Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दिवाळीनंतर फुटणार राजकीय आपटबार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनंतर नाशकात भाजप आणि मनसेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याने दोन्ही पक्षात चांगलेच राजकीय आपटबार फुटणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ४ नोव्हेंबरनंतर नाशिकमध्ये पक्षाच्या राजकीय बांधणीसाठी तळ ठोकणार आहेत.

मनसेला संजीवनी देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. तर दिवाळीनंतर मंत्रीमंडळाच्या विस्तारात नाशिकला स्थान मिळणार असल्याची चर्चा असल्याने भाजपच्या तीनही आमदारांमध्ये रस्सीखेच रंगणार आहे. सद्यस्थितीत आमदार बाळासाहेब सानप आणि प्रा. देवयानी फरांदे यांच्या नावाची चर्चा असली तरी, ऐनवेळी आश्चर्यकारक नावेही पुढे येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठांना पोलिसांकडून मिळणार ओळखपत्र

0
0

arvind.jadhav @timesgroup.com
नाशिक

आयुष्याच्या संध्याकाळी मदतीचा हात शोधणाऱ्या शहरातील सुमारे तीन लाख ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकल‌ित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पुढील आठवड्यात प्रतिनिधीक स्वरूपात पोलिसामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांची माहिती मध्यवर्ती ठिकाणी संकल‌ित केली जाणार असून, एका क्लिकसरशी पोलिस ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधू शकतील. विशेष म्हणजे यासाठी एक विशेष सेलही पोलिसांमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

शहरातीलच नव्हे तर जगभरात ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा समाजाकडून ज्येष्ठ नागरिकांना विविध कारणांमुळे उपेक्षीत ठेवण्यात येते. दुसरीकडे बदललेल्या जीवनशैलीचा थेट परिणाम कधीकाळी कुटुंबांचा आधारवड राहिलेल्या व्यक्तीवर पडतो. करियर असो की कौटुंबिक वाद, बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना एकटे किंवा जोडीदारासोबत राहण्याशिवाय पर्याय नसतो. मग अशा व्यक्ती विविध मंडळे किंवा सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देतात.

ज्येष्ठ नागरिकांनी अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेत. त्यांच्याकडे माहितीही भरपूर असते. मात्र, त्याचा समाजाकडून तेवढ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जात नाही. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी एक विशेष सेल सुरू केला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. या बाबत बोलताना सिंगल म्हणाले, विविध कार्यक्रमांसाठी, कधीतरी वेगळ्या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क येतो. त्यांच्यातील उत्साह, ज्ञान अधोरेखीत होते. त्यांच्या काही समस्याही दिसून येतात. या पार्श्वभूमीवर आम्ही नियोजन आखले. समाजातील २० टक्के लोकसंख्या पोलिसांशी जोडणे महत्त्वाचे होते. त्यामुळे सध्या आम्ही शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांना सोबत घेतले. या नागरिकांची माहिती संकलित केली. या आधारे आम्ही एक ओळखपत्र तयार करीत असून, पुढील आठवड्यात ते वितरीत करण्याचे काम सुरू होईल. यानिमित्ताने मोठा समुह पोलिसांशी जोडला जाईल.

विशेष म्हणजे यात त्यांच्या व कुटुंबियाचे मोबाइल क्रमांक, पूर्ण पत्ता व इतर माहिती नमूद केलेली असेल. हा सर्व डेटा मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात आला असून, एका क्लिकसरशी आम्हाला संबंध‌ित व्यक्तीची सर्व माहिती उपलब्ध होईल. एवढेच नव्हे तर या मोठ्या समुहाशी थेट संवाद साधता येईल. या माध्यमातून वृध्दांना येणाऱ्या समस्यांवर देखील उत्तर शोधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिक मंडळाशी थेट संबंध नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती देखील स्थानिक पोलिस स्टेशनच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. नागरिक आणि पोलिसांचा संवाद सुरू ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके फोडण्यास मनाई केल्यानं खून

0
0

पंकज काकुळीद । धुळे

फटाके फोडण्यास मनाई केल्यामुळं झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना धुळ्यातील मनमाडजीन परिसरात घडली आहे. दिनेश प्रल्हाद चौधरी असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारोळा रोडजवळच्या परिसरात काही तरुण फटाके फोडत होते. दिनेशनं त्यांना फटाके फोडण्यास मज्जाव केला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की फटाके फोडणाऱ्या तरुणांनी दिनेशवर हल्ला चढवला. त्यांच्यातील एकानं धारदार गुप्तीनं दिनेशच्या पोटावर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादात हल्लेखोर तरुणांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश व त्याच्या मित्रांमध्ये याआधीही वाद झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठीच त्यांनी दिनेशवर वार केले असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात ‘एसटी’ कर्मचाऱ्यांनी केले मुंडण

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । येवला

एरवी वर्षभर चांगलेच गजबजणाऱ्या येवला बसस्थानकात ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या बेमुदत संपामुळे संपूर्णतः शुकशुकाट दिसून आला. एसटीच्या चालक व वाहकांसह वर्कशॉप कर्मचारी, तसेच सर्वच कार्यालयीन कर्मचारी या बेमुदत संपात उतरले असल्याने संपाच्या शुक्रवारच्या चौथ्या दिवशी देखील येवला आगाराची एकही बस ना आगाराच्या बाहेर पडली, ना नेहमीप्रमाणे एकाही बसची बेल वाजली. गुरुवारी दुपारी येवला आगाराच्या बाहेर एकत्रित जमा झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासन तसेच एसटी प्रशासन यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करतानाच काही कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मुंडण देखील करून घेतले.

‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे येवला बसस्थानक सलग चौथ्या दिवशीही अक्षरशः ओस पडले होते. संपाच्या शुक्रवारच्या चौथ्या दिवशी देखील कुठलाही चालक अथवा कंडक्टर बसमध्ये न चढल्याने आगारात उभ्या असलेल्या एकाही बसचे चाक जागचे हलले नाही. शेकडो बसेसच्या आवागमनासह दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशांच्या वर्दळीने एरवी नेहमीच गजबजणारे नाशिक-औरंगाबाद व नगर-मनमाड या दोन मुख्य राज्य महामार्गावरील येवला बसस्थानकात निरव शांतता पसरली आहे. स्थानकाच्या आवारात पोलिसांनी बंदोबस्त असून तिथे एक पोलीस व्हॅन उभी करून ठेवण्यात आलेली आहे. एकही बस अथवा प्रवाशी नसल्याने स्थानकातील उपहारगृह तसेच इतर व्यावसायिकांना बंदचा मोठा फटका बसला आहे. अनेक दुकानदारांनी तर सध्या आपली दुकाने बंद ठेवणेच पसंत केल्याचे दिसत आहे.



