Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्वीकृतसाठी आता अल्टिमेटम!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या कोट्यातील तीन स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून पक्षात अजूनही घमासान सुरूच असून, भाजपने स्वीकृत सदस्यांच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्याची पुन्हा मागणी केली. मात्र, आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आता आणखी संधी देण्यासंदर्भात असमर्थता दर्शवली आहे. मात्र, भाजप व शिवसेनेला आपल्या कोट्यातील अर्ज करण्यासाठी २९ सप्टेंबरची डेडलाइन दिली असून, मुदतीत नावे सादर करा; अन्यथा सर्व काही शासन स्तरावरच सोपवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. या संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन मागवण्याचीही तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने दोन जागांसाठी मंगळवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे भाजपवरील दबाव वाढणार आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सात महिने लोटले तरी अद्याप पाच स्वीकृत सदस्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाचीच डोकेदुखी वाढली आहे. महापालिकेत बहुमत मिळालेल्या भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठी रस्सीखेच निर्माण झाल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे आहेत. पक्षीय बलाबल लक्षात घेता, भाजपला तीन, तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची नियुक्ती करायची आहे. भाजपच्या कोट्यातील तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असताना नव्या व जुन्यांचा वाद सुरू झाला आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी शक्यता असतानाच स्वीकृतसाठी दररोज नवनवी नावे येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे, तर दुसरीकडे मुदतवाढीसाठी प्रशासनावर दबाव टाकला जात आहे.

शिवसेनेची यादी निश्चित

शिवसेनेकडून सुनील गोडसे, राजू वाकसरे, अॅड. श्‍यामला दीक्षित व अलका गायकवाड या चौघांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. यातून दोन नावे निवडली जाणार आहेत. शिवसेनेची तयारी असताना भाजपच्या नावांची निश्‍चिती होत नसल्याने आज सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

...तर सेनेची यादी महासभेवर जाणार

आयुक्त कृष्णा यांनी आज घेतलेल्या बैठकीत महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर व शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे उपस्थित होते. भाजपकडून पुन्हा एकदा एक महिन्याची मुदत मागण्यात आली, परंतु आयुक्तांनी ही मागणी फेटाळून लावली. २९ तारखेपर्यंत नावे सादर न झाल्यास कायदेशीर मार्गदर्शन घेतले जाणार आहे. या दरम्यान शिवसेनेकडून नावे आल्यास ती पुढील प्रक्रियेसाठी महासभेवर सादर केली जाणार असल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले. त्यामुळे भाजपवर दबाव वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रारब्ध लिहिणारी डुबेरेची सटुआई

0
0

विजय गोळेसर

--

मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. मुलाच्या जन्मानंतर हिंदू धर्मातील रीतिरिवाजाप्रमाणे अनेक संस्कार व धार्मिक विधी केले जातात. मूल जन्माला आले, की ‘सटुआई’ त्याच्या कपाळी प्रारब्ध (भाग्यरेषा) लिहिते, असा समज हिंदू धर्मामध्ये रूढ आहे. त्यामुळे ‘सटुआई’ ऊर्फ ‘सटी’ या देवतेचे बाळ व बाळंतीण यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा या ‘सटुआई’ किंवा ‘सटी’चे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे आहे. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांची ही कुलदेवता आहे. त्यामुळे मुलाचा जन्म झाल्यावर सव्वा महिन्याच्या आत बाळाला सटुआईच्या दर्शनाला नेले जाते.

----

‘सटीचा लेखाजोखा न चुके ब्रह्मादिका’ असे जिच्याबद्दल म्हटले जाते त्या सटुआईचे सुप्रसिद्ध मंदिर सिन्नरपासून ८ किलोमीटरवरील डुबेरे येथे आहे. सुमारे ३०० वर्षांपासून हे मंदिर येथे आहे. बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी त्याच्या कपाळावर त्याचे प्रारब्ध (नशीब) लिहिणारी देवता म्हणजे सटुआई! पूर्वीचे मंदिर दगड-मातीचे होते. आता डुबेरेच्या नावलौकिकत भर टाकणारे सिमेंट काँक्रीटचे भव्य मंदिर येथे उभे आहे.

नवसाला पावणारी सटुआई

या मंदिरातील सटुआईचे वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन काळापासून आजपर्यंत लहान मुलांचे जावळ काढणे, मूल होत नसल्यास नवस बोलणे, तसेच लहान बाळांची इडापिडा (आजार) बरे होण्यासाठी या देवीला साकडे घातले जाते आणि शेकडा ९९ वेळा भाविकांच्या मागण्या देवी पूर्ण करते, असा अनुभव आहे. या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नाही, तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक एवढेच नाही, तर परदेशांतून थेट अमेरिका, जर्मनी व फ्रान्स येथूनदेखील भाविक येतात, असे गेली २१ वर्षे देवीची पूजा करणारे सेवेकरी नामदेव मुजगुडे अभिमानाने सांगतात. सटुआईला केलेले नवस फेडणारे भाविक देवीला खेळणा, पाळणा, नाडापुडी वाहतात.

