Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ऊसदर चांगला देऊ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी तीन लाख मेट्र‌िक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व साखर कारखान्यांच्या बरोबर ‘वसाका’चे गाळप सुरू करून जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही ‘वसाका’चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

‘वसाका’चा ३२ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

डॉ. आहेर म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ‘वसाका’च्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन गळीत हंगाम सुरू करण्यात येणार आहे. ‘करो या मरो’च्या गळीत हंगामाला यशस्वी करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक, सभासद व कामगारांनी प्राधिकृत मंडळाला सहकार्य करावे. तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू. कारखान्याने दोन वर्षांपूर्वी अत्यंत अल्पशा काळात ९७ हजार मेट्र‌िक टन ऊस गाळप करून तब्बल १३ कोटी रुपयांच्या राज्य सहकारी व जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड केली. यावेळी कारखान्याला गळीत हंगाम सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. ऊस उत्पादक बांधवांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देण्यात येणार असल्याने वसाकालाच ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असेही आवाहन आमदार डॉ. आहेर यांनी केले. अॅड. एकनाथ पगार, कृष्णाजी आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद महेंद्र हिरे, दादाजी चव्हाण, राजेंद्र भामरे, दत्तू पवार, बाळू जाधव यांच्या हस्ते सपत्नीक कारखान्याच्या बॉयलरचे पूजन करण्यात आले. तर ‘वसाका’चे प्राधिकृत अधिकारी बाळासाहेब बच्छाव, पंढरीनाथ सोनवणे, मोतीराम गुंजाळ यांच्या हस्ते सपत्नीक आसवनी प्रकल्पाच्या बॉयलरचे पूजन करण्यात आले. अहवालवाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांनी केले. अर्थसंकल्पीय वाचन राजेंद्र सावळे यांनी केली. यावेळी वसाकाचे प्राधिकृत अधिकारी केदा आहेर, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, अभिमन पवार, बाळासाहेब बच्छाव, संजय गीते, आर. डब्ल्यू. बकाल, माजी संचालक संतोष मोरे आदींसह ऊस उत्पादक, सभासद, कामगार हजर होते.

…अन् सारेच गहिवरले

कारखान्याला संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देणाऱ्या स्वर्गीय डॉ. दौलतराव आहेर यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘वसाका’लाच ऊस पुरवठा करण्याचे आवाहन करताना आमदार डॉ. राहुल आहेर यांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेकडून महागाईच्या रावणाचे दहन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दसरा व दिवाळी या सणासुदीच्या दिवसांमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील तसेच वापरातील सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये प्रचंड दरवाढ केकरण्यात आली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने महागाईच्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी या पुतळ्याच्या दहा तोंडांचे रुपांतर पेट्रोल, डिझेल, गॅस, साखर, डाळी, तेल, तूप, वीज बिल, जीएसटी, शेतकरी कर्ज, घरपट्टी, पाणीपट्टी मध्ये करण्यात आले होते. पुतळ्यच्या एका हातात पेट्रोलचा पंप, तर पोटात भाववाढ झालेला गॅसचा सिलेंडर लटकवला आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’ विरोधात घोषणा देण्यात आल्या.

पेट्रोल, डिझेल, गॅस, साखर, डाळी, तेल, तूप, वीज बिल, जीएसटी, शेतकरी कर्ज, घरपट्टी, पाणीपट्टीमध्ये सरकारने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड उद्रेक वाढला आहे. दिवसेंदिवस सामान्य जनता या दरवाढीमुळे होरपळून जात आहे. त्यामुळे शिवसेना नाशिक महानगरच्यावतीने दसऱ्याला महागाईच्या रावणाचे दहन केल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या वतीने या दरवाढीच्या विरोधात निषेध आंदोलने देखील करण्यात आले होते. पण, त्यानंतरही कोणतीही दरवाढ रद्द न झाल्यामुळे हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

यावेळी मुंबईतील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या २२ प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, राजू लवटे, नगरसेवक प्रवीण तिदमे, डी. जी. सूर्यवंशी, आर. डी. धोंगडे, संतोष गायकवाड यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रावण दहनाच्या कार्यक्रमानंतर सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा उद्या कृषी मेळावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित गंगापूर रोडवरील नंदनवन लॉन्स येथे राज्यस्तरीय शेतकरी मेळावा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षातील विविध शेतकरी संघटना यांना सोबत घेऊन या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर धोंडगे यांनी दिली. ते राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यभर शेतकरी मेळावे घेण्यात येत असून २ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, कार्यकारी समितीचे सदस्य खेमराज कौर आदी उपस्थित होते. यावेळी धोंडगे पुढे म्हणाले की, शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत क्रांतीदिन ९ ऑगस्टपासून राज्यभर दौरे सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात देखील प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या अभियानाचा समारोप २ ऑक्टोंबर रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशनाने होणार होणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी रस्त्यावर आले. मात्र काही संघटनांच्या अतिघाईमुळे आंदोलन दाबले गेले. यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही खेदाची बाब असल्याचे त्यानी म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयादशमीला कालिकेच्या चरणी नाशिककर लीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी मुंबई नाका परिसरात दिवसभर गर्दी होती.

यात्रेचा अखेरचा आणि महत्वाचा दिवस असल्याने सकाळी ८ वाजेनंतर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनानेही व्यवस्था केली होती. मंदिर परिसरासह मुंबई नाक्याच्या भोवताली पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मंदिरासमोरील रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती.

