Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘ढोली तारो...’ची धूम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सवाची एकेक माळ जसजशी पुढे सरकत आहे तसतसे रास गरब्याच्या खेळालाही उधाण येत असल्याचे चित्र आहे. शहरात यंदाही विविध सामाजिक मंडळांच्या वतीने गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला तरुणाईसह मध्यमवयीन अन् बच्चेकंपनीदेखील थिरकताना दिसत आहेत.

शहरातील विविध लॉन्स आणि मोकळ्या मैदानांमध्ये सायंकाळी ६ वाजेनंतर रंगणारा गरबा रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहत आहे. ठिकठिकाणी साजऱ्या होणाऱ्या गरबा महोत्सवात पारंपरिक खेळांसोबतच बॉलिवूड स्टाइलचेही सादरीकरण केले जात आहे. गरब्यात सहभागी होणाऱ्या महिला आणि कपल्सने पारंपरिक पोशाखास जास्त पसंती दिल्याचे चित्र आहे. यात काठियावाडी, राजस्थानी, पंजाबी आदी सांस्कृतिक पोशाखांची निवड करण्यात आली आहे. गरब्यात सहभागी नागरिकांसोबतच गरबा बघण्यास येणाऱ्यांचीही गर्दी प्रचंड आहे. तरुणाईसोबत लहानग्यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला आहे. गरब्याच्या सादरीकरणास ऑर्केस्ट्रा, चित्रपटगीते आणि डिजिटल लाइट्सची मिळणारी साथ यामुळे शहरातील सायंकाळचे वातावरण उत्साही बनले आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन या उत्सवांतर्गत करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा गणेशोत्सवातील जास्तीच्या आवाजासंदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा धसका नवरात्रोत्सव मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे बहुतांश मंडळांचा ‘आवाज’ बराच नियंत्रणात आहे. दांडिया व गरब्याची शहरातील लोकप्रियता लक्षात घेत बाजारात काही दिवसांपासून घागरा, कुर्ते व बाराबंदी दाखल झाले आहेत. अनेक हौशी मंडळींनी फॅशन डिझायनर्स, फॅशन इन्स्टिट्यूटस खास दांडियासाठी कपडे शिवून घेतले आहेत. अनेक ठिकाणी या सोहळ्यासाठी लागणारे कपडे भाडेतत्त्वावरही देण्यात येत आहेत. काही बड्या राजकीय मंडळांच्या वतीने उत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात दांडियाच्या कार्यक्रमात सेलिब्रेटीजनाही बोलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतिकूल परिस्थितीतही समितीची भरीव प्रगती

0
0

घोटी बाजार समितीच्या वार्षिक सभेत गुळवेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, घोटी

गेल्या वर्षातील देशात असलेली प्रतिकूल आर्थिक स्थिती, नोटाबंदीचा परिणाम, नियमन मुक्ती अशा परिस्थितीला सामोरे जाऊनही घोटी बाजार समितीने उत्पन्न व विकासात भरीव प्रगती केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात घोटी बाजार समितीचे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न वाढले तसेच ४८ लाख रुपयांचा वाढावा झाल्याची माहिती घोटी बाजार समितीचे संदीप गुळवे यांनी दिली.

घोटी बाजार समितीची पंधरावी सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २४) संस्थेच्या सभागृहात ज्येष्ठ संचालक खंडेराव भोर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ संचालक तथा जिल्हा बँक संचालक संदीप गुळवे, उपसभापती गोरख बोडके, माजी सभापती शांताराम कोकणे, संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत संस्थेच्या गतवर्षीच्या इतिवृत्त वाचन व अहवाल वाचन संस्थेचे सचिव जितेंद्र सांगळे यांनी केले. तर प्रास्ताविक उपसभापती गोरख बोडके यांनी केले. सर्वसाधारण सभेत उपस्थितांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी पंढरीनाथ शेलार, शिवाजी शिरसाठ, पुंडलिक धांडे, नंदलाल पिचा, सुनील जाधव, भरत आरोटे, साहेबराव जाधव, धोंडीराम कौले, कचरू कडभाने, हरिश्चंद्र नाठे, रमेश जाधव, राजाराम दुर्गुडे, भाऊराव जाधव, नामदेव खातळे उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना गुळवे यांनी सांगितले की, संस्थेने उत्पन्न वाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, स्पर्धाक्षम योजनेतून बांधलेल्या कामाचे जागतिक बँकेकडून लेखापरीक्षण होऊन 'अ' वर्ग दिला आहे. लवकरच बाजार समितीच्या या विकासकामांचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुबंदीसाठी तीव्र आंदोलन करणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
दारुबंदी आंदोलनकर्त्यांची एकजूट होऊ नये म्हणून सरकार खेळी करीत आहे. मात्र, दारुबंदीविरोधातील संघटनांना एकत्र आणून आंदोलनाची धार आणखी तीव्र केली जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र दारूबंदी जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी रविवारी येथे केले.
येथील हॉटेल उत्सवमध्ये राज्यस्तरीय दारुविरोधी परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विक्रम कदम, सुभाष वाघ, माधवी पाटील, दीप्ती गायकवाड, शारदा टिळे आदी उपस्थित होते. गणेश कदम म्हणाले, की अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात दारूबंदी करण्यासाठी विविध संघटना, संस्था सरकारच्या विरोधात आंदोलने करीत आहेत. परंतु, ही ताकद विभागली गेल्याने आंदोलनाला यश मिळू शकले नाही. दारूमुळे हजारो संसार उद्‍ध्वस्त झाले. दारुविरोधासाठी या सर्व संघटनांची मोट बांधण्यासाठी ही परिषद होत आहे. लिकर झोन व अन्य घोषणा सरकारने केल्या; मात्र अंमलबजावणी केली नाही. दारुने युवापिढी उद्‍ध्वस्त होत आहे. आगामी काळात दारुमुक्ती केंद्र सुरू केले जाईल. मद्यपींची अनाथ ३२ मुले आम्ही दत्तक घेतली असून मद्यपी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारतीर्थ सुरू केले जाईल.
कार्यक्रमास मंगला भंडारी, मंगला शिंदे, मनीषा टेंमगिरे, तुषार भोसले, यश बच्छाव, विलास गायधनी, संतोष गायधनी, ज्ञानेश्वर भोसले, दीपक जाधव, संतोष टिळे, सचिन पाटील, मयूर सोनवणे, पुष्पा आहिरे, श्रीकांत गायधनी, अक्षय शिरसाठ, संजय बर्वे आदी उपस्थित होते.

