Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धान्य, भुसार मालाचे झोडगेत होणार लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील बाजार समितीच्या झोडगे उपबाजार आवारात धान्य व भुसार मालाचे लिलाव सुरू करण्यात येतील, तसेच मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर सुरू असलेल्या लिलाव पद्धतीनुसार कांद्याचे लिलाव दररोज दुपारी चार वाजता सुरू करण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले. शेतकरी बांधवांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात भुसे यांनी तालुक्यातील झोडगे, मुंगसे येथील व्यापारी, आडते, माथाडी कामगार, हमाल मापारी, बाजार समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक घेतली. झोडगे येथील ओट्याचे तसेच इतर अपूर्ण राहिलेले काम १५ दिवसात पूर्ण करण्यात येतील, पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी कायमस्वरुपी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेत पिण्याचे पाणी देऊन गैरसोय दूर करण्यात येईल, आवश्यक सोयी बाजार घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. बाजार समितीकडून अडचणींची सोडवणूक करण्यात येईल, झोडगे येथे दररोज दुपारी चार वाजता कांद्याचे लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. तसेच उत्पन्नवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बैठकीस समितीचे उपसभापती सुनील देवरे, सदस्य संग्राम बच्छाव, उमाकांत देसले, संजय घोडके, वसंत कोर, फकिरा शेख, मालेगाव, झोडगे, मुंगसे व्यापारी असोसिएशनचे सचिव अशोक देसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा बळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
दिक्षी (ता. निफाड) येथील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात रविवारी (दि. १७) दोन वर्षीय बालकाचा जीव गेला. देविदास दशरथ प्रधान असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. मोकाट कुत्र्यांनी या भागात दहशत माजवली असून शेळ्या, मेंढ्या यांच्यावरही यापूर्वी हल्ले केले आहेत.
मूळचे पेठ तालुक्यातील असलेले दशरथ प्रधान हे आपल्या कुटुंबीयांसह दिक्षी येथील शेख यांच्या द्राक्षबागेत मजुरीसाठी आलेले आहे. जुन्या रेल्वेलाइनलगत शेख यांच्या वस्तीवरच प्रधान कुटुंब राहते. दशरथ प्रधान यांचा दोन वर्षांचा देविदास हा मुलगा इतर लहान मुलांसोबत रविवारी खेळत होता. तिथे कुत्र्यांची झुंड आली. यातील एका कुत्र्याने देवीदासला फरपटत उचलून बाजूला नेले. यानंतर इतर कुत्र्यांनी देविदासच्या पायाला, अंगाला अनेक ठिकाणी चावे घेऊन शरिराचे लचके तोडले. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने घाबरलेल्या शेतमजुरांनी गावात येऊन ही घटना सांगितली. कुत्र्यांच्या दहशतीमुळे वस्तीवर काम कसे करावे, असा प्रश्न केला. कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर तेथे लस उपलब्ध नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

नाशिकमधील कुत्री गावांमध्ये
नाशिक महापालिका हद्दीत पकडण्यात आलेले मोकाट संबंधित विभागाकडून गाडीत घालून पहाटेच्या वेळेस निफाडसह तालुक्यातील इतर ग्रामीण भागात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ग्रामीण भागात अन्न मिळत नसल्याने हे मोकाट कुत्रे एकत्रितपणे हल्ले करीत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमी बहिणीचाही मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर
पाथर्डी-देवळाली रोडवर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गुरुवारी (दि. १४) तरुण भाऊ ठार झाला होता. याच दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या जखमी बहिणीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी-देवळाली मार्गावरून सागर कासार हा तरुण आपल्या बहिणीला सातपूर येथे सासरी सोडायला जात होता. त्याचवेळी ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार सागर हा जागीच ठार झाला. मात्र मागे बसलेली त्याची बहिण योगिता विकास शिंदे ही गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी दुपारी सविताचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्‍त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात तरुणावर गोळीबार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरातील किदवाई रस्त्यावरील सोडा पिण्यास गेलेल्या तरुणावर बंदुकीने गोळी झाडून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. १७) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
जमाल अहमद अब्दुल खालीक (२४, रा. कुंभारवाडा) या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली. जमाल आणि त्याचा मित्र अकीब हुसेन हे दोघे सोडा पिण्यासाठी ए. टी. टी. हायस्कूलजवळील सोडागाडीवर गेले. त्यांनी कडक सोडा बनविण्यास सांगितले. माझ्याकडे कडक सोडा नाही, असे सांगितल्याने जमाल त्याचावर रागवत असताना सोडागाडीचालकासोबत उभ्या असलेल्या ३० ते ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचे व जमालचे भांडण झाले. यावेळी अनोळखी व्यक्तीने त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीने जमालवर गोळी झाडली. त्यास येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जमालची प्रकृती स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिलाव पूर्ववत; भाव कमीच

$
0
0

टीम मटा
कांदा व्यापाऱ्यांवरील आयकर विभागाच्या धाड सत्रानंतर जिल्हाभरातील कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेत आदेश दिल्यानंतर कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार सोमवारी सुरळीत सुरू झाले. मात्र नेहमीपेक्षा आवक कमी राहिल्याने भाव देखील खाली आल्याचे ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये दिसून आले.

