Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कॅन्सरविरोधी बिया विकणारा तरुण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/सिडको
फेसबुकवरून मैत्री करीत कॅन्सरविरोधी तसेच इतर आजारांवर उपयुक्त असलेल्या औ‍षधी बियांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या भामट्याने लाखो रुपये उकळले असून, यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
निल्स हॅम्पे (३०, नवी मुंबई, मुळ देश नायजेरिया) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी सापळा रचून नवी मुंबई येथे हॅम्पेला जेरबंद केले. सायबर पोलिस स्टेशनमध्ये २२ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यात संशयित आरोपीने औषधी बिया पुरवण्याचे आश्वासन देत तीन लाख रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत पोलिसांनी निल्स हॅम्पेला जेरबंद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताची एक तरुण मैत्रिणीने तक्रारदाराशी फेसबुकवरून ओळख वाढवून अडचणीत असल्याचे भासवले. आमची कंपनी वेबसाइटवरून ५ लाख पौंडाला औषधे खरेदी करते. परंतु, भारतातून यापूर्वी पुरवठा करणाऱ्यांनी तो अचानक बंद केला आहे. यामुळे आपलीही नोकरी धोक्यात आहे. जर त्या औषधी बिया तुम्ही भारतातून आम्हाला पुरवल्या तर आपली नोकरी वाचेल. तसेच, तुम्हालाही चांगला फायदा होईल. या बिया भारतात अवघ्या ५० हजार ते १ लाख रुपयांत मिळतात. तर यासाठी आमची कंपनी ५ लाख रुपये मोजते. अशी माहिती देऊन ही औषधे खरेदी करून आमच्या कंपनीस पुरवण्याची गळ घातली होती. फिर्यादीने एक किलो औषधी बियांची मागणी केली होती. नवी मुंबई येथे ही औषधे घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी पैसे देऊन औषधी बिया विकत घेतल्या. मात्र, औषधांच्या नावाखाली त्या केवळ करंज झाडाच्या बिया फिर्यादीस सोपवण्यात आल्या. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करून मुंबई येथून एका नायजेरीयन संशयितास ताब्यात घेतले. सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवराज बोरसे, जयश्री मूर्ती, किरण जाधव, मंगेश काकुळते, शेखर बडगुजर आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात उद्योजकांना पुन्हा एमआयडीसीची नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) वापरासाठी दिलेल्या भूखंडावर व्यावसायिक वापर केल्याबद्दल सात उद्योगांना दुसरी नोटीस पाठवली आहे. यानंतर या उद्योगांनी प्रतिसाद न दिल्यास तिसरी नोटीस पाठवून पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या बांधकाम विभागाने दिली आहे.
काही दिवसांपासून औद्योगिक वापरासाठी दिलेल्या भूखंडावर व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने एमआयडीसीने कारवाई सुरू केली आहे. या सात उद्योगांमध्ये चार उद्योग अंबड एमआयडीसीत तर दोन उद्योग हे सातपूर एमआयडीसीतील आहे.

अंबड येथील उद्योगात उज्ज्वल अॅटो हिल्स, इंडोलाईन इंडस्ट्रीज, अॅटोमोटिव्ह प्रा. लि. अश्वमेध पॅकर्स यांचा समावेश असून सातपूर येथील वसाहतीत सुदर्शन फेब्जीकल व प्रेसिजन इंडस्ट्रीजचा समावेश आहे. औद्योगिक व व्यावसायिक भूखंडाचे दर वेगवेगळे असल्याने यातून मोठा महसूलही एमआयडीसीला मिळणार आहे. गेल्या आठवड्यात फाइल गहाळ प्रकरणात उद्योजक इंद्रपालसिंग सहाणी यांना पोलिसांनी अटक करून कारवाई केली. यामध्ये औद्योगिक वापराच्या भूखंड व्यावसायिक वापर केल्याचे कागदपत्र होते. त्यामुळे भूखंडाच्या वापराचा मुद्दा चर्चेत आला. गेल्या काही दिवसापासून हे भूखंड व्यापारासाठी वापरले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. एमआयडीसीने आता कडक पाऊले उचलत ही कारवाई केली आहे. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातही ही कारवाई केल्यानंतर अनेकांनी व्यापारी वापर बंद केला आहे.

वृक्षसंवर्धन भूखंडातही उल्लंघन
जोटो अॅब्रेसिव्हज प्रा. लि. या कंपनीला वृक्षसंवर्धनासाठी दिलेल्या भूखंडावरही शर्थीचा भंग व नियमाचे उल्लंघन झाले असल्याचे तपासणीत आढळल्याची माहिती एमआयडीसीच्या बांधकाम विभागाने दिली आहे. बांधकाम विभागाने पुढील कारवाईसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे ही फाईल पाठवली असून त्यावर आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा भूखंड परत ताब्यात घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाली’ काळवंडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सध्या टोमॅटोचा हंगाम सुरू असून, कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या निफाड तालुक्यात टोमॅटोचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र पाक‌िस्तानने भारताकडून शेतमाल आयात बंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे. त्यामुळे सुरुवातीला टोमॅटोच्या चढत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आलेली लाली आता काहीशी कमी होत आहे.

टोमॅटोचे दर मध्यंतरी एक हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र टोमॅटोची निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने टोमॅटो आज दोनशे रुपये भावाने विक्री होत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या हाती प्रतिकिलो दहा रुपये इतकाच भाव पडत आहे. सप्टेंबर महिन्यात टोमॅटोची ३ लाख ३१ हजार ३२६ क्रेट्स इतकी आवक झाली असून, जास्तीत जास्त ४२१, सरासरी २०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दहा रुपये किलोप्रमाणे टोमॅटो विकण्याची वेळ आली आहे.