मजुरांचा संताप
कामगार उपायुक्तांनी नाशिकरोडला बिगारी व बांधकाम मजुरांची ८० रुपये शुल्क घेऊन नावनोंदणी सुरु केली. त्यांना अर्जवाटप केले. दारुबंदी परिषदेत त्यांना पाच हजार रुपये कर्ज दिले जाईल, अशी अफवा पसरली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर आले. परंतु, ही परिषद दारुबंदीची असल्याचे कळल्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. आमची फसवणूक झाल्याचा आरोप हरिश्चंद्र डोखळे, बन्सीलाल म्हस्के, राहुल म्हस्के, अण्णासाहेब डोखडे आदींनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळमुक्तीसाठी एक खिडकी कार्यक्रम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारे ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ अभियान मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार असून त्यासाठी ग्रामपंचायतीत एक खिडकी कार्यमक्रम राबविला जाईल. ‘आपले सरकार’ अॅपद्वारेही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अधीक्षक अभियंता लघुसिंचन प्रकाश मिसळ, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, कार्यकारी अभियंता राजेश शिंदे, तहसीलदार नितीन गवळी आदी उपस्थित होते. डवले म्हणाले, की जलस्त्रोत खोलीकरणाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. दुरुस्तीच्या कामाचे धोरण आणि दरही तयार करण्यात येत आहे. ‘जलयुक्त’च्या माध्यमातून वाढलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे आणि गाव आदर्श करण्याचा प्रयत्न करावा.

वडझिरे गावात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांबाबत डवले यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, की अनुकूल बदल घडवूनच विकास साधता येतो. वडझिरेने पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असताना जलसंधारण कसे करावे याचे आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे. गावात दिशादर्शक काम झाले आहे. पाण्यातून समृद्धी आणि समृद्धीतून विकास शक्य असल्याने परिसराती इतरही गावांच्या विकासाला उपलब्ध पाण्यामुळे चालना मिळेल, असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला.
वाजे म्हणाले, की सरकार आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून चांगले काम होऊ शकते हे वडझिरे गावाने दाखवून दिले. सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळी तालुका म्हणून असलेली सिन्नरची ओळख बदलली आहे. सरकारने घेतलेल्या पुढाकाराचा गावाला लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डवले यांच्या हस्ते जलपूजन तसेच नवसंजीवनी फार्मस प्रोड्युसर कंपनीचे उद्‍घाटन करण्यात आले. जलदिंडीने कार्यक्रमाला सुरूवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिंद्रा कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
नाशिकमधील महिंद्रा कंपनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याचा हिवरखेडा (ता. चांदवड) येथे मृतदेह आढळून आला आहे. हा घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हिवरखेडे येथे खंडोबा मंदिराजवळ शनिवारी (दि. २३) प्रकाश जानकीदास सोनवणे (४३) यांचा मृतदेह आढळून आला. सोनवणे हे मूळचे पाळे बुद्रुक (ता. कळवण) येथील रहिवासी असून नोकरीनिमित्ताने ते अशोकनगर, सातपूर येथे कुटुंबीयांसह राहत होते. मालेगाव येथील बहीण आणि शालक यांच्याकडे ते गेले होते. नाशिककडे जाण्यासाठी बाइकने ते निघाले; मात्र घरी पोहचले नाही. हिवरखेडा येथे शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. सोनवणे यांनी नाशिक येथे फ्लॅट घेतला होता; मात्र मिळणार पगार आणि कर्जाचा हप्ता यांचा ताळमेळ बसत नसल्याने ते काही दिवसांपासून विवंचनेत असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रखवालदारास धाक दाखवून तिघांनी चक्क एटीएम मशिनच पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. २३) रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील साई प्लाझा इमारतीतील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर घडली.
फिर्यादी राजेश दौलत लेवे (३९, मु. पो. शेणीत, ता. इगतपुरी) यांच्या फिर्यादीनुसार, घटनेच्या वेळी तिघे अज्ञात संशयित एटीएम केंद्रात पोहचले. त्यांनी लेवे यांना दमदाटी करीत गप्प बसवले. तसेच लागलीच सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. यानंतर, चोरट्यांनी लोखंडी पहार लावून तसेच वेल्डींग मशिन व कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास यश मिळाले नाही. एटीएम मशिनमधून पैसे निघणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी लेवे यांच्या खिशातील मोबाइल घेऊन पळ काढला. उपनगर पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भेंडीकर करीत आहे.

बालकास सोडून मातेचे पलायन
जन्माला घातलेल्या काही दिवसांच्या मुलास सोडून आईने पलायन केले. ही घटना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संबंधीत महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यास्मिन इमान शेख (रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) असे संशयित महिलेचे नाव आहे. गर्भवती यास्मिन बाळंतपणासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिने ४ मार्च रोजी प्रसुत होऊन मुलाला जन्म दिला. मात्र, मुलावर उपचार सुरू असताना ९ मार्च रोजी ती पळून गेली. याप्रकरणी हवालदार अशोक राजपाल राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय मोरे करीत आहे.

