Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मोदक विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

लाडक्या बाप्पांच्या आगमनाने सार्वजनिक मंडळांसह घरोघरी चैतन्य अवतरले असून, गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. मोदक त्यापैकी प्रमुख असून, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मोदकाच्या विविध प्रकारांना वाढती मागणी असल्याने मोदक विक्रेत्यांना जणू गणपत्ती बाप्पा पावल्याची स्थिती आहे.

मोदक अन् गणपती बाप्पा या जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गणपती बाप्पाला प्रिय असल्याने गणेशपूजनात मोदकांना विशेष मान व स्थान असते. त्यामुळे यंदाही बाजारात

खोबरे, मलई, चॉकलेट, आंबा, उकडी, खवा, पेढा, काजू अशा विविध प्रकारांत रुचकर मोदक उपलब्ध आहेत. बाजारात मिळणारे मोदक अत्यंक सुबक व वैशिष्ट्यपूर्ण असल्याने अशा मोदकांना भक्तांकडून वाढती मागणी दिसून येत आहे. त्यामुळे मोदक बनविण्याच्या उद्योगाला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

--

सेंद्रिय मोदकांना मागणी

बाजारात सध्या सेंद्रिय मोदकही विक्रीला आले आहेत. या मोदकांत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर केलेला नसतो. असे मोदक आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असतात. सेंद्रिय मोदकांची जाहिरात सोशल मीडियावर झळकत असल्याने या मोदकांना वाढती मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. सेंद्रिय मोदकांत हापूस आंब्याच्या रसापासून बनविलेल्या मोदकांचीही चलती आहे.

--

रोजगारासंधीत वाढ

गणेशोत्सवात घरोघरी गणेशपूजेसाठी संपूर्ण दहा दिवस मोदकांना मोठा मान असल्याने विविध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मोदकांचे आगाऊ उत्पादन केलेले आहे. खवा, पेढा, आमरस, मलई, खोबरे या पदार्थांपासून तयार केलेल्या मोदकांना मोठी मागणी असल्याने कुशल कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. काही महिला गृहोद्योगांसह बचतगटांनाही मोदकांमुळे अच्छे दिन आले आहेत.

सेंद्रिय हापूस आमरसापासून तयार केलेल्या मोदकांना नागरिकांची मोठी मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शुद्ध हापूस आंब्याच्या आमरसाचा वापर या मोदकांत होतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही हे मोदक पौष्टिक अाहेत.

-अमोल पाध्ये, मोदक विक्रेते

--

मोदकांचे प्रकार व दर

प्रकार - दर (किलो रुपयांत)

खोबरे २८०

मलई ४००

चॉकलेट ४००

आंबा २००

उकडी २५०

खवा २८०

पेढा ४५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भक्तांच्या उत्साहाला उधाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज (दि. २५) घरोघरी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. गणरायाच्या स्वागताचा उत्साह यंदा बाजारपेठेत ओसंडून वाहतो आहे. यंदा पावसाने चांगली वर्दी दिल्याने बाजारपेठेत चैतन्य आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठही नटली असल्याचे चित्र आहे.
गणरायाच्या स्वागताची तयारी आता पूर्ण झाली आहे. गुरुवारी दिवसभर शहरातील बाजारपेठा गजबजल्या होत्या. नजर जाईल तेथे चित्ताकर्षक गणेशमूर्ती आणि आरास सजावटीच्या साहित्याची रेलचेल नजरेला पडत होती. गुरूवारी रात्रीपर्यंत हजारो नाशिककरांनी श्रींची आवडती मूर्ती आरक्षित करून ठेवली. आज सकाळी सहकुटूंब ही मूर्ती वाजत गाजत घरोघरी नेली जाणार आहे. शहरात मुबलक प्रमाणात मखर आणि सजावटीचे साहित्य विविधांगी स्वरूपात दाखल झाले आहे. यात प्लास्ट‌िक फुलांच्या माळा, विविधरंगी हार-फुले, पर्यावरणपूरक मखर, थर्माकॉलचे मखर, गणेशमूर्तीसाठी फेटा, थर्माकॉलपासून ते प्लायवूडपर्यंत साकारलेली नक्षीदार सिंहासने आदी वस्तूंची रेचलेल आहे. यंदा हे साहित्य सुमारे २० ते २५ टक्क्यांनी महागले आहे.
बॉलिवूडचा प्रभाव
गेल्यावर्षी लोकप्र‌िय ठरलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेचा प्रभाव त्यावेळी गणेशमूर्तीच्या ट्रेंडवर दिसून आला होता. जागोजागी खंडेरायाच्या रूपातील गणेशमूर्तींना मागणी होती. ही जागा यंदा बाहुबली आणि बाजीराव यांनी घेतली आहे. काही ठिकाणी गतवर्षीचा ‘जय मल्हार’ ट्रेंडही नजरेला पडतो आहे. याशिवाय पारंपरिक स्वरुपातील शारदेसह गणेश, संतरूपातील गणेश, बालगणेश, महापुरूषांच्या स्वरूपातील गणेशमूर्तींसह विविध देवतांच्या स्वरूपातील आकर्षक गणेशमूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शहर आणि उपनगरांमध्ये बहुतांश ठिकाणी गणेशमूर्ती व सजावटीच्या साहित्याचे स्टॉल्स लागले असून, पावसाची शक्यता लक्षात घेता प्लास्ट‌िक पेपर किंवा ताडपत्रीने विक्रीमंडप संरक्षित करण्याची काळजीही स्टॉलधारकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

पूजासाहित्यास मागणी
श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारात विविध प्रजातींची फुले, हार, नारळासह फळे आणि विविध वृक्षांच्या पत्रींचे पॅकेजच विकले जात आहे. यामध्ये श्रींच्या वस्त्रासह जानवे, सुपारी, वृक्षपत्री आदी वस्तूंचा समावेश आहे.