मुंगसेत तीन हजार क्विंटल आवक
मालेगाव : मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रात केवळ तीन हजार क्विंटल आवक झाली. मालेगाव तालुक्यातील उमराणे येथील कांदा व्यापारी खंडू देवरे यांच्यावर गुरुवारी आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर कांदा व्यापारीमध्ये खळबळ उडाली होती. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारपासून येथील मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रावर कांदा लिलाव सुरू झाले. याची अनेक शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने कांद्याची नेहमीपेक्षा कमी आवक दिसून आली. मुंगसे येथे केवळ तीन हजार क्विंटल आवक झाल्याची माहिती सचिव अशोक देसले यांनी दिली. तर कांद्याचे भाव ३०० रुपयांपर्यंत खाली आले. दुपारनंतर भाव सरासरी एक हजार १०७ रुपयांवर स्थिरावले. कांद्याला कमाल भाव एक हजार ३०४ रुपये इतका मिळाला.
उमराणे बाजार समितीच्या आवारातही लिलाव सुरू झाले असले तरी सकाळच्या सत्रात आवक कमी होती. दुपारनंतर आवक वाढल्याने दिवसभरात सुमारे १० क्विंटल आवक झाल्याची माहिती सचिव नितीन जाधव यांनी दिली. उमराणे बाजार समितीतही कांद्याचे भाव स्थिर होते.‌ किमान ९०० रुपये आणि कमाल एक हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार २०० रुपये इतका भाव होता.

पिंपळगावात सरासरी ११२५ रुपये
पिंपळगाव बसवंत : लिलाव बंद व दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी पिंपळगाव बसवंत बाजार समिती लिलाव पूर्ववत सुरू झाले. सुमारे ३०७ ट्रॅक्टर, ७६ जिपमधून नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल १६२०, किमान ८२५ तर सरासरी ११२५ रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली. दोन दिवस बाजार बंद राहूनही दरात मात्र फारसा फरक पडला नाही.

सटाण्यात आज लिलाव
सटाणा : कांदा व्यापाऱ्यांकडे खरेदी केलेल्या मालाला ठेवण्यासाठी जागा नसल्याने सोमवारी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला. कांदा लिलाव मंगळवार (दि. १९) दिवसभर करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. बुधवारी (दि. २०) सर्वपित्री अमावस्या तर गुरूवार (दि. २१) घटस्थापना असल्याने बाजार समिती बंद ठेवून शुक्रवारी (दि. २२) कांदा लिलाव होणार आहे. या सप्ताहात सटाणा बाजार समितीत अवघे दोनच दिवस कांदा लिलाव होणार असल्याने कांदा उत्पादक चिंतेत आहेत.
सटाणा शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने सद्यस्थितीत जोर पकडला आहे. यामुळे बाजार समिती आवारात कांदा खरेदी करणे आणि तो साठवून ठेवणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कांदाचाळीत कांदा साठवून ठेवलेला असला तरीही कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणण्यासठी उत्सुक आहे. मात्र, कांदा बाजार येत्या सप्ताहभरात अवघ्या दोनच दिवस सुरू राहणार असल्याने शेतकरी हताश झाला आहे.

दरात तीनशे रुपयांची घसरण
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी लिलाव सुरू होताना शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी उन्हाळ कांद्याचे बाजारभाव पूर्वीच्या तुलनेत सरासरी तब्बल तीनशे रुपयांनी खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.
यंदाच्या हंगामात ऑगस्टमध्ये प्रतिक्विंटल सुमारे अडीच हजार रुपये भाव दिलेला उन्हाळ कांदा चालू सप्टेंबरमध्ये खाली आला. प्राप्तीकर विभागाकडून कांदा व्यापाऱ्यांवर छापा टाकण्यात आल्यानंतर बाजारभाव अधिकच गडगडला. स्थानिक व्यापाऱ्यांनी शुक्रवार व शनिवारी पाठ फिरवल्याने बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवरासह अंदरसूल उपबाजार आवारातील लिलाव बंद होते. व्यापारी वर्गाने सोमवारी लिलावात सहभाग घेतल्याने सरासरी पावणे तीननशे रुपयांनी कांद्याचे दर घसरले. गेल्या आठवड्यातील सोमवारी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ६०० ते कमाल १ हजार ६५० (सरासरी १ हजार ४००) रुपये असा बाजारभाव मिळाला होता. सोमवारी सकाळच्या सत्रात किमान ५०० ते कमाल १ हजार ४६६ (सरासरी १ हजार १५०) असा बाजारभाव मिळाला. सोमवारी दुपारच्या सत्रात दर पुन्हा खाली आले. दुपारी किमान ५०० ते कमाल १ हजार ३५० (सरासरी १ हजार १२५) असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, महिनाभरापूर्वी चांगला भाव मिळेल या आशेने चाळीत उन्हाळ कांदा साठविलेल्या उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावासाठी पाचशे ते सहाशे ट्रॅक्टर्स येतात. मात्र, सोमवारी सकाळी २६३ ट्रॅक्टरचे लिलाव होताना, दुपार सत्रात अवघे शंभरच्या आसपास ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडून लिलावासाठी आणले गेले. सकाळच्या सत्रात मिळालेला कांदा बाजारभाव हा समाधानकारक नसल्यानेच नंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. येवला बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात सोमवारी दिवसभरात एकूण ३६३ ट्रॅक्टरमधून जवळपास सात हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.