सर्वात जास्त शेतमालाची आयात करणाऱ्या पाकिस्तानने भारताकडून कुठलाही शेतमाल न घेण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानची बॉर्डर लासलगावच्या टोमॅटोसाठी बंद पडली आहे. त्यामुळे त्याचा फटका टोमॅटोसह इतर पिकांनाही बसला आहे. हजार रुपयांचा टोमॅटो आज कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रतलाम शिवपुरी (मध्य प्रदेश) या ठिकाणी स्थानिक मालाचे आगमन झाल्याने तेथेही नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला मागणी नाही. अशा परिस्थितीत दररोज वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे टोमॅटो खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

आपल्याकडे कांद्याचे दर वाढले की भारत सरकारकडून कांदा पाकिस्तानातून आयात केला जातो. मात्र आज टोमॅटोच्या बाबतीत आपल्यावर ही वेळ आल्याने भारत सरकार टोमॅटोचे दर

वाढण्यासाठी पाकिस्तानची बॉर्डर खुली करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाकिस्तान बॉर्डर खुली झाली

तर शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल. त्यामुळे भारत सरकारच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक लक्ष लावून आहेत.

नुकसानीचे कारण

केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे धरसोडीचे निर्णय चुकीचे

पाकिस्तानची बॉर्डर बंदचा जिल्ह्यातील टोमॅटोला फटका

वातावरणात दररोज होणाऱ्या बदलाचा फटका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमएसबीटीईतून ‘संदीप’ला वगळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेल्या शासन निर्णयातून संदीप विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस (डी. फार्मसी) या महिरावणी (त्र्यंबकेश्वर) येथील संस्थेला वगळण्यात आले आहे. याबाबत संस्थेशी संपर्क साधला असता संदीप विद्यापीठाकडे ही संस्था आता वर्ग झाली आहे. नाव वगळण्याची ही प्रक्रिया आमच्या मागणीनुसारच झाली. यात एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल जाधव यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा या विषया संदर्भातील अध्यादेश बुधवारी सकाळी वेबसाइटवर जाहीर करण्यात आला. या अध्यादेशात नाशिकमधील या संस्थेच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमाचे नाव वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या विषयाची पार्श्वभूमी अध्यादेशात समाविष्ट नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये काहीवेळ संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे संस्थेशी संपर्क साधला असता प्राचार्य डॉ. अनिल जाधव यांनी सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, ‘आमच्या संस्थेकडे स्कूल ऑफ फार्मसी अंतर्गत दोन डिप्लोमा कॉलेजेस आहेत. प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमता असणारे एक कॉलेज डीटीई आणि एमएसबीटीई या पालक संस्थांशीच संलग्नित ठेवण्यात आले आहे. तर दुसरे कॉलेज हे एमएसबीटीई आणि डीटीई या पालक संस्थांच्या यादीतून वगळून ते संदीप विद्यापीठाशी तत्काळ संलग्न करण्यात आले आहे. यामुळे संदीप या स्वतंत्र विद्यापीठासोबत आता डिप्लोमाचे ५० विद्यार्थी क्षमतेचे हे कॉलेज संलग्नित राहणार आहे. या कॉलेजच्या प्रवेशापासून तर परीक्षा प्रक्रियेपर्यंतच्या जबाबदाऱ्या विद्यापीठच सांभाळेल. या प्रक्रियेत एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसून त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती प्राचार्य डॉ. जाधव यांनी दिली.

एमएसबीटीईच्या यादीतून स्कूल ऑफ फार्मसीचे नाव वगळण्याची प्रक्रिया तांत्रिक आहे. आता हे कॉलेज संदीप विद्यापीठाशी संलग्नित राहील. यातून प्रवेशापासू तर परीक्षेपर्यंत अधिक दर्जेदार शिक्षण दिले जाईल. या प्रक्रियेत एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही.
- डॉ. अनिल जाधव, प्राचार्य
स्कूल ऑफ फार्मसी, संदीप विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
महापालिका हद्दीतील वडनेर दुमाला, दाढेगाव, पिंपळगाव खांब, पाथर्डीगाव या भागात महावितरण कंपनीकडून अघोषित भारनियमन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यावसायिक यांचे हाल होत आहेत. हे भारनियमन दोन दिवसात न थांबवल्यास महावितरण कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी दिला.
खासदार गोडसे, बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवक केशव पोरजे यांनी नागरिकांसह महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, शहर अभियंता थोरात यांना घेरावा घातला. यावेळी भिकाभाऊ ढेमसे, गणेश जाधव, सोमनाथ बोराडे, योगेश पोरजे, किरण कर्डीले, विजय कदम, नीलेश कर्डिले, सोमनाथ कोकणे, बबन पोरजे, राहुल थोरात, अशोक उन्हवणे आदी उपस्थित होते.
कुमठेकर यांना निवेदन देण्यात आले. वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब दाढेगाव, पाथर्डीगाव आदी गावांमध्ये महावितरण मनमानी करीत आहे. दररोज ठरलेल्या भारनियमनाशिवाय ग्रामीण भागातील गावांमध्ये भारनियमन केले जाते. दररोज १३ ते १५ तास भारनियमन असते. सततच्या भारनियमामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. पाण्याअभावी पिकांचेही नुकसान होत आहे. सध्या परीक्षांचा काळ आहे. भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. व्यावसायिकांचेही नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सणांचे दिवस आले आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात वीज पुरवठा करावा. दोन दिवसात अघोषित भारनियमन बंद न झाल्यास कंपनीच्या मुख्य कार्यालयास कुलूप लावण्यात येईल.
- हेमंत गोडसे, खासदार