पर्यावरणाचा जागर

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आग्रह धरणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्थांच्या वतीने यंदाही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्लास्ट‌िक ऐवजी शक्य तेथे कापडाचा करण्यात येणारा उपयोग, शाडू मातीच्या गणेशमूर्तींची खरेदी आदी उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी शाडूमातीच्या सुबक मूर्तीही उपलब्ध आहेत. काही मूर्ती तयार करतानाच त्यामध्ये झाडांच्या बिया मिश्र‌ीत करण्यात आल्या असून, बादलीत गणेशविसर्जन केल्यानंतर त्या मातीतून पुन्हा नव्याने अंकुरणार आहेत. त्यामुळे अशा ‘अंकुर गणेश’ मूर्तींनाही मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठराशे ग्राहकांशी महावितरणचा ‘संवाद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरण कंपनीतर्फे नाशिक शहर विभाग दोन, तसेच नाशिक ग्रामीण विभागात आयोजित ग्राहक तक्रार निवारण व संवाद मेळाव्यांना वीजग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला. गेल्या तीन दिवसांत झालेल्या या मेळाव्यांचा जवळपास १८०० वीजग्राहकांनी लाभ घेतला. शहर विभागातील बिलांबाबतच्या ४५, तांत्रिक ७८, तर इतर १४ तक्रारींचे निवारण या मेळाव्यातून करण्यात आले.

नाशिक परिमंडलात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीजग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण व संवाददिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यांअंतर्गत

१५०० नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली असून, आणखी दोन हजार ग्राहकांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नाशिक शहर विभाग दोनमधील शिखरेवाडी उपविभाग, नाशिकरोड उपविभागातील लहवित, नायगाव आणि नानेगाव येथे स्वतंत्रपणे आयोजित ग्राहक मेळाव्यात १८६ वीजग्राहक सहभागी झाले. बिलांबाबतच्या ४५, तांत्रिक ७८, तर इतर १४ तक्रारींचे निवारण या मेळाव्यातून करण्यात आले.

नाशिक ग्रामीण विभागातील ननाशी, उमराळे, पेठ आणि गोंदे येथे स्वतंत्रपणे आयोजित ग्राहक मेळाव्यात नवीन वीज जोडणीसाठी साडेतीन हजारपेक्षा अधिक अर्ज आले होते. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नवीन ग्राहकांना दोनशे रुपयांमध्ये वीज जोडणी देण्यात येत असल्याने नवीन जोडणीसाठी अर्जांची संख्या अधिक आहे. यातील १४५० नागरिकांना तात्काळ जागेवर वीज मीटर देऊन वीज जोडणी देण्यात आली. उर्वरित अर्जांवर वीज जोडणी देण्याची कार्यवाही सुरू आहे. बिलांसंदर्भातील ३५ व इतर २३ तक्रारींचेही या मेळाव्यांतून निवारण करण्यात आले.

--

सोमवारी पुन्हा आयोजन

नाशिक शहर विभाग एक पंचवटी, सातपूर, भद्रकाली आणि सिडको उपविभागातील ग्राहकांसाठी येत्या सोमवारी (दि. २८) ग्राहक तक्रार निवारण व संवाददिन आयोजित करण्यात येणार आहे. मालेगाव विभाग, इगतपुरी उपविभागातील टाकेद येथेही याच दिवशी मेळावा घेण्यात येईल. या मेळाव्यात सहभागी होऊन तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी वीजग्राहकांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवासिनींकडून ‌हरितालिका पूजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भाद्रपद शुद्ध तृतीयेला येणारे हरतालिकेचे व्रत महिला, मुलींनी करत मनोभावे भगवान शंकराची पूजा केली. ‘हर’ म्हणजे शंकराची आराधना करुन सुवासिनींनी गुरुवारी हरितालिका पूजेचे व्रत केले. या व्रतामुळेच पार्वतीला भगवान शंकर प्राप्त झाले होते. या आख्यायिकेनुसार अविवाहित मुलीही चांगला वर मिळावा यासाठी तर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात.
जरीची साडी, केसात माळलेला गजरा, पूजेचे साहित्य घेऊन पारंपरिक पद्धतीने सुवासिनी, मुलींनी पहाटे साडे पाच सहा वाजेपासून शंकराच्या मंदिरात गर्दी केली होती. कपालेश्वर मंदिरात वर्षानुवर्षे या पूजेसाठी दुरुन येऊन हरतालिकेचे व्रत महिलांनी केले. हिरव्या बांगड्या, खारीक सुपारी, बदाम, फळं, फुलं, पत्री असे पूजेचे साहित्य घेऊन अखंड सौभाग्यवतीचे मागणे त्यांनी यावेळी मागितले. मंदिरांमध्ये शिवपार्वतीच्या मंत्रांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. पुरोहितांनी व्रतामागील संकल्पना समजावून सांगत या व्रताचे स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले. रात्री जागरण करुन आरती, भक्तीसंगीत म्हणण्यात आले. आज दहीभाताचा नैवेद्य दाखवून उत्तरपूजा केली जाणार आहे.
उपनगरांमध्ये उत्साह
पंचवटी, सातपूर-अंबड, ना‌शिकरोड, जेलरोड, भगूर, देवळाली, आडगाव, सिडको, इंदिरानगर आदी सर्व उपनगरांमध्ये असलेल्या सर्व ‌ शिवमंदिरांमध्ये महिलांनी हरतालिका साजरी केली. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्रांसह विविध वनस्पती, पाने फुले अर्पण करून मंत्रोच्चारात पूजा करण्यात आली. देवळालीच्या विविध शिवमंदिरांसह रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिर, भैरवनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिर येथे असंख्य महिलांनी हरतालिका तृतीया हे व्रत केले. या व्रतादरम्यान वाळूचे शिवलिंग बनवून बेल, शमी, तुळशीची पाने व मंजिरी, तर धोतऱ्याचे फुल वाहण्याची परंपरा आहे.तर पार्वतीसाठी बांगड्यांचा चुडा,मेहंदी,सौभाग्य कुंकू,कंगवा आदी साहित्य वाहण्यात येते. भगूरच्या देवी मंदिरातही पूजा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीने लांबविले एक लाख रुपये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा बस स्थानकासमोरील महात्मा फुले चौकातील निकीता लेडीज आर्टिकल्स या दुकानात खरेदीसाठी आलेल्या युवतीच्या बॅगेमधून दुसऱ्या एका तरुणीने तब्बल एक लाख रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. मात्र सदर चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. संबंधित तरुणीने तिच्या सोबत असलेल्या लहान मुलांच्या माध्यमातून ही चोरी केल्याचे उघडकीस झाले आहे.

