने सर्व पोलिस मुख्यालयाला वेबसाइट बनविण्याचे आदेश दिलेले आहे. त्याचे पालन करीत नाशिक पोलिसांची वेबसाइट तयार केली गेली. मात्र यामध्ये बऱ्याच चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. एका नागरिकाला आडगाव पोलिस स्टेशनचा फोन नंबर लागत असल्याने त्याने वेबसाइटवर चेक केला असता तेथे दिलेला नंबर हा दुसऱ्याच ठिकाणी लागल्याने नागरिकाचा गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे पोलिस स्टेशनचे नंबर, पत्ता अशी माहिती परिपूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आडगाव परिसरातील एका नागरिकाने पोलिस स्टेशनला फोन करायचा म्हणून गूगलवर आडगाव पोलिस स्टेशन संपर्क क्रमांक शोधला. त्याला 'नाशिक पोलिस डॉट कॉम' या वेबसाइटवरून आडगाव पोलिस स्टेशनच्या पेजवर नंबर मिळाला. मात्र त्याने तो लावल्यावर संबंधित फोन नंबर चुकीचा आढळला. नाशिक पोलिसांच्या वेबसाइटवर आडगाव पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक ०२५३-२६२९८३७ हा दिलेला आहे. मात्र तो चुकीचा असून, अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. परंतु, त्याच्यातही बदल केलेला नाही.

वेळोवेळी अपडेट गरजेचे

सोबतच या वेबसाइटवर शहरातील म्हसरूळ पोलिस स्टेशनची कोणतीही माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. वेबसाइट वेळोवेळी अपडेट असणे गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला असून, प्राधान्याने वापर सुरू आहे. त्यामुळेच हायकोर्टाने सर्व शहर, जिल्हा पोलिस मुख्यालयाची वेबसाइट असली पाहिजे. मात्र तरीही वेबसाइटवर फोन नंबर चुकीचे आहेत. तरी वेबसाइट वेळोवेळी अपडेट होतांना दिसत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे वेबसाइट बनवण्याबरोबरच ती वेळोवेळी अपडेट ठेवणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक स्पर्धेत संजीवनीला रौप्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतच्या पावलावर पाऊल टाकत नाशिकच्या संजीवनी जाधवने आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाची परंपरा कायम राखली आहे. चीनमध्ये तैपई येथे झालेल्या जगातिक स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले.

महिलांच्या दहा हजार मीटर स्पर्धेत संजीवनीने यावेळी ३३ मिनिटे २२ सेकंद अशी सर्वोत्तम वेळही नोंदवली. सुवर्णपदक विजेत्यापेक्षा अवघ्या तीन ३ सेकंदानी ती मागे राहिल्याने तिचे सवुर्णपदक हुकले. दरम्यान, संजीवनीचे पदक जिंकण्याची घोडदौड सुरूच आहे. या अगोदर कविता राऊतनंतर आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संजीवनी जाधवने गुंटूर येथे संपलेल्या ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा यंदा बारा दिवस

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गणरायांचे आगमन अवघ्या एक दिवसावर आल्याने साऱ्याच गणेशभक्तांची बाप्पांच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. त्यातच बाप्पा यंदा दहा नव्हे, तर तब्बल बारा दिवस मुक्काम ठोकणार असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला आणखी उधाण आले आहे.

पुरोहित महासंघाचे सतीश शुक्ल यांनी सांगितले, की बारा दिवसांच्या गणेशोत्सवाचा योग दुर्मिळ असून, शुभ आहे. दर वर्षी तिथी घटतात किंवा वाढतात. त्यानुसार गणेशोत्सवाचा कालावधी हा कमी-जास्त होत असतो. कधी तो नऊ दिवसांचा असतो, तर कधी दहा दिवसांचा असतो. चतुर्थी ते अनंत चुतर्दशी असा गणेशोत्सव असतो. यंदा तिथी वाढल्यामुळे श्रींचा मुक्काम बारा दिवस राहणार आहे.

रत्नाकर संत गुरुजी यांनी सांगितले, की तिथीचा ठराविक कालावधी असतो. तिथीक्षयामुळे (सूर्याने पाहिलेली तिथी) गणेशोत्सव कालावधी कमी-जास्त दिवसांचा असू शकतो. यंदा चतुर्थीला राहू काल आहे. परंतु, गणेश स्थापना आणि राहू कालाचा काही संबंध नाही. राहू काल हा फक्त नवीन प्रयाण, सरकारी कामे, प्रवास गाठीभेटी यासाठी वर्ज्य आहे. गणेशमूर्ती स्थापनेसाठी वर्ज्य नाही.

संत गुरुजींनी सांगितले, की गणेशोत्सव काळात घरात बाळ जन्माला आले किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास दुसऱ्याच्या हस्ते त्वरित गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. काही कारणास्तव घरात एखाद्या वर्षी गणेशमूर्तीची स्थापना करता आली नाही, तरी चालते. घरात गर्भवती स्त्री असली, तरी विर्सजन करावे. अशावेळी मूर्ती विसर्जन करू नयेयाला शास्त्राधार नाही.

