Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अडीचशे कोटींचे गाजर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मनसेच्या सत्ताकाळातील दोनशे कोटींच्या रस्त्यांची बोंब असताना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नगरसेवकांमधील असंतोष कमी करण्यासाठी अडीचशे कोटींची रस्तेविकास योजना प्रस्तावित केली आहे.
निवडणुकीला सात महिन्यांचा कालावधी उलटला तरी प्रभागातील विकासकामे होत नसल्याने अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांमधील संताप कमी करण्यासाठी प्रत्येक प्रभागात साडेसात कोटींचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कामांची निविदा प्रक्रियाही राबवली जाणार असली तरी, प्रत्यक्षात या कामांना २०१८ उजाडणार आहे. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात त्याचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकासाठी ही लॉटरी असली तरी त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने साडेचारशे कोटी रुपये खर्चाची रस्ते व रिंगरोड विकासाची योजना राबविण्यात आली. यानंतर मनसेच्या सत्ता काळातील शेवटच्या टप्प्यात कॉलनी अंतर्गत रस्ते विकासासाठी १९५ कोटींची योजना राबविण्यात आली. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांचा विकास झाला आहे. या रस्त्यांचीच कामे अजून अपूर्ण आहेत. काही ठिकाणी अस्तरीकरण तर काही ठिकाणी तिसरा चौथा लेअर बाकी आहे. सिंहस्थातील काही रस्तेही अपूर्ण आहेत. मनसेची सत्ता जावून महापालिकेत भाजप सत्तारुढ झाली आहे. महापालिकेत भाजपला बहुमत मिळाले असले तरी, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच विकासकामांसाठी चाचपडत आहेत. सत्ता येऊन सात महिने झाले तरी नगरसेवकांची विकासकामे होत नाहीत. त्यामुळे भाजपच्याच नगरसेवकांमध्ये असंतोष असून त्यांनी पालकमंत्र्याकडे बोलून दाखवला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांचा असंतोष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिजोरीत खडखडाट असताना नव्याने शहरात अडीचशे कोटींची रस्ते विकास योजना हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे बोट दाखवण्यात आले असून त्यांच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा करण्यात आल आहे. पंरतु, हा केवळ नगरसेवकांचा असंतोष कमी करण्यासाठीचा अट्टाहास असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण
महापालिकेने रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. सुमारे २०० किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती या माध्यमातून केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात किमान ७.५ कोटींच्या रस्त्यांचा विकास होणार आहे. डांबरी तसेच सिमेंटचे रस्ते केले जाणार असून त्यासाठी प्रामुख्याने नव्याने विकसित झालेल्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच जुन्या वसाहतीतील पाच ते दहा वर्षे जुन्या रस्त्यांचे अस्तरीकरण केले जाणार आहे. प्रस्तावित रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. प्रत्यक्ष कामांना एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात होऊ शकेल, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता यू. बी. पवार यांनी दिली. त्यामुळे केवळ गाजरच ठरण्याची शक्यता अधिक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा लिलाव ठप्प

0
0

म. टा. खास, प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवडसह मोठ्या बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी लिलाव झाले नाहीत. मालेगाव येथे शुक्रवारची सुटी असल्यामुळे बाजार समिती बंद होती. मनमाड, सटाणा वगळता कोठेही लिलाव झाले नाहीत. काही बाजार समित्यांना दोन दिवस सुटी आल्याने सोमवारीच लिलाव सुरू होऊ शकणार आहेत.
मनमाड व सटाणा येथे झालेल्या कांदा लिलावात मात्र कांद्याच्या किमतीत कोणतीही घसरण व वाढ झाली नाही. या दोन्ही बाजार समितीत भाव स्थिरच राहिले. मनमाड येथे किमान ७०० रुपये क्विंटल तर कमाल भाव १ हजार ३५१ रुपये क्विंटल होते. या बाजार समितीत सरासरी भाव मात्र १ हजार १९० रुपये क्विंटल होता. सटाणा येथेही लिलावात फारसा फरक नव्हता. येथे किमान दर ९०० रुपये क्विंटल तर कमाल भाव १ हजार ४०० रुपये क्विंटल होता. या बाजार समितीत सरासरी भाव मात्र १ हजार २०० रुपये क्विंटल होता. शनिवार व रविवारी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद असणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर या बाजार समितीत लिलाव सुरू होणार आहेत.
कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी या धाडी टाकल्या असल्या तरी त्यामुळे कांद्याची बाजारपेठ ठप्प झाली. विशेष म्हणजे यातील सर्वच व्यापारी मोठे खरेदीदार असल्याने ती सुध्दा अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कांद्याची मोठी बाजारपेठ असून, देशात व परदेशातही येथून कांदापुरवठा केला जातो. त्यामुळे येथील लिलावाचे परिणाम भाववाढीवर होऊ शकतात. त्यामुळे हे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. व्यापाऱ्यांवर पडलेल्या धाडीने लिलाव ठप्प झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे.

नाशिकला मार्केट सुरळीत
पंचवटी : नाशिक जिल्हाभरात कांदा मार्केट बंद असताना नाशिक बाजार समितीत कांद्याचे व्यवहार सुरळीत सुरू होते. जिल्ह्याच्या तुलनेत नाशिकला कांद्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी प्रमाणात असतात. सध्या नाशिक मार्केटमध्ये १० ते १३ रुपये प्रति किलो असा कांद्याला दर मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध निर्यातीमध्ये जगात भारत अव्वल

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारत हा औषध निर्यातीमध्ये फार्मसी ऑफ वर्ल्ड झाला असून २०० देशात औषधांचा पुरवठा आता आपल्याकडून होतो. या पुरवठ्यातून वर्षभरात २ लाख कोटी व्यवयास होतो. येत्या तीन वर्षात तो दुप्पट होईल त्यामुळे या व्यवसायाकडे नाशिकच्या केमिस्टने सहभाग घेवून कायद्याच्या चौकटीत आपला व्यवसाय वाढवावा त्यासाठी कायदेशीर मदत ही अन्न औषध प्रशासनाकडून देण्यात येईल, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त ओमप्रकाश सादवाणी यांनी केले.

नाशिक जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सादवाणी बोलत होते. ते म्हणाले, की फार्मसी व्यवसायत मी सुद्धा काम केले आहे. पेशंटची सेवा करणे हे महत्त्वाचे आहे. त्यांना चांगल्या दर्जाचे औषध मिळावे यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा असून तुम्ही कस्टोडियन आहात. लायसन्स असलेला कोणाताही विक्रेता नकली औषध विकत नाही. पण लायसन्स नसलेले असले उद्योग करतात. त्यामुळे त्यांना रोखण्याची गरज आहे. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या पिस्क्रिप्शन घेऊन आणि बील देऊनच औषधाची रुग्णांना विक्री करावी. या व्यवसायात कायदेशीर काम करावे आणि आपला व्यवसाय वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सादवाणी यांचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव चौधरी यांनी सत्कार केला. योगेश बागरेचा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपेंद्र दिनानी, जगदीश भोसले, संजय अमृतकर, अतुल दिवटे, महेंद्र शहा, सुरेश अहिरे यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स हाउसिंग फेस्ट’चा आजपासून धमाका

