Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मालवाहतूकदार संपाचा औद्योगिक क्षेत्राला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद ठेवण्यात आली. याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला.

मालवाहतुकीला जीएसटीमध्ये जास्त कर लावल्याने व डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या किमतीमुळे देशभरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस देशव्यापी संपाची हाक दिली. त्याला नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के मालवाहतूकदार संपात सहभागी झाले. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार गाड्या उभ्या होत्या. सोमवारी व मंगळवारी प्रवासात असलेली वाहने वगळता इतर सर्व वाहने संपात सहभागी झाली. माल वाहतूकदारांच्या संपामुळे मुंबई-आग्रारोडवरील वाहतूक तुरळक होती. सरकारने या संपाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा संघटनेचा विचार असल्याचा इशारा वाहतुकदारांनी दिला आहे. संपामुळे मालवाहतूक ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

सरकारने जीएसटीची अन्यायकारक आकारणी करू नये, डिझेलचे दर कमी करावेत, मालवाहतूकदारांना वाहतूक पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत होणारा त्रास कमी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, टोल संदर्भातील व्यावहारिक धोरण आखावे आदी विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हा संप सुरू झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर देशभरातील मालवाहतुकीचे बुकिंग व डिलिव्हरीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळत सर्व मालवाहतूक ठप्प होती. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्राला झाला. अनेक कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा न झाल्याने उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली. सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास दिवाळीनंतर बेमुदत संप केला जाणार आहे. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल.
- अंजू भगवानदास सिंघल, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि. १०) बेमुदत संपाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. संपामुळे कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्या मान्य व्हाव्यात, यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटना चार वर्षांपासून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु, अजूनही अनेक मागण्या मान्य होऊ शकलेल्या नाहीत. सरकारने पुरवठा निरीक्षकपद सरळसेवेतून भरण्याचा निर्णय घेतल्याने अव्वल कारकूनांवर अन्याय होणार आहे. त्यांनी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील २५३ अव्वल कारकून, ३४३ लिपिक, वाहनचालक ४१ तसेच १८२ शिपाई तसेच २४ पदोन्नत नायब तहसीलदार असे एकूण ८४३ कर्मचारी सहभागी झाले आहेत. यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प‍्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

नागरिकांची गैरसोय

महसूल कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने नागरिकांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. तहसील कार्यालये, पुरवठा व‌िभाग, टंचाई शाखेसह विविध कार्यालयांमध्ये कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या टेबल खुर्च्यांचे दर्शन घडले. कार्यालयात कर्मचाऱ्यांनी संपाबाबतचा सूचना फलक लिहिला असून नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअर्स असोसिएशनचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यासाठी मंगळवारी जिल्हापरिषदेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व कॉन्ट्रॅक्टर व त्यांच्यावर अवलंबून असलेले कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
मुख्य लेखाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धनादेश वितरित करण्यात आले आहे. या बँकेचे कामकाज ठप्प असल्याने तेथून पैसे मिळवण्यास अडचण येते आहे. ती अडचण दूर करण्यात येऊन आम्हाला रोख स्वरुपात पैसे देण्यात यावे. तसेच मार्च २०१७ पर्यंत जी बिले देण्यात आली आहेत त्यांचे पैसे आद्यप मिळालेले नाही. ते पैसे व्याजासह देण्यात यावे. संघटनेच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सने वेगवेगळ्या बॅँकाकडून कर्ज घेतले आहे. ते फेडण्यास कॅन्ट्रॅक्टर हतबल आहेत. लोकांचे देणी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे बाजारात तोड दाखवणे मुष्कील आहे. त्यामुळे अर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. येत्या तीन दिवसात पैसे देण्यात यावे; अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यत येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियामुळे तरुणाई डिप्रेशनमध्ये

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : jitendratarte@MT

नाशिक : वाढती स्पर्धा, तणावपूर्ण जीवनशैली आणि अपेक्षापूर्ती न झाल्याने येणारे नैराश्य या कारणांच्या बरोबरीलाच इंटरनेट आणि सोशल मीडियाचे लागणारे व्यसन हे ही टीन एजर्स युवकांना डिप्रेशनच्या जाळ्यात ओढत आहे, असे गंभीर निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

या निरीक्षणास शहरातील समुपदेशक व संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी ‘मटा’शी बोलताना पुष्टी दिली. ‘मना सज्जना’ या मालिकेच्या माध्यमातून युवकांच्या भावविश्वाची घुसमट पहिल्या भागात मांडल्यानंतर टीन एजर्सच्या अस्वस्थ मनांची दाहक स्पंदनेही प्रतिक्रियात्मक स्वरूपात आली. इयत्ता आठवीपासून स्मार्ट फोन अन् इंटरनेटच्या आहारी गेलेल्या टीन एजर्स युवक व युवतींच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. आधुनिक जगातील संवाद साधण्याची ही नवमाध्यमेच टीन एजर्सना नैराश्याच्या अन् प्रसंगी आत्महत्येच्या गर्तेतही खेचत असल्याच्या मुद्द्यावर संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी प्रकाशझोत टाकला.

