Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुचाकी मार्केटला बूम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्री, तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर वाहन खरेदीला महत्त्व असल्याने हजारो ग्राहकांकडून दुचाकी वाहनांचे बुकिंग करण्यात येत आहे. अष्टमी, नवमी अन् दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहन घरी आणण्याचे अनेकांचे नियोजन असून, जीएसटी लागू झाल्यानंतरही नवरात्रीमुळे दुचाकींच्या मार्केटमध्ये बूम आल्याची स्थिती आहे.

शहरात विविध भागातील दुचाकींच्या दालनात अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे. काहींनी डाऊन पेमेंट अदा केले आहे, तर अनेकांची बँकेची कर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे तीन हजार वाहने आरटीओकडे नोंदणीसाठी गेली असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. काहींनी आवडता क्रमांक मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दसऱ्याच्या अगोदर आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होण्यासाठी काहींची धावपळ सुरू आहे.

वाहन विक्रीच्या दालनांत ग्राहकांची गर्दी दिसून येऊ लागली आहे, तर त्यांना विविध वित्त संस्थांचे कर्ज उपलब्ध करून देणे, आरटीओ कार्यालयाकडे नोंदणीसाठी कागदपत्रे पाठविणे, वाहनाचा विमा भरून घेणे आदी कामांसाठी प्रतिनिधींची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रुप बुकिंगवर सवलत असल्याने एकत्रितपणे एकाच वेळी दुचाकी खरेदी करणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी अंबड, सातपूर येथील कामागारांनी एकत्र येऊन वाहन खरेदीचे बेत आखले आहेत. येत्या दसऱ्याला आपल्या घरात दुचाकी आलीच पाहिजे, अशी व्यवस्था करण्यात कामगार व्यस्त आहेत. दुचाकी घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आपल्या विश्वासू मेकॅनिकचा सल्ला घेतला आहे. जास्त अॅव्हरेज देण्याबरोबरच तिच्यातील ड्युरॅबिलिटीकडे आणि अन्य सोयी-सुविधा तपासून दुचाकींचे बुकिंग केले जात आहे.

--

बहुसंख्य शोरूम्सकडून सूट

गणेशोत्सवानंतर दुचाकी खरेदीचा वेग काहीसा मंदावला होता. पितृपक्षात फार कमी प्रमाणात या व्यवसायात उलाढाल झाली. मात्र, घटस्थापनेपासून वाहन खरेदीला तेजी आली असून, अनेकांकडून दुचाकींचे बुकिंग केले जात आहे. दुचाकी घेणारा ग्राहक आपल्याकडेच यावा यासाठी बहुसंख्य शोरुम्स चालकांनी मोठ्या प्रमाणत सवलती जाहीर केल्या आहेत. आपल्याकडेच ग्राहक कसे वळतील यासाठी अनेकांनी आपली मार्केटिंगची टीम कामाला लावली आहे.

--

जुन्या दुचाकींसाठी गर्दी

अनेकांना काही कारणास्तव नवीन दुचाकी घेणे परवडत नाही. अशा ग्राहकांकडूनदेखील जुन्या बाजारपेठेत चांगल्या दुचाकींचा शोध सुरू केला आहे. अनेकांनी सिडको, सातपूर ओझर येथे असलेल्या दुकानांमध्ये माहिती घेतली असून, टोकन देऊन आपली वाहने बुक केली आहेत.

--

नुकतीच मी ज्युपीटर गाडी खरेदी केली. दुकानात गर्दी असतानाही मला चांगली सर्व्हिस मिळाली व गाडीदेखील मिळाली. दसऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलो नाही.

-प्रवीण शिरुडे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कल्पवृक्षाची सावली रेणुका माऊली

$
0
0

विजय गोळेसर

--

‘माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली’ असे जिचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे, त्या रेणुकादेवीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आहे. रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच आहे. मंदिर डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आग्रारोड चांदवडच्या ज्या डोंगरावरून पुढे मालेगावकडे जातो त्याच्या खालीच ही मंदिराची गुहा आहे. मंदिराचा कळस आग्रारोडवरच आहे.

--

रेणुकादेवीचे स्थान चांदवडला कसे स्थापन झाले याची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी-

रेणुका ही माहूरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी. परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. तो परमपितृभक्त होता. रेणुका पतिव्रता होती, ती रोज पतीचे पाय धुण्यासाठी नदीवरून पैठणीतून पाणी आणायची, एवढे तिचे पावित्र्य कठोर होते. एकदा ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणायला गेली असता तिथे जलक्रीडा करणारा राजा व त्याच्या स्त्रियांना पाहून तिच्या मनांत कामवासना जागृत झाली. तिला नदीवरून घरी येण्यास उशीर झाला. जमदग्नींची देवपूजा खोळंबून राहिली. रेणुकेच्या उशिरा येण्याचे कारण लक्षात येताच त्या कोपिष्ट ऋषींच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरातच दाराशी आलेल्या आपल्या पत्नीचे म्हणजेच रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा त्यांनी आपल्या मुलाला, परशुरामाला दिली.

परशुराम परमपितृभक्त होता. वडिलांच्या तोंडून शब्द निघताच त्याने परशु सरसावला आणि एका घावातच आपल्या मातेचे मस्तक धडावेगळे केले. रेणुकेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथेच राहिले. तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुकेची स्थापना झाली. आजही माहूरला रेणुकादेवीच्या फक्त पादुका, तर चांदवडला फक्त मस्तक पाहायला मिळते.

--

दररोज त्रिविध रुपांत दर्शन

रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच आहे. मंदिर डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आग्रारोड चांदवडच्या ज्या डोंगरावरून पुढे मालेगावकडे जातो त्याच्या खालीच ही मंदिराची गुहा आहे. मंदिराचा कळस आग्रारोडवरच आहे.

चांदवडची रेणुकादेवी स्वयंभू असून, मूर्ती पाषाणाची आहे. रेणुकामातेची मूर्ती मनुष्याकृती नसून, तिथे एक तांदळा आहे. शेंदूरचर्चित शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर होय. त्याला डोळे, नाक, तोंड आहेत, तसेच नथ व मुकुट घातलेले असतात. रेणुकादेवीलाच कर्नाटकात ‘यल्लमा’, तर महाराष्ट्रात ‘यमाई आणि ‘एकवीरा’ असेही म्हणतात. या देवीचे वैशिष्ट्य असे सांगतात, की गडावरच्या सप्तशृंगनिवासिनी देवीप्रमाणेच ती सकाळी बाला, दुपारी तरुणी, तर सायंकाळी वृद्धेप्रमाणे दररोज त्रिविध रूपांत दिसते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला ज्या ठिकाणी नंदी, पादुका, नाग वगैरेंच्या दगडी प्रतिमा आहेत तिथेच भुयाराचे बंद केलेले दार आहे, असे सांगितले जाते. यावर्षी पुरातत्त्व विभागाकडून मंदिर परिसरात सुधारणा करण्यात आली आहे. मंदिराचे दरवाजे व गाभारा मोठा करण्यात आल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करणे सुलभ झाले आहे. दर वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हजारहून अधिक महिला देवी मंदिरात घटी बसल्या आहेत. त्यांच्यासाठी चार प्रशस्त हॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शनरांगेत भाविकांना बसण्यासाठी बेंचेस, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, दर्शनासाठी दोन स्वतंत्र जिने इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

--

देवीचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने

रेणुकादेवीच्या मंदिराची व देवीची सर्व व्यवस्था येथील कुंभार व गुरव पाहतात. चांदवडच्या रेणुकादेवीला भरपूर दागिने आहेत. देवीचा मुखवटा सोन्याचा असून, तो जवळजवळ दोन किलो वजनाचा आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवशी सकाळी एक पालखी रंगमहालातून निघते. तिच्यात देवीचा मुखवटा व दागदागिने असतात. अतिशय कडक बंदोबस्तात ही पालखी डोंगरातील देवीच्या मंदिरात जाते. दिवसभर देवीचा सोन्याचा मुखवटा व दागदागिने मंदिरात देवीच्या अंगावर असतात. रात्रीआठ वाजता ही पालखी पुन्हा पोलिस बंदोबस्तात रंगमहालात परत आणण्यात येते. देवीचे मंदिर गावापासून तीन किलोमीटर दूर आहे. त्यामुळे इतर वेळी गाभाऱ्यात देवीची चांदीची प्रतिमा ठेवलेली असते. रेणुकादेवीची आरती सकाळी व सायंकाळी नियमितपणे केली जाते. नवरात्रीत सकाळी साडेआठ वाजता, तर रात्रीची आरती देवीची पालखी निघून गेल्यावर रात्री साडेनऊ वाजता करण्यात येते. नवरात्रीत दररोज देवीची पालखी, महाभिषेक, आरती आदी उपक्रम होत आहेत.