पूजा करण्याची विशिष्ट पद्धत

सटुआईची पूजा करण्याची विशिष्ट पद्धत आहे. बाळाची आई देवीची वाट आपल्या केसांनी झाडते. पाच वेळा देवीला दंडवत घालते. बाळाला देवीचे दर्शन घडविल्यानंतरच त्याचे जावळ काढता येते. बाळाच्या जावळाचे केस काढताना प्रथम मान मामाचा असतो व आत्या ते जावळ आपल्या ओटीत झेलते.

बरेच लोक येथे म्हणजे डुबेरेच्या सटुआई मंदिरात कोरडा शिधा आणून येथेच शिजवतात व देवीला नैवेद्य अर्पण करतात. देवीला गोड म्हणजे शाकाहारी नैवेद्य असतो. मात्र, देवीचा सारथी असलेल्या काळोबाला मांसाहारी नैवेद्य दाखविला जातो. काळोबाचे मंदिर देवी मंदिराच्या मुख्य दरवाजाशेजारी आहे. भाविक आपल्याऐपती प्रमाणे विधी (जत्रा) करतात. देवीचा नवस फेडण्यासाठी आलेले भक्त सटुआईच्या दर्शनानंतर गावात कुणाकडेही न जाता थेट आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात व घरी गेल्यावर स्नान करतात, अशी प्रथा आहे. देवीचा फोटो, प्रसाद, अंगारा घरी नेल्यास घरातील बाळांना त्रास होतो, असे इथले सेवेकरी सांगतात.

सन १९८७ मध्ये गावातील तरुण कार्येकर्ते नारायण केरुजी वाजे यांच्या पुढाकाराने श्री सटुआई मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. १९९५ साली जुने मंदिर पडून त्याच जागेवर १९९७ साली सिन्नरभूषण हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाले व त्याच वर्षी मंदिराचे गर्भगृह म्हणजे गाभारा बांधण्यात आला. त्यानंतर लवकरच भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास बांधण्यात आले, तसेच ग्रामीण विकास योजनेंतर्गत सभामंडप, स्वच्छतागृह, संरक्षक भिंत व पाण्याची टाकी या सुविधा तयार करण्यात आल्या.

--

पंचधातूंची देखणी व प्रसन्न मूर्ती

देवीच्या या गाभाऱ्यात सटुआईची पंचधातूंची अतिशय सुंदर, मनमोहक, देखणी व प्रसन्न मूर्ती आहे. नाशिकचे सुप्रसिद्ध मूर्तिकार शरद मैंद यांनी ही मूर्ती तयार केली आहे. त्यावेळी मूर्तीसाठी एक लाख एक हजार रुपये, कळसासाठी २९ हजार रुपये, तर गाभाऱ्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. सटुआईच्या मूर्तीचे कल्पनाचित्र श्री भीमाजी चव्हाण यांनी तयार केले होते. ८ एप्रिल २००२ रोजी सटुआईदेवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. महामंडलेश्वर आचार्य महंत हभप रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृदांने वैदिक मंत्रघोषात यथासंग होमहवन केले. मूर्ती स्थापनेच्या वेळी तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. साखरे महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली,

तेव्हापासूनच नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवात दर वर्षी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. यात रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा असे उपक्रम घेतले जातात. दोन वर्षांपासून महिला कीर्तनकार सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. श्री सटुआई मंदिराची ख्याती ऐकून दक्षिण फ्रान्सच्या जेसिका मॅडम देवीवर आधारित इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी दोन वेळा पूर्ण नवरात्रभर डुबेरे येथे राहिल्या होत्या, याचा उल्लेख संस्थांनच्या www.satwai.org या संकेतस्थळावरदेखील करण्यात आला आहे.

--

मंदिर संस्थानची वैशिष्ट्ये

सन १९८७ मध्ये गावातील तरुण कार्येकर्ते नारायण वाजे यांच्या पुढाकाराने श्री सटुआई मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. सटुआईच्या मंदिरात प्राचीन काळापासून शेंदूर लावलेल्या दोन पाषाण मूर्ती (तांदळे) आहेत. देवीच्या या गाभाऱ्यात सटुआईची पंचधातूंची अतिशय सुंदर, मनमोहक, देखणी व प्रसन्न मूर्ती आहे. सटूआईच्या मूर्तीचे कल्पनाचित्र भीमाजी चव्हाण यांनी तयार केले होते. १९९७ साली सिन्नरभूषण हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाले. महामंडलेश्वर आचार्य महंत हभप रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली ८ एप्रिल २००२ रोजी सटुआई देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला.

