Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खादी वापरातून द्या ग्रामविकासाला चालना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खादीच्या वापराचा थेट लाभ ग्रामविकासाच्या संकल्पनेस होतो. त्यामुळे खादीच्या वापराला दैनंदिन जीवनात प्राधान्य देत ग्रामविकासाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी तुमचे योगदान द्या, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘महाखादी’ यात्रेस झगडे यांनी भेट देऊन प्रदर्शनाची माहिती घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग आदी उपस्थित होते.

झगडे यांनी प्रदर्शनात असलेल्या विविध वस्तूंसोबतच सूतकताई यंत्राची सविस्तर माहिती घेतली. खादी प्रसारासाठी अत्यंत जुन्या पद्धतींची माहिती देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांसह चरखा चालवून सूत कताई केली.

सोमवारी यात्रेचा अखेरच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांनी यात्रेला भेट देऊन चरख्याविषयी जाणून घेतले. शालेय विद्यार्थ्यांनी चरख्याची माहिती घेण्यात विशेष रस दाखविला. विद्यार्थ्यांना चरख्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पेटी चरखा, बूक चरखा, अंबर चरखा, सोलर चरखा, गांधी चरखा आदी चरख्याचे विविध प्रकार एकाच ठिकाणी यात्रेच्या ‍निमित्ताने पाहता आले. खादीच्या विकासातील विविध टप्प्यांची माहिती यानिमित्ताने देण्यात आली.

खादीच्या वस्तूंना चांगली मागणी

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनांच्या विक्रीलादेखील चांगला प्रतिसाद लाभला. दुपारपर्यंत २ लाख ३८ हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. त्यात खादी कापड, अमरावती सोलर चरख्याने तयार केलेले खास कोट, चपला, हर्बल उत्पादने, मातीच्या वस्तू, तांब्याच्या कलात्मक वस्तू आदींचा समावेश होता. प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी दिंडोरी तालुक्यातील संस्थेने बनविलेला मातीचा फ्रीज विशेष आकर्षण होते. राज्यातील एकूण २० जिल्ह्यांना ही यात्रा भेट देणार आहे. नाशिक हा या क्रमवारीतील सातवा जिल्हा आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस प्रदर्शनाचे आयोजन करून खादीचा प्रसार करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककर गारठले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हावासीयांना हुडहुडी भरली आहे. राज्यात सोमवारीदेखील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली. १०.२ अंश सेल्सिअसवर तापमान स्थिरावले. पुढील दोन दिवस तापमान राज्यभर कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नाशिकची थंडी, किमान तापमान आता राज्यभर चर्चेचा विषय ठरू लागले आहे. पहाटे व रात्री बाहेर पडणे कठीण व्हावे इतक्या तीव्रतेने थंडी अंगाला झोंबत आहे. थंडीची ही तीव्रता कमी करण्यासाठी नाशिककरांकडून वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात असून, ठिकठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्याचे चित्र आहे. बाजारपेठांमध्ये ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. स्वेटर, कानटोप्या, मफलर, जॅकेट्स अशा ऊबदार कपड्यांना चांगली मागणी वाढली आहे. थंड हवामानाचा त्वचेवरही परिणाम जाणवत असून, चांगल्या लोशन्स, क्रीम्सची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. नाशिकनंतर राज्यातही थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली असून, अहमदनगर १०.७, पुणे ११.४, सातारा ११.५, नागपूर १२.९, गोंदिया १२.६, यवतमाळ १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची सोमवारी नोंद झाली.

आठवडाभरातील तापमान ः १३ नोव्हेंबर ः १०.२, १२ नोव्हेंबर ः १०.४, ११ नोव्हेंबर ः १२.६, १० नोव्हेंबर ः १३.२, ०९ नोव्हेंबर ः १३.१, ०८ नोव्हेंबर ः १२.४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेड्यांच्या विकासाला कात्री

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या निधीसाठी प्रशासनाने आता खेडे विकास निधीचा बळी दिला आहे. रस्त्यांसाठी मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या खर्चाचा भार सहन होत नसल्याने महापौरांनी थाटामाटात जाहीर केलेला दहा कोटींचा खेडे विकास निधी आता रस्त्यांच्या कामामध्ये वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रथमच महापालिकेत समाविष्ट झालेल्या खेड्यांची निराशा होणार आहे.

महापौरांनी बजेटमध्येच प्रतिखेडे ५० लाख याप्रमाणे २० खेड्यांसाठी दहा कोटींची घोषणा केली होती. परंतु आता पदाधिकाऱ्यांच्या निधीपाठोपाठ आता खेडे विकास निधीलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे या २० खेड्यांच्या विकासाचा प्रश्न कायम राहणार आहे.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २० खेड्यांचा विकास हा शहरांच्या मानाने झालेला नाही. या २० खेड्यांचा समावेश पालिकेत झाला असला तरी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, भूमीगत गटार अशा पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून दरवेळेस बजेटमध्ये या खेड्यांसाठी निधीची तरतूद केली जाते. या खेड्यांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांचा जास्त निधीचा आग्रह असतो. त्यामुळे महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपनेही बजेटमध्ये या खेडे विकासासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. महापौरांचा प्रभागामध्येही खेड्यांचा समावेश असल्याने त्यांनी विशेष प्रयत्न करून खेडे विकास निधीची बजेटमधे १० कोटींची तरतूद करून घेतली होती. त्यामुळे या खेड्यांमधील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

परंतु सत्ताधाऱ्यांनी नुकतेच मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकास निधीमुळे खेडे विकास निधीवर गडांतर आले आहे. ७५ लाखांच्या नगरसेवक निधीमुळे अगोदरच तिजोरीवर शंभर कोटींचा भार आला आहे. त्यात २५७ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी दिल्याने आता प्रशासनाने खेडे विकास निधीवर फुली मारली आहे. खेडे विकास निधी हा रस्ते कामात वर्ग केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला असून, खेडे विकास निधीअंतर्गत कामे घेवून येणाऱ्या नगरसेवकांना माघारी पाठव‌लिे जात आहे. त्यामुळे या भागातील नगरसेवकांसह नागरिकांचीही मोठी निराशा झाली आहे. प्रशासनाच्या या पवित्र्यामुळे महापौरांसह या भागातील नगरसेवक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

पदाधिकारी निधीही कागदावरच

पालिका प्रशासनाने एकीकडे महापौरांचा ७५ लाखांचा नगरसेवक निधी देण्यासह २५७ कोटीं रस्ते कामांचाही हट्ट पुरवला आहे. त्यामुळे खेडे विकास निधीसोबतच महापौरांसह पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या १७ कोटींच्या विशेष निधीही अजूनही कागदावरच आहे. गरसेवकांना ७५ लाखांचा निधी घोषित केला होता. सोबतच महापौरांसाठी पाच कोटी, उपमहापौर तीन कोटी, स्थायी समिती सभापती तीन कोटी, सभागृहनेता दोन कोटी, विरोधी पक्षनेता एक कोटी आणि सहा प्रभाग समिती सभापतींना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर जवळपास १७ कोटींचा भार येणार आहे. परंतु खेडे विकाससोबतच पदाधिकारी निधीलाही ब्रेक लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधक टाकतांना नियमांची पायमल्ली