नवरात्र कालावधीत या मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यात यंदा दसरा शनिवारी आल्याने शनिवार आणि रविवारसह सोमवारी गांधी जयंती अशी तीन दिवसांची सुटी आली आहे. यामुळे शनिवारी दसऱ्याचे औचित्य साधून उत्तर महाराष्ट्रातील भाविकांनी श्री कालिकेचे दर्शन घेतले. वणी गावातील श्री भगवती मंदिर आणि वणी गडावरील यात्रेकरूंनीही परतीच्या प्रवासात नाशिकमधील कालिका मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

यात्रेच्या निमित्ताने लागलेल्या बऱ्याच दुकानांनी सकाळपासूनच आवरासावर केली होती. यात्रेतील मोठे रहाटपाळणे, विविध खेळणी आणि संसारोपयोगी वस्तुंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्सचीही दुपारपर्यंत आवरासावर झाली होती. संध्याकाळी मंदिरात दर्शनासाठी पुन्हा गर्दी झाली होती. वाढत्या गर्दीला आवरताना सुरक्षा कर्मचाऱ्यांचा कस लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात लसीकरणासाठी मौलवींची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मालेगाव

मालेगावात लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळावा यासाठी जनजागृती बरोबरच नगरसेवक तसेच मौलवींची मदत घ्यावी, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

नाशिकसह राज्यातील ९ जिल्हे व १३ महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये ७ ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. बालमृत्यू टाळता यावे हा या मोह‌िमेचा उद्देश आहे. मल्ल‌िक यांनी या मोहिमेचा आढावा घेतला. व्हिड‌िओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी त्यांनी संवाद साधला. मालेगाव शहरात नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करूनही लोक विरोध करतात. या पार्श्वभूमीवर मल्ल‌िक यांनी काही सूचना केल्या. विरोधकांना लसीकरणाचे फायदे तसेच लसीकरण न केल्यास होणारे तोटे समजावून सांगण्यासाठी स्थानिक लोकप्रत‌िन‌िधी तसेच मौलवींची मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मल्लिक यांनी केले. ७ ऑक्टोबरपासून पुढील चार महिने मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे.

१३ शहरांत मोहीम

नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, बीड, नांदेड, सोलापूर, जळगाव, ठाणे, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसेच मालेगाव, जळगाव, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भाइंदर, सोलापूर, नांदेड या १३ महापालिका क्षेत्रामध्ये ही मोहीम घेण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात लसीकरणासंबंध‌िचा बालकांचा सर्वे तातडीने पूर्ण करावा असे आदेशही मल्ल‌िक यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई दुर्घटनेतील मृतांना आज श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी रविवारी (१ ऑक्टोबर) हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. एलफिस्टन रोड रेल्वेस्टेशनवरील फ्लायओव्हरवर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मूलभूत हक्क आंदोलन व नाशिकमधील इतर संस्था संघटनांतर्फे स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा होणार आहे.

मुंबईतील दुर्घटना ही आजवर आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. नाशिक शहरामधील शहर बस वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थांचे हाल होत आहेत. एकीकडे नाशिक शहर स्मार्टसिटी करण्याची वल्गना केली जात आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरामधील बस प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित व धोकादायक होत आहे. या विषयावर या बैठकीत चर्चा करून कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. नाशिक शहरातील नागरी समस्यांवर व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्था संघटनाच्या कार्यकर्त्यानी व सिटी बसेसच्या समस्येमुळे त्रस्त नागरिक व विद्यार्थ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी विमानसेवेचा नाशिकला तोटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शिर्डी येथून रविवार, एक ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू झाल्याने या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाशिकला फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहे. अवघ्या दीड तासाच्या अंतरावर असलेल्या या विमानतळाचा नाशिक-मुंबई प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ९०० हून अधिक पिक-अप व्हॅनचा रोजगार संकटात सापडला आहे.
नाशिक येथील विमानसेवा तूर्त सुरू होणार नसल्याने नाशिककरांसाठी मंबईपेक्षा जवळचे विमानतळ म्हणून शिर्डीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. शिर्डी येथील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने भविष्यात देशभर आणि जगभर पोचण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही. मात्र, या विमानसेवेला प्रवाशांकडून कितपत प्रतिसाद मिळतो हेही महत्त्वाचे आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी शिर्डीतील विमानतळाचे उद्‍घाटन झाले. श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. शिर्डीच्या या विमानतळावरून सुरुवातीला दररोज सुमारे ५०० प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे. शिर्डी-मुंबई हे अंतर विमानाने ३५ मिनिटांत गाठता येणार आहे. मुंबई-शिर्डी ही विमानसेवा अलायन्स एअरलाइनने, शिर्डी-हैदराबाद सेवा जेट एअरवेजने, तर भोपाळ-नागपूर-शिर्डी सेवा इंडिगोने सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे शिर्डीतील विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे. ‘एमएडीसी’ने तब्बल ३०० कोटी रुपये खर्चून हे विमानतळ उभारले आहे.

नाशिकची सेवा सहा महिन्यात
कोल्हापूर, नांदेड आणि नाशिकहून मुंबईसाठीची विमानसेवा येत्या सहा महिन्यात सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गुरुद्वारामुळे देशात प्रसिद्ध असलेल्या नांदेड येथून पुढील महिन्यापासून विमानसेवा सुरू होणार आहे. त्या पाठोपाठ नाशिकची सेवा सुरू होणार आहे.