शहरात २४ तास वीज दिली जाते. परंतु, शहराच्या लगत ग्रामीण भागात १३ ते १५ तास भारनियम केले जाते. बील न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा बंद करा. मात्र, गावांचा वीजपुरवठा खंडीत करू नका.
- शिवाजी चुंभळे,
सभापती, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किटकनाशके चोरटे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात किटकनाशकांची दुकाने फोडणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून दोन चारचाकी, एक दुचाकी आणि सात लाख २९ हजार रुपये किमतीची किटकनाशके असा सुमारे साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काही महिन्यांपासून जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड तालुक्यांमधील किटकनाशकांची दुकानांमधून शेती उपयुक्त औषधे, किटकनाशके, बुरशीनाशके चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते. परंतु चोरटे हाती लागत नव्हते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना चोरांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ संशयितांना दिंडोरी तसेच चांदवड तालुक्यातील सिंदवड, खतवड, तिसगाव, बहादुरी येथून ताब्यात घेतले. सोपान दिनकर बस्ते, राहुल भाऊसाहेब मोरे, गुलाब निवृत्ती लांडे, लहू शंकर बस्ते (सर्व रा. सिंदवड, ता. दिंडोरी) सतीश अरुण मोरे (रा. कसबे सुकेणे, ता. निफाड), शुभम नामदेव गवे (रा. खटवड, ता. दिंडोरी), खंडेराव पोपट कडाळे, (रा. तिसगाव, ता. दिंडोरी), किरण अशोक गायकवाड (रा. बहादुरी, ता. चांदवड), ज्ञानेश्वर मधुकर गणोरे (रा. खडक सुकेणे, ता. निफाड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी किटकनाशकांची ११ दुकाने फोडल्याची कबुली दिली असून १३ लाख २४ हजार ५५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राम करपे, उपनिरीक्षक मच्छिंद्र रनमाळे, रवी शिलावट, रामभाऊ मुंढे, हवालदार दीपक अहिरे, हनुमंत महाले, अमोल घुगे आदींनी हे गुन्हे उघडकीस आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्पना चावलाचा वारसा सुरू राहील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र व अंतराळ संशोधनात रुची निर्माण करण्यासाठी शहरात आयोजित केलेला जागतिक अंतराळ सप्ताह महत्त्वाचा आहे. या सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अंतराळाची गोडी, कुतुहूल निर्माण होण्यास मदत होत आहे. यामुळे कल्पना चावला यांच्यासारख्या अंतराळवीर तयार होऊन त्यांच्या कार्याचा वारसा सुरू राहील, असा विश्वास महापौर रंजनी भानसी यांनी व्यक्त केला.
महापालिका आणि कल्पना युथ फाउंडेशन यांच्यातर्फे जागतिक अंतराळ सप्ताहाचे उद्‍घाटन महापौर भानसी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण तारांगण येथे बुधवारी झाले. अंतराळ सप्ताह ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी महापौर भानसी बोलत होत्या. या सप्ताहासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या कल्पना युथ फाउंडेशनला शुभेच्छा देत यापुढेही असेच प्रेरणादायी कार्य पुढे चालू ठेवावे, असे आवाहन केले.

नासा स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी कार्यक्रमात प्रारंभी अंतराळ सप्ताहाची पार्श्वभूमी सांगितली. तसेच यावर्षी युनोने जाहीर केलेली ‘एक्सप्लोरिंग न्यू वर्ल्ड्स इन स्पेस’ याविषयी माहिती दिली. जगातील जवळपास ८५ देशांमध्ये हा सप्ताह साजरा केला जातो. नाशिककरांनीही यात आपला सहभाग नोंदवावा, असे त्यांनी आवाहनही त्यांनी केले. कल्पना युथ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जयदीप शाह यांनी या सप्ताहात घेतले जाणारे विविध कार्यक्रम व स्पर्धा यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. अंतराळ सप्ताहाचे तीन वर्षांपासून आयोजन करणारी देशातील पहिली महापालिका ठरल्याबद्दल फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रा. भूषण उगले यांनी नाशिक महापालिकेचे अभिनंदन केले. यावेळी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, शहर अभियंता उत्तम पवार, इस्रोचे माजी अभियंता अविनाश शिरोडे, तसेच सुशांत राजोळे, हेमंत आढाव, पवन कदम, दीपक तरवडे आणि केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी तारांगणचा ‘शो’ दाखविण्यात आला. सप्ताहांतर्गत निबंध, पोस्टर अशा विविध स्पर्धा होणार आहेत.

सप्ताहांतर्गत होणारे कार्यक्रम
शुक्रवार (दि. ६) : पॉवर पॉईंट स्पर्धा - के. के. वाघ कॉलेज
रविवार (दि. ८) : पोस्टर स्पर्धा, अंतराळ प्रश्न मंजुषा स्पर्धा, इस्रोच्या वैज्ञानिकांसह व्हिडियो कॉन्फरन्स
मंगळवार (दि. १०) : गिरीश पिंपळे यांचे तारांगण येथे व्याख्यान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकलीच्या घशात अडकली सेफ्टी पिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खेळताना चुकून सेफ्टीप‌नि गिळल्याने कळवण तालुक्यातील एका वर्षाच्या मुलीचा जीव धोक्यात आला होता. सिव्ह‌लि हॉस्प‌टिलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून गळ्यात अडकलेली सेफ्टी प‌नि बाहेर काढली.