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

वेगवान वाहतुकीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी रहिवासी क्षेत्रात गावालगत रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी गतिरोधक बसविले जातात. परंतु येथील पालिका हद्दीतील रस्त्यावर तसेच शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र तीन व राज्य महामार्गांवर कोणतेही निकष न पाळता गतिरोधक टाकण्यात आल्याने वेगवान वाहतुकीस आळा बसण्यापेक्षा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते गतिरोधक नियमबाह्य असून, शहरातील तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील गतिरोधक काढून टाकण्याची मागणी येथील आम्ही मालेगावकर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

वेगावर नियंत्रण मिळविण्याचा मूळ उद्देश असलेले स्पीडब्रेकर बनवितांना भारतीय सडक काँग्रेस (आयआरसी)च्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. मात्र आयआरसीच्या नियमांची पायमल्ली करून सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका प्रशासन, नगर पालिका व जिल्हा परिषद प्रशासन पूर्णतः डोळे झाक करीत आहे. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा व आयआरसीच्या नियमांचा भंग होत असल्याचे समिती सदस्यांनी म्हटले आहे. आयआरसीच्या मानकाप्रमाणे गतिरोधक बनविण्यात यावे अशी मागणी ‘आम्ही मालेगावकर’च्या निखिल पवार, देवा पाटील, विवेक वारुळे, राहुल देवरे, रवीराज सोनार, देवेंद्र अलई, यशवंत खैरनार, अतुल लोढा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

असे होतात अपघात

शहरातील बहुसंख्य रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. काही रस्त्यांवर तर दोन गतिरोकधकांमध्यील खूपच कमी आहे. तसेच इतर ठिकाणी गतिरोधकांची उंची प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने तेथे थबकतात, त्यामुळे मागून येणारी वाहने त्यांच्यावर धडकतात. बऱ्यांचदा गतिरोधकांच्या अवास्तव उंचीमुळे चालकाचा वाहनावरील ताबाही सुटल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खा. राऊतांची येवल्यात चाचपणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

संपूर्ण राज्यभरात शिवसेनेसाठी सध्याचे वातावरण चांगले असून, जनता निवडणुकांची वाट पाहतेय. कधी निवडणूक येते आणि निकाल लावतोय याकडेच राज्यातील जनतेचे लक्ष लागले असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करताना आपण पाहिले असल्याचे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी येवल्यातील आढावा बैठकीदरम्यान व्यक्त केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवाच फडकला पाहिजे, असे आवाहन करत शिवसैनिकांना निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच कामाला लागण्याचा संदेश दिला.

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे दिंडोरी लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या येवला, नांदगाव व चांदवड या तीन विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकांसाठी रविवारी रात्रीच धुळे येथून येवल्यात मुक्कामी आले होते. येवला शहरातील शासकिय विश्रामगृहावर या तीन मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या वेगवेगळ्या बैठका खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. बैठकीस प्रारंभ होताना प्रथम येवला,नंतर नांदगाव व शेवटी चांदवड मतदारसंघातील स्वतंत्र आढावा बैठक होताना त्यात खासदार राऊत यांनी शिवसैनिकांची बाजू एकूण घेत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कुठली पावले उचलता येतील, यावर संवाद साधला. पक्ष संघटनेला बळकटी देणे,स्थानिक पातळीवरील समस्या व प्रश्‍न जाणून घेत या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुखांना दौरा करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. पुढील दौऱ्यावेळी आम्ही कामाला लागलेलो आहोत, असे उत्तर मला हवे असल्याचे सांगत खासदार राऊत यांनी विधानसभेवर भगवा झेंडा आता पक्का फडकणारच, असा ठाम विश्‍वास यावेळी व्यक्त केला. या वेगवेगळ्या बैठकांना शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.
‘निवडणुका शिवसेनेच्या हातात’

निवडणुका कधीही होवू शकतात. निवडणुका कधी लावायच्या हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा सरकारच्या हातात नाही, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, असे सांगतानाच शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी तयार असल्याचे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

गेल्यावेळच्या व आताच्या होणाऱ्या निवडणुकीतील वातावरणात जमीन अस्मानचा फरक असणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बुडबुडे फुगले होते, आता तेच बुडबुडे येत्या निवडणुकीत फुटल्याचे दिसेल, या शब्दात यावेळी खासदार राऊत यांनी भाजपाला टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी असतानाही शिवसेनेने राज्यात दौरे सुरू केले आहेत. सरकारला तीन वर्षे होत आलेली आहे आणि चौथ्या वर्षात कुठल्याही राज्यामध्ये असुदे लोकसभा असुदे, विधानसभा असुदे लोक तयारी करतात.

शेवटचे सातआठ महिने आचारसंहितेत जात असल्याने तयारी केली जाती. मला असे वाटते योग्य वेळी तयारी झाली आहे. मागच्या वेळी काही ठिकाणी आम्हाला धावपळ करावी लागली होती. यावेळेस तसे होवू नये यासाठी आम्हाला तयारीनिशी सामोरे जावे लागेल असे, राऊत म्हणाले.

रस्त्यात नव्हे, सर्वच क्षेत्रात खड्डे

दिंडोरी : राज्यातील रस्त्यांवर नुसते खड्डे पडलेले नाही तर भाजप सरकारने सर्वच क्षेत्रात राज्यात खड्डे पाडले आहेत. त्यांन आता जनताच धडा शिकवेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी केले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा घेण्यासाठी पदाधिकारी शिवसैनिकांचा मेळाव्यात राऊत बोलत होते. राऊत यांनी भाजपचे नाव न घेता जे आमच्या अंगावर आले त्यांना आम्ही शिंगावर घेतो. शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेले शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत असून त्यांना आता शिवसैनिक गाडल्याशिवाय राहणार नाही. पोल‌सि खात्यात सद्या सरकार चुकीचा प्रकार करत असून, नेमणुकांमध्ये हस्तक्षेप होत राजकीय रंग बघून नियुक्त्या होत आहेत. कार्यकर्ते म्हणून पोलिसांना राबवले जात आहे. त्यांचेकडून सुपारी वाजवण्याचा प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तांचे होणार सर्वेक्षण

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील क व ड वर्ग महापालिकांसह सर्व नगर परिषदा व नगरपंचायत यांच्या हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस अर्थात भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करण्याची योजना राबविण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश दिले आहेत. यानुसार येथील महापालिकेच्या शहरासह हद्दवाढ भागातील मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात पालिकेच्या महसुलात कोट्यवधीची वाढ होण्याची शक्यता आहे.

