Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रीयीकृत बँकांत ज्येष्ठांची परवड

$
0
0

स्वतंत्र कक्ष देण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

देशातल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यातच पेन्शन व सरकारी कारणांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असणे अनिवार्य आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जाताना ज्येष्ठांची होणारी परवड कोण रोखणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. निवृत्त झालेल्या ज्येष्ठांनी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष देण्यात यावा, अशीही मागणी केली आहे. अनेकदा वयोवृद्ध झालेल्यांना बँकेत येताना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातच आजाराने पीडित असलेल्यांना सर्वाधिक त्रास राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये येताना होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. गेल्याच महिन्यात पेन्शनधारकांचा मोर्चा भविष्य निर्वाह निधी कार्यालय आयटीआय पुलाच्या बाजूला पार पडला. यावेळी शेकडोंच्या संख्येने सेवानिवृत्तांची एकच गर्दी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडीही झाली होती. यानंतर सेवानिवृत्त झालेल्या शिष्टमंडळाने पीएफ आयुक्तांकडे पेन्शनबाबत व बँकांमध्ये होणाऱ्या त्रासाची व्यथा मांडली होती. परंतु, आजही ज्येष्ठांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जातांना परवड होत असल्याचे समोर आले आहे.

शहरातील राजीव गांधी भवनाच्या परिसरात अनेक बँका असून त्याठिकाणी अनेकवेळा ज्येष्ठांना बँकेत जाण्यासाठी तसेच उतरण्यासाठी एकमेकांचा सहारा घ्यावा लागतो. ते बँकेत गेल्यावर पैसे काढण्याची स्लिप भरून रांगेत उभे राहतात. परंतु, दोन काऊंटरपैकी केवळ एकच काऊंटर सुरू असल्यास एकाच लाइनीत उभे राहण्याची वेळही ज्येष्ठांवर येत आहे. याबाबत राष्ट्रीयीकृत बँकांनाही योग्य समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. काही ठिकाणी तर कर्मचारी नसल्याचेही निदर्शनास आल्याचे ज्येष्ठांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारशी असहकाराचा ठराव

$
0
0

किसान मंचच्या आंदोलनात नऊ ठराव संमत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजुराची व शेतीपूरक व्यावसायिकांना कोणत्याही अटी, शर्ती व निकष न लावता सन २०१७ पर्यंत संपूर्ण कर्जातून मुक्त करावे. कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत शेतीवरचे कर्ज, वीज बिल, पाणीपट्टी, शेतसारा आम्ही देणार नाहीत. तसेच, सरकारच्या वतीने होणाऱ्या कामकाज व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार किसान मंचच्या अधिवेशनात करण्यात आला. शेती व शेतकऱ्यांशी निगडीत विविध प्रकारचे नऊ ठराव किसान मंचच्या राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान मंचतर्फे शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानचा समारोप तथा राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत झाला. मंचाचे समन्वयक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, पकंज भुजबळ, जयवंत जाधव हे सर्व आमदार, किशोर माथनकर, दत्ता पवार, खेमराज कोर, श्रीराम शेटे, रामचंद्र बापू पाटील, रंजन ठाकरे, प्रेरमा बलकवडे, विष्णुपंत म्हैसधुणे, मंचचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनात उद्घाटन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शेतकरीहिताचे नऊ ठराव मांडले. यानंतर या ठरावावर अधिवेशनात चर्चा झाली. खेमराज कोर यांनी अभियानामागील भूमिका मांडली.

राज्यातील तीस जिह्यांतून सलग ५५ दिवस शेतकरी, शेतमजूर व शेतकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधत अडचणीतील बळीराजाला धीर दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी अधिवेश होत असून, लबाडांचे सरकार असल्याचा आरोप शंकर अण्णा धोंडगे यांनी केला. सर्व ठरावांचे वाचन निमंत्रक शंकरराव धोंडगे यांनी केले, तर ठरावांना उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून अनुमोदन दिले. अधिवेशनासाठी सोपान पाटील (जळगाव), गोविंद बेंडाळकर (जालना), मनोज तायडे (अकोला), सुरेश रानगुंडे (चंद्रपूर), प्रभावती दिवटे, शंकरराव बोरसे (सातारा), राजू राऊत (नागपूर), शिवाजी पाटील (औरंगाबाद), एकनाथ शिंदे (सटाणा), शेषराव कटाळे, जंयत घोंगे, दिनकर कोंबे, बापू जग्वार, नानाजी सराडकर (सर्व यवतमाळ) या जिल्हा प्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिवेशनातील ठराव

शेतकरी, शेतमजूर व पूर्व शेतीपूरक व्यावसायिकांची कोणत्याही अटी, शर्ती व निकष न लावता सन २०१७ पर्यंतच्या संपूर्ण कर्जातून मुक्तता करावी.
राज्य व केंद्राच्या शेतमाल भाव समितीला कायदेशीर अधिकार देऊन सर्व शेतमालाला कायद्याने उत्पादन खर्चानुसार योग्य भावाची हमी द्यावी.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसाय व शेतीपूरक उद्योग धंदे करण्यासाठी तारण जमिनीच्या मूल्यांकनाच्या ७० टक्के इतके कर्जपुरविण्याचे धोरण असावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न किमान तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या इतके सुरक्षित केले जावे. पेरणी ते काढणीपर्यंतची शेतीकामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी. तरुणांना काम मिळेपर्यंत किमान जीवनावश्यक गरजा भागविता येतील, इतके मानधन द्यावे. शेतकरी व शेती व्यवसायासाठी नक्की किती तरतूद केली आहे हे स्पष्ट होण्यासाठी जिल्हा परिषदेपासून राज्य सरकारकडून केवळ शेतीसाठीचा स्वतंत्र असा अर्थसंकल्प मांडण्यात यावा.
शेतकऱ्यांचे संपूर्ण प्रश्न सुटेपर्यंत सरकारसोबत असहकार आंदोलन केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारत यात्रे’चे मालेगावात स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी ‘सुरक्षित बालपण सुरक्षित भारत’ या उद्दिष्ठासाठी कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत यात्रेचे रविवारी मालेगावात आगमन झाले. सत्यार्थी यांच्यासह १२० स्वयंसेवक या यात्रेत सहभागी झाले आहेत.