पर्यटकांचा वाढणार ओघ
शिर्डीला विमानाने येणाऱ्या पर्यटकांचा ओघ नाशिककडे वळण्याची शक्यता आहे. देशभरातून त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिर्डी विमानतळावरून त्यांना या ठिकाणी येणे सोपे व वेळेची बचत करणारे ठरणार आहे.

उद्योजकांना फायदा
देशभरातील उद्योजकांना नाशिकला येण्यासाठी यापूर्वी मुंबई गाठावे लागत होते. मात्र, आता हवाईमार्गे शिर्डीला पोहचून नाशिकला येणे या उद्योजकांना शक्य होणार आहे. तसेच नाशिकच्या उद्योजकांना सुद्धा विमानाने जाण्यासाठी मुंबईच्या तुलनेत शिर्डी हे जवळचे डेस्टिनेशन ठरू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सभेला वाटाण्याच्या अक्षता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्य सरकारने महिलांमध्ये जागृती करण्याच्या‌ हेतूने गावांमध्ये एक ऑक्टोबर रोजी सभा घेण्याचे निर्देश दिले. मात्र, अशा निर्देशाचे केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याचे समोर आले आहे.

निफाडमधील प्रशासनाला याचा गंधही नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या आदेशाबाबत निफाड तालुक्यातील गावांमध्ये महिलांची जनजागृती करण्याबाबत कोणत्या गावात बैठकी झाल्या, किती महिला सहभागी झाल्या, ठराव मंजूर करण्यात आले का, निवडणूक असणाऱ्या गावात सभा झाल्या का, याबाबत निफाड प्रशासनाला विचारणा करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडे अशी माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक‌ बाब समोर आली. सध्या तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. मात्र, तहसीलच्या निवडणूक विभागातर्फे कोणतीही माहिती अद्ययावत व वेळेवर उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक, सदस्य, सरपंच बिनविरोध झाले, याची माहिती मिळत नाही. यामुळे तहसीलच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हंस कल्याण धाममध्ये युवा जागृती शिबिर

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

मानव उत्थान सेवा समितीतर्फे सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत युवा जागृती आध्यात्मिक शिबिर होणार आहे. नाशिक- पुणे रोडवरील शिवाजीनगर येथील श्री हंस कल्याण धाममध्ये हे शिबिर होईल.

देशात सर्वाधिक लोकसंख्या युवा असून, तरुणांमध्ये अद््भुत सामर्थ्य आणि क्षमता आहे. स्वत:मध्ये असणाऱ्या या क्षमतांची जाणीव करून देणे आणि या क्षमतांचा वापर कोठे आणि कसा करावा, याबाबत मॉरिशसमधून आलेल्या साध्वी हरिशाजी मार्गदर्शन करणार आहेत. भक्तिगीतांनी सायंकाळी सहाला शिबिराला सुरुवात होईल. अध्यात्माशी जोडल्या गेलेल्या युवाशक्तीवर सायंकाळी साडेसहाला नाट्य सादर केले जाईल. त्यानंतर अध्यात्माबाबत मनात असलेले प्रश्न उपस्थ‌ित करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. त्यानंतर अध्यात्मावर आधारित सारगर्भित विचार तरुणांना श्रवण करता येतील. रात्री नऊला महाप‍्रसादाने शिबिराची सांगता होईल. तत्पूर्वी सकाळी महात्मा गांधी जयंतीनिमित्त नाशिक-पुणे महामार्गालगत परिमंडळ दोन पोलिस उपायुक्त कार्यालयाजवळील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहरमच्या मिरवणुकीत ऐक्याचे दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

करबला येथील युद्धात हजरत इमाम हुसेन हे यज‌िद यांच्याशी लढतांना शहीद झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इस्लाम धर्माच्या कालगणनेप्रमाणे असलेल्या ‘मुहर्रम’ या पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या ‘यौमे आशुरा’ म्हणजे ‘मोहरम’च्या निमित्ताने नाशिकसह देवळालीमध्ये पारंपरिक व गेल्या सात पिढ्यांपासून जोपासना करण्यात येणाऱ्या ताबूत व सावरींची मिरवणूक काढण्यात आली. शहर परिसरात मुस्लिम बांधवांकडून दूध व सरबताचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याची दर्शन घडून आले.

तत्पूर्वी सकाळी मस्जिदींमध्ये नमाज-ए-अशुरा अदा करण्यात येऊन ‘शहिद-ए-करबला’ च्या लढाईविषयीच्या इमामांनी प्रवचने केली. सकाळी झालेल्या नमाजमध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा पठण करण्यात आले. जुन्या नाशिकच्या आशूरखाना येथे मानाचा ‘हालोका ताजिया’ची मिरवणूक काढण्यात आली. हा ताबूत हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन स्थापन करत असल्याने त्याच्या मिरवणुकीला खांदा देण्याचा मान मुस्लिम बांधवांप्रमाणे हिंदू खांदेकऱ्यांना देखील देण्यात येतो. मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांनीदेखील या मिरवणुकीत सहभागी होत ऐक्याचा संदेश दिला. यावेळी नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी चांदीचे घोडे किंवा पाळणा यांसह इतरही वस्तू वाहण्याची प्रथा असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळाली. याशिवाय इमामशाही येथे यात्राही भरत असल्याने बच्चे कंपनीसह नागरिक येथे दाखल झाले होते.