येथील महापलिकेच्या क्षेत्रात वाढते शहरीकरणच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कराद्वारे मिळणारे उत्पन्न वाढावे या उद्देशाने शासनाने जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता कर आकरण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील मलामात्तांसह हद्दवाढ भागातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर या भागातील एकूण २५ हजार ६०४ मिळकतींवर तत्कालीन ग्रापच्या आकारणीनुसार कर वसुली होते आहे. परिणामी महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यासह शहरात देखील नव्याने बांधण्यात आलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण झालेले नाही. जीआयएस प्रणालीनुसार सर्वेक्षण झाल्यास मालमत्ता करण्याच्या आकारणीत लक्षणीय वाढ होणार आहे. पालिकेचा महसुलात ३० ते ३५ कोटीची वाढ होवू शकते. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून एकत्रित निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांनी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवू नये, असे आदेश आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्मार्ट पार्किंग'ची शहरात पायाभरणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्मार्ट पार्किंगच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर याच धर्तीवर शहरभर स्मार्ट पार्किंगचे जाळे उभारले जाणार आहे. त्यासाठी नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या वतीने शहरस्तरीय निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.

शहरातील वाहतूक आणि वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनतळांसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. नाशिक शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात निवड झाल्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात ४१ ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारली जाणार आहे. यामध्ये ३४ ठिकाणी रस्त्यांच्या कडेला तर ७ ठिकाणी खुल्या मैदानात स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारली जाणार आहे. पार्किंगची जागा शोधणे सोपे

वाहनतळांच्या जागेचा शोध व डिजिटल पेमेंटला चालना देणे हेच उद्दीष्ट्य नसून यामाध्यमातून शहरातील पार्किंगच्या मालमत्तेत सुधारणा करणे हाही हेतू आहे.

जागतिक दर्जाचे पार्किंग सेन्सॉर, डॅश बोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे स्मार्ट या ठिकाणी उपलब्ध केले जाणार असून, प्रस्तावित स्मार्ट पार्किंगची सुविधा कॅशलेश असणार आहे. वेब आधारित आणि मोबाइल अॅपचा वापर करून वाहनचलाकांना पार्किंगची जागा शोधणे सहजसोपे होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी केला आहे. या पार्किंगचा पायलट प्रोजेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयात राबविला जात आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केला जात असून यानंतर शहरभर पार्किंगसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत निवड महिनाभरात

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका निवडणूक पार पडून पाच महिने उलटले तरी स्वीकृत नगरसेवक सदस्यांची निवडप्रक्रिया पार पडलेली नाही. अखेर महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून, या प्रक्रियेबाबत सभागृहातील गटनेत्यांना माहिती देण्यासाठी आयुक्तांच्या दालानात सोमवारी दुपारी बैठक पार पडली. त्यात येत्या महिनाभरात सदस्य निवड करण्यात येईल, अशी माहिती नगरसचिव राजेश धसे यांनी दिली.

येथील पालिकेचे उपायुक्त डॉ. राजेश पठारे, उपमहापौर सखाराम घोडके, नगरसचिव राजेश धसे, महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल, एमआयएम गटनेते डॉ. खालिद परवेज, काँग्रेस गटनेत्या ताहेरा शेख, भाजप गटनेते सुनील गायकवाड आदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी धसे यांनी स्वीकृत सदस्यांची निवडीबाबतची प्रक्रिया कशी असेल, याचा तपशील गटनेत्यापुढे ठेवला. तसेच पक्षीय बलाबल, पक्षनिहाय स्वीकृत नगरसेवकांची संख्या, सदस्य निवडीबाबतच्या अटी याबाबत माहिती दिली. त्यानुसार गटनेते स्वीकृत सदस्यांचे अर्ज आयुक्तांकडे सादर करतील त्या अर्जाची छाननी, अर्ज वैधता याची तपासणी होवून स्वीकृत सदस्य निवडीबाबत विशेष महासभा घेण्याची शिफारस करण्यात येईल. आगामी महिन्याभरात निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पराभूत सदस्यांचे प्रयत्न जोरात

पालिकेत नवनिर्वाचित एकूण ८४ सदस्य असून ५ स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. पक्षीय बलाबलानुसार काँग्रेस व महागठबंधन आघाडी यांना प्रत्येकी २ तर शिवसेनाला १ स्वीकृत सदस्य निवडता येणार आहे. स्वीकृत सदस्य निवडीच्या हालचाली सुरू झाल्याने पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्यांसह अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

बुधवारी प्रभाग सभापती निवड

एकीकडे स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू झाली असताना पालिकेच्या चारही प्रभाग सभापतींच्या निवड येत्या १५ नोव्हेंबरला होत आहे. अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागनिहाय विशेष सभा होणार असून, काँग्रेस, एमआयएम, शिवसेना, महागठबंधन आघाडी यांना प्रभाग समित्यांचे सभापतीपद मिळू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिफारस पत्रांसाठी उमेदवारांना भुर्दंड

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणूक अर्ज स्वीकृतीस दोन दिवसांचा अवधी बाकी आहे. विविध दाखल्यांसाठी लागणार शिफारसपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची नगर परिषद कार्यालयात झुंबड उडाली आहे. कोणते आणि कशाप्रकाचे दाखले लागतात याबाबत मागर्दशन नसल्याने उमेदवारी करणाऱ्यांना नाहक शे-दोनशे रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. जातपडताळणीचे शिफारसपत्र नगर परिषद कार्यालयात ५० रुपये भरून मिळते. मात्र प्रत्यक्ष चौकशी केल्यावर ते तहसील कार्यालयातील पाहिजे असे समजल्याने सोमवारी सायंकाळी बहुतेकांनी तहसील कार्यालयात धाव घेतली.

शौचालय वापरचा दाखला, पोल‌िसांकडे चारित्र पडताळणी करिता शिफारस पत्र अशा दाखल्यांची फी आकारून नगरपालिका ऐन निवडणुकीत चांगली कमाई करीत आहे. शुक्रवारी आणि सोमवारी याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. एक नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक अशा एकुण १८ जागांकरिता शेकडो अर्ज येतील, असा अंदाज आहे. एकट्या भाजपकडे शंभरच्या वर इच्छुकांनी उमेदवारीकरिता अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे उमेदवार देण्यासाठी चाचपणी करीत आहेत. श्रमजीवी संघटना या सर्व घाडामोडीवर लक्ष ठेवून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रानवडसाठी स्वाभिमानी आक्रमक

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रानवड सहकारी साखर कारखान्याचे कामगारांचे देणे न दिल्यास व २५ तारखेपर्यंत कारखाना सुरू न झाल्यास कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना घराबाहेर पडू देणार नाही. तसेच खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.