वस्तू खरेदी करून फसवणूक
टीव्ही तसेच मोबाइल विकत घेऊन जाणीवपूर्वक चुकीचे धनादेश देऊन तब्बल ६१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हर्षद ठाकूर, (४६, सीएचएसबी, १०४, शास्त्रीनगर, पार्सिक जनता बँकेजवळ, कळवा, ठाणे) आणि त्याचा ७० वर्षीय जोडीदार यांनी हा प्रकार केला आहे.
कल्पिता बाळासाहेब महाले-दहीवाळकर (रा. सिद्धमणी बी अपार्ट. सिद्धार्थ कामत हॉटेलमागे, नाशिक-पुणे रोड) यांनी सदर घटनेबाबत तक्रार दिली आहे. साधारणतः १४ सप्टेंबर रोजी दोन्ही संशयितांनी दहीवाळकर यांच्या अशोका मार्गावरील ओवी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातून ४२ हजार ९९० रुपयांचा ४० इंची टीव्ही आणि १७ हजार ९९० रुपयांचा मोबाइल विकत घेतला. यासाठी संशयितांनी ओव्ही एक्लुसिव्ह स्टोअर या चुकीच्या नावाचा धनादेश दिला. यामुळे फिर्यादीस पैसे मिळाले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पीएसआय पाटील करीत आहे.

आगार पार्किंगमध्ये महिलेचा विनयभंग
बस आगार क्रमांक एक येथील पार्किंगमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी परप्रांतीय संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पार्किंगमध्ये उभे असलेल्या पीडित महिलेच्या पाठीमागून आलेल्या सुरेंद्र गौरी शंकर पटेल (३०, रा. मछली शहर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) याने विनयभंग केला. महिलेले आरडाओरड केली असता संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. घटनेचा अधिक तपास पीएसआय शिंदे करीत आहे.

कामटवाड्यात घरफोडी
बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तब्बल ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. उत्तम गोपाळराव रणदिवे (५८, रा. फ्लॅट क्रमांक १२, शिवतीर्थ कॉलनी, कामटवाडा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, सव्वा दोन तोळे वजनाची पोत, मोहन माळ, कानातले, चांदीचे चार मंडल आणि पाच हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी केला. अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय घाडगे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला दोन गटात हाणामारी

0
0

सिन्नर फाटा : गोठ्याजवळील शेण चारा उचलण्याच्या क्षुल्लक कारणातून जेलरोडला दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाले. हाणामारीत दोन्ही गटांकडून लाकडी दांडके व कोयत्याचा वापर झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या नामदेव जाधव यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या गटातील जखमी दत्तात्रय जाधव यांच्यावरही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्हीही गटांनी एकमेकांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाल्मीकनगरात जुगार अड्ड्यावर छापा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
वाल्मीकनगर येथील तळघरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. या जुगाराच्या अड्डयावर छापा मारण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशात रिक्षातून हिरावाडी मार्गे वाल्मिकनगर येथे जाऊन छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या बाळू पाटील याच्यासह अकरा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील ५१ हजार ७०० रुपये तसेच जुगाराचे साहित्य, टेबल, खुर्च्या आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाल्मिकनगर परिसरात दोनदा करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या वेळी येथील परिसरातील गुन्हेगारांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिस येण्याचा सुगावा गुन्हेगाराना लागत असल्यामुळे ते पळून जाण्यात यशस्वी होत होते. त्यामुळे हा छापा टाकताना पोलिसांनी बाळू पाटील याच्या घराच्या मागच्या बाजूने चोर रस्ता तयार करून शनिवारी रात्री हा छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या बाळू पाटील याच्यासह अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, अजय देवरे, विजय चव्हाण यांच्यासह ३० पोलिस कर्मचारी या मोहिमेत सामील झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंतवणूकदारांना गंडविणारा गजाआड

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
पैसे गुंतवणूक करून त्या गुंतवणूकीवर सुमारे पाच टक्क्यांहून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून लाखो रुपये गोळा करणाऱ्या प्रशांत नलावडे व त्याची पत्नी सीमा नलावडे हे गजाआड झाले आहे.
नलावडे दाम्पत्याविरोधात भिमराव हरी साळवे यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट रोजी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी या अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांची माहिती गोळा करण्याबरोबरच दोघा संशयितांचा शोध सुरू केला होता. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रशांत नलावडे हा पोलीसांना शरण आला. साळवे यांच्याकडून २०१३ मध्ये प्रशांत नलावडे यांनी रियल इनव्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी असल्याचे सांगून या कंपनीत पैसे गुंतविले तर त्याचा फायदा होईल. पैसे गुंतविल्यावर नफा झाल्यास पाच टक्के जादा दराने परतावा मिळेल असे नलावडे यांनी सांगितल्याने साळवे यांनी प्रशांत याच्याकडे १४ लाख रुपये चेकने देऊन गुंतवणूक केली. त्यानंतर या रक्कमेवर परतावा मिळत नसल्याने त्यांनी वारंवार पैशासाठी विचारणा केली असता नलावडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर नलावडे यांच्या घरी व तिडके कॉलनी येथील कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते भेटू शकले नाही. त्यांची इतरत्र चौकशी केल्यानंतर साळवे यांना अशोक गायकवाड यांची भेट झाली. गायकवाड यांनीही नलावडे यांचेकडे नऊ लाख रुपये गुंतविल्याचे सांगितले. नलावडे यांचा संपर्क होत नसल्याने अखेरीस साळवे यांनी याबाबत पोलिसांना माहिती देऊन गुन्हा दाखल केला हेाता. तसेच मोठाभाऊ शेवाळे, जगन्नाथ पाटील, राजेंद्र भालेराव, रमेश पाटील यांच्यासह अनेक जणांची फसवणूक झाल्याचे यावेळी पोलिसांना सांगण्यात आले.

