Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फ्लॅट नावावर करून देण्यासाठी अपहरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पहिल्या पत्नीच्या नावावर फ्लॅट करून द्यावा, या मागणीसाठी पत्नीच्या भावाने व त्याच्या साथीदाराने मुजाहीद अहमद खान उर्फ मुकेश गुप्ता यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुजाहीद अहमद खान उर्फ मुकेश हरिलाल गुप्ता यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा विवाह रेहाना उर्फ सबाना इजाहार खान हिच्याबरोबर झाला होता. त्यानंतर काही वर्षांतच हे दोघे जण वेगवेगळे राहू लागले. फिर्यादी यांच्या मालकीचे चार फ्लॅट असून, यातील तीन फ्लॅटमध्ये रेहाना व तिच्या नातेवाइकांनी कब्जा केला आहे. फिर्यादीचा पार्क साइट येथे असलेला फ्लॅट रेहानाच्या नावावर करून देण्याची वारंवार मागणी करण्यात येत आहे. फिर्यादी त्यांच्या मित्रासमवेत पांडवनगरी येथे एका दुकानात उभे असतांना अचानक रेहानाचा भाऊ अयूब इजाहार खान याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादीला गाडीवर बसवून सातपूर येथे नेले. तेथेही मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपींच्या लक्षात आले, की फिर्यादीला पकडले त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपल्याला त्रास होईल म्हणून त्यांनी फिर्यादीला दवाखान्यात नेऊन गाडीवरून पडल्याचे सांगण्यास सांगितले. त्याच्यावर दवाखान्यात उपचार झाल्यावर फिर्यादीसह संशयित आरोपी अयूब अंबड पोलिस ठाण्यात आले. तेथे फिर्यादीने विश्वासाने पोलिसांना सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अयूबसह फिर्यादीला इंदिरानगर पोलिस ठाण्यात आणले. त्या वेळी पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार अयूब खान, बबलू खान व त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राडा घालणाऱ्यांना पोलिस कोठडी

पतीसमवेत प्रॉपर्टीसंबंधी सुरू असलेल्या वादात पोलिस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत पोलिस आयुक्तालयात गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या जमावास कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता. रिझवाना खान, रियाज खान, युसूफ खान, शाईस्ता कोकणी, बिस्मिल्ला शेख, शबाना अन्सारी, शहजादी शेख अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.

रेहाना खान हिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रेहानाचे पतीसमवेत मालमत्तेसंबंधी वाद आहेत. तिचा पती सध्या दुसरीकडे राहतो. या प्रकरणी पोलिसांनी मदत करून प्रॉपर्टी मिळवून द्यावी, अशी रेहानासह तिच्या काही नातेवाइकांची मागणी होती. यातूनच रेहानासह तिच्या नातेवाइकांनी शुक्रवारी दुपारी इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलदास भोये यांच्याकडे मदत मागितली. मात्र, सिव्हिल प्रकरण असून, तुम्ही कोर्टात जा, असा सल्ला भोये यांनी दिला. यानंतर सर्वांनी पोलिस आयुक्तालयात पोहोचून तिथे पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धिंगाणा घातला. रेहानाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारवाडा पोलिसांनी सर्वांना अटक करून त्यांच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला. सर्व संशयितांना आज कोर्टात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना-भाजपचा याराना!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपासून विळ्या-भोपळ्याचे नाते निभावणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये जिल्हा नियोजन समिती निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा मनोमीलन सुरू झाले आहे. जिल्हा नियोजनाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी एकमेकांच्या दारी जाऊन तब्बल ४० पैकी ३३ जागा बिनविरोध केल्या आहेत.

दररोज एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या नाशिकमधील या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील याराना या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा फुलू लागल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आतापर्यंत आपली ताकद दाखविण्याची भाषा वापरणाऱ्या दोन्ही पक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमधील नेत्यांचा दिवस हा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही. विधानसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा देत आपली ताकद वाढविण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे राज्यात शिवसेना सत्तेत असली, तरी विरोधकांची स्पेस घेऊन राजकारण करीत आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र ताकद आजमावली. महापालिकेत भाजप, तर जिल्हा परिषदेत शिवसेना सत्तेत आली. जिल्हा परिषदेत तर शिवसेनेने भाजपची मदत सोडून काँग्रेसची साथ केली. त्यामुळे या पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये वैर निर्माण होऊन नेते व कार्यकर्ते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता दोन्ही पक्ष जिल्ह्यात एकत्र येणार नाहीत, अशीच शक्यता होती.

परंतु, जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना व भाजपमधील नेत्यांमधील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ पुन्हा फुलली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा नियोजन समिती बिनविरोध करण्यासाठी पुन्हा दिलजमाई केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या ४० पैकी ३३ जागा बिनविरोध करण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना यश आले आहे.

महापालिकेत युती नसली, तरी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मात्र दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मतभेद आणि वाद विसरून एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे ताकदवान असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनमध्ये तळ ठोकून बिनविरोधचा तह केला. नाशिक आणि मालेगाव महापालिकेतील एकूण १४ जागांसाठी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित येऊन १४ पैकी सात जागा बिनविरोध केल्या. जिल्हा परिषद व नगर परिषदेतही हाच फॉर्म्युल्या वापरण्यात आला. शिवसेनेने भाजपशी तह करून महापालिका व जिल्हा परिषदेत आपली ताकद वाढवून घेतली आहे. महापालिकेसाठी २४ मतांचा कोटा असताना शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले आहेत.


