Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कुठे बरसल्या सरी, कुठे पाटी कोरी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अधूनमधून बरसणाऱ्या परतचीच्या पावसाने सोमवारी नाशिककरांना चकवा दिला. महानगरातील काही भागात मुसळधार पावसाने झोडपले, तर काही ठिकाणी पावसाचा लवलेशही नव्हता. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांची त्रैधातिरपीट उडाली. पाऊस असलेल्या ठिकाणाहून रेनकोन घालणाऱ्या दुचाकीस्वारांना काही अंतराने मात्र हा रेनकोट पुन्हा काढावा लागला. या पावासाने शहरात २४ तासात ०.४ मी. मी पावसाची नोंद झाली तर सकाळी ८.३० ते ५.३० यावेळेत १.१ मी.मी पाऊस झाला.

नाशिकरोड येथे मुसळधार पाऊस झाला. तर इतर ठिकाणी मात्र त्याने केवळ हजेरी लावली. ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही तेथील गैरहजेरीसुद्धा चर्चेची ठरली. गेल्या काही दिवसांपासून हवामानातही बदल झाल्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. ऑक्टोबर हिटची चाहूल लागल्यानंतर मध्येच बरसणारा पावसाने अनेकांचे अंदाज फोल ठरवले आहे. यावर्षी पावसाने समाधानकार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणात ८७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

नाशिकरोडला झोडपले

सिन्नर फाटा ः असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नाशिकरोड व परिसरातील गावांना सोमवारी चार वाजता मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नागरिक, व्यावसायिकांसह प्रवाशांचे हाल झाले. बाजारपेठांतील रस्त्यावरील सर्वच व्यावसायीकांची दैना उडाली. नेहमीप्रमाणे वीजेची बत्तीही गुल झाली.

सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान नाशिकरोड सह शिंदे, पळसे या भागात मुसळधार पाऊस झाला. ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाट हा परिसर काही काळ हादरला. सुमारे पाऊण तास झालेल्या या जोरदार पावसाने शहरातील सर्वच रस्त्यांसह सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले.

महामार्ग आणखी उखडला

कालच्या पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा ते चेहेडी दरम्यान आनखी खड्डे निर्माण झाले. अस्वले मळा, निसर्ग लॉन्स येथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. चेहेडी शिव येथे महामार्ग पुर्णपणे उखडल्याने येथे दुचाकी वाहने घसरुन पडल्याच्या घटनाही घडल्या.

वीज पुरवठा खंडित

मुसळधार पावसादरम्यान नेहमीप्रमाणी शहरातील वीजपुरवठा पुन्हा एकदा खंड‌ति झाला. सायंकाळी चारवाजता खंड‌ति झालेला वीज पुरवठा अडीच तासांनंतर साडेसहावाजताही सुरळीत झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेला आता अधिकाऱ्यांचीही गळती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कधी जकात गळती, कधी पाणी गळतीने चर्चेत असलेल्या महापालिकेला आता अधिकाऱ्यांच्या गळतीने सतावले आहे. भाजपच्या बेधुंद कारभाराने महापालिकेतील वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकारी अक्षरशः वैतागले असून, त्यांचा ओघ आता स्वेच्छानिवृत्तीकडे सुरू झाला आहे. भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारेंपाठोपाठ आता विधी व मिळकत विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनीही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर तीन अभियंत्यांचेही स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज वाटेवर असल्याने कर्मचाऱ्यांपाठोपाठ अधिकाऱ्यांच्या गळतीने प्रशासनासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे.

एकीकडे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीने प्रशासन जेरीस आले असताना आता थेट विभागप्रमुखांकडूनच स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जांचे रतीब सुरू झाले आहेत. महापालिका प्रशासन सध्या विकासकामे, तसेच जनतेच्या प्रश्नांऐवजी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गळतीने चिंताग्रस्त झाले आहेत. महापालिकेची पदोन्नती क वर्गातून ब वर्गात झाली असली तरी महापालिकेकडे असलेला कर्मचारी व अधिकारी वर्ग मात्र तोच असून, त्यात सुधारणा होत नाही. दर महिन्याला दहा ते पंधरा कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवृत्ती होत आहे. २०१९ पर्यंत सध्या कार्यरत असलेले पाच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी अडीच कर्मचारी निवृत्त होत आहेत, तर दुसरीकडे नोकरभरतीला सरकारने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे प्रशासनाची अगोदरच पंचाईत झाली असताना आता अधिकाऱ्यांच्या गळतीचे नवे संकट प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

भाजपच्या सत्तेने धास्तावलेले तत्कालीन शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर यांनी स्वेच्छानिवृत्ती यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. गेल्या सात महिन्यांत भाजपचा कारभार भरकटला असून, महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत त्रस्त झाले आहेत. महापालिकेतील काही पदाधिकारी व नगरसेवकांच्या जाचाने अधिकारी त्रासले असून, त्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. त्यामुळे त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करला आहे. गेल्या महिन्यात भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला असून, तो महासभेवर ठेवण्यात आला आहे. विधी व मिळकत विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनीही सोमवारी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे. यापूर्वीही अग्निशमन विभागाच्या प्रमुखांना स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला होता. शहर अभियंता, पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद हे प्रभारी अधिकाऱ्याकडे आहे, तर काही उपायुक्तांकडे दोन ते तीन विभागांचा पदभार आहे. त्यात पदाधिकाऱ्यांच्या जाचामुळे तर अधिकच त्रास होत असल्याने आता त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करला आहे.

आयुक्तांना पडला पेच

अधिकाऱ्यांसोबत अभियंते, कार्यकारी अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. कार्यकारी अभियंतापदाचा पदभार अभियंत्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिकेतील आणखी तीन बड्या अभियंत्यांनी स्वेच्छानिवृत्तीची तयारी केली असून, आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली आहे. मात्र, तूर्तास आयुक्तांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला आहे. स्वेच्छानिवृत्ती हा अधिकाऱ्यांचा अधिकार असल्याने त्यांना रोखायचे कसे, असाही त्यांच्यासमोर पेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजीपनगरला तरुणाचा गळफास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपी नगर परिसरात जॉगिंग ट्रॅकवरील झाडाला तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी - वडाळागाव परिसरातील राजवाडा येथील रहिवासी सुरेंद्र रमेश साळवे (२५) याने रविवारी (दि. १७) जॉगिंग ट्रॅक येथील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब त्याचा आतेभाऊ चंद्रकांत पगारे यांना समजताच त्यांनी उपनगर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांनी सहकाऱ्यांसह जाऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.