प्रमिला गवळी असे ही शस्त्रक्र‌यिा करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. ती कळवण तालुक्यातील सीतापुरी येथील रहिवाशी आहे. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी घरात खेळत असताना ती सेफ्टी प‌नि तोंडात टाकून चघळू लागली. अनावधानाने ही सेफ्टी पीन तिने गिळली. पीन घशामध्ये उघडली गेल्याने काही वेळाने तिला त्रास होऊ लागला. तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने तिला जवळच्या हॉस्प‌टिलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून तिला वणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठव‌लिे. तेथेही उपचार करणे शक्य नसल्याने तिला सिव्हील हॉस्प‌टिलमध्ये हलविण्यात आले. प्रमिलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांनी तपासणी केली. प्रमिलाचा एक्सरे काढल्यानंतर स्वर व श्वसननलिकेजवळ सेफ्टी पीन उघडलेल्या अवस्थेत अडकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुर्बीणीच्या सहायाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॅरिगोस्कोपच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तोंडावाटे सेफ्टी प‌नि काढण्यासाठी पाऊण तासाचा वेळ लागला. शस्त्रक्रियेदरम्यान, प्रमिलाच्या श्‍वसननलिकेला इजा होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आली. अखेर घशात अडकलेली पीन काढण्यात डॉक्टरांना यश आले. या शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञ डॉ. सचीन पवार यांच्यासह डॉ. सिद्धार्थ शेळके व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

प्रमिलाच्या गळ्यात अडकलेली प‌नि स्वर यंत्राच्या आत होती. त्यामुळे तेथे जखम झाल्यास रक्तस्त्राव होऊन मृत्यू होण्याचा धोका अधिक होता. त्यामुळेच तातडीने शस्त्रक्रिया केली. प्रमिला आता सुखरुप आहे.

-डॉ. संजय गांगुर्डे, कान, नाक, घसा तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेफ कपूर यांचा लाइव्ह कुकरी शो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व व्हेजिको ट्री संजीव कपूर खजानाच्या वतीने खमंग, चटपटीत पदार्थ बनविण्याचे तंत्र नामांकित शेफ संजीव कपूर यांच्याकडून शिकण्याची सुवर्णसंधी नाशिककरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येत्या सोमवारी (दि. ९) दुपारी ३ वाजता नभांगण लॉन्स, इंदिरानगर येथे आयोजित लाइव्ह कुकरी शोमधून ही संधी महिलावर्गाला उपलब्ध होणार आहे. संजीव कपूर स्वतः या कार्यक्रमात विविध पाककृती करून दाखवणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. वर्षभरातील महत्त्वाचे सण उत्सव स्पेशल करण्यासाठी तर अशा कार्यक्रमांची रीघ लागलेली असते. सध्या दिवाळीचे वातावरण सर्वत्र आहे. शहर रंगीबेरंगी दिव्यांनी सजण्यासाठी सज्ज झाले आहे. या सणात फराळ व चटकदार पदार्थ मुख्य वैशिष्ट्य व आकर्षण असतात. यंदाच्या दिवाळीत काही तरी वेगळे पदार्थ करण्याची संधी मिळावी, यासाठी मटा कल्चर क्लबतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.



दिवाळीनिमित्त वैशिष्ट्यपूर्ण रेसिपींची मेजवानी

या कार्यक्रमात मास्टर शेफ संजीव कपूर दिवाळीनिमित्त स्वतः काही रेसिपी तयार करून दाखवणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १५० तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी असणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क करावा किंवा (०२५३) ६६३७९८७, ९५५२५६६८४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’मध्ये नाशिक दुसऱ्या स्थानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील नऊ महिन्यात स्वाइन फ्लूमुळे नाशिक जिल्ह्यात ८० नागरिकांचा बळी गेला. यात, नाशिक शहर, जिल्हा तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. जीवघेण्या स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक बळी पुणे जिल्ह्यात (१००) गेले असून, त्याखालोखाल नाशिकचा क्रमांक लागतो.
ऑक्टोबर हिट सरता सरता थंडीची चाहूल लागणार असून, आरोग्य यंत्रणेसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे. राज्यभरात यंदा स्वाइन फ्लू या आजाराने थैमान घातले असून, यात ६०० जणांचा बळी गेला आहे. नाशिकमध्ये २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा झाला. या काळात लाखो भाविक शहरात दाखल झाले. त्यावेळी स्वाइन फ्लूमुळे वर्षभरात ८७ बळी गेले होते. यंदा मात्र नऊ महिन्यातच हा आकडा ८० च्या घरात पोहचला आहे. वर्षाअखेरीस यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्य आरोग्य विभागाने नाशिक तसेच पुणे येथील स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच आरोग्य विभागास सूचना केल्या असून, संशयित पेशंटवर वेळीच उपचार करण्यासाठी तपासणीवर भर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूला रोखण्यासाठी आवश्यक औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सुचनाही स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आल्या आहेत. हायपर टेन्शन, डायबेटीस तसेच गरोदार महिलांबाबत विशेष लक्ष ठेवण्याची गरज असते. दरम्यान, स्वाइन फ्लूमुळे राज्यभरात मृत्युचा आकडा वाढत असून, राज्य आरोग्य विभागाने त्याची कारणमिमांसा सुरू केली आहे. यासंदर्भात एक कमिटी कार्यरत असून, ती मृत्युच्या कारणांचा आढावा घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सप्टेंबरमध्ये १८ बळी