सोनज येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या लेझीम पथकासह जी. ओ. फोरम, नाशिक, सेवाम–संस्था मालेगाव, हिंद सम्राट ज्युडो कराटे आणि सामाजिक संस्था मालेगाव यांच्यातर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

कैलास सत्यार्थी यांचे चिरंजीव भुवन सत्यार्थी म्हणाले, सध्या भारतात दर एक तासाला सहा बालके बेपत्ता होत आहेत. महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत ५० हजार बालके बेपत्ता झाली आहेत. त्यांचा तपास लागत नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आणि शासन प्रयत्न करीत आहे. परंतु हे प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे भारत यात्रेचे आयोजन करून देशात जाणीव जागृती करणे एवढाच प्रयत्न नसून, ही एक चळवळ व्हावी हा यात्रे मागील हेतू आहे. बालकांची सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्यक्रम दिला पाहिजे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवाम संस्थेचे समाधान घोंगडे, आनंदा बच्छाव, प्रदीप बच्छाव, हेमंत बच्छाव यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुमत मिळाले, पण सत्ता गमावली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलला बहुमत मिळाले. मात्र सरपंचपद प्राप्त करण्यात अपयश आले. केवळ सात जागांवर कसाबसा विजय मिळविलेल्या ग्रामविकास पॅनलने सरपंचपद राखतांनाच ग्रामपंचायतीची सत्ताही राखली. शिवसेना बंडखोराच्या हाती सरपंचपद, तर भाजप पुरस्कृत पॅनलच्या हाती बहुमत सोपविलेल्या एकलहरेतील मतदारांनी दोन्हीही पॅनलला चांगलाच धडा शिकविला आहे.

एकलहरे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांचीच सत्ता होती. मात्र, यंदा एकलहरे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने धनवटे यांना सरपंचपदावर पाणी सोडावे लागले. परंतु, त्यांनी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीत आपले नशीब आजमावले. एकलहरेतील मतदारांनी त्यांना बहुमतापासून रोखले. दुसरीकडे धनवटेंचेच पट्टशिष्य राहिलेले व नंतर भाजपवासी झालेले नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला दहा जागा देत बहुमत दिले असले तरी चाणाक्ष मतदारांनी सरपंचपद मात्र परिवर्तनच्या हाती सोपविले नाही. मतदारांच्या या भूमिकेमुळे आता ग्रामविकास व परिवर्तन या दोन्हीही पॅनलची गोची झाली आहे.

दलित कार्ड चालले

ग्रामविकास पॅनलला दोन जागांचा अपवाद वगळता इतर जागा केवळ दलित व्होट बँकेमुळेच मिळाल्या आहेत. प्रभाग क्र १ व २ मधील पाचही जागा ग्रामविकास पॅनलला मिळाल्या. यातील तब्बल चार जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. प्रभाग क्र.४ मध्ये मिळालेली एक जागाही अनुसूचित जाती प्रवर्गाचीच आहे. प्रभाग क्र.२ व ६ मध्ये मिळालेली प्रत्येकी एक जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील आहे. याशिवाय सरपंचपदी निवडून आलेल्या मोहिनी जाधव यादेखील अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. त्यांचे पती सागर जाधव यांच्यामुळे दलित व्होट बँक शंकर धनवटे यांच्या पॅनलच्या मदतीला धावून आली. २० कोटी रुपयांची स्मार्ट दलित वस्ती योजना सरपंच राजाराम धनवटे यांनी मंजूर करून आणण्यात यश मिळविले होते.

भाजपला पसंती

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शंकर धनवटे यांनी बंडखोरी केल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी व सर्वसाधारण मतदारांनी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलला साथ दिली. त्यामुळे परिवर्तनला थेट बहुमताला गवसणी घालता येणे शक्य झाले. मात्र, दलित मतदारांची संख्या जास्त असलेल्या प्रभागातील मतदारांनी ग्रामविकासला साथ दिल्याने सरपंचपद परिवर्तनच्या हातून निसटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूरला पळवल्या ‘शिवशाही’ बस

$
0
0

एक दिवसाच्या सेवेनंतर एसटीचा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी महामंडळाच्या नाशिक डेपोमध्ये दाखल झालेल्या चार शिवशाही बस तातडीने नागपूर डेपोकडे देण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकच्या वाटेला आलेल्या चार बस पहिल्याच दिवसाच्या सेवेनंतर नागपूरला रवाना होणार आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर यापूर्वी शिवनेरी, हिरकणी व साध्या बसेस धावत होत्या. त्यातील ११ हिरकणींपैकी चार बसेस कमी करून त्याऐवजी शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला. नाशिक डेपोकडे चार नव्या बस रविवारीच दाखल झाल्या. या चार बसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक अशी सेवा देण्यात आली. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता, दुपारी १२.१५, दुपारी १.१५ आणि दुपारी २.१५ वाजता या बस नाशिकहून पुण्याकडे निघाला. या चारही बसेसला भरघोस प्रतिसाद लाभला. शिवशाही बसच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बसच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे. शिवनेरी बसचे भाडे नाशिक-पुणेसाठी ६०५ रुपये आहे, तर सेमी लक्झरीचे भाडे ३१६ रुपये आहे. त्यामुळे ही बस परवडणारी असल्याचे प्रवाशांचे मत आहे. नाशिक डेपोकडील चार आणि पुणे डेपोकडील चार अशा एकूण आठ शिवशाही बसेसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा देण्यात आली. नाशिकमध्ये टप्प्याटप्प्याने २० बसेस मिळणार असून, त्यात स्ल‌िपर कोचसुद्धा असणार आहे. मात्र, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी महामंडळाचा अजब फतवा आला आहे. नाशिक आणि पुणे डेपोकडील नव्याने दाखल झालेल्या प्रत्येकी चार बसेस तातडीने नागपूरला देण्यात याव्यात, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे अवघ्या एक दिवसाच्या सेवेनंतर या बसेस नागपूरला रवाना होणार आहेत. परिणामी, शिवशाही बसच्या सेवेपासून नाशिककर वंचित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंडक्टर असलेल्या शिवशाही बसेस नाशिक डेपोला मिळाल्या होत्या. मात्र, त्या नागपूरला पाठविण्यात येणार आहेत. विनाकंडक्टर असलेल्या शिवशाही बसेस नाशिकला मिळतील. नव्या बस आल्या की या बसेस नागपूरला पाठविल्या जातील.

- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा सरकारला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात आणि देशात शेतकऱ्यांवर मोठमोठी संकटे आली असताना हे भाजप सरकार फक्त ग्राहकांच्या हिताचा विचार करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर हे सरकार गंभीर नसून, आता या सरकारला शेतकऱ्यांची सामूहिक ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना महिनाभरात सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

आज बळीराजा गप्प आहे; पण उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरले तर कुणाच्या बापाला घाबरणार नाही, असा इशारा देत सध्याची कर्जमाफी ही लबाडाघरचे जेवण असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी किसान मंचच्या वतीने नाशिक येथील नंदनवन लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा करूनही अडीच वर्ष शेतकऱ्यांना झुलवत ठेवल्याची टीकाही पवार यांनी या वेळी केली.

शरद पवार उवाच...

- महागाईने देशात उच्चांक गाठला

- जगात इंधनाचे दर घसरले; भारतात मात्र वाढत आहेत

- नोटबंदीने देशाची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त

- दहा हजारांची आर्थिक मदत म्हणजे फसवेगिरी

- शेतकरी उद््ध्वस्त झाला तर देश उद््ध्वस्त होईल

- शेतमालाच्या किमतींबरोबर खेळणं देशाला परवडणार नाही

- शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका!

- शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवणार

- शेतीसंबंधित सर्व कर्जे त्वरित माफ करा

- ५ नोव्हेंबरला आंदोलनाची दिशा ठरणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर गजबजले

$
0
0


म. टा. वृत्तसेवा,त्र्यंबकेश्वर

सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गर्दी उसळली आहे. उत्तर दरवाजाने प्रवश देण्यात येत असला तरी भाविकांची रांग थेट ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचत आहे. भर उन्हात भाविक रस्त्यावर उभे असल्यामुळे त्यांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे.

रविवारी शिर्डी येथे दुपारपर्यंत दर्शन बंद असल्याने भाविकांचा लोंढा त्र्यंबकेश्वरी वळला अशी येथे चर्चा होती. गर्दी उसळली म्हणून देवस्थान ट्रस्टने सशुल्क दर्शन बंद ठेवले होते. मात्र दोनशे रुपये देणगी दर्शन हा फलक पाहून बाहेरच्या भाविकांनी वाद घालल्याचे आढळून आले.

गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. शनिवारी, रविवार आणि त्यानंतर गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी आल्यामुळे राज्यासह परराज्यातील भाविक पर्यटनाकडे वळाले आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वर एकाच दिवसात दर्शन करून होत असल्यामुळे येथे भाविकांचा नेहमीच राबता असतो. गेल्या दोन दिवसांपासून गर्दी वाढली आहे. मात्र त्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करत भावि‌कांना बराच वेळी रांगत थांबावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी एक्सप्रेस होणार आदर्श

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोमवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून पंचवटी एक्सप्रेसला आदर्श ट्रेन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर रेल परिषद, रोटरी क्लब वेस्ट, पतंजली- भारत स्वाभिमान न्यास, आदर्श विद्या मंदिर, आशा फाउंडेशन व विद्यार्थ्यांनी रेल्वेस्टेशन परिसराची स्वच्छता केली.

खासदार हेमंत गोडसे, आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, उपाध्यक्ष व्ही. जे. आर्य, कैलास कमोद, दिग्विजय कपाडीया, रोटरीचे गुरुमितसिंग रावल, दीपक शर्मा, स्थानकप्रमुख एम. बी. सक्सेना यांच्याहस्ते पंचवटीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

देशातील आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार म्हणाले की, हिवरे बाजाराला ११२ देशांच्या प्रतिनिधींनी भेट दिली आहे. स्वच्छता व शिस्तीबाबत प्रशासनाला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. हेमंत गोडसे म्हणाले की, पंचवटी एक्सप्रेसला आदर्श करण्यासाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील. रेल परिषदेच्या रेल्वे संबंधित सर्व प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करेन. बिपीन गांधी म्हणाले की, प्रशासनाने सहकार्य केले तर पंचवटी एक्सप्रेसला लवकरच संपूर्ण नवीन बोगी मिळतील. ही गाडी वेळेवर चालवण्यात येईल.

अभिजित रानडे, देविदास पंडित, ब्रिजमोहन मुंदडा, मिलिंद गणकर, किसन आव्हाड, सागर कासार, विनायक पगारे, अशोक बोरसे, कुणाल गोसावी, सागर गोसावी, यश कुंभेजकर, प्रो. नयना, नेहा जोशी, शहनवाज इराणी, रसिका अमोलिक, मनीषा विसपुते, संजय सानप, भानुदास कदम, श्याम जाधव, अभिज्ञान आर्य आदी उपस्थित होते. रोटरी क्लब वेस्टेने रेल परिषदेला प्रथमोपचार पेटी दिली. इको फ्रेंडली पिशवीचे वाटप केले. पतंजली व भारत स्वाभिमान न्यास यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली.