परंपरा जोपासावी

शुक्ल यांनी सांगितले, की काही जण दीड दिवसाचा, तर काही जण अडीच दिवसांचा गणेशोत्सोव साजरा करतात. यंदा बारा दिवसांचा गणेशोत्सव आल्यामुळे गोंधळून जाण्याचे कारण नाही. आपल्या घराण्यातील रुढी-परंपरेप्रमाणे गणेशोत्सोव साजरा करावा.

प्रतिष्ठापना मुहूर्त असे

शास्त्रानुसार गणेशमूर्ती मातीचीच असावी. मूर्ती स्थापना करताना देवाचे व आपले तोंड दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यावी. गणेशोत्सवास शुक्रवारी (दि. २५) प्रारंभ होत आहे. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचे मुहूर्त असे ः सकाळी ८ ते ९.३० लाभ मुहूर्त. ९.३० ते ११ अमृत मुहूर्त. दुपारी १२ ते २ शुभ मुहूर्त. विसर्जनाचा कालावधी सूर्यास्तापर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीचा ठराव केरात

0
0

महासभेत विषय मंजुरीनंतरही मंदिराचे सभागृह अद्याप ट्रस्टकडे नाहीच


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मंदिरालगत बांधण्यात आलेले सभागृह ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा ठराव महापालिकेने केला होता. या ठरावाला अनेक वर्षे लोटली तरी हे सभागृह अद्याप ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. त्यामुळे टाकळी येथे येणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच, धार्मिक ठिकाण असतानाही या सभागृहात उपद्रवी आणि व्यसनींचा वावर वाढल्याचे चित्र आहे.

नंदिनी नदीला येत असलेल्या पुरामुळे समर्थ रामदास स्वामी मंदिराला धोका निर्माण झाला होता. नदीच्या पाण्यामुळे मंदिरासमोरील मातीचा भाग ढासळत जाऊन मंदिरापासून २० फूट असलेली जमीन फक्त चार फूट राहिल्याने मंदिराला धोका निर्माण झाला. याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे खर्चाचे काम असल्यामुळे येथील ट्रस्टींनी तत्कालीन महापौर शांताराम बापू वावरे यांना महापालिकेत जाऊन परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्यक्ष पाहणी केली. मनपाच्या महासभेत बंडोपंत जोशी यांनी केलेल्या मागणीनुसार महापौर उत्तमराव ढिकले यांनी संरक्षक भिंत बांधण्यासाठी १० लाख रुपये मंजूर केले. यानंतर महापौर अशोक दिवे यांनी ५४ लाख रुपये बांधकामासाठी मंजूर केले. या सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापौर दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत या सभागृहाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. दोन सभागृहांपैकी एका सभागृहाला मातोश्री राणुबाई सभागृह व दुसऱ्या सभागृहाला दादासाहेब पोतनीस सभागृह अशी नावे देण्याचेही जाहीर केले.

दोन्ही सभागृहे श्री समर्थ सेवा मंडळास धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यासाठी ताब्यात देण्याचे जाहीर केले. मंडळाकडे बांधकाम सुपूर्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार झाली. परंतु, मंडळाचा वाद कोर्टात सुरू आहे, अशा काही लोकांनी वावड्या उठवल्याने या कामाला खो बसला. परंतु, या आधीच मंडळाच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागला होता. २०१२ रोजी हायकोर्ट मुंबई यांनी नवीन आदेशानुसार नवीन घटना करून विश्वस्ताची नेमणूक करण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायाधीश हे कायमस्वरूपी अध्यक्ष असून, सात जणांचे विश्वस्त मंडळ कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, करूया ‘उत्सवमूर्ती सन्मान’साठी नोंदणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विघ्नांचे सावट दूर करून मांगल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. गणेशाच्या या उत्सवाचा जल्लोष आणखी रंगतदार करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ यंदाही ‘उत्सवमूर्ती सन्मान’ हा अनोखा उपक्रम घेऊन आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवात नाशिक ढोलने आपला दबदबा कायम राखला आहे. सर्वांगसुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मांगल्यपूर्ण वातावरणात बाप्पाची पूजा, रंजक आणि प्रबोधन करणारे देखावे करून सार्वजनिक मंडळे या उत्सवाची शान वाढवितात. त्यामुळे आपले वैशिष्ट्य जपण्यासाठी मंडळांचाही खास प्रयत्न असतो. मंडळांना व्यापक व्यासपीठ देण्यासह त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने खास मंडळांसाठी उत्सवमूर्ती सन्मान आयोजित केला आहे. यंदा या उपक्रमाचे

दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेलाही मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

‘उत्सवमूर्ती सन्मान’मध्ये सर्वोत्तम गणेशमूर्ती, इको फ्रेंडली गणेशमूर्ती, सर्वोत्तम मंडळ आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंडळ अशा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या उपक्रमासाठी सोमवारपासून नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘मटा’च्या कार्यालयात येऊन, प्रवेश अर्ज भरून आपल्या मंडळाची नावनोंदणी करावी.