कार्यकर्ते मात्र संभ्रमात

दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे संबंध पुन्हा फुलल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयात अर्ज माघारीच्या दिवशी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सभागृह नेते दिनकर पाटील, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी एकत्रित येऊन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची मनधरणी करीत माघारी करवून घेतल्या. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध घडवून आणल्याने पदाधिकाऱ्यांमधील याराण्याचा परिणाम मात्र कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होणार असून, कोणासाठी भांडावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतून निघाला अन् पिंजऱ्यात अडकला

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेली बिबट्याची मादी सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे.

शिंगवे येथे शांताराम वाघ हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराजवळच विहीर आहे. शनिवारी सकाळी वाघ हे आपल्या शेतात गेले होते तेव्हा त्यांनी शेतातील विहिरीत डोकावून पहिले असता विहिरीत बिबट्या पडलेला दिसला. याबात त्यांनी येवला वन विभागाला कळव‌िले. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, मनमाडचे वनपाल पी. एस. पाटील, वनरक्षक विजय टेकणर आदींचे पथक शिंगवे येथे दाखल झाले. विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे बिबट्या विहिरीच्या कडेला पाइपचा आधार घेवून बसलेला होता.

वन विभागाच्या पथकाने विहिरीत दोरखंडाच्या साहाय्याने पिंजरा सोडला. त्यानंतर बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभरात माळढोकचे सर्वेक्षण

0
0

नाशिक : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकचे (ग्रेट इंडियन बस्टर्ड) राज्यभरात सर्वेक्षण केले जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला असून, डेहराडूनच्या वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

शेतकऱ्यांचा मित्र आणि देखणा प्राणी म्हणून ओळख असलेल्या माळढोक पक्षाची संख्या नगण्य झाली आहे. आवश्यक कुरण नष्ट होणे, भक्ष्य न मिळणे तसेच मानवी हस्तक्षेप होणे यामुळे माळढोक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन सोसायटीने (आययूसीएन) जाहीर केले. त्यामुळेच माळढोकचा समावेश लालयादीत करण्यात आला. या पक्ष्याचे भारतातील अस्तित्व रहावे, त्यात वाढ व्हावी यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने एका विशेष कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार माळढोक संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर येथील माळढोकचा अधिवास पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. राज्याचा वनविभाग आणि डेहराडूनच्या वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूएलआयआय) यांच्यावतीने आता माळढोकच्या सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. येत्या २५ सप्टेंबरपासून हे सर्वेक्षण होणार असून, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. १५ चौरस किलोमीटर अंतर असलेला एक भाग अशा एकूण २८० भागांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचे नियोजन डब्ल्यूएलआयआयने केले आहे. राज्यभरात ६० हजाराहून अधिक चौरस किलोमीटर क्षेत्रात हे सर्वेक्षण होणार आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक पातळीवर राज्यात प्रथमच असे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली. या सर्वेक्षणासाठी काही स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.

ओझरखेड आणि माळढोक

नाशिक, निफाड आणि दिंडोरी या तीन तालुक्यांशी संबंधित असलेल्या ओझरखेड धरणाच्या परिसरात २००७च्या सुमारास माळढोक दिसल्याच्या नोंदी आहेत. नाशिक जिल्ह्यातील माळढोकच्या स्पॉटिंगचा (अस्तित्त्व) अहवाल तत्कालीन उपवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी वनविभागाला सादर केला होता. त्यानंतर केंद्राच्या योजनेनुसार माळढोकसाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार ओझरखेड धरण परिसरातील ५०० एकरची जागा विशेष संरक्षित करण्यात आली. त्यासाठी या भागाला कुंपण करण्यात आले. तेथील गवती कुरण टिकविणे, त्यात वाढ करणे, नियंत्रित वातावरण तयार करणे, अंडी राखण आणि उबवण केंद्र स्थापन करणे ही कामे करण्यात आली आहेत.

एचएएलमुळे धोका

ओझरखेड धरण परिसरात ओझर येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा लढाऊ विमाने तयार करण्याचा प्रकल्प आहे. या विमानांच्या निर्मितीत विविध चाचण्या घ्यावा लागतात. त्यासाठीच या परिसरात एअरस्ट्रीप (हवाई उड्डाण कार्यक्षेत्र) निश्चित करण्यात आली आहे. माळढोकच्या परिसरातील ही एअर स्ट्रीपच त्यांचे अस्तित्व नष्ट करणारी असल्याचा अहवाल नाशिक वनविभागाने तयार केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणचा गलथान कारभार काही थांबेना

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सध्या इंदिरानगर परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. इंदिरानगर परिसरात महावितरण कंपनीचे लक्षच नसल्याचे सध्या प्रकर्षाने दिसत असून, या भागातील विद्युत डीपी या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.

इंदिरानगर परिसरात अनेक ठिकाणी डीपी उघड्या अवस्थेत दिसत आहेत. तसेच त्यापासून नागरिकांना शॉक लागण्याचाही धोका उद्भवू शकतो. तरी महावितरणने याकडे तातडीने लक्ष देत त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

इंदिरानगर भागात मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले असून, कधीही कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित होत आहे. या धोकादायक डीपींच्या प्रश्नाबाबत लवकरच परिसरातील नगरसेवक व नागरिक हे महावितरण कंपनीला जाब विचारणार आहेत. नागरिकांच्या जिवाशी हा खेळ सुरू आहे.

