Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नागरिकांनी विंचुरला रोखला रस्ता

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

विंचूर-प्रकाशा मार्गावरील लासलगाव-विंचूर दरम्यान पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्याची दूरवस्था झाली आहे. अनेक अपघात या रस्त्यावर होऊन अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील विंचूर येथील तीन पाटी येथे सुमारे अर्धा तास रास्ता रोको करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला. यावेळी विंचूर तीन पाटी परिसरात सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सर्वपक्षीय नेत्यांनी वेळोवेळी हा रस्ता दुरुस्तीबाबतचे निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे या रस्त्याची दूरवस्था झाली असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर यांनी सांगितले.

लासलगाव येथे रेल्वेच्या कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रस्त्यावरून गेले होते. रस्ता खराब असल्याने त्यांनी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांच्या समवेत लष्कराच्या हेलिकॉप्टरने नाशिक येथे जाणे पसंत केल्याचे यावेळी पंचायत समिती सदस्य शिवा सुरसे यांनी निदर्शनास आणून दिले.

या आंदोलनात विंचुरचे उपसरपंच नाना जेऊघाले, अविनाश दुसाने, महेंद्र पुंड, नीलेश दरेकर, शांताराम राऊत, पांडुरंग राऊत, ग्रामपंचायत सदस्या संगीता सोनवणे, रेहाना मोमिन, अंजुम शेख, वंदना काकडे, नंदिनी शिरसागर, ज्ञानेश्वर पवार, सुनीता पवार, आत्माराम दरेकर, पप्पू शेख, धनंजय पवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आश्वासनावर बोळवण

या रस्त्याची निविदा काढण्यात आली आहे. तातडीने काम केले जाणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी या आंदोलकांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खड्ड्यांमध्ये ओतली माती

0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पिंपळस ते येवल्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नैताळे येथील बळीराजा संघटनेने सत्यनारायण पूजा करून खड्ड्यांना प्रसाद अर्पण केला होता. या अनोख्या आंदोलनाद्वारे संघटनेने बांधकाम विभागाच्या कामकाजाचा निषेध केला होता. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने चक्क खड्ड्यांमध्ये माती टाकून ते बुजवण्याचा हास्यास्पद आणि संतापजनक प्रकार सुरू केला आहे.

परतीच्या पावसाने या रस्त्यावर पावसाने मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र आता हे खड्डे चक्क मातीने बुजवण्याचा अजब प्रकार पाहून बांधकाम विभागाच्या या ‘आयडीच्या कल्पने’बाबत नागरिकांना हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गासह संपूर्ण निफाड तालुक्यातील रस्त्याची ‘वाट’ लागली आहे. यामुळे तालुक्यातील जनता रस्त्याच्या प्रश्नावर प्रचंड संतापलेली आहे. या रोजच्या समस्येला वैतागून नैताळकरांनी गांधीग‌िरी करत सत्यनारायण पूजत आंदोलन केले. ही पूजा नाशिक-औरंगाबाद महामार्गाला पावला खरा, मात्र निफाड परिसरात बांधकाम विभागाचा ट्रॅकटर खड्ड्यांसाठी केवळ माती घेवून धावत आहे. या महामार्गावर चक्क माती टाकून हे खड्डे बुजवल्यामुळे नागरिकांकडून बांधकाम विभागाच्या संताप व्यक्त केला जात आहे.

केवळ एक किलोमीटरचीच दुरुस्ती

नाशिक-औरंगाबाद या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले असून, पिंपळस ते निफाड या सहा कि.मी. रस्त्याची दुरुस्ती अपेक्षित असतांना फक्त एक कि.मी.च्या रस्त्याची दुरुस्ती का केली, असा सवाल निफाडचे नगरसेवक राजाभाऊ शेलार यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

पिंपळस ते येवला हा नाशिक औरंगाबाद महामार्गावरील चौपदरीकरण मार्ग पूर्णतः उखडला आहे. मोजता येणार नाही इतके खड्डे असल्याने या मार्गावर अपघात वाढले आहे. तरीही बांधकाम विभाग लक्ष देत नाही हे अनाकलनीय आहे. भाजप सरकारकडून रस्त्यांबाबत खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण होताना दिसत नाही.-अॅड. श्रीकांत रायते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतांच्या नातेवाइकांना एक लाखाची मदत

0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अजंग येथील ट्रॅक्टर दुर्घटनेतील जखमींची व मृतांच्या नातेवाइकांची जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामान्य रुगणालयात बुधवारी भेट घेतली. यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांची मदत तर जखमींना रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, अजंग येथे मृत व जखमींच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्तारोको केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तालुक्यातील अजंग दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात शेतमजूर महिलांना गावाकडे आणणारा टॅक्टर ट्रॉलीसह कोसळ्याने सात महिलांचा मृत्यू झाला होता. १० महिला जखमी झाल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अग्नीशामक दल व पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या जखमी महिलांची व नातेवाइकांची विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त महेश झगडे, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रांताधिकारी अजय मोरे, संजय दराडे, भाजप नेते अद्वय हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, उपसभापती सुनील देवरे, संजय दुसाने, विनोद वाघ, लकी गिल आदी आले होते.

अपघातातील पाच महिलांचा प्राण वाचविणाऱ्या निकिता सोनवणे या जखमी तरुणीशी पालकमंत्री महाजन यांनी संवाद साधला. तिच्या समयसुचकतेचे त्यांनी कौतुक केले. यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत पालकमंत्री महाजन व भुसे यांनी या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांची मदत तर जखमींवर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच ट्रॅक्टर चालकावर देखील गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत या घटनेबाबत चर्चा झाली असून, अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी केल्याचे भुसे यांनी सांगितले.

