Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘पेट’च्या मुलाखतीसाठी २,८४७ विद्यार्थी पात्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. आणि एम. फील या अभ्यासक्रमांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुलाखतीच्या टप्प्यासाठी आता पेट मध्ये पात्र ठरलेल्या २,८४७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

लेखी प्रवेश परीक्षेत यश मिळवलेले २,८४७ उमेदवार आणि आणि प्रवेश परीक्षेतून सूट मिळालेले ३ हजार उमेदवार अशा एकूण ५,८४७ उमेदवारांच्या मुलाखती लवकरच होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठी नाशिकसह पुणे, व नगर या जिल्ह्यांमध्ये रविवारी परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेला ९,५८८ विद्यार्थी बसले होते. त्यानुसार पीएचडीच्या २,९९०, तर एमफीलच्या ३९५ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील एकूण ९२ परीक्षा केंद्रांवर रविवारी परीक्षा झाली. या परीक्षेचे निकाल त्याचदिवशी घोषित करण्यात आले. परीक्षेला बसलेल्यांपैकी २,५९७ जण पीएचडीसाठी, तर २५० जण एमफीलसाठी असतील. याशिवाय ३ हजार उमेदवारांना पेटमधून सूट मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता करा ‘अॅप्टिट्यूड’ची तयारी!

0
0

उद्यापासून अर्ज भरण्यास होणार सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणसेवक या पदावरील भरतीसाठी स्वत:ला पात्र ठरविण्याकरिता ज्या उमेदवारांनी महत्प्रयासाने टीईटी (टीचर्स इलिजीबिलीटी टेस्ट) मध्ये यश मिळविले त्या सर्वांना उद्यापासून अॅप्टिट्यूड टेस्ट या नव्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. अॅप्टिट्यूड टेस्टसाठी उद्यापासून (२ नोव्हेंबर) टीईटीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

शिक्षक पात्रता चाचणीचा निकाल दरवर्षी अत्यल्प लागतो. या परीक्षेला सामोरे जाणारे उमेदवारही संख्येने लाखांमध्ये आहेत. जुलै महिन्यात पार पडलेल्या टीईटी परीक्षेचा निकालही नुकताच जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल अत्यंत कमी लागला आहे. यातच सरकारने या उमेदवारांसाठी अॅप्टिट्यूट टेस्टचा आणखी एक अडसर उभा केल्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात पार पडलेल्या परीक्षेत सुमारे दीड लाखांवर परीक्षार्थी होते. पैकी अवघे ५ हजारांवर परीक्षार्थी यात उत्तीर्ण झाले आहेत.

‘अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी’ या नावाने पार पडणाऱ्या या परीक्षेसाठी डी. एड. किंवा बी. एड. सह टीईटी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.mahapariksha.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ ऑनलाइन स्वरुपात हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरण्यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १२ ते २१ डिसेंबरदरम्यान ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून, या परीक्षेचे नियोजनही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात

येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गच्चीवर बाग फुलविण्याच्या मिळणार टिप्स

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गावाकडील घर आणि घरासमोर असलेले मोठे अंगण आपल्याकडेही असावे, असे शहरवासीयांना नेहमीच वाटते. किंबहुना शहरवासीयांचे हे स्वप्नच असते. पण, शहरातल्या गर्दीमुळे किंवा जागेच्या वाढत्या किमतींमुळे हे स्वप्न साकार होणे दुरापास्त होते. हे स्वप्नन साकारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे गच्चीवरील बाग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात जागेअभावी अनेक जण गॅलरीत दोन-चार कुंड्या ठेवून किंवा अपार्टमेंटच्या गच्चीवर कुंड्या ठेवून बागेची हौस भागविताना दिसतात. मात्र, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत, उपलब्ध असलेल्या साधनात बाग कशी फुलवायची यासंदर्भातले प्रशिक्षण गच्चीवरील बाग या वर्कशॉपमधून ‘मटा’तर्फे देण्यात येणार आहे. संदीप चव्हाण हे यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे. गच्चीत किंवा गॅलरीत बाग तयार करताना येणाऱ्या अडचणींसंदर्भातही या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या काही शंका असल्यास त्यांचे निरसनही या कार्यक्रमात करता येणार आहे.

--

रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य

या डेमो वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. कल्चर क्लब सदस्यांना शंभर रुपये, तर इतरांसाठी दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. रजिस्ट्रेशनसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, फोन- (०२५३) ६६३७९८७, मोबाइल- ७०४०७६२२५४ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कार्तिकी’निमित्त हरिहर भेट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्री विष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत, असे म्हटले जाते. त्यानिमित्त मंगळवारी पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात भक्तांनी तुळस वाहिली, तर सुंदरनारायण मंदिरात बेल वाहण्यात आले. या दिवशी शिवाला तुळस आणि विष्णूला बेल वाहण्याची प्रथा असून, या प्रथेला हरिहर भेट असे संबोधले जाते.

कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक ठिकाणी पूजापाठ करण्यात आले. कपालेश्वर मंदिरात सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली होती. त्याचप्रमाणे विष्णूचे दर्शन घेण्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुलाजवळील अतिप्राचीन सुंदरनारायण मंदिरात नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी काकड आरती झाल्यानंतर पूजाविधीचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे तीळभांडेश्वर मंदिर येथेही नागरिकांनी गर्दी केली होती. काठे गल्ली येथे हरिपाठाचे सामुदायिक पठण करण्यात आले. त्याचप्रमाणे डीजीपीनगर येथे विष्णुसहस्रनामाचा जप करण्यात आला. एकादशीनिमित्त कॉलेजरोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरातदेखील भाविकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे १२५ वर्षे जुन्या असलेल्या काजीपुरा येथील नामदेव मंदिरातदेखील पूजेचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक भाविकांनी उपवासदेखील केला होता.

--

तुलसी विवाहानिमित्त पूजाविधी

कार्तिकी एकादशीच्याच दिवशी क्षीरसागरात शयन करीत असलेल्या श्री विष्णूंना उठवून मंगलकार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते. अनेक भावकांनी मंदिरे आणि घरांमध्ये उसांचे मांडव तयार करून सत्यनारायणाची पूजा केली आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखविला. हा विधी झाल्यानंतर मंडपात तुळस आणि शाळिग्राम विवाह लावण्यात आला. मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित व्यक्तींच्या विवाहासाठी प्रार्थना करण्यात आली. तुलसी विवाहानिमित्त जागोजागी पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निदेशक संघटनेच्या सदस्यपदी आहिरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य शासकीय आयटीआय निदेशक संघटनेच्या अध्यक्षपदी एम. ए. माळी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नाशिकमधील आर. बी. आहिरे यांचीही निवड झाली. आहिरे यांनी यापूर्वी विभागीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.

शासकीय आयटीआय निदेशक संघटनेचे बावीसावे अधिवेशन अमरावती येथे संघटनेचे माजी अध्यक्ष भोजराज काळे आणि मावळते अध्यक्ष चंद्रकांत देसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पार पडले. यावेळी संघटनेची राज्य तसेच सहा विभागांची कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष आणि सरचिटणीस ही दोन पदे बिनविरोध निवडण्यात आली. अन्य सर्व पदांसाठी निवडणूक झाली. राज्य कार्यकारिणीमध्ये व्ही. एल. पाटील (उपाध्यक्ष), विनोद दुर्गपुरोहित (सरचिटणीस), एम. बी. उघडे (खजिनदार), श्री. खर्चे, एस. एल. ढुमणे, सरला शिंदे (सहसरचिटणीस) यांचा समावेश आहे. तर कार्यकारिणी सदस्यपदी आर. बी. आहिरे, मंगेश पुंडकर आणि आर. एन. खडबडे यांची निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधींच्या नावाचा अपमान; आंदोलनाचा दिला इशारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

स्वच्छ भारत योजनेच्या प्रसारासाठी महात्मा गांधी यांचे नाव वापरा; पण रेल्वे पादचारी पुलावरील पायऱ्यांवर गांधीजींचे नाव टाकून ते प्रवाशांच्या पायदळी तुडवून अवमान कराल तर काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनमाड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अफजल शेख व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी दिला. भुसावळ रेल्वे प्रबंधकांची मंगळवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान थांबवा यासाठी मनमाड काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.

मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नव्या पादचारी पुलावर रेल्वे प्रशासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करत असतांना रेल्वे प्रशासनाने पुलाच्या पायऱ्यांवर गांधीजींचे नाव रंगवले.

नाव पायदळी तुडवले जात असल्याने राष्ट्रपित्याचा अवमान होतोय, असे सांगत मनमाड काँग्रेसचे अध्यक्ष अफजल शेख व पदाधिकाऱ्यांनी हे नाव तेथून त्वरित हटवावे, अन्यथा आंदोलन करू असा इशाराे दिला आहे. निवेदनावर अध्यक्षांसह नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, संजय निकम, माजी नगराध्यक्ष रहेमान शाह, पवन रॉय आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावामध्ये सात लाखांची घरफोडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील संगमेश्वर भागातील सन्मती टॉवरमध्ये चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून सुमारे ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घरमालक नितेश मुंदडा हे सोमवारी (दि. ३०) कामानिमित्ताने बाहेर गेले होते. तसेच मुख्या‌ध्यापिका असलेल्या त्यांची पत्नी नीता मुंदडा यादेखील घरी नव्हत्या. मुंदडा कुटुंबीय घरी नसल्याचा फायदा घेत सकाळी दहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फ्लॅटचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम व मुलांच्या रूमधील चारही कपाटाचे लॉक तोडून सोने चांदीचे दागिने व रोकड रक्कम सह एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

