Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आता तरी बिबट्या गावणार का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मेरी, मखमलाबाद, हनुमानवाडी, हिरावाडी, म्हसरूळ अशी सगळीकडे दहशत निर्माण करणारा बिबट्या आता तरी पिंजऱ्यात कैद होईल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. मेरीमध्ये बिबट्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रविवारी दुपारी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला आहे. मात्र, प्रत्येक वेळी बिबट्या दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिंजरा लावण्यात येत असल्यामुळे ‌बिबट्या तिथून इतरत्र पसार होत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.

मेरीच्या हायड्रो प्रकल्पाच्या दाट झाडीच्या भागातील भिंतीवर शनिवारी (दि. ९) सायंकाळी बिबट्या बसलेला दिसला. त्याची कॅमेऱ्यात टिपलेली छबी सोशल मीडियातून व्हायरल झाली. पंचवटी परिसरात बिबट्या वावर असल्याचे या फोटोमुळे पुन्हा लक्षात आले. वन विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी या जागेवर येऊन पाहणी केली. त्वरित पिंजरा लावण्याऐवजी त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. १०) पिंजरा लावला. दुपारपर्यंत या पिंजऱ्यात आमिष ठेवण्यात आले नव्हते. रविवारी सायंकाळी या पिंजऱ्यात बकरी ठेवण्यात येऊन पिंजरा झाडीमध्ये लपविण्यात आला. याअगोदर मेरीच्या जलविज्ञान भवनाच्या भागात पिंजरा बसविण्यात आला होता. तेव्हा बिबट्याला आमिष म्हणून कोंबडा ठेवण्यात आला. मखमलाबाद भागात बिबट्या दिसला. तेथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात कुत्रा ठेवण्यात आला होता, तर हनुमानवाडी येथे रिकामाच पिंजरा लावण्यात आला होता. या सर्वच ठिकाणी बिबट्या दिसल्यानंतर त्वरित पिंजरा न बसवल्याने बिबट्याची दहशत अद्याप कायम आहे. बिबट्या सतत एका भागातून दुसऱ्या भागात फिरत असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कालिका भक्तनिवासचे काम पूर्ण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी परिसरात १ कोटी १५ लाख रुपर्य खर्च करुन बांधलेल्या भक्त निवासाचे नवरात्रोत्सवात भक्तार्पण केले जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या भक्त निवासात नऊ खोल्या आहेत. पर्यटन विकास महामंडळाने यासाठी निधी दिला असून, त्यातून ते साकारले आहे. ट्रस्टने भक्तनिवाससाठी आणखी जागा घेतली असून, त्यातून पुढे १० खोल्या बांधण्यात येणार आहेत.

कालिका माता मंदिर परिसरात तब्बल ५० हून अधिक हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे बाहेर गावाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हा भक्तनिवास महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या भक्तनिवासाचे काम जोरात सुरू होते. आता ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आठ दिवसांत त्याचे फिन‌िश‌िंग होणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीला ते भक्तांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्या‌ दिशेने नियोजन सुरू आहे.

शहरात कालिका देवीच्या यात्रेमुळे नाशिककरांचा नवरात्रोत्सव अतिशय उत्साह आणि आनंदाचा होतो. ग्रामदैवत असलेल्या या देवीच्या मंदिर परिसराचा विकास याअगोदरच ट्रस्टने केला आहे. त्यामुळे याची दखल घेऊन पर्यटन विकास निधीतून भक्त निवाससाठी पैसे देण्यात आले आहेत. त्यानंतर कालिका मंदिर ट्रस्ट आणि पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तरित्या या कामासाठी पुढाकार घेऊन हा भक्तनिवास पूर्ण केला आहे. नवरात्रोत्सवाशिवाय कालिकेच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हीच बाब ओळखून मंदिराच्या मागील बाजूस नऊ खोल्यांचा हा भक्तनिवास उभारण्यात आला आहे. प्रसाधन आणि स्वच्छतागृही उभारण्यात आले आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेला बगीचा अगोदरच विकस‌ित करण्यात आला आहे. आता मंदिर परिसराचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कालिका मंदिराचा परिसर नवरात्रोत्सवात उजळून निघणार आहे.


कालिका मंदिर परिसर हा भाविक आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिसरातच ५० हॉस्पिटल्स असून, तीन प्रमुख बसस्थानक काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ही चांगली सुविधा असणार आहे.

- अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष, कालिका माता ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोइंग व्हॅनसाठी ठेकेदाराचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नो पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहने हटवण्यासाठी येणारी अत्याधुनिक वाहने लवकर उपलब्ध होण्याची शक्यता नाही. यापूर्वी प्रसिध्द झालेल्या टेंडर नोटीसला चार ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. मात्र, पोलिसांच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यास ठेकेदारांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे ही प्रक्रियाच रद्द करीत नव्याने नोटीस प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तूर्तास जुन्या ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली आहे.