येथे साधावा संपर्क

मोबाइल ः ९५५२५६६८४२

वेबसाइट ः www.mtganeshutsav.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणीतून जोपासा सामाजिक बांधिलकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेताच वर्गणी गोळा केली, तर पोलिस संबंधित मंडळावर खंडणीचा गुन्हा दाखल करू शकतात. त्यामुळे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी गणेश मंडळांनी धर्मादाय विभागाची परवानगी घ्यावी, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे यांन‌ी बुधवारी केले.

गणरायांचे आगमन एक दिवसावर येऊन ठेपले आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अबालवृद्ध आतुरले आहेत. हा उत्सव साजरा करताना गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानगीअभावी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू नये याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही बुधवारी गणेश मंडळांची बैठक बोलावली होती. घुगे यांच्यासह सहायक धर्मादाय आयुक्त म. वि. तोकले, डी. डी. कोळपकर आणि वैशाली पंडित यावेळी उपस्थ‌ति होत्या. ४० हून अधिक मंडळांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी, गरीब विद्यार्थी, तसेच गरजू रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी गणेश मंडळांनी जमा वर्गणीपैकी किमान १० टक्के रक्कम खर्च करावी, असे आवाहन घुगे यांनी यावेळी केले. पी. एस. झाडे यांनी प्रास्ताविक केले. सुमंत पुराणिक यांनी आभार मानले.


घरबसल्या मिळवा परवानगी

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी घेण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात येण्याची गरज पडू नये आणि परवानगीसाठी अडवणुकीचे प्रकारही घडू नयेत यासाठी यंदा प्रथमच ऑनलाइन परवानगीची सुविधा या विभागाने उपलब्ध करून दिली आहे. www.charity.maharashtra.gov.in या वेबसाइटवर प्रणाली मार्गदर्शनवर क्लिक करून कलम ४१ सी खाली ऑनलाइन अर्ज सादर करून परवानगी घेता येते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व तत्सम माहिती अत्यंत सुटसुटीत भाषेत देण्यात आली आहे. मंडळाचा ठराव, जागामालकाची संमती आणि मागील परवानगीची पावती या अर्जाला स्कॅनद्वारे जोडून परवानगी घेता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप शेटजींचे सरकार’

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

राज्यातील भाजपप्रणित शासनाने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. हे सरकार ना शेतकऱ्यांचे, ना नोकरदारांचे. हे सरकार शेटजी, भटजीचें असून यांची धोरणे संबधितानांच पूरक असल्याची टीका आमदार निर्मला गावित यांनी केली.

वैतारणा येथे काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, काँग्रेसच्याच योजनांचे नाव बदलून हे शासन केवळ यंत्रणा राबवत आहे. या मेळाव्याला जि. प. उपाध्यक्षा नयना गावित, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ममता पाटिल, तालुका काँग्रेस अध्यक्ष कचरु पा. डुकरे, विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ उपस्थित होते. इगतपुरी तालुका महिला अध्यक्षपदी मथुराताई जाधव, एनएसयूआयच्या तालुकाध्यक्षपदी पंकज माळी, इगतपुरी शहराध्यक्षपदी धनराज शर्मा, घोटी शहराध्यक्षपदी आशा बेलेकर, महिला उपाध्यक्षा सिताबाई चौधरी आदीची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महादेववाडीत पोलिसांवर हल्ला

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

अवैध दारू व्यवसायावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संशय‌ितांनी आत्महत्या करण्याची धमकी देत हल्ला चढविला. सातपूर परिसरातील महादेववाडीत ही घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संबंधितांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.

चित्रा महेंद्र साळवे, बाळा उर्फ महेंद्र प्रल्हाद साळवे व कृष्णा शिवाजी जाधव (रा. महादेववाडी, सातपूर) अशी अटक केलेल्या संशय‌ितांची नावे आहेत. महादेववाडीतील एका घरात राजरोसपणे अवैधरित्या मद्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा टाकला. या छाप्यात मद्याचा साठा आढळून आला. पोलिस पंचासमक्ष पंचनामा करीत असताना महिलेसह दोघांनी मज्जाव कारवाई मज्जाव केला. आत्महत्या करीन तसेच छेड काढल्याची तक्रार देईन असे धमकावले. तसेच पोलिसांना धक्काबुक्कीही केली. पोलिसांनी तिघा संशय‌ितांना अटक केली आहे.

भद्रकालीत महिलेचा विनयभंग

नाशिक : पायी चाललेल्या महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आली. जुन्या नाशकातील पाटील गल्लीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन मोटरसायकलस्वारांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

केतन चौधरी व राहूल बागडे अशी संशय‌ितांची नावे आहेत. काझीगढी येथील जुना कुंभारवाडा भागात राहणारी ३५ वर्षीय महिला मंगळवारी भद्रकाली मार्केटकडून घराकडे पायी चालली होती. पाटील गल्लीतील म्हसोबा मंदिर परिसरातून जात असताना मोटरसायकलवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यापैकी एकाने महिलेस अश्लिल शिवीगाळ करीत पोटावर लाथ मारली. तिचा विनयभंग करून ते पसार झाले.