--

असा आहे मंदिर संस्थान ट्रस्ट

स्थापना- दि. २५-०९-१९८७, नंबर ए-९०१, पदाधिकारी- नारायण केरुजी वाजे (संथापक अध्यक्ष), रघुनाथ धोंडूजी वारुंगसे (व्हाइस चेअरमन), भीमाजी रामभाऊ चव्हाण (सेक्रेटरी), विश्वस्त- भाऊराव भागूजी वारुंगसे, रामनाथ मुरलीधर भालेराव, सुरेश महादू वारुंगसे, श्रीपत मारुती वारुंगसे, विठ्ठल गंगाधर ढोली, पोपट रामचंद्र ढोली, बाजीराव भाऊराव माळी, सेवेकरी- नामदेव चिमाजी मुजगुडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला कॅन्सर तपासणी व्हॅन?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहिल्याच टप्प्यात कॅन्सरचे निदान व्हावे याची तपासणी करणारी अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर व्हॅन नाशिकला मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात परदेशी संस्थेच्या सदस्यांसह आरोग्य सहसंचालकांनी नाशिक दौरा केला असून, या व्हॅनचा नाशिकला मोठा फायदा होणार आहे.

पहिल्याच टप्प्यात कॅन्सरचे निदान झाले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो, तसेच यामुळे संबंधित पेशंटच्या कुटुंबाला मानसिक, आर्थिक आणि अन्य बाबींपासूनही दिलासा मिळतो. रेड अॅड मदत ही परदेशी संस्था कॅन्सरबाबत काम करते. ही संस्था कॅन्सर निदान करणारी अत्याधुनिक मोबाइल व्हॅन उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आहे. नाशिक आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे कॅन्सरच्या पेशंटवर उपचार केले जातात. म्हणूनच राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालिका साधना तायडे यांच्यासमवेत या संस्थेच्या सदस्यांनी शालिमार येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली. महिन्यात, वर्षभरात किती पेशंट येतात, कुठल्या टप्प्याच्या कॅन्सरचे निदान होते, कुठला कॅन्सर असतो यासह विविध प्रकारची माहिती त्यांनी घेतली. तोंड, स्तन आणि गर्भपिशवी या तीन प्रकारच्या कॅन्सरचे निदान पहिल्या टप्प्यात झाले तर तो पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यात ही व्हॅन उपलब्ध झाल्यास ती गावोगावी जाऊन पेशंटचे स्क्रीनिंग करणार आहे. त्याद्वारे पहिल्या टप्प्यातील पेशंटला तातडीने उपचार मिळू शकतील. ही संस्था आता अमरावतीलाही भेट देणार असून, तेथील माहिती घेणार आहे. नाशिक आणि अमरावती यापैकी कुठे ही व्हॅन द्यावी याबाबत ते निर्णय घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाईचा निषेध

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. महागाई रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करीत शिवसेनेच्या वतीने सोमवारी आंदोनल करण्यात आले. यावेळी बाइकची बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच ‌महिलांनी चुलीवर भाकरी थापत गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध केला.

देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन, तसेच भाजीपाल्यासह जिवनावश्यक वस्तूंचे दर ऐन सणासुदीच्या दिवसात गगनाला भिडले आहेत. यासाठी केंद्रातील भाजप सरकारचेच धोरण कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शिवसेना तालुकाध्यक्ष संजय दुसाने, माजी सभापती बंडू बच्छाव, उपसभापती सुनील देवरे, नगरसेविका अॅड. ज्योती भोसले, जिजाताई बच्छाव, छाया शेवाळे, गटनेते नीलेश आहेर, माजी नगरसेवक मनोहर बच्छाव, श्रीराम मिस्तरी, सुनील चांगरे, भिकन शेळके, चंदू पठाडे, उपमहापौर सखाराम घोडके, राजाराम जाधव, प्रमोद शुक्ला आदींच्या नेतृत्वात हे महागाई विरोधातील आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील शिवाजी पुतळा ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शिवसैनिकांनी केंद्र सरकार, भाजप तसेच महागाईचा विरोध करणारे होर्डिंगस हाती घेतले होते. बैलगाडीवर बाइक ठेवून इंधन दरवावाढीचा निषेध केला. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचला. गॅसचे दर वाढत असल्याने आता चुलीवर स्वयंपाक करायचा का? असा सवाल करीत शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी तेथेच चुली मांडल्या. चुलीवर भाकरी थापत प्रतीकात्मक आंदोलन केले.

सामान्यांचे जगणे कठीण
यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. काही दिवसांपासून महागाईमुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले असून याबाबत त्वरित उपाययोजना करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. वाढती महागाई रोखण्यासाठी वेळीच निर्णय न झाल्यास शिवसेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी-त्र्यंबक मार्गाची दुरवस्था