साधरणतः ऑगस्ट महिन्यापासूनच १२ अत्याधुनिक नवीन टोइंग व्हॅन सुरू होणे अपेक्षित होते. यामध्ये चारचाकी वाहनांसाठी चार, तर तीन चाकी आणि दुचाकींसाठी आठ वाहनांचा समावेश आहे. शहरातील बहुतांश परिसरातील पार्किंगची ठिकाणे गायब असून, वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागतात. मात्र, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातासारख्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी टोइंग व्हॅन सुरू करण्यात आली होती. मात्र, या टोइंग व्हॅनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानालाच फाटा देण्यात आला होता. त्यामुळे चारचाकी वाहनांचे प्रंचड नुकसान होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अवघ्या काही महिन्यांत चारचाकी वाहने उचलण्याचे काम बंद झाले. दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले. मात्र, यात देखील अप्रशिक्षित कर्मचारी दुचाकी हाताळताना नुकसान करीत असल्याचे वारंवार समोर आले. सध्या, चारचाकी व दुचाकी उचलण्यासाठी दोन वेगवेगळी वाहने ठेकेदाराने नियुक्त केली आहेत. मात्र, यात आधुनिकतेचा अभाव असून, वाहने उचलण्याची क्षमता फारच कमी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रमाणे यंत्रणा राबवण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतला होता. अत्याधुनिक साधनांमुळे वाहनचालकाचे नुकसान होत नाही. तसेच, टोइंग व्हॅनची संख्या मुबलक असल्यास रस्त्यावर वाहने पार्क झाल्याबरोबर कारवाई होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिलप्रश्न सीएम कोर्टात

$
0
0

मुंबईतील बैठकीपूर्वी विभागीय आयुक्तांनी घेतली सिव्हिलची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमधील इन्क्युबेटरची कमी संख्या, अतिदक्षता विभागात असलेली अर्भकांची अतिरिक्त संख्या आणि अर्भक मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

या बैठकीत नाशिक विभागासाठी शालिमार येथील संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र दुसऱ्या क्रमाकांचा शिशुविभाग (पेडियाट्रिक) सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात क्षमतेपेक्षा अधिक मुलांचा भरणा असतो. इन्क्युबेटरची संख्याही खूपच कमी असून, गेल्या काही महिन्यात अडीचशेपेक्षा जास्त अर्भकांचा मृत्यू झाला. याची राज्य सरकारने दखल घेतली असून, शनिवारी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थिती समजावून घेतली. सिव्हिल हॉस्पिटल लेव्हल दोनच्या कॅटेगरीत येत असल्याने येथे यापेक्षा अधिक बालकांवर उपचार करणे शक्य नाही. यापेक्षा अधिक सुविधांनी परिपूर्ण असलेला विभाग संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये सुरू करणे शक्य असून, त्याची चाचपणी नव्याने घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा करून नवजात अर्भकांसह इतर बालकांवर उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभी कशी करता येऊ शकते, याची माहिती झगडे यांनी घेतली. विभागीय आयुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांची महिन्यातून एकदा मुख्यमंत्र्यांकडे बैठक असते. या बैठकीत याच मुद्यावर चर्चा होणार आहे. संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटर आणि अतिदक्षता विभागाचा सुसज्ज वार्ड तयार झाल्यास सिव्हिलवरील ताण कमी होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संबंधी काही तरी निर्णय घेण्याची शक्यता असल्याने झगडे यांच्या आजच्या दौऱ्याला महत्त्व आहे.

ताण कमी होणे आवश्यक

जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यातच कमी वयात होणारी लग्ने, कुपोषण, पोषक आहाराचा अभाव यामुळे गरोदर माता प्रसूतीसाठी सक्षम नसतात. कमी दिवसांचे तसेच कुपोषित बालकांचा जन्म झाल्यास अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढते. अशा बालकांवर उपचार करण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये मोठा खर्च येतो. सर्वसामान्य गरीब कुटुंब यासाठी तयार नसते. त्यामुळे सहाजिकच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पालक मुलांना अक्षरशः सोडून जातात. याचा ताण सिव्हिल हॉस्पिटलवर पडत असून, ही बाजूही मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका खोलीचे पोलिस ठाणे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