बारा सवाऱ्यांची मिरवणूक

देवळालीत गेले पाच दिवस स्थापन केलेल्या हैदरखान उस्मानखान तर रईसखान उस्मानखान यांची चांदीची ताजिया, शेख अब्दुल सत्तार यांची गेल्या सात पिढ्यांपासून परंपरा असलेल्या लाकडी ताजिया, नवाज आबिद खान यांसह शहरातील इतर १२ सवाऱ्यांची सायंकाळी मिरवणूक काढण्यात येऊन येथे निश्चित केलेल्या ‘करबला’च्या विहिरीवर विसर्जन करण्यात येऊन दुवा पठण करण्यात आली. फारुख सैय्यद, रमजान सैय्यद, नहीम शेख, जफ्फर खान, इमरान शेख, जावेद खान, सुलतान शेख, शकील शेख आदींसह एसएस सरकार समूहाच्या वतीने मशिदीबाहेर दिवसभर दूध -सरबत वाटप करण्यात आले. दहा दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. महिलांनी घरोघरी धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. ताजियाच्या मिरवणुकीची सांगता संसरी येथील दारणा नदीतटावर तर इतर ११ सवारींच्या मिरवणुकीची सांगता करबलाच्या विहिरींवर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांसाठी पोलिसांकडून नियमावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकाच ठिकाणी ५० पेक्षा जास्त फटाका स्टॉल्सना फटाके विक्री करण्यास परवानगी देऊ नये, यापेक्षा जास्त स्टॉलधारक असल्यास त्यांचा स्वतंत्र गट करून दोन्ही गटांमध्ये ५० मीटरचे अंतर ठेवावे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी राहील, अशी बंधने पोलिसांनी घातली आहेत.

पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी मुंबई पोलिस अधिनियम, १९५१ मधील तरतुदीनुसार अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हे नियम लागू राहतील. त्यानुसार फटाके स्टॉल परिसरात फटाके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या आवाजातील फटाके मोकळ्या मैदानात उडवावे लागतील. प्रत्येक फटाका दुकानात शंभर किलोग्रॅम फटाके आणि ५०० किलोपर्यंत शोभेचे चायनिज क्रॅकर्स यापेक्षा जास्त साठा असू नये. फटाका दुकानात जाण्या-येण्याचा मार्ग विनाअडथळा, योग्य प्रकारे विद्युत वायरिंग केलेला असावा. फटाके हाताळण्यासाठी ग्राहकांना पुरेशी जागा ठेवून अग्निशमन व्यवस्था उभारावी. खराब फटाक्यांची विक्री करू नये, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

या फटाक्यांना बंदीच

२५ ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे आणि ३.८ सेमी पेक्षा जास्त आकाराचे अ‍ॅटमबॉम्ब व अशा प्रकारचे फटाके, फुटफुटी, तडतडी, मल्ट‌िम‌िक्स चिडचिड‌िया आदी नावाने ओळखले जाणारे विषारी फटाके विकता व उडविता येणार नाहीत. शाळा, न्यायालय व शांतता क्षेत्रापासून १०० मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे फटाके उडविता येणार नाहीत. दहा हजारांपेक्षा जास्त फटाक्यांची माळ उडविता येणार नाही, आदी अनेक नियमांचा त्यात समावेश आहे.

तर गुन्हा दाखल होणार

या नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गत वर्षी औरंगाबाद शहरात फटाक्यांच्या दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले होते. शहरातही फटाके विक्रेते आणि पोलिस आमने-सामने उभे ठाकले होते. यंदा, जीएसटीसह इतर काही घटकांचा फटाक्यांच्या किमतीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅनच्या धडकेत दोन प्रवासी जखमी

$
0
0

येवला : शिडीवरून मनमाडकडे चाललेल्या एका प्रवाशीवाहू काळ्या रंगाच्या मारुती व्हॅनने एका अज्ञात वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात व्हॅन चालकासह इतर दोघे जखमी झाले. मनमाड-नगर राज्य महामार्गावर येवला शहरानजीक शासकीय विश्रामगृहासमोर रविवारी (दि. १) सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

मारुती व्हॅन मनमाड येथील असून, तिच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. मारुती व्हॅनचा चालक मद्दशीर शेख तंजुमल (वय २६, रा. मनमाड) याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो गंभीर जखमी आहे. तर याच व्हॅनमधील प्रवाशी भाऊसाहेब निवृत्ती कदम (६७, रा. येसगाव, ता. कोपरगाव) हे डोक्याला मार लागून गंभीर, तर गोपीनाथ कचरू ठोंबरे (६०, रा. अंचलगाव, ता. कोपरगाव) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमकुमार जाधव यांनी प्राथमिक उपचार

केले. दोघा गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपीपेक्षा जास्त दर देणार

$
0
0

‘रासाका’च्या गाळपप्रसंगी अध्यक्ष लथ यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रानवड साखर कारखाना केवळ नफा कमावणे या उद्देशाने चालवायला घेतला नसून, ही ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्यासाठी करण्यात येत असलेली लढाई आहे, असे एमकेपी सेल्स कंपनीचे अध्यक्ष रॉनिटन लथ यांनी सांगितले. तसेच येत्या हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर देऊ असेही आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (रासाका) चे ३८ व्या ऊस गाळप हंगामाचे बॉयलर प्रतिपादन शनिवारी (दि. ३०) विजयादशमीला झाले. त्यावेळी लथ बोलत होते. हा कारखाना २०१२ ते २०१८ दरम्यान छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग, औरंगाबाद यांना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यात आला होता. मात्र या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी एमकेपी सेल्स कंपनीस कारखाना एका हंगामासाठी चालवायला दिला आहे. याप्रसंगी मुख्य अभियंता बाळासाहेब डेर्ले व कर्मचारी भाऊसाहेब जेउघाले यांच्या हस्ते सपत्नीक पूजा झाली.