आपल्या मागण्यांकडे राज्य शासन तसेच राज्य परिवहन महामंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी शुक्रवारी दुपारी देखील येवला आगारातील चालक, वाहक तसेच इतर कर्मचारी आगाराच्या प्रवेशद्वारावर एकत्र जमा झाले होते. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सचिव बाळासाहेब गांगुर्डे यांच्या नेतृवाखाली काही कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मुंडण करून घेत परिवहन मंत्री तसेच एसटी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत संपून जवळपास १७ महिने उलटूनही नवीन करार तसेच वेतन आयोगाबाबत शासनाची व प्रशासनाची भूमिका ठोस नसल्यानेच बेमुदत संपाच्या आजच्या शुक्रवारच्या सलग चौथ्या दिवशी देखील शंभर टक्के बंद आहे.



खरेतर १७ महिन्यांपूर्वीच समिती नेमून, चर्चा करून, बैठका घेवून ठोस निर्णय घेतला असता तर, आज ‘एसटी’ कर्मचाऱ्यांवर संपाची वेळ आली नसती, असे यावेळी गांगुर्डे यांनी स्पष्ट केले. बेमुदत संपाबाबत तोडगा काढण्याऐवजी जेलमध्ये टाकण्याची वा बडतर्फीची भाषा, निलंबनाच्या कारवाईसह गुन्हे दाखल करण्याची धमकीची भाषा नक्कीच शोभणारी नाही, असा टोला देखील यावेळी गांगुर्डे यांनी लगावला. एसटी कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी मिळणारा ८ ते १० हजार रुपये पगार व सर्व कपात होवून त्यातील हाती पडणारे अवघे २ ते ५ हजार रुपये अन्याकारक असल्याचे सर्वसामान्य जनतेसह कुणीही मान्य करेल, असेही यावेळी कामगार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लाल पिवळे खोकडे, त्यात दोन माकडे
घालायला दोन फाटके खाकी कपडे
खायला दोन शिळे तुकडे
झोपायला एक किंवा दोन बाकडे...


अशी आम्हा ‘एसटी’ कर्मचाऱ्यांची अवस्था झाली असल्याची नाराजी यावेळी ‘एसटी’च्या येवला आगारातील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके फोडण्यास मनाई केल्याने खून

0
0

धुळे : फटाके फोडण्यास मनाई केल्यामुळे झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना धुळ्यातील मनमाडजीन परिसरात घडली आहे. दिनेश प्रल्हाद चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारोळा रोडजवळच्या परिसरात काही तरुण फटाके फोडत होते. दिनेशने त्यांना फटाके फोडण्यास मज्जाव केला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, फटाके फोडणाऱ्या तरुणांनी दिनेशवर हल्ला चढवला. त्यांच्यातील एकानं धारदार गुप्तीनं दिनेशच्या पोटावर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगार जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

अहमदनगर पोलिस अनेक वर्षांपासून शोधात असलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांसह तिघांना पाथर्डी फाटा येथे जेरबंद केले. नाशिक आणि अहमदनगर पोलिसांनी कमांडोच्या मदतीने तब्बल चार तास हीकारवाई केली. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेले तिघे जण अतिरेकी असल्याची अफवा शहरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र संबंधित तिघे अतिरेकी नसल्याचा खुलासा पोलिसांनी केल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला.

पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवन मागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर तीन गुन्हेगार लपले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यात शाहरुख रज्जाक शेख (२५, रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि सागर सोना पगारे (२२, रा. चितळी, तालुका राहता, जि. अहमदनगर) या अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील व मोक्‍का अंतर्गत कारवाई सुरू असलेल्या दोघांचा समावेश होता. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी नाशिक पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र सिंगल यांच्याशी चर्चा करून नाशिक पोलिसांच्या व कमांडोच्या मदतीने पहाटे चार वाजता या इमारतीजवळ सापळा रचला. रेकॉर्डवरील दोघे गुन्हेगार तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये असल्याने काही पोलिसांनी इमारतीतून तर काही जणांनी शिडीच्या माध्यमातून फ्लॅटच्या गॅलरीत प्रवेश केला. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर पोलिसांना शाहरूख आणि बारकू सुदाम अंभोरे (दि. २१, रा. चितळी ता. राहता, जि. अहमदनगर) हे दोघे आढळले. बेडरुममध्ये लपलेल्या सागर पगारे याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी दरवाजा तोडवा लागला. यावेळी सागरने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलमधून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमांडोने झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी या तिघांकडून दोन पिस्तुल, ४० राउंड, चार मोबाइल व पासिंग न झालेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. हे तिघेजण अतिरेकी असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांनी शांतपणे व नियोजनबद्धपणे सोसायटीच्या आवाराला घेरून या तिघांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्‍त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

यापूर्वी कोर्टातून पोबारा

अहमदनगर पोलिसांनी पकडलेला शाहरूख याला एकदा कोर्टात नेले असता, चहा पिण्याचा बहाणा करून त्याने पळ काढला होता. या प्रकरणी अहमदनगरचे तीन पोलिस निलंबित करण्यात ओल हेाते. त्यामुळे शाहरूखचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. शाहरूखला नाशिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले.

घरमालक रडारवर

नाशिक पोलिसांनी यापूर्वीच शहरात भाडेतत्वावर दिलेल्या जागांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले हेाते. मात्र, बरेच घरमालक याकडे दुर्लक्ष करीत असतात. ज्या ठिकाणी हे तिघे संशयित सापडले त्याठिकाणची माहिती इंदिरानगर पोलिसांना होती का नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून अशा पद्धतीने नोंद न करणाऱ्या घरमालकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिकरोड येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे गावातील दोघा शाळकरी विद्यार्थ्यांना तलावात बुडून मृत्यू झाला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडला.

आदित्य हरिश्‍चंद्र माळी (१६) आणि सुरज देवीदास पवार (११) हे दोघे गुरे चारण्यासाठी गावात गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही दोघे घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हिंगणवेढे येथे असलेल्या तलावाच्या डबक्याजवळ या दोघांचे कपडे आढळून आले. त्यामुळे ते तलावात आंघोळीसाठी गेल्याचा संशय बळावला. त्यानंतर सरपंच संतोष धात्रक, पोलीस पाटील दयाजी शिंदे, सूरज धात्रक, राजाराम धात्रक, सुरेश इलग आदी नागरिकांनी आदित्य व सूरज यांचा शोध घेतला.

संबंधित घटना समजताच नाशिकरोड ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा शोध घेतला. बऱ्याच प्रयत्नानंतर आदित्य व सूरज यांचे मृतदेह आढळून आले. सूरज हा हिंगणवेढे येथील नाईक शिक्षण संस्थेत दहावीच्या वर्गात होता. त्याचे वडील एसटीमध्ये ड्रायव्हर आहेत. तर आदित्य याचे वडील शेतमजूर आहे. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. ऐन दिवाळीच्या सणात अशी घटना घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत दागिने चोरीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन दिवाळीत रो हाउसच्या हॉलमध्ये पूजेसाठी ठेवलेले साडे पाच तोळे वजनाचे दागिने चोरट्याने लांबविले. खुटवडनगर परिसरात शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

रामा त्र्यंबक भागवत (६४, रा. साईदृष्टी अपार्टमेंट, खुटवडनगर) यांनी अंबड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यांनी २० ऑक्टोबर रोजी सोन्याची मोहनमाळ, पोत, अंगठ्या आणि नेकलेस असे दागिने पाटावर पूजेसाठी मांडून ठेवले होते. पूजाविधीनंतर रात्री १२ वाजता ते सर्व झोपले. पहाटे पावणेचारच्या सुमारास भागवत यांना जाग आली. त्यावेळी दागिने पाटावर नसल्याचे त्यांना आढळून आले. घराची खिडकी उघडून सुमारे एक लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे.