वसाहतीत घरफोडी

बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी लॅपटॉपसह सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांच्या बांधकाम भवन कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विशाल लिंबराज भोर (रा. गंगासागर इमारत) यांनी फिर्याद दिली आहे. भोर कुटूंब‌ीय १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान बाहेर गावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सुमारे २६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

चोरट्यास पकडले

सिन्नर फाटा : नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट्रिंग प्लेटची चोरी करणाऱ्या चोरट्यांना सुरक्षा रक्षकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांकडे सोपविले. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत दोन चोरटे त्याच्याकडील वाहनात भरलेल्या २५ सेंट्रिंग प्लेटा घेऊन पसार झाले. सुरक्षारक्षक विकी विलास दुशिंग (२३, रा. कडवा कॉलनी, शिंदे) आणि किरण आधार पाटील या दोघांनी या सेंट्रिंग प्लेटांची चोरी करणाऱ्या चोरट्यांसोबत दोन हात करण्याचे धाडस दाखवले. पवन भैरवनाथ भाटिया (रा. गोदावरी हॉटेलमागे, द्वारका) असे पकडण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. समीर व अरबाज (पूर्ण नाव माहित नाही) अशी फरार झालेल्या अन्य दोघा संशयित चोरट्यांची नावे आहेत. ते दोघेही द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमागे राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा नाशिकरोड पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा रक्षकांनी चोरट्यास पकडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे येथे उभारण्यात येत असलेल्या फ्लाय ओव्हर ब्रिजच्या कामासाठीच्या सेंट्रिंग प्लेटची चोरी करणाऱ्या चोरट्यांना सुरक्षा रक्षकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांकडे सोपविले. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत दोन चोरटे त्याच्याकडील वाहनात भरलेल्या २५ सेंट्रिंग प्लेटा घेऊन पोबारा करण्यात यशस्वी झाले.
नाशिक-पुणे महामार्गाचे काम करणाऱ्या चेतक एंटरप्रायजेस कंपनीकडे सुरक्षारक्षक म्हणूस कार्यरत असणाऱ्या विकी विलास दुशिंग (२३, रा. कडवा कॉलनी, शिंदे) आणि किरण आधार पाटील या दोघांनी या सेंट्रिंग प्लेटांची चोरी करणाऱ्या चोरट्यांसोबत दोन हात करण्याचे धाडस दाखवले. तीनपैकी एका चोरट्यास पकडण्यात यश आले. दोघे चोरटे त्यांच्याकडील छोटा हत्ती (एमएच ६ एसी २४९) हे वाहन घेऊन फरार झाले. त्यांनी ५० हजार रुपयांच्या २५ लोखंडी सेंट्रिंग प्लेटा चोरल्याची फिर्याद विकी दुशिंग यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली. पवन भैरवनाथ भाटिया (रा. गोदावरी हॉटेलमागे, द्वारका) असे पकडण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. समीर व अरबाज (पूर्ण नाव माहित नाही) अशी फरार झालेल्या अन्य दोघा संशयित चोरट्यांची नावे आहेत. ते दोघेही द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमागे राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा नाशिकरोड पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयईएसए’च्या बैठकीत फीवाढीवर काथ्याकूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंडिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (आयईएसए) बुधवारी झालेल्या बैठकीत एफआरए, पीटीए आणि फीवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नाशिक, धुळे, जळगाव येथील ५० शाळांनी सहभाग घेतला.
शाळांशी निगडित विविध बाबींवर चर्चा करणे व त्यावर योग्य मार्गदर्शन मिळणे हा या बैठकीमागील उद्देश होता. असोसिएशनच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना आरटीईचा फी परतावा, आरटीईच्या रिक्त जागा भरणे, आरटीई राउंड २० जूनपूर्वी संपवावे, अभ्यासक्रमात कुठलाही बदल हा तीन महिने अगोदर करावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नाशिक विभागीय अध्यक्षपदी विवेक पाडले व जिल्हा कार्यकारणीच्या जिल्हाध्यक्षपदी सुखदेव उशीर, कार्याध्यक्षपदी सौराजश्री सुरावकर सचिवपदी अजय देशमुख, सहसचिवपदी शेवाळे व सदस्य कंगणे व प्री-स्कूल जिल्हाध्यक्षपदी डॉ. शैलेश उदासी यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीसाठी ‘आयईएसए’च्या राज्याध्यक्षा जागृती धर्माधिकारी, कार्यकारी अध्यक्ष भरत भांदरगे, उपाध्यक्ष राजेंद्र दायमा, प्रि स्कूल हेड फिरोज सौदागर, सहसचिव डॉ. प्रिन्स शिंदे खजिनदार श्रीधर व कार्यकारी सदस्य नाहीदा खान यांचे मार्गदर्शन लाभले. विविध कर कायद्यांबद्दल सीए भूषण कोतकर यांनी उपयुक्त माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन समितीसाठी १६ अर्ज