तरुणीचा मृत्यू
दुचाकीच्या धडकेने जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे. कस्तुरी रवीकांत जाधव (१८, रा. जेतवन नगर, नेहरूनगर, नाशिकरोड) ही तरुणी शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिखरेवाडी येथून घरी पायी जात होती. हॉटेल करी लिव्हसमोर रस्ता ओलांडताना नाशिकरोडकडे वेगाने जाणाऱ्या दुचाकीची (एमएच १५ के एएम ५१४१) तिला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार गाडी सोडून फरार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसाहित्यात समृद्धतेचा अभाव खेदजनक

$
0
0

आधुनिक काळातील पिढी वाचनाच्या संस्काराला दुरावत असून, व्हर्च्युअल जगाशी एकरूप होत आहे. नव्या पिढीला वाचनाचे व्यसन जडावे इतकी समृद्धता आपल्याकडील बालसाहित्यात नसल्याचा खेद व्यक्त केला आहे मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका ‘एक होता कार्व्हर’कार वीणा गवाणकर यांनी. मात्र, त्या दिशेने सुरू असलेली मराठी बालसाहित्यिकांची धडपड ही एक जमेची बाजू आहे, असे मतही त्यांनी मांडले. नाशिकरोड येथे आयोजित राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलानाच्या उद्घाटनाला नाशिकमध्ये आलेल्या गवाणकर यांनी सध्याची साहित्य संमेलने, मराठीतील उपलब्ध बालसाहित्य आणि बालसाहित्याचा पुढील प्रवास याबाबत ‘मटा’कडे व्यक्त केलेल्या भावना...

--

-प्रभावी बालसाहित्याची वैशिष्ट्ये कोणती?

-बालसाहित्याची भाषा सहज-सुलभ, बालकांच्या भाषेशी जुळणारी असते. ओघवती कथनात्मक शैली असते. असे साहित्य बालकांच्या भावविश्वाचा ठाव घेते. त्यांची उत्सुकता, उत्कंठा वाढविते. सचित्र मांडणीसह त्यात वैविध्यता असते.

--

-सध्याचे बालसाहित्य बालमनाचा वेध घेण्यास समर्थ आहे असे वाटते का?

-नाही, सध्याच्या बालसाहित्यात अजून नवीन प्रयोग होणे गरजेचे आहे. तसे ते सुरूही आहेत. परंतु, त्यांची गती खूपच संथ आहे. आजच्या बालकांचा प्रत्यक्ष पुस्तकांचे वाचन करण्याऐवजी व्हर्च्युअल जगाशी जास्त संबंध येतो. आजची आधुनिक पिढी साहित्यापासून दुरावतेय, कारण आजचे साहित्य तितके समृद्ध नाही. समृद्ध साहित्यनिर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. साहस कथा, शोध कथांची उणीव जाणवते.

--

-हल्लीच्या पिढीला वाचते करण्यासाठी कोणते उपाय सुचवाल?

-गाव व शाळा तेथे वाचनालय हवे. प्रत्येक वाचनालयात चिल्ड्रेन वाचनालय हवे. व्यसनी वाचक तयार करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. वाचनालये संस्कारांची केंद्रेच असतात. शालेय अभ्यासक्रमांतही केवळ कृतियुक्त लिखाणावर भर न देता डिस्क्रिप्टिव्ह लिखाणालाही मोठा वाव ठेवायला हवा.

--

-बालसाहित्याचे विद्यार्थ्यांच्या विकासात महत्त्व काय?

-बालकांना गोष्टीरुपातील साहित्य आवडते. त्यातील मानवीकरण केलेल्या अनुभूती त्यांना भावतात. त्यातून त्यांची शब्दसमृद्धी, चौकसबुद्धी वाढते. अभिव्यक्तीलादेखील चालना मिळते.

--

-आजच्या साहित्यावर सोशल मीडियाने आक्रमण केल्यासारखे वाटते का? त्याचा परिणाम काय?

-सध्या तरी सोशल मीडियाचा दुष्परिणामच जाणवतो. तंत्रज्ञानाची ओळख इथपर्यंत ठीक. पण, त्याचे धोकेच अधिक आहेत. पुस्तके प्रत्यक्ष हाताळण्याऐवजी नेटसॅव्ही पिढी स्क्रीनपुढेच जास्त वेळ घालविते. अर्थव्यवस्थेचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे या अर्थव्यवस्थेने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाला कमवायला भाग पाडले आहे. त्यामुळे पाल्यांकडे लक्ष देण्यासाठी पालकांकडेही वेळ नाही. नेमक्या याच वेळी सोशल मीडियाचे आगमन वेगाने झाल्याने साहित्यात रस घेणारी पिढी आपण हरवून बसल्यासारखे झालेय.

--

-आजचे बालसाहित्य आणि भविष्यातील आव्हाने याबद्दल आपले मत काय?

-भविष्यातील आव्हानांचा सामना करू शकणाऱ्या बालसाहित्याची निर्मिती जुन्या साहित्यिकांकडून झालेली नाही. आजही राज्यभरात बालसाहित्याचा एकही एडिटर नाही. बालसाहित्य समीक्षकही एकच आहे, विद्या सुर्वे, मालेगाव. पाश्चात्त्यांप्रमाणे बालसाहित्य निर्मितीत आपण कमी पडलो. आपल्याकडील बालसाहित्य आजही प्रयोगशील आहे. सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. काही तरी अननोन निर्माण करण्याचे आव्हान आजही आहे.

--

-साहित्य संमेलनांविषयीच्या वादाबद्दल आपल्याला काय वाटते?

-सॉरी! (साहित्य संमेलन नसते साहित्य उत्सव असतो. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नसतो असेच साहित्य संमेलनांवर वाद उपस्थित करतात. या वादांमुळे साहित्य संमेलनात साहित्याविषयी आता काही नसतं. केवळ सेलिब्रेटींसोबत सेलिब्रेशन असतं...)

--

(शब्दांकन ः नवनाथ वाघचौरे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दांडिया वर्कशॉपला वेग

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दांडिया आणि गरबा वर्कशॉपला शहरात ठिकठिकाणी वेग आला अाहे. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून ठिकठिकाणी दांडिया व गरबा वर्कशॉपला सुरुवात झालेली आहे. तरुणाईसह या वर्कशॉपमध्ये सर्व वयोगटांतील व्यक्तींचा सहभाग दिसून येत आहे.