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आपल्या बजेटमधील घरे, रो-हाउसेस, फ्लॅट्स, प्लॉट्स यासारख्या प्रॉपर्टीजची माहिती एकाच ठिकाणी मिळविण्याची संधी चालून आली आहे. टाइम्स ग्रुपतर्फे शनिवारपासून त्र्यंबक रोडवरील हॉटेल एमरल्ड पार्कमधील ग्रीन व्ह्यू हॉलमध्ये ‘टाइम्स हाउसिंग फेस्ट नाशिक’ होणार आहे.
‘टाइम्स हाउसिंग फेस्ट नाशिक’ या प्रॉपर्टी प्रदर्शनातून ही संधी उपलब्ध झाली आहे. शहर व परिसरातील नामांकित बांधकाम विकसकांचे प्रकल्प एकाच ठिकाणी या प्रदर्शनातून पाहता येणार आहे. नवरात्रोत्सव, दिवाळी असे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सण उत्सवाच्या या काळात ग्राहकांचा गृहखरेदीकडे मोठा ओढा असतो. तसेच बांधकाम विकसकांकडूनही वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्सची बरसात सुरू करण्यात आली आहे. जीएसटी नाही, पाच ते दहा लाख रुपयांची सूट, कार फ्री अशा अनेक आकर्षक ऑफर्सचा यात समावेश आहे. नोटबंदी व रेराच्या अवलंबानंतर रिअल इस्टेट मार्केट डळमळीत झाले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रिअर इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी एक पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये सुमारे १७ बिल्डर्स शंभरपेक्षा जास्त प्रोजेक्ट घेऊन सहभागी होणार आहेत. ग्राहकांना एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पाची माहिती उपलब्ध व्हावी असा त्या मागील उद्देश आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या फेस्टला भेट देऊन आपल्या मनात असलेले घर बुक करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिपचे चार शिक्षक बडतर्फ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कामात गैरवर्तणूक, नियमबाह्य वर्तन, अनधिकृत गैरहजेरी, विद्यार्थ्यांसमोर मारहाण करणे अशा गंभीर कारणांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या चार शिक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. यातील तीन शिक्षक पेठ तर एक शिक्षक सुरगाणा तालुक्यातील आहे. बडतर्फीचे अजून सुमारे दहा प्रस्ताव रांगेत असून येत्या महिनाभरात या शिक्षकांवरही कारवाई होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
शिक्षकांना विद्यार्थी आदर्श मानत असले तरी त्यांच्या कृतींनी विद्यार्थ्यांमध्येही सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई झाल्यानंतर अशा अनेक मारकुट्या शिक्षकांचे प्रताप समोर आले आहे. यामध्ये मुख्याध्यापकांच्या अंगावर धावून जाणे, विद्यार्थ्यांसमोर मारहाण करणे, अर्वाच्य भाषेचा शाळेत वापर करणे, विद्यार्थ्यांचा अभ्यास विहित वेळेत पूर्ण न करणे, शाळेतील संगीत कॅसिओची तोडफोड करणे अशा अनेक कारणांनी बडतर्फीचा बडगा जिप अधिकाऱ्यांकडून उचलण्यात आला आहे. यामध्ये पेठ तालुक्यातील अरुण भगवान चव्हाण, लक्ष्मण नवसू खाडस, जगन्नाथ सुपडू घृणावंत आणि सुरगाणामधील चंदर उखा चौधरी या शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांप्रमाणेच येत्या महिनाभरात आणखी दहा शिक्षकांवर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार असून तसेच प्रस्तावही शिक्षण विभागाने दिले आहेत. कारवाई झालेल्या शिक्षकांना पेठ तालुक्यातील शिक्षकांची संख्या मोठी असून इगतपुरी, निफाड, दिंडोरी, नांदगाव, चांदवड, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे येत्या काळात असे वर्तन करणाऱ्या शिक्षकांच्या वर्तणुकीला चाप बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यांची रोखली वेतनवाढ
हिरामण रामदास बैरागी यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद, मंगला पुरुषोत्तम गवळी यांची तीन वेतनवाढी कायमस्वरूपी बंद, जिभाऊ पंडित सोनजे यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद, मिलिंद प्रल्हाद गांगुर्डे, मधुकर गंभीर अहिरे, नाना वसंत गंगावणे आणि दिनकर आधार पवार यांच्या दोन वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय, नांदगावमधील घनश्याम बाबुराव पाटील व चांदवड तालुक्यातील सुनंदा राणोजी जाधव या दोन शिक्षकांना त्यांच्या वर्तणूक सुधारण्याची ताकीद देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेतून काढलेले चार लाख लांबवले

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
लासलगाव येथील दत्ताजी पाटील सहकारी बँकेतून मुलाच्या फ्लॅट खरेदीसाठी काढलेले चार लाख रुपये चोरट्यांनी पल्सरवरून येत लंपास केल्याची घटना घडली.
अण्णासाहेब सीताराम सुरवाडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. सुरवाडे यांनी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेतून सकाळी चार लाख रुपये काढले. घरी परतत असताना गणेशनगरजवळ पल्सरवरून आलेल्या तरुणांनी तुमचे पैसे पडल्याचे सांगत त्यांच्याकडे असलेली पैशांची बॅग ओढून नेली. सुरवाडे यांनी आरडाओरड केला; परंतु तोपर्यंत दुचाकीस्वारांनी पोबारा केला. मुलाच्या फ्लॅट खरेदीसाठी त्यांनी बँकेतून पैसे काढले होते. चोरट्यांनी बँकेपासून सुरवाडे यांच्यावर पाळत ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अत्यंत गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

उगावमधील मंदिरात चोरी
निफाड : उगाव येथील मध्यवस्तीत असलेल्या श्रीराम विठ्ठल मंदिरात दानपेटी फोडून चोरी झाल्याची घटना घडली. भाविकांनी गुरुवारी (दि. १४) रात्री आरतीनंतर मंदिराचे सर्व दरवाजे कुलुपबंद केले होते. भाविक शुक्रवार (दि. १५) पहाटे काकड आरतीसाठी मंदिरात दाखल झाले त्यावेळी मंदिराचे प्रवेशद्वार व आतील गाभाऱ्यापर्यंतचे दोन दरवाजांची कुलुप तोडून दरवाजे उघडे दिसले. मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याचे भाविकांना आढळले. भाविकांनी मंदिराभोवती गर्दी केली. दुपारच्या सुमारास मंदिरातील चोरीस गेलेली दानपेटी निफाड रोडलगत शिवडी शिवारातील शेतात आढळून आली.

अपघातात दोघे ठार
निफाड : येवला येथून विंचूरला येत असलेल्या दोघा मोटरसायकलस्वारांचा पाठिमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. सुनील बाबुराव गारे (४३, रा. चांदवड) आणि मोहम्मद मन्सूर आलम (५२, रा. कोलकाता) हे डाळिंबाचे व्यापारी येवल्याहून विंचूरला कामानिमित्त जात होते. त्यांना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरात धडक दिली. यात दुभाजकावर फेकले गेल्याने दोघेही जागीच ठार झाले. अपघातात मोटरसायकल चक्काचूर झाली. निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ पाटील यांनी शवविच्छेदन झाल्यानंतर त्या दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावजवळ गोवंश मांस जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
केळीची वाहतूक करीत असल्याचा बनावाद्वारे गोवंश जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणाऱ्या धुळे येथील टोळीस येथील पोलिसांनी गजाआड केले. पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने व अजित हगवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मुंबई-आग्रा महामार्गवरील चाळीसगाव फाट्याजवळ शालिमार हॉटेल येथे सापळा रचून धुळेकडून मुंबईच्या दिशेने जणारा टेम्पोची (एमएच ०४ सीपी १७६९) तपासणी केली. यावेळी गाडीत केळीचे फांद्यांखाली तीन लाख रुपयांचे तीन हजार किलो गोवंश जनावरांचे मांस भरलेले प्लास्टिक १५ ड्रम आढळून आले. दोन आरोपी टेम्पो चालवित होते तर अन्य दोघे त्यांना टेम्पो सुरक्षितरित्या नेता यावा यासाठी कारने (एमएच १८ क्यू ००७१) टेहळणी करीत होते. धुळे येथील मुश्ताकीन अय्युब कुरेशीच्या सांगण्यावरून ही वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी शेख अहमद शेख इमान (रा. जळगाव), अफजल खान यासिन खान (रा. मालेगाव), मुजाहिद आयुब कुरेशी (रा. धुळे) आणि इंडिगोचालक जुनेद कुरेशी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड-पिंपळगाव मार्गाचा होणार कायापालट