लक्ष्मीपूजनलाच चेन स्नॅचिंग

सिटी सेंटर मॉलसारख्या वर्दळीच्या परिसरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्याने हिसकावून नेली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुपारी साडेचार ते पावणेपाचच्या दरम्यान हा प्रकार घडला. वर्षा अनिल भालेराव (४२, रा. शारदानगर, गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

पर्समधील दागिने लांबविले

पायी चाललेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले. आरटीओ कॉर्नर सिग्नल ते राजमाता मंगल कार्यालयादरम्यान ही घटना घडली. जयश्री विजय कळसरकर (रा. साईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. जयश्री कळसरकर या शुक्रवारी (दि.२०) रात्री साडेनऊच्या सुमारास त्या पायी चालल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्याजवळील पर्सची चेन खोलून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोन्याची दागिने लंपास केले. म्हसरुळ पोलीस तपास करीत आहेत.

पतीसमोरच महिलेचा विनयभंग

शिवाजीनगर येथे एका महिलेचा तिच्या पतीसमोरच विनयभंग करून पतीला दमदाटी करण्यात आली. गुरूवारी (दि. १९) पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. दरवाजा उघडा ठेवून ही महिला घरात झोपली होती. त्यावेळी याच परिसरात राहणारा रमेश बबन निरगुडे हा संशयित नग्न अवस्थेत तिच्या घरात आला. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसमधील बॅटऱ्यांची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक आणि वाहकांचा संप चोरट्यांच्या पथ्यावर पडला. चार ते पाच दिवस सुरू असलेल्या या संपकाळात चोरट्यांनी चार बसेसमधून आठ बॅटऱ्या चोरून नेल्या. पंचवटी आगारात ही घटना घडली. या प्रकरणी विक्रम सोमनाथ नागरे (२९, रा. पिंपळगाव बहुला) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पंचवटी आगारात १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान संपादरम्यान १७० बसेस उभ्या केल्या होत्या. त्यापैकी चार बसेसमधील २० हजार रुपये किमतीच्या आठ बॅटऱ्या चोरट्याने लांबविल्या.

कॅशबॅकच्या आमिषाने फसवणूक

फोनद्वारे संभाषण साधत एटीएम तसेच क्रेडीट कार्डची माहिती घेऊन एका संशयिताने सुमारे २९ हजारांच‌ी फसवणूक केली. दिवाळी पाडव्याच्या दिवशी ओझर रोडवरील भुजबळ हॉस्टेल शेजारी हा प्रकार घडला.
वैभव प्रकाश खैरनार (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. खैरनार यांना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अनोळखी मोबाइलवरून फोन आला. संबंधित व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना टुरिस्ट पॅकेज, एलईडी टीव्ही बक्षीस आणि कॅशबॅक ऑफरची माह‌िती दिली. तसेच त्यांच्याकडून एटीएम तसेच स्टेट बँकेच्या क्रेडीट कार्डची माहिती घेतली. त्याआधारे त्यांच्या दोन्ही अकाउंटमधून २८ हजार ९४५ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. कोणतेही बक्षीस अथवा कॅशबॅक ऑफर न देता फसवणूक करण्यात आल्याचे खैरनार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल लंपास
पायी चाललेल्या तरुणाच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेला. गंगापूर रोडवरील महाराष्ट्र दरबार हॉटालजवळ गुरूवारी (दि. १९) रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. गणेश केशव गवळी (२५, रा. नरसिंहनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

मोटारसायकलस्वार ठार

इनोव्हा कार आणि मोटारसायकल यांच्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार झाला. पाथर्डी फाटा येथील साईप्रसाद हॉटेल समोरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. शंकर गेबा खेतावत (३७, रा. राणाप्रताप चौक, सिडको) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खेतावत हे गुरुवारी (दि. १९) रात्री साडेआठच्या सुमारास मोटारसायकलवरून जात होते. विल्होळीकडून नाशिककडे चालेल्या इनोव्हाने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अंबड पोलीसांनी अपघाताची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोवासीय मंत्रमुग्ध

0
0

राजीवनगर

------

सिडकोवासीय मंत्रमुग्ध

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

ओंकार स्वरुपा... आली माझ्या घरी ही दिवाळी... सूर निरागस हो... यांसारख्या मराठी व हिंदी गाण्यांनी परिसरातील रहिवाशांची पाडवा पहाट सूरमयी झाली. राजीवनगर येथील युनिक मैदानात नगरसेवक सतीश सोनवणे यांनी आयोजित केलेल्या पाडवा पहाट मैफलीत गीतकार-गायक संजय गिते यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

राजीवनगर येथे दर वर्षीप्रमाणे युनिक ग्रुपच्या वतीने पाडवा पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला संजय गिते यांच्या सोर्स म्युझिक प्रस्तुत गीतयात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गगन सदन..., आजी सोनियाचा दिनू... अबीर गुलाल..., टिक टिक वाजते..., ही गुलाबी हवा..., उधळीत येरे गुलाल..., ऐसी लागी लगन... चला जेजुरीला जाऊ..., जिवा शिवाची... वाजले की बारा... यांसारखी अनेक मराठी-हिंदी गीते सादर करण्यात आले. संजय गिते, निषाद गिते व अश्विनी सरदेशमुख जोशी यांनी मैफलीत रंगत आणली. सोर्स म्युझिकच्या विद्यार्थ्यांनीही गीते सादर केली.

यावेळी की-बोर्ड जयेश भालेराव, अॉक्‍टोपॅड शुभम जाधव, तबला अनिल गिते, ढोलकी फारुक पीरजादे, बासरी सुधीर सोनवणे, गिटार कृष्णप्रसाद अय्यर यांनी साथसंगत केली. यावेळी सोर्स म्युझिकच्या वतीने विनिता शिनकर, भाग्यश्री गुजर, संगीता अहिरराव, श्रावणी गिते, आर्या आंबेकर यांनी दिवाळीची खास ओवी सादर केली.

--

‘शनाया’च्या गीतांना दाद

यावेळी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील ‘शनाया’ ही सर्वच रसिकांसाठी आकर्षण ठरली. तिने पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिने गाणीही सादर केली. त्यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नगरसेवक सतीश सोनवणे यांनी उपस्थित गायकांचा व कलाकारांचा सत्कार केला.