निफाड येथे तहसील कार्यालयावर रानवड सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा आणि कामगारांची तीन महिन्यांचा पगार द्यावा व रॉनीटन लथ व भारत वाबळे यांच्यावर कारवाई करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कामगार व शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्त्व संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोऱ्हाडे यांनी केले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या संभाजी राजे उद्योग समूहाकडून उपकररावर रानवड कारखाना रॉनीटन लथ व भारत वाबळे यांनी चालवायला घेतला आहे. कारखाना सुरू करण्याची पूर्वतयारी करून झाल्यानंतर रानवड कामगारांचे तीन महिन्यांचे पगार थकवून दोघे े फरार झाले. त्यामुळे कामगारांनी पिंपळगाव पोल‌िस स्टेशनला फिर्याद दिली. या दरम्यान काही कामगारांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या आठवड्यात या प्रश्नावर विविध पक्षांचे प्रतीनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कामगारांची भेट घेत रानवड सुरू होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कामगार व शेतकऱ्यांचा निफाड तहासीलवर मोर्चा नेला. मोर्चात रानवडचे कामगार, शेतकरी सहभागी झाले होते. जिल्ह्याध्यक्ष गोविंद पगार, सुधाकर मोगल, संजय गायकवाड, निवृत्ती गारे, नितीन कोरडे, संदीप जगताप यांनी आक्रमक भूमिका मांडली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना अनेकदा निसाका व रासाकाबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती करूनही ते जबाबदारी झटकतात येत्या काळात होणाऱ्या निवडणुकात भाजपला शेतकरी काय असतो हे दाखवून देऊ असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर प्रदेशातील अट्टल गुन्हेगार अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नी, मंदिरातील पुजाऱ्यासह पाच खून, दरोडे, प्राणघातक हल्ला करून उत्तर प्रदेशमधून पसार झालेल्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी अंबड लिंक रोडवर अटक केली. हा अट्टल गुन्हेगार सहा ते सात महिन्यांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास होता.

असगर बदलू शेख (वय २६, रा. मु.पो. हकिमगाव, ता. नानपारा, जि. बहराईच, उत्तर प्रदेश) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. अंबड लिंक रोडवरील संजयनगर या परिसरात एका भाड्याच्या खोलीत असगरने बस्तान बांधले होते. संशयित असगरच्या संशयास्पद हलचालींबाबत पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार बर्डेकर यांनी गुन्हे शोधपथकाचे उपनिरीक्षक महेश इंगोले व कर्मचाऱ्यांना त्याच्या पाळतीवर ठेवले. पोलिस पाळतीवर असताना असगर क्वचितच, पण खूप सावधगिरीने घराबाहेर पडत होता. संशयितास मंगळवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून पंचवटी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने तब्बल पाच खून केल्याची कबुली दिली. असगरने स्वत:च्या पत्नीचा खून केला, तसेच एका मंदिरात दरोडा टाकला. त्या वेळी पुजाऱ्याचा खून केला होता. असगरविरोधात बलरामपूर पोलिस स्टेशनसह अन्य ठिकाणी खून, दरोडे, प्राणघातक हल्ले यासह १५ ते २० गुन्हे दाखल आहेत. पंचवटी पोलिसांनी ही माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना दिली आहे. असगर आठ महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशातून पळाला होता. असगरच्या अटकेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक नाशिकला रवाना झाल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, अशोक नखाते उपस्थित होते. या सर्वांनी पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह तपास पथकाचे अभिनंदन केले.

घरमालकाविरोधात गुन्हा

भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकाविरुद्ध सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गोरख रंगनाथ निगळ (रा. सोमेश्वर कॉलनी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे. निगळ यांची एबीबी कंपनी परिसरातील सोमेश्वर कॉलनीत २० खोल्यांची चाळ आहे. या चाळीत आठ महिन्यांपासून दोन भाडेकरू वास्तव्यास आहेत. मात्र, भाडेकरूंची कोणतीही माहिती निगळ यांनी पोलिसांना दिली नाही. पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी कारवाई केली. हवालदार घुमरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देव-देवतांची विटंबना रोखण्यासाठी पुढाकार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अनेकदा शहरातील विविध झाडांखाली किंवा मंदिरांमध्ये देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्याचे दिसून येते. अशा प्रकारामुळे देवतांची विटंबना होण्याची श‍क्यता असते. ती रोखण्यासाठी गोदा संवर्धनच्या माध्यमातून युवकांनी आता जनतेचे प्रबोधन करून झाडाखाली किंवा अन्यत्र ठेवलेल्या मूर्ती व फोटोंचे संकलन सुरू केले आहे.

गोदा संवर्धन मोहिमेच्या सदस्यांनी नंदिनीची परिक्रमा हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. अनेक ठिकाणी नदीत मूर्ती किंवा फोटो सोडले जातात. मात्र, हे सर्व फोटो व मूर्ती तशाच नदीत पडून राहिल्याने त्यांची विटंबना होते. त्यामुळे प्रकाराबाबत युवकांनी जनजागृती सुरू केली अाहे. भाविकांना असे न करण्याची विनंती करण्यात येत असून, अनेक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही लाभला आहे. गोदाप्रेमी राजेश पंडित, रामदास स्वामी मठाचे विश्वस्त मकरंद जोशी, शिव उपासक अाप्पासाहेब उपासनी, अमित कुलकर्णी, उदय थोरात, मधुकर बागुल, चंदन खतेले, सचिन महाजन, विपुल आपटे, रवी वाघ, अक्षय एडके, पंकज महाजन, महेश महाजन, किरण पाटील आदी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहशांतीसाठी भोंदूबाबाने दिला चोरीचा ‘मंत्र’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्धवट सोडलेली पूजा पूर्ण केली नाही तर तुझे वडील मरतील. पूजा करावीच लागेल. अन्यथा मंत्राच्या शक्तीने तुला व तुझ्या वडिलांना ठार मारेल, अशी भीती घालून अवघ्या १८ वर्षांच्या युवतीकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भोंदू मांत्रिकास सरकारवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

उदयराज रामआश्रम पांडे (वय ४९, रा. वांगणी, अंबरनाथ, जि. ठाणे) असे संशयित भोंदू मांत्रिकाचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेश येथील संशयित आरोपी पांडे याने काही वर्षांपासून अंबरनाथ परिसरात बस्तान बसवले आहे. घरातच धार्मिक विधी, पूजा-अर्चा तो करतो. शहरातील काही भक्तांच्या माध्यमातून पीडित युवती व तिचे कुटुंबिय बाबापर्यंत पोहचले. साधारणतः दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान बाबाने नाशिकमधील अवघ्या १८ वर्षांच्या युवतीला करणी करण्याची धमकी देत तिला चोरी करण्यास भाग पाडले. सरकारवाडा पोलिसांच्या हाती प्रकरणाची सूत्रे येताच लागलीच पांडेच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. या प्रकरणी विरेंद्र नेमीचंद मुथा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताविरोधात कलम ३८६, ३८७, ४२०, औषधे व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियमातील कलम ५ आणि ७, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यातील कलम तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी भोंदू बाबास कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने संशयित पांडेला आठ दिवसांची (दि. २१ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.

अपशकुनाची दाखवली भीती

गृहशांती व कौटुंबिक कलह मिटवण्यासाठी पीडित युवती व तिचे कुटुंबिय मागील दीड वर्षापासून बाबाच्या संपर्कात होते. यादरम्यान सुख-शांतीसाठी संशयित आरोपीने एका मोठ्या पूजेचे आयोजन केले. यासाठी त्याने कुटुंबियाकडून एक लाख १० हजार रुपये घेतले. ही पूजा बाबाच्या घरीच आयोजित करण्यात आली. मात्र, पूजा सुरू असताना पेटलेला दिवा अनेकदा विझला. हा अपशकून असल्याचे म्हणत बाबाने खंड‌ित दिवा पीड‌ित युवतीकडे सोपवला. पूजेचे सामान घेऊन कुटुंबिय घरी परतले. मात्र, खंड‌ित दिवा घरात ठेवणे चांगले नसल्याचे म्हणत पीड‌ित युवतीच्या आईने सर्व सामान फेकून दिले. ही माहिती समजताच बाबाने पीड‌ित युवतीशी संपर्क साधला. झाल्या प्रकारामुळे तुझे वडील मरणार असून, असे होऊ द्यायचे नसल्यास पूजा करावीच लागेल, असे सांगितले. पूजा केली नाही तर तुझ्या कुटुंबियाची बरबादी करेल अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीकडून बाबाने चार लाख रुपये, १५ तोळे सोने, त्यात बांगड्या, पोत व पाच तोळे सोन्याचे बिस्क‌िटे असे दागिने उकळले. मात्र, तरी त्याची पैशांची मागणी सुरूच होती.