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी
घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावरील कुर्नोली परिसरातील अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता अवघ्या चार महिन्यात उखडून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची पुन्हा दुरुस्ती केलेली नाही. या रास्ते कामात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा मुंबई-नाशिक महामार्ग बंद केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीतर्फे तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या रस्त्याच्या समस्येला गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अर्जुन पोरजे, शशी आव्हाड, दत्तू गायकर, अशोक खातळे, सखाराम जोशी, विठ्ठल खकाळे, विजय तांबे, गोपी खातळे, संजय कोकणे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
रस्ते दुरुस्तीसाठी अन्य तालुक्यात वारेमाप खर्च होत असताना येथे मात्र खड्डे बुजविण्याचे सौजन्य देखील दाखविले जात नाही. जनता मेटाकुटीला आली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा मुंबई-नाशिक महामार्गावर आंदोलन केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. चालकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत. वाहने चालवितांना अंदाज चुकल्याने अपघात होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देशासाठी झटणाऱ्या सैनिकांना सलाम करा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
विरमातांमुळे शूर सैनिक जन्माला येतात. प्रतिकूल वातावरणात ते देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावतात. अशा सैनिकांच्या कुटुंबीयांना आपण मान सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. सैनिक दिसल्यावर त्यास मानाने सलाम करा, असे प्रतिपादन पत्रकार अजित चव्हाण यांनी निफाड येथे शारदोत्सव व्याख्यानमालेत केले.
मंचावर आमदार अनिल कदम, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, प्रभाकर अहिरराव, प्रवीण तनपुरे आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले, की सीमेवर देशासाठी लढणाऱ्या त्यागी जवानांमुळेच भारतात लोकशाही बळकट आहे. भारतीय सैनिक जात, धर्म विसरत केवळ देशासाठी लढतात. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने सैनिकांना लढण्याची उर्मी मिळते. ज्या कुटुंबीयांच्या रक्तात प्रखर राष्ट्रभक्ती असते, त्यांचीच मुले सैन्यदलात दाखल होतात, असेही चव्हाण म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमास निफाडचे नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, प्रल्हाद कराड, अॅड. त्र्यंबकराव गुंजाळ, अॅड. ना. भा. ठाकरे, रतन वडघुले, राजाभाऊ राठी, नगरसेवक अनिल कुंदे, संपतराव व्यवहारे, विक्रम रंधवे, संपतराव डुंबरे, पंढरीनाथ शिंदे आदी उपस्थित होते. विक्रम रंधवे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया पोलिसाकडून दोन लाख जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस असल्याचे सांगत वृद्धांना गंडा घालणाऱ्या भिवंडी येथील इकबाल सैफुल्ला बेग उर्फ जाफरी या संशयिताकडून गुन्हे शाखेने दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयिताने शहरात केलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिस असल्याचे सांगत वृद्धेचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचने सुरू केला. निरीक्षक एन. एस. न्याहाळदे यांनी तपासाची चक्र फिरवत इकबाल सैफुल्ला बेग उर्फ जाफरी यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, मुद्देमालही काढून दिला आहे. अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीतही असे प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

चोरटा गजाआड
नाशिक : दुचाकीच्या डिक्कीतून रोकड पळविणाऱ्या मयूर दिनेश बजरंगे आणि श्रीकांत मनोज गुमाने (दोघेही रा. अहमदाबाद) या संशयितांना पोलिसांना गजाआड केले. त्यांच्याकडील ४७ हजाराची रोकड व दुचाकी जप्त करण्यात आली. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील आनंदनगर भागात घडली होती. यात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची रोकड चोरी केली होती. आनंदनगरमधील तरणतलावासमोर उदय मनसुख भगत यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास करुन चोरटे फरार झाले होते. या प्रकरणाचा उपनगर पोलिसांनी तपास करीत थेट गुजरात गाठले.

वाहन चोरटे अटकेत
नाशिक : सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. भाऊसाहेब रामराव जाधव (रा. रचना कॉलनी, जयभवानी रोड) आणि राहुल चंद्रकांत अग्रवाल (रा. जयभवानी रोड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी दुचाकीही हस्तगत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध कत्तलखाने बंद करा!

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरातील पवारवाडी व दरेगाव भागातील अवैध कत्तलखाने (स्लॉटर हाऊस) बंद करण्याचे, हाडके उकळविण्याचे कारखाने तसेच साबण बनविण्याचे कारखाने तोडण्याचे आदेश लोकायुक्त एम. एल. टहिलांनी यांनी मालेगाव महपालिकेसह पवारवाडी पोलिस ठाण्यास ‌सोमवारी दिले.
अवैध कत्तलखान्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे अवैध कत्तलखाने बंद करण्यात यावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. यावर मुंबई येथे सोमवारी सुनावणी झाली. यात लोकायुक्तांनी आदेश दिल्याची माहिती पवार यांनी दिली. पवार यांच्या तक्रारीवर लोकायुक्तांकडे वेळोवेळी सुनावणी झाली. दरम्यान, या परिसरातील अवैध कत्तलखाने तसेच हाडके उकळणे व साबण तयार करण्याचे कारखान्यांबाबत महापालिका व पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदारपणाबाबत ताशेरे ओढले. त्याबाबत योग्य ती कारवाई झाली नव्हती. तसेच साबण कारखानदार यांनी स्थानिक कोर्टातून याबाबत मनाई हुकुम मिळवले होते. त्यामुळे करवाई थांबली होती. लोकायुक्त टहलियानी यांनी १९ जुलै २०१६ रोजीच्या सुनावणीत स्थानिक कोर्टाचा मनाई हुकूम रद्द करीत सर्व अवैध कारखाने तोडावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यावर करवाई समाधानकारक कारवाई न झाल्यास पुनः लोकायुक्त कार्यालयास अर्ज करण्याचे आदेश तक्रारदार पवार यांना दिले. त्यानुसार निखिल पवार यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली. याबाबत झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी २७ नोव्हेंबरपर्यंत कार्यपूर्ती अहवाल लोकायुक्त कार्यालयात सादर करावा, असे आदेश दिले. यावेळी तक्रारदार पवार, महापालिका नगररचनाकार संजय जाधव, संकीर्ण कर अधीक्षक इकलाख अहमद, इमारत निरीक्षक चौरे, पवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गांगुर्डे उपस्थित होते.