पैसै परत मिळणार का?
इंदिरानगर पोलिसांनी फसवणूकदारांची नावे शोधण्यासह संशयितांचाही शोध सुरू केला. मात्र, प्रशांत नलावडे हा स्वतःहून पोलिसांना शरण आला. पोलिसांनी प्रशांतच्या अटकेनंतर त्याची पत्नी सीमा नलावडे हिचा शोध घेऊन तिलाही अटक केली आहे. या प्रकरणात शेकडेा नागरिकांनी पैसे गुंतविल्याची चर्चा इंदिरानगर परिसरात सुरू आहे. या अटकेमुळे आता तरी लोकांचे पैसे परत मिळणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् राष्ट्रवादी एकवटली!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची पक्षाच्या जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून नियुक्तीनंतर त्यांच्या पहिल्याच दौ-यात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकजूट झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. गट-तट विसरून सर्व आजी-माजी नेते एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी जेलवारी झानंतर प्रभारी म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे धुरा देण्यात आली. पण राष्ट्रवादीचा हा प्रयोग फसला. त्यानंतर आता राष्ट्रवादीने माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे धुरा सोपविली आणि कार्यकर्त्यांनाही धीर आला. त्यांच्या या नियुक्तीवर ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या भाषणातून याच भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीने पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रवादी भवन येथे ग्रामीण व शहराचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात माजी खासदार माधवराव पाटील, देवीदास पिंगळे यांच्यापासून विद्यमान आमदार पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ, हेमंत टकले, जयंत जाधव सह सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. दोन तास उशिरा सुरू झालेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी होती. मितभाषी असलेल्या पाटील यांचा जिल्ह्यात कोणताच गट नाही. त्यांनी मनमोकळा संवाद साधत कार्यकर्त्यांना धीर दिला आणि जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांची नाशिकच्या प्रभारीपदासाठी घोषणा केल्यानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. यापूर्वी, नाशिकचे प्रभारीपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होते. आव्हाड यांना नाशिकच्या संघटनात्मक पातळीवर लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून पाटील यांच्याकडे प्रभारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यानंतर पाटील यांनी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकांऱ्याशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे उपस्थित होते.

सरकारला अपयश
केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले असून सामान्य माणूसही सरकारबद्दल नाराज आहे. ‘कमळ’ला आता मत देणार नाही, असे मतदार जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता ताकदीने उभे राहून सरकार विरुद्ध संघर्ष करण्याची गरज आहे. निराशा झटका, गट-तट विसरून सर्वांनी कामाला लागा, यश निश्चित मिळेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. महिनाभरात प्रत्येक तालुक्यात बैठक घेऊन संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

भुजबळ असते तर गरज नव्हती!
भुजबळ असते तर मला येथे येण्याची गरजच नव्हती. त्यांचा संघर्ष सुरू आहे, संकटाला ते तोंड देत आहे. त्यातून ते बाहरे पडतील, असे सांगताच भुजबळ समर्थकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. पाटील यांनी भुजबळांच्या कामांचेही कौतुक केले.

ऑक्टोबरपासून आंदोलन
भाववाढ आणि सरकारविरोधात एक ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन, दोन ऑक्टोबरला सदस्य नोंदणी आणि तीन ऑक्टोबरला राज्यव्यापी बैठक होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीला नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना राष्ट्रवादीचीच जास्त भीती वाटते. त्यामुळे भाजपच आता विरोधी पक्ष राहिला नसल्याच्या अफवा पसरवित असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

नाशिकमध्ये उद्या यल्गार
पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालय आणि नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि. २६) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याध्यक्ष अॅड. रव‌ींद्र पगार यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणे तुडुंब; चिंता मिटली

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
वरुणराजाची कृपा झाल्याने यंदा नाशिक विभागातील लहान, मध्यम व मोठे धरण समूहातील पाणीसाठा ८२.१० टक्क्यांवर गेला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसाने थोडीबहुत भरणे बाकी असलेली धरणे तुडूंब भरली आहेत.
विभागातील १९ पैकी गिरणा धरणाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व मोठे प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राची पाण्याची चिंता मिटली आहे. विभागातील ३२१७.४० दलघमी इतका पाणी साठ्याची क्षमता असलेल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत २९०४.७३ दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. विभागातील मोठे, मध्यम व लहान अशा ३५३ प्रकल्पांची पाणीसाठ्याची क्षमता ४३३७.८० दलघमी असून त्यापैकी आजवर ३५६१.४१ दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे.
गत वर्षी पाऊस कमी झाल्याने नाशिककरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. यंदा वरुणराजा मनसोक्त बरसला. खान्देशातील गिरणा धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व धरणे काठोकाठ भरली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राची पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली आहे. सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूर व दारणा धरण समूहातील मोठे, लघु व मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत.

मोठे प्रकल्पांमधील जलसाठा शंभरी गाठणार
विभागात १९ मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील १३ मोठ्या प्रकल्पांतील आजच्या उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ९५.८९ वर पोहचली आहे. नगर जिल्ह्यातील ३ मोठ्या प्रकल्पांत ९८.९० टक्के जलसाठा झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.१२ टक्के जलसाठा झाला आहे. धुळे जिल्ह्याला अजून दमदार पावसाची गरज आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणे काठोकाठ
नाशिक जिल्ह्यातील करंजवण, दारणा व कडवा (१०० टक्के), गंगापूर (९९ टक्के), चणकापुर (९७ टक्के), मुकणे (८५ टक्के) ही मोठी धरणे काठोकाठ भरली आहेत. तर गिरणा (६४ टक्के) धरणाच्या पाणलोट क्षेत्राला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील आळंदी,वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी भोजापूर, हरणबारी, केळझर, माणिकपुंज (प्रत्येकी १०० टक्के), कश्यपी, गौतमी, पुणेगाव (प्रत्येकी ९९ टक्के), पुनद (९७ टक्के), पालखेड (९५ टक्के) ही धरणेही भरली आहेत. पांझण नदीवरील नागासाक्या या एकमेव मध्यम प्रकल्पातील धरणातील जलसाठा अवघ्या २५ टक्क्यांवर पोहचला आहे.