डॉ. गायकवाड म्हणाले, की इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या आहारी शाळकरी मुले जात असल्याच्या समस्या घेऊन पालक भेटण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. ही आधुनिक साधने उपयुक्त असली तरीही त्यांचे जडणारे व्यसन माणसांमधील संवाद संपवित आहे. परिणामी भावनांचा ओलावा संपल्याने टीन एजर्समध्ये गैरसमजांना येणारे उधाण, वादाच्या परिणीतीत अन् प्रसंगी गुन्हेगारीत होणारे याचे रूपांतर हे नवयुवकांचे आयुष्य फुलण्या अगोदरच उध्वस्थ होण्यास कारणीभूत ठरत आहे.

भासमान जगाचे बळी

शहरातील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थी स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या आहारी गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरील आणि वर्तणुकीतील वाढत्या तणावामुळे पालकही अस्वस्थ झाले होते. त्याच्या समस्येवर उतारा शोधताना पालकांना धक्काच बसला. सोशल मीडियावर त्याने फेक अकाउंट उघडून चक्क एका एका बॉलिवूड अभिनेत्रीशी चॅटिंग सुरू केले होते. अर्थात, अभिनेत्रीच्या नावे चालविले गेलेले फेक सोशल मीडिया अकाउंटही खोटे असू शकते. मात्र, या प्रसंगातून टीन एजर्स मुले इंटरनेट अन् सोशल मीडियाच्या भासमान जगाला बळी पडत असल्याचेच अधोरेखीत होते आहे.

सोशल मीडियाचा दुष्प्रभाव

आणखी काही प्रसंगांमध्ये युवकांनी सोशल मीडियावर स्वत:चे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो शेअर करणे, स्वत:च्या घरात किंवा कॉलेजमध्ये मौज मजेसाठी मोठ्या चोऱ्या करणे, टोळीयुद्ध करणे यासारखी मानसिकता केवळ इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या दुष्प्रभावाने होते आहे, असेही निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञांनी नोंदविले.

तिशीच्या आतील तरुणाईचे वास्तव

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सर्वाधिक आत्महत्या भारतात होतात. जगाच्या तुलनेत भारतातील या घटनांचे प्रमाण १० टक्के आहे. यामध्येही सर्वाधिक आत्महत्या तिशीच्या आतील युवकांच्या आहेत. देशातील एकूण आत्महत्यांपैकी जवळपास ३० ते ४० टक्के आत्महत्या फक्त युवकांच्या असतात, या वास्तवावरही ‘डब्ल्यूएचओ’च्या नोंदी प्रकाश टाकतात. आत्महत्येच्या प्रयत्नात युवतींचेही प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक बाब आहे.

मेंदूतही होतात अतिसूक्ष्म बदल

चीनमध्ये झालेल्या एका मनोविषयक अभ्यासातही ‘इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर’ या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला. इंटरनेटच्या अतिरेकाने मेंदूतही अतिसूक्ष्म बदल घडून रचनांमध्ये परिवर्तन होते. परिणामी, चांगले विचार करण्याच्या क्षमतेत घट होणे, भावनांवरील नियंत्रण हरविणे यासारख्या गंभीर बाबी टीन एजर्स आणि तरुणांमध्ये वाढीस लागल्याचे दाहक सत्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पसा’ नाट्यगृहात प्रथमच चित्रपट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकांकिका, हौशी, प्रायोगिक व व्यावसायिक नाटके, व्याख्याने इतकेच नाही तर स्नेहसंमेलने, विविध कार्यशाळा आणि सभा संमेलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात प्रथमच चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

याआधी पसा नाट्यगृहात ‘कावळा’ हा लघुपट दाखविण्यात आला होता; मात्र त्यासाठी छोटा पडदा वापरण्यात आला होता. कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे रिन्युएशनचे काम सुरू झाले आणि त्यापाठोपाठ शहरातील इतर नाट्यगृहांचा भाव चांगलाच वधारला. त्यातच परशुराम साईखेडकर हे नाट्यगृह मध्यवर्ती असल्यामुळे या ठिकाणी अधिकाधिक कार्यक्रम होऊ लागले; परंतु आता या नाट्यगृहात चक्क चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने नाशिककर कलाकारांनी बनवलेल्या जातीअंताच्या चळवळीअंतर्गत जाती निर्मूलनाचा विषय घेऊन ‘उतरंड’ हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाचा आशय सामाजिक आहे. या चित्रपटात लेखक दिर्ग्दाकापासून तर मुख्य कलाकारापर्यंत सर्वाधिक नाशिककरांचा समावेश आहे. रंगकर्मी श्रीराम गोरे, धर्मराज खैरनार, प्रवरा कुलकर्णी, तुषार माने, संगीता गायकवाड, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. सुनिता वाघमारे, नरेंद्र खाडे, पुष्पेंद्र जाधव, अमित शिरसाठ, अमित गायकवाड, शरद गांगुर्डे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. लेखक व दिग्दर्शन सुदाम वाघमारे असून प्रथमच चित्रपट पसा नाट्यगृहात होत असल्याने त्याविषयी कुतूहलाचे वातावरण आहे.