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी निफाडमधील देवगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादीच्या सदस्या अमृता पवार यांनी दोन जागांसाठी दोन अर्ज सादर केले. त्यापैकी एक अर्ज सर्वसाधारण तर दुसरा सर्वसाधारण महिला गटासाठी भरला आहे. दरम्यान दोन दिवसांत १६ अर्जांचे वितरण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
विलंब झालेल्या जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. बुधवारपर्यंत १६ उमेदवारी अर्ज वितरित झाले असून त्यापैकी दोन जागांसाठी अर्जही सादर झाले आहेत. वितरित अर्जांमध्ये दीपाली वारुळे यांनी ग्रामीण क्षेत्रासाठी सुषमा पगारे यांनी मोठ्या नागरी क्षेत्रासाठी अनुसूचित जातीसाठीच्या राखीव जागेतून, सचिन देशमुख यांनी संक्रमणकालीन शेख अब्बास हुसेन, अकिल पठाण, सुरेखा नरेंद्र दराडे यांनी ग्रामीण क्षेत्रासाठी, सुनील मोरे यांनी लहान नागरी गटासाठी अर्ज नेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण बदलास शिवसेनेचा विरोध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीच्या विषयांवरून गेल्या महासभेत झालेल्या गोंधळाचा फायदा घेत, सत्ताधाऱ्यांनी गंगापूर आणि मानूर येथील दोनशे एकर जमिनीचे आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला आता शिवसेनेनेही विरोध केला आहे.

महापालिकेच्या शनिवारी (दि. १९) झालेल्या महासभेत गोंधळात मंजूर केलेल्या दोनशे एकरवरील आरक्षण बदलाच्या धोरणात्मक विषयांसह आर्थिक विषयांना आपला विरोध असल्याचे पत्र शिवसेनेकडून आयुक्तांना दिले जाणार असल्याची माहिती गटनेते विलास शिंदे यांनी दिली. त्यामुळे भाजपची अडचण अधिक वाढणार आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी यापूर्वीच या प्रस्तावाला विरोध केला आहे.
महासभेत विषय क्रमांक ३९२ मध्ये गंगापूर शिवारातील सर्व्हे नंबर १३० व १३५ भागशा, मानूर शिवारातील सर्व्हे नंबर ५५, ५६, ८४, भागशः, ६१ ते ७१ व ७५ ते ८२ मधील हिरव्या पट्ट्याचे आरक्षण पिवळ्या पट्ट्यात करण्याचा प्रस्ताव गोंधळातच मंजूर करण्यात आला. सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या पत्रानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यास माजी महापौर दशरथ पाटील यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांची जवळपास दोनशे एकर जमिनीचे आरक्षण बदलले जाणार असून त्यावर सत्ताधारी भाजपसह शिवसेनेच्या भूमिकेवर पाटील यांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, या प्रस्तावास आमचा विरोध असल्याचे गटनेते विलास शिंदे यांनी म्हटले आहे. आरक्षण बदलाच्या या विषयासह महासभेत मंजूर झालेल्या धोरणात्मक व मोठ्या आर्थिक विषयांच्या मंजुरीला विरोध असल्याचे पत्र शिवसेनेकडून आयुक्तांना दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपची कोंडी
गेल्या महासभेत मंजुरी न घेता भाजपचे ४६ विषय परस्पर मंजूर करून घेतले होते. त्यावरही शिवसेनेने आयुक्तांना पत्र देत आक्षेप नोंदविला होता. या विषयांवरून पुढील महासभेत या विषयांवरून भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो @ ७०० रुपये

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
हंगामाच्या प्रारंभीच पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दररोज सुमारे ३५ हजार क्रेटची आवक सुरू झाली आहे. आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव तेजीत आहेत. बाजार आवारावर मंगळवारी २० किलो क्रेटसाठी किमान ३०० रुपये आणि कमाल ९०० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्रेट भाव मिळाला.

हंगामाच्या प्रांरभीच टोमॅटोला उत्तम भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत आहेत. यंदा पाऊस अगदी वेळेवर आणि सरासरी पेक्षाही अधिक बरसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात टोमॅटो लागवडी केल्या आहेत. जूनमध्ये लागवड झालेले टोमॅटो आता बाजार आवारावर विक्रीस येत असून देशभरातून टोमॅटोला प्रंचड मागणी होत आहे. त्यामुळे बाजारभाव तेजीत आहे. येथील बाजार समितीत देशभरातून हजारो टोमॅटो व्यापारी दाखल झाले असून टोमॅटो खरेदीसाठी मोठी स्पर्धा व झुंबर होत असल्याचे चित्र आहे. पिंपळगाव बाजार समितीने यंदा सर्वच व्यापारी आडतदारांना मुबलक जागा उपलब्ध करून दिली आहेत. पिंपळगाव बसवंत येथून मुंबर्इसह उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी ठिकाणच्या बाजारपेठेत टोमॅटो रवाना होत आहे. नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो दर्जेदार असल्याने संपूर्ण देशभरातून मागणी होत आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह नगर, कोपरगाव बाजारातून व्यापारी येत आहेत. आगामी पधंरा दिवसात येथील बाजार आवारावर किमान दीड ते दोन लाख टोमॅटो क्रेट आवक होण्याचा अंदाज आहे. टोमॅटो आवक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपळगाव बाजार समितीने टोमॅटो लिलाव यंत्रणा अधिक सक्षम व नियोजनबद्ध केल्याची माहिती सचिव संजय पाटील यांनी दिली.