विभागातील उपलब्ध जलसाठा
जिल्हा.........उपयुक्त साठा (दलघमी).........सध्याचा जलसाठा (दलघमी).........टक्केवारी
नगर.........१२१७.६३.........११७७.२८.........९६.६९
नाशिक.........१४९३.८४.........१३९९.८२.........९३.७१
नंदुरबार .........१९४.३२.........१५६.९६.........८०.७७
धुळे.........४८१.२६.........२९१.२०.........६०.५१
जळगाव.........१४२५.४५.........८५२.९६.........५९.८४
एकूण.........४३३७.८०.........३५६१.४१.........८२.१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगी ज्ञाननाथ रानडे यांचे देहावसान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या गुरू शिष्य परंपरेतील अठरावे दीक्षित नाथयोगी ज्ञाननाथजी रानडे यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने पुण्यात देहावसान झाले. ते ९४ वर्षांचे होते. मूळ नाशिकचे असलेल्या रानडे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाचा दुवा निखळला आहे. पुण्यासोबतच मुंबई व नाशिक परिसरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.
ज्ञाननाथजी यांचा जन्म नाशिकमध्ये ५ सप्टेंबर १९२४ रोजी झाला होता. त्यांचे मूळ नाव बापू नारायण रानडे. त्यांना पूज्य शंकर महाराज यांचे सान्निध्य बालपणापासून लाभले. योगी हरिनाथजी यांच्याकडून त्यांना त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात वयाच्या १८ व्या वर्षी नाथदीक्षा प्राप्त झाली होती. त्यानंतर पुढे ५० वर्षे श्री ज्ञानेश्वरीच्या कृपेने त्यांनी कीर्तनसेवा आणि निर्गुण भजनसेवा केली. श्री ज्ञानेश्वरी सप्तजन्म शताब्दी वर्षात त्यांनी वर्षभर (१९९५-९६) आळंदीत वास्तव्य केले.
पुण्यातील न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, श्रीमंत रावसाहेब पटवर्धन, विख्यात तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती, विमला ठकार, गोविंदकाका उपळेकर, नाशिकचे गजानन महाराज गुप्ते, दादा महाराज सातारकर, स्वामी अवैद्यनाथ आदींशी त्यांचे विशेष सख्य होते. त्यांची ‘जंगली महाराज तथा जागरनाथ’, ‘ हरिनाथबाबा’, ‘मी पाहिलेले शंकर महाराज’, ‘गोविंदकाका उपळेकर’, ‘दादा महाराज सातारकर’, ‘जोगन विठामाई’, ‘विश्वनाथ महाराज रूकडीकर’, ‘पिंडे पिंडाचा ग्रासु’ आणि ‘नाथपंथीचा दंशु’ ही चरित्र प्रसिद्ध आहेत. याशिवाय विविध दैनिकांच्या माध्यमातून त्यांनी नाथपरंपरेवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. प्रसिद्ध लेखक व संशोधक रा. चि. ढेरे, प्र. ना. जोशी यांनीही त्यांचे सहाय्य घेतले होते.
पंढरपूर वारी सुरू झाल्यानंतर ‘मनोमय वारी’ (मानसिक वारी) हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता. तसेच त्यांचा शिष्यवर्ग आळंदी, सप्तशृंग देवी, निवृत्तीनाथ समाधीस्थान, त्र्यंबकेश्वर आणि पुन्हा आळंदी अशी वारी करतात. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल माध्यमांमुळे साहित्य प्रकारांचा जन्म

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
मोबाइल आणि तत्सम डिजिटल समाज माध्यमांविरोधात गळे काढण्यापेक्षा या नवनवीन माध्यमांशी आपण आपले नाते अधिक घट्ट करायला हवे. अशा माध्यमांमुळे नवनवीन साहित्यप्रकार पुढे येत असून त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहायला हवे, असे प्रतिपादन समीक्षक अजित जोशी यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.
सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यानिमित्त मु. श. औरंगाबादकर सभागृहात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘समाज माध्यमांचे साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावर हा परिसंवाद रंगला. यावेळी मंचावर मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील, विलास औरंगाबादकर आणि साहित्य‌िक डॉ. राजेंद्र मलोसे आदी उपस्थ‌ित होते. मोबाइल तसेच सोशल मीडियाबाबतचे रडगाणे बंद व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. डिजिटल सोशल मीडियाचे आक्रमण थोपवायला हवे, त्यामुळे संस्कृतीवर आघात होत असल्याची ओरड सातत्याने होऊ लागली आहे. नवीन माध्यमांनी मानवी जीवनात शिरकाव केला, त्या प्रत्येकवेळी अशी ओरड होत आली. कुठलेही नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा ते विनाश घेऊनच येते, अशी मानवी धारणा बनली आहे. मोबाइल आणि डिजिटल माध्यमांबद्दलही अशी ओरड होणे स्वाभाविक आहे. परंतु याच माध्यमांनी नवीन साहित्य प्रकारांना जन्म दिल्याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले. ट्विटरवर दीडशे शब्दांमध्ये तुमचे म्हणणे मांडावे लागते. अल्पाक्षरांमध्ये मांडले जाणारे हे साहित्यच असते. फेसबुकवर लोक लिहिते झाले आहेत. फेसबुकवरील पोस्टकडेही साहित्य म्हणूनच पहायला हवे. या समाज माध्यमांवरील पोस्ट कशा असाव्यात, त्यामध्ये वापरले जाणारे शब्द कसे असावेत यावर परदेशात शास्त्रशुद्ध विचार सुरू झाला असून आहे हे सर्व बदल आपण सकारात्मकपणे घ्यायला हवेत. सोशल मीडियामध्ये बदल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पेजर, ऑर्कुट गेले तसे कालांतराने व्हॉटसअॅप, फेसबुकही आउट डेटेड होऊ शकते. त्यामुळे आपल्याला थांबून चालणार नाही. हे बदल सकारात्मकतेने स्वीकारून त्यामधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणेच तेवढे आपल्या हातात असल्याची जाणीव जोशी यांनी यावेळी करून दिली. बदलत्या काळातही सकसता, सत्व आणि सज्जनता टिकवून ठेवणे हे आपले उद्द‌िष्ट असायला हवे असे ते म्हणाले.

