Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भूतबाधा उतरवण्यासाठी नरबळीचा प्रयत्न?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पवारवाडी भागातील एका शाळकरी मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगून तंत्रमंत्र करीत अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलिसांनी शनिवारी दुपारी रफिकबाबा उर्फ सांडू नामक बाबाला ताब्यात घेतले. अंधश्रद्धेतून गुप्तधन काढण्यासाठीच आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी संबंधितांनी अघोरी पूजा चालविल्याचा संशय पीडित मुलाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र, मुलाचे जायखेडा येथील मामाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी शनिवारी मालेगाव येथे धाव घेतली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मुलाचे वडील शेख ऐनुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा अजहरुद्दीन ऐनुद्दीन शेख (वय १८) गेल्या दोन वर्षांपासून त्याचे मामा मसूद लियाकत पठाण यांच्याकडे जायखेडा येथे कामकाजानिमित्त राहत होता. मोहरमनिमित्त तो २८ सप्टेंबर रोजी मालेगावकडे निघाला. मात्र, थेट घरी न जाता तो काका शहाबुद्दीन शेख ऊर्फ अलाउन्सर यांच्याकडे आला. त्या वेळी तेथे असलेल्या रफिकबाबाने त्याच्यावर भूतबाधा झाली असल्याची बतावणी करत उपचारासाठी म्हाळदे शिवारातील हाज्जीन सुलेमानी मशीनजवळील आपल्या पत्र्याच्या घरात नेले. ही माहिती शहाबुद्दीनने ऐनुद्दीन यांना दिली. ऐनुद्दीन मुलाला पाहण्यासाठी दोन-तीन दिवसांनंतर गेले असता, बेशुद्धावस्थेतील मुलाला अमानुषपणे बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. मुलाला मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसल्याने त्यांनी मुलाला तातडीने सटाणा रोडवरील द्वारकामणी दवाखान्यात दाखल केले. या घटनेविषयी मुलाच्या मामाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मालेगाव गाठत पाहणी केली. भयभीत अवस्थेतील अजहरुद्दीनने शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची पुसटशी कल्पना दिली. विचित्र वास असलेले औषध पाजून मारहाण करण्यात आल्याने त्यानी सांगितले. तत्काळ पालकांनी पवारवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने रफिकबाबाच्या घरात छापा टाकून त्याला पत्नीसह ताब्यात घेतले. घरातील संशयास्पद साहित्यदेखील जप्त करण्यात आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई पूर्ण झाल्यानंतरही रात्री साडेसात वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही झालेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलवारीचा धाक दाखविण्याऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये औरंगाबाद-मनमाड दरम्यान तलवारी उपसत दहशत निर्माण करणाऱ्या दोन शीख तरुणांविरोधात शनिवारी मनमाड लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. तलवारीच्या धाकामुळे डब्यातील शौचालयात काही प्रवाशी लपले होते. तेथून एका प्रवाशाने रेल्वे पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एक्स्प्रेस मनमाडला येताच आरपीएफ, रेल्वे पोल‌िसांनी तलवारीच्या जोरावर दहशत माजविणाऱ्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. सदर घटना औरंगाबाद रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे पुढील तपासासाठी आरोपीसह हा गुन्हा औरंगाबाद रेल्वे पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अर्जुन पगारे, सतीश सराक या प्रवाशांचे नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसच्या डी-२ या बोगीत सीट आरक्षित होते. गाडी औरंगाबादला आल्यानंतर ते डब्यात चढले. मात्र त्यांच्या जागेवर दोन शीख तरुण बसले होते. त्यांना दोघा प्रवाशांनी आरक्षणाबद्दल सांगितले. मात्र त्यांनी बाचाबाची सुरू केली व दोघांनी म्यानेतून तलवारी काढून दहशत निर्माण केली. तलवारी पाहून डब्यातील सर्वच प्रवाशांमध्ये भीती पसरली. भीतीपोटी प्रवासी डब्यात इकडे-तिकडे धावू लागले. महिला मुले शौचालयात जाऊन लपले. एका प्रवाशाने धावत्या ट्रेन मधील या तलवारनाट्याचे मोबाइलवर चित्रण केले. ही गाडी मनमाड स्थानकात शुक्रवारी सायंकाळी येताच पोल‌िस निरीक्षक के. डी. मोरे, रेल्वे सहाय्यक निरीक्षक नितीन पवार, एएसआय देवरे यांनी जसपालसिंग व हरजितसिंग या दोघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'छात्र भारती'चे मुरलीधर शहा यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

'छात्र भारती' या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सहकारी डॉ. मुरलीधर शहा यांचं आज पहाटे निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शहा यांच्या नेतृत्वाखाली नव्वदच्या दशकात 'छात्र भारती'नं महाराष्ट्रात आंदोलनाचा झंझावात निर्माण केला होता. अनेक प्रश्नांवर आंदोलन केली. शहा यांचं प्रभावी वक्तृत्व आणि कुशल संघटना कौशल्याच्या बळावर छात्र भारतीने अनेक लढे यशस्वी केले. यदुनाथ थत्ते यांच्या साथीनं बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो' आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते. छात्र भारतीची संपूर्ण ताकदही त्यांनी या आंदोलनात उतरवली होती. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी कथामाला, आंतर भारतीचेही काम ते करत होते. बाबा आमटे यांच्या 'आनंदवन'चे काम साप्ताहिक 'साधना' व शिबिरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम त्यांनी केलं. सुट्टीच्या काळात ते आनंदवनात जात.