लासलगाव, चांदवडमध्ये लिलाव नाही

बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने लासलगावमध्ये लिलाव होवू शकले नाही. तसेच रविवार व सोमवारी बंद वार असल्याने चांदवड येथेही लिलाव हरोऊ शकले नाहीत. जिल्ह्यातील उर्वरित इतर १३ कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी लिलाव झाले. त्यात कांद्याचे कमाल दर १ हजार ३५० रुपये तर किमान दर ९०० रुपये प्रतिक्विटंल होते. सरासरी दर हे १ हजार १०० रुपये होते. छापा पडण्यापूर्वी दर होते तेच या लिलावत असल्यामुळे त्यात फारसा बदल झाला नाही.

प्राप्तिकरची छाननी सुरू
प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यानंतर तीन दिवसानंतर गडकरी चौकातील कार्यालयात कागदपत्राच्या छाननीचे काम सुरू केले आहे. त्यात सर्व व्यवहार तपासले जात असून उर्वरित माहिती मागवली जात आहे. या कारवाईनंतर व्यापाऱ्यांच्या ‘सीए’च्या प्राप्तिकर विभागात फेऱ्या वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी जयंतीपासून खादीवर सवलत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर)पासून १४ नोव्हेंबरपर्यंत खादीवर १० टक्के सवलत देण्याचा निर्णय नाशिक जिल्हा सहकारी खादी व ग्रामद्योग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. खादी जीएसटीमुक्त केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.

ही सभा मराठा मंगल कार्यालय, मेनरोड येथे पद्माकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाइस चेअरमन शंकराव बर्वे, सचिव मानिनी कन्सारा, अंजली दामले, रमेशचंद्र घुगे, प्रमोद गर्गे, दिलीप मोरे, काशीनाथ निमसे, कैलास सोनवणे, मकरंद सुखात्मे, केदारनाथ सूर्यवंशी, अजय तांबट आदी उपस्थित होते.

जॅकेट, साड्या, अगरबत्त्या आदी खादी भांडारमध्ये उपलब्ध असून,नागरिकांनी खादी भांडारला भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेचे एकूण १४०९ सभासद असून, यावर्षी ४ लाख ५१ हजार रुपये नफा झाल्याची माहिती बर्वे यांनी दिली. संस्थेचे मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थापक तथा स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर पांडुरंग करंजकर, डॉ. यशवंत पाटील, शांताराम निगळ यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वपित्रीने रामकुंडावर गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

परंपरेनुसार माध्यान्हकाळ अमावास्येच्या ज्या दिवशी येतो, तीच पितरांची अमावास्या मानली जाते. त्यामुळे मंगळवार (दि. १९) हाच दिवस सर्वपित्री अमावास्येचा मानण्यात आल्याने रामकुंड परिसरात पितरांना नैवेद्य देण्यासाठी येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सर्वपित्रीचे श्राद्ध घालण्यासाठी दिवसभर या परिसरातील मिळेल त्या जागेवर बसून विधी सुरू होते.

यंदाची सर्वपित्री अमावास्या ही मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवशी असल्यामुळे याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम होता. मंगळवारी ११ वाजून ५३ मिनिटांनी अमावास्येला प्रारंभ झाल्यामुळे दुपारी श्राद्ध आणि तर्पण विधी करण्यासाठी रामकुंड परिसरात जागा कमी पडली होती. गोदावरीला पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे गांधी तलावावरून पाणी ओसांडून वाहत आहे. त्यामुळे रामकुंडाच्या ज्या भागात हे विधी होत होते, ती जागा अपुरी पडल्याने थेट कपालेश्वरसमोरील पायऱ्यांवर, तसेच मैदानावरही अनेकांना विधी पार पाडावे लागले.

अमावास्येस मंगळवारी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अमावास्या राहील. त्यामुळे श्राद्ध काळ माध्यान्ही म्हणजेच दुपारी १२ ते ३ यादरम्यान होता. पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांचे स्मरण करण्यास ज्यांना जमले नाही, ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नाही, अशांसाठी सर्वपित्री अमावास्या हा श्राद्धाचा दिवस मानण्यात येतो. घरोघरी श्राद्ध तर्पणाचे विधी केले जातात. त्यात रामकुंड परिसरात श्राद्धाला महत्त्व असल्यामुळे येथे हे विधी करण्यासाठी या पंधरवड्यात गर्दी होत असते. त्यात शेवटचा दिवस म्हणून सर्वपित्रीला दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी गर्दी झाली होती. उत्तर भारतीय उगवत्या सूर्याने पाहिलेल्या दिवसालाच सर्वपित्रीचा दिवस मानतात. त्यांच्याकडून बुधवारी (दि. २०) सकाळी सर्वपित्रीचे श्राद्ध होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजूर महिलेने पोस्टाला शिकविला धडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गरीब महिलेच्या खात्यातून अपहाराद्वारे काढलेले १३ हजार ३०९ रुपये पोस्टाने एक महिन्यात जमा करावेत. विलंब केल्यास दहा टक्के व्याज द्यावे. नुकसान भरपाईपोटी दहा हजार व दावा खर्चापोटी दोन हजार अदा करावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने नुकतेच दिले.

पेठ तालुक्यातील आंबे येथील मजूर महिला कौसल्याबाई अंबादास गायकवाड यांनी न्यायासाठी दिलेली लढाई इतरांसाठी प्रेरणादायी आहे. न्या. मिलिंद सोनवणे यांच्यापुढे तक्रारदारातर्फे अॅड. कोमल गुप्ता तर पोस्टातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर यांनी युक्तीवाद केला.