प्रशासनाची परवानगी नाहीच
साबण बनविणाऱ्या कारखान्यांनी स्थानिक कोर्टात दाखल केलेला दावा फेटाळला गेला असल्याची माहिती महापालिकेचे नगररचनाकार संजय जाधव यांनी लोकायुक्त टहलियानी यांच्यासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिली. मात्र, महापालिकेतर्फे कत्तलखान्यांना परवानगी दिली गेली आहे का? अशी लोकायुक्तांनी विचारणा केली असता संकीर्ण कर अधीक्षक इकलाख अहमद यांनी कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यांना दरेगाव ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी दिली होती. मात्र, यावर लोकायुक्त टहलियानी यांनी सांगितले, की कोणत्याही कारखान्याला ‘ना हरकत दाखला’ परवानगी होत नाही, महापालिकेची बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र नाही. त्यामुळे हे अवैध स्लॉटर हाउस बंद करावेत, असे आदेश दिले.

दरेगाव तसेच पवारवाडी परिसरातील अवैध कत्तलखान्यामुळे नागरिकांसह नदीपत्रातील जीव, पशु, पक्षी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणात वाढ झाली आहे. याविरोधात लढा सुरू असून आता लोकायुक्तांच्या आदेशानंतर तरी महापालिका व पोलिस कारवाई करतील अशी अशा आहे. महापालिकेने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. अवैध कत्तलखाने पूर्णतः बंद करावेत.
- निखील पवार, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाल्मीकी क्रीडांगणाचा वनवास संपणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील आययूडीपी परिसरातील नगरपालिकेच्या महर्षी वाल्मीकी क्रीडांगणाचा वनवास संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांच्या उपस्थितीत क्रीडांगणाच्या नूतनीकरण कार्यास प्रारंभ करण्यात आल्याने क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

क्रीडांगणाच्या नूतनीकरणाच्या कामात नगराध्यक्षा धात्रक यांच्यासह गटनेते गणेश धात्रक, नगरसेविका उषा तेजवाणी, दिलीप तेजवाणी या लक्ष घातले होते, अशी माहिती निमंत्रक डॉ. सुहास जाधव व देवेंद्र चुनियान यांनी दिली. या नूतनीकरणामध्ये स्टेडियमला तीनला गेट बसवणे आणि इतर गेट बंद करण्याच्या कामाचे उद्‍घाटन गणेश धात्रक यांचे हस्ते झाले. सदर काम २५ वर्षांपासून प्रलंबित होते. क्रीडांगणाची दुरवस्था झाल्याने सायंकाळनंतर तेथे अनेक अनिष्ठ गोष्टी घडत होत्या. याबद्दल क्रीडाप्रेमींसह नागरिकांची नाराजी होती. याबाबत सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाला लक्षात आणून देण्यात आले. यानंतर या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेण्यात आली आणि क्रीडांगणाच्या नूतनीकरणाचा पर्याय पुढे आला.

दिलीप तेजवाणी यांनी कामाची जबाबदारी घेतली असून यातून कामाला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. येत्या आठवडाभरात काम पूर्ण होणार असून त्यासाठी पाच लाखापर्यंत निधी खर्च अपेक्षित आहे. स्टेडियमवर तरुण, ज्येष्ठ नागरिक यांची व्यायामासाठी गर्दी वाढत आहे. अनेक वर्षे रखडलेले स्टेडियमचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी नूतनीकरण प्रकल्पाचे स्वागत केले आहे. नूतनीकरण सोहळ्यास उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, मुख्याधिकारी मेनकर गटनेते, दिलीप तेजवानी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