चोरीनंतर पर्दाफाश

बाबाची पैशांची मागणी सतत पूर्ण होणे शक्य नसल्याचे पीड‌ित मुलीने स्पष्ट केल्यानंतर बाबाने तिला ओळखीचेच असलेल्या नितीन फिरोद‌िया यांच्या घरी चोरी करण्यास भाग पाडले. मुलीने या ठिकाणाहून १४ लाख रुपये रोख आणि १५ तोळे सोने चोरी केले. फिरोद‌िया यांनी ही माहिती सरकारवाडा पोलिसांना दिली. पोलिसांची चौकशी सुरू झाली असतानाच पीड‌ित मुलीचे पालक मुद्देमालासह फिरोद‌िया यांच्याकडे आले. त्यांनी सर्व मुद्देमाल परत केला. मात्र, कॉलेजला जाणाऱ्या मुलीने चोरीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न फिरोद‌ियांसह पोलिसांसमोर उपस्थित झाला. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील रोहोकले, सहायक पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव, एएसआय शिवाजी भालेराव, हवालदार पंकज पळशीकर, सुरेश शेळके, नाईक प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, रवींद्र पानसरे, राजू शेळके, संतोष संगम, रवींद्र ठाकूर, सुनील जगदाळे, दीपक खरपडे आदींनी पुढील चौकशी करून संशयितास बेड्या ठोकल्या.

बाबाच्या मोबाइलमध्ये अश्लिल फोटो

संशयित आरोपी पांडेच्या मोबाइलमध्ये २० ते २५ अश्लिल फोटो सापडले आहेत. हे फोटो बाबाच्या भक्तांचे आहेत इतर कोणाचे, याचा तपास पोलिस करणार आहेत. पूजेच्या निमित्ताने येणाऱ्या युवती व महिलांना गंडवून त्यांचे शोषण बाबाकडून होत असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टीकोनातून तपास केला जात आहे. बाबा विवाहीत असून, त्यास पाच मुलेदेखील आहेत.

अतिशय गंभीर प्रकरण असून, त्याचा सर्वांगाने तपास केला जाईल. बाबाकडे फेऱ्या मारणारे काही भक्त नाशिकसह ठाणे परिसरात असून, कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेडिज रूम अन् पुरेशा सुविधांची वानवा

0
0

वाट स्वच्छ आरोग्याची

ठिकाण ः गोखले एज्युकेशन कॅम्पस

मटा मालिका भाग ः २


--


लेडिज रूम अन् पुरेशा सुविधांची वानवा


टीम मटा

कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये आठ ते दहा कॉलेजेस आहेत. या कॅम्पसमध्ये लेडिज रूमची वानवा प्रामुख्याने दिसून येते. स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येत असली, तरी जुन्या कॉलेजेसमध्ये सुविधांची मात्र प्रतीक्षाच आहे. काही स्वच्छतागृहांमध्ये डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजरोडवरील कॅम्पसमध्ये सुमारे आठ ते दहा कॉलेजेस आहेत. या कॅम्पसमध्ये सर्व विद्याशाखांचे कॉलेजेस असल्याने नाशिक शहरातील नामांकित कॅम्पस म्हणून याची ओळख आहे. एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेज, एसएमआरके गर्ल्स कॉलेज, बीवायके कॉमर्स कॉलेज, आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज, एनबीटी लॉ कॉलेज, डॉ. मो. स. गोसावी फार्मसी कॉलेज, डॉ. मो. स. गोसावी ज्युनिअर कॉलेज, जेडीसी मॅनेजमेंट कॉलेज, डॉ. मो. स. गोसावी बिझनेस स्टडी कॉलेज ही कॉलेजेस या कॅम्पसमध्ये आहेत.

२२ हजार विद्यार्थिनी

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये दहा ते बारा ज्युनिअर व सीनिअर कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमध्ये प्रत्येकी सुमारे पाच ते सात हजार विद्यार्थिसंख्या आहे. सर्व कॉलेजेस मिळून ५० हजार विद्यार्थी या कॅम्पसमध्ये रोज येत असतात. यात विद्यार्थिनींची संख्या सुमारे २२ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षा, तसेच स्वच्छतागृह, लेडिज रूम या योग्य सोयी-सुविधा असणे महत्त्वाचे आहे. मात्र, कॉलेज कॅम्पसमध्ये या तुलनेत मोजक्याच सुविधा विद्यार्थिनींना पुरविल्या जात आहेत.

--

नवे कॉलेज अद्ययावत, जुने दुर्लक्षित

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजरोड कॅम्पसमध्ये गेल्या पाच वर्षांत आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज व डॉ. मो. स. गोसावी फार्मसी कॉलेज बांधण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणची स्वच्छतागृहे अद्ययावत आहेत. विशेष म्हणजे या कॉलेजमधील स्वच्छतागृहांची रोज स्वच्छता केली जात आहे. या स्वच्छतागृहांत अपडेटेड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. मात्र, या कॅम्पसमध्ये एसएमआरके गर्ल्स कॉलेज, एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेज, बीवायके कॉमर्स कॉलेज, एनबीटी लॉ कॉलेज या कॉलेजेसच्या बिल्डिंग जुन्या आहेत. या कॉलेजेसमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाकडे संस्था प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. या कॉलेजेसमधील स्वच्छतागृहांत कोणत्याही अद्ययावत सुविधा नाहीत. या कॉलेजेसच्या स्वच्छतागृहातील पाण्याचे नळ लिक आहेत, तसेच स्वच्छता कर्मचारी दोन दिवसांआड येथील स्वच्छता करतात. त्यामुळे संस्थेकडून जुने कॉलेजेस दुर्लक्षित केला जात असल्याची तक्रार विद्यार्थिनी करीत आहेत.