तक्रारीनंतरही 'जैसे थे'

या परिसरातील अनेक विद्युत डीपी या जून्या झाल्याने त्या धोकादायक असून, याबाबत महावितरणला वारंवार तक्रार करूनही काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इंदिरानगर येथील कलानगर भागात साई चैतन्य रो-हाऊससमोर असलेली विद्युत डीपी ही धोकादायक बनली आहे. ही डीपी पूर्णपणे जूनी झाली असून ती एका घराच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. त्यामुळे घरात ये-जा करताना या डीपीचा धक्का लागून मोठा अपघातही होवू शकतो. त्याचबरोबर इंदिरानगर भागातील अनेक डीपी या गंजून गेल्याने त्यांचे पत्रेसुद्धा चोरीस गेले आहेत. परिसरातील डीपी या उघड्याच असून, याबाबत महावितरणने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर समित्यांच्या दारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमधील विसंवादावरून पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्यानंतर पदाधिकारी आता नगरसेवकांच्या ‘मन की बात’ ऐकणार आहेत. महापौर, उपमहापौर, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती व गटनेता असे पाच पदाधिकारी सोमवारपासून विषय समित्यांसह प्रभाग समित्यांच्या दारी जाऊन नगरसेवकांचे प्रश्न व समस्या ऐकून घेणार आहेत.

सोमवारी महिला व बालकल्याणसह तीनही विषय समित्यांमधील नगरसेवकांची भेट पदाधिकारी घेणार आहेत. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमुळे भाजपची बदनामी होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात भाजप कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेतील कारभाराविषयी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देत कारभार सुधारण्याची तंबी दिली होती. कारभारात एकवाक्यता ठेवण्यासह नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून आता महापौर रंजना भानसी यांच्यासह उपहामहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, गटनेते संभाजी मोरुस्कर हे सहा प्रभाग समित्यांसह महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती, विधी व आरोग्य समिती, शहर सुधार समित्यांना भेटी देऊन सभापती व सदस्यांशी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेणार आहेत.


तीन दिवसांचा दौरा असा

सोमवारी विधी, शहर सुधार आणि आरोग्य समित्यांच्या सभापती व सदस्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. दि. १२ व १३ सप्टेंबरला सहा प्रभाग समित्यांचे सभापती आणि सदस्यांशी चर्चा करून तेथील परिस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. १२ सप्टेंबर रोजी सकाळी सातपूर प्रभाग समिती, त्यानंतर सिडको व नाशिकरोड प्रभाग समित्यांना पदाधिकारी भेटी देऊन आढावा बैठक व नगरसेवकांशी वन टू वन चर्चा करणार आहेत. १३ सप्टेंबर रोजी पूर्व प्रभाग समिती, पश्‍चिम व पंचवटी प्रभाग समितीची भेट घेऊन नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. प्रभाग समित्यांचे प्रश्‍न व तेथील समस्या काय आहेत आणि कोणती विकासकामे प्रलंबित आहेत याबाबतची माहिती घेऊन पदाधिकारी विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारभार सुधारण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या या संवादयात्रेचा किती फायदा होतो, हे या दौऱ्यांनंतरच समजणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी थेट गोदावरीत

0
0

आनंदवली भागातील पावसाळी पाइपलाइनद्वारे नद्या प्रदूषित

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेने सांडपाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करत ड्रेनेजच्या पाइपलाइन टाकल्या आहेत. परंतु, असे असतानाही पावसाळी पाइपलाइनमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याने गोदावरी व नंदिनी नदी प्रदूषित होत असल्याचे चित्र दिसत आहे. येथील महादेव मंदिराजवळील पाइपलाइनद्वारे सांडपाणी थेट गोदावरी नदीत मिसळत आहे. या नदी प्रदूषणाला कोण लगाम लावणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शहरातील आनंदवली भागात असलेल्या पावसाळी पाइपलाइनीत काहींनी सांडपाणी सोडले आहेत. हे सांडपाणी थेट गोदावरी, नंदिनी नदीत जात असल्याने नद्या प्रदूषित होत आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्यावेळच्या सातपूर प्रभाग बैठकीत नगरसेवक संतोष गायकवाड यांनी गोदावरी नदी किनारी असलेल्या महादेव मंदिरात सांडपाणी थेट मंदिरात जात असल्याचे सांगितले होते. परंतु, मंदिरासह गोदावरीतही सांडपाणी मिसळत असल्याने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेवक गायकवाड यांनी केली आहे.

सांडपाण्याबाबत महापालिकेच्या सर्वच विभागांना माहिती दिली होती. परंतु, असे असतानादेखील आजही गोदावरीत सांडपाणी मिसळत असल्याने गोदावरी प्रदूषित होत आहे. तसेच महादेव मंदिरात सांडपाणी जात असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

संतोष गायकवाड, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भकांसाठी व्हेंटिलेटर्स बसवू

0
0

बालमृत्यू प्रकरणानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सरकारी हॉ‌स्प‌टिल्समधील नवजात अर्भक विशेष दक्षता कक्षांमध्ये व्हेंटिलेटर्सची सुविधा नाही. परंतु, गरज भासल्यास लवकरच राज्य सरकार सर्व सरकारी हॉस्प‌टिल्समध्ये नवजात अर्भकांसाठीचे व्हेंटिलेटर्स (पेडियाट्रिक्स व्हेंटिलेटर्स) उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिली. येथील सिव्हिल हॉस्प‌टिलमध्ये महिनाभरात आणखी सात इन्क्युबेटर्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र टाइम्सने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेव्दारे एकेका इन्क्युबेटर्समध्ये चार अर्भके ठेवली जात असल्याचा तसेच, नवजात अर्भक विशेष दक्षता कक्षात व्हेंटिलेटर्स नसल्याची बाब उजेडा आणली. सिव्हिल हॉस्प‌टिलमधील स्पेशल न्युबॉर्न केअर युनिटमध्ये ऑगस्ट महिन्यात ५५ अर्भके दगावली. यापूर्वीही अनेक अर्भक दगावल्याची राज्य सरकारने दखल घेतली आहे. सावंत यांचा नियोजित दौरा सोमवारी ११ सप्टेंबर रोजी होणार असला तरी त्यांनी शनिवारीच अचानक सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्पेशल न्युबॉर्न केअर युनिटची त्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार जयंत जाधव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. गुठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