स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या ६० टक्के व्यक्तींना कॅन्सर, अस्थमा, मधुमेही रुग्ण असल्याचे कमिटीवरील पॅनलने स्पष्ट केले आहे. उर्वरित घटनांमध्ये पेशंटवर अगदीच शेवटच्या स्टेजवर स्वाइन फ्लूबाबत उपचार झाल्याचे सदर कमिटीच्या अहवालात समोर आले आहे. नाशिकमध्ये सप्टेंबर महिन्यात १८ मृत्यू झाले असून, सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज संशयित पेशंटची तपासणी केली जाते. तपमानातील चढ-उताराचा परिणाम स्वाइन फ्लूच्या फैलावास कारणीभूत ठरत असल्याचा दावा आरोग्य विभागातील सूत्रांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी अंधारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

ऐन सणासुदीच्या व परीक्षांचे काळात दिंडोरी शहरासह तालुक्यात विजेचे भारनियमन वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लखमापूर शिवारात अगोदरच बिबट्याची दहशत असताना रात्रीच्या भारनियमनाने घबराटीत वाढ होत आहे.

दिंडोरी शहरात गेले काही वर्षे विजेचे भारनियमन नव्हते. तर ग्रामीण भागात भारनियमन कमी होते. परंतु गेल्या महिनाभरापासून भारनियमनात अचानक वाढ झाली असून, दिंडोरी शहरात दोन टप्प्यात सहा तासाहून अधिक भारनियमन सुरू आहे. ग्रामीण भागात बारा तासापेक्षा जास्त भारनियमन सुरू आहे. दिवसाच्या भारनियमन काळात विविध व्यवसाय ठप्प होत असून, ऑनलाइन असलेले विविध शासकीय कार्यलयातील कामकाज बंद पडत आहेत. तर रात्रीच्या भारनियमनाने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. भारनियमन त्वरित बंद करून सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यावर अखेर फुली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खासगी आरोग्य विम्याला विरोध केल्याने या विम्यावर फुली मारण्यात आली आहे. दोन लाखाच्या खासगी विम्याचा हफ्ता हा जीएसटीमुळे दोन हजारांवरून साडेचार हजारावर गेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विमा काढण्यास नकार दिल्यानंतर दिवाळी सानुग्रह अनुदानातून एक हजार रुपयांची कपात होणार नसल्याचे स्पष्टीकरण लेखा विभागाने दिले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पूर्ण १५ हजार रुपये देण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी दिल्याने शुक्रवारी साडेसात हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यावर १५ हजार रुपये जमा होणार आहेत.

महापालिकेच्या वतीने पालिकेच्या सात हजार ५६३ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ हजाराचे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.या १५ हजार सानुग्रह अनुदानातून आरोग्य विम्यासाठी एक हजार रुपये कपात करण्यात येणार होती. तर उर्वरीत रक्कम कर्मचाऱ्यांना भरायची होती.

परंतु यावेळी जीएसटी आणि दोन लाखाच्या विमा पॉलिसीमुळे विमा हफ्ता हा साडेचार हजारावर गेला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हा हफ्ता डोईजड झाला होता. हा विमा ऐच्छिक करण्याची मागणी म्युन्सिपल कर्मचारी सेनेने महापौरांकडे केली होती. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व कर्मचारी संघटनेचे प्रवीण तिदमे यांनी महापौरांना विनंती केल्यानंतर कर्मचाऱ्यांना पूर्ण १५ हजार रुपये रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखा विभागाकडून सर्व सात हजार ५६३ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजागरीला अवतरले चैतन्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
कोजागरी पौणिमेनिमित्त गुरुवारी दोन लाख भाविकांनी गर्दी केल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड परिसर भगवामय झाला. देवीच्या जागरण गोंधळाने चैतन्याची उधळण झाली. अभिषेकासाठी राज्यभरातून आलेल्या कावडीधारकांचे जल आदिमायेच्या चरणी अर्पण करण्यात आले.
पहाटेपासून कावड धारकांसह भाविकांची गर्दी झाल्याने सप्तशृंगगड परिसर गजबजून गेला. भकत म्हणून आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सपत्नीक आणि देणगीदार भाविक गुलशन पटेल यांच्या हस्ते पंचामृत महापूजा करण्यात आली. गुरूवारी सकाळी १० वाजेपासून कावडीधारकांसह भाविकांनी शिवालय तलावर गर्दी केली. आपापपल्या गटासोबत देवीच्या मंदिराकडे येताना दिसत होते. मंदिरात जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने दुपारी पायऱ्यामध्ये १५ ठिकाणी बाऱ्या लावून भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते. संस्थांनच्या प्रसादालयात भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभरात ३० ते ३५ हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. कावडीधारकांना सायंकाळी ७ वाजेनंतर देवीच्या अभिषेकासाठी शिप्रा, गोदावरी, नर्मदा, गंगा, जमुना, कावेरी, मुळा, मुठा, रामेश्वर, इद्रांयणी आदी पवित्र नद्यांचे जल घेण्यासाठी संस्थानमार्फत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. या सर्व नद्यांचे जल एकत्र करून सकाळी १० वाजता देवीच्या अभिषेकास सुरुवात करण्यात आली. यानंतर दुपारी १२ वाजता देवीची आरती होऊन कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र बोल मेरी अंबे, प्रेम से बोलो जय मातादी, सप्तश्रृंगी माता की जय, परशराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