कौसल्याबाईंनी आंबे येथील पोस्टर मास्टर, नाशिकचे मुख्य पोस्ट मास्टर, अधीक्षक, तक्रार निरीक्षक यांच्याविरुद्ध दावा केला होता. कौसल्याबाई यांनी आंबे पोस्टात २०१३ मध्ये बचत ठेव आणि विमा खाते सुरू केले. खात्यांमध्ये त्यांनी वेळोवेळी एकूण २६ हजार रुपये जमा केले. रक्कम काढलीच नाही. मात्र, पोस्ट मास्टर के. एम. पवारांनी नियमित त्याचा अपहार केल्याचा आरोप कौसल्याबाई यांनी केला. कौसल्याबाईंनी पोस्टाकडे २०१५ मध्ये दोन वेळा तक्रारी केल्या. त्यावर पोस्टाने त्यांची बचत पुस्तिका जमा केली. कोऱ्या फार्मवर सह्या घेऊन १५ दिवसात पैसे जमा होतील असे सांगितले. मात्र, रक्कम जमा केली नाही. ही सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे जमा रक्कम, व्याज आणि नुकसान भरपाईपोटी ९१ हजार रुपये मिळण्याची मागणी कौसल्याबाईंनी न्याय मंचाकडे केली.

गैरव्यवहार केल्याचे मान्य

पोस्टाने दावा केला, की कौसल्याबाईंनी शंभर रुपये जमा करून खाते सुरू केले. त्यानंतर खात्यात व्यवहार झाले. मात्र, आंबेचे पोस्टमास्टर पवार यांनी त्या खात्यातून ११ हजार ९०० रुपयांचा अपहार केला. चौकशीअंती कौसल्याबाईंच्या खात्यात १२ हजार ६९१ रुपये पुन्हा जमा करण्यात आले. पोस्टाने सेवेत कमतरता ठेवली नाही.

यावर कोसल्याबाईंनी युक्तीवाद केला, की पोस्ट मास्तरांनी अपहार केल्याचे पोस्टानेही मान्य केले. त्यामुळे सेवेत कमतरता स्पष्ट होते. यावर पोस्टाने तक्रारीची दखल घेऊन तात्काळ चौकशी झाली. चौकशीत तक्रारदाराच्या खात्यात ११ हजार ९०० रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. ती रक्कम खात्यावर पुन्हा जमा केली. नवीन पासबुकही दिले. त्यामुळे सेवेत कमतरता राहिलेली नाही, असा दावा पोस्टाने केला.

अन् मिळाला न्याय

पोस्टमास्तरांनी तक्रारदार व इतर व्यक्तींच्या खात्यांमध्ये गैरव्यवहार केल्याचे‌ निरीक्षक न्यायमंचाने नोंदविले. चौकशी अंती रकमा पुन्हा खात्यात जमा केल्या असल्या तरी असा अपहार गंभीर आहे. गरीबांनी विश्वासाने जमा केलेल्या मेहनतीच्या पैशांची काळजी घेणे ही पोस्टाची जबाबदारी होती. तक्रारदारांनी दावा केल्यानंतर रक्कम खात्यावर जमा होण्यास दोन वर्षे लागली. मंचाकडे अर्ज केल्यानंतर पोस्टाने तपास केला. त्यामुळे सेवेत कमतरता स्पष्ट होते. कौसल्याबाईंनी आपण दोन खात्यात २६ हजार रुपये जमा केल्याचा दावा केला. मात्र, तसे पुरावे दिले नाही. तक्रारदाराच्या खात्यावर पोस्टाने केवळ १२ हजार ६९१ रुपये जमा केले. कौसल्याबाईंनी आपण रक्कम काढलेली नाही, असे शपथेवर सांगितले आहे. पोस्टानेही ती बाब खंडित केलेली नाही. त्यामुळे राहिलेले १३ हजार ३०९ रुपये महिनाभरात जमा करावेत. सेवेत कमतरतेमुळे नुकसान भरपाईपोटी १० हजार व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी दोन हजार रुपये द्यावेत, असे आदेश न्यायमंचाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी दोघांचे स्वेच्छानिवृत्ती अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या गळतीने प्रशासन त्रस्त असताना, आता थेट वैद्यकीय विभागातूनच स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जांचा ओघ सुरू झाला आहे. सोमवारी वैद्यकीय विभागाच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज करून प्रशासनाची चिंता वाढवली आहे. शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले असताना, डॉक्टरांच्या या अर्जांमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. अजूनही काहीजणांकडून स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज येण्याची शक्यता आहे.

महापालिकेत सध्या कर्मचाऱ्यापाठोपाठ अधिकाऱ्यांचेही आऊटगोइंग सुरू आहे. भाजपच्या आततायी कारभाराला कंटाळलेल्या अधिकाऱ्यांनी कामकाजाऐवजी बाहेर जाण्याकडे कल वाढवला आहे. तत्कालीन शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर यांनी आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे आणि विधी व मिळकत विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज बुधवारच्या महासभेत ठेवण्यात आला आहे. सोमवारी पुन्हा वैद्यकीय विभागाच्या दोन डॉक्टरांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. बिटकोत कार्यरत असलेल्या डॉ. प्रिया राजहंस आणि डॉ. संजय पिचा या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागात अगोदरच डॉक्टरांची कमतरता असताना तेथेही गळती सुरू झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. शहरात रोगराईला अटकाव करताना नाकीनऊ येत असताना या नव्या संकटामुळे प्रशासन चिंतेत पडले आहे.