--

जुन्या दगडी बांधणीचे मंदिर

देवीचे मंदिर जुन्या दगडी बांधणीचे आहे. आतमध्ये फरशी व शेड वगळता सगळे बांधकाम अहिल्यादेवींच्याच काळातले आहे. दगडी प्रवेशद्वार, ५० पायऱ्या, मंदिराच्या आवारात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दगडी दीपमाला ही सगळी दौलत अभिमानाने मिरवत रेणुकामातेचे मंदिर चांदवडमध्ये डौलाने उभे आहे. हे मंदिर म्हणजे चांदवड शहराचे वैभव आहे आहे. या मंदिराशिवाय चांदवड येथे कालिका, तसेच दशाश्री माळी समाजाची महालक्ष्मी अशी दोन मंदिरे असून, नवरात्रीत या दोन्ही ठिकाणीही भाविकांची गर्दी दिसून येते.

--

जिल्ह्यातली मोठी यात्रा

नवरात्रीत नऊ दिवस आणि चैत्री पौर्णिमेला एक दिवस चांदवडच्या रेणुकादेवीची यात्रा भरते. सप्तशृंगगडानंतरची मोठी यात्रा म्हणून येथील यात्रेचा उल्लेख करावा लागेल. यात्रेच्या काळात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर दूरदूरच्या ठिकाणांहून भाविक देवीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येतात. यात्राकाळात विविध खेळणी, गृहोपयोगी वस्तूंच्या शेकडो दुकानांचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. चांदवडच्या देवीची ही यात्रा पंचक्रोशीतीलच नव्हे, तर नाशिक जिल्ह्यातील मोठी यात्रा आहे. अर्थचक्राला गती देणारी ही यात्रा गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून प्रसिद्ध आहे. लहान विक्रेत्यांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच या यात्रेमुळे आर्थिक फायदा होतो. पूर्वी देवीच्या मंदिराजवळ फुलांची एक-दोन दुकानं असायची. हल्ली देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, ओटी भरण्याचे साहित्य, हिरवी साडी, चोळी, चुडा, हळद-कुंकू, प्रसाद, नारळ, देवीचे फोटो, पुस्तके आदींचा २५-३० दुकाने वर्षभर लागलेली असतात. यात्राकाळात तर हजारो भाविकांच्या वर्दळीने रेणुकादेवीचा परिसर फुलून जातो. यंदाही रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवाने परिसरात चैतन्य अवतरले आहे. राज्यातील व परराज्यांतील हजारो भाविकांच्या गर्दीने चांदवड आणि रेणुकामातेचा मंदिर परिसर फुलून गेला आहे.

--

हरवला निसर्गरम्य परिसर

एकेकाळी देवीचे मंदिर जिथे आहे तो सर्व परिसर घनदाट झाडीने बहरलेला होता. रेणुका देवीच्या मंदिराबाहेरच्या पटांगणातून डाव्या बाजूला चंद्रेश्वराचा डोंगर आहे. तिथे पाण्याचा एक मोठा धबधबा सर्वांनाच आकर्षित करीत असे. उजव्या बाजूला डोंगराचे अतिसुंदर इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण दिसते. चित्रपट निर्मात्यांनाही हा निसर्गरम्य परिसर आवडल्यास नवल नाही. राज कपूरच्या ‘श्री ४२०’ आणि ‘जय रेणुका’ या चित्रपटात चांदवडच्या देवीजवळील या दोन्ही डोंगरांच्या परिसरात चित्रीकरण करण्यात आले होते. मात्र, हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता केवळ चित्रपटातच पाहता येतील. कारण, रेणुकादेवी मंदिराभोवतालचा निसर्ग मंदिरावरून जाणाऱ्या आग्रारोडच्या रुंदीकरणात नष्ट झाला. एकेकाळी निसर्गसंपन्न असलेला रेणुका मंदिराचा परिसरही आता उघडा-बोडका झाला आहे.

--

नवरात्रोत्सवाची वैशिष्ट्ये

यंदा नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात दररोज महाअभिषेक, पालखी मिरवणूक, महाआरती होत आहे. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या माथ्यावरून व पायथ्यापासून येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाने यंदा मंदिराचे दरवाजे व गाभारा मोठा केल्याने मंदिरात प्रवेश करणे सुलभ झाले आहे. भाविकांना सुलभ दर्शनासाठी शिर्डीसारखे स्टीलचे बॅरिकेडिंग केले आहे. घटी बसलेल्या हजारावर महिलांची स्वतंत्र व्यवस्था भक्त निवासातील चार हॉलमध्ये करण्यात आली आहे. श्री रेणुकादेवी ट्रस्टकडून भाविकांसाठी वाहनतळ, पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, विजेचे दिवे व आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात येत आहेत. श्री रेणुकादेवी ट्रस्टमध्ये मधुकर पवार (व्यवस्थापक), सुभाष पवार (सहायक व्यवस्थापक) यांचा समावेश असून, मुख्य पुजारी तानाजी अहिरराव, तर पुरोहित प्रकाश वैद्य, विजय जोशी, हरेंद्र वैद्य, नंदकुमार वैद्य हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश बँकेचे पाच सभासद ठरणार अपात्र!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

महेश को-ऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या निकषांची पूर्तता न केल्याने निवडून आलेल्या पाच उमेदवारांना अपात्र ठरविण्याची शिफारस सहकारी संस्थांच्या तालुका उपनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. या निर्णयामुळे माहेश्वरी समाजात खळबळ उडाली आह. महेश बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नही करण्यात आले. परंतु देवेंद्र भूतडा यांनी माघार न घेतल्यामुळे नियमानुसार निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत भुतडा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निवडून आलेल्या काही उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठीच्या निकषांची पूर्तताच केली नसल्याचा दावा भुतडा यांनी सहकारी संस्थांच्या तालुका उपनिबंधकांकडे केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुजराथी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेपही त्यामध्ये नोंदविण्यात आला. तालुका उपनिबंधकांनी भुतडा यांच्यासह निवडणूक अधिकारी गुजराथी आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते.

निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांनी संचालकांना त्रास देण्यासाठी चुकीचे अर्ज केल्याची बाजू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्यावतीने वकीलांकडून मांडण्यात आली. तर अर्ज छाननीवेळी भुतडा प्रत्यक्ष उपस्थ‌ित असतानाही त्यांनी तोंडी किंवा लेखी आक्षेप नोंदविला नसल्याची बाजू गुजराथी यांनी मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित ठेवण्याची शिफारस जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे. काही उमेदवारांनी बँकेचे मंजुर उपविधी क्र. ४० चे पालन केले नसल्याचेही स्पष्ट झाल्यामुळे वल्लभदास जाखोटीया, ओंकारनाथ मणियार, हिरा जाजू, मंगला कलंत्री, विकास साळवे यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करण्याबाबतची शिफारस नाशिक तालुका सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगगडावरील अनिष्ट प्रथेला अखेर मूठमाती

$
0
0

दीपक महाजन, कळवण

कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगगड मंदिर परिसरात नवरात्रीत बोकडबळीची वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा महसूल प्रशासनाने यंदापासून बंद केली आहे. या निर्णयामुळे श्रद्धा असलेल्या भाविकांची निराशा झाली असली, तरी इतिहासजमा झालेली सतीची प्रथा हीदेखील काळानुरूप बंद झालीच, असा दाखला प्रशासनाने दिला आहे. तुळजापूर, कोल्हापूर या शक्तिपीठांमध्येही अशा प्रथांना बंदी आहे. कुठल्याही पशूंची अशी हत्या करणे कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र, रुढी व परंपरेचा दाखला देत आजपर्यंत येथे ही प्रथा सुरू होती.