रोख खरेदीच्या सूचना
पिंपळगाव बसंवत बाजार समिती टोमॅटो हंगामास जोरदार प्रांरभ झाला. संपूर्ण देशभरातील व्यापारी पिंपळगाव बाजार आवारावर दाखल झाल्याने टोमॅटो खरेदीसाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव तेजीत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी टोमॅटो प्रतवारी करून विक्रीस आणावा. शेतकऱ्यांना टोमॅटोची रक्कम रोख स्वरूपात देण्याबाबत सर्व आडतदारांना सूचना देण्यात आल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षांच्या तयारीसाठी राज्य मंडळाचेही पोर्टल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बारावीनंतर ‘नीट’, ‘जेईई’ किंवा ‘एमएच सीईटी’ परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अधिकाधिक प्रश्न सोडवून दमदार सराव व्हावा, यासाठी आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही पुढाकार घेतला आहे. फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासाचा सराव करून घेण्यासाठी बोर्डाचे ऑनलाइन प्रिप्रेशन पोर्टलही आता लवकरच कार्यरत होणार आहे.
या पोर्टलसाठी बोर्डाचे राज्य सचिव कृष्णकुमार पाटील यांनी राज्यभरातील शिक्षक आणि विषयतज्ज्ञांकडून राज्य मंडळास प्रश्न पाठविण्याचे आवाहन केले आहे. या पाठविलेल्या बहुपर्यायी प्रश्नांची तपासणी होऊन योग्य प्रश्नांचा समावेश प्रश्नपेढीत करण्यात येणार आहे.
प्रश्नपेढीसाठी प्रश्न द्यायचे आहेत अशा शिक्षकांनी प्रश्नांच्या तक्त्यात इयत्ता, विषय, घटकाचे नाव, उपघटक उत्तराच्या विश्लेषणासह ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत मंडळाच्या http:/neetqb.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर तपशील अपलोड करावा. हे प्रश्न केवळ ११ वी आणि १२ वीच्या फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांशी निगडीत केवळ बहुपर्यायी स्वरूपाचे असावेत. हे प्रश्न केवळ विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यासक्रम वेगवेगळे असल्याने या पोर्टलवरच्या प्रश्नपेढीतले प्रश्न हमखास परीक्षेत विचारले जातीलच, असा समज विद्यार्थ्यांनी करून घेऊ नये असाही इशारा बोर्डाने विद्यार्थ्यांना दिला आहे.

गुणवत्तावाढीवर भर
बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पारंपरिक पदवी अभ्यासक्रम वगळता इतर मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेला हमखास सामोरे जावे लागते. यासाठी विद्यार्थी तयारी करताना राज्य मंडळाची इतर बोर्ड सोबत तुलना करतात. या तुलनेत राज्य मंडळ गुणवत्तेत कमी राहू नये, यासाठी मंडळाद्वारे प्रयोग सुरू आहेत. यापैकीच एक प्रयत्न म्हणून ऑनलाइन प्रीप्रेशन पोर्टलकडे बघितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
पाल पडलेले अन्न खाण्यात आल्याने एकाच कुटुंबातील चार जणांची प्रकृती बिघडल्याची घटना जेलरोड परिसरात घडली. हा प्रकार लक्षात येताच चौघांनीही महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. योग्य उपचार झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
जेलरोड, ढिकलेनगरामधील सरस्वतीनगर भागात वास्तव्यास असलेल्या सचिन प्रकाश जाधव (२७) यांच्या कुटुंबात मंगळवारी (दि. २२) सकाळी जेवणानंतर सर्व कुटुंबीयांना अत्यवस्थ वाटू लागले. डोकेदुखी, उलट्या व मळमळ असा त्रास झाल्याने सचिन जाधव यांचे कुटुंबीय घाबरून गेले. जेवणात पाल पडल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले. जाधव हे स्वत:सह आपल्या पूर्ण कुटुंबीयांना घेऊन बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सचिन यांच्यासह पत्नी सोनाली जाधव (२०), मुलगा प्रेम (५) आणि मुलगी गौरी (३) या चौघांवर उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधार झाल्यानंतर त्या सगळ्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, या घटनेची नाशिकरोड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस मोजणार गोंगाट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी असलेला गोंगाट पोलिस मोजणार आहेत. उत्सवात आवाज मर्यादेत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडे ७० साउंड मीटर उपलब्ध करून देण्यात आले असून शहरातील सर्व १३ पोलिस स्टेशनमध्ये त्याचे वाटप करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या आवाजाची मर्यादा मोजण्यासाठी महानगरातील १३ पोलिस स्टेशनसाठी ७० नवे साउंड मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नव्या साउंड मीटरमुळे पोलिसांना कारवाई करणे सोपे होणार आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर ३७ गुन्हे दाखल केले. यंदाही आवाजाबाबत पोलिसांनी काटेकोर धोरण पाळत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
डेसिबल हे ध्वनीतीव्रता मोजण्याचे परिमाण असल्याने किती डेसिबल आवाज येतो हे नव्या पोलिसांना या मीटरमुळे कळणार आहे. गेल्या वर्षी कमी उपलब्ध साउंड मीटरची संख्या कमी हाती. आता, प्रत्येक पोलिस ठाण्यात साउंड मीटर मिळाले आहे. त्यामुळे गणेश मंडळांना आवाजाची मर्यादा काटेकोर पाळावे लागणार आहे. गणेशोत्सवात डीजेवर बंदी असल्याने आता पारंपरिक वाद्यांवर गणेश मंडळाचा भर असणार आहे. पण त्यांनाही आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कार्यकर्ते गेल्या वर्षी डीजेच्या तालावर थिरकत असल्याचे सर्वत्र चित्र होते. या आवाजामुळे कानठळ्या बसल्याचे अनेकांना जाणवले. मात्र, धार्मिक उत्सव असल्याने कोणीही त्याबद्दल तक्रारी केली नाही. पण, डीजेच्या दणदणाटाविरूध्द सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टाने त्यावर कडक भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासनही कामाला लागले असून त्यांनी आवाजला मर्यादित ठेवण्यासाठी गणेश मंडळाच्या बैठकी व जनजागृती केली आहे. त्यानंतरही उल्लघंन झाल्यास पोलिस कारवाई करणार आहे.