पदाधिकाऱ्यांची धास्ती

सध्या पालिकेतील काही पदाधिकारी व नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांसह डॉक्टरांनाही टार्गेट केले जात आहे. काहींच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला जात असून, काहींना थेट धमकावले जात असल्याचे प्रकार होत आहेत. त्यासंदर्भातील तक्रारी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. पदाधिकारी व नगरसेवकांच्या या त्रासाची धास्ती अधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी घेतली असून, एकीकडे कामाचा ताण आणि दुसरीकडे त्रास यामुळे दुहेरी कोंडीत सापडलेले अधिकारी व डॉक्टर स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग पत्करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद कारखान्यांचा तिढा सुटणार केव्हा?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात औद्योगिक वसाहत उभी राहण्यासाठी शासनाने सातपूर व अंबड गावातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनींवर आरक्षण टाकले. त्यानंतर कारखान्यांचे मोठे जाळे नाशिक शहरात पसरले. परंतु, अशा जागेवर वसलेल्या अाणि गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. हा तिढा सुटणार तरी केव्हा, असा सवाल युवा उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे निमा या संघटनेकडून अनेकदा बंद असलेल्या कारखान्यांची पडिक असलेली जागा एमआयडीसीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली आहे. परंतु, डीआरटी न्यायालयात गेलेल्या कारखानामालकांना निमाचेच काही पदाधिकारी मदत करीत असल्याने त्यावर निर्णय होत नसल्याचे बोलले जात आहे. याबाबत एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहराच्या वाढत्या विस्तारात कारखान्यांची संख्याही वाढली आहे. वेगाने वाढणाऱ्या शहरात सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत बंद असलेल्या कारखान्यांच्या प्रश्न अधांतरीच असल्याने त्यावर उपाय शोधणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नाशिकला एमआयडीसीची स्थापना झाल्यावर शासनाने सातपूर व अंबडमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या होत्या. शेतकऱ्यांनीदेखील कुठलाही नकार न करता शेतजमिनी कवडीमोल भावात एमआयडीसीला कारखान्यांसाठी दिल्या होत्या. त्यानंतर सन १९७८ नंतर कारखान्यांचे मोठे जाळे एमआयडीसीत उभे राहिले. दरम्यान, कारखान्यांची संख्या वाढती असताना अनेक कारखाने वादामुळे मालकांनी बंद केले. त्यामुळे अशा जागा युवा उद्याेजकांना दिल्या जाव्यात किंवा शेतकऱ्यांना परत दिल्या जाव्यात, अशी चर्चा परिसरात होतना दिसत आहे.

--

औद्योगिक संघटनांचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांच्या कवडीमोल भावाने घेतलेल्या कारखान्यांच्या जागेचे मोल आज सोन्यापेक्षाही अधिक झाले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ वादात बंद असलेल्या कारखान्यांचा प्रश्न एेरणीवर आला आहे. औद्योगिक संघटनादेखील त्यात विशेष लक्ष घालत नसल्याने कोट्यवधी रुपये मूल्याच्या जागा धूळ खात पडून आहेत. यावर एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच योग्य तो उपाय करावा, अशी युवा उद्योजकांकडून केली जात आहे.

--

शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील बंद असलेल्या कारखान्यांचा प्रश्न सुटत नसल्याने मोठे भूखंड अडकून पडले आहेत. त्यामुळे साहजिकच नवीन उद्योजकांना भूखंड मिळत नसल्याची स्थिती आहे. यावर एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच निर्णय घेण्याची गरज आहे.

-रोहन हिंगोले, युवा उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोतराजच्या भूमिकेत विद्यार्थी

$
0
0

धुळे ः विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही आदिवासी विकास प्रकल्प व समाज कल्याण विभागाने दखल न घेतली नाही. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. १९) मोर्चा काढण्यात आला. यावेळी एका विद्यार्थ्याने पोतराजाची वेषभूषा परिधान करून मोर्चात सहभाग नोंदविला होता. याप्रंसगी जिल्हा प्रशासनाला अभाविपतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गोरगरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात दाखल होतात. मात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून देण्यात येणारी शिष्यवृत्तीचा लाभ तीन वर्षांपासून मिळालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचण येत आहे. तरी आदिवासी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती व वसतिगृहातील इतर भत्ते त्वरित मिळावे अन्यथा अभाविपतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी अभाविपचे प्रदेश सहमंत्री धनश्री चांदोडे, शहरमंत्री रोहन अग्रवाल, ज्योत्स्ना पाटील, चेतन पाटील, पुजा गुरव, प्रिया नेरकर, विशाल सूर्यवंशी, शुभम देव, गोपाळ पाटील, अजय पदमार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुआई’च्या वृक्षांना महावितरणचा ‘शॉक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य सरकारच्या वनविभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून वनमहोत्सवांतर्गत कोटीच्या कोटी वृक्ष लागवड करण्यात आल्याचा गाजावाजा झाला. मात्र मालेगावातील वृक्षसंवर्धनाच्या ‘तरुआई’ चळवळीतून रोवण्यात आलेल्या झाडांना सरकारी असंवेदनशीलतेच फटका बसला आहे. टवटवीत झालेली ही झाडे बेदरकारपणे तोडली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील एम. बी. पेट्रोल पंप ते डॉ. भोकरे क्लिनिकसमोर तहसील व अपर जिल्हाधिकारी निवासाच्या कंपाउंडलगत ३४ झाडे वृक्षसंरक्षक पिंजऱ्यासह जानेवारी २०१६ पासून लावलेली आहेत. चार महिन्यांपूर्वीच याठिकाणी लावलेल्या जंगली बदाम व बकाम नीम या दोन झाडांच्या पिंजऱ्यांच्यामध्ये महावितरणकडून एक डीपी बसवण्यासाठी खांब उभारण्यात आले. याबाबत वृक्षप्रेमींनी कंपनीच्या अभियंत्यांना डीपी व तारा तहसील कार्यालयाच्या कुंपणाच्या आतून टाकाव्यात अशी विनंती केली होती.