शहा यांनी धुळे येथील जयहिंद महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधक मंडळाचे ते ट्रस्टी होते. महाराष्ट्र हिंदी राष्ट्र भाषा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. धुळ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक 'स्वतंत्र भारत'चे काही काळ संपादक होते. त्यांचे त्या काळातील अग्रलेख चांगलेच गाजले होते. अमृता प्रीतम यांच्या ' रसीदी तिकिट ' या पुस्तकाचं अनुवाद त्यांनी केला होता. राष्ट्र सेवा दलाचा इतिहास, डॉ. राम मनोहर लोहिया यांचं चरित्र, साने गुरुजीचं चरित्र आदी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींना मिळणार टॅबद्वारे शिक्षण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिनींना संगणक व तंत्रस्नेही पद्धतीने शिक्षण देता यावे यासाठी मनपा शाळा क्र ३३ आनंदवलीमध्ये डिजिटल शाळा निगडीत अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले. नन्हीकली उपक्रमांतर्गत या अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले असून नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळानुसार विद्यार्थिनींना शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. टॅबद्वारे विद्यार्थिनींना आता शिक्षण मिळू शकणार आहे. मुख्याध्यापक कैलास ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंती अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थिनींना बक्षिस वितरण करण्यात आले. वीणा देशमुख यांनी किशोरवयीन विद्यार्थिनींचे आरोग्य व स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. तर नंदिनी घुमरे यांनी शालेय शिस्त व वेळेचे महत्त्व या विषयावर प्रबोधन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलास शिंदे, नगरसेविका राधा बेंडकोळी, नगरसेविका राधा गांगुर्डे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला उपशिक्षिका सुरेखा घुमरे यांच्या माध्यमातून इनर क्लबकडून शाळेस मिळालेल्या सॅनिटरी सुविधेची पाहणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विष्णूपंत बेंडकोळी, संजय जाधव, भरत गांगुर्डे, बन्सी वाघ, केंद्रप्रमुख कैलास ठाकरे, नन्हीकली उपक्रमाच्या प्रोजेक्टर सविता पवार व श्रद्धा दाभाडे उपस्थित होत्या. शाळेतील उपशिक्षक व उपशिक्षका यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तनुजा देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कुंदा बच्छाव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिशू तज्ज्ञांचे मानधन वाढवणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवजात शिशू तज्ज्ञांचे मानधन वाढवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी (दि. ८) जिल्हा आरोग्य विभागाला दिले. आरोग्य मंत्र्यांनी अचानक भेट देत सिव्हिल हॉस्पिटलमधील नवजात शिशू विभागाची माहिती जाणून घेतली.

नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात प्रमाणापेक्षा जास्त बालकांवर होणारा उपचार तसेच इनक्युबिटरची कमी संख्येमुळे होणारे बाल मृत्यू यामुळे सिव्हिल हॉस्पिटल टीकेचे धनी ठरले. याबाबत प्रसार माध्यमात ओरड झाल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. सावंत यांनी सलग दोन दिवस भेट दिल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. यानंतर सीएसआरमधून सहा इन्क्युबिटर मिळाले. त्यांनाही लागलीच जागा उपलब्ध करून देत सिव्हिल प्रशासनाने यंत्रणा कार्यन्वित केली. रविवारी आरोग्य मंत्री सावंत मालेगाव दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी अचानक सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी कोणालाही माहिती न देता ते थेट सिव्हिल हॉस्पिटलच्या एसएनसीयू कक्षात गेले. कक्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या इन्क्युबिटर व्यवस्थेची पाहणी करीत त्यांनी कक्षाचे प्रमुख डॉ. पंकज गाजरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या महिन्यात येणाऱ्या नवीन सात इन्क्युबिटरसाठी सुरू व्यवस्थेचीही पाहणी केली. यासाठी नवजात शिशू तज्ज्ञाची आवश्यकता असून, त्यांचे मानधन वाढवण्याचा प्रस्ताव तयार करून सादर करा, असे आदेश सावंत यांनी दिले. मानधन वाढल्यास असे तज्ज्ञ सिव्हिल हॉस्पिटलसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक घरे एेरणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गेल्या अनेक महिन्यांपासून पडायला झालेले देवळालीगावातील बाबू गेणूरोडवरील जुने धोकादायक घर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळले. या घराचा काही भाग शेजारील घरावर कोसळल्याने या घराचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी यामुळे देवळालीगाव व परिसरातील धोकादायक घरांचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

देवळालीगावात धोकादायक व मोडकळीस आलेल्या जुन्या घरांची संख्या मोठी आहे. अशी घरे केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, अशी धोकादायक घरे मोठ्या प्रमाणात असूनही महापालिका प्रशासनाचे अशा घरांकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक जुन्या घरांमुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झालेला असूनही महापालिका प्रशासन मात्र या जुन्या घरांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

महापालिकेच्या अशा दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवरच देवळालीगावातील बाबू गेणूरोड ते भागवत गल्ली, अहिल्यामातारोड यादरम्यान असलेले निवृत्ती सहाणे यांच्या मालकीचे जुने घर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळले. हे जुने घर शेजारच्याच घरावर कोसळल्याने चंदू वराडे यांच्या मालकीच्या जुन्या घराचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही दुर्घटना रात्रीच्या ऐवजी दिवसा घडली असती, तर मात्र या घराजवळील रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.


पालिकेला दिली होती माहिती

शनिवारी मध्यरात्री कोसळलेल्या या जुन्या व धोकादायक घराबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना महिनाभरापूर्वीच लेखी अर्जाद्वारे माहिती दिली होती. या धोकादायक व मोडकळीस आलेल्या घराच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने तरीही दुर्लक्ष केल्याने उपाययोजना होण्यापूर्वीच हे जुने घर कोसळले. अशी अनेक धोकादायक घरे देवळालीगाव व परिसरात आहेत. मात्र, महापालिका प्रशासन या धोकादायक घरांच्या प्रश्नावर मूग गिळून आहे. परिणामी देवळालीगावातील नागरिक धोकादायक इमारतींमुळे धास्तावले आहेत. या दुर्घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही सुटीचे कारण पुढे करून महापालिकेचे कोणीही जबाबदार अधिकारी या घटनेची चौकशी करण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाने वाढला धोका

सध्या परतीचा पाऊस कोसळत असल्याने धोकादायक व जुनी घरे कोसळण्याचा धोका आणखी वाढला आहे. देवळालीगावातील अशा अनेक जुन्या व धोकादायक घरांत कोणीही वास्तव्याला नाहीत. संबंधित घरांचे मालकही इतरत्र वास्तव्याला आहेत. त्यामुळे अशा धोकादायक घरांपासून शेजारच्या कुटुंबांतील नागरिकांच्या जीवितास जास्त धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन गावातील धोकादायक घरांच्या मालकांना कायदेशीर नोटिसा देऊन या धोकादायक घरांप्रश्नी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

--


देवळालीगावात मोडकळीस आलेल्या धोकादायक घरांची संख्या मोठी आहे. अशी अनेक घरे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन या प्रश्नाची दखल घेत नाही.