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
निफाड-पिंपळगाव या खड्डेमय झालेल्या मार्गाच्या दुरुस्तीस सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर सुरुवात केली आहे. या मार्गासह निफाड तालुक्यातील अन्य रस्त्यांची चाळण झाल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. पिंपळगाव मार्गावरील दावचवाडी गावातील मोठे खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
गुजरातमधील साईभक्तांच्या सूरत-शिर्डी मार्गात निफाड-पिंपळगाव हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र, याच मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे ‘मटा’ने लक्ष वेधल्यानंतर निफाडचे आमदार अनिल कदम यांनी गेल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांच्यासह अधिकारी डी. एस. पवार, महेश पाटील यांना सोबत घेऊन तालुक्यातील रस्त्यांचा खडतर प्रवास स्वतः घडवून आणला. यानंतर निफाड येथे पत्रकारपरिषद घेत तालुक्यातील रस्त्यांसाठी मंजूर असलेला निधी व दुरुस्तीच्या कामांचा निधी याबाबत माहिती दिली.
निफाड तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण, मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते आणि पिंपळगाव निफाड या मुख्य रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्डयाचे साम्राज्य यामुळे वाहतूक व्यवस्थेवर झाला होता. विशेषतः निफाड-पिंपळगाव मार्गाबाबत लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया होत्या. दावचवाडी या गावाजवळ तर पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नदी वाटावी इतके मोठे निर्माण झाले होते. बांधकाम विभागाने या ठिकाणचे खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे. या मार्गाचे लवकरच रुंदीकरण केले जाणार आहे. नामपूर-सिन्नर अंतर्गत निफाड तालुक्यातील हद्दीपर्यंत या मार्गासाठी १४७ कोटी रुपयांचे टेंडर निघणार आहे.

स्वतःच करणार रस्त्यांची कामे
अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामाला मंजुरी आहे. मात्र जीएसटीमुळे ही कामे करणे परवडत नाही यासह अन्य कारणांमुळे ठेकेदार कामे करण्यास तयार नाहीत. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या. एकाच कामाच्या चार-चार वेळा निविदा काढूनही कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे ही कामे करण्याचे सूतोवाच बांधकाम विभागाने दिले आहे. परंतु, या कामांसाठी अधिकारी वर्ग पैसा कुठून उपलब्ध करणार असा प्रश्न आहे.

अशी आहेत मंजूर कामे आणि निधी
- चांदवड-निफाड मार्ग : ६० कोटी
- पिंपळगाव-निफाड-नांदूर मध्यमेश्वर रुंदीकरण : १४७ कोटी
- निफाड-शिवडी-भोयेगाव-गणूर-चांदवड : १७ लाख ३० हजार
- निफाड रेल्वे स्टेशन-रानवड-खडकजांब मार्ग : ७२ लाख ६६ हजार
- मोहाडी-साकोरे-शिरसगाव-वडाळी-पिंपरी कोठुरे : २९ लाख
- पिंपळगाव-निफाड-सिन्नर : १९ लाख ९३ हजार
- शिरवाडे-वणी-पिंपळगाव ते वडाळी-कसबे सुकेणे : ६५ लाख
- चाटोरी-सायखेडा-भुसे-मांजरगाव : २९ लाख आठ हजार
- पिंपळगाव-पालखेड-लासलगाव-मनमाड : दोन कोटी ४६ लाख
- मोहाडी-कोकणगाव-शिरसगाव-वडाळी-पिंपरी कोठुरे : दोन कोटी ८९ लाख
- ओझर-सुकेणे-पिंपळस-कोठुरे : दोन कोटी ८९ लाख
- ओझर-सायखेडा-पांचाळे-वावी : दोन कोटी ८६ लाख ८० हजार
- सुकेणे-पिंपरी मार्गावर बाणगंगा नदीवर पूल : चार कोटी ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्मलवारीवर शिक्कामोर्तब

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वरच्या निर्मलवारीसंदर्भात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव होऊन जिल्हा प्रशासनाला प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दीड कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवाल मंजूर झाला आहे. त्यासाठी शासकीय स्तरवर मुख्यमंत्री निधीतून खर्च मंजुरीचे प्रतीक्षा आहे.

पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर आषाढी कार्तिकी वारीनंतर मानवी मलमूत्रामुळे निर्माण होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी निर्मलवारीचा प्रयोग यशस्वी ठरला. तोच धागा पकडत वनवासी कल्याण आम या स्वयंसेवी संस्थेने त्र्यंबकेश्वर येथे पौषवारी म्हणजेच श्री संत निवृत्तीनाथांच्या यात्रेत हा उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. त्र्यंबकच्या या यात्रोत्सवात किमान पाच लाख भाविक हजेरी येतात. दशमी एकादशी आणि द्वादशी असा सलग तीन दिवस शहरात लाखोंचा राबता राहतो. यात्रा नियोजनात स्वच्छतागृहांची तात्पुरती सुविधा केली जाते. मात्र, ती अत्यंत तुटपुंजी ठरली. भाविक परतल्यानंतर स्थानिक नागरिकांना दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागतो. शहरालगत मोकळ्या जागेचा वापर उघड्यावर शौचास बसण्यासाठी होत असे. शहराचा विस्तार वाढला तसा लगतच्या माळरानांवर रहिवासी वस्ती होत आहे. जागोजाग कुंपणांचा वेढा वाढला आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्वच्छतागृहाची निकड भासते. सद्यस्थितीला असलेली मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था गरजेपेक्षा अनेक पटींनी कमी आहे. निर्मलवारीच्या प्रयोगातून यात्रेतील समस्या दूर होणार आहे.

प्रत्यक्ष भेटीतून सर्वेक्षण
वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या माध्यमातून सेवाभावी व्यक्ती एकत्र आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर येथे वारंवार भेट दिली आणि माहिती जाणून घेतली. यात्रोत्सवात स्वच्छतागृहाची गरज असलेली नेमकी किती ठिकाणे आहेत आणि तेथे कशा प्रकारे योजना होईल याचा आराखडा तयार केला. यामध्ये नगरपालिका शहर अभियंता आणि नगरसेवक यांची मदत घेतली. त्यानंतर पालिकेने प्रकल्प अहवाल तयार करून त्याची मंजुरी घेतली आहे.

१३ ठिकाणांची निवड
यात्रोत्सव कालावधीत १३ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गर्दीचे ठिकाण आहे तसेच रस्त्यांचा बाजुचाही समावेश केला आहे. गरजेप्रमाणे त्या-त्या भागात एकूण १६०० टॉयलेट ब्लॉक ठेवण्यात येणार आहेत. या सेवाभावी कार्यासाठी तीन हजार स्वयंसेवक आपले योगदान देणार आहे.