सर्वांना मुक्त प्रवेश

समता, एकता प्रस्थापित करू पाहणाऱ्या या चित्रपटाची पहिली चाचणी बुधवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजता होत आहे. हा प्रयोग विनामूल्य असून आसन क्रमांक निश्चित करण्यासाठी ९८३३७७७२५० किंवा ९२०९१४३१९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनदरबारी दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांनी सुरू केलेल्या संपाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संघटनेच्या प्रत‌िनिधींना बुधवारी (दि. ११) दुपारी एक वाजता चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे या बैठकीत संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात प्रचलित छापिल मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेऊन त्यावर विक्रेत्यांना १० टक्के कमिशन द्यावे, राज्यात सुरू असलेली इ चलन तसेच e-SBTR प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रते व दस्तलेखक यांचे मार्फतच राबविण्यात यावी, ASP प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी आणि मयत मुद्रांक विक्रेत्यांचे वारस हक्काने परवाना मिळावा, अशा मागण्यांसाठी शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता अर्ज व दस्तलेखक संघटनेने बंद केला आहे. राज्यातील सुमारे चार हजार मुद्रांक विक्रते आणि १२ हजारांहून अधिक दस्तलेखक बंदमध्ये सहभागी झाले असून त्यामुळे मुद्रांक विक्री, दस्तलेखन व इ-चलन बनविण्याची कामे ठप्प झाली आहेत.
मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २८ फेब्रुवारीला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. परंतु, सात महिने उलटूनही त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे संघटनेने सोमवारपासून संप सुरू केला आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संघटनेचे राज्यभरातील २० पदाधिकारी मंगळवारी मुंबईला गेले आहेत. महसूल मंत्र्यांनी त्यांना बुधवार (दि. ११) चर्चेसाठी बोलावले आहे. पाटील यांच्या दालनात दुपारी एक वाजता ही बैठक होणार असून त्यामध्ये मागण्यांबाबत तोडगा निघू शकेल अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य रस्त्यांलगत सजला दिवाळी बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी निमित्त शहरातील मॉल्सप्रमाणे रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्टॉल्सवरही ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. पारंपरिक ते अत्याधुनिक मॉल कल्चरबरोबरच रस्त्यांवर उभारण्यात येत असलेल्या स्टॉल्सलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

नाशिक शहरात मेनरोड, भद्रकाली, शालीमार, भांडीबाजार, दहीपूल, फुलबाजार, बोहरपट्टी, सराफबाजार, रविवार पेठ, रविवार कारंजा, शिवाजी रोड, अशोकस्तंभ, महात्मा गांधी रोड, भोसला सर्कल, कॉलेजरोड या ठिकाणी पूर्वापार चालत आलेला रिटेल विक्रीचा बाजार आहे. मात्र, काही वर्षांपासून या बाजाराला जोड म्हणून अत्याधुनिक व सोयी, सुविधांनीयुक्त अशा मॉलकल्चरचीही रुजवण झाली आहे. कॉलेजरोड, गंगापूर रोड, त्र्यंबक नाका, उंटवाडी रोड, महात्मानगर, नाशिकरोड, फेम थिएटर, म्हसोबा मंदिर, त्रिमूर्ती चौक, गोविंदनगर आदी ठिकाणी खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ लागले आहेत. मात्र, यापारंपरिक ते अत्याधुनिक मॉल कल्चरबरोबरच रस्त्यांवर उभारण्यात येत असलेल्या स्टॉल्सलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘केवळ रस्ते का माल सस्ते में’ याच विचाराने ग्राहक रस्त्यावरील दुकानांवर खरेदी करीत नाहीत, तर मालाचा दर्जा, गुणवत्ता, वैविध्य तसेच दर याबाबीही त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

येथे थाटली दुकाने
डोंगरे वसतिगृह मैदान परिसर, त्र्यंबक नाका, मायको सर्कल, एबीबी सर्कल, पंचवटी, मुंबई-आग्रा हायवे लगतचा सर्व्हिसरोड, शालिमार, द्वारका सर्कल, गांधीनगर, उपनगर, नाशिक-सिन्नर महामार्ग, नाशिकरोड, देवळाली कॅम्प येथे विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. गॉगल्स, कपडे, जीन्स, टी शर्ट, शर्ट, स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट, उबदार कपडे, कार्पेट, चटई, गालिचा, बेडशीट, चादर, लोड, सॉफ्ट टॉइज, खेळणी, फळे, अॅल्युमिनिअम शिडी, प्लास्टिकच्या वस्तू, चप्पल, बूट, सँडल तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या माळा झुंबर हेही रास्त दरात उपलब्ध आहेत.