‘बँकेची स्थिती सुधारेल’

समारंभात शेतकरी अण्णा आरोटे यांनी ऊसाला भाव किती देणार हे जाहीर करा व पेमेंट करताना ते जिल्हा बँकेमार्फत करू नका, अशी मागणी केली. त्यावर बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांनी जिल्हा बँक शेतकऱ्यांची असून, बँकेची परिस्थिती निश्चित सुधारेल, असे सांगितले. कर्जवसुलीसाठी सिक्युटिरायझेशन अॅक्टखाली निसाका व नासाका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला असून, येत्या तीन ते चार दिवसांत निविदा बँकेतर्फे प्रसिद्ध केली जाईल, अशी माहितीही दराडेंनी दिली. समारंभाला इंडियन शुगर कंपनीचे अरुण खडके, दिगंबर बदडे, सुरेश जाधव, भास्कर डेर्ले, पी. आर. जाधव, कार्यकारी संचालक भरत वाबळे, व्यापारी खिमजीभाई, विलास वाघ, लक्ष्मण ढोमसे, आर. आर. वाघ, भय्यासाहेब देशमुख, संपतराव कडलग उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम क्षेत्राला मंदीचा फेरा

$
0
0

हक्काच्या घरासाठी प्रत्येक व्यक्ती आपली आयुष्याची जमापुंजी लावून चांगले घर घेण्याचे स्वप्न बघत असते. त्यासाठी सुरक्षितता व मूलभूत सोयी-सुविधांचा विचार केला जातो. पण, नाशिक शहरात गेल्या तीन वर्षांपासून कपाट, कम्प्लिशन आदींमुळे बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट कायम असतानाच नोटाबंदी, रेरा आणि जीएसटी असे एकामागाेमाग एक धक्के बांधकाम व्यावसायिकांना बसले. त्यामुळे मंदीचे सावट गडद झाले आहे. जीएसटीचा व्यवसायावर परिणाम झालेला नाही, असे अनेक व्यासायिक सांगतात. मात्र, नवीन कायदा अन् कर प्रणालीमुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांत संभ्रम असल्याने बांधकाम क्षेत्रावरील मंदीचा फेरा कायम आहे. थोड्या काळाने परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा आशावादही व्यक्त होत आहे.


खरेदीदारावर थेट भार

जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादित वस्तू आणि सेवांवरील केंद्रीय अबकारी कर, सेवा कर आणि राज्यांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) तसेच अन्य अप्रत्यक्ष करांऐवजी एकच कर भरावा लागत आहे. जमिनीची तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या वस्तूची विक्री मात्र वस्तू पुरवठा किंवा सेवा पुरवठा म्हणून गणली जाणार नसल्याने त्यावर जीएसटी लागणार नाही.

बांधकाम सुरू असलेल्या वास्तूची विक्री मात्र सेवा पुरवठा म्हणून गणली जाणार असल्याने त्यावर जीएसटी भरावा लागणार आहे. सध्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत फ्लॅट खरेदी करताना सेवाकर भरावा लागतो. पूर्वी घर घेताना विकसकाकडून सेवाकर, व्हॅट व मुद्रांक शुल्क अशा करांची आकारणी करण्यात येत असे. हे तीनही कर एकत्रित करून ग्राहकाला एकूण रकमेच्या ९ ते १० टक्के इतका कर भरावा लागत होता. मात्र, जीएसटीनंतर हे सर्व कर बाद होऊन मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त एकच करप्रणाली अाली आहे. जीएसटीअंतर्गत स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी १२ टक्के कर आहे. जीएसटीनंतर राज्यांकडून लावले जाणारे मुद्रांक शुल्क ५ ते ७ टक्के आहे, ज्याचा थेट भार घर खरेदी करणाऱ्या ग्राहकावर पडत असून, कुठलाही व्यवहार करताना प्रत्येकावर कर द्यावा लागणार असल्याने स्थावर मालमत्तांच्या किमतीही वाढल्या असल्याची चर्चा बाजारात ऐकायला मिळत आहे.

--

कागदोपत्री व्यवहारांअभावी अडचण

कोणतेही नवीन धोरण किंवा नवीन कायदे अंमलात आणल्यानंतर काहीशा अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने बदल स्वीकारण्यासाठी थोडा वेळ नक्की लागेल, हे खरे आहे. पण, ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कागदोपत्री व्यवहार केलेले नसतील त्यांना मात्र आज अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. १ जुलैपासून महाराष्ट्रासह देशभरात वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी लागू करण्यात आला असून, त्यातील तरतुदींनुसार बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर खरेदी केल्यास, तसेच जमीन आणि वस्तू व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर दिल्यास जीएसटी भरावा लागणार आहे. जमीन, तसेच वस्तूची विक्री करताना मात्र जीएसटी भरावा लागणार नाही.