दररोजची निर्मलवारी कधी?
शहरात दररोजच भाविकांची अलोट दाटी होत असते. मंदिर परिसरात एकमेव शौचालय आहे. त्याची दुरवस्था झालेली आहे. तेथून पुढे कुशावर्तावर तीन मजली वस्त्रांतरगृहासह स्वच्छतागृह आहे; मात्र त्याची भाविकांना माहितीच होत नाही. सकाळी भाविक मेनरोड परिसरात रहिवांशाच्या घरात याची विचारपूस करतात. वाहनतळ परिसरात अद्यापही हागणदारी असल्याचे चित्र कायम आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने भाविकांची खास करता महिला भाविकांची होणारी कुचंबना दूर झालेली नाही.

निर्मलवारीसाठीचा कामनिहाय अपेक्षित खर्च
टॉयलेट ब्लॉक, फिटिंग, व्हॅक्युम एमटीआर : ६७ लाख २० हजार
जलनिस्सारण प्रक्रिया केंद्र सक्षमीकरण : १८ लाख
एलईडी लाईट : १६ लाख
मनुष्यबळ : १३ लाख ५० हजार
जमीन सपाटीकरण, जागा तयार करणे : १२ लाख
प्रचार प्रसिद्धी बॅनर : पाच लाख
भोजन खर्च : साडेचार लाख
निवास व्यवस्था : चार लाख २० हजार
वाहतूक : तीन लाख
पाणीपुरवठा : एक लाख १० हजार
मजुरी / मनुष्यबळ खर्च : ६७ हजार ५००
वीज खर्च : ५७ हजार ५७५
एकूण : एक कोटी ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंठशहनाईवाद सिन्नरकर यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ज्येष्ठ कंठशहनाईवादक गोकुळ नीळकंठ सिन्नरकर यांचे खुटवडनगर, यमुनानगर येथील घरी शुक्रवारी पहाटे २ वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

कंठशहनाईवादक म्हणून पंचक्रोशीत सिन्नरकर परिचित होते. सनई वाद्याशिवाय केवळ कंठाद्वारे स्वरनिर्मिती करून कंठशहनाई ते सादर करीत. १९८० च्या दरम्यान श्याम पाडेकर, हेमंत शिंगणे, सुधीर करंजीकर यांनी एकत्र येऊन गणेशोत्सवाच्यानिमित्ताने ‘रसिका तुझ्याचसाठी’ हा प्रथम कार्यक्रम सादर केला. तेव्हापासून गोकुळ सिन्नरकर कंठशहनाईवादक म्हणून सर्वांना परिचित झाले. पुढे बागेश्री वाद्यवृंदाच्या माध्यमातून त्यांनी ३०० हून अधिक कार्यक्रम केले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यांनी ‘छंदातून आगळा आनंद’ या नावाने मुलाखतीच्या माध्यमातून सुमारे पाचशे प्रयोग केले. त्यांचा स्वभाव मुळातच विनोदी असल्याने कंठशहनाई वादनाच्या वेळी घडलेले किस्से ते कार्यक्रमाच्या वेळी सांगत. ‘छोटाभाई’ आणि ‘भाभी की चूडियाँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. तसेच ‘क्रांतिचक्र’, ‘शिल्परंग’ आणि ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. मैफलींमध्ये उत्तम निवेदकाची भूमिका ते पार पाडत. राज्यनाट्यस्पर्धेत त्यांना पार्श्वसंगीताचे प्रथम पारितोषिक प्राप्त होते. सिन्नरकर यांनी सुवर्णकार समाजाच्या एका मासिकाचे कार्यकारी संपादकाची जबाबदारीही सांभाळली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांची बदली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देवीकर यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कैलास पाटील यांची नियुक्ती झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच पध्दतीने राजेंद्र कुटे यांच्याकडील कारभार देवीकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत गुरुवारी सकाळी चार चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर देवीकर यांची बदली झाल्याचे सांगितले जाते. या तत्कालीक कारणांव्यतिरिक्त देवीकर यांच्या कार्यपध्दतीवर वरिष्ठ नाराज होते. गंगापूररोड परिसरातील अनेक तक्रारदार थेट पोलिस आयुक्तालयात धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडत असल्याचे वारंवार पुढे आले. पोलिस स्टेशन पातळीवर काम होत नसल्याने तक्रारदारांना वरिष्ठांकडे जावे लागत असल्याचे यातून प्रतित होत होते, असे सूत्रांनी सांगितले. प्रशासकीय कामांना गती नव्हती, असेही बोलले जाते. त्यातच एकाच दिवशी झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांनंतर देवीकर यांची बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. देवीकर यांच्या जागी वाहतूक विभागाच्या युनिट चारचे पोलिस निरीक्षक कैलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्याकडील कारभार काढून देवीकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तर, कुटे यांना त्याच पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

0
0

शिवसेनेकडून धुळ्य ात निषेध

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेकडून धुळ्यात निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी व महानगरप्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. १६) शहरातून मुख्य रस्त्यावरून बैलगाडीत मोटारसायकल मिरवत हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने वाढवलेले पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याचा शिवसेना निषेध करीत असून, सरकारने या दरवाढीला मागे घ्यावे, या मागणीसाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार पेट्रोल डिझेल व गॅस सिलिंडरसोबत आता अन्न धान्यांच्या किमतीतदेखील वाढ होत असल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे, असेही यावेळी आंदोलकांनी सांगितले.

तीव्र आंदोलन करणार

नोटबंदीचा फटका आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या त्रुटी कायम असून, त्यात आता महागाईने भडका घेतला आहे. पेट्रोल, डिझेल गॅसचे भाव कमी करण्याऐवजी मोदी सरकारने भाववाढ केली आहे. त्यामुळे हे सरकार देशात महागाई कमी करण्यास अपयशी ठरल्याचे जिल्हाप्रमुख माळी यांनी सांगितले. त्यामुळे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आता रस्त्यावर उतरली आहे. येत्या काही दिवसांत महागाईचा उच्चांक कमी झाला नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गंगाधर माळी, संजय गुजराथी, राजेंद्र पाटील, सुनील बैसाणे, पंकज गोरे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलीचा विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दमदाटी करून शाळेच्या बसमध्ये घुसलेल्या युवकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केला. ही घटना दिंडोरीरोडवरील वडनगर भागात घडली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून, तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी तरुणाने मुलीला दिली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास पोलिसांनी अटक केली.

संजय शेरसिंग करणसिंग एैर (रा. बोरगड, म्हसरूळ) असे या संशयिताचे नाव आहे. अवतार पॉईंट भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीस संजय मागील तीन महिन्यांपासूत्न त्रास देतो. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून त्याने पीडित मुलीला एसएमएस केले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पी‌डित मुलगी शाळेच्या बसमधून घरी परतत असताना वडनगर भागात संशयिताने चालकास दमदाटी करीत बस थांबवली. त्यानंतर त्याने युवतीच्या तोंडावर पाणी फेकत विनयभंग केला. त्याने मुलीला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. युवतीने घरी जाऊन हा प्रकार सांगितला असता कुटुंबातील सदस्यांनी तिला लागलीच म्हसरूळ पोलिस स्टेशनला आणले. संशयितास पोलिसांनी गजाआड केले असून, अधिक तपास उपनिरीक्षक जोपळे करीत आहेत.

विवाहितेचा विनयभंग

सोशल मीडियावरील मैत्रीच्या माध्यमातून परजिल्ह्यातील तरुणाने विवाहितेचा विनयभंग केला. व्हॉट्सअॅपवर केलेली चॅटिंग तरुणाने पतीस दाखविण्याची धमकी देत थेट घर गाठून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला.