जीएसटीचे नो टेन्शन!
दुकानात मिळणाऱ्या सर्वच वस्तू रस्त्यावर कमी किंमतीत मिळत असल्याने अनेक उच्चभ्रू नागरिकही रस्त्यावरच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. दुकानात खरेदी केल्यानंतर जीएसटीची रक्कम मोजावी लागते. त्यामुळे लोकांना भूर्दंड बसतो म्हणून अनेक लोकांनी नाशिकच्या बाजारपेठे बरोबरच मुंबईच्या रस्त्यावरूनदेखील खरेदी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील तिघा चोरट्यांनी तोडून धूम ठोकली. ही घटना जेलरोड परिसरातील सुवर्णनगर भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्मावती बाळासाहेब निरगुडे (रा. सदगुरूनगर, जेलरोड) यांच्या तक्रार दिली. फेरफटका मारण्यासाठी सोमवारी (दि. २) रात्री आठ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या निरगुडे सुवर्णनगरकडे पायी चालल्या होत्या. येथील वळणावर समोरून आलेल्या दुचाकीवरील तिघांपैकी एकाने त्याच्या गळ्यावर फटका मारून सुमारे २५ हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबाडून पोबारा केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गोसावी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फर्निचर दुकानात चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फर्निचरचे दुकान फोडून चोरट्यांनी एलसीडी टीव्ही चोरून नेला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचित माधव कातकाडे (रा. राजीवनगर, इंदिरानगर) यांनी तक्रार दिली आहे. कातकाडे यांचे महामार्गावरील करंबळेकर रेजन्सी या इमारतीत ड्रिम फर्निचर नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून सुमारे २० हजार रुपयांचा एलसीडी टीव्ही चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक वराळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बँक कर्मचाऱ्याचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँकेत काम करणाऱ्या तरुणीस मोबाइलवर अश्लिल मेसेज वापरून तसेच पाठलाग करून तरुणाने विनयभंग केला. सिडकोत घडलेल्या या घटने प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
अमीत संजय कोथमिरे (२५ रा. बी. एच. शेलार हॉटेल शेजारी, भद्रकाली) असे संशयिताचे नाव आहे. रविवार पेठेत राहणारी २१ वर्षीय तरुणी लेखानगर भागातील एका राष्ट्रीय बँकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करते. संशयिताने बँकेत जाऊन संबंधित तरुणीकडून बँक सुविधांची माहिती घेतली. यावेळी तरुणीचा मोबाइल नंबर घेऊन वेळोवेळी माहितीच्या बहाण्याने फोन लावून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. रविवारी तरुणी घरी असताना संशयिताने मोबाइलवर कॉल करून अश्लिल भाषा वापरली. तसेच सोमवारी ती कामावर आली असता संशयिताने आपल्या मित्रासमवेत तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिरावणी आश्रमशाळेची मान्यता रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या महिरावणी येथील अनुदानित आश्रमशाळेतील संतोष डगळे (११) या मुलाच्या मृत्यू प्रकरणाची आदिवासी आयुक्तालयाने गंभीर दखल घेतली आहे. या शाळेची मान्यताच रद्द करण्यात आली असून त्यामुळे आश्रमशाळा व्यवस्थापनांचे धाबे दणाणले आहे.

शालेय व्यवस्थापनच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त असल्याने शाळेची मान्यता रद्द करण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास आयुक्तालयातील शिक्षण विभागाच्या उपआयुक्तांनी दिली आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील अनेक आदिवासी आश्रमशाळांमध्ये लैंगिक अत्याचार होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींकडून प्राप्त झाल्या. अशा तक्रारींनंतर संबंधितांवर कठोर कारवाईची अपेक्षा असताना अजूनही गैरप्रकार सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी महिरावणी येथील आश्रमशाळेमध्ये संतोष डगळे या ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शिपायाने केलेल्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली होती. याखेरीज या शाळेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने या अनुदानित शाळेची मान्यताच रद्द करण्याचा निर्णय आदिवासी विकास आयुक्तालयाने घेतला आहे.