अजंग येथे रस्तारोको

दरम्यान, मंगळवारी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर बुधवारी सकाळी मृत व जखमींचे नातेवाइक, ग्रामस्थ यांनी मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्तारोको केला. पालकमंत्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देवून मृत तसेच जखमींच्या नातेवाईकांची भेट घेवून १० लाख रुपयांची मदतीची घोषणा करावी अशी मागणी लावून धरल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मोठा पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान शासकीय मदतीची घोषणा केल्यावर भुसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून १ लाख मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली असून शासनस्तरावरून अधिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

या दुर्दैवी अपघातानंतर अजंग वडेल गावासह पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. बुधवारी शोकाकुल वातावरण मृत सात शेतमजूर महिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील आशाबाई म्हाळके यांच्यावर अजंग येथे तर संगीता महाजन, उषाबाई भदाणे, संगीता भदाणे, रोहिणी शेलार, सुनंदा शेलार, रंजना महाले यांच्यावर वडेल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, अद्वय हिरे, बंडू बच्छाव उपस्थित होते. मृत महिलांच्या नातेवाइकांनी हंबरडा फोडल्याने अनेकांचे डोळे पाणावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात लूट करूनही अस्वच्छतेचीच सेवा

0
0

नाशिकमध्ये सर्वच बस स्थानकांवर महिलांची कुचंबणा

नाशिक : ‘मी लहान होते तेव्हा जशी महिला स्वच्छतागृहाची स्थिती होती अगदी तशीच आताही आहे. शिवनेरीने मी नेहमी पुण्याला जाते. पण, स्टँडवरील स्वच्छतागृहात जाण्याची इच्छाच होत नाही’, संपदा पाठक या प्रवासी महिलेचे उद‍्गारच सारे काही सांगतात. शहरातील चारही बसस्टँडच्या ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची मोठीच दुर्दशा आहे. पैसे घेऊनच महिलांना प्रवेश दिला जात असला तरी सेवा मात्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेचीच मिळते आहे.

शहरातील नवीन सीबीएस, जुने सीबीएस, मेळा, महामार्ग आणि निमाणी असे चार बसस्टँड आहेत. तेथे एसटी महामंडळाच्या वतीने महिला स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण, ते केवळ नावालाच. देखभाल दुरुस्तीची मदार कंत्राटदारावर असून त्यावर कुठलेही नियंत्रण महामंडळाचे नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. कंत्राटदारांकडून महिला सेविकेची नियुक्ती दरवाजातच करण्यात आली आहे. या सेविका दोन ते पाच रुपये घेतल्याशिवाय महिलांना आत प्रवेशच देत नाही. त्यामुळे महिलांना युरिनसाठीही पैसे मोजावे लागतात. तक्रार आली तर कारवाई करतो, दंड करतो, असे सरकारी उत्तर महामंडळ प्रशासन देते. पण, खुले आम महिलांची लूट करण्याचे बळ ठेकेदाराला येते कुठून? हाही प्रश्नच आहे. प्रमुख बसस्टँडच्या ठिकाणी जे स्वच्छतागृह आहे ते पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे वास्तव आहे. याची कुठलीही दखल आजवर महामंडळाने घेतलेली नाही. यासंदर्भात तक्रार करण्याचे प्रमाणही नगण्यच आहे. देशात स्वच्छता अभियान राबविले जाते मग एसटीचे स्वच्छतागृह त्याला अपवाद आहेत का, असा प्रश्न महामार्ग बसस्टँडवर आलेली शीतल गाडेकर ही युवती विचारते.

एकाही ठिकाणी कमोड नाही

एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. याबाबत त्यांना विचारले तर ते नाव नका घेऊ पण, समस्या नक्की मांडा, असे त्या अवर्जून सांगतात. काही ठिकाणी पाण्याची सुविधा आहे तर काही ठिकाणी गळक्या पाइपलाइन. त्यामुळे स्वच्छ, सुरक्षित असे वातावरण कुठेच नाही. कमोडची व्यवस्था एकाही स्वच्छतागृहात नाही. त्यामुळे अपंग, वृद्ध महिलांचे प्रचंड हाल होतात. हिरकणी कक्षाची संकल्पना नावालाच आहे. केवळ बोर्डापुरतीच ती मर्यादित आहे. महिलांमध्येही त्याची जनजागृती नाही.

विद्यार्थिनींची गैरसोय

शहर परिसरात एसटीच्या मदतीने हजारो विद्यार्थिनी ठिकठिकाणी प्रवास करतात. गावातून शहरात आणि शहरातून गावाकडे अशा स्वरुपाचा शैक्षणिक विकासाचा त्यांचा मार्ग मात्र एसटीने फारच गैरसोयीचा केला आहे. शहरालगतच्या परिसरातील शैक्षणिक संकुलांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींनी एसटी शिवाय पर्याय नाही. एसटीच्या महिला स्वच्छतागृहात मोठी कुचंबणा होते पण, सांगायचे कुणाला, असा प्रश्न कामिनी कदम ही ओझरची विद्यार्थिनी विचारते.

सॅनिटरी नॅपकीन तर दूरच

जिथे साधी स्वच्छता होत नाही तिथे सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीनचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. सतत प्रवास करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये एसटीची स्वच्छतागृहे मोठा आधार ठरू शकतात. पण, दुर्गंधी, तुटलेले नळ, फुटलेले दरवाजे अशा घाणेरड्या वातावरणातच महिलांना वावरावे लागत असल्याने ते दिवस महिला प्रवाशांना नकोसेच वाटतात. मार्केटिंगचा मी जॉब करते. त्यामुळे सतत एसटीचा प्रवास असतो. पण, ते दिवस अतिशय खडतर असतात, असे प्रमिला जगताप सांगते.

जिल्ह्यात अवस्था भीषण

जिल्ह्यातील तालुक्याच्या किंवा गावाच्या ठिकाणी असलेल्या बसस्टँड परिसरातील महिलांसाठीही एसटीचेच स्वच्छतागृह उपलब्ध आहे. त्यामुळे महिला प्रवाशांबरोबरच परिसरातील महिलाही तेथेच येतात. त्र्यंबकेश्वरसारख्या तीर्थस्थळी तर एसटीच्या स्वच्छतागृहाचाच मोठा आधार आहे. लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत, येवला, सटाणा येथेही अशीच स्थिती आहे. नांदगावला बसस्टँडमध्ये स्वच्छतागृह आहे पण त्याचा वापर होत नाही. कारण, बसस्टँडवर जाणाऱ्यांची संख्या कमी आणि

शनिचौकात उभे राहणाऱ्यांची अधिक. तर, सटाण्यामध्ये पैसे घेत असल्याने महिला उघड्यावरच भींत व झुडपांच्या आडोशाला बसतात. त्याची दखल घेतली गेलेली नाही.

स्वच्छतागृहांच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदारांकडे देण्यात आली आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर केली तर कारवाई करतो. तक्रार केली तर त्याची तत्काळ दखल घेतो.

- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी-विदेशी मद्याची ढाब्यांवर सर्रास विक्री

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिकला गंगापूर धरणाशी जोडणा ऱ्या गंगापूर रोडवर गेल्या काही दिवसात ठिकठिकाणी अनधिकृत हॉटेलांचे पेव फुटले असून तेथे बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्याची विक्री केली जात आहे. या प्रश्नी महापालिकेसह पोलिस प्रशासनाने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

गंगापूर रोडवरील अनधिकृत हॉटेल चालकांवर कारवाईची मागणी यापूर्वी अनेकदा स्थानिक रहिवाशांनी केली आहे. परंतु, असे असतांना दिवसेंदिवस वाढत असलेल्या अनधिकृत ढाब्यांवर ओल्या पार्ट्या रंगत आहेत. तेथे देशी, विदेशी मद्य सर्रासपणे विक्री होत आहे. गेल्या काही काळात दारू विक्रीबंदीसाठी शहरात विविध ठिकाणी आंदोलने झाली. यात सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अनधिकृतपणे दारू विक्रीला जणू संरक्षणच मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गंगापूर रोडवर तर अनधिकृत व्यावसायिकांचे अड्डे सुरू आहेत. मांसाहारी खानावळींच्या नावाखाली तेथे अवैद्य मद्यविक्री होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडे याबाबत स्थानिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्यांच्याकडूनही याकडे कानाडोळा केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. काही स्थानिक पुढारी ढाबाचालकांना पाठिशी घालत आहे.

ढाब्यांवर बर्थ-डे सेलिब्रेशन

शहरात महागड्या हॉटेल्सवर वाढदिवस साजरा करणे अनेकांना परवडत नाही. यात राजकीय पुढारी, कार्यकर्तेही अपवाद नाहीत. कार्यकर्त्यांला खूश करण्यासाठी ढाब्यांवर वाढदिवस साजरा करण्याचे पेव फुटले आहे. अशा सेलिब्रेशनमध्ये केवळ मांसाहारच नव्हे तर मद्याचे पेगही रिचविले जात आहेत. अनेकदा अशा पार्ट्यांमध्ये वादही होतात. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो.

राजकीय कार्यकर्त्याचा ढाबा तेजीत

शिवाजीनगर, गंगापूररोडवर एका राजकीय कार्यकर्त्या ढाबा आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या या कार्यकर्त्यांकडून आपल्या ढाब्यावर बिनदिक्कतपणे मद्यविक्री केली जात आहे. राजकीय वरदहस्त असल्याने तेथे थेट कारवाई करण्याचे पोलिसांकडून टाळले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या ढाब्यावर महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पाच दुचाकी लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या सुट्यांसाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या वाहनांवर चोरट्यांनी हात साफ केल्याचे समोर आले आहे. वाहनचोरीच्या तब्बल पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. बाहेरगावी गेलेले वाहनमालक घराकडे परतू लागल्याने वाहनचोरीच्या घटना पुढे येत आहेत.

पंचवटीतील गजानन चौकात राहणारे आकाश श्रीकांत मेखे बुधवारी दिवाळीनिमित्त खरेदीसाठी रविवार कारंजा भागात गेले असता चौकात पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच १५/ सीएफ ९३६६) चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत. दुसरी घटना हिरावाडी भागात घडली. एकाच इमारतीत पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. नीलेश जिभाऊ भामरे (रा. हरिनंदन अपार्टमेंट, सिद्धेश्वरनगर) यांची पॅशन (एमएच १५/डीक्यू ५१८९) व कपिल कमलकर यांची यामाहा (एमएच १५/ईएल ६८२५) अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी लंपास केली. दिवाळीनिमित्त दोन्ही कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी ही संधी साधली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार साळवे तपास करीत आहेत. वाहनचोरीची तिसरी घटना अशोका मार्गावर घडली. चेतन पाटील (रा. शुभ अपार्टमेंट, आदित्यनगर) यांची दुचाकी (एमएच १५/सीयू ०५२५) त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, हवालदार शेख तपास करीत आहेत. दरम्यान, पराग ज्ञानदेव चौधरी (रा. मैत्रेय सोसायटी, गंधर्वनगरी) मंगळवारी (१७ ऑक्टोबर) दिवाळीनिमित्त कुटुंबीयासह जळगाव येथे मूळ गावी गेले होते. रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वी त्यांनी आपली पल्सर (एमएच १९/एक्स ३२४४) दत्त मंदिर सिग्नल परिसरातील आर्चिज गॅलरीलगतच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी ही दुचाकी लंपास केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक तेली तपास करीत आहेत.

संशयित जेरबंद

चोरीच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या परप्रांतीय संशयित चोरट्यास पोलिसांनी अटक केली. हा संशयित भामटा कापड दुकान फोडण्याच्या प्रयत्नात होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रवी दीनदयाल पांडे (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. तो नाशिकरोड परिसरातील गीता ड्रेसेस या दुकानाजवळ बुधवारी मध्यरात्री सापडला. नाशिकरोड पोलिस रात्री गस्त घालत असताना तो संशयास्पद हालचाली करीत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कापड दुकान फोडण्यासाठी अंधारात लपून बसल्याची कबुली त्याने दिली. हवालदार खिल्लारी तपास करीत आहेत.

हॉटेलमध्ये टोळक्याचा धुडगूस

जेवणाचे बिल देण्याच्या कारणातून टोळक्याने हॉटेलचालकास मारहाण करीत धुडगूस घातला, तसेच सामानाची तोडफोड केली. ही घटना जुना सायखेडा रोडवरील जामकर मळ्यात घडली. या प्रकरणी नारायणबापूनगर भागात राहणाऱ्या चार संशयितांविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन तोरणे, कुंदन आढाव, अक्षय बोडके आणि यश गरुड (रा. सर्व नारायणबापूनगर, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. हॉटेलचालक कुणाल दिलीप पगारे (रा. आगर टाकळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पगारे यांचे जामकर मळ्यात सुदर्शन नावाचे हॉटेल आहे. सर्व संशयित जेवणासाठी मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास संशयितांनी जेवणाच्या बिलावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संशयितांनी शिवीगाळ करीत हॉटेलमालक पगारे यांना व त्यांच्या मामेभावाला बेदम मारहाण केली. संशयितांनी हॉटेलमधील सामानाची आणि फ्रीजची तोडफोड करीत मोठे नुकसान केले. उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा लिलावावरून गोंधळ

0
0

सटाण्‍यात कांदा उत्पादकांचा सभापतींना घेराव; दोन तास लिलाव बंद

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात होणारी घसरण व कांदा व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यास आलेल्या निर्बंधाचा उद्रेक होत सटाणा बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादकांनी गुरुवारी (दि. २६) सकाळी कांदा लिलाव बंद पाडले. यावेळी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या बाहेर सभापती रमेश देवरे यांना कांदा उत्पादकांनी घेराव घातला. यामुळे तब्बल दोन तास कांदा लिलाव बंद पडले. दरम्यान, बाजार समिती सभापती देवरे यांनी कांदा विक्रेत्या शेतकरी बांधवाना विश्वासात घेऊन कांदा आवक व व्यापारी कमतरता लक्षात आणून दिल्यानंतर लिलाव पूर्ववत सुरू झाले.