---------------

जेलरोड

--

सुरावटींना उत्स्फूर्त दाद

--

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राजराजेश्वरी कार्यालयाजवळील पवारवाडी येथे शुक्रवारी झालेल्या पाडवा पहाट मैफलीस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. शंकरराव वैरागकर, गायत्री जोशी यांनी शास्त्रीय गीते, तसेच भक्तिगीते सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

पहाटे सहाला सुरू झालेली ही मैफल आठ वाजेपर्यंत रंगली. विविध गीते एेकण्यात परिसरातील श्राेते रंगून गेले होते. पं. शंकरराव वैरागकर यांनी सुरुवातीला अभंग सादर केला. नंतर ‘एकच टाळी’, ‘मनमोहन मुरलीवाला’, ‘पाहिला नंदाचा नंदन’ या गवळणी सादर करून त्यांनी श्रोत्यांची दाद मिळविली. ‘अवघा तो शकुन’, ‘जो भजे हरी को सदा’ या हिंदी भजनाने कार्यक्रमाची उंची वाढवली. गायत्री जोशी यांनी राग जीवनपुरी सादर केला. यामध्ये त्यांनी बडा ख्याल सादर करून छोटा ख्याल गात रसिकांची मने जिंकली. त्यानंतर भटियार रागात एकतालात छोटा ख्यालची बंदिश सादर केली. मीरा भजनही सादर केले. ‘अवघा रंग एकच झाला’, ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ अशी भक्तिगीते सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी सूत्रसंचालन केले. पुण्याचे अजिंक्य जोशी यांनी वैरागकर यांना तबल्यावर साथसंगत केली. पखवाजावर व्यंकटेश धवन, तानपुऱ्यावर अथर्व वैरागकर, हार्मोनियमवर सागर जोशी यांनी साथ केली. संयोजक अजित बने यांनी आभार मानले.

यावेळी नगरसेविका रंजना बोराडे, शरद मोरे, प्रकाश बोराडे, संजय भालेराव, सुधाकर जाधव, कस्तुरे गुरुजी, ओंकार वैरागकर, सरिता वैरागकर, सुनील महाले, राजेंद्र बोराडे, दत्तात्रय बोराडे, सौरभकुमार शुक्ल, अॅड. अरुण वाकचौरे, सुनील पवार आदी उपस्थित होते.

------------


खुटवडनगर

….

रंगली दीपावली पहाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहाटेपासूनच खुटवडनगर येथील माहेरघर कार्यालयाकडे निघालेले रसिक, प्रवेशद्वाराजवळच भव्य रांगोळी, प्रत्येक पायरी दिव्यांनी सजलेली अन् भव्य व्यासपीठ व त्यावर विराजमान विविध कलासंपन्न गुणवंत २६ कलाकार आणि हळुवार सुरू असलेली आकाशवाणीची धून अशा चैतन्यदायी वातावरणात येथे दीपावली पहाट मैफल रंगली.

परिसरातील लाडशाखीय वाणी मित्रमंडळ व हितगुज महिला मंडळातर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित व वाणी कलाकार संघटन प्रस्तुत ‘उजळून आलं आभाळ’ या मैफलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली.

मैफलीचा प्रारंभ समृद्धी महाजन हिच्या गणेशवंदनेने झाला. नंतर सुधाकर अमृतकर व विनोद कोठावदे यांनी शंखनाद केला. त्यानंतर सादर झालेल्या अवीट गीतांच्या मैफलीत रसिक हरखून गेले होते. उमेश कोठावदे, अथर्व दशपुते, जिज्ञासा येवला, प्रज्ञा मेतकर, पार्थ अलई, योगिता शेंडे, संजय नेरकर, नीता अमृतकर, रजनी मेतकर, पूनम कोतकर, संदीप शिनकर, संकेत अमृतकर, नेहा कोठावदे, प्रियंका कोठावदे, प्राजक्ता बागड, विनिता शिनकर, दीपा पाटे, अनिता शिरोडे, अविनाश बाविस्कर, जितेंद्र सोंजे, प्रसाद शिरोडे आदींनी बहारदार गीते सादर केली.

विद्या कोठावदे यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश कोतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास समाजातील सर्व मंडळांचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ, तसेच समाजबांधव उपस्थित होते.

---

गुणवंतांचा सन्मान

यावेळी आर्किटेक्ट स्मिता वाणी, प्रदीप कोठावदे, डॉ. विशाल अमृतकर, समीर मांजरेकर, चंदर वाघिरे, गोकुळ पाटील, नितीन धामणे, संजय अमृतकर, सुनील राणे पाटील, सीए भूषण कोतकर, भूषण महाजन, सुनील मुसळे आदींचा सत्कार करण्यात आला. मीनल वाणी यांनी निवेदन केले. विवेक वाणी, सचिन बागड, मनीषा शिरोडे यांनी मनोगत व्यक्त केले.

-------------

गोरक्षनगर

---------

भावमधुर गीतांची पर्वणी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे घेण्यात आलेल्या दीपावली सांज पाडवा मैफलीत भावमधुर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. इंटरनॅशनल म्युझिक लव्हर्स ग्रुपने सादर केलेल्या कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भावगीते, भक्तिगीते, तसेच जुन्या व नवीन अशा अनेक हिंदी-मराठी गाण्यांनी ही मैफल रंगली.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मनोगतात आजच्या तरुणपिढीकडून देशाला मोठ्या आशा असून, मेहनत व जिद्दीच्या जोरावर आजचा तरुण आयुष्यात निश्चितच यशस्वी होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा देऊन जास्तीत जास्त तरुणांनी प्रशासकीय सेवेत सामील होण्याचे आवाहन यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तरंगांत रंगुनी गेले रस्ते

0
0

दीपावलीनिमित्त रांगोळीचे कलाविष्कार

म. टा. वृत्तसेवा, येवला

दीपावली सणाचे औचित्य साधत जागोजागी साकारलेला कलाविष्कार, सप्तरंगांच्या रंगांत रंगुनी गेलेले येवला शहरातील रस्ते अन् रस्ते, आकाशात शितल चांदणे व हा मनमोहक नजारा येवला शहरात पाहायला मिळाला. तो साठविण्यासाठी शनिवारी (दि. २१) सायंकाळपासून ते रात्री अगदी उशिरापावेतो फुललेले रस्ते हे चित्र कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन भाऊबीजेच्या दिवशी बघायला मिळाले.

येवल्यातील धडपड मंचने दीपावली सणानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेने हा योग घडवून आणला. शितल चांदण्यांच्या प्रकाशात आकाशातील चांदण्यांप्रमाणे खुललेली शहरातील प्रत्येक गल्ली अन् गल्ली व त्यातील घरांपुढे फुललेल्या नेत्रदीपक रांगोळ्या पाहण्यासाठी केवळ येवलेकर नागरिकच नव्हे, तर बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांनीदेखील गर्दी केली होती. एकापेक्षा एक सरस अशा या रांगोळ्यांच्या कलाकृती पाहुन पाहणारा प्रत्येकजण अगदी फिदा झाल्याचे चित्र यावेळी दिसले.