तक्रारींची गंभीर दखल

आश्रमशाळेत निकृष्ट आहार मिळत असल्याच्या तसेच मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी प्रशासनाला यापूर्वी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे २०११ मध्ये या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली होती. आश्रमशाळांमध्ये चुकीचे प्रकार घडल्यास थेट मान्यता रद्दसारखी कठोर कारवाई होऊ लागल्याने आश्रम शाळांच्या व्यवस्थापनांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पला महिलेची आत्महत्या

$
0
0

देवळली कॅम्प : परिसरातील आडकेनगर भागातील ५६ वर्षीय महिलेने आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
ग्रिसी अ‍ॅम्पोनिमोजेस (५६ रा. वैष्णव संकुल, आडकेनगर) असे या महिलेचे नाव आहे. ग्रिसी यांनी रविवारी (दि. ८) रात्री आपल्या घरात गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारसह चार मोटारसायकली चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात एका स्विफ्ट कारसह चार मोटारसायकली चोरीस गेल्याप्रकरणी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कामटवाडे परिसरातील अभियंतानगर भागात राहणारे रवींद्र गणपत पवार यांची चार लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार (एमएच १५ इएक्स २४८९) रविवारी (दि. ९) रात्री त्यांच्या घरासमोर चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत. जाधव संकूल परिसरातील कातकाडे नगर भागात राहणारे पंकज सुरेश गडाख यांची पल्सर (एमएच १५ डीएच ९४४२) लवाटेनगर येथील त्यांच्या मून स्टोन रो-हाउससमोर पार्क केलेली असताना चोरट्यांनी चोरून नेली. गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.

दरम्यान, पेठरोड भागातील शनि मंदिराजवळ राहणाऱ्या उत्तम राजाराम धोत्रे यांची स्प्लेंडर (एमएच १५ एएन ८९०४) रविवारी (दि. ९) दुपारी उन्नती शाळेसमोरून चोरी झाली. वाहनचोरीची आणखी एक घटना जगतापमळा भागात झाली. भूषण दादाजी जाधव (रा. वास्तू संदेश अपा.) यांची दुचाकी (एमएच ४१ एएच ९१०६) १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. तर, तुकाराम परशराम बोरसे (रा. साईसिद्धी अपा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) यांची युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५ एफएक्स ७५६९) शनिवारी (दि. ८) रात्री त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी इंदिरनगर पोलिस अधिक तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वैद्यकीय साधनांवर हवे नियंत्रण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय साधनांच्या किमतींवर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सर्वसामान्य जनतेस याचा भूर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने वैद्यकीय साधनांचा अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडे करण्यात आली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने झगडे यांच्यासोबत या विषयाची चर्चा करून निवेदन दिले. शस्त्रक्रियेच्या वेळी वापरात येणारे कॅथेटर्स, मोतीबिंदू ऑपरेशन्सनंतर लावल्या जाणाऱ्या लेन्सेस, युरिन बॅग्ज, ऑक्सिजन मास्क यासारख्या १८ साधनांच्या किमतींवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे रुग्णांना २५० ते ५०० टक्के अधिक रक्कम मोजावी लागते. या उपचारांसाठीच्या साधनांच्या किमतींवरील अवाजवी वाढ आणि अवाढव्य नफ्याचा प्रश्न गंभीर आहे. या साधनांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी संघटनेच्या बलकवडे यांच्यासह शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, पुष्पलता उदावंत, सायरा शेख, लता गोडेकर, कोमल निकाळे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त दुचाकीखरेदी पडली महागात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वापरलेली दुचाकी स्वस्तात खरेदी करणाऱ्या नागरिकांनी कागदपत्रांकडे दुर्लक्ष केले. परिणामी चोरट्यांना चोरीचे वाहन खपवण्याची आयती संधी मिळाली. अशाच प्रकारे चोरीची वाहने खरेदी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलिसांनी प्रथमच अशी कारवाई केली असून, नागरिकांनी जुने वाहन खरेदी करताना फक्त विश्वासावर नाही तर कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहनचोरीच्या घटनानंतर चोरटे रातोरात वाहने शहराबाहेर घेऊन जातात. परजिल्ह्यात अगदी स्वस्तात ही वाहने विकली जातात. कागदपत्रे काही दिवसांनी देतो, असे मध्यस्त सांगतो. मात्र, वाहनचालकास पुन्हा कधीही कागदपत्रे मिळत नाही. यामुळे वाहनचोरीचा गोरखधंदा चांगलाच फैलावला आहे.

वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी जुनी वाहने खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यातच अंबड, सातपूर, तसेच गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत होणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. तब्बल १८ वाहने पोलिसांनी जप्त केली. यातील सात वाहने जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे विक्री झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी वाहन खरेदी करणाऱ्यांवर चोरीचा माल खरेदी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी राजेश गौतम नरवाडे (रा. स्वामीनगर, अंबड), तुषार रवींद्र पाटील या दोघांच्या ताब्यातून सात वाहने जप्त करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी अभिषेक उद्धव विश्वकर्मा (स्वामीनगर, अंबड), गोरख मदन हिरे (रा. शिंदी, ता. भडगाव, जि. जळगाव), अमोल भाऊसाहेब हिरे (शिंदी, ता. भडगाव), राजेंद्र काशिनाथ पाटील (शिंदी, ता. भडगाव) विशाल अंबादास काकड (पाथर्डी फाटा, नाशिक), गजानन ज्ञानेश्वर पाटील (राणाप्रताप चौक, सिडको) या संशयितांना अटक करून चोरीची वाहने जप्त केली. यातील आणखी एक संशयित फरार असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