--

सपट अन् बीवायकेवर कृपादृष्टी

यूजीसीच्या नियमांतर्गत प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहासोबतच लेडिज रूम असणे बंधनकारक आहे. मात्र, असे असूनही गोखले एज्युकेशन सोसायटीने फक्त दोनच कॉलेजेसमध्ये लेडिज रूमची सुविधा पुरविली आहे. कॅम्पसमधील आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज आणि बीबायके कॉलेजमध्येच लेडिज रूम आहे. एचपीटी-आरवायकेमध्ये लेडिज रूम आणि स्वच्छतागृह सामायिक असल्याने विद्यार्थिनींना लेडिज रूममध्ये बसणे शक्य होत नाही. एसएमआरके कॉलेजमधील लेडिज रूम कित्येक महिन्यांपासून कुलूपबंद आहे. त्यामुळे लेडिज रूम असूनही विद्यार्थिनींना त्याचा वापर करता येत नसल्याची तक्रार विद्यार्थिनी करीत आहेत. एनबीटी लॉ कॉलेजमध्येदेखील स्वतंत्र लेडिज रूम नाही. त्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होते. या असुविधांमुळे विद्यार्थिनींना बसण्यासाठी लेडिज रूमचा वापर करता येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते आहे. खास बाब म्हणजे, बीवायके कॉलेज व आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये स्वच्छतागृहाच्या बाजूला स्वतंत्र लेडिज रूम आहे. मग बाकीच्या कॉलेजेसमध्ये का नाही, असा सवालही विद्यार्थिनी उपस्थित करीत आहेत.

--

या सुविधा कार्यान्वीत

-यूजीसी नियमांतर्गत अपंग विद्यार्थिनींसाठी कमोडची व्यवस्था आहे.

-विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन मशिन्स जोडले आहेत.

-विद्यार्थिनींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्यार्थिनी मंच कार्यान्वीत आहे.

-विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहासाठी स्वच्छता कर्मचारी कार्यान्वीत आहेत.

--

या सुविधांचा अभाव

-सोसायटीच्या सर्वच कॉलेजेसमध्ये लेडिज रूमची सुविधा नाही.

-विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांची संख्या मोजकीच आहे.

-विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांची योग्य स्वच्छता होत नाही.

-बीवायके, आरवायके, एसएमआरकेत विद्यार्थिनींसाठी एकच स्वच्छतागृह.

-स्वच्छतागृहांची रोजच्या रोज सफाई केली जात नाही. तक्रारींकडेही दुर्लक्ष.

-स्वच्छतागृहांची योग्य स्वच्छता नसल्याने डासांचा प्रादुर्भाव जाणवतो.

-सॅनिटरी नॅपकिनच्या रिफिल्स विद्यार्थिनींनी मागणी केल्याशिवाय भरल्या जात नाहीत.

--

विद्यार्थिनी म्हणतात...

कॉलेजमधील स्वच्छतागृहाची हवी तशी स्वच्छता राखली जात नाही. अनेकदा येथे स्वच्छता करा, असा अर्ज कॉलेज प्रशासनास करावा लागतो. पूर्ण कॉलेजमध्ये एकच वॉशरूम आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी वेगळी लेडिज रूमदेखील नाही. सुविधा आहेत, पण त्यांचा मेंटेनन्स नसल्याने त्रास सहन करावा लागतो.

-संपदा कांबळे, माजी विद्यार्थी प्रतिनिधी, एचपीटी-आरवायके कॉलेज

...

कॉलेजमध्ये लेडिज रूमची सोय नाही. कॉलेजच्या वॉशरूममध्येही कायम स्वच्छता नसते. दोन दिवसांआड सफाई केली जात असली, तरी ती फारशी चांगली नसते. स्वच्छता कर्मचारी फक्त पाणी मारून सफाई करतात. त्यामुळे अनेकदा डासांचा प्रादुर्भाव जाणवतो. कॉलेजकडे मागणी केल्याशिवाय कोणतीही समस्या मार्गी लागत नाही.

-ऐश्वर्या शहाणे, एसएमआरके कॉलेज

--

संस्था म्हणते...

विद्यार्थ्यांच्या लेखी मागण्या आल्यास त्यांची पूर्तता आवर्जून केली जाते. अनेकदा काही कारणास्तव सर्व कॉलेजेसमध्ये योग्य त्या सुविधा पुरविताना कुठे तरी मनुष्यबळ कमी पडते. मात्र, विद्यार्थिनींची वाढती संख्या लक्षात घेता संस्थेच्या सर्व कॉलेजेसमधील स्वछतागृहांची योग्य काळजी घेण्यासाठी स्टाफ नेमण्यात आला आहे. काही कॉलेजेसमध्ये स्वच्छतागृहांची संख्या कमी असून, तेथेही मागणीनुसार नव्या उपाययोजना केल्या जात आहेत. शासकीय नियमानुसार सर्व सुविधा पुरविण्यासाठी संस्था कार्यशील आहे. विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी लेखी स्वरूपात केल्यास त्याचा नक्की विचार केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् मायलेकरांची झाली पुनर्भेट…

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तिचे तान्हुले तीन लेकरं…उसाच्या शेतातून हरवतात…ती कासावीस होते…शोधशोध शोधते…रात्री पुन्हा त्या ठिकाणी येते… लेकरं दिसतात…तिच्या जीवात जीव येतो…पण त्यांना हृदयाशी घेता येत नसल्यामुळे ती विव्हळते…त्यांनाही आईला पाहून तिच्या कुशीत शिरावं असं वाटतं…मात्र भेट होत नाही…ती सलग तीन ते चार दिसस येते…मात्र लेकरांना पाहून निघून जाते…अखेर परवा रात्री तिच्या आणि तान्हुल्यातील अंतर कमी होते…ती तिघांना पाहते…ओंजाराते-गोंजारते आणि एकेकाला हृदयाशी घेत पलायन करते… कोणाच्याही मातृत्त्वाला हेलावून सोडणारा हा प्रसंग घडला आहे निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे शिवारात. बिबट्याची मादी आणि तिच्या तीन पिलांच्या पुनर्भेटीची ही कहाणी.

ब्राह्मणवाडे शिवारात बुधवारी (दि. ८) ऊसतोड मजुरांना संतोष गोसावी यांच्या शेतात ऊस तोड करताना बिबट्याचे तीन बछडे आढळले होते. गोसावी यांनी वनविभागाला कळवल्यानंतर त्यांनी हे बछडे ताब्यात घेतले. मात्र बछडे खूपच लहान असल्याने त्यांच्या पालनपोषण करणे अवघड झाले. त्यातच बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यामुळे बछडे सापडलेल्या ठिकाणी पिंजरा लावला व त्यात बछड्यांना ठेवण्यात आले.

बिबट्याची मादी पिंजऱ्याजवळ येऊन बछड्यांना पाहून निघून जायची. असे दोन दिवस झाल्यानंतर अखेर तीनही बछड्याना तिच्या आईच्या स्वाधीन करायचे असा निर्णय झाला. यासाठी जुन्नर येथील डॉ. अजय देशमुख यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांच्या टीमने ब्राह्मणवाडे शिवारातीत त्याच शेतात बछड्यांना एका कॅरेटमध्ये ठेवले. आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविला.

रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान बिबट्याची मादी त्या ठिकाणी आली. तिने पायाच्या एका पंजाने कॅरेट बाजूला केले. एकेक बछड्याला चाटून त्यांना गोंजारले. त्यानंतर तिने एक एक करून तीनही बछडे आपल्या तोंडात घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.