दिवसभरात ८० गाड्यांचे सुमारे १४० थांबे... लहवित ते कसबे-सुकेणेदरम्यानची तब्बल ४२ किलोमीटरची विस्तीर्ण हद्द... दररोज दाखल होणारे गुन्हे... गेल्या २५ वर्षांपासून पोलिस कर्मचारी संख्येत वाढ नाही... महिला कोठडीही नाही... गुन्ह्यांचा तपास व दररोजची ड्युटी यात भरडले जाणारे पोलिस कर्मचारी आणि हा सारा कारभार हाकण्यासाठी मिळालेली एक छोटीशी खोली... अशी जर्जर अवस्था सध्या नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्याची झाली आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील गुन्हेगारीत अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असली, तरी गेल्या अनेक दशकांपासून नाशिकरोड रेल्वे स्थानकातील पोलिस ठाण्याच्या समस्या मात्र जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. या समस्यांचा सामना करीत सेवा बजावणारे येथील पोलिस कर्मचारी कामाच्या भाराने मेटाकुटीस आले आहेत.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील पोलिस ठाण्याला गेल्या २५ वर्षांपासून लागलेले समस्यांचे ग्रहण आजही कायम आहे. राज्याच्या गृह खात्याला या पोलिस ठाण्याच्या सक्षमीकरणाचा जणूकाही विसरच पडला असल्याचे चित्र सध्या दिसून येते. ब्रिटिश आमदनीपासून एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला या पोलिस ठाण्याचा कारभार रेल्वे स्थानकाचा विस्तार अनेक पटींनी वाढूनही आजही त्याच छोट्याशा खोलीतून सुरू आहे.

या पोलिस ठाण्यात १९९३ सालापासून पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज असतानाही अद्याप ती वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनुष्यबळ व जागेच्या कमतरतेमुळे या पोलिस ठाण्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ब्रिटिश आमदनीपासून अद्याप या पोलिस ठाण्यात महिलांसाठी ड्रेसिंग रूमची सुविधाही उपलब्ध झालेली नाही. पुरेसे कर्मचारी उपलबध व्हावेत व जागेची अडचण सोडविण्यात यावी यासाठी स्थानिक अधिकारी वरिष्ठ कार्यालयांकडे लेखी विनंती दर वर्षी करीत आलेले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याची स्थिती आहे.

--

महिला कोठडीचा अभाव

रेल्वे स्थानकावरील पोलिस ठाण्यात सध्या महिला कोठडी नाही. त्या जागेचा वापर मुद्देमाल व रेकॉर्ड सांभाळण्यासाठी केला जातो. महिला संशयितांना पोलिस ठाण्यातच बसवून ठेवावे लागते. त्यामुळे अशा महिला संशयित सांभाळताना या पोलिस ठाण्यातील पोलिसांची जोखीम वाढते.

---

तपासाला ब्रेक

हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील पोलिस ठाण्यास आजवर वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदही मिळालेले नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारीच या पोलिस ठाण्याचा गाडा हाकत आहे. त्याच्याशिवाय येथे सध्या केवळ ३१ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. सीसीटीएनएस, कोर्ट समन्स, वॉरंट, देवळाली दूरक्षेत्र, कार्यालयीन कामकाज, बारानिशी आदी कामकाजाच्या रेट्यापुढे हे मनुष्यबळ खूपच तोकडे आहे. याशिवाय व्हीआयपी एस्कॉर्टचीही जबाबदारी पार पाडावी लागते. या कामाच्या व्यापाचा परिणाम दाखल गुन्ह्यांच्या तपासावर झाला आहे. येथील सर्व गुन्ह्यांचे न्यायालयीन कामकाजही मनमाड कोर्टात चालते.

--

अलीकडील दाखल गुन्ह्यांची संख्या

--

वर्ष - दाखल गुन्हे संख्या

२०१२ ६१

२०१३ ८९

२०१४ १३५

२०१५ १५७

२०१६ २०८

२०१७ २०१

एकूण ८५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय सुविधांचे आउटसोर्सिंग करा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

केजरीवाल सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही आणीबाणीच्या परिस्थ‌ितीत रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सरकारी खर्चाने वैद्यकीय सुविधांचे आउटसोर्सिंग करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्र‌ीती मेनन यांनी‌ केली आहे. आपचे पदाधिकारी मंगळवारपासून हॉस्प‌िटलच्या गेटवर बेमुदत सविनय सत्याग्रह आंदोलन करणार आहेत.

सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मेनन यांनी सोमवारी नाशिकच्या सिव्हिल हॉस्प‌िटलला भेट दिली. त्या वेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. बालमृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अर्भकांसाठी पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध ठेवाव्यात, व्हेंटिलेटर व इन्क्युबेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, तसेच ते हाताळण्यासाठी कुशल कर्मचारी नेमावेत, ऑक्सिजन सिलिंडर व रक्तघटक यांचा पुरवठा करावा, औषधे व उपकरणे खरेदीसाठी मंत्रालयात असलेल्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी जगबीरसिंग, स्वप्नील घिया, विनायक येवले, एकनाथ सावळे, विकास पाटील आदी उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांची घरातून तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ऑटोमेटीक व्हेइकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरमधील (एव्हीईएस) सिस्टिम हॅक केल्याच्या प्रकरणात ‘आरटीओ’तील क्लार्कचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. क्लार्कचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळाला असून, त्याच्या अटकेनंतर या प्रकरणावरील पडदा खऱ्या अर्थाने बाजूला सरकरणार आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपींची संख्या दोन झाली असून, ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परितोष रणभोर, असे फरार झालेल्या संशयित कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. आरटीओ कार्यालयात क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या रणभोरने आपल्याच घरातील कम्प्युटरसह मोबाइलचा वापर करीत आरटीओ कार्यालयातील ‘एव्हीईएस’ सिस्टिम हॅक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तब्बल १३ वाहनांची कोणतीही तपासणी न करता फिटनेस सर्टीफिकेट दिले गेल्याचे आजवरच्या तपासात समोर आले आहे. ‘एव्हीईएस’ सिस्टिम हॅक झाल्याप्रकरणी १९ ऑगस्ट रोजी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हॅकरने सदर सिस्टिम हॅक करून वाहनांची प्रत्यक्ष तपासणी न करता दोन वाहनांचे फिटनेस सर्टीफिकेट प्राप्त केली. हॅकिंगची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली होती. १६ ऑगस्ट रोजी वाहन निरीक्षक हेमंत गोविंद हेमाडे सिस्टिम तपासत असताना हॅकिंगचा प्रकार उघड झाला. यानंतर, हेमाडे यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली. हॅकिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी दीपक गिरधरलाल पटेल यास काही दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, पटेल हा वाहनमालक असून, मुख्य सूत्रधार आरटीओ कार्यालयाशी निगडीत असावा, असा पोलिसांचा कयास होता.

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी एव्हीइएस केंद्राशी संबंधित सर्व इन्स्पेक्टर व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले. सर्वांत प्रथम झालेल्या चौकशीत रणभोर हजर होता. मात्र, त्यानंतर त्याने पोलिसांकडे पाठ फिरवली. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीकोनातून चौकशी सुरू केली. त्यांच्याकडील कम्प्युटर, मोबाइल आदींची माहिती घेतली असता हॅकिंगचा उगम स्त्रोत पोलिसांना सापडला. मात्र, याच दरम्यान रणभोरने अटकपूर्व जामिनीसाठी कोर्टात अर्ज दिला. त्यावर अर्जावर सुनावणी होऊन कोर्टाने रणभोरचा अर्ज फेटाळला. आता पोलिस त्याच्या मागावर असून, लवकरच त्यास अटक करण्यात येईल.

गुन्ह्यात संशयितांची संख्या दोन झाली असून, ती वाढू शकते. संशयित आरोपीला सिस्टिमची माहिती असल्याने त्याने घरातूनच हॅकिंगचा प्रकार केला. त्याच्या अटकेनंतर हॅकिंगचे सर्व चित्र स्पष्ट होऊन अन्य आरोपींची तसेच दिल्या गेलेल्या सर्टिफिकेटची माहिती समोर येईल.
- अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ट्रीटमेंटची होणार चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जखमी पोलिसावर वेगवेगळ्या कारणाने उपचार करण्यास नकार देणाऱ्या हॉस्पिटलबाबत तसेच त्या अनुषंगाने इतर घटनांची चौकशी करण्यात येणार असून, हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाल्यास ते पोलिस पॅनलमधून ब्लॅक लिस्ट करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या पोलिसाची उपचारासाठी परवड झाल्याची बाब ‘मटा’ने प्रसिद्ध केली होती.
एखादा अपघात झाल्यानंतर कोणत्याही कायदेशीर बाबींचा विचार न करता डॉक्टरांनी प्रथम उपचारास प्राधन्य द्यावे, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. पोलिसही त्यादृष्टीने जनजागृती करीत असतात. मात्र, तीन दिवसांपूर्वी बिटको परिसरात झालेल्या रस्ते अपघातात पोलिस कर्मचारी पोपट पवार गंभीर जखमी झाले. मेंदूला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. यावेळी तेथे उपस्थित झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी घेऊन गेले. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. यातील काही हॉस्पिटल पोलिस पॅनलवर आहेत. म्हणजे पोलिसांवर केलेल्या उपचारानंतर राज्य सरकार संबंधीत हॉस्पिटलला पैसे अदा करते. मात्र, त्या दिवशी पवारांना वेळेत उपचार मिळाला नाही. पोलिस असल्यानेच पवारांना ही ‘ट्रीटमेंट’ मिळाल्याची भावना पोलिस दलात पसरली आहे. ‘मटा’ने याचे सविस्तर वृत्त सोमवारी (दि. ११) प्रसिद्ध केले. याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी सदर घटनेची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः पोलिस पॅनेलवरील हॉस्पिटलने सुरुवातीस उपचार करण्यासाठी होकार दर्शवून प्रत्यक्ष पेशंट आल्यानंतर नकार दिला. एकदा नाही तर दोनदा असा प्रकार घडला. त्यामुळे या सर्व घटनांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून त्यात हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचे निर्दशनास आल्यास त्यास ब्लॅक लिस्ट केले जाईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