झाडांचे अस्तित्व धोक्यात?

शहरात गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या गटाने केवळ वृक्षारोपण न करता खऱ्या अर्थाने वृक्षसंवर्धनही चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीमुळे शहरात ५०० हून अधिक झाडे लावली आहेत. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय ही चळवळ वृक्षसंवर्धनाचे काम करीत आहे. सरकारी पातळीवरून यासाठी मदत तर सोडाच पण आता सरकारी बाबूंचा ‘प्रताप’' सहन करावा लागत आहे. ‘तरुआई वृक्षारोपण आणि संवर्धन’ या फेसबुक पेजवर पोस्ट व फोटो टाकण्यात आल्याने सर्वच स्तरातून सोशल मीड‌यिावर या घटनेचा निषेध केला जात आहे.

मंत्र्यांच्या आदेशाला फाटा

या झाडांबाबत राज्यमंत्री दादा भुसे यांनीदेखील संबंध‌ति अधिकाऱ्यांना कल्पना देऊन ही डीपी या कंपाउंडच्या आत सरकारी पडीक जागेत उभारण्याविषयी सूचना केली होती. मात्र, अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी तीन-चार दिवसांपूर्वी जंगली बदाम व बकाम नीम या दोन मोठ्या विस्तारलेल्या झाडांची कत्तल करून असंवेदनशीलपणा दाखवला आहे. काही टवाळखोरांनीही पोल‌सि कवायत मैदानावरील पिंजरा क्र ४०६ काढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा शुल्क रद्द करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शेतकऱ्यांच्या टीडीआरवर लावलेले अतिरिक्त शुल्क कमी करावे, अशी साकडे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महापालिका आयुक्तांना घातले आहे.

महापालिकेच्या विकासकामांसाठी आपली हक्काची जागा देऊन त्याबदल्यात टीडीआर घेणाऱ्या शेतकऱ्यांना महापालिकेच्या प्रीमियम एफएसआयचा मोठा फटका बसत आहे. महापालिकेकडून प्रीमियम एफएसआय कमी शुल्कात विक्री केला जात असल्याने शेतकऱ्यांकडे असलेल्या टीडीआरची मागणी घटली आहे. त्यातच शेतकऱ्यांकडे असलेल्या टीडीआरवर पायाभूत सुविधा सुधारणा शुल्क लावल्याने टीडीआरचे दर वाढले आहेत. त्यामुळे ही मागणी होत आहे.

महापालिका विकासकामांसाठी शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करते. जमिनीचा मोबदला रोख स्वरूपात देता येत नसल्याने राज्य सरकारने टीडीआर देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार महापालिकेकडून शेतकऱ्यांना टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) दिला जातो. नाशिकमधील अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर टीडीआर शिल्लक असतानाच महापालिकांना उत्पन्नवाढीसाठी एफएसआय विक्रीचे अधिकार बहाल केले आहेत. त्यात शासकीय मूळदराच्या ४० टक्केप्रमाणे येणारा दर कायम ठेवत एफएसआय देण्याचे धोरण आहे.

एकीकडे विकासकामांचा रोख मोबदला मिळत नाही, तर दुसरीकडे टीडीआरला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. त्यामुळे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन प्रीमियम शुल्कावर आक्षेप घेतला आहे. टीडीआरवर असलेले पायाभूत सुविधा शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.


टीडीआर महाग, एफएसआय स्वस्त!

शेतकऱ्यांकडे असलेल्या टीडीआरवर पायाभूत सुविधा शुल्क आकारले जात असल्याने शेतकऱ्यांचा टीडीआर महाग, तर महापालिकेचा एफएसआय स्वस्त झाला आहे. त्यातच महापालिकेच्या प्रीमियम एफएसआयवर मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आयकर, पायाभूत सुधारणा शुल्क लागू होत नाही. त्यामुळे बिल्डरांचा ओघ हा महापालिकेच्या प्रीमियम एफएसआयकडे असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या टीडीआरला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावरील बोकडबळीला बंदीच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या सप्तशृंग गडावर बोकडबळी प्रथा बंदबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ही प्रथा बंद करण्याचेच फर्मान कायम केले. महसूल प्रशासन प्रमुख असलेले जिल्हाधिकारी, जिल्हा पोल‌िस प्रमुख संजय दराडे, कळवणचे प्रांत अर्जुन श्रीनिवासन, डीवायएसपी देवीदास पाटील यांच्यासह प्रशासनाने गडावर भेट देत पाहणी केली.

नवरात्रोत्सवातील बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, वैयक्तिक पातळीवर देवस्थान ट्रस्टची हद्द सोडून कुठेही नवसपूर्ती, जावळांचा विधी, लग्न समारंभ तसेच विविध प्रकारच्या धार्मिक (बळी संदर्भातील)विधीला मज्जाव करण्यात आलेला नाही.