या बछड्यात दोन मादी व एक नर आहे. वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत मायलेकांची भेट चित्रीत झाली आहे. डॉ. देशमुख यांनी ही चित्रफित सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाड्यांची ओळखपरेड

0
0

सहाही विभागांत आज तपासणी; आरोग्य अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अस्वच्छता आणि अनियमित घंटागाड्यांमुळे महापौरांनी मंगळवारी थेट आरोग्य विभागापुढे हात टेकले. अस्वच्छता आणि घंटागाड्यांबाबत नगरसेवकांकडून वारंवार तक्रारी होवूनही त्यांचे निराकरण होत नाही. आरोग्य विभागाचे ठेकेदारांशी असलेल्या कथित अर्थपूर्ण संबंधांमुळे पालिकेतील सत्ताधारी आता हतबल झाले आहेत. त्यामुळे आता थेट घंटागाड्यांची परेडच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील सहा विभागांत असलेल्या सर्व घंटागाड्यांची बुधवारी नगरसेवक तसेच सहा प्रभाग समित्यांचे सभापती तपासणी करणार आहेत. घंटागाड्यांचे दिलेले आकडे आणि प्रत्यक्षात उपस्थित घंटागाड्यांमध्ये तफावत आढळल्यास थेट आरोग्य अधिकाऱ्यांनाच निलंबित करण्याचा इशारा महापौर रंजना भानसी यांनी दिला आहे. प्रभाग समित्यांचे सभापती, नगरसेवक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छतेसंदर्भात महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी शहरात सुरू असलेल्या अनियमित घंटागाड्यांवरून बैठकीत बरीच वादावादी झाली. प्रभागांमध्ये घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी यावेळी केल्या. प्रत्येक प्रभागात चार ते सात घंडागाड्या असतानाही केवळ एक दोनच घंटागाड्या येत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या. पंधरा दिवस घंटागाडी येत नसल्याचा आरोप विधीसमिती सभापती शीतल माळोदे यांनी केला. सर्वच नगरसेवकांनी एकमुखात घंटागाड्यांबाबत तक्रारी केल्याने महापौर संतप्त झाल्या. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना धारेवर धरत प्रभागनिहाय घंटागाड्यांचा आकडाच सादर करण्याचे फर्मान सोडले.

आरोग्याधिकारी डॉ. बुकाने यांनी प्रभागनिहाय घंटागाड्यांचे आकडेवारी सादर केल्यानंतर महापौरांनी नगरसेवकांना या घंटागाड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व प्रभाग समिती सभापतींनी बुधवारी आपल्या प्रभागात येणाऱ्या घंटागाड्यांची पडताळणी करावी आणि तसा अहवाल महापौराकडे सादर करावेत, अशा सूचना महापौरांनी दिल्या.त्यासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीत त्रुटी आढळल्या तर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी प्रभाग तसेच विभागीय कार्यालयांमध्ये घंटागाड्यांची ओळखपरेड केली जाणार आहे. त्यावरून शहरात प्रत्यक्ष धावणाऱ्या घंटागाड्यांची संख्या समजणार आहे.

तर जागेवरच निलंबन!

आरोग्य अधिकाऱ्याचे घंटागाडी ठेकेदारांशी लागेबांधे असल्याचा आरोप होत आहेत. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असून, ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप महापौर भानसी आणि स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी केला आहे. बुधवारी आरोग्य विभागाने सांगितलेल्या घंटागाड्याची संख्या आणि पडताळणीत सापडलेल्या घंटागाड्यांची संख्या मॅच झाली नाही तर, थेट आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांचे निलंबन करू असा इशाराच महापौरांनी दिला आहे.

बुकाने फक्त बुक्का लावतात!

घंटागाडी आणि स्वच्छतेसंदर्भात वारंवार तक्रार करूनही आरोग्याधिकारी डॉ. बुकाने हे लक्ष देत नाहीत असा आरोप भाजपच्या शांता हिरे यांनी केला. बुकाने केवळ बुक्का लावतात, काम काहीच करत नाहीत, अशी तक्रार करीत त्यांनी बुकानेंच्या गैरकारभाराचा पाढा वाचला. माझ्या प्रभागात एकदाच उदघाटनावेळी घंटागाडी दिसली. त्यानंतर प्रभागात घंटागाडीच दिसली नसल्याचा आरोप हिरे यांनी केला.


समान वितरण नाहीच

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रभागात समान वाटप करण्याचे आदेश आयुक्तांनी देवून महिना लोटला नाही तरी त्याबाबत कार्यवाही केली नसल्याचा आरोप सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केला. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही बुकानेंनी दखल घेतली नाही. बैठकीत बुकाने यांना याबाबत जाब विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना बुकाने यांची फजिती झाली. तातडीने सर्व प्रभागांत कर्मचाऱ्यांचे समान वाटप केले जाईल, असे आश्वासन त्यांनी सदस्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चोरट्यांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय चोरीची दुचाकी खरेदी करणाऱ्या कळवण येथील खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली. वाहन चोरट्यांच्या अटकेमुळे चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सलमान शौकत शेख, अजय जीवन बिराडे आणि खरेदीदार अन्वर सलीम शेख (रा. कळवण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पुणे रोडवरील सिद्धार्थनगर येथील राहुल अशोक दांडगे यांची मोटारसायकल (एमएच १५/डीएच ५३३४) जाकीर हुसेन हॉस्पिटलजवळून चोरीस गेली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास करीत असताना पोलिस नाईक राजेंद्र मोजाड यांना माहिती मिळाली. त्यानुसार संशयित सलमान शौकत शेख याला पोलिसांनी एमएच १५/बीएन २९२० या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याने व त्याचा साथीदार अजय बिराडे यांनी मिळून तब्बल आठ वाहने चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एक दुचाकी कळवण येथील अन्वर शेख यांना विक्री करण्यात आली होती, तर शेखची सिन्नर येथील मावशी हमिदा युसूफ खान यांच्याकडे एक दुचाकी ठेवण्यात आली होती. ही दुचाकीदेखील पोलिसांनी जप्त केली. यामुळे भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील एक, मुंबईनाका हद्दीतील तीन आणि म्हसरूळ हद्दीतील एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक कमलाकर जाधव, हवालदार धनराज पाटील, राजेंद्र मोजाड, मिलिंदसिंग परदेशी, गणेश निंबाळकर, संतोष पवार आदींच्या पथकाने केली.