सरकार आणि मी स्वत: देखील बालमृत्यूबाबत अत्यंत संवेदनशील आहे. नवजात अर्भकांच्या या विशेष कक्षाशेजारील एका वॉर्डात आणखी पाच ते सात इन्क्युबेटरची व्यवस्था करण्यात येईल, असे सावंत यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारच्या मानकांमुळे सध्या सरकारी हॉस्प‌टिल्समध्ये नवजात अर्भकांसाठीचे व्हेंटिलेटर्स नाहीत. परंतु, गरज भासल्यास राज्य सरकार सरकारी हॉ‌स्प‌टिल्समध्ये असे व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही यावेळी सावंत यांनी दिली.

जंतुसंसर्गाचेे आव्हान

उपचारांसाठी दोन तीनशे किलोमीटरवरून रुग्ण सरकारी हॉस्पिटल्समध्ये येत असतात. अशा रुग्णांमुळे जंतुसंसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते. एप्रिल-मे महिन्यात स्थलांतरित नागरिक शहरात आल्याने देखील जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढते. म्हणूनच जंतुसंसर्ग कमी करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली. बालमृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याचे निर्देश त्यांनी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

झाडांप्रश्नी तोडगा!

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात अर्भक आण‌ि गर्भवती माता उपचार कक्ष उभारण्यात येणार असून, त्यासाठी २१ कोटींचा निधीदेखील केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या कक्षाची उभारणी ज्या जागेवर करावयाची आहे तेथे १६ झाडे आहेत. ही झाडे तोडण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने महापालिकेकडे अर्ज केला होता. परंतु, हायकोर्टाच्या निर्देशांमुळे झाडे तोडण्यास महापालिकेने मनाई केली. त्यामुळे डिसेंबरपासून या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले होते. या विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री तसेच आरोग्य विभागाच्या सचिवांनी महापालिका आयुक्त अभ‌षिेक कृष्णा यांना सूचना केल्या असून, आठ दिवसांत हा विषय निकाली निघेल अशी माहिती सावंत यांनी दिली.

यंत्रणा कार्यान्वित करा

संदर्भ रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी हॉस्प‌टिल) बंद पडलेल्या यंत्रणा येत्या तीन आठवड्यांत सुरू कराव्यात, असे निर्देश डॉ. सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. नाशिक भेटीवर आलेल्या सावंत यांनी संदर्भ रुग्णालयाचीही पाहणी केली. गरजू रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी यंत्रणा चांगल्यारितीने सुरू राहिल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांवर अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफीचे उपचार होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

कठोर नियमावली बनविणार

बरेचसे रुग्ण अन्य हॉस्प‌टिल्समधून सरकारी हॉस्प‌टिल्समध्ये दाखल होतात. त्यामुळे रुग्णांमध्ये संसर्गाचे प्रमाणही वाढते. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारी तसेच खासगी अशा सर्व हॉस्प‌टिल्ससाठी नियमावली आवश्यक आहे. त्यामुळेच कठोर नियमावली बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नियमावलीची अंमलबजावणी प्रत्येक हॉस्प‌टिल करतेय की नाही याची पाहणी करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी संदर्भ रुग्णालयात दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॉयलर पुन्हा धगधगावा...

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

स्वतःच्या फायद्यासाठी नाशिक साखर कारखान्याची विक्री करून सभासदांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा बँकेचा निषेध करीत कोणत्याही परिस्थितीत नासाकाचा बॉयलर पुन्हा धगधगला पाहिजे, असा ठराव नासाका सभासदांनी शनिवारी केला. नासाका कार्यस्थळी ४५ व ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत उपस्थित सभासदांनी हा ठराव मंजूर केला.

नासाकाला जीवदान देण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करीत असतानाही केवळ कर्जवसुलीसाठी नासाकाची विक्री करण्याची भाषा करणाऱ्यांचे स्वागत नासाकाचे सभासद शेतकरी हातात रुमणे घेऊन करतील, असा खणखणीत इशाराही नासाका सभासदांनी जिल्हा बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

तब्बल चार वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या नासाकाची वार्षिक सर्वसाधारण सभा अशासकीय प्राधिकृत संचालक मंडळाचे चेअरमन तानाजी गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक कैलास टिळे, श्रीकृष्ण जानमाळी, प्रल्हाद काकड, सुदाम भोर, मोहन डावरे, अरुण जेजुरकर, नंदू हांडे ,अनिता सहाणे, कमल थेटे, कार्यकारी संचालक टी. आर. ढोणे आदींसह नासाकाचे माजी पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत झाली. नासाका सुरू करण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, या सर्वसाधारण सभेस भाजपचे पदाधिकारी असलेले नासाका संचालक गैरहजर होते. बाहेरगावी असल्याचा खुलासा या संचालकांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपची नासाकाविषयीची भूमिका केवळ बोलघेवडी आहे, अशीही चर्चा रंगली होती.

नासाका सुरू करण्यासाठी संचालक मंडळामार्फत शासन स्तरावर आजपावेतो झालेले प्रयत्न व त्याला मिळालेला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद याबाबतची वस्तुस्थिती चेअरमन तानाजी गायधनी यांनी उपस्थित सभासदांपुढे मांडली. असे असतानाही जिल्हा बँक मात्र केवळ आपली थकबाकी वसूल करण्यासाठी इरेला पेटली आहे. त्यासाठी नासाकाच्या विक्रीचा ठरावही जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर केलेला आहे. याशिवाय यापूर्वी दिलेला ना हरकत दाखलाही जिल्हा बँकेने आता रद्द केला असल्याची माहिती समजताच उपस्थित सभासदांनी जिल्हा बँकेच्या नासाकाबद्दलच्या धोरणाचा निषेध केला.