सकाळी १० वाजेच्या सुमारास कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करतांना वाहनांचे निर्बंध घातले व कांदा दरदेखील सुमारे ५५० रुपये क्विंटलने घसरल्याने संतप्त झालेल्या कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून आपला मोर्चा बाजार समिती प्रशासकीय कार्यालयावर वळविला. या वेळी बाजार समिती प्रशासक रमेश देवरे, सचिव तांबे यांना घेराव घातला. गत दोन दिवसांत कांद्याचे दर ३३०० रुपये क्विंटलवरून ५५० रूपये इतके घसरून थेट २७५० रुपये इतके झाले आहे. याचा परिणाम कांदा उत्पादकांच्या नफ्यावर होऊन ट्रॅक्टर मागे शेतकऱ्यांचे १३ ते १५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे, असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यात कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समिती आवारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असताना कांदा खरेदी कमी करण्याचा सपाटा सुरू केला. यामुळे संतप्त कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी सभापती व सचिवांना जाब विचारला.

दरम्यान, कांदा खरेदीसंदर्भात दररोज माहिती वरिष्ठ कार्यालयात देण्यात येत असल्याचीदेखील माहिती यावेळी सभापती देवरे यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी घेराव आंदोलनात दिलीप सूर्यवंशी, मनोज सोनवणे, किरण रौंदळ, लक्ष्मण सोनवणे, रूपेश सोनवणे, प्रदीप भामरे, भुपेंद्र निकम, अनिल सोनवणे, केशव सूर्यवंशी, मोती चौधरी, संपत सोनवणे, महेश सोनवणे आदी उपस्थित होते.

दर वाढविणे हा समितीचा विषय नाही

संतप्त झालेल्या कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांना बाजार समिती सभापती रमेश देवरे यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करणे व वाढविणे हा बाजार समितीचा विषय नाही. मात्र कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, मजूर टंचाई अभावी व्यापारी कांदा खरेदी कमी करत असल्याचे देवरे यांनी शेतकऱ्यांनी सांगितले. अशात सटाण कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यस्थितीत व्यापारी कमतरतेमुळे संपूर्ण वाहने खरेदी करण्यातही अडचणी निर्माण होत असल्याची भूमिका देवरेंनी यावेळी मांडली.


कांदा व्यापाऱ्यांनी साखळी करून कांदा भाव जाणीवपूर्वक कमी करून कांद्याची खरेदीवर निर्बंध लादले असतील. तर सर्व कांदा उत्पादक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करतील.

- लक्ष्मण सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी

कांद्याची बाजार समितीत वाढलेली आवक, व्यापाऱ्यांना जाणवणारी मजूरटंचाई यामुळे कांदा खरेदी करण्यास व्यापाऱ्यांना अडचणी येत आहे. तसेच कांदा व्यापारी वाढविण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे.

- रमेश देवरे, सभापती, बाजार समिती सटाणा


गुरुवारचे कांदा लिलावाचे दर (रुपयांमध्ये)

कांद्याचे प्रकार...........कमी.............जास्त............सरासरी

उन्हाळ कांदा...........१२००............२९००..............२३००

नवा कांदा (लाल)...........६००............१४२७..............१०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक ते तळोदा सायकल रॅली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्षत्रिय कलाल समाजाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने नाशिक ते तळोदा (जि. नंदुरबार) अशी सायकल रॅली काढण्यात आली. नाशिक येथून २६ ऑक्टो रोजी सकाळी सहा वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडूसा गोपालसा कलाल, नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र फड व माजी सैनिक सदाशिव सूर्यवंशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. गुरुवारी निघालेली रॅली नाशिक- पिंपळगाव- चांदवडमार्गे मालेगाव येथे मुक्काम करणार आहे.

२७ ऑक्टोबर रोजी मालेगाव– आर्वी- धुळेमार्गे शिरपूर येथे मुक्काम करणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी शिरपूर- शहादामार्गे तळोदा येथे पोहोचणार आहे. तळोदा येथे गणपती गल्लीतील कलाल समाजवाडी येथे सायकल रॅलीचा समारोप होईल. रॅलीचे आयोजक व निमंत्रक राजेंद्र कलाल आहेत, तर रॅलीत संयोजकांची भूमिका भरत सोनवणे, मुकेश कानडे, प्रदीप कलाल, राजेश बागूल, गजेंद्र चित्ते, विठ्ठल सोनवणे, विजय सोनवणे, अशोक कलाल, लकेश कलाल आदींनी निभावली. सायकल रॅलीच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना आयोजक कलाल म्हणाले, की क्षत्रिय कलाल समाज तुलनेने कमी लोकसंख्या असलेला समाज आहे. नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने समाजातील लोक राज्यातील विविध भागांत विखुरलेले आहेत. त्यामुळे समाजातील लोकांना एकत्र करून विचारांचे आदानप्रदान करण्याच्या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीत १५० सायकललिस्ट सहभागी झाले होते. यासाठी २० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रथमोपचारासाठी खासगी डॉक्टरांची टीम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौघांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतल्या मायको दवाखान्यात महिलेची रिक्षात प्रसुती प्रकरणातील दोषी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यासह चार परिचारिकांच्या निलंबनावर अखेर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी निलंबनाच्या आदेशावर सह्या केल्या. बुधवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निलंबनाबाबत घूमजाव केले होते.

पंचवटीतल्या मायको दवाखान्यात आलेल्या एका मह‌िलेची रिक्षातच प्रसुती झाल्या प्रकरणाची गंभीर दखल महापालिकेने घेतली होती. भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी सदरील दवाखान्यातील गैरप्रकार उघडकीस आणत, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांच्या अनुपस्थितीवर बोट ठेवले. या अतिसंवेदनशील प्रकरणामुळे पालिकेची बदनामी झाल्यानंतर वैद्यकीय विभागाने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करत, या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणे, परिचारिका बी. जी. कोठारी, परिचारिका सरला रुपवते, मनीषा शिंदे, एम. एम. ठाकूर यांच्यावर ठपका ठेवत निलंब‌ित करण्याची घोषणा केली होती. परंतु, बुधवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी प्रस्ताव ठेवल्याचे सांगत घूमजाव केले होते. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी डॉ. हिरामण कोकणींसह चारही जणांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर सह्या केल्या. त्यामुळे गुरुवारी अधिकृतरित्या त्यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली आहे.