-प्रकाश गोहाड, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात वीज पडून एका शेतकरी युवकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दोन बैल आणि एक बकरी असे तीन जनावरे देखील दगावली आहेत. तहसीलदार महेंद्र पवार यांनी या घटनास्थळांना भेट देऊन रविवारी पाहणी केली. शनिवारी रात्री झालेल्या वळवाच्या पावसात वीज पडल्याने चिंचओहळ येथील रहिवासी महादू शंकर गावित (वय ३०) हा शेतरकरी आपल्या रानातील घरात बसला असताना घरावर वीज पडली. यामध्ये तो जागीच मृत्यमुखी पडला. दरम्यान, नांदगाव कोहळी येथील कृष्णा नारायण आहेर या शेतकऱ्याचा बैल आणि कचरपाडा येथील धर्मराज नावाच्या शेतकऱ्याचा बैल अशी दोन जनावरे विजेने दगावली आहेत.

सुरगाण्यात विजांचा कडकडाट

कळवण : सुरगाणा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. दोन दिवस हजेरी लावलेल्या या पावसाने अन्य पिकांना फायदा होणार असला तरी ज्या शेतकऱ्यांचे भातपिक कापून शेतात होते अशा शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी चांगलीच कसरत करावी लागली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नाग‌र‌किांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नसंचातून बनविणार प्रश्नपत्रिका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी , नाशिक

गेल्या काही वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेच्या परीक्षांबाबत तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या चुकांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंजिनीअरिंग विद्याशाखेच्या प्रश्नपत्रिका प्रश्नसंचाद्वारे तयार करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. या जोडीलाच ‘मॉडेल’ उत्तरपत्रिकाही तयार करण्याच्या निर्णयाची जोड याला असणार आहे. पहिल्या टप्प्यात इंजिनीअरिंगच्या प्रथम व द्वितीय वर्षासाठी हा प्रयोग करण्यात येईल. यानंतर इतर विद्याशाखांनाही हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या सिनेट सभेत शनिवारी हे निर्णय घेण्यात आले. या सभेत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर सध्याच्या सिनेटचे सदस्य कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, आमदार डॉ. अपूर्व हिरे, जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अमोल शेटे आदी उपस्थित होते. विद्यापीठ कायद्यानुसार अद्याप सिनेट निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे नवे सदस्य नाहीत. त्यामुळे या सिनेट सभेत निवडक सदस्यच उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या २०१६-१७ सालच्या २९६ कोटी ९० लाखांच्या आर्थिक अहवालाला मान्यता देण्यात आली.

इंजीनिअरिंग विद्याशाखेच्या पहिल्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका प्रश्नसंचाच्या आधारे करण्यात येतात. याप्रमाणेच यंदापासून द्वितीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकादेखील प्रश्नसंचातून तयार करण्यात येणार आहेत. प्रश्नसंच हे विविध तज्ज्ञ प्राध्यापकांकडून तयार करण्यात येतील. प्राध्यापकांकडे उपलब्ध असणाऱ्या मॉडेल उत्तरपत्रिकांमध्ये काही प्रमाणात चुका असल्याने ‘सॉम’ विषयाची पुनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही योग्य पद्धतीने पार पडलेली नाही. यावर उपाय म्हणून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘मॉडेल’ उत्तरपत्रिकादेखील तयार करण्यात येणार आहेत.

---

आर्थिक अहवालात ३६ कोटींची तूट

जागतिक व देश पातळीवर होणाऱ्या आर्थिक घडामोडींचा विद्यापीठाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत आहे. विद्यापीठाचे स्वयंनिर्वाही धोरण अवलंबण्यावर केंद्र व राज्य सरकारचे धोरण, वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे शैक्षणिक खर्चातील वाढ, विद्यापीठात पायाभूत सुविधा पुरविणे, ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये घट यामुळे विद्यापीठाच्या आर्थिक कारभारावर भार पडला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक झाला. या कारणाने आर्थिक अहवालात तब्बल ३६ कोटी २ लाख रुपयांची आर्थिक तूट आढळून आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्यांच्या दिवाळीला स्वावलंबनाचा प्रकाश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अंधकारमय जीवनात तेजाचे दीप प्रज्वलित करण्यासाठी प्रत्येक वेळी कुणाकडून देणगीच कशाला हवी? आम्ही कष्टातूनच आमच्या लेकरांच्या मुखी गोडधोड घालणार अशा स्वाभिमानी बाण्याचे दर्शन नाशिकमधील एचआयव्हीग्रस्त घडवीत आहेत. त्यांनी बनविलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील डोळ्यांचे पारणे फेडत असून, स्वावलंबनाचा वस्तुपाठच एचआयव्हीग्रस्त त्यांच्या पुढील पिढीला देत आहेत.
एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने सोबत केल्यामुळे नाशिकमधील काही महिला, तसेच तरुणांच्या आयुष्यात अंधकार दाटला आहे. मात्र, या अंधकारावर अश्रू ढाळत बसण्यापेक्षा एचआयव्हीग्रस्तांनी उर्वरित आयुष्य प्रकाशवाटा शोधण्यासाठी खर्ची घालण्याचा संकल्प सोडला आहे. स्वत: स्वावलंबनाने जगावे आणि आपल्या लेकरांनाही स्वावलंबनाचेच धडे देण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. याकामी यश फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसह महिंद्र अँड महिंद्र लिमिटेडचा त्यांना मोठा आधार मिळाला आहे. पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून या महिलांना रोजगार मिळतोच; परंतु त्यांनाही जल्लोषात दिवाळी साजरी करता यावी यासाठी रोजगाराची नवी दालने खुली झाली आहेत. दोन तीन वर्षांपासून दिवाळी काळात आकर्षक पणत्या बनविणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांनी यंदा सुंदर आणि इको फ्रेंडली आकाशकंदिलाचे विविध प्रकारही हाताने घडविले आहेत. विशेष म्हणजे या वस्तूंना नाशिकसह पुणे, मुंबईतही मागणी वाढते आहे. आम्हाला आमचे आणि आमच्या कुटुंबाचे जगणे स्वावलंबनाने सुंदर करायचे आहे, अशी भावना या महिला व्यक्त करतात. त्यांनी बनविलेल्या सुबक आणि सुंदर पणत्या, आकाशकंदील इतरांच्या जीवनातही प्रकाश पेरण्याचे काम करीत आहेत.
घटस्थापनेला या वस्तू बनविण्याचा प्रारंभ करण्यात आला. ५० एचआयव्हीग्रस्त अडीच ते तीन हजार आकाशकंदील आणि १५ हजार पणत्या बनविण्यात व्यस्त असून, बाजारभावापेक्षाही माफक दरात या वस्तू मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ममदापूर संवर्धनासाठी सायकल ट्रॅक