टीव्ही, सोशल मीडिया यामुळे दांडिया, गरबा यांचे नवनवीन प्रकार सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. दररोज वापरावयाच्या साध्या कपड्यांवर गरबा, दांडियाचा सराव केल्यावर आता घागरा, चनिया-चोली यांसारख्या पारंपरिक वेशभूषेेत सराव करण्याकडे वर्कशॉप प्रशिक्षकांचा कल दिसून येत आहे. दांडिया, गरबा हे नवरात्रात खेळले जाणारे पारंपरिक प्रकार असले, तरी ते आजच्या काळात व्यायामाचे उत्तम पर्याय असल्याचे मार्गदर्शनदेखील वर्कशॉपमध्ये होत आहेत.

--

या प्रकारांना प्राधान्य

सालसा गरबा, सनेडो, ठकडी, धोडिओ, बेली गरबा यांसारखे निरनिराळे गरबा व दांडियाचे प्रकार वर्कशॉपमध्ये शिकविले जात आहेत. त्याचप्रमाणेे एक ताली गरबा प्रकारापासून ते सहा ताली गरबा प्रकारापर्यंतचे प्रशिक्षण वर्कशॉपमध्ये दिले जात आहे.

--

दर वर्षीप्रमाणेे यावर्षीदेखील दांडिया, गरबा वर्कशॉपला सर्वच वयोगटांतील व्यक्तींचा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी खास तरुणाईसाठी वेगळ्या पद्धतीने सराव सुरू आहे. पारंंपरिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारांत सराव सुरू असून, गुजराथी पद्धतीचा मूळ गरबा हे यावर्षीच्या वर्कशॉपचे खास आकर्षण आहे.

-कौस्तुभ जोशी, प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला डेंग्यूचा डंख

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत सुरू असलेल्या उपाययोजना व विविध प्रकारची जागृती फार्स ठरत असून, या दोन्ही आजारांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या १८ दिवसांत महापालिका हद्दीत डेंग्यू संशयित रुग्णांचा आकडा दीडशेवर गेला असून, पॉझ‌िट‌िव्ह रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत डेंग्यूने चांगलेच डोक वर काढले असून, यंत्रणांसमोर आव्हान उभे केले आहे. डेंग्यूबरोबरच स्वाइन फ्लूनेही कहर केला असून, १८ दिवसांत दहा जणांचा बळी गेला आहे. शहराच्या हद्दीत जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचे २५ बळी गेले असून, जिल्ह्यातील मृतांचा आकडा ६१ पर्यंत गेला आहे. स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना आरोग्य यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसली आहे.

शहर व ग्रामीण परिसरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना महापालिका व जिल्हा प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले असून, डेंग्यूच्या रुग्णांत प्रतिदिन वाढ होत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरच्या १८ तारखेपर्यंत डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा १६५ पर्यंत पोहोचला आहे, तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ पर्यंत गेली आहे. दोन आठवड्यांपर्यंत हा आकडा शंभरपर्यंत होता. मात्र, आठ दिवसांत त्यात ६५ संशयित रुग्ण, तर ५० पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या अहवालात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले होते. संशयित रुग्णांची संख्या १७४ होती. सप्टेंबरमध्ये त्यात मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ५६२ संशयित रुग्ण असून, पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २१३ पर्यंत पोहोचला आहे. खासगी रुग्णालयांमध्येही संशयितांचा आकडा मोठा असल्याने डेंग्यू संशयितांचा आकडा दोनशेपार, तर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरीपार जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वाइन फ्लूचे ६१ बळी

स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, गेल्या १८ दिवसांत तब्बल १० जणांचा बळी गेला आहे. यातील चार जण शहर, तर सहा जण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या वाढत चालली आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ४१ रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यात विविध ठिकाणी ७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूने ६१ जणांचा जीव घेतला आहे. त्यात महापालिका हद्दीतील २५, तर ग्रामीण भागातील ३१ जणांचा समावेश आहे.

डेंग्यूचे रुग्ण

जुलै : संशयित ९४, पॉझिटिव्ह १४

ऑगस्ट : संशयित १७४, पॉझिटिव्ह ९७

सप्टेंबर : संशयित १६५ पॉझिटिव्ह ६२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला पर्यटनाचे बुकिंग सुरु

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ‘पर्यटन मार्ट’नंतर आता पर्यटकांचे पाऊले नाशिककडे वळू लागले आहे. देशभरातून हळूहळू बुकिंग सुरू झाले असल्याने ट्रॅव्हल एजंट व हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या सुट्यांसाठी अनेक पर्यटकांनी नाशिकलाही पसंती दिली आहे. त्यात पर्यटनांचे सर्किट महत्त्वाचे ठरले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनने यांनी देशभरातील सहाशेहून अधिक ट्रॅव्हल एजंट्स, पर्यटन विषयावर लिहिणारे लेखक व ब्लॉगर्सना नाशिकच्या पर्यटनस्थळांचे महत्त्व पटवून देण्यात तीन दिवसीय ट्रॅव्हल मार्ट घेतला होता. त्यात नाशिकला केंद्रस्थानी ठेवून शिर्डी, वेरूळ, अजिंठा, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, तोरणमाळ तसेच गुजरातमधील सापुतारा असे पाच-सहा दिवसांचे सर्किटची माहिती देण्यात आली. त्यात आता पर्यटकांनी या सर्किटला पसंती दिली आहे. यात दोन दिवस हे पर्यटक नाशिकचे पर्यटन स्थळे बघणार आहे. पर्यटकांच्या बरोबरच विद्यार्थ्यांच्या ट्रीपने हे सर्किट निवडले आहे.

धार्मिक स्थळांबरोबरच ऐतिहासिक पर्यटनस्थळे, वायनरीज, गड- किल्ले, पक्षी अभयारण्य, पुरातन लेणी हे सगळे नाशिक व परिसरात आहे. त्यांचे महत्त्व सांगण्याबरोबरच त्यांचा प्रसार जसे महत्त्वाचे होते. तसे त्याच्या जोडीला इतर जवळचे पर्यटन स्थळही जोडणे गरजेचे होते. हे पर्यटन मार्टमधून पोहचल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. यात ट्रॅव्हल एजंटची भूमिका महत्त्वाची होती. मार्टसाठी देशभरातून नाशिकला आलेले हे ट्रॅव्हल एजंट आता पर्यटकांना नाशिकचे सर्किट सुचवू लागले, त्याला प्रतिसादही मिळू लागला आहे.