मोबाइलमुळे हरवला संवाद
परिसंवादाच्या प्रारंभी डॉ. राजेंद्र मलोसे यांनी मोबाइलच्या अतिरेकी वापरावर टीका केली. सरजी सारखे शब्द आणि शॉर्टकट्स त्याने समाजाला बहाल केले असले तरी त्यामुळे संवाद हरवत चालला आहे. अल्पाक्षरी व्हा, असा संदेश ही सोशल माध्यमे देत आहेत. विखारी, विषारी विचार पसरविले जात आहेत. मोबाइलमुळे लोक ताठ मानेने जगणं विसरले, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदकिशोर ठोंबरे यांना गोविंद काव्य पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सावानाच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात कवी गोविंद काव्य पुरस्कार प्रथम क्रमांक नंदकिशोर ठोंबरे यांना १००१ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. द्वितीय क्रमांक रवींद्र मालुंजकर यांना ७५१ रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक राजेंद्र सोमवंशी यांना ५०१ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा प्रथम पुरस्कार रघुनाथ सावे यांना १००१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार सुरेखा बोऱ्हाडे-गायखे यांना ७५१ रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक धनंजय आपटे यांना ५०१ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. लक्ष्मीबाई टिळक बालवाङमय पुरस्कार संजय वाघ यांना देण्यात आला. ५०१ रुपये व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप होते. जयश्री राम पाठक स्मृती पुरस्कार रवींद्र कांगणे व रावसाहेब जाधव यांना देण्यात आला. या पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काशिनाथ वेलदोडे, अलका कुलकर्णी, विजयकुमार मिठे, डॉ. दिलीप पवार, शरद बिन्नोर, प्रशांत केंदळे व संतोष हुदलीकर, मिलिंद गांधी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचनालयांचे व्हावे डिजिटायझेशन!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
ही युगान्ताची वेळ आहे. पुस्तके वाचण्याच्या व छापण्याच्याही संकल्पना बदलत आहेत. परंतु, युगान्ताच्या वेळी उदय होत असतो. नव्या प्रकारचे दृष्टिकोन जन्माला येत असतात. संधीकालच्या आधीची स्मृती नंतरच्या युगात नेण्यासाठी वाचनालयांचे डिजिटायझेशन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केले.

‘सावाना’च्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील समारोपाप्रसंगी डॉ. देवी बोलत होते. सार्वजनिक वाचनालयाने डिजिटायझेशनची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे देव तुम्हाला सुखी ठेवो ही सदिच्छा व्यक्त करतो. आज ज्ञानाची संकल्पना बदलत चालली आहे. पुस्तके प्रिंट ऑन ऑर्डरनुसार होतात. काही दिवसांनी राईट ऑन ऑर्डर असा प्रकारही सुरू होण्याची शक्यता आहे. वर्तमानपत्रांमध्ये तर सध्या तेच सुरू आहे. अशावेळी लायब्ररींचे काम महत्त्वाचे आहे. वाचनसंस्कृती टिकवायची; परंतु ती काळाच्या बदलत्या पावलांचा अंदाज घेऊ, असेही डॉ. देवी म्हणाले. विनोद हा विरोध करण्याचा सर्वात प्राचीन मार्ग आहे. माणूस हसतो व हसवतो हे बुद्धीच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे, असेही डॉ. देवी म्हणाले.

‘सावाना’च्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने यांना देण्यात आला. २१ हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महामिने या पुरस्काराची रक्कम त्यात चार हजार रुपये टाकून २५ हजार रुपये ‘सावाना’ला दिले. या पैशांच्या व्याजातून दरवर्षी एका विनोदी साहित्यिकाला पुरस्कार देण्यात यावा, असे महामिने यांनी सुचविले. सत्काराला उत्तर देताना महामिने भावूक झाले. नाशिकच्या लेखकांनी मला घडवले असून मी त्यांचा ऋणी असेल, असे ते म्हणाले.

यावेळी मंचावर सावाना अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, साहित्य मेळावा अध्यक्ष दत्ता पाटील, कवी संमेलनाध्यक्षा रेखा भांडारे, आमदार सीमा हिरे, अजय बोरस्ते व सावानाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मीना परूळकर यांनी सरस्वती वंदना सादर केली. श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक तर अभिजित बगदे यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय वसंत खैरनार व विजयकुमार मिठे तर मानपत्राचे वाचन गंगाधर अहिरे केले. संगीता बाफणा व डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनींकडून दुचाकीचोरी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत क्राइम ब्रँचच्या पथकाने चक्क दोन विद्यार्थिनींना अटक केली आहे. वाहनचोरीच्या घटनांमध्ये सुशिक्षित युवकांनी हात साफ करण्याचा प्रकार नवीन राहिलेला नाही. मात्र, आता थेट टीवाय बी. एस्सी.च्या विद्यार्थिनींचा दुचाकी चोरीच्या प्रकारात सक्रिय सहभाग आढळून आल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या विद्यार्थिनी मध्यमवर्गीय असून, त्यांचे पालक व्यावसायिक आहेत. कॉलेजरोडवरील आरवायके कॉलेजच्या पार्किंगमध्ये १० ऑगस्ट रोजी वाहनचोरीचा प्रकार घडला होता. वाहनचोरीसह चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे पथक कार्यरत असताना सहायक उपनिरीक्षक शेख जाकीर हुसेन यांना चोरीच्या एका दुचाकीची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक गिरमे, पोलिस नाईक संतोष कोरडे व चालक दीपक जठार, पोखरकर आदींनी गस्त सुरू केली. या पथकाला सिव्हिल हॉस्पिटलजवळ एक क्रमांक नसलेली मॅस्ट्रो ही दुचाकी आढळून आली. पोलिसांनी लागलीच ती ताब्यात घेऊन तिचा चेसिस व इंजिन नंबर तपासला. त्यात ही दुचाकी आरवायके कॉलेज कॅम्पसमधून १० ऑगस्ट रोजी चोरी झाल्याचे पुढे आले. त्यामुळे ही दुचाकी ताब्यात बाळगणाऱ्या कुणाल माळी यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र, सदर दुचाकी त्याच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थिनींनी त्यास दिल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही मुलींना अटक करून पुढील कार्यवाहीसाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन्ही विद्यार्थिनी टीवाय बी. एस्सी.चे शिक्षण घेत असून, कुणालदेखील याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

--

संशयित मुलींचा दुसरा गुन्हा

काही दिवसांपूर्वी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीस संशयित विद्यार्थिनीने ड्युप्लिकेट चावी लावली. दुचाकी सुरू झाली. या दुचाकीवर बसून या विद्यार्थिनींनी शहरभर चक्कर मारली. काही तासांनी पुन्हा ती दुचाकी उभी करून त्या नामानिराळ्या झाल्या. दुचाकी चोरीला गेल्याची ओरड झाली. मात्र, काही तासांतच ती सापडल्याने हा गुन्हा रेकॉर्डवर आला नाही. यामुळे मुलींची हिंमत वाढली. त्यांनी १० ऑगस्ट रोजी अन्य एक दुचाकी चोरी केली. विशेष म्हणजे संशयित दोन्ही विद्यार्थिनींकडे स्वतःच्या दुचाकी आहेत.