$
0
0

वन्यजीव सप्ताह निमित्ताने सायकल रॅलीचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील हजारो हेक्टर वनक्षेत्र अन् त्यातील हरणे, काळवीट हे वन्यजीव म्हणजे निसर्गाचा एक अनमोल ठेवाच आहे. बागडती हरणे व काळविटांचा या भागातील मोठा संचार हा पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. याच वनक्षेत्रातील ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्राचा विकास करण्यासाठी वनविभागाने विविध योजनांना खऱ्या अर्थाने गती दिली आहे.

अधिकाधिक संख्येने वन्यजीवप्रेमींसह पर्यटक या भागाकडे आकर्षित व्हावेत यासाठी वनक्षेत्राला कुठलाही धक्का न लागू देता सोयीसुविधांची उभारणी करण्यात येत आहे. पर्यटकांना वनक्षेत्राची सायकल सफर करता यावी यासाठी वनविभागाच्या वतीने पर्यावरणपूरक ‘सायकल ट्रॅक’ निर्मितीचे काम प्रगतीपथावर असून, सध्या सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताह निमित्ताने हा सायकल ट्रॅक शनिवारी (दि. ७) सायंकाळी पर्यटकांसाठी खुला करून देण्यात आला.

वनक्षेत्रातील हजारोंच्या संख्येने असलेल्या हरणे, काळवीट या वन्यजीवांमुळे येवला तालुक्याचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलले आहे. वनविभागाने गेल्या काही वर्षात या भागाच्या विकासासाठी टाकलेली दमदार पावले यातून हे निसर्गसौंदर्य अधिकाधिक बहरण्यास हातभार लागला आहे. याठिकाणी येणाऱ्या वन्यजीवप्रेमींसह पर्यटकांसाठी उभारण्यात येत असलेल्या विविध सोयीसुविधांमध्ये वनक्षेत्रातील विविध ठिकाणी अनेक किलोमीटर पर्यावरणपूरक सायकल ट्रॅक, तर वनक्षेत्रानजिकच्या गावठाण जागेवर विश्रामगृहाची उभारणी आदींचा समावेश आहे.

यावेळी मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, उपवनसंरक्षक एम. रामानुजम यांच्या हस्ते सायकल ट्रॅकचे उद््घाटन केल्यानंतर या ट्रॅककरून वन्यजीव संरक्षणाचा संदेश देत काढण्यात आलेली सायकल रॅली सर्वांचे लक्ष वेधून गेली. सहाय्यक वनसंरक्षक आर. ए. कापसे, येवला वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, ज्येष्ठ वनाधिकारी एन. बी. भुरे, ज्येष्ठ पक्षीतत्ज्ञ दत्ता उगावकर, वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे यांच्यासह वन्यजीव अभ्यासक मृणाल घोसाळकर आदींची उपस्थिती होती. प्रास्तविक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी केले.

सायकल ट्रॅकची आखणी

या संवर्धन राखीव क्षेत्रात पर्यावरणपूरक पर्यटनासाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. त्यातील राजापूर वनहद्दीत ७, ममदापूर ९, सोमठाण जोश ४, तर देवदरी २ किलोमीटर अशा एकूण २२ किलोमीटरवर सायकल ट्रॅकची उभारणी प्रस्तावित आहे. हौशी पर्यटकांना वनक्षेत्राची ही सायकल सफर व्हावी या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर सध्या १० सायकल खरेदी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

$
0
0

इगतपुरी शहराचा पाणीप्रश्न सुटणार

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी शहरासाठी भावली धरणातून नळ पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेला त्वरित मंजुरी देऊन निधी वितरित करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी नगरविकास खात्याला दिले आहेत, अशी माहिती भाजपा नेते महेश श्रीश्रीमाळ यांनी दिली.

इगतपुरी शहरासाठी ७०च्या दशकातील जुना नगरपालिका तलाव आहे. तसेच, तळेगाव येथील तलावातूनसुद्धा पाणीपुरवठा होतो. परंतु, हा पुरवठा शहराच्या लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहे. त्यात जलशुद्धिकरण केंद्राची क्षमता अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा आठवड्यातून तीनदा तेही फक्त एक तास नळाला पाणी येते. उन्हाळ्यात तर खूपच हाल होतात. पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मागील वर्षी भाजपनेते महेश श्रीश्रीमाळ यांनी आग्रह करून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांना भावली धरणावर घेऊन गेले. या योजनेबद्दल माहिती दिली. गिरीश महाजन यांनी या योजनेला गती देण्याबाबत ग्वाही दिली.

पालकमंत्री गिरीश महाजन यांचे पत्र तसेच आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, इगतपुरीच्या तत्कालीन नगराध्यक्षा जनाबाई खातळे यांच्या पत्रासोबत स्वतःचे पत्र जोडून महेश श्रीश्रीमाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सागर हांडोरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब सदर पत्र कार्यवाहीसाठी पुढील विभागास पाठवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी या आरोग्य केंद्रात वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. सायंकाळनंतर निवासी आरोग्य अधिकारीही या आरोग्य केंद्राकडे फिरकत नसल्याने हे आरोग्य केंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.

या आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांवर उपचारांबाबत रात्रीच्या वेळी तर ड्युटीवरील नर्सला आरोग्य अधिकारी फोनद्वारे मार्गदर्शन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार या आरोग्य केंद्रात घडत असल्याने अशा प्रकारच्या उपचारांतून आरोग्य अधिकारी रुग्णांच्या जिवाशीच खेळ करीत असल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचा हा सावळागोंधळ जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही दुर्लक्षित होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या आरोग्य केंद्रातील उपचार बेभरवशाचे झाले आहेत. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे जगन्नाथ आगळे व युवासेनेचे नवनाथ गायधनी यांनी केला आहे. शिंंदे येथील आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी मिळावेत, निवासी न राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, पळसे येथील आरोग्य उपकेंद्र वाऱ्याव सोडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीही चौकशी व्हावी व त्यांच्यावरही कायदेशीर करण्याची मागणी जगन्नाथ आगळे, नवनाथ गायधनी, सरपंच देवीदास गायधनी आदींनी केली असून, प्रसंगी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


पळसे उपकेंद्रातही परवड

पळसे येथे शिंदे आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे. या उपआरोग्य केंद्रात एकच नर्स नेमणुकीस आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या उपआरोग्य केंद्रातील नर्सदेखील अनुपस्थित असल्याने येथील आरोग्य उपकेंद्र असून, अडचण नसून खोळंबा ठरू लागले आहे. या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या रुग्णांना या आरोग्य उपकेंद्राला टाळे बघून माघारी परतावे लागत आहे.

शिंदे आरोग्य केंद्र व पळसे आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतच्या नागरिकांच्या तक्रारीची तालुका आरोग्य अधिकाऱ्यामार्फत शहानिशा केली जाईल. त्यात तथ्य आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- डॉ. सुशील वाकचौरे, आरोग्य अधिकारी, जि. प.

---

शिंदे आरोग्य केंद्र व पळसे येथील उपकेंद्रांतील आरोग्य सुविधा पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी सध्या रामभरोसे झाली आहे. सायंकाळनंतर तर येथे डॉक्टर्स उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील इमर्जन्सी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाची येथील कर्मचाऱ्यांवर मेहेरबानी सुरू आहे.

- नवनाथ गायधनी, माजी सरपंच, पळसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दप्तरांची पुनर्तपासणी

$
0
0

महसूल आयुक्त महेश झगडेंचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गावपातळीवरील गाव दप्तर महसूल खात्याचा महत्त्वाचा दस्तऐवज असतो. हा दस्तऐवज त्रुटीरहित राहण्यासाठी विभागातील महसूल यंत्रणेने साफ दुर्लक्ष केल्याची बाब नुकतीच विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आली होती. यात आता गावदप्तरांची नव्याने तपासणी होणार आहे, याने आता विभागीय आयुक्तांच्या या धडक कारवाईमुळे आजवर गावदप्तरांची तपासणी घरबसल्या करून शंभर टक्के बरोबर असल्याचा शेरा देणाऱ्या अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.

गावपातळीपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या महसूल अधिकाऱ्यांत कुणाचाच पायपोस कुणात राहिलेला नसल्याचेही उघड झाले आहे. या गंभीर बाबीची विभागीय आयुक्तांनी दखल घेतली असून, एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालणाऱ्या अधिकाऱ्यांना सापडून काढण्यासाठी त्यांनी गावदप्तरांची नव्याने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायव्यवस्थेवर प्रचंड ताण

सध्या अर्धन्यायिक व न्यायिक अपिलांच्या संख्येत दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेचा कालापव्यय वाढण्याबरोबरच नागरिकांनाही विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे तलाठी कार्यालयातील जमिनींचे अभिलेखे नियमाप्रमाणे असल्याचे व तपासणीत शंभर टक्के बरोबर असल्याचे नमूद केली जातात. तर दुसरीकडे अपिलांची संख्या प्रचंड वाढलेली दिसून येते. याचा अर्थ नियमाप्रमाणे मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी या महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून गावदप्तरांची तपासणी नियमाप्रमाणे होत नसल्याचे विभागीय आयुक्तांनी दि. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत सोदाहरण सिद्धही केली होते. महसूल अधिकाऱ्यांच्या या एकमेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रकारामुळे न्यायव्यवस्थेवर प्रचंड ताण वाढला आहे.

यादी विभागीय आयुक्त जाहीर करणार

आतापर्यंत गावदप्तर तपासणीसाठी महसूल अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे गावांची निवड करीत होते. यात बऱ्याचदा राजकीय व्यक्तींची मर्जी राखण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे येथून पुढे कोणत्या अधिकाऱ्याने कोणत्या गावांची दप्तर तपासणी करावी याची यादी विभागीय आयुक्तच जाहीर करणार आहेत. या कार्यवाहीचा अहवालही विभागीय आयुक्तांनी तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दोषी अधिकाऱ्यांची थेट चौकशी

नियमानुसार मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त गावदप्तरांची शंभर टक्के, तहसीलदारांनी ४८, उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३६ तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ गावदप्तरांची तपासणी करणे बंधनकारक आहे. या तपासणीत काही त्रुटी आढळल्यास कलम २५७ नुसार त्यांचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठवला पाहिजे. परंतु, या कलमांतर्गत विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याने सक्षम अधिकाऱ्यांकडे त्रुटी दूर करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवलाच नसल्याची गंभीर बाब उघडकीस आल्याने महसूल प्रशासन मोडकळीस आले आहे. आता नव्याने गावदप्तर तपासणी करून त्यात त्रुटी आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांची प्राथमिक चौकशी न करता थेट विभागीय चौकशी करून घटनेच्या अनुच्छेद ३११ कलमान्वये अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही विभागीय आयुक्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी इफेक्ट’ने ग्राहकांमध्ये संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी साजरी करण्याचा उत्साह नाशिककरांमध्ये असला, तरी जीएसटीच्या नावाखाली वाढलेल्या महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. सर्वच वस्तूंवर जरी जीएसटी लागू नसला, तरी ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा काही विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे खरेदीबाबत ग्राहकांत संभ्रम दिसून येत आहे. मात्र, दिवाळी तोंडावर आल्याने खरेदीला वेग आला आहे.