८० टक्के वाहनांचा थांगपत्ताच नाही

शहरात ऑगस्टपर्यंत ४०७ वाहने चोरीस गेली असून यातील ८१ वाहने परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले. गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाण २० टक्के इतके आहे. गत वर्षी ऑगस्टपर्यंत ३७२ वाहनांवर चोरट्यांनी हात साफ केला होता. याच दरम्यान पोलिसांनी २१ टक्क्यांच्या सरासरीने ७८ वाहनांचा शोध लावला. चोरीस जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत वाहने सापडण्याचे प्रमाण तसे खूप कमी आहे. साधारणतः १०० पैकी ८० चोरी झालेल्या वाहनांचा कोणताही थांगपत्ता लागत नाही.

चोरीस गेलेली वाहने अगदी स्वस्तात विकली जातात. नागरिक कमी किंमतीत वाहने मिळतात; म्हणून कोणतीही चौकशी अथवा खातरजमा करीत नाही. मध्यस्तही वेगवेगळी आश्वासन देतो. या घटनेत मोठ्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील कामगारांसाठी वाहनांची खरेदी केलेली दिसते. यापुढे खरेदीदारावर थेट गुन्हाच दाखल करण्यात येईल.
- डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुनेला जिवंत जाळणाऱ्या सासूला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चारित्र्यावर संशय घेऊन वाद झाल्यानंतर सुनेवर रॉकेल टाकून जिवंत जाळणाऱ्या सासूस जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

हौसाबाई निवृत्ती माळेकर (५५, रा. कापाची करंजाळी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे आरोपी महिलेचे नाव आहे. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एच. मोरे यांच्या कोर्टात सुरू होती. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विद्या जाधव यांनी काम पाहिले. दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथील हौसाबाई माळेकर ही मुलगा विलास व सून अनिता यांच्यासोबत राहत होती. सुनेचे परपुरुषासोबत बोलणे खटकत असल्याने या दोघींमध्ये सतत वाद होत. २५ एप्रिल २०१६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सून अनिता ही जनावरांच्या गोठ्याची साफसफाई करीत असताना सासू हौसाबाई हिने वाद उकरून काढला. परपुरूषांनी बोलते म्हणून संतप्त हौसाबाईने अनिताला खेचत घरात नेले. तिथे तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावून पेटवून दिले. तसेच घटनेनंतर ती स्वतः पळून गेली. पती विलास व शेजारील नागरिकांनी अनिताला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ६४ टक्के जळालेल्या अनिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत्यूपूर्व जबाब ठरला मोलाचा

मृत्यूपूर्व जबाबात सासूने पेटवून दिल्याचे अनिताने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी वणी पोलिसांनी हौसाबाईवर खूनाचा गुन्हा दाखल केला. सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने १२ साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर सबळ पुरावे आल्याने हौसाबाईल खूनाच्या गुन्ह्याऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षबागा डावण्याच्या कचाट्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या चार-पाच दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी दिवाळीची खरेदी बाजूला ठेवून फवारणीसाठी शेतकऱ्यांना हजारो रुपयांची औषधे खरेदी करावी लागत आहे.

परतीच्या पावसाचा आणि ढगाळ हवामानाचा सर्वात जास्त फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे. हा पाऊस थांबल्यानंतर डावण्या या रोगाचा द्राक्षबागांवर प्रादुर्भाव होईल, असे मत उत्पादकांनी व्यक्त केले आहे. तालुक्यात शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार या दिवशी सातत्याने संततधार पाऊस होत असल्याने ज्या द्राक्षबागांची छाटणी झाली. ज्यांची छाटणी सुरू आहे अशा द्राक्षबागांना धोका निर्माण झाला असून, द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. काही द्राक्षबागा लवकर छाटणी झाल्या. त्यांच्या बागांना फुलोरा आला त्या बागांचा फुलोरा या संततधार पावसाने कुजण्यासडण्याची शक्यता आहे.

बुरशीजन्य रोगांचा धोका

निफाड तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या आहेत. सध्या द्राक्ष बागांच्या ऑक्टोबर छाटणी सुरू आहे. काही ठिकाणी कवळी काडी असल्याने सध्या सुरू असलेला पाऊस व बदललेल्या वातावरणाचा परिणाम होऊ शकेल असे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले या वातावरणामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. बागा सध्या पोंगा (कोंब फुटण्याची अवस्था) अवस्थेत आहे. या बागांचे जास्त नुकसान होईल. बऱ्याच ठिकाणी बागांना पेस्ट केली आहे. ती पेस्ट पुन्हा करण्याची वेळ येईल असे शेतकरी म्हणाले. यासह सोयाबीन, मका, भाजीपाला, टोमॅटोचेही नुकसान होणार आहे.