--

लोनमुळे दुचाकी विक्रीची बतावणी

आरवायके कॉलेजच्या कॅम्पसमधून या विद्यार्थिनींनी दुचाकीची चोरी केल्यानंतर त्यांनी आपल्या कॉलेजमधील कुणाल माळी यास ती दुचाकी सोपवली. एका नातेवाइकाची ही दुचाकी असून, तिच्यावर कर्ज असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. हप्ते थकले असून, फायनान्सर दुचाकी ओढून घेऊन जाण्याची बतावणी विद्यार्थिनींनी केली. ही दुचाकी काही दिवस ठेव, असे सांगत विद्यार्थिनींनी काढता पाय घेतला. मात्र, ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली अन् दोन्ही मुली जेरबंद झाल्या.

--

पोलिसही चक्रावले

कॉलेजेसमधून वाहने चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून, या गुन्ह्यात अशी विद्यार्थिनींना अटक होईल, याचा विचारही पोलिसांनी केला नव्हता. विद्यार्थिनींचे पालक व्यावसायिक असून, त्यातील एकीचा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. या विद्यार्थिनींनी केवळ मजा करण्यासाठी, तसेच पैशांच्या हव्यासापोटी हे कृत्य केले. त्या सराईत गुन्हेगार नसून, चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

--

मटा भूमिका

--

पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून महिला काम करतात, याचा कोण अभिमान समाजाला वाटतो. पण, चोऱ्यांमध्येही त्यांनी अशी बरोबरी करावी हे अंमळ अतीच झाले. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या व चांगल्या कुटुंबातील दोन तरुणींनी चक्क मौजेसाठी दुचाकींची चोरी करावी ही धक्कादायक घटना आहे. मध्यंतरी उच्चशिक्षित मुले छानछोकीसाठी चोऱ्या करायचे हे उघड झाले होते. पण, मुलींनीही तो कित्ता गिरविल्याने समानतेचा अतिरेक तर होत नाही ना, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांचे लाड वा दुर्लक्ष यास काही प्रमाणात कारणीभूत असले, तरी उच्चशिक्षित मुलींनी असा मार्ग चोखाळावा हे चिंतनीय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ खड्ड्याची दुरुस्ती कधी?

0
0

महसूल आयुक्तालय जवळ अपघाताचा धोका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील महसूल आयुक्तालयाच्या रस्त्यावर गेल्या आठवड्यात एका पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला होता. या रस्त्यावरील असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व खड्डे मनपा प्रशासनाने बुजण्याची तसेच त्यांची दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली आहे.

नाशिकरोड परिसरातील महसूल आयुक्तालयाजवळील रस्त्यावर खड्डे झाले आहेत. त्याचप्रमाणे येथील धान्य गोडावूनच्या वळणावरच माणूस पडेल, असा मोठा खड्डा आहे. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. हा खड्डा एवढा मोठा आहे की त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आयुक्तालयातजवळील हे खड्डे बुजवण्याची मागणीही अनेकवेळा करण्यात आली आहे. त्याबाबत नुकतीच समता परिषदेकडून नाशिकरोड अध्यक्ष तेजस शेरताटे, गोरख खैरनार, रमेश डावरे, राकेश महाजन, धनराज जाधव, सौरभ शेरताटे, अरुणा आहेर, दीपक खरारे आदींनी खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालय हे मिनी मंत्रालय असून, या परिसरातच विविध शासकीय कार्यालये आहेत. आयुक्त कार्यालयात पाचही जिल्ह्यातील नागरिक, कर्मचारी येतात. त्यांना खराब रस्त्याला तोंड द्यावे लागते.


रस्ते, पथदीपच नाहीत

विभागीय आयुक्तालय परिसरातील रस्त्यांचा प्रश्न कायम असून, रात्री येथे पथदीपही नाहीत. त्यामुळे अंधारात वाहनचालकांना या रस्त्यावरील खड्डेच दिसत नाही. परिणामी, अपघाताचा धोका असतोच. जवळील स्टाफ क्वॉर्टरजवळ खड्डे असतात, मेनगटपासून प्रेसपर्यंत व तेथून कन्या शाळेपर्यंत खड्डेच आहेत. एकंदरीत या खड्ड्यांसह नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळत नाही, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री किंवा मोठे अधिकारी येण्याआधी खड्डे बुजवले जातात. मात्र नंतर परिस्थिती जैसे थे होते, तरी यावर लवकर उपाययोजना करावी.

अपघातानंतर दुरुस्ती करणार का?

याचबरोबर वनिता विकास शाळा व आरंभ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बस, रिक्षा याच मार्गाने जातात. नवले चाळ, चिडे मळा येथील रहिवासी धान्य गोडावून रस्त्याचा वापर करतात. येथेच स्टाफ क्वॉर्टरजवळ प्रेसचे अधिकारी राहतात. या सर्वांना या खड्ड्यांचा धोका आहे. येथेच वर्षभरापूर्वी धान्याचा ट्रक खड्ड्यात फसला होता. आता जलवाहिनी जवळच मोठा खड्डा पडलेला आहे, अशा परिस्थितीत हे खड्डे केव्हा बुजवले जातील, असा प्रश्न नागरिकांना केला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याशेजारून आयुक्तालय रस्त्यावर गेल्यानंतर उजव्या हाताला शासकीय धान्य गोडावून आहे. या रस्त्यावरच हा मोठा खड्डा आहे, असेही शेरताटेंनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठीचा मतदारयादी कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे ही निवडणूकप्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून तयारी सुरू केल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ यांनी सोमवारी दिली.