शेजारी राहणाऱ्या कमलेश पोरवाल यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंदडा यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात डोकावून बघितले असता आतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी मुंदडा कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे याबाबत तत्काळ माहिती कळवली. मुंदडा यांनी घराकडे धाव घेतली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्यविक्री रडारवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाच्या अवैध धंदे विरोधी पथकाने दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यातील विनापरवाना हॉटेल-ढाब्यावर कारवाई करीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या पाच व्यावसायिकांना अटक केली. कारवाईत स्कार्पिओसह तब्बल साडे सात लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

नाशिक-सापूतारा मार्गावरील काही हॉटेल आणि धाब्यांवर अवैध मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय दराडे यांना मिळाली. त्यानुसार, सलग दोन दिवस या मार्गावरील हॉटेलांवर छापे टाकून पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई केली. हतगड (ता. सुरगाणा) शिवारातील हॉटेल माधव रिसोर्ट येथे पथकाने रविवारी (दि. २९) छापा टाकला असता देवानंद रामचंद्र उपासणे (रा. नामपूर, ता. सटाणा) आणि नैनसिंग कृपाराम रोकाया (मूळ रा. नेपाळ, हल्ली हतगड) हे दोघे विनापरवाना मद्यविक्री करताना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ८७ हजार ८५४ रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. या दोघांचा साथीदार दीपक बापूराव पाठक (रा. हतगड) हा मात्र फरार झाला. या प्रकरणी सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी सोमवारीही (दि. ३०) दिंडोरी रोडवरील पिंपळणारे शिवारातील हॉटेल अजिंक्यतारा येथे छापा मारून हॉटेलमालक चंद्रकांत प्रभाकर धात्रक (४५ रा. राशेवाडी ता. दिंडोरी) यास अवैध मद्य विक्री प्रकरणी अटक केली.

ढकांबेत हॉटलवर कारवाई

हॉटेलमध्ये व बाहेर उभ्या असलेल्या स्कार्पिओच्या (एमएच १५ डीएम ६४९५) तपासणीत तब्बल सहा लाख ५७ हजार ६५४ रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी ढकांबे शिवारातील हॉटेल आप्पा का ढाबा येथेही कारभारी वसंत धात्रक आणि अमोल श्यामराव सलवदे (रा. दोघे ढकांबे, ता. दिंडोरी) यांना अवैध मद्य विक्री प्रकरणी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून १० हजार ९०५ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या सेंट फिलोमिना शाळेसमोर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी दोन कारच मोठे नुकसान झाले.

बिटकोहून डिझेल जनरेटर घेऊन जाणारी गाडी जेलरोडकडे चालली होती. या गाडीच्या पुढे स्कार्पिओ गाडी होती. तिला या गाडीने धडक दिल्याने स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटून ती उजवीकडे वळण घेणाऱ्या दुसऱ्या स्कॉर्पिओला धडकली. या अर्धवट वळालेल्या कारला जेलरोडून आलेल्या आयशर गाडीने धडक दिली. त्यामुळे तिचे मोठे नुकसान झाले. पहिल्या स्कॉर्पिओचेही नुकसान झाले. आयशरचालक निघून गेला. जनरेटर गाडीचालकाला पकडून नागरिकांनी चोप दिला. पोलिसांनी येऊन पंचनामा केला. अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहूतक पूर्ववत केली. या ठिकाणी शाळा असल्याने गतिरोधकाची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवीण देशमुख ठरला राज्य कुस्ती स्पर्धेत अव्वल

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लाल मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना, युवासेना व जिल्हा तालीम संघ यांच्यातर्फे आयोजित राज्य कुस्ती स्पर्धेत चाळीसगावचा प्रवीण देशमुखने अजिंक्य ठरला.