पालिकेच्या स्टेडियमबाबत अनेक तक्रारी होत्या. नूतनीकरणाची जुनी मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे. उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्यासह सर्व नगरसेवकांची या कामात निश्चित साथ मिळणार आहे. क्रीडाप्रेमींची गैरसोय दूर होईल.
- गणेश धात्रक,
गटनेते, मनमाड पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडला भरदिवसा घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूररोडवरील मामामूंगी मंगल कार्यालय परिसरात चोरट्यांनी दिवसा घर फोडून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भाग्यश्री कुणाल देवरे (रा. सिंधू पॅलेस, गंगापूररोड) यांच्या तक्रारीनुसार, ही घटना शनिवारी (दि. २३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या कालावधीत देवरे कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता चोरट्यांनी संधी साधली. त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लेखोर स्नॅचर्स गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडणाऱ्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केले. महिलेने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप उर्फ अशोक दादा पालवे (रा. प्रबुद्धनगर, सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे. तिडके कॉलनीतील मातोश्रीनगर भागात राहणाऱ्या पुष्पा पोपटलाल मथुरे (६०) या रविवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुंबई नाक्याकडून आपल्या घराकडे पायी जात असताना स्नॅचिंगचा प्रकार घडला होता. तुपसाखरे लॉन्स समोरून जाणाऱ्या मथुरे यांना संशयित पालवेने अडवले. एका हताने त्यांची हनुवटी धरून दुसऱ्या हाताने गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबडले. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर पहिल्या झटक्यात मंगळसूत्र हाती न आल्याने संशयित पालवेने मथुरे यांच्या छातीवर हल्ला केला. मात्र, मथुरे यांनी आरडाओरड केला. नवरात्रोत्सवामुळे या भागात पोलिस बंदोबस्त तैनात असून, लागलीच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मथुरे यांच्या वर्णनावरून चारच तासात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक डी.पी.पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची बॅग पळविली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीजवळ उभ्या असलेल्या विद्यार्थीनीच्या हातातील बॅग दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार केटीएचएम कॉलेज परिसरात घडली. बॅगमध्ये शालेय दप्तर आणि १५ हजार रुपयांचा मोबाइल होता. याबाबत सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. गायत्री मकवाना (रा. मखमलाबाद नाका, पंचवटी) या विद्यार्थिनीने फिर्याद दिली.

शिकवणीला जाण्यासाठी ती रविवारी कॉलेजमध्ये आली. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ती घराकडे परतण्यासाठी उड्डाणपूलाखालील कॉलेज प्रवेशद्वारावर बसची प्रतीक्षा करीत होती. यावेळी सर्व्हिस रोडने आलेल्या दुचाकीस्वाराने बॅग तिच्या हातातील बॅग ओढून धूम ठोकली. बॅगमध्ये शालेय पुस्तके आणि दोन मोबाइल असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज होता. घटनेचा अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून टॅबची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कारची काच फोडून चोरट्यांनी मोबाइल टॅब आणि इतर वस्तू लंपास केल्या. ही घटना ठक्करडोम परिसरात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सोफिया अंद्रादे कपाडिया (रा. गडकरी चौक, नाशिक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. कपाडिया या कुटुंबीयांसह शनिवारी (दि. २३) रात्री आठ वाजेच्या सुमारास सिटी सेंटर मॉलमध्ये गेल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी आपली कार (एमएच १५ एफएफ ०७२९) ठक्कर डोमजवळ, एबीबी सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्क केली. याचा फायदा घेत चोरट्यांनी काच फोडून कारमध्ये ठेवलेला मोबाइल टॅब, स्पोर्ट शूज, सनग्लासेस तसेच पाकिट असा सुमारे तीन हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पाकिटामध्ये डेबिट कार्ड होते. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देशमुख करीत आहेत.

तडीपारास अटक
तडीपार असताना शहरात वावर असलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वीच संशयितावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
सतीश बबन माने (२२ रा. माऊली चौक दत्तनगर, अंबड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. विविध पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे त्यास शहरातून ४ सप्टेंबर रोजी हद्दपार करण्यात आले. मात्र, हद्दीपारीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत माने शहरातच वास्तव्य करीत होता. पोलिसांनी शनिवारी (दि. २३) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास त्यास पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळा भागात सापळा लावून अटक केली. घटनेचा अधिक तपास हवालदार मल्ले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूबाबांची नावे जाहीर करणारे महंत बेपत्ता

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

देशातील चौदा भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत मोहनदास गेल्या दहा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे, भोंदूबाबांची यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच ते गायब झाले आहेत. यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. सरकारने त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने केली आहे.

महंत मोहनदास हे आखाडा परिषदेचे प्रवक्ता आहेत आणि बडा उदासीन आखाड्याचे कनखल येथे कोठारी महंत आहेत. दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री त्यांनी हरिद्वार येथून मुंबई जाण्यासाठी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी भोपाळ स्टेशनवर त्यांचा एक शिष्य त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेला असता, ते त्यांच्या राखीव सीटवर आढळले नाहीत. दरम्यान, रात्री मेरठ येथपर्यंत ते प्रवासात होते असे सहप्रवाशांची माहिती घेतली असता समजते. त्यानंतर झोप लागल्याने महंत मोहनदास उतरून गेले, की त्यांचे काही बरेवाईट झाले हे कोणीही सांगू शकलेले नाही. त्यांच्या सीटजवळ त्यांचे कपडे आदी साहित्य आढळून आले. मात्र, साधूंजवळ बटवा असतो, तो मात्र नव्हता. या बटव्यात रोख रक्कम आणि त्यांच्या अंगावर काही दागिनेदेखील आहेत.

अर्थात महंत मोहनदास यांच्याजवळ असलेल्या रोकडमुळे काही दगाफटका झाला आहे, की काही दिवस अगोदर आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या भोंदूबाबांच्या यादीने दुखावलेल्या एखाद्या भोंदूबाबाच्या समर्थकाने घातपात केला याबद्दल संशय व्यक्त होत आहे. महंत मोहनदास यांचे अपहरण झाले, की ती स्वतःच निघून गेले आहेत, याबाबत संभ्रमावस्था आहे. रेल्वे प्रशासनाने देखील याबाबत दखल घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे.