मालेगाव कॅम्पमध्ये घरफोडी

मालेगाव ः शहरातील कॅम्प भागातील गायत्रीनगर येथील मेहता रेसिडेन्सी या इमारतीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास घरफोडी झाली असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यासह २० हजार रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढल्या असून, शहर पोलिसांना त्या रोखण्यात अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी घरमालक अनिल धामणे यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मेहता रेसिडेन्सी येथे दुसऱ्या मजल्यावर राहत असलेले अनिल धामणे आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धामणे यांच्या घराचे कुलूप तोडून आत घुसले. घरातील दोन कपाटांचे लॉक हत्याराने तोडून त्यात असलेल्या सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह अंदाजे वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान धामणे यांचे शेजारी असलेल्यांना सकाळी या घटनेची चाहूल लागताच त्यांनी नाशिक येथे नोकरीनिमित राहत असलेले धामणे यांचा मुलगा गौरव याला दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लर्न अँड डान्स’ वर्कशॉप रविवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कुठलीही गोष्ट शिकायला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजूला पाहत असतो. एखादा लहानगा अशा प्रकारे शास्त्रीय संगीतातले बारकावे म्हणून दाखवतो की आपण ऐकून थक्क होतो. ८० वर्षांचे आजोबा आपले शिक्षण पूर्ण करत पदवी संपादन करतात, तेव्हा आपल्याला कौतुक वाटते. अशा प्रकारे कुठलेही वयाचे बंधन न ठेवता नवीन गोष्ट शिकण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
येत्या रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी कल्चर क्लबतर्फे ‘लर्न अँड डान्स’ वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये लोकगीतांवर आधारीत लोकनृत्य प्रकार शिकविण्यात येणार आहेत. यात डान्सच्या सर्व स्टेप्स शिकवल्या जाणार आहेत. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचे बंधन नाही अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांचे आजी-आजोबाही सहभागी होऊ शकतात.
फोक फिटनेस या डान्स प्रकारातून आपला फिटनेस कसा ठेवायचा, याबद्दल प्रज्ञा तोरस्कर मार्गदर्शनही करणार आहेत. रविवारी दुपारी ३ वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये हे वर्कशॉप होणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सभासदासाठी १०० तर इतरांसाठी ४०० रुपये फी आहे. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क - ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉक्टरांना’ मिळणार पदव्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत सोहळा आज (दि. १५) विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे होणार आहे. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्यास विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिश महाजन अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक प्रा. डॉ. रंदीप गुलेरिया व मुख्य अतिथी म्हणून टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर आदी उपस्थित राहणार आहेत.

विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ७४ सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. याच बरोबर संशोधन पूर्ण केलेल्या २२ विद्यार्थ्यांना पीएच. डी. प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी २०१६ -२०१७ मध्ये घेतलेल्या पदव‌िका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व इंटर्नश‌िप पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ८ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.

विद्वज्जन मिरवणूकीने सोहळ्यास सुरूवात होईल. या मिरवणूकीत प्रमुख अतिथी अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य सहभागी होतील. दीक्षान्त समांरभात आरोग्य विज्ञान पदवी आणि पदव्युत्तरच्या विविध विद्याशाखांतील अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, विविध विषयांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्यांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत. वैद्यकीय विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांस मेरीट स्कॉलरशिप अॅवॉर्ड रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

शाखानिहाय पदव्या

विविध विद्याशाखा आणि त्यात पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे : आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवी : ६०५, दंत विद्याशाखा पदवी : १६६०, आयुर्वेद विद्याशाखा : ५५९, युनानी विद्याशाखा : ३३, होमिओपॅथी विद्याशाखा : ९५३, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे ३४८, बेसिक बी. एस्सी. नर्सिंग विद्याशाखा : १२०७, बी.पी.टी.एच. विद्याशाखा : १२२, बी. ओ. टी. एच. विद्याशाखा : १४, बी. ए. एस. एल. पी. विद्याशाखा ३५, बी. पी. ओ. विद्याशाखा : ३, डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक सायन्स विद्याशाखा : ३८, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे : ३२, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखा : ८६९, एम.एस.मेडिकल विद्याशाखा : ४४७, डी. एम. मेडिकल विद्याशाखा : ४६, एम. सी. एच. मेडिकल विद्याशाखा : ५६ , पी. जी. डिप्लोमा विद्याशाखा : ३०३, पॅरामेडिकल डिप्लोमा विद्याशाखा : ७६, पी. जी. डी. एम. एल. टी. विद्याशाखा : ७३, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसिन विद्याशाखेचे १३ , एम. एस्सी. मेडिकल बायोकेमिस्ट्री विद्याशाखा : २, एम. बी. ए. विद्याशाखा : १८, एम. पी. एच. एन. विद्याशाखा : ११, एम. डी. एस. विद्याशाखा : ३६१, एम. डी. आयुर्वेद विद्याशाखा : ४८१, एम. एस. आयुर्वेद विद्याशाखेचे १७२, एम. डी. युनानी विद्याशाखेचे १०, एम .एस. युनानी विद्याशाखा : ३, पी. जी. डिप्लोमा आयुर्वेद विद्याशाखेचे १२, एम. डी. होमिओपॅथी विद्याशाखेचे ३८, एम. ए. एस. एल. पी. विद्याशाखा : १७, एम. एस्सी. नर्सिंग विद्याशाखा १५०, एम.पी.टी.एच. विद्याशाखा : १०४, एम. ओ. टी. एच. विद्याशाखा : १२, एम. पी. ओ. विद्याशाखा : ३, ए. डी. एच. एम. विद्याशाखा : २ आणि यातील ७४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकेंद्राच्या सक्षमतेसाठी कुलगुरूंशी चर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेचे केंद्र नाशिकमध्ये आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचे प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. नाशिकचे विद्यापीठ उपकेंद्र सक्षम व्हावे, ही मागणी घेऊन त्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेत नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या.

शहरात असलेले उपकेंद्र सक्षम नसल्याने महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अडचणी येतात. महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांना कामांसाठी विद्यापीठाच्या पुणे कार्यालयातच जावे लागते. विद्यापीठाचा भार हलका व्हावा, यासाठी सात वर्षांपूर्वी नाशिकमध्ये उपकेंद्र सुरू केले. जिल्ह्यातील सुमारे सव्वाशे महाविद्यालये आणि लाखभर विद्यार्थ्यांची विद्यापीठाशी निगडित असलेली कामे सहजपणे व्हावीत, यासाठी हे उपकेंद्र सुरू केले गेले. मात्र अल्प जागा, अपुरे मनुष्यबळ, मर्यादित अधिकार आणि साधनसामग्रीची कमतरता यामुळे उपकेंद्राची अवस्था बिकट आहे.

उपकेंद्र प्रशस्त इमारतीत असावे, पुरेसे कर्मचारी असावेत, उपकेंद्रात विभागवार कक्षनिर्मिती करावी, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, तसेच हॉल तिकिटात बदल करण्याचे अधिकार उपकेंद्राला असावेत, पेपर सेटिंग करण्याचे काम उपकेंद्रातच करावे, परीक्षेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार उपकेंद्रातच स्वीकारावे, पी. जी. आणि पीएच. डी.साठी शिक्षकांना मान्यतेसाठी द्यावी लागणारी हार्ड कॉपी उपकेंद्रात जमा करण्याची सुविधा असावी, महाविद्यालयाच्या प्रोफाइलमध्ये बदल करून देण्याची सोय उपकेंद्रात असावी, अशा सूचना या वेळी गोडसे यांनी कुलगुरूंना केल्या. आपल्या मागण्या योग्य असून, त्यावर लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही करमळकर यांनी दिली. सुसज्य कार्यालयासाठी वीस हजार स्क्वेअर फूट जागेची गरज असून, जागेच्या पाहणीसाठी आपण पुढील आठवड्यात नाशिकला येणार आहोत, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले. या इमारतीतच पैठणी, फळबागा, दाक्ष- कांदा आणि निर्यात या विषयांवर आधारित नव्याने चार अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे करमळकर यांनी सांगितले. के. के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक सेवलीकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images