प्रवीणने आखाड्यात आपला हातखंडा असलेला ‘ढाक’ डाव टाकत अवघ्या दोन मिनिटाच्या आतच परभणी येथील मल्ल अजय ढोली याचा पराभव केला आणि खासदार-आमदार चषकावर आपले नाव कोरले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानाच्या गदेसह शाल, श्रीफळ व रोख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन प्रवीणला गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील कुस्तीगीरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मल्ल्यांच्या कुस्ती पाहण्यासाठी ग्रामीण भागातून सिन्नर-घोटी महामार्गावरील साकुर फाटा येथे गर्दी लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. शौकिनांचा उत्साह पाहून १० वर्षांच्या मल्लापासून आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांनी काटकुस्ती करत उपस्थितांना चकित केले. आखाड्यातील डावांमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या पठ्ठ्यांनी बाजी मारली. महिला कुस्तीगीरांनी दाखवलेले विविध डाव नवशिक्या पहिलवानांसाठी मार्गदर्शक ठरले. पारितोषिक वितरण सोहळ्यात विजय चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, निवृत्ती जाधव, आमदार योगेश घोलप, संदीप गुळवे, ज्ञानेश्वर लहाने, रमेश गायकर, भगवान जुंद्रे, रवींद्र मोरे, चंद्रकांत गोडसे, जगदीश गोडसे, योगेश हारक, गोरख बोडके, जनार्दन माळी, राजू नाठे, भगवान आडके आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. प्रवीण पाळदे यांनी प्रस्ताविक केले. स्पर्धेदरम्यान पंच म्हणून वस्ताद रामचंद्र पाळदे, दशरथ गावंडे, पांडुरंग मोजाड, संदीप सहाणे, अरुण चव्हाण, अरुण शिंदे, भाऊसाहेब मोजाड आदींनी काम पहिले. संदीप गायकर यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अविनाश सहाणे, अविनाश कातोरे, रतन पाळदे, किरण मोजाड, राहुल खंडांगळे, वैभव चोभे आदींसह शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

कुस्तीचे डाव अन् मल्ल
कुस्ती स्पर्धेत सातारा, सांगली, परभणी, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, इंदापूर, जळगाव, धुळे आदी भागातून अक्षय शिंदे, शाम गायकर, गोटीराम चव्हाण, अमृता ठाकरे, श्रीराम चहाळे, वर्षा गावंडे, ठकू चौधरी, योगिता भुसारे, सोनाली भोये यासारख्या नामवंत कुस्तीगीरांनी हजेरी लावली. आखाड्यात निकाल, आकडी, धोबीपछाड, कलाजंग, बांगडी, ढाक, एकेरी, दुहेरीपट आदी डावांचे प्रदर्शन पाहण्यासाठी कुस्तीशौकिनांनी आखाड्यापर्यंत मजल मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरा लक्ष है, भ्रष्टाचार मुक्त भारत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय दक्षता सप्ताहानिमित्त ओझरच्या हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचअंतर्गत ‘मेरा लक्ष, भ्रष्टाचार मुक्त भारत’ अशी शपथही घेण्यात आली.

केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी दक्षता सप्ताह आयोजित केला जातो. याअंतर्गत ओझर एचएएलमध्ये या सप्ताहाचे उद्‍घाटन झाले. एएमडी विभागाचे महाव्यवस्थापक ए बी घरड, एओडी विभागाचे सूर्यकांत नौबाद, एयूआरडीसी विभागाचे चिफ डिझायनर यु जी सलवादे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘मेरा लक्ष्य, भ्रष्टाचार मुक्त भारत’ अशी यंदाच्या सप्ताहाची थीम असल्याने त्यासंदर्भातील शपथ उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, एचएएलचे चेअरमन, केंद्रीय दक्षता आयुक्त यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

यावेळी घरड म्हणाले की, दक्षता ही आपल्या वर्तनातून आणि स्वतःपासूनच येते. आपण स्वतःच दक्षता घेतली की अवैध बाबी घडत नाहीत. तसेच, भ्रष्टाचारमुक्त समाज घडविण्यासाठी आपण सांघिक प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. सप्ताहाअंतर्गत एचएएलच्यावतीने आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत. जानोरी आणि साकोरे या गावांमध्ये ग्रामसभेत जनजागृती करणे, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी पोस्टर पेंटिंग स्पर्धा, कर्मचाऱ्यांसाठी निबंध स्पर्धा आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रीसील’ देणार अहवाल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स‌टिीबस सेवेवरून मनपा आणि राज्य परिवहन महामंडळातील तिढा सुटण्याची शक्यता आहे. महापालिकेने स‌टिी बसची व्यवहार्यता तपासण्यासाठी ‘क्रीसील’ (क्रेडिट रेटिंग अॅण्ड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड) या सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेमार्फत जानेवारी २०१८ अखेर पालिका आयुक्तांना व्यवहार्यता तपासणी अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच स‌टिी बससेवेचे भवितव्य ठरणार आहे. या कामासाठी क्रिसीलला पंधरा लाख रुपये दिले जाणार आहेत.