‘पर्यटन मार्ट’मध्ये देशभरारतून ट्रॅव्हल्स एजंट आले. त्यांनी नाशिकमधील सर्व पर्यटन स्थळे बघितली. आता ते त्यांच्याकडे आलेल्या पर्यटकांना नाशिकचा पर्याय सुचवू लागले आहे. नाशिकच्या पर्यटनांसाठी सर्किट व बुकिंगबाबत विचारणा होऊ लागली असून काहींनी बुकिंगही केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ट्रिपही बुक झाल्या आहेत. पर्यटन टूरिझम वाढवण्यासाठी सुरुवात चांगली झाली आहे.
- दत्ता भालेराव, अध्यक्ष,
ट्रव्हल्स एजंट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संगणकीय ७/१२’ची कासवगती

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा
प्रशासनाचा ढिला कारभार आणि संगणकीकरणातील तांत्रिक समस्यांमुळे अद्याप सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यभरातील ४३ हजार ९४३ पैकी अवघ्या ९ हजार ५३२ म्हणजेच २१.६९ टक्केच गावांचे संगणकीय ७/१२ कामाचे अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झाले आहे. नाशिक विभागात हेच प्रमाण अवघे १०.२३ टक्के म्हणजे ६७९ गावे असे आहे. प्रशासनाच्या कासवगती कारभारामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचे चित्र आहे.

डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास अनुसरून स्वातंत्र्यदिनापर्यंत राज्यातील सर्व गावांमधील ७/१२ उतारे संगणकीकरण करण्याची घोषणा सरकारने केली. राज्याच्या महसूल व वन विभागाने गाव दप्तरातील नमुना ७/१२ चे संगणकीकरणाचे कामही हाती घेतले. मात्र, महिला उलटून गेल्यानंतरही राज्य सरकार आपले लक्ष्य पूर्ण करू शकलेले नाही.

स्वातंत्र्य दिनापासून सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे गाव दप्तरातील नमुना ७/१२ उतारे ऑनलाइन प्राप्त होणार होते. काही महिन्यांपासून महसूल यंत्रणा या जिकिरीच्या कामासाठी झटत आहे. घोषणेनुसार स्वातंत्र्यदिनापर्यंत राज्यातील सर्व विभागांतील गावांचे सातबारा संगणकीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, या कामात प्रशासनाला अद्याप यश मिळू शकलेले नाही. सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ऑनलाइन ७/१२ वितरणास प्रातिनिधीक स्वरुपात प्रारंभही केला होता. उर्वरित गावांचे अपूर्ण काम ऑगस्ट अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता होती. मात्र डेडलाइन उलटल्यानंतर राज्यातील प्रशासकीय कामकाजात सुस्तपणा दिसून आला आहे. निम्मा सप्टेंबर उलटला तरी अद्याप राज्यभरातील सर्व गावांचे अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झालेले नाही.

सरकार ऐकेना; अधिकारी जुमानेतना
राज्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांचे ७/१२ संगणकीकृत करून ते ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना चांगली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीतील समस्या ऐकून घेण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आले आहे. तर या योजनेची अंमलबजावणी करणारे अधिकारी सरकारच्या आदेशांना जुमानत नसल्याचे उघड झाले आहे.

अमरावती, नंदुरबार अव्वल
संपूर्ण ७/१२ संगणकीकरण कामात राज्यात अमरावती महसूल विभागाने तर नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. अमरावती विभागात ४७.७५ तर नंदुरबार जिल्ह्यात २७.९५ टक्के गावांना अंतिम प्रमाणपत्र मिळाले आहे. राज्यातील कोकण (८.६१), पुणे (९.२६) या महसूल विभागांची टक्केवारी तर दोन आकडी संख्याही गाठू शकलेली नाही.

मंत्र्यांच्या जिल्ह्यातच खोडा
नाशिक विभागातील जळगाव, नगर आणि नाशिक या तिन जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन संगणकीकरणाचे अगदी निचांकी काम झालेले आहे. विशेष म्हणजे या तिन्हीही जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान लाभलेले आहे. मंत्र्यांच्याच जिल्ह्यात या योजनेच्या कामाला खीळ बसला आहे.

संगणकीय सातबारा राज्याची प्रगती
महसूल विभाग......संगणकीय सातबारा पूर्णतेचे प्रमाण (टक्के)
अमरावती....................४७.७५
औरंगाबाद....................३०.४७
नागपूर....................१८.६६
नाशिक....................१०.२३
कोकण....................८.६१
पुणे....................९.२६
एकूण....................२१.६९

नाशिक विभागातील स्थिती
जिल्हा........गावे........संगणकीकरण ७/१२ झालेली गावे........टक्के
जळगाव........१,५०२............७२................४.७९
नगर...............१,६०२...........११६................७.२४
नाशिक........१,९६६................१७८................९.०५
धुळे.............६७८................६५................९.५८
नंदुरबार ........८८७................२४८................२७.९५
एकूण.............६,६३५........६७९................१०.२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निमा’ विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी ब्राह्मणकर

$
0
0

नाशिक ः निमा हाऊस येथे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मधुकर ब्राह्मणकर यांची विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. या निवडीनंतर ब्राह्मणकर यांनी भविष्यात नवीन उपक्रमांच्या माध्यमातून निमामार्फत नाशिक जिल्ह्याच्या विकासात निश्चितच भरीव योगदान दिले जाणार असल्याचे सांगितले. या निवडीनंतर निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, विश्वस्त मंडळाचे सदस्य मनिष कोठारी व रवी वर्मा यांनी अभिनंदन केले.

मधुकर ब्राह्मणकर यांनी २००९-१० रोजी निमाचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच निमाच्या घटना समितीची धुरा देखील त्यांनी सांभाळली आहे. निमाच्या घटना उपसमितीचे अध्यक्षपद भूषवितांना त्यांनी केलेले भरीव योगदान हे भविष्यातील निमाच्या वाटचालीस मार्गदर्शक ठरणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकाच चालविणार सीटीबस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळासाठी डोईजड ठरलेली शहर बससेवा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तोट्यातील सेवेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीत पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांचाही समावेश आहे. सर्वंकष वाहतूक आराखड्यातही शहर बससेवा महापालिककडेच असावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ही सेवा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू झाल्याने बससेवेचे शुक्लकाष्ठ संपण्याची शक्यता आहे.