तालुक्यातील चौंधाणे येथील शेतकरी किशोर मोरे यांना कांदा विक्रीचे पैसे खात्यात वर्ग झाल्याचा संदेश मोबाइलवर मिळाला. त्यांनी सटाणा कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत असणारी आपली मुलगी माधुरी हिच्याकडे सटाणा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा धनादेश दिला होता. माधुरी हिने बँकेत जावून एक लाख रुपये काढले. तेथून ती खरेदीसाठी निकीता लेडीज आर्टिकल्स या दुकानात आली. तिच्यासोबत तिच्या काकू होत्या. त्या दोघेही लेडीज आर्टिकल खरेदीमध्ये गुंग झाल्याचा फायदा घेत दुकानात खरेदीचा बहाणा करून १८ ते २० वयाच्या युवतीने बॅग कापून एक लाख रुपये हातोहात लंपास केले. सीसीटीव्हीत सदर युवतीसोबत लहान मुलगा असल्याचेही स्पष्ट दिसत आहे. सदरील पैसे युवतीने त्याच्याकडे देताच तो दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर संबंधित तरुणीने ५०० रुपयांची नोट देवून दुकानादारकडून १० रुपयांची पिन खरेदी केली. मात्र दुकानादारांने सुट्टे नसल्याचे सांगताच संबंधित युवतीने दुकानातून काढता पाय घेतला. तरुणी दुकानातून निघाल्यावर चोरीचा प्रकार उघकीस आला आहे. सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी गटार योजना दोन वर्षांत मार्गी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

पालिका निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार भूयारी गटारींचा प्रश्न मार्गी लावणार असून, या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन वर्षांत शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करू, असा आशावाद नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष मोरे बोलत होते. मोरे म्हणाले, शहरवासियांना दरडोई १३५ लीटर पिण्याचे पाणी पुरविण्याची क्षमता ज्या पालिकांकडे असेल त्यांनाच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करता येतो. पालिकेने पुनद पाणी योजना मंजूर करून घेतल्याने शासनाची दरडोई १३५ लीटर पिण्याचे पाणी पुरविण्याची अट पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रकल्प अहवाल तयार करण्यातील प्रमुख अडसर दूर झाल्याने आता भुयारी गटांरीचे स्वप्न साकार होणार आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने ई-निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार येथील अजिंक्यतारा कन्सल्टंन्स यांना प्रकल्प तयार करण्याचे काम देण्यात आल आहे. अहवाल तयार झाल्यानंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

दहा टक्के लोकवर्गणी

भुयारी गटार, मैला व सांडपाणी प्रक्रिया करण्याकामी तसेच सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. ५० टक्के केंद्र ४० टक्के राज्य शासन व १० टक्के निधी लोकवर्गणीच्या माध्यमातून पालिका भरणार आहे. या वेळी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावजयीचा खून करून द‌िराची आत्महत्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मेरी रासबिहारी लिंकरोडवरील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये सख्ख्या द‌िराने आपल्या भावजयीची दोरीने गळा आवळून खून केला आणि स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बुधवारी (दि. २३) रात्री बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भावजय प्रियासिंग विकासकुमार शर्मा (वय २७) व त्यांचा दीर श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा (वय २५) अशी घटनेतील मृत झालेल्यांची नावे आहेत. मेरी रासबिहारी लिंकरोडवरील लक्ष्मी रेसिडन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर एक वर्षभरापासून नालंदा-गया (बिहार) येथील विकासकुमार शर्मा त्यांच्या पत्नी प्रियासिंग यांच्यासोबत राहत होते. प्रियासिंग यांचे पती विकासकुमार हे एका खासगी कंपनीत काम करीत असून, ते कामानिमित्ताने नवापूर येथे गेले होते. बुधवारी रात्री एकच्या सुमारास ते घरी आले, त्यांनी आवाज देऊनही बराच वेळ दरवाजा उघडला गेला नाही. शेजारचे पांडे नावाच्या व्यक्तीच्या मदतीने त्यांनी धक्का देऊन दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना बेडरुममध्ये खाली पडलेली प्रियासिंग मृतावस्थेत दिसली. तर भाऊ श्रीरामकुमार हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डाक्टरांनी त्यांना मृत घोष‌ित केले.