षडयंत्राचा आरोप

जिल्हा बँकेचे नासाकावरील कर्ज सध्या ८४ कोटींवर गेले आहे. बँकेने व्याजावर व्याज लावल्याने नासाकावर ४७ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार टाकल्याचा आरोप या सभेत संचालक मंडळाने केला. जिल्हा बँकेने नासाकाविरोधात हे षडयंत्र रचले असल्याचाही आरोप संचालक मंडळाने केला. जिल्हा बँकेची पै अन् पै चुकती करण्याची हमी संचालक मंडळाने दिली असल्याचा निर्वाळा चेअरमन तानाजी गायधनी यांनी यावेळी दिला.

नासाका कार्यक्षेत्रातून जिल्हा बँकेवर तब्बल सहा संचालक आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर सारे होत असूनही हे सहाही संचालक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी संचालक मंडळाने केला.


रुमण्याचा देणार दणका

नासाका विक्री प्रक्रियेंतर्गत येत्या १२ सप्टेंबर रोजी नासाकाच्या मशिनरीची व जमिनीची पाहणी करण्यासाठी एक पथक नासाका कार्यस्थळी येणार आहे. या पथकाला पिटाळून लावण्यासाठी सभासद शेतकरी हातात रुमणे घेऊन तयार राहणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शासनाने संचालक मंडळाला दिलेला शब्द मोडून सभासदांची फसवणूक करू नये, अशी मागणी यावेळी उपस्थितीत सभासदांच्या वतीने पी. बी. गायधनी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळाच्या मृतदेहासाठी पैसे मागितल्याचा आरोप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्ह‌लि हॉस्प‌टिलमधील कर्मचाऱ्यांनी अर्भकाचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी सात हजार रुपये घेतल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका पीडित कुटुंबाने शनिवारी केला. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा शल्य च‌किित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना निवेदन देण्यात आले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी, टाके देवगाव येथील भारती हनुमंत पारधी या महिलेने ३१ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास एका मुलीस जन्म दिला. परंतु, बाळाची प्रकृती खालावल्याने तिला तत्काळ सिव्हिल हॉस्प‌टिलला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या कुटुंबाने सिव्हिल हॉस्प‌टिलमध्ये येऊन बाळाला दुसऱ्या मजल्यावरील कक्षातील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले. परंतु, एक तासानंतर त्यांना हे बाळ दगावल्याचे सांगण्यात आले. बाळाचा मृतदेह मागितला असता त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांकडून सात हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाहीत तर बाळ देणार नाही असे त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. हॉस्प‌टिलमध्ये बाळाला दाखल केल्याची नोंदही घेण्यात आली नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला.

अर्भक दगावल्याने पुन्हा गोंधळ

एकीकडे आरोग्यमंत्री डॉ. सावंत सिव्हिल हॉस्प‌टिलची पाहणी करण्यासाठी येणार असतानाच पुन्हा शनिवारी दुपारी आणखी एक नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. त्यामुळे हॉस्पिटलच्या आवारात गोंधळाची परिस्थ‌तिी निर्माण झाली. अर्भकांच्या गंभीर प्रकृतीमुळे दररोज अशा एकदोन घटना घडत असल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेलनेस हबसाठी ‘पर्यटन’ने मागवले प्रस्ताव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी येथे १०० ते १५० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र अर्थात वेलनेस हब तयार करण्यासाठी राज्याचे पर्यटन विकास महामंडळ सरसावले असून, त्यांनी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून १८ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागवले आहेत. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी याअगोदरच इगतपुरी येथे वेलनेस हब करणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. जगभरातून वेलनेस टुरिझमला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे इगतपुरीचे निसर्गसौंदर्य व मुंबईची कनेक्टिव्हिटी याचा विचार करून या हबची कल्पना पुढे आली आहे. हा प्रकल्प गुंतवणूकदार व महाराष्ट्र पर्यटन मंडळ संयुक्तपणे राबवणार आहे.

वैद्यकशास्त्राच्या या प्राचीन परंपरेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र वेलनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या आरोग्य केंद्रामध्ये भारतीय वैद्यकीय सुविधांबरोबरच आशिया खंड, तसेच जगातील प्रसिद्ध वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील.

वेलनेस टुरिझम

केरळच्या धर्तीवर अशा सुविधा निर्माण झाल्या तर स्थानिकांच्या सहभागातून उत्तम दर्जाची सेवा आपण पर्यटकांना पुरवू शकतो. त्यासाठी वेलनेस सेंटर असावे, अशी मागणी होती. त्याला पर्यटनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आरोग्य पर्यटनाला वाव

जिल्ह्यात योगा, आयुर्वेद, तसेच निसर्गोपचार आदी उपचारपद्धती पुरवणाऱ्या संस्था, तसेच रिसॉर्टस यांना मोठा वाव आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक- इगतपुरी, वणी- दिंडोरी, मांगीतुंगी परिसरात पर्यटकांना आरोग्य सुविधांसोबतच उत्तम दर्जाची आतिथ्य सेवा जर पुरवली तर आरोग्य पर्यटनाला मोठा वाव मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाडूमातीच्या मूर्तींचेच स्टॉल!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला यंदा चांगला प्रतिसाद मिळून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची संख्या ७० हजाराने घटली आहे. शाडूमातीच्या मूर्तींचे प्रमाण वाढल्यामुळेच हे शक्य झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून महापालिका शाडूमातीच्या मूर्तींचा अधिकाधिक वापर वाढावा, यासाठी अधिक स्टॉल्स उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहे.