औषधांच्या दुकानात गर्दी

द्राक्षबागांना औषध मारण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धावपळ सुरू आहे. शेती औषधांच्या दुकानात दिवसाला एक कोटींच्यावर औषधे शेतकरी खरेदी करीत आहेत. तितकीच दुसऱ्या दिवशीची मागणीही नोंदवली जात आहे. पहिल्या दिवशी झालेल्या पावसानंतर एकाच दिवसात साडेतीन कोटींची औषध विक्री काही दुकानांमध्ये झाली.

द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्यांना गेल्या पंधरवाड्यापासून सुरुवात झाली आहे. नवीन फुटव्यातून निघालेला द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाण वाढत असताना गेल्या चार दिवसांपासून बदललेल्या ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. - मनोहर सांगळे, द्राक्ष उत्पादक, सोनेवाडी

परतीचा पाऊस नुकसानकारक असला तरी या पावसाची गरज असल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. गोदाकाठ भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे वातावरणात उकाडा आहे. अशात पाऊस जर पडला तर उसाला त्यांचा फायदा आहे. - संपतराव व्यवहारे

शेतकरी, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्क्रॅप जीन्सच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

फॅशनेबल दिवाळी साजरी करण्यासाठी यंगस्टर्सच्या ट्रेंडी खरेदीला उधाण आले आहे. यंदाच्या नव्या ट्रेंडफुल जीन्स खरेदी करण्यासाठी तरुणांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. या बाजारपेठेत स्क्रॅप जीन्सला तरुण प्राधान्य देत आहेत. मात्र, स्वस्तात मिळणाऱ्या या जीन्समुळे मात्र त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असल्याचे समोर आले आहे. यामुळे फॅशनच्या नावाखाली सुरू असलेल्या आरोग्याच्या बाजारापासून तरुणांनी सावध रहावे, असे आवाहन सर्व स्तरांतून केले जात आहे.

स्क्रॅप जीन्स सध्या वॉश, मंकी वॉश, डेनिम, जोगर्स असा नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली खपवल्या जात आहेत. दिल्ली, गुजरात, अहमदाबादच्या कपडा बाजारातून किलोवर माल घेऊन मुंबईच्या काही भागात स्क्रॅप जीन्स तयार केल्या जातात. स्क्रॅप जीन्सची मूळ किंमत १५० ते ३५० रुपये इतकी आहे. शहरातल्या बाजारापेठा याच स्क्रॅप जीन्स ब्रॅण्डेड असल्याचे भासवत ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान त्या विकतात. जीर्ण झालेल्या कपड्यावर प्रक्र‌िया करून विकला जाणारा हा माल गिऱ्हाईकांच्या खिशाला कात्री लावतोय. सोबतच स्क्रॅप जीन्समुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार जडण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्क्रॅप जीन्स ब्रॅण्डेड असल्याचे भासवण्यासाठी केमिकलची प्रक्र‌िया करुन चांगले कलर दिले जातात. यासाठी वापरले जाणारे कलर आणि केमिकल अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. या जीन्स वापरताना या कलर्सचा त्वचेशी सतत संबंध आल्याने त्वचेचे आजार होण्याचा धोका वाढत आहे. यासंदर्भात सध्या सोशल मीडियावरही मेसेजेस व्हायरल होत आहेत. यंदाच्या दिवाळीत तरुणांनी स्क्रॅप जीन्स खरेदी करू नये, असे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे.

तिबेट‌ियन ‘स्क्रॅप’चे मार्केट

नाशिकचे तिबेट‌ियन मार्केट ही स्क्रॅप जीन्सची मोठी बाजारपेठ असल्याची चर्चा आहे. या मार्केटमध्ये एकाच मालकाची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे प्रत्येक दुकानात सारखाच माल विकला जातो. जीन्सच्या किमती तोंडी फिक्स केल्या जातात. जीन्सवर कुठेही छाप‌िल किंमत नसते. फाटलेल्या जीन्सला फॅशन म्हणत लोगो स्टाइल ठिगळं लावून ब्रॅण्डच्या नावाखाली विकल्या जात आहेत. तसेच या मार्केटमधल्या कोणत्याही जीन्सला फिक्स साइज नसते. सोशल मीडियावर स्क्रॅप जीन्सबाबत व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये तिबेट‌ियन मार्केटचे हे वास्तव यंगस्टर्स शेअर करत आहेत.


स्वदेशीला द्या महत्त्व

स्क्रॅप जीन्स वापरुन आपल्या आयुष्याची नकळत होणारी हेळसांड थांबवणे आपल्याच हाती आहे. केमिकल रंगांमुळे त्वचेचा कर्करोग ओढावून घेण्यापेक्षा तो टाळता येणे शक्य आहे. थोडे जास्त पैसे गेले तर जाऊ द्या. पण ब्रॅण्डेड जीन्सचा नाद करण्यापेक्षा स्वदेशी कपडे वापरा, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.