पोलिसांच्या मोटर विभागात चोरी

नाशिक ः शहर पोलिसांच्या मोटार विभागात दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या वाहनांचे तब्बल २६ हजार ३०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चारही बाजूने बंदिस्त असलेल्या आणि पोलिसांचीच वर्दळ असलेल्या मोटार विभागात चोरीची घटना घडल्याने पोलिस देखील चक्रावले आहेत. यामुळे पोलिस मुख्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसतो.

मोटार वाहन विभागातील साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ ते २४ मे दरम्यान चोरट्यांनी वीज तांत्रीक विभागाचे कुलूप तोडून दोन बॅटऱ्या व मोटार वाहन विभागात दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या वाहनांची बॅटरी व रेड‌िएटर असा सुमारे २६ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरी झाला. सतत पोलिसांची वर्दळ असलेल्या पोलिस मुख्यालयातच चोरट्यांनी हात साफ केला असून, यामुळे मुख्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखीत झाला आहे.

सिग्नलची बॅटरी चोरीस

सिग्नल यंत्रणेस बसविण्यात आलेले इन्व्हटर्स आणि बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना कॅनडा कॉर्नर सिग्नल येथे घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.नितीन रघुनाथ धामणे (रा.गोविंदनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. सुमारे १८ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.

दुुकान फोडून चोरी

वडाळा नाका परिसरातील कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ९८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दीपक भुलचंद सोनेसर (रा. गुरूगोविंद कॉलेज शेजारी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडाळा रोडवरील आठवण लॉन्स भागातील हरिस्नेह इमारतीत रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री दुकानातील रेडिमेड कपडे व लॅपटॉप असा सुमारे ९८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

पाथर्डीरोडवर चेन स्नॅचिंग

सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र दुचाकीवरील चोरट्यांनी चोरून धूम ठोकली. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील शिवकॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी वैशाली सुनील निकुंभ (रा.शिवकॉलनी, एलआयसी कॉलनी समोर) यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक लढविणारच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या पंधरा वर्षांत तालुका रसातळाला गेला असून, आगामी विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मी निर्धार केला आहे. पदाची अपेक्षा मी करीत नाही. आजही माझ्यासोबत स्वाभिमानी व प्रामाणिक कार्यकर्ते असून, या कार्यकर्त्यांसाठी मला निवडणूक लढवायची असल्याचे सांगत भाजप नेते डॉ अद्वय हिरे यांनी सांगत लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे.

हिरे यांनी आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती अनिल तेजा, सदस्य अरुण पाटील उपस्थित होते. डॉ अद्वय हिरे यांनी यावेळी बुधवारी तालुक्यातील निमगाव येथे अद्वय हिरे मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्नेहमिलन मेळाव्यात याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हिरे म्हणाले, आजवर अनेक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊन मोठे केले. मात्र यातील काहींनी वैयक्तिक लोभापायी इमान विकले. मात्र प्रामाणिक व स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढणार आहे. तसेच ज्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आमच्या सोबत राहायचे असेल त्यांनी राहावे अन्यथा आपली वेगळी वाट निवडावी, असा इशारा देखील दिला. यावेळी पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष निवडणूक लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. उमेदवारी मिळाली नाही तरी मी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भुसेंमुळे तालुक्याचा विकास खुंटला

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मरण आणि तोरणाला जाणे हे आमदार लोकप्रतिनिधीचे काम नाही. मंत्री महोदयांनी विकासाच्या कामांना प्राधान्य दिले नाही म्हणून तालुक्याचा विकास खुंटला असल्याचा आरोप हिरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भुजबळांबरोबरचा संघर्ष थांबला

गेल्या निवडणुकीत जरी नांदगाव मतदार संघात पंकज भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी त्यांच्याशी माझा वैयक्तिक संघर्ष नाही. राजकीय संघर्ष देखील थांबला आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारपेठेत चैतन्याचा दरवळ

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

बाप्पांच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्याचा दरवळ पसरला असून, आज होणाऱ्या प्रतिष्ठापनेसाठी अनेकविध अगरबत्त्या, रंगीत वाती, पाट, चौरंग आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या २१ भाज्या आदींना वाढती मागणी असल्याचे दिसून येत आहे. पूजा साहित्याचे दर गतवर्षीच्या तुलनेने वाढले असले, तरीही त्यातील वैविध्य भाविकांना आकर्षित करीत आहे.

मखर, रोषणाई यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज गणराय घरोघरी विराजमान होत आहेत. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजींचे ‘बुकिंग’ही झाले असून, पूजा साहित्य खरेदीची लगबग बाजारात सुरू आहे. गणेशोत्सवात २१ भाज्यांच्या नैवेद्याचे मोठे महत्त्व असल्याने भोपळा, मेथी, गवार, भेंडी, दोडके, गिलके, कारले यांसारख्या २१ एकत्रित भाज्या १५ ते २० रुपये पावशेर अशा दराने उपलब्ध असून, भाविकांकडून त्यांना मोठी मागणी दिसून येत आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदा पूजा साहित्याच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे, तसेच गोल्ड प्लेटेड दिवे, रंगीत माळा, गणपती-गौरींचे मुकुट, आरतीचे तबक अशा डिझायनर वस्तूंच्या किमतीतही ४५ ते ५० टक्के वाढ झाली आहे. मात्र, तरीही असे साहित्य खरेदी करण्याकडे भाविकांचा कल दिसून येत आहे. गणरायांच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक असणाऱ्या बदाम, खारीक, मध, अष्टगंध, धूप, वाती, हळकुंड, अत्तर अशा अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांमुळे बाजारपेठा ओसंडल्या आहेत.