सप्तशृंग देवी गडावर देवस्थान ट्रस्ट हद्दीत बोकडबळी न देण्याचे पालन देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापनाकडून केले जाणार आहे. बोकडबळीची प्रथा बंद करू नये याबाबत ग्रामस्थांनी भूमिका मांडली असली तरी देवस्थान हद्द सोडून कुठल्याही विधीला प्रशासनाची हरकत नाही. मात्र देवस्थान हद्दीत हा विधी होणार नाही हे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. बैठकीत ग्रा. प. सदस्य राजेश गवळी, अनिल खताळे, दिलीप बर्डे, सुधाकर धामोडे, मयूर बेनके, शांताराम सदगीर, विजय दुबे यांच्यासह ट्रसटचे पदाधिकारी उपस्थित होते.

असे असतील कार्यक्रम

गुरुवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. सकाळी ७ वाजता दररोज श्री भगवतीची पंचामृत महापूजा करण्यात येईल. शुक्रवारी (दि. २९) शतचंडी याग, होमहवन पूजाविधी होईल. ३० सप्टेंबर रोजी विजयादशमीला सकाळी १० वाजता पूर्णाहुती विधी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूर गाव परिसरात अवतरतेय चैतन्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नवरात्रोत्सवासाठी देवळाली कॅम्प व भगूर परिसर सज्ज झाला आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुकामातेचे रेस्ट कॅम्परोडवरील मंदिर, माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मीमाता मंदिररासह नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची या उत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे परिसरात चैतन्य परसल्याची अनुभूती येत आहे.

रेस्ट कॅम्परोडवर असणाऱ्या मंदिराची स्थापना पुरातन काळातील असून, भृगू ऋषी यांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. रेणुकादेवी मंदिरासमोर मंडपाची उभारणी करण्यात आली असून, दर्शन रांगांची सोय व परिसरात देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भगूर येथील यात्रोत्सव प्रसिद्ध असून, मंदिराच्या परिसरात पूजा साहित्यासह खेळणी व इतर दुकाने थाटण्याच्या कामाला गती आली आहे.

मंदिराच्या बाजूला असलेल्या कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या जमिनीवर खेळण्यांची दुकाने थाटण्याकरिता जागा भाड्याने देण्यात आलेली आहे, तर मंदिरासमोर कासार यांच्या मालकीच्या जागेत रहाट-पाळणे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथील मंदिरासमोर असणारे पाण्याचे बारव त्वचारोगापासून मुक्ती देणारे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्याचीही नुकतीच स्वच्छता करण्यात आली आहे. रेणुकामाता मंदिरात पहाटेच्या आरतीला, दिवसभर यात्रोत्सवाला होणारी गर्दी लक्षणीय असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवरात्रोत्सवासाठी बंदोबस्तात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी शहरवासीय सज्ज झाले असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शहरात नवरात्रोत्सवाचा फिवर हळुहळू वाढत असून, नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतः चेन स्नॅचर्सला रोखण्याचे आवाहन पोलिसांना पेलावे लागणार आहे.

शहरासह वणी येथील सप्तशृंगी गड भाविकांच्या आगमनासाठी सज्ज झाला असून चांदवड तसेच येवला तालुक्यातील कोटमगाव येथील भाविकांना जत्रांचे खास आकर्षण असते. नाशिक शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या काल‌किा जत्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिकची ग्राम दैवत असलेल्या काल‌किा मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी हजेरी लावतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर प्रशासनाने आपल्यापरीने चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी कंबर कसली आहे. काल‌किा माता मंदिरासह भगूर परिसरातील रेणूका माता मंदिरात देखील नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून शहराच्या दोन्ही परिमंडळात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः कालिका यात्रेला समोर ठेऊन मुंबई नाका, भद्रकाली, सरकारवाडा आदी पोलिस स्टेशन अर्लट असणार आहे. मुंबई नाका पोलिस स्टेशनसाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. साधारणतः २०० पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच तितकेच होमगार्डस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गर्दीच्या वेळी साध्या वेषातील पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवा दरम्यान महिला वर्गाची लगभग असते. याचाच फायदा घेत चोरटे सक्रिय होतात. महिला घराबाहेर पडत असल्याने चोरट्यांना आयती संधी उपलब्ध होते. महिलांनी शक्यतो अशावेळी दागिने परिधान करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवस वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सवात वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होऊ नये म्हणून, शहर पोलिसांनी कालिका मंदिर परिसर तसेच भगूर येथील रेणुकादेवी मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. वाहतुकीतील बदल २१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत लागु राहतील.

बंद करण्यात आलेला मार्ग

त्र्यंबक नाका सिग्नल ते संदीप हॉटेल कॉर्नर, महापालिका आयुक्त निवासस्थान ते भूजल सर्वेक्षण कार्यालय, चांडक सर्कल ते संदीप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेल मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पहाटे पाच ते सकाळी दहा व दुपारी चार ते रात्री बारा या वेळेत वाहतूक बंद राहील.

वाहनांना पर्यायी मार्ग

वाहतूक बंद असेल त्या काळात एसटी बस व इतर सर्व प्रकारची वाहने ही त्र्यंबक नाका सिग्नलवरून खडकाळी सिग्नलमार्ग साठफुटी रोडने द्वारका सर्कल या मार्गाने नाशिक रोड व सिडकोकडे जातील. तसेच, मुंबई नाक्याहून येणारी हलकी वाहने महामार्ग बसस्थानक, टॅक्सी स्टॅण्ड, हुंडाई शोरूमसमोरून चांडक सर्कल, मार्गाने त्र्यंबकरोडने शहरात येतील.