पोलिस कल्याण निधीतून मदत?
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पवार कुटुंबाची परवडच झाली. आर्थिक विवंचना दूर करायची की बेशुद्ध पडलेल्या पतीची सुश्रृषा करायची, असा प्रश्न पवार कुटुंबीयांसमोर उभी आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की कोमात असलेले पवार लवकर बरे व्हावेत, अशी सर्वांची अपेक्षा आहे. पवार कुटुंबीयांना पोलिस कल्याण निधीतून अधिकाधिक मदत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरस्कारांमुळे वाढते जबाबदारी

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
चांगल्या कार्याला प्रोत्साहन म्हणून पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांमुळे पुरस्कारार्थींची जबाबदारी वाढते. यापुढील काळात आणखी जोमाने काम करून सामाजिक बांधिलकी जपा, असे आवाहन यशवतराव पाटील यांनी सोमवारी केले.

नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने आयोजित गोदारत्न आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, श्रीकांत बेणी, ज्येष्ठ पत्रकार पां. भा. करंजकर, पद्माकर पाटील, भानुदास शौचे आदी मान्यवर उपस्थ‌ित होते. यावेळी संघाच्या वतीने हभप इंद्रायणी मोरे, मनोहर जगताप, हेमंत शिंदे, विलास काकडे, सुरेश नारायणे, कैलास सूर्यवंशी, उद्धव मोरे, अनुराधा तारगे आदी २९ जणांना गोदारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच रमेश कडलग, शंकरराव बर्वे, नितीन घोडके, चंद्रकांत वाघुलीकर, सुरेश बागुल यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सरल धारणकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुप्रसिध्द लेखिका डॉ. सरल धारणकर यांचे राम जानकी अपार्टमेंट, चैतन्य नगर, निर्मला कॉन्व्हेंटजवळ येथील घरात शनिवारी (दि. ९) पहाटे निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. नाशिक अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
डॉ. धारणकरांचा नाशिक हा अभ्यासाचा व आवडीचा विषय होता. त्या इतिहास या विषयाच्या प्राध्यापिका होत्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी गाइड म्हणून त्या काम पहात होत्या. तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी सदस्य म्हणून त्या निवडून गेलेल्या होत्या. भारतीय इतिहास संकलन समिती संस्थेच्या कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. तसेच कित्येक वर्षे डॉ. धारणकर या पुस्तक मित्र मंडळाच्या अध्यक्ष होत्या. उत्तमोत्तम पुस्तकांवर त्यांनी वक्ते बोलावून त्यांना बोलते केले होते. सावानाच्या बी लिब केंद्राच्या त्या काही वर्षे प्रमुख होत्या. डॉ. धारणकर यांनी नाशिक तसेच इतर विषयांवरही पुस्तके लिहिलेली असून दादासाहेब बिडकर, नाशिक मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे ही पुस्तके गाजलेली आहेत. भारतीय इतिहास संकलन समिती संस्था व सावानाच्या वतीने गुरूवारी, १४ सप्टेंबर रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पंचवटीतील सराईत गुन्हेगाराची हत्या करणाऱ्या तिघा संशयितांना जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हत्येची घटना २०१४ मध्ये घडली होती.
पंचवटीतील सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२, रा. गणेशवाडी, नाशिक) याची धारदार हत्याराने खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. शर्मा यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.
योगेश गांगुर्डे (सातूपर), प्रितम चांगले (रा. गणेशवाडी, पंचवटी) आणि सागर खैरनार (रा. मखमलाबाद नाका, पंचवटी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेशवाडीतील सप्तशृंगी देवी मंदिराजवळील भुजबळ बँकेखाली ५ जानेवारी २०१४ रोजी हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोपी योगेश गांगुर्डे, प्रितम चांगले व सागर खैरनार हे तिघे इंडिका कारमधून आले. त्यांनी सचिन उर्फ डोण्या मोकळ यास फोन करून बोलावून घेतले. पूर्ववैमनस्यातून तिघांनी चॉपर, चाकू व कोयत्याने मोकळवर वार केले. आरोपींच्या अचानक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोकळला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदेश पवार यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी वरील तिघा आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. पंचवटी पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी तपास सुरू करीत तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा यांच्या कोर्टात खटला सुरू झाल्यानंतर अॅड. प्रमोद पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले. कोर्टासमोर सबळ पुरावे सादर झाल्याने तिघांना कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेप तसेच आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर रोडवर ५० हजारांची लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
जेहान सर्कल परिसरात गुंजनसिंह यांच्या चारचाकीची काच फोडून ५० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा बाजेच्या सुमारास घडली. या घटनेमागे इराणी टीमचे चोरटे असल्याचे मानले जात आहे.
गाडीचा कट लागण्याचा बहाणा करून दोन जणांनी सिंह यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली. चारचाकी बाजूला लावत विचारणा करण्यासाठी गेलेल्या सिंह यांच्या गाडीची काच फोडत पुढील भागात ठेवलेले ५० हजार रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गायब केले. गाडीची काच फोडत असताना बाजूला असलेल्या इमारतीतील रहिवाशाने चोरट्यांना हटकले. मात्र, काही क्षणात गाडीची काच फोडत त्यांनी रोकड लंपास केली. दरम्यान, संबधित चोरट्यांकडून बँकेच्या बाजूला पाहणी करून चोरीसाठी सावज शोधले जात असल्याने पोलिसांचा संशय आहे. चोरीची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्यांची माहिती घेत त्यांचा इराणी टीमकडून पाठलाग केला जाते. वळणावर तुमच्या गाडीने कट मारला असे सांगून हुज्जत घातली जाते. संबधित चारचाकीचालक गाडी बाजूला लावत विचारपूस करण्यासाठी गेला की अन्य दोघे गाडीची काच फोडून मिळेल ती रक्कम लंपास केली जात असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेला जबर मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
रविवार कारंजा परिसरात राहणाऱ्या विवाहित महिला प्रियंका विशाल लाड (३२) यांना त्यांच्याच कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी प्रियंका यांच्या पतीसह तिघांची अटकेनंतर जामीनावर सुटका झाली.