महापालिकेच्या वतीने यंदा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या गणेशोत्सवात दिसून आला. यंदा घरगुती गणेशोत्सवात शाडूमातीच्या मूर्तींचा सर्वाधिक वापर झाला. तसेच, पालिकेने पर्यावरण संरक्षणासाठी बेकिंग सोडाही वितरीत केला होता. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींचे संकलन हे एक लाख ६९ हजार एवढेच झाले. गेल्या वर्षी तर २ लाख ३९ हजार इतक्या विक्रमी संख्येने मूर्ती संकलित झाल्या होत्या. यंदा त्यात ७० हजाराची घट झाली. नागरिकांमध्ये प्रबोधन झाल्याने त्यांनी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बसविल्याने मूर्ती संकलनात घट झाल्याचा महापालिकेचा दावा आहे.

महापालिकेकडून चाचपणी

शहरात गणेशमूर्ती विक्रीसाठी महापालिकेकडूनच परवानगी घेतली जाते. त्यामुळे पुढील वर्षी फक्त शाडूमातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठीच स्टॉल्स देण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. शाडूमातीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवतील त्यांनाच स्टॉलला प्राधान्य देण्याचा विचार सुरू केल्याचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बससेवेच्या वादात प्रवाशांचे हाल

0
0

मुंबई-आग्रा महामार्गावर विद्यार्थ्यांची दैना

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

एस. टी. महामंडळाने शहर बससेवा हळूहळू बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असून, शहर बससेवा महानगरपालिका प्रशासनाने चालवावी अशाप्रकारचा रेटाही सुरू झाला आहे. दुसरीकडे महानगरपालिका प्रशासनाकडून बससेवा चालवण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. परंतु, या सर्व परिस्थितीत शहरातील त्याचबरोबर मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रवाशांचे नुकसान होत आहे.

सिटी बसचा स्टॉप असूनही त्याठिकाणी सिटीबस थांबत नाही. विद्यार्थ्यांना बससाठी ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे शहर बससेवेच्या वादात प्रवाशांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहर बस फेऱ्या कमी झाल्याने नियमितपणे प्रवास करणारे प्रवासी व मानसिक पासधारक अडचणीत असताना मात्र सिटी बस शाळा, कॉलेजेसच्या वेळेमध्ये बस स्टॉपवर थांबत नाही. यामुळे या स्टॉपवर प्रवाशांना उशीर होत असतो. तरी बसचालक आणि वाहकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. एस.टी महामंडळाच्या सिटी बसेस प्रवासी वाहतुकीचे काम करतात. या शहरातील विद्यार्थी, नोकरदारांना सिटी बसचा प्रवास स्वस्त व सुलभ व्हावा याकडे कटाक्ष असतो. परंतु, बसचे कर्मचारी हे स्वतःला एस.टी आपल्या मालकीची असलेल्या अविर्भावात वावरत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना पश्चात्ताप व त्रास सहन करावा लागत आहे.

वरिष्ठांकडूनदेखील पाठराखण

गेले काही दिवसांपासून सिटी बसच्या फेऱ्या कमी झाल्याने ठराविक काळात शहरातील विविध बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. प्रामुख्याने सी. बी. एस, पंचवटी, आडगाव, ओझर या परिसरातील थांब्यांवर गर्दी पाहून सिटी बसेस थांबत नाही. त्या थांब्यावर उतरणारे प्रवासी असल्यास बस थांब्यावर न थांबता मागे किंवा पुढे थांबत असतात. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची बस पकडण्यासाठी धावपळ होत असते. त्यामुळे बऱ्याचदा अपघातदेखील घडलेले आहेत. पण याबाबत बसच्या कर्मचाऱ्यांना कुठलेही सोयरसुतक नसते. शिवाय त्यामुळे बऱ्याचदा शाळा, कॉलेजेसचे विद्यार्थी व कामावर जाणारे कर्मचारी उशिरा पोहचतात. सिटी बसच्या वाहक व चालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने वरिष्ठांकडूनदेखील कर्मचाऱ्यांच्या वर्तनाची पाठराखण केली जाते की, अशाप्रकारचे प्रश्न सर्वसामान्य प्रवासी विचारत आहे.

प्रवाशांची दिशाभूल

शहर बससेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्विस रोडने गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून सुरू झाली. त्यामुळे अनेक प्रवासी सर्विस रोडवर उभे राहतात पण बसचालक मात्र बस सर्रासपणे महामार्गावरून जातात. त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे. आम्ही ज्याठिकाणी थांबतो त्याठिकाणी बसस्टॉप असल्यास बसचालक बस का थांबवत नाहीत, असाही सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.


आम्ही रोज शाळेत सिटीबसने प्रवास करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून बस फेऱ्या कमी झाल्या आहेत. शिवाय शाळा, कॉलेजेसच्यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी असल्याचे बघून चालक बस थांबवत नाही. विशेष म्हणजे प्रवाशी उतरणारा असला की बस पुढे उभी करतात.

अमोल मोरे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जितकी झाडे, तितका निधी देवू

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या ‘लोणजाई माता क्षेत्राच्या’ पर्यटन विकासासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील. त्यासाठी येत्या दोन वर्षांत ७ कोटींचा निधी शासन देणार असल्याचे आश्वासन राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. तसेच जितक्या प्रमाणात झाडे लावले जातील तितका विकास निधी देवू, असेही आश्वासन त्यांनी दिले.