प्रवाशांची पंचसूत्री

पंचवटी एक्सप्रेस आदर्श करण्यासाठी पुढील पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा संकल्प करण्यात आला. यामध्ये स्वच्छ रेल्वे व निरोगी प्रवासी, सुरक्षित रेल्वे व सुरक्षित प्रवासी, शुद्ध भोजन व तंदुरुस्त प्रवासी, वेळेवर रेल्वे व समाधानी प्रवासी, प्रदूषण मुक्त रेल्वे व शांतीमय प्रवास यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोहित पवारांकडून नेतृत्वाचे सीमोल्लंघन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यासह देशाच्या राजकारणावर भक्कम पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्यातील चौथी पिढीचे नेतृत्व आता राज्यव्यापी करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली आहे. पवार यांचा नातू रोहित राजेंद्र पवार यांच्या नाशिक दौऱ्यातील विविध कार्यक्रमांनी हे अधोरेखित झाले आहे. रोहित पवार यांनी राजकारणात ठसा उमटवण्यासाठी नाशिकची निवड केली असून, त्‍यांनी नाशिकमध्ये दोन दिवस तळ ठोकून राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली.

नाशिकमधून राजकीय झेप घेण्यासाठी रोहित पवार यांनी सध्या गाजत असलेल्या अर्भक मृत्यू प्रकरणात उपकरणांची पाहणी करीत आपल्यातील संवेदनशीलता दाखवली. त्यामुळे पवारांच्या या चौथी पिढी राजकारणात कसा ठसा उमटवतेय याकडे लक्ष लागून आहे. आता पवारांच्या या चौथ्या पिढीने पुण्यातून बाहेर निघत आपले नेतृत्व राज्यव्यापी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे जिल्हा परिषदेत बारामती गटाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित राजेंद्र पवार यांनी नाशिकबाहेर सीमोल्लंघन केले आहे.

राजकीय झेप घेण्यासाठी नाशिकची भूमी पवार कुटुंबीयांसाठी नेहमीच अनुकूल राहिली आहे. त्याचाच आधार घेत रोहित पवार यांनी गेले दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकत विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांशी चर्चा केली. नाशिक, सिन्नर, निफाड या शेतीसंपन्न पट्ट्यातील काही घटकांशी चर्चा करून त्यांनी नेतृत्वाच्या प्रशिक्षणासाठी पायाभरणी केल्याची चर्चा आहे. शरद पवारांशी निगडीत असलेल्या अनेकांच्या भेटी गाठी घेऊन त्यांनी राजकारणाचेही बाळकडू घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय क्षेत्रातील सीमोल्लंघनाची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधखरेदी मंजूर

$
0
0

सिव्हिल हॉस्पिटलसाठी दीड कोटीचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वातावरणातील बदलामुळे शहरासह जिल्ह्यात फोफावलेला स्वाइन फ्ल्यू, डेंग्यूसह इतर जीवघेण्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी तातडीने एक कोटी ६० लाख रुपये किमतीच्या औषधखरेदीस सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य आमदार डॉ. राहुल आहेर, सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य विषयक आढावा घेण्यात आला. वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लू, डेंग्यू यासारखे आजार हातपाय पसरत असून, त्यास तोंड देण्यासाठी येत्या दीड महिन्यात दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीच्या विषयाला मान्यता देण्यात आली. मंजूर झालेल्या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार आहेर यांनी दिले. दरम्यान, चांदवडच्या ट्रामा केअर सेंटरच्या दुरवस्थेबाबत बैठकीत चर्चा झाली. सदर सेंटरमध्ये मशिनरींसह मनुष्यबळाची कमतरता असून, सदर विषय राज्य स्तरावर प्रलंबित असल्याचे स्पष्ट करीत याबाबत राज्याच्या बैठकीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. आहेर यांनी दिले.

वाढीव औषधे हवीत

ऑक्टोबर हीट आणि पाऊस अशा संमिश्र वातावरणात व्हायरल इन्फेक्शनच्या तक्रारी झपाट्याने वाढत असून, पेशंटची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने औषध साठा उपलब्ध व्हावा याकडे डॉ. जगदाळे यांनी लक्ष वेधले. सध्या सिव्हिल हॉस्पिटलसह ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे पुरेसा औषधसाठा आहे. मात्र, साथीचे आजार आणि किमान महिनाभर सतत बदलणारे हवामान लक्षात घेता, वाढीव औषधसाठा त्वरीत उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित कंपन्यांकडे पाठपुरावा करून महिनाभराच्या आत औषध उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ. आहेर यांनी दिले. बैठकीस आरोग्य अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाल्याशी संवाद महत्त्वाचा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपले मूल हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून आपल्याला त्याच्या मानसिकतेचा अंदाज देत असते. परंतु, आपण ते जाणून घेण्यात कमी पडत असल्याने मोठ्या घटनांचा सामना करावा लागतो. मुलांच्या वागण्यातील ही कारणे शोधणे अतिशय महत्त्वाचे असून त्याविषयी पाल्यांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास विभागाच्या सचिव डॉ. विनिता सिंगल यांनी केले.

विद्यार्थी सुरक्षेबाबत वाढत असलेल्या समस्यांबाबत योग्य चर्चा व्हावी, पालक, चालक यांना मार्गदर्शन मिळावे, या हेतूने ग्लोबल व्हीजन इंग्लिश स्कूलच्या वतीने ‘सजग पालक-चालक मैत्र’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंकराचार्य संकुलमध्ये सोमवारी हा कार्यक्रम पार पडले.