--

लाँग अगरबत्ती अन् सुगंधी वाती

अगरबत्त्यांचे तर शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. मोगरा, जाई, जुई, गुलाब, केशर अशा सुवासिक अगरबत्त्यांसह १२ ते ३० तास चालणाऱ्या लाँग अगरबत्तीला यंदा पसंती मिळत असून, विविध मंडळांसह नागरिकांकडून या अगरबत्तीची मागणी होत असल्याचे व्यावसायिक प्रशांत पाटील यांनी सांगितले. साध्या वातींच्या स्पर्धेत आता सुवासिक आणि रंगीत वातींनीही स्थान पटकावले आहे. पूजेचे ताह्मण, आरतीचे तबक, रंगीत दिवे, गौरींसाठी ओटीचे ताट अशा डिझायनर साहित्यालाही भक्तांची मागणी आहे. त्यामुळे अशा साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.

--

पाट, चौरंगाचा थाट

बाप्पांची मूर्ती घरी आणण्यापासून मखरात प्रतिष्ठापना होईपर्यंत पाटाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. गणरायांच्या विसर्जनालाही पाटावरच मूर्ती नेली जाते. त्यामुळे वैविध्यपूर्ण पाट आणि चौरंगही यंदा बाजारात दाखल झालेले असून, लाल आणि केशरी या पारंपरिक पाटांसह सोनेरी, चंदेरी अशा गोल्ड प्लेटेड पाटांना मोठी मागणी आहे. साधारण २०० रुपयांपासून असे डिझायनर पाट व चौरंग उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रोक्त गणेशपूजा नेटिझन्सकडून व्हायरल

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

आजकाल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेला प्रत्येेक जण आपल्याकडे असलेली चांगली माहिती आपापल्या ग्रुपवर फॉरवर्ड करताना दिसतो. सण, उत्सवातदेखील असा प्रकार होताना दिसतो. आता बाप्पांच्या स्वागतासाठीही नेटिझन्स सरसावले असून, गणरायांच्या प्रतिष्ठापनेची शास्त्रोक्त पद्धतीची पूजा विविध ग्रुप्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.

गणरायाची प्रतिष्ठापना गुरुजींकडूनच करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अनेक जण घरच्या घरीच बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याला प्राधान्य देतात. अशा गणेशभक्तांसाठी सध्या व्हायरल होत असलेली गणेशपूजा उपयुक्त ठरणारी आहे. अशा शेअर झालेल्या पूजेेच्या आधारेच प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शास्त्रोक्त पद्धतीवरही भर दिला जात आहे.

सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली गणेशपूजा ही योग्य असल्याचे मला वाटते. शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केलेला असल्याने त्यात काही गैर काही नाही. परंतु, अशा पद्धतीने प्रतिष्ठापना करताना पूजा सोवळ्यातच व्हायला हवी.

- शशांक कुलकर्णी, पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश स्थापनेला दिवसभराचा मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बाप्पाच्या आगमनाचे बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच वेध लागले आहेत. यंदा गणेश चतुर्थी दिवसभर असल्याने ब्राह्म मुहूर्तापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत गणेशाची स्थापना करता येणार आहे. शक्यतो सकाळी अकरा वाजेच्या आत प्रतिष्ठापना व्हावी, असा संकेत रूढ आहे. त्याप्रमाणे नियोजन करावे, असे मत गुरूजींनी व्यक्त केले.

गेल्या वर्षी बाप्पाला लवकर येण्याची आळवणी केल्याप्रमाणे यंदा बाप्पाचे लवकर आगमन होत आहे. गेल्या वर्षी पाच सप्टेंबरला बाप्पांचे आगमन झाले होते, तर यंदा पाच सप्टेंबर रोजी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दहा दिवसांत आपल्या घरी ज्या ‘श्रीं’ची स्थापना करायची असते, त्या शाडूच्या गणेशमूर्तीची उंची ९ ते १० इंचच असावी. त्याचप्रमाणे ही गणेशमूर्ती निवडतानासुद्धा अथर्वशीर्षात वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी. यावेळेस पार्थिव गणेशपूजनाची व गणेशस्थापनेची श्रीगणेश चतुर्थी गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी आहे. ब्राह्म मुहूर्तापासून सूर्यास्तापर्यंत अर्थात पहाटे साडेचारपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रींची प्रतिष्ठापना करावी.

अशी आणावी मूर्ती

घरच्या प्रमुख व्यक्तीने आदल्या दिवशीच गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानाच एक तबक, गुलाल, जानवे व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी. जानवे शेजारी ठेवावे व त्यावर रुमाल झाकावा व आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.

ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पहाटेच उठावे. स्नान उरकून अत्यंत शूचिर्भूत व्हावे. सोवळे, कद, नवीन धोतर नेसावे. कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. घरच्या देवांची पूजा करावी. त्यानंतर श्रींची प्राणप्रतिष्ठा करावी. घरी आलेल्या देवाला पंचामृत स्नान घालून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. एकवीस दूर्वांच्या २१ जुड्यांचा हार गळ्यात घालावा. लाल रंगाच्या फुलांचा हार गळ्यात घालावा. मग गणेशाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य व २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. घरातील सर्वांनी मिळून भक्तिपूर्वक श्रींची आरती करावी. संपूर्ण दहा दिवस श्रींची नैवेद्यारती सकाळ- संध्याकाळ करावी. जमले तर रोज सकाळी अथर्वशीर्ष म्हणावे, अशी माहिती अमोल किरपेकर गुरूजी यांनी दिली.