शहर बससेवेवरून सध्या महापालिका आणि राज्य परिवहन सेवेत संघर्ष सुरू आहे. शहर बससेवा परवडत नसल्याचे सांगत महामंडळाने ही बससेवा महापालिकेने चालवावी, अशी मागणी केली आहे. तर वाढत्या तोट्यामुळे महामंडळाने २७३ बसेसवरून हा आकडा आता १४५ पर्यंत घटवला आहे. दुसरीकडे महापालिकेने बससेवेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कन्स्लटंट नियुक्त केले आहेत. तर सर्वंकष शहर वाहतूक आराखड्यात बससेवा ही महापालिकेनेच चालवावी, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे बससेवेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालिकेवर दबाव वाढला आहे. पालिका याबाबत चाचपणी करित आहे. परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पालिका याबाबत निर्णय घेण्यास कचरत आहे.

महापालिका संभ्रमात असतांनाच राज्य सरकारने तोट्यात सुरू असलेल्या शहरी बससेवा संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. परिवहन विभागाने परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, समिती अंतिम निर्णय घेणार आहे. या समितीत सदस्यम्हणून पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, महामंडळाचे एमडी आणि नगरविकास विभागाचे उपायुक्त सदस्य आहे. ही समिती अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे बससेवा पालिकांकडे हस्तांतरीत होण्याच्या हालचाली आता शासन स्तरावरच सुरू झाल्या आहेत.

पीपीपी तत्वावर शिफारस

महापालिकेने शहर बससेवेसंदर्भात कन्स्टटंटची नियुक्ती केली आहे. सोबतच इंदूर महापालिकेच्या बससेवेचा अभ्यास केला जात आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बससेवा ही पीपीपी तत्वावर चालवावी, अशी शिफारस अगोदरच दिल्लीस्थिती यूएमटीपी संस्थेने केली आहे. त्यामुळे पालिकाच बससेवा घेणार हे निश्चित झाले असून त्याच्यावर धोरणात्मक समितीकडून मोहोर उमटवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कावनई’च्या विकासाला ब्रेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

कुंभमेळा होऊन दोन वर्षे उलटूनही सिंहस्थाच्ये मूळस्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथील विकासकामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. चौदा वर्षांपूर्वी (२००३) सरकारने भरघोस निधी दिला होता. त्यावेळी मंदिर परिसरातील सर्वच कामे पूर्ण झाली होती. मात्र यावेळी दोन वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात शासनाकडून निधी तर पूर्ण आलाच नाही, त्यातही जो निधी मिळाला त्यातील कामे अपूर्ण आहेत.

श्री क्षेत्र कावनई येथे कुंभमेळा होऊन दोन वर्षे उलटली. या ठिकाणी येणाऱ्या संतांसाठी निवास, गोशाळा, प्रसाधनगृह, तीर्थक्षेत्रावरील डागडुजी, परिसरातील सिमेंट रस्ते, विद्युत पथदीप अशा अनेक कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आला होता. मात्र आजही येथील काहीच सुविधा नाहीत. संतनिवास व गोशाळेचे काम अजूनही अपूर्ण आहे.

गोशाळा अर्धवट

दोन वर्षे उलटूनही ही कामे अपूर्ण का असा प्रश्न महंत उडिया महाराज व भरतदास महाराज यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या ठिकाणी देशभरातील भाविक व संत अजूनही मोठ्या संख्येने येतात. याठिकाणी आल्यानंतर त्याची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. कपिलधाराच्या गोमाता दोन वर्षांपासून गोशाळेच्या प्रतीक्षेत कुंभमेळ्यात याठिकाणी गोशाळा बांधण्यात आली होती. मात्र त्या गोशाळेवर अजूनही पत्रे, दरवाजे, खिडक्या बसव‌िलेल्या नाहीत.

जिल्हा परिषदेने ८० लाख रुपये श्री क्षेत्र कपिलधाराला मंजूर केले असून, ही कामे पूर्ण का होत नाहीत. झालेली ७० टक्के कामे ही दोनवर्षापूर्वीची आहेत. मात्र अद्यापही ती पूर्ण झालेली नाही. ही कामे लवकर पूर्ण केली नाही, तर झालेले काम देखील पाण्यात जाईल.- उडिया महाराज

गत दोन वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात कावनई कपिलधारा तीर्थ येथे संतनिवास, गोशाळा, प्रसाधनगृह, स्वयंपाक गृह ही कामे कामे शासनाने उभी केली आहेत. मात्र ती कामे अजूनही अपूर्ण आहेत. ही कामे जर वेळेत पूर्ण केली नाहीतर शिवसेनेना आंदोलन करणार.

- कुलदीप चौधरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत गाळेधारकांचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गाळा नं ११६चे व्यावसायीक अनधिकृतपणे याच आवारातील गाळे नं १६ धारक सतीश महाजन यांच्या गाळ्यासमोर माल उतरवून लिलाव करतात. यामुळे वादाचे प्रसंग उभे राहतात. त्यांना याठिकाणी लिलाव करण्यास बंदी घालाण्यात यावी, या मागणीसाठी गाळेधारकांनी बाजार समिती आवारात उपोषण केले.

बाजार समितीच्या आवारात सतीश महाजन हे १९८८ पासून व्यवसाय करीत असून, त्यांच्या गाळ्याच्या पूर्वेस असलेल्या रस्त्यावर ज्योती एंड कंपनीचे गाळे धारक अनधिकृतपणे माल उतरवतात. यामुळे फळ बाजाराकडे असलेल्या गाळयांकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांसह वाहनांना त्रास होतो. यावरून अनेकदा वाद होवून शेतमालाची नासधूस होते. ज्योती एंड कंपनीचे गाळेधारक यांना गाळा नं ११६ च्या मागील बाजूस जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीदेखील ते गाळा नं. १६ च्या पूर्वेस बळजबरीने लिलाव करतात. गाळेेधाराकांचे आर्थिक नुकसान होत असून यास बंदी घालावी, अशी मागणी े करण्यात आली आहे. या लाक्षणिक उपोषणात सतीश महाजन, जगदीश महाजन आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छते’ला मिळाले बळ

$
0
0

टीम मटा ः १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोह‌िमेत जिल्हाभरात विविध उपक्रमांद्वारे स्वच्छता करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे गोदापात्राची स्चच्छता, येवल्यात राष्ट्रपुरुषांचे शिल्प अन् त्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. देवळा, कळवणमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तर निफाड तालुक्यातील नैताळे येथे मात्र या मोहिमेचा निषेध करीत पेट्रोल दरवाढीवर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
येवला बाजार समिती आवाराची साफसफाई

येवला ः केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय कृषी, पणन व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी रविवारी हाती झाडू घेत बाजार समिती आवारात स्वच्छता मोहीम राबवली.