सिंगल म्हणाल्या की, कोणतीही मोठी घटना ही अचानक घडत नसते. तर त्यामागे मोठी पार्श्वभूमी असते. दिल्लीतील शाळेत घडलेल्या प्रकरणाचा विचार करता त्यामागेही पार्श्वभूमी दिसून आली. मुलांमध्ये दडपण असल्याचे ते दहशतीखाली वावरत असल्याचे पालकांना जाणवल्यास त्यांनी ताबडतोब त्याच्याशी संवाद साधून त्याच्या अडचणी समजून घेतल्यास मोठे धोके टळू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, घटना घडण्यापूर्वीच ती घडू नये यासाठी सर्वांनी सजग असणे आवश्यक आहे.

‘गुड टच, बॅड टच’बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्यासाठी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूलचे सचिव शशांक मणेरीकर, संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर, नाशिक फर्स्टचे संचालक अभय कुलकर्णी, नाशिक स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष रतन लथ आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षबागांच्या छाटणीला वेग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील द्राक्षपंढरी असलेल्या उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव, सोनेवाडी, सारोळे, खडकमाळेगाव, सावरगाव, रानवड भागातील द्राक्षबागांच्या छाटण्यांनी वेग धरला आहे. गुजरातमधील डांगसह पेठ, सुरगाणा, दिंडोरी भागातील शेतमजूर यासाठी ये‌थे दाखल झाले आहेत. त्यामुळे थंडावलेला रोजगारालाही बळ मिळाले आहे.

गेल्या हंगामात अत्यल्प बाजारभाव मिळाल्याने उश‌िराने द्राक्षमाल काढण्यात आला. खरड छाटणीनंतर फुटव्यातून निघालेल्या नवीन काड्यांची कमी वेळेत गर्भधारणा झाली नाही. काडी अपरिपक्व राहिली. त्यातच गेल्या महिन्याभरापासून पावसाने द्राक्ष उत्पादकांची चांगलीच तारांबळ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना गोड्याबार (फळबहार) छाटणी सुरू करता आली नाही.

हवामान कोरडे झाल्याने अनेक द्राक्ष उत्पादकांनी नवरात्रीचा मुहूर्त साधत छाटण्यांना सुरुवात केली आहे. त्यामुळे द्राक्षपंढरीत ही कामे करण्यासाठी मजूर दाखल झाले आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकरीही गटागटाने अशा कामगारांकडून द्राक्ष बागेची छाटणी, पेस्ट, थिनिंग, डिपिंग इत्यादी कामे करून घेत आहेत. त्यासाठी काही भागात शेतकरी व कामगार करार करत आहेत.

हवामानातील बदलानुसार फवारणी

दररोज द्राक्षपंढरीत कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे द्राक्षबागांची छाटणीसह मशागतीची कामे करण्यासाठी सकाळ-सायंकाळ जाता-येतांना दिसत आहेत. नवीन फुटव्यांतून चांगला द्राक्षमाल निघावा तसेच रोगाला द्राक्षवेल‌ बळी पडू नये याकरिता विविध सेंद्रीय, रासायनिक खतांची मात्रा द्राक्षबागायतदार देत आहेत. त्याचप्रमाणे दैनंदिन रोगप्रतिकारक औषधांची हवामान बदलानुसार फवारणी सुरू आहे.

असे आहेत प्रत‌ि एकरी मजुरीचे दर

छाटणी करून त्यावर औषधाची पेस्ट करण्यासाठी ३५०० ते ५००० रुपये

फेलफूट करणे डिपिंग करणे आदीसाठी १५००-३००० रुपये

डिप‌िंग व इतर फवारणीसाठी इएसएस मशिनद्वारे फवारणीकरिता एक ते दीड हजार रुपये
रवर्षी गणेशोत्सवानंतर द्राक्ष उत्पादक भागात आम्ही दहा पंधरा जणांच्या गटगटाने येतो. शेतकऱ्यांच्या शेतातील शेडमध्ये राहतो. जसे जसे काम भेटते तसतसा रोजगार सुरू मिळतो.

- रवींद्र महाले, कामगार, दिंडोरी

गेल्या हंगामात जास्त काळ द्राक्षमाल वेलीवर राहिला. परिणामी खरड छाटणीनंतर काडी अपेक्षित परिपक्व झाली नाही. त्यातच संततधार पावसाने अर्ली छाटणीची हिंमत करण्यास बागायतदार धाजवले नाहीत. आता वातावरणात मोकळे असल्याने छाटण्या सुरु झाल्या आहेत.

- सुनील कापसे, द्राक्ष उत्पादक, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकांची होणार तीनदा सफाई

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत दिनाचे औचित्य साधून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शहर आणि जिल्ह्यातील आगारांमध्ये सोमवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छता बसस्थानक आगाराची वारसा संत गाडगेबाबांच्या संस्कारांचा’ अशी साद घालत दररोज तीन वेळा बसस्थानके स्वच्छ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्यासाठी महामंडळाच्या नाशिक विभागाला व्हॅक्यूम क्ल‌िनर मशिन्स प्र‍ाप्त झाले असून, ठक्कर बसस्थानकात त्याचा शुभारंभ करण्यात आला.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिरुद डौलाने मिरविणाऱ्या एसटीला मोठा प्रवासी वर्ग लाभला आहे. मात्र महामंडळाची आगारे, बसस्थानके अस्वच्छ असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. स्वच्छतेअभावी प्रवाशी एसटीपासून दूर जाण्याची शक्यता गृहीत धरून महामंडळाने स्वच्छतेच्या बाबतीत आश्वासक पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ‘स्वच्छता बसस्थानक-आगारांची, वारसा संत गाडगेबाबांच्या संस्कारांचा’ याबरोबरच ‘शुभारंभ नव्या युगाचा संकल्प स्वच्छता सिद्धीचा’ या संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संकल्पनेचा शुभारंभ महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. त्यानिमित्त ठक्कर बाजार बसस्थानकात आयोजित कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे, विभाग नियंत्रक यामिनी जोशी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते व्हॅक्यूम क्लिनर मश‌िनद्वारे स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक योगेश खोडे, आगार व्यवस्थापक किशोर पाटील, विभागीय भांडार अधिकारी अरविंद कहार, विभागीय अभियंता आर. के. काझी, ब्र‌िस्क कंपनीचे नासर देसाई आदी उपस्थित होते. सीबीएस, ठक्करबाजारसह शहर आणि जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.