पशुहत्या होऊ नये, तसेच गेल्या वर्षी नवरात्रीत ही प्रथा सुरू असताना हवेत फायरिंगद्वारे दिल्या जाणाऱ्या मानवंदनेप्रसंगी गर्दीत बुलेटचे छर्रे उडाल्याने १२ जण जखमी झाले होते. भविष्यात या प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेत महसूल प्रशासनाने अर्थात, कळवणचे प्रांत अर्जुन श्रीनिवासन व तहसीलदार कैलास चावडे यांनी हा निर्णय घेतला व ही परंपरा बंद केल्याचे फर्मान काढले. नवरात्रोत्सवयाच्या नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याला नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही मोठे पाठबळ दिले. मात्र, भाविकांच्या दृष्टीने श्रद्धेचा भाग असलेली नवसपूर्ती, कारण व विविध प्रकारच्या विधीनिमित्त केले जाणारे बोकड अथवा अन्य बळीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. पण, त्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या हद्दीबाहेरच्या जागेची अट घातली आहे. थोडक्यात काय, तर प्रशासनाने देवस्थान ट्रस्टमार्फत दसऱ्याच्या दिवशी होणारी बोकडबळीची प्रथा बंद केली आहे. अन्य ठिकाणचे कुठलेही विधी भाविक करू शकतात.

--

अशी दिली जायची आहुती

श्री सप्तशृंग देवीचे हे स्वयंभू प्रकारातील जागृत देवस्थान आहे. नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी येथे सहस्रचंडी यज्ञाच्या आहुतीसाठी बोकडाचा बळी दिला जातो. प्राचीन काळापासून रुढी व परंपरेने ही प्रथा सुरू आहे. गडावरील शिवालयापासून वाजत-गाजत बोकडाची मिरवणूक काढण्यात येऊन ट्रस्ट कार्यालयात त्याची विधिवत पूजा होत होती. तेथून पहिल्या पायरीजवळ महिषासुरदर्शनानंतर श्री दत्तात्रेय मंदिराजवळ असलेल्या उंबराच्या झाडाखाली दसरा टप्पा नावाच्या जागेत शेकडो ग्रामस्थ, भाविक, पर्यटक यांच्यासमोर धारदार शस्त्राने बोकडाचे मस्तक उडविले जायचे. या मस्तकाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत भगवतीसमोरील यज्ञकुंडात आहुती दिली जात होती. यादरम्यान मानवंदना म्हणून हवेत फायरिंग केली जायची. बोकडबळीची परंपरा कधी सुरू झाली व कोणी सुरू केली याची नोंद कुठेही नाही. मात्र, सप्तशृंग देवस्थान ट्रस्टच्या तत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेकडून सन १९७५ पासून हवेत गोळीबार करण्याची प्रथा सुरू करण्यात आल्याचे आढळते. या विधीप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, भाविक व देवस्थानच्या कर्मचारीवर्गाची झुंबड उडायची. या आहुतीनंतर नवरात्र व दसरा महोत्सवाची सांगता व्हायची, असे सांगितले जाते.

--

अनेक समाजधुरिणांकडून प्रबोधन

पुरोगामी महाराष्ट्रात व डिजिटल इंडियाच्या माहोलमध्ये पशुहत्या करण्याचे कर्म देवस्थान ट्रस्टच्याच माध्यमातून होत होते. १९५५ च्या सुमारास संत गाडगेबाबांसारख्या अनेक समाजधुरिणांनी या कृतीला विरोध केला होता. नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर एम. आर. यार्दी यांनी याविरोधाची दखल घेत जाहीर पत्रक काढून या प्रथेला व पशुहत्येला विरोध करीत समाजप्रबोधन केले होते. त्यांनी ११ मार्च १९५५ रोजी काढलेल्या जाहीर पत्रकाचा आशय असा होता, की पशूचे बलिदान देऊन देवी कधीच प्रसन्न होणार नाही. याउलट त्यास जीवदान दिल्याने ती खूश होईल. अनेक भाविकांना ही प्रथा बंद व्हावी असेच वाटत होते. मात्र, या परंपरेत आतापर्यंत कधीही व्यत्यय आला नव्हता.

--

प्रशासनाचे कारवाईचे संकेत

यंदा ही प्रथा अचानकपणे बंद करण्यात आल्याने गडावरील काही ग्रामस्थ व काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, देवस्थान ट्रस्टने हा प्रयोग बंद न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहेत. ही प्रथा ट्रस्टने बंद केल्याचा समज ग्रामस्थांचा झालेला आहे. तशा रोषाचा सामना देवस्थान ट्रस्ट प्रशासनाला करावा लागत आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत स्पष्टपणे या प्रथेला बंदी घालण्याचीच री ओढल्याने या निर्णयामुळे एका पशूची हत्या अखेर थांबली, हे मात्र नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्दम्य इच्छाशक्तीची ‘वंदना’

$
0
0

कोणतेही आव्हान असो किंवा आजार, त्याला तोंड देण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. फक्त या क्षमतेचा शोध त्या व्यक्तीला लागलेला नसतो. आपल्या क्षमतांचा आपण विचारही करीत नाही. ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे यांनी मात्र आपल्यातील क्षमता ओळखल्या. त्या बळावरच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला गेल्या दहा वर्षांत एक-दोनदा नव्हे, तर तीन वेळा त्या हसतमुखाने सामोऱ्या गेल्या. आजारपणामुळे खचून जाणाऱ्यांसाठी प्रा. वंदना अत्रे या अत्यंत आदर्शवत उदाहरण ठरल्या आहेत.

कॅन्सरसारखा दुर्धर आजार आपल्याला होईल असा विचारही अत्रे यांनी कधी केला नव्हता. तोही वेगवेगळ्या वेळी आणि शरीरात वेगवेगळ्या ठ‌िकाणी. कॅन्सर होण्यासाठी कोणतेच निश्च‌ित कारण नाही. तो कुणालाही होऊ शकतो, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यामधून सहजासहजी सावरणेही शक्य नव्हते. मात्र, तरीही त्या डगमगल्या नाहीत. मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांची त्यासाठी त्यांना खूप मदत झाली. मनाची ताकद कल्पनेपेक्षाही अफाट असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. ‘अपंग माणूस पर्वत चढून जाऊ शकतो’ अशा आशयाची एक म्हण आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती पाहावयास मिळतात. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जाताना अत्रे यांनीही मनाचे बळ एकवटले. इच्छाशक्ती जागी केली. वेद-उपनिषदांमध्ये सांगितलेल्या प्राणायामाची त्यासाठी खूप मदत झाली. आपल्याच बाबतीत असे का घडले, असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपल्याला भविष्यात काय हवे आणि त्यासाठी आपण वर्तमानात काय करू शकतो, याचे चिंतन करण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घेतली.

जीवनात आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी मिळाल्या. त्या आपल्यालाच का मिळाल्या, असा प्रश्न आपण स्वत:ला कधी विचारत नाही. त्यामुळे आपल्याच बाबतीत वाईट का घडते, असा विचार करण्याचा अधिकारही आपल्याकडे राहत नाही. या आजाराकडे त्यांनी खूप सकारात्मकतेने पाहिले. शरीर आणि मनाशी संवाद साधण्याची संधी त्यामुळे मिळाल्याचे त्या सांगतात. कुठलाही आजार होण्यापूर्वी शरीर आपल्याला संकेत देत असते. शरीर काय सांगतेय हे ऐकायलाच हवे. शरीरासाठी दररोज १५ मिनिटे वेळ द्यायलाच हवा. सकारात्मक विचार, इच्छाशक्ती, छंद आणि चांगल्या माणसांची सोबत यामुळे कुठल्याही संकटावर मात करता येते, असा संदेश अत्रे देतात.

--

नकारात्मकतेवर केली मात

त्या सकारात्मक विचाराकडे जात असतानाच आजारपणात नकारात्मक विचार अधिक प्रबळ होत. त्यामुळे त्या काहीशा खचल्या. अशावेळी त्यांनी आवडीच्या गोष्टी करण्यास प्राधान्य दिले. लेखन, संगीत आणि वाचनात स्वत:ला गुंतविले. पुस्तके वाचली. आवर्जून चांगल्या फिल्म्स पाहिल्या. स्वत:ला सतत बिझी ठेवले. त्यामुळेच त्या नकारात्मकेतेचे दरवाजे बंद करू शकल्या. या आव्हानात्मक काळात त्यांच्या अवतीभवती असलेल्या माणसांचीही त्यांना खूप मदत झाली. आफ्रिकन भाषेत एक म्हण आहे ‘एक मूल वाढविण्यासाठी चांगल्या गावाची गरज असते!’ म्हणजेच एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी अवतीभवती धीर देणारी, आपल्यातील उमेद जागविणारी चांगली माणसेही असायला हवीत. सुदैवाने अशी अनेक माणसे त्यांना भेटत गेली.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदू बाबांच्या समर्थकांवर संशय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत मोहनदास बेपत्ता होऊन ११ दिवस उलटले. मात्र, अद्याप त्यांच्याबाबत माहिती घेण्यास सरकारला अपयश येत असल्याचे पाहून साधू- महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या यादीतील भोंदू बाबांच्या समर्थकांवर संशय व्यक्त केला जात आहे. आखाडा परिषदेने दुसरी यादीही जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. कदाचित आपले नाव जाहीर होईल म्हणून अशा संभाव्य संशयित भोंदूंचा हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असावा, अशी चर्चा साधूंमध्ये होत आहे.