परदेशवारीचीही चौकशी

डॉ. कोकणींसह सर्व चार जणांच्या निलंबनानंतर सर्वांची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. डॉ. कोकणींसह काही जण परदेशवारीवर असल्याची चर्चा आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही सदरील डॉक्टर व कर्मचारी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या परदेशवारीचा संशय बळावला असून त्यांच्या परदेशवारीचीही चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान आंदोलनाला नाशिकचे बळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला विमानसेवा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली येथे हवाई वाहतूक मंत्रालयाबाहेर सुरू केलेल्या आंदोलनाला शहरातील विविध संस्था-संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर गुरुवारी दुपारी उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व ट्रॅव्हल कंपन्यांच्या संचालकांसह सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ‘दिल्ली ते गल्ली’ हे आंदोलन सुरू झाल्यामुळे विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारने मान्य केले.

सप्टेंबरपासून ‘नाशिक-मुंबई-नाशिक’ आणि ‘नाशिक-पुणे-नाशिक’ ही सेवा केंद्राच्या ‘उडान’ योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीच्या वतीने सुरू केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र, ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकाळपासून शहरातील विविध संघटनांनीही नाशिकमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सर्व संघटनांचे पदाधिकारी ‘निमा’त एकत्र आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व तेथे मुख्य द्वाराजवळच ठिय्या आंदोलन करून ‘विमानसेवा सुरू झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, ‘तान’चे उपाध्यक्ष राजेंद्र बकरे यांच्यासह उद्योजक मनीष कोठारी, निमाचे उपाध्यक्ष उदय खरोटे, सरचिटणीस श्रीकांत बच्छाव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेवे’पेक्षा गैरसोयीचेच आगार

0
0

मटा मालिका

ओझर बससेवेची दुर्दशा भाग २

--

‘सेवे’पेक्षा गैरसोयीचेच आगार

म. टा. वृत्तसेवा, ओझर

नाशिक शहर व ग्रामीण वाहतुकीचे केंद्र असलेले ओझर बस स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अस्ताव्यस्त पडलेला कचरा, अस्वच्छता, दलदल, पाण्याचे तळे, विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग अशा विविध समस्यांमुळे जणू प्रवाशांच्या सेवेपेक्षा गैरसोयीचेच आगार बनल्याची स्थिती दिसून येत आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील प्रवासी करीत आहेत.

सायखेडा, पिंपळगाव, ओझर, तसेच निफाड तालुक्यातील नागरिकांची या बस स्थानकावर दिवसभर वर्दळ असते. असंख्य प्रवासी येथे ऊन-पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी निवारा शेडचा आसरा घेत असतात. मात्र, येथे पाणी साचत असल्याने येथील निवारा शेडमध्ये जाणसाठी रस्ताच नसतो. स्थानकात बस उभी केल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी चिखलातून जावे लागते. बस स्थानकातील सुलभ शौचालयाचीही दुरवस्था झालेली आहे. येथील नळ तुटलेले असून, टपकणारे पाणी, अस्वच्छता या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. नियमितपणे सापसफाई केली जात नसल्याने महिला प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

--

विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल

दररोज साधारणतः पाच ते सहा हजार प्रवासी येथून प्रवास करतात. जवळपास अडीच हजार विद्यार्थी आणि प्रवासी मासिक पासधारक असून, शहर बस वाहतुकीबरोबर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये या स्थानकातून बसेस जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येथे येत असले, तरी त्यांना तुटपुंजीच सेवा लाभत असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

--

तुटपुंज्या शहर बसेस

गेल्या काही दिवसांपासून तोट्याचे कारण पुढे करत शहर बस वाहतुकीच्या फेऱ्या मोठ्याप्रमाणात कमी केल्या आहेत. पण, त्यामुळे हजारोंच्या संख्येने जाणारे विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांचे प्रचंड हाल आहेत. त्यामुळे शहर बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवासी करता आहे. शहर बसच्या फेऱ्या घटल्याने प्रवाशांना बस वाट थांबावे लागते एवढा वेळ वाट पाहत थांबण्यापेक्षा खासगी प्रवासी (काळी-पिवळी) वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे या वाहनांना अच्छे दिन आले आहेत.

--

बस स्थानकात साचत असलेल्या पाण्यामुळे निवारा शेडमध्ये जाता येत नाही. बसमध्ये चढताना व उतरताना त्रास सहन करावा लागतो. येथील स्वच्छतागृहाचीदेखील दुरवस्था झालेली आहे. तेथे नेहमी दुर्गंधी असते. येथील समस्या त्वरित दूर कराव्यात.

-गौरव सोनार, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाजपत्रक स्थगितीने विकासाला खीळ

0
0

महापौर रशीद शेख यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या मंजूर अंदाजपत्रकास नगरविकास विभागातर्फे स्थगिती देण्यात आली असून, सदर अंदाजपत्रकाबाबत ३० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे. मंजूर अंदाजपत्रकास स्थगिती देणे म्हणजे शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्याचा प्रकार राष्ट्रवादी-जनतादल आघाडी व भाजपतर्फे करण्यात आला असून, याबाबत येत्या शुक्रवारपासून शहराशहरात चौकसभा घेऊन जनतेचे लक्ष वेधून घेणार असल्याचा इशारा महापौर रशीद शेख यांनी दिला.

येथील उर्दू मिडीया सेंटर येथे गुरुवारी (दि. २६) आयोजित पत्रकार परिषदेत शेख बोलत होते. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सदस्य सलीम अन्वर आदींसह सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बोलतांना शेख म्हणाले, महागठबंधन आघाडी व भाजपतर्फे शहरात विकास विरोधी राजकारण सुरू असून स्थायी समितीनंतर महासभेला अंदाजपत्रक मंजुरीची परंपरा पूर्वीदेखील राहिली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून विकासकामे ठप्प असून, शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या अंदाजपत्रक मंजुरीनंतर शहरातील विकासकामांना प्रारंभ होणार होता. मात्र आघाडी व भाजपतर्फे राजकारण करून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून मंजूर अंदाजपत्रकास स्थगिती आणण्याचा प्रकार हा दुर्दैवी आहे. सदर अंदाजपत्रकाला स्थगिती मिळाल्याने शहरातील विकासकामांना खीळ बसली असून, आता पुन्हा अंदाजपत्रक मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शेख यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींची कार, खड्ड्यांनी केली बेकार!