महापालिका आणि महामंडळात गेल्या अनेक दिवसांपासून स‌टिीबस सेवा चालविण्यावरून वाद सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवेमुळे होणाऱ्या तोट्याचा मुद्दा उपस्थित करीत ही सेवा महापालिकेनेच चालवावी, असे सांगत, चेंडू पालिकेकडे टोलवला आहे. पालिकेतील सत्तारूढ भाजपही इच्छुक असल्याचे दिसत आहे. किंबहुना महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना पुण्यातील ‘पीएमएपीएल’चा अनुभव असल्याने त्यांच्याकडूनही बससेवा हाती घेण्याचे संकेत यापूर्वी मिळाले असून, त्या दृष्टीने पावलेही उचलली जात आहेत. परंतु पालिकेची आर्थिक स्थितीची अडचण आहे.

सिटीबस सेवेबाबत भाजप व प्रशासनात एकमत असल्याने महापालिकेने बससेवेच्या दिशेने अखेर एक पाऊल पुढे टाकले आहे. तोट्यातील शहर बससेवा ताब्यात घेणे महापालिकेसाठी योग्य ठरेल का, याविषयीचा व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्यात क्रीसील संस्थेला अहवाल तयार करण्याचे काम मिळाले आहे. या अहवालासाठी क्रीसीलला १५ लाख रुपये अदा केले जाणार आहेत. क्रिसीलला कार्यादेश देण्यात आले असून, बुधवारपासून या कामास प्रारंभदेखील झाला असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.

शक्यता तपासणार

महामंडळामार्फत सुरू असलेली सीटी बससेवा, मनपाची आर्थिक स्थिती, ही बससेवा मनपामार्फत चालविणे शक्य आहे का, याबाबतची व्यवहार्यता क्रिसीलमार्फत तपासली जाणार आहे. सिटी बससेवा महापालिकेच्या माध्यमातून चालविता येणे शक्य आहे का, मनपा व परिवहन महामंडळामार्फत संयुक्तरित्या चालविता येईल का, भाडेतत्त्वाचा पर्याय योग्य ठरेल का, मनपा व परिवहन महामंडळामार्फत संयुक्त कंपनी स्थापन करून ही सेवा चालविता येईल का किंवा पीपीपी अर्थात खासगीकरणातून ही सेवा चालविता येऊ शकते का, या पर्यायांचा अभ्यास क्रिसीलकडून केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धांची लुबाडणूक करणारे जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पेन्शनधारक वृद्ध महिलांची आर्थिक लुबाडणूक करणार्‍या एका टोळीचा अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांनी वेषांतर करून पर्दाफाश केला आहे. पैशांची मदत करण्याच्या नावाने वृद्ध महिलांकडून तब्बल १० ते २० टक्के दराने पैशांची वसुली करणार्‍या चौघांना बुधवारी (दि. १) रंगेहाथ पकडले. संशयित दौलत देवरे, सागर देवरे व अन्य दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात सावकारीसह अन्य कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आली होती त्यानुसार ही कारवाई झाली. तसेच देवरे यांनी बुरखा परिधान करून या कथित सावकारांना पकडून देणार्‍या तहसीलदार ज्योती देवरे यांचेही कौतूक होत आहे.

पेन्शनधारक वृद्ध महिलांना बँकेत पेन्शन काढून देण्याच्या वेळेस मदत करण्याच्या नावाने शहरातील कथित सावकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोषागार शाखेजवळ आपला ठिय्या मांडला होता. हे चौघेही पेन्शनधारक वृद्ध महिलांना काही हजारांची मदत करून त्यांच्याजवळ असलेले पेन्शनचे पुस्तकच ताब्यात घेत असत. नारायण मास्तर चाळ, जमनागिरी, शनी नगर, फाशी पूल यासह विविध भागातील शेकडो पेन्शनधारक वृद्ध महिलांना हेरून त्यांना आर्थिक मदत करीत या चौघा कथित सावकारांनी मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यानुसार बुधवारी (दि. १) सकाळी सापळा लावण्यात आला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी वेषांतर करून बुरखा परिधान केला आणि एका पेन्शनधारक वृद्ध महिलेची नातेवाईक बनून त्यांच्यासोबत कोषागार शाखेत गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत हवालदार मोबीन अन्सारी, सुनील पाथरवट, दिनेश परदेशी, पंकज खैरमोडे, बंटी साळवे, शोएब बेग हे सापळा लावून होते. कथित सावकारांनी वृद्ध महिलांची पेन्शन काढून देत व्याजाची रक्कम कापून वृद्ध महिलांना देताच तहसीलदार देवरेंनी पोलिसांच्या मदतीने चौघा सावकारांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायलेकराच्या भेटीने ग‌हिवरले सारे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथून बेपत्ता असलेल्या, थेट झारखंड राज्यात नक्षलवादी भागात जाऊन पोहोचलेल्या व भग्न आयुष्य जगणाऱ्या साठ वर्षीय हिराबाई थेटे यांना तब्बल सहा महिन्यानंतर माणुसकीच्या देवदूतांनी मंगळवारी त्यांच्या घरी सुखरूप आणून सोडले. पुण्याच्या स्माईल सोशल फाउंडेशनच्या योगेश मालखरे यांच्या प्रयत्नाने नांदगावमध्ये मायलेकरांची भेट होऊन हिराबाईंना मायेचे छप्पर मिळाले. भिकारी अवस्थेत परराज्यात अनोळखी मुलखात परके आयुष्य जगणाऱ्या हिराबाईंना घरी येताच झालेला आनंद अवर्णनीय ठरला.