साधूंचे आखाडे भारतभर आहेत आणि साधू नेहमीच रेल्वेने प्रवास करीत असतात. आता हा रेल्वेप्रवासच धोक्याचा झाल्याने साधूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आखाडा परिषद जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून, त्यावर साधू- महंतांमध्ये चर्चा होत आहे. रेल्वेच्या आरक्षित बोगीतून एखादा प्रवासी अचानक नाहीसा होतोच कसा, ही रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. हरिद्वार ते भोपाळ या प्रवासादरम्यान किती स्थानके आहेत आणि तेथे सीसीटीव्ही असेल तर त्याची तपासणी करावी. थांबा नसलेल्या ठिकाणी रेल्वे थांबवण्यात आली असेल तर साखळी ओढल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे. देशभरात साधू-संतांमध्ये खळबळ उडविणारी घटना असताना याबाबत सरकार यंत्रणा निश्चल असल्याचे पाहून साधूंचा पारा चढला आहे.

दरम्यान, साधूंशी चर्चा केली असता, काही साधूंना यादी जाहीर झाल्यानंतर रेल्वे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी वादावादीस सामोरे जावे लागण्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत. यामध्ये भोंदू बाबांचे समर्थक असल्याचेही लक्षात आले. राम रहीम प्रकरणात साधू बदनाम होत असल्याने आखाडा परिषदेने भोंदू बाबांची यादीच जाहीर केली होती. त्र्यंबकेश्वर येथे साधूंचे दहा आखाडे आहेत. या दहा आखाड्यांतील साधूंपैकी महंत मोहनदास यांच्या बेपत्ता होण्याचा विषय केंद्रस्थानी आहे.

महंत मोहनदास बेपत्ता होण्याच्या घटनेत निश्चितच भोंदू बाबांच्या समर्थकांचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत सरकारने तातडीने चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सरकारने रेल्वेसुरक्षा यंत्रणेकडून सखोल माहिती घेऊन याबाबत छडा लावला पाहिजे, असे डॉ. बिंदूजी महाराज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​देवाणघेवाणीचे `कौशल्य` शिक्षण!

$
0
0

आयटीआय अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही आयटीआय संस्थांकडून सेमिस्टरच्या अगोदर पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती एका प्रकरणाद्वारे उघड झाली आहे. दिंडोरीमधील हा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यातील इतर संस्थांमध्येही असेच प्रकार सुरू असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. दिंडोरीमधील प्रकाराची विद्यार्थ्यांनी संचालनालयाकडे दिलेली लेखी माहिती आणि मुख्यमंत्री व मंत्रालयांपर्यंत करण्यात आलेल्या तक्रारींमुळे या प्रकरणाची कोंडी फुटली आहे.


‘मेक इन इंडिया’ सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळू इच्छिणाऱ्या केंद्र सरकारचे उद्देशच पायदळी तुडविण्याचे प्रकार काही आयटीआय संस्थांकडून सुरू आहेत. असेच धक्कादायक वास्तव एका माहितीद्वारे उघड झाले आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून अभ्यासक्रमातला टप्पा पूर्ण करू पाहणाऱ्या आयटीआयच्या प्रति विद्यार्थ्यामागे चक्क दोनशे ते पाचशे रुपये उकळून‘अर्थ’पूर्ण मागणी काही ठिकाणी झाल्याचा लेखी आरोपच विद्यार्थ्यांकडून लेखी स्वरूपात केला गेला. मात्र चौकशीअंती अशा आर्थिक मागणीत तथ्यता आढळून येत नसून अशाप्रकारचा आरोपच निराधार असल्याची व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाची बाजू या विभागाचे सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी‘मटा’शी बोलताना मांडली.

दिंडोरी आयटीआयमध्ये असाच अनुभव आल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी नाशिक विभागाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर, कौशल्य विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, विभागाचे संचालक, मुख्य सचिव, उपसचिव यांच्याकडेही तक्रार अर्जांच्या प्रती पाठविल्या आहेत.

कौशल्य शिक्षणाची ऐसीतैशी

‘मेक इन इंडिया’सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे कौशल्य विकसनासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे ग्रामीण भागात कौशल्य विकसनाची मदार असलेल्या आयटीआयसारख्या संस्थेवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच करण्यात आलेला हा आरोप गंभीरच आहे. चौकशीअंती हे आरोप तथ्यहीन असल्याचा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचलनालयाचा दावा असला तरीही अशाप्रकारच्या लेखी तक्रारी उपस्थित होणे, या प्रकरणाची संचालनालयास चौकशी लावणे भाग पडण्याचा प्रकार व्यवसाय शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरावा.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

परीक्षेच्या अगोदर प्रॅक्टिकलच्या गुणदानासाठी किंवा परीक्षेत उत्तरे सांगण्यासाठी संस्थेतीलच काही घटकांकडून बेकायदेशीर आर्थिक मागणी होत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप होते. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाला दिल्यानंतर चौकशी समितीही नेमण्यात आली. मात्र, तीन महिने उलटूनही त्या चौकशीचे काय झाले याबाबत तक्रारकर्ते अनभिज्ञ आहेत. या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

इंजिनीअरिंग किंवा मेडिकल विद्याशाखांच्या प्रवेशांपासून प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र कौशल्याधिष्ठीत आयटीआयसारख्या अभ्यासक्रमांबाबतीत असे फारसे प्रकार ऐकण्यात नाहीत. मात्र गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षेतील अशा अनुभवांसंदर्भात प्रशिक्षणार्थींनी २१ एप्रिल २०१७ रोजी सहसंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. यावर सहसंचालनालयाने कारवाई करत ९ जून २०१७ रोजी प्रशिक्षणार्थी तक्रारकर्त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात घेतले होते. तर २३ जून २०१७ रोजी नियमित प्रशिक्षणार्थ्यांचे म्हणले लेखी स्वरूपात घेतले होते.

असे आहे प्रकरण...

आयटीआयचा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा आहे. यात विविध ट्रेड्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक मुलींचा आणि दुसरा मुलांचा असे दोन आयटीआय कार्यरत आहेत. या आयटीआय संस्थांमध्ये प्रामुख्याने मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशिअन, मशिनिस्ट आदी ट्रेड्सना मागणी विद्यार्थ्यांची पसंती असते. या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गट आहेत. यापैकी पहिल्या गटात नियमित प्रशिक्षणार्थी येतात, तर दुसऱ्या गटात बीटीआरआय अंतर्गत अॅप्रेंटेसशीप करणारे प्रशिक्षणार्थी येतात. हा सर्व प्रकार बहुतांशी ऑटोमोबाइल ट्रेड संदर्भात घडल्याचा तक्रारकर्त्यांचा दावा आहे. जिल्ह्यातील विविध आयटीआयमधून या ट्रेडमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना परीक्षेसाठी दिंडोरी आयटीआय गाठावा लागतो. जानेवारी २०१७ आणि जुलै २०१७ या दोन गत सेमिस्टरपासून बहुतांश प्रशिक्षणार्थींनी या प्रकाराला विरोध सुरू केला आहे. या सेमिस्टर्समध्ये अनेक प्रशिक्षणार्थींनी अशा प्रकारच्या सूचनांना प्रतिसाद देणेच बंद केले आहे. असाच प्रकार जिल्ह्यासह राज्यभरात इतरत्र प्रकार सुरू असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांचा दावा आहे. या धर्तीवर जिल्ह्यातील दिंडोरी येथे सुरू असणाऱ्या एका प्रकाराला वाचा फोडण्याचा जोरदार प्रयत्न तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी

केला होता. यावर चौकशीला सुरुवात होऊन लेखी विद्यार्थ्यांचे जवाबही प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात नोंदविण्यात आले. या जवाबांमध्ये संस्थेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी किंवा गुणदानासाठी आर्थिक मागणी होत असल्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी सहसंचालकांकडील लेखी जबाबात दिली आहेत. इतकी स्पष्ट उत्तरे देऊनही या चौकशीचे पुढे काय झाले. का, तक्रारीनंतर चौकशीचा फार्स उभारून नंतरचा अहवाल बासनात गुंडाळला गेला. याबाबतही तक्रारकर्ते विद्यार्थी अद्याप अनभिज्ञच आहेत.