वेगवेगळ्या वस्तूंचा कच्चामाल बाहेरच्या देशांमधून आयात व निर्यात केला जाताे. आयात-निर्यातीतील कर १३.५ टक्क्यांवरून थेट २८ टक्क्यांवर पोहोचला असल्याने उत्पादनांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम ग्राहकांवर झाला असून, अनेक वस्तूंबाबत हात आखडता घेतला जात आहे. त्याचमुळे सुरुवातीला बाजारपेठेत काहीसा निरुत्साह दिसून येत होता. मात्र, जसजशी दिवाळी जवळ येत आहे, तसतशी बाजारात गर्दी दिसू लागली आहे. मात्र, जीएसटीमुळे बाजारात खरेदीबाबत संभ्रम दिसून येत आहे. दिवाळीत वाचकांसाठी मुख्य आकर्षण असलेल्या दिवाळी अंकांची किंमतही जीएसटीमुळे वाढली आहे. काही अंकांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे. आधीच दिवाळी अंकांकडे वाचक खेचण्याचे आव्हान असताना या वाढलेल्या किमतींमुळे खप कमी होण्याची भीती विक्रेते व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेक इन इंडियाला ‘झळाळी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे सणासुदीच्या दिवसांत घराची शोभा वाढविणारा आकाशकंदील अन् लायटिंगच्या. सध्या अशा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खरेदीला वेग आला असून, त्यात भारतीय बनावटीच्या वस्तूंनाच प्राधान्य दिले जात असल्याने मेक इन इंडियाला झळाळी मिळाल्याचे चित्र आहे.

पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या साध्या, कापडी, प्लास्टिकच्या कागदापासून निर्मित, तसेच पर्यावरणपूरक अशा टिंटेड पेपरपासून बनविलेल्या कंदिलांना पसंती मिळत असून, अगदी ८० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंतच्या किमतीचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. दरात गतवर्षीच्या तुलनेत साधारणपणे १५ ते २० टक्के वाढ झाली असून, या कंदिलांमध्ये कपड्यापासून बनविलेले कंदील ४८० रुपये, लॅम्प कंदील २६० रुपये, चटई कंदील ५३० रुपये, दोरा बॉल २५० रुपये अशा किमतीत उपलब्ध असून, कमळ, हंडी, डमरू, झालर, डबल झालर, तुळस, थ्री लेअर कंदील, गोल, षट्कोनी, चांदणी, सूर्यफुलासारखे

विविध आकार उपलब्ध आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवण्यासाठी रंगीत लायटिंगची व्यवस्था असलेले कमळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

--

‘चायनामेड’वर संक्रांत

गेल्या वर्षी बाजारात दाखल झालेल्या वेताच्या काडीपासून बनविलेले आकर्षक कंदील यंदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे चायनामेड कंदिलांवरील संक्रांत यंदाही कायम आहे. मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा आंध्र प्रदेशातून आलेले व्यावसायिक शहरातील उपनगर, गांधीनगर, सातपूर, सिडको, पंचवटी अशा विविध परिसरात विखरून वेतापासून बनविलेल्या विविध आकारांच्या कंदिलांची करीत आहेत.

--

वैशिष्ट्यपूर्ण लायटिंग...

--

प्रकार - दर (रुपये)

बॉम्बे कॅप १८०

डायमंड कॅप २५०

आठ एमएम लायटिंग २२०

पद्य लायटिंग ४५०

लोट्स कंदील लायटिंग ३७०

फ्लॉवर, कंदील, गोटी १२० ते २००

स्टार लायटिंग २०० ते ३५०

--

इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये यंदा मेक इन इंडिया उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता झाली आहे. चायनासारखेच दिसत असल्याने त्यापेक्षा अधिक टिकाऊ असल्याने बहुसंख्य ग्राहक भारतीय वस्तूंची खरेदी करीत आहेत.

-अंकुश मंत्री, विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅम्पमध्ये खरेदीला उधाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

दिवाळीच्या आधी आलेला रविवार म्हटला, की देवळाली कॅम्पमधील लेव्हिट मार्केटमध्ये रेडिमेड कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होणार हे समीकरण अनेक वर्षांपासून पक्के झाले असून, कालही मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

देवळालीच्या लेव्हिट मार्केटमध्ये वाजवी दरात कपडे खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. नाशिकसह सिन्नर, इगतपुरीसारख्या तालुक्यांमधून रविवारी ग्राहकराजा देवळालीच्या लेव्हिट मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्याचे दिसून आले. सध्या ग्राहकांकडून महिला व लहान मुलांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असून, मोठ्यांकडूनही काही प्रमाणावर खरेदी होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. येथील व्यापारी सौदी अरेबिया, दिल्ली, मुंबई, सुरत, अहमदाबाद अादी ठिकाणांहून माल विक्रीसाठी आणतात. वेस्टर्न आउटफिट्सच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वाढती गर्दी दिसून आली.

--

या प्रकारांची चलती

यंदाच्या दिवाळी खरेदीत विविध सिनेमांमध्ये वापरल्या गेलेल्या कपड्यांचे प्रकार खरेदी केले जात असून, यामध्ये लहान मुलांमुलींच्या कपड्यांमध्ये फोंचो, ट्यूबलाइट पॅटर्न, जॅकेट-टी शर्ट, मोठ्यांच्या कपड्यांमध्ये जॉगर्स, प्रिंटेड शर्ट, डस्टी शेड शर्ट, सिक्स पॉकेट, कार्गो, स्ट्रक्चर जीन्स, तर महिलांमध्ये रईस व बादशहा पॅटर्नची यंदा चलती असल्याचे दिसून येते आहे. जीएसटीच्या फेऱ्यामुळे यंदा दर वर्षीपेक्षा कमी प्रमाणात कपडे विक्री करण्यासाठी आणले असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

--

चौकाचौकांत थाटली दुकाने

दिवाळीनिमित्त येथील चौकाचौकांत दुकाने थाटण्यात आली अाहेत. लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू, चायना बाजार, पडद्याचे कपडे, किलोच्या भावाने मिळणारे पडद्याचे कापड, ब्लँकेट, जेकेट्स, प्लास्टिकच्या गृहपयोगी वस्तू अशा नानाविध प्रकारचे वस्तू थेट रस्त्याच्या कडेला उपलब्ध करून देत ग्राहक वळविण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून केला जात आहे. त्यामुळेही रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यासाठी दुचाकी व चारचाकींची गर्दी होत आहे.​ कॅन्टोन्मेंट बोर्ड व वाहतूक पोलिसांनी सध्या होणारी ग्राहकांची गर्दी लक्षात घेता शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी व्यावसायिकांसह नागरिकांकडून होत आहे.