तृतीयपंथींचा जागर
श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावर कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. तृतीयपंथींकडून कोजागरी पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले. तसेच ठिकठिकाणच्या कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथींनीही नृत्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंत्यांना सटाण्यात घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू करण्यात आलेले विजेच्या अघोषित भारनिमयना बरोबरच अधूनमधून सुरू असलेला विजेचा लंपडावमुळे व्यापारी वर्गासह शेतकरी, उद्योजक व विद्यार्थी अक्षरशः वैतागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर कार्यकारी उपअभियंता अनिल उईके यांना घेराव घालण्यात आला. तब्बल दोन तासांनंतर नाशिक येथील अधीक्षक अभियंता नाशिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गत महिनाभरापासून सटाणा शहरासह तालुक्यात वीजेचे भारनियमन सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांकडे पाणी असूनही वीज नसल्याने पिकांना पाणीपुरवठा करता येत नाही. तर उद्योजक, व्यापारी वर्गाला सततच्या भारनियमनामुळे मोठा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांच्याही सध्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने त्यांच्याही अभ्यासातही व्यत्यय येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कार्यकारी अभियंता अनिल उईके यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करून त्यांना घेराव घालण्यात आला.

यावेळी डॉ. व्ही. के. येवलकर यांनी वीज भारनियमनाबरोबरच वीज खंड‌ित होण्याने रुग्णांना ऑक्स‌िजन देणे, हॉस्पिटलमधील उपकरणे बंद असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होवून जीव‌ित हानी होण्याची शक्यता वर्तविली.

जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व माजी आमदार संजय चव्हाण यांनी नाशिकचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संवाद साधला. वीज उपलब्धता व मागणी यामधील तफावत वाढल्याने भारनियमन वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या आठवड्याभरात वीज भारनियमन बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात माजी आमदार संजय चव्हाण, शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, रत्नाकर सोनवणे आदींसह शेतकरी, व्यापारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ करणार सोशल ‘इंजिनीअरिंग’

$
0
0

नाशिक : भव्य इमारती आणि झगमगीत रस्ते उभारून स्वत:चे आयुष्य चकचकीत करण्याचे स्वप्न बघण्याऐवजी इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थिनी ग्रामपंचायतची निवडणूक लढवित आहेत. विशेष म्हणजे सिव्हिल शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींचे मुख्य ध्येय सोशल इंजिनीअरिंग घडवून गावात विकास साधण्याचे आहे.

एनडीएमव्हीपीच्या केबीटी इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये पूनम सानप आणि शारदा निफाडे या विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्या दोघीही सिव्हिल विद्याशाखेत अंतिम वर्षाला आहेत. त्यांच्यासोबतच्या शहरी पार्श्वभूमी असलेल्या अनेक वर्गमित्र आणि मैत्रिणींना पदव्युत्तर शिक्षण, मेट्रो शहरांमधील नोकरीच्या उच्च संधी आणि परदेशातील करिअरची ओढ आहे. मात्र, आपल्याला पाठबळ देणाऱ्या गावाच्याच पाठीशी उभे राहून गावाचे ‘करिअर’ घडवायचे असाच ध्यास निफाड तालुक्यातील शिंगवे येथील पूनम सानप आणि पिंपळसच्या शारदा निफाडे या विद्यार्थिनींनी घेतला आहे. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावाच्या विकासाचा मुद्दा अन् पारंपरिक चेहरे अशा वातावरणाला छेद देत ग्रामपंचायतच्या सदस्यपदासाठी या दोन्ही तरुणींनी प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे केले आहे.

या दोन्हीही तरुणींची शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली आहे. ज्या गावाने आम्हाला पुढे आणले त्या गावात अद्यापही रस्ते, वीज आणि पाण्यासारख्या प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागते, हे चित्र बदलणे ही नव्या पिढीची जबाबदारी आहे. त्यासाठी राजकारण आणि समाजकारण नक्कीच उपयुक्त ठरेल, या तत्वावर पूनम आणि शारदा या दोघी वर्गमैत्रिणींचा विश्वास आहे. त्यामुळे सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेताना दोघींनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने पूनम सानप यांनी ‘मटा’ शी बोलताना सांगितले.

दुहेरी जबाबदारी

दोघीही तरुणी सध्या सकाळी कॉलेज करून दुपारी प्रचारासाठी पुन्हा गावात येतात. पूनम यांच्या आईने यापूर्वी सदस्य पदावर काम केले आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते धोंडिराम आप्पा रायते यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात यायला प्रोत्साहन मिळाल्याने पूनम सांगतात. तर शारदा यांच्या मोठ्या बहिणीनेही शिक्षण घेताना निवडणूक लढवत सदस्य पदावर काम केले आहे. ज्या मातीतून आपण पुढे आलो तिला विसरून कसे चालेल? अशा आशयाचे या वर्गमैत्रिणींचे उदगार राजकारणाची नवी दिशा सुचवित आहेत.