हिरवाईने नटलेल्या विंचुर येथील लोनजाई डोंगरावरील लोनजाई मातेचे मंदिर आणि डोंगर परिसराला रावल यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सुरेशबाबा पाटील, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, पंचायत समिती सभापती पंडितराव आहेर, वैशाली रसाळ, संजय शेवाळे, महेश पाटील आदी उपस्थित होते.

रावल म्हणाले, लोणजाई हे धार्मिक स्थळ पर्यटक व भाविकांना आपल्याकडे आकर्षित करू शकते, असे वातावरण येथे आहे. यादृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. लोणजाईमाता डोंगर व या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होण्याची गरज आहे. येथील ग्रामस्थांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढे यावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एक झाड लावून त्याची निगा राखावी. जितक्या प्रमाणात झाडे लावले जातील तितका विकास निधी देऊ, असेही त्यांनी आश्वासन दिले.

लोणजाईच्या डोंगरावर अनेक औषधी वनस्पती आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहभागाने आम्ही डोंगर हिरवागार करण्याच्या कार्यात आहोत. हे स्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होण्यासाठी पर्यटन विभागाने समाजसेवी संस्थांना सोबत घ्यावे.

- वि. दा. व्यवहारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेफाम तरुणाईला लगाम

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शहरातील धूम स्टाइल वाहने चालविणाऱ्या तरूणार्इला लगाम लावण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी धरपकड मोहीम हाती घेतली आहे. विना परवाना, ट्रीपल सिट, कागदपत्रांचा अभाव असलेल्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

यामुळे शहरातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी ही धडक मोहीम सुरू केली आहे. याद्वारे हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोल‌िसांच्या या मोह‌िमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. शहरात वाहन चालवितांना मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, गर्दीत वेगात वाहन चालविणे, दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणे, महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या मागे पिंगा घालणे आदी प्रकारांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे पिंपळगावकरांनी स्वागत केले आहे.

पिंपळगाव शहरात दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या विक्रमी आहे. धूमस्टाइलने वाहन चालविणाऱ्यामुळे अनेकांनी अपघाताला सामोरे जावे लागले आहे. पोल‌िसांनी राबविलेल्या मोहिमेत पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र चिने, तुषार झाल्टे, शांताराम निंबेकर, मनोज बोराळे आदींचे पथक तैनात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐनवेळच्या लोडशेड‌िंगमुळे निफाड शहर अंधारात

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करणाऱ्या वीज वितरण कंपनीने शनिवारी निफाड शहरातील वीजपुरवठा दिवसभरात दोन ते तीन वेळा खंडित केला. सायंकाळी पाच वाजेपासून वीजपुरवठा खंडित केल्याने निफाड शहर अंधारात बुडाले होते.

या बाबत वीज कंपनीचे निफाडचे अभियंता सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता लोड शेडिंग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु शहरातील वीज ग्राहकांना या बाबत कोणतीही पूर्वसूचना न देता सायंकाळी तीन तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित केला होता. वातावरणात आधीच उकाडा असल्याने शिवाय शहरात

डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांनी वीज कंपनीच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सायंकाळी शहरात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यांचेही या समस्येमुळे हाल झाले. व्यवसायीकांनीही कपंनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना या बाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. लोडशेडिंगच्या नावाखाली वीज कंपनी वीजपुरावठ्या वाचून वंचित ठेवत असल्याची भावना निफाडकरांनी बोलून दाखविली.
वीज वितरण कंपनीने अती केले तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ढोकेश्वर’च्या कार्यालयांवर छापे

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केबीसी, इमू अशा अनेक संस्थांमध्ये आर्थिक आमिषाला बळी पडलेल्या घटना नाशिक जिल्ह्यात ताज्या असताना आता लासलगाव येथे ढोकेश्वर मल्ट‌िस्पेशालिटी या संस्थेचाही फुगा फुटला आहे. या संस्थेविरुद्ध पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर लासलगावसह जिल्ह्यातील ९ शाखांसह सोसायटीचे संचालक सतीश काळे यांच्या घरी पोलिसांनी शनिवारी छापे टाकले. त्यामुळे ढोकेश्वरच्या गुंतवणूकदारांसह नोकरीसाठी पैसे भरलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ढोकेश्वर सोसायटीच्या महाराष्ट्रात १७५ शाखा आहेत. या पतसंस्थेच्या शाखांमध्ये नोकरीच्या आशेने हजारो तरुणांनी सोसायटीने सांगितल्याप्रमाणे पैसे भरले आहेत. मात्र या तरुणांची संस्थेने फसवणूक केली. त्यानंतर तरुणांनी लासलगाव पोलिसांत यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात सुमारे दहा शाखांवर याआधीच छापे घातले आहेत.

बेरोजगारांना आम‌िष

ढोकेश्वर सोयासटीच्या राज्यभर ठिकठिकाणी विविध आर्थिक लाभ व योजनांची जाहिरात केली. याच सोसायटीच्या शाखांमध्ये नोकरी लावून देण्यासाठी ठराविक रक्कम युवकांकडून घेतली जात होती. पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत पैसे उकळण्यात आले. कमी पैशात नोकरी मिळत असल्याने अनेक युवक या आमिषाला बळी पडले.

कारवाईचा बडगा

नोकरीसाठी पैसे भरूनही नोकरी व ते पैसेही परत मिळत नाही तसेच नातेवाईकांकडून मुदत ठेवी या पतसंस्थेत ठेवल्याने अनेक युवकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. लासलगावचे सहाय्यक पोल‌िस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्याकडे मनमाड येथील एका तक्रारदाराने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या तक्रारीनुसार नाशिक जिल्ह्याचे पोल‌िस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे व जनार्दन सोनवणे यांच्यासह पथकाने जिल्ह्यातील सुमारे दहा शाखा व सतीश काळे यांच्या राहत्या घरी छापे टाकले.