आता आक्षेपास नाही संधी
पोलिस ठाण्यांना उपलब्ध झालेले ७० साउंड मीटर चौकाचौकात आणि महत्त्वाच्या ठिकाणी लावले जाणार आहे. ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा ७५ डेसिबलपेक्षा अधिक झाल्यास कोर्टाच्या आदेशानुसार थेट कारवाई केली जाणार आहे. साउंड सर्व्हिस व्यावसायिकांनी गेल्याच आठवड्यात राज्यभर आंदोलन केले. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाईची भीती त्यांनी व्यक्त केली. पण त्यांना अद्याप दिलासा मिळू शकलेला नाही. आवाजाच्या मर्यादेचे नेमके मापन केले जात नसल्याचा मुद्दा साउंड सर्व्हिस व्यावसायिकांनी मांडला होता. पण पोलिसांना उपलब्ध झालेल्या साउंड मीटरवर या व्यावसायिकांना आक्षेप घेता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातच्या पूरग्रस्तांसाठी सव्वा पाच लाखांची मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मुसळधार पावसामुळे पुराचा फटका बसलेल्या गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पीडितांना कांताबा धर्मशाळेकडून सव्वा पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना भावनाथ तलेठी (जि. जुनागड) येथील शाह परिवाराच्या कांताबा संकुलाकडून मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
नाशिक येथील विराज इस्टेटचे संचालक राजेंद्र शाह, विलास शाह, विराज शाह आणि करण शाह यांनी भावनाथ तलेठी येथे आपल्या मातोश्रींच्या नावे कांताबा संकुल अर्थात धर्मशाळा उभारली आहे. या धर्मशाळेच्या माध्यमातून देश विदेशातून आलेल्या महाराज, साधू, साध्वी व यात्रींसाठी निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे १ लाख चौरस फुटांच्या या संकुलात एकूण ७८ खोल्या आहेत. बनासकांठा जिल्ह्यात पूरस्थिती आटोक्यात आली असली तरी आत्तापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पूरपरिस्थितीची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी कांताबा संकुलास भेट दिली. यावेळी रुपानी यांनी राजेंद्र शाह, विलास शाह, विराज शाह, करण शाह व मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक अमूलक व्होरा यांनी सत्कार केला. त्यांनी शाह परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, या संकुलात जैन धर्माचे आचार्य जगवल्लभ सुरी महाराज मुक्कामी थांबले असून पर्युषण पर्व सुरू आहे. रूपानी यांनी त्यांचे प्रवचनही ऐकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुलक्षणी गोविंद विड्याला मागणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समृध्दीच्या सोनपावलांनी घरोघरी महालक्ष्मीचे आगमन होणार असून, त्यासाठी लागणाऱ्या नाशिकच्या गोविंद विड्याला राज्याच्या विविध भागांतून मागणी आहे. वकीलवाडी येथील साईछत्र पान स्टॉलमधून विडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.

महालक्ष्मीला विड्याचा नैवेद्य लागतोच. तो पानविडा जर आयुर्वेदिक आणि आकर्षक स्वरुपात असला तर नक्कीच मन प्रसन्न करेल. म्हणूनच वकीलवाडीतील साईछत्र पान दुकानाचे रवींद्र लहामगे यांनी महालक्ष्मीच्या आकाराचा पानविडा बनविला आहे. यंदा या विड्याला नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून मागणी आहे. त्यांनी बनवलेले विडे इतर जिल्ह्यात पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गेल्या दोन दिवसांत अमरावती, महाबळेश्वर, औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, अशा १५ ते २० जिल्ह्यांमध्ये विडे पाठवले आहेत. विड्याची मागणी अजूनही आहे. परंतु वेळेत पाठवणे शक्य नसल्याने बाहेरच्या ऑर्डर थांबवल्या आहेत. नाशिककरांसाठी विडे केव्हाही उपलब्ध आहेत.