---

लहान मुलांचे व महिलांचे कपड्याची बऱ्यापैकी खरेदी होत असून, मोठ्यांच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये अजून फारशी गर्दी झालेली नाही. पुढील आठवड्यात आणखी गर्दी वाढू शकेल.

-उमेश गोडसे, कपडे विक्रेता

--

दिवाळी म्हटली, की लहान मुले व घरातील महिलांमध्ये खरेदीचा उत्साह संचारतो. यंदा महागाई जाणवत असली, तरी येथे कपडे खरेदी करण्यासाठी आलो आहोत.

-हेमंत नारद, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’मध्ये अडवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

ट्रान्स्पोर्ट, प्रवासी वाहनांना दोन वर्षांनंतर आरटीओचे फिटनेस सर्टिफिकेट घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयात वाहनांची स्वयंचलित वाहन केंद्रावर लाइट सेटिंग, ब्रेक, इंजिन आदींची तपासणी केली जाते. मात्र, ही तपासणी करीत असताना वाहनधारकांची अडवणूक करून लूट केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत.

वाहन फिटनेस सर्टिफिकेटसाठी तपासणी करीत असताना एका ठराविक केंद्रावर लाइट सेटिंग केली, तरच वाहने पासिंग केली जातात, असा अघोषित फतवाच आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी काढला असल्याच्या अनेक वाहनधारकांच्या तक्रारी आहेत. फिटनेस सर्टिफिकेट घेताना बऱ्याचदा लाइट सेटिंगच्या अडचणी असतात. पण, लाइट सेटिंग इतरही अनेक ठिकाणी करणे शक्य असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. मात्र, आरटीओ कार्यालयापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंटरमधून सेटिंग केल्याची पावती असल्याशिवाय वाहन पासिंग केले जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा इतर ठिकाणावरून लाइट सेटिंग करून आणणाऱ्यांची वाहने पास केली जात नसल्याच्या तक्रारी असून, इतर ठिकाणी केलेली लाइट सेटिंग ग्राह्य धरली जात नसल्याचा आरोप होत आहे.

आरटीओ कार्यालयाकडून दररोज दोनशेपेक्षा अधिक टेम्पो, ट्रक आणि इतर अनेक वाहने फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी कार्यालयात येतात. फिटनेस इन्स्पेक्शन व सर्टिफिकेटचे ६०० रुपये, मिसलेनियस चार्जेस म्हणून वाहन तपासणी मशिनचे २०० आणि पेनल्टी असे अधिकृत पैसे द्यावे लागतात. शिवाय कागदपत्रांसोबत ३०० रुपयांपासून अधिक रक्कम वाहनांप्रमाणे द्यावी लागते. यातून हजारो रुपयांची दररोज उलाढाल होते.


अधिकाऱ्यांच्या सहभागाचा आरोप

तवली फाटा येथील एका सेंटरमध्ये हेडलाइट बीम अलाइनमेंट, अॅक्सेसरीज आणि फिटिंग करून दिले जाते. त्यासाठी २५० रुपयांपासून पुढे पैसे घेतले जातात. शिवाय अॅक्सेसरीज आणि फिटिंगसाठी वेगळे पैसे घेतले जातात. पण, तेच काम इतर ठिकाणी १०० ते १५० रुपयांत केले जाते. त्यामुळे या केंद्राद्वारे वाहनधारकांची लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे. संबंधित सेंटर काही आरटीओ अधिकाऱ्यांमार्फतच चालविले जात असल्याने तेथे हजारो रुपयांची उलाढाल होते, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर तेथे तपासणीसाठी येणाऱ्या वाहनधारकांनी दिली. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून सर्वसामान्य वाहनधारकांची लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

--

वाहन फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून विशिष्ट सेंटरची पावती बघितल्याशिवाय वाहने पासिंग केली जात नाहीत. त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून, ती थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत.

-रामचंद्र काळे, वाहनधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉपिंगचा सुपर संडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रकाशाचा सण म्हणजेच दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठ व नाशिककर सज्ज झाले आहेत. दिवाळी एक आठवड्यावर येऊन ठेपली असल्याने रविवारची सुटी साधून शहरवासियांनी दिवाळीची खरेदी करण्यास पसंती दिली. नवीन कपडे, पणत्या, आकाशकंदील, गृहसजावटीचे साहित्य आदींच्या खरेदीची धामधूम सुरू झाली असल्याचे त्यामुळे रविवारी बाजारात दिसून आले. मात्र, अवेळी आलेल्या पावसाने खरेदीदारांच्या उत्साहावर पाणी फेरत नाशिककरांची तारांबळ उडवली.

दिवाळीच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. सराफी पेढ्या, कापड मार्केट, स्वीट मार्ट आदी सर्वच विक्रेत्यांनी ग्राहकराजाच्या मागण्या पुरवण्यासाठी आकर्षक वस्तू व ऑफर्ससह दुकाने थाटली आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या व विशेषतः लहानांपासून मोठ्यांसाठी असलेल्या कपड्यांची दुकाने थाटली आहेत. रविवारची सुट्टी असल्याने अनेकांनी दिवाळी खरेदी या दिवशीच पूर्ण करण्याचे नियोजन आखले होते. काही दिवसांपासून दुपारनंतर पाऊस पडत असल्याचा अंदाज घेत रविवारी सकाळी लवकरच बाजार फुलण्यास सुरुवात झाली होती. विक्रेत्यांनीही दिवाळीचा माहोल पाहता सध्या दुकाने लवकर उघडण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे चार ते पाच वाजेपर्यंत हे चित्र बाजारात होते.

किराणा दुकाने फुल्ल

दिवाळीत कपडे, फटाके, पणत्या, आकाशकंदील यांबरोबरच आकर्षण असते ते फराळाचे. आजचा काळ रेडीमेडचा असला तरी घरीचे फराळ बनविण्याची आवडही अनेकींना असते. त्यासाठी आवश्यक सामान खरेदीसाठी महिलावर्गाची मोठी गर्दी बाजारात आहे.