श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त

आज, २५ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. सूर्योदयापासून रात्री ८.२९ पर्यंत गणेशस्थापना करता येईल. भद्रा प्रारंभ शुक्रवारपासूनच सकाळी ८.२६ ते रात्री ८.२९ पर्यंत आहे. श्री गणेश स्थापनेसाठी भद्रेचा निषेध नाही. त्यामुळे भद्रा काळात गणेशस्थापना करण्यास काहीही हरकत नाही. गणेशस्थापना सूर्योदयापासून रात्री ८.२९ पर्यंत आपल्या कुलाचाराप्रमाणे करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमभंग केल्यामुळे सदस्यत्व रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा.

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर पंचायत समिती गणाच्या विद्यमान सदस्या केदूबाई राजू सोनवणे, तर बाभुळणे गावाच्या सरपंच रेखा अहिरे या दोघांवर सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थावर निवडून येणाऱ्या सदस्यांने तत्काळ नोकरीतून पदमुक्त व्हावे. अन्यथा लोकप्रतिनिधीत्व पदाचा राजीनामा द्यावा लागतो.

बागलाण तालुक्यातील एक पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सदस्या केदूबाई राजू सोनवणे या अंगणवाडी सेविका आहेत. तर बाभुळण्याच्या सरपंच रेखा अहिरे या अंगणवाणीत मदतनिस आहेत. या दोघांनी शासनाची दिशाभुल करून स्थानिक स्वराज्य संस्थावर पदाचा उपभोग घेतल्याचे निर्देशानात आले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून दोघा पदाधिकाऱ्यांकडून सदस्यत्वाचा राजीनामा घेतला आहे.

तालुक्यात महिला व एकात्मिक बालविकास योजेंनतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावर अकराशेहून अधिक महिला मानधनावर कार्यरत आहेत. असे असतांना देखील अनेक वर्षांपासून बहुतांश सेविका, मदतनीस यांनी यापूर्वीही पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक लढवून स्थानिक स्वराज्य संस्थावर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पेललेली असल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने शासन नियमांची पायमल्ली करणाऱ्या सेविकांची शोधमोहीम गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व साहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी हाती घेतली आहे. पठावे दिगर गणाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या केदूबाई राजू सोनवणे या अंगणवाडी सेविका पदावर आजही कार्यरत आहेत. तर बाभुळणे सरपंच असलेल्या अंगणवाडी सेविका रेखा अहिरे अंगणवाडी मदतनीस आहेत. या निर्णयामुळे आता पठावे दिवगर आणि बाभुळणे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांद्यासाठी हब निर्माण करणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भारतात होणाऱ्या एकूण कांदा उत्पादनातील ४० टक्के हिस्सा हा नाशिक जिल्ह्याचा आहे. त्यात लासलगाव येथील बाजारपेठ आशिया खंडात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे येथे कांद्यासाठी हब निर्माण केले जाईल. कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत मी निर्बंध घालू देणार नाही. तसे पत्र बुधवारी रात्री पंतप्रधान मोदी यांना पाठवले आहे. मात्र तरीही निर्बंध घालण्याचे प्रयत्न झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह रस्तारोको आंदोलनात मी स्वतः सहभागी होईल, अशी ग्वाही कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पाशा पटेल, आमदार अनिल कदम, बाजार समिती सभापती जयदत्त होळकर उपस्थित होते. नाशिक जिल्हासाठी कांदा साठवणूक चाळीच्या निधीसाठी १५ कोटी २८ लाख रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यात वाढ करण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच सोयाबीनची ३५ लाख मेट्रिक टनाची होणारी आयात कमी करून ती दोन लाख टनावर आणल्याने त्याचा फायदा दरात वाढ होणार आहे,असे त्यांनी सांगितले. यापूर्वी कृषी राज्यमंत्री खोत यांनी चितेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन व संशोधन संस्थेस भेट दिली.

...पण कल्याण करा

सदाभाऊ खोत आता भाजपात जाणार अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी मनोगतात सर्वच पक्ष भाजपात विलीन करून घ्या आणि एका विचाराचा देश करा. पण शेतकऱ्यांचे कल्याण करा अशी कोपरखळी आपल्या मनोगतात मारल्याने खोत यांच्यासह सर्वांच्या चेहऱ्यासह हसू आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागतासाठी सजावट सज्जता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवात सर्वाधिक उधाण येते ते सजावटीला. आपला गणपती इतरांपेक्षा सुंदर कसा दिसेल याकडे सर्वजण लक्ष पुरवितात. त्यासाठी प्रचंड सजावट करतात. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सजावटीचा बाजारही जोरात आहे. चिनी वस्तुंनी यंदाही बाजारपेठ काबीज केली असून स्वस्तातील लायटिंगला सर्वाधिक मागणी आहे.

बाजारात प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचा हार, थर्माकोल आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले मखर, पाट, चौरंग यांची रेलचेल आहे. मखराच्या प्रकारांमध्येही विविधता आहे त्यामुळे ते घेण्यासाठी गर्दी होत आहे. गणपतीसाठी माळ १५ रुपये ते १५० रुपये, शोपीस, झिरमिळ्या ५० ते १५० रुपये, छत्र ५० ते १५० रुपये, चक्र ३० ते ५०० रुपये, विविध रंगी पताका २० रुपयांपासून पुढे, मोरपीस सात रुपये नग, लायटिंग १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत, कागदी फुले २० ते २५ रुपये, तोरण ७० रुपये, चमकीची चादर १५० रुपये असा भाव आहे.

गणराय घरी येणार म्हटल्यावर सजावटीच्या वस्तुंना प्रचंड मागणी असते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नाशिककरांनी घरच्या घरी सजावट करण्यालाही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जाड कार्डशिटपासून तयार केलेले मंदिर स्थापन करण्यावर व पताका लावण्यावर अधिक भर दिसून येत आहे.