प्रियंका यांना त्यांचा पती विशाल, प्रियसी सुभदा खांडेकर आणि नंदकुमार देशपांडे यांनी जबर मारहाण केल्याची
तक्रार प्रियका यांचे वडिल रमेश पाटोळे यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला दिली. यानंतर पोलिस दलातील निर्भया टिमच्या अधिकारी सारिका आहिराव यांनी प्रियंका यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले. तसेच आरोपी विशाल यास सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले. गंभीर दुखापत झालेल्या प्रियंका यांना त्यांचे वडील पाटोळे यांनी नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. दरम्यान, विशाल यास पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उभीधोंडची वाटचाल टंचाईमुक्तीकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पेठ तालुक्यातील उभीधोंड गावात विविध यंत्रणांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामांमुळे चांगला पाणीसाठा निर्माण झाला असून गावाची वाटचाल टंचाईमुक्तीकडे सुरू आहे.
गावातील गावतळे गळतीमुळे पावसाळ्यानंतर दोन-तीन दिवसात कोरडे होत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्यासाठी समस्या निर्माण होत असे. दोन वर्षांपूर्वी गावात टँकरही सुरू होता. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावाची निवड झाल्यावर मग्रारोहयो, कृषी विभाग, वन विभाग आदी यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे घेण्यात आली. ग्रामपंचायतीने या कामांसाठी पुढाकार घेतला. गावतळ्यातील गाळ काढल्याने ६ टीसीएमने पाणीक्षमता वाढली. तळ्यातील गळती रोखण्यासाठी मातीचा थर देण्यात आला असून सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. एकूण ४३६ मनुष्य दिवस एवढे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले. त्यासाठी एक लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आला. प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीचे कामासाठी सहकार्य मिळाले.

शिवारात जिरणार पाणी
वन विभागाने पाच ठिकाणी वनतळे निर्माण केल्याने शिवारातच पाणी जिरणार आहे. या कामावर सुमारे १५ लाख खर्च करण्यात आला. डोंगरमाथ्यावर सीसीटीचीही कामे घेण्यात आल्याने माथा ते पायथा पाणी अडविण्यात आले. कृषी विभागाने ५ हेक्टर क्षेत्रावर मजगीची कामे केली. तसेच ३ हेक्टरवर खोल सलग समतल चर खोदण्यात आले. त्यासाठी ३ लाख रुपये खर्च करण्यात आला. यातून १६ टीसीएम साठवण क्षमता निर्माण झाली. जलयुक्त शिवार योजनेने गावातील पाणीसमस्या कायमची दूर होईल, असा ग्रामस्थाना विश्वास वाटत असल्याचे ग्रामसेवक दीपक कोतवाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटख्यासाठी झाडांचा बळी