या पान विड्याची ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री होत असून हा पान विडा चार दिवस चांगला राहु शकतो. या पान विड्यासाठी अगोदर बुकिंग करावी लागत असून हा पानविडा ‘गोविंद’ या नावाने प्रसिध्द आहे. विड्यात विशिष्ट प्रमाणात काथ आणि चुना लावला जातो. पानात लावलेला काथ व चुना वेगळ्या पध्दतीने तयार केला जातो. त्यात गुलाबपाणी, लोणी यांचे मिश्रण असते. त्याचबरोबर सुपारी बडीशेप, सुकामेवा, गुलाबपाकळी, गुलाबपाणी, गुलकंद, मध, केशर, अस्मनतारा, वेलची, लवंग, ओवा, जेष्ठमध, कंकोळ, तीळ, खोबरे, पत्री, खडीसाखर, काळा मनुका, मध, कापूर, स्वर्णभस्म, चांदीचा वर्ख, अशा ५२ प्रकारच्या बहुगुणी वस्तू त्यात टाकलेल्या असतात. या विड्याला चारही बाजूने वस्त्राने सजविले जाते. चेरीचा मुखवटा, लवंगाचे डोळे असा विविध प्रकारांनी सजवून महालक्ष्मीचे स्वरुप देण्यात येते. गेल्या १५ वर्षांपासून गृहिणींच्या गौरीपूजन सोहळ्यात हा विडा रंगत आणतोय. एखाद्या आकर्षक शिल्पाप्रमाणे या विड्याची सजावट केलेली असते. गौरी सजावटीचा एक भाग म्हणून हा मंगल नैवेद्य ठेवला जातो. गौरी विसर्जनानंतर प्रसाद म्हणून सर्व कुटूंबियांकडून या प्रसादाचे सेवन केले जाते. ही परंपरा केवळ नाशिक शहरातच प्रसिध्द आहे. या विड्यासाठी लागणारी वस्त्रे मथुरेहून आणली आहेत, तर दागिने नाशिकच्या सराफ व्यावसायिकांनी बनवली आहेत.

आम्ही शास्त्रशुध्द पध्दतीने विडा बनवित असल्याने ग्राहकांची मागणी असते. गेल्या अनेक वर्षांपासून मागणीत सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी नाशिकमधून मागणी असायची. मात्र, आता बाहेरच्या जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद आहे.

- रवींद्र लहामगे, संचालक, साईछत्र पान मंद‌िर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातही गणेशभक्तांचा उत्साह

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे आगमन आज (दि. २५) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात होणार असल्याने शहरातील शिवतीर्थ, पारोळा चौफुली, फुलवाला चौक यासह ठिकठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

यंदा सरकारने अंमलात आणलेल्या जीएसटीमुळे गणेशमूर्तीच्या किमती १० ते २० टक्क्यांनी वाढल्या असून, बाजारात साधारण दहा इंचापासून ते दहा फुटांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गणेशभक्तांचा उत्साह पाहता यंदाही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. विशेष म्हणजे शहरात गणेशाच्या आगमनासाठी यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गणपतीच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळेदेखील सज्ज झाले असून, गणेश मंडळांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मोठ्या गणेश मंडळांची मूर्ती विक्रेत्यांकडे आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. यंदा सजावट केलेल्या गणेश मूर्ती भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहेत.


बाहुबली, मोटू-पतलू रुपात गणेशमूर्ती

गणेश मूर्ती शास्त्रानुसार तयार केलेल्याच भाविकांनी पसंती असते. सार्वजनिक गणेश मंडळासह घरगुती गणपतीची मनोभावे स्थापना केली जाते. यंदा गणेशमूर्ती विक्रेत्यांकडे जय मल्हार, लालबागचा राजा, बाहुबली - २, मोटू-पतलू तसेच कृष्ण-राधाच्या रुपासह तयार केलेल्या मूर्तीसह विविध गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही, परिणामी पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते. यासाठी अनेक भाविकांचा कल पाण्यात विरघळणाऱ्या शाडूच्या मातीने तयार केलेल्या गणेशमूर्ती घेण्यासाठी दिसतो आहे.




सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल

गणेशत्सात सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यात विद्युत रोषणाई, पताका, गोंडे, प्लास्टिकचे हार, चमकी, पट्ट्या, तोरण अशा वस्तू विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. तर आकर्षक थर्माकॉलपासून तयार करण्यात आलेली मखर विविध आकारात विक्रीसाठी आहेत. त्यात दगडूशेट पॅटर्न, मंदिर, फुलांची कमान, मुषक रथ, मोर, बाहुबली हत्ती, शिवाजी महाराज, फुलपाखरूचे मखर बाजारात आलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images