पर्यावरणपूरक सजावटीस प्राधान्य
पर्यावरणपूरक गणपतीला विशेषत्वाने स्थान देण्यात येत असल्याने यंदा शाडूच्या मूर्ती घेण्यासाठी बहुतांशी भाविकांनी अग्रक्रमाने स्थान दिले. त्यांनी पर्यावरणपूरक सजावटीस प्राधान्य दिले आहे. सजावटीमध्ये हिरव्या झाडांच्या फांद्यांचा वापर करून डेकोरेशन तयार करण्यात आले आहे. तसेच अनेकांनी गडकिल्ले बनविण्यास प्राधान्य दिले असून गणपतीसाठी विशेषत्त्वाने नैसर्गिक रंग खरेदी करून तेच देण्याकडे कटाक्ष ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बाप्पाचे आगमन होत असताना सार्वजनिक मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून सर्व भक्त बाप्पांच्या आगमानाची आतुरतेने वाट बघत आहे.
शहरातील काही मंडळांचे देखावे पूर्ण झाले आहे. तर काही मंडळाच्या देखाव्यांची रंगरंगोटी सुरू आहे. बी. डी. भालेकर मैदानाजवळील मंडळांनी आपली कामे पूर्ण केली आहे. काही मंडळांचे देखावे लायटिंगचे आहे तर काही चलतचित्र आहे. त्यांनीही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. नाशिकच्या पंचवटी मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिक, रविवारपेठ, अशोकस्तंभ परिसरात कामे पूर्णत्वाकडे आहेत. परंतु, शहराच्या उपनगरांमध्ये पूर्णत्वाचा वेग कमी आहे. नाशिकरोड परिसरातील मंडळानीही गणपतीच्या कामाचा वेग वाढवला आहे. जेलरोड, शिवाजीरोड, सुभाषरोड, देवळालीगाव, अनुराधा थिएटरजवळील गणपती, जयभवानी रोड येथेही मंडप टाकून तयारी पूर्ण झाली आहे. काही मंडळांनी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, काही मंडळाचे देखावे मोठे असल्याने उशिराने उघडण्यात येतील, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

मंडळांमध्ये नाराजी
यंदा पोलिसांनी मांडवाच्या मर्यादा आखून दिल्याने अनेक मंडळांना आपल्या गणेशोत्सव मंडळाच्या मांडवांचा आकार कमी करावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक मंडळानी पोलिसांच्या सूचनेचे पालन करून यंदा मिरवणुकीत डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे असहकार्य
नाशिक महापालिकेने पोलिसांची परवानगी असल्याखेरीज महापालिका परवानगी देणार नसल्याची भूमीका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांकडून परवानगीचा चेंडू महापालिकेकडे टोलवला जात असून महापालिका पोलिसांच्या परवानगीचा आग्रह धरते आहे. त्यामुळे दोघांच्या कचाट्यात कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत स्टॉल्सचा सुळसुळाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
महापालिकेची अधिकृत परवानगी नसतानाही नाशिकरोड मध्ये शेकडो स्टॉल्सधारकांनी गणेशमूर्ती विक्रीची दुकाने बिनदिक्कतपणे थाटली आहेत.
गणेशमूर्ती विक्री स्टॉल्सधारकांना अद्याप वीज कंपनीने अधिकृत वीज जोडणीही दिलेली नाही. मात्र, तरीही यातील बहुसंख्य स्टॉल्सधारकांनी महावितरणलाही अंधारात ठेवून आपल्या स्टॉल्समध्ये उजेडाची ‘सोय’ केली आहे. विशेष म्हणजे एरव्ही वीज बील भरण्यासाठी सामान्य नागरिकांच्या मागे वसुलीचा ससेमिरा लावण्यात पुरुषार्थ गाजवणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारीही या प्रकाराकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे.
शहरात गणेश मूर्ती विक्रीचा स्टॉल्स उभारण्यासाठी दिलेल्या विहित मुदतीत डिपॉझिट न भरल्याने नाशिकरोडमध्ये यंदा एकाही स्टॉल्सधारकाला महापालिकेची अधिकृत परवानगी मिळालेली नाही. महापालिकेची परवानगी नसल्याने शहर वाहतूक पोलिसांनीही या स्टॉल्सधारकांना परवानगी नाकारली. त्यामुळे नाशिकरोड पोलिस ठाण्यातही या स्टॉल्सधारकांना स्टॉल्स लावण्याची परवानगी मिळू शकलेली नाही. असे असले तरी एकट्या जेलरोडवरच सुमारे ८० स्टॉल्स मुख्य रस्त्यावरच उभारण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील इतर भागातही ठिकठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल्स थाटात थाटली आहेत.

अनधिकृत वीज जोडणी
मुळात स्टॉल्सला महापालिकेची परवानगी नसल्याने महावितरणनेही स्टॉल्सधारकांना तात्पुरत्या स्वरुपाती अधिकृत वीज जोडणी दिलेली नाही. तरीही बहुतांश स्टॉल्समध्ये विजेचा वापर केल्याचे चित्र शहरात दिसून आले. कित्येक स्टॉल्सधारकांनी आपल्या स्टॉल्समध्ये मोठी रोषणाईही केलेली असल्याचे बुधावरी रात्री दिसून आले.