महेंद्र नागरे असे संशयित आरोपीचे नाव आहे. जेलरोड भागातील बोराडे मळा परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, साधारणतः सहा महिन्यांपूर्वी पीडित महिलेची आणि संशयितेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. सतत चॅटिंग होत असल्याने दोघांमध्ये व्हर्चुअल मैत्री झाली. दोघे एकमेकांशी नेहमी फोनवरही बोलत असत. या काळात दोघांमध्ये अश्लिल मॅसेजचीही देवाण घेवाण होत होती. या दरम्यान संशयित तरुणाने महिलेच्या वास्तव्यासह सर्व माहिती संग्रहित करून तिचे घर गाठले. यावेळी त्याने पतीस चॅटिंग व मॅसेज दाखविण्याची धमकी देत विनयभंग केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक हांडोरे करीत आहेत.

नाशिकरोडला घरफोड्या

नाशिकरोड परिसरात गुरुवारी लोखंडे मळा व चेहडी भागात एकाच दिवशी भरदिवसा झालेल्या वेगवेगळ्या दोन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सुमारे दोन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी उपनगर व नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

जुना सायखेडा रोड भागातील राजेंद्र शामगीर गोसावी (रा. सहारा दीप अपार्ट. लोखंडे मळा) यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी गोसावी कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच लोखंडी कपाटातील लॉकरमधील रोकड, घड्याळ व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

दुसरी घटना चेहडी शिवपरिसरातील खर्जुल मळा भागात घडली. येथील प्रगती प्राईड, गजानन पार्कसमोर राहणारे दीपक नाकराणी आपल्या कुटुंबीयांसमवेत गुरुवारी सकाळी घराबाहेर पडले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून लॉकरमधील रोकड व दागिने असा सुमारे ७७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

मोबाइल, पर्सची चोरी

उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी दोन मोबाइलसह पर्स चोरी केली. भिला गणेश जाधव (रा. लवटेनगर जयभवानीरोड) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (दि.१) जाधव कुटुंबिय कामात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकीद्वारे हात घालून टेबलावर ठेवलेले दोन मोबाइल आणि पर्स चोरून नेली. पर्समध्ये रोकडसह कानातील झुमके असा सुमारे ४९ हजार रुपये किमतीचा ऐवज होता. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार विंचू करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसेसना थांब्यांचे वावडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शहर बससेवा तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत एसटी महामंडळाने शहरातील जवळपास ४० ते ४५ टक्के बसफेऱ्या कमी केल्या आहेत. त्यामुळे बहुतांश शहर बसथांब्यांवर प्रवाशांना तासन् तास वेटिंग करावे लागत असून, अनेक चालकांकडून थांब्यावर बस न थांबविण्याचे प्रकारही घडत आहेत. चालकाच्या मुजोरीमुळे बसमध्ये चढताना सहा विद्यार्थी खाली पडल्याचा असाच धक्कादायक प्रकार आडगाव येथे घडल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आडगाव येथील बसथांब्यावर शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांची मोठी गर्दी बघून चालकाने बसचा वेग मंद करीत न थांबताच बस पुढे दामटली. त्यावेळी बसमध्ये बसणारे सहा विद्यार्थी या बसमधून खाली पडले. त्यातील एक विद्यार्थी बससोबत फरफटत पुढे जात असल्याचा ओरडा विद्यार्थ्यांनी केल्यावर चालकाने बस थांबविली. यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नसली, ती चालकाची मुजोरी पाहून स्थानिकांनी बस अडवून चालकाला जाब विचारत धक्काबुक्की केली. एसटी कर्मचारी व स्थानिकांची बाचाबाची झाल्याने येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

एसटी कर्मचाऱ्यांनी आडगाव येथून जाणाऱ्या-येणाऱ्या बसेस या परिसरात उभ्या केल्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांना बसफेऱ्या वाढवून देण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर हा वाद मिटला.

--

फेऱ्या घटविल्याने हाल

एसटी महामंडळाने शहर बससेवा तोट्यात असल्याने ती बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले असून, शहर बससेवा महापालिका प्रशासनाने चालवावी असा रेटा लावला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून शहर बससेवा चालविण्यासाठी असमर्थता दर्शविली जात आहे. मात्र, या दोघांच्या वादात बसफेऱ्यांचे प्रमाण घडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

--

बस न थांबविल्याने धावपळ

आडगाव परिसरात समाजकल्याण विभागाचे एक हजार मुलांचे वसतिगृह, मेडिकल कॉलेज, भुजबळ नॉलेज सिटी, न्यू इंग्लिश स्कूल शाळा, महापालिका शाळा असल्याने विद्यार्थ्यांचा मोठा वावर परिसरात असतो. शहर परिसरातील शाळा-कॉलेजेसमध्येही मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. नियमितपणे प्रवास करणारे प्रवासी व मासिक पासधारकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. एकाच वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशावेळी एखादी बस थांब्यावर न थांबता गेल्यास गर्दी वाढत जाते. त्यामुळे धावपळीत दुर्घटना होण्याची भीती शुक्रवारच्या घटनेनंतर अधोरेखित झाली आहे.

--

एक-एक तास वेटिंग

शहर बसच्या फेऱ्या जवळपास ४० ते ४५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. पूर्वी बस थांब्यावर उभे राहिल्यानंतर १५ मिनिटांत दुसरी बस यायची. पण, अनेक दिवसांपासून बसफेऱ्या कमी झाल्याने एक-एक तास बस मिळत नाही. त्यामुळे मासिक पासधारक कर्मचारी आणि विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. या मार्गावरून नाशिक ते ओझर ४५ आणि नाशिक ते सय्यदपिंप्री १२ अशा बसफेऱ्या सध्या सुरू आहेत. मधल्या मार्गांच्या बहुसंख्य फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

--

चालक-वाहकांची मुजोरी

एसटीचे काही चालक-वाहक एसटी आपल्याच मालकीची असल्याच्या आविर्भावात वावरत असतात. शाळा-कॉलेजेसच्या वेळेमध्ये गर्दी बघून थांब्यावर सिटी बसेस थांबविणे टाळले जाते. तेथे उतरणारे प्रवासी असल्यास बस मागे किंवा पुढे थांबतात. परिणामी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची बस पकडण्यासाठी धावपळ होते. त्यामुळे बऱ्याचदा अपघात घडतात. पण, एसटीच्या कर्मचाऱ्यांना कुठलेही सोयरसुतक नसते. त्यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहर बसससेवा सर्व्हिसरोडने सुरू झालेली आहे. मात्र, अनेक चालक बस सर्रासपणे महामार्गावरून नेत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

--

आडगाव परिसरात शैक्षणिक संस्था मोठ्याप्रमाणात असल्याने सकाळी ७ ते १२ या वेळेत विद्यार्थी संख्या मोठी असते. अपुऱ्या बसेसमुळे अनेक विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजाला लटकून धोकादायक प्रवास करावा लागतो.

-पोपट शिंदे , स्थानिक रहिवासी

--

बसफेऱ्या कमी केल्यापासून बऱ्याचदा परिसरात बस थांबत नाहीत. आमचा विद्यार्थी पास असतो, त्यामुळे इतर वाहनांनी प्रवास करू शकत नाही. कॉलेजमध्ये उशीर झाल्यास शिक्षक आम्हाला बसू देत नाहीत. त्यामुळे नाहक गैरसोय होते.

-गौरव लभडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंदीकरणाच्या कामाला मुहूर्त कधी?