यंग ब्रिगेडचे आव्हान

यंदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका खुल्या गटातून होत असल्याने गावोगावी या मुलींप्रमाणेच यंग ब्रिगेडने निवडणुकीत उडी घेतली आहे. उच्च शिक्षित व अवघ्या विशीतले तरुण-तरुणींनी जुन्या पिढीतील उमेदवारांपुढे काही ठिकाणी आव्हान उभे केले आहे. वयाच्या तांत्रिक अटीत बसत नसल्याने इतर पदांऐवजी अनेकांनी सदस्य पदासाठीच व्यूहरचना केली आहे. या यंग ब्रिगेडने उभ्या केलेल्या नव्या आव्हानाची जागोजागी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कायदापालन जबाबदारी हॉटेल व्यवस्थापनाचीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हॉटेल्समध्ये काय करावे आणि करू नये याबाबत स्पष्ट कायदे आहे. त्याची अंमलबजावणीची जबाबदारी हॉटेल व्यवस्थापन तसेच मालकांची आहे. कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणारच, असा इशारा ग्रामीण पोलिस दलाचे अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिला आहे.

इगतपुरी तालुक्यात १२५ पेक्षा जास्त रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत. बॉलिवुडसह निसर्गप्रेमींना वेड लावणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पर्यटन व्यवसायाने जोर पकडला आहे. निसर्गरम्य वातावरणाशी एकरूप होण्यासाठी मुंबईच नव्हे तर परदेशातील नागरिक येथे दाखल होतात. यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी तसेच अगदी दुर्गम भागात हॉटेल्स वा रिसॉर्ट सुरू झाले आहेत. यातील काही ठिकाणी अवैध प्रकार सुरू असतात. नुकतेच ग्रामीण पोलिसांनी बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये धांगडधिंगा घालणाऱ्या सात जणांवर कारवाई केली. या ठिकाणाहून मद्यप्राशन करून अश्लिल वर्तन करणाऱ्या सात तरुणींची सुटका केली. यातील काही मुली अल्पवयीन आहेत. दोन मुली नाशिकमधील तर उर्वरित पाच जणी मुंबईतील एका डान्सबारमधील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की संशयिताविरोधात अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यात हॉटेल मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यात हॉटेल तसेच रिसॉर्टची संख्या मोठी असून, कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी हॉटेल व्यवस्थापनाची आहे. आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाची नक्की मागणी काय आहे, त्यासाठी ग्राहकाकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी हॉटेल व्यवस्थापकांनी घ्यायला हवी, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मुलींसाठी काम करणाऱ्या एजंटांची झाडाझडती सुरू आहे.

स्थानिकांची पोलिसांना साथ

हॉटेलांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत स्थानिकांकडून पोलिसांना माहिती पुरविली जाते. त्यानुसार पोलिस कारवाई करतात. मोठ्या आवाजाचा इतर अवैध प्रकारांचा त्रास स्थानिकांना होतो. त्यामुळे स्थानिक थेट पोलिसांकडे तक्रार करतात. नागरिकांचा सकारत्मक प्रतिसाद मिळणे ही बाब चांगली असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील ‘पर्यटन’ ओसरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शनिवार, रविवार आणि शासकीय सुटी संपल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे सध्या शुकशुकाट दिसत आहे. भाविक, पर्यटनावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेला यामुळे चांगलीच खिळ बसली असून, अशीच परिस्थिती आणखी महिनाभर राहील असा अंदाज येथील व्यवसाय‌ीकांनी व्यक्त केला आहे. शाळा महाविद्यालयांच्या सत्र परीक्षा आणि त्यानंतर सणावारांचा माहौल असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या शांतता आहे.

गत वर्षांच्या तुलनेत यावर्षी यात्रेकरूंची संख्या घटल्याचे ठळकपणे जाणवत आहे. यावर्षी पाऊस जास्त झाला आणि पुराच्या बातम्या पसरल्याने भाविकांनी इकडे येण्यास टाळले. दूरध्वनीवरून येथील पूर परिस्थितीबाबत पुरोहित आणि नातेवाईकांकडे विचारणा होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले. सोशल मीड‌ियावरील अफवांमुळे पर्यटनावर परिणाम झाल्याचेही काही व्यावसायीक सांगतात.

वाहनतळाचे चुकीचे नियोजन

त्र्यंबकेश्वर येथे यात्रा कितीही वाढली तरी त्याचा फायदा ठरव‌िक परिसरातील व्यवसायीकांना होतो. असाच यापूर्वीचाही अनुभव असल्याने यात्रा पर्यटनाच्या तेजी-मंदी बाबत शहरात उदसीनता दिसून येते. यात्रा वाढली तरी ती आम्हाला काय फायद्याची असाच संवाद शहरातल्या बहुतांश परिसरात होत असतो. वाहतळ ते मंदिर असा थेट सरळ मार्ग गजबजलेला असतो. त्याच वेळेस संत निवृत्त‌िनाथ महाराज समाधी मंदिर आणि परिसरात शुकशुकाट असतो. वाहनतळाचे नियोजन करतांना शहरातील मोकळे शासकीय भूखंड वापरात आले तर निश्च‌ितच या परिसरातील व्यवसायीकांना लाभ होईल. तसेच मंदिर आणि सध्याचे वाहनतळ या एकमेव रस्त्यावर होणारी गर्दीही कमी होईल.