0
0

नामदेव पवार, सातपूर

नाशिक शहराचा समावेश स्मार्ट सिटीत करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच एक नवश्रीमंत वर्गही वाढतो आहे. अशा उद्योजकांकडून मर्सिडीज, जग्वार, ऑडीसारख्या कंपन्यांच्या प्रीमियम कार खरेदी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही या गाड्यांमध्ये फिरण्याची हौस या उद्योजकांना भागवता येत नाही, याचे कारण आहे शहर परिसरातील रस्ते. विशेष म्हणजे एका-एका कारमागे वीस लाखांपेक्षा जास्त रक्कम रोड टॅक्स म्हणून आरटीओकडून वसूल केली जाते.

विदेशांतून आयात केलेल्या या वाहनांची बनावट तिकडचे चकाचक रस्ते डोळ्यांसमोर ठेवून केलेली असते. मात्र, आपल्याकडे त्या दर्जाचे रस्ते नसल्याने ही वाहने या रस्त्यांवर चालवताना अडचणी येतात. रस्त्यातील मोठ मोठे खड्डे तसेच स्पीड ब्रेकरमुळे ही वाहने थेट खाली टेकतात. त्यामुळे केवळ हायवेने जायचे असेल तरच या महागड्या कार बाहेर काढल्या जात असल्याचे उद्योजक सांगतात. कोट्यवधी रुपये खर्च करून हौसेने घेतलेल्या या वाहनांची दळभद्री रस्त्यांमुळे हौसच फिटत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. जर या वाहनांच्या दर्जाचे रस्ते सरकार देऊ शकत नसेल, तर सरकारने लाखो रुपयांचा टॅक्स घेऊन त्यांना पासिंग का दिली, असा सवालही हे कारमालक उपस्थित करीत आहेत.

सरकारने आधी अशा प्रीमियम वाहनांसाठी त्या दर्जाचे रस्ते उभारावेत आणि मगच रीतसर कर घेऊन त्यांना पासिंग द्यावी, अशी अपेक्षा कारमालकांकडून व्यक्त होत आहे.

सर्व्हिसिंगसाठी कंटेनरची गरज

अशा महागड्या कार कंपन्यांच्या सर्व्हिसिंगसाठीची व्यवस्थाही शहरात नाही. एका कंपनीची कार सर्व्हिसिंगसाठी औरंगाबादला पाठवावी लागते. मात्र, नाशिक-औरंगाबाद हायवेची अवस्था पाहता ही कार चालवत न नेता कंपनीकडून पाठविलेल्या कंटेनरवर टाकून नेली जाते. त्यामुळे कंपनीचा तर खर्च वाढतोच, शिवाय कारमालकालाही त्याचा भूर्दंड बसतो.


परिवहन आयुक्तांचा ‘नो रिप्लाय’

नीलय इंडस्ट्रिजचे संचालक सागर गिरासे यांनी घरभरणीवेळी नवीन वाहन घ्यावे म्हणून जग्वार कार विकत घेतली. औरंगाबादच्या शोरूमचालकाने कार घरापर्यंत सोडली. पण, पुन्हा तिला ‌सर्व्हिसिंगला नेण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने ती कंटेनरवर टाकून नेण्याची वेळ येते. जर ही कार अशा रस्त्यांवर चालतच नसेल, तर आरटीओने पंधरा वर्षांसाठीचा वीस लाख रुपयांचा रोड टॅक्स का घेतला, या गाडीला पासिंग कशी काय दिली, याबाबत गिरासे यांनी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना ई-मेल पाठवला होता. मात्र, गेडाम यांच्याकडून त्याला उत्तर आले नाही.


लक्झरी वाहनाच्या हौसेपोटी जग्वार कार खरेदी केली होती. दोन वर्ष झाले, पण ती गावाकडे नेऊ शकलो नाही. या कारने फक्त घर ते ऑफिस आणि परत एवढाच प्रवास करू शकतो. या कारसाठी रस्ते योग्य नसतील, तर मग आरटीओने रोड टॅक्स का घेतला?

- सागर गिरासे, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी महिलांवरील उपचारांबाबत घाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील अजंग येथील अपघातात जखमी महिलांना शहरातील खासगी रुग्णालयांसह सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असलेल्या महिलांना दोन दिवसदेखील झालेले नसताना पूर्ण उपचार न करताच त्यांना डिस्चार्ज देण्याची घाई सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भुसे यांनी याची दखल घेत थेट सामान्य रुग्णालयात भेट देवून रुग्णांची विचारपूस केली. तसेच आरोग्यधिकारी डॉ. किशोर डांगे यांची झाडाझडती घेत संबंधित डॉक्टरांवर कारवाईचे आदेश दिले.

यावेळी राज्यमंत्री भुसेंनी उपचार घेणाऱ्या महिलांशी संवाद साधला.सुवर्णा बंदरे व गायत्री मांडवडे यांनी योग्य उपचार होत नसल्याची तक्रार केली. यातील सुवर्णा बंदरे यांना कमरेस दुखापत झाली असून, त्यांचा एक्स-रेसाठी २५० रुपयांची मागणी केल्याची तक्रार त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे दर घसरले; शेतकरी पुन्हा चिंतेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिना दीड महिन्यानंतर या आठवड्यातील सोमवारी एकदम मोठी उसळण घेत यंदाच्या हंगामातील प्रतिक्विंटल तब्बल ३३०० रुपयांहून अधिकचा उच्चांक बाजारभाव गाठलेल्या उन्हाळ कांद्याने गुरुवारी (दि. २६) पुन्हा नांगी टाकली. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांदा बाजारभावात सोमवारच्या तुलनेत गुरुवारी सरासरी सातशे रुपयांनी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हास्य क्षणभंगूर ठरले.

गेल्या महिनाभरात दीड हजार रुपये क्विंटलच्या आसपास रेंगाळलेला उन्हाळ कांदा दीपावलीनंतर एकदम उसळला होता. सोमवारी (दि.२३) येवला बाजार समितीतील लिलाव सुरू होताना उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान १ हजार ते कमाल ३,३२६ रुपये (सरासरी ३ हजार) असा बाजारभाव मिळाला होता. सोमवारच्या लिलावानंतर मंगळवारची आठवडे बाजारची सुट्टी, तर बुधवारची एका व्यापाऱ्याकडील लग्नानिमित्त बाजार समितीतील व्यापारी वर्गाच्या अर्जावरूनची सुट्टी अशा सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर गुरुवारी (दि.२६) येवला बाजार समितीत कांदा लिलाव झाले. सोमवार इतकाच किंवा त्यापेक्षाही अधिक बाजारभाव मिळेल या आशेने गुरुवारी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपला कांदा घेऊन बाजार समिती गाठली. मात्र सोमवारच्या तुलनेत गुरुवारी कांद्याचे बाजारभाव तब्बल सातशे रुपयांनी गडगडल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.

येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात गुरुवारी जवळपास ५०० पीकअप रिक्षामधून उन्हाळ कांद्याची आवक होताना किमान उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ७०० ते कमाल २६०० (सरासरी २३००) रुपये असा बाजारभाव मिळाला. आज (दि. २७) होणाऱ्या कांदा लिलावासाठी गुरुवारी सायंकाळीच दीडशेच्यावर ट्रॅक्टर मुक्कामी डेरेदाखल झालेले होते. शुक्रवारी कांदा बाजारभावाची नेमकी काय परिस्थिती राहते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा असून त्यातूनच चाळीत कांदा साठवण केलेल्या शेतकऱ्यांच्या जीव टांगणीला लागल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता मोफत पुस्तकांऐवजी बँकेत पैसे

0
0

नाशिक : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पुस्तके थेट विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची योजना येत्या शैक्षणिक वर्षात बंद होणार आहे. विद्यार्थ्यांना आता शाळांमध्ये मोफत पुस्तके न देता त्याऐवजी पुस्तकांची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या रकमेतून स्वतः थेट विक्रेत्यांकडून पुस्तके घ्यावी लागणार आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येते. यामध्ये शाळांमधील प्रत्येक वर्ग, विषय यांच्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या बालभारतीकडे पाठविण्यापासून ते शाळांमध्ये पुस्तकं घेऊन येणे, वाहनांची उपलब्धता, हिशोब करण्यापर्यंत सर्वच कामांमध्ये प्रत्येक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ खर्ची होत असे. तसेच विक्रेत्यांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम होत होता. त्यामुळे हा निर्णय पुस्तक विक्रेत्यांसाठी आनंददायी ठरणार आहे. परंतु, पुस्तकांचे पैसे वेळीच मिळणे, ते पैसे पुस्तकांसाठी खर्च होते की नाही, हे पाहण्याचे आव्हान मात्र निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून पुस्तक होलसेलर्सच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय कळविण्यात आला.

विक्रेत्यांना विश्वास

शालेय विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आले असून, ते आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही त्यांची खाते नव्या शैक्षणिक वर्षापर्यंत उघडण्याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली आहे. ही योजना यशस्वी ठरेल असा विश्वास पुस्तक विक्रेत्यांना वाटत आहे.

पैसे पुस्तकांसाठीच खर्च व्हावेत

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी मोफत पुस्तक योजना लाभदायक ठरत होती. आता शिक्षण विभागाकडून पुस्तकांसाठी मिळणारी रक्कम विद्यार्थी, पालक पुस्तकांसाठीच खर्च करतील का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय, हे पैसे वेळेत मिळण्याची गरजदेखील व्यक्त करण्यात येत आहे.

पुस्तक विक्रेत्यांना आता चांगले दिवस येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील पुस्तके होलसेलर्सच्या झालेल्या बैठकीत आम्हाला ही माहिती देण्यात आली. त्यानुसार आता शाळांमध्ये पुस्तके मिळणार नसून फक्त पुस्तक विक्रेत्यांकडेच मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा बँक खात्यावर पैसे पुस्तके घेण्या करीता दिले जातील

- अतुल पवार, अध्यक्ष, जिल्हा बुक सेलर्स आणि स्टेशनर्स असोसिएशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने उडान योजनेत समावेश करूनही नाशिकला विमानसेवा सुरू होत नसल्याप्रकरणी खासदार हेमंत गोडसे यांनी राजधानी नवी दिल्लीत छेडलेल्या आंदोलनाला यश आले आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरू करण्याची लेखी आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने गोडसे यांना दिले आहे.

सातत्याने नाशिकला डावलले जात आहे आणि सर्व पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध असतानाही नाशिकला विमानसेवा सुरू होत नसल्याबाबत खासदार गोडसे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी आंदोलन छेडले. गोडसे यांच्यासह शिवसेनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष नीरज सेठी, उत्तर भारतीय संघाचे विनय शुक्ला, पंजाब प्रदेशाध्यक्ष योगिराज शर्मा, बिहारचे कोशलेंद्र शर्मा या नेत्यांसह शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयावर मोर्चा काढला. नाशिक विमानसेवेसाठी मुंबई विमानतळावर टाइम स्लॉट उपलब्ध करून दिला जात नाही आणि गुजरातच्या तीन शहरांसाठी कसा उपलब्ध होतो, असा सवाल या वेळी आंदोलकांनी उपस्थित केला. मुंबई विमानतळाचा सांभाळ करणाऱ्या जीव्हीके कंपनीच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अखेर टाइम स्लॉटला मान्यता

आंदोलनानंतर खासदार गोडसे यांच्या शिष्टमंडळाने नागरी वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. नाशिक विमानसेवेसाठी मुंबईत टाइम स्लॉट देण्यात येईल आणि येत्या १५ डिसेंबरच्या आत विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाढी यांनी दिले. याप्रसंगी मंत्रालयाच्या अधिकारी रुबिना अलीम, जी. के. चोखियाल, उमेश भारद्वाज, अनुप पंथ आदी उपस्थित होते. या हमीपत्रानंतर शिवसैनिकांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

जळगावलाही विमानसेवा

महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर या शहरांमध्ये येत्या १५ डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरू होणार असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या लेखी हमीपत्रात म्हटले आहे. त्यामु‍ळे खासदार हेमंत गोडसे यांच्या आंदोलनाचा महाराष्ट्रातील इतर शहरांनाही लाभ होणार आहे.

...तर चक्का जाम आंदोलन

प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही. हमीपत्राप्रमाणे विमानसेवा सुरू न झाल्यास शिवसेनेच्या सर्वच खासदारांना बरोबर घेत दिल्लीत चक्का जाम आंदोलन छेडू, असा इशारा खासदार गोडसे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंड्यांच्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सध्या डीजेच्या कर्णकर्कश आवाजात निघणाऱ्या साई पदयात्रा नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. निफाड शहरालगत जाणाऱ्या निफाड- पिंपळगाव रस्त्यावर या दिंड्या मार्गक्रमण करीत असताना रस्त्यात न्यायालय, शाळा, पंचायत समिती, तहसील आवारालगतच्या नागरिकांना दिंड्यांमधील डीजेचा प्रचंड त्रास जाणवत आहे. याबाबत पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा असताना त्याकडे कानाडोळा‌ केला जात आहे. गेल्या वर्षी निफाड न्यायालयातील वकिलांनी याबाबत पोलिसांना निवेदन दिले होते.