0
0

आडगावकरांची वर्षभरानंतरही समस्या कायम

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव गावातील जुना महामार्ग व गावातील मुख्य रस्ता हा अद्यापही राष्ट्रीय महामार्ग यांच्या अखत्यारीत येतो. राष्ट्रीय महामार्ग जरी गावाच्या बाहेरून जात असला तरी आडगाव गावातील हा रस्ता अजूनही बांधकाम विभागाने महापालिकेकडे हस्तांतरित केलेला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाकडे दोन्हीही विभागांनी दुर्लक्ष केल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

याबाबतचे वृत्त 'मटा'ने मागीलवर्षी प्रसिद्ध केले होते. पण गावाच्या विकासात केंद्रस्थानी असलेल्या या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी अद्यापही दुर्लक्षच केले आहे. स्थानिक नागरिकांकडून अनेकवेळा याबाबत पाठपुरावा केला गेला. पण ढीम्म झालेल्या प्रशासनाकडून या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुहूर्त केव्हा लागणार, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

आडगाव हे पारंपारिक असून पूर्वी गावाची लोकसंख्या मर्यादित होती. पण जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेस २३ खेड्यांचा यामध्ये समावेश केला गेला. पण शहरापासून टोकाला असलेल्या या गावाच्या विकासात प्रशासनाचे व लोकप्रतिनिधी यांचे कायम दुर्लक्ष झाले आहे. नागरी सुविधांबाबत परिसरातील नागरिकांना नेहमीच प्रशासनाकडे मागणी करावी लागली आहे. अनेकवेळा मागणी करूनही काही समस्या अद्यापही कायम असल्याचेही नागरिकांनी बोलताना सांगितले. त्यामुळे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात मुसळधार पाऊस

0
0

शहरात २४ तासांत ५० मिमीहून अधिक पाऊस

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत जेमतेम झालेला पाऊस गेल्या पंधरा दिवसांत चांगलाच मेहेरबान झाला आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने शहर व तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले, तलाव, ओढे पाण्याने भरले आहेत. उशिराने का होईना पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला असून, पीकपाणी चांगले येईल या आशेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. शनिवारीदेखील दुपारी एकच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बसस्थानक तसेच शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते जलमय झाले होते.

येथील मसगा महाविद्यालयातील वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिवसभरात २९ मि.मी. तर गेल्या चोवीस तासांत ५० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून वाढलेला उकाडा आणि त्यात भारनियमन यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने दिलासा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

तालुक्यात झोडगे, करंजगव्हाण या गावांसह माळमाथा परिसरातील अनेक गावांना गेल्या दोन दिवसांत पावसाने चांगलेच झोडपून काढले. कंधाणे, अस्ताने, जळकू आदीगावांसह परिसरात नाले, तलाव ओढे पाण्याने भरून गेले आहेत. जूनपासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी यंदा देखील पीक हाती येते की नाही या चिंतेत सापडला होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

वडनेर, झोडगे, करंजगव्हाणवर मेहेरबानी

मालेगावात आतापर्यंत ३०६ मि.मी. म्हणजेच ६९ टक्के इतका पाऊस झाला असून, वडनेर परिसरात सर्वाधिक ३४० मि.मी. इतका पाऊस झाला आहे. त्याखालोखाल झोडगे, करंजगव्हाण, दाभाडी, कौळाणे, सायने या परिसरातदेखील १०० मि.मी.हून अधिक पाऊस झाला आहे. गिरणा, मोसम नदीक्षेत्रात देखील पाऊस चांगला झाल्याने गिरणा धरण ६४ टक्के, चणकापूर ९३ टक्के, तर हरणबारी १०० टक्के भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिलाव सुरू करा; अन्यथा परवाने रद्द

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

बाजारात कांद्याचे भाव वधारण्यामागे साठेबाजी हे कारण असून बंद लिलावप्रक्रियेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सोमवारपर्यंत लिलाव सुरू करा; अन्यथा कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करून परवाने रद्द करावेत, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याच्या नोटिसा पाठव‌िल्या आहेत.

प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जिल्ह्यातील सात व्यापाऱ्यांच्या २५ गोदामांवर छापे टाकल्याने या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. महानगरांमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विक्री होऊ लागल्याने केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाकडून कांद्याच्या सद्य:स्थितीविषयी अहवाल मागविला. गत महिन्यात कांद्याचे भाव २२०० ते २७०० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, कालांतराने त्यामध्ये घसरण झाली. कांदा लिलावाचे पैसे शेतकऱ्यांना न मिळता थेट व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा निष्कर्ष सरकारने काढला. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने बड्या व्यापाऱ्यांची घरे आणि गोदामांवर छापासत्र सुरू केले असून, त्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंदची हाक दिली असून, त्यामुळे जिल्हयातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. या संदर्भात शनिवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवापासून लिलाव सुरू करावेत, अशा आशयाची नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना पाठव‌िली आहे. तरीही लिलाव सुरू न केल्यास परवाने रद्द केले जातील, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, शनिवारीदेखील प्राप्तिकर विभागाचे छापासत्र सुरूच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकटची ‘वकिली’ पोलिसांच्या रडारवर!

0
0

नाशिक : डीजे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते गजानन शेलार यांचे समर्थन करून गुन्हे दाखल झाल्यास फुकट वकिली करीन, असे फेसबुकवर आवाहन करणाऱ्या वकिलाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. एवढेच नव्हे, तर बार असोसिएशनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारदेखील करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडे मारुती हनुमान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि नगरसेवक शेलार यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात शेलारांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून, त्यावर अंतिम निर्णय बाकी आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की कोर्टाच्या आदेशानुसार पोलिस शेलारांना केव्हाही अटक करू शकतात. त्यांची शोधमोहीम सुरू असून, त्यांच्या घरीही दोन ते तीन वेळा पोलिसांनी तपासणी केली. या दरम्यान फेसबुकवर कायदा मोडल्याचे काही व्यक्तींनी समर्थन केल्याची बाब समोर आली. अॅड. राजेश आव्हाड यांनी मिरवणुकीत डीजे वाजवण्याचा निर्णय समर्थनीय असल्याची पोस्ट फेसबुकवर केली. डीजेसंदर्भात मंडळावर, तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास सर्वांना मोफत जामीन व कायदेशीर मदत करणार असल्याचे आश्वासन अॅड. आव्हाडांनी दिले. एवढेच नव्हे, तर त्यांचे दोन मोबाइल क्रमांकही पोस्टमध्ये दिले. यामुळे गुन्हा करण्यास कार्यकर्त्यांना बळ मिळाले. कायदा मोडण्यास एक प्रकारे चिथावणी दिली गेली असून, संबंधित वकिलावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. समोरील व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाचे आमिष दाखवून केस घेता येत नाही, असा बार असोसिएशनचा नियम आहे. संबंधित वकिलाने हा नियम मोडल्याने बार असोसिएशनकडेदेखील तक्रार करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सोशल मीडियावर तारतम्य बाळगा

भावनेच्या भरात सोशल मीडियावर व्यक्त होणे सोपे आहे. कोणत्याही बाबींचा, कायदेशीर चौकटींचा विचार न करता पोस्ट करून बरेच नेटिझन्स मोकळे होतात. या प्रकरणात मात्र पोलिसांनी उत्साही कार्यकर्त्यांमागे चौकशीचा फेरा लावला आहे. संबंधित वकिलासह अन्य काही व्यक्तींविरोधात दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये कारवाई होणार आहे. असे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी भविष्यात सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून सोशल मीडियावर व्यक्त व्हावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांची हलगर्जी चिमुकल्यांच्या जिवावर

0
0

गुडगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या झाल्याच्या घटनेनंतर दोन दिवसांतच बेंगळूरूमधील एका शाळेत चारवर्षीय विद्यार्थिनीवर सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली. मोठ्या शहरांतील बड्या शाळांमधील या घटनांमुळे शाळांमधील विद्यार्थी सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एेरणीवर आला असून, शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणाच विद्यार्थ्यांच्या जिवावर उठत असल्याचे समोर आले आहे. मोठी फी घेऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करणाऱ्या अशा शाळांविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. नाशिकमधील शाळांची परिस्थितीही सुरक्षेच्या दृष्टीने काही वेगळी नसून, प्राथमिक सुविधांपासूनही विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरक्षेसाठी आवश्यक नियमावलीही या शाळा डावलत असून, शिक्षण विभागाचे दुर्लक्षही या प्रकरणांमध्ये समोर येत आहे.