पुरातत्व खात्याचेही दुर्लक्ष

पावसाळा संपला आहे. मंदिराच्या पाठीमागे असलेले डोंगर हिरवेगार झाले आहेत. मंदिरावरही मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले आहे. तसे पाहता पुरातत्व खात्यास सिंहस्थपूर्व कामांसाठी चार कोटींचा भरीव निधी मिळाला होता. तथापि येथे नेमकेकोणते काम झाले याचे संशोधन आता करण्याची वेळ आली आहे. मंदिरावर हिरवे गवत उगवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकचा मनोरुग्ण सीमेवर आढळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

गुजरात राज्यातील भारतीय सीमेवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव शिवारातील मनोरुग्ण तरुण आढळून आला आहे. महिनाभरापूर्वी गायब झालेला हा तरुण थेट सीमेवर कसा पोचला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सीताराम सोमा वारे (२३) असे सीमेवर आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. तो त्र्यंबक तालुक्यातील आणि घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव शिवारातील हट्टीपाडा येथे राहतो. वेडाच्या भरात घरातून नेहमीच जात असल्याने त्याच्याकडे कुटुंबीयांचे दुर्लक्ष झाले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला शोधण्यास कोणी जात नाही. महिनाभरापासून तो घरातून असाच निघून गेला होता. गुजरातमधील भुज कच्छ वेस्ट या भागातील भारतीय सीमेवर सोमनाथ जवानांना आढळून आला. त्याला खावडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. त्याने आपली माहिती दिली. गुजरात पोलिसांनी घोटी पोलिसांशी संपर्क साधला. घोटी पोलिसांनी वारे कुटुंबीयांना सीतारामविषयी कळविले. दरम्यान, बिकट आर्थिक परिस्थिमुळे त्याला कच्छ येथे जाऊन आणण्यास इच्छुक नसल्याचे सीतारामचा भाऊ राजू सोमा वारे याने कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी नसल्यानं हैदराबाद-शिर्डी उड्डाणं रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, शिर्डी
अलायन्स एअर इंडियाने गुरुवारी अचानक मुंबई-शिर्डी आणि हैदराबाद-शिर्डी या दोन विमानांची सेवा रद्द केली. त्याचा मोठा फटका बसून प्रवासी शिर्डीतच अडकून पडले. विमान उड्डाणे का रद्द केली याचे स्पष्टीकरण विमान कंपनी देत नसली तरी, तरी पुरेसे प्रवासी मिळत नाही, हेच प्रमुख कारण असल्याचे समजते.
१ ऑक्टोबरपासून शिर्डीहून मुंबई आणि हैदराबादसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली. हैदराबादच्या सेवेला दररोज ५० ते ६० प्रवासी मिळतात, पण मुंबईच्या विमानात मात्र १५हून अधिक प्रवासी नसतात. गुरुवारी मात्र मुंबईसाठी २२ तर हैदराबादसाठी ५५ प्रवाशांनी बुकिंग केले होते, असे समजते. पण बुधवारी रात्रीच अलायन्स एअर इंडियाने शिर्डी एअरपोर्ट कंपनीला संदेश पाठवून गुरुवारी मुंबई व हैदराबाद सेवा रद्द राहील, असे कळविले. त्यामुळे गुरुवारी मुंबई व हैदराबाद येथून विमाने शिर्डीला आलीच नाहीत. त्याचा मोठा फटका बसून प्रवासी शिर्डीतच अडकून राहिले. अचानक उड्डाणे का रद्द झाली याची माहिती देण्यास अलायन्स एअरलाइन्सचे शिर्डीतील मॅनेजर अनिल पलटणकर यांनी असमर्थता दर्शवली. आज, शुक्रवारी मात्र दोन्ही विमाने शिर्डीला येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार, खासदारांची ‘एसपीव्ही’त नो एन्ट्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत स्थापन झालेल्या स्पेशल पर्पज व्हेइकलमध्ये (एसपीव्ही) खासदार व आमदारांची घुसखोरी करणारा महापौरांचा ठराव आयुक्तांनी फेटाळून लावला.

रिक्त दोन संचालकांच्या जागेवर उतरत्या पक्षबळानुसार काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात महापौरांना अवगत करून देण्याचे आदेश नगरसचिव विभागाला दिला आहे. आयुक्तांनी नगरसचिवांना पत्र लिहून ‘एसपीव्ही’च्या नियुक्त्यांची आठवण करून दिल्याने सत्ताधाऱ्यांना झटका बसला आहे.

स्मार्ट सिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसपीव्ही’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्या संचालक मंडळात सर्व पक्षाच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेत सत्ताबदल झाल्याने ‘एसपीव्ही’च्या संचालकांमध्ये फेरबदल झाले आहे. सिताराम कुंटे ‘एसपीव्ही’चे संचालक असून आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता या कंपनीचे संचालक आहे. तसेच प्रत्येक पक्षाचा एक सदस्य या कंपनीत संचालक असणार आहे.

काँग्रेसकडून शाहू खैरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरूमित बग्गा यांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु, बग्गा यांना विरोध करण्यासाठी महापौरांनी या ‘एसपीव्ही’त गटनेते आणि खासदार व आमदार असे नवीन दहा सदस्य संचालक करण्याचा ठराव केला होता. त्यामुळे बग्गांची नियुक्ती रखडली होती. परंतु आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नियमात अशी तरतूद नसल्याचे सांगत महापौरांचा ठराव फेटाळून लावला. तसेच नियमानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एक सदस्याची नियुक्ती करण्यासंदर्भात महापौरांना अवगत करून देण्याचे पत्र नगरसचिवांना दिले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना हा मोठा झटका मानला जात आहे. येत्या सभेत गुरूमित बग्गा आणि शाहू खैरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images