... तर कारणे दाखवा नोटीस

आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून सेमिस्टर अगोदर पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सहसंचालक कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर चौकशी समिती नेमण्यात येऊन चौकशीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या तक्रारींमधील आर्थिक मागणीच्या मुद्द्यात तथ्य आढळत नाहीत. लेक्चर्सची अनियमितता किंवा शैक्षणिक दर्जा संदर्भात इतर ढिलाई असणाऱ्या बाबी काही प्रकरणात आढळल्या असून, लवकरच संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येईल.

-एस. आर. सूर्यवंशी

सहसंचालक, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग

बीटीआरआय प्रॅक्टिकल परीक्षेबाबतही तक्रार

२१ एप्रिल २०१७ रोजी पार पडलेल्या ऑटोमोबाइल बीटीआरआय प्रॅक्टिकल परीक्षेत दिंडोरी आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थ्यांकडून ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाच्या धमक्याही देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कृती समितीच्या पुढाकाराने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणचे सहसंचालकांकडे तक्रार केली होती. याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. या प्रकाराबाबत ९ जून रोजी सहसंचालक कार्यालयाने लेखी विचारणा केली असता सत्य घटनाक्रम विद्यार्थ्यांनी लिहून दिला आहे.

प्राचार्य ‘आऊट ऑफ कव्हरेज’

या प्रकरणी माहितीसाठी दिंडोरी आयटीआयच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल क्रमांक‘आऊट ऑफ कव्हरेज असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे सहसंचालकांशी संपर्क साधून व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न‘मटा’ने केला. यानंतर तक्रार दाखल होताच चौकशी समितीच्या माध्यमातून तक्रारींमधील तथ्यांश पडताळण्याचे काम संचलनालयाने केले असल्याची माहिती सहसंचालकांनी दिली. तक्रारदारांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून लेखी जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणी समितीला आर्थिक आरोपांत तथ्य आढळले नसल्याचे सहसंचालकांनी सांगितले. तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांची संघटना, तिची विश्वासार्हता आणि तक्रारदारांची पार्श्वभूमी या संदर्भातही पाहणी चौकशीसोबतच गरजेची असल्याचेही सहसंचालक सूर्यवंशी यांनी‘मटा’ला सांगितले.



काही विषयांच्या तासिका वेळेवर होत नाहीत. परिणामी अभ्यासक्रम अपूर्ण राहतात. अशावेळी मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांपुढे उत्तीर्ण होण्यासाठी पैसे जमा करण्याचे प्रकार प्रस्ताव ठेवले जातात. मी स्वत: पैसे दिले नाहीत मात्र इतरांनी दिल्याचे माहिती आहे. हे प्रकार बंद व्हावे.

माजी प्रशिक्षणार्थी, आयटीआय

------------------------

कौशल्याधारित शिक्षण असल्याने मध्यमवर्गीय व अतिसामान्य वर्गातील विद्यार्थी या अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. लवकरच जॉब करण्याचे उद्दिष्ट असल्याने यातील तक्रारी व पाठपुराव्याला विद्यार्थी टाळाटाळ करतात. सद्यस्थितीतही आमचे स्पष्ट म्हणणे आम्ही यंत्रणेस लेखी दिले आहे. यंत्रणेने योग्य ती कारवाई करावी. सध्या मी जॉब करतो. याशिवाय अधिक काहीही सांगायचे नाही.

माजी प्रशिक्षणार्थी, आयटीआय

संकलन : जितेंद्र तरटे

Jitendra.tarte@timesgroup.com / Twitter : jitendra@mt

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन विवाहितांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला. नांदगाव तालुक्यातील चांदोरा व खिरडी येथे या घटना घडल्या. चांदोरा येथील विवाहिता शशिकला मच्छिंद्र चव्हाण (वय ४२) शेतातील विहिरीत पाणी काढत असताना त्या पाय घसरून पडल्या. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. खिरडी येथील मनीषा विजय पठाडे (वय २२) पहाटे पाच वाजता शेतातील पाणी काढत असताना विहिरीत पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिलिव्हरी बॉयकडून गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू ग्राहकांनी परत दिल्यास त्या वस्तू काढून त्यात इतर साहित्य भरून कंपनीला पाठवणाऱ्या डिलिव्हरी बॉयने संबंधित कंपनीला तब्बल ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत उपनगर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल अाहे.

यासंदर्भातील फिर्यादीनुसार, जय भवानीरोड परिसरात इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. सदर कंपनी फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग साइट्ससाठी काम करते. ग्राहकांनी वेबसाइटवर खरेदी केली, की त्या वस्तू जय भवानीरोडवरील इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत येतात. तेथून डिलिव्हरी बॉइज ते पार्सल शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. अनेकदा ग्राहकांना वस्तू पसंत पडत नाही किंवा वस्तूमध्ये दोष असतो, तसेच खरेदीच्या वेळी दाखविलेली किंमत आणि प्रत्यक्ष द्यावी लागणारी किंमत यात तफावत असल्याने ग्राहक त्या वस्तू परत पाठवतात. अशा तब्बल ६४ लाख ५५ हजार ४०२ रुपये किमतीच्या वस्तू परस्पर लंपास करण्याचा प्रताप संबंधित डिलिव्हरी बॉयने केला आहे.

ही बाब कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. कंपनीच्या वतीने किरण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या अज्ञात डिलिव्हरी बॉयविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करीत आहेत.

--

या वस्तूंवर मारला हात

इन्स्टाकार्ट कंपनीच्या अज्ञात डिलिव्हरी बॉयने तब्बल ६४ लाख ५५ हजार ४०२ रुपये किमतीच्या वस्तू परस्पर काढून घेतल्या. ग्राहकांनी दिलेल्या वस्तू कंपनीला न देता त्या बॉक्समध्ये इतर साहित्य भरून त्या परत कंपनीकडे पाठविण्यात आल्या. दि. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल १२ कॅमेरे, एक लॅपटॉप, तसेच एक प्ले स्टेशन अशा १५ किमती वस्तू काढून घेण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरेत परिवर्तन की ग्रामविकास?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिन्नर फाटा

संपूर्ण नाशिक तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या एकलहरे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२६) शांततेत ६३.२० टक्के इतके मतदान झाले. विद्यमान सरपंच राजाराम धनवटे व जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनल व भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांचे राजकिय भवितव्य बुधवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.

मंगळवारी एकलहरे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. सहा वॉर्डांतून एकूण १७ सदस्य व सरपंच पदाच्या एका जागेसाठी दोन उमेदार उभे होते. या निवडणुकीत ७ हजार ४६८ मतदारांपैकी ४ हजार ७२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकलहरे कॉलनीतील माध्यमिक विद्यालयात ७ तर एकलहरे गावातील जिल्हा परिषद शाळेत २ बुथवर मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली एकूण ३२ निवडणूक कर्मचाऱ्यांनी कामकाज केले. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केल्याने मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एकलहरे कॉलनीतील माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर दोन्हीही पॅनल प्रमुख व सरपंचपदाचे उमेदवार सकाळपासूनच हजर होते.