--

सीसीटीव्ही मॉनिटरिंगचा अभाव

गेल्या वर्षी मुंबईतील एका शाळेत लहानग्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला होता. या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालनाये प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बंधनकारक करण्याची सूचना दिली. त्यानुसार राज्यातील बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. काही शाळांनी मात्र सीसीटीव्हीसाठी शाळेची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे सांगत या सूचनेकडे कानाडोळा केला. अनेक शाळांमधील सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याचेही चित्र आहे. अनेक शाळांचे प्रशासनदेखील या मुद्याकडे तितकेसे गांभीर्याने बघत नसल्याने विद्यार्थी सुरक्षा रामभरोसे असल्याची स्थिती उद्भवली आहे. शाळांमध्ये सध्या होत असलेल्या गैरप्रकारांची चाचपणी करण्यासाठी सीसीटीव्हीचे मागितले जाणारे फुटेज देण्यासही बहुतांश शाळा नकार देतात. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या शाळांमध्ये कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणाऱ्या घटना तपासण्यासाठी यंत्रणाच नसल्याचीही वस्तुस्थिती आहे. केवळ सीसीटीव्ही बसवून विद्यार्थी सुरक्षेबाबत शाळा प्रशासन किती जागरूक आहे, इतकेच दाखविण्याचा प्रयत्न शाळांकडून केला जात आहे. यात कैद झालेल्या घटनांचे मॉनिटरिंग करणाऱ्या व्यवस्थेची गरज यातून पुढे आली आहे.

--

पालकांनी करावी शहानिशा

विद्यार्थी सुरक्षेबाबत पालकांची भूमिकाही महत्त्वाची असून, जितकी सजगता आपल्या पाल्यासाठी शाळा निवडण्यासाठी पालक घेतात, तितकीच दक्षता त्या शाळेत आपला पाल्य किती सुरक्षित आहे, यासाठी ते घेत नसल्याचे वरचेवर घडणाऱ्या या प्रकरणांमुळे समोर आले आहे. नाशिकमध्येही पालकवर्ग शाळा व्यवस्थापनाच्या मुजोरीविरोधात, बेकायदेशीर फीविरोधात आंदोलने करीत असला, तरी यात विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा फार ठळक असल्याचे दिसून येत नाही. शाळेत कोणत्याही मानसिक, शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे का, याची शहानिशा वेळोवेळी पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद साधून केली पाहिजे, असा मुद्दाही या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात समोर आला आहे. पालकांचा पाल्याबरोबर वेळोवेळी सुसंवाद असेल, तर त्यांच्यासोबत घडणाऱ्या गंभीर घटनांना आळा बसू शकेल.

--

विद्यार्थ्यांसाठी संवाद माध्यमाची वानवा

अलीकडच्या काळात शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांत झालेली वाढ पाहता प्रत्येक शाळेत समुपदेशकाची नेमणूक असावी, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिलेल्या आहेत. मात्र, अपवाद वगळता बहुतांश शाळांमध्ये असे समुपदेशकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणवत असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी कोणतेही माध्यम उपलब्ध नाही. एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल, तर त्याला त्याच ठिकाणी वाचा फोडता येईल, अशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. नाशिकमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनीच त्यांच्या वर्गमैत्रिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा समुपदेशकांचा मुद्दा समोर आला. मात्र, आजच्या परिस्थितीत शाळांकडून यासंदर्भात सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शालेय आवारात विद्यार्थ्यांची होणारी घुसमट त्यांना एखाद्या गंभीर प्रकरणाकडे नेत असल्याचे अशा प्रकरणांवरून दिसून येते.

--

मूलभूत सुविधांकडे कानाडोळा

हजारो, लाखो रुपये फी घेऊन व त्यात दर वर्षी वाढ करूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही अनेक शाळांमध्ये पुरविल्या जात नाहीत. स्वच्छतागृहांमधील तुटलेले नळ, पाण्याचा अभाव, अस्वच्छता अशा स्वच्छतागृहांचा वापर विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संसर्गाची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ४१५ शाळांना कंपाऊंड नसल्याची व काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत कंपाऊंड असल्याची परिस्थिती आहे. शहरातही अशा अनेक शाळा असून, कंपाऊंड नसल्याने मोकाट जनावरांचा मोठा वावर या ठिकाणी असतो. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडूनही अशा ठिकाणी शाळांजवळ वाहन पार्किंग करणे, टवाळखोरी करण्यासारखे प्रकार केले जातात. यामुळेही विद्यार्थ्यांना इजा पोहोचण्याचा धोका असला, तरी शाळा प्रशासन अनेकदा गाफील राहते.

--

महिला सुरक्षारक्षकांची निकड

बोटांवर मोजता येतील इतक्या शाळांची संख्या सोडल्यास महिला सुरक्षारक्षकांची संख्या शाळांमध्ये फारशी आढळत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांशीही सुरक्षारक्षकांकडून अरेरावीची भाषा केली जाते. अशा परिस्थितीत महिला सुरक्षारक्षकांची गरज पालकांकडून पुढे आली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठीही हा मुद्दा समोर येत आहे. शिवाय, खासगी संस्थांमधून सुरक्षारक्षकांची नेमणूक शाळा करीत असल्याने सुरक्षारक्षकांच्या योग्य कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबदारीही शाळांनी स्वीकारणे आवश्यक आहे.

--

पालक-शिक्षक, परिवहन समिती नावालाच

सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या शाळांमध्ये पालक-शिक्षक संघाची स्थापना अनिवार्य आहे. पालक आणि शाळेला जोडणारी व विद्यार्थीनिगडित महत्त्वाचे निर्णय घेण्यास आवश्यक असणारी पालक-शिक्षक समितीही अनेक शाळांमध्ये अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी ती केवळ नावालाच आहे. प्रशासनाकडून सर्व शाळांमध्ये ही समिती स्थापन झाल्याचे गोडवे गायले जात असले, तरी अद्याप अनेक शाळांमध्ये अशी समितीच नसल्याचे वास्तव आहे. ज्या शाळांमध्ये ही समिती आहे, त्यांच्या महिनोन् महिने बैठकीच होत नसल्याची स्थिती आहे. हेच चित्र शालेय परिवहन समितीबाबतही आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याच्या घटना घडल्यानंतर या समितीबाबत शाळा प्रशासन, पोलिस, आरटीओ सजग झाले. मात्र, समन्वयाच्या अभावामुळे ठराविक कालावधीनंतर पुन्हा समित्या ठरत आहेत. सीबीएसई बोर्डानेही पालक-शिक्षण समितीच्या बैठकींमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या गरजेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

--

‘सीबीएसई’चे संलग्न शाळांना निर्देश...