खासगी कंपनीला कंत्राट

शहरासह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये दररोज तीन वेळा स्वच्छता केली गेली पाह‌िजे, असे आदेश महामंडळाने सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी ३९ व्हॅक्यूम क्लिनर मश‌िन प्राप्त झाले आहेत. या मशिनद्वारेच स्वच्छता केली जाणार आहे. शहरातील ठक्कर बाजार, निमाणी, मुंबई नाका, जुने सीबीएस, नाशिकरोड येथील बसस्थानकांमध्ये जेट क्लिन‌िंग मशिन, व्हॅक्यूम क्लोरिंग मश‌िनची स्वच्छतेसाठी मदत घेतली जाणार आहे. एका खासगी कंपनीला तीन वर्षाकरिता हे कंत्राट देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीटर रिंडीग घेणाऱ्यांना मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीज मीटर रिडींगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना धमकी देऊन मारहाणाची घटना नाशिकरोडला घडली. योगेश दीपक काळे (२४, पंडित जवाहरलाल नगर, मोठा मातंग वाडा, द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शिवसेना नेत्याच्या मुलाचे नाव फिर्यादित असल्याने खळबळ उडाली आहे.

काळे हे दोन वर्षांपासून वीज मीटर रिडींग घेणाऱ्या सुधीर चव्हाण यांच्या रुद्रा सिस्टीममध्ये नोकरीस आहेत. काळे व त्यांचे सहकारी शेखर वाघमारे, सिद्धांत बस्ते, प्रकाश जाधव हे जेलरोडच्या सिद्धेश्वर नगरमधील वैशाली नगर येथे मीटर रिडींग घेण्यासाठी एक आक्टोबरला दुपारी साडेबाराला गेले होते. त्यावेळी भांगरे ही व्यक्ती पाच ते सहा साथीदारांसह आली. त्यांनी मीटर रिंडींग घेण्यास प्रतिबंध करत काळे व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. शिवीगाळ करत मोबाइल घेतले. काळे व सहकारी त्यांच्यासोबत मोटरसायकलने अनुराधा थिएटर समोर गेले. तेथे त्यांना संदेश लवटे यांच्या आफिससमोरील बाकावर बसविण्यात आले. संदेश लवटे, राठोड नावाची व्यक्ती व इतर काहीजण आले. त्यांनीही दमबाजी करत मारहाण केली. त्यांनी काळे यांना ठेकेदार चव्हाणांना फोन करायला लावला. काळे यांनी चव्हाण यांना सर्व माहिती दिली. मारहाण करणारे म्हणाले की, तुमच्या मालकाला सांगा की, वीजमीटरचा ठेका आम्हाला घ्यायचा आहे. मीटर रिडिंग घेणे बंद करा अगर त्या मोबदल्यात ४० हजार रुपये आम्हाला द्या. आमच्या विरोधात गेला तर याद राखा, अशी धमकी देत सायंकाळी सहाला सुटका केली. उपनगर पोलिस ठाण्यात काळे यांनी भांगरे व साथीदारांविरुध्द तक्रार नोंदवली. दरम्यान, संदेश लवटे हा शिवसेना नेत्याचा मुलगा असून त्याचे नाव फिर्यादित असल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतमालाचे भाव गडगडले असून, कांद्याला योग्य भाव मिळत असतांना शासनाने इजिप्तचा कांदा आयात केला. कांदा निर्यात बंद केली. त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण झाली. यासर्व बाबींवर शासनाच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे, प्रतिपादन किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी केले.

शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणाच्या संदर्भात व विविध मागण्यांसदर्भात किसान मंचच्या वतीने वर्धा ते नाशिक शेतकरी संवाद अभियान रॅली मालेगाव येथे आल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे, पुरुषोत्तम कडलवा, डॉ. जयंत पवार, गुलाबराव चव्हाण, अॅड. आर. के. बच्छाव, प्रतिभा सूर्यवंशी, बाळू वाणी उपस्थित होते.

९ ऑगस्ट क्रांती दिनापासून सेवाग्राम येथून किसान मंचच्या वतीने सुरू झालेल्या शेतकरी संवाद अभियानाचा समारोप नाशिक येथे राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशनात होणार आहे. या अधिवेशनात राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन धोंडगे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यासंगी, साक्षेपी लेखक गेला…

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून महानगरीय उद्यमशील संस्कृतीचे दर्शन घडवणारे, त्यावर उपरोधिक शैलीत भाष्य करणारे प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे सोमवारी पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक प्रख्यात साहित्यिक निघून गेल्याची भावना साहित्य वर्तुळात उमटली.

___

आयुष्याने ‘हमों’ची परीक्षा पाहिली

‘हमो’ हे आधी माझे स्नेही आणि नंतर किर्लोस्कर प्रकाशनांमधले सहकारी. त्यांच्यातला अस्वस्थ ललित लेखक आणि त्यांची तगमग मी फार जवळून पाहिली आहे. बालकांड मधलं त्यांचं करपलेलं बालपण नंतर तपशिलात वाचलं तेव्हा हा माणूस आयुष्यभर आपल्या स्नेहाचा होता, पण त्याने सोसलेला जगण्याचा हा तुकडा आपल्याला दिसला नाही या जाणिवेने चटका बसला होता. आयुष्याने ‘हमों’ची फार परीक्षा पाहिली. ‘लोकप्रभा’ आणि ‘घरदार’च्या यशाने त्यांच्या आयुष्यात आनंद आणला. तो अल्पायुषी ठरला हे खरं असलं तरी त्यांचं ते कर्तृत्व काळाच्या ओघात जिवंत राहील आणि त्यांनी कथा कादंबऱ्यांमधून रंगवलेल्या व्यक्तिरेखाही! माझ्या या मित्राच्या आयुष्याचं दान दुखावणार पडलं. तो सल माझ्या आणि ‘हमों’च्या अनेक मित्रांच्या मनात कायम राहील! त्यांना आता शांतता मिळो!