प्रथमच सरपंच थेट जनतेतून

राज्यातील ग्रामपंचायतीत सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने घेतला. त्यानुसार एकहलरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच सरपंच निवड थेट जनतेतून होणार आहे. एकलहरे ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद अनुसुचित जाती महिला संवर्गासाठी राखिव असून या पदासाठी ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी जाधव व परिवर्तन विकास पॅनलच्या सुजाता दिलीप पगारे यांच्यापैकी एकलहरेतील मतदार सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकतात याचा फैसलाही बुधवारी दुपारपर्यंत होणार आहे. मतमोजणी नाशिक तहसील कार्यालयात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियामुळे पडतोय वास्तव जगाचा विसर

$
0
0

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

व्हर्च्युअल जगाच्या आकर्षणामुळे आजच्या युवा पिढीला वास्तविक जगाचा विसर पडला असून, पिढीत एकाकीपणा वाढला आहे. त्यामुळे खरे प्रश्न दुर्लक्षित होत त्यातून नैराश्य येत आहे, असे मत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. सोशल मिडीयाच्या आहारी गेलेली आजच्या युवा पिढीकडून नकळतपणे कायद्यांचे उल्लंघन होत असल्यानेच सोशल मीडिया हाताळण्यासंबंधीचे कायदेशीर ज्ञान असेल तर त्याचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहर पोलिस आयुक्तालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या युवा रक्षा जागर अभियानांतर्गत येथील के. जे. मेहता हायस्कूल व इ. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सिंगल बोलत होते. या कार्यक्रमास साने गुरुजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन, प्राचार्या करुणा आव्हाड, विद्या जोशी आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त सिंगल म्हणाले की, आजचे विद्यार्थी भावी भारत देशाचे भविष्य आहेत. म्हणून करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करा. आईवडील व शिक्षकांच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात, विद्यार्थ्यांना यश मिळाले की आईवडील व शिक्षकांना अभिमान वाटतो. म्हणून त्यांना अभिमानाची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांना मदत करणे नागरिकाचे कर्तव्य असते. एक दिवस जरी सर्व पोलिस संपावर गेले तर काय होईल, असा प्रश्न विचारून आपल्या पालकांना हेल्मेटचा आग्रह धरा, असे आवाहनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई विद्यापीठाच्या घोळामुळे रखडले ‘लॉ’चे प्रवेश

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : jitendra.tarte@MT

नाशिक ः मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या पेपर तपासणीसंदर्भातील घोळामुळे राज्यभरातच ‘लॉ’ विद्याशाखेचे प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल पाच महिने उशिरा हे प्रवेश सुरू होणार आहेत. परिणामी, या विद्याशाखेचे विद्यार्थी प्रवेश घेतील त्याच दिवशी त्यांचा एका सेमिस्टरचा कालावधी संपलेला असेल.

दरवर्षी प्रवेशाला विलंब होणाऱ्या शाखांमध्ये मेडिकल किंवा इंजिनीअरिंगसारख्या विद्याशाखांचा समावेश असतो. यंदाही २१ जुलै रोजी या विद्याशाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केंद्रीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकालही जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आला. मात्र, मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या घोळामुळे या प्रवेशप्रक्रियेत मोठा अडसर उभा राहिला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पदवीचा निकाल नसल्याने हे विद्यार्थी सीईटीमध्ये उत्तीर्ण असूनसुद्धा त्यांच्या डोक्यावर पदवी निकालातील विलंबामुळे टांगती तलवार होती. मुंबई विभागातील लॉ कॉलेज आणि मुंबई विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, या गोष्टीचा परिणाम एकूणच लॉ विद्याशाखेच्या प्रवेशप्रक्रियेवर झाला आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली गेली.

राज्यात १८१ कॉलेज

लॉ विद्याशाखेचे शिक्षण देणारे राज्यभरात एकूण १८१ लॉ कॉलेज आहेत. या कॉलेजांमध्ये सुमारे १५,२२० जागा आहेत. यंदा २१ जुलै रोजी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत २७,३४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या संख्येचे प्रमाण लक्षात घेता, सर्व जागांवर प्रवेश होणे अपेक्षित आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात या विद्याशाखेचे एकूण चार कॉलेज आहेत. यातील अभ्यासक्रमांमध्ये सुमारे ६०० जागा उपलब्ध आहेत. या विलंबामुळे जिल्ह्यातील सुमारे ६०० जागांचेही भवितव्य टांगणीला लागले आहे. यंदा विलंबित प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया ९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. याबाबतची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

एका सेमिस्टरला बसला फटका

गेल्या शैक्षणिक वर्षात ऑगस्टमध्ये लॉ विद्याशाखेची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली होती. यामुळे या विद्यार्थ्यांची पहिली सेमिस्टर परीक्षा जानेवारीमध्ये पार पडली होती, तर दुसरी सेमिस्टर मेमध्ये होऊन वर्ष विनाअडथळा पूर्ण झाले होते. यंदा ९ ऑक्टोबरला ही प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने पहिली सेमिस्टरची प्रक्रियाही आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. या सर्व बाबींबा परिणाम अभ्यासक्रम पूर्ण होण्यावरही होणार आहे. यातच या विद्यार्थ्यांना प्रवेशासोबतच परीक्षेची तयारी करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यंदा लांबलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यसेवा सलाइनवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वर्षभरापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळूनही भिजत पडलेले शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे घोंगडे, तर दुसऱ्या बाजूला कार्यान्वित असलेल्या तीस खाटांच्या तालुका ग्रामीण रुग्णालयातील रिक्तपदांची समस्या यामुळे येवला ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेचा गाडा अंधरूणाला खिळला आहे. मोठ्या प्रमाणातील रिक्तपदांमुळे रुग्णांना आरोग्यसेवा देताना कार्यरत असलेल्या डॉक्टरांची चांगलीच दमछाक होत आहे. दिवसेंदिवस या ग्रामीण रुग्णालयात वाढत चाललेली बाह्यरुग्णांची संख्या अन् परिसरातील अपघातांचे वाढते प्रमाण हे सर्व काही लक्षात घेता रुग्णशय्येवर पडलेल्या येवला ग्रामीण रुग्णालयास रिक्तपदे भरतीच्या बुस्टर डोसची नितांत गरज आहे.

जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून २००९ मध्ये शहरातील हुतात्मा स्मारकानजीक तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. येवला ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गेल्यावर्षी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या उपजिल्हा रुग्णालयासाठी आर्थिक निधीची पुरेशी तरतूद झालेली नसल्याने त्याचे काम रखडले आहे. त्यातच सध्या कार्यान्वित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा गाडा अपुऱ्या स्टाफमुळे कसातरी ओढला जात असल्याचे दिसत आहे. या रुग्णालयातील असंख्य पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने आरोग्यसेवेचा गाडाच रुग्णशय्येवर पडण्याची वेळ आली आहे. या रिक्तपदांमुळे कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह इतरांवर मोठा ताण आहे. येवला ग्रामीण रुग्णालयात वैदयकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर ३ पदांपैकी २ पडे गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहेत. परिमाणी वैद्यकीय अधीक्षकांसह एका वैदयकीय अधिकाऱ्यांनाच मोठी जबाबदारी पेलावी लागत आहे. लेखापाल, एक्सरे तंत्रज्ञ, शिपाईचे पद रिक्त आहे. कक्ष सेवकांच्या चार मंजूर पदांपैकी दोन पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. सफाई कामगारांच्या दोन पदांपैकी एक पद तीन वर्षांपासून रिक्त असल्याने कामावर असलेल्या एकालाच स्वच्छतेचा मोठा भार उचलावा लागत आहे. लसीकरण परिचारिकेच्या ४ मंजूर पदांमधील २ पदे गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहेत.

आरोग्यसेवेचे ज्ञान

असलेले पालिकेत

येवला नगरपालिकेच्या सेवेतील ३ अधिपरिचारिका, १ औषधनिर्माण अधिकारी, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व १ कुटुंबकल्याण समन्वयक असे येवला ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले एकूण सहा कर्मचारी येवला पालिकेने वर्षभरापूर्वी ग्रामीण रुग्णालयातून काढून घेतलेले आहेत. आरोग्यसेवेचे ज्ञान असलेले हे कर्मचारी सध्या मात्र येवला नगरपालिका कार्यालयात काम करत आहेत. याबाबत येवला पालिका व शासनाच्या आरोग्य विभागाने एकविचाराने तोडगा काढल्यास अपुऱ्या कर्मचारी संख्येचा भेडसावणारा प्रश्न काही अंशी सध्यापुरता तरी मार्गी लागू शकतो.

भिजत घोंगडे

शंभर खाटांचे उपजिल्हा श्रेणीचे रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे. सध्याच्या ३० खाटांच्या येवल्यातील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांच्या बांधकामास राज्य शासनाने गेल्यावर्षी प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र अजूनही त्याचे काम सुरू झालेल नाही.

आरोग्य उपकेंद्राची मागणी

तालुक्यातील गवंडगाव, रहाडी, कोळगाव येथे नव्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करून ते कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दराडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. राजापूरच्या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील १५ ते २० गावांचा आरोग्य उपचाराचा गाडा सुरळीत होणार असला तरी भविष्यातील या केंद्रावर पडणारा मोठा ताण लक्षात घेता गवंडगाव, रहाडी, कोळगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना वार्षिक सभेत जुन्नरेंची उचलबांगडी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिकची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या सभेत जुन्नरे यांची उचलबांगडी होणार असल्याचे सभेच्या सूचनेवरून स्पष्ट होत आहे.