--

रेती, विटा, सिमेंटला लाभ

बांधकाम साहित्याचा बहुतेक भाग १८ टक्के आणि २८ जीएसटी स्लॅबच्या खाली आहे. पण, असे असताना मात्र बांधकाम करताना अत्यावश्यक असलेल्या वाळू, विटा यांना साधारणपणे ५ टक्के जीएसटी कर लागतो, पूर्वी तो ६ टक्क्यांच्या आसपास लागत होता. त्यामुळे त्यांचा दरांमध्ये थोडा फरक पडला आहे. पण, एकंदरीत नव्या कर प्रणालीत फक्त रेती, विटा आणि सिमेंट यांच्या किमतीत घट झालेली दिसून येते. मात्र, इतर बांधकाम साहित्याचे कर मात्र वाढलेले आहे. याशिवाय सिमेंटला पूर्वी सर्व कर मिळून एकत्रित ३० टक्के कर आकारणी केली जात असे. पण, जीएसटीनंतर २८ टक्के कर आकारणी केली जाते, म्हणजेच २ टक्के घट झाली आहे.

--

फिनिशिंगच्या कामांना फटका

बांधकाम झाल्यानंतर फिनिशिंगसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पेंट आणि वॉर्निश, पुट्टी व वॉल फिटिंग्ज, प्लास्टर यांच्यावर पूर्वी २६ टक्के कर आकारणी केली जात असे. पण, जीएसटीनंतर त्यांमध्ये वाढ होऊन २८ टक्के कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे पेटिंग मटेरियलच्या किमतीतदेखील २ टक्के वाढ झाली. वॉलपेपरसाठी पूर्वी १८.५ टक्के कर लागत असे. त्यामध्ये वाढ होऊन तब्बल २८ टक्के जीएसटी लागत आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत जवळपास १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालेली दिसून येते .

--

टाइल्स, स्टीलची दरवाढ

सिरॅमिक टाइल्स, ग्रॅनाइट, मार्बल या वस्तूंवर पूर्वी १३.५ व्हॅट आणि इतर कर मिळून १८ ते २२ टक्के कर आकारणी केली जात असे. जीएसटीनंतर त्यामध्ये वाढ होऊन २८ टक्के कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे ५ ते ६ टक्के अधिक वाढ झाली आहे. स्टीलच्या विक्रीवर पूर्वी व्हॅट, एक्साइज मिळून १७.५ टक्के कर आकारणी केली जात असे. त्यामध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाली असून, १८ टक्के जीएसटी आकारणी केली जात आहे.

--

अडचणी मर्यादित काळासाठी...

‘जीएसटी’मुळे अनेक छोटे-मोठे कर बंद होऊन एकच लागू केल्याने व्यावसायिकांसाठी चांगले आहे. नवीन प्रणाली असल्यामुळे समजण्यासाठी सुरुवातील अवघड जाईल. पण, त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल. ‘जीएसटी’ची माहिती देण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून सहकार्यदेखील सुरू आहे. शिवाय आकारणी केल्या जाणाऱ्या किमतीचे रिबेटदेखील त्यांना प्राप्त होणार आहे. पण, ज्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय पारदर्शक नसतील त्यांच्या अडचणी मात्र वाढल्या असल्याचे जाणकार सांगतात.

--

‘जीएसटी’च्या नावाखाली फसवणूक

जीएसटी कर प्रणालीमुळे वस्तूंच्या किमती काही प्रमाणात वाढल्या किंवा घटल्या आहेत. पण, बांधकाम साहित्य घेणाऱ्या सर्वसामान्यांची मात्र ‘जीएसटी’च्या नावाखाली फसवूक केली जात आहे. वस्तूंच्या किमती कर आकारणी करून लावलेल्या असल्या, तरी ग्राहकांनी पक्के बिल घेऊन नये म्हणून वस्तूंच्या किमती फुगवून सांगितल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकदेखील जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून पक्के बिल घेणे टाळतात. बांधकाम साहित्याची ‘एमआरपी’ नसते, त्यामुळे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळे दर आकारले जाऊन फसवणूक केली जाते. अशा व्यावसायिकांवर कारवाई होण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. दरम्यान, नवरात्री आणि दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या जाहिराती केल्या जात असल्या, तरी यावर्षी अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ‘जीएसटी’वर ५० टक्के सवलतीच्या जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

--

जमिनींच्या दरात घसरण

जमिनींचे खरेदी-विक्रीचे दर विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेवर अवलंबून असतात हे मान्य असले, प्लॉट आणि जागांचे दर चार ते पाच वर्षांपूर्वी गगनाला भिडायला सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर मात्र मंदीची सुरुवात झाली. नोटाबंदीनंतर जमिनींचे दर २० ते २५ टक्के कोसळले आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी विकत घेतलेल्या किमतीपेक्षा जमिनींची किंमत बरीच कमी झाल्याची चर्चा बाजारात ऐकायला मिळत आहे.

---

नाशिक शहरात तीन वर्षांपासून महापालिकेच्या धोरणांमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत होताच. पण, जीएसटीचा मात्र व्यवसायावर फारसा परिणाम दिसत नाही. नवीन करप्रणाली सर्वांसाठी चांगली आहे. या कर प्रणालीसंदर्भात पुरेशी जनजागृती करणे गरजेचे आहे.

-मनीष राठोड, मार्बल व्यावसायिक

--

सध्या बाजारात मंदीचे सावट कायम असले, तरी कोणतीही नवीन प्रणाली आल्यानंतर अडचणी येतच असतात. जीएसटीचा व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नसून, सध्या थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होतील.

-कैलास धूत, स्टील व्यावसायिक

--

जीएसटीमुळे बाजारात मंदी नसून, रेरा, नोटाबंदी आदींमुळे बाजारात मंदीचे सावट आहे. जीएसटीमुळे अनेक वस्तूंच्या किमती थोड्या अधिक प्रमाणात वाढल्या आणि घटल्या आहेत. त्यामुळे इतर छोट्या करांच्या आकारणीपेक्षा जीएसटी कर आकारणी चांगली आहे.