संरक्षणाची मागणी

साधूंना त्रास देणाऱ्या भोंदूबाबांच्या समर्थकांपासून संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने केली आहे. आखाडा परिषदेच्या बैठकीस स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंत्री महंत हरिगिरी महाराज, षडदर्शन आखाडा परिषद प्रवक्ता डॉ. बिंदुजी महाराज, महंत शंकरानंद महाराज, अभयानंद ब्रह्मचारी, राजेंद्रसिंह महाराज, विचारदास महाराज, बालकमुनी महाराज, आनंदपुरी महाराज आदींसह विविध आखाड्यांचे साधू, महंत, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपासंदर्भात मंगळवारी (दि. २६) मुंबई येथे मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांसमवेत बैठक होणार आहे. यात काय निर्णय घेतला जातो यानंतर आंदोलनाची भावी दिशा ठरणार आहे. दरम्यान, राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस बुधवारी २७ सप्टेंबरला आझाद मैदानावर एकवटून मागण्यांची मांडणी करणार असल्याची माहिती आयटकचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी दिली आहे.
वेळेवर मानधन न मिळणे, मानधनवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी न होणे, प्रवास भत्ता थकीत राहणे अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतीनीसांनी ११ सप्टेंबरपासून पुकारलेला राज्यव्यापी संप पंधरा दिवसांनंतरही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ४०० सेविका व मदतनीसांचा या संपात सहभाग आहे. राज्यातील सुमारे ९७ हजार अंगणवाड्यांचे कामकाज या संपामुळे बंद आहे. सेविकांना अवघे पाच हजार तर मदतनीसांना अडीच हजार रुपयांवर काम करावे लागते. अनेक सेविका, मदतनीसांची कुटुंबे यावरच अवलंबून असून दरमहा हे वेतनही वेळेत मिळत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीसांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. मानधनवाढीचा निर्णय होऊनही त्यावर कोणतीही प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये दुर्लक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या भावनेतून एकत्र येत ११ सप्टेंबरपासून राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संप पुकारला आहे. यावर उपाय काढत आशा कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांचे कामे करण्याचे परिपत्रक काढून हा संप फोडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याने या वर्गात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. मात्र, आशा कर्मचाऱ्यांनीही त्यास नकार देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्याने या संपाला नवीन वळण लागले आहे. तर महापालिकेच्या सुमारे दोनशे अंगणवाड्यांमधील सेविका, मदतनीसांचा या संपात सहभाग असल्याची माहिती राजश्री पानसरे यांनी दिली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा संपात मोठा सहभाग आहे. वेळोवेळी देण्यात आलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने अन्यायाची भावना या वर्गात निर्माण झाली आहे. आझाद मैदानावर बुधवारी (दि. २७) राज्यातील अंगणवाडी कर्मचारी एकवटणार असून पन्नास हजारांहून अधिक सेविका, मदतनीस यावेळी एकत्र जमून मागण्या मांडणार आहेत.
- राजू देसले, राज्य अध्यक्ष, आयटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आजपासून धार्मिक उपक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
आर्ट ऑफ लिव्हिंग, वैदिक धर्म संस्थान परिवाराच्या वतीने मंगळवारपासून (दि. २६) तीन दिवसीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड परिसरातील श्रीकृष्णा लॉन्स येथे हे उपक्रम होणार आहेत.
या धार्मिक उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २६) सकाळी गणेश होम व नवग्रह होम, सायंकाळी ५ ते ९ या काळात नवचंडी होम व सत्संग होणार आहे. बुधवारी (दि. २७) सकाळी ७ ते १२ या वेळेत महारूद्र होम होणार आहे. सायंकाळी ५ ते १० या वेळेत महासुदर्शन होम आणि सत्संग होणार आहे. तर गुरुवारी (दि. २८) सकाळी ८ वाजता महाचंडी होम होणार आहे. या सोहळ्याची पुर्णाहूती दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. याच दिवशी १००८ कन्या पूजनाचा संकल्प घेण्यात आला असून देशभरात २६ ठिकाणी पूजा होणार आहे. याशिवाय सामाजिक उद्दिष्टाने नागरिकांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजता ‘फ्री लिगल सेल’चे उद्‍घाटन केले जाणार आहे. गरजू व्यक्तींनी आर्ट ऑफ लिव्हिंगशी संपर्क साधल्यास त्यांना नामांकित वकिलांमार्फत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलातर्फे आज सखी मेळावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने महिला सुरक्षितता आणि जनजागृती यासाठी मंगळवारी (दि. २६) पोलिस सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ११ वाजता मेळावा होईल. यावेळी दामिनी पथकाच्या वाहनाचा अनावरण सोहळाही पार पडणार आहे.
कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर आदींसह विविध क्षेत्रातील महिला उपस्थित राहणार आहे. महिलांवर बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, हुंडाबळी आदी मार्गाने अत्याचार होतात. कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शारिरीक शोषण, अश्लिल शेरेबाजी हा प्रकारही सुरू आहे. काही दुकानांसह शोरूमच्या चेंजिंगरूममध्ये छुपा कॅमेरा ठेवून व्हिडिओ क्लिप्स काढण्याचे प्रकार केले जातात. याबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये दामिनी पथक कार्यरत आहे. या पथकाच्या वाहनाचे अनावरणही यावेळी होणार आहे. मेळाव्यासाठी महिलांसह कॉलेज युवती, विविध महिला बचत गट, महिला मंडळांच्या पदाधिकारी आणि महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेसा’ जमिनींबाबत मागविले मार्गदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
‘मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे’च्या कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात करण्याचा सरकारचा मानस असला, तरी तांत्रिक अडचणींमुळे इगतपुरीत भूसंपादनाचा वेग मंदावला आहे. ‘पेसा’क्षेत्रामध्ये जमीन संपादनात कायद्याचा अडसर निर्माण झाला असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागव‌िले आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी जमीन संपादनाच्या कामास सुरूवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून १००.६१ किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. त्यासाठी ४९ गावांतील १२९०.८ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सद्यस्थ‌ितीत जिल्ह्यात ८० हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. इगतपुरीमध्ये भारत पेट्रोलियमच्या इंधन पाइपलाइनचाही समृद्धी भूसंपादनाला अडथळा येत असल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पात जमिनी गेलेल्या बहुतांश शेतकऱ्यांवर कर्ज आहे. त्यामुळे आधी कर्जमाफी होऊ द्या, मग बघू अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. इगतपुरी हा आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे आदिवासींच्या जमिनी आदिवासींनाच खरेदी करता येतात. हाच कायदा जमीन संपादनाच्या कामकाजात डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागव‌िले आहे.