सतत केमिकलच्या संपर्कात आल्यावर त्वचेचा कॅन्सर बळावू शकतो. स्क्रॅप जीन्समध्येही केमिकलचा वापर केला जातो. यामुळे जर तुम्ही सतत स्क्रॅप जीन्स वापरत असाल तर कॅन्सरची लागण होऊ शकते.

- डॉ. राज नगरकर, कॅन्सर स्पेशालिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नको नको रे पावसा...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एरव्ही पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता ‘नको नको रे पावसा’ असे म्हणायची वेळ आली आहे. परतीच्या पावसाचा ठिय्या कायम असल्याने दररोज नित्यनेमाने दुपारी पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बाजारपेठेवरही परिणाम झाला असून, खरेदीच्या आनंदावर विरजण पडत आहे.

बुधवारी दुपारी मुसळधार पावसाने शहराला झोडपले. दिवसभर ऊन-पाऊस आणि ढगाळ वातावरणाची छाया शहरात होती. मात्र, दुपारच्या सुमारास कोसळलेल्या पावसाने नाशिककरांची चांगलीच त्रेधातिरप‌िट उडविली. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरीची पूरस्थिती कायम आहे.

बुधवारी सकाळीच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर शहराच्या काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत होता. त्यामुळे रेनकोट, छत्री यांचा वापर करावा की नाही याच संभ्रमात नाशिककर होते. शिवाय दिवसभर प्रचंड उकाडाही होता. त्यामुळे नाशिककरांच्या अस्वस्थतेत वाढच होत होती. अशातच दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. काही मिनिटातच पावसाने संपूर्ण नाशिकला झोडपले. शहरातील जवळपास सर्वच रस्ते जलमय झाले. त्यामुळे क्षणार्धात रस्त्यांवरील वाहतूक नाहीशी झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढणेही वाहनधारकांना अडचणीचे बनले. पावसाच्या या तडाख्यामुळे शहराच्या काही भागात वीजेचा पुरवठा खंडित झाला होता. रस्ते पाण्याने भरल्याने अशोकस्तंभ, रविवार कारंजा, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, शालिमार, त्र्यंबकनाका आदी ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.


उपनगरांमध्ये धावपळ

सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, जुने नाशिक, गंगापूररोड यासह शहरातील विविध उपनगरांमध्ये पावसाने चांगलीच बॅटिंग केली. परिणामी, रस्त्यावरील विक्रेत्यांपासून दिवाळी खरेदीसाठी सज्ज असलेली दुकाने क्षणार्धात नाहीशी झाली. तर, शहरात अनेक टिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

विसर्ग सुरूच

गंगापूर आणि दारणा या धरणातून अद्यापही विसर्ग सुरूच आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आणखी काही दिवस विसर्ग सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास २८७४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असुरक्षितता, अस्वच्छतेचा डेरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
कळवण शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या बस स्टँडमध्ये स्वच्छतागृह आहे. तालुक्यातील व अन्य भागातून येणाऱ्या महिलांना त्याचा लाभ होतो. कळवणच्या बसस्थानकाच्या आवारात मोठी अस्वच्छता आहे. सुमारे १० वर्षांच्या वर कालावधी उलटून गेला असला तरी दिवसेंदिवस होणाऱ्या हागणदारीमुक्तीमुळे या स्वच्छता गृहांमध्ये शहराबाहेरील महिलांचा वावर अधिक दिसून येतो.
या ठिकाणी पुरुषांच्या १२ मुतारी, ६ संडास, २ बाथरूम आहेत. तर महिलांना ४ संडास व १ बाथरूम असल्याने थोडीशी नाराजी आहेच. सुलभ इंटरनॅशनल या खासगी सेवेच्या माध्यमातून स्वच्छता गृहांची निगा राखली जात असते. महिलांना ५ रुपयांची किंमत मोजल्यावर याठिकाणी सुविधा उपलब्ध होत असते. स्वछता मोहीम सर्वात आधी बसस्थानकाच्या आवारात राबविण्यात येत असते. मात्र त्यात सातत्य नसल्याने रात्री उशिरापर्यंत या स्वच्छता गृहाजवळ जाणे महिलांना अडचणीचे ठरते. कारण मद्यधुंद व्यक्ती व या स्वच्छता गृहाबाहेरच उघड्यावर लघुशंका करतात. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरते. कळवण बसस्थानकाच्या आवारात दुर्गंधी येणे ही नित्याचीच बाब आहे. मात्र, मुबलक पाणी असल्यामुळे महिलांना कुठलीही अडचण ठरत नसल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

कळवण बसस्थानकाच्या आवारात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात दिसून येते. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तसेच महिलांच्या स्वछतागृहासाठी महिला कर्मचारीच असावी.
- मीनाक्षी मालपुरे, अध्यक्ष, इनरव्हील क्लब, कळवण

बसस्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहाचा वापर बाहेरगावच्या महिलांना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. स्वच्छता असली तरी दुर्गंधी घालवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
- चांदणी चव्हाण, प्रवासी महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images