-तुषार शेवाळे, प्लंबिंग मटेरियल सप्लायर

--

(संकलन ः अभिजित राऊत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोनशे डेंटिस्ट नियुक्तीच्या प्रतीक्षेत

$
0
0

एमपीएससीची संथ प्रक्रिया; १८९ उमेदवारांची घालमेल

नाशिक : दंत शल्यचिकित्सक या पदासाठी एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेचा निकाल जाहीर होऊन ११ महिने उलटले आहेत. मात्र आयोगाच्या संथ प्रकियेमुळे या परीक्षेत यश मिळविणाऱ्या राज्यभरातील सुमारे १८९ उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करूनही उमेदवारांच्या पदरी निराशाच पडली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दंत शल्यचिकित्सक या पदासाठी सरळ सेवा भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालानंतर आयोगातर्फे पात्र उमेदवारांची यादी आरोग्य विभागाकडे कार्यवाहीसाठी तसेच, उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यासाठी देण्यात आली होती. मात्र ११ महिन्यांच्या कालावधी उलटूनही या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्याचे मुख्यमंत्र्यांनीही आदेशही दिले होते. मात्र पुढील प्रक्रिया ढिम्म असल्याचीच अनुभव उमेदवारांना येत आहे. अनेक मंत्र्यांनी आरोग्य विभाग व प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करूनही या अधिकाऱ्यांना या विषयात रस दाखवलेला नाही. आरोग्य विभागात कार्यरत अस्थायी दंत शल्यचिकित्सक आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत दंत शल्यचिकित्सक यांना शासन सेवेत हवे असलेले कायमस्वरूपी समावेशनाचे कारणा व या विभागाशी त्यांचे असलेले साटेलोटे यामुळे या पात्र उमदेवारांच्या नियुक्त्यांना उशीर होत असल्याचाही आरोप या प्रक्रियेतील काही उमेदवारांकडून होत आहे.

गांभीर्याचा अभाव

राज्यात आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवर बोट ठेवले जाते. शिवाय डॉक्टरांच्या रिक्त पदांची समस्या गंभीर आहे. शासनात कार्यरत डॉक्टरांचे शासनाची नोकरी सोडून जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. या स्थितीत नवे उमेदवार नियुक्तीसाठी उत्सुक असूनही त्याबाबत गांभीर्य दाखविले जात नाही. मौखिक आजारांची समस्या गंभीर असतानाही राज्यात आरोग्य विभागाच्या ५१२ मंजूर पदांपैकी केवळ ४१ स्थायी दंत शल्यचिकित्क कार्यरत आहेत. आयोग आणि शासनाने या प्रलंबित भरती प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्याची अफरातफर करणारे भामटे गजाआड

$
0
0

सिन्नर फाटा : ऑनलाईन शॉपिंग साईटवर बनावट ग्राहकांची नोंदणी करून त्यांच्या नावे आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची अफरातफर करून कंपनीचा फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

प्रवीण शिवाजी घोलप (वय २०, रा. चेहेडी) व गणेश भिमा तळपाडे (वय २३, रा. सिंहस्थ नगर, सिडको) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्याकडून ६ लाख २५ हजार ५५० रुपये किमतीचे १० कॅमेरे, ३ लॅपटॉप व एक प्ले स्टेशन असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात अटक केलेले दोघेजण जयभवानी रोडवरील एन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग केलेल्या वस्तुंची डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीस होते. या दोघांनी फ्लिपकार्ट व मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग साइटवर बनावट ग्राहकांची नावे, पत्ते व इमेल आयडी पाठवून कॅमेरे, लॅपटॉप, प्ले स्टेशनची खरेदी करत होते. त्या ताब्यात मिळाल्यावर त्यातील वस्तू हे दोघेजण स्व:तच्या फायद्यासाठी काढून घेत व त्याजागी त्याच वजनाच्या दुसऱ्या काहीतरी भरून सदरच्या वस्तू ग्राहकांनी परत केल्याचे कारण दाखवून दुकानात परत करीत होते. ही बाब कंपनी मॅनेजरच्या लक्षात आल्याने दोघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, नारायण न्याहळदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस उपनिरीक्षक भिमराज गायकवाड यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिंग सिटीला चालना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे (एमटीडीसी) पर्यटकांमध्ये सायकल संस्कृती रुजविण्यासाठी नाशिकमध्ये रेल्वे स्टेशन व बस स्टॅण्डवर सायकल स्टॅण्ड उभारले जाईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत केली आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनमंत्री रावल यांनी याबाबत राज्यातील सहा ते सात ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार असून, त्यात पहिला प्रयोग नाशिकला करण्यात येणार आहे. पर्यटकांना शहरात व इतरत्र सर्व स्थळे सायकलिंग करून बघता यावीत, यासाठी ही संकल्पना पुढे आल्यानंतर त्यात नाशिकची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये सायकलद्वारे पर्यटन ब्रँडिंगसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण, तो का पंक्चर झाला हे पुढे आले नाही. आता मात्र पर्यटनमंत्री रावल यांनी यावर पुन्हा जोर दिला असून, सायकलिंगद्वारे पर्यटन ही संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत रोड, हायब्रिड, माउंटेनिंग, टुरिंग यासाठी सायकलिंग करण्याचे प्रकार लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे आता नाशिकमध्येही असे सायकलिंग सुरू झाल्यास ते कोणत्या प्रकारचे असेल याबाबतही उत्सुकता राहणार आहे. परदेशात सायकलवरून पर्यटन लोकप्रिय असून, ते महाराष्ट्रात सुरू केल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा उपक्रम पर्यटकांना आवडला, तर भविष्यात काही मार्गांवर सायकल ट्रॅकही होऊ शकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

...