येवला शहरातील दरवर्षी साजरे होणारे सण, उत्सव म्हटले की जरा हटकेच. दिवाळी सण म्हटला की, जसे आकाशकंदील, फराळ, फटाके आपल्या डोळ्यांपुढे येतात, तसेच दारापुढे रेखाटलेल्या मनमोहक रांगोळ्यादेखील येतात. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या रांगोळीशिवाय हा सण पूर्णच होऊ शकत नाही. प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा नुकतीच पार पडली. त्यात रांगोळीच्या कलेसह ती रेखाटू पाहणाऱ्या महिला व युवतींमधील सुप्त कलागुणांना उत्तेजन मिळावे. शहरातील वातावरण मंगलमय व आनंदमय होऊन दीपावली सण अधिक चैतन्यमयी व्हावा या हेतूने शहरातील धडपड मंचच्या वतीने भाऊबीजेच्या दिवशी शहरात रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

डोळ्यांना भावल्या कलाकृती

सालाबादप्रमाणे यंदाच्या सलग १९ व्या वर्षी दारापुढे काढलेल्या रांगोळीची घेतलेली स्पर्धा शनिवारी अगदी मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी आपल्या घरांसमोर विविध रंगांच्या रांगोळ्यांतून उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती व्हावी यासाठी महिला मग्न झाल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या स्पर्धेत तब्बल १९२ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवताना शहरातील गल्लोगल्ली साकारलेल्या रांगोळ्यांतून एकापेक्षा एक सरस असे कलाविष्कार समोर आले. पारंपरिक ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती रांगोळी आणि विषयाचे बंधन नसलेली रांगोळी अशा तीन विभागात यंदा स्पर्धा घेण्यात आली. धार्मिक प्रसंग, व्यक्तिचित्रे, निसर्ग चित्रे,यासह पशु-पक्षी, पाने-फुले, गालीचा, बेटी बचाओ, क्रांतिकारक, थ्रीडी अशा विविध विषयांवरील रेखाटलेल्या या रांगोळ्यांचा कलाविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी सायंकाळपासून अबालवृद्धांनी रस्ते व गल्ल्यांमध्ये गर्दी केली होती. यंदाच्या रांगोळी स्पर्धेत अंगी असलेल्या कलेला प्रतिभाशक्तीची जोड देत या स्पर्धेत स्पर्धक महिला व युवतींनी अतिशय मनमोहक रांगोळीची मांडणी केली होती. ऐश्वर्यसंपन्न सौंदर्याला विसर पडेल असा कलाविष्कार या कलाकृतींमध्ये दिसून येताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यांची पारणे फिटली. आकाशातील चांदण्यांच्या प्रकाशात सप्तरंगात रंगलेल्या रांगोळ्या बघण्यासाठी येवलेकरांनी मोठी गर्दी केली होती.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डी. एस. वसईकर, सुशांत घोडके, रमेश जाधव, नारायणमामा शिंदे, प्रा. दत्ता नागडेकर, मंगेश रहाणे, संतोष खंदारे, मुकेश लचके व श्रीकांत खंदारे यांनी काम पहिले. यशस्वीतेसाठी प्रभाकर आहेर, गोपाळ गुरगुडे, मयुर पारवे, दत्ता कोटमे, पंकज सांबर, सोनू आहेर, गणेश चव्हाण, मनोज उगले, ऋतिक क्षत्रिय, हेमंत नागपुरे, नंदु पारवे, अक्षय पारवे, परीक्षित सुकासे प्रयत्नशील होते.

स्पर्धेतील विजेते असे

विषय किंवा आकाराचे बंधन नसलेली रांगोळी : अमृता सतीश गुजराथी, आदिती मनोज पटेल, सृष्टी कल्पेश पटेल, शीतल दिलीप कोळस, सुखदा राजेंद्र देवगावकर, शिवानी संतोष मिस्कीन, नीलम सुनील मोहारे, भक्ती रामानुज हेडा, शिवानी मेहुल पटेल, करिष्मा बाकळे, प्रिया प्रवीण शर्मा, आदिती गिरीश पटेल, कोमल रजनीकांत समदडीया.

ठिपक्यांची रांगोळी : रेखा शामसुंदर लाड, राखी राजेंद्र राजपुत, शीतल प्रणव परदेशी, प्राची कंदलकर, वैष्णवी पीयुष पटेल, मंजुषा दिलीप गुजराथी, सविता कृष्णा आहेर, मनिषा उपेंद्र कुलकर्णी.

संस्कार भारती रांगोळी : प्रीतीबाला पटेल, करिष्मा विधाते, पूजा सोहन पटेल, कोमल घटे, मनीषा उमेश काबरा, माया संजय टोणपे, पूर्ती वचनराव गायकवाड, गीता मुंगीकर, दर्शना अक्षय छाजेड, शिल्पा राहुल भावसार, कोमल राजपूत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरपत्नीस सरकार सेवेत सामावून घेणार

0
0

खैरनारांच्या कुटुंबीयांना डॉ. भामरेंचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जम्मू-काश्मीर मधील बांदीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील जवान मिलिंद खैरनार यांना वीरमरण आले. शहीद मिलिंद यांच्या पत्नी हर्षदा यांची इच्छा असल्यास त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन डॉ. भामरे यांनी यावेळी दिले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बोराळे गावात जावून शहीद मिलिंद यांच्या परिवाराची भेट घेतली.

यावेळी वडील किशोर खैरनार, आई, पत्नी व भाऊ तसेच नातेवाईकांची भेट घेऊन मंत्री भामरे यांनी सहवेदना प्रकट केल्या. दरम्यान, शहीद मिलिंद यांच्या बलिदानाचा खान्देशासह संपूर्ण देशाला अभिमान असून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविणे आमचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून शहीद मिलिंद यांच्या कुटुंबीयांना मिळणारा निधी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच त्यांना कुटूंब निवृत्तीवेतन कायमस्वरूपी सुरू राहील. त्यांचे मासिक वेतन यापुढेही त्यांच्या पत्नीस मिळेल, असे डॉ. भामरे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार नितीन पाटील, बोराळे सरपंच पूनमचंद पाटील, देविदास पाटील, विजय चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे. देवळे दारणा नदीवरील पूल विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीसाठी मोकळा करावा या मागण्यांसाठी नुकतेच तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले आहे.

तालुक्यातील भातशेतीसह बागायती पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सिन्नर-घोटी मार्गावरील वाहतूक व्यवस्था किमानपक्षी विद्यार्थ्यांसाठी तरी सुरळीत करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या पुलाची अडचण असल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहतुकीने प्रवास करावा लागत असून, त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात व कॉलेजमध्ये वेळेवर पोहचता येत नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखणीतून झिरपत गेले त्याचे नैराश्य!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योगेशला (नाव बदललेले आहे) इंजिनीअरिंग शिकण्यात रस नव्हताच. पण तरीही पालकांच्या दबावाखातर त्याला इंजिनीअरिंग कॉलेजची पायरी चढावीच लागली. नवा कॅम्पस, नवा माहोल अन् स्टेटस असणारं कॉलेज भोवताली असतानाही दिवसागणिक योगेश मनातून तुटत चालला होता. पालकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तो फारसा उलगडला नाही. आपण स्वत:शी प्रतारणा करत असल्याच्या भावनेने आता योगेशच्या मनात घर केलं होतं.