जुन्नरे यांचे एकरकमी सभासद यादीतून नाव कमी करण्याच्या कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर विचार विनिमय करणे व निर्णय घेणे हा महत्त्वाचा विषय या सभेत होणार आहे. संस्थेची बदनामी केल्याच्या कारणावरून सावानाचे माजी कार्यवाह आणि आजीव सभासद रमेश जुन्नरे यांचे सभासदत्त्व रद्द का करू नये, वार्षिक सर्वसाधारण सभेने त्यांच्या अधिकारात निर्णय घ्यावा, असा ठराव सार्वजनिक वाचनालय नाशिक कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला होता.

सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या सहीने आजीव सभासद रमेश जुन्नरे यांना कारणे दाखवा नोटीसवजा पत्र देण्यात आले होते. वर्गणीदार सभासदांच्या यादीतून नाव कमी का करू नये याविषयी कार्यकारी मंडळासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडावी असे या पत्रात नमूद केले होते. मात्र या बैठकीसाठी रमेश जुन्नरे उपस्थित राहीले नाही. त्यांनी अध्यक्ष व प्रमुख सचिवांना पत्र पाठवून सविस्तर उत्तर दिले आणि गुंडागर्दी करणाऱ्यांसमोर उभे राहून उत्तर देण्याची इच्छा नाही, असे सांगत बैठकीला हजर राहणे टाळले. मात्र जुन्नरे यांच्या सभासदत्व रद्द करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा असा ठराव कार्यकारी मंडळात करण्यात आला असून तो अध्यक्षांकडे पाठविण्यात आला होता. तो विषय आता वार्षिक सर्वसाधारण सभेवर घेण्यात आला आहे.

याशिवाय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २०१६-१७ चा अहवाल मंजूर करणे, लेखापरीक्षण झालेला ताळेबंद व जमाखर्च चर्चा करून मंजूर करणे, २०१८-१९ चे अंदाजपत्रक मंजूर करणे, २०१८-१९ वर्षासाठी सनदी लेखापाल यांची नियुक्ती करणे, २०१८-१९ करीता अंतर्गत हिशोब तपासनीस यांची निवड करणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषय या सभेत अंतर्भूत राहतील.

ही सभा गणसंख्येच्याअभावी तहकूब झाल्यास सभा त्याच दिवशी अर्धा तासानंतर होईल. तिला गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही. संस्थेचा अहवाल, जमाखर्च वाचनालयात पहाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आयत्या वेळेचे प्रश्न सभेपूर्वी तीन दिवस अगोदर लेखी स्वरूपात आल्यास सभेत त्यावर विचार होईल, अन्य विषयांचा विचार होणार नाही असे सावानातर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस अडकली कन्सल्टंट अन् समितीत!

$
0
0

नाशिक ः शहराच्या २० लाख लोकसंख्येची जीवनवाहिनी होण्याऐवजी सिटी बस ही सध्या अखेरची घटका मोजत आहे. सिटी बसचा तिढा तातडीने सोडविण्याची आवश्यकता असताना महापालिकेने बससेवेबाबत निर्णय घेण्यासाठी कन्सल्टंट नियुक्तीचा फार्स केला आहे, तर राज्य परिवहन महामंडळाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे कन्सल्टंट अन् समितीच्या वेळकाढू बैठकांमध्ये सिटी बसचा प्रश्न लटकण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी २०३६ पर्यंत तीन हजार कोटींची आवश्यकता आहे.

राज्य परिवहन विभागाकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या सिटी बसचे घोंगडे झटकण्यासाठी महामंडळ आणि महापालिकेत सध्या स्पर्धा सुरू आहे. महामंडळाने १२५ कोटींचा आर्थिक तोटा झाल्याचे सांगत महापालिकेनेच आता ही सेवा चालवावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेने आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत थंड प्रतिसाद दिला. हा नूर पाहून महामंडळाने थेट सिटी बसची संख्या व फेऱ्यांमध्येच तब्बल निम्म्याने कपात केल्याने विद्यार्थी व नागरिकांची परवड होत आहे. औरंगाबाद, नागपूर, पुणे, ठाणे या शहरांमध्ये महापालिकाच बससेवा चालवीत असल्याने नाशिकमध्येही महापालिकेवर सिटी बस चालविण्यासाठी दबाव वाढला आहे. दिल्लीस्थित यूएमटीसी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सार्वजनिक वाहतूक सेवा भक्कम करण्यावर भर देण्यात आला असून, महापालिकेने पीपीपी तत्त्वावर बससेवा चालवावी, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सिटी बसचा तिढा सोडविण्यासाठी कन्सल्टंटची नियुक्ती केली आहे. या कन्सल्टंटकडून बससेवेची व्यवहार्यता तपासून महापालिकेला अहवाल दिला जाणार आहे. त्यास जवळपास सहा महिन्यांचा कालावधी तरी लागणार असल्याने तोपर्यंत महापालिकेने आपला ताप टाळला असला, तरी प्रवाशांच्या त्रासात मात्र भरच पडणार आहे.

महापालिकेनेने कन्सल्टंट नियुक्त करून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले असतानाच एसटी महामंडळानेसुद्धा परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, नगरविकास विभागाचे उपसचिव असे या समितीचे सदस्य राहणार असून, ही समिती नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये महामंडळाकडून सुरू असलेल्या बससेवेबाबतचा अहवाल तयार करणार आहे. बससेवेची स्थिती, आवश्यकता आणि आर्थिक भार यासंदर्भातील सखोल अभ्यासानंतर ही समिती आपला अहवाल परिवहन मंत्र्यांना देणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला किमान सहा ते आठ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी सिटी बसचा तिढा कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांसह विद्यार्थ्यांचा प्रवास हा धक्के खातच होणार आहे.

---

डॉ. गेडाम, कृष्णांकडून अपेक्षा

शहर बससेवेचे भवितव्य हे सध्या परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि सध्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हातात आहे. डॉ. गेडाम यांनी महापालिकेत काम केले असून, त्यांना महापालिकेच्या आर्थिक स्थितीची पूर्ण जाणीव आहे, तसेच शहराचा अभ्यासही आहे. अभिषेक कृष्णांवर महापालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. बससेवा महापालिकेच्या ताब्यात घेणे शक्य नसल्याची जाणीव दोन्ही अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे बससेवेचा योग्य तोडगा डॉ. गेडाम आणि कृष्णा यांनाच काढावा लागणार असून, त्यांच्याकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा आहेत.

--

२९६१ कोटींची गरज

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यासाठी सन २०२१ पर्यंत तातडीने ७२६ कोटी रुपयांची गरज आहे. सध्याच्या बसेसची संख्या ६९८ वर नेऊन ती सन २०३६ मध्ये १३२९ पर्यंत वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी एक कृती आराखडा दिल्लीस्थित ‘यूएमटीसी’ने महापालिकेला सादर केला असून, शहराच्या वाढीव लोकसंख्येचा अंदाज गृहित धरून पुढील वीस वर्षांत बससेवेसाठी २९६१ कोटी रुपये खर्च करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सन २०३६ मध्ये नाशिकची लोकसंख्या ३४ लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक खर्चाची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ तीन विद्यार्थ्यांना एक दिवसाची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचोरीच्या गुन्ह्यात सापडलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मित्रास कोर्टाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यातील दोन मुली टीवाय बी. एस्सी.त शिक्षण घेत असून, संशयित मुलगाही त्यांच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

कॉलेजरोडवरील आरवायके कॉलेजमधून १० ऑगस्ट रोजी वाहनचोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना क्राइम ब्रँचच्या पथकाने कुणाल माळी या विद्यार्थ्यास २५ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता वाहनचोरी त्याच्या दोन मैत्रिणींनी केल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर चोरीची दुचाकी विकण्याची जबाबदारी संशयित मुलाकडे देण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी लागलीच दोन्ही विद्यार्थिनींना अटक करून गंगापूररोड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. मंगळवारी या तिघांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांचे पालक व्यावसायिक असून, मुलांना पैशांची गरज असल्याचे दिसत नाही. मात्र, तरीही शिक्षण सोडून मुलांनी चोरी केल्याची बाब समोर आली आहे.