-दत्ता सराफ, ज्येष्ठ पत्रकार

ज्येष्ठ व व्यासंगी लेखकाचा वियोग

१९६२ च्या गावकरी दिवाळी अंकासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेतली होती. त्यात ‘हमों’ना पहिले बक्षिस मिळाले होते. तेव्हापासून त्यांचा व माझा परिचय होता. त्यानंतर ते ‘किर्लोस्कर’मध्ये गेले. काही काळ या मासिकाचे ते संपादक होते. त्यांना पत्रकारितेत हवे तसे यश आले नाही. ब्राह्मणेतर चळवळीकडून ब्राह्मणांना टिकेचे धनी व्हावे लागले तेव्हा त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी ‘हमो’ उभे राहिले होते. त्यावेळच्या त्यांच्या भाषणातून त्यांनी अनेकांना प्रत्युत्तर दिले. इतिहासात ब्राह्मण वाईट कधीच नव्हते हे त्यांनी भाषणातून सांगितले.

-अरविंद पोतनीस, संपादक, अमृत

सव्यसाची पत्रकार आणि कादंबरीकार

‘हमो’ सव्यसाची पत्रकार आणि एक महत्त्वाचे कादंबरीकार होते. त्यांनी सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने पकडून कादंबरीची प्रयोगशीलता जोपासली. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांत वेगळे सामाजिक प्रश्न उत्तम पद्धतीने हाताळलेले दिसतात. कादंबरीची कक्षा रुंदावण्याचे काम ‘हमों’नी केले. विशेषत: कादंबरी प्रकाराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-डॉ. दिलीप धोंडगे, ज्येष्ठ समीक्षक

धगधगती भाषा व कडकडीत प्रतिमांचा धनी

नाशिकला त्यांच्या मुलाखती झाल्यात, त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. ते प्रयोगशील संपादक होते. ‘किस्त्रीम’, ‘किर्लोस्कर’, ‘घरदार’ हे त्यांचे प्रयोगच होते. ‘लोकप्रभा’चे, ‘बालवाडी’, ‘अपूर्व’ या दिवाळी अंकांचे ते संपादक होते. त्यांच्या ‘इतिवृत्त’, ‘प्रास्तविक’ या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या. पत्रकारितेतला माणूस लेखक म्हणून लिहितो तेव्हा ते वेगळे, उठून दिसते. त्यांनी साहित्याला दिले तितकेच पत्रसृष्टीला दिले. व्यक्तिचित्रणातील लेखन ‘एक माणूस एक दिवस’ ही त्यांची प्रयोगशीलता नंतर चॅनल्सना देखील भावली. ‘काळेशार पाणी’, ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी’ यावर अश्लीलतेचे आरोप झाले. त्यांच्याकडे निरिक्षणशक्ती, वास्तव मांडण्याची कळकळ, धगधगती भाषा व कडकडीत प्रतिमा, प्रतिमाने होती. बालकांड हे आत्मचित्रण फार गाजले. मराठी साहित्याचा चेहरामोहरा त्यांनी बदलवला. पत्रकारिता व साहित्य असे लिखाण हातात हात घालून करणारा हा माणूस आपल्यातून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

-डॉ. वृन्दा भार्गवे, ज्येष्ठ लेखिका

‘हमों’नी दखलपात्र काम केले

मराठी साहित्य आणि पत्रकारितेच्या व्यवच्छेदक लक्षणात बसणाऱ्या ह. मो. मराठे यांना अधूनमधून वादात राहणे पसंत असावे. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीवर अश्ल‌िलतेचे आरोप झाले. तेव्हापासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत ते अधूनमधून वादात राहिले. नियतकालिक पत्रकारिता आणि ललित साहित्य या दोन्ही क्षेत्रात ‘हमों’नी दखलपात्र काम केले यात शंका नाही. वाचकाला नेमके काय हवे हे कळणाऱ्या फार थोड्यांपैकी ते एक होते.

-अनंत येवलेकर, मराठी विभागप्रमुख, एचपीटी कॉलेज

साक्षेपी कादंबरीकार गेल्याची भावना

ह. मो. मराठेंसारखा व्यासंगी लेखक सार्वजनिक वाचनालयात येऊन गेल्याने आम्ही स्वत:ला धन्य समजतो. ते एका कार्यक्रमासाठी नाशकात आले तेव्हा त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. अतिशय भला माणूस गेला. चांगला, द्रष्टा लेखक, साक्षेपी कादंबरीकार आपल्यातून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

-मधुकर झेंडे, माजी अध्यक्ष, सावाना

साठोत्तरी पिढीचा दुवा निखळला

ह. मो. मराठे हे साठोत्तर पिढीतील महत्त्वाचे लेखक होते. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही त्यांची कादंबरी साठोत्तरी पिढीची आत्मकथा होती. पुढे त्यांच्या ‘बालकांड’ आणि ‘पोहरा’ या आत्मकथा महत्त्वाच्या ठरतात. बालकांडवर चर्चा अधिक झाली. ह. मो. मराठे हे व्रती लेखक होते. कथा, कादंबरी, स्तंभलेखन करीत ते सातत्याने लिहीत राहीले. ‘एक दिवस एक माणूस’ ही त्यांची वृत्तमालिका खूप गाजली. साठोत्तरी पिढीचा हा दुवा निखळला. ह. मो. मराठे हे पहिला चहा हे स्तंभलेखन वृत्तपत्रासाठी करीत. घराघरात हे लेखन वाचले जाई. सार्वजनिक वाचनालयाच्या विविध उपक्रमात ते सहभागी झाले. साहित्यिक चर्चा त्यांनी घडवून आणली. एका मोठ्या लेखकाच्या जाण्याने मराठी विचार विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