योगेशला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी यशस्वीपणे मदतीचा हात देणारे त्याची कहाणी सांगत होते. त्यावेळी शहरातल्या प्रति दहा घरांमागे एखादा योगेश दडलेला असू शकतो, अशा आशयाचा त्यांचा संदेश युवकांच्या मानसिक आरोग्याबाबतचे गांभीर्य अधोरेख‌ित करून गेला.

समुपदेशक म्हणाले, इंजिनीअरिंगला प्रवेश घेणाऱ्या या मुलाला अभ्यासक्रमातले मार्कस मुबलक होते. त्याला मिळालेले कॉलेजही नामांकित आणि रँकिंगमधले होते. त्याने निवडलेली ब्रँचही चांगली मागणी असणारी होती. त्याच्या मित्र वर्तुळातून किंवा कॅम्पसमधून कुणाचा कुठल्याही कारणाने सुप्त दबाव असावा, असेही वातावरण नव्हते. कुटुंबातही कलह नव्हता. असे सारे आलबेल असताना अचानक योगेशचे नैराश्याच्या गर्तेत जाणे म्हणजे न समजणारे कोडे होते. घरच्या माणसांच्या हाताबाहेर जाणारे प्रकरण म्हणून योगेशला समुपदेशकांकडे आणले गेले.

मूळ नैसर्गिक स्वभावापासून तुटत चाललेला योगेश अगोदर समुपदेशकांसोबत बोलण्यास तयार नव्हता. पण त्याच्या छंद आणि आवडी-निवडीविषयी मुद्दा आल्यावर तो स्वत:हून खुलला. त्यावेळी त्याने स्वत:ला इंजिनीअरिंगमध्ये रस नसून नाट्यलेखक बनायची इच्छा असल्याचे सांगितले. पण पालकांच्या आग्रहाखातर इंजिनीअरिंगला आल्याचे आणि तेव्हापासून छंदही तुटल्याचे त्याने अत्यंत नाराजीने सांगितले. इंजिनीअरिंग शिकताना नाट्यलेखनासारख्या गोष्टींमध्ये सहभाग घेण्यास पालक समर्थन देत नव्हते. ज्या क्षेत्रात करिअर करायचे, तेच डोळ्यांसमोर हिरावले जात असल्याने योगेश स्वत:शी प्रतारणा होत असल्याच्या भावनेत गुरफटत होता. समुपदेशकांशी खुलून बोलल्यानंतर त्याचे बरचसे ओझे हलके झाले. त्याने स्वत: लिहिलेल्या काही स्क्रिप्ट त्यांना वाचायलाही दिल्या. त्या वाचून योगेशचा मानसिक कल समुपदेशकांनी ओळखला आणि त्याच्या पालकांशी संवाद साधण्याचे ठरविले.

...अन् परत मिळाला त्यांचा मुलगा

योगेशच्या आई-वडिलांशी संवाद साधत त्याला ज्या गोष्टी करण्यात रस आहे, त्यात गैर काहीच नसल्याचे समुपदेशकांनी समजावून सांगितले. इंजिनीअरिंगसोबतच त्याने निवडलेल्या क्षेत्रातही त्याला रूजू द्यावे, असाही संदेश त्यांनी दिला. काही दिवस असा प्रयोग करण्याचे ठरल्यास इंजिनीअरिंगचा अभ्यास सांभाळून नाट्यलेखनास वेळ द्यायची संधी त्याला मिळाल्याने योगेश खूश होता. पूर्वीपेक्षा कदाचित जास्तच तो खुलत गेला. त्याचे हे रूप आईवडिल खूप दिवसांनी बघत होते. नामांकित एकांकिका स्पर्धांसाठी त्याने पुन्हा संहिता लिहिण्यासही सुरुवात केली आणि इंजिनीअरिंगचा अभ्यासही सांभाळला. दिवसेंदिवस त्याच्या चेहऱ्यावरचा खुलणारा आनंद बघून त्याच्या वडिलांनी समुपदेशकांना फोन केला, ‘सर, तुमचा मी ऋणी आहे. तुमच्यामुळे आम्हाला आमचा मुलगा परत मिळाला आहे.’

स्वत:च्या आकांक्षा मुलांवर लादण्याऐवजी त्यांचेही भावविश्व करिअरच्या वळणावर विचारात घ्या, असा संदेश ही केस हाताळणाऱ्या समुपदेशकांनी ‘मटा’ सोबत ‘मना सज्जना’ मालिकेसाठी बोलताना दिला.


.. अशी केली नकारात्मकतेवर मात !

स्पर्धा, ताण-तणाव, धावपळीची जीवनशैली या शब्दांमुळे मेटाकुटीस आलेल्या तरुणाईचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न आम्ही ‘मना सज्जना’ या मालिकेद्वारे करत आहोत. या विषयावर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. तुमच्याही आयुष्यात कधीतरी करिअर, स्पर्धा, रिलेशनशिप, व्यसनाधिनता, अपयश अशा कुठल्याही मुद्द्याशी निगडीत कसोटीचे क्षण असतीलच ना! मग या कसोटीला तुम्ही तोंड कसं दिलंत? नैराश्यावर मात करून यश कसं मिळवलं? तुमचे अनुभव लिहून पाठवा. तुमच्या योग्य अनुभवांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून प्रसिद्धी देण्यात येईल. अनुभवाच्या मांडणीत तुमची नावे आणि वैयक्तिक ओळख गुप्त ठेवण्यात येईल. तर, ‘पत्र नव्हे मित्र’ हे ब्रीद जपणाऱ्या ‘मटा’च्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आमच्या ई-मेल पत्त्यावर मेल करा : पत्ता असा : mataamanasajjana@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवर गुन्हे दाखल करा

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या घटनांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहरातून बळीराजा अभिवादन रॅली काढली. गोल्फ क्लब मैदानापासून काढण्यात आलेल्या या रॅलीचा सरकारवाडा पोल‌िस स्टेशनजवळ समारोप झाला.

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे असून, ते सातत्याने वाढतच आहे. शेतमालाला अपेक्षित भाव न मिळणे, निसर्गाचे दृष्टचक्र, नोटबंदी, जीएसटी, निर्यातबंदीचा धसका शेतकऱ्यांनी देखील घेतला असून, त्यामुळेच शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचा दावा आंदोलकांनी निवेदनात केला आहे. महाराष्ट्र सरकारवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बळीराजा मिरवणुकीद्वारे यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील आळंदी उपसा जलसिंचन संस्थेसह पाच सिंचन संस्थांचे कर्ज थकित आहे. उत्तर महाराष्ट्रातील उपसा सिंचन संस्थेचे कर्ज माफ करून त्यांना पुन्हा सिंचनासाठी अनुदानही देण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मात्र अन्याय सुरूच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून शेतकरी आत्महत्येस जबाबदार असलेल्या सरकारवर कलम ३०२, ३०६ , ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी राजू देसले, सुनिल मालुसरे, हंसराज वडघुले, करण गायकर, गणेश कदम, नाना बच्छाव, प्रकाश चव्हाण, कैलास खांडबहाले, चंद्रकांत बनकर, अमृता पवार, संदीप जगताप, भास्कर शिंदे, किसन गुजर ,नामदेव बोराडे, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, राम खुर्दळ, महादेव खुडे आदी उपस्थ‌ित होते.