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
गुटखा आणि पानामधील काथसाठी पेठ, सुरगाणा पट्ट्यातील खैरांच्या झाडांवर तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे. ही झाडे तोडून टोळ्यांच्या मदतीने गुजरातमध्ये पाठवली जातात. तेथून प्रक्रिया करून देशभरात गुटख्यासाठी पाठवली जातात, असे सूत्रांनी सांगितले.
सुरगाणा वनक्षेत्रात खैराची झाडे तोडून गुजरातमध्ये तस्करी करणाऱ्या स्थानिक गणेश वाघमारेसह गुजरातच्या प्रवीणभाई पटेल आणि संताभाई काळात सुरगाणा वनखात्याने अटक केली. त्यांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती वनखात्याला मिळाली. राजकीय दबाव आणि कठोर शिक्षेचा अभाव यामुळे हे तस्कर दोन-चार वर्षे शिक्षा भोगून पुन्हा याच उद्योगात येतात. पानामध्ये वापरला जाणारा कात हा खैराच्या झाडाच्या गाभापासून तयार होतो. काही झाडे शंभर वर्षांपूर्वीची आहेत. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबक, हरसूल, पेठ, सुरगाणा तसेच कोकणपट्ट्यात खैराची झाडे आहेत.

वन जमिनींवर अतिक्रमण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनहक्क कायदा आल्यानंतर सुरगाण्यासह अन्य तालुक्यात काही आदिवासींनी वन जमिनीवर अतिक्रमण केले. बळकावलेले क्षेत्र वाढविण्यासाठी शेतीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. त्यामुळे साग व खैराच्या लागडवडीसाठी जागा राहिलेली नाही. आता तस्करांची वक्रदृष्टी पडल्यामुळे खैराची आहे ती झाडे टिकवणेही अवघड झाले आहे.

गुजरातमध्ये संरक्षण
गुजरातमध्ये वनजमिनीवर अतिक्रमण कमी आहे. वनखात्यावर राजकीय दबाव फारसा येत नाही. लोक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक आहेत. नाशिक जिल्ह्यात असे सहकार्य चांदवड, कळवण, दिंडोरी भागातील लोकांचे मिळते. त्यामुळे तेथे वनसंपदा टिकून आहे.

गरज कडक कायद्याची
लाकडांची अवैध वाहतूक हा अजामीनपात्र गुन्हा आहे. खैराची झाडे परिपक्व होण्यास ५० ते १०० वर्षे लागतात. मात्र, इलेक्ट्रिक करवतीने ती कापण्यास काही सेकंद पुरसे ठरतात. तस्कर सापडलेच तरी शिक्षा फारतर दोन वर्षांपर्यंतच होते. दंडही पाच हजार रुपयांच्या पलिकडे नाही. शिक्षेची तरतूद वाढवावी, कायदा कडक करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सूत्रबध्द कार्यवाही
खैराची झाडे तोडणाऱ्या टोळ्या आवाज न करणाऱ्या इलेक्ट्रिक करवतीचा वापरतात. तस्करांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटच नव्हे तर चॅसीनंबरही बनावट असतात. गाडी पकडली गेली तरी मूळ मालकाचा शोध लागत नाही. तस्करीच्या गाड्यांच्या पुढे मोटारसायकली असतात. वनकर्मचारी, पोलिस नसल्याची खात्री केल्यानंतर ते ट्रकचालकाला निरोप देतात. नंतर गाड्या गुजरातला रवाना होतात. आरोपींना पकडण्यात वनकर्मचाऱ्यांना गुजरात पोलिसांचे सहकार्य मिळत नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

बडे व्यापारी मोकाट
गुजरातमध्ये झाडे तोडणे अवघड असल्याने तेथील व्यापारी पेठ, सुरगाणा, हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी परिसरातील गरीब लोकांना हाताशी धरून खैराची झाडे तोडतात. खैराची लाकडे गुजरातला नेल्यावर व्यापारी ती वैध करून घेतात. नंतर ही लाकडे गुटख्याच्या फॅक्टरीत नेली जातात. गुजरातमध्ये गुटखाविक्रीवर बंदी आहे. मात्र, त्याची निर्मिती केली जाते. त्यासाठी खैराची लाकडे वापरली जातात. वापीमधून मुंबईकडे व तेथून ती देशभरात पाठवली जातात. हे काम करणारी प्रशिक्षित टोळीच असून मुंबईपर्यंत मोठे व्यापारी गुंतले आहेत. ते कधीच पकडले जात नाहीत.