हिराबाई मानसिक रुग्ण असल्याने सहा महिन्यांपूर्वी घर सोडून नांदगाव स्थानकावर आल्या. कोणत्यातरी रेल्वेत बसून थेट झारखंडमध्ये बुकारो येथे नक्षलवादी परिसरात शिरल्या. तिथे कसेही भटकणे, मिळेल ते खाणे, दगडावर झोपणे हे आयुष्य त्यांच्या नशिबी आले. मात्र तिथे असलेले आर्मी अधिकारी आय. के. दुर्गाई यांच्या रुपात त्यांना माणुसकीचा आविष्कार पाहायला मिळाला. महाराष्ट्रीयन दुर्गाई यांनी मराठीतून विचारपूस करून या वेगळ्या जगात हरवलेल्या हिराबाईंची पुण्याचे योगेश मालखरे यांना माहिती दिली. माणूसपण जपणाऱ्या योगेश यांनी आपल्या चार फेसबुक मित्रांना सोबत घेऊन झारखंड गाठले. रमेश घोलप या मराठी अधिकाऱ्याच्या सौजन्याने हिराबाई यांच्यापर्यंत पोहचून त्यांना मायेने आपुलकीने झारखंड येथून नांदगावच्या मांडवड येथे राहत्या घरी आणले. योगेश मालखरे यांनी हिराबाई व त्यांच्या अनिल या मुलाची गाठभेट करून दिली. हिराबाई सुखरूप घरी पोहचल्या व माणुसकीच्या देवदूतांना बघताना त्यांना गहिवरून आले. नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी व अनिलने या देवदूतांचा मांडवडमध्ये सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. संदीप गुळवे शिवबंधनातून मुक्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

जिल्हा बँक संचालक संदीप गुळवे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. शिवसेना, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, प्रश्न सुटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिवबंधनातून मुक्त होत असल्याची घोषणा संदीप गुळवे यांनी स्व. लोकनेत गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीदिनी केली.

इगतपुरी तालुक्यात राजकीय, सहकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच उलेखनीय नेतृत्व म्हणजे लोकेनेते गोपाळराव तथा दादासाहेब गुळवे यांचे. आजही त्यांच्याच विचाराने जिल्ह्यात आनेक लोकप्रतिनिधी काम करीत असल्याच्या भावना बुधवारी घोटी येथे लोकनेते गोपाळराव गुळवे यांच्या ७७ व्या जयंती निमित्त अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँक संचालक राजाभाऊ डोखळे हे होते.

यावेळी सभापती इंदुमती गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, मनसे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, जि. प. सदस्य उदय जाधव, उपसभापती गोरख बोडके, उत्तम भोसले, कृउबा संचालक पांडुरंग बऱ्हे, रघुनाथ तोकडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, विठल लंगडे, रामदास चव्हाण खंडेराव भोर आदींनी मनोगत व्यक्त केले.

वर्षभरातच शिवसेनेला जय महाराष्ट्र

गेल्या वर्षभरापूर्वी इगतपुरी तालुक्यात राजकीय समीकरणे बदलत गेल्याने तत्कालीन काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा बँक संचालक, माजी जि. प. सदस्य संदीप गुळवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र वर्षभरातच त्यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. गेल्या महिनाभरापासून याबाबत कुजबूज चालू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ धार्मिकस्थळांना अभय?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भातील डेडलाइन जवळ येत असल्याने महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेऊन कारवाईचा कृती आराखडा तयार केला आहे. सर्व विभागांना कारवाईचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका, सिडको, एमआयडीसी, म्हाडा यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रस्त्यावरील १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर ८ नोव्हेंबरपासून हातोडा पडणार आहे. तसेच २००९ नंतरची ७१ अनधिकृत धार्मिक स्थळेही हटवली जाणार आहेत. त्यामुळे जवळपास २२१ अनधिकृत धार्मिक स्थळांवर नोव्हेंबरपूर्वी कारवाई केली जाणार आहे. दरम्यान खुल्या मैदानावर असलेल्या धार्मिक स्थळांना दहा टक्के बांधकामाचा फायदा मिळावा यासाठी महासभेवर प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू झाल्याने धार्मिक स्थळांना संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.

सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भातील डेडलाइन नोव्हेंबर २०१७ आहे. त्यापूर्वी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करावी लागणार आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार २००९ पूर्वीच्या आणि नंतरच्या अनधिकृत धार्मिकस्थळांची वर्गवारी करत नोव्हेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात २००९ पूर्वीच्या ६५९ धार्मिक स्थळांची यादी तयार करत त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. पालिकेने जवळपास १०५ धार्मिक स्थळांवर कारवाईदेखील केली होती. परंतु, शिवसेनेसह काही संस्था-संघटनांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोकळ्या भूखंडांवरील देवस्थानांवर कारवाई करू नये, अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी घेतली होती. परंतु, आता आता न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्याने महापालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंगळवारी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका अधिकारी, पोलिस, म्हाडाचे अधिकारी व सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात नोव्हेंबरपूर्वी हटवण्यात येणाऱ्या धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत निर्णय झाला. त्यानुसार ८ नोव्हेंबरपासून महापालिका हद्दीतील १४२ आणि सिडकोच्या हद्दीतील ८ अशा एकूण १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच २००९ नंतरच्या खुल्या जागेवरील ५७ आणि सिडकोतील १४ अशा ७१ अनधिकृत धार्मिक स्थळांचाही कारवाईत समावेश आहे. हायकोर्टात याबाबत वाद निर्माण झाल्याने कारवाई थांबली होती. परंतु आता हायकोर्टाने कोणतीही स्थगिती न दिल्याने कारवाई होणार आहे. त्यामुळे ही अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यावरून पुन्हा वाद निर्माण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांचे वैभव लयाला

0
0

नाशिकरोडमधील उद्यानांची निधी व मनुष्यबळाअभावी दुरवस्था


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडला १८५ उद्याने आहेत. त्यातील ७५ हे खासगी ठेकेदाराकडे आहेत. मात्र, या ठेकेदाराकडे फक्त स्वच्छतेची जबाबदारी आहे. त्यामुळे ते सोयीसुविधा पुरवण्यास असमर्थ आहेत. शंभरावर उद्याने ही महापालिकेकडे आहेत. पण, या निधी व मनुष्यबळाअभावी या उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. गार्डनच्या जाळ्या गायब झाल्या आहेत. फुलझाडे केव्हाच सुकून गेली आहेत. जनावरांनी हिरवळीचा फडशा पाडला आहे. उद्यानात सर्वत्र कचऱ्याचा ढीग साचत आहे. याठिकाणी मद्यपी, समाजकंटकांचा सतत वावर असतो. या पार्श्वभूमीवर मुक्तिधाम शेजारील सोमाणी उद्यान हेच एकमेव चांगले उद्यान उरले आहे.

नाशिकरोडकरांचा सर्वात जास्त ओढा असलेल्या सोमाणी गार्डनमध्ये सोयीसुविधा व पुरेशा खेळण्यांची मागणी नागरिकांनी केली आहे. हे गार्डन १९९० साली सुरू करण्यात आले होते. उद्यान विभाग आणि नगरसेवक यांनी एकत्रित प्रयत्न करून या महत्त्वाच्या उद्यानाची वैभव वाढविण्याची गरज आहे.

शोभेची झाडे लावा

सोमानी गार्डनमध्ये शोभेची झाडेच नाहीत. आहे ती केवळ हिरवळ. नागरिकांना फुलझाडांशिवाय असलेले गार्डन बघायला मिळते. गार्डनच्या टेकडीवर, सर्कलमध्ये तसेच जॉगिंग ट्रकच्या बाजूला फुलझाडे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही भागात हिरवळ नाहीत, ती लावणे आवश्यक आहे. मुलांच्या खेळणीच्या ठिकाणी खड्डे आहेत. तेथे मुले खेळताना पडून जखमी होतात. तरी, येथे बारीक वाळू टाकण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सर्पदंशाची भीती

गार्डनमध्ये प्रवेश केल्यावरच डाव्या हाताला ट्री गार्ड व अन्य भंगार पडलेले आहे. तसेच येथे फरशा किंवा गट्टूही नाहीत. नागरिक येथे उष्टे पदार्थ टाकतात. ते खाण्यासाठी उंदीर झाले आहेत. त्यांना खाण्यासाठी साप येऊ शकतात. त्यामुळे सर्पदंशाची भीती असल्याने भंगार व विटांचे तुकडे उचलण्याची गरज आहे. जॉगिंग ट्रॅकवर कचरा, पालापाचोळा असतो. त्यामुळे ट्रॅकवर रात्रीच्या अंधारात फेरी मारायला कोणी धजावत नाही. पुतळ्याभोवती संरक्षण जाळ्याही वाकलेल्या आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब तुटलेले आहे.