सायकलद्वारे ब्रँडिंग

पर्यटनाचे ब्रँडिंग आणि पर्यावरणाचे हित या दोन्ही गोष्टी साधून सायकल भाडेतत्त्वाने देण्याची संकल्पना पुढे आली आहे. विशिष्ट स्वरूपाची आणि एमटीडीसीचा लोगो असलेली सायकल पर्यटनस्थळी उपलब्ध करून देण्याचीही चर्चा सुरू आहे. एका स्टॅण्डवरून घेतलेली सायकल दुसऱ्या स्टॅण्डवर जमा करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथाबंदीची काटेकोर अंमलबजावणीच नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगगड देवी ट्रस्ट आणि प्रशासनाने घेतलेल्या बोकडबळी प्रथाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली नसल्याबाबत खंत व्यक्त केली आहे. अशा निर्णयाच्या पाठीशी उभे राहताना प्रशासनाने प्रबोधनावरही भर द्यावा. याशिवाय राज्यभरात इतरत्रही यात्रांच्या आयोजनामध्ये या निर्णयाचा आदर्श घेतला जावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.

यंदा नवरात्रात सप्तशृंग गडावर बोकडबळीची प्रथा प्रशासन आणि ट्रस्टने निर्णय घेत बंद केली. देवाच्या नावाखाली उघड्यावर पशुहत्येस प्रतिबंध करण्याचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रशासनास २३ जुलै १९९८ रोजीच दिलेला आहे. या आदेशावर सरकार पक्षाच्या वतीने देवाच्या नावाखाली पशू-पक्ष्यांचे बळी बंद करण्याबाबत योग्य ती सर्व पावले उचलून मूक प्राण्यांच्या कत्तली रोखण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, उशिराने का होईना, प्रशासनाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांच्या रूपाने यंदा असा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या वेळी मात्र निर्दिष्ट ठिकाणावर पशुहत्याबंदी दिसली असली तरीही परिसरात या प्रथेवर चाप लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला बळ देण्यासाठी जनप्रबोधनासह कायद्याचेही प्रबोधन करायला हवे, अशी अपेक्षा अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.

विकासकामांवर भर द्यावा

सप्तशृंगगडाचा भौगोलिक परिसर हा निसर्गाने समृद्ध आहे. यात्रेतील पशुबळींच्या निमित्ताने येथे लाखो रुपयांच्या अर्थकारणास चालना मिळते. जनप्रबोधनाच्या माध्यमातून पशुहत्याबंदीविषयक मुद्द्याला प्रोत्साहन देऊन त्यापोटी वाया जाणारे लाखो रुपये गड विकासाच्या कामासाठी उपयोगात आणले जातील, अशी संकल्पनाही समितीच्या वतीने डॉ. गोराणे यांनी मांडली आहे. येथील दुर्मिळ व औषधी वनस्पतींच्या संगोपन, संवर्धनासाठी केंद्र उभारणी, या आदिवासी पट्ट्यातील महिला व बालकांचे आरोग्य सांभाळणे, गर्भवती महिला व मुलींसाठी सकस आहाराचा पुरवठा आदी सामाजिक आयामांवर या प्रथांपोटी होणारा खर्च वळविता येऊ शकतो, असा मुद्दाही अंनिसने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मांडला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानदाराची पोलिसाला दमदाटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भद्रकालीतील तिवंधा चौकात वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहने हटवण्यासंबंधी आदेश देणाऱ्या भद्रकाली पोलिस स्टेशनच्या सहाय्यक उपनिरीक्षकास बुधा हलवाई दुकान चालकांनी दमबाजी करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबकगिरी डी. गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. ३०) दसरा असल्याने सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिवंधा चौकात मिठाई खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पार्क झालेली वाहने हटवण्यासाठी भद्रकाली पोलिस त्याठिकाणी पोहचले. यावेळी गोसावी यांनी वाहने हटवण्यासंदर्भांत सूचना केली असता दिलीप बुधा वाघ (४८), ललीत चंद्रकांत वाघ (२८), वसंत बुधा वाघ (५३) आणि दिलीप बापू राठोड (२७, सर्व रा. तिवंधा चौक) यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. संशयितांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे गोसावी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल अधिक तपास करीत आहेत.

काच फोडून चोरी

कारची काच फोडून चोरट्याने कारमधील मोबाइल चोरी केला. ही घटना मुंबई नाका परिसरात घडली. याप्रकरणी रामचंद्र बी. पाटील (५१) यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कारची (एमएच १५ ईपी ०१२०) काच फोडून १० हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. ही घटना चांडक सर्कलकडून मुंबई नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आवारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा विनयभंग

$
0
0


नाशिकरोड : परिसरातील आगर टाकळी येथील महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताविरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली. रोशन सुनील पगारे (२५, रा. आगार टाकळी) असे या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २९) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पगारेने घराबाहेर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या बहिणीस धक्काबुक्की केली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या पीडित महिलेच्या बहिणीलाही पगारेने शिवीगाळ करून धमक्या दिल्या. याप्रकरणी पीडित महिलेने संशयिताविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली असून, उपनिरीक्षक पी. बी. बाकले हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images