लक्ष्य मुदतीत कार्यपूर्तीचे
समृद्धीसाठी तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. अडीच ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परंतु, एक ना अनेक अडचणींमुळे ही कामे मुदतीत पूर्ण होऊ शकणार की नाही? असा सवालही उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाच्या पत्नीस कॅन्टोन्मेंट सेवेत घ्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
लामरोड येथील सहा नंबर नाका परिसरात १५ दिवसांपूर्वी अपघातात बळी गेलेल्या लष्करी जवान योगेश गवळी यांच्या पत्नीस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सेवेत रुजू करून घेण्याची मागणी मनसेने केली आहे. या संदर्भातील लेखी निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनास देण्यात आले.
लामरोडवरील ६ नंबर नाका ते भगूर दरम्यान १२ हून अधिक गतिरोधक आहेत. त्यावर कुठेही रिफ्लेक्टर नाही. तसेच आखण्यात आलेले झेब्रा क्रॉसिंग पट्टेही रात्री नजरेस पडत नाही. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बांधकाम विभागासह संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवू नये? यापूर्वीही लामरोडवरच अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत असल्याचा संतप्त सवाल असा सवाल मनसे शहराध्यक्ष गोकुळ जाधव यांनी निवेदनातून केला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर यांना निवेदन देतेवेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष गोडसे, माजी शहराध्यक्ष भास्कर चौधरी, संजय गीते, नितीन काळे, संदीप चौधरी, सुधीर वाजे, विजय गव्हाणे, राहुल वाडेकर, ऋषिकेश घोलप, अशोक ताजने, अजय मुसळे आदींसह मनसेचे कार्यकतें उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर परिसरात दोन चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरात ठिकठिकाणी शहर पोलिसांकडून नाकाबंदी व वाहनतपासणी सुरू असतानाही उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. मोटवाणी रोडवरील साईबाबा सोसायटी तसेच पुणे महामार्गावरील गुरुद्वारासमोरील एलआयसी बिल्डींग रोडवरील गुरुआशिष इमारतीजवळ या घटना घडल्या.

नवरात्रीनिमित्ताने आयोजित श्रीदुर्गा सप्तशती पाठासाठी जाणाऱ्या नंदिनी आहिरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन असे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मोटवाणीरोड येथे घडली. तसेच गुरु आशिष इमारतीजवळ महाजन (पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने दुचाकीस्वाराने खेचन नेले. मात्र या महिलेने इमिटेशन ज्वेलरी घातलेली होती. मोटवाणी रोडवरील नंदिनी अहिरे या महिलेचे दागिने खेघून पळ काढलेल्या दुचाकीस्वारांनीच पुढे जाऊन एलआयसी बिल्डींग परिसरात पुन्हा चेन स्नॅचिंग केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजधानी चौक परिसरात गतिमंद मुलांची शाळा आहे. तेथेही एका महिलेची चेन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी खेचून पोबारा केल्याची घटना घडल्याची माहिती या भागात सीसीटीव्ही बसविण्याचे काम करणाऱ्या कामगारांनी दिली आहे. देवळाली गावातील सत्कार पॉईंट येथेही एक चेन स्नॅचिंगची घटना घडल्याची माहिती समजते. उपनर पोलिस ठाण्यात मात्र या घटनांची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images