या आहेत मागण्या

पॉल‌िहाऊसधारक शेतकरी व २०१७ अखेर थकीत सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी व समान न्याय द्यावा, समृद्धी महामार्गासाठी सरकारने बागायती जमिनी घेऊ नयेत, भूसंपादन कायदा २०१३ चे उल्लंघन थांबवावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन स्वामीनाथन आयोग लागू करावा, वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकऱ्याला दरमहा किमान दोन हजार रुपये पेन्शन द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शिवडेत काळी दिवाळी

नाशिक ः समृद्धी महामार्गास विरोध दर्शविणाऱ्या सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी गावाच्या मुख्य चौकात, तसेच अंगणात काळे आकाशकंदील लावून काळी दिवाळी साजरी केली.

समृद्धी महामार्ग बाध‌ित शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीतच काळी दिवाळी साजरी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध दर्शविणारे शिवडे ग्रामस्थ गावातील मुख्य चौकात एकत्रित जमले. काळी दिवाळी तसेच सरकारचा निषेध असा मजकूर असलेले काळे आकाशकंदील तेथे लावण्यात आले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला. दिवाळी सर्वांच्या आयुष्यात भरभराट, सुख घेऊन येत असते. परंतु, शिवडेतील शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने यंदा नवीन कपडे खरेदी केले नाहीत. तसेच फटाकेही फोडले नाहीत. प्रत्येकाच्या दारासमोर रंगीबेरंगी आकाशकंदील न लावता काळे आकाशकंदील लावून सरकारचा निषेध करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवरे शिवारात बिबट्या जेरबंद

0
0

निफाड : तालुक्यातील शिवरे येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद झाल्याची घटना रविवारी (दि. २२) घडली. हा जेरबंद करण्यात आलेला बिबट्या ४ ते ५ वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. शिवरेत बाजीराव पांडुरंग सानप यांच्या शेतात वन विभागाने ३ ते ४ दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. बिबट्या जेरबंद झाल्याने शिवरे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या दीड वर्षात येवला वन विभागाने निफाड तालुक्यात १७ बिबटे पिंजऱ्यात जेरबंद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाटेंच्या स्वराविष्कारांची मोहिनी

0
0

प्रमोद महाजन उद्यान

---

भाटेंच्या स्वराविष्कारांची मोहिनी


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहाटेचा गारवा, त्यात मिसळणारा तानपुऱ्याचा स्वर, किणकिणणारे घुंगरू, पखवाजाची थाप अशा अाल्हाददायक वातावरणात नाशिककरांनी भाऊबीजेच्या पहाटे प्रख्यात शास्त्रीय गायक आनंद भाटे यांचा स्वरविष्कार अनुभवला. गंगापूररोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यानात आयोजित भाऊबीज पहाट कार्यक्रमात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या गायनात श्रोते तल्लीन झाले होते.

सांगीतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचे किस्से, गप्पांच्या ओघात मांडताना सजलेल्या या मैफलीत ‘वद जाऊ कुणाला शरण’ या पदासह ‘जोगीया मोरे घर आये’ या ललत रागातील तीन तालातील बंदिशीसह विविध रचनांना यावेळी उत्स्फूर्त दाद लाभली. ‘काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग', ‘माझे माहेर पंढरी’ यांसारखी भजने, रचना सादर करीत भाटे यांनी रसिकांची मने जिंकली. ‘बाजे रे मुरलीयाँ बाजे' ही रचना सादर करीत त्यांनी सर्वांना थक्क केले. ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘चिन्मया सकल हृदया' या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

आनंद भाटे यांना भरत कामत (तबला), दिगंबर सोनवणे (पखवाज), सागर बोरकर (तालवाद्ये), राहुल गोळे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी ‘भाऊबीज पहाट' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल, भाजपचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, सभागृह नेते दिनकर पाटील, अॅड. नितीन ठाकरे, वसंत खैरनार, नंदकिशोर भुतडा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवीट स्वरांतून अवतरली मंतरलेली सोनेरी किरणे

0
0

अवीट स्वरांतून अवतरली मंतरलेली सोनेरी किरणे


सूरमयी पाडवा पहाट, सांज पाडवा मैफली अन् त्यांना दाद देणारे कानसेन नाशिककर हे समीकरण अलीकडे चांगलेच दृढ झाल्याचे दिसून येते. शहरात दर वर्षी पहाट, सांज पाडव्याचे आयोजन करण्यात येते. मुंबई-पुण्यानंतर शास्त्रीय गायक नाशिक शहरात आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक असतात, याचा प्रत्यय यंदाच्या पाडवा मैफलींमुळे अाला. शहरासह विविध उपनगरांत रंगलेल्या या मैफलींतील अवीट सुरावटींतून मंतरलेली सोनेरी किरणे अवतरल्याची अनुभूतीच त्यामुळे आली...

-----

पिंपळपार

---

‘बडा ख्याल’मध्ये नाशिककर तल्लीन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहाटेचा कुंद गारवा, नीरव शांततेत गोदाघाटाकडून अवचित येणारी घंटांची किणकिण, अधूनमधून होणारी पिंपळपानांची सळसळ, संस्कृती नाशिक या दोन शब्दांनी व्यापलेले बॅक््ग्राउंड, मध्येच हलणारे छोटे आकाशकंदील आणि समुद्राच्या लाटांची हळुवार येणारी व्हिडीओग्राफी या मंतरलेल्या माहोलमध्ये कैवल्यकुमार गुरव नावाचे गंधर्व गाण्यासाठी बैठक जमवतात. प्रत्यक्ष शारदामाता वास करतेय असा वाटणारा स्वर जेव्हा पिंपळपारावरील मंतरलेल्या वातावरणात गुंजतो तेव्हा नाशिककर मंत्रमुग्ध होतात. निमित्त असते संस्कृती नाशिकतर्फे नेहरू चौकात आयोजित पाडवा पहाटचे.

सध्याच्या पिढीतील आश्वासक स्वर म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या कैवल्यकुमार गुरव यांनी ‘ललत’ या रागाने मैफलीची सुरुवात केली. ‘राम नाम तू जप कर’ पेश करून त्यांनी ‘जा रे जा बालमवा’ सादर केले. त्यानंतर ‘बरखा ऋतू आयी’, भूपेश्वरी रागातील ‘कैसे बिताऊँ पिया’, ‘सय्या नहीं आवे’ हा छोटा ख्याल झाल्यावर ‘सूर चराचर छायो’ हे निरंजनी भजन त्यांनी गायले. ‘घेई छंद मकरंद’ने नाशिककरांची ब्रह्मानंदी टाळी लागली. त्यानंतर भटियार रागातील ‘सुचत गयी मोरी निंद’ पेश केले. ‘दिन बित गए सुख के, तनिक सुन री’ हेदेखील त्यांनी सादर केले. ‘आयी देखो भोर भयी’ या भैरवीने त्यांनी मैफलीची सांगता केली.