प्रेमीयुगलांना आवरा

सोमानी गार्डनमध्ये प्रेमी युगलांचा वावर वाढला आहे. दुपारीही ही जोडपी येऊन बसू लागल्याने सायंकाळपर्यंत या गार्डनला टाळे लावावे लागते. मात्र, प्रेमी युगल सायंकाळी येतात. जॉगिंग ट्रॅक व अन्य ठिकाणी खेटून बसतात. त्यांच्या चाळ्यांकडे महिला व बालकांना दुर्लक्ष करावे लागते. जॉगिंग ट्रॅकवर फिरायला जाणेही या प्रेमी युगलांमुळे अवघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस सिल‌िंडरचा अनरदला स्फोट

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अनरद गावात बुधवारी (दि. १) सायंकाळी ७ वाजण्याचा सुमारास विजय ताराचंद पाटील यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नसून, या घटनेमुळे तीन घरांना आग लागली. आगीत शेतमालाचे नुकसान झाले असून, काहीजण जखमी झाले आहेत.

शहादा तालुक्यातील अनरद गावात बुधवारी (दि. १) गॅस सिलिंडरच्या स्फोट होऊन लागलेल्या या आगीत चार घरे भक्ष्यस्थानी पडले. यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे राखरांगोळी झाली. घरांमध्ये कापसाची वेचणी करून मोठ्या प्रमाणात कापूस साठवला असल्याने यात जवळपास ८० क्विंटल कापूस, संसारोपयोगी सामानाची राखरांगोळी झाली. या आगीत कोकिळाबाई विजय पाटील, हिमांशू माळी, पंढरीनाथ माळी हे

जखमी झाले आहेत.

दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी शहादा आणि दोंडाईचा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आणि ग्रामस्थांनी केलेल्या दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. घटनेमुळे ९ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गॅस सिल‌िंडरचा अनरदला स्फोट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात काँग्रेसतर्फे वीजबिलांची होळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दुष्काळ, अवकाळी पाऊस व हमीभाव नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झालेली असताना भाजप सरकार वीज कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वीजपंप जोडणी बंद करीत आहे. तसेच, सक्तीची वीज बिल वसुली केली जात आहे. हा प्रकार थांबवावा, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी वीजबिलांची होळी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कसमादे पट्ट्यात पर्जन्यमान कमी असल्याने शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न झाले नाही. त्यात हमीभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना देखील भाजप सरकार वीज वितरण कंपनीद्वारे शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे कनेक्शन खंडित करीत असल्याचा आरोप डॉ. शेवाळे यांनी केला. सक्तीची वीज बिल वसुली न थांबल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावरची मांसविक्री थांबणार का?

0
0

आरोग्य विभागाकडून कारवाईबाबत साशंकता

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सरकारच्या नियमानुसार उघड्यावर मांस विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु, नाशिक महापालिकेच्या हद्दीत सर्वच ठिकाणी उघड्यावर मांस विक्री होताना दिसते. उघड्यावर मांस विक्रीला ब्रेक कधी लागणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा आरोग्य विभागाकडून याबाबत कारवाई का होत नाही, असाही प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे मांस विक्रीसाठी व्यवस्था महापालिकेनेच उपलब्ध करून द्यावी, असे मत विक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

शहराच्या वाढत्या लोकवस्तीत सुविधा पुरविताना महापालिका कमी पडत असल्याचे चित्र आहे. अगोदरच अनेक भागात रस्त्यांची वानवा असताना पिण्याचे पाणीदेखील मुबलक मिळत नसल्याचा आरोप केला जातो. परंतु, वाढत्या लोकवस्तीत उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येत मांस खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने घराजवळ मांस विक्री करणाऱ्यांकडून ग्राहक मांस घेतात. यामुळे साहजिक नव्याने लोकवस्ती झालेल्या भागात मुख्य रस्त्यांच्या कडेला मांस विक्री करणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. महापालिकेकडून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. परंतु, संबंधित कारवाई ठोस नसल्याने मांस विक्रेते पुन्हा दुकाने मांडत असतात. उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम आरोग्य विभागाचे आहे. परंतु, आरोग्य विभागाचे हात ओले असल्याने ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. अनेकवेळा सांगूनही या मागणीचा विचार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात नाही. त्यामुळे आता दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक भागात उघड्यावरच अशाप्रकारे मांसविक्री सुरू असल्याने त्याकडे आरोग्य विभाग का कानाडोळा करीत आहे. तरी याबाबत मांस विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था लावावी, अशी मागणी होत आहे.

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुख्य रस्त्यांवर मांस घेणारे ग्राहक येत असल्याने मांस विक्रेत्यांनी तेथेच दुकाने थाटली आहेत. यावर महापालिकेनेच योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे.

भगवान महाले, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images