-डॉ. शंकर बोऱ्हाडे, ग्रंथसचिव, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये गोणीत स्फोटकं आढळली

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकमधील पाथर्डी-गौळाणे मार्गाजवळील असणाऱ्या मोंढेगावाच्या रस्त्यालगत एका गोणीत जिलेटीनच्या कांड्या आणि डिटोनेटर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी रात्री पोलिसांच्या गस्ती पथकाला एक गोण संशयास्पदरीत्या आढळली. इंदिरानगरचे पोलिस पथक दाखल झाल्यानंतर गोण उघडण्यात आली. त्यावेळी या गोणीत ६० जिलेटीनच्या कांड्या आणि १७ डिटोनेटर आढळून आल्याने खळबळ उडाली.

ही स्फोटकं विहिरीच्या खोदकामासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी ते हैदराबाद विमान भाडे १०, ७५० रुपये

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । शिर्डी

बहुप्रतिक्षीत शिर्डी विमानतळाचे लोकार्पण होऊन दोन दिवस उलटत नाही तोच विमान कंपन्यांनी आपली मनमानी सुरू केली आहे. २२०० रुपयांऐवजी विमान कंपन्या प्रवाशांकडून तब्बल १० हजारांपेक्षा अधिक भाडे वसूल करीत आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी या विमानतळाचे लोकार्पण पार पडले. हैदराबादला जाण्यासाठी विमान कंपन्यांनी २२०० रुपये भाडे आकारले होते. परंतु, प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर विमान कंपन्यांनी विमान भाड्यात भरमसाठ वाढ केली. शिर्डी ते हैदराबाद या प्रवासासाठी विमान कंपन्या एका प्रवाशाकडून तब्बल १०,७५० रुपये आकारत आहेत.

विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिर्डीहून हैदराबादकडे जाणारे एअर अलायंस कंपनीचे विमान रद्द करण्याची वेळ आली होती. तसेच हैदराबादहून शिर्डीला येणारे विमान शिर्डीत अर्धा तास उशिराने पोहोचले होते. केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेत शिर्डी विमातळाचा समावेश करण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. शिर्डीचा या योजनेत समावेश झाल्यास प्रवाशांना आणखी फायदा मिळू शकतो. परंतु विमान सुरू होऊन दोन दिवस होत नाही तोच कंपन्यांनी अशी भरमसाठ भाडेवाढ करणं हे अन्यायकारक आहे, असे प्रवाशांनी म्हटल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणे डेंग्यूत ६० टक्के घट!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यू, स्वाइन फ्ल्यूने उच्छाद मांडला असतानाच महापालिका मात्र गेल्या वर्षापेक्षा महापालिका हद्दीतील डेंग्यू व स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे १०५ बाधित रुग्ण आढळले, तरी वैद्यकीय विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ६० टक्क्यांनी घटल्याचा दावा केला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात १७५ रुग्ण असल्याचे सांगत यावर्षी रुग्ण कमी असल्याचा हास्यास्पद दावा महापालिकेच्या वतीन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा डेंग्यूने एकाचाही बळी गेला नसल्याचा दावा केल्यानेदेखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वैद्यकीय विभागाने शहरातील रोगराईसंदर्भात वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समितीला मासिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात १०५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान शहरात डेंग्यूचे २५६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा १७५ व ६४० एवढा होता. त्यामुळे डेंग्यूचा प्रकोप हा गेल्या वर्षीपेक्षा ६० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी शहरात डेंग्यूमुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र डेंग्यूने एकाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. नाशिकरोड, सिडको व सातपूर या विभागांत डेंग्यूचा प्रकोप असल्याचा दावा करण्यात आला असूनस महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाकडून रोगराईचा अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


साडेदहा हजार घरांत तपासणी

महापालिकेने डेंग्यूसंदर्भात शहरातील १० हजार ५६८ घरांची तपासणी केली आहे. त्यात जवळपास १२५ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ६२ पथकांद्वारे शहरात विविध ठिकाणी फवारणी केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच १३९ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. जनजागृतीसाठी साडेसात हजार पत्रके वाटल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठा विभाग कर्मचाऱ्यांचे कामबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुरवठा विभाग हा महसूल विभागापासून वेगळा केला जात असून, याला महसूल कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत विरोध दर्शविण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात पुरवठा विभागातील कर्मचारी सहभागी झाले असून, मागण्या मान्य न झाल्यास येत्या १० ऑक्टोबरपासून महसूल कर्मचारीही कामबंद आंदोलन करणार आहेत.

महसूल विभागापासून पुरवठा विभाग वेगळा करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. त्या निवेदनात, २८ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार पुरवठा विभाग हा महसूल विभागापासून विभक्त करण्याच्या निर्णयाला पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे, असे म्हटले आहे. तरी हा निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी पुरवठा विभागातील कामकाज बेमूदत बंद करण्यात आले असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास येत्या १० ऑक्टोबरपासून महसूल कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. या आंदोलनादरम्यान पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करीत विविध आठ मागण्या केल्या आहेत. याबाबत प्रशासनाने विचार करावा, असे संघटनेचे पदाधिकारी रत्नाकर वसईकर, किशोर शिनकर, आर. जी. पाटील, मन्सुर शेख, संजय शिंदे, अविनाश सोनकांबळे, मोहन मोरे, अरुण जोशी, सतीश चौधरी आदींसह अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images