कर्मचाऱ्यांची गस्त
वनखात्याचे दोन ते तीन गाव मिळून एक बीट तयार होते. एका बीटासाठी एक वनरक्षक असतो. तीन बीट मिळून एक वनपाल तर चार बीटांच्या एका परिमंडळासाठी वनाधिकारी असतो. चार ते सहा परिमंडळ मिळून वनक्षेत्रपाल असतो. वनक्षेत्रपालाच्या अधिकाराखाली चार वनाधिकारी व कर्मचारी मिळून ४० ते ५० जणांचा स्टाफ असतो. त्यांच्या सहाय्याने मोठ्या परिक्षेत्रातील खैरांच्या झाडांचे रक्षण करणे अवघड असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर परिसरातून चोरट्यांनी एका अ‍ॅटोरिक्षासह दोन दुचाकी चोरी केल्यात. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
नागचौकातील जोशीवाड्यात राहणारे कृष्णा अशोक शिंदे यांची रिक्षा (एमएच १५ झेड ६४४१) चोरी झाली. जुना आडगाव नाक्यावरील सावली आईस्क्रीम कारखान्याजवळ १५ ऑगस्ट रोजी त्यांनी रिक्षा पार्क केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत. वाहनचोरीची दुसरी घटना सीबीएस परिसरात घडली. विकी रामदास बागुल (रा. गणेश चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकी मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सीबीएस भागात गेला होता. सीबीएस चौकातील व्होडाफोन स्टोअर्स समोर दुचाकी (एमएच १५ डीबी २९४३) पार्क करून तो मोबाइल दुकानात गेला असता चोरट्यांनी काही मिनिटातच त्यांची दुचाकी पळवून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. दरम्यान, इंदिरानगर परिसरातील गितांजली सोसायटीत राहणाऱ्या महेंद्र सुभाष बागुल यांची पल्सर (एमएच १८ एयू ४६०७) शुक्रवारी (दि. ८) रात्री त्यांच्या घरासमोरून चोरी झाली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार भामरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहिंग्या मुस्लिमप्रश्नी भारताने हस्तक्षेप करावा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
म्यानमार (बर्मा) येथून विस्थापित केल्या जाणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नात भारताने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जमाते उलेमा-ए-हिंद संघटनेने केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्यानुसार भारत मानवतावादी मूल्य जतन करणारा महत्त्वाचा देश आहे. देशातील मानवतेवर विश्वास ठेऊन मोठा मुस्लिम समुदाय देशात राहतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाने जमाते उमेला हिंद संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे योगदान दिले. म्यानमार देशात तेथील रोहिंग्या मुस्लिमाचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन सुरू आहे. त्यांना देशात आसरा दिला जावा. म्यानमार देशात तेथील सशस्त्र दबावातून मुस्लिमांचे स्थलांतर घडविले जात आहे. विशेषःत रोहिंग्या मुस्लिमांबाबत हा विषय गंभीर आहे. त्यामुळे रोहिंग्या मुस्लिम समाजाच्या विस्थापनाच्या विषयावर भारताने जागतीक पातळीवर म्यानमारच्या राजदूतांमाफर्त या विषयात हस्तक्षेप करावा व हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी खेडकर यांच्याकडे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एपीआय’च्या अंगावर घातली दुचाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना एका दुचाकीस्वाराने थेट सहायक पोलिस निरीक्षकाच्या (एपीआय) अंगावर दुचाकी घातली. ही घटना सातपूर आयटीआय सिग्नलवर घडली. यात वाहतूक शाखेच्या युनिट तीनचे सहाय्यक निरीक्षक सुरेश भाले जखमी झाले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणणे तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
वाहतूक शाखेचे कानिफनाख तुकाराम मोटकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. युनिट तीनचे सहाय्यक निरीक्षक सुरेश भाले आपल्या पथकासह आयटीआय सिग्नल भागात रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करीत असताना हा प्रकार घडला. विनाहेल्मेट भरधाव येणाऱ्या (एमएच ४१ एक्यू १४५०) वरील दुचाकीस्वारास पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव दुचाकीस्वाराने थेट पोलिस पथकावर दुचाकी घालून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रसंगावधान राखत अन्य कर्मचारी बाजूला झाले. परंतु, पुढे कारवाई करणाऱ्या भाले यांना दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात भाले यांच्या डोक्यास आणि पायास गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दुचाकीस्वार मयूर विजय देवरे (२०, रा. उमराणे, ता. देवळा) याच्याविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्वारका परिसरातील कांदा बटाटा भवन परिसरात जुगार खेळणाऱ्या सात जुगारींना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून सुमारे अडीच हजार रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कांदा बटाटा भवन पाठीमागील भिंतीजवळ काही युवक पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी गौरव गांगुर्डे (रा. वडाळा नाका) व त्याचे सहा साथीदार जुगार खेळताना आढळून आले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून पर्स लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
चार चाकी वाहनाची काच फोडून चोरट्यांनी पर्स चोरी केली. ही घटना तुपसाखरे लॉन्स परिसरात घडली. पर्समध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिने, घड्याळ, मोबाइल व महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे २५ हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
विलास शंकर सोळंके (रा. किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ) यांच्या फिर्यादीनुसार, सोळंके कुटुंबीय रविवारी तुपसाखरे लॉन्स येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावलेल्या त्यांच्या स्कार्पिओ (एमएच १८ एजे ९११९) गाडीची चोरट्यांनी काच फोडून चालकापाठीमागील आसनावर ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये रोकडसह सोन्या चांदीचे दागिने, मोबाइल, घड्याळ व महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज होता. घटनेचा अधिक तपास ससहायक पोलिस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images