शिक्षक मतदारसंघाची नाशिक विभागाची निवडणूक जून २०१८ मध्ये होणार आहे. त्यासाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. १ नोव्हेंबर २०१७ पूर्वी सहा वर्षे म्हणजे ३१ ऑक्टोबर २०११ पूर्वीचे किमान तीन वर्षांहून अधिक सेवा असलेले माध्यमिक शिक्षक अर्ज भरू शकणार आहेत. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त मतदार नोंदणी अधिकारी, तर नाशिक विभागातील सर्व पाच जिल्हाधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत.

निवडणुकीचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यांचे असून, जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे काम जिल्हा निवडणूक शाखा करणार आहे. गत निवडणुकीवेळी जिल्ह्यातून १४ ते १५ हजार मतदार होते. या वेळी ही संख्या आणखी वाढेल. शिक्षक मतदारांना निवडणूक शाखेकडून विहित नमुन्यात अर्ज देण्यात येतील. त्यामध्ये मतदारांचे नाव, छायाचित्र, पूर्ण पत्ता, वय, संपर्क क्रमांक, नोकरी करीत असलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव, नोकरीचा कालावधी यांसारख्या माह‌ितीचा समावेश आहे.

मतदार यादी कार्यक्रम ः

२८ सप्टेंबर : मतदारयादीची अधिसूचना प्रसिद्ध करणे.

१३ ऑक्टोबर : मतदारयादीबाबत वृत्तपत्रात सूचना प्रसिद्ध करणे

६ नाव्हेंबर : अर्ज, हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिवस

२० नोव्हेबर : प्रारूप मतदार याद्यांची छपाई

२१ नोव्हेंबर : प्रारूप मतदारयाद्यांची प्रसिद्धी

२१ नोव्हें. ते २१ डिसेंबर : मतदारयादी हरकती स्वीकारणे

१५ जानेवारी २०१८ : हरकती निकाली काढून याद्या तयार करणे

१९ जानेवारी २०१८ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवनातील मळ्यांच्या रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी आरक्षित करण्यात आलेल्या तपोवन परिसरातील रस्ता कधी सुधारणार, असा प्रश्न येथील शेतकरी आणि रहिवाशी करू लागले आहेत. गोदावरी-कपिला संगमाकडून मळ्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी असलेल्या या मार्गाकडे सिंहस्थ कुंभमेळ्यापासून दुर्लक्षच करण्यात आले आहे.

कपिला संगम ते कैलास नगर सिग्नलच्या मार्गापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटरच्या या रस्त्याची सध्या दुरवस्था झालेली आहे. पावसामुळे पडलेले खड्डे आणखीच खोल होत गेले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या भागात जाण्यासाठी छोटा पण डांबरीकरण केलेला रस्ता होता. सिंहस्थात या रस्त्याची पूरती वाट लागली. रस्ते विभागाकडून येथे केवळ खडी आणि मुरूम टाकण्यात आला. हा रस्ता डांबरीकरण करण्याच्या भानगडीत प्रशासन पडलेच नाही.

सिंहस्थाच्या वेळी आलेल्या पावसामुळे येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठे नाले खोदण्यात आले तेही या रस्त्यावर आहेत. कच्च्या रस्त्यावर पडलेले खड्डे खोल होत चालले आहेत. या भागात सिंहस्थानंतर पुन्हा शेती बहरू लागली आहे. शेतमाल घेऊन जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब येथील शेतकरी करीत आहेत. या रस्त्याने मोठ्या जिकिरीने त्यांना वाहने चालविण्याची वेळ येत आहे. येथील रहिवाशांनाही या रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण तर दूरच साधा मुरूमदेखील टाकण्यात येत नसल्यामुळे येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी सेंटर प्रशासन अखेर नरमले

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सिटी सेंटर मॉलमध्ये वाहने पार्किंगसाठी करण्यात आलेली दरवाढ सिटी सेंटर मॉल प्रशासनाने काहीशी कमी केली आहे. यापुढे मोटरसायकलस्वारांना वाहन पार्किंगसाठी १५ रुपये, तर कारधारकांना ३० रुपये मोजावे लागणार आहेत. दरवाढ पूर्ण मागे घेण्यात आली नसली, तरी या निर्णयामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शहरात उंटवाडी परिसरात असलेल्या सिटी सेंटर मॉलमध्ये नावाजलेले विविध स्टोअर्स, तसेच मल्टिप्लेक्स एकाच छताखाली असल्याने नाशिककरांची नेहमी गर्दी असते. वाहने घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी मॉलमध्ये प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे. गेली अनेक वर्षे तेथे मोटरसायकल पार्किंगसाठी १० रुपये, तर कार पार्किंगसाठी २० रुपये आकारले जात. परंतु, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मॉल प्रशासनाने पार्किंगचे दर दुप्पट केले. त्याबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रया उमटण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावरही त्याबाबतच्या पोस्ट व्हायरल झाल्या. भाडेवाढीबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेनेने आक्रमकपणे भीख माँगो आंदोलन केले. वाढीव दर तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली हाती. ही मागणी सिटी सेंटर मॉल प्रशासनाने मान्य केली आहे. आज, मंगळवार (दि. २६)पासून सिटी सेंटर मॉलच्या टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंगचे कपात केलेले नवीन दर लागू होणार आहेत. मॉल प्रशासनाने दरवाढीत कपात केल्यामुळे शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी श्रीरंग सारडा यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, भारतीय विद्यार्थी सेनेचे महानगरप्रमुख संदीप गायकर, शिवसेना उपमहानगरप्रमुख दिगंबर मोगरे, राजेंद्र क्षीरसागर, विभागप्रमुख अमोल सूर्यवंशी, वैभव ढिकले आदी उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images