वाहतूक शाखेची कारवाई
विना परवानगे शहरात गणेश मूर्तीविक्रीची स्टॉल्स थाटलेल्या विक्रेत्यांवर सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईस प्रारंभ केला. यातील बहुसंख्या स्टॉल्सधारकांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. उड्डाणपुलाखाली विनापरवाना थाटात सुरू करण्यात आलेल्या गणेश मूर्ती विक्री स्टॉल्समुळे सकाळपासूनच शिवाजी पुतळा चौकातील वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजा विधीसाठी पुरोहितांना मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गणेशमूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना, पूजा करण्यासाठी पुरोहितांना जोरदार मागणी सध्या शहरात आहे. गणेश चतुर्थीपूर्वीच काही दिवस पुरोहितांची बुकिंग मुख्यतः सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये करण्यात आली आहे.
मुहूर्तातच गणेशपूजा पूर्ण व्हावी यासाठी पुरोहितांना विचारणा होत आहे. मात्र, पुरोहितांची संख्या तुलनेने कमी आणि पूजाविधीसाठी मागणी अधिक अशी परिस्थिती असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. पुरोहितांची नवी पिढी पौराहित्यापेक्षा उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे वळली आहे. त्यामुळे पुरोहितांचे प्रमाण सणउत्सवांच्या काळात मागणीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. मोठमोठी मंडळे, शिक्षणसंस्था आदी ठिकाणी पुरोहितांकडून पूजा करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हीईएस हॅकिंग; दोन जण रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ऑटोमेटिक व्हेइकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरमधील (एव्हीईएस) सिस्टिम हॅक केल्याप्रकरणी दोघे संशयित रडारवर आले आहेत. या दोघांविरोधात काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, संशयितांच्या सहभागाबाबत पोलिसांकडून पुराव्याची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
‘एव्हीईएस’ सिस्टिम हॅक झाल्याप्रकरणी शनिवारी (दि. १९) सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हॅकरने सदर सिस्टिम हॅक करून वाहनांची प्रत्यक्ष तपासणी न करता दोन वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त केले. हॅकिंगची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली होती. १६ ऑगस्ट रोजी वाहन निरीक्षक हेमंत गोविंद हेमाडे सिस्टिम तपासत असताना हॅकिंगचा प्रकार उघड झाला. यानंतर, हेमाडे यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली.

फिटनस सर्टिफिकेट घेण्यासाठी प्रत्यक्ष वाहनाची तपासणी होणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने आरटीओच्या वेबसाइटवरील फिटनेस व्हेरीफिकेशन व अप्रोव्हल येथे हेमाडेंच्या नावे लॉगीन करून दोन वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट मिळवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी लागलीच सिस्मटमसाठी वापरण्यात आलेली हार्डडिस्क जप्त केली. यामुळे हॅकरचा ठावठिकाणा मिळण्याची शक्यता वाढली. काही जणांचे प्रत्यक्ष जबानी नोंदवण्यात येत असून, चौकशीही केली जाते आहे.
याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की या प्रकरणी दोघ व्यक्तींना संशयित म्हणून गणले जाते आहे. त्यांच्याविरोधात काही पुरावे असले तरी त्यांना अटक करण्यासाठी पुराव्यांची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, या दोन व्यक्ती आरटीओ कार्यालयाशी संबंधित आहे की बाहेरचे याविषयी अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३४ उमेदवारांना मेळाव्यात रोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी संयुक्तरिक्त्या घेतलेल्या सिन्नर येथील रोजगार मेळाव्यात ६७४ उमेदवरांनी उपस्थिती नोंदवली. यातील १३४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. मेळाव्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता विकास अभियान राबवण्यात आले. यात विनामूल्य कौशल्य शिक्षण देण्यात आले. रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी ३४३ उमेदवारांनी नोंदणी केली.
उद्योग व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी कर्ज सहाय्य करण्यासाठी विविध महामंडाळे यांचे प्रतिनिधींनी स्टॉल लावून कर्जासाठी मार्गदर्शन केले. यासाठी १५६ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. उद्योग व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी कर्ज सहाय्य करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्ग विकास महामंडळ व अपंग विकास महामंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी स्टॉल उभारत कर्ज सहाय्यक घेऊ इच्छिणाऱ्या १५६ उमेदवारांची नोंदणी करून त्यांना मार्गदर्शन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटातर्फे ‘उत्सवमूर्ती सन्मान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्सव म्हणजे जल्लोष आणि त्यात लाडक्या बाप्पाचा उत्सव म्हटला तर जल्लोषाला सीमाच नसते. गणेशोत्सवात मुख्य आकर्षण असते ते सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्याचे. मंडळाचे कार्यकर्ते दिवस रात्र-एक करून हे देखावे साकरतात. शहरातल्या गणेश मंडळांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्सने यंदाही उत्सवमूर्ती सन्मान हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवात नाशिक ढोलने आपला दबदबा कायम राखला आहे. सर्वांगसुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मांगल्यपूर्ण वातावरणात बाप्पाची पूजा, रंजक आणि प्रबोधन करणारे देखावे करून सार्वजनिक मंडळे या उत्सवाची शान वाढवितात. त्यामुळे आपले वैशिष्ट्य जपण्यासाठी मंडळांचाही खास प्रयत्न असतो. सार्वजनिक मंडळे, देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडतात तर काही मंडळे प्रबोधनही करतात. अनेक मंडळे पर्यावरणपूरक देखावे उभारतात. मंडळांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवमूर्ती सन्मान अंतर्गत मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्वोत्तम सजावट केलेला मंडप, सर्वात सुंदर मूर्ती, पर्यावरणस्नेही मूर्ती अशा विविध गटात ही स्पर्धा होणार आहे.

सहभागासाठी संपर्क
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या फॉर्ममध्ये माहिती भरावी, तो फॉर्म महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात जमा करायचा आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५६६८४२ या क्रमांकावर किंवा www.mtganeshutsav.com वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन मटाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images