वाहतूक कोंडी

शहरातील मुख्य बाजारपेठा म्हणून ओळखल्या जात असलेल्या मेनरोड, शालिमार, दहीपूल या ठिकाणी सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत असते. चारचाकींमुळे कितीतरी वेळ वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांनादेखील ताटकळत उभे राहावे लागते. सध्या दिवाळीच्या गर्दीमुळे बाजारात पुन्हा वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे या परिसरात चारचाकी वाहनांना किमान सणासुदीच्या काळात बंदी करण्यात यावी, अशा प्रतिक्रिया ग्राहकवर्गाकडून देण्यात येत आहे.

पावसामुळे हाल

बाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी, वाहतूक कोंडी आणि त्यातच अवेळी आलेला पाऊस यामुळे नाशिककरांची चांगलीच निराशा झाली. संध्याकाळनंतर कोसळलेल्या पाऊसधारांनी अनेकांचा खरेदीचा मूड बदलत चालला होता. मेनरोडला कपड्यांसह दिवाळीचे साहित्य विकणाऱ्या फेरीवाल्यांचेही पावसाने चांगलेच हाल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगणक साक्षरतेची निकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या आधारावर समाज मोठी वाटचाल करीत असला, तरी अद्यापही आर्थिक व सामाजिक दरी मोठी आहे. ही दरी संगणक साक्षरतेसारखे आधुनिक काळासोबत चालणारे उपक्रम भरून काढू शकतात.

सर्व समाजास सोबत प्रगतिपथावर नेण्यासाठी संगणक साक्षरता ही कॉम्प्युटर सोसायटीची मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.

कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने सपकाळ नॉलेज सिटी, अरेस सॉफ्टवेअर लिमिटेड, नाशिक, ट्रायमार्क हेल्थ नाशिक व मिनीटेक सिस्टिम्स नाशिक यांच्या सहकार्याने यंग आयटी प्रोफेशनल्स (सीएसआयवायटीपी-२०१७) आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेंतर्गत श्रेयाशी दत्त यांना प्रथम, श्रेष्ठा अनाथा यांच्या संघास द्वितीय व प्रभाकर गडुपुड्डी व संघास उत्तेजनार्थ परितोषिके देण्यात आली.

यावेळी सकपाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. यासंदर्भातील स्पर्धेत संपूर्ण देशभरातून विविध आयटी क्षेत्रांतील स्पर्धकांनी भाग घेतला. या विभागीय स्पर्धा संस्थेच्या लखनौ, कोलकाता, बडोदा, भुवनेश्वर, बंगळूरू, पुणे, कोईमतूर येथे घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील विजेते स्पर्धक नाशिकमध्ये सहभागी झाले. अंतिम फेरीसाठी श्रीकांत करोडे, आर. एस. तिवारी, रोहित कुलकर्णी, हुसैन दाहोदवाला परीक्षक म्हणून लाभले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण कुलगुरू वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले.


‘सीएसआय’च्या उपक्रमांचे कौतुक

कुलगुरू डॉ. वायुनंदन म्हणाले, की नाशिकची भौगोलिक परिस्थिती अतिशय चांगली आहे. भारतात झपाट्याने प्रगत होत असलेल्या शहरांमध्ये नाशिकचे नाव घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शाखेच्या माध्यमातून नाशिकचा संगणक क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करण्यास मोठा वाव आहे. सध्या सुरू असलेले कॉम्प्युटर सोसायटीचे विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंद्रधनुष्य’मध्ये सहभागी व्हावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव व भिवंडी ही शहरे लसीकरणाबाबत मागे असून, येत्या तीन महिन्यांत राबविण्यात येणाऱ्या विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेद्वारे हे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत वाढावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बालकांच्या आरोग्यासाठी विविध लसी मोफत देण्यात येत आहेत. लसीकरणाबाबत गैरसमज असतील ते दूर करून बालकांच्या आरोग्यासाठी विशेष इंद्रधनुष्य मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दीपक सावंत केले.

राज्यस्तरीय विशेष इंद्रधनुष्य मोहिमेचा शुभारंभ रविवारी (दि. ८) आरोग्य मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत व ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी सावंत बोलत होते. यानिमित्ताने मालेगाव येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद््घाटन व महिला व बाल रुग्णालय इमारतीचे नूतनीकरण कामांचा शुभारंभही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री सावंत व राज्यमंत्री भुसे यांच्या हस्ते बालक इनामुर रेहमान जावेद कैसर व सुजाता चव्हाण यांच्या नवजात बालकास लस देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे हस्ते इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेबाबत माहितीपटाचे अनावरण केले. यासाठी योगदान देणारी रोटरी क्लब सदस्य आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी महापौर शेख रशिद शेख शफी, उपमहापौर सखाराम घोडके, माजी आमदार मुक्ती महंमद इस्माइल, मौलाना अब्दुल बारी, प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपसंचालक डॉ. लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार

मालेगावकरांच्या आरोग्यासंबंधीच्या समस्याबाबत राज्यमंत्री भुसे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, माझ्या कार्यकाळात मालेगावच्या आरोग्यविषयक मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन डॉ सावंत यांनी दिले. तसेच येथील सामान्य रुग्णालयतील रिक्त पदे, विविध मशीन्स, ब्लड बँक हे प्रश्न येत्या सहा महिन्यांत मार्गी लागण्याची ग्वाहीही डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना दिली. राज्यस्तरीय मिशन इंद्रधनुष्यासाठी मालेगावची निवड सार्थ ठरवून येथे मोहिमेची अंमलबजावणी तंतोतंत करण्यात येईल, असे ग्रामविकास राज्यमंत्री भुसेंनी सांगितले. तसेच महिला व बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये प्राप्त झाले असून, यासाठी वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग महाविद्यालयासाठी वसतिगृह व कर्मचारीही लवकर दिला जावा, ही अपेक्षा राज्यमंत्री भुसे यांनी व्यक्त केली. यावेळी विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images