--

पोलिसही चक्रावले

कॉलेजेसमधून वाहने चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून, या गुन्ह्यात अशी विद्यार्थिनींना अटक होईल, याचा विचारही पोलिसांनी केला नव्हता. विद्यार्थिनींचे पालक व्यावसायिक असून, त्यातील एकीचा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. या विद्यार्थिनींनी केवळ मजा करण्यासाठी, तसेच पैशांच्या हव्यासापोटी हे कृत्य केले. त्या सराईत गुन्हेगार नसून, चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारांअभावी अर्भकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभर गाजल्यानंतरही गेंड्याच्या कातडीचे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन सुधारण्यास तयार नसल्याची लाजिरवाणीबाब समोर आली आहे. केवळ जागा नाही म्हणून उपचारास नकार मिळाल्याने नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारासच अपंग मातेवर डिलेव्हरीनंतर बाळाला वाचविण्यासाठी भटकावे लागल्याचा संतापजनक प्रकारही यानिमित्ताने घडला आहे. या प्रसंगाची आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

तब्बल दोन तास उपचारच न मिळाल्याने या अर्भकाचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत यामुळे चर्चेत आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

हेमलता जगदीश कहांडोळे (वय २३, रा. घनशेत, पो. कुळवंडी, ता. पेठ) या महिलेने मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास हरसूल हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. मुलाचे वजन एकच किलो भरल्यामुळे त्यास लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठव‌िण्यात आले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हेमलता काही नातेवाईकांसह येथे पोहचल्या. मात्र, नवजात बालकांच्या कक्षात (एनएससीयु) जागा नसल्याचे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले नाहीत.

त्यानंतर त्यांना आडगाव येथील मेड‌िकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगण्यात आले. तेथे संपर्क साधून बालकास अॅडमीट करण्याबाबत विचारणा केली. मात्र, जागा नसल्याचे सांगण्यात आले. दोन ते अडीच तासांनंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास नवजात बालकाचा खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासून बालकास मृत घोष‌ित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दसऱ्यापूर्वीच दिवाळी गोड!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून आपल्या नियमित पाच हजार कर्मचाऱ्यांसह शिक्षक, अंगणवाडी सेवक आणि वैद्यकीय कर्मचारी अशा साडेसात हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे गिफ्ट मिळाले असून, त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ११ कोटी ३४ लाखांचा बोजा पडणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत महापालिकेने सानुग्रह अनुदानात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. महापालिकेच्या कायम पाच हजार १७० कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. दरम्यान, सानुग्रह अनुदानाचा ठराव तातडीने प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याने यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी दसऱ्यापूर्वीच गोड झाली आहे.

महापालिकेकडून दर वर्षी दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते. म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी यंदा २० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. तसेच, भाजपचे गटनेेते संभाजी मोरुस्कर यांनीही महासभेत ठराव केला होता. परंतु, महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्याबाबत महापौरांसह आयुक्तांनी कानावर हात ठेवले होते. मंगळवारी ‘रामायण’वर महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेत्यांसह गटनेत्यांची बैठक झाली. त्यात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, मनसे गटनेते सलिम शेख, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसे गटनेत्या दीक्षा लोंढे, नगरसेवक उद्धव निमसे, प्रवीण तिदमे यांची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना किती सानुग्रह अनुदान द्यायचे, यावर चर्चा करण्यात आली.

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महापौरांसह गटनेत्यांनी गेल्या वर्षीच्या सानुग्रह अनुदानात एक हजाराची वाढ करून सानुग्रह अनुदान १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला, तसेच महापालिकेच्या पाच हजार कायम कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्यासाठी अतिरिक्त एक हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. याचा लाभ अास्थापनेवरील ५ हजार १७० कर्मचाऱ्यांना, तसेच एक हजार ३७४ अंगणवाडी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसह एक हजार ५९ शिक्षकांसह मानधन व रोजंदारीवर असलेल्या एकूण सात हजार ५६३ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

--

यंदा एक हजारांची वाढ

गेल्या वर्षी महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्यात यावर्षी प्रत्येकी एक हजाराची वाढ केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ११ कोटी ३४ लाखांचा बोजा पडणार आहे. महापालिकेने सानुग्रह अनुदानासाठी बजेटमध्ये १० कोटींची तरतूद केली आहे, तसेच शिक्षण विभागाच्या बजेटमध्येसुद्धा १ कोटी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीनंतर महापौरांनी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करीत हा ठराव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी दसऱ्यापूर्वीच गोड झाली आहे.

--

महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय हा सर्वसंमतीने घेण्यात आला आहे. तातडीने या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार असून, दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

-रंजना भानसी, महापौर

--

शिवसेनेची २० हजारांची मागणी होती. परंतु, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने १५ हजारांवर सर्वांनी शिक्कामोर्तब केले असले, तरी कर्मचाऱ्यांचा विमा एक लाखावरून दोन लाख होणे अपेक्षित आहे. त्याचा भार महापालिकेने उचलला पाहिजे.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस मिनिटांत २० मिली पाऊस!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांवर परतीच्या पावसानेही कृपावर्षाव सुरूच ठेवला असून, मंगळवारी (दि. २६) शहरात रेकॉर्डब्रेक पाऊ‌स झाला. शहरात अवघ्या २० मिन‌िटांमध्ये २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे काही ठिकाणी कडक ऊन, तर अवघ्या काही अंतरावर धुव्वाधार पाऊस असा वेगळाच नजारा शहरवासीयांनी अनुभवला.

यंदा जूनपासूनच नाशिककरांवर पाऊस मेहेरबान राहिला. जुलै आणि ऑगस्टमध्येही पावसाने सरासरी ओलांडली. सप्टेंबरमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला असला तरी परतीच्या पावसाने आपले अस्तित्व वेळोवेळी दाखवून दिले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची चिन्हे नसतानाही सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट होऊ लागला. कॉलेजरोड, गंगापूर रोड, महात्मानगर अशा काही भागात लख्ख ऊन पडले असतानाही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सीबीएस, शालिमारसह मध्यवर्ती भागावर पाऊस तुटून पडल्याचे नागरिकांनी अनुभवले. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पंचवटी, जुने नाशिक, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड परिसरातही पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. अवघ्या २० मिनिटांत २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस रेकॉर्डब्रेक ठरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. कालिकामाता यात्रोत्सवात सहभागी सर्वांनाच या पावसामुळे फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परावलंबित्वाच्या कोषातून बाहेर पडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांवरील वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना सतत समोर येतात. अशावेळी पोलिस मदतीला येतात. मात्र, अनेकदा महिलाही आपल्या कर्तव्यापासून दूर राहतात. स्वसंरक्षणकडे दुर्लक्ष तर परावलंबित्वाची मानसिकता यामुळे महिला स्वत:ला कमजोर बनवितात. या कोषातून बाहेर पडण्याची गरज असून, त्यासाठी पोल‌िसांना सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले.

भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये ग्रामीण पोलिस दलातर्फे आयोज‌ित ‘पोल‌िस सखी मेळावा’प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, सिनेअभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, डॉ. निवेदिता पवार, नगरसेविका अश्विनी बोरस्ते, रोहिणी दराडे, पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक अतुल झेंडे, सायबरचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कदम आदी उपस्थित होते. स्त्री अद्याप पूर्ण सक्षम नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कायदा सोबत आहे. मात्र, यासाठी महिलांनीही आपला परालांबित्वाचा कोष मोडून काढावा, असे महापौरांनी स्पष्ट केले.

शीतल सांगळे यांनी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. मोबाइल व इतर तंत्रज्ञानामुळे समाजाला गती मिळाली. मात्र, त्याचा परिणाम कौटुंबिक संवादावर झाला. मुले मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यातूनच गंभीरस्वरुपाच्या घटना घडत आहेत. त्यासाठी पालकाचा मुलांशी संवाद असायलाच हवा, असा दृष्टीकोन सांगळे यांनी मांडला. रोहिणी दराडे यांनी पोलिस दलाच्या अभियानाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. महिलांनी मानसिक धैर्य कणखर करण्याची आवश्यकता असून, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेठेकर यांनी केले. तर प्रास्ताविक पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी मांडले.

दामिनी पथकाच्या वाहनांचे अनावरण

जिल्ह्यातील महिलांना संरक्षण पुरवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या दामिनी पथकांच्या वाहनांचे अनावरण करण्यात आले. प्रत्येक वाहनावर एक महिला पोलिस अधिकारी व चार महिला पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या आहेत. महिला अत्याचारसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा यामुळे जलद करणे शक्य होणार आहे. अशा तक्रारींसाठी पीडित महिलांनी महिला हेल्पलाइन व ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images