कैवल्यकुमारांसारख्या गायकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी अनेक गायकांनी दिलेली पावती, तसेच उस्ताद विलायत खाँ, उस्ताद अल्लारखा खाँ, उस्ताद अमजद अली खाँ, पं. हरिप्रसाद चौरासिया यांसारख्या दिग्गजांनीही कैवल्यकुमार यांच्या आवाजाचे केलेले कौतुक उगाचच केलेले नाही, याचा प्रत्यय त्यांचे गाणे ऐकल्यावर आला. कैवल्यकुमार गुरव यांना तबल्यावर पंडित नितीन वारे, तर संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तानपुऱ्यावर विनोद कुलकर्णी, संस्कार जानोरकर यांनी साथसंगत केली.

---

मान्यवरांचा सत्कार

येथील पाडवा पहाट कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. यात यंदा व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गामणे, बडी दर्गाहचे ट्रस्टी अलीमभाई पीरजादे आणि पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र श्यामराव शिंदे यांना संस्कृती नाशिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी अग्निशामक दलातील राष्ट्रपतिपदक विजेत्या जवानांचाही सत्कार करण्यात आला. संयाेजक शाहू खैरे, गुरुमित बग्गा, शरद आहे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, गोकुळ पिंगळे, रवींद्र कदम, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आदींसह असंख्य नाशिककरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांचा बार फुसका!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टाचे निर्देश आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाचा फटाके विक्रीवरही विपरीत परिणाम झाला. यंदा ३० ते ३५ टक्क्यांनी फटाक्यांची विक्री रोडावल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. तरीही फटाके विक्रीतून शहरात २० ते २५ कोटींची आणि जिल्ह्यात साधारणत: ५० ते ५५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज विक्रत्यांनी व्यक्त केला आहे.

दिवाळी आणि फटाक्यांचे अतूट नाते असून फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्ण असल्याची अबालवृध्दांची धारणा आहे. नाशिककरांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी यंदाही शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावण्यात आले. परंतु, दिवाळीपूर्वी सातत्याने सुरू असलेला पाऊस, ऐन दिवाळीत सुरू झालेला एसटी महामंडळातील चालक वाहकांचा संप, नोटबंदी आणि जीएसटीचाही फटाके व्यवसायावर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

रहिवाशी भागात फटाके विक्रीला हायकोर्टाने परवानगी नाकारली. महापालिकेनेही फटाके स्टॉलधारकांना परवानगी देण्याची प्रक्रिया उशिराने सुरू केल्यामुळे फटाके विक्रेत्यांना व्यवसायासाठी पाचच दिवस मिळाले. त्यामुळे यंदा विक्रेत्यांचा बराचसा माल पडून राहिल्याची माहिती काही विक्रेत्यांनी दिली. यंदा प्रथमच फटाके विक्रीच्या स्टॉल्सची संख्याही ४०० वरून शंभरावर आली. गोल्फ क्लब मैदान येथे केवळ ३७ स्टॉल्स उभारण्यात आले. दिवाळी काळात येथे दीड कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. शहरात पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिककरोड अशा सर्वच ठिकाणच्या फटाके स्टॉल्सवर २० ते २५ कोटींची तर जिल्ह्यात सुमारे ५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा फटाके विक्रीला काहीसा कमी प्रतिसाद मिळाला. साधारणत: ३५ टक्के विक्री रोडावली. स्टॉलधारकांना व्यवसायासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. फटाके खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी राहिल्यामुळे बहुतांश विक्रेत्यांकडे माल शिल्लक राहून भांडवल अडकून पडले.

- संतोष चव्हाण, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षोल्हासात प्रकाशपर्व साजरे!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत हर्षोल्हासाच्या वातावरणात आनंदाची पखरण करत नाशिककरांनी दिवाळीचा आनंद लुटला. गतर्षीप्रमाणेच यंदाही पर्जन्यवृष्टी चांगली झाल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उत्साह ओसंडत होता. अद्याप सुट्यांचा माहोल असल्याने बाजारपेठांमधील गर्दी आणि खरेदीचा ओघ कमी झालेला नाही. फटाक्यांच्या आतषबाजीत प्रकाशपर्वाचे स्वागत करण्यात आले. मात्र, यंदा फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्याचे सुचिन्ह दिसून आले.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीस वसुबारसच्या पूजनाने प्रकाशपर्वाच्या उत्साहास सुरुवात झाली. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी या पर्वाचा आनंद शिगेला पोहचला. यंदा दिवाळीच्या तोंडावर अवकाळी पावसाने प्रश्नचिन्ह उभे केल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गही धास्तावला होता. पण सुदैवाने पावसाने उघडीप दिल्यानंतर बाजारपेठ पुन्हा गर्दीने फुलू लागली.

नाशिककरांनी यंदाच्या दिवाळीत रिअल इस्टेटसह फर्निचर, वाहन, सोने, कपडे आदी वस्तूंच्या खरेदीचाही मनमुराद आनंद लुटला. बाजारपेठेतही या प्रकाशपर्वाच्या औचित्यावर कोट्यवधींची उलाढाल झाली. या मोठ्या वस्तूंसोबतच दिवाळीच्या बाजारतही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. दिवाळीच्या दरम्यान सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुटीच्या कालावधीत फिरण्याच्या आनंदावर विरजण पडण्याचे चिन्ह होते. मात्र, संपाच्या घोषणेनंतर खासगी वाहतूक यंत्रणेने घेतलेल्या पुढाकारामुळे अनेकांनी प्रवास करणे पसंत केले. अनेकांनी हाती असलेल्या वाहनांद्वारे प्रवास करत पर्यायी व्यवस्था शोधण्याचा प्रयत्न केला. भाऊबीजेपासून प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाली आहे. या दिवसापासून एसटीचा संपही मिटल्याने सद्यःस्थितीत वाहतूकव्यवस्था सुरळीत आहे. अद्याप घराघरांमध्ये सुट्या आणि पिकन‌िकचा माहोल दिसून येत आहे. परिणामी अद्याप शहरातील विविध उद्याने, हॉटेल्स आणि सिनेमा टॉकीजसह विरंगुळ्यांच्या केंद्रांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.


वंचितांच्या अंगणातही पणतीचा प्रकाश

अनेक सामाजिक संस्थांसह विविध कंपन्या आणि काही कुटूंबांनी वैयक्तिकरित्या वंचितांसोबत दिवाळी साजरी केली. त्यासाठी शहरातील विविध वस्त्यांसह जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांवर गरजू लोकांमध्ये फराळ, फटाके, कपडेवाटप आणि अन्नदान करण्याच्या उपक्रमांचे आयोजन केले होते. अनेकांनी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून या उपक्रमांसाठी बळ देण्याचे आवाहन केले होते. यामुळे लक्ष्मीपूजनानंतर अनेक व्यक्ती आणि संस्थांची पाडवा आणि भाऊबीजेची दिवाळी वंचितांसोबत साजरी केली. संवेदनशील नागरिकांच्या योगदानाने वंचितांच्या जीवनातही प्रकाशपर्व पोहचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images