रविवारी सकाळी येवला बाजार समितीत ही मोहीम राबविण्यात आली. सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपत कांदळकर यांच्यासह समितीतील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेतला. केंद्रीय विपणन अधिकारी एस. एम. शुक्ला व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकारी यांनी यावेळी येवला बाजार समितीस भेट देवून स्वच्छता अभियानाची पाहणी केली.


गोदापात्र स्वच्छतेला त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गोदापात्राची स्वच्छता करत स्वच्छता हिच सेवा या अभियानाला पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे शुभारंभ करण्यात आला. त्र्यंबक नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज, डॉ. बिंदू महाराज या साधुमहंतांसोबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक संजय दराडे आदींसह महसूल अधिकारी सहभागी झाले. बेझे येथील श्री राम शक्ती पिठाचे भक्त आणि संदीप फाउंडेशन, आर्कीड, ब्रह्माव्हॅली आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.

त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पालकमंत्री महाजन यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत नगराध्यक्षा तृप्ती धारणे, भाजप शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे आदींसह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. स्वच्छतेची शपथ घेतल्यानंतर नियोजनाप्रमाणे शहराच्या विविध भागात स्वयंसेवक स्वच्छतेसाठी रवाना झाले. दरम्यान पालकमंत्री महाजन आणि महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज यांच्यासह नगराध्यक्षा धारणे व नगरसेवक नदीपात्रात उतरले आणि स्वच्छता केली.
कळवणच्या विद्यार्थ्यांचा मोहिमेत सहभाग

कळवण ः कळवण नगर पंचायत व आर. के. एम. उच्चमाध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा या मोहिमे अंर्तगत कळवण शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार स्वच्छता हीच सेवा ही मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणूण सोमवारी कळवण नगर पंचायत व कळवण एज्युकेशन संचालित आर. के. एम. उच्चमाध्यमिक विद्यालय, कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण बस स्थानक परिसर, नवीन कोर्ट आवार, गांधी चौक, मेनरोड या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, नगराध्यक्षा सुनिता पगार, शिवसेनेचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, गटनेते कौतिक पगार, नगरसेवक अनुराधा पगार, भाग्यश्री पगार, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, विद्यालयाचे प्राचार्य एच. के. शिंदे, उपप्राचार्य सी. आर. गांगुर्डे यांच्यासह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

चांदवडला फेरी

मनमाड ः चांदवड नगरपालिकेतर्फे सोमवारी शहरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली. विविध सरकारी कार्यालये, अधिकारी कर्मचारी विविध विद्यालयातील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांनी सात सहभाग घेतला. आमदार राहुल आहेर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी या अभियानात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

निफाडला मोहीम

निफाड ः निफाड नगरपंचायत अंतर्गत शहरातील वैनतेय विद्यालय, कर्मवीर ग. दा. मोरे महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक संस्था यांच्यासह निफाड नगरपंचायतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली. निफाड गावातील विविध रस्ते, चौक, तसेच खुल्या भूखंडावर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी निफाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष मुकुंद होळकर मुख्याधिकारी किशोर चव्हाण नगरसेवक देवदत्त कापसे, नगरसेविका सुनीता कुंदे, वि. दा. व्यवहारे, नवनाथ पवार, उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेक्नोलॉजीसह साधनसामुग्रीचा वापर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र पोलिस दल सर्वच दृष्टीकोनातून सक्षम आहे. मात्र, आपण टेक्नोलॉजीसह उपलब्ध साधनसामुग्रीचा तितका वापर करीत नाही. त्याचा कुठेतरी परिणाम होतो. त्यामुळे राज्यातील पोलिसांनी यापुढे काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.
महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीमध्ये सुरू असलेल्या १५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार, प्रशिक्षण आणि विशेष शाखेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. जगन्नाथन, एमपीएचे संचालक विजयसिंग जाधव, अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे, संचालक रितेशकुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल, पोलिस महानिरीक्षक, अनुपकुमारसिंह, सुनील रामानंद, विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, श्रीकांत तरवडे, डॉ. जय जाधव आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर होते. यावेळी माथूर यांनी सांगितले, की सीसीटीएनचा आपण वापर करतो हे जाहिर केले आहे. मात्र, अद्याप यात बऱ्याच त्रुटी आहेत. राष्ट्रीय पातळीवर सीसीटीएनचा वापर सुरू झाला असून, राज्य पोलिसांनाही या प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. परदेशात डॉग स्वॉडच्या मदतीने अनेक कामे केली जातात. राज्यात डॉग स्वॉडची संख्या वाढवण्यात येत असून, ही चांगली बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस दलात सव्वा दोन लाख पोलिस असून, त्यांच्या कुटुंबीयासह तसेच नातेवाइकांसह ही संख्या आठ लाखांच्या पुढे जाते. पोलिसांकडून पुरवल्या जाणाऱ्या ऑनलाइन सुविधांचा वापर करण्याची सुरुवात या लोकांनी केली तर सर्वसामान्य नागरिकही त्याकडे वळतील. ईद आणि गणेशोत्सव या दरम्यान राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेची बाजू पोलिसांनी चांगली संभाळली. याचा मोबादला म्हणून राज्य सरकारने पोलिसांसाठी मोठे बक्षिस जाहीर केल्याचे माथूर यांनी स्पष्ट करीत पोलिसांना सकारत्मक संदेश दिला.

पोलिस दलासाठी जागा
पोलिसांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, जमिनीच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे ज्यांनी कधीकाळी जमिनी दिल्या, त्या व्यक्ती अथवा स्थानिक प्रशासन जमीन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दौंडमध्ये एसआरपीएफच्या जागेबाबत असा अनुभव आला. आता तिथे डॉग स्वॉड युनिट सुरू करण्यात आले आहे. भविष्यातील हा धोका ओळखून सर्वांनी आपल्या हक्काच्या जमिनींबाबत सजग राहावे, असे आवाहन माथुर यांनी केले.