प्रत्येक विद्यार्थ्याचा दिवसातील मोठा कालावधी शाळेत व्यतित होत असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशीही त्याचा सातत्याने संपर्क होत असतो. मात्र, या वर्गाकडूनच त्यांना इजा पोहोचणार असेल, तर विद्यार्थी सुरक्षेचे काय, हा मुद्दा आता चिंतेचा ठरत आहे. सुप्रीम कोर्टानेही या विषयाच्या सुनावणीत विद्यार्थी सुरक्षा विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातील गांभीर्य लक्षात घेता सीबीएसईकडून संलग्न शाळांना सुरक्षेविषयी विविध निर्देश देण्यात आले आहेत. शाळेच्या आवारात सुस्थितीत सीसीटीव्हीची कॅमेरे असणे, विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी शाळेच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात यावे, शिक्षक-शिक्षकेतरांची मानसिक चाचणी केली जावी, असे अनेक निर्देश सीबीएसईने संलग्न शाळांना दिले आहेत. शिक्षक, शिक्षकेतर, कंडक्टर, स्वीपर्स, वाहनचालक अशा सर्वांच्या चाचण्या याअंतर्गत घेतल्या जाणे अभिप्रेत आहे.

--

गुडगाव प्रकरणानंतर समोर आलेल्या बाबी

--

-शैक्षणिक संस्थांबाबत माहिती अधिकार कायदा लागू असावा.

-केजी टू पीजीसाठी केंद्रीयकृत प्रवेशप्रक्रिया राबविली जावी.

-प्रशिक्षित शिक्षकांचीच नेमणूक केली जावी.

-सुरक्षारक्षक व इतर स्टाफची पडताळणी केली जावी.

...


शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता तपासण्यासाठी आम्ही सहा पथकांची नेमणूक केली आहे. ही सुरक्षा पथके शाळांमध्ये जाऊन सर्व बाबींची पाहणी करीत आहेत. मराठी माध्यमाच्या व महापालिकेच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये समस्या उद्भवत असल्याने शहरातील इंग्रजी माध्यमाच्या ११० शाळांना या तपासणीत प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शाळा बसची सुविधा पुरवितात त्यांच्यावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण समिती

--

कोणतीही मोठी घटना घडण्याअगोदर लहान-लहान घटना घडलेल्या असतात, ज्याकडे शाळांनी दुर्लक्ष केलेले असते. अशा घटना शाळा दाबून टाकतात आणि त्यातून मोठी दुर्घटना घडते. याबाबत पालकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. शाळेचे कामकाज किती कायदेशीर पद्धतीने चालते आहे, याची शहानिशा त्यांनी वेळोवेळी केली पाहिजे. शाळांना कामकाजात पारदर्शकता नको असल्याने अशा घटनांवर अंकुश नसल्याचे दिसते.

-डॉ. मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच

--

केवळ मोठ्या आकड्यांची फी घेण्याकडे अनेक शाळांचा कल दिसून येतो. मात्र, त्या फीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिटसारख्या महत्त्वाच्या बाबींविषयीदेखील बहुतांश शाळा अनभिज्ञ असतात. त्यामुळे शाळांमधील सुरक्षाविषयक नियमावलीच्या अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणांनी पुरेशी तत्परता दाखविणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

-मकरंद वाघ, पालक

--

शहरातील शाळांची संख्या

--

महापालिका प्राथमिक १२७

महापालिका माध्यमिक १३

खासगी अनुदानित १८०

विनाअनुदानित १४०

कायम विनाअनुदानित ११०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है?

0
0

नाशिक ः सार्वजनिक वाचनालय नाशिकचा जिल्हा साहित्यिक मेळावा म्हणजे साहित्यप्रेमींना, आपल्या स्नेहांकितांना भेटण्याचे एक छानसे स्थळ व निमित्त. खेळीमेळीच्या, मनमोकळ्या वातावरणात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यिक मेळाव्याला या असे नेहमी आवर्जून सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यंदा साहित्यिकांच्या मांदियाळीऐवजी राजकारण्यांचीच भाऊगर्दी अधिक केल्याने ‘मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है,’ असे म्हणण्याची वेळ साहित्यिकांवर आली आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षातील मेळावा आणि सावाना पदाधिकाऱ्यांच्या नव्या कार्यकारिणीचा निवडून आल्यावर पहिलाच म्हणून या मेळाव्याकडून प्रचंड अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यक्रमपत्रिका पाहिल्यावर या अपेक्षांवर पाणी फेरले गेल्याचे चित्र आहे. पालकमंत्र्यांपासून, तर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यापर्यंत सर्वांनाच झाडून या ना त्या कारणाने निमंत्रित करण्यात आले आहे. राजकारण्यांना त्यांची व्यासपीठं कमी पडायला लागली, की काय अशी शंका यातून यावी इतक्या जणांना उद्घाटन व समारोपाला निमंत्रित करण्यात आले आहे.

जिल्हा साहित्यिक मेळाव्याची संकल्पना कुसुमाग्रजांची. त्यांनी अतिशय सूत्रबद्धपणे ती आखली होती. परंतु, यंदा त्यात साहित्य संमेलनासारखी ग्रंथदिंडी घुसविण्यात आली असून, मेळाव्याच्या अध्यक्षांचा उल्लेख पत्रिकेत सर्वच ठिकाणी संमेलनाध्यक्ष असाच करण्यात आला आहे. जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे रुपांतर व्यापक संमेलनात व्हावे यासारखा दुसरा चांगला विचार नाही. परंतु, केवळ साहित्यप्रकार बदलून काल, आज आणि उद्या असे विषय ठेवणार असाल, तर त्या संमेलनाची कीव यावी असेच आहे. ये रे माझ्या मागल्याप्रमाणे नाटक आणि कवितेचा विषय परिसंवादात ठेवण्यात आला. नृत्य, चित्र, शिल्प, संगीत यंदाही पारखेच राहिल्याचे चित्र आहे. त्यातच आता परिसंवादात दोनच वक्ते बोलणार, असा नवा पायंडा सावाना पाडणार असल्याचे पत्रिकेतून दिसते. कवितेच्या परिसंवादात तर फक्त एकच वक्ता बोलणार असून, मग त्याला व्याख्यानच म्हटले असते तर काय बिघडले असते, असा विचार डोकावून जातो.

शारदीय उत्सव म्हणून गौरवला जाणारा हा मेळावा खरोखरच जिल्हा पातळीवर होतो का, याचे उत्तर या दोन दिवसांच्या मेळाव्यानंतरही मिळत नाही. एक काळ असा होता, की जिल्हाभरातून कविसंमेलनासाठी येत, येथे कविता म्हणत व स्वत:ला कृतकृत्य समजून पुन्हा गावी जात. यंदा आता तसे काही जाणवत नाही.

--

कार्यक्रमांत विविधतेचा अभाव

भरगच्च कार्यक्रम दिले आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षांच्या

लेखनावर आधारित सादरीकरणाचा खास कार्यक्रम ठेवला आहे. यात विविधता लांबूनही डोकावताना दिसत नाही. ४९ वर्षांत जिल्हा साहित्यिक मेळाव्याने काय दिले असा विषय घेऊनही एक कार्यक्रम होणार आहे. मात्र, शिवाजी तुपे, यास्मिन शेख, चंद्रकांत महामिने, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, मीना वैशंपायन, भीष्मराज बाम असे अध्यक्ष व अनिल अवचट, विनायकदादा पाटील, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. श्रीपाद जोशी यांसारखे उद्घाटक लाभलेल्या मेळाव्यांनी मोठे विचार व साहित्यिक महाराष्ट्राला दिले आहेत. त्या अंगणात राजकारण्यांची गर्दी करून मेळाव्याला राजकारणाचा आखाडा करून नका, असे पदाधिकाऱ्यांना सांगण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images