जड वाहनांसाठी मार्ग

शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारे जड वाहने ही द्वारका सर्कलवरून गरवारे पॉइंटमार्गे सातपूर एमआयडीसीमध्ये जातील व द्वारका सर्कलवरून पंचवटीत जणारी जड वाहने कन्नमवार पूल, रासबिहारी हायस्कूल मार्गे पंचवटीत जातील .भगूर गावाकडून कॅम्पकडे जाणारी वाहने केंद्रीय विद्यालयासमोरून पेरूमल रोड या मार्गाने जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भलिंग चिकित्सा रोखा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत वारंवार सोनोग्राफी केंद्रांची तपासणी होऊनही जिल्ह्यात नियमबाह्य गर्भलिंग चिकित्सा व गर्भपात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमबाह्य गर्भलिंग चिकित्सा करणारे हॉस्प‌िटल्स तसेच सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई करा, असे आदेश आरोग्य विभागाला देऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनीच याबाबतची पुष्ठी दिली आहे.
जिल्हा गर्भधारणा व प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियम अंतर्गत काम करणाऱ्या समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, की सिन्नर तालुक्यात एक हजार मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण सर्वात कमी ८९३ इतके आढळले. येवल्यात सर्वाधिक ९९१ प्रमाण आहे. अजूनही जिल्ह्यात सिन्नरसह काही तालुक्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. महापालिका हद्दीत तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी सोनोग्राफी तंत्राचा वापर करुन गर्भलिंग तपासणीच्या घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका, जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले.
आमची मुलगी व हेल्पलाइनच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची संवेदनशिलता बाळगून दखल घ्यावी व त्वरित उपाययोजना कराव्यात. यासाठी महापालिकेच्या हद्दीत सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी तर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले. दोषी प्रकरणांमध्ये लगेचच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आजच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मुला-मुलींचे प्रमाण, सोनोग्राफी केंद्रांवरील कारवाई, इंद्रधनुष्य अभियान, जिल्हा एडस् नियंत्रण समिती आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायफलधारींचा प्रस्ताव महासभेवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेची मासिक महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २०) होत आहे. यात रायफलधारी सुरक्षारक्षक, औषध खरेदीसह विविध विकासकामांचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सुरक्षेसाठी ४५ खासगी सुरक्षारक्षक नियुक्तीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर जवळपास दीड कोटींचा खर्च केला जाणार असल्याने सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. दरम्यान स्वीकृतसह घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीचाही विषय जादा विषयांमध्ये येण्याची शक्यता आहे.
महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी जवळपास ४५ सुरक्षारक्षकांचा वेढा महापालिकेभोवती पडणार असून, त्यात १८ सुरक्षारक्षक शस्त्रधारी राहणार आहेत. त्यावर दीड कोटींचा खर्च येणार आहे. हा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत ठेवण्यात आला आहे. महापालिकेला एवढ्या सुरक्षारक्षकांची गरज आहे काय? याबाबत मात्र शंका उपस्थित केल्या जात असून या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे. शस्रधारी सुरक्षारक्षक नेमल्यास सर्वसामान्यांची अडचण होईल, असा दाखला दिला जात आहे. यासोबतच औषधखरेदी आणि पाणीपुरवठा विभागात पाण्याचे नमुने तपासणीचे काम आउटसोर्सिंगने करण्याचाही प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे. तर उद्यान निरीक्षकांचीही चार पदे आउटसोर्सिंगने भरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सोबतच विविध विकासकामांचे प्रस्ताव या महासभेत ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचा औषध खरेदीवर भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
संकट ही संधी समजून काम करणाऱ्या वैद्यकीय विभागाने शहरातील वाढलेल्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर औषध खरेदीचा बार उडवला आहे. महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहे, शहरी आरोग्य केंद्रासाठी जवळपास तीन कोटींच्या औषध खरेदीचे प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आले आहेत.
शहरात पसरलेल्या रोगराईच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाना विरोध करणे नगरसेवकांना अवघड होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाकडून एकाच वेळी नागरिकांसह सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान यासोबतच बिटकोच्या नवीन विस्तारीत इमारतीसाठी आठ कोटींची मशिन खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
सध्या शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लूसह विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पाऊस थांबत नसल्याने त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून रुग्णालये फुल्ल झाली आहेत. या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना व जागृती करणे अपेक्षित असतांना वैद्यकीय विभागाने मात्र तीन कोटींच्या औषध खरेदीचे प्रस्ताव महासभेवर ठेवले आहेत. महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहे आणि ३० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साथीच्या आजारांसाठी आवश्यक असलेली औषध खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. विशेष म्हणजे हे प्रस्तावाचे पद्धतशीरपणे तुकडे पाडण्यात आले आहे. सदस्यांकडून जाब विचारला जावू नये म्हणून ३०, ४०, ५०, ६० लाख असे प्रस्तावाचे तुकडे पाडण्यात आले आहे. त्यामुळे आता सदस्यांची कोंडी होणार आहे. या प्रस्तावांना मंजुरी दिली नाही, तर रोगराई आटोक्यात कशी आणायची असा जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदस्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बिटकोसाठी आठ कोटी
औषध खरेदीसोबतच बिटकोच्या नवीन हॉस्पिटलसाठी साहित्य खरेदीसाठी आठ कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आले आहेत. या हॉस्पिटल्समध्ये लागणारी यंत्र सामग्री, एसी तसेच विविध प्रकारच्या उपकरणांचा यात समावेश आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images