विजेत्या संघांचा सन्मान
कर्तव्य मेळाव्यात राज्यभरातील २३ संघाचे ४७५ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. पोलिस व्हिडिओग्राफीमध्ये शहर पोलिसांनी बाजी मारली. वैज्ञानिक मदत व तपास यात पुणे सीआयडी अव्वल ठरले. फोटोग्राफीमध्ये कोल्हापूर रेंज, डॉग स्वॉडमध्ये अमरावती आणि अॅण्टी स्टॉबेज चेक आणि कम्प्युटर अवेरनेस यात एमआयए पुणे विजेते ठरले. विजेत्या संघांचा पोलिस महासंचालकांच्या हस्ते चषक देऊन सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् त्यांचा पुन्हा फुलला संसार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लग्न करुन त्या दोघांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. पण, अवघे ११ महिने होत नाही तोच दोघांमध्ये विसंवादातून टोक गाठले. अखेर एकमेकाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये ते गेले आणि तेथून हा वाद थेट कोर्टात. अखेर जिल्हा विधी प्राधिकरणाने त्यांचा समेट घटवून आणला आणि त्यांचा संसार पुन्हा फुलला.
वयाच्या २१ व्या वर्षी तिचे आणि त्याचे वयाच्या २६ व्या वर्षी लग्न झाले. दोघांचा सुखी संसार सुरू झाला; पण अवघ्या ११ महिन्यांनंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाले. सासरच्या मंडळींविरोधात ती आणि तिच्याविरोधात सारे उभे ठाकले. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नंतर गुन्हा आणि त्यानंतर कोर्टात हा वाद गेला. अखेर हे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आले. दोघांमध्ये समेट घडावा यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यवान डोके, प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुधीरकुमार बुक्के, मध्यस्थ न्यायाधीश आर. एम. कपाट यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातील मतभेद दूर केले. दोघांनीही सकारात्मकता दर्शविल्याने अखेर त्यांचा मोडलेला संसार पुन्हा जोडला गेला आहे. या दोघांनीही एकमेकांसोबत पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने नांदण्याचा निर्णय घेतला असून तसा शब्द कोर्टाला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामायणावर आधारित बहारदार नृत्याविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्री संत सेवा संघातर्फे श्रीरामायणातील व्यक्तीरेखांवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सोमवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘रामायण : आदर्श समाज का स्वर्णचित्र’ या शीर्षकाने हा कार्यक्रम झाला. श्री संत सेवा संघातर्फे २० वर्षांपासून तत्त्वज्ञानातील दिव्य विचारांचा प्रसार समाजामध्ये करण्यासाठी विविध माध्यमातून कार्यरत आहे. या श्रृंखलेतील हा नाविन्यपूर्ण उपक्रम होता. श्री रामायणातील व्यक्तिमत्त्वांनी जे आदर्श जीवन जगून दाखवले ते समाजासमोर आणणे अत्यंत आवश्यक आहे. श्री संत सेवा संघाचे संस्थापक संजय गुरूजी यांच्या मार्गदर्शनातून संस्थेचे कार्यकर्ते संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी श्रीरामायणातील व्यक्तिरेखांवर आधारित हिंदी गिते लिहून त्यांना संगीतबध्द केले आहे. कार्यकर्ती नेहा भाट हिने या गीतांवर नृत्संरचना केली होती. प्रत्येक नृत्याविष्काराच्या सुरूवातीला त्या व्यक्तिरेखेची माहिती देण्यात येत होती. ज्येष्ठ शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर यांनी गायलेल्या सूर्यवंशी राम या गीतावर आधारित काही प्रसंग यावेळी सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोमनाथ मुठाळ, सीमा पछाडे आणि मनीषा विसपुते, दिलीप दीक्षित, नितीन ढगे व चेतन भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी क्लबतर्फे आज शालेय साहित्य वाटप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रोटरी क्लबने २०२२ पर्यंत शंभर टक्के भारत साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासास प्रोत्साहन देण्याचे कार्य या मोहिमेतून करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील तब्बल २३ शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रोटरी क्लबने ‘टीच’ उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण, ई लर्निंग, प्रौढ शिक्षण, मुलांचा शैक्षणिक विकास आणि आनंदी शाळा असा पाच कलमी कार्यक्रम आखला आहे. त्याचाच भाग म्हणून रोटरीतर्फे घोटी परिसरातील २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता चौथी आणि पाचवीच्या ११०० गरजू विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश, शूज, सॉक्स, पेन्सिल बॉक्स, कंपास पेटी, पाण्याची बाटली, पाच वह्या अशा वस्तूंचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. प्रती किट दोन हजार रुपये मूल्य असलेल्या या साहित्यासाठी रोटरी इंटरनॅशनल आणि अमेरिकेच्या लुईस विले मॉर्निंग क्लबने अर्थसहाय्य दिले आहे. याशिवाय या सर्व शाळांमध्ये नेलकटर आणि हॅण्डवॉश सोप किटचेही वाटप होणार आहे.
सामाजिक उपक्रमांतून समाजाचा विकास साधण्याच्या या उपक्रमाला टिचर्स ट्रेनिंगची गरज आहे. यात गरजूंना मदतीचा हात देऊ इच्छिणाऱ्या दानशुरांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक, दूरध्वनी २५०९८०८ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल यांनी केले आहे. या उपक्रमासाठी सचिव मनीष चिंधडे, विवेक जायखेडकर, उदयराज पटवर्धन, नितीन पाठक, राधेय येवले आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची कॉलेजमध्ये आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील व्ही. एन. नाईक कॉलेजध्ये बारावीत शिक्षण घेणारी काजल संजय साळवे (१८) या तरुणीने कॉलेजच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. कॉलेजमध्ये गर्दी असतानाच सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विद्यार्थी व संस्थेच्या स्टाफने तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
काजल साळवे सातपूर परिसरातील रहिवासी आहे. ते बारावी कॉमर्स शाखेमध्ये शिक्षण घेत होती. सध्या कॉलेजमध्ये घटक चाचणी परीक्षा सुरू आहेत. तिने सोमवारी परीक्षा दिली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. कॉलेज इमारत आणि कॅम्पसमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू होती. घटनेची माहिती समजताच सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

चित्रपट प्रमोशनपूर्वीच दुर्घटना
व्ही. एन. नाईक कॉलेज शहराच्या मध्यवर्ती परिसरात आहे. बारावीची घटक चाचणीचा पेपर झाल्यानंतर काही वेळात एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही अभिनेते कॅम्पसमध्ये येणार होते. मात्र, तत्पूर्वीच बारावीची विद्यार्थिनी काजलने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. कॉलेजमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने तिला सिव्हिलमध्ये दाखल केले. या वेळी मुलीचे नातेवाइकही दाखल झाले. जोपर्यंत आत्महत्येचे कारण समजत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा तिच्या नातेवाइकांनी घेतला. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दिवसभरात संस्थेचे कामकाज बंद ठेवण्यात आले.

घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. वृत्त कळताच संस्थेतील सहकाऱ्यांनी विद्यार्थिनीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ नेले. मात्र, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. कोणतेही टोक गाठण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी तणावाच्या स्थितीत थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.
- कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्ष,
व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिका सेवेतून जखमींना जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील राज्याच्या हद्दीत आजपर्यंत अपघातातील २ हजार ९८५ जखमींना जीवदान मिळाले आहे. या मार्गावर रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून १ हजार ९०४ अपघात झाले आहेत. गोंदे फाटा हद्दीत सर्वाधिक अपघात झाले. त्यात तब्बल १ हजार २८९ जखमी प्राण या सेवेमुळे वाचले आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावर सहा ठिकाणी रुग्णवाहिका होत्या. त्यात शहापूर हद्दीत आजपर्यंत ९२३ अपघात झाले, त्यात ६४३ जखमींचे प्राण वाचले. गोंदे फाटा हद्दीत ६४७ अपघात झाले असून त्यात १ हजार २८९ जखमींचे प्राण वाचले. शिरवाळे फाटा (पिंपळगाव) टापूत २२७ अपघात होऊन त्यात ७५५ जखमी झाले. झोडगे हद्दीत ४२ अपघात होऊन त्यातील ७५ जखमींचे प्राण वाचले. शिरपूर (चोपडा फाटा) हद्दीत २८ अपघात झाले. त्यात १५८ जखमी झाले आहेत. सोनगीर हद्दीत ३७ अपघात झाले. त्यात ६५ जखमींचे प्राण वाचले आहेत.
या सर्व जखमींना संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात नेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले व त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. सध्या या मार्गावर चार रुग्णवाहिका आहेत. अपघात झाला की जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले तर उपचार लगेच सुरू होतात व त्यांचे प्राण वाचू शकतात. हे ओळखून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी मोफत रुग्णवाहिका सेवेचा उपक्रम सुरू केला आहे.
सध्या मुंबई-गोवा महामार्गावर आठ ठिकाणी, मुंबई-गुजरात महामार्गावर तीन ठिकाणी, मुंबई-आग्रा महामार्गावर चार ठिकाणी, मुंबई-हैदराबाद महामार्गावर पाच ठिकाणी, पुणे-बंगळुरू महामार्गावर सहा ठिकाणी, कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर एक रुग्णवाहिका आहे. रुग्णवाहिकांची ठिकाणे तेथील अपघातांच्या संख्येनुसार बदलत असतात.
संस्थानने त्यांच्या चालकांचे मोबाइल नंबर त्या भागात जाहीर केलेल आहेत. त्याशिवाय संस्थानचाही नंबर जाहीर केला आहे. कोठेही फोन आली की नजिकची रुग्णवाहिका अपघातस्थळी जाते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात व रुग्ण गंभीर असेल तर जिल्हा रुग्णालयात दाखल करते. त्यामुळे त्या देवदूत ठरल्या आहेत.

मदतीसाठी येथे साधा संपर्क
रुग्णवाहिका सेवा मोफत आहे. गाडीचा इंधन व चालकाच्या पगाराचा खर्च संस्थानतर्फे दिला जातो. या जखमींकडून वा त्यांच्या नातेवाइकांकडून पैसे घेतले जात नाही. पोलिसांनाही ही सेवा उपयुक्त आहे. सर्व महामार्गावरील रुग्णवाहिकांशी संपर्क साधण्यासाठी ८८८८२६३०३० हा मोबाइल क्रमांक सुद्धा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस मुख्यालयाची जागा कोर्टाच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा सोमवारी (दि. १८) रितसर जिल्हा कोर्टाच्या स्वाधीन करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांच्यासह वकील आणि इतर अधिकारी यावेळी हजर होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात १९८५ साली स्थापन झालेले जिल्हा कोर्टाला अनेक वर्षांपासून जागेचा प्रश्न सतावतो आहे. कमी जागेमुळे पार्किंगसह वकील, पक्षकार, आरोपी अशा सर्वांच्या दृष्टीकोनातून सुसज्ज इमारतीची गरज असून, कोर्टाच्या पाठीमागील आणि पोलिसांच्या ताब्यातील पाच एकर जागा कोर्टासाठी मिळावी म्हणून अॅड. का. का. वाघ यांनी थेट मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आजमितीस येथे ३१ न्यायाधीश न्यायदानाचे काम करतात. नाशिक कोर्टाला जागा कमी असल्यामुळे कुटुंब न्यायालय, मोटार वाहन न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच स्कुल ट्रिब्युनल हे शहरातील इतर ठिकाणी चालवावे लागतात.

पोलिसांची कार्यालये शिफ्ट
नाशिक कोर्टाच्या पश्चिमेकडील पोलिस हेडक्वार्टरच्या ताब्यात असलेली पाच एकर जागा मिळावी म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडून २००० पासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना जनहित याचिकेच्या माध्यमातून यश मिळाले. या खटल्याची मुंबई हायकोर्टात काही महिन्यांपूर्वी सुनावणी पूर्ण झाली. त्यात, कोर्टाने अडीच एकर जागा सरकारने कोर्टासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. काही महिन्यापूर्वी भूमीअभिलेख विभागामार्फत मोजणी प्रक्रिया राबवण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या सात ते आठ इमारतीतील कामकाज दुसऱ्या जागेत हलवण्यात आले.

लवकरच बांधकाम
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, याचिकाकर्ते का. का. घुगे यांच्यासह वकील संघाचे सदस्य व इतर अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. तसेच पोलिसांच्या ताब्यातील हस्तांतरण कागदपत्रे कोर्ट प्रशासनाला देण्यात आली. कोर्टाच्या नवीन जागेत लवकरच बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीत बार रूम, बहुमजली पार्किंग यासह इतर सुविधा उभारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images