निफाड- पिंपळगाव रस्त्यावरून सध्या गुजरातमधील भाविकांच्या दिंड्या शिर्डीकडे रवाना होत आहेत. दिवसभरात पाच ते सात दिंड्या रवाना होतात. यात महिला, पुरुष भाविकांसोबत साहित्य वाहून नेणारी गाडी असते. या दिंडीत पालखी अन् डीजेचा भला मोठा कर्णकर्कश आवाज करत बेधुंद नाचणारी तरुणाई ठिकठिकाणी नजरेस पडते. पहाटेपासूनच हा डीजेचा आवाज सुरू होतो. हे भाविक शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत साईचरणी लीन होण्यासाठी जात असले तरी शिस्त पाळली जात नाही. पालखीसोबत जाताना जी आचारसंहिता पाळायला हवी ती साईभक्त पाळताना दिसत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

दिंडीत आरत्या व भजने ही चित्रपटांतील लोकप्रिय गीतांच्या चालीवर लावली जातात. या आवाजाने परिसर दणाणून सोडला जात आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून निफाड शहरातून जाणाऱ्या या पालखी दिंड्यांनी सामान्य नागरिकांसह प्रशासनही व्यथित झाले आहे. निफाड शहरातून जाताना या डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने रस्त्यालगतच्या निफाड न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. लगतच वैनतेय विद्यालय, तसेच भूमिअभिलेख, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालय, निफाड इंग्लिश स्कूल, निफाड बसस्थानक आदी कार्यालये व शाळा, महाविद्यालये आहेत. डीजेच्या आवाजाने या कार्यालयांच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. गेल्या वर्षी निफाड वकील संघाने याबाबत निवेदन देऊन सायलेन्स झोनची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. यंदाही न्यायालयीन कामकाजाला त्रास होत असल्याने निफाड पोलिसांनी सायलेन्स झोनची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमातर्फे ग्राहक जागृती कार्यक्रम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंड‌िस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (निमा) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत (पीएसयूएस) ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३० व ३१ ऑक्टोबर रोजी हॉटेल गेटवे, मुंबई आग्रा रोड, येथे हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९.३० वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते हे करणार असून, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या माहितीपर कार्यक्रमासाठी नाशिकच्या २०० उद्योगांनी नोंदणी केली आहे.

नाशिक परिसरातील लघुउद्योगांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत उद्योग व व्यवसायाच्या संधी निर्माण करणे व उद्योग व व्यवसायला चालना देणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे. या कार्यक्रमात भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, गार्डन रिच शिपबिल्डर्स अॅण्ड इंजिनीअर्स लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड, मिश्र धातू निगम लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे (पीएसयूएस) प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ते यावेळी प्रेझेन्टेशन व वन टू वन इन्टरॅक्शन करणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमात राऊंड टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची टेंडर पद्धती यात सांगण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक व्हावी व येथील उद्योगांना चालना मिळावी यासाठी ३० व ३१ मे रोजी मुंबईत

‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी केंद्रीय अवजड व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (पीएसयूएस) प्रतिनिधींबरोबर ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे बैठकही घेतली. त्यानंतर आता हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी या कार्यक्रमसाठी सतत पाठपुरावा केला.

दोनशेहून अधिक कंपन्या

या कार्यक्रमासाठी उद्योजकांची नोंदणी अंतिम टप्प्यात असून २०० हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात स्विचगिअर, ऑटोमोबाइल कॉम्पोनन्ट्स, इंजिनीअ‌रिंग, इलेक्ट्र‌िकल्स्, कंट्रोल पॅनेल, हिट ट्रिटमेंट, हेवी इंजिनीअरिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग आहे. कार्यक्रमास अधिकाधिक उद्योजकांनी नोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष उदय खरोटे, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहाडीत अतिक्रमणे जमीनदोस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक राहत होते. मात्र याठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेल्या घरांवर दिवाळी आणि पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्याने कारवाई केली नव्हती. ती कारवाई गुरुवारी (दि. २६) मनपाकडून करण्यात आली. यावेळी ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत शासनाची स्थगिती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर मार्ग निघाल्यानंतर ३५० घरे व व्यावसायिकांचे अतिक्रमण भूईसपाट करण्यात आले.

२००३ मध्ये नागरिक राहत असलेल्या घरांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाकडून हालचाली सुरू झाल्या. दरम्यान अतिक्रमण धारकांनी त्यावेळी न्यायालयात मनपाविरुद्ध दावा दाखल केला होता. हा दावा २०१२ मध्ये न्यायालयाने फेटाळला कारण शासनाच्या नियमानुसार या अतिक्रमण धारकांना मोहाडी उपनगर भागात घरकूलाचा लाभ देण्यात आला होता. पण तरीही लाभार्थ्यांनी घरकूलात जाण्याऐवजी रेल्वेस्टेशन जवळील जागेत अतिक्रमण करून घरे बांधली होती. यावेळी जिल्हा व महापालिका प्रशासनाला कारवाई करणे अनिवार्य ठरल्याने १३ सप्टेंबरला हे अतिक्रमण काढण्यात येणार होते. मात्र दिवाळी सण आणि पोलिस दलाकडे पुरेसा बंदोबस्त नसल्याने अखेर दिवाळीनंतर ही कारवाई करण्यात आली. रेल्वेस्टेशन परिसर ते दसेरा मैदान आणि लेनीन चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यासाठी ३५० पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता.

सुरुवातीला अतिक्रमित जागेवर राहत असलेल्या नागरिकांनी अतिक्रमण काढण्यासाठी विरोध दर्शविला. यात काही महिलांना दोन पिढ्यांचा संसार असलेली घरे सोडताना अश्रू अनावर झाले होते. याठिकाणी गोरगरीब व कष्टकरी जनतेचा रहिवास होत दिवाळीनिमित्त अनेक विवाहिता माहेरी आल्या होत्या. तर सकाळपासून सुरू असलेल्या वादामुळे लहान मुले घाबरून एका कोपऱ्यात उभे राहून शांतपणे पाहत होते, असे चित्र याठिकाणी पाहायला मिळाले. शहरातील स्टेशनरोड परिसरात जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, रमेश परदेशी आदींनी पाहणी केली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images