आधीही झाली

होती तोडफोड

औरंगाबाद, जालना, अहमदनगर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातून बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या आमिषाने ढोकेशवेर सोसायटीत पैसे भरले आहेत. महिनाभरापूर्वी जालना आणि औरंगाबाद, हिंगोली जिल्ह्यातून काही तरुण लासलगावला आले होते. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी फसवणूक झाली हे लक्ष्यात
येताच कार्यालयाची तोडफोड केली होती.

असा रचला पाया

रयत शिक्षण संस्थेच्या विंचुर येथील विद्यालयात नोकरीला असणाऱ्या सतीश काळे यांनी सुरुवातीला हरिओम ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले. यातही मोठ्या प्रमाणात अपहार करून अनेक ग्राहकांची फसवणूक केली. मात्र अनेकांनी त्यावेळी तक्रार देण्याचे टाळले. गेल्या दोन तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यानंतर काळे यांनी नवीन योजना आखली. त्यानुसार ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीची स्थापना केली. सुमारे १७५ शाखांची निर्मिती केली.

कार्यालयांतील साहित्य ताब्यात

लासलगाव येथील मुख्य कार्यालय कळवण, नांदगाव, मनमाड, घोटी, नाशिक शहर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. या ठिकाणांवरून संगणक, कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या कारवाईची चाहूल लागताच सोसायटीचे संस्थापक सतीश काळे फरार झाले. पोल‌िस त्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनासाठी ७४ कोटींचा निधी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील हरणबारी डावा कालव्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपये तर तळवाडे भामेर पोहच कालव्यासाठी १९ कोटी रुपये मंजूर करून केले आहेत. शासनाने या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून या प्रकल्पांमुळे मोसम परिसरातील कायम अवर्षण प्रवण क्षेत्रातील सुमारे ४० ते ४५ गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे. यामुळे साडेबाराशे हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असल्याची माहिती आमदार दीप‌िका चव्हाण यांनी दिली.

आघाडी सरकारच्या काळातच हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा, केळझर कालवा क्र. ८ व पूनद प्रकल्पांतर्गत सुळे डावा कालव्याच्या कामांना प्राशसकीय मान्यता मिळाली. यामुळे प्रकल्पांची ६० ते ७० टक्के कामी मार्गी लागली आहेत. शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला. यामुळे बराच कालावधी गेला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह आपण सातत्याने पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचे चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे. आगामी काळात केळझर कालवा क्र. ८ व हरणबारी वाढीव उजवा कालवा व पूनंद प्रकल्पातंर्गत सुळे डावा कालवा आरमनदीतील मळगाव बंधाऱ्याया पर्यंतच्या कामास प्राधान्य देण्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनकाई किल्ल्याची चिमुकल्यांना भुरळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्याच्या उत्तर सिमेवरील अनकाईचा किल्ला, या किल्ल्यावरील प्राचीन लेणी अन् पुरातनकालीन कोरीव शिल्प, गुंफा व निसर्गरम्य परिसर याने आजवर अनेकांना आकर्षित केले आहे. याच अनकाई किल्ल्याने विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांना भुरळ घालताना ते गडाच्या प्रेमात पडले. निमित्त ठरलं ते शाळेने आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीचे.

एरवी नेहमीच शाळेतील अभ्यासाचे धडे गिरवचाताना बाहेरच्या जगातील ज्ञान म्हणजे प्राथमिक शाळांमधील बच्चेकंपनीसाठी अशक्यप्राय गोष्ट. मात्र, आता बदलत्या काळात ओघात जग बदलू लागताना या शाळा देखील बदलू लागल्या आहेत. येवल्यातील विदया इंटरनॅशनल स्कूलने आपल्या शाळकरी बच्चे कंपनीला तालुक्यातील अनकाई किल्ल्याची सफर घडवली.

ही शैक्षणिक भेट मुलांना खऱ्या अर्थाने इतिहासरुपी ज्ञानाचा खजिना देवून गेली. इयत्ता सहावी व सातवी मधील विदयार्थी या सहलीत सहभागी झाले होते. जिकडे नजर टाकावी तिकडे जागोजागीचे किल्ल्यावरील मनमोहक दृष्य, प्राचीनकालीन अगस्ती लेणी याची यावेळी विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. लेण्यांमधील इंद्रदेव, शांतीनाथ, पार्श्वनाथ यासह कोरीव स्तंभ, गणेशाची मूर्ती अन् असंख्य जैन लेणी पाहताना बच्चेकंपनीचे चेहरे उजळून निघाले. किल्ल्याच्या या भेटीनंतर मुले अनकाई किल्ल्यावर ऐतिहासिक प्रबंध देखील तयार करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल व मुख्याध्यापिका शुभांगी शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी फॉर्मसाठी देवळ्यात सुविधा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर यांच्या प्रयत्नातून शनिवारी देवळा बाजार समिती सभागृहात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

कर्जमाफीच्या ऑनलाइन प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून देवळा तालुक्यातील १४ हजार ५४९ शेतकऱ्यांनी फॉर्म भरल्याची माहिती सहाय्यक

निबंधक संजय गीते यांनी दिली. कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने शेतकरी यापासून वंचित राहू नये म्हणून आहेर यांच्या प्रयत्नातून देवळा बाजार समितीच्या सभागृहात मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. या उपक्रमप्रसंगी आहेर यांच्यासह संजय गीते, अशोक आहेर, प्रदीप आहेर, चंद्रकांत आहेर